☆ समर्थ रामदास, दासबोध आणि प्रपंच… ☆ सौ शालिनी जोशी ☆
☆
जगाच्या कल्याणाचा विचार करणारे समर्थ रामदास. बारा वर्षे बालपणीची गेल्यावर, ’ विश्वाचि चिंता वाहणारा’ हा मुलगा, नारायण सूर्याजीपंत ठोसर घर सोडून नाशिक जवळ टाकळीला आला. बारा वर्षे साधना व तपश्चर्या केली. विविध विषयांच्या ग्रंथांचा अभ्यास केल्यावर बारा वर्षे भारत भ्रमण केले. लाखो लोकांचे जीवन जवळून पाहिले. त्यावेळची लोकांची कर्तव्याविषयीची, धर्माविषयीची उदासीनता, परकीय राजांची स्विकारलेली लाचारी, स्त्रियांची होणारी विटंबना पाहून त्यांचे मन कळवळले. मृतप्राय झालेल्या समाजाला आपल्या वाणीने आणि लेखणीने जागृत करण्यात त्यानी आपले आयुष्य पणाला लावले. त्यासाठी विपुल ग्रंथरचना केली. त्यातील श्रेष्ठ ग्रंथ दासबोध.
वीस दशक २०० समास आणि ७७५१ ओव्या असा हा ग्रंथराज दासबोध. इ. स.
१६८१ (शके १६०३) मध्ये सिद्ध झाला. ही रचना समर्थांनी शिवथरघळीत सुंदर मठातील मुक्कामात केली. कल्याणस्वामीनी लिखाणाचे काम केले. याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही ग्रंथावरील टीका नसून स्वतंत्र ग्रंथ आहे. समर्थांच्या दिव्य प्रज्ञा प्रतिभेतून हा ग्रंथ उदयाला आला. स्वानुभव हाच ग्रंथाचा गाभा आहे. मूर्खलक्षणापासून राष्ट्रकारणापर्यंत ग्रंथाची व्याप्ती आहे. मंदबुद्धीपासून धुर्तांपर्यंत सर्वांसाठी हा ग्रंथ असल्याचे समर्थ आत्मविश्वासाने सांगतात. पहिल्याशिवाय दोष देऊ नये, असेही टीकाकाराना सुनावतात. समर्थांचा परखडपणा आणि आत्मविश्वास या ग्रंथात दिसून येतो. तो समाजाविषयीच्या कळवळ्यातून आहे. त्यामुळे वाचत असताना समर्थ आपल्या बरोबर आहेत अशी अनुभूती येते.
परमार्थ मार्गावरील पुरुषांच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे स्त्री व प्रपंच. असा बऱ्याच साधू, संतांचा अभिप्राय होता. त्यांच्या साहित्यात त्यानुसार स्त्रियांची अवहेलना पाहायला मिळते. पण समर्थानी प्रपंच व परमार्थ दोघांना समान पातळीवर आणलं. प्रपंचाला विरोध केला नाही, तर प्रपंच करून परमार्थाचा मार्ग दाखवला. प्रपंच सोडून परमार्थ केला तर केवळ आत्मोन्नती होते. पण प्रपंच करून परमार्थ केला तर राष्ट्रन्नती होते. म्हणून ते म्हणतात,
प्रपंची जो सावधान l तोचि परमार्थ करील जाण l
प्रपंची जो अप्रमाण l तो परमार्थी खोटा ll दा. १२/१/९
व्यक्तिहित व समाजहित यांची सांगड त्यांनी घातली. सद्गुणाच्या आधारे प्रपंच संपन्न केल्यावर, प्रापंचिकाने कुटुंबकेंद्रीत न राहता परोपकाराच्या माध्यमातून समाजाची नाते जोडावे. समाजाचा घटक म्हणून जगावे. यासाठीच ते म्हणतात,
आधीं प्रपंच करावा l नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका l
येथें आळस करूं नका l विवेकी हो ll दा. १२/१/१
एकसंध समाजातून एकसंध राष्ट्र निर्माण होत असते. हे वैचारिक क्रांतीचे काम त्यांनी आपल्या शिष्यामार्फत केले. त्यासाठी महंतांची फळी उभी केली. मठ, मंदिरे स्थापन केली. समाजाला बलवान करण्याचे प्रयत्न केले. प्रपंच सुखी करण्याचा विवेक सांगताना ते म्हणतात,
लेकुरें उदंड झाली l तो ते लक्ष्मी निघोन गेली l
बापडी भिकेस लागली l काही खाया मिळेना ll दा. ३/४/१
समर्थांचा ४०० वर्षांपूर्वीचा हा विचार कुटुंब नियोजनाचे द्रष्टेपण दाखवणारा आहे. समर्थ स्वतः परमार्थी असले तरी सामान्य लोकांना शक्य नाही ते तत्त्वज्ञान त्यांनी सांगितले नाही.
प्रपंच सांडून परमार्थ केला l तरी अन्न मिळेना खायला l
मग त्या करंट्याला l परमार्थ कैचा ll दा. १२/१/३
भुकेल्याला परमार्थाचा विचार मानवणारा नाही. तर
प्रपंची पाहिजे सुवर्ण l परमार्थी पंचीकर्ण l
असे त्यांनी स्पष्ट सांगितले. समर्थानी प्रपंचाला हीन न लेखता त्याचे महत्त्व विशद केले.
नाना वेश नाना आश्रम l सर्वांचे मूळ गृहस्थाश्रम l
जेथे पावती विश्राम l त्रैलोकेवासी ll
कारण देव, ऋषी, मुनी, योगी, तपस्वी सर्वांचा मूळ आधार गृहस्थाश्रमाचा आहे. स्वधर्माचरण आणि भूतदया यांनी युक्त गृहस्थाश्रम उत्तमच. धनसंपादन आणि त्याचा उपयोग याला भगवंताचे स्मरण आणि नीतीचे पालन यांची बैठक हवी. याला ते सुकृताचा योग म्हणतात. यामुळे माणूस समर्थ आणि भाग्यवान होतो. अशाप्रकारे प्रपंच आणि परमार्थ यांचा सुवर्णमध्य साधणारा समाज समर्थांना अपेक्षित होता.
संसार त्याग न करिता l प्रपंच उपाधी न सांडिता l
जनामध्ये सार्थकता l विचारेचि होये ll दा. ६/९/२४
प्रपंच अथवा परमार्थ lजाणता तोचि समर्थ l
नेणता जाणिजे वेर्थ l नि: कारण ll दा. ९/४/१९
दासबोध हा व्यापक व शाश्वत समाजहिताचा विचार मराठी भाषेत सांगणारा अलौकिक ग्रंथ आहे. ऐहिक व पारलौकिक उद्धार हा उदार हेतू यामागे आहे. प्रापंचिकांना नेटका प्रपंच, भाविकांना देव प्राप्ती, ज्ञानियांना ज्ञानप्राप्ती आणि योग्याना वैराग्य देणारा हा ग्रंथराज. समर्थांच्या अंतर्यामीचे आर्त पानोपानी प्रगट आहे. प्रत्येक समास हा स्वतंत्र विषय असून सुबोधप्रद आहे. कोणतेही पान उघडावे आणि वाचावे समाधानी व्हावे असा हा वैशिष्ट्यपूर्ण ग्रंथ.
काही शब्दांची आदरयुक्त भिती असते, वकील हा त्यातलाच एक शब्द. आदरयुक्त भिती म्हणायचं कारण त्यांना लांबून पाहतो तेव्हा त्यांच्या बद्दल आदर असतो. पण जवळीक साधायची म्हटली की मनात भिती वाटते. हे फक्त वकील या शब्दाबद्दलच नाही. याच प्रमाणे काही आडनांवाच्या बाबतीत सुध्दा आदरयुक्त भिती असते. कारण अशी आडनांव असणारे वकील नसले तरी वकीलच वाटतात. आणि अशी आडनांव असणारेच वकील असतील तर… तर मग भित्यापाठी ब्रह्मराक्षस…
(अशी आडनांव, आडनावाचे वकील, व वकील असणारे कृपया हे विनोदाने घ्या. व मला माफ करा.)
यांच्याबद्दल आदर असायला त्यांच ज्ञान, हजरजबाबीपणा, आत्मविश्वास, त्यांच्या कामामुळे मिळणारा सन्मान यासारखी खूप कारणं आहेत. पण भिती असायला कोणतही कारण नाही. किंवा भिती असायला कोणतही कारण चालेल.
यांच्या ज्ञानाबद्दल बोलायचं तर त्यांना जे माहित असतं ते त्यांच्या चेहर्यावर कधीच दिसत नाही. किंंवा ते दाखवत नाहीत. आणि जे चेहर्यावर दिसतं ते त्यांना माहिती आहे का? … असा प्रश्न आपल्या चेहर्यावर असतो.
यांना भेटल्यावर पहिला प्रश्न असतो, की यांच्याशी काय बोलावं… आणि ते काही बोलतील असं वाटतं… तर हं… काय? … काय म्हंणण आहे? … हे खरं आहे का? … किंवा खरंच असच आहे का? … असेच प्रश्न तेच आपल्याला करतात. म्हणजे बोलायचं कसं हा आपल्याला पडलेला प्रश्न तेच प्रश्न विचारून सोडवतात. यांच्याशी बोलतांना बोलणं कमी, आणि पश्नोत्तराचा भाग जास्त वाटतो.
हे सहज रस्त्यात दिसले, व आपण यांच्याशी दोन शब्द बोलतांना चुकून कोणी पाहिलं तर ते पाहणारे आपल्याकडे अशा नजरेने पाहतात, की अशावेळी आपण काहिही अपराध केला नसेल तरी यांच्याशी बोलतांना आपण अपराधी आहोत असं उगाचच वाटतं.
यातले काही खाजगीत विचारतात सुध्दा… काही प्राॅब्लेम आहे का… नाही… रस्त्यात वकीलांशी बोलतांना दिसलात, म्हणून… चांगला सुचवू का… थोडक्यात यांना कोणीही सरळ सरळ वाईट म्हणत नाही. पण यांच्यापेक्षा चांगला असल्याचं सुचवतात… मग आपणच म्हणतो तो चांगलाच आहे. आणि माझा चांगला मित्र आहे. यात आपण वकील नसतांनाही एका वकीलाच वकीलपत्र आपण घेतल्याचं समाधान मिळतं.
यांच्या बाबतीत अजून एक पडणारा प्रश्न म्हणजे हे कामात असतात म्हणून गडबडीत असतात, का काम मिळावं म्हणून गडबडीत असतात हेच लवकर समजत नाही.
तारीख याचा जास्त वापर वकील सोडला तर दुसर्या कोणीही केला नसेल. आपण फक्त मिळणार्या पगाराच्या तारखेचाच विचार केला असेल. आता फारतर जमा होणाऱ्या पेन्शनची तारीख. किंवा सणवारांच्याच तारखा पाहतो. पण यांचा सगळा विचार तारखेशी आणि तारखेभोवतीच फिरत असतो असं वाटतं. आपण सहज म्हणून यांना काही विचारावं तरी यांची पहिला प्रश्न असतो. तारीख सांग.
आपण रोज काम करुन कोणत्यातरी एकाच तारखेला पैसे मिळवतो. आणि हे रोजच्या तारखेवर पैसे मिळवतात.
हातात काम घेतल्यावर बर्याचदा हे पुढची तारीखच देत असतात. पण काहिवेळा यांना भेटण्यासाठीसुध्दा तारीख घ्यावी लागते. तारखेशिवाय यांच पान हालत नाही. पण हातात असलेली पानं (कागद) ते सतत हलवत असतात.
आपल्याकडे काही कार्य असेल तर आपण गुरुजींना सांगतो. लक्षात असूद्या बरं. हे तिथेही म्हणत असतील गुुरुजी… या दिवशी साक्षीला यायला विसरु नका बरं…
शिक्षकाने खडू हातात घेतल्यावर ते मराठीचे शिक्षक असतील तर सुविचार, गणिताचे असतील तर सूत्र लिहीली जात असावित. डाॅक्टरांनी पेन उचलल्यावर त्यांच्याकडून फक्त आणि फक्त औषधांची नांवच कागदावर उतरत असतील असं वाटतं. तसच वकीलाने पेन म्हणजे कलम उचलल्यावर त्यातून फक्त कायद्याची कलमच कागदावर लिहीली जात असतील असं ऊगाचच वाटतं. काट्याने काटा काढावा. या धर्तीवर कलम वापरुन कलम लिहीणारा किंंवा सांगणारा असं वकीलांबद्दल सांगता येईल. याच्यातही पोट कलमाचा ऊल्लेख होईल अस वाटलं तर नकळत आपल पोट ढवळायला लागत.
शहाण्याने कोर्टाची पायरी चढूनये असं म्हणतात. पण इथे पावला पावलावर किंवा पायरी पायरीवर तेच दिसतात. मग परत विचार शहाणे कोण… यांच्या ऑफिसमधे मागे लावलेली कायद्याची मोठीमोठी पुस्तक पाहिली कि यापैकी कोणत्या पुस्तकात कोणत्या पानावर कोणाच्या अटकेचा किंवा सुुटकेेचा उल्लेख आहे हाच प्रश्न असतो. कारण याच पुस्तकांचा आधार घेत दोन वकील आपापली बाजू मांडतात. इतर दोघे (आपसात भांडणारे) बाजूला ऊभे असतात असंच चित्र डोळ्यासमोर येतं.
यांच्या बोलण्यात अर्थ असतो. तर आपल्या दृष्टिने ते अर्थ पूर्ण (किमती) असतं. हे सहज बोलतांना सुध्दा मोजकच बोलतात का.. असं ऊगाचच वाटतं.
एखादा वकील मित्र सहज भेटल्यावर आपण गप्पा मारत असतांना चुकून त्याचा समव्यवसायीक भेटला तर त्यांची एखाद्या केस विषयीच चर्चा होते. आणि त्यांची हि चर्चा संपेपर्यंत आपण शो केस मधल्या पुतळ्यासारखे ऊभे असतो.
(हे फक्त वकील या शब्दाबद्दलच नाही. याच प्रमाणे काही आडनांवाच्या बाबतीत सुध्दा आदरयुक्त भिती असते. आणि अशी आडनांव असणारेच वकील असतील तर… तर मग भित्यापाठी ब्रह्मराक्षस… अशी आडनांव व आडनावाचे वकील असणारे, व वकील कृपया हे विनोदाने घ्या. व मला माफ करा.)
☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ७ – ट्रेंड ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य)☆
ट्रेंड
आज मनुष्य अनेक गोष्टी स्वतःला आवडते म्हणून करीत नाही, तर सध्याचा *”ट्रेंड* पाहून करतो असे म्हणावे लागते…
बरं यातील बरेचसे ट्रेंड हे आपल्या संस्कृतीच्या विरोधात जाणारे आहेत, असे आपल्या लक्षात येईल…! काळानुरूप सभ्यतेचे मापदंड बदलत असले तरी नीतीचे मोजमाप मात्र कोणत्याही काळात बदलत नसते…! आणि कोणत्याही ट्रेंडपेक्षा नीती कधीही उच्च असणारच, राहणारच आहे, त्यामुळे मनुष्याने त्याचा विचार आधी करायला हवा, नाही का?
पोशाख हा सर्वसाधारणपणे संस्कृतीचा निदर्शक मानला गेला आहे…! पोशाखामध्ये हे विशिष्ट शास्त्र दडलेले असते…! उदा. उष्ण कटिबंधात सैलसर पोशाख प्रामुख्याने आढळतो, तर शीत कटिबंधात घट्ट पोशाख आढळतो…! पण सध्या अंधानुकरण हा स्थायीभाव झाल्याने मनुष्य विवेक न करता अनुकरण करत आहे, पटतंय ना?
आपल्याकडे एक म्हण आहे.
‘ एक नूर आदमी.. दस नूर कपडा…’
थोडक्यात मनुष्याची पत प्रतिष्ठा मोजण्याचे, जाणून घ्यायचे पोशाख हे एक माध्यम आहे.
आपल्या प्रकृतीला, आपल्या संस्कृतीला, आपल्याकडील भौतिक परिस्थितीला झेपेल त्याप्रमाणे पोशाख परिधान करणे उचित नव्हे काय? पण याचा विचारच केला जात नाही असे पुढील उदाहरणातून आपल्या लक्षात येऊ शकेल…
आपल्याकडे साधारण मे महिन्यात लग्नाचा हंगाम असतो. रणरणत्या उन्हात, खास करून गावाकडे जिथे पंख्याची किंवा शीतलीकरण साधनांची सोय करणे शक्य नाही, अशावेळी, अशा ठिकाणी नवरदेव सुटबुट घालून घामाने थबथबून विवाह वेदीवर उभा रहात असतो… (कदाचित म्हणून त्या जागेला वेदी म्हणत असावेत…! ) त्या नवरदेवाची स्थिती काय होत असेल…?
लग्नाच्या नावावर लोकं करीत असलेले अतिरिक्त खर्च, सध्या निघालेले विवाहपूर्व छायाचित्रीकरणाचे फॅड, विवाहातील मौल्यवान संस्कार सोडून त्याला आपण सर्वांनी मिळून दिलेले एखाद्या तांत्रिक सोहळ्याचे अर्थात इव्हेंटचे स्वरूप, तसेच दैनंदिन जीवन जगताना मनुष्य खोट्या प्रतिष्ठेसाठी करीत असलेले अनावश्यक खर्च, या सर्व गोष्टी वेताळ बनून आपल्या मानगुटीवर बसल्या आहेत, नाही का?
माझी ताई रमा देशमुख, वय वर्षे सत्तर मुंबईत असते. घरी पंचाहत्तर वर्षाचे भाऊजी, मुलगा सुन, नातू सर्व आहेत. फक्त शनिवार रविवार सर्व जण जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवायचा प्रयत्न करतात. बाकी आठवडाभर रोज सकाळी लग्न घाईच असते. आॅफिस, शाळेची रोज तीच वेळ जरी असली तरी घाई असतेच. ••••
हा सकाळचा वेळ म्हणजे ताई भाऊजींकरिता निवांत वेळ असतो. बगीच्यात बसून पेपर वाचणे, चहा घेणे, बगीच्यात झाडांना पाणी घालणे वगैरे काम ते करतात. एकदा मुलांची घाई संपली की ते आपल्या कामाला लागतात. जाता जाता अजय अनिता काही सूचना न विसरता करतातच. •••
” वेळेवर औषध घ्या. वेळेवर जेवा, अॅमेझोन चे आज एक पार्सल येईल तेवढे घ्या. दरवाजा उघडू नका. ग्रील मधूनच घ्या. ” वगैरे वगैरे. ••••
” मावशींना स्वयंपाकाचे सर्व सांगितले आहे. तुम्ही धावपळ करू नका, शाळेतून आल्यावर अनय आपल्या हाताने दूध घेईल. फक्त लक्ष असू द्या. जाता जाता अनिताच्या काळजीयुक्त सूचना असतातच. “•••
असा साधारण रोजचा संवाद असतो.
थोड्या फार फरकाने कित्येक घरी सकाळी असेच दृश्य असते.
मुलांना आई वडिलांची काळजी असतेच. नोकरी ही सांभाळायची असते. मुलांना त्यांच्या म्हातारपणाची सोयही करायची असते. सध्याची परिस्थिती बघता एकुलता एक मुलगा जरी असला, तरी त्याचे शिक्षण ट्युशन्स, ग्राउंड वर खेळायला नेणे, अशी बरीच कामं आईवडीलांना असतातच. •••
महागाई, प्राइवेट नोकरी बघता मुलांना काही कमी कष्ट, काळजी नसते. तरूण वयात जास्तीत जास्त काम करावे, पैशाची सोय करून ठेवावी असा त्यांचाही विचार असावा. •••
आई बाबांना ही सांभाळायचे असतेच.
अजय अनिता ला आईबाबांचा खूप आधार आहेच. घरी कोणी लक्ष देणारे असले की बरेच प्रश्न उद्भवतच नाही. रोज कुलुप लावायचे काम नसते. आधार असतो.
ताई भाऊजी आपलं ज्येष्ठत्व छान सांभाळतात. ••••
आज आॅफिस ला जाताना अजय सांगुन गेला, आज माझी महत्वाची मिटिंग आहे. तेंव्हा मी उशीरा येईन, संध्याकाळी जेवायला माझी वाट बघू नका. माझे बाहेरच जेवण आहे. ••••
ताईने स्वतः ला भजन, भिशी, जेष्ठ नागरिक संघ, वाचक मंच, मैत्रिणीं बरोबर गप्पा टप्पा यात बिझी ठेवले आहे. अनय चार ते सहा ग्राउंड वर खेळायला जातो. त्या वेळी भाऊजी आपल्या मित्राला सोबत म्हणून त्यांच्या घरी जाऊन बसतात. ••••
भाऊजींचे मित्र श्री मनोहर जोशी मागच्या वर्षी पडले व त्यांचे दोन्ही पाय अधु झाले. आता ते व्हील चेअर वर आहेत शरीर नाजूक झाले असले, तरी बुद्धी छान काम करते. ते बुद्धिबळ कॅरम, पत्ते छान खेळतात, मॅचेस बघायला त्यांना आवडत. बरोबर त्यांच्या मित्राचा साथ असला तर दोघेही मॅचचा आनंद घेतात. त्यांची चर्चा रंगते, जोशी साहेब रोज भाऊजींची वाट बघतात. ••••
त्यांचा एकुलता एक मुलगा आनंद अमेरिकेत स्थाईक झाला आहे. पैशाची कमी नाही. त्याने चोवीस तास एजन्सी चा सहायक मदतीला घरी ठेवला आहे. तो जोशी काकांची सर्व काम छान प्रेमाने करतो.
पण मित्रांसोबत गप्पा मारणे विविध विषयांवर गप्पा, चर्चा ही पण बौद्धिक आवश्यकता असतेच. ते काम भाऊजी अगदी न चुकता रोज करतात. दोन तास आपल्या मित्रांसोबत घालवतात. आनंदला या गोष्टीची जाणीव आहे. तो मधून मधून भाऊजीं बरोबर बोलतही असतो. ••••
असा सर्व दैनंदिन कार्यक्रम सुरळीत चालू असताना, आज अचानक ताईचा पाय खुर्चीत अडकला आणि ती पडली. शेजारच्या पराग च्या मदतीने भाऊजींनी ताईला दवाखान्यात नेले. देवाच्या दयेने विशेष काही झाले नाही तरी पायाला दुखापत झाली होतीच. आता पंधरा दिवस तरी अजिबात चालायचे नाही अशी सूचना पण डॉक्टर ने दिली. ••••
भाऊजी नी मला, अनिताला फोन करून सांगितले. तसेच आनंद ला पण कळविले की आज मला तुझ्या बाबांना भेटायला जाण जमणार नाही. तरी लक्ष असू दे. •••
आजचा दिवस फारच घडामोडींचा गेला पण सर्व वेळेवर व्यवस्थित झालं. त्याच समाधान होत. ••••
दुसऱ्या दिवशीची सकाळ थोडी वेगळीच उजाडली. ताईची व्यवस्था कशी करायची?? यावर सर्व बोलत असतानाच बेल वाजली. अजयने दार उघडले तर दारात साधारण पन्नाशीच्या वयाच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या एक मावशी उभ्या दिसल्या.
त्या म्हणाल्या, •••
नमस्कार मी माणिक पाटील. मी TIME BANK हुन आले आहे. ताईंच्या मदतीला म्हणून मी आलेय. ••••
अजय मावशीं बरोबर बोलत असतानाच आनंदचा भाऊजींना फोन आला. त्याने Time Bank कडून सौ. माणिक पाटील पंधरा दिवसांसाठी घरी येण्याची बातमी दिली. •••
अजयला Time Bank बद्दल माहिती होती. पण मी, ताई भाऊजी आम्हाला काहीच कळलं नाही. •••
तेंव्हा अजयने खुलासा केला. तो म्हणाला, •••
अग!! जस आपण बॅंकेत पैसे जमा करतो ना, आणि गरजेनुसार ते पैसे वापरतो तशीच ही पण बॅंकच आहे. यात पैसे ऐवजी वेळ जमा करायचा व आवश्यकतेनुसार तो जमलेला वेळ आपल्याला वापरता येतो. ••
जगात चौतीस देशात ही बॅंक व्यवस्थित चालू आहे. मागे आनंद याविषयी माझ्या बरोबर बोलला होता. त्याने त्याच्या मित्रां बरोबर अशी बॅंक मुंबईत सुरु केली आहे. तसेच बंगलोर, राजस्थान मध्ये थोड्या फार प्रमाणात असे काम सुरू आहे. सध्या एखाद्या सोसायटी करिता किंवा छोट्या संख्येत असे प्रयोग सुरू आहेत. कागदावर लिहून किंवा फक्त विचार करण्यापेक्षा प्रत्यक्षात करून बघावा, म्हणजे नेमके, काय प्रश्न, शंका, उद्भवतात हे कळेल. संकल्पनेची माहिती लोकांपर्यंत पोहचेल. काही उत्साही लोक, संस्था मदतीचा हात पुढे करतील. संकल्पनेला भक्कम आकार देण्यासाठी नियम, सुरक्षा, बॅंकेचे व्यवस्थापन सुरळीत चालण्यासाठी नियमावली, रजीस्ट्रेशन, पैशाचे व्यवस्था, वगैरे अनेक गोष्टींचा विचार विमर्श हौईल. असा हा TIME BANK चां concept आहे. असे काम करायला प्रोपर फुल प्रूफ सिस्टीम असायला हवी. एकदा का प्रचलनात आली की तेही होईल. •••
ही सोय फक्त ज्येष्ठांसाठींच आहे असं नाही. कोणीही यांचा लाभ घेऊ शकतो फक्त त्याकरिता त्यांच्या अकाउंट मध्ये वेळेचा बॅलेंस असायला हवा तरच याची सुविधा तुम्हाला मिळेल. •••
आज आपल्या घरी सौ् माणिक मावशी आल्या, कारण बाबांचा टाईम बॅंक बेॅलेंस भरपूर आहे. बाबा जोशी काकांकडे रोज संध्याकाळी जायचे, तेंव्हा तो वेळ आनंद बॅंकेत जमा करत असे. •••
त्यामुळे आज आपल्याला माणिक मावशींची मदत होत आहे. आता हा आईसाठी दिलेला वेळ माणिक ताईंच्या अकाउंट मध्ये जमा होईल. •••
अशी ही सायकल चालू राहिल
स्वीझरलॅंड साऊथ अफ्रिका, इजराईल सारख्या अनेक देशांत ही व्यवस्था छान चालू आहे. •••
तशी व्यवस्था चांगलीच आहे, गरजेची पण आहे. आता आपल्या देशात एकदा का ही व्यवस्था प्रचलनात आली तर चांगले होईल. •••
मला आनंद व त्यांच्या सारख्या शिकलेल्या मुलांचे कौतुक वाटते की त्यांनी आपली नोकरी सांभाळून या प्रकारची सेवा समाजात उपलब्ध करण्याचे ठरविले आहे.
आज आपल्यालाही त्याचा उपयोग झालाच. ••••
भाऊजी म्हणाले, •••
अरे!! पण मी काही मनोहर कडे या उद्देशाने जात नव्हतो. माझा वेळही त्याच्या बरोबर चांगला जात होता. माझी अशी काहीच अपेक्षा नाही. •••
अजय म्हणाला, ••• बाबा!! बरोबर आहे तुमचे म्हणणे. आनंद ने पण तुमच्या वेळेचा/ मदतीचा मान ठेवला. ••••
आज सर्व वेगळ्याच विश्वात होते. भाऊजी म्हणाले, •••
खरंच या तरूण मुलांचे किती कौतुक करावे कळतच नाही. खरंच ही संकल्पना छान आहे. सर्वांनाच कधी न कधी मदतीची गरज पडतेच. •••
मदत आपणही करावी आणि निःसंकोचपणे घ्यावी. •••
योग्य उद्दिष्ट ठेवून योग्य दिशेने सतत प्रयत्न केल्यास आव्हानात्मक परिस्थितीवर सहज विजय मिळवू शकतो. •••
खरंच, ते दिवस छान होते, घड्याळ एखादयाकडेच असायचे, पण वेळ सर्वांकडे.
आता घड्याळ सर्वांकडेच आहे परंतु वेळ कोणाकडेच नाही. •••
आज या गोष्टीचा खेद आहे. ••••
गरजेच्या वेळेस कोणी भरवशाची व्यक्ती माझ्या मदतीला येईल, हा विचार खूप मानसिक आधार देणारा आहे. त्याकरिता आधी •••
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १० ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
रविंद्रनाथ टागोरांच्याविषयीचा आदर व्यक्त करण्यासाठी त्यांचे पुतळे केवळ भारतात (प. बंगाल, चेन्नई, हैदराबाद, मैसूर, अर्नाकुलम, लखनौ) व बांगलादेशातच नव्हे तर आशिया, युरोप, रशिया खंडातील अनेक देशात स्थापित करण्यात आले आहेत. उदाहरणादाखल कांही नावे बघू.
गॉर्डन स्क्वेअर, लंडन, यू के
फ्रेंडशिप पार्क, मॉस्को, रशिया
कॅथलिक युनिव्हर्सिटी, ल्युवेन, बेल्जियम
बॅलटनफर्ड, हंगेरी
लोझान युनिव्हर्सिटी, स्वित्झर्लंड
भारतीय दूतावास, बीजिंग, चीन
सोल, द. कोरिया
बोरोबदूर, माजेलिंग, योग्यकार्टा, जावा, इंडोनेशिया
तुर्कमेनिस्तान
डब्लिन, आयर्लंड
स्लिगो, आयर्लंड
मक्वारी विद्यापीठ, सिडनी, ऑस्ट्रेलिया
कॅनबेरा, ऑस्ट्रेलिया
—–
☆ गीत : २८ ☆
OBSTINATE are the trammels, but my heart aches when I try to break them.
Freedom is all I want, but to hope for it I feel ashamed. I am certain that priceless wealth is in thee, and that thou art my best friend, but I have not the heart to sweep away the tinsel that fills my room.
The shroud that covers me is a shroud of dust and death; I hate it, yet hug it in love. My debts are large, my failures great, my shame secret and heavy; yet when I come to ask for my good, I quake in fear lest my prayer be granted.
HE whom I enclose with my name is weeping in this dungeon. I am ever busy building this wall all around; and as this wall goes up into the sky day by day I lose sight of my true being in its dark shadow.
I take pride in this great wall, and I plaster it with dust and sand lest a least hole should
be left in this name; and for all the care I take I lose sight of my true being.
☆ ‘वडिलांचा नकार…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री ब्रह्मानंद पै☆
☆
“मॅडम, तुमची फ्लाईट दोन तासात आहे… ” पीएने आठवण करून दिली. ईशाने डोळ्यावरचा चष्मा काढला. लंडनच्या ५० व्या मजल्यावरून खाली बघताना तिला आज खूप रिकामं वाटत होतं. तिच्या वडिलांचं, सदाशिवरावांचं काल रात्री पुण्यात निधन झालं होतं.
ईशा एक यशस्वी बिझनेस वूमन होती. पण गेल्या १० वर्षांत ती एकदाही वडिलांना भेटायला भारतात आली नव्हती. कारण? कारण होता १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ दिवस.
ईशाला अमेरिकेतल्या मोठ्या युनिव्हर्सिटीत ऍडमिशन मिळाली होती. फी होती २५ लाख रुपये. सदाशिवराव एक साधे कारकून. ईशाने हट्ट धरला होता, “बाबा, लोन काढा, घर गहाण ठेवा, पण मला अमेरिकेला जायचंच आहे. “
सदाशिवरावांनी स्पष्ट नकार दिला होता.
“ईशा, आपली ऐपत नाही ग. मी घर गहाण ठेवू शकत नाही. तुझं लग्न, तुझा भाऊ, म्हातारपण… मी रिस्क घेऊ शकत नाही. “
ईशा संतापली होती.
“तुम्ही भित्रे आहात! तुम्हाला माझ्या प्रगतीची जळजळ होते. मला तुमची मुलगी म्हणवून घ्यायची लाज वाटते. “
असं म्हणून ईशाने घर सोडलं होतं.
तिने रागाच्या भरात एका ट्रस्टकडून स्कॉलरशिप मिळवली आणि ती अमेरिकेला निघून गेली. जाताना तिने बापाच्या तोंडाकडे पाहिलंही नव्हतं.
गेल्या १० वर्षात तिने स्वतःला सिद्ध केलं, करोडो रुपये कमावले, पण बापाला एक फोनही केला नाही.
वर्तमान:
ईशा पुण्यात पोहोचली. जुनाट वाडा तसाच होता. दारात मोजकी लोकं होती. सदाशिवरावांचा देह अंगणात ठेवला होता. ईशाने पाहिलं, बापाच्या अंगावरचा सदरा जुनाच होता, जो १० वर्षांपूर्वी तिने पाहिला होता.
तिला रडू आलं नाही, फक्त एक विचित्र ओझं वाटलं. विधी उरकले. लोकं पांगली. शेवटी घरात ईशा आणि सदाशिवरावांचे जुने मित्र, वकील देशपांडे काका उरले. देशपांडे काकांनी ईशाच्या हातात एक जुनी, फाटकी डायरी आणि एक पासबूक दिलं.
“ईशा, सदाने हे तुझ्यासाठी ठेवलंय. “
ईशाने उपहासाने विचारले, “काय असणार यात? हिशोब? की मी किती वाईट वागले याच्या तक्रारी?”
काका गंभीर झाले. “वाच तू. तुला काही प्रश्नांची उत्तरं मिळतील. “
ईशाने डायरी उघडली. हळूहळू वाचू लागली.
काहीवेळाने आलं ते पान – तारीख १० वर्षांपूर्वीची.
“आज ईशा रागावून गेली. ती मला भित्रा म्हणाली. पण तिला कसं सांगू, की ज्या घराला गहाण ठेवायला ती सांगत होती, ते घर तर मी तिच्या इंजिनिअरिंगच्या वेळीच विकलं होतं. आता आम्ही भाड्याच्या घरात राहतोय, हे तिला कळलं असतं तर तिला गिल्ट (अपराधीपणा) वाटला असता. म्हणून मी खोटं बोललो. “
ईशाच्या हाताला कंप सुटला. तिने पुढचं पान उलटलं. “आज ईशाला अमेरिकेच्या ‘ज्ञानदीप ट्रस्ट’ ची २० लाखांची स्कॉलरशिप मिळाली. ती खूप खूश आहे. तिला वाटतंय, तिच्या हुशारीवर मिळाली. बरंच झालं. तिला हे कधीच कळू नये की ‘ज्ञानदीप ट्रस्ट’ मध्ये मी माझ्या PF चे सगळे पैसे, आणि गावी असलेली वडिलोपार्जित जमीन विकून आलेले पैसे जमा केलेत. तिला वाटेल, बापाने मदत नाही केली. ती माझा तिरस्कार करेल… पण चालेल. माझा तिरस्कार करून का होईना, पण ती जिद्दीने शिकेल. ती माझ्या उपकाराखाली दबली असती तर आकाशात उडू शकली नसती. “
ईशाच्या पायाखालची जमीन सरकली. ती ज्याला ‘स्कॉलरशिप’ समजत होती, ते तिच्या बापाचं रक्त आणि घाम होतं?
ज्या बापाला तिने ‘भित्रा’ आणि ‘कंजूस’ म्हटलं होतं, त्याने स्वतःचं म्हातारपण विकून तिचं भविष्य विकत घेतलं होतं?
ती रडत रडत शेवटच्या पानावर आली. तारीख – २ दिवसांपूर्वीची.
”ईशा, आज डॉक्टर म्हणाले- माझ्याकडे २ दिवस आहेत. तू खूप मोठी झाली आहेस. टीव्हीवर तुझा फोटो बघतो तेव्हा छाती अभिमानाने फुलून येते. बाळा, तुझा राग अजून गेला नसेल, पण एक सांगतो… मी तुला पैसे दिले नाहीत, असं नाटक केलं, कारण तुला ‘बापाच्या पैशावर जगणारी मुलगी’ नाही, तर ‘स्वतःच्या हिंमतीवर उभी राहिलेली स्त्री’ व्हायचं होतं. तू जिंकलीस बाळा. मी हरलो, पण मी आनंदाने हरलो.
फक्त एक खंत आहे… मरताना एकदा तुला डोळे भरून बघायचं होतं.
तुझा ‘कंजूस’ बाबा. “
ईशाने डायरी छातीशी कवटाळली. ती जमिनीवर कोसळली आणि ओक्साबोक्शी रडू लागली.
“बाबा… बाबा उठा ना… मला माफ करा… मी चुकले… “
तिचा आक्रोश त्या रिकाम्या घरात घुमत होता. आज तिच्याकडे करोडो रुपये होते, जगातल कुठलंही सुख ती विकत घेऊ शकत होती.
पण ज्या माणसाने स्वतःची राख करून तिला प्रकाश दिला होता, त्या बापाची एक ‘भेट’ आता ती जगातल्या कुठल्याच दौलतीने विकत घेऊ शकत नव्हती. बाहेर देशपांडे काका डोळे पुसत होते.
त्यांना माहिती होतं, सदाशिवरावांनी शेवटचे १० वर्षे फक्त ‘चटणी-भाकरी’ खाऊन दिवस काढले होते, जेणेकरून ईशाला परदेशात कधी पैशाची कमी पडू नये म्हणून ते गुपचूप तिच्या खात्यात पैसे पाठवत होते.
ईशाला आता कळलं होतं…
बाप कधीच गरीब नसतो, फक्त त्याची श्रीमंती मोजायची ताकद आपल्याकडे नसते.
आई-वडिलांच्या नकारामागे अनेकदा असा त्याग लपलेला असतो, जो आपल्याला उशिरा समजतो. जोवर ते आहेत, तोवर त्यांची कदर करा. कारण एकदा वेळ निघून गेली, की पश्चातापाशिवाय हाती काहीच उरत नाही.
☆
लेखक: अज्ञात
प्रस्तुती: श्री. ब्रह्मानंद पै
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
रात्री टीव्हीवर बातम्या पाहत असताना नाशिक आणि नगर भागात बिबट्याने किती थैमान घातले ते दाखवत होते. बिबट्याच्या दहशतीने लोक घाबरले होते. त्या बातम्या पाहतच मी झोपी गेलो. मी गाढ झोपलो असताना अचानक मला एक भीतीदायक डरकाळी ऐकू आली. मी दचकून जागा झालो. पाहतो तर काय समोर चक्क एक बिबट्या! त्याचे डोळे अंधारात चमकत होते. तो अगदी समोर आणि मी त्याच्या शिकारीच्या टप्प्यात. बापरे! आता काही खरं नाही. माझ्या काळजाचा ठोका चुकला. माझ्यात कुठून एवढे बळ आले कुणास ठाऊक, पण भीती वाटण्याऐवजी माझ्या डोक्यात काहीतरी केमिकल लोचा झाला आणि मला थेट ‘शोले’ चित्रपटच आठवला. समोर साक्षात मृत्यू उभा होता आणि माझ्यातला ‘गब्बर सिंग’ जागा झाला होता.
बिबट्याने पुन्हा एकदा गुरगुरत माझ्याकडे पाहिले. मी थरथरत्या हाताने चादर सावरली आणि मनातल्या मनात म्हणालो, “जो डर गया, समझो मर गया! “
बिबट्या एक पाऊल पुढे आला. त्याचा पवित्रा पाहून मला वाटलं तो आता झडप घालणार. पण मी ही काय कच्च्या गुरुचा चेला नव्हतो. मी बेडवर उभा राहिलो आणि पूर्ण ताकदीने ओरडलो, “अरे ओ सांबा! लगा निशाना इस बिबटे पर. अब तेरा क्या होगा बिबट्या? “
माझ्या अशा अनपेक्षित ओरडण्याने बिबट्या सुद्धा दोन मिनिटं कन्फ्युज झाला. तो डोळे विस्फारून माझ्याकडे बघतच राहिला. समोरच्या सावजाकडून त्याला अशा प्रकारच्या प्रतिसादाची अपेक्षा अजिबात नसावी. आतापर्यंत त्याचा अनुभव असा होता की समोरचे सावज त्याला पाहिले की गर्भगळीत होत होते. पण इथे तर वेगळाच प्रकार होता. मनात नक्कीच विचार आला असेल की, “शिकार करायला आलोय की शिकार व्हायला? “
बिबट्याला आतापर्यंत स्वतःबद्दल फार आत्मविश्वास होता. गावोगावच्या माता आपल्या बाळाला झोपवताना त्याची भीती दाखवत होत्या. ” बेटा सो जा नही तो बिबट्या आ जायेगा. ” बिबट्या सुद्धा आपल्या साथीदारांना मोठ्या गर्वाने म्हणत होता, ” कितना इनाम रखा है रे इन फॉरेस्ट वालो ने मुझपर? ” त्याचे साथीदार म्हणायचे, ” पुरे पाच लाख, सरदार. ” आणि मग बिबट्या गडगडाटी हास्य करायचा. पण आता बिबट्याचा हा आत्मविश्वास पार डळमळीत झाला होता.
मी म्हटलं, ” गाववालोने भुखे कुत्तों के सामने रोटी डालना अब बंद कर दिया है. इसलिये यहा कुछ नही मिलेगा. “
बिबट्या बिचारा अजूनच गोंधळला. त्या गोंधळलेल्या अवस्थेत त्याने आणखी एक डरकाळी फोडली. बहुधा त्या परिस्थितीचा निषेध त्याने व्यक्त केला असावा. पण आता त्याच्या डरकाळीत ती पूर्वीची जरब राहिली नव्हती. त्याने एक पाऊल मागे घेतलं. मला वाटलं तो घाबरला. माझा आत्मविश्वास वाढला. मी कोपऱ्यात ठेवलेली काठी उचलली. मी म्हटलं, ” गब्बर से तुम्हे एक ही आदमी बचा सकता, है खुद गब्बर! “
तसं जर बिबट्याने ठरवलं असतं तर समोरच्या भक्ष्याची शिकार करणं त्याला काही अवघड नव्हतं. पण आता त्याच्या डोक्यातही काहीतरी केमिकल लोच्या नक्कीच झाला होता. त्याला आता खात्री पटली होती की हा माणूस खायला योग्य नाही, कारण ह्याला शिकार बनवले तर आपलीच शिकार व्हायची आणि असा माणूस न खाल्लेला चांगला! माणूस जातीचे भवितव्य उज्वल राहण्यासाठी अशी माणसे जगणे आवश्यकच! काही एक न बोलता तो खिडकीकडे चालू लागला. तो पाठ फिरवून जात असताना मी त्याला शेवटचा टोमणा मारलाच, “जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी! “
बिबट्या खिडकीतून उडी मारून पळून गेला.
आता बिबट्याच्या घरी काय परिस्थिती असेल ते दृश्य माझ्या डोळ्यासमोर तरळले. त्याचा चेहरा पाहून बिबटीण बाईंनी नक्कीच विचारले असणार. ” काय झाले शिकार मिळाली नाही का? ” बिबट्याचे उत्तर ” नाही. आज माझीच शिकार व्हायची होती पण वाचलो. ” सौ बिबट म्हणाल्या, ” का? पळून आलात? “
बिबट्या म्हणाला ” होय. “
सौ बिबट, ” कितने आदमी थे? “
बिबट्या, ” सिर्फ एक “
सौ बिबट, ” सिर्फ एक आदमी और फिर भी वापस आ गये? “
एवढ्यात कसला तरी आवाज झाला आणि मला जाग आली. सगळं शांत झाल्यावर मी बेडवर धपकन बसलो आणि स्वतःशीच पुटपुटलो, “इतका सन्नाटा क्यूँ है भाई? “
तेवढ्यात बायकोचे उद्गार माझ्या कानावर आले. ” अहो, कसला सन्नाटा आणि झोपेत कसले शोलेचे डायलॉग म्हणत होतात! गब्बर काय, सांबा काय? उठा सकाळचे आठ वाजले आता. “
तेव्हा मला कळलं, बिबट्या वगैरे काही नव्हता. हा सगळा रात्रीच्या बातम्या पाहण्याचा परिणाम होता. पण आता बिबट्या वगैरे काही नव्हता तो खिडकीतून पळून गेला होता आणि माझ्या अंगात रात्रीचा गब्बर अजून जागा होता. मी बायकोला ऑर्डर केली, ” चहा आण. “
एकदा माझ्या एका अत्यंत अरसिक नातेवाईकाने प्रश्न विचारला होता, “दरवर्षी तुम्ही इतके फिरत असता, सात आठ दिवसांसाठी इतका पैसा खर्च करता, कशासाठी? त्यातून काय मिळतं तुम्हाला? हे निरर्थक वाटत नाही का तुम्हाला? मी तर याला उधळपट्टीच म्हणेन. ”
त्याच्या या प्रश्नाने खरं म्हणजे मी थक्कच झाले होते. शिवाय त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला जी एक आर्थिक बाजू होती त्यातून त्याला बाहेर काढून कुठल्यातरी अज्ञात, पलीकडच्या आवश्यक भावनिक, मानसिक, विश्वात घेऊन जाणं म्हणजे आपलीच किती दमछाक होईल आणि ऊर्जेचा अपव्यय होईल असा विचार करून मी चक्क गप्पच राहिले. माझ्या मौनाचा अर्थ त्यांनी जो लावला असेल तो असो, मला त्याचा विचार करण्याची गरज भासली नाही.
पण तुमच्याकडे एक रुपया असेल तर अर्ध्या रुपयाची भाकरी खा आणि अर्ध्या रुपयाची फुले विकत घ्या. भाकरी तुम्हाला जगवेल आणि फुलं तुम्हाला जगणं शिकवतील. माझ्या आयुष्याची ही एक मार्गदर्शक रेखा आहे म्हणून प्रवास करणे म्हणजे पैशाची उधळपट्टी करणे असे मला कधीच वाटलं नाही कारण निरनिराळ्या ठिकाणची भ्रमंती म्हणजे एक विशाल असे प्रकटीकरण(एक्सपोजर) असते. जडणघडणीचे एक सक्षम आणि भक्कम माध्यम असते. प्रवासात येणारे भले बुरे अनुभव, होणारी विविध व्यक्तींशी ओळख, अडचणी, संकटे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठल्याही परिस्थितीत न डगमगता कसं स्थिर राहावं याचं प्रात्यक्षिक देणारं ठरतं. प्रत्येक भ्रमंतीत असे विविध अनुभव येतातच असाच आणखी एक कसोटीचा क्षण ठरावा असा भयप्रद अनुभव आम्ही दोन-तीन वर्षांपूर्वी इंडोनेशिया देशातल्या “बाली” या बेटावर गेलो असताना घडला. त्याच बाली सफरीतले काही वेचक क्षण. ही सफर आम्ही साधना, सतीश, सुमन, प्रमोद याआमच्या जीवलग मित्रमैत्रिणींसोबत केली होती.
फायर डान्स —अग्नि नृत्य म्हणजे बाली बेटावरचे एक प्रमुख आकर्षण.
समुद्रकिनाऱ्यावर उतरत्या संध्याकाळी या नृत्याचे भव्य सादरीकरण असतं. बीचवर जाण्याच्या सुरुवात स्थानापर्यंत आम्हाला हॉटेलच्या शट्ल सर्विस ने सोडले. उंच टेकडीवरून आम्हाला समुद्राचे भव्य दर्शन होत होते. ज्या किनाऱ्यावर हे अग्नी नृत्य होणार होते तिथपर्यंत पोहोचाण्याचा रस्ता बराच लांबचा, डोंगरावरून चढउताराचा, पायऱ्या पायऱ्यांचा होता. सुरुवातीला कल्पना आली नाही पण जसजसे पुढे जात राहिलो तसतसे जाणवले की हे फारच अवघड काम आहे. त्यापेक्षा आपण खालून किनाऱ्यावरून चालत का नाही गेलो? तो रस्ता जवळचा असतानाही— असा प्रश्न पडला. अर्थात त्याचे उत्तर यथावकाश आम्हाला मिळालेच. ती कहाणी मी तुम्हाला नंतर सांगेनच. तूर्तास आम्ही धापा टाकत जिथे नृत्य होणार होते तिथे पोहोचलो.
बरोबर संध्याकाळी सहा वाजता हे अग्नी नृत्य सुरू झाले. चित्र विचित्र, रंगी बेरंगी, चमचमणारी वस्त्रं ल्यायलेले, अर्धे अधिक उघडेच असलेले नर्तक आणि नर्तिकांनी हातात पेटते पलीते असलेली चक्रे फिरवून नृत्याला सुरुवात केली. समोर सादर होत असलेल्या त्या नृत्य क्रीडा, पदन्यास आणि ज्वालांशी लीलया चाललेले खेळ खरोखरच सुंदर तितकेच चित्तथरारक होते. आपल्याकडच्या गोंधळ, जागर यासारखाच लोकनृत्याचा तो एक प्रकार होता. संगीताला ठेका होता. अनेक आदिवासी नृत्यंपैकी हे एक नृत्य. साहस आणि कला यांचं अद्भुत मिश्रण होतं.
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या….
या जुन्या गाण्याचीही आठवण झाली.
काळोखात चाललेलं आभाळ, लाटांची गाज, मऊ शुभ्र वाळू यांच्या सानिध्यात चाललेलं ते अग्नी प्रकाशाचे नृत्य फारच प्रेक्षणीय होतं. उगाच काहीसं भीषण आणि गूढही वाटत होतं. एक तास कसा उलटला ते कळलंही नाही.
परतताना मात्र आम्ही आल्यावाटेने गड चढत जाण्यापेक्षा सरळ वाळूतून चालत जायचे ठरवले. तिथल्या स्थानिक माणसाने आम्हाला एवढेच सांगितले, ” अर्ध्या तासात समुद्राला भरती येईल. मात्र दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही शटल पॉईंट ला पोहोचालच. जा पण सांभाळून.. ”
मग असे आम्ही सहा वृद्ध वाळूतून चालत निघालो. वाळूतून चालणारे फक्त आम्हीच असू. बाकी सारे मात्र ज्या वाटेने आले त्याच वाटेने जाऊ लागले.
हळूहळू लक्षात आले वाळूच्या अनंत थरातून चालणे सोपे नव्हते. पाय वाळूत रुतत होते. रुतणारे पाय काढून पुढची पावले टाकण्यात भरपूर शक्ती खर्च होत होती. अंधार वाढत होता. समुद्र पुढे पुढे सरकत होता. आमच्या सहा पैकी सारेच मागे पुढे झाले होते. समुद्राच्या भरतीची वेळ येऊन ठेपत होती.
विलासला फूट ड्रॉप असल्यामुळे तो अजिबात चालूच शकत नव्हता. आम्ही दोघं खूपच मागे राहिलो. मी विलासला हिम्मत देत होते. थोड्या वरच्या भागात येण्याचा प्रयत्न करत होतो पण विलास एकही पाऊल उचलूच शकत नव्हता आणि तो वाळूत चक्क कोसळला. त्या विस्तीर्ण समुद्राच्या वाळूत, दाटलेल्या अंधारात आम्ही फक्त दोघेजण! आसपास कुणीही नाही. दोघांनाही आता जलसमाधी घ्यावी लागणार हेच भविष्य दिसत होतं. मी हाका मारत होते…” साधना, सतीश प्रमोद हेल्प हेल्प”
मी वाळूत उभी आणि विलास त्या थंडगार वाळूत त्राण हरवल्यासारखा निपचीत पडून. एक भावना चाटून गेली.
We have failed” आपण उंट नव्हतो ना…
कुठून तरी साधना धडपडत कशीबशी आमच्याजवळ आली मात्र. सतीश ने माझी हाक ऐकली होती. समोरच बीच हाऊस मधून त्यांनी काही माणसांना आमच्यापर्यंत जाण्यास विनंती केली.. दहा-बारा माणसं धावत आमच्या जवळ आली. सतीशच्या प्रसंगावधानाचे कौतुक वाटले. कारण त्याने त्याच क्षणी जाणले होते की हे एक दोघांचं काम नव्हे. मदत लागणार. मग त्या माणसांनी कसेबसे विलासला उभे केले आणि ओढत उंचावरच्या पायऱ्या पर्यंत आणले. तिथून एका स्विमिंग बेड असलेल्या खुर्चीवर विलासला झोपवून पालखीत घालून आणल्यासारखे शटल पॉईंट पर्यंत नेले. हुश्श!! आता मात्र आम्ही सुरक्षित होतो. चढत जाणाऱ्या समुद्राला वंदन केले. त्याने त्याचा प्रवाह धरुन ठेवला होता का? त्या क्षणी ईश्वर नावाची शक्ती अस्तित्वात आहे याची जाणीव झाली. आमच्या मदतीसाठी आलेली माणसं मला देवदूता सारखीच भासली. जगाच्या या अनोळखी टोकावर झालेल्या मानवता दर्शनाने आम्ही सारेच हरखून गेलो. श्रद्धा, भक्ती आणि प्रेम या संमिश्र भावनांच्या प्रवाहात मात्र वाहून गेलो. या प्रसंगाची जेव्हा आठवण येते तेव्हा एकच जाणवते, *देअर इज नो शॉर्टकट इन लाईफ*
बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्ग सोडू नको.. हेच खरे.
शरीराने आणि मनाने खूप थकलो होतो गादीत पडताक्षणीच झोप लागली.
दुसऱ्या दिवशीची सकाळ छान प्रसन्न होती. विलास जरा नाराज होता कारण कालच्या थरारक एपीसोडमध्ये त्याचा मोबाईल मात्र हरवला. पण आदल्या दिवशी ज्या दुर्धर प्रसंगातून आम्ही दैव कृपेने सही सलामत सुटलो होतो, त्या आठवणीतच राहून निराश, भयभीत न होता दुसऱ्या दिवशी आमची टीम पुन्हा ताजीतवानी झाली. सारेच पुढच्या कार्यक्रमाचे बेत आखू लागले.
दुसर्या दिवशीच्या सकाळी कर्मा कंदारा— विला नंबर ६७ च्या खाजगी तरण तलावावर जलतरण करण्याचा आनंद मनसोक्त लुटायचा हेच ठरवले.
अवतीभवती हिरव्या गच्चपर्णभाराचे वृक्ष आणि मधून मधून डोकावणारी पिवळ्या चाफ्याची गोजीरवाणी झाडे यांच्या समवेत तरण तलावात पोहतानाचा आनंद अपरंपारच होता.
अनेक वर्षांनी इथे, बालीच्या या नयनरम्य पार्श्वभूमीवर, सुरुवातीला काहीशा खोल पाण्यात झेप घेताना भयही वाटलं. पण नंतर वयातली ३०/४० वर्षं जणू काही आपोआपच वजा झाली आणि पोहण्याचा मनमुराद आनंद लुटू शकलो. झाडं, पाणी आणि सोबतीला आठवणीतल्या कविता.
थोडं हसतो थोडं रुसतो
प्रत्येक आठवण
पुन्हा जागून बघतो ।।
अशीच मनोवस्था झाली होती.
सिंधुसम हृदयात ज्यांच्या
रस सगळे आवळले हो
आपत्काली अन् दीनांवर
घन होउनी जे वळले हो
जीवन त्यांना कळले हो..
बा. भ. बोरकरांच्या या कवितेतले ‘जीवन कळणारे’ ते म्हणजे जणू काही आम्हीच होतो हीच भावना उराशी घेऊन आम्ही तरण तलावातून बाहेर आलो.
असे हे बालीच्या सहलीत वेचलेले संध्यापर्वातले खूप आनंदाचे क्षण!!
तसा आजचा दिवस कष्टमय, भटकण्याचा नव्हता. जरा मुक्त, सैल होता.
इथल्या स्थानिक लोकांशी गप्पा करण्यातली एक आगळी वेगळी मौज अनुभवली.
ही गव्हाळ वर्णीय, , नकट्या नाकाची, गोबर्या गालांची, मध्यम उंचीची, गुटगुटीत ईंडोनेशीयन माणसं खूप सौजन्यशील, उबदार हसतमुख आणि आतिथ्यशीलही आहेत.
भाषेचा प्रमुख अडसर होता. कुठलीही भारतीय भाषा त्यांना अवगत असण्याचा प्रश्नच नव्हता. पण इंग्रजीही त्यांना फारसं कळत नव्हतं. ते त्यांच्याच भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. पण गंमत सांगते, भाषेपेक्षाही मुद्राभिनयाने, हातवारे, ओठांच्या हालचालीवरूनही प्रभावी संवाद घडू शकतो याचा एक गमतीदार अनुभवच आम्ही घेतला.
सहज आठवलं, पु. ल. जेव्हा फ्रान्सला गेले होते तेव्हा दुधाच्या मागणीसाठी त्यांनी शेवटचा पर्याय म्हणून कागदावर चक्क एका गाईचे चित्रच काढून दाखवलं होतं. तसाच काहीसा प्रकार आम्ही येथे अनुभवला.
बाली भाषेतले काही शब्द शिकण्याचा खूप प्रयत्न केला पण लक्षात राहिला तो एकच शब्द *सुसु*.
बाली भाषेत दुधाला सुसू म्हणतात.
पण त्यांनीही आपले, ’नमस्कार, शुभ प्रभात, कसके पकडो वगैरे आत्मसात केलेले शब्द, वाक्यं, त्यांच्या पद्धतीच्या उच्चारात बोलून दाखवले. माणसाने माणसाशी जोडण्याचा खरोखरच तो एक भावनिक क्षण होता!
या भाषांच्या देवघेवीत आमचा वेळ अत्यंत मजेत मात्र गेला आणि त्यांच्या प्रयत्नपूर्वक मोडक्या तोडक्या इंग्लिश भाषेद्वारे बाली विषयी काही अधिक माहितीही मिळाली.
राजा केसरीवर्माने या बेटाचे नाव बाली असे ठेवले.
बाली या शब्दाचा अर्थ त्याग.
बाली या शब्दाचे मूळ, संस्कृत भाषेत आहे आणि या शब्दाचा सामर्थ्य, शक्ती हाही एक अर्थ आहे. आणि तो अधिक बरोबर वाटतो.
आणखी एक गमतीदार अर्थ त्यांनी असा सांगितला की बाली म्हणजे बाळ. बालकाच्या सहवासात जसा स्वर्गीय आनंद मिळतो तसेच स्वर्गसुख या बाली बेटावर लाभते.
बाली बेटावरच्या स्वर्ग सुखाची कल्पना मात्र अजिबात अवास्तव नव्हतीा हे मात्र खरं!!
संध्याकाळी कर्मा ग्रुप तर्फे झिंबरान बीच रिसॉर्टवर आम्हाला कॉम्प्लिमेंटरी डिनर होते. जाण्या येण्यासाठी त्यांच्या गाड्या होत्या.
संगीत, जलपान आणि गरमागरम पदार्थांची रेलचेल होती. वातावरणात प्रचंड मुक्तता होती. खाणे पिणे आणि संगीत, सोबत तालबद्ध संगीतावर जमेल तसे केवळ नाचणे. थोडक्यात वातावरणात फक्त आनंद आणि आनंदच होता आणि या आनंदाचे डोही आम्हीही अगदी आनंदे डुंबत होतो. LIVE AND LET LIVE.
☆ जे मिळालं आहे तेच पुरेसं आहे!! लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
दिल्लीतील एका मल्टिनॅशनल कंपनीत मॅनेजर पदावर काम करणारा एक तरुण पर्यटक आपल्या कुटुंबासह एक आठवड्याच्या सुट्टीसाठी लडाखला आला होता. तिथे त्याला जो ड्रायव्हर मिळाला तो साधारण अठ्ठावीस वर्षांचा असावा. त्याच्या कुटुंबात वृद्ध आई-वडील, पत्नी आणि दोन मुली होत्या.
प्रवासात बोलणं सुरू झालं.
पर्यटक: या आठवड्याच्या शेवटी पर्यटन हंगाम संपेल. मग तुम्ही काय करता? गोवा, दिल्ली किंवा इतर मोठ्या शहरांत हॉटेलमध्ये काम करायला जाता का?
तरुण: नाही, मी इथेच राहतो. लडाख सोडून कुठेही जात नाही.
पर्यटक: इथे तर हिवाळ्यात गोठवणारी थंडी असते. तेव्हा काय करता?
तरुण:फारसं काही नाही, फक्त सियाचिनला जातो.
पर्यटक (आश्चर्याने): सियाचिन? तिथे तर इथल्यापेक्षा जास्त थंडी असते!
तरुण:मी तिथे भारतीय लष्करासाठी लोडर म्हणून काम करतो. हे कंत्राटी काम असतं. मी आणि माझ्यासारखे काही लोक इथून सुमारे अडीचशे किलोमीटर पायी चालत सियाचिन बेस कॅम्पपर्यंत जातो. त्यासाठी पंधरा दिवस लागतात. तिथे वैद्यकीय तपासणी होते. फिट असलो तर गणवेश, बूट, गरम कपडे, हेल्मेट मिळतं. मग तीन-चार महिने तिथेच राहून काम करतो.
पर्यटक: तिथे काम काय करावं लागतं?
तरुण: सामान वाहून नेणं. जे काही आवश्यक असतं ते आर्मी एअरड्रॉप करते. आम्ही ते पाठीवर उचलून एका पोस्टवरून दुसऱ्या पोस्टवर पोहोचवतो.
तो संपूर्ण भाग हिमनद्यांचा आहे. तिथे ट्रक चालत नाहीत. बर्फावर चालणाऱ्या स्कूटर्सचा आवाज होतो, त्यामुळे शत्रू गोळीबार करू शकतो. म्हणून आम्ही रात्री साधारण दोन वाजता निघतो. टॉर्चही लावता येत नाही. पूर्ण शांतपणे, अंधारात चालावं लागतं. तिथे ना घोडे असतात ना खच्चर. मायनस पन्नास अंश तापमानात आणि अठरा हजार फूट उंचीवर कोणताही प्राणी जिवंत राहू शकत नाही.
पर्यटक (गंभीर आवाजात): तिथे ऑक्सिजनही कमी असतो. इतकं ओझं कसं उचलता?
तरुण: म्हणूनच पंधरा किलोहून जास्त वजन नसतं आणि दिवसाला फक्त दोन तास काम. उरलेला वेळ फक्त शरीर जिवंत ठेवण्याचा प्रयत्न.
पर्यटक:हे तर जीवघेणं आहे…
तरुण काही क्षण शांत राहिला, मग म्हणाला—
अनेक मित्र परत आलेच नाहीत. कोणी दरीत कोसळलं, कोणी शत्रूच्या गोळीने मारलं गेलं, आणि सर्वात मोठा धोका म्हणजे फ्रॉस्टबाईट… एकप्रकारे मृत्यू अटळच.
पर्यटक:मग तुम्हाला चांगला पगार तरी मिळत असेल?
तरुण:अठरा हजार रुपये महिन्याला. सगळा खर्च लष्कर उचलतं, त्यामुळे तीन महिन्यांत साधारण पन्नास हजार रुपये वाचतात. ते भरपूर आहेत. घर चालतं आणि सर्वात महत्त्वाचं—देश आणि लष्करासाठी काहीतरी करण्याचं समाधान मिळतं.
दिल्लीचा तो पर्यटक गप्प झाला. पन्नास लाखांच्या पॅकेजमध्ये, एसी ऑफिस आणि ऐषआरामाच्या आयुष्यात जगणारा तो माणूस, पहिल्यांदाच स्वतःला लहान वाटू लागला.
इथे—मायनस पन्नास अंश तापमान, अठरा हजार आठशे पंचाहत्तर फूट उंची, सकाळचे दोन वाजता, मृत्यूची सावली सोबत—दिवसाला सहाशे रुपयांची कमाई “फार” वाटते आणि देशासाठी काहीतरी केल्याची भावना आयुष्याला अर्थ देते.
शहरांत बसून ज्ञान पाजळणारे, सोशल मीडियावर विष ओकणारे—त्यांच्यातील कुणातही इतकं धैर्य नाही की त्या अंधाऱ्या, बर्फाळ शांततेत दहा मिनिटं तरी उभं राहावं.
तुम्ही तुमच्या मुलाला मॉलमध्ये शॉपिंग करायला घ्या, पिझ्झा खाऊ घाला; पण कधीतरी ही गोष्टही त्याला नक्की सांगा, जेणेकरून त्याला कळेल—या देशाची खरी रीढ कुठे आहे.
आपण सगळ्यांनी आपल्या मुलांना हे समजावून सांगावं की देशभक्ती म्हणजे फक्त घोषणा देणं किंवा चर्चा करणं नाही, तर त्याग, शिस्त आणि कर्तव्य यांतून ती जन्माला येते.
पुढच्या वेळी आपण आरामदायी खोलीत बसलेलो असू, तेव्हा एक क्षण थांबून त्या लोकांना आठवूया—जे रात्री दोन वाजता, अंधार आणि बर्फाच्या सान्निध्यात, आपल्या शांततेचं ओझं पाठीवर उचलून उभे असतात.
कारण ते आहेत म्हणूनच आपण आहोत.
राम रक्षा स्तोत्र –
राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे ।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ।।
सदैव प्रसन्न रहा!!
जे मिळालं आहे—तेच पुरेसं आहे!!
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈