प्रतिमा रवींद्र कुलकर्णी
विविधा
☆ कालाय तस्मै नम: ☆ प्रतिमा रवींद्र कुलकर्णी ☆
☆
श्रावणसरी येतात, चिंब भिजवतात
आठवणींची पानं हलकेच उलगडतात
नऊवारीचे ओचे सावरत आजी म्हणायची उठता उठता…
“चला बाई श्रावण आला,
कामाला लागायला हवं आता.
गेजवस्त्रं करायला हवीत, फुलवाती भिजवायला हव्या.
गव्हले करुन ठेवीन म्हणते, खारका सुपा-या आणायला हव्या.”
व्रतं वैकल्यं ती करायची, नैवेद्य-कहाणीला आम्ही आधाशी. फराळोत्सव होई आमचा
ती बिचारी खरीच उपाशी.
श्रावण सारा मजेत जाई गोडधोड खाताना
नागपंचमी, मंगळागौरी खेळून जागवताना
जागरणाच्या त्या दंग्याने वाडा दणाणून जाई
खेळायला कशाला आमंत्रण? गल्लीच सामील होई.
काय कटकट आहे? असं कुणी कुणाला म्हणत नसे.
जागरण कुणाकडेही असो, कार्य घरचंच वाटत असे.
घरमालकांची पडवी नि शेजा-यांच्या खोल्या
हक्कानेच पाहुण्यांसाठी जात वापरल्या.
घर भले भाड्याचं असो, वाडा आपलाच असायचा
कुणाच्याही मनात कधी आप-परभाव नसायचा.
दिवस बदलले.
नेमेचि येणारा श्रावण आताही येतो.
विकतची वस्त्रं-वाती, शेवया नि लाडू घेऊन येतो.
व्रतं कसली जुनीपानी? उपवासाने पित्त वाढतं!
टीव्ही बघत रोजच जागरण! याहून जादा कुठे झेपतं?
मंगळागौरी नि नागपंचमी खेळायला शरीर काटक हवं!
वाढता बोजा शरीराचा वाकता तरी यायला हवं?
निसरफुगडी खेळताना घसरुन पडायला व्हायचं!
कणा असेल ताठ तर ना काटवटकणा खेळायच?
नको बाई, त्यापेक्षा मंगळागौरीच्या खेळग्रुपला बोलवूया
आरामात बसून सा-याजणी मनसोक्त एंजॉय करूया.
घरं मोठी असली तरी नाचानाच कोण करेल?
हॉल भाड्याने घेऊ तेच सोयीचं ठरेल!
किती बदललं पहा सारं
नव्या युगाचं न्यारं वारं
मुलींच्या सोयीने आधी मंगळवार ठरायचा
आता हॉल कधी मिळेल तोच नक्की करायचा.
नशीब अजून तरी मंगळागौर शनिवारी पुजली जात नाही.
रविवारच्या सुट्टीला जोडून अलिकडे घेतली जात नाही.
© प्रतिमा रवींद्र कुलकर्णी
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈






छान लिहिलंय, अगदी वास्तव कालचं आणि आजचही.