मराठी साहित्य – विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – आमचा शिमगा …. ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

 ☆ विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – आमचा शिमगा ….? ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

(जून्या लेख/ चारोळींची  काही बदलांसह संग्रहित आहुती ?)

होळी म्हणले की ‘ बोंबलणे ‘ आणि ‘ टिमकी ‘ वाजवणे ( या दिवशी स्वत:ची सोडून)  याचे बाळकडू आम्हाला घाटावरच (सांगली) मिळाले. मात्र मुंबईत आल्यावर या दोन्ही गोष्टींना मुकलो. दरवर्षी सोसयटीच्या आवारात अगदी पारंपारिक पध्दतीने होळी साजरी होते मात्र या दोन्ही गोष्टी बघायला ( करायला ) मिळत नाहीत.

मात्र या वर्षी होळी पेटली की ठरवलय ,प्रसादाचा नारळ होळीत सोडायचा आणि मग होळी भोवती प्रदक्षिणा मारत बोंब ठोकायची. ‘ (हा काय करतोय येड्यासासारखा ? ‘? असे सोसायटीतील लोकाना वाटले तरी चालेल .)

वर्ष भरात ज्या गोष्टींमुळे त्रास झाला/ होतो त्यांचा उध्दार करायचाच म्हणून यादी तयार करायला घेतली ती अशी…..

१) पहिली फेरी करोना विषाणूच्या  नावे – ६ वर्षानंतर संधी आलेली बाहेर जायची. साडेसातीचा परिणाम …. ?

२) पर्यावरणवादी – या(ना) लायकांना फक्त होळी आणि दसरा या दिवशीच झाडे, पर्यावरण -हास यांची आठवण होते. ?

३) मुंबईकर – मराठी अस्मितेचा अभिमान बाळगत धुळवडीच्याच दिवशी रंगमंचमी साजरी करणा-या मुंबईकरांसाठी ( आणि यात आता सुसंस्कृत पुणेकर ही आले) तिसरी फेरी.

४) खास ‘ती’ च्या साठी – ती हो आमची , ८.२१ ची  – ठाणे लोकल. एक दिवस जरी वेळेवर आली तर शप्पथ…। ?

५) आम्हाला खोट्या प्रकरणात अडकवून पोलीस चौकीची फेरी घडवून आणणाऱ्यांच्या नावे ?

६) समुहात राजकारणाच्या पोस्ट नको असा ‘शिमगा’ करुन इतरांच्या मजेशीर पोस्टवर स्वत: बोंब मारणाऱ्यांच्या नावे एक फेरी

७) गाण्यातील सूरांसह,  लेखनाची ही वाट लावणाऱ्या सर्व आमच्या सारख्या फ्यूजन कलाकारांच्या नावेही एक फेरी

बास ! बास ! दमलो, याच्या पुढे फे-या मारता येणार नाहीत ( आणि जास्त बोंबलूनही उपयोग नाही ?)

अरे हो सोशल मिडिया सोडायचा असा सल्ला देणाऱ्यांसाठी? विसरलोच की.

नाही नाही हा मात्र सल्ला आपल्याला आवडला. आणि हा सल्ला यांच्यापर्यंतही पोहोचला , लगेच तयारीतच आल्या

नो व्हॅाट्स अप, नो फेसबुक

साजरी करू या होळी….

शब्दांना सोबत घेऊन लगेच

आल्या चार ओळी ?….बोंबला सौख्य भरे❗?

बोंब मारायची ही झाली माझी कारणे

काय तुमची टार्गेट्स तयार  आहेत का ?

कळूदे आम्हाला ही ?

( टीपः वरील यादीत बुडणाऱ्या बँका, ऑफीस , महागाई , भ्रष्टाचार, ट्रॅफिक  जाम यांना मुद्दाम स्थान दिले नाही. यांच्या नावाचा शिमगा रोजचाच आहे. त्यांच्या बद्दल बोंबलणे जाऊ दे त्यांच्या करामतीने आमची बोबडी वळु नये हीच ‘ होळी’ चरणी प्रार्थना  ?)

? अमोल केळकर ?❗

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – कोकण – रत्नागिरी ची होळी.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे 

 

☆ विविधा ☆ होलिकोत्सव विशेष – कोकण – रत्नागिरी ची होळी.. ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 होळीचे दिवस, परीक्षांचे दिवस आणि कैऱ्यांचे दिवस या तिन्ही गोष्टी रत्नागिरीच्या आठवणींशी निगडीत आहेत. लहानपणी मार्च महिना आला की अभ्यासाचे पडघम वाजायला घरात सुरुवात व्हायची आणि अभ्यासाबरोबर कैरीचे तुकडे तिखट मीठ घालून खाण्याची आमची सुरुवात असायची! कोकणात होळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. त्यामुळे मुंबईचे चाकरमानी या दिवसात सुट्टी घेऊन कोकणात यायचे. मग खरी  होळीच्या उत्सवाची मजा सुरू व्हायची! रोज रात्री अंगणात ‘खेळे’ यायचे!’खेळे’ म्हणजे वेगवेगळे  गाण्याच्या तालावर नाच करणारी ठराविक लोकं असायची. पारंपारिक गाण्याबरोबरच नवीन नवीन सिनेमाच्या गाण्यांवर नाचत केले जायचे. ते काही शास्त्रशुद्ध नाच नसायचे, पण त्यात उत्साह, जोश इतका असायचा की ते बघायला वाड्यातील सर्व लोक उत्सुकतेने, उत्साहाने गोळा व्हायचे.तेव्हा टीव्ही नव्हता, त्यामुळे ही जिवंत, उत्साहाची करमणूक सर्वांना फार आवडायची! या सगळ्या सांस्कृतिक  होळीच्या काळात पुरणाची पोळी लज्जत आणत असे ती वेगळीच!

होळीचा खुंट म्हणजे होळी उभी करायची जागा ठरलेली असते. दरवर्षी एखाद्याच्या बागेतील सुरमाड होळीसाठी निवडला जाई.सुरमाडाला नारळ येत नाहीत. तो सुरमाड तोडून त्या ठिकाणाहून वाजत गाजत होळीच्या ठिकाणी आणला जाई. मुख्य म्हणजे ते झाड माणसे वाहून आणत. त्यासाठी चार पाच तास लागत असत. आमच्या घरापासून जवळच होळीचा खुंट असल्याने आम्ही दुपारपासून ते बघण्यात दंग असायचो! एकदा का होळी उभी राहिली की पाच दिवस तिथे जत्राच असे. तसेच देवीची पालखी ही तिथे आणली जाई.जुगाई देवीच्या मंदिरापासून मिरवणुकीने देवीची पालखी येत असे. तेव्हा खूपच गर्दी उसळत असे.रोज दुपारी आणि रात्री वाजत गाजत देवीची पालखी मंदिरापासून खुंटा पर्यंत येते. कोकणात सगळीकडे होळीचा उत्सव थोड्याबहुत प्रमाणात असाच असतो. काही ठिकाणी होळी लहान असते पण उत्साह तेवढा जास्तच असतो.

देवीच्या पालखी चे पाच दिवस असत पण देवीची पालखी उठली तरी होळी पंधरा दिवस उभी असे. पाडव्याला होळी उतरवतात.होळी उतरवतात म्हणजे उभा केलेला सुरमाड खाली पाडून त्याचे तुकडे करून बाजूला ठेवतात. खुंटावर होळी जाळण्याची पध्दत तेथे नाही. लोकांनी नवसाचे म्हणून बांधलेले अगणित नारळ असतात. होळी खाली आली की ते प्रसादाचे नारळ घेण्यासाठी झुंबड उडते. दरवर्षी लोक श्रद्धेने देवीकडे मागणे मागत असतात. तिचा कौल मिळाला की ते काम होते असे लोकांना मनापासून वाटत असते. मग पुढच्या वर्षी नारळाची तोरणे नवस पुरा करण्यासाठी बांधली जातात.

होळी च्या पाचव्या दिवशी रंगपंचमी येते. मुलांच्या आवडीचा हा सण विविध रंगाचे पाणी उडवून साजरा होतो. पुढे येणाऱ्या उन्हाळ्याला तोंड देण्यासाठी ही सगळी तयारी असते. थंड पन्हं, कैरीची डाळ यांचे स्वाद येऊ लागतात. देशावर धुळवड साजरी केली जाते पण कोकणात मात्र रंगपंचमीची जास्त असते. परीक्षा तोंडावर आलेली असते पण अभ्यासाबरोबरच हे रंगीबेरंगी दिवसही मनाला खूप आनंद देतात. रत्नागिरीची, कोकणातील होळी माझ्या डोळ्यासमोर अशीच येते. इतकी वर्षे झाली, काळ बदलला पण सणवार, प्रथा आहे तशाच आहेत. काळानुसार त्यात थोडे बदल झाले असतीलही, पण ती पालखी, होळीचा खुंट, तो लोकांचा उत्साह हे सगळं तसंच असणार आहे. पुन्हा एकदा मनाने मी रत्नागिरी फिरून आले. तेथील होळीचा सण अनुभवायचा योग पुन्हा कधी येतो पाहू या!

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ होलिकोत्सव विशेष – सूरसंगत (भाग – २३) – ‘सुर संग रंग’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर

सुश्री आसावरी केळकर-वाईकर

☆ सूर संगत ☆ होलिकोत्सव विशेष – सूरसंगत (भाग – २३) – ‘सुर संग रंग’ ☆ सुश्री आसावरी केळकर-वाईकर ☆ 

दुपारी उज्वलाताईंचा फोन आला कि, उद्या होळी आहे तर तू उद्याचा लेख ‘होरी’ वर लिही आणि मला पटकन सुरेश भट साहेबांनी लिहिलेलं आपलं एक मराठी भावगीत आठवलं

‘आज गोकुळात रंग खेळतो हरी, राधिके जरा जपून जा तुझ्या घरी!’ मग जुन्या अभ्यासाच्या वह्या बाहेर काढल्या, वाचनातून मेंदूतल्या ‘होरी’च्या फोल्डरमधे असलेले संदर्भ गोळा करण्यासाठी स्मरणशक्तीला ताण दिला. सगळ्याचा मागोवा घेताना अगदी औरंगजेबाच्या संगीतप्रेमासहित बराच खजिना हाती लागला त्याविषयी पुढं लिहीनच, मात्र मगाचच्या गीताचा उल्लेख करण्याचं कारण म्हणजे सगळ्या माहितीतला एक समान धागा त्या एका ओळीतून दिसतो.

‘होरी’च्या एखाद्या प्रकारानुसार त्याची गायनशैली बदलत जाते मात्र त्यातल्या गीताचे शब्द हे होळीच्या उत्सवाचं वर्णन करणारेच असतात… अर्थातच ही गीतं ह्याच कारणास्तव ‘होरी’ किंवा ‘होरीगीत’ म्हणून ओळखली जाऊ लागली. वरील भावगीताचा विचार केला तर वर्णन वृंदावनातल्या होलिकोत्सवाचेच आहे मात्र ह्यातले काव्य वृत्तबद्ध आहे, भटसाहेबांचं शब्दलावण्यही संपूर्ण रचनेत दिसून येतं… कारण विषय ‘होरी’चाच आहे मात्र काव्याला केंद्रबिंदू मानून त्याची रचना झाली आहे. म्हणूनच हे गीतप्रकाराच्या दृष्टीने हे भावगीत आहे, होरी नाही. पारंपारिक होरीगीतांचा विचार करता एक गोष्ट प्रामुख्याने जाणवते कि, होळीचे वर्णन असणे इतपतच तिथं साहित्याला/ काव्याला महत्व आहे. मात्र त्याला दर्जेदार साहित्य, उत्कृष्ट काव्य म्हणता येईल असे बहुतांशी नाहीच.

‘होरी’चं मूळ शोधताना पूर्वीच्या लोकसंगीतातच हा प्रकार मोडत असल्याचे दिसून येते. समूहानं रंग खेळत असताना ही गीतं गायली जात. अर्थातच त्यावेळी एखाद्या गायनशैलीशी ही गीतं जोडली गेलेली नसावीतच. फक्त तो उत्सव साजरा करतानाचा आनंद समर्पक पण बोलीभाषेतील शब्दांच्या आधारे सहजस्फूर्त सुरावटींत व्यक्त करणे हेच इतर लोकसंगीतप्रकारांप्रमाणे घडत असावं. त्यामुळं ‘काव्य’ म्हणून ते लिहिणं, त्याचा साहित्यिक दर्जा ह्या गोष्टींचा विचारच तिथं अपेक्षित नाही.

पूर्वीच्या ‘ब्रज’ प्रदेशातील म्हणजे आजच्या मथुरा-वृंदावन व आजूबाजूच्या बऱ्याचशा प्रदेशातील होलिकोत्सव’ देशभर प्रसिद्ध आहे. असं वाटतं कि, तिथल्या ह्या होलिकोत्सवाला मोहक वलय द्वापारयुगात जसं कृष्णाशी ह्या उत्सवाचं नातं जोडलं गेलं तेव्हांपासून प्राप्त झालं असावं आणि ते साहजिकही आहे. साक्षात मनमोहनासोबत रंग खेळून होळी साजरी करण्यापेक्षा देखणा उत्सव कोणता असू शकतो! परंपरागतपणे त्या प्रदेशात पुढंही धामधुमीत हा उत्सव साजरा होत राहिल्यानं त्याचं वर्णन सर्वदूर पोहोचून तो प्रसिद्ध झाला असेल. त्याच काळापासून कदाचित ‘होरी’गीतांमधे बहुतांशी कृष्णासोबत साजऱ्या होणाऱ्या होळीचं वर्णन येऊ लागलं असावं. शिवाय पारंपारिक होरीगीतं ही ‘ब्रज’ भाषेतच आढळतात. त्याआधीच्या ‘लोकसंगीतातील’ होरीगीतं कशी होती हे माझ्या वाचनात आलेले नाही, मात्र त्यात कृष्ण-गोपिकांत रंगलेल्या होळीची वर्णनं असण्याची शक्यता नसणारच!.. अर्थात हा सगळा माझा ह्याबाबतीतला ‘होरा’ आहे!

पुढं कागदोपत्री ‘होरीगीतां’बाबत जे उल्लेख आढळतात ते फार रंजक आहेत. लोकसंगीतातूनच शास्त्रीय संगीत निर्माण झाले. अर्थातच पुढं ह्या शास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांनाही मूळ लोकसंगीताने भुरळ घातली नसती तरच नवल होतं. त्यामुळं झालं असं कि लोकसंगीतातल्या ज्या काही उत्तम संगीतधुनी शास्त्रीय संगीताच्या आधारे सुंदर सजवून त्या गायनशैलीच्या निदान एका उपप्रवाहात आणता येतील त्या ‘उपशास्त्रीय’ ह्या प्रकारात अभ्यासू कलाकारांकडूनच सामावून घेतल्या गेल्या. विचार करता सहज लक्षात येईल होरी, चैती, झूला, कजरी इत्यादि आजच्या उपशास्त्रीय संगीतातील कित्येक प्रकार आपल्याला थेट लोकसंगीताच्या पाऊलवाटेशी नेऊन सोडतात.

ह्यापैकी ‘होरी’ गीतांबाबत विचार करायचा झाला तर धृपदशैली प्रचारात असताना त्या शैलीनुसार दुगुन, चौगुन, बोलतान, गमकाचा गीतविस्तारासाठी वापर करून ‘धमार’ ह्या चौदा मात्रांच्या विशिष्ट तालात जी गीतं गायली जाऊ लागली ती ‘धमार’ ह्याच नावानं ओळखली गेली. मात्र ह्या गीतांचे शब्द होलिकोत्सवाचे वर्णन करणारे असायचे. ‘धमार’ गाताना रागाची चौकट पाळूनच गायन केले जाते त्यामुळं शास्त्रोक्त पद्धतीनं धृपदशैली शिकलेल्यांनाच चांगल्याप्रकारे धमार गाता येतो. आजही धृपदगायकच उत्तमप्रकारे ‘धमार’ गाताना आढळून येतात. तर ‘धमार/धमारी/धमाली’ (प्रचारातील नांव ‘धमार’च!) हा एक होरीगीतांतलाच प्रकार आणि ह्या प्रकाराला ‘पक्की होरी’ असं म्हटलं जातं. याशिवाय धमार तालात फक्त काही वैष्णव संतांनी भक्तिरचना केलेल्या व त्यांनाही ‘धमार’ असेच संबोधले गेल्याचे व आजही त्यांचे अनुवंशी कीर्तनकार त्याला धमारच म्हणत असल्याचे आढळते. पुढं यवनकाळात आश्रयदात्या राजांविषयी स्तुतीपर शब्द काही बंदिशींच्या गीतांत रचण्याचा प्रकार सुरू झाला त्याला धमारही अपवाद नव्हते. फक्त धमारात होलिकोत्सवाविषयीच्याच काव्यात खुबीनं असे शब्द गुंफले जात. त्याविषयी माहिती पुढं येईलच.

‘कच्ची होरी’ ह्या प्रकारांतर्गत पुढील प्रकार येतात.

ख्यालगायनशैलीचा बराचसा प्रभाव असणारा उपशास्त्रीय संगीतातील ‘ठुमरी’ हा जो प्रकार आहे त्यापद्धतीने जी होरीगीतं गायली जातात त्यांना ‘होरी-ठुमरी’ असं म्हणतात. खरंतर ही ठुमरीच, फक्त त्यातलेही काव्य होलिकोत्सवात रंगलेले असते. ही गीतं दीपचंदी, तीनताल, जतताल इ. ठुमरीसाठी वापरल्या जाणाऱ्या तालांतच गायली जातात. ह्या प्रकारांत मात्र रागाची चौकट पाळण्याचे बंधन नसते. ह्या गीताच्या विस्तारक्षेत्रात अनेक रागांना सामावून घेतले जाऊ शकते.

अशा प्रकारची काही होरीगीतं अगदी रागाच्या बंदिशीसारखी असतात. त्यांचा विस्तार रागाचे नियम पाळून बंदिशीप्रमाणेच केला जातो. रागानुसार काहीवेळा विस्तारढंग बदलतो… तो ठुमरीकडे जास्त झुकणारा असेल तर ती गीतं ‘बंदिश की ठुमरी’ ह्या प्रकारांतर्गतही धरली जातात. इतर होरीगीतं जी साधारण ‘दादरा’ ह्या उपशास्त्रीय गीतप्रकारानुसार गायली जातात त्यांना ‘होरी’ ह्याच नावानं ओळखलं जातं. ती दादरा किंवा केहरवा तालात निबद्ध असतात. ह्यांच्या विस्तारात रागनियम पाळण्याचे बंधन नसते.

संगीताविषयी विशेष रुची नसलेल्या व्यक्तीवर सहजपणे ‘हा संगीतातला औरंगजेब आहे’ अशी टिप्पणी केली जाते. औरंगजेबाच्या संगीतद्वेषाच्या कित्येक कथा प्रसिद्ध आहेत. मात्र लिखितस्वरूपात औरंगजेबाच्या संगीतप्रेमाविषयी जे स्पष्ट उल्लेख आढळतात त्यात ‘होरी’ला किंबहुना ‘धमार/धमारी’ला स्थान आहे. औरंगजेब मंगलामुखींसोबत (गणिका) अगदी उत्साहाने, जोशपूर्ण रीतीने होळी खेळायचा आणि त्यावेळी त्या गातगात अशी प्रार्थना करायच्या कि, ‘शहेनशहा औरंगजेबाचे आयुष्यमान लोमश ऋषींसारखे असावे आणि त्यांनी नेहमी आपल्यासोबत अशीच जोशपूर्ण होळी खेळत राहावे!’ पूर्वी अकबर, शहेनशहा ह्या कलाश्रयी राजांची प्रशंसा काही बंदिशींतून दरबारगायक करत असत. त्याचप्रमाणे ती औरंगजेबाच्या काळी त्याच्याबाबतही केली गेली. औरंगजेब हा संगीतातला मर्मज्ञ होता, त्याला संगीताची कदर होती, मात्र काही ‘राजनैतिक’ कारणांमुळं त्यानं आपल्या दरबारातून संगीताला बहिष्कृत केले होते असाही उल्लेख आढळतो. तर ‘धमारा’ची रंगीन धूमधाम ही फक्त लोकजीवनात व वैष्णवांच्या मंदिरांपुरतीच मर्यादित न राहाता पार औरंगजेबाच्या अंत:पुरापर्यंत पोहोचली होती असं म्हणायला हरकत नाही.

अकबराच्या काळच्या एका धमाराचा अर्थ भारी गंमतशीर आहे. एकीकडे नायिकेच्या सख्या त्यांच्या मैत्रिणीला म्हणतात, ‘असं रुसून बसून काही साधणार नाही, होळी खेळलीस तरच तुझी मनोकामना पूर्ण होईल’ आणि दुसरीकडे अकबराला म्हणतात, ‘हिची समजूत इतकी सहजी पटणार नाही. शाह जल्लालुद्दीन तुम्ही ‘फगुआ’ (फाल्गुनात दिली जाणारी भेटवस्तू) द्या, म्हणजे आपोआप ती तुम्हाला वश होईल.’  त्या धमाराचे शब्द आहेत-

होरी खेलेई बनैगी, रूसै अब न बनैगी।

मेरो कहो तू मानि नवैली, जब वा रंग में सनैगी॥

कैई बेरि आई-गई तू, नाही मानत ऊंची करि ठोडी भौहें तनैगी।

साहि जलालदीन फगुआ दीजै, आपुतें-आप मनैगी॥

ख्यालगायनशैलीला जनमानसांत स्थान मिळवून देणाऱ्या मोहम्मदशाह रंगीलेच्या दरबारातील सदारंग, अदारंग व महारंग ह्या त्रिमूर्तींपैकी ‘सदारंगांनी’ रागांच्या अनेक बंदिशींप्रमाणेच काही धमारांमधेही मोहम्म्दशाहचे नाव गुंफल्याचे दिसून येते. पुढं सदारंगांचे पुत्र मनरंग ह्यांच्याही ‘धमार’रचना आढळतात. तसेच नूररंग ह्यांनीही ‘धमारी’ रचल्याचे आढळून येते. मात्र ह्या सर्वांनीच धमाराचं कृष्णाच्या लीलांशी असलेलं नातं जपून त्यानुसारच रचनांचं लेखन केल्याचं दिसून येतं.

जाताजाता, आपणां सर्वांना होलिकोत्सवाच्या अनेकरंगी शुभेच्छा!

क्रमश:….

© आसावरी केळकर-वाईकर

प्राध्यापिका, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत  (KM College of Music & Technology, Chennai) 

मो 09003290324

ईमेल –  asawarisw@gmail.com

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ अनुकंपा…सहृदयतेतून उमटलेला हुंकार…!!☆ श्री अरविंद लिमये

श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ अनुकंपा…सहृदयतेतून उमटलेला हुंकार…!! ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

‘परदु:ख शितल असतं’ असं म्हणतात.सर्वसाधारण अनुभवांती यात तथ्य आहे हे मान्य करावं लागतंच. तरीही या वास्तवाला छेद देणारे अपवादही आहेत आणि म्हणूनच त्या अपवादांच्या सत्कृत्यांच्या पायावरच हवेतीलच नव्हे, तर वैचारिक पातळीवरील प्रदूषणापश्चातही जग अजून अस्तित्त्वात आहे आणि जगणं आनंदी होण्यासाठीचा आशावाद सुध्दा..! हा आशावाद जागता ठेवलाय तो मानवी मनातल्या अनुकंपेने..!!

दुसऱ्याचं दु:ख, वेदना पहाताच स्वतः सुरक्षित अंतरावर न थांबता एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखी तात्काळ मदतीला धावून जाण्याची मनात निर्माण होणारी असोशी ही अनुकंपेची जन्मदात्री..! त्या असोशीतून निर्माण झालेल्या सहवेदनेतूनच पाझरत रहाते तीच अनुकंपा! अशा सहवेदनेच्या स्पर्शानेच परदु:ख परकं न रहाता ते स्वतःचंच होऊन जातं. ते शितल नसतंच. चटके देणारं, कासावीस करणारच असतं. त्या कंपनांमधून परदु:खाला कवटाळण्याची जी ऊर्मी झेपावते तीच अनुकंपा..!

या अनुकंपेला त्या त्या वेळी,त्या त्या परदु:खाच्या तीव्रतेनुरुप पहाणाऱ्याच्या सहृदयतेतूनच अनेक वेगवेगळ्या भावना निर्माण होतात, ज्या करूणा, कळवळा, आस्था, कणव, कळकळ, अशा कोणत्याही रंगरुपाच्या असल्या, तरी सहानुभूती हा या सर्व भावनांमधला समान धागा असतो. कृपा, किंव, दया, या सारख्या तत्कालिक भावनांमधेही उपकाराची भावना ध्वनित झाली, तरी मूलत: असते ती सद्भभावनाच..!

अनुकंपा जगणं आणि जगवणं दोन्हीला पूरक असते. विध्वंसक विकृतीला परस्पर छेद देणारी अनुकंपा हा जगाच्या अस्तित्वाचाच मूलभूत भक्कम पाया असते. लहानपणा पासून कौटुंबिक पातळीवरुन होणारे संस्कार आणि शैक्षणिक पातळीवरील मूल्यशिक्षणातून अशा अनेक मूल्यांचे बिजारोपण होत असे आणि ती बिजं माती ओली असल्यामुळे खोलवर रुजतही असत.पण कालानुरुप वेग वाढवत सुरु असणाऱ्या कुटुंबसंस्थाच नव्हे तर शिक्षण आणि सामाजिक पार्श्वभूमीवरील सर्वदूर पडझडीमुळे खिळखिळी होत चाललेली मूल्यव्यवस्था पुन्हा पूर्ववत करणं ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यासाठी आवश्यक आहे ती थोडी जागरुकता आणि जाणवायलाच हवी अशी निकड!

अनुकंपेसारख्या सहवेदनांच्या हुंकाराला आवर्जून प्रतिसाद द्यायची सजगता ही आता काळाची गरज आहे एवढं खरं!!

© श्री अरविंद लिमये 

सांगली

९७२३७३८२८८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनचा ☆ कविवर्य ग्रेस ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ क्षण सृजनचा ☆ कविवर्य ग्रेस ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

Grace IMG 1263.jpeg

जन्म नाव – स्व माणिक सीताराम गोडघाटे टोपणनाव – ग्रेस

(जन्म – १० मे, १९३७ नागपूर   मृत्यु – २६ मार्च, २०१२ पुणे)

झाली म्हणजे किती पटकन प्रसन्न होते.नाहीतर एकदा का रूसली की रूसलीच. कवितेच हे असच आहे.

26 मार्च. म्हणजे कविवर्य ग्रेस यांचा स्मृतिदिन. त्यांच्यावर आलेले लेख,व्हिडिओ पाहणे चालू होते. काही नवीन माहितीही मिळाली त्यांच्याबद्दल.  वाचणे चालू होतेच. पण त्यांच्या गूढगर्भात्मक कवितांच्या ओळी मनातून जात नव्हत्या. जे लेख वाचले त्यातही गूढता, दुःख यांचा उल्लेख होताच. आणि तरीही त्या कविता वाचू नयेत अस कोणालाच वाटत नव्हतं. अगम्यतेच आकर्षण. समजो न समजो, पुन्हा वाचाव्यात अशा कविता. नकळतपणे आपण गुंतत जातो त्यांच्यात. वाचलेल्या कविता, त्यांची झालेली गीते, सगळं कानाना ऐकू येऊ लागल आणि नकळतपणे मनात गुणगुणलो,

गूढ तुझ्या शब्दांची जादू

मनात माझ्या अशी उतरते…

आणि पुढचं कसं  सुचत गेलं, मलाही ठाऊक नाही. ती ही कविता, तुम्हांसाठी सादर.

☆ कविवर्य ग्रेस ☆

गूढ तुझ्या शब्दांची जादू

मनात माझ्या अशी उतरते

चांद्रनील किरणांच्या संगे

संध्येची जशी रजनी होते

 

कळू न येतो अर्थ जरी,पण

दुःखकाजळी पसरे क्षणभर

खोल मनाच्या डोहावरती

कशी होतसे अस्फुट थरथर

 

सोसत नाही असले काही

तरी वाचतो पुनः नव्याने

डोलत असते मन धुंदीने

हलते रान जसे वार्याने

 

ग्रेस,तुझ्या त्या काव्यप्रदेशी

माझे जेव्हा येणे झाले

जखम न होता कुठे कधीही

घायाळ कसे , मन हे झाले

 

संपत नाही जरी इथले भय

शब्दचांदणे उदंड आहे

त्या गीतांच्या स्मरणा संगे

दुःख सहज हे सरते आहे

साभार चित्र  – माणिक सीताराम गोडघाटे – विकिपीडिया (wikipedia.org)

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆  शिवथर घळ ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे

सौ. अर्चना सुरेश देशपांडे

☆ मनमंजुषेतून ☆  शिवथर घळ ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे☆ 

सह्याद्रीच्या डोंगररांगात अनेक घळी आहेत, अनेक घळींना इतिहास आहे आणि त्या प्रसिद्ध ही आहेत पण सर्वात प्रसिद्धीला आली ती श्री रामदास स्वामींची शिवथरघळ!

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात, वरंधा घाटाच्या कुशीत ही घळ विराजमान झालेली आहे. ही घळ चारी बाजूंनी हिरव्यागार झाडांनी झाकून गेली आहे. सतराव्या शतकात श्री.रामदासांनी निबीड अरण्यात, निसर्गसंपन्न स्थळी असलेल्या ह्या घळीची ध्यान धारणेसाठी निवड केली. समर्थांनी बावीस वर्षे इथं वास्तव्य केले आणि ह्या घळीतच दासबोधा सारख्या आध्यात्मिक ग्रंथाची निर्मिती झाली. श्री. कल्याणस्वामी नी हा ग्रंथ अक्षरबंद केला. ह्या ग्रंथाद्वारे रामदासस्वामींनी सर्व जाती,पंथ, धर्माच्या स्त्री पुरुषांना उपदेश केला आणि सकारात्मक दृष्टिकोन दिला.शिवराय आणि समर्थ रामदासांची पहिली भेट  ह्याच घळीत झाली.

या घळीत रहाण्या मागचा रामदासांचा ग्रंथनिर्मिती हा एकमेव हेतू नव्हता तर त्यांचा महत्त्वाचा हेतू होता की शिवरायांना स्वराज्य बांधणीत मदत करणे. डोई जड झालेले जावळीचे चंद्रराव मोरे शिवाजी महाराजांची खबर विजापूरला कळवतात, हे ध्यानात येताच समर्थांनी मठा मंदिरा द्वारे जावळी खोऱ्याची संबंध प्रस्थापित केले. तेथील आम जनतेला स्वराज्याच्या बाजुला ओढून घेतले. पुढे शिवाजी महाराजांनी मोर्‍यांचा निपात केला तेव्हा बाजीप्रभू देशपांडे आणि मुरारबाजी हे दोन्ही हिरे शिवाजी महाराजांना गवसले.

अफजलखान  विजापूरहून निघाला त्यावेळी याच घळीतून रामदासांनी शिवबांना निरोप धाडला “केसरी गुहेसमीप मस्तीत चालला”.

“एकांती विवेक करुनी इष्ट योजना करावी.”

समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी म्हणजे शिवथर घळ.

समर्थानंतर तब्बल अडीचशे वर्षे कुणालाच या घळीची माहिती नव्हती. “रामदास गोसाव्याची गुहा” असं या घळीला म्हटले जायचे. समर्थ साहित्याचे अभ्यासक आणि संशोधक धुळ्याचे शंकरराव देव यांनी काही कागदपत्रांच्या आधारे एकोणीशे तीस साली या घळीचा शोध लावला. नंतर एकोणीसशे पन्नास साली समर्थ सेवा मंडळाची स्थापना झाली. त्यांच्या पुढाकाराने या संपूर्ण जागेचे नूतनीकरण करण्यात आले, पर्यटकांना चढण्यास सोपे जावे म्हणून पायऱ्या बांधून दोन्ही बाजूला लोखंडी रॉड लावले गेले. पायथ्यापासून शंभर पायऱ्या चढून आल्यावर घळीपाशी पोचता येते. घळीत समोरच समर्थांच्या बसण्याची जागा आहे. सुमारे एक हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या घळीत दगड आणि माती यांचं बांधकाम केलेल्या तीन भिंती आहेत. हवा खेळती राहावी म्हणून खिडकी सारख्या पोकळ्या ठेवल्या आहेत. या घळीच्या  बाजूला असलेला धबधबा 100 फुटावरून खाली पडतो, उन्हाळा व हिवाळ्यात या धबधब्याचे पाणी शांत व मनोहरी दिसते. पण पावसाळ्यात हेच पाणी तांडव नृत्य करणाऱ्या शंकराचे रूप घेते.  घळीत आजही शांतता आणि गारवा जाणवतो निसर्गाचा हा गारवा यांत्रिक एअर कंडिशनिंग पेक्षा जास्त गार आहे. या घळीत रामदास स्वामी दासबोध सांगताहेत आणि कल्याण स्वामी लिहून घेत आहेत अशा दोन मूर्ती पहावयास मिळतात.

शिवथर घळ येथे सेवा समितीच्या इमारतीमध्ये राहण्याची सोय होऊ शकते.

समर्थांनी या घळीला “सुंदर मठ असे म्हटले आहे.”

ही जागा अशी आहे की एक वेगळीच मनशांती इथे लाभते. अशी मनशांती मिळण्याचे भाग्य आम्ही सहलीला  गेलो तेव्हा मला लाभली. अशी ही अद्भुत घळ आपणही पहावी म्हणून हा सारा खटाटोप.

।।जय जय रघुवीर समर्थ.।।

©  सौ. अर्चना सुरेश देशपांडे

पुणे

मो. ९९६०२१९८३६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ जगू नव्याने… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

☆ क्षण सृजनाचे ☆ जगू नव्याने… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

काही दिवसांपूर्वी आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या व्हाट्सअप ग्रुपवर एक व्हिडिओ आला. तो पाहून त्यावर कोणाला काय सुचते ते कवितेच्या स्वरूपात लिहा,असा मेसेज दिला होता.

जवळपास ७५ वर्षानंतर भेटणाऱ्या दोन वृद्ध मैत्रिणी. त्यांचे वय असेल ८०-८५ च्या घरात. शाळेत बालपणी एकत्र खेळल्या, बागडलेल्या मैत्रिणी. इतक्या वर्षांनी भेटल्यावर ‘काय करू अन् काय नको ‘ असे त्यांना झालेले. पण पाठीची कमान झालेली, हातात काठी, तोंडाची बोळकी. उत्साहाने भरभरून आनंद व्यक्त करायला तेवढी शारीरिक क्षमता नाही. पण सतत तोंड भरून हसत हसत पुन्हा पुन्हा हातात हात धरणाऱ्या ‘त्या ‘ मैत्रिणीं ची सगळी देहबोली आनंदाने फुलूनआली होती.

हे चित्र पाहिल्यावर झटकन मन पन्नास-पंचावन्न वर्षे मागे गेले.आठवले ते शाळेतले सुंदर, फुलपाखरी दिवस. शाळेची ती छोटीशी टुमदार इमारत. तिच्या पुढे- मागे मोठी मैदाने. त्यावर खेळणाऱ्या, धावणाऱ्या, चिवचिवणाऱ्या अनेक मैत्रिणी. वेगवेगळे खेळ,वेडी गुपिते, रुसवेफुगवे, मनधरणी आठवून हसू आले.त्यावेळच्या सगळ्या गोड, रम्य आठवणींनी  मनात फेर धरला आणि मनाच्या आतल्या खोल कप्प्यातून शब्दांची लड झरझर उलगडत गेली.व्हिडिओतल्या ‘ त्या ‘ दोन वृद्ध जीवांना जणू नवसंजीवनी मिळाली आणि ते पाहून त्या  निष्पाप निरागस मैत्रीने शब्द रूप घेतले.

☆ जगू नव्याने… ☆

बालपणीच्या दोन सख्या

कित्येक वर्षांनी भेटल्या

एकमेकींना बघताच

खळाळून हसत सुटल्या ||

 

डोईवरी रूपेरी कापूस

तोंडाची झाली बोळकी

हसत हसतच दोघींनी

एकमेकींना दिली टाळी ||

 

ओळखलंच नाही बघ

किती बाई बदललीस!

मला म्हणतेस बयो,

तू कुठं पहिली राहिलीस ?

 

कशा होतो ग आपण

नाजुकश्या कळ्या सुंदर !

एकेक पाकळ्या गळत गेल्या

आयुष्य आहे मोठं बिलंदर ||

 

किती खेळलो भांडलो

रोज नवीनच खोडी !

अजूनही आठवते बघ

चिमणीच्या दातांची गोडी ||

 

कमा, सुमा, नंदू, रंजू

पुन्हा कोणी भेटलेच नाही !

प्रत्येकीची कहाणी वेगळी

ढाचा मात्र एकच राही ||

 

फुलपाखरापरी स्वच्छंदी

माहेरघरात वावरलो !

सासरची रीतच न्यारी

प्रत्येक गोष्टीत बावरलो||

 

भलेबुरे अनुभव घेतले

दुसर्‍यांसाठीच धावलो !

अजूनही झोळी रिकामीच

आधारावरच राहिलो ||

 

जाऊ दे सये,विसर सारं

पुन्हा नव्यानेच भेटूयात !

होय ग बयो,दोघी मिळून

संध्या गीत गाऊयात ||

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – सूर संगत ☆ सूर संगीत राग गायन (भाग १३ ) – राग~ संपन्न भैरव कूळ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर

सुश्री अरूणा मुल्हेरकर

☆ सूर संगीत राग गायन (भाग १३ ) – राग~ संपन्न भैरव कूळ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆ 

सूर संगत~संपन्न भैरव कूळ

प्राचीन काळी संगीतांतील उत्पत्ती देव देवतांपासून झाल्याचे मानले गेले. पंचमहाभुतांना देवता मानून त्यांची स्तुती आणि प्रार्थना मुख्यतः संगीताद्वारे केली जात असे. अशा संगीतात काही रागस्वरूपे देव देवतांच्या नावानेच अस्तित्वात आली.पुढे त्या त्या रागांना देव~देवतांची वर्णने लावण्यांत आली. अशा प्रकारच्या रागांमध्ये भैरव हा प्रमूख आहे. भैरव म्हणजेच शिव शंकर, शंभू महादेव!

हा भैरव थाटजन्य राग. रिषभ व धैवत कोमल. वादी~संवादी अनुक्रमे धैवत व रिषभ.सात स्वरांचा संपूर्ण जातीचा हा राग प्रातःकाळी गायला जातो. “जागो मोहन प्यारे” ह्या गाण्याच्या ओळी कानांवर पडल्या की भैरव रागाचे दर्शन घडते. यशोदा मैय्या तिच्या नंदलालाला प्रातःकाळी उठविते, “उठी उठी नंदकिशोरे”, “प्रातसमय भई भानूदय भयो, ग्वाल बाल सब भूपति थाडे” अशा वर्णनाच्या बंदीशी ह्या भैरव रागांत ऐकायला मिळतात. पहाटेच्या वेळी चित्त प्रसन्न होते.

सा (रे) ग म प (ध) नी सां

सां नी (ध)प म ग (रे) सा असे ह्याचे सरळ आरोह अवरोह असले तरी सादर करतांना वक्र स्वरूपांत आढळतो, जसे रिषभाला मध्यमाचा स्पर्ष”ग म(रे) सा, धैवताला ग म नी(ध), नी(ध)प असा निषादाचा स्पर्ष हे भैरवाचे खास वैशिष्ठ्य आहे. गायन/वादन रंजक करण्यासाठी पूर्वांगांत सा ग म प ग म(रे)सा, आणि उत्तरांगांत ग म नी(ध)सां अशी वक्र स्वररचना करतात. शांत रस हा या रागाचा आत्मा म्हणता येईल.

अकबराच्या दरबारांतील  तानसेनाने या रागाविषयी “कहे मिया तानसेन सुनो शाह अकबर। सब रागनमे प्रथम राग भैरव।” असे म्हटले आहे. संगीत मार्तंड पं. जसराजजी यांच्या संगीत शिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांचे शिक्षण भैरव रागानेच सुरू होते हे बर्‍याचजणांना माहीत असेलच.

अतिशय संपन्न असे हे भैरव कूळ आहे. अनेक वर्षांपूर्वी कुमार गंधर्वांनी ‘भैरव के प्रकार’ अशी एक मैफील केली होती. ह्या मैफीलीत भैरवाबरोबरच सादरीकरणांत थोडेफार फेरफार करून अहीर भैरव, शिवमत भैरव, भवमत भैरव, बीहड भैरव, बैरागी भैरव, बंगाल भैरव, प्रभात भैरव, धुलिया भैरव, आनंद भैरव नटभैरव, भैरव बहार असे भैरवाचे अनेक प्रकार सादर करून श्रोत्यांना भैरवाचे वैभव दाखवून दिले होते.

“नवयूग चूमे नैन तुम्हारे” हे सलील चौधरींनी संगीतबद्ध केलेले भैरवातील गीत रात्रीकडून पहाटेकडे नेते. “जागो मोहन प्यारे” ह्या पारंपारिक बंदीशीत काही वेगळे शब्द आणि सूर चपखल बसवून लतादिदींच्या आवाजांत ऐकतांना वेगळाच आनंद मिळतो. खेड्यांतून शहरांत आलेला एक तरूणराज कपूरपाण्यासाठी वणवण फिरतो, पहाट होते, प्राचीवर सूर्यबिंब उगवते, पण पाणी न मिळाल्यामुळे त्रासलेल्या त्याला एक सामान्य पाणी भरणारी स्त्रीनर्गीसत्याच्या ओंजळीत घागरीने पाणी घालते. भैरवाच्या सुरांनी भरलेली ती पहाट~चित्रपट संपतो पण भैरव कायम मनांत रेंगाळतो.

कालिंगडा, रामकली,जोगिया ही भैरवाचीच रूपे! “मोहे भूल गये सांवरिया” हे बैजू बावरांतील गीत, सामनामधील “तुम्हावरी केली मी मर्जी बहाल”, जाळीमंदी पिकली करवंद”ह्या लावण्या म्हणजे भैरवाचे चंचल रूप कालिंगडा.

रामकलीतून भैरवाचे मृदू स्वरूप दिसते.भीमसेन जोशी “सगरी रैन मै जागी”ह्या बंदीशीने सवाई गंधर्व उत्सवाची सांगता करीत असत.

जोगिया म्हणजे करूण रसांत भिजलेला भैरव!”पिया मिलनकी आस”ही ठुमरी ऐकतांना डोळे न पाणावणारा श्रोता विरळाच.सौभद्र नाटकांतील”माझ्या मनीचे हितगूज सारे ठाऊक कृष्णाला”हे बाल गंधर्वांनी अजरामर केलेले पद.गीत रामायणातील परित्यक्ता सीतेच्या तोंडी असलेले “मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे”हे गीत श्रोत्यांना देहभान विसरावयास लावते.

असे हे सूर संपन्न भैरव खानदान! हे जाणून घेतल्याशिवाय संगीत शिक्षण अधूरे आहे.

क्रमशः ….

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी

सौ. पुष्पा चिंतामण जोशी

☆ मनमंजुषेतून ☆ काळजातलं कुसळ – भाग 3 ☆ सौ. पुष्पा चिंतामण जोशी ☆ 

“वैजू सारखं वागायला जमत नाही ग आपल्याला. ती कशी कुणी चौकस भेटलं की तिच्या लेकीच्या उत्तम करिअरबद्दल कौतुकाने बोलत सुटते. विचारणार्याची कोरडी काळजी ओठावर यायला संधीच देत नाही.” उषाने त्यांच्या मैत्रिणीचा वैजूचा दाखला देत म्हटलं.

“हो ना! वैजू म्हणते की, ‘लोकांना सतत काहीतरी चघळायला हवं असतं. आपण कशाला त्यांचं च्युइन्गम व्हायचं? आपल्या काळजातलं कुसळ दाखवायचं?”

“बरोबरच आहे तिचं. पण….” म्हणत दोघी  गप्पच बसल्या.  आपापल्या विचारात मग्न झाल्या आणि मग निमूट घरी निघाल्या

* * *

लॅच् की ने दरवाजा उघडल्याचा आवाज आल्यावर उषाने घाईघाईने पुढ्यातली भाजी आवरायला घेतली.

“शी! काय पसारा केलायस आई माझ्या खोलीत.” पर्स ठेवता ठेवता मानसीने शेरा मारलाच.

“हे मॅच बघताहेत आमच्या रूम मध्ये. म्हणून मालिका बघायला मी इथे बसले भाजी निवडत.” उषाने खालच्या मानेने म्हटलं.

“आवर ते सगळं लवकर” मानसीच्या आवाजातून बासगिरी डोकावलीच.

काल मॉलमधून आणलेले ड्रेस घालून बघताना मानसीने खोलीभर टाकलेला पिशव्या, हँगर्स, पिनान्चा पसारा उषाने आज सकाळीच आवरला होता. मुकाट्याने भाजीचा पसारा आवरताना तिने डोळ्यातलं पाणीसुद्धा आवरलं…..

समाप्त

©  सौ. पुष्पा चिंतामण जोशी

जोगेश्वरी पूर्व, मुंबई

9987151890

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 91 ☆ आठवणी – जाहल्या काही चुका ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 91 ☆

 ☆ आठवणी – जाहल्या काही चुका  ☆ 

काही चूका शेअर केल्याने हलक्या होतात असं मला वाटतं,

मी माझी ऑक्टोबर 2020 मधली चूक सांगणार आहे. ती चूक कबूल करणं म्हणजे confession Box जवळ जाऊन पापांगिकार करण्याइतकी गंभीर बाब आहे असे मला वाटते.

गेले काही वर्षे माझ्या पायाला मुंग्या येत होत्या, डाॅक्टर्स,घरगुती उपाय करून झाले, पण मागच्या वर्षी मी बाहेर चालत जाताना पाय जड झाला आणि मला चालता येईना, ऑर्थोपेडीक,फिजिओ थेरपी सर्व झाले तरी बरं वाटेना, स्पाईन स्पेशालिस्ट ला दाखवलं,एम आर आय काढला, मणक्याची नस दबली गेली ऑपरेशन करावं लागेल असं डाॅक्टर नी सांगितलं, मार्च/एप्रिल मध्ये ऑपरेशन करायचं ठरलं, पण बाबीस मार्च ला लाॅकडाऊन झालं, कामवाली बंद, माझी सून लाॅकडाऊन च्या काळात आमच्या मदतीसाठी आली घरची आघाडी तिनं उत्तम सांभाळली! तीन महिन्यानंतर ती परत तिच्या फ्लॅटवर गेली……

माझ्या पायाच्या तक्रारी होत्याच ऊठत बसत स्वयंपाक करत होते, नव-याने घरकामात खुप मदत केली, माझी सून आणि नवरा यांना खुपच कष्ट पडले.

एक मैत्रीण म्हणाली मणक्याचं ऑपरेशन टळू शकतं मी स्पाईन क्लिनीक ची ट्रिटमेन्ट घेतेय मला बरं वाटतंय, तिथे जायचं धाडस केलं कारण कोरोना च्या काळात मी मला मधुमेह असल्यामुळे कुठेच बाहेर जात नव्हते कुणाकडे जात नव्हतो,कुणाला घरी येऊ देत नव्हतो!पण दोन  महिने माझा नवरा मला स्पाईन क्लिनीक मध्ये फिजिओ साठी घेऊन जात होता.घरी आल्यावर आम्ही अंघोळ करून वाफ घेत होतो, पण माझं दुखणं कमी होईना, शेवटी ऑपरेशन ला पर्याय नाही हे समजलं सेकंड ओपिनिअन घ्यायचं म्हणून डाॅ भणगेंची रूबी हाॅलची वेळ घेतली तिथे दोन अडीच तास वाट पाहिली डॉक्टरांची! मला तिथे निवर्तलेले आप्तेष्ट आठवले खुप अस्वस्थ झालं, नव-याला म्हटलं आपण उगाच इथे आलो…माझी मानसिकता समजणं शक्य नव्हतं त्याला..मग  भांडण झाल्यामुळे डॉक्टरांना न भेटता घरी ! काही काळ अबोला, मी पुन्हा पहिल्या डॉक्टरांना फोन केला त्यांनी चार वाजता बोलवलं व पाच दिवसांनी दीनानाथ मध्ये ऑपरेशन करायचं ठरलं, सर्व टेस्ट झाल्या, दीनानाथ ची भीती वाटत होती, माझी पुतणी म्हणाली काकी वॅक्सिन घेतल्यानंतर ऑपरेशन कर,दीनानाथ मध्ये जाऊ नको,कामवाली पण म्हणाली, “आई रूबी लाच ऑपरेशन करा!” मला ऑपरेशन ची भीती वाटत होती पण त्या काळात कोरोना ची भीती  वाटली नाही, माझं ऑपरेशन म्हणून सून आणि नातू आमच्याकडे सोमवार पेठेत रहायला आले, कोरोना ची तीव्रता कमी झाल्यामुळे कामवालीला  परत बोलवलं होतं, ऑपरेशन करणा-या डॉक्टरांनी “दीनानाथ मध्ये आता अजिबात भीती नाही, नाहीतर मी तुम्हाला सांगितलं नसतं तिथे ऑपरेशन करायला ” अशी ग्वाही दिली! गुरुवारी ऑपरेशन झाले,हॉस्पिटल मध्ये माझ्याजवळ “हे” राहिले. आम्ही सोमवारी घरी आलो, आमची सून कार घेऊन  आम्हाला न्यायला आली हॉस्पिटल मध्ये,  घरी आल्यावर नातू म्हणाला “आजी मला तुला hug करावंसं वाटतंय पण तुझं ऑपरेशन झालंय!”……..

माझे दीर आणि जाऊबाई मला भेटायला आले त्याचदिवशी!

……..आणि चार नोव्हेंबर नंतर आमचं सर्व कुटुंब “पाॅझिटीव” एक दोन दिवसांच्या अंतराने गोळविलकर लॅबचे रिपोर्ट….. मी, हे, दीर, जाऊ केईएम ला एडमिट, सूननातू घरीच होते होम क्वारंटाईन पण सुनेला ताप येऊ लागला, म्हणून ती आणि नातू मंत्री हॉस्पिटल मधे एडमिट झाली, ऐन दिवाळीत आम्ही कोरोनाशी लढा देत होतो…….

या सर्वाचा मला प्रचंड मानसिक त्रास झाला. असं वाटलं  हे सगळं होण्यापेक्षा मी मरून गेले असते तर बरं झालं असतं, ऑपरेशनला तयार झाले ही माझी चूक, रूबी हाॅल मधून परत आले ही पण चूकच ! संपूर्ण कुटुंबाला माझ्या ऑपरेशन च्या निर्णयाने बाधा झाली, मला सतत रडू येत होतं, सारखी देवाची प्रार्थना करत होते…..आपण कुणीतरी शापीत, कलंकित आहोत असं वाटत होतं! आयुष्यभराची सर्व दुःख या घटनेपुढे फिकी वाटायला लागली, सर्वजण बरे होऊन सुखरूप घरी आलो ही देवाची कृपा! मुलगा म्हणाला “आई तू स्वतःला दोष देऊ नकोस, ही Destiny आहे,”

पण हे शल्य सतत काळजात रहाणारच!

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares