मराठी साहित्य – जीवनरंग ☆ हे देवा म्हाराजा…- भाग १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर ☆

श्री प्रदीप केळुस्कर 

?जीवनरंग ?

☆ हे देवा म्हाराजा… – भाग १ ☆ श्री प्रदीप केळुस्कर 

प्रभाकर आपल्या पानपाट्टीच्या स्टॉल मध्ये छोटया गादीवर बसला होता, विचाराचे थैमान डोक्यात सुरु होते. गेले दोन तास एक सुद्धा गिऱ्हाईक फिरकले नव्हते मात्र स्वतः प्रभाकरने गेल्या दोन तासात आठ पाने तंबाखू खाऊन मोठया पिचकाऱ्या गादीच्या खाली मारल्या होत्या.

प्रभाकर विचार करत होता, समोरच्या भगवान ने काय जादू केली कोण जाणे, त्याच्याकडे पान खायला भरपूर येत होती. त्याला बनारसी पाने कोण देतो हे कळत नव्हते, लोकांना आता बनारसी पानांची चटक लागली होती.

आपण मुंबई सोडून आलो आणि ही पानपट्टी खोलली, सोबत जर्दा आणि गुठक्याच्या पुड्या ठेवायला सुरुवात केली, त्यावेळी जाणाऱ्या येणाऱ्या शाळेतल्या पोरांपासून, मास्तर आणि गावातील तमाम तरुण म्हातारे गर्दी करत होते. त्यावेळी आपण खुश होतो,आपले बरे चालले होते.

पण दोन वर्षांपूर्वी या कुंभार वाडीतील भगवानने रस्त्याच्या विरुद्ध बाजूला पानपट्टी खोलली. आपल्या दुर्दैवाने रस्त्याच्या त्याच बाजूला एस टी थांबते, त्या मुळे एस टी तुन उतरल्या उतरल्या भगवानची पानपट्टी दिसते, त्या मुळे गिऱ्हाईक त्याच्यकडे गेले, त्यात त्याने बनारसी पाने कुठूनतरी आणायला सुरवात केली किंवा तो पान बरे घोटंतो म्हणून असेल किंवा देवदेवस्की करत असेल, पण आपले गिऱ्हाईक गेले ते गेले.

प्रभाकरच्या डोळ्यसमोर घरातली दहा माणसे आली, आपली बायको आणि दोन मुले भाऊ किरण, त्याची बायको आणि दोन मुलं आणि म्हातारी दोघ, असे आठ जणं. यांना दोन वेळा खायला काय घालायचे?

आपली बायको आणि भावाची बायको कुठं कुठं कामाला जातात म्हणून दोन वेळा अन्न तरी मिळत, पण म्हातारे आई आणि बाबा सतत आजारी, बापाला खोकला रात्रभर तरी विडी सुटत नाही, त्याच्या खोकल्याने रात्रभर झोप नाही, मग भाऊ किरण दोन पेकटात लाथा घालतो, मग म्हातारा रडतो आणि झोपतो.

म्हातारेचे आणि आपल्या बायकोचे एक मिनिट पटत नाही, आपली बायको म्हातारेला घरा बाहेर काढा, म्हणून आपल्याला सांगत असते, पण मला दया येते म्हणून म्हातारी अजून घरात आहें. धाकटा भाऊ ड्रायव्हर आहें, कुणा कुणाच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून जातो पण पैसे दारूत उडवतो.

त्याची बायको मात्र मेहनती आहें, खालच्या मानेने बाहेर आणि घरात मरमर काम करते म्हणून आपण भावाला वेगळे केल नाही.

आपला मुलगा सतीश शाळा सोडून घरी बसला आहें, त्याला काहीतरी धंदा उद्योग बघ म्हणून सांगून आपण थकलो, नाक्यावर वासुगिरी करत फिरत असतो. मुलगी मोहिनी आता वीस वर्षाची झाली, काजू कारखान्यात काजू फोडायला जाते.

ऐकंदरीत एवढ्या दहा माणसांना खाणे, कपडे, औषधं पाणी करताना बँकेचे कर्ज डोकयावर आहें, बँकेच्या नोटीचा येत आहेत जर तीन चार महिन्यात पैशाची तजवीज केली नाही, तर आठ गुंठे जमीन तारण ठेवली आहें, ती बँक जप्त करणार हें निश्चित.

प्रभाकरला काय करावे, कसे पैसे मिळवावे हें सुचेना, त्याच्या वाडीतील देवळीत सहदेव वर वार येत असे, आपल्याला त्याच्या आधार होता, त्याच्या अंगात वार आलं की आपण त्याच्या सोबत असायचो, त्याने अंग सोडल की तो धाडकन पडायचा तेंव्हा आपण त्याला मागून पकडायचो, इतक्या वर्षात त्याच्या मागे उभे राहिल्याने आपल्याला त्याचे वार शांत कस करायचे हें माहित झाल होत..

लांबून लांबून लोक सहदेव कडे अडचणी घालवण्यासाठी येत असत. लोक जमली की आपल्याला निरोप मिळाला की हातात असलेले काम सोडून आपण देवळीत जायचो. आपण आलो हें समजलं की सहदेव अंग धरत असे. मग आपण त्याला गाऱ्हाणं घालत असू

“हें देवा महाराज्यां, बारा पाचाच्या वहीवटीच्या म्हराज्या… म्हणजे सहदेव घुमू लागे.

सू.. सू… सू…

पण गेले सहा महिने सहदेव टी बी ने आजारी, दोन शब्द बोलला की दहा मिनिटे ढास, जीव राहील का जाईल अशी परिस्थिती, डॉक्टर नी सक्त ताकीद दिलेली, अजिबात ओरडायचे नाही, कमीत कमी बोलायचे. त्यामुळे सहदेव चें वारे बंद, म्हणजे लोक सहदेवला पाचशे दिले तर आपल्याला पण पन्नास शंभर देत होती, देही बंद.

प्रभाकर च्या मनात विचारांचे वारूळ उभे राहिले होते. काही तरी करायला हवे. एवढ्यात tyachaमुलगा सतीश सायकलवरून आला.

” बाबानू, एक आयडिया आसा, त्या दिवशी कणकवलीत गेललय, तेवा बघलंय, सगळे पानपाट्टीवले मटको घेतत, म्हणजे काय करूंक नको, लोक सांगतीत तो आकडो आणि तेच्यावर लावतीत ते पैसे लिहून दयायचो, तेचे कागद वसंता देतलो, संबंध दिवसाचो हिशेब वसंतचो माणूस घेऊन जातलो, कोणाक काय पैसे लागले, तेचो हिशेब वसंतचो माणूस देतलो, ते आपण जेका लागलो आकडो, तेका दयायचे, आपणाक धा टक्के कमिशन, म्हणजे पाच हजार दिवसाक जमले तर पाचशे गावातले.

प्रभाकरच्या तोंडाला पाणी सुटले, काही न करता एवढे पैसे मिळणार? हल्ली सगळीच मटको खेळतातं, ड्रायव्हर, कंडक्टर, कामगार, रिक्षावाले, शिक्षक, शेतकरी, दुकानदार सगळे. रोज जर वीस हजार बिट आली तर दिवसाला दोन हजार…

दुसऱ्या दिवशी वसंताचा माणूस येऊन मटक्याच्या स्लीपी देऊन गेला, कल्याण आणि वरळी ओपन आणि क्लोज याची माहिती देऊन गेला, अर्थात प्रभाकरचा मुलगा सतीश हा मटका खेळत होता, त्यामुळे त्याला सर्व माहिती होतीच.

सतीशने रिक्शावाल्याना आम्ही मटका बिट घेतो, असे सांगितल्यावर त्याच्या पानपट्टी मध्ये लोक येऊ लागली, हळूहळू ही बातमी सर्वाना समजली आणि पुन्हा एकदा प्रभाकरच्या पानपट्टी कडे माणसं जमू लागली, तिथे नुसती मटक्याची बीट कशी द्यायची, पान घेऊ लागले. त्यामुळे इतर बारीक सारीक वस्तू पण खपायला लागल्या.

प्रभाकर चे पुन्हा बरे दिवस आले, ही मटक्याची बीट आपण आधीच का नाही घेतली, याची रुख रुख त्याच्या मनाला लागली. आता कधी कधी प्रभाकर घरी थांबू लागला आणि त्याचा मुलगा सतीश आता दुकानात बसू लागला.

आता प्रभाकरच्या पानपाट्टीचे गिऱ्हाईक वाढले, पण समोरच्या भगवानचे गिर्‍हाईक घटले. भगवान मनातल्या मनात आश्चर्य करू लागला, हल्ली हल्ली पर्यंत माझ्याकडे येणारी गिर्हाईक समोर प्रभाकर कडे कशी जाऊ लागली? त्याने काय देवाची ओवाळणी वगैरे केली की काय? त्याच्याकडे आलेले एक गिर्हाईक त्याला म्हणाले ” तो मटक्याची बिट घेता, वरळी आणि कल्याण, तू घेवंक सुरवात कर म्हणजे तुजकडे माणसा येतली ‘.

भगवान ने वसंताशी संधान बांधले आणि बीट घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे प्रभाकरची निम्मे गिर्हाईक भगवान कडे गेली. त्यात प्रभाकरचा मुलगा सतीश याने हेराफरी केली, शाळेच्या शिपायला 1600 रुपये लागले, वसंताच्या माणसानी ते पैसे सतीशकडे दिले आणि सतीशने ते पैसे जुगारात उडवले.

शाळेचा शिपाई जेव्हा आपले पैसे मागायला आला, तेव्हा सतीश दडून राहू लागला, म्हणून तो शिपाई वसंता कडे गेला, आणि आपली स्लीप दाखवून पैसे मागू लागला. स्वतः वसंता प्रभाकर च्या स्टॉल कडे आला

वसंता – ह्या शिपायचे पैसे कित्या दिलस नाय, आमच्या माणसाने पैसे दिल्ले मा, मग?

सतीश थरथर कापत म्हणाला ” उद्या देतंय, पैसे खर्च झाले. ,’

वसंताने भर बाजारात सतिषच्या तोंडात दोन लाफा चढवल्या.

” तुका म्हाईत आसा मा, हो जरी मटको आसलो तरी सगळ्यात प्रामाणिक धंदो आसा, नुसत्या कागदावर लिहून दिल्ला आसता, पण कोणाचे पैसे बुडानात नाय. तुजामुळेमाजा आणि मटक्याचा नाव खराब झाला, बापाशिक सांग, रात्री पर्यंत पैसे नाय मिळाले तर गोळी मारून ठार मारतलंय ‘.

प्रभाकरला ही बातमी कळली, तू धावत धावत वसंताचे पाय पकडण्यासाठी आला पण तोपर्यंत वसंता घरी गेला होता. प्रभाकरने परत दोन लाथा सतीशच्या पेकटात घातल्या.

प्रभाकरला माहित होते, वसंता बोलल्यापणे करणार, तो गोळी घालायला मागे पाहणार नाही, तो घरी गेला आणि बॅगेत जपून ठेवलेले पैसे काढून वसंताच्या माणसाकडे दिले.

परत प्रभाकर काळजीत पडला, त्याच्या डोळ्यासमोर दहा माणसांचे चेहेरे येऊ लागले, इतक्या माणसांना दोन वेळा जेवण, शिवाय म्हाताऱ्याची औषधे, त्यात मोहिनीचे लग्न…

त्याच्या डोक्यात कल्पना आली, आपल्या गावात आणि आजूबाजूला भाजी पिकते. मुळा, लाल माठ, चवळी, ही भाजी खरेदी करून करून तालुक्याच्या गावात विकली तर?

त्याने मुलाला हाक मारली “झिला, हो धंदो काय चालणा नाय, इतक्या माणसाक दोन वेळा तोंडात घालूक व्हया कायतरी, काय तरी धंदो पाणी करूंक व्हयचं. तू असा कर, मी तुका भाजी घेऊन देताय, तुझ्याकडे होयत्त फुरफ़ुरा आसा, तेच्या पाठी भाजी बांध आणि सगळे बाजार कर. येताना मिरची, कोथिंबीर, टमाटे, आला आणलंस, की हय मी विकीन, तुजा काय मत ‘.

सतीश म्हणाला ” होय बाबानू, मी माज्या गाडयेर भाजी घेऊन जाईन, त्या पैशातून थोडी मिरची, कोथिंबीर आणीन बाकीचे पैसे परत तुमच्यकडे, परत भाजी घेऊक होई मा ‘.

– क्रमश: भाग १

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ “आठवणींची छोटी वाटी…” ☆ तृप्ती देव ☆

तृप्ती देव

? जीवनरंग ?

☆ “आठवणींची छोटी वाटी…तृप्ती देव

परवा आईला फोन केला…

“आई, रविवारी येतोय बरं का… मी, मुलं आणि स्वाती. काही करू नकोस हं फार त्रास! फक्त भेटायला येतोय. ”

माझं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच तिचा नेहमीचा हक्काचा आणि घाईचा कार्यक्रम सुरू झाला…

“अरे मग मुलांना काय आवडतं आता? … त्या छोट्याला अजून पुरणपोळी आवडते का? की शहरातल्या पिझ्झा-बर्गरच्या नादात विसरला? … आणि स्वातीला तिखट कमीच ना? … तू येताना दही घेऊन येऊ नकोस हं बाहेरचं, मी कालच विरजण लावलंय घरी, छान घट्ट जमेल! ”तृप्ती देव 

फोन ठेवला… पण तिचे फोन थांबले नाहीत. तिचं मन तिथेच घुटमळत होतं.

कधी — “तुला वांग्याचं भरीत करू का रे? गावची गावरान वांगी आणलीत गल्लीत आलेल्या गाडीवरून. ”

तर कधी — “अरे त्या जुन्या कपाटातल्या चिनी मातीच्या बरणीतलं लोणचं अजून आहे हं, तसंच मऊ आणि रसरशीत! ”

… आईचं प्रेम म्हणजे मेन्यू कार्ड नसतं… ते आठवणींनी गच्च भरलेलं स्वयंपाकघर असतं, जिथे प्रत्येक पदार्थाला मायेची फोडणी असते.

बाबांना जाऊन अजून काही महिनेच झाले होते. घरातलं मुख्य छत्र हरपलं होतं. बाबा गेल्यावर मी खूप प्रयत्न केला, “आई, चल माझ्यासोबत शहरात. तिथेच एकत्र राहू. इथे या मोठ्या घरात तू एकटी कशी राहणार? “

पण आई साफ नाकारायची. म्हणायची, “अरे राजा, माझं आयुष्य या घरात गेलंय. तुझ्या बाबांचा वावर आहे या भिंतींमध्ये. शहरातल्या त्या सिमेंटच्या फ्लॅटमध्ये कोंडल्यासारखं होतं मला, तिथे माझं मन करमत नाही. मी इथेच बरी आहे गावाला. आणि तू काळजी करू नकोस, शेजारी राहणारे जोशी काका आहेत ना, काही लागलं-सवारलं तर ते हक्काने उभे राहतात. “

जोशी काका खरंच देवासारखे शेजारी होते. दिवसातून दोनदा चक्कर माराचे, ‘वहिनी, काही आणायचं का बाजारातून? ‘ म्हणून विचारून जायचे. पण तरीही, नोकरीच्या जबाबदारीमुळे मला शहरात परत जावं लागलं होतं, आणि आई मागे या घरात एकटीच राहायची. मनात सतत तिची काळजी असायची, म्हणूनच या रविवारी वेळ काढून आम्ही सगळे गावाला आलो होतो.

रविवारी सकाळी आम्ही दारात उभे राहिलो. बेल वाजवल्या वाजवल्या आईने हसऱ्या चेहऱ्याने दार उघडलं. पाऊल आत पडताच, त्या बंद दाराआड साठलेला घराचा तोच जुना आणि ओळखीचा सुवास एका दमात छातीत भरला… स्वयंपाकघरातून येणारा मोहरीच्या खमंग फोडणीचा सुटलेला दरवळ, कोपऱ्यात तेवणाऱ्या उदबत्तीचा पवित्र सुगंध आणि त्याहूनही जास्त, आईच्या साध्या सुती साडीला लगटून राहिलेला तिचा हक्काचा, मायेचा स्पर्श! त्या एका श्वासाने शहरातला सगळा थकवा कुठल्या कुठे पळून गेला.

मुलं तिच्या गळ्यात पडून धावत आत गेली. स्वाती नेहमीप्रमाणे पदर खोचून स्वयंपाकघरात शिरली. काही वेळ गप्पा झाल्या. बऱ्याच वेळ झाल्यानंतर 

आणि मी सहजच डायनिंग टेबलवर नजर टाकली…

तिथे स्टीलची एक छोटी, जुनी वाटी ठेवलेली होती. कडा थोड्या घासून घासून झिजलेल्या, पण लख्ख स्वच्छ.

… ती रिकामी होती.

क्षणभर वाटलं स्वातीचं किंवा मुलांचं काही राहिलं असेल, धुवायची राहिली असेल. पण आईने मागून येत ती वाटी अलगद, जणू काही काचेची मौल्यवान वस्तू असल्यासारखी उचलली आणि कपाटातल्या एका कोपऱ्यात ठेवून दिली.

मी सहज विचारलं…

“काय गं आई, ही कोणाची वाटी? रोज तर नाही दिसत टेबलावर. ”

आई दोन सेकंद शांत राहिली. तिचा हात कपाटाच्या कड्यावरच रेंगाळला.

मग मागे वळून, डोळ्यातली आर्द्रता लपवत हलकंसं हसत म्हणाली…

“तुझ्या बाबांची…”

मी जागीच थबकलो.

ती पुढे म्हणाली…

“अरे, त्यांना जेवताना दही किंवा ताक वेगळ्या, अगदी याच छोट्या वाटीत लागायचं. ताटात कितीही पंचपक्वान्नं असली, तरी ही वाटी नसेल ना, तर तोंड वाकडं करायचे… म्हणायचे — ‘जेवणाला काय ती मजा नाही आली आज. ’ हट्टी होते गडी! ते गेल्यापासून ही वाटी मी वापरतच नाही रे. बाकी सगळी भांडी घासते, वापरते… पण ही वाटी हातात घेतली ना, की तिचा गारवा थेट काळजाला लागतो. नाही जमत रे हातात घ्यायला…”

माझ्या अंगावर सरसरून शहारा आला.

एखादं माणूस गेल्यावर… त्याचे कपडे, त्याचा चष्मा, त्याचा घोगरा आवाज आठवतोच… पण काही लोक घराच्या विटाविटांमध्ये आणि जगण्यात इतके मिसळलेले असतात, की त्यांच्या जाण्यानंतर घरातली निर्जीव भांडीसुद्धा एकाकी आणि पोरकी पडतात.

आई पुढे अगदी सहज, एका सुस्कारा सोडत बोलून गेली…

“पूर्वी रोज न विसरता दही लावायचे मी, त्यांना आवडायचं म्हणून. आता फारसं करत नाही रे. स्वतःसाठी कोण एवढा पसारा करणार? आणि कोण इतकं कौतुकाने खाणार? ”

त्या क्षणी अचानक माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला… आणि छातीत कुठेतरी गलबलून आलं.

बाबा गेल्यापासून गेल्या काही महिन्यांत आम्ही आईच्या हातचं श्रीखंड खाल्लंच नव्हतं. चक्का बांधणं, तो गाळणं, त्यात केशर-वेलची सुवास भरणं… हे सगळं कौतुक बाबांच्या ‘वाः! काय जमलंय श्रीखंड! ‘ या एका वाक्यासाठी होतं. बाबा नसताना आईने स्वतःच्या हातातील ती चव आणि ते कौतुक कपाटात बंद करून ठेवलं होतं. म्हणूनच तिला शहरातही यायचं नव्हतं, कारण तिथे बाबांच्या या आठवणी साठवून ठेवायला तिची हक्काची कपाटं आणि भांडी नव्हती.

मला अचानक आतून कसंसंच झालं. कृतज्ञतेची आणि एकाच वेळी अपराधीपणाची भावना दाटून आली.

दुपारी तृप्त जेवण झाल्यावर मुलं आणि स्वाती गप्पा मारत बसले. मी हळूच उठून स्वयंपाकघरात शिरलो. आई आवराआवर करत होती, मी तिच्या मागे जाऊन उभा राहिलो.

मी फ्रिज उघडला, सकाळी आईने कौतुकाने लावलेले घट्ट दही काढलं. एक स्वच्छ सुती कपडा किचन मधला घेतला.

आईने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि विचारलं…

“काय करतोयस रे राजा? ”

मी हसत, तिचा हात हातात घेत म्हणालो…

“आज तुझ्यासाठी आणि बाबांसाठी… श्रीखंड करतोय. ”

“अरे वेड्या, आता या दुपारी? आणि मी कुठे एवढं गोड खाणारे आता—”

“तू शांत बस गं… काही बोलायचं नाही आज. आणि हो… हे श्रीखंड आज बाजाराच्या वाटीत नाही, तर त्या बाबांच्या आवडत्या वाटीतच वाढलं जाणार आहे! ”

आई काहीच बोलू शकली नाही. तिने फक्त पदराने तिचे पाणावलेले डोळे टिपले आणि ती स्वयंपाकघरातून बाहेर निघून गेली. कदाचित तिला तिचं रडू लपवायचं होतं.

संध्याकाळी चहाच्या वेळी, मी फ्रिजमधून तो केशर-वेलचीचा सुवास सुटलेला मऊशार चक्का काढला. आणि कपाटातून ती छोटी, बाबांची स्टीलची वाटी काढून घेतली. त्यात चमचाभर श्रीखंड अगदी सुबकतेने वाढलं.

मी श्रीखंडाची ती वाटी आईच्या समोर नेऊन ठेवली.

आईने ती वाटी हातात घेतली… इतकी जपून, दोन्ही हातांचा द्रोण करून… जणू काही त्या स्टीलच्या स्पर्शात अजूनही बाबांच्या हाताचा उबदार स्पर्श शिल्लक होता.

जेव्हा आईने त्या वाटीतलं श्रीखंड खाल्लं, तेव्हा त्या वाटीचा तो परिचित आणि जिवंत स्पर्श आईला बाबांच्या अनेक गहिऱ्या स्मृतींमध्ये, त्यांच्या एकत्र घालवलेल्या सुखाच्या दिवसांत आणि न संपणाऱ्या अथांग प्रवासात परत घेऊन गेला… जणू बाबा तिथेच तिच्यासमोर बसून कौतुकाने म्हणत होते, ‘वाः! काय जमलंय श्रीखंड! ‘

खूप दिवसांनी… आई खऱ्या अर्थाने हसली होती.

त्या दिवशी मला एक अथांग सत्य कळलं…

काही पदार्थ हे फक्त जिभेच्या चवीसाठी किंवा भूक शमवण्यासाठी नसतात… ते ‘कोणीतरी आपल्यासोबत आहे, आपण कोणासाठी तरी हवं आहोत’ या अस्तित्वाच्या भावनेसाठी बनत असतात. भूतकाळ आणि वर्तमान का जोडण्यासाठी असतात.

माणूस गेल्यावर… त्याची आवड किंवा त्याची चव घरातून संपत नाही. ती शांतपणे कुठल्यातरी अंधाऱ्या कपाटात, एखाद्या रिकाम्या छोट्या वाटीत, एखाद्या न बोललेल्या आठवणीत आणि सांडलेल्या आसवांमध्ये जिवंत राहते. गरज असते ती फक्त, मुलाने आईचा हात धरून त्या आठवणीला पुन्हा एकदा मायेची चव देण्याची… मग ती गावाला असो वा शहरात!

© तृप्ती देव

भिलाई( छत्तीसगड)

मो ९१६५९८४३२२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ असावा असा एक छंद! – लेखिका : रेशमा डोळे (रमा) ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? मनमंजुषेतून ?

☆ असावा असा एक छंद! – लेखिका : रेशमा डोळे (रमा) ☆ प्रस्तुती – श्री अनिल वामोरकर ☆

नवीन ठिकाणी राहायला आलो, पण मन काही त्या नव्या जागेत अजून रुळलं नव्हतं. नवऱ्याच्या नोकरीची अजून सहा वर्षे बाकी होती. तब्येतीच्या कारणामुळे आम्हाला जुनी राहती जागा सोडावी लागली आणि त्यांच्या नवीन ऑफिसजवळ घर घ्यावं लागलं.

सुरुवातीचे एक-दोन दिवस सामान लावण्यातच गेले.

एक दिवस दाराची बेल वाजली. दार उघडलं तर समोर एक गोड आजी उभ्या होत्या. गोऱ्यापान, गुलाबी वर्ण, ठेंगण्या. अंगात सुंदर पंजाबी ड्रेस, त्याला मॅचिंग टिकली, कानातले, बांगड्या… आणि ते निळेशार डोळे! सगळंच देखणं… आणि त्याहूनही गोड त्यांचं बोलणं.

 

मी मात्र घरच्या अवतारात होते. मला अगदीच लाजल्यासारखं झालं.

“अगं, मी तुझी शेजारीण. सगळे मला ‘माई’ म्हणतात. कालच यायचं ठरवलं होतं ओळख करून घ्यायला, पण लगेच आले असते तर तू म्हणाली असतीस, ‘काय ही म्हातारी, लगेच आली! ‘”

हे बोलून त्या गालावर खळी पाडत इतक्या गोड हसल्या की मी त्या खळीतच हरवून गेले.

“हे घे, मस्त टोमॅटो सूप आणलंय. घरात किती जण आहेत माहीत नव्हतं, म्हणून अंदाजाने आणलं. आवडतं ना? म्हणजे आवडत नसलं तरी आता प्यावंच लागेल हं! “

पुन्हा तेच मधाळ हसू…

“अगं, मीच बोलत बसले ना! माझं असंच होतं. समोर माणूस दिसला की किती बोलू आणि किती नको, हेच कळत नाही.

चल येते… चालू दे काम तुझं.. काही लागलं तर सांग.. “

आमच्या दोघींच्या गच्च्या समोरासमोर होत्या. त्यामुळे सकाळी हळूहळू गप्पा सुरू झाल्या. बिल्डिंगमध्येही एक-दोन ओळखी झाल्या; पण तिथल्या बायकांना इतर रहिवाशांच्या घरात काय सुरू आहे याच्या गप्पा, मालिकांची चर्चा यांतच जास्त रस होता. त्यामुळे मी त्यांच्यात फारशी रमले नाही.

माईंच्या हातचे पदार्थ अप्रतिम असायचे. हळूहळू माझ्या घरूनही पदार्थांच्या वाट्या त्यांच्याकडे जाऊ लागल्या. त्या मनापासून कौतुक करायच्या आणि मला अजून काहीतरी करून त्यांना खाऊ घालावंसं वाटायचं.

मी आता इथे रुळले आहे, हे पाहून नवरा आणि परदेशात असलेली मुलगी दोघेही निर्धास्त झाले. “आता काय करू? कंटाळा आलाय… ” हा माझा पंचक्षरी मंत्रही बंद झाला.

एक दिवस सकाळी माई गच्चीत बसून क्रोशेचं काम करताना दिसल्या.

“माई, तुम्हाला हे येतं? मला शिकवाल का? “

“अगं, आजपासूनच ये. उभ्याउभ्या पळतेस नेहमी. निवांत घरीच आली नाहीस अजून. “

दुसऱ्या दिवशी सगळी कामं आटोपून मी अकराच्या सुमारास त्यांच्या घरी गेले.

माईंबद्दल मला फारसं काही माहीत नव्हतं. एवढंच ऐकलं होतं की त्यांचे पती आणि मुलगा आर्मीमध्ये होते.

घरात शिरताच समोर भिंतीवर मोठा फोटो होता. माई, त्यांचे पती आणि मुलगा. पती आणि मुलगा दोघेही आर्मीच्या गणवेशात.

घराचा प्रत्येक कोपरा त्यांनी इतका सुंदर सजवला होता! कुठेही दिखाऊपणा नव्हता; पण साधेपणातलं देखणेपण मात्र प्रत्येक वस्तूतून जाणवत होतं.

“येतेस का गं आत? मी जरा आमच्या नातेवाईकांना जेवू घालून येते. “

मी चकित झाले.

नातेवाईक? पण घरात कोणाचाच आवाज नव्हता. बाहेर चप्पलही नव्हत्या.

“माई, मी नंतर येऊ का? “

“अगं, कशाला? थांब. हे असे जेवतील आणि जातील. “

मला काहीच कळेना.

“ये ना, आतच. तुझी ओळख करून देते. “

मी किचनमध्ये गेले.

खिडकीजवळ खुर्ची टाकून माई बसल्या होत्या. त्यांच्या हातात कणकेच्या छोट्या गोळ्यांचा डबा होता.

एक गोळा त्यांनी खिडकीत ठेवला.

क्षणात एक कावळा आला, दोन मिनिटं एकदम शांत बसून राहिला. सावकाश एक गोळा चोचीत धरला आणि उडून गेला.

“ही माझी बहीण. एकदम गाय होती. आयुष्यभर कधी कसले नखरे नाहीत. समोर जे आलं ते आनंदाने स्वीकारलं. “

पुढचा गोळा ठेवताच दुसरा कावळा आला. बराच वेळ कर्कश आवाज करत राहिला. गोळा चोचीने इकडे-तिकडे करत राहिला आणि मग घेऊन गेला.

माई हसत म्हणाल्या,

“या माझ्या सासूबाई. आयुष्यात कधी म्हणून कौतुक नाही. “

मलाही आता गंमत वाटू लागली.

पुढचा गोळा ठेवला. एक कावळा आला; पण आमच्याकडे पाठ करून बसला.

“हा कोण? “

“आमच्या आईचे मोठे जावई. कायम मानपान हवा असायचा. अजूनही ताठा तोच. “

माई म्हणाल्या,

“जयंतराव, वाढलं आहे. येता का? “

माई हे म्हणताच क्षणात तो कावळा वळला, गोळा घेतला एकदा कर्कश्य ओरडला आणि उडून गेला.

योगायोग असेल कदाचित; पण मला मात्र हे सगळं विलक्षण वाटत होतं. मला आता जरा मजा वाटत होती.

आणखी एक कावळा गोळा घेऊन खिडकीच्या कपारीत ठेवून थोडा खाऊन उडून गेला.

“ही माझी जाऊ. कायम सगळं लपवून ठेवायची. “

तेवढ्यात एक खार आली.

“माई, हीसुद्धा नातेवाईक? “

“नाही गं. ही पाहुणी. “

एक गोळा घेऊन ती धूम ठोकून पळाली.

थोड्याच वेळात आणखी एक कावळा आला. आधी त्याने चोचीने जागा स्वच्छ केली, मग स्वतःची चोच साफ केली आणि शेवटी गोळा खाल्ला.

मी भुवया उंचावत विचारलं,

“हे कोण? “

माई कपाळावरचं कुंकू दाखवत हळूच म्हणाल्या,

“आमचे हे… सगळी कडे शिस्त म्हणजे शिस्त. “

त्यांच्या डोळ्यांत त्या क्षणी वेगळीच चमक होती.

थोड्या वेळाने कावळे येणं थांबलं.

माईंनी दहीभाताची वाटी खिडकीत ठेवली.

क्षणात एक कावळा आला आणि दहीभातावर तुटून पडला.

मी हसत विचारलं,

“याला वेगळा मेनू? फार स्पेशल दिसतोय हा नातेवाईक. “

क्षणात माईंचे डोळे भरून आले.

“माझा लेक… नील. त्याला माझ्या हातचा कालवलेला दहीभात फार आवडायचा. “

माझ्याकडे बोलायला शब्दच उरले नाहीत.

क्षणभर शांतता पसरली.

पण पुढच्याच क्षणी माई नेहमीसारख्या गोड हसल्या.

“चल… झाले सगळे. उरलेले गोळे ठेवून देऊ. अजूनही येतात हळूहळू. जवळचे सगळे भेटून गेले. “

मी म्हणाले,

“माई… आज क्रोशा नको. आज फक्त गप्पा मारूया. हा सगळा प्रकार मला सांगाल? “

माई हळूच बोलू लागल्या.

“हे आणि माझा मुलगा नील… दोघेही एका पाठोपाठ गेले. हे आजाराने गेले आणि नील देशासाठी शहीद झाला. नुकतंच त्याचं लग्न झालं होतं. आम्ही दोघी बायका अक्षरशः कोलमडलो होतो.

एक दिवस मला स्पष्ट जाणवलं… नील मला दहीभात मागतोय.

सुनेनेच सांगितलं, ‘आई, तुम्हाला तो जाणवतोय ना? मग खिडकीत ठेवा. ‘

मी दहीभात ठेवला… आणि मिनिटभरात एक कावळा आला. सगळा भात खाऊन गेला. मग रोजच ठराविक वेळी येऊ लागला.

त्या दिवशी मला किती आनंद झाला होता, हे मी कुणालाच सांगू शकले नाही.

वर्षभराने मी सुनेचं दुसरं लग्न लावून दिलं. ती तिच्या संसारात सुखी आहे. मला दोन गोड नातवंडं आहेत. आली की तुला भेटवेन.

मग नीलसाठी ठेवलेला दहीभात… त्यानंतर एक-एक कावळा यायला लागला मग रोज अशी पंगत बसायला लागली… आणि हळूहळू हा माझा छंद झाला.

लोक म्हणतात ना, माणूस एकटा पडला की काहीतरी आधार शोधतो…

मी माझे आधार या ‘नातेवाईकांमध्ये’ शोधले. “

 

थोडा विराम घेऊन त्या पुढे म्हणाल्या,

“बिल्डिंगमध्ये गेले की मुल सुनांचा तक्रारी, मेंदू बधिर करणाऱ्या मालिकांवर चर्चा या गप्पा. माझी सून दुसऱ्या घरी सुखात आहे म्हणून तिच्याबद्दल वाईट बोलायचं मला कधी जमलं नाही. मग माझ्या कडून काही मसालेदार खबर नाही म्हणून मी जरा त्यांच्यात नापासच होते.. मग मी खाली जाणंच बंद केलं.

आता, सकाळी या नातेवाईकांसोबत वेळ जातो. दुपारी थोडेसे विणकाम किंवा वचन, चार वाजता परदेशात राहायला जाणाऱ्या मुलांसाठी ऑनलाइन रेसिपी क्लास. संध्याकाळी मिलिटरीच्या एनजीओमध्ये काम. रात्री पुन्हा घर… असा माझा दिवस संपतो.

लोक मला वेड्यात काढतील म्हणून हे कावळ्यांचं प्रकरण मी कुणालाच सांगितलं नव्हतं… तुला सांगितलं… कारण तू चेष्टा करणार नाहीस, असा विश्वास वाटला. “

मी त्यांच्या हातावर हलकेच हात ठेवला. त्या दिवशी मला एक गोष्ट उमगली…

प्रत्येक जण दुःख विसरण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतो. कुणी देवात रमतो, कुणी कामात, कुणी आठवणींमध्ये… आणि माई? माई रोज आपल्या “नातेवाईकांना” एक गोळा कणिक वाढून जगण्याची उमेद गोळा करत होत्या.

त्या दिवशी मी क्रोशा शिकले नाही…

पण आयुष्याच्या विणकामात दुःखाचे धागेही किती प्रेमाने गुंफायचे असतात, हा सर्वात मोठा धडा मात्र माईंनी मला शिकवला.

लेखिका : रेश्मा डोळे (रमा).

प्रस्तुती : श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ”शांत दिसणाऱ्या वादळाचा तडाखा..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? जीवनरंग ?

☆ “शांत दिसणाऱ्या वादळाचा तडाखा.. ☆ संध्या बेडेकर ☆

“नेहमीपेक्षा शांत दिसणाऱ्या या वादळाचा तडाखा मात्र जबरदस्त होता. “

कालपासून घरात खूपच शांतता आहे. आईचे बोलणे अगदी मोजकेच व घरातील कामे शांतपणे चालू आहेत. कोणाला काही ‘instructions’ देणे वगैरे नाहीच.

आज ओला टॉवेल पलंगावर टाकल्या वर, आई नेहमी प्रमाणे काही म्हणाली नाही. मी सवयीप्रमाणे आलमरी उघडी टाकली. वर्तमानपत्रातील सर्व पाने इकडे तिकडे पसरलेली होती. सकाळपासूनच मोबाईल वर बोलत होतो. अभ्यास केला नाही. पण आज रोजचे डायलॉग ऐकू येत नव्हते.

आज आई नेहमी सारखी वागत नाहीये. कसल्या तरी विचारात आहे. हे सर्वांच्या हळूहळू लक्षात आलं. बाबा, अनघा अजय सर्वांचे एकमेकांना विचारून झाले. पण काय कारण असावे?? हे कोणाला कळले नाही. वादळं येण्यापुर्वी ची ही शांतता असावी का?? . असं म्हणून सर्व वादळं येण्याची वाट बघत होते. आज काही खरं नाही. एवढं मात्र नक्की.

शेवटी अनघाने विचारलेच काय झाले आई?? बरं वाटतं नाही का?? मी काही मदत करू का?? पण त्याच शांतपणे आई म्हणाली, अग, नको. तू कर आपला अभ्यास, मी बघते सर्व.

आज ‘जागतिक फॅमिली डे ‘ तेंव्हा आईने प्रत्येकाच्या आवडीचा एक एक पदार्थ केला होता. अगदी एखाद्या सणासाठी असतो ना, तसा पूर्ण स्वयंपाक होता. प्रत्येक जण अचंबित होता. जेवण तर उत्तम, विशेष आहे, पण रोजच्या सारखे वागणे नाही. रागावणे ही नाही. इतकं शांत आईला बघायची सवयच नाही. काही कळत नव्हते.

त्यात भर पडली, जेंव्हा जेवताना आई म्हणाली आज संध्याकाळी तुमच्या सर्वांचा काय कार्यक्रम आहे.?? मला आज तुमच्या सर्वांचा एक तास हवा आहे. मला तुमच्या सर्वांशी बोलायचे आहे. काळजी करू नका. काही भयंकर असं मी बोलणार नाही. फक्त माझ्या मनातलं सहजच तुमच्या जवळ बोलावे असं मला वाटतंय.

आज ‘फॅमिली डे ‘म्हणजे परिवाराकरिता महत्वाचा दिवस. यापेक्षा योग्य दिवस दूसरा नाही. तर आज आपण सर्व येथेच संध्याकाळी सात वाजता भेटतोय.

असं आईचे म्हणणे ऐकून सर्व म्हणजे, बाबांपासून सर्व वेगळ्याच विश्वात पोचले. आपापली समीकरण मनातल्या मनात जमवू लागले. जून्या नवीन घटनांचे विचार/ विश्लेषण होऊ लागले. आपल्या काही सांगितलेल्या, काही न सांगितलेल्या चूका डोळ्यासमोर येऊ लागल्या. पण आज बोलायची किंवा आईला प्रश्न विचारायची हिम्मत बाबांना पण झाली नाही. मन मात्र शंका कुशंका आश्चर्याने भरून गेले. अनेक ओळखीचे, अनोळखी चेहरे समोर आले. पण लिंक काही लागत नव्हती. कसा तरी सात वाजेपर्यंत चां वेळ काढला. पहिल्यांदाच आपल्याच घरात एवढं चविष्ट जेवण जेवून ही सर्व अस्वस्थ होते.

संध्याकाळी सर्व डायनिंग टेबलावर जमले. आईने बोलायला सुरुवात केली. माझे बोलणे झाल्यावरच तुम्हाला जे बोलायचे असेल ते बोला. मधे नाही.

आईने अगदी ‘Professional ‘वक्ता असल्यासारखी सुरुवात केली.

आई म्हणाली,

” मी अनिता देशमुख, श्री आनंद देशमुख यांची पत्नी व अजय आणि अनघा ची आई. ही माझी ओळख म्हणा किंवा अस्तीत्व, किंवा माझं जग म्हणा. माझ्या जगण्याचा उद्देश म्हणा. “काही ही समजा.

माझ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तुमच्या पासून होते. व दिवस मावळतो ही अशाच काही घरच्या कामाने. मी रोज रात्री दुसऱ्या दिवशीच्या कामाचे ‘Homework’ करते. त्यात रोजचा स्वयंपाक, तुमचे डबे, तुमची, घरातील इतर कामे असतात. मी माझ्या सवयीनुसार, तुमच्या आवडीनुसार, माझ्या क्षमतेनुसार, बुध्दीनुसार, प्रामाणिकपणे रोजचा आराखडा तयार करते व आनंदाने सर्व गोष्टी करायचा प्रयत्न असतो माझा. हे सर्व करणे मी माझे कर्तव्य समजते. रोजची कामे खूप आनंदाने पार पडतातच, असं दररोज होत नाहीं. काही अडथळे येतातच.

तुमचे वागणे नेहमीच खूप चूकीचे असते असं नाही. पण खूपदा मला पटणारे नसते. वयाप्रमाणेच वागता तुम्ही. पण मला दिसणाऱ्या काही गोष्टींकडे आज लक्ष देणे गरजेचे आहे असं मला वाटतं. ते बघून काळजी करत बसणे, यापेक्षा तुमच्या शी आज बोलावे असं वाटल मला. रोज रोज त्याच त्याच गोष्टींवर वाद घालायचा, चर्चा करायची पण प्रगती काहीच नाही. ‘ जैसे थे ‘. मी मात्र काळजी करत बसते. विचार करून करून मला मानसिक थकवा येतो, कधी कधी झोप लागत नाही. माझं काम मी बरोबर करत नाहिये असं वाटतं. मी अस्वस्थ असते. पण याने प्रश्न सुटत नाहीत.. माझा त्रास वाढतोय धैर्य संपतं चाललंय. मला मानसिक शांतता हवी आहे. मला यावर उपाय शोधायचा आहे.

मी ‘आई ‘ म्हणजे माझ्या कामांची एक नियमावली /रूपरेषा पूर्वी पासूनच ठरविण्यात आली आले. घर, नवरा मुलं त्यांची जबाबदारी, त्यांची देखभाल, त्यांना आनंदी ठेवणे हे सर्व त्यात आहे. जोपर्यंत तुम्ही तुमच्या पायांवर उभे राहात नाही, तोपर्यंत ती माझी जबाबदारी आहे. असं मी समजते. पण मी सांगीतलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला आवडतेच असं नाही. तुमची प्रतिक्रिया बघून मला ते समजत. कुठे तरी राग निघतो. चिडचिड होते. तुमचा व माझा वेळ जातो, मन खराब होत. ताणतणाव वाढतो. आपल्या संबंधांवर ही त्याचा परिणाम होतो. मनात अढी निर्माण होतात. अजून पर्यंत तरी तुम्ही मला दुरत्तरे देत नाही. ते सर्व कसं थांबवायचे?? किंवा कमी करायचे.??? हे बदलता येईल का?? यावर मी विचार केला व एक प्रयोग करायचे ठरविले.

फक्त तुम्हीच चूकता असं माझं म्हणणं नाही. माझ्या पण खूप गोष्टी तुम्हाला आवडत नसतील. मी हे शंभर टक्के मान्य करते.

आज मी तुम्हाला एक ‘Homework’ देते.

तुम्ही तिघांनी एका कागदावर तुम्हाला माझ्या कोणत्या गोष्टी आवडत नाहीत. त्यात माझे वागणे, बोलणे, स्वयंपाक, ड्रेसिंग सेन्स, तुम्हाला टोकणे, अशा अनेक इतर कोणत्याही गोष्टीचा समावेश असू शकतो. किंवा मी अजून काय करणे तुम्हाला अपेक्षित आहे?? हे अगदी बिनधास्त लिहा. एक कागद कमी पडला तर दूसरा घ्या. माझी काही हरकत नाही. मलाही माझ्या चूका सुधारायचा किंवा तुमच्या अपेक्षा पूर्ण करायची संधी द्या. खर तर हे काम मी दोन वर्ष आधीच करायला हवं होतं, जेंव्हा तुम्ही दोघेही टीनेजर झाला. म्हणजे परिणामाचा विचार करण्याएवढे मोठे तुम्ही झाला.

चला, काही हरकत नाही.

“देर आये दुरुस्त आये।. “

माझ्या एक लक्षात आलंय, माझे तुमच्या सर्वांवर जीवापाड प्रेम आहे. तुमचे नेहमी चांगलेच व्हावे ही माझी इच्छा व देवाजवळ प्रार्थनाही असते. पण सर्वच गोष्टी माझ्या हातात नाही. तुमचा आनंद, तुमचे पूढचे आयुष्य तुमच्या सवयींवर, तुमच्या निर्णयावर ही अवलंबून आहे. तुमच्या आयुष्याची जबाबदारी तुमची पण आहे.

तुम्हाला प्रोत्साहन देणे, मदत करणे सल्ला देणे हे माझे कर्तव्य आहे. तुमच्या चूका दाखविणे हेही माझे काम आहे. पण त्याकडे लक्ष द्यायचे की नाही?? हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे. मी हे काम करावे की नाही हे पण तुम्हालाच ठरवायचे आहे.

तुमच्या सवयी तुमचे निर्णय त्यामुळे होणारे परिणाम, निर्माण होणाऱ्या समस्या याकरिता तुम्ही जबाबदार असणार आहात. लक्षात ठेवा, विचार करा. तुमच नशीब घडविणारे किंवा उद्ध्वस्त करणारे तुमचे विचार व सवयी असतात.

” नशीब आकाशातून घडत नाही. किंवा जमिनीतून उगवत नाही. नशीब आपोआप निर्माण होत नाही. तर, केवळ माणूसच प्रत्यक्ष स्वतः चे नशीब स्वतः घडवत असतो. “नशीबात असेल तसे घडेल “या भ्रमात राहू नका. कारण आपण जे करू, त्याचप्रमाणे नशीब घडेल. हे लक्षात असू द्या. यावर विश्वास ठेवा.

आज आईने घेतलेला हा ‘ Stand ‘ आश्चर्यकारक होता. विचार करण्यासारखा होता. सगळे स्तब्ध होते.

म्हणजे एखाद्या कडक मास्तरांनी लाईनीत सरळ उभा रहा, म्हणून पाठीवर जोरात मारलेल्या धपाट्या सारखाच होता.

प्रत्येकाच्या हातात कागद तर होता पण कुठून सुरुवात करावी हे कळत नव्हतं. एक मात्र ल‌क्षात आलं, आमच्या आयुष्याची जबाबदारी आईने आमच्यावरच सोपवली आहे.

आई मात्र शांत होती. तिचा निर्णय झाला होता.

“नेहमीपेक्षा शांत दिसणाऱ्या या वादळाचा तडाखा मात्र जबरदस्त होता. “

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ये दोस्ती हम नही तोडेंगे….. ☆ राधिका माजगावकर पंडित ☆

राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

☆ ये दोस्ती हम नही तोडेंगे… ☆ राधिका माजगावकर पंडित

एस. पी. चा आमचा आवडता कट्टा आज बरेच दिवसांनी टोळभैरवांनी भरगच्च भरला होता. प्रत्येकाच्या हातात मस्त रंगीत फुलांचे बुके नाचत होते.

 हो! आज अभ्याचा वाढदिवस आहे ना! शिक्षणाच्या कोर्सच्या वाटा बदलल्या म्हणून काय झालं! ‘येदोस्ती हम नही तोडेंगे’ चा नारा आम्ही आधीपासूनच पक्का केला होता. भेटल्यावर पहिली सलामी शिव्यांचीच असायची, “साल्या कुठे कलमडला होतास? भुतासारखा कुठल्या पिंपळावर बसला होतास आज उगवलास? ” अशीच सुरुवात व्हायची पण प्रेमाने दिलेली शिवीही एकमेकांना वडापाव सारखी वाटायची. खरं प्रेम होतं आमच्या मित्रांमध्ये.

कुणाला मदत करताना आम्ही ‘साथी हाथ बढाना’ होतो तर माजलेल्या गुंडांचा माज उतरवण्यासाठी आम्ही रांगडे पैलवान व्हायचो. आपल्याच मस्तीच्या विचारात मी असताना पोरं खिंकाळली, “अरे अभ्या आला रे आला! उचला त्याला मिरवत आणूया आणि नाचणाऱ्या मित्रांच्या खांद्यावरून तोल सांवरत अभ्या अवतरला.

सगळ्यांची वर्णी लागली होती पण मन्याचा पत्ता नव्हता अभयनी विचारल्यावर कोणीतरी किंचाळल “अरे तो मजनू पार कामातून गेलाय त्याची लैला त्याला सोडून गेलीय नां म्हणून तो जन्तर मंतर झालाय. परवा तर आत्महत्येची भाषा करत होता. ” नऱ्याचं टाळकच् सटकलं, सोडून गेली? म्हणजेकांय? माझ्यासमोर प्रेमाचा, लग्नाचा पाढा वाचलाय त्यांनी. आणि आता ती पळून जाते म्हणजे काय? बघतोचं तिच्याकडे. ” 

त्याच्या डोक्यावर बर्फाचे लादी ठेवत मी म्हणालो, “समंधा शांत हो तिच्याकडे आपण नंतर बघू आधी त्या मजनुला ताळ्यावर आणू. “

अभ्या बोलला, “माझा बर्थडे उद्या होणार आज आपली धाड मनोजच्या घरावर पाडायची. आमचा मोर्चा मनोजच्या घराकडे वळला शिट्ट्या वाजल्या. मन्याला आम्ही घराबाहेर रस्त्यावर खेचला. गॅलरीतून त्याची आई कळवळली, “अरे सांभाळून न्यारे त्याला” तर बाबा ओरडले, “बरं झालं तुम्ही आलात ते, चार दिवस झाले सुतकी चेहरा करून, त्या पोरी पायी टाळकं फिरवून बसलय कार्ट, डोकं ठिकाणावर आणा त्याचं” 

काकांचं म्हणणं बरोबर होतं मन्याला धोपटून ब्रेन वॉश करणं आवश्यक होतं. दाढी काय, डोळे काय, देवदास झालेल्या मन्याला अगदी रामदास नाही पण वास्तवदास करायचा चंग आम्ही बांधला. “मी नाही येत रे” चा पाढा वाचणाऱ्या त्याला आम्ही उचलला आणि बाकावर आदळला. सम्या करवादला “अरे तिच्यापाई काय अवस्था करून घेतलीस स्वतःची. आणि रडतोस काय बायल्या हातभर बांगड्या भर लेका” आमच्याकडून मुक्ताफळांची उधळण चालली होती. आमच्यात अभ्या जरा शांत डोक्याचा आणि सीनियर आहे मन्याच्या भोवतांलचं आमचं कोंडाळ फोडून तो आत शिरला. त्या फडतुस मुलीसाठी वेड्या झालेल्या वेड्याला त्यांनी चुचकारत विचारलं, ” काय झालंय मन्या? कोण ही पोरगी? अरे! तिच्यासाठी तू जीव द्यायला निघाला होतास? चल त्या पोरीकडे सरळ करतो तिला. “

एकानी शंख केला, “अरे अभ्या सरळ करायला ती इथे आहे कुठे, पैसेवाल्याचा हात धरून केव्हाच पळालीय ती. ” 

मन्याला पुन्हा दुःखाचा उमाळा आला. त्याच्या नरड्यात आम्ही अख्खी बिसलरी ओतली तेव्हा त्याचे उसासे थांबले. तो म्हणाला, “अरे चांगली होती, सुंदर होती रे ती मला आवडली होती. ह्या बजरंगापुढे आम्ही आणाभाका घेतल्या, सात जन्म एकत्र राहण्याचा वचन दिलं होतं तिनं मला. दोन्हीकडचे आई-बाबा एकदम खुश होते सगळीकडून हिरवा सिग्नल मिळाला. लग्नाची तारीख पक्की झाली पत्रिका कशा छापायच्या, तुझी आवड सांग म्हणून मी तिच्या घरी विचारायला गेलो तर आई-वडिलांनी हात झटकले. तुमच्या घरात तिची हौस नसती पुरवली गेली म्हणून तिने पैसेवाल्याशी लग्न केलं” असं म्हणून त्यांनी मला अक्षरशः हकललं रे!

मध्या दात ओठ खात मन्याला मारायला धावला, “मुर्खा त्यांनी सांगितलं आणि तू ऐकलंस? हा सगळा त्यांचा आधीपासूनचा प्लॅन असेल. लबाड साले”एवढं महाभारत घडूनही आमचा हा हिरो रिंगणाबाहेर यायला तयारच नव्हता. “अरे पण ती चांगली होती रे माझं प्रेम होतं तिच्यावर” मन्याचं गाणं चालूच होतं. अजूनही हे पात्र तिच्या प्रेमातून बाहेर यायला तयारच नव्हतं. त्याच्यापुढे डोकं आपटायचंच बाकी राहयलं होत. त्याला धोधो धुवावासा वाटत होतं. आता मात्र मध्या भडकून म्हणाला “चुलीत घाल तिचं प्रेम, अरे मुर्खा फसवलय तिने तुला. तुझं घर, पैसा, इन्कम, बचत बघायला तुझ्या घरात आणि गोड बोलून तुझ्या आई बाबांच्या मनात शिरली ती बया. तुझा मासा गळाला लागला होता. पण पैसा हातात येत नव्हता मग काय सोडलं तुला आणि गाठला तिने मोठा लक्षाधीश मासा 

आणि हे येडं अजूनही अडकलय तिच्यात. अरे सोड! छपन्न मुली आणून उभ्या करतो तुझ्या पुढे” आम्ही हिरवा सिग्नल दाखवला. तरी पण आमचं हे बाळं तुणतुण वाजवतच राह्यलं, ” 56 राहू दे रें एक तरी मुलगी लग्न करायला तयार आहे का माझ्याशी? वय वाढतय माझं. आई बाबा थकलेत. मी नाही गुडघ्याला बाशिंग बांधलं पण आई माझ्या डोक्यावर अक्षता टाकायला उतावळी झालीय. आता कोण देईल मला मुलगी? आमचं हे बेनं दळण दळतच होतं. आम्ही वास्तवात आलो या रड्याच्या बोलण्यात तथ्य होतं त्याचं म्हणणं बरोबर होतं. आमची लग्नाची वय मागे पडताहेत. गुडघ्याला बाशिंग बांधलय खरं पण नवरीचा पत्ता नाहीये. केविलवाणी परिस्थिती झालीय आमची. तरी पण मन्याला स्वप्नातून कसंबसं आम्ही खाली आणलं.

आता पुढे काय? हा गुंता सुट्ता सुटत नव्हता. निराश झालेला आमचा दोस्त आणि उदास झालेल्या त्याच्या आई बाबांचा चेहरा डोळ्यासमोरून हालत नव्हता आता काय करायच? हा राक्षसी प्रश्न ‘आ’वासून गिळायला बघत होता.

त्याच तिरीमिरीत चंद्याकडे गेलो दार त्याच्या बहिणीने उघडलं. आणि डोळ्यासमोर लख्ख वीज चमकली, मेंदू हलला, झटका बसला आणि झटक्यात विचारआला ‘अरे ही पोरगी तर लग्नाची आहे की. मन्यासाठी हिला विचारलं तर.. चंद्या नुकताच चतुर्भुज झाला होता आणि गेला होता त्याच्या चंद्राला घेऊन मधुचंद्राला. मग काय थेट त्याच्या आबांना गाठलं खडा टाकून बघितला, मनोजची वकिली करून त्याच्याबद्दल त्यांना पटवलं. बाबातर एकदम खुश झाले चंद्याची आई देवापुढे साखर ठेवायला धावली. पडद्याआडून डोकावणाऱ्या मनालीकडे मी बघितलं. मनोजला ती ओळखत होतीच. खुणेने मी तिला विचारलं तर पोरगी झक्कास लाजली. चला अर्धा गड तर सर झाला.

आता मन्याला घोड्यावर बसवायचं. एस. पी. चा कट्टा गाठला. मोबाईल खणखणले मित्रांचा अड्डा जमला. मन्याला मधे घेतला, चारी बाजूंनी हल्ला करून ‘अरे मारो गोली उस छोकरीको असं म्हणून त्या पळालेल्या पोरीचं त्याच्या मानगुटीवर बसलेलं भूत उतरवलं. अखेर त्याचा भेजा ठिकाणावर आला आणि या बैलाने मुंडी हलवली,

लगेच आमचं दोस्त मंडळ तयारीला लागलं. हो! हे खुळं परत बिथरलं तर काय करा! कारण मन्या त्या पोरीपायी पार कामातून गेला होता. येरवड्याला न्यायचंच बाकी होतं अनेक रात्री त्याने जागवल्या. दिवसा तो मनांत रडायचा. त्याचा उदास आणि केविलवाणा चेहरा बघून त्याच्या आई-बाबांचा जीव धास्तावला होता.

त्याला ह्या निराशेच्या डोहातून बाहेर काढणं आवश्यक होतं. अशावेळी फक्त त्याच्यावर फोकस करून आमच्या दोस्त मंडळींनी त्याला माणसात आणण्याचा विडा उचलला चंद्या ला निरोप गेला तो हनिमून सोडून धावत पळत आला.

चक्र वेगाने फिरत होती. मनाली तर खुश होतीच, पण आमचं हे ध्यान मन्याही आता लग्नाला उतावळा झाला होता. अंतरपाट वर धरला तरी टाचा उंच करून तो मनालीला न्याहाळत होता. ते बघून आमचं मित्रमंडळ पुढे सरसावलं, नवरदेवाला उंचावर नेण्यासाठी दहीहंडी केली आणि म्हणालो “कशी घालतोस माळ बघु लेका, आता माळ घालूनच दाखव ” 

पण ह्या l बहाद्दराने दहीहंडी फोडून उडी मारली आणि तो धपक्कन मनालीच्या पुढेच पडला. आम्ही तिथे पोहोचायच्या आतच चलाखीने नवरीच्या गळ्यात त्याने माळ घातली, मनालीने पण तितक्याच चपळाईने त्याच्या गळ्यात हार घातला. आणि काय म्हणाली माहित आहे कां “.. हमभी कुछ कम नही..

अक्षतांचा मारा झाला हास्याची लाट उसळली, फुलांची उधळण झाली आणि.. आणि.. शुभमंगल एकदाचं पार पडलं. आम्ही रोखलेले श्वास सोडले.

आज डोकं ठिकाणावर आलेलं आमचं हे यडखुळं हनिमूनला निघालय. त्याला पोहोचवायला वीस गाड्या बाहेर पडल्यात. विमानतळावर त्याला सोडताना आम्ही आरोळ्या ठोकल्या.

“बाय मनोज… बाय मनाली… हॅप्पी जर्नी”

© राधिका माजगावकर पंडित

सन सॅटॅलाइट पुणे – 51  

मो. 8451027554

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अंधाराची सावली… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

डॉ. शैलजा करोडे

🌸 जीवनरंग 🌸

☆ अंधाराची सावली… ☆ डॉ. शैलजा करोडे

“निलिमा मॅडम, 28 फेब्रुवारी विज्ञानदिन. यानिमित्ताने आपल्या शाळेत विज्ञान कथास्पर्धेचे आयोजन करुया, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला वाव मिळेल व त्यांच्या मनात विज्ञानाविषयी गोडीही निर्माण होईल. कथेचा विषय व इतर नियमावली तुम्ही तयार करुन नोटीस बोर्डवर लावायला द्या. कथांचं परीक्षण करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून काही बक्षीसंही देऊयात “. ” होय मॅडम, मी करते सगळं आयोजन. स्पर्धा यशस्वी होईल मॅडम ” “दॅट्स गुड. किप इट अप. शुभस्य शीघ्रम मॅडम. कारण वेळ फार कमी आहे. आज 21फेब्रुवारी, आपल्या हातात फक्त चार/पाच दिवस आहेत.

मी स्टाफ रूममध्ये आले. पुढचा पिरेड मला आँफ होता. चला विज्ञान कथेचा विषय ठरवायला वेळ मिळाला. काय बरं विषय ठरवावा. होय सुचला कि विषय ” कृष्णविवरातील अंधाराचा भेद “होय हाच विषय ठेवूया. मुलांच्या कल्पनाशक्तीला चांगलाच वाव मिळेल. छान छान काल्पनिक विज्ञान कथा तयार होतील. येस, वाॅव, माझ्या चेहर्‍यावर स्मित झळकलं. काय निलिमा मॅडम खुश आहात “, माझी सहकारी अपर्णा पोतनीस स्टाफ रूममध्ये प्रवेश करीत बोलत होती. “काही नाही गं, असंच ‘. ‘असंच कसं, काहीतरी तर कारण असेल ना ‘ ” काही विशेष नाही ग अपर्णा ‘ ‘ नसेल सांगायचं तर नको सांगूस निलिमा. पण आनंद वाटून घेतल्याने द्विगुणित होतो म्हणतात ” मी माझी कल्पना अपर्णा बरोबर शेअर केली. ‘ अरे वाह, किती छान विषय आहे ग. मुलांनाही आवडेल आणि स्पर्धेला भरघोस प्रतिसाद मिळेल बघ. खूप खूप शुभेच्छा. ‘ धन्यवाद अपर्णा ‘ तास संपल्याची घंटा वाजली आणि आमचा संवाद थांबला. मी खडू, डस्टर घेऊन वर्गात जाण्यासाठी निघाले.

स्पर्धेला खरंच भरघोस प्रतिसाद मिळाला. जवळ जवळ चाळीस मुलांनी कथा लिहिल्या होत्या.

कृष्णविवर, महा भयंकर अंधार, प्रकाशालाही गिळंकृत करणारा, अभेद्य, पण या अंधाराचाही शोध वैज्ञानिकांनी घेण्याचा प्रयत्न केलाय. मी कथांचं परीक्षण करीत होते.

इव्हेंट होरायझन टेलिस्कोप (EHT): जगभरातील रेडिओ टेलिस्कोप एकत्र करून तयार केलेल्या या आभासी टेलिस्कोपमुळे मानवाला इतिहासात पहिल्यांदाच २०१९ मध्ये ‘M87*’ आणि २०२२ मध्ये आपल्या आकाशगंगेतील ‘Sgr A*’ या कृष्णविवराची थेट छायाचित्रे घेणे शक्य झाले.

हॉकिंग रेडिएशन सिद्धांत: महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी सिद्ध केले की कृष्णविवरे पूर्णपणे काळी नसतात;

त्यातून पुंज भौतिकशास्त्राच्या (Quantum Mechanics) नियमांनुसार सूक्ष्म किरणोत्सर्ग बाहेर पडतो, ज्यामुळे ती हळूहळू नाहीशी होऊ शकतात.

गुरुत्वीय लहरी (Gravitational Waves): २०१५ मध्ये ‘LIGO’ वेधशाळेने दोन कृष्णविवरांच्या टक्करीतून निर्माण झालेल्या गुरुत्वीय लहरींचा शोध लावला, ज्यामुळे कृष्णविवरांचा अभ्यास करण्यासाठी विज्ञानाला ‘नवे डोळे’ मिळाले.

अॅक्रेशन डिस्कचा प्रकाश: कृष्णविवराच्या भोवती फिरणारा वायू आणि धूळ तीव्र वेगाने फिरताना प्रचंड घर्षणामुळे चमकू लागतात, या प्रकाशाच्या मदतीने कृष्णविवराच्या सीमांची (Event Horizon) अचूक रचना समजते.

कृष्णविवराचे मुख्य भाग

सिंग्युलॅरिटी (Singularity): कृष्णविवराचा केंद्रबिंदू जेथे संपूर्ण वस्तुमान एका अनंत सूक्ष्म बिंदूत एकवटलेले असते तेथे भौतिकशास्त्राचे नियम कोलमडतात.

इव्हेंट होरायझन (Event Horizon): कृष्णविवराची ती अंतिम सीमा ज्याच्या आत गेलेली कोणतीही वस्तू किंवा प्रकाश कधीही परत येऊ शकत नाही.

विज्ञानाने अत्यंत प्रगत टेलिस्कोप, गणिताची सूत्रे आणि भौतिकशास्त्राच्या सिद्धांतांच्या जोरावर कृष्णविवराच्या अंधाराचा भेद करून त्याची छायाचित्रे आणि अस्तित्व जगासमोर आणले आहे.

बाप रे बाप, मुलांनी काय अभ्यास केलाय. किती सविस्तर आणि सखोलात जाऊन लिहिण्याचा प्रयत्न केलाय. खरंच मानलं पाहिजे आजच्या पिढीला. माहिती तंत्रज्ञान, सगळी इलेक्ट्रानिक माध्यमं आणि AI ची होणारी मदत, जणू ज्ञानगंगा दारी आलीय आजच्या युगात.

आजच्या या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात कृष्णविवराचा शोध घेऊन त्या अंधाराला भेदण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

असाच, असाच अंधार वारंवार जीवनातही येतो, माझ्याही जीवनात अनेकदा आला. म्हणतात ना जेव्हा अंधार येतो ना तेव्हा आपली सावलीही सोबत सोडते म्हणतात. पण, पण, सावली आपल्या सोबतच असते. कारण आपण तिथे असतो, फरक एवढाच कि आपल्याला ती दिसत नाही. जेव्हा संकटे येतात, वादळे येतात, परीक्षेचे क्षण येतात तेव्हा या अंधाराला भेदते आपली सावली, होय सावलीच, मग ती आपला आत्मविश्वास जागवते, मनाला खंबीरता देते, संकटांशी झुंजण्याची शक्ती देते तर चोहीकडे पसरलेल्या अंधारातही प्रकाशकिरण शोधण्याची हिंमत देते.

सात आठ वर्षाची असेन मी, घरात आई कॅन्सरशी झुंज देत होती, दोन लहान भावंडे, सगळी जवाबदारी माझ्यावर, जमेल तसा कच्चा पक्का स्वयंपाक मी करायची, आईची सेवा करुन शाळेत जात होती. आणि तो काळा दिवसही आला, आईने जगाचा निरोप घेतला.

आम्हां भावंडासाठी बाबांनी पुन्हा संसाराची घडी बसविली. सावत्र आई, तिला कसलं प्रेम माया, सातत्याने मला कामाला जुंपायची, जेमतेम 13 वर्षाची असेल मी. बाबांना माझे हात पिवळे करायला लावले. माझे शिक्षण सातव्या इयत्तेतच थांबले.

लहान लहान भावंडे सोडून मी सासरी आले. माझं लक्ष भावंडांकडे लागायचं.

“लग्न झालंय तुझं आता, विसर सगळं माहेर आणि लाग संसाराला ” सासूबाईंची टोचणी. नणंदेचा तोरा होताच. पतीराजही बायकोला नेहमी धाकात ठेवले पाहिजे या विचारसरणीचे. घरात कोणाला उलटून बोलण्याची हिंमत नाही. काही चुकल्यास, मनाविरूद्ध घडल्यास मारहाणही व्हायची मला. जीवनाची गाडी अशी चालू असतांनाच मातृत्वाचं ओझंही माझ्यावर लादलं गेलं केवळ सतराव्या वर्षीच. गोंडस, गोड गोजिरं बाळ कुशीत आलं आणि या प्रकाशाने माझ्या जीवनातील अंधाराचा भेद केला. बाळाला कुशीत घेतांना ब्रम्हांड सुखाचा अनुभव मी घेत होते.

आणि एक दिवस कोसळणार्‍या पाऊसधारा, दाटलेला अंधार, विजेच्या कडकडाटासह, घोंघावणारा वारा, जणू प्रलयाची नांदी देणारा, पतीराज अजून घरी आले नव्हते. माझी अस्वस्थता वाढलेली. दरवाज्यातून, खिडकीतून यांची वाट पाहात होते. हळूहळू पाऊस थांबला पण माझ्यासाठी धरणी दुभंगणारी बातमी घेऊन आला. वादळी पावसात घरी येतांना रस्त्याच्या कडेला असलेला वृक्ष उन्मळून पडला होता, तो नेमका माझे पती अशोकच्या अंगावरच, सोबत वीजेच्या तारा. तत्क्षणीच त्यांचा मृत्यू झालेला.

कुशीत सहा महिन्याचा माझा गौरव व मी पुन्हा अंधाराने वेढले गेलो. सगळ्या नातेवाईकांनी पाठ फिरवली. पण बाळासाठी मला पुन्हा मला उभं राहाणं भाग होतं. शिवणकला मी शिकलेली होती. शहरातीलच सुधर्मा फाऊंडेशन विद्यार्थ्यांना गणवेष, पुस्तकं, जलमंदिर अर्थात पिण्याच्या पाण्याची सोय, तसेच अपंगाना सायकल व निराधार भगिनींना शिवणयंत्राचे वाटप करायचे. माझा आर्थिक प्रश्न काही प्रमाणात सुटला असला तरी तो पुरेसा नव्हता. मला पुढील शिक्षण घेणं भाग होतं. मी बहिःस्थ विद्यार्थी म्हणून दहावीची परीक्षा दिली, उत्तीर्ण झाले. डी. एड. साठी अर्ज केला, प्रवेशही मिळाला. प्रश्न होता गौरवला सांभाळण्याचा. यावेळी मात्र बाबांनी सगळा विरोध पत्करून गौरवला सांभाळण्याची जवाबदारी घेऊन माझा मार्ग सुकर केला.

यथावकाश माझे शिक्षण पूर्ण होऊन मला शाळेत नोकरीही मिळाली. आर्थिक स्वावलंबनाने माझ्या जीवनातील अंधार कमी झाला होता. आता मी पदवी परिक्षेचाही अभ्यास सुरू केला होता. यशाची दालनं हळूहळू उघडत गेली आणि मी आज ज्युनियर काॅलेजमध्ये प्राध्यापिका होते.

माझा गौरवही एमबीबीएस च्या शेवटच्या वर्षाला होता. अंधाराचा भेद झाला होता.

अंधारातील माझ्या आत्मविश्वासरूपी सावलीनेच मला प्रकाशाचा मार्ग दाखविला होता.

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तीन अनुवादित लघुकथा – मी नक्की येईन / आत्मविश्वास / खेळणे “ हिन्दी लेखक : श्री महेश राजा ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? जीवनरंग ?

☆ तीन अनुवादित लघुकथा – मी नक्की येईन / आत्मविश्वास / खेळणे “ हिन्दी लेखक : श्री महेश राजा ☆ भावानुवाद – उज्ज्वला केळकर

१) मी नक्की येईन माझ्या बाळांनो!

मुलांच्या परीक्षेचा आज शेवटचा दिवस होता. मुले खूश होती. उद्यापासून दिवाळीची सुट्टी लागणार होती. दु:खी होती ती शाळेतली आया. ती एका कोपर्‍यात बसून मुलांना खेळताना बघत होती. उद्यापासून शाळा उजाड वाटणार होती.

तिचे कोणी नातेवाईक, संबंधित नव्हते, असा काही नव्हतं. तिला दोन मुले होती. ती वेगवेगळ्या शहरात आपापल्या पत्नी-मुलांबरोबर रहात होती. जेव्हा, त्यांना पैशाची काही अडचण यायची, तेव्हा, त्यांना आईची आठवण यायची. नाही तर कधी सणावारीदेखील आईला कधी बोलावले नव्हते. पतीचा मृत्यूनंतर, तिने मेहनत-मजुरी करून मुलांना शिकवले. छोटी-मोठी नोकरी शोधून, त्यांची समान परिवारातील मुलींशी लग्ने करून दिली. सगळ्यांना ती खुश बघू इच्छित होती. तिची कुणाहीबद्दल कसलीच तक्रार नव्हती. तिला माहीत होतं, आज-कालचे दिवस असे आहेत. सुना सासूच्याजवळ राहू इच्छित नाहीत. घरोघरी हीच परिस्थिती आहे. आपल्या नशिबाचा दोष मानून, ती शहरातील एका प्रतिष्ठित शाळेत आयाची नोकरी करत होती. शाळेतील मुलांवर ती खूप प्रेम करत असे. त्या मुलामध्ये, ती आपलं मन रमवत असे. कधी तिला आपल्या नातवंडांची आठवण येत असे. आपण त्यांना आपल्या मांडीवर बसवून कधी नीट भरवू शकलो नाही या विचाराने, ती दु:खी होत असे. या शाळेतल्या मुलांनाच ती आपली मुले मानून खूश रहात असे.

एवढ्यात, एका मुलाच्या रडण्याच्या आवाजाने तिची तंद्री भंग पावली. तिने त्या मुलाला मांडीवर बसवले आणि त्याला गप्प करण्याचा ती प्रयत्न करू लागली. सगळ्या मुलांना ती खूप आवडत असे. ती सगळ्यांमध्ये मिळून-मिसळून गेली होती. तिला आता रडू येऊ लागले होते. दिवसभर मुलांची देखभाल, त्यांचे खाणे -पिणे, साफ-सफाई यात तिचं मन रमायचं. आता उद्यापासून काय करणार? हा विचार तिला सतावत होता. मॅडमने हाक मारली. सुट्टीची वेळ झाली. मुलांकडे भरलेल्या नजरेने बघत ती बेल वाजवायला निघून गेली. तिच्या डोळ्यातून अविरत अश्रूधारा वहात होत्या. मॅडमने तिच्या मनातील भाव समजून, तिच्या ख्ंद्यावर हात ठेवून तिला सांत्वना दिली. गेट उघडून ती लक्ष ठेवत होती. कुणाची रिक्षा अजून आली नाही. इतक्यात बघता बघता मुलांनी तिला घेरलं. त्यांच्या हातात एक पॅकेट होतं. सगळी मुले एका स्वरात ओरडली, ; बाई, यावेळी दिवाळीसाठी तू आमच्याच घरी ये. आम्ही आमच्या मम्मी –पापांना विचारलय! तिने सगळ्या मुलांना आपल्या ममतामयी बाहुंनी विळखा घातला. भरल्या आवाजात ती म्हणाली, येईन बाळांनो. जरूर येईन! तिचा गळा दाटून आला. मुले जिद्द करू लागली. नाही. आत्ताच चल आमच्या बरोबर! तिने मुलांना समजवलं, शाळेची साफ-सफाई, राखण करणं, याची जबाबदारी तिच्यावर आहे. वेळ काढून एकेकाकडे, अशी ती सगळ्यांकडे जाईल.

मुलांनी तिच्याकडून प्रॉमीस घेतले. सगळ्यात छोट्या असलेल्या सिद्धीने तिच्या हातात पॅकेट दिले. ती म्हणाली, हे काय आहे बाळांनो?

यावेळी सहावीच्या वर्गातला विकी म्हणाला, ही साडी आहे. आम्ही सगळ्यांनी आमच्या पॉकेट मनीतून पैसे वाचवून ही साडी तुझ्यासाठी घेतली.

नको. मी कशी ही घेऊ?

नाही म्हणू नको हं! आम्हाला वाईट वाटेल!

मॅडम म्हणाल्या, बाई, घे! मुलांनी इतक्या प्रेमाने आणलीय!

तिने सगळ्या मुलांच्या गालाचा एकेक पापा घेतला.

बाई, तू घरी आली नाहीस, तर मी फटाके नाही उडवणार! विशू म्हणाली.

बाई, मी फराळाच करणार नाही.. मदन म्हणाला.

नाही. नाही. बाळांनो, मी नक्की येईन. आत्यंतिक खुशीने ओघळणारे अश्रू, तिने तसेच ओघळू दिले.

सगळी मुले निघून गेली.

गेटपाशी उभी असलेल्या तिला, दूर उडणार्‍या धुळीकडे ती बघत राहिली.

…. जीवनात आज तिला प्रथमच वाटले, ती एकटी नाही आहे.

मूळ कथा – मैं जरूर आऊंगी मेरे बच्चोँ!, मूळ लेखक – महेश राजा

मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454,

२) आत्मविश्वास – – 

जानकीदेवींनी एकदा आपल्या सार्‍या घराचे निरीक्षण केलं. सगळं काही ठाक-ठीक आहे न? तिची सहयोगी आशा पूर्ण निष्ठेने घर सजवण्याच्या कामात गुंतलेली होती. तिचा मुलगा राजेश आपल्या पत्नीला घेऊन आपल्या कामाच्या ठिकाणी गेला होता. मुलगी रीना आपल्या सासरी सुखात आहे. जानकीदेवींनी अन्य नोकरांना आवश्यक त्या सूचना दिल्या. आता ती देवघरात आली. आपल्या इष्ट देवतांना नमस्कार करून, आपल्या पतीच्या फोटोपूढे उभी राहिली. तस्बिरीतून एक तेजस्वी किरण फुटतोय, असा तिला वाटलं.

पदर डोक्यावर ठेवत ती हळुवारपणे म्हणाली, ‘आहो, बघा ना, मी माझी सारी कर्तव्ये पार पाडलीत. मुलीचा विवाह एका कुलीन परिवारात केला. मुलगा आणि सून डॉक्टर आहेत. तुम्ही दोघांना माझ्या झोळीत टाकून, लवकर निघून गेलात आणि सगळी जबाबदारी माझ्यावर टाकलीत. तुमचा माझ्यावर विश्वास होता. तो मी कायम ठेवला. सगळं चांगल्या तर्‍हेने निभावलं. ’

थोडं थांबून डोळ्यात उतरलेलं पाणी पदराने पुसलं. मग म्हणाली, ‘आता मला परवानगी द्या. आता मी माझं पुढचं जीवन समाजसेवेत आणि गरीब मुलांना शिकवण्यात व्यतीत करू इच्छिते. मला आशा आहे, तुमचा विरोध असणार नाही. आजपासूनच मी आपलं हे निवासस्थान, हर्षध्वनी आश्रमाच्या रूपात बदलते आहे.

तुम्हाला प्रणाम करून, तुमचा आशीर्वाद घेऊनच, हे शुभ काम मी करू इच्छिते. मला परवानगी द्या! ’

– – ती हात जोडून मूक उभी राहिली. तिला वाटलं, पतीची तसबीर हसते आहे.

मूळ हिंदी कथा – स्वयं पर विश्वास, मूळ लेखक – महेश राजा

मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454

३) खेळणे – – 

दोन दिवसांनंतर आज वातावरण स्वच्छ होतं. मध्यंतरी खूप पाऊस पडत होता. आज ऊन पडण्याची लक्षणे दिसू लागले होती. अंश आज आपल्या आजोबांबरोबर किलकारी गार्डनमध्ये आला होता. शहराच्या मधोमध असलेला हा बगीचा मुलांच्या दृष्टीने फिरण्यासाठी अतिशय आकर्षक जागा होती. बागेत झोपाळे, घसरगुंड्या आणि व्यायाम करण्याची अनेक उपकरणे लावलेली होती. बसण्यासाठी चांगली व्यवस्था केलेली होती. किलकारीच्या एका बाजूला फळे, ज्यूस इ. च्या हातगाड्या लागल्या होत्या. दुसर्‍या

बाजूला एक हलकी चटई हांतरून एक बाई, आपल्या लहान मुलाला घेऊन मुलांसाठी मातीची अनेक आकर्षक खेळणी घेऊन, गिर्‍हाईकांची वाट बघत बसली होती. तिचा छोटा मुलगा पुन्हा पुन्हा त्या खेळण्यासाठी हट्ट करत होता. तो सारखा एखादं खेळणं उचलून घेत होता. त्याची आई, त्याच्या हातातून ते काढून घेत होती.. खेळणं घेण्याची मनाई करत होती.

अंश वारंवार हे दृश्य बघत होता. तो आपल्या आजोबांना म्हणाला, ‘ आजोबा, त्या मुलाची मम्मी त्याला खेळणं का घेऊ देत नाही? ’

आजोबा त्याला समजावत म्हणाले, ‘ती गरीब आहे. त्यांच्या घरी खाण्यासाठी काही नाही. जेव्हा तिची खेळणी विकली जातील, तेव्हा त्यांच्या घराची चूल पेटेल. 

अंशने पुहा विचारले, ‘आजोबा, त्यांच्याकडे खायला का नाही? आपल्या घरी तर आहे. आपण घरून रोटी आणून या महिलेला आणून देऊ या. ’

आपल्या नातवाचे हे निरागस बोलणे, ऐकल्यावर आजोबा हसू लागले. लाडाने त्यांनी याला मिठीत घेतलं. ‘चल! त्या महिलेकडून खेळणं घेऊ या. ’

अंश खूश झाला. तो त्या जागी गेला व दोन चांगली खेळणी त्याने उचलली आणि आजोबांकडे पाहिलं. आजोबांनी होकार भरला.

अंशने एक खेळणं त्या छोट्या मुलाला दिलं. ती महिला ‘नको… नको.. ’ म्हणत होती.

आजोबांनी दोन्ही खेळण्यांचे पैसे तिला दिले. तेव्हा ती आश्वस्त झाली. तो मुलगा खेळणं मिळाल्याने खुश झाला. तो खेळण्याशी खेळू लागला.

अंशने आपल्या बॅगेतून काही फळे काढली आणि त्या मुलाला दिली. मुलाची आई त्यांच्यापुढे हात जोडत राहिली.

आता आजोबा-नातवाची जोडी हातात हात घालून आपल्या घराकडे खुशी-खुशीने परत चालले होते.

– – आकाश निरभ्र होतं. त्यातून सूर्यदेवता हसत होती.

मूळ हिन्दी कथा – खिलौना, मूळ लेखक – महेश राजा

मराठी अनुवाद – उज्ज्वला केळकर मो- 8369252454,

मराठी भावानुवाद : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संस्थापक संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ”वक्त वक्त की बात है! ..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? जीवनरंग ?

☆ “वक्त वक्त की बात है!” ☆ संध्या बेडेकर ☆

“व्यक्तिमत्त्व एवढे सरळ व तिखट ठेवा की चांगल्या माणसांना त्याची चव व वाईट लोकांना त्याचा ठसका लागलाच पाहिजे “.

आज दादा वहिनीला श्री. श्रीधर कुलकर्णी यांचेकडे लग्नाचे आमंत्रण आहे. कुलकर्णी काका म्हणजे आमचे चुलत घराणे. खूप श्रीमंत. पैशाचा धबधबा पडतो की काय त्यांच्या घरी?? असं वाटतं. त्यातच मुलांचीही बिझनेसमधे मदत झाली.   म्हणतात ना,   “पैसा पैशाला ओढतो. ”  

ते काकांकडे बघून पटत.   

म्हंटल तर मुलं खूप शिकलेली नाही. पण पिढी दर पिढी चालत आलेला बिझनेस मात्र उत्तम सांभाळतात. सोन्याचा चमचा तोंडांत घेऊन जन्माला आलेली ही मुलं, आपल्या बिझनेस मधे चोख आहेत. सरस्वती खूप प्रसन्न नसली तरी लक्ष्मीने मात्र आपला वरदहस्त त्यांच्यावर छान ठेवलेला आहे.   

श्रीमंतीची सर्व लक्षणे दिसतात. मोठा बंगला, दारासमोर चार गाड्या, घरात नोकर माणसे, म्हणजे घरच्या बायकांना साधारण बायकांसारखे काम करायची गरज पडत नाही. उठणे बसणे पण अशाच लोकांबरोबर.    

पैशाचा माज चढला आहे, असं म्हणता येणार नाही. कदाचित ते सहज बोलत असावेत, वागत असावेत. पण ते आपल्या सारख्या सामान्य माणसांना कुठे तरी खटकत. , मनाला लागत. असे आमच्या दादाचे नेहमी म्हणणे असते. वहिनीला काही ते पटत नाही व आवडत तर त्याहुनही नाही.   

मागे दादाच्या मुलाच्या लग्नाचे आमंत्रण द्यायला दादा वहिनी त्यांच्या घरी गेले असताना, त्यांना मिळालेली वागणूक वहिनी अजूनही विसरलेली नाही. प्रत्त्येक भेटीची वहीनीची काही तरी खास आठवण आहेच. नातं असलं तरी सांपत्तिक परिस्थिती मधे तफावत आहे. तरीही काही महत्वाच्या कार्यक्रमात दादा वहिनी जातातच. आपलं नातं टिकवण्यासाठी, कसलाही विचार न करता हजेरी लावतात.   

तेंव्हा अनघा लहान होती, ती पण आई बाबांबरोबर जायची. काही प्रसंग तिच्या बालमनावर चांगले कोरले गेले होते. घरी अलमारी भरून क्रोकरी असताना, आम्हा तिघांना वेगवेगळ्या आकाराच्या स्टील प्लेट, वाटी मधे चिवडा दिल्याचा प्रसंग तिला आठवतो. दुर्लक्ष केलेले ही आठवते. त्यानंतरची आईची कुरकुर, वाईट वाटणे, कधी कधी आईचे रडणे, तिच्या चांगले लक्षात होते. एकदा पूजेला गेले असताना, पूजेचे महत्व कमी व श्रीमंत लोकांचा कौतुक समारंभच जास्त वाटत होता. वहीनी खूप खुशीने तेथे कधीच गेली नाही.   

दादा ची परिस्थिती सामान्य होती. येथे लक्ष्मी नाही, पण सरस्वती मात्र खूप प्रसन्न होती. दादाची मुल शिक्षणात हुशार होती, म्हणून त्यांच्या शिक्षणाकरिता दादा वहिनीने कधी काही कमी पडू दिले नाही.  

अनघा ने ग्रॅज्युएशन नंतर स्टेट लेवल, नॅशनल लेवल च्या परीक्षा दिल्या. ‘ UPSC ‘ पास केली. आज ती पोलीस खात्यात उच्च अधिकारी आहे.   

आज कुलकर्णी काकांकडे लग्नाला जायचे आहे. अनघा म्हणाली मी पण येईन. ती अशा एका दिवसाची वाट बघतच होती.   

अचानक तिच्या समोर फ्लॅश बॅक सुरू झाला. आईच्या डोळ्यातील अश्रु आठवले.

“आपण नेहमी चांगले वागायचे”. असा बाबांचा नियम आहे. त्यामुळे नाइलाजाने आई, बाबांबरोबर जात असे.  

अनघा रंगाने सावळी व जेमतेम उंची, म्हणून तिच्या वर तेथे कटाक्ष व्हायचे. कसं होईल हिचे??? ही काळजी तिच्या आई बाबांपेक्षा त्यांनाच जास्त होती. त्यांच्या घरी आई बाबांकडे दुर्लक्ष करतात. ही गोष्ट तिच्या मनात घर करून बसली होती. काही दुःख सारख आपलं डोकं वर काढतात. व तुम्हाला त्याची सतत आठवण करून देत राहतात. व प्रत्त्येक आठवणीबरोबर ती सल वाढतच जाते.   

आई बाबा लग्नाला जायला निघाले. अनघा आॅफिस मधून सरळ हॉलवर येणार होती.  

तसं अनघाला सहज सुट्टी घेता आली असती, व छान तयार होऊन लग्नाला जाता आले असते. पण तिला काळया सावळ्या अनघाचा ‘रूबाब ‘ दाखवायचा होता. खरं तर हे असे वागणे तिच्या स्वभावात बसत नव्हते. पण जून्या प्रसंगाची आठवण व आई बाबांना मिळालेली वागणूकही ती विसरली नव्हती. आज आई बाबांना खासकरून आईला तिची प्रतिष्ठा मिळवून द्यायची होती. त्यांच्या अपमानाचा बदला घ्यायचा होता.   

पोलिस अधिकारी च्या युनिफॉर्म मधे अनघा हॉलवर पोचली. मस्त कडक युनिफॉर्म त्यावर ACP rank चे लागलेले स्टार्स, डोक्यावर लावलेली cap, हातात स्टीक, चकचकीत बूट, कमरेवर बेल्ट. डोळयांवर काळा चष्मा. तिला आॅफिसकडून मिळालेल्या गाडीतून अनघा आली. लगेच ड्रायव्हर ने कारचा दरवाजा उघडला. अदबीने बाजूला उभे राहून, एक कडक सॅलूट मारला.   

” व्वा!!! काय शान होती अनघाची. “

तेथील सर्व लोक बघतच राहिले. लहान मुले तर जवळ येऊन बघू लागली. अनघाचा मोबाईल कारमधेच राहिला होता, तेंव्हा ड्रायव्हर ने तो तिला आणून दिला व पुन्हा एकदा तसाच कडक सॅलूट मारला.  

हाॅलमधील सुंदर महागड्या पैठणी निसून, दागिन्यांनी लदलेल्या, ब्युटी पार्लर मधून सरळ हॉलवर आलेल्या so called smart, श्रीमंत बायका बघतच राहिल्या. आता आकर्षणाचा केंद्रबिंदू पोलिस अधिकारी ‘अनघा ‘ होती.   

श्रीधर काकां काकू, व त्यांच्या घरचे इतरही सर्व, अनघाच्या स्वागतासाठी लगेच आले.   

अनघाने वेळ कमी असल्यामुळे मी सरळ आॅफिसमधूनच आले व लगेच मला जावे लागेल. असे सांगितले.   आज सर्वांशी भेट होईल, म्हणून मी आले.   पुर्वी लहान असताना मी आई बाबांबरोबर येत असे.  पण या मधल्या काळात मला येणे जमलेच नाही.  तिने सर्वांची विचारपूस केली.   सर्वांना आनंदाने भेटली. वर वधू ला भेटली. फोटोग्राफर ने तिचे आवर्जून बरेच फोटो काढले. आपल्यामुळे वर वधू कडे दुर्लक्ष व्हायला नको, म्हणून तिने लगेच निघायचे ठरविले   

लगेच अनघाच्या जेवणाची सोय झाली. तिच्या ड्रायव्हरला ही आदराने जेवण दिल्या गेले.. आई बाबा हे सर्व डोळे भरून बघत होते. आजही आईच्या डोळ्यात अश्रू आलेच. पण ते मुलीचे कौतुक बघून, तिचा होणारा मानसन्मान बघून.   

अनघाच्या आई-बाबांना लग्न घरात सर्वांसमोर मान मिळाला. आईच्या मनातील सल दूर झाली होती. अनघाचा उद्देश्य पूर्ण झाला होता, तो ही बाबांचा नियम सांभाळून, “आपण नेहमी चांगले वागावे”.   

निघताना अनघा आई बाबांना म्हणाली,   आई-बाबा जास्त उशीर करू नका. अंधाराच्या आत घरी पोहचा.   

श्रीधर काकांची पंधरा वर्षांची नात ‘ राधा’ अनघा जवळ येऊन म्हणाली, ताई मला पण तुझ्या सारखे पोलिस अधिकारी बनायचे आहे. बाबा, माझा ताई बरोबर फोटो काढा ना. तो मी माझ्या स्टडी टेबल वर ठेवेन.   

अनघा म्हणाली,   हो का??

मग छान अभ्यास कर. मी तुला वेळोवेळी guidance देईन.   

एकंदरीत अनघाचा प्रभाव जबरदस्त होता.  

“वक्त वक्त की बात हैं। 

वो भी एक वक्त था ।

आज भी एक वक्त हैं।”  

आज कुलकर्णी काकांच्या ड्रायव्हर ने आई-बाबांना घरी पोहचविले.   

म्हणतात ना,  

“Your greatest test is how you handle people who have mishandled you.”   

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गोष्ट एका मुंगूसाची ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

? जीवनरंग ?

☆ गोष्ट एका मुंगूसाची ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

राजेश, त्याची बायको रजनी व त्यांची २ वर्षांची छकुली स्वीटी यांचं छोट्टं कुटुंब यमुना सोसायटीत खूप आनंदात होते. राजेशची एका बॅंकेत नोकरी होती आणि रजनीने स्वीटीच्या जन्मापासून नोकरी सोडली होती. सोसायटीचा वॉचमन नकुल सिंग याचा स्वीटीवर खूप जीव. “इसे देखता हूँ ना तो गांवमे मेरी बिटीया है ना, उसकी याद आती है! “, त्याचं नेहेमीचे पालुपद असायचे.

एकदा राजेश नेहमीप्रमाणे कामावर गेलेला. दुपारी ४ – ४:३० ची वेळ होती. सोसायटीच्या बागेत सावलीत स्वीटी व ७-८ वर्षाची सोहम, पिंकी, राजू खेळत बसली होती. सोहमची आई दुसऱ्या मजल्यावर गॅलरीत कपडे वाळत टाकत होती. रजनीला पटकन कोपऱ्यावरच्या दुकानात जाऊन यायचे होते. रजनीने सोहमच्या आईला खूणेनेच आपण ५ मिनीटात येतोय असे सांगितले. मुलांनाही सांगितले – “स्वीटीवर लक्ष ठेवा रे, तिला एकटीला नका सोडू. मी आलेच पाच मिनीटात. ” गेटशी नकुल सिंग अर्धवट डोळे मिटून डुलक्या काढत होता.

रजनी परतली, पाहते तर बागेत मुलं नव्हतीच. एकटी स्वीटीच तिथे आणि नकुल सिंग तिच्या जवळ बसून, तिचा स्कर्ट वर करून… रजनीच्या जीवाने ठाव सोडला. जोरात ओरडतच ती नकुलच्या अंगावर धावून गेली आणि लाथा-बुक्क्याने त्याला मारू लागली.

इमारतीशी उभी राहिलेली मुलं काहीतरी ओरडून तिला सांगत होती, नकुल हात जोडून तिला काही सांगत होता, पण ती बेभान – बेफाम झालेली.

सोहमची आई धावतच येत होती. ” अग रजनी, हात आवर, हात आवर. ही मुलं खेळत होती तर तिकडून हा एवढा मोठा नाग आला. मुलं घाबरून पळाली, स्वीटी मात्र काही न कळल्याने तिथेच तशीच फतकल मारून बसलेली. मुलांच्या आरडाओरड्याने नकुलचे लक्ष गेले; नाग स्वीटीच्या पायात घुटमळत होता. नकुलने जीवाची पर्वा न करता खाली वाकून त्याला हाताने उचलले आणि दूर भिरकावून दिले. तो तिला कुठे डसला नाही ना नकुल पहात होता. “

रजनीच्या जीवाचे पाणी पाणी झाले, मारहाण करणारे हात जोडले गेले आणि ती नकुलकडे क्षमायाचना करू लागली, तिच्या छकुलीचा जीव वाचवल्याबद्दल त्याच्या पाया पडू लागली.

— —

पंचतंत्रातील मुंगूसाची गोष्ट –

एक शेतकरी एका मुंगूसाला वाचवतो आणि घरी आणतो. एकदा तो शेतकरी आणि त्याची बायको दोघेही घराबाहेर गेले असतात, घरी त्यांचे बाळ व मुंगूस असे दोघेच असतात. बायको घरी येऊन बघते तर दारात मुंगूस उभं असतं – त्याचं तोंड आणि शरीर रक्तानं माखलं असतं. या मुंगूसाने नक्की आपल्या बाळाचा घात केला असे वाटून ती माऊली तिथल्या तिथे त्या मुंगूसाला मारून टाकते. घरात जाऊन पहाते तर बाळ मजेत खेळत असतं आणि त्याच्याजवळ एक विषारी नाग मरून पडलेला असतो – बाळाला इजा करण्याच्या आधीच मुंगूसाने त्याला मारलेले असते.

— —

संस्कृतमध्ये मुंगूसाला नकुल म्हणतात, माहित होतं का हो तुम्हाला?

© डॉ मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ते दहा तास… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी ☆

श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ ते दहा तास… – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

(“अहो मागच्या महिन्यात मी याला घेऊन एकटीच अमेरिकेत जाऊन आले, आमच्या नातेवाईकाच्या लग्नाला. हा तर आपला महाराष्ट्र आहे. इथं सोबतीची काय गरज? “

मी चुपच झालो. बाई मोठी धीट दिसत होती.) 

इथून पुढे – – 

मग आमच्या गप्पा रंगल्या. मला वाटत होतं ती एक साधी गृहिणी असावी पण फॅक्टरीच्या कामातही तिचा सक्रिय सहभाग असतो हे तिनं मला सांगितलं. फॅक्टरीच्या प्राॅडक्ट्सची, त्यांच्या प्रक्रियेची आणि मार्केंटिंगची तिला खडानखडा माहिती होती. नवऱ्यासोबत ती अनेक देशात जाऊन आली होती. एका ट्रस्टच्या माध्यमातून ती बरीच समाजसेवाही करत होती.

जसजसा मी तिच्याशी बोलत होतो तसतशी माझी नजर स्वच्छ होत होती. तिच्या सौंदर्याचा माझ्यावरचा परिणाम कमी झाला होता. त्याची जागा आता आदराने घेतली होती. इतकी धनाढ्य आणि कमालीची सुंदर असुनही तिच्या वागण्यातला नम्रपणा, साधेपणा, तिच्यापुढे मी अगदीच क्षुल्लक असतांनाही माझ्याशी बोलण्यातली तिची आपुलकी हे सर्व पाहून मी खुप भारावून गेलो होतो.

“तुम्ही फिल्म इंडस्ट्रीत का नाही गेलात? ” माझ्या नकळत माझ्या मनात खदखदणारा तो प्रश्न निघून गेला. ती मोकळेपणाने हसली. मग म्हणाली

“मला हा प्रश्न अनेकांनी विचारलाय. मला ऑफरही होत्या पण तिथं जाऊन मला प्रसिद्धीव्यतिरिक्त काय मिळालं असतं? आम्ही पिढीजात श्रीमंत. पैशाची आमच्याकडे कधीच कमतरता नव्हती. फिल्म इंडस्ट्रीत काय काय धंदे चालतात हे तुम्हांलाही वाचून माहित असेल. मला ते नको होतं. आणि प्रसिद्धी क्षणभंगुर असते. काही काळानंतर तुम्हांला कुणीही विचारत नाही. मला साधंसुधं जीवन जगायला आवडतं. सामान्य माणसांत मिसळायला, त्यांचे जगण्यामरण्याचे प्रश्न सोडवायला आवडतं. खरं सांगू मला मी सुंदर असल्याबद्दल वाईटच वाटतं. लोक माझी बुद्धीमत्ता, माझं कर्तुत्व, माझ्या भावना, माझ्यातली माणुसकी किंवा इतर काही गुण बघायलाच तयार होत नाहीत हो. ते माझ्या चेहऱ्याकडेच वेड्यासारखे बघत रहातात “

मीही तर तेच करत होतो. मला माझीच लाज वाटून मी चुप बसलो.

“थोडंसं याच्याकडे बघता का? मी जरा डिश धुऊन येते “

ती म्हणाली तसं मी भानावर येऊन होकारार्थी मान हलवली.

ती बेसिनपर्यंत पोहचत नाही तर तिचा मुलगा रडू लागला. मी त्याला शांत करायचा प्रयत्न केला पण तो थांबेना म्हणून मग मी त्याला उचलून घेतलं आणि पॅसेजमध्ये फेऱ्या मारु लागलो. काय गोड होता तो पोरगा! अगदी आईसारखा सुंदर, गोरापान, गुटगुटीत, चमकदार डोळे आणि लालचुटूक ओठांचा. एकदा जवळ घेतलं की सोडावसं न वाटणारा. रडतांनासुध्दा तो अतिशय गोड दिसत होता. मी त्याला थोपटलं तसा तो झोपून गेला.

तेवढ्यात ती आली.

“रडत होता वाटतं! ” तिनं जवळ येऊन त्याला घेतलं आणि बर्थवर झोपवलं.

थोड्यावेळाने आम्ही दोघंही झोपलो. पण झोप आमच्या नशिबातच नसावी. रात्रीतून चार वेळा तिच्या मुलाच्या रडण्याने आम्हांला जागवलं. चारही वेळा मी त्याला घेऊन पॅसेजमध्ये फेऱ्या मारल्या. गंमत म्हणजे तोही माझ्याकडे लगेच येत होता आणि थोडं फिरवलं की खांद्यावर पटकन झोपत होता.

“मागच्या आठवड्यात आम्ही स्वित्झर्लंडला होतो. तिथली थंडी त्याला मानवली नाही म्हणून सर्दीमुळे सारखा किरकिर करतोय ” तिनं स्पष्टीकरण दिलं.

सकाळ झाली. आख्खी रात्र जागरणात गेली होती. प्रत्येक आईच्या रात्री अशाच जागरणात जात असतील का? या विचाराने मी अस्वस्थ झालो. कितीही सुंदर असली तरी आई ती आईच असते. रात्र रात्र मुलांसाठी जागणारी, त्यांच्या सुखासाठी जीवाचं रान करणारी.

एक तासाने नागपूर येणार होतं. आम्ही दोघंही बसून खिडकीबाहेर पहात होतो. रात्रभर जागूनही ती तशीच फ्रेश आणि सुंदर दिसत होती.

“घरी कोणकोण असतं? “तिनं अचानक प्रश्न केला.

“मी, आईवडील, दोन लहान भाऊ आणि एक बहिण. वडिलांनी तब्येतीच्या कारणास्तव स्वेच्छानिवृत्ती घेतलीये “

“अच्छा. म्हणजे तुम्हांला नोकरीची खरी गरज आहे “

“हो तर! वडिलांच्या पेन्शनवर किती दिवस काढणार? “

तिनं लगेच पर्समधून मोबाईल काढला. कोणाशीतरी बोलली. बोलणं झाल्यावर मला म्हणाली “तुम्ही ज्या कंपनीत जाताय तिथं माझे काका मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. इंटरव्ह्यू तेच घेणार आहेत. मी आताच त्यांच्याशी बोलले. तुमचं नाव सांगा मी त्यांना मेसेज करते “

मी नाव सांगितलं तिनं मेसेज केला.

“तुम्ही भेटलात की त्यांना सांगा संजनाने पाठवलंय म्हणून “

“संजना कोण? ” मी विचारलं

“मीच. माझंच नांव संजना” ती हसून उत्तरली.

“थँक्यू व्हेरी मच मॅडम अँड व्हेरी व्हेरी साॅरी”

“साँरी? कशाबद्दल? ” तिनं आश्चर्याने विचारलं

“काल तुम्ही म्हंटलात तसं इतर पुरुषांसारखं मीही तुमच्याकडे वेड्यासारखा बघत होतो. मी विसरुन गेलो होतो की तुम्ही विवाहीत आहात, एका मुलाची आई आहात. माझी चुक झाली. आय ॲम एक्स्ट्रीमली साॅरी फाॅर दॅट”

तिनं हलकसं स्मित केलं. म्हणाली. ” फरगेट इट. अशा नजरांची मला सवय झाली आहे. स्वतःची बायको सुंदर असतांनाही दुसऱ्या बायकांकडे पहाणारे अनेक पुरुष असतातच की. तुम्ही तर अनमॅरीड आहात. आणि सुंदरतेकडे बघणं वाईट नाही पण त्यात वासना नसावी. तुमच्या नजरेत ती नव्हती. हे मी पहिल्या नजरेतच ओळखलं होतं. नाहीतर मी तुमच्याशी बोललेच नसते “

थोडं थांबून ती म्हणाली “आणि काय हो रात्रभर कटकट न करता आपुलकीने तुम्ही माझ्या मुलासाठी जागताय त्याबद्दल मीही तुमचे आभार मानले पाहीजेत. खरं ना? “

“नाही नाही ” मी घाईघाईने म्हणालो “अहो तुमचा मुलगा इतका गोड आहे की त्याच्यासाठी मी एक रात्र काय दहा रात्री जागून काढायला तयार आहे ” तिनं स्मित केलं आणि प्रेमाने मुलाच्या अंगावरून हात फिरवला.

नागपूर आलं. मी खाली उतरलो. तीही माझ्यामागे मुलाला घेऊन खाली उतरली. निघण्यापूर्वी मी तिच्या मुलाकडे हात पसरले. तो लगेच माझ्याकडे झेपावला. मी त्याला जवळ घेऊन त्याचे मुके घेतले. मग त्याला तिच्याकडे दिलं. रात्रभरात या पोराने मला चांगलाच लळा लावला होता.

“बेस्ट ऑफ लक फाॅर युवर इंटरव्ह्यू. मी फोन केलाच आहे. तुम्हांला कोणतीही अडचण येणार नाही ” ती म्हणाली.

“थँक्यू व्हेरी मच “

जड अंतःकरणाने मी त्यांचा निरोप घेतला.

इंटरव्ह्यूमध्ये अगदी जुजबी टेक्निकल प्रश्न विचारुन एकशेसाठ उमेदवारातून माझी निवड करण्यात आली. त्यामागे संजनाचा तो फोनच होता हे नक्की.

संजना त्यानंतर मला कधीही भेटली नाही. पण नाशिक ते नागपूरच्या त्या दहा तासात ती माझं जन्मभराचं कल्याण तर करुन गेलीच पण आंतरबाह्य सौंदर्य कसं असतं याची खुप चांगली शिकवणही देऊन गेली.

समाप्त

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares