मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझ्या गावातल्या माणसातला माणूस – म्हादा..! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? मनमंजुषेतून ?

☆ माझ्या गावातल्या माणसातला माणूस – म्हादा..! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

आजही गावी गेलो की म्हादा कुठं ना कुठं भेटतोच. आपल्याच नादात आपल्याशीच बोलत फिरणारा म्हादा गावभर लहानथोरापासून सगळ्यांच्याच ओळखीचा. रंगानं काळासावळा, 

किरकोळ शरीरयष्टी, चेहऱ्यावर साजेशी तेवढीच पांढरी शुभ्र दाढी, डोक्यावर कितीतरी एकावर एक घातलेल्या टोप्या आणि त्या टोप्यांवर टॉवेलवर टॉवेल गुंडाळून स्वतःची अशी वेगळी ओळख बनून गेलेला म्हादा. अंगात लांब हाती मळकट सदरा, खांदयावर तीन ते चार प्रकारचे टॉवेल,  सदऱ्याच्या आत कधी रंगीत कधी पांढरे बनियन किंवा टी -शर्ट, कमरेला सदैव हाफ पँट आणि पायात झिजलेल्या स्लिपरी–असा सदैव जुन्यार नेसूनच मळकटलेला व भरकटलेला म्हादा…..!

माझ्या लहानपणापासून हा म्हादा मला जसा आहे, तसाच आजही दिसणारा. आता वयानं जरासा थकलेला. म्हादाच्याजवळ कुणी कुणी दिलेले नवे कपडे आणि त्या नव्या कोऱ्या कपड्यांच्या त्यानेच केलेल्या चिंध्या. लोकांनी कितीही नवे कपडे दिले तरी म्हादा जुने कपडेच घालतो. सोबत पाच सहा कपड्यांना घेऊन म्हादा अनेक ठिकाणी भटकताना नेहमीच दिसतो. अगदी मायाक्का- चिचणीपर्यंत पायी चालत जाणारा म्हादा कधी आजूबाजूची गावेही फिरून येतो. असा वणवण भटकणारा म्हादा कधी कुणाच्या शेतात जळण काटूक वेचताना, कधी कुणाच्या घराच्या अंगणातला कचरा गोळा करतानाही भेटतो. असं गोळा केलेले जळण कुणाच्याही घरी देतो, कुणाचे अंगण स्वच्छ करतो आणि मगच पोटाला भाकरी मागून घेतो. “कुणाचं फुकट नगं ” म्हणत हसत हसत कष्टाची शिकवण देत राहणारा म्हादा मला नेहमीच भावून जातो. काही तरी काम करून मगच भाकरी मागून पोट भरणारा म्हादा मला शहाण्याहून शहाणा वाटतो……!

कुणी भेटलं तर एखादा नवा टॉवेल, एखादी नवी टोपी किंवा चहासाठी पाच दहा रुपये मागणाऱ्या म्हादाच्या चेहऱ्यावर दिसणाऱ्या निरागसतेला पाहून म्हादा विसरता म्हणता विसरता येत नाही….! दिवसभर फिरणारा म्हादा, रात्री शाळेला किंवा देवळाला आपलंसं करून बडबडत कधी झोपतो ते कळतच नाही.

मी माझ्या लहानपणापासून म्हादाला असाच पहात आलोय. सर्वांशी कधी चांगलं तर कधी फटकळ बोलणारा म्हादा आता थकलाय. त्याच्या सोबत आता त्याची काठी असते. म्हादा भटकत असताना कुत्री अंगावर धावून जातात, पण म्हादा आपला बडबडत त्यांना काठीनं हाकलत जणू त्यांच्याशीच गप्पा मारत असतो.

म्हादा गावातल्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला सुद्धा हजर असतो. तिथली झाडलोट करून निवद आणि फळं खाताना म्हादाला काहीच वाटत नाही. गावात एखादा कार्यक्रम असला की म्हादा जेवणाची अपेक्षा ठेवून तिथे जात असतो. पंगतीच्या बाजूलाच दूरवर बसून जेवतो. वरातीत मनसोक्त नाचून घेतो. कुणी त्याला खेकसतं, कुणी त्याची टिंगल टवाळी करतं. म्हादा पण “ए लसूण गड्डया ” म्हणत त्याच्याच तालात मग्न असतो. अगदी मनसोक्त उड्या मारत नाचणारा म्हादा इतरांनाही नाचवत राहतो. म्हादा ज्याला भेटतो त्याला नवा टावेल किंवा टोपी मागत राहतो. पण नवे कपडे त्याच्याजवळ काही वेळच असतात. म्हादा नवं कापड फाडून कधी चिंध्या करेल सांगता येत नाही.ज्यानं एखादं नवं कापड दिलं ते गावभर दाखवत म्हादा सर्वांना सांगत सुटतो.

परवा म्हादा सहजच भेटला. मरीआईच्या देवळाच्या कट्टयावर कापडांची जोडतोड करत बडबडत बसलेला. त्यानं माझ्याकडं बघून ” कवा आलासा ” म्हणाला. त्याच्याशी थोड्या गप्पा मारल्या. बोलत बोलत त्याच्यातल्या म्हादाला शोधत राहिलो. जाता जाता म्हणाला ” व्हय नवा टावेल असल तर बघा की, देताय नव्हं ,मी येतु की घरी.” आणि असं बरंच काही बडबडत राहिला. स्वतःलाच सांगत राहिला. त्याचा एक फोटो घ्यावासा वाटला. बोलत बोलत फोटो घेत असतानाच “व्हय व तेवढा नवा टावेल द्या की बाकी काय नगं ” पुन्हा पुन्हा असं बडबडत राहिला..!

असा सदैव भटकत आणि पोटासाठी जेवढं हवं तेवढच मागणाऱ्या माझ्या गावच्या म्हादानं त्याच्या अस्तित्वाचं नाव अजून तरी राखून ठेवलय. ” मी काय येडा हाय का व्हय ” म्हणणारा म्हादा माझ्या गावातल्या माणसातलाच माणूस म्हणून मला नेहमीच असा भेटत राहतो……..!

(” माणसातली माणसं ” या माझ्या आगामी पुस्तकातील एक पान )

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर..

बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

मो ९४२११२५३५७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ दिवा संध्याकाळी किती वाजता लावावा.….किशोर अभ्यंकर ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर

? इंद्रधनुष्य ?

 ☆ दिवा संध्याकाळी किती वाजता लावावा.….किशोर अभ्यंकर ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆ 

(सांजवात ….एक अनुभव)

नमस्कार,

साधारण २५ वर्षापूर्वी मी आणि माझे पती पवई येथील चिन्मयानंद स्वामींच्या आश्रमात गेलो होतो . तेथील शंकर मंदिराच्या आवारात आम्ही बसलो असता ..तेथे बाजूला बसलेल्या एका अमराठी हिंदी भाषिक वयस्कर काकांनी पण आमच्या गप्पात भाग घेतला. त्यांनी एक महत्वपूर्ण माहिती दिली ती अशी—–

काका: आपण सर्वजण संध्याकाळी देवाला दिवा लावतो.

आम्ही : हो बहुतेक सर्व हिंदू लोकं.

काका : का लावतो?

आम्ही : पूर्व परंपरा, घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते !

काका : वेळ कोणती ?

आम्ही : सूर्यास्तानंतर घरच्या गृहिणीच्या सवडीनुसार !

काका : असे का ?

मी: घरातल्या पुरुषवर्गांनी आम्हाला दिलेला हा एकमेव अधिकार.  

काका: आता मी काय सांगतो ऐका… योग्य वाटल्यास त्याचे आचरण करा.. त्याची अनुभूती किंवा प्रचीती आल्यास इतरांना सांगा 

काका: दिवा नेहमी संध्याकाळी ७.३७ मिनिटांनी लावावा.

आम्ही: ७.३७ च का? सर्वांची घड्याळे सारखी नसतात … मग त्याचे काय?

काका : असे सांगितले जाते की जगाची जगन्माता श्री कामाक्षीदेवीच्या मंदिरात तेजोवात अखंड तेवत असते  परंतू  तेथेही एक सांजवात  संध्याकाळी ७.३७ वाजता लावली  जाते. ती सांजवात सूक्ष्म रूपाने अखंड भारत वर्षात घरोघर जाऊन जेथे जेथे दिवा लागला असेल त्या घराचे क्षेम कुशल विचारून पुन्हा जगन्माता श्री कामाक्षीदेवीच्या  मंदिरात तेवत असलेल्या तेजोवातीमध्ये विलीन होते.  त्या घराची, घरधन्याची सुख-दुःखे सांगते. आई कामाक्षी देवी त्याप्रमाणे सर्व अमंगल, अडचणी दूर करते.

आम्ही: ह्या विज्ञान युगात हे खरे कोण मानणार. ह्यावर कोण विश्वास ठेवणार?

काका : तुम्ही तर ठेवाल ना ? तुम्हाला अनुभव आल्यावर इतरांना सांगा किंवा मी नेहमी येथेच असतो मला येऊन सांगा !

आम्ही त्याप्रमाणे दररोज संध्याकाळी ७.३७ ला दिवा लावणे सुरु केले. खरं सांगू  का? काही दिवसाच्या आत आमच्या घरात, आमच्या आर्थिक परिस्थितीत आमूलाग्र बदल झाला. हा अनुभव आम्ही इतरांना सांगितला …त्यानाही खूप चांगला अनुभव आला … तुम्हालाही असा अनुभव येवो ही इच्छा!

हा आमचा अनुभव ऐकायला ते काका त्या दिवसापासून तेथे आजतागायत दिसले नाहीत.

आई कामाक्षी देवी तुम्हा सर्वांचे भले करो !!!

 – किशोर अभ्यंकर

संग्राहक : श्री अनंत केळकर   

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अप्रूप पाखरे – 25 – रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ अप्रूप पाखरे – 25– रवींद्रनाथ टैगोर ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

[११७]

या माझ्या लहानशा जगात

राहतो मी दिवसरात्र जपत

क्षुद्र …क्षुल्लक … क्षीण गोष्टी

उचलून घे ना मला

तुझ्याच जगात

आणि दे स्वातंत्र्य

अगदी आनंदाने

स्वत:लाच हरवून टाकण्याचे

पुसून टाकण्याचे … 

 

[११८]

परिवर्तनाचं वैभव असतो

काळ म्हणजे

पण घड्याळ जेव्हा

विडंबन करतं काळाचं

तेव्हा शिल्लक रहातं

केवळ परिवर्तन

एका क्षणाचं दुसर्‍या क्षणात

वैभवाचा मागमूसही

नसतो त्यात….

 

[११९]

दिवा विझल्यावर

अधिकच मादक बनून

मला बिलगणार्‍या

माझ्या प्रियेसारखी

चारी बाजूंनी

जाणवत रहाते मला

ही काळोखी रात्र

विलक्षण सौंदर्याचा

रेशमी पोत असलेली

 

[१२०]

धुकं पूर्णपणे वितळल्याशिवाय

स्वच्छ प्रकाशात नाही

सकाळचा सूर्य

तशी

माझं नाव पुसून टाकल्याशिवाय

ओसंडत नाही

तुझ्या नामाची माधुरी  

 

मूळ रचना – स्व. रविंद्रनाथ टैगोर 

मराठी अनुवाद – रेणू देशपांडे (माधुरी द्रवीड)

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सहज आपलं सुचलं म्हणून…. ☆ प्रा. तुकाराम पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

?  विविधा  ?

☆ सहज आपलं सुचलं म्हणून…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

अनुभवलेल्या प्रसंगांच्या कडू गोड बिया काळजात खोलवर रुजून बनले असते त्यांचे विशालवृक्ष आणि पुनः प्रत्ययाची सुमधुर फळ वारंवार चाखायला मिळाली  असती तर किती मजा आली असती जीवनात.

आणि महत्त्वाचं म्हणजे काही वेडंवाकडं करण्याला, वागण्याला कुणी धजावलच नसतं आयुष्यात. सर्वात महत्त्वाचा फायदा हाच झाला असता की घडवणारा व उपभोगणारा बांधील राहिला असता एकामेकाला. संपला असता जीवनकलह, मिटल्या असत्या व्यथा विवंचना उरला असता निखळ आनंद कायमचा . परस्परांना बांधून ठेवणारा, अतूट . पण करणार काय?  आता सुपीक काळीज ही उरलं नाही आणि प्रसंगांच्या बिया ही उगवणक्षम राहिलेल्या नाहीत. हा सुधारलेल्या गतीमन काळाचा महिमा, स्विकारावाच लागेल भविष्याचा कसलाही विचार न करता.  प्राक्तनान दिलेली भेट म्हणून पण भविष्याचा विचार करण्याआगोदर जे पेरलजात तेच उगवतं हे माहीत नव्हतका ? भौतिक सुखाची चटक लागलेले आपण जमानाच बदलला असं म्हणताना , तो कुणी बदललाय याच्यावर  कधी विचार तरी करतो का ? आपला सहभाग आहेच ना त्यात ? मग आपण मौन पाळून गप्प का ? जमाना बदलत रहातो. ती काळाची गरजही आहे.  पण जुनं जे हितकारक आहे.सुंदर आहे, ज्याच्यातून ऐश्वर्याची उंची मोजली जाते. जे सुखकारक असून परमानंद देते. जे गुण आणि अगाध आहे , माणसाला  माणसात ठेवण्यासाठी आवश्यक आहे ते टिकवण्यासाठी आपण काय केलं. की त्याची मोडतोड करण्याला हातभार लावण्याचाच अपराध केला.हे नाहीच तपासलं कधी. कारण आपण मनाचे मिंधे. सुखाना लाचावलेले. थोडेका होइना पण अपराधी आहोतच ना.

केलेला अपराध मान्य करायलाही मनाचा मोठेपणा असायलाच हवा. आपलं चुकत कुठं हे सगळ्यांनाच माहिती असतं. पण ते मान्यकरण्याची हिंमतच हरवली आहे आपल्यातली. मग उगीच कशाला दूस-याच्या नावावर बील फाडायची. माणसाला स्वत:चा टेंभा   मिरवण्याची जुनीच खोड आहे . त्यामुळे काय-काय घडलंय यांचे अनेक दाखले पुराणांन आणि इतिहासान नोंदवून ठेवले आहेत. ते वाचून  शहाणपण शिकेल तर तो माणूस कसला. कारण तो सजीवांच्यातला सर्वश्रेष्ठ जीव आहे, हे त्याला माहीत आहे. म्हणून  “मी करीन तीच पूर्व ” ही त्यांची घमेंड. तेवढ्याच तकलादू बळावर त्यान निसर्ग नियमांना बासनात गुंडाळून ठेवलं . त्यांच्यावर आक्रमण करत आपल्याला हवे तसे बदल घडवण्याचा चंग बांधला आणि टाकला बदलून जमाना आपल्या मर्जीप्रमाण. मग  बदलाचे परिणाम भोगताना आता काय म्हणून गळा काढून रड  मांडायचं.  हे सारं करताना आपल्या पेक्षाही एक वरचढ शक्ती या विश्वात आहे हेच आपण सोईस्कर रित्या विसरलोय . जग नियंत्यान घालून दिलेले आणि अनादी अनंत काळापासून चालत आलेले नियम पाळायला नकोतका? ते मोडले,की   गालफाड सुजेपर्यंत पडत जाणा-या थपडा  सोसाव्या लागतात. सध्या आपण हेच अनुभवत नाही काय ? तशा त्या पुढेही वाढतच रहाणार आहेत. निदान हे तरी लक्षात घेऊन पावलं उचलली जावीत हे समजायला हवं माणसाला.

 

© श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हैदराबाद मुक्ती-संग्राम – भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ हैदराबाद मुक्ती-संग्राम – भाग-3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(राष्ट्रसेविका समितीच्या यावर्षीच्या हस्तलिखितामघ्ये  सुश्री पुष्पा प्रभुदेसाई यांच्या या लेखाची निवड झाल्याबद्दल ई – अभिव्यक्ती समूहातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, व पुढील साहित्य-वाटचालीसाठी शुभेच्छा.)  

(रोज सकाळी मागचे दार उघडून, आई जनावरांना गोठ्यात पाहून, हात जोडायची. दहा महिने दिवस दिवस  मोजत काढले .अनुभव लिहू तितके कमी ! ) इथून पुढे —-

निजामाने  संयुक्त राष्ट्रसंघाकडे भारताच्या  संभाव्य हस्तक्षेपाबद्दल तक्रार नोंदवली. परिस्थिती ओळखून 9 सप्टेंबर 1948 रोजी श्री. वल्लभभाई पटेल व पंडित नेहरू यांनी सशस्त्र दलाच्या कारवाईचा निर्णय घेतला . रझाकारांची  दहशत आणि जुलूम मोडून काढण्यासाठी ‘कबड्डी ‘, ऑपरेशन सुरू केले. त्यानंतर 13 सप्टेंबर 1948 ला पहाटे चार वाजता जनरल राजेंद्रसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली मेजर जनरल जयंतीनाथ चौधरी यांनी ‘ पोलो ‘ नावाने सैनिकी अँक्शन सुरु केली.  संस्थानच्या तिन्ही बाजूंनी सैन्याने प्रवेश सुरू केला. दोन तासात नळदुर्ग व  तुळजापूर आणि संध्याकाळपर्यंत दौलताबाद काबीज केले. औरंगाबादकडून मेजर जनरल डी. एस. बार यांनी चढाई सुरू केली. तुंगभद्रेवरचा पूल ताब्यात घेतला. तेरणा नदीवरचा पूल उडवला. वरंगळ व बिदरच्या विमानतळावर बाँबफेक केली. 14 सप्टेंबरला जालना, उस्मानाबाद ,येरमाळा, कर्नूल येथील रझाकारांचा  प्रतिकार मोडून काढला.  हुमणाबाद आणि शहागडचा पूल ताब्यात घेतला. 15 सप्टेंबरला औरंगाबाद फत्ते झालं. निजामाचे सैनिक आणि रझाकार मिळून बाराशे जण मारले गेले. भारताचे दहा जवान धारातीर्थी पडले .निजाम सेनेचे प्रमुख अल इद्रिसने 17 सप्टेंबर 1948 रोजी शरणागती पत्करली. कासिम रझवी पाकिस्तानात गेला. अटक टाळण्यासाठी निजाम उर्फ मीर उस्मान अली खान याने हैदराबाद रेडिओवरून शरणागती जाहीर केली. लगेच २० सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रसंघाकडे केलेली तक्रार मागे घेतली. ” निजामाच्या राजवटीवर टाच आणण्याचा प्रयत्न केला तर लक्षावधी मुस्लीम प्रतिकारासाठी उतरतील ” अशी धमकी दिली होती. योगायोग असा की कारवाई झाली, त्याच दिवशी जिना यांचं निधन झालं. प्रत्यक्षात हैदराबादचं विलीनीकरण सहजपणे झालं. हैदराबादला  तिरंगा मोठ्या डौलाने फडकायला  लागला. लोक  निजामाच्या जाचातून मुक्त झाले. हैद्राबाद संस्थान, देशाचा अविभाज्य भाग झाला. लोक आनंदोत्सव साजरा करू लागले. हैदराबाद मुक्त झालं तरी, अन्याय्य समाजव्यवस्था मोडून काढण्यासाठी शेतकऱ्यांचा सशस्त्र मुक्ती-लढा चालू ठेवणं आवश्यक आहे, असं म्हणून कम्युनिस्टांनी 1951 पर्यंत आपला लढा चालू ठेवला. 21 ऑक्टोबर 1951 ला देशातील मोठा सशस्त्र लढा संपुष्टात आला. दोनशे वर्षांची इस्लामी राजवट संपुष्टात आली. संपूर्ण भारताचं स्वप्न साकार झालं.

रोज सूर्य उगवतच होता.  पण 15 ऑगस्ट 1947 दिवशी उगवणारा सूर्य वेगळा होता. स्वातंत्र्याची एक रम्य पहाट घेऊन तो उगवला होता. कवी वसंत बापट यांना तेव्हा इतके छान शब्द सुचले होते—-

“शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट.

नव अरुणाचे होऊ आम्ही प्रतिभाशाली भाट “

यावर्षी, भारताच्या 75 वर्षांच्या स्वातंत्र्यदिनाच्या वर्षी, म्हणजेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या वर्षी, सर्वांनी मिळून  नव अरुणाची  स्तुतिसुमने गाऊया. आणि पुढील शताब्दी महोत्सवापर्यंत महासत्ता होण्याचे स्वप्न साकार करू या.

समाप्त

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोकणचं पाणी…भाग 1 – श्रुती आगाशे ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ कोकणचं पाणी…भाग 1 – श्रुती आगाशे ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

बुधवारी आमच्या एका स्वयंसेवक मित्राने आम्हा चौघींना चिपळूणच्या एका शाळेत सोडलं आणि नंतरच्या ४ दिवसांत आयुष्य किती unpredictable आहे ह्याची क्षणोक्षणी प्रचिती येणारे अनुभव आले !

प्रत्येक गोष्ट ही योजलेली असते आणि त्याचा नियोजनकर्ता वेगवेगळ्या पातळ्यांवर मनुष्याची परीक्षा पाहत असतो हा विचार कोरोना आल्यापासून वेळोवेळी पटतो. 

मागच्या सोमवारी ऑफिसचं काम करत बसले होते. मनात एकीकडे आठवड्याभरात काय कामं कधी आणि कशी करायची आहेत याचे विचार चालू होते. पण, man proposes and God disposes ! त्यामुळे एका मित्राचा मेसेज आला आणि त्यानंतरच्या दहाव्या मिनिटाला माझं मनाशी पक्कं ठरलं होतं की मी कोकणात होणाऱ्या पूरग्रस्तांच्या मदतकार्यात सहभागी होतेय. 

‘आतून आलेलं gut feeling कधीच झिडकारून टाकायचं नाही, त्यावर फक्त विश्वास ठेवायचा ‘ हे मला आता पार कळून चुकलंय. 

मदतकार्यासाठी संघाचे स्वयंसेवक जाणार होते, पण मी मुलगी असल्याने तिथे माझी राहण्याची व्यवस्था नसेल आणि मदतीपेक्षा आपली अडचणच होईल ही भावना सर्वात पहिले मनात आली. पण तरीही एका स्वयंसेवक मित्राला फोन केला आणि माझ्या मनातली ही भावना त्याला सांगितली. त्यावर ‘अगं, मुलींचीही तितकीच गरज आहे तिथे ‘ हे अनपेक्षित उत्तर ऐकून मी थक्क झाले.  अर्ध्या तासात ६ जणींची नावं आली.

पुढची समस्या होती ऑफिसमधून सुट्टी मिळण्याची ! पण माझ्या अधिकारी आत्मकेंद्री नसल्यामुळे तेही शक्य झालं आणि बुधवारी आम्ही चार जणी बाकी १७ मुलांबरोबर कोकणात गेलो.

I told you, never doubt a gut feeling!

(दरम्यान, आई-बाबांना विचारण्याची एक formality सुद्धा यशस्वीरित्या मी पार पाडली.)

मुलींची व्यवस्था चिपळूणमध्ये होती आणि कामही चिपळूणमध्येच करायचं होतं. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ हे management चे एक उत्तम institute आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही हे अनुभवाशिवाय पूर्णपणे पटणार नाही. 

आम्ही चिपळूणमध्ये पोहचलो, तिथे महिला विभागाची प्रमुख भावनाताई (जिच्या एका ‘या’ वर आम्ही तिथे गेलो होतो), ती म्हणाली,  ‘शांतपणे बसा, चहा घ्या आणि आजूबाजूला जे घडतंय त्याचं निरीक्षण करून हे वातावरण स्वतःत सामावून घ्या. मग आपोआप कामाला लागाल.’ आम्ही exact तसंच केलं आणि पुढच्या दहाव्या मिनिटाला आम्ही त्या व्यवस्थेचा एक भाग होऊन गेलो. पूरग्रस्तांसाठी भरपूर ठिकाणाहून विविध प्रकारचे दान येत होते. त्याचं वर्गीकरण करून वितरणासाठी kits बनवणं हे प्रामुख्याने आमचं काम होतं. मदतकार्यासाठी जाताना तिथे जाऊन गाळ साफ करणं, लोकांची घरं साफ करणं, आणि घाण, रोगराई असा कसलाच अतिविचार न करता पडेल ते काम करणं ही तयारी मनात घेऊन आम्ही गेलो होतो. पण, again, man proposes and God disposes. आम्हाला काम होतं kits तयार करण्याचं ! अपेक्षेप्रमाणे काम न मिळूनही तितक्याच निष्ठेने आणि तितक्याच सेवाभावाने काम करता आलं पाहिजे हा आयुष्यासाठी खूप मोठा अनुभव त्या क्षणी आम्हाला मिळाला. हे एक life management skill आहे जे कुठेच शिकवलं जात नाही आणि शिकवून समजण्यासारखंही नाही. आम्ही कामाला लागलो !

तिथे जवळजवळ २०० स्वयंसेवक आणि सेविका त्यांना नेमून दिलेली कामं मन लावून करत होती. कुणी ट्रकमधून सामान उतरवत होतं, कुणी टेम्पोत सामान भरत होतं. एक सेविका आणि एक स्वयंसेवक निष्ठेने चारही दिवस स्वयंपाकाच्या खोलीत सगळ्या कार्यकर्त्यांसाठी आणि तिथे येणाऱ्या प्रत्येक भुकेल्या व्यक्तीसाठी स्वयंपाक करण्याचं काम करत होते. एक जण पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करत होता, काही जण स्वच्छतागृहांची आणि एकूणच शाळेची स्वच्छता राखली जाईल यासाठी कार्यरत होते. काही जण एका वर्गात बसून याद्या, नियोजन करत होते तर काही जण बाहेर पूरग्रस्त ठिकाणी जाऊन सामानाचं वितरण, लोकांच्या समस्या जाणून घेण्याचं काम करत होते. काही जणांनी वाहनचालकाची जबाबदारी घेतली होती तर काही जण चालू असलेल्या कामांची नोंदणी करत होती. प्रत्येक जण त्याला मिळालेलं काम सर्वोत्तम करण्याच्या प्रयत्नात होता आणि ह्यालाच सज्जनशक्ती म्हणतात. ही सगळी सज्जन माणसं एकत्र आणून त्यांची सज्जनशक्ती करण्याचं काम संघ गेली जवळपास ९०हून अधिक वर्ष करत आहे !

क्रमशः….

लेखिका : -श्रुती आगाशे.

संग्राहक : – सुहास सोहोनी 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ हैदराबाद मुक्ती-संग्राम – भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

? इंद्रधनुष्य ?

☆ हैदराबाद मुक्ती-संग्राम – भाग-2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

(राष्ट्रसेविका समितीच्या यावर्षीच्या हस्तलिखितामघ्ये  सुश्री पुष्पा प्रभुदेसाई यांच्या या लेखाची निवड झाल्याबद्दल ई – अभिव्यक्ती समूहातर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन, व पुढील साहित्य-वाटचालीसाठी शुभेच्छा.)  

(न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर हैदराबाद मुक्ती लढ्याचे साक्षेपी अभ्यासक होते.) इथून पुढे —

निजामाने आंदोलने, चळवळी यावर दडपशाही आणि सैन्य दलाचा वापर सुरू केला. त्यासाठी त्यांनी, ‘ इत्तेहादुल मुस्लिमिन ‘ ही राजकीय संघटना, आणि ‘रझाकार ‘ हे सशस्त्र स्वयंसेवक दल स्थापन केले. आणि दहशत माजवायला, त्यांना प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. रझाकार यांचा आक्रमक व क्रूर नेता ,लातूरचा ‘कासीम रिजवी’ याला हाताशी धरून, सांप्रदायिक भावनेला खतपाणी घालणाऱ्या वृत्तीला उत्तेजन दिलं. शेतातील उभी पिके कापणे, गोठ्यातील जनावरे पळवून नेणे, स्त्रियांना पळवून नेणे, बलात्कार करणे, पुढाऱ्यांचे खून करणे, किती किती म्हणून अमानुष अत्याचार चालले होते. 1946 ते 48  अशी 2 वर्षे जनतेने भीतीदायक वातावरणात  काळरात्रीसारखी काढली .संस्थानात स्त्रियांचे स्थान बालविवाह ,बालविधवा, अज्ञान, निरक्षरता ,दारिद्र्य, अंधश्रद्धा यांनी बरबटलेले होते. अशा परिस्थितीतही ,अनेक कर्तबगार स्त्रियांनी या सत्याग्रहात उडी घेतली होती. दगडाबाई शेळके, वाघमारे ,कुँवर ,पोटेचा, वैशंपायन ,सुशिलाबाई दिवाण यांनी केलेला कामातील सहकार खूपच महत्वपूर्ण ठरला. पत्रके वाटणे ,ग्रंथालयाचे काम, सांस्कृतिक कार्यक्रमातून जनजागृती ,अशी कामे त्या करत. “हैदराबाद मुक्ती संग्रामातील महिलांचे योगदान” हा एक स्वतंत्र संग्राम म्हणून ओळखला जातो. मला अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो की त्या काळी स्त्रीशिक्षणाच्या तळमळीने, सुशिलाबाई दिवाण यांनी लातूरला मुलींची शाळा सुरू केली. त्या माझ्या मैत्रिणीच्या आई होत. त्या शाळेच्या सुवर्णमहोत्सवाच्या समारंभात, त्यावेळचे  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी यांनी व्यासपीठावरून उतरून, त्यांना नमस्कार करून, सत्कार करून, त्यांच्या कार्याची पोचपावती दिली .

कासीम रझवीचा  हैदोस चालू होता. जवळा हे गावच्या गाव जाळून टाकलं. अनेक कुटुंबांनी स्थलांतर केलं. निजाम हा रेडिओ, वृत्तपत्रं, भाषणं, आदिद्वारे भारत विरोधी प्रचार करून, स्वतंत्र राष्ट्राच्या मागणीचा पुनरुच्चार करीत असल्याचं स्पष्ट झालं .माऊंटबॅटननेही  पुढाकार घेतला. पण सगळे प्रयत्न निष्फळ ठरले .अखेर सैनिकी कारवाईचा गांभीर्याने विचार होऊ लागला. ही बातमी निजामाला समजली. त्याने अगोदरच, पोर्तुगाल आणि पाकिस्तानकडून हवाईमार्गाने, तीस लाख  पौंड किमतीची शस्त्रास्त्रे खरेदी करून ठेवली होती. 29 नोव्हेंबर 1947 रोजी त्याच्यासोबत ‘ जैसे थे ‘ करार केला होता. ( भारताशी पूर्ववत् संबंध व संस्थानात शांतता राखावी .) तो करार धुडकावून ,त्याने पाकिस्तानकडे मदत मागितली. कराचीमध्ये आपल्या संस्थानाच्या प्रतिनिधीची नेमणूक केली. भारताचे 20 कोटीचे कर्जरोखे पाकिस्तानला कर्ज देण्यासाठी वापरले.

अखेरचा उपाय म्हणून 9 सप्टेंबर 1948 रोजी गृहमंत्री वल्लभभाई पटेल आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पोलीस ॲक्शन घेण्याचा निर्णय घेतला. आता प्रत्यक्ष लढाई सुरू होणार होती .त्याच दरम्यान, मला माझ्या आईवडिलांनी घेतलेल्या अनुभवाचा अभिमानाने उल्लेख करावासा वाटतो. त्यावेळी मिरज लातूर रेल्वेमार्गावर ढोकी नावाचे स्टेशन होते. निजाम संस्थान, आणि भारताच्या सरहद्दीवरचे ते स्टेशन. माझे वडील तात्या तेथे स्टेशन मास्तर म्हणून रुजू होते. स्टेशनच्या संरक्षणासाठी इब्राहिम, रसूल आणि महंमद हे रखवालदार होते. अनेक स्टेशन मास्तरांनी, आपल्या कुटुंबांना गावी पाठवले होते. अपवाद माझी आई.! स्टेशन मध्ये रोज खुनाच्या, अंदाधुंदीच्या नवनवीन बातम्या यायच्या. गावचा पाटील किशनदास गरड साडी नेसून चुलीजवळ जाऊन बसला. रझाकारांनी ओढत त्याला बाहेर आणले. आणि त्याच वेषात  खच्च केले. रेल्वे स्टेशनमध्ये आप्पा पोर्टरचा खून झाला. तात्या ‘नको नको रे ‘ म्हणत असता “आता तुम्हालाही फुंकून टाकू. गप्प बसा ” ,शब्द ऐकायला येऊ लागले. मुसलमान स्त्रिया बाळांना दूध मागण्यासाठी मागच्या अंगणात आल्या. जात धर्म न पाहता तंग वातावरणातही  आईने माणुसकी जपली. म्हैस व्यालेली होती .लहान बाळांना  का जात धर्म असतो ? असं म्हणून बाळांसाठी दूध  देऊन त्यांना परत पाठवून दिलं .तात्याही गावकऱ्यांना शक्य होईल ती मदत करत होते. रोज सकाळी मागचे दार उघडून, आई जनावरांना गोठ्यात पाहून, हात जोडायची. दहा महिने दिवस दिवस  मोजत काढले .अनुभव लिहू तितके कमी !

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ कोकणचं पाणी…भाग 2 – श्रुती आगाशे ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी

श्री सुहास सोहोनी

? मनमंजुषेतून ?

☆ कोकणचं पाणी…भाग 2 – श्रुती आगाशे ☆ संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆ 

(ही सगळी सज्जन माणसं एकत्र आणून त्यांची सज्जनशक्ती करण्याचं काम संघ गेली जवळपास ९०हून अधिक वर्ष करत आहे ! ) इथून पुढे —

किट्स बनवण्याव्यतिरिक्त, सर्व्हे, सामानाचे वितरण अशा कामांचा अनुभवही या चार दिवसांत आम्हाला मिळाला. कल्याणहून निघण्याच्या आदल्या दिवशी तिथल्या भटक्या प्राण्यांसाठीही काहीतरी करायला हवं  असा विचार मनात आला. दुसऱ्या दिवशी प्राण्यांच्या डॉक्टरची भेट घेऊन पूरानंतर प्राण्यांना होणाऱ्या आजारांविषयी आणि त्यांना देण्याच्या औषधानाविषयी समजून घेतलं आणि एक box भरून औषधं बरोबर घेऊन गेले. या क्षेत्रात थोडासा अनुभव असल्याने आपण हे करू शकतो हा आत्मविश्वास होता. चिपळूणला गेल्यावर पहिल्या दिवशीच्या अहवाल बैठकीत हा विषय सांगितला आणि ४ दिवसांत एकूण ९ भटक्या, पाळीव कुत्र्यांना जुलाब, fungal infection यासाठीची treatment-औषधं देऊ शकले. त्यांच्यातील सगळेच पूर्ण बरे झाल्याचे अजून कळलेले नाही, पण काही कुत्रे बरे होत असल्याचे कळले आहे. इतक्या मोठ्या संकटात भटके प्राणी ही आपली शेवटची priority असते, पण आपल्या अनुभवाचा सेवकार्यात उपयोग होत असेल तर ५ दिवसांत ते काम पूर्ण करून यावं असं वाटलं म्हणून परिस्थिती सावरण्याचा आणखी एक लहानसा प्रयत्न केला.

पुराने कोकणची भयंकर अवस्था केली आहे. माणसाचं घर वाहून जातं म्हणजे काय? घर वाहून जाणे हा विचारच किती भीतीदायक वाटतो ! २४ तासांत घरातल्या तीन भिंती कोसळून एकंच भिंत शिल्लक राहते याहून मोठं संकट काय असू शकतं एखाद्यावर? तिथल्या स्थानिक स्वयंसेवकांनी आम्हाला त्यांचे अनुभव सांगितले. दररोज संध्याकाळी एक अहवाल बैठक व्हायची. त्या बैठकीत बसलेला प्रत्येक जण मनाने आणि शरीराने पूर्ण थकलेला असायचा. पण बैठकीच्या सुरुवातीला म्हटलेल्या गीताने मनातली विषण्णता जाऊन पुन्हा उमेद निर्माण व्हायची आणि हे केवळ वर्णनाचे शब्द नाहीत हा खरा अनुभव आहे. अहवाल बैठक ही सर्वांत महत्त्वाची बैठक होती माझ्यासाठी या ४ दिवसांत! वेगवेगळ्या विभागातील कामांचे निवेदन आणि अनुभव यांत आम्ही सांगायचो. स्वयंसेवकांनी सांगितलेले अनुभव ऐकून अनेकदा अश्रू अनावर व्हायचे ! पैसे मिळतील या आशेने साफसफाई करण्यासाठी आलेली गडी माणसं परिस्थिती पाहून सेवाकार्याला लागतात, दिलेल्या किटमधली फक्त मेणबत्ती काढून घेत एक पूरग्रस्त त्याला फक्त मेणबत्तीचीच गरज असल्याचे सांगत बाकीचे किट परत करतो, अख्खा संसार वाहून गेलेला असताना दान म्हणून मिळालेल्या किटमध्ये सोन्याचं कानातलं सापडलं म्हणून दुसऱ्या दिवशी ते कानातलं एका स्वयंसेवकाकडे परत करणारी, स्वतःचं घर अर्ध पाण्याखाली जाऊन नुकसान झालेलं असताना माझ्यापेक्षा ज्यांची घरं पूर्ण पाण्याखाली आहेत त्यांच्यावरचं संकट मोठं आहे असं म्हणत मदतीला धावून जाणाऱ्या माणसांबद्दल ऐकून हृदय गदगदून यायचं. ही सगळी माणसं नक्कीच विश्वकर्त्याने घेतलेल्या परीक्षेत पास झालेली माणसं आहेत असं वाटायचं.

या सगळ्यांत आमची निवासाची व्यवस्था शाळेतच असेल असं गृहीत धरून आम्ही तशा तयारीनिशी गेलो होतो. पण, God surprises us too!

आमची राहण्याची व्यवस्था अथर्व वैशंपायन या एका स्वयंसेवकाच्या घरी केली होती. त्यांचं आख्खं कुटुंब मागचे ५ दिवस या कार्यात सक्रीय होतं. आम्ही सगळे एकत्रच रात्री घरी जायचो. घरी गेल्यावर कोकणातल्या माणसांचा खरा गोडवा आम्हाला अनुभवायला मिळाला. थकून भागून स्वतःच्या घरी आल्यावर जसं ‘हुश्श !’ वाटतं, तसंच्या तसं आम्हाला रात्री त्यांच्या घरी गेल्यावर वाटायचं, इतका जिव्हाळा देणारी माणसं आम्हाला लाभली. अथर्वची बायको आणि आता आमची मैत्रीण जाई, रात्री १०-१०:३० वाजता आलं घालून कडक चहा करायची ! कोकणातली माणसं without any regret कधीही चहा पिऊ शकतात हा बाहेरून पाहताना किती आनंदाचा विषय वाटतो ! जाईच्या चहाने दिवसभराच्या कामाचा शीण खरोखर निघून जायचा. मग गप्पा, इकडच्या तिकडच्या ओळखी, वेगवेगळे विषय या सगळ्याने दिवसभर पाहिलेली आणि ऐकलेली चित्तविदारक चित्र शांत होऊन गाढ झोप लागायची. 

शेवटच्या दिवशी संध्याकाळी काही मोकळा वेळ मिळाला. काम करून अक्षरशः पायाचे आणि पाठीचे तुकडे पडले होते. पण, प्राजक्तामावशीने आम्हाला पूर्वांचलच्या मुलींच्या वसतिगृहात जाण्याबद्दल विचारलं. आम्ही सहज नाही म्हणू शकलो असतो. पण संघकामातलं spirit च वेगळं आहे. आम्ही गेलो त्यांना भेटायला ! ‘मनाचे सौंदर्य हेच खरे सौंदर्य’ हा सुविचार म्हणजे त्या मुली ! त्याचं हास्य, त्यातील निरागसपणा, त्यांची स्वागत करण्याची पध्दत ह्या सगळ्यामुळे त्या इतक्या सुंदर दिसत होत्या की त्यांना पाहूनच थकवा भरून निघाला !  ह्या मुलीही आपल्याच समाजाचा भाग आहेत आणि ह्या इतक्या सुंदर व्यक्ती आपल्या देशात राहतात ही जाणीव खूप आनंददायी वाटली. हे वसतिगृह का आहे, इथे पूर्वांचलातील मुली का राहतात, या आणि संघाच्या अशा अनेक प्रकल्पांविषयी जाणून घेण्यासाठी संघ आतून अनुभवावा लागेल.

या चार दिवसांत वेगवेगळ्या प्रकृतीची, स्वभावाची माणसं दिसली, भेटली. ह्या संकटातून कोकण नक्की सावरेल. समुद्र मुंबईतही आहे, नद्या भारतभर आहेत, पण उध्वस्त करणारं आणि नंतर तितक्याच जिव्हाळ्याने सर्वांना सावरणारं कोकणचं पाणी खरंच वेगळं आहे !

समाप्त

लेखिका : -श्रुती आगाशे.

संग्राहक : – सुहास सोहोनी 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मन… ☆ सौ .कल्पना कुंभार

सौ .कल्पना कुंभार

? विविधा  ?

☆ मन…☆ सौ .कल्पना कुंभार ☆

माणसाचं मन किती विचित्र असत ना.?? आता इथे तर क्षणांत दुसराच विचार मनात डोकावून पहातो…

मन कधीच शांत किंवा स्थिर नाही रहात..सतत काही न काही विचार हे चालूच असतात मनांत….अगदी झोपेतही…

मन कधीच समजू शकत नाही आपण त्याला…त्याचा थांग लागण खरचं खूप अवघड..कधी ते अगदी लहान वाटतं…मुंगीप्रमाणे…तर कधी गरुड होऊन उंच आकाशी भरारी मारू लागतं….

या मनाचे ना अनेक कप्पे आहेत..काही उलगडणारे..सहज..सोपे तर काही न उलगडणारे… गूढ…

या गूढ कप्प्यात अनेक आठवणी बंदीस्त करून ठेवलेल्या असतात जणू…अन बाहेर लावलेलं असतं भल मोठं कुलूप…अहंकाराच…

हा अहंकार जेंव्हा वितळू लागतो तेंव्हा हे कुलुपही नकळत तुटून पडत…अन अनंत आठवणी फेर धरू लागतात या मनभोवती….या आठवणीतून बाहेर पडणे वाटत तितकं सोपं नक्कीच नसत….त्यासाठी हवा असतो एक भरभक्कम आधार…प्रत्येकालाच..

असा आधार..अशी साथ ज्याला लाभते..तो खरचं खूप भाग्यवान… मनाच मनाशी जुळलेलं नातं जर घट्ट असेल तर कितीही वादळ आली तरी हातातले हात सुटत नाहीत…आणि मन पुन्हा गुंतू लागतं त्या अलवार मिठीत….त्याच्या प्रेमात…त्याच्या स्वप्नांत… जो ठाम उभा असतो प्रत्येक वादळात… आपल्यासमोर..

मन मनाशी सांगत

मनातलं गुंजन

मनातल्या स्पंदनांची

मनाशीच गुंफण

 

मनी आठवणीचा फेरा

नयनी दाटले काहूर

होती पापण्या या ओल्या

लागे कोणाची चाहूल

 

मन क्षणांत उदास

मन क्षणांत हसरे

मनालाच उमजेना

मन मनांत गुंतले

 

मन मनाशी खेळते

मनाचेच खेळ

कोण जिंके कोण हारे

त्याला नाही कसली फिकीर

 

मन नाजूक ते फुल

पडते मनास भूल

मन होते रे भ्रमर

त्याला सुगंधाची हूल

 

मन नाही समजत

मन नाही उमजत

मन न सुटलेले कोडे

मन तुझ्यासाठीच वेडे

 

© सौ .कल्पना कुंभार

इचलकरंजी

मोबाईल नंबर:: 9822038378

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆  केल्याने होत आहे रे… ‘बालसखा’ ची निर्मिती ☆ श्री आनंदहरि

श्री आनंदहरी

? मनमंजुषेतून ?

☆ केल्याने होत आहे रे… ‘बालसखा’ ची निर्मिती श्री आनंदहरि  

आयुष्य हे अनाकलनीय असते असे म्हणले तर ते फारसे चुकीचे होईल असे वाटत नाही.. एखादी गोष्ट ठरवूनही, प्रयत्न करूनही साध्य होतेच, घडतेच असे नाही. तसेच ध्यानी-मनी नसताना एखादी चांगली गोष्ट मात्र घडून जाते, साध्य होते… ‘ बालसखा ‘ या बाल-कुमारांच्या साहित्याने आणि चित्रांनी नटलेल्या दिवाळी-बालदिन अंकाबाबत असेच झाले.

इस्लामपूर येथील आमच्या ‘नटरंग ‘ या नाट्यसमुहाचे प्रमुख अमृत शिंगण यांचा ३० ऑक्टोबरला फोन आला. ख्यालीखुशाली विचारून झाली आणि त्यांनी अचानक विचारले,

‘एखादा छोटासा दिवाळी अंक काढता येईल काय ? ‘ 

या प्रश्नाने मनात उलट सुलट विचार सुरू झाले…  छोटासा दिवाळी अंक काढण्याचा विषय आणि दिवाळी तर तोंडावर आलेली ? सहज दिनदर्शिका पाहिली.. ३० ऑक्टोबरला ठळक अक्षरात नमूद असणाऱ्या तिथीवर नजर गेली.. सफला एकादशी.. मुहूर्त.. तिथी याचा कधीच विचार करत नसतानाही सहज मनात आले- ‘प्रयत्न करायला’ काय हरकत आहे ? लगेच चर्चाही झाली. शब्दशिल्प प्रकाशनच्या दिलीप क्षीरसागर सरांची सक्रीय साथही लाभली. 

लहान मुलांच्या साहित्यलेखनाला, चित्रकलेला एक व्यासपीठ मिळावे म्हणून बाल-कुमारांच्या साहित्याने आणि चित्रांनी सजलेला छोटासा दिवाळी-बालदिन अंक, नटरंग ग्रुप, इस्लामपूर आणि शब्दशिल्प प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने, प्रकाशित करण्याचे निश्चित झाले. आणि नामकरण ही झाले ‘बालसखा ‘ 

‘बालसखा ‘ बालदिनी प्रकाशित करण्याचे निश्चीतही झाले…हातात केवळ १५ दिवसांचा अवधी होता.. छपाई, बांधणीसाठी आठ दिवस लागणार होते. चर्चा झाली, सगळे ठरले त्यावेळी अचानक  ‘त्रिशूल ‘ चित्रपटातील अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध संवाद आठवला,

“मै पांच लाख का सौदा करने आया हूँ, मगर इस वक्त मेरी जेब में पांच फुटी कवडियां भी नही है !” 

स्थिती साधारण तशीच होती. त्याच दिवशी सर्व साहित्य समूहावर मुलांनी स्वलिखित साहित्य, चित्र पाठवण्याचे आवाहन पाठवले. दोन दिवसांतच मिरज येथील बालकवयित्री हर्षदा महेशकुमार कोष्टी हिची कविता आणि नागपूर येथून बालचित्रकार तन्मय सिताराम माटे आणि पुण्याहून ईशान्वी कुलकर्णी यांची चित्रे आली. मनाला हुरूप आला. नंतर साहित्य, चित्रे येतच राहिली…  ‘ बालसखा ‘अंकातील साहित्यकृतीसाठीची चित्रे-रेखाटने इस्लामपूर येथील नववीमध्ये शिकणाऱ्या कु.वैष्णवी टिळे हिने रेखाटायलाही सुरवात केली आणि चित्रकार गणेश पोतदार यांनी अल्पावधीतच अतिशय सुंदर मुखपृष्ठचित्र दिले.

वेळापत्रक आखले होते त्यानुसार ३२ पृष्ठांचा ‘ बालसखा ‘अंक तयार होऊन छापायला गेला. नियत वेळेनंतर आलेले साहित्य, चित्रे समाविष्ट करता आली नाहीत. अगदी कमी वेळेत ‘बालसखा’ अंकाची निर्मिती झाली असल्याने काही त्रुटी राहणे साहजिकच होते.. पण  पुढील वर्षी नियोजनबद्ध, पुरेसा अवधी घेऊन याहून अधिक पृष्ठांचा ‘ बालसखा ‘अंक प्रकाशित करण्याचे निश्चितही झाले. एवढ्या कमी कालावधीतही सांगली जिल्ह्याबरोबरच सातारा, सिंधुदुर्ग, पुणे, नागपूर जिल्ह्यातून बाल-कुमारांचे साहित्य, चित्रे प्राप्त झाली, प्रसिद्ध करता आली याचा आनंद झाला. 

ठरवल्याप्रमाणे १४ नोव्हेंबरला बालदिनादिवशी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य विश्वासराव सायनाकर सर, वाचन चळवळीत अग्रभागी असणारे नामवंत साहित्यिक, वक्ते प्रा. संजय थोरात, प्रसिद्ध कवी आणि ‘प्रतिभा’ दिवाळी अंकाचे संपादक धर्मवीर पाटील, मुक्तांगणचे विनोद मोहिते यांच्यासमवेत प्रातिनिधिक बाल-कुमार साहित्यिक-चित्रकारांच्या हस्ते आणि बाल-कुमार व त्यांच्या पालकांच्या तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत ‘ बालसखा ‘ चा प्रकाशन सोहळा संपन्न झाला.  

‘बालसखा’ चा निर्मिती प्रवास आठवताना, अंक पाहताना शालेय जीवनात गुरुजनांनी मनावर चांगलाच बिंबवलेला सुविचार आठवतो, 

केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे..!

 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares