श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “पाझरणारा पाषाण!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

मेजर साहेबांनी हातातली रायफल खाली ठेवली… आणि ती वृद्धा आणि त्या तीन मुलींना आपले दोन्ही हात पसरवून एकत्र मिठीत घेतले… हिमालयाच्या कुशीत चार छोटी हिमशिखरे विसावली आहेत… असे ते दृश्य! या पाचही जणांच्या नेत्रांतून अश्रूंचा एक प्रवाह वाहू लागला… इथे शब्दांचे काहीही काम नव्हते. ती वृद्धा म्हणाली… ”बेटा! माझं उरलेलं सर्व आयुष्या तुला लाभो! आणि… हो… आमची ही कहाणी तू जगाला एक न एक दिवस जरूर सांग! ” मेजर साहेबांनी मानेनेच होकार दिला आणि साहेबांनी त्या चौघींना तिथून सुरक्षित पाठवण्याच्या सूचना त्यांच्या सहकारी सैनिकांना दिल्या… आणि डोळे पुसले! साहेबांच्या डोळ्यांची आणि आसवांची भेट या पूर्वी कधी झाली होती हे त्यांचे त्यांनाही स्मरत नव्हते. अगदी काहीच मिनिटांपूर्वी त्या सात नराधमांना यमसदनी धाडताना त्यांचे हात जराही थरथरले नव्हते! पण ती वृद्धा आणि तिच्यासोबतच्या त्या तीन असाहाय्य पिडीत कन्या पाहून साहेबांच्या पाषाणहृदयातून कारुण्याचा, ममतेचा एक निर्झर त्यांच्याही नकळत पाझरून गेला होता!

शत्रू एकदा निश्चित झाला की त्याला थंड डोक्याने संपवण्याचे प्रशिक्षण त्याला मिळालेले होते.. आणि ते त्याने नसानसांत भिनवून घेतले होते. त्यादिवशी त्याच्या नेतृत्वात एक-दोन नव्हे सात जण यमसदनी धाडले गेले होते… या कामात तो सर्वांच्या पुढे होता.

साधा सैनिक ते एन. एस. जी. कमांडो आणि पुढे लवकरच मेजर या पदापर्यंत पोहोचण्याचा त्याचा प्रवास अतिशय रोमांचक असाच आहे. केरळमधील एका लहानशा खेड्यातून एक सामान्य मनुष्य लष्करात भरती झाला… आणि त्याच्या पोटी आलेला हा निधड्या छातीचा पोरगा त्याच वाटेवर चालला… पण बापाच्या एक पाऊल पुढे!

जवान (लष्करी शिपाई) म्हणून कारकीर्द सुरु करून, शिक्षण पूर्ण करीत करीत, विविध परीक्षा देत देत साहेब अधिकारी बनले. National Security Guard (N. S. G.) मध्ये कमांडो बनणे हे आव्हानही त्यांनी पेलले. सल्ला देणारा देह कोणत्या पदावर आहे, त्यापेक्षा त्या देहाने जगाचा किती अनुभव प्राप्त केला आहे… यावर साहेब त्या देहाचा सल्ला प्रमाण मानत. एका चाळीस किलोमीटर्स धावण्यातच नव्हे तर अभ्यासक्रमाच्या सर्वच आघाड्यांवर साहेब क्रमांक एकवर होते. त्यादिवशी अडीचशे प्रशिक्षणार्थी जवानांचा जथा रात्रीच्या अंधारात चाळीस किलोमीटर्स धावण्याच्या स्पर्धेत धावण्यास सज्ज होता. साहेबांनी ही कामगिरी याआधीही पूर्ण करून दाखवली होतीच. या वेळी त्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला नसता तरीही त्यांचा एकूणातला पहिला क्रमांक काही गमवला जाणार नव्हता. म्हणून त्यांनी अगदी शर्यत सुरु झाल्यावर काही मिनिटांतच शर्यतीत सोडून दिली. अडीचशे जवान पुढे निघून गेले. साहेबांच्या पेक्षा कनिष्ठ पदावर परंतू वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या एका सैनिकाने साहेबांशी संवाद साधला… आणि या पुढे निघून गेलेल्या जवानांपैकी एखादा तरी “तुम्ही चाळीस किलोमीटर्स शर्यत पूर्ण केली नाही… असं म्हणू शकेल असं म्हणत त्यांच्यातल्या कर्तृत्वाला आव्हानच दिले… शर्यत पूर्ण करणं म्हणजे काही फार कठीण बाब असते असं नाही… फक्त मागचा पाय पुढं टाकीत रहायचं… आणि शर्यत संपेपर्यंत हा क्रम थांबवायचा नाही! साहेबांनी या बोलण्यातलं मर्म जोखलं… आणि शारीरिक थकवा, वेदना यांच्याकडे साफ दुर्लक्ष करीत त्या रात्री ती चाळीस किलोमीटर्स धावण्याच्या शर्यतीची अंतिम रेषा प्रथम क्रमांकाने पार केली! पुढे देशभरात अनेक धाडसी कारवायांत भाग घेऊन पराक्रम गाजवला.

त्यांच्या लष्करी कारकीर्दीतला एक मोठा मैलाचा दगड म्हणजे तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल एस. एफ. रॉड्रीग्ज साहेबांचे A. D. C. अर्थात साहाय्यक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडणे!

१९८०-९० हे दशक भारतातल्या पंजाब राज्यातल्या दहशतवादी घटनांनी अक्षरश: धडधडा जळत होते. सुमारे ८ हजार दहशतवादी आणि कित्येक हजार पोलिस, लष्करी जवान, अधिकारी आणि सामान्य नागरिकांचे यात बळी गेले!

मेजर साहेबांना यावेळी पंजाबात कर्तव्यावर धाडण्यात आलं. सकाळी सकाळी एक खबर मिळाली… एका फार्म हाउसवजा घरात सहा दहशतवादी आहेत… साहेबांनी आपले दल सज्ज केले आणि साहेब त्वरेने निघाले. प्रचंड मोठे शेत शिवार. पण पिकं काढून मोकळं केलेलं. मध्यभागी एक दोन-अडीच मजली इमारत. या इमारतीच्या आसपास मात्र बारा-पंधरा फुट उंचीचे पीक… बहुदा जनावरांना चारा मिळावा म्हणून केलेली सोय. पण याच शेतात आज काही मानवी जनावरं दबा धरून बसणार होती… हे कुणास ठाऊक होतं?

साहेब त्या फार्म हाऊसपासून सुमारे दीडशे मीटर्सवर पोहोचले… त्या इमारतीपासून वीस मीटर्स अंतरावर सी. आर. पी. एफ. च्या दोन जवानांचे मृतदेह पडलेले… एक जवान अजूनही जिवंत होता… जखमी अवस्थेत विव्हळत पडून होता. त्या फार्म हाऊस मधून गस्तीवर निघालेल्या या जवानांवर अचानक हल्ला चढवण्यात आलेला होता. इतर जवानांनी या इमारातीला लांबून वेढा दिलेला होता… परंतू आतून अतिशय मोठ्या प्रमाणावर अचूक आणि मोठ्या क्षमतेचा गोळीबार होत असल्याने पुढे जाता येत नव्हते… मात्र इमारतीमधील दहशतवाद्यांना तिथून बाहेरही पडता येत नव्हते. स्थानिक पोलिस, सी. आर. पी. एफ. यांच्या जोडीला आता एन. सी. जी. ला पाचारण करण्यात आलं होतं!

मेजर साहेबांनी त्या इमारतीपर्यंत थेट पुढे न जाता दोनशी मीटर्स दूरवरून वळसा घालून पोहोचण्याची योजना आखली… साहेब ज्या बाजूने इमारतीच्या जवळ जाणार होते… त्या बाजूला त्या इमारतीला खिडक्या नव्हत्या! साहेब आणि त्यांचे दल त्या इमारतीच्या अगदी भिंतीपर्यंत पोहोचले… पण कसं कुणास ठाऊक… त्या दहशतवाद्यांनी इमारतीवरून उद्या घेऊन त्या दाट शेतात आश्रय घेतला! साहेब त्या इमारतीच्या तळमजल्यावरच्या खोल्यांत पोहोचले!

आत चूल पेटली होती… भात रटरटत होता… दूध उकळत होतं. चुलीपुढे बसलेल्या वृद्ध महिलेने आणि घरातल्या बाजांवर निपचित पडलेल्या तीन पोरींनी साहेबांच्या अशा आत घुसण्यावर काहीही प्रतिक्रिया नोंदवली नाही… जणू काही झालंच नाही… असा त्यांचा अविर्भाव होता! सैनिक इमारतीच्या छतावर गेले… तोच त्यांच्या दिशेने गोळीबार सुरु झाला… पण नेमक्या गोळ्या कुठून येत होत्या… हे कळायला काही मार्ग नव्हता… कारण उंच गवतामुळे दहशतवादीसुद्धा अंदाजेच गोळीबार करीत असावेत!

साहेबांनी मोक्याची जागा शोधली… त्या शेतातल्या सुमारे पाऊणशे मीटर्स अंतरावर त्यांना थोडासा धूर वर येताना दिसला… अर्थात दहशतवादी तिथ होते तर! साहेबांसोबत असलेल्या जवानांला त्याच्या हातात असलेले Rocket Launcher डागण्याजोगी स्थिती सापडत नव्हती. आहे त्या स्थितीत सरळ rocket डागले तर ते दीडशे मीटर्सवर गेल्यावरच फुटणार… म्हणजे जिथे हे दहशतवादी होते त्यांच्या पलीकडे जाऊन ते फुटणार होते… म्हणजे उपयोग फारसा होणार नव्हताच. अशा स्थितीत मेजर साहेबांनी स्वत: धोका पत्करला… rocket डागण्याचा अनुभव नसताना साहेबांनी launcher खांद्यावर घेतले… खांदा, पाय यांना दुखापत होण्याचा धोका होताच… साहेबांनी launcherचा कोन बदलला… ते सरळ न धरता आकाशाकडे काहीसे वर केले आणि डागले… गोळा थेट वर गेला… तिथून पुढे गेला… आणि बरोबर सुमारे पंचाहत्तर मीटर्सवर हवेत फुटला… खाली लपलेल्या दहशतवाद्यांवर आग कोसळली… काम फत्ते झाले होते! पण अजून धोका संपला नव्हता. ते दहशतवादी अधून मधून गोळीबार करीत होतेच!

यावर उपाय म्हणून साहेबांनी एक वाहन मागवून घेतले… वाहनावर आडोसा ठेवून त्याच्यामागून गोळीबार करीत त्या वाहनातून साहेब पुढे निघाले… त्या शेतातील पीक तुडवीत… चालकाला पुढचे काही दिसत नव्हते… साहेब गोळीबार करता करता चालकाला दिशा सांगत होते… अचानक चालकाला गोळी लागली… वाहन मागे घ्यावे लागले… दुसरा चालक घेतला… वाहन पुढे निघाले… पण आधी त्याच वाहनाने त्या रस्त्यावरील पीक आडवी केल्याने रस्ता साफ झाला होता… ते दहशतवादी आता नजरेच्या टप्प्यात आलेले होते… साहेबांनी आणि इतरांनी त्या सहा जणांच्या डोक्यात नेम धरून गोळ्या मारल्या…!

साहेब वाहनावरून खाली उडी मारून पुढे जाण्याच्या अगदी बेतात असताना त्यांच्यापेक्षा पदाने कनिष्ठ परंतू अनुभवाने ज्येष्ठ असलेल्या सैनिकाने सांगितले… साहेब… रायफल लोड करूनच खाली उतरा… साहेबांनी ते मानले… आणि खरंच… त्या पिकाच्या दुस-या बाजूला हालचाल दिसली… सातवा दहशतवादी तिथे होता… जखमी परंतू गोळीबार करण्याच्या स्थितीत. साहेबांनी आणि इतरांनी मिळून त्याच्यावर शेकडो गोळ्या झाडल्या… आणि त्याच्या शरीराची चाळण केली… कामगिरी फत्ते झाली होती!

मेजर साहेबांना अशा कामगिरी काही नव्या नव्हत्या! त्यांनी शांतपणे त्या दहशतवाद्यांच्या देहांची पुढची व्यवस्था करण्याच्या कामाला सुरुवात केली… तेवढ्यात ती वृद्धा पुढे आली… म्हणाली… मला साहेबांना काही सांगायचे आहे! मेजर साहेब त्या वृद्धेवर आधीच रागावलेले होते… तिने फक्त सहाच दहशतवादी आहेत, असे सांगितल्याचा साहेबांचा समज होता… आणि प्रत्यक्षात सात निघाले होते! . पण सहा आकडा त्या वृद्धेने सांगितलेला नव्हता असे सहकारी अधिका-याने साहेबांना सांगितले. तिची वाट रोखून धरणा-या अधिका-याला जवळजवळ ढकलून ती वृद्धा पुढे आली… आणि मेजर साहेबांच्या पायांशी बसली.. त्यांचे पाय घट्ट धरून! आता साहेब थोडे नरमले… इतकी म्हातारी बाई… आपल्या पायाशी बसते! साहेबांनी तिला उभे केले… त्यावर ती वृद्धा म्हणाली… माझं फक्त एवढं ऐका.. साहेब! इतका वेळ मी माझ्या आणि माझ्या नाती असलेल्या या अभागी मुलींच्या जीवाच्या भीतीने काही बोललो नव्हतो… हे सात जण जगले असते… तर त्यांनी आमचे आणखी हाल केले असते, साहेब! या माझ्या तिन्ही नातींवर या सातही जणांनी रात्रभर पाशवी अत्याचार केले हो.. माझ्या नजरेसमोर! तुम्ही हे जगाला निश्चितच सांगा… या सात दहशतवाद्यांपैकी पाच जण आमच्याच रक्ताचे… आणि उरलेले दोघे पाकिस्तानी… आमच्या लोकांच्या वेशात आलेले राक्षस… होते! अतिरेकाचे हे भयावह रूप… आपल्याच माणसांच्या हातून आपल्याच माणसांचे बळी घेणारे! भारतात अराजक माजवण्यासाठी पाकिस्तान कोणत्याही थराला जाऊ शकतो, भारातीयांना भडकावू शकतो हेच यातून सिद्ध झाले.. आजही हे सुरु आहे. मात्र भारतीय लष्कर समर्थपणे मुकाबला करते आहे.. आणि करीत राहील!

ती वृद्धा बोलत असताना त्या तिन्ही मुली पुढे आल्या… त्यातली एक तर केवळ अकरा-बारा वर्षांची. वृद्धेने त्या मुलीच्या गळ्यातला दुपट्टा बाजूला केला… गळ्यावर, चेह-यावर चावल्याच्या, ओरबाडल्याच्या असंख्य खुणा… कुत्तरओढ झालेली नुसती! पोरी भेदरून गेलेल्या हरिणी जणू… पशूंना अगतिकतेने शरण गेलेल्या… नव्हे जावं लागलेल्या!

मेजर पहाडासारखा कणखर माणूस… पण ते दृश्य पाहून त्याचे अंत:करण द्रवले… डोळे भरून आले… मेजर साहेबांनी त्या चौघींना हात पसरवून जवळ घेतले… एका आलिंगनात.. आणि आसवांना वाहण्याची अनुमती दिली काही क्षण! अतिरेक्यांच्या डोक्यात गोळ्या घालताना न थरथरलेले त्यांचे हात त्या लेकरांच्या माथ्यांवर फिरताना थरथरत होते!

या पहाडाचे नाव… मेजर ए. के. रवीन्द्रन… ऊर्फ मेजर रवी(निवृत्त). रवी साहेबांना दोनदा सेना मेडलने गौरवण्यात आले आहे. साहेबांनी जम्मू-काश्मीरमध्येही पराक्रम गाजवून पदक मिळवले आहे… अंदमान निकोबार मध्ये लष्करी गुप्तचार विभागात सेवाही केली आहे. भारताचे तत्कालीन पंतप्रधान कै. राजीव गांधी यांच्या संशयित मारेक-यांना पकडण्याच्या मोहिमेचे ते प्रमुख होते. आपल्या पराक्रमाचे श्रेय सर्व सहकारी दलाचे आहे… असे ते आवर्जून सांगतात. त्यांच्या सोबत लष्करी कारवाईत महत्वाची कामगिरी बजावलेल्या प्रत्येकाला सन्मान मिळवून देण्याचे प्रयत्न त्यांनी केले. सध्या ते खाजगी सैन्य प्रशिक्षण केंद्र चालवतात… आणि त्यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारीत कीर्ती चक्र, कर्मयोद्धा इत्यादी चित्रपटांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मितीही केली आहे. लष्कराची योग्य ती प्रतिमा जनमानसात रुजावी यासाठी ते चित्रपट निर्मात्यांना लष्करविषयक सल्ला देण्याचे कामही करत असतात!

मेजर रवीन्द्रन यांची फारशी माहिती मराठी वाचकांना नसावी. Monks and warriors नावाच्या podcast मध्ये त्यांनी मुलाखत बघायला मिळाली. केवळ एका असामान्य लष्करी अधिका-याची माहिती सामान्य मराठी वाचकांना व्हावी, या उद्देशाने, संबंधित podcast निर्मात्यांचा कॉपी राईट भंग होण्याचा गुन्हा हातून घडण्याची आणि कारवाई होण्याची शक्यता, असा धोका पत्करून मी हे लिहिले आहे. जय हिंद!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted