? इंद्रधनुष्य ?

रणरागिणी संजुक्ता पराशर ☆ प्रस्तुती – सुश्री हेमा फाटक ☆ 

हातात एके 47 घेऊन घनदाट जंगलात शिरल्यावर तब्बल १६ अतिरेक्यांना यम सदनाला पाठवून आणखी ६४ अतिरेक्यांना अटक करणाऱ्या संजुक्ता पराशरची कहाणी स्वतःला अबला समजणाऱ्या देशातील प्रत्येक स्त्रीला माहिती व्हायला पाहिजे।

दिसायला गोरीपान आणि सुंदर अशी संजुक्ता जर कधी आपल्या समोरून गेली, तर तिच्या अफाट कर्तृत्वाची आपण कल्पनाही करू शकणार नाही। एक सामान्य स्त्री लाखो सामान्य पुरुषांनाही जमणार नाही असं काम करते, तेव्हा तिच्या कर्तृत्वाचे पोवाडे सोशल मीडियावर गायले जायला हवेत, पण आम्हाला राजकारण आणि जात, धर्मापलीकडेही आणखी दुनिया आहे हेच मान्य नसतं। त्यामुळे संजुक्ता पराशरच्या फेसबुक पेजला लाखभरही लाईक मिळत नाहीत आणि राजकारणी, सिनेनट मात्र करोडोंनी लाईक मिळवतात। असो. 

आसामसारख्या मागासलेल्या राज्यात शाळेत शिकून, नंतर दिल्लीच्या जे एन यु मधून डिग्री घेणारी संजुक्ता २००६ मध्ये आयपीएस परीक्षा देशात ८५ वा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली। यु. एस. फॉरेन पॉलिसी विषयात तिने पीएचडी केल्यामुळे ती ‘ डॉक्टर संजुक्ता पराशर ‘ म्हणूनओळखली जाते। तिचं लग्न झालं तेही आयएएस अधिकारी पुरू गुप्तांशी। त्यांना ६ वर्षाचा मुलगा आहे। संजुक्ता आई त्याला सांभाळते।

संजुक्ताची पोस्टिंग २०१४ मध्ये आसाममधील सोनीतपुर जिल्ह्यात सुप्रिंटेंडंट ऑफ  पोलीस म्हणून झाली आणि अग्निदिव्य म्हणजे काय ह्याची प्रचिती तिला रोजच घ्यावी लागली। बोडो अतिरेक्यांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता। शेकडो लोकांचे बळी गेले होते। आसामच्या घनदाट जंगलात शिरून त्यांच्याशी मुकाबला करणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण। हातात एके 47 घेऊन संजुक्ता सीआर पी एफ च्या जवानांना घेऊन जेव्हा घनदाट जंगलात शिरायची, तेव्हा जवानांनाही दहा हत्तीचं बळ मिळायचं। अनेक मोहिमा यशस्वी झाल्यामुळे अतिरेकीही संजुक्ताच्या नावाने कापू लागले होते। तिला पत्राद्वारे आणि फोनद्वारे धमक्या येऊ लागल्या होत्या। परंतु शीर तळहातावर घेऊन फिरणाऱ्या संजुक्तावर कसलाच परिणाम झाला नाही। तब्बल १६ अतिरेकी मारले गेले आणि ६४ अटक झाले, तेही तिच्या अवघ्या १८ महिन्यांच्या कारकीर्दीमध्ये। 

आज संजुक्ता पराशर दिल्लीमध्ये कार्यरत आहे। देशातील दहशतवाद पूर्णपणे निपटून काढणं हेच तिचं ध्येय आहे। अशा ह्या खऱ्या खुऱ्या रणरागिणीच्या अफाट कर्तुत्वाला आपण सर्वांनीच मानाचा मुजरा करायला हवा। सलाम करायला हवा !

माहिती संग्रहिका : सुश्री हेमा फाटक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted