सौ. गीता वासुदेव नलावडे

? मनमंजुषेतून ?

 ☆ भावनांचा तू भुकेला… लेख क्र. २४ ☆ सौ. गीता वासुदेव नलावडे

भावनांचा तू भुकेला – – 

इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी बसले होते, मुलांना दोन चार प्रश्न विचारून त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते.

एक छोटी चुणचुणीत मुलगी तिच्या वडिलांबरोबर माझ्या ऑफिसमध्ये आली. वडील काहीतरी विसरले – ते आणायला बाहेर गेले.

मी तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. “घरी कोण कोण असतं? “

ती नॉन स्टॉप बोलायला लागली. “बाई, आमच्या घरी मी, आई, बाबा, दादा असतो. मी मस्ती करत नाही, भांडण करत नाही. तरी आई आम्हाला टाळं लावून कामाला जाते. काही केलं नाही तरी उगाचच मारते. आमचं काहीच ऐकून घेत नाही. “

हे सर्व सांगत असताना तिच्या चेहऱ्यावरच्या वेदना पाहून मला एकदम भरून आलं, म्हटलं, “थांब हं, आपण तुझ्या आईला बोलावू. मी तिला समजावून सांगेन. मग नाही मारणार ती तुम्हाला. “

तिचे वडील आल्यावर त्यांच्याशी यासंबंधी बोलले, तर मान खाली घालून अपराधी स्वरात म्हणाले, “बाई, आजूबाजूची वस्ती चांगली नाही. दुपारच्या वेळी ही मुलं बाहेर खेळायला गेली, तर त्यांच्यावर लक्ष कोण ठेवणार? हिची आई दुपारी घरकामाला जाते, म्हणून दोघांना आत ठेवून टाळं लावून जाते. काम करून कंटाळते, मग मुलांनी जरा मस्ती केली तर मारते. “

त्यांना म्हटलं, “सध्याच्या परिस्थितीत मुलांना आत ठेवतात, ते योग्यच आहे, पण त्यांना उगाच मारू तरी नका. किती गुणी बाळं आहेत तुमची! अहो, या वयात मुलांनी मस्ती नाही करायची तर कोणी करायची? तुमच्या प्रेमाला भुकेली आहेत ती. त्यांच्यासाठी कष्ट करता, पण अशा वागण्याने त्यांना तुमच्याबद्दल प्रेम वाटेल का? रागावू नका, पण रोज अर्धा तास मुलांशी गप्पा मारा, खेळा, मस्ती करा. तुमचा शिणवठाही निघून जाईल आणि मुलांना आनंदही मिळेल. बघा बरं हा प्रयोग करून. “

हसून मान डोलवत ते मुलीला घेऊन निघून गेले. ऑफिसबाहेर पडताना मागे वळून पुन्हा पुन्हा मला टाटा करणारी ती चिमुरडी माझ्या नजरेसमोरून जात नाही. इतके दिवस तिच्या मनात असलेली खंत बोलून ती मोकळी झाली होती. आणि तो आनंद तिच्या चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता.

काही पालक मुलांवर सतत ओरडत असतात. त्यामुळे पालकांविषयी मुलांच्या मनात अढी निर्माण होते, त्यातून अनेक समस्या निर्माण होतात.

मुलांशी मूल होऊन वागा. आपले निरागस बालपण पुन्हा अनुभवा. यातून तुम्हाला आणि मुलांना निखळ आनंदच मिळणार आहे.

या छोट्या जीवांना समजून घ्यायला हल्ली पालकांना वेळच नसतो. प्रत्येकाचं स्वतंत्र विश्व असतं. सुसंवाद सोडा, साधा संवादही घडत नाही, मग मुलांची वाढ खुंटते, त्यातूनच अनेक विकृती निर्माण होतात. आणि आपण दोष मात्र नवीन पिढीला देतो.

असं न करता प्रत्येकाने आपल्या वागण्याचा विचार करावा.

(हा लेख किमान दहा वर्षांपूर्वी लिहिलेला आहे, परंतु त्यात वर्णलेल्या परिस्थितीत सुधारणा झालेली तर दिसत नाहीच, उलट कुटुंबातील संवाद आणखीनच नाहीसा झालेला दिसत आहे. आणि त्यातून अनेक कौटुंबिक आणि सामाजिक समस्या निर्माण झालेल्या दिसत आहेत.

…. हे दुष्टचक्र थांबवायला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही – आम्ही – आपण काहीतरी सकारात्मक केले पाहिजे, नाही का?)

क्रमशः दर गुरुवारी… 

© सौ गीता वासुदेव नलावडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted