मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “ही लढाई अनिवार्य!” भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य 

☆ “ही लढाई अनिवार्य!” भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके

कॅप्टन राकेश वालिया 

साडेनऊ वगैरे वय असताना या पोराचे आई-वडील रस्ते अपघातात जातात. हे पोर मग नातेवाईकाच्या आश्रयाला जातं. आई-बाप नावाची सावली सरल्यावर डोईवर ऊन-पावसाचा खेळ नित्याचा होतो. परिस्थिती याला बाल-कामगार बनवते. पोरगं कारखान्यात तुटपुंज्या रोजंदारीवर राबत राबत मोठं होत राहतं. इतरांच्या सायकली दुरुस्ती करत करत आपल्या आयुष्याचा मार्ग आक्रमत राहतं. कृश शरीरयष्टी त्यात अन्नाची आबाळ. खाली धरती आणि उशाशी आभाळ.

डिसेंबर, १९७१. भारतीय सैन्य पाकिस्तानशी लढायला निघालं आहे. दिल्ली रेल्वे स्टेशनवर सीमेवर निघालेली ट्रेन भरगच्च भरून तयार आहे. सैनिकांना जेवण पुरवण्यासाठी नेमलेला ठेकेदार त्याच्याकडच्या पोरांना घेऊन स्टेशनवर पोहोचला आहे. पोरं पटापटा प्रत्येक डब्यात आलू-पुरीचे डबे सैनिकांच्या हाती सोपवत आहेत. या पोरांची सुद्धा ही जगण्याची लढाईच की. हा लहानगा गडी सुद्धा त्याच लगबगीत आहे. गाडी हलली… हळूहळू पुढे जाऊ लागली. डब्याच्या खिडकीतून पाण्याची एक खास लष्करी बाटली डोकावली… पानी… पानी चाहिदा! कुण्या सैनिकाला पाणी भरून पाहिजे होतं. या पोराने ती हाक ऐकली… खिडकीपाशी धाव घेतली… फलाटावर ठेवलेल्या पाण्याच्या पिंपातलं पाणी बाटलीत शिगोशीग भरलं… आणि वेग घेत असलेल्या गाडीपेक्षा जास्त वेग धारण करीत त्या सैनिकाच्या हाती ती बाटली दिली!

“बेटे, फौज में भर्ती हो जाना… ” पोराच्या खांद्यावर थोपटत तो सैनिक म्हणाला… आणि गाडी पुढे निघून गेली… या पोराच्या डोक्यात एक विचार रुजवून.

त्या सैनिकाच्या डोईवर त्याने परिधान केलेल्या मोठ्या तिरकस, रुबाबदार टोपीने त्याच्या मनात घर केले. असा गणवेश पाहिजे आयुष्यात! नंतर समजले… पाणी मागणारी व्यक्ती सामान्य जवान नव्हते… अधिकारी होते त्यांच्यातले. काय लागतं सैनिक अधिकारी व्हायला? किमान माध्यमिक शिक्षण तर पाहिजेच. तोवर आठवीपर्यंत मजल गेली होती… शाळेत जाता कधी न जाताही. दहावीची परीक्षा दिली… उत्तीर्ण होणे अनिवार्य ठरले होते… Passed शेरा प्रमाणपत्रावर उमटलेला पाहून मन भारावून गेलं. सेनेत जाण्याचा मार्ग माहीत नव्हता तोवर. ग्वालियर येथे कारपेट कारखान्यात काम मिळाले. त्याच शहरात सेनेची भरती निघाली.

तोवर पोरानं धावण्याचा सराव, व्यायाम करून ठेवला होताच. प्राथमिक शारीरिक परीक्षेत निवड झाली… आता लष्करी वर्दी दूर नव्हती. पण समजलं की या भरतीमध्ये ती तिरकी टोपी नाही मिळणार घालायला… मन खट्टू झालं. डोक्यावर गोरखा बटालियनची, पूर्ण डोकं झाकणारी, हनुवटीवर घट्ट दोरी बांधलेली टोपी घालून एक भरती अधिकारी झाडाच्या सावलीत खुर्चीवर बसलेले दिसले. “त्यांच्यासारखी टोपी पाहिजे! ” हा तरुण म्हणाला. उत्तर मिळालं… ”त्यासाठी वेगळी परीक्षा असते.. आधी पदवीधर व्हावे लागते! ” पोराने मनाशी काही विचार केला… आणि त्या रांगेतून काढता पाय घेतला!

पडत-धडपडत बी. ए. ची पदवी पदरात पडली… पण नशिबाने पुढे मुंबईला पोहोचवलं… तारुण्यसुलभ मनाला सिनेमा नावाची जादूसुद्धा भावली होतीच तोवर. मायानगरीत एका फुटकळ प्रवासी एजन्सीत काम लागलं. कामानिमित्त कुलाब्याच्या नेव्ही नगरमध्ये मित्रासोबत जाणं व्हायचं… तिथे पांढ-या शुभ्र, रुबाबदार गणवेशात येणारे-जाणारे अधिकारी दिसायचे. त्यांपैकी एका साहेबांच्या दृष्टीस प्रवेशद्वाराजवळ नेहमी दिसणारा हा तरुण पडला. त्यांनी याची चौकशी केली आणि “माझ्यासारखे अधिकारी व्हायचं असेल तर स्पर्धा आहे… परीक्षा द्यावी लागेल” हे सांगून मार्ग सांगितला. त्या मार्गावर चालत हे महाशय ती परीक्षा देते झाले. एक-दोनदा आपटी खाल्ल्यानंतर एकदा उत्तीर्ण झाले. इतर कुणाचेही मार्गदर्शन नसल्याने ब-याच गोष्टी ठाऊकच नव्हत्या. वाटलं आता मिळेल युनिफॉर्म. मग समजलं आता एस. एस. बी. मुलाखत द्यावी लागेल… त्यातून सुटला की मग मिळेल वर्दी! मुलाखतीत अपयश आलं आणि या माणसाने रेल्वे रूळाकडे धाव घेतली. जीवन संपवून टाकलेले बरं. रेल्वे गाडी काही फुटांवर आल्यावर मनातला लढवय्या जागा झाला… कुणीतरी आपली परीक्षा घेतं आहे… ज्या अर्थी संकटे मोठी त्या अर्थी इनामही मोठेच असणार! गडी चपळाईने बाजूला झाला… मोठा आवाज करीत, धुरळा उधळीत ट्रेन निघून गेली… इथेही आणखी एक प्रयत्न करावा लागला. पण अलाहाबादमध्ये हेही दिव्य पार झालं. पण पुढे वैद्यकीय चाचणी असते… त्यात नापास म्हणजे थेट घरी परत जाणे. आयुष्यात तोवर कधी डॉक्टरांकडे जाण्याचा प्रसंग अनुभवला नव्हता. त्यावेळी पैसेच नसायचे. कामाच्या धावपळीत किरकोळ आजार दुर्लक्षित रहायचे. पायांत चप्पल नसायची बहुतेकवेळा. कधी काही जखम झाली की औषधी मलम म्हणून चक्क टूथपेस्ट लावायची जखमेवर… आग व्हायची… पण हेच औषध… जखम यथावकाश बरी व्हायची.

 वैद्यकीय तपासणीत सारं काही आलबेल… पण दृष्टी थोडी दोषपूर्ण. पण ते चालून गेलं त्यावेळी नशिबानं. अजूनही वर्दी मिळायला अवकाश होता. दिल्लीतून निजामुद्दीन स्टेशनवरून त्यावेळच्या मद्रास म्हणजे आताच्या चेन्नईकडे स्वारी निघाली. तमिल, मद्रासी भाषा येत नाही… स्टेशनचं नाव समजत नाही पटकन… चोवीस तास सलग प्रवास करून प्रशिक्षण संस्था गाठली. तिथं दैनंदिन वापरासाठीच्या वस्तूंचे कीट विकत घ्यावं लागतं हे ठाऊक नव्हतं. किंमत होती चौदाशे. खिशात सातशे. दोनदा रांगेतून बाहेर पडले साहेब. तिथल्या एका अनुभवी माणसाने हे ओळखले… सातशे रुपये उसने दिले.

प्रशिक्षण जड जाऊ लागले… घरी जावे आता… विचार आला. कारण प्रकृती धडधाकट नव्हती. खाण्याची आबाळ झालेली आयुष्यात. पण अशाच एका माणसाने धीर दिला… ही संधी पुन्हा मिळणार नाही! मनातला सैनिक आता पुन्हा उठून उभा ठाकला… प्रशिक्षण संपले! गुरखा पलटण हट्टाने मागून घेतली… आणि नशिबाने तीच मिळालीही… तीच तिरकी टोपी… हनुवटीवर बंद् घट्ट बांधलेली!

साडेनऊ वर्षे सेवा झाली… उत्तम सेवा झाली. ३५० ब्रिगेड मध्ये सारं काही उत्तम सुरु होतं. लग्न झालं. मुलगा झाला. आणि पत्नीला असाध्य व्याधीने घेरलं. कुटुंब फार मोठं नव्हतं. गरजेच्या वेळी पाठ फिरवलेल्या नातेवाईकांशी पुन्हा धागे जोडलेले नव्हतेच. कौटुंबिक परिस्थिती अगदीच हाताबाहेर जाऊ लागल्यावर स्वेच्छानिवृत्ती मागावी लागली. वैद्यकीय कारण म्हणून अनुग्रहाच्या तत्वावर सेवेतून निवृत्ती मिळाली. फारशी रक्कम हाताशी नव्हती. स्वत:चे घरही झालेले नव्हते. मुलगा अजून हाताशी यायचा होता. एक मारुती गाडी चालवायला घेतली. पुढे प्रवासी व्यवसायात उडी घेतली. पुढे नागरी विमान वाहतूक क्षेत्रात संधी मिळवली… आणि यश मिळायला आरंभ झाला.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “शिवदासी लता…” – लेखक : श्री. गो. नी. दांडेकर ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सौ. शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “शिवदासी लता” – लेखक : श्री. गो. नी. दांडेकर ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

असे तीव्रतेने वाटत असे, की या दीदीला कुठेतरी एखादे दृढ आलंबन सापडले असले पाहिजे. एरवी प्रसिद्धीचे अन् लोकप्रियतेचे हे लोटच्या लोट अंगावरून जात असता एखादा माणूस केवळ खुळावून गेला असता.

एके दिवशी अचानकपणे पत्ता लागला. हे लोकप्रियतेचे चपेटे ज्या महापुरुषाच्या आश्रयाने दीदी सोसत्ये आहे, त्याचे नाव कळले.

बाळाकडून (हृदयनाथ मंगेशकर) समर्थभक्त देवांचे समर्थावतार घेऊन आलो – अभ्यासासाठी. पुस्तकाची पहिली पृष्ठे उलटायचे कारण पडले नाही. मधले संदर्भ हवे असत, तेवढ्यापुरता तो भाग उघडला, की माझे काम भागत असे. पण एकदा पुस्तकावर नाव कुणाचे आहे, हे पाहण्याचा फुकाचा चाळा करू गेलो. बाळाचे थोडे तिरके, अतिशय देखणे हस्ताक्षर नुसते पाहत बसणे, हेही एक सुखच आहे.

मुखपृष्ठ उलटले, तो आत अक्षरे दिसली :

“श्रीजगदंबेच्या कृपेने – ज्ञानेश्वरांच्या लेखणीने – समर्थांच्या वैराग्याने – शिवाजीमहाराजांच्या तरवारीने पवित्र झालेल्या या मंगल महाराष्ट्राचा तुला कधी ओढही विसर न पडो, हा आशीर्वाद. “

आणि खाली सही होती –

‘शिवदासी’

१९-१०-५५

चि. हृदय,

१९ व्या वाढदिवसानिमित्त’

 शिवदासी!

 शिवदास्याबद्दल मनी केवढा गौरव! छंदच जडायचा असेल, तर तो हा असा जडावा. तो श्रीमंत योगी अशा अलौकिक योग्यतेचा पुरुषोत्तम होता, की भल्याभल्यांनी त्याचे दास म्हणून मिरवण्यांत धन्यता मानावी! ते एक भावनिक समाधान असते. बऱ्या-वाइटाच्या लाटा भवताली आंदोळत असता मनाला आधार वाटत राहतो, की चिंतेचे कारण काय? ज्याचे दास म्हणून म्हणवितो, त्याने तर याहून अधिक विराटरूप अंगावर झेलून त्याचा भार सहज वाहिला होता!

दीदीचे हे शिवदास्य केवळ कौतुकापुरते नव्हे, याचा प्रत्यय येण्याजोगी एकदोन बरी निमित्ये घडली. शिवराय मंडळाने दादरच्या हेटकरी महाजन वाडीमध्ये शिवछत्रपतिविषयक प्रदर्शन भरवले होते. काही दुर्गांच्या प्रतिमा, छायाचित्रे, शिवजीवनातले चित्ररूप केलेले काही प्रसंग, शिवकालीन शस्त्रे, अशा नाना परी यत्नपूर्वक मिळवून मांडल्या होत्या. अनेक जवानांनी रात्रंदिवस कष्ट केले होते. मात्र त्यांच्या त्या श्रमांचा परिहार करता येईल, असे मंडळाजवळ काही नव्हते। पाचसातशे रुपये खर्चावेत, तेव्हा शिवछत्रपतींच्या नावाला साजेसे कवतिक करता आले असते.

एकदम विचार आला, की दीदीजवळ हात पसरावा. शब्द टाकताक्षणी दीदी मूठभर नोटा घेऊन बाहेर आली; आणि कार्यकर्त्यांच्या मुद्रा उजळून निघाल्या. पावती नेऊन देऊ जाता ती म्हणाली,

“करायची काय पावती? घरच्या कामासाठी कुणी पावत्या का फाडीत बसते? “

दुसरा प्रसंग –

सिंधुदुर्गावरून शिवछत्रपतींच्या पदमुद्रेचा ठसा घेऊन मुंबईस आलो. मनी गौरव दाटला होता, की या क्षणीं आपल्याजवळ एक अलौकिक वस्तु आहे. ज्याला तिचे मोल कळते, तो पाहतांक्षणी मोहरून उठेल. स्वतः शिवछत्रपतींच्या पावलाचा ठसा!

दीदीकडे जाऊन तो कसा मिळवला, इत्यादि सर्व फुशारक्या मारल्या. शेवटी म्हणालो,

“आणि या क्षणी तो ठसा माझ्याजवळ आहे! ”

अतिशय उतावीळ होऊन दीदी म्हणाली,

“खरे? कुठाय्? दाखवा ना! “

ठशावरची आवरणे सोडेतोवरही तिला धीर निघेना. ठसा अनावृत्त होताच तिने अत्यंत श्रद्धापूर्वक करस्पर्श करून हात भाळी टेकला, अन् एखाद्या लहान मुलीप्रमाणे धावत ठसा घेऊन आपल्या शयनगृहात गेली. तिथे तो उशाशी ठेवून दिला. किती वेळ त्याच्याकडे बघत राहिली. मग भराभरा ज्याला त्याला फोन करून सांगू लागली,

‘हाँ, जी, सुनिये, महाराज शिवछत्रपति का चरणचिन्ह – हाँ, उन्हींका – अभी मेरे पास है, वही तो बता रही हूँ -‘

मात्र आता सूक्ष्मपणे पाहता वाटू लागले आहे, ही स्वरदेवता अलिकडे अधिक गंभीरपणे जीवनाचा विचार करू लागली आहे.

ज्या वेडाने जनी-मीरा झपाटल्या होत्या, त्या दिशेने हे पाखरू भरारू लागले आहे! तिथवर झेप घ्यावी, जिथवर त्या दोघी पोचल्या होत्या. त्याही तर प्रापंचिक कर्दमातून वर उठल्या होत्या. तर मग आपल्यालाही ऐहिक व्यापांची खंत मानायचे कारण नाही. तुकारामाने भरवंसा देऊन ठेवला आहे –

मागे झाले नका पाहो । पुढे जमान आम्ही आहो ।।

जामिनकी त्या महावैष्णवाने स्वीकारली आहे, तेव्हा आता द्यावे स्वतःला झोकून त्या महासमुद्रामध्ये!

 

लेखक:गोपाळ नीलकण्ठ दाण्डेकर

प्रस्तुती: सौ. शोभा जोशी 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मराठीच बोलू कौतुके… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

सुश्री संगीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ मराठीच बोलू कौतुके ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆

!! माझा मराठाची बोलू कौतुके |

  परि अमृतातेही पैजा जिंके !!

                                – संत ज्ञानेश्वर

भाषा ही कोणत्याही मानवी सामाजिक जीवनाचा आधार आहे. ते परस्पर संवादाचे जसे प्रभावी माध्यम आहे तसेच ते ज्ञानसंचय, ज्ञानप्रदानाचे ही महत्त्वाचे माध्यम आहे. संस्कृती, इतिहास, आचार-विचाराचे महत्त्वाचे साधन म्हणून भाषेकडे पाहिले जाते. मराठी हि महाराष्ट्राची राजभाषा आहे. महाराष्ट्राची ती मातृभाषा आहे..

मराठी भाषेला साधारणतः लिखित साहित्याचा बाराशे वर्षांचा इतिहास लाभला आहे. महाराष्ट्रात आणि जगात पंधरा कोटी लोक मराठी भाषा बोलतात. प्राचीन कालखंडापासून अतिशय दर्जेदार साहित्याची निर्मिती मराठी भाषेतून झालेली आहे. ज्ञानेश्वर-लीळाचरित्र, तुकारामांची गाथा, नामदेवांची-अभंगवाणी, बखर, पोवाडे ही प्राचीन मराठी भाषेची खरी ओळख असून त्यांची ख्याती सातासामुद्रांपलीकडे पोहोचली असून यांचा अनेक भाषांत अनुवादही झाला आहे. आधुनिक युगात निबंध, कथा, कविता, कादंबरी, नाटक व ललित गद्य तसेच दलित, ग्रामीण, स्त्रीवादी आणि आदिवासी साहित्यातून देशभर आणि जगभर मराठीची स्वतंत्र अशी  ओळख निर्माण झाली आहे.

समाजातील दिन-दलित, वंचित, उपेक्षित घटकांच्या मनोव्यथेचा पहिला हुंकार मराठी साहित्यातूनच उमटला. अभिजनांच्या साहित्य जाणिवांपेक्षा बहुजनांच्या जीवन वेदनेला स्थान देणारे मराठी साहित्यच आहे.

शिक्षणाची प्रक्रिया अधिक गतिमान करण्यासाठी मातृभाषेसारखे दुसरे साधन असूच शकत नाही म्हणूनच महाराष्ट्रात उच्चशिक्षण मराठी भाषेतून

दिले जावे…. मराठी भाषेत अकराव्या शतकापासून संतानी सातत्याने ज्ञानाची क्रांती केली आहे. मराठीतील लोकवाङ्मय व लोकसंस्कृतीच्या खुणा मराठीतून विविधतेने नटलेल्या दिसतात… अनेक श्रेष्ठ संत मंडळींनी आपल्या बोलीतून मराठी भाषेला सजविले, फुलविले व मोठे केले.. विसाव्या  एकविसाव्या शतकातील अनेक थोर लेखक,कवींनी आपल्या

शब्दसामर्थ्यामधून मराठी भाषा समृध्द केली पण हीच आपली मातृभाषा कुठेतरी मागे पडते आहे हे विधान सर्वत्र ऐकायला मिळते आणि ह्या मागे एक आर्त कळकळ असते ती आपल्या मातृभाषेवरील प्रेमाची, आस्थेची… मुळात भाषा कशासाठी तर संवाद साधण्यासाठी, भावना, विचार मांडण्यासाठी, ते जतन  करून ठेवण्यासाठी, विकासासाठी… आणि मग जेव्हा हीच भाषा मागे पडते तेव्हा फक्त भाषा नाही तर एक संपूर्ण मानव समुह , एक संस्कृती मागे पडते.

जागतिकीकरणाच्या युगात मराठी भाषा नवनव्या आव्हानांना सामोरी जाऊन, कधी त्यात सामावून तर कधी सामर्थ्याने अनेक क्षेत्रात प्रभावीपणे पदार्पण करताना दिसते आहे. या भाषिक संक्रमणाच्या युगातही मराठीने आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवले आहे. कला, संस्कृती, क्रीडा, न्यायालयीन व वैधक कामकाज, गणित, विज्ञान, उपयोजीत मराठी, संगणक, वृतपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन, मोबाईल इत्यादी अनेक क्षेत्रांत मराठी भाषा आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून आहे.  नव्या क्षेत्राची परिभाषा मराठीने आत्मसात केली आहे. या पुढेही मराठी भाषेला नव्या नव्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सजग रहावे लागणार आहे हे नक्की..

!!लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी !!

खरंच हे दिवस महाराष्ट्रात आहेत का? मातृभाषा आहे म्हणून मराठीचं कौतुक आहेच. पण बऱ्याचदा असं होतं की मुलं मराठी कुटुंबातून आलेली असली तरी त्यांच्यावर इंग्रजीचा प्रभाव जास्त असतो. अगदी उलट परिस्थिती जेव्हा इतर भाषिक लोक एकत्र येतात तेव्हा असते. तेव्हा खंत वाटते की आपलं आपल्या मातीशी असलेलं नातं तुटतंय का? महाराष्ट्राच्या मातीशी असलेले घट्ट ऋणानुबंध टिकवून ठेवणारी आपली मातृभाषा आहे. जिचा गोडवा अवीट आहे जिने राष्ट्रीय ख्यातीचे पुरस्कारविजेते लेखक-कवी घडवले जिने बॉलीवूडकरांनाही भुरळ घातली ती भाषा बोलण्यात कमीपणा वाटण्याचं काही कारणच नाही. दुसऱ्याची वाट न पाहता स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे असे मनापासून नमूद करीन.. तसंच कॉलेजच्या मराठी वाङ्मयमंडळांची ही व्याप्ती वाढली पाहिजे तरच जास्तीत जास्त मराठी साहित्य जनमानसांत पोहोचेल व मराठी केवळ कागदापूर्तीच मर्यादित न राहता सगळ्यांच्या मनामनात राहील. मातृभाषेमधून जे संस्कार मनावर, बुद्धीवर होतात ते कुठेतरी आत्म्यात रुजत असावेत.. मातृभाषेत विचारांची जडणघडण झाली तर माणूस प्रत्येक गोष्टीचा विचार करायला लागतो आणि हळूहळू सगळ्या समाजाचीच

विचारसरणी बदलते. त्यामुळे मराठीचा अभिमान बाळगणे हा संकुचितपणा असा विचार करणारे आम्ही भाषेच्या डबक्यातच अस्तित्व असणारे बेडूक नसून एका विचारी आणि सर्वसमावेशक राज्याचे नागरीक आहोत हे सांगायला नकोच.

आमच्या मराठीची पीछेहाट होण्यामागे दुसरं तिसरं कोणी जबाबदार नसून आम्हीच आहोत. आम्हीच मराठी बोलायला टाळायला लागलो. अश्याने बाकीच्या भाषा बोकाळल्या आणि आम्ही त्यांचा उदो उदो करत रहिलो.

अहो या मराठीने तिचं गाऱ्हाणं सांगावं तरी कोणाला ? झोपेचं सोंग घेतलेल्यांना की खरंच या विषयाचं गांभीर्यच न उमगणा-यांना ? मराठीचं बोलण कळेल तरी का या इंग्रजाळलेल्या मराठी फकिरांना ?

मराठीच मराठी राहिली नहिये. तिची कक्षा रुंदावी, तिची प्रगती व्हावी असं तिलाही वाटत असणारचं ना ? पण मग काय कुठलीही भेसळ सहन करावी का तिने ? मराठीचं शुद्धीकरण करायला प्रत्येक पिढीत सावरकर जन्माला येतीलच असं नाही ना..! सावरकरांनी मराठीला इंग्रजी राजवटीत वाचवलं, सावरलं आणि पुन्हा उभं केलं. मराठीत कित्येक शब्द सावरकरांनी रुजू केले. पण ते इंग्रजीतून अथवा इतर प्रांतीय भाषांमधून नाही तर तिचं मूळ जिच्यात होतं अशा संस्कृतमधून..

किती श्रीमंत ही मराठी.. ज्ञानदेव तुकोबारायांसारखे संत मराठीच्या छायेत वाढले. तर या मराठीच्या अंगाखांद्यावर माडगुळकर, कुसुमाग्रज, शांता शेळके, सुरेश भट, भा.रा तांबे, आरती प्रभू अश्या अनेक महान कवींची कविता खेळली, बागडली. व. श्री. ना. पेंडसे, पु. काळे, जी. ए. कुलकर्णी, शं. ना. नवरे, अशा कित्येक कथाकारांच्या गोष्टीचं कथेत रुपांतर झालं. भारुड, जात्यावरच्या ओव्या, गोंधळ असे गेय साहित्य प्रकार, ज्ञानेश्वरी, दासबोध, गाथा असे ग्रंथ या मराठीने प्रत्येक मराठी

मनापर्यंत पोहोचवले. हे साहित्य पुढल्या पिढीला सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कुठपर्यंत झेपेल हे कोणास ठाऊक?.. . कारण हे समजायला मराठी गाभा लागतो. आणि हे साहित्य श्रुती, स्मृती या माध्यमांमधून जर पुढे गेलं नाही तर हे सगळं कुठेतरी लुप्त होण्याची फार दाट शक्यता आहे .. मनाला लागलेली एक रूखरूख..

कुठलीही भाषा शिकायला फारसा काळ  लागत नाही. त्या भाषेत प्रभुत्व मिळविण्याची इच्छा असेल तरीही नाही… त्यासाठी मुलांना इंग्रजी शाळांमध्येच शिकविण्याचा आग्रह का ? या सगळ्या अट्टाहासात मुलांचा आत्मविश्वास तर बळी पडत नाहीये ना?  न्यूनगंड तर निर्माण होत नाहीये ना ? असा विचार या पालकांनी वेळीच केलेला बरा.

मराठीच्या उत्कर्षासाठी झगडणं हा आमचा मराठी धर्म. महाराष्ट्रात मराठी बोलून जर समोरच्याला कळत नसेल तर आम्ही मराठी सोडण्याची नाही तर समोरच्याने मराठी शिकण्याची गरज आहे असं माझ्यासारख्या मराठी माणसाचं ठाम मत आहे. यातून मराठीचं अस्तित्व टिकून राहील आणि त्या निमित्ताने एक नवीन भाषा शिकण्याचं भाग्यही शिकविणा-याला  लाभेल असे मला वाटते..सध्या इंग्रजी आणि हिंदी ची लाट आहे. पण जेंव्हा प्रयत्नांती मराठीच पारडं जड होईल ना  तेव्हा हेच इंग्रजाळलेले मराठी पुन्हा मराठीच्या लाटेत निर्विकारपणे का होईना सामील होतील अशी आशा मनी आहे.

 

 ©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे मो. 9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “माझी भाषा… माझा समज…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “माझी भाषा… माझा समज…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

नुकत्याच झालेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने बरेच काही चांगले, विनोदी वाचायला मिळाले. आणि मराठी भाषेवरच्या प्रेमाच्या लाटेने थोडी उसळी घेतली… 

आणि बोलतांना मराठीत असलेले, लपलेले, लपवलेले, आणि गैरसमज करून घेतलेले अर्थ व त्यामुळे होणारी गंमत लक्षात आली.

घरात बोलत असतानांच साध वाक्य, तुम्ही चहा आधी घेणार, कि भांडी घासून झाल्यावर. आता सांगा यात चहा घेणार… म्हणजे मिळणार का आपल्या हाताने घेणार… आदर आणि स्वावलंबन दोन्ही अर्थ यात काठोकाठ भरलेले आहेत. कदाचित हे अर्थ जितके काठोकाठ भरलेेेले आहेत तेवढा चहा पण कपात भरलेला नसतो. त्यातही आपण थोडी कपात करतो. या बरोबरच भांडी कोण घासणार… याचा उल्लेख नसला तरी बरोबर समजत. पण वाक्यात गंमत आहे.

असंच दुसरं वाक्य. काही कळलं का. आता यात विचारणा, प्रश्न, आणि असलेल्या बुध्दी बद्दल शंका… सगळ्या भावना यात आहेत. मग ते वाक्य आपल्यासाठी असेल, किंवा आपण म्हंटल असेल. पण प्रसंग, परिस्थिती, शब्दावर दिलेला जोर, आणि अर्थातच चेहर्‍यावर असणारा भाव यामुळे काय म्हणायचं ते लक्षात येतच. याच धर्तीवर असणारं आणखीन एक वाक्य, काही गरज नाही. यात राग आणि सौजन्य दोन्ही आहे. पण हे वाक्य सौं. च असेल, तर सौजन्य असेलच असही नाही. परिस्थितीनुसार याचा अर्थ आपण आपला लावायचा असतो. जमेल का हे पण याच अर्थाने ऐकायला येणारं वाक्य. यात क्षमतेवर विश्वास जाणवतच नाही. काहीवेळा काळजी, तर काहिवेळा उपरोध जाणवतो.

लक्ष कुठे आहे तुमचं हे तर लक्ष्यवेधी वाक्य आहे. यात आपण काय सांगतो या कडे लक्ष नाही. किंंवा ज्याची गरज आहे ते सोडून नेमकं कशाच निरीक्षण चाललं आहे हे लक्षात आणून दिल जातं. यावेळी लक्ष आणि लक्ष्य दोन्ही विचलित झालेलं लक्षात येत.

तुम्ही काय देणार यात अपेक्षा, कौतुक, आनंद, आश्चर्य याच बरोबर अपेक्षित असलेल काहि मिळणार नाही याची जवळपास खात्रीच असते. फक्त वेेळ, व शब्दांच्या सुरावरुन यात काय आहे ते समजून घ्याव लागतं.

एखादं काम पूर्ण केल्यावर आपण सहज म्हणतो, झालं. यात काम पूर्ण केल्याचा आनंद किंवा समाधान असतं. पण हे काम मी करु का… अशी विचारणा आपणहून केली, आणि त्यावर झालं… अस उत्तर आल, तर मात्र त्या झालं याचा अर्थ आपल्याला वेगळा सांगावा लागतच नाही. यात आनंद किंवा समाधान सापडणारच नाही. जाणवेल ती फक्त निराशा… 

आपण मराठीत बोलत असलो तरी काही इंग्रजी शब्द आपण आपलेच म्हणून सर्रास वापरतो. कदाचित एकदा आपलं म्हंटल की दूर लोटायच नाही हा मराठी बाणा यात असेल. किस हा शब्द मराठीत आणि इंग्रजीत लिहितांना वेगळा आणि अर्थही वेगळा असला तरी, व आपण बोलतांना किस याचा मराठी अर्थच घेतला तरी वाक्य कस ऐकतो त्यावरून ऐकतांना गंमत वाटते.

आज दोन्ही वेळेस ऊपवास आहे. मग… किस सकाळी करु कि रात्री चालेल… अस विचारल तर… गंमत वाटणारच. आणि समजा ऊत्तर दिल… सकाळीच कर. रात्रीच रात्री बघू… तर… किंवा एखाद्या गोष्टीबद्दल नको तितकी चर्चा सुरु असेल तरी म्हणतो, बास आता… किती किस पाडायचा… 

बोलीभाषा मराठीच असली तरी पुणं, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, मराठवाडा, नाशिक, खान्देश इथली वेगळी आहे. आमच्याकडे काहि लोकांना ळ चा उच्चार ड असा करायची सवय आहे. लिहीतांना ळ लिहीला तरी उच्चार ड असा करतात. यात काही चूक आहे अस वाटत नाही. आमच्या वर्गात नेमाडे, भोळे, काळे अशी आडनांव असणारे होते. या सगळ्यांनाच एक जण बोलवत होता. पण तो म्हणाला नेमाडे, भोडे, काडे. सगडेच्या सगडे संध्याकाडी या. समजल तरी ऐकतांना गंमत वाटायची. एक म्हण आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार. आता हिच म्हण याने म्हंटली तर ती उथड पाण्याला खडखडाट फार अस म्हणेल. खळखळाट आणि खडखडाट किती विरुद्ध अर्थ आहे. पण हिच गंमत आहे.

अशा खूप गोष्टी असतील. पण भाषेत प्रेम, ओलावा, गंमत आहे कारण ती माझी आहे.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५ आणि ६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ५ आणि ६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

– – – श्लोक ५

मना पापसंकल्प सोडून द्यावा

मना सत्यसंकल्प जीवी धरावा |

मना कल्पना ते नको विषयांची |

विकारी घडे हो जनी सर्व ची ची ||

अर्थ : समर्थ मनाला बजावत आहेत की हे मना तू पापसंकल्प (वाईट विचार)सोडून दे आणि त्या जागी सत्यसंकल्पांना (सद्विचार किंवा परमात्मास्वरूपाचे ज्ञान) स्थान दे. हे मना तू विषयांची कल्पना देखील करू नकोस कारण विषयातून नाना प्रकारचे विकार निर्माण होतात. आणि मग तशा प्रकारची कृत्ये हातून घडतात. त्यामुळे लोकांमध्ये छी थू होते.

आधीच्या श्लोकात समर्थ म्हणतात, ” मना अंतरी सार विचार राहो ” मग मनामध्ये हे सार विचार म्हणजेच चांगले विचार कायमस्वरूपी राहावेत म्हणून काय करायला हवे ते समर्थ आपल्याला या श्लोकात सांगतात. त्यासाठी सुरुवातीला पापसंकल्प म्हणजे आपल्या मनातील वाईट विचारांचा त्याग करावा लागेल. प्रत्येकाच्या मनात चांगले वाईट असे विचार येतच असतात. त्यातही वाईट विचार लवकर येतात आणि ते नैसर्गिक असते. मग असे विचार घालवले तर त्या जागी दुसरे काहीतरी हवे कारण रिकामे मन हे सैतानाचे घर असते असे आपण म्हणतो. म्हणून समर्थ म्हणतात की पापसंकल्प म्हणजे वाईट विचारांचा त्याग केल्यानंतर मनामध्ये सत्यसंकल्पांना म्हणजे चांगल्या विचारांना स्थान द्यावे. आपले मन म्हणजे सुपीक जमीन अशी कल्पना केली तर त्यामध्ये जशा विचारांचे बीज आपण पेरू तसे ते उगवतील, अनेक पटींनी उगवतील. म्हणूनच त्यात सद्विचारांची पेरणी करावी आणि वाईट विचारांचे तण उपटून टाकावे.

पापसंकल्प आणि सत्यसंकल्प या दोन्ही शब्दात ‘ संकल्प ‘हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. संकल्प म्हणजे आपल्याला पुढे जे काही करायचे आहे त्याचा विचार आणि उच्चार मनाशी करणे होय. जेव्हा आपण एखादे धार्मिक कार्य करतो तेव्हा सुरुवातीला गुरुजी आपल्या हातून त्याचा संकल्प सोडतात. म्हणजेच ते कार्य निर्विघ्नपणे पार पडावे आणि त्याचे परिणामस्वरूप फळ आपल्याला मिळावे असा त्यामागील हेतू असतो. नवीन वर्षात किंवा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी देखील आपण संकल्प करत असतो. विद्यार्थी अभ्यासाचा, उत्तम शरीर प्रकृती कमावण्याचा निश्चय करतात. हे संकल्प साधारणपणे चांगलेच असतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संकल्प सोडला होता आणि मग तशी कृती त्यांच्या हातून घडली आणि त्यांच्या संकल्पास मूर्त रूप आले. आधी मनात विचार येतो, त्याप्रमाणे आपल्या जिभेवर ते शब्द येतात आणि नंतर त्याप्रमाणे कृती घडते. म्हणजे विचार, उच्चार आणि आचार ही संकल्पमागील त्रिसूत्री आहे असे म्हणता येईल. मग लौकिक व्यवहारात जर संकल्प एवढा आवश्यक आणि महत्वाचा असेल तर मग अध्यात्मात तर हवाच हवा.

पण असे संकल्प करण्यासाठी मनाचा निर्धार लागतो. त्यासाठी वाईट विचारांचा, कुबुद्धीचा त्याग करावा लागतो आणि त्या जागी सद्विचारांना जाणीवपूर्वक स्थान द्यावे लागते. हे करणे सोपे नाही. त्यासाठी  मनावर नियंत्रण ठेवण्याची सवय लावावी लागते. माणसाचे मन हे नेहमी विषयांकडे ओढ घेते. मनाचे विषय, बुद्धीचे विषय आणि इंद्रियांचे विषय माणसाला आकर्षित करत असतात. इथे विषय या शब्दाचा अर्थ वासना (इच्छा)असा घेता येईल. निरनिराळ्या प्रकारच्या वासना आपल्याला आकर्षित करून त्यांच्याकडे ओढत असतात. आपण त्या वासनांना बळी पडतो. म्हणजे आधी विचार येतो, मग आपल्या मुखात तशा गोष्टी येतात आणि नंतर तशी कृती घडते. तसे होऊ नये म्हणून समर्थ आधीच बजावतात की विषयांची कल्पनाच करू नये. एकदा का विषयांची कल्पना म्हणजे त्या विषयांना मनामध्ये स्थान दिले तर त्यांना बळ मिळत जाते आणि मग माणसाची कृती त्याप्रमाणे होते. काम, क्रोध, लोभ, मोह इ. षडविकार आहेत. माणूस विषयाधीन झाला किंवा वासना आणि विकारांना बळी पडला तर समाजामध्ये त्याची छी थू होते, तो माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचा राहत नाही.

श्रीरामांनी जीवनात संयमाला स्थान दिले आणि मर्यादांचे पालन केले म्हणूनच ते मर्यादा पुरुषोत्तम आहेत. रावण विद्वान होता, शूर होता, ज्ञानी होता पण तो विकारांना बळी पडला आणि त्यामुळे त्याचे अध:पतन झाले. आपण संयमाची मूर्ती असलेल्या आणि मर्यादापुरुषोत्तम असलेल्या श्रीरामांचे पूजन करतो, रावणाचे नाही. म्हणूनच विषयांची कल्पना देखील नको असे समर्थ म्हणतात.

आपल्यासारख्या सामान्य आणि संसारी माणसाच्या मनात साहजिकच प्रश्न येईल की मग विषय भोगायचेच नाहीत का? जीवनाचा आनंद घ्यायचा नाही का? अशा प्रसंगी श्रीरामांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवावा. श्रीरामांनी जीवनाचा आनंद घेतला परंतु त्यासाठी धर्माने जी मर्यादा आखून दिली आहे, तिचे त्यांनी पालन केले. म्हणून आपल्या धर्मात, संस्कृतीत जे मान्य असेल त्याचा संयमितपणे उपभोग आपण घेऊ शकतो. आणि ते करत असताना सत्यसंकल्पाकडे म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीकडे आपली वाटचाल करू शकतो. हल्ली जग जवळ आले आहे. द वर्ल्ड इज अ ग्लोबल व्हिलेज असं आपण म्हणतो. पण प्रत्येक देशाच्या चालीरीती, संस्कृती निराळी असते. ते पाहिल्यानंतर आपल्याकडील नीतिमत्तेच्या कल्पना आपल्याला चुकीच्या वाटू शकतात. परंतु जिथे जसे वागणे योग्य असते तसेच वागायला हवे. इतर ठिकाणी अमुक अमुक गोष्ट मान्य आहे म्हणून आपण इकडेही तसं करायला काय हरकत आहे असा सोयीस्कर विचार आपल्या मनात येऊ शकतो. कारण मनाची धाव विषयांकडेच असते. पण ती गोष्ट आपल्या धर्मात, संस्कृतीत किंवा नीतिमत्तेच्या कल्पनेत बसते का याचा विचार करायला हवा. असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय अशी आपली वाटचाल जीवनामध्ये असले पाहिजे. हेच या ठिकाणी समर्थांना सांगायचे आहे.

संकल्प जसा असेल, तसे जीवन घडते. म्हणून समर्थ प्रथम मनाला शुद्ध करण्याचा आग्रह धरतात. मन शुद्ध झाले की मार्ग आपोआप प्रकाशमान होतो; सत्यसंकल्पातूनच श्रेयसाचा प्रवास सुरू होतो.

स्वसंवाद..

  • माझ्या मनात वारंवार येणारे विचार कोणत्या प्रकारचे असतात?
  • मी जाणीवपूर्वक सत्यसंकल्प करून तो पाळण्याचा प्रयत्न करतो का?
  • माझे विचार, शब्द आणि कृती यांमध्ये सुसंगती आहे का?
  • विषयांच्या आकर्षणामुळे मी कधी माझ्या मूल्यांशी तडजोड करतो का?
  • माझ्या जीवनसंकल्पाची दिशा केवळ यशाकडे आहे की मानसिक आणि अध्यात्मिक उन्नतीकडेही?

– – – 

– – – श्लोक ६.

नको रे मना क्रोध हा खेदकारी |

नको रे मना काम नाना विकारी |

नको रे मदा सर्वदा अंगीकारू |

नको रे मना मत्सरू दंभ भारू ||||

अर्थ : हे मना, क्रोधाला स्थान देऊ नकोस; तो शेवटी खेद आणि दुःख देणाराच आहे. कामवासना नाना प्रकारचे विकार निर्माण करते. मद (अहंकार), मत्सर आणि दंभ (ढोंगीपणा) या विकारांपासून दूर राहा असा समर्थांचा स्पष्ट उपदेश आहे.

मागील श्लोकात समर्थांनी “पापसंकल्प” सोडण्याची सूचना केली. येथे ते त्या पापसंकल्पांचे मूळ असलेल्या विकारांकडे आपले लक्ष वेधतात. मनाच्या अध:पतनाला कारणीभूत ठरणारे हे विकार म्हणजेच षडरिपूंपैकी प्रमुख काम, क्रोध, मद, मत्सर आणि दंभ. त्याबद्दल समर्थ प्रामुख्याने या ठिकाणी सांगतात.

क्रोध हा खरोखरच खेदकारी आहे. रागाच्या भरात उच्चारलेले शब्द आणि केलेली कृती अनेकदा नंतर पश्चातापाला कारणीभूत ठरतात. हातातून सुटलेला बाण जसा परत येत नाही; तसेच रागाच्या भरात बोललेले शब्दही.

क्रोध हा क्षणिक असतो; पण त्याचे परिणाम मात्र दीर्घकाळ मनात जखम करतात. म्हणूनच मोठी माणसे आपल्याला सांगतात की राग आला की थोडा थांबा, एक ते दहा अंक मोजा, श्वास घ्या. कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी विचार करा. हा छोटासा विरामच अनेक अनर्थ टाळू शकतो.

कामभावना ही जीवनातील नैसर्गिक शक्ती आहे. ती नाकारण्याची गोष्ट नाही; पण तिचा अतिरेक विकारांना आमंत्रण देतो. काम म्हणजे केवळ लैंगिक वासना नव्हे; कोणत्याही गोष्टीचा अतिरेकी हव्यास हा देखील ‘काम’च.

विवाहमंत्रातील “धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामि” हे वचन याच संतुलनाची शिकवण देते. धर्माच्या चौकटीत राहून अर्थ आणि कामाचा स्वीकार ही आपली संस्कृती आहे. संयमित काम सृजनशील असतो तर त्याचा अतिरेक विनाशकारी ठरतो.

संत परंपरेत तीन ‘एषणा’ सांगितल्या आहेत. वित्तेषणा (संपत्तीची हाव), दारेषणा (सुंदर स्त्रीची अभिलाषा) आणि लोकेषणा (कीर्तीचा हव्यास). या तिन्ही एषणा किंवा वासना मनाला बाहेर खेचतात. अध्यात्माची वाट मात्र अंतर्मुख करते. म्हणूनच ती श्रेयस्कर!

यश, वैभव किंवा कीर्ती मिळाली की मनात ‘मीच केले’ हा अहंकार उद्भवतो. ‘ वऱ्हाड निघालं लंडनला ‘ या लक्ष्मण देशपांडे यांच्या एकपात्री प्रयोगात एक नणंदेचं पात्र आहे. काही चांगलं झालं की ते माझ्यामुळे झाला असं ती सारखं म्हणत असते. हा फुकाचा अहंकार. हा मद म्हणजेच अहंकार साधकाच्या प्रगतीत अडथळा ठरतो.

इतरांची प्रगतीने सज्जनांना आनंद होतो. पण ज्यांना ती पाहवत नाही त्यांना मत्सर निर्माण होतो आणि मत्सरातून द्वेष जन्म घेतो. आणि मग स्वतःला श्रेष्ठ दाखवण्याचा दंभ सुरू होतो. हे असते आभासी मोठेपणाचे प्रदर्शन. जर मनापासून एखादी गोष्ट कोणी करत नसेल तर टिळे, टोपी, गंधमाळा, भगवे कपडे या सगळ्या गोष्टी म्हणजे सोंग आहेत. जो सगळ्या गोष्टी मनापासून करतो त्याला असे प्रदर्शन करण्याची गरज भासत नाही. पांढरे कपडे घालून समाजसेवेचा आव आणणे, वाङ्मयचौर्य करणे हा देखील असाच प्रकार म्हणता येईल.

‘जगाच्या पाठीवर ‘ या चित्रपटात ग दि माडगूळकर यांनी लिहिलेले एक सुंदर गाणे आहे ‘ थकले रे नंदलाला ‘ हे गीत आजच्या परिस्थितीचे अतिशय सुंदर वर्णन करते यातील प्रत्येक ओळ आजच्या राजकीय आणि सामाजिक वातावरणाला लागू पडते. या गीतातील ‘ निलाजरेपण कटीस नेसले, निसुगपणाचा शेला… ‘ यासारखी ओळ असो किंवा ‘ विषयवासना वाजे वीणा, अतृप्ती दे ताला… ‘ यासारखी ओळ असो त्या आजच्या परिस्थितीचे हुबेहूब वर्णन करतात.

हे विकार सूक्ष्म असतात; पण आत्मविकासाच्या वाटेवर ते खोल दरी निर्माण करतात. राघवाच्या अनंत मार्गावर चालायचे असेल तर बाह्य शत्रूंपेक्षा अंतर्गत शत्रूंवर विजय मिळवावा लागतो. हा मार्ग दुसऱ्यांवर विजय मिळवण्याचा नाही; तर स्वतःवर विजय मिळवण्याचा आहे. साधकाला देहबुद्धी ओलांडून आत्मबुद्धीकडे वाटचाल करायची असते. या प्रवासात विकारांवर सतत लक्ष ठेवावे लागते. कारण ते हळूहळू, नकळत मनावर कब्जा करतात.

त्यासाठी मनावर एकदम नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न न करता सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी करावी. मोठ्या प्रतिज्ञेपेक्षा छोट्या, सातत्यपूर्ण संयमाचे पाऊल अधिक प्रभावी असते.

स्वसंवाद..

  • रागाच्या क्षणी मी थांबतो का, की तत्काळ प्रतिक्रिया देतो?
  • माझ्या इच्छांमध्ये संयम आहे का, की अतिरेक?
  • इतरांच्या यशाने मला आनंद होतो की मत्सर?
  • माझ्या यशामागे ईश्वरकृपा आणि इतरांचा देखील वाटा आहे याचे भान मी ठेवतो का?
  • बाह्य जग जिंकण्यापेक्षा मी स्वतःवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो का?

– क्रमशः श्लोक ५ आणि ६.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अर्थपूर्ण गिचमिड…” माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ सौ शोभा जोशी ☆

सौ शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “अर्थपूर्ण गिचमिड…” माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात ☆ सौ शोभा जोशी

पुण्याच्या प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेज रोडवर (FC Road) संध्याकाळची वेळ होती. तरुण मुला-मुलींची गर्दी, कॅफेमधला गोंगाट आणि वाहनांचा आवाज.

तिथेच, एका कोपऱ्यात, जिथे महापालिकेची मोठी कचराकुंडी होती, तिथे एक ६५-७० वर्षांचा म्हातारा बसला होता.

त्याचा अवतार बघण्यासारखा नव्हता. अंगावर एकच फाटका शर्ट, वाढलेली दाढी, जटा झालेले केस आणि अंगाला दुर्गंधी येत होती. तो कचऱ्यातून काहीतरी शोधून खात होता.

येणारे-जाणारे लोक त्याला बघून नाक मुरडत होते. काही टवाळखोर पोरं त्याला दगड मारून पळून जात होती. “ए वेड्या! ए सायंटिस्ट! काय शोधतोय कचऱ्यात? “

तो म्हातारा कोणाकडेच बघत नव्हता.

त्याच्या हातात एक ‘विटकरीचा तुकडा’ (Red Brick Piece) होता.

तो त्या तुकड्याने फुटपाथवर आणि समोरच्या भिंतीवर काहीतरी ‘गिचमिड’ लिहित होता.

लोक हसून म्हणायचे, “बघा, वेडा काहीतरी नक्षी काढतोय. “

त्याच वेळी, तिथून ‘समीर’ एका लग्सरी कार मधून जात होता. समीर आता शहराचा ‘जिल्हाधिकारी’ (Collector) झाला होता. त्याला आज कॉलेजच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं होतं.

समीरची नजर त्या म्हाताऱ्यावर पडली.

गाडी सिग्नलला थांबली होती. समीरने खिडकीतून बाहेर पाहिलं. त्या म्हाताऱ्याने भिंतीवर जे लिहिलं होतं, ते बघून समीरचे डोळे विस्फारले.

ते काही गिचमिड नव्हतं.

ती ‘कॅल्क्युलसची अवघड समीकरणं’ (Complex Calculus Integration Problems) होती.

आणि ती इतकी अचूक होती की, एखाद्या सामान्य प्रोफेसरलाही सोडवायला वेळ लागेल.

समीरने ड्रायव्हरला ओरडून सांगितलं, “गाडी थांबव! आताच्या आता! ” समीर गाडीतून उतरला. तो आपला सूट-बूट सावरत त्या कचराकुंडीजवळ गेला.

सुरक्षारक्षक आणि लोक बघत राहिले. “कलेक्टर साहेब या वेड्यापाशी का जात आहेत? “

समीर त्या म्हाताऱ्याच्या जवळ गेला. दुर्गंधी येत होती, पण समीरला त्याचं भान नव्हतं.

तो भिंतीवरची ती गणितं वाचत होता. आणि त्याला त्याच्या बालपणीची आठवण झाली.

त्याच्या शाळेत एक शिक्षक होते – ‘देशपांडे सर’. जे गणिताचे जादूगार होते. ते नेहमी म्हणायचे, “गणितात देव असतो रे! आणि हे जग एक समीकरण आहे. “

पण २० वर्षांपूर्वी, देशपांडे सरांच्या पत्नीचा आणि मुलाचा एका भीषण अपघातात मृत्यू झाला होता. त्या धक्क्याने सर वेडे झाले होते आणि ते कुठेतरी गायब झाले होते.

समीरने थरथरत्या हाताने त्या म्हाताऱ्याच्या खांद्यावर हात ठेवला.

“सर? देशपांडे सर? “

त्या म्हाताऱ्याने मान वर केली. त्याचे डोळे रिकामे होते. त्यात कोणतीच ओळख नव्हती.

तो फक्त हसला आणि म्हणाला, “बाळा, हे गणित चुकलंय बघ. इथे ‘X’ नाही, ‘Y’ पाहिजे. हे जग चुकलंय… “

त्या एका वाक्याने समीरला खात्री पटली. हा आवाज तोच होता.

समीरच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा लागल्या.

ज्या शिक्षकाने त्याला घडवलं, ज्याच्यामुळे आज तो ‘कलेक्टर’ झाला होता, तो गुरु आज कचऱ्यात अन्न शोधत होता आणि लोक त्याला दगड मारत होते.

समीर तिथेच, त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात गुडघ्यावर बसला.

त्याने त्या म्हाताऱ्याचे घाणेरडे, चिखलाने माखलेले पाय आपल्या हाताने धरले आणि त्यावर डोकं ठेवलं.

गर्दी जमली होती. लोक फोटो काढत होते.

समीर ओरडला, “ए फोटो काय काढताय? लाज वाटत नाही तुम्हाला?

ज्या माणसाला तुम्ही ‘वेडा’ समजून दगड मारलेत ना… ते तुमचे आणि माझे ‘बाप’ आहेत ज्ञानाने.

हे ‘प्राध्यापक विनायक देशपांडे’ आहेत. ज्यांनी हजारो इंजिनिअर्स आणि डॉक्टर्स घडवलेत.

आज नियतीने त्यांची परीक्षा घेतली, आणि तुम्ही समाजाने त्यांना नापास केलं. “

समीरने स्वतःचा कोट काढला आणि सरांच्या अंगावर घातला. त्याने जवळच्या हॉटेलमधून पाणी आणलं आणि स्वतःच्या हाताने सरांचा चेहरा धुतला.

देशपांडे सर शांत होते. ते फक्त समीरकडे बघत होते. कदाचित त्यांच्या स्मृतीच्या पडद्यावर काहीतरी अस्पष्ट आठवत असावं.

समीरने त्यांना आपल्या सरकारी गाडीत बसवलं.

तो त्यांना आपल्या घरी घेऊन गेला.

त्यांना आंघोळ घातली, नवीन कपडे दिले आणि पोटभर जेवण दिलं.

जेवताना देशपांडे सर अचानक थांबले.

त्यांनी समीरकडे बघितलं आणि विचारलं, “बाळा… ते इंटीग्रेशनचं गणित सुटलं का रे तुझं? “

समीर रडत हसला. “नाही सर… तुम्ही शिकवाल तरच सुटेल. “

समीरने पुढचे ५ वर्षे देशपांडे सरांचा सांभाळ केला.

औषधोपचाराने त्यांची स्मृती पूर्ण परत आली नाही, पण त्यांना हे समजलं की आपण सुरक्षित आहोत.

समीर रोज संध्याकाळी ऑफिसवरून आला की पाटी-पेन्सिल घेऊन सरांच्या समोर बसत असे.

आणि देशपांडे सर, ज्यांना स्वतःचं नाव आठवत नसे, ते मात्र समीरला गणिताची अवघड समीकरणं अगदी सफाईदारपणे शिकवत असत.

ज्या दिवशी देशपांडे सर वारले, त्या दिवशी समीरने त्यांच्या अंत्यविधीसाठी एकही दिवस सुट्टी घेतली नाही.

तो म्हणाला, “सरांची शिकवण होती – कर्म करत राहा. मी रडणार नाही, कारण त्यांनी मला गणितातल्या शून्यातून विश्व निर्माण करायला शिकवलंय. “

रस्त्यावरचा प्रत्येक वेडा किंवा भिकारी हा जन्मताच तसा नसतो. कोणाचं नशीब कधी फिरेल सांगता येत नाही. ज्या हातांनी आज तुम्ही दगड मारताय, त्या हातांनी कधीतरी कोणाचं भविष्य घडवलं असेल. शिक्षकांचा आणि बुजुर्गांचा आदर करा, परिस्थिती कशीही असो. कारण ज्ञान कधीच म्हातारं होत नसतं आणि ते कधीच कचरा होत नसतं.

माहिती संग्राहक / लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :  सौ शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “कुठे हरवली ती मैना खेर??” – लेखक : श्री बिपिन देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “कुठे हरवली ती मैना खेर??” – लेखक : श्री बिपिन देशमुख ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

आज एका रद्दीच्या दुकानावरून जाताना सहज एका गोष्टीवर नजर गेली. एक लक्झरी कार त्याच्या दारात थांबली होती. त्याने खटका दाबून डिकी (सॉरी.. त्याला आता ट्रंक म्हणायचं! ) उघडली आणि कारच्या डिकीतून अगदी किरकोळ रद्दी काढून ती दुकानदाराला देऊ केली.

माझ्या खट्याळ मनात उगीचच विचार आला की आज २८ तारीख, हा मनुष्य रद्दी विकायला आलाय म्हणजे याच्या घरी ‘ मैना खेर’ आली की काय?

मी मनाने एकदम ४०-५० वर्षे मागे गेलो. ‘मैना खेर…! ‘

बहुतेक पगारदार मध्यमवर्गीय घरांमध्ये प्रत्येक महिन्याची साधारण २०-२५ तारीख आली की ही ‘मैना खेर’ नावाची नावडती पाहुणी हटकून येत असे.

आज हा २८ तारखेला रद्दी विकणारा मनुष्य दिसल्यावर तिची आठवण झाली.

त्यावेळी मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात दर महिन्याच्या ४ आठवड्यांना नावही मोठी भन्नाट दिलेली असायची.

दर महिन्याला १ तारखेला पगार झाल्यावर येणारा पहिला आठवडा म्हणजे ‘ गोल्डन विक’!

महिन्याची वाणी, दूधवाला, पेपरवाला, मुलांच्या फिया (त्यावेळचं ‘फी’ चं मराठी अनेकवचन) वगैरे देऊन थोडी मध्यमवर्गीय मौजमजा करून झाल्यावर, दुसरा आठवडा यायचा तो म्हणजे  ‘सिल्व्हर विक’!

पैशाचं पाकिट बऱ्यापैकी हलकं व्हायला लागलेलं असताना महिन्याचा तिसरा आठवडा यायचा तो म्हणजे ‘ ब्रॉंझ विक’!

हा संपतोय नाही तर यायचा महिन्याचा ४था आठवडा. हा म्हणजे ‘ रद्दी विक’!

पगाराचं पाकिट रिकामं झालेलं असायचं. रोजच्या खर्चासाठी महिनाभर साठलेला रद्दीचा गठ्ठा नाडीनं बांधून सायकलीच्या कॅरियरला लावला जायचा. जे काही पैसे येतील, त्यातून बारीकसारीक खर्च भागवले जायचे. रद्दी विकून आलेल्या थोड्याफार पैशातून आठवडा ढकलला जायचा म्हणून याचं नाव ‘ रद्दी विक’ इतकंच! आधीच्या गोल्डन, सिल्व्हर वगैरे आठवड्यांचा गोल्ड, सिल्व्हरशी तसा काही संबंध नाही.

या आठवड्यात नवीन खरेदीवर बॅन आलेला असायचा.

नवीन काही आणायचं असेल तर “आत्ता हट्ट नको करूस, आत्ता ‘मैना खेर’ आहे ! बाबांचा पगार झाल्यावर घ्यायला सांगते हं मी त्यांना! “अशी आश्वासनं मुलांना दिली जायची.

तर अशी ही ‘ महिना अखेर’ यायची. तिचं लाडाचं नाव ‘ मैना खेर’!

शाळकरी मुलांना मात्र या महिना अखेरीत देखील एक आनंदाचा दिवस असायचा, तो म्हणजे, महिन्याचा शेवटचा दिवस!

त्या दिवशी शाळा ‘अर्धा दिवस’ असायची. वर्गशिक्षकांना महिन्याच्या ‘फी’चा हिशोब  करायला वेळ मिळावा म्हणून शाळा अर्धा दिवस असायची. तसं पाहिलं तर या अर्ध्या दिवसाच्या शाळेलाही काही अर्थ नसायचा म्हणा. वर्गशिक्षक त्या वेळातही काम करायचे.

कुणी फी भरलेली नसेल तर त्याला सूचना दिली जायची. प्रगती पुस्तकात महिन्यातल्या हजेरी-गैरहजेरीचा हिशोब मांडला जायचा.

त्या अर्ध्या दिवसातही सगळा गडबड गोंधळच चालायचा.

मला आजही एक गोष्ट खटकते ती म्हणजे वर्गशिक्षक मंडळी हिशोबात गोंधळ नको म्हणून ‘नादारीवाल्या’ मुलांना एका बाजूला वेगळे बसवत असत. तेव्हा ते ‘नादारी’ प्रकरण काय आहे ते समजायचं नाही. खरंतर ज्या मुलांना ‘नादारीवाले’ म्हणून अस्पृश्यासारखं वेगळं बसवलं जायचं, त्यांनादेखील खरंतर ते माहिती नसावं. कारण तेवढी समज कुणाला होती म्हणा?

हे आत्ता या ‘ मैना खेरच्या’  आठवणीत आठवलं खरं!

आता  या ‘मैना खेर’चं नाव कुठे ऐकायला मिळत नाही.

मोबाईल ॲप वरून सहज मिळणारी फसवी कर्जं, क्रेडिट कार्ड्स, चौका चौकात उघडलेली गोल्ड लोनची दुकानं आणि महत्त्वाचं म्हणजे ‘इएमआय’वर उपलब्ध असणाऱ्या जीवनासाठी आवश्यक आणि अनावश्यक गोष्टींमुळे,

“आत्ता नको ! बाबांचा पगार झाल्यावर पुढच्या महिन्यात ह्यांना आणायला सांगते हं! “असं म्हणणारी आई तरी कुठे राहिली आहे आता!

या सगळ्या ‘इझी क्रेडिट’, ‘इन्स्टा लोन’ च्या या आभासी सुबत्तेच्या आणि चंगळवादाच्या युगात, ती दुष्ट चेटकिणीसारखी वाटणारी  ‘मैना खेर’  कुठेतरी हरवली आहे, हे मात्र निश्चित!

लेखक: श्री. बिपिन देशमुख

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ शतजन्म शोधिताना या नाट्यगीता चे रसग्रहण ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆

प्रा. भारती जोगी

 काव्यानंद

☆  शतजन्म शोधिताना या नाट्यगीता चे रसग्रहण ☆ रसग्रहण – प्रा. भारती जोगी ☆

(सावरकर पुण्यतिथी दि.२६ फेब्रुवारी निमित्त…)

संगीत नाटकांच्या वैभवशाली परंपरेत सुवर्णाक्षरांनी कोरलेलं नाव म्हणजे सावरकरांनी, मा. दीनानाथ मंगेशकर यांच्यासाठी लिहिलेली अजरामर नाट्यकृती “ संन्यस्त खड्ग ! “ १८ सप्टेंबर १९३१ या दिवशी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. आता शतकाकडे वाटचाल सुरू झाली आहे याची! 

या नाट्यकृतीतल्या… वैश्विक अनुभूती आणि एका वेगळ्याच विरहानुभूतीचा स्पर्श लाभलेल्या, भैरवी रागातल्या अवीट आणि अमीट सुरांची झालर असलेल्या एका नाट्य पदाचे रसग्रहण करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. खरंतर सावरकरांच्या भावना, कल्पना आणि विचारांचं… उदात्त, उन्नत आकाश दोन बोटांच्या चिमटीत धरणं, सामावणं शक्यच नाही. पण तरीही हे शिवधनुष्य… काही क्षणांपुरतं का असेना… पेलून बघणार आहे…

नाट्यपद…

शत जन्म शोधितांना। शत आर्ति व्यर्थ झाल्या। 

शत सूर्य मालिकांच्या। दीपावली विझाल्या |

*

तेव्हा पडे प्रियासी| क्षण एक आज गांठी |

सुख साधना युगांची| सिद्धीस अंती गाठी। 

*

हा हाय जो न जाई| मिठी घालू मी उठोनी |

क्षण तो क्षणात गेला | सखी हातचा सुटोनी |

हे नाटक गौतम बुद्धांच्या काळाशी संबंधित आहे. बुद्धांच्या सांगण्यावरुन ‘शाक्य’ सेनापती विक्रमसिंह आणि शाक्य जनता, शस्त्र त्याग करून संन्यास घेतात. काही काळ जातो. दरम्यान विक्रमाचा मुलगा वल्लभ सुलोचना नावाच्या युवतीशी प्रेमविवाह करतो. लग्नाला वर्ष उलटल्यानंतर वल्लभ आणि सुलोचना यांच्या मिलनाचा / भेटीचा योग येतो. आणि… तो बहुप्रतिक्षित मधुर मिलनाचा क्षण येतो… पण हाय रे दैव! 

त्याचवेळी, कोसल देशाचा राजा… विद्युतगर्भ याने आक्रमण केल्याची वार्ता येते आणि शाक्य राष्ट्राला वाचवण्यासाठी, वल्लभालाही पाचारण केले जाते. कपिलवस्तुचा पाडाव टळावा म्हणून संन्यस्त खड्गाला आवाहन केले जाते. वल्लभही मग संन्यास धर्माचा संन्यास घेत… युद्धात उतरतो. म्हणून नाटकाचं नाव.. “संन्यस्त खड्ग!!”

मिलनाच्या क्षणीच झालेली ताटातूट, त्यामुळे सुलोचनेच्या मनाची झालेली अवस्था, विरह वेदनेचे, हतोत्साहित, विकल, असहाय असे मनोभाव… सगळ्याच… विभाव, अनुभाव आणि संचारी भावांसह, रस निष्पत्ती पर्यंत पोहोचविणारं हे नाट्यपद!! 

 सुलोचना आपल्या प्रिय सखीला… नलिनीला, वल्लभाच्या ऐनवेळी असं निघून जाण्याने, तिच्या मनात उठलेलं भावनांचं वादळ, विचारांचा कल्लोळ… कथन करते आहे…. ते शब्दांकन म्हणजे हे पद! 

सुलोचना अगतिक होते आणि म्हणते… असा पती लाभावा म्हणून मी शत जन्म शोधत राहिले गं! त्यासाठी मी शत-शत/अगणित, आरती केल्या. परमेश्वराच्या आळवण्या केल्या. तो भेटावा म्हणून शतजन्म वाट पाहिली. पण सखी, बघ ना, काय झालं…

‘शत आर्ति व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या! ‘

… या ओळींमध्ये शब्द.. शत सूर्य मालिका…. सावरकरांचं विश्वाच्या भव्यतेचं आकर्षण आणि विराटतेची ओढ व्यक्त झाली आहे. उत्तुंग कल्पना शक्ती, आशयातील भावोत्कटता जाणवते आहे. त्यातूनच सुलोचनेची मनोवस्था डोळ्यासमोर येते. ‘ दीपावली विझाल्या ‘ यातला विझाल्या हा अगदी अनवट असा शब्द प्रयोग…. तिच्या मनातले, मिलनोत्सुक आशेचे… शत-शत दीप विझले.. हे सूचित करतो… अगदी प्रत्यक्षानुभूतीच दिलीयं!

पुढील ओळीत सुलोचना म्हणतीये…

‘ तेव्हा पडे प्रियासी, क्षण एक आज गांठी!

सुख साधना युगाची, सिद्धीस अंति गाठी!‘

… या ओळी म्हणजे… यमक आणि श्लेष या दोन्ही अलंकाराच्या गाठभेटीचा उत्तुंग आणि उत्कट क्षण!! 

प्रिय मिलनाचा, शत जन्म वाट पाहिलेला क्षण, आज गांठी आला, गाठला एकदाचा, प्राप्त झाला, मिळाला…. असं वाटतंय! आणि मनात एकच विचार येतोयं की… शतजन्माच्या माझ्या साधनेने, सिध्दी गाठली. साधना आणि सिद्धीची गाठ पडली!! प्रिय आराधना, तपस्या, साधना सफल झाली.

 गाठी या शब्दांत, यमक आणि श्लेष या भाषालंकारांचा उपयोग करून… या पदातल्या, सुलोचनेच्या भावनांची अगदी… ये हृदयीचे, ते हृदयी…. म्हणजे प्रेक्षक वृंद हृदयी… गाठी घातली अंती… हीच भावना येते.

शेवटच्या दोन ओळी तर… कल्पनेची उत्तुंगता, आशयघनता, शब्दकळा, आणि भावनोत्कटता या सगळ्याचाच परिपूर्ण, परिपक्व, परिणाम म्हणावा ! 

सुलोचना सांगतीये… अगदी सजीव, सगुण, साकार दर्शन… त्या एका कृतीची साक्षात्कारी अनुभूती देत की…

हा हाय जो न जाई, मिठी घालू मी उठोनी

क्षण तो क्षणात गेला, सखी हातचा सुटोनी!! 

… सखी, बघ ना, तो मधुर मिलनाचा क्षण आला… मी उठून माझ्या वल्लभाला मिठी घालायला गेले… आणि… आणि, निमिषार्धात्.. तो क्षण.. क्षणात निसटून गेला गं माझ्या हातून.. अगदी काही कळायच्या आत!… किती ही वैश्विक अनुभूती! आध्यात्मिक किनार लाभलेली! कुठेतरी याच ओळी आठवतात… ‘ पाया पडू गेले तव, पाऊलचि ना दिसे!!! ‘ 

विरहाची काळ हा प्रदीर्घ भासतो, मात्र मिलनाचा काळ अत्यल्प भासतो.. असंही सुचवलयं ! ‘ क्षण तो क्षणात गेला…. ’ या सावरकरांच्या ओळीचं खरं मोल जाणून, भाषाप्रभू पु. ल. म्हणतात… ‘ या एका ओळीसाठी सावरकरांना नोबेल द्यायला हवं. ‘ 

हा खरा गौरव आहे त्या… ओळी सुचलेल्या क्षणांचा, सुलोचनेच्या हातून निसटलेल्या त्या हुरहुर लागलेल्या क्षणांचा ! 

या पदाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे… हे मिलनाच्या आधीचं नाही तर नंतरचं विरह गीत आहे. हे गाणं आपण ऐकतो तेव्हा एक विचित्र हुरहुर लागते. भैरवी रागातल्या सुरांची झालर असलेलं हे नाट्यपद… ‘आर्ति व्यर्थ झाल्या’ मधली आर्तता आणि ‘ क्षण तो क्षणात गेला ’ मधली क्षणभंगुरता स्पष्ट करतं… प्रेक्षकांच्या हाती मात्र खूप काही, मनाच्या गाभाऱ्यात स्थिरावून गेलं… असंच म्हणावसं वाटतं.

© प्रा. भारती जोगी

पुणे.                            

९४२३९४१०२४.📚📖🖋️

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ माझी मराठी — ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

🌸 विविधा 🌸

☆ माझी मराठी — ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

(मराठी भाषा गौरव दिनानिमित्त)

माझ्या मराठीची गोडी, मला वाटते अवीट मराठी माझी मातृभाषा आहे आणि तिचं संवर्धन, विकास, विस्तार ही माझीदेखील जबाबदारी आहे. माझ्या क्षमतेनुसार मी त्यासाठी नक्कीच कायम प्रयत्नशील  राहीन.

‘माझा मराठाचि बोलु कौतुकें। परि अमृतातेंही पैजा जिंके।..

सुमारे आठशे वर्षांपूर्वी, ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या मराठी भाषेबद्दलचा अभिमान, प्रेम आणि मराठी शब्दांच्या सामर्थ्यावरील  विश्वास,  व्यक्त केला आहे. खरंच अवीट गोडी असलेली अशी ही आपली मराठी भाषा! या भाषेचं वैभव वाढवलं ते संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, जनाबाई इ. महान संतांच्या वाङ्मयानी. या त्यांच्या साहित्याने  रसिकमनांचं केवळ मनोरंजन न करता, अखिल विश्वाच्या कल्याणाचा विशाल दृष्टिकोन त्यांना दिला. तेही कोणताच भेदभाव न करता! हे आमच्या मराठी भाषेचं सामर्थ्य आणि परंपराआहे. आणि ती साहित्य परंपरा आजतागायत चालू ठेवली ती, श्री.महादेवशास्त्री जोशी, ना. सी. फडके, वि. वा.शिरवाडकर, बालकवी , इंदिरा संत, शांताबाई शेळके, पु. ल. देशपांडे अशा आमच्या शेकडो प्रतिभावंत लेखक, कवी आणि नाटककारांनी!

   पण आज आमच्या भाषेचं वैभव जणू लुप्त झालं आहे. इंग्रजी भाषेचा पगडा आमच्या समाजमनावर इतका जबरदस्त आहे की त्यापुढे आपली मातृभाषा मराठी किती समृद्ध आहे, याचा विसर पडू लागला आहे. अटीतटीच्या या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी, इंग्रजी भाषेत शिक्षण घेणं हाच एकमेव उपाय आहे, अशी बहुजन मराठी समाजाची समजूत झाली आहे.  किंबहुना आपला पाल्य कोणत्या इंग्रजी शाळेत शिकतो, हा त्यांच्या प्रतिष्ठेचा विषय झाला आहे. 

 महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळ, अशी मराठी वृत्तपत्रे  आवर्जून मराठी बाणा जपताना दिसतात.  तेवढाच आशेचा किरण!अन्यथा आज महाराष्ट्रात मराठीची उपेक्षा होताना दिसत आहे.पण भारतातील इतर राज्यांत आणि परदेशात वास्तव्य करून असलेली मंडळी मात्र विविध उपक्रमांद्वारे, मराठी भाषा आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

 मराठी या आपल्या मातृभाषेचा विसर पडणे याचा दूरगामी परिणाम म्हणजे मराठी संस्कृतीही नामशेष होणे! हा विघातक परिणाम टाळायचा असेल तर मराठी भाषेच्या संवर्धन आणि वृद्धीसाठी, जाणीवपूर्वक आणि परिणामकारक प्रयत्न करणे आवश्यक आहे. सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे. या हेतूनेच  १४ ते २८ जानेवारीपर्यंत,  मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, महाराष्ट्र शासनातर्फे, २७ फेब्रुवारी, हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. इथल्या सर्व शाळांमध्येही मराठी हा सक्तीचा विषय केला आहे. सार्वजनिक  ठिकाणी असलेले नामफलक आणि सूचनाफलक हे ठळक मराठी भाषेतच असावे, यासाठी नियम लागू केले आहेत.

महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी असल्याने, महाराष्ट्रातील सर्व व्यवहार हे मराठी भाषेतूनच झाले पाहिजेत. तसा आपलाच आग्रह असला पाहिजे पण आम्ही भलतेच सहिष्णू! घरातून बाहेर पडल्यावर रिक्षावाल्याला ‘ ऑटो ‘ म्हणून पुकारतो आणि ‘ स्टेशन जाना है’ असं सांगतो. आमच्या भाषेला आम्हीच मान देत नाही तर इतरांची काय कथा? आपण प्रत्येकाने जास्तीत जास्त मराठीत बोलण्याची, समाजमाध्यमांवर लिहिण्याची सवय केली, तर इथे आलेल्या अन्य भाषिकांना ती भाषा शिकावीच लागेल. कारण त्याशिवाय त्यांना इथे व्यवहार करणं, स्थापित होणं, अशक्य होईल.

भ्रमणध्वनी आणि आंतरजालाच्या वाढत्या वापरामुळे वाचनसंस्कृती लयाला चालली आहे. त्यासाठी बालकांना, तरूणवर्गाला आकर्षित करेल, असं उत्कृष्ट,  नवीन आणि जुनं साहित्य ,  हे ‘ई-बुक’ च्या स्वरूपात, उपलब्ध करून दिले पाहिजे. ग्रंथालयांची संख्या वाढली पाहिजे आणि आहेत त्या ग्रंथालयांची स्थिती सुधारली पाहिजे. मराठी भाषेतील लिखाणाला, डबघाईला आलेल्या प्रकाशन व्यवसायाला सरकारकडून अनुदान  आणि प्रोत्साहन मिळालं पाहिजे.  मराठीच्या उपभाषा असलेल्या कोंकणी, मालवणी, अहिराणी या भाषांतील साहित्य,मराठीच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेतलं पाहिजे.

एकूण काय तर मराठी भाषा वृद्धिंगत करण्यासाठी प्रचंड राजकीय, सामाजिक आणि वैयक्तिक इच्छाशक्ती आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांची  आवश्यकता आहे. आघाडीचे मराठी उद्योजक आणि सामाजिक संस्थांनीदेखील यासाठी आपला वाटा उचलला पाहिजे. 

मग नक्कीच.. ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल.

© सुश्री प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – प्रतिमेच्या पलिकडले ☆ # कितना हंसीन है मौसम… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ # कितना हंसीन है मौसम… # ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

कितना हसीन सफ़र है… साथी भी खुबसुरत है ये तो मौसम को भी खबर है…

“… हे देवा काय म्हणून हे कवि असलेलं ध्यान माझ्या नशीबी मारलंस! … त्याला तो निसर्ग, ते चंद्र तारे, निर्झराचे गाणे आणि पौर्णिमेचे चांदणे एव्हढे मिळाले कि त्याच्या कवितेला उधाण येते! … सारे सारे भोवतालचे जग विसरून जातो आणि कवि कल्पनेच्या जगात विहरत बसतो.. ना खाण्या पिण्याची शुद्ध ना घरच्या कामाची, ना घरातल्या माणसांची सुधबूध… सुचलेली कविता जोवर कागदावर उतरत नाही तोवर याची तंद्रीतून बाहेरच येत नाही! .. आपलं नुकतंच लग्न झालयं… दिसायला सुंदर आणि मनमोकळी स्वभाची गोड नि मृदू बोलणारी नवयौवयना बायको आहे… तिच्याशी दोन घटका प्रेमाचा वार्तालाप करायला हवा की नको? … आपण नाही तर तिच्याशी कोण बरे बोलणार? … त्या एकांतातल्या सलज्ज कुजबुजणे आपण दोघांनी शेअर करायचे नाही तर कोण करणार? … आणि आणि हे सगळं त्या मठ्ठ, बथ्थड कविच्या डोक्यात कोण कसं घालणार? … प्रेम होईना तुझ्याने हि का तक्रार सांगायची असते इतरांच्या समोर! … ते काय म्हणतील आपल्याला! … “

“अगं कवि हा सौंदर्याचा भोक्ता असतो ना! त्याच्या कवितेला देखील कुणीतरी प्रेरणा दिली तरच त्याची काव्य प्रतिभा फुलून येते ना! त्याची भावनोत्कटता, त्याचं शब्द प्रभुत्व आणि त्याच्या तरल हळवं संवेदनशील मनात एखादी कल्पना सुचते, रूजते तेव्हा त्याला सृजनशीलतेचा अलौकिक अनुभव येतो… तो सृष्टीच्या सौंदर्याने प्रभावीत होतो आणि दिन हो या रात हम रहे तेरे साथ… अशी त्याची झपूर्झा स्थिती होते! … मग तो ना घरचा ना दारचा त्याचं जगंच वेगळं असतं…

आणि काय गं तू आणि तो लग्नाच्या आधीपासूनच काॅलेजमध्ये असतानाच तुमचं जमलं होतं म्हणालीस ना तू.! .. कवि मनाचा आणि सुंदर सुंदर प्रेमभावनेने ओथंबलेल्या कविता रचून तुला तर त्याने आपल्या प्रीतीच्या पावसात चिंब चिंब भिजवून टाकले असंच म्हणायचीस ना तू? … आणि हे तर काहीच नाही तुला तर त्या नवरंग सिनेमातील संध्या सारखं त्याच्या कवितेची तूच तर प्रतिभा असा तुमच्या प्रेमाचा मोठा सन्मानच केला हे ही तूच आम्हाला सांगितलसं ना त्या वेळी! … आम्ही तुला त्यावेळेला सांगत होतोच की बाई गं हे कवि लोक वेडे असतात! … यांचं खरंखुरं प्रेम फक्त त्यांच्या कवितेवरच असतं… या मंडळींना संसार हवा असतो तो त्यांना त्यांची केअरटेकर घेणारं माणूस घरात असावं म्हणून… बाकी या स्वच्छंदी माणसाला काय गं? … पण तू मारे नाक उडवून आम्हाला सांगितलेस कि मी माझ्या सौंदर्याच्या जाळ्यात त्याला असं जखडून ठेवेन! माझ्या प्रेमाचं अस्त्र असं सोडेन कि त्याने कविता वगैरे विसरून जाईल आणि माझ्या पदराला सारखं धरून मागं मागं घेऊन जाईन… मग आता काय झालं तुमच्या लग्नानंतर? … का तुझं मोहीनी अस्त्र कुचकामी ठरलं! का तुझ्या प्रेमातलं सामर्थ्य पेबळं ठरलं? … का तू आता त्याची हक्काची लग्नाची बायको झालीच आहेस म्हटल्यावर त्यानं आता जाशी कुठे नवनवीत चोरा सारखं तुला वागवायला लागला! .. त्याचा तुला सांगताही येईना आणि सहन ही होईना त्रास होऊ लागल्यावर सारं आठवलं काय? … पण तुला आता आम्ही काय सल्ला देणारं.? .. तुझं तुलाच सारं निस्तारलं तर पाहीजे… बघ एकेक नव्या नव्या क्लुप्त्या काढून कवि नवरा मुठीत येतोय का पहा… आणि जोवर तुझ्या मनासारखं होत नाही तोवर एकच पालुपद त्याच्याजवळ अष्टौप्रहर गात रहा… आज मी रूसूनी आहे…!!!

©  श्री नंदकुमार इंदिरा पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares