श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

? मनमंजुषेतून ?

☆ मनामनातील वेताळ… लेख क्र. ४ ☆ श्री संदीप सुंकले (दास चैतन्य) 

” चार लोक काय म्हणतील…? “

थ्री इडियट हा सिनेमा जवळजवळ सर्वांनी पाहिला असेल…! त्यात एक विदारक सत्य मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अभियंत्याचा मुलगा अभियंता, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर आणि तत्सम बरेच काही दाखवले आहे…

आपली सध्याची शिक्षण व्यवस्था उपजत अंगी असलेल्या गुणांना उपयोग करून स्वतःची प्रतिभा वापरून प्रगती साधण्यास वाव देण्याऐवजी उपलब्ध असलेल्या शैक्षणिक पर्यायांमध्ये आपापल्या गुणांचा उपयोग करून प्रगती करण्याची संधी देते असे म्हणावे लागेल आणि तेही एका अमर्यादित स्वरूपात… ,. असे खेदाने नमूद करावेसे वाटते…

– – त्यामुळे आपल्याकडील विद्यार्थी प्रचंड दबावात शिक्षण घेत आहेत असे आपल्या लक्षात येईल…! शिक्षण आनंददायी असावे असे आपण सर्वजण म्हणतो, पण ते खरेच आनंददायी होते का, हे पाहणं मात्र पालकांकडून होताना दिसत नाही…!!

सध्या सर्वसाधारण विद्यार्थी विद्यार्थीनी क्लास, शाळा, संध्याकाळी परत क्लास (अन्य छंदाचा), सर्व क्लासेस् चा गृहपाठ, पालकांच्या अपेक्षा, सामाजिक माध्यमांची चमकधमक, नैसर्गिक रित्या शरीरात होणारे हार्मोन्स मधील बदल, बदलत्या सामाजिक वातावरणाचा मुलांवर होणाऱ्या परिणाम, एक मूल असलेले, कुटुंब, मैदानी खेळांचा अभाव, मनातील भावनिक आणि शारीरिक घुसमट बाहेर पडण्यासाठी उपलब्ध असलेले मर्यादित पर्याय, यांनी गांजून गेली आहे…! हे सर्व वेताळ आहेत आणि यातले अर्धे अधिक पालकांच्या मनात आणि बाकीचे विद्यार्थ्यांच्या मनात आहेत… यातूनच आत्महत्या आणि अनेक दुष्कृत्य करण्यास विद्यार्थी धजावत आहेत… आणि यावर वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे… पटतंय ना?

बरेच वेळा सामान्य मनुष्य द्विधा मनस्थितीत असतो…! अहो, ते कशाला, महाभारतात अर्जुनसारख्या महान भक्ताला साक्षात परमात्मा सोबतीला असताना विषाद वाटला… युद्ध करावे की न करावे असा संभ्रम झाला तिथे आपल्या सारख्या सामान्य मनुष्याची काय कथा?

… सांगायचा मुद्दा इतकाच की सामान्य मनुष्याचा गोंधळ होणे, संभ्रम होणे अगदी स्वाभाविक आहे…!

सध्याच्या काळात कोणतीही गोष्ट करताना मनुष्याला आणिक एक प्रश्न भेडसावतो…!

… जगातील आज जे पर्यंत न सुटलेले प्रश्न आहेत, त्यामधील हा प्रश्न प्रमुख म्हणता येईल… सूज्ञ वाचकांच्या हा प्रश्न लक्षात आलाच असेल… आता मी आपली उत्सुकता फार ताणत नाही…

– – ” चार लोकं काय म्हणतील…?  “

अहो, जसे आपल्याला प्रश्न आहेत, तसे जगातील प्रत्येक माणसाला विविध प्रकारचे आणि विविध कंगोरे असलेले प्रश्न असतात, आहेत आणि हे पुढेही चालू राहील…! समर्थ रामदास स्वामी म्हणतात, *”त्याप्रमाणे जगी सर्व सुखी असा कोण आहे…? “* तर या प्रश्नाचे उत्तर कोणीही सुखी नाही असेच आहे.

… यामुळे ही जी चार लोकं आहेत, त्यांनाही आपल्यासारखे किंबहुना आपल्यापेक्षा जास्त गहन प्रश्न असतील… , ते त्यांचे प्रश्न सोडविण्यात इतके मग्न आहेत की त्यांना आपले प्रश्न पाहण्यात काडीचाही रस नसेल..

…. म्हणूनच तिकडे लक्ष न देता मनुष्याने आपल्याकडे उपलब्ध साधनांचा उपयोग करून, नीती धर्मांचे आचरण करून आपला सोडविण्याचा प्रयत्न करावा, त्यासाठी भगवंताकडे मदत मागावी. हा उपाय सर्वमान्य आणि उचित ठरू शकेल…!!

– – त्या चार लोकांचा विचार त्यांचा त्यांनाच करू दे, आपण आपला *”स्वार्थ”* पाहू…!

पहा, पटतंय का?

क्रमशः भाग चौथा 

© श्री संदीप सुंकले (दासचैतन्य)

मो. 8380019676

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted