मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “ओळख” ☆ मंजुषा सुनीत मुळे☆

मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “ओळख” ☆  मंजुषा सुनीत मुळे  ☆

☆

सारी सृष्टी गोठवणारा थंडीचा कडाका …. थिजलेलं वातावरण ..

आम्ही आमच्या घरट्याच्या उबेत लपेटलेले .. ..

.. आणि दूर झाडाखाली कुणीतरी ..

.. गारठण्याची संवेदनाच जणू गोठलेला .. ..

.. .. .. बधीरसा .. शरीराने .. अन् मनानेही ।।

 

ग्रीष्माची धगधगती काहील ….सूर्याच्या साक्षीने होरपळणारी सृष्टी ..

आम्ही आमच्या घरट्याच्या सुखद गारव्यात विसावलेले .. ..

.. आणि तिकडे दूर कुणीतरी ..

.. निष्पर्ण झाडाची सावली शोधत ..

.. .. .. अंगांगाची आग उन्हानेच विझवणारा .. केविलवाणा ।।

 

सृष्टीलाच वाहून न्यायला आलेला धुंवाधार पाऊस ….फाटलेलं आभाळ ..

आम्ही आमच्या घरट्याच्या छपराखाली सुरक्षित .. पावसाची गंमत पहात .. ..

.. आणि दूर पलीकडे कुणीतरी ..

.. जणू वाहून जायलाच आलेला ..

.. .. .. पण नशिबाला धरून लोंबकाळणारा .. बिच्चारा ।।

 

 

.. .. .. कोण हा कुणीतरी ?? .. दरवेळी न चुकता दिसणारा ?? .. ..

 

.. .. .. .. अरे हे तर साक्षात दारिद्र्य ….

.. ..  पण भाग्य त्याचं थोर .. ..

.. आम्ही निदान अजून ओळखतोय तरी त्याला ..

.. .. लांबून का होईना .. पण ओळखतोय .. .. ..

☆

© मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ झपूर्झा ! गडे झपूर्झा! ☆ कल्याणी केळकर बापट ☆

कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ झपूर्झा ! गडे झपूर्झा! ☆  कल्याणी केळकर बापट ☆

(सात आक्टोबर  : पुण्यतिथी निमित्त)

कवी स्व केशवसुत (कृष्णाजी केशव दामले)

साहित्य वाचायची, समजून घ्यायची एकदा सवय झाली की मग आपोआप लिहायची पण सवय होते. लिहायच्या प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात आणि म्हणूनच मग आपल्याला प्रत्येक लिखाणात वेगवेगळी गोडी, खुमारी जाणवायला लागते.

आपले विचार, मत हे विस्तृत स्वरूपात मांडायच ठरवलं की ते भरपूर उदाहरण, दाखले देऊन वर्णन पर लिहिले की ते गद्य प्रकारात मोडतं आणि हेच आपले विचार, भावना अतिशय कमी शब्दात व्यक्त करता आल्यात तर ते पद्य ह्या प्रकारात मोडतं.

गद्य  म्हणजे दैनंदिन बोलण्याच्या नैसर्गिक प्रवाहातील, व्याकरणाचे नियम पाळून साध्या व सरळ भाषेत केलेले लेखन . यात कथा, कादंबरी, निबंध, नाटक, चरित्र, आणि पत्रे यांसारख्या साहित्य प्रकारांचा समावेश असतो. तर पद्य म्हणजे छंद, लय, यमक आणि विशिष्ट अक्षररचना किंवा मात्रेच्या नियमात बांधलेली कविता, अभंग, ओवी किंवा श्लोक-रूपी रचना होय हे गद्याच्या विरुद्ध असते, कारण यात भावनांना नाद आणि यमकाद्वारे काव्यात्मक रूप दिले जाते.

गद्य प्रकारात लिहिण्यापेक्षा पद्य प्रकारात मांडणं हे जास्त कठीण कारण किमान शब्दांत कमाल भावना वाचकांपर्यंत पोहोचवायच्या असतात.

एकदा साहित्याची आवड निर्माण झाली की मग आपोआप आपलं लक्ष, नजर ही त्यातील सौदर्यावर पडते. मग ते सौंदर्य कथा, कादबं-या, कविता, लेख चारोळ्या इत्यादी प्रकारांमध्ये आपल्याला आढळतं. मग आपल्याला आवडत्या प्रकारांमधील आपला अजूनअजून शोध सुरु होतो.

आजची तारीख म्हणजे ह्या साहित्यातील कठीण प्रकार आपल्या वेगळ्या आधुनिक काव्याच्या शैलीत मांडणाऱ्या केशवसुतांची जयंती. कवी केशवसुत यांचे संपूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले असून त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक मानले जाते.

इंग्रजी काव्यातील चौदा ओळींचा सॉनेट हा काव्यप्रकार ‘सुनीत’ या नावाने त्यांनी मराठीत लोकप्रिय केला. त्यांनी लिहिलेल्या कवितांपैकी फक्त 135 कविताच आज उपलब्ध आहेत.  त्यांच्या कवितांमध्ये अनेक प्रकारचे नानाविध विषय दिसून येतात. अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, परस्पर स्नेहभाव, स्त्रीपुरुषांमधील प्रेम, त्याचबरोबर सामाजिक बंडखोरी, मानवतावाद, राष्ट्रीयत्त्व, गूढ अनुभवांचे प्रकटीकरण, आणि निसर्ग असे अनेक विषय त्यांनी अगदी सहजपणे हाताळले आहेत. इंग्रजी काव्य परंपरेतील रोमॅण्टिक समजला जाणारा सौंदर्यवादी दृष्टीकोन प्रथम मराठी साहित्यात आणि काव्यात आणण्याचा मान केशवसुतांकडे जातो.

त्यांची साहित्य, कविता ह्या बाबतीत स्पष्ट आणि परखड मतं होती. प्रत्येक कवीची प्रतिभा ही त्यांची स्वतःची स्वतंत्र असावी असे त्यांचे म्हणणे होते. काव्य हे कायम उत्स्फूर्त असावे ते कुठल्याही हुकूमानुसार नसावे असे त्यांचे म्हणणे होते.  त्यांच्या काव्य विचारांवर वर्डस्वर्थ, शेली, किटस् यांसारख्या इंग्रजी कवींचा मोठा प्रभाव होता, पण ह्या प्रभावाने  त्यांच्या भारतीय शैलीच्या मध्ये आला नाही हे पण खरे. ‘आम्ही कोण?’, ‘झपुर्झा’, ‘तुतारी’, ‘नवा शिपाई’ या त्यांच्या अत्यंत प्रसिद्ध व गाजलेल्या कविता आहेत.

भगवतगीतेतील स्थितप्रज्ञाच्या लक्षणांचा मुक्त आविष्कार आपल्याला त्यांच्या झपूर्झा ह्या कवितेत वाचायला आणि अभ्यासायला मिळतो. ह्या कवितेतील चार ओळी पुढीलप्रमाणे,

हर्षखेद ते मावळले, हास्य निमाले, अश्रु पळाले।

कंटक-शल्यें लव वठली; कांहीं न दिसे दृष्टीला l

प्रकाश गेला, तिमिर हरपला

      काय म्हणावें या स्थितिला ?—

                         झपूर्झा ! गडे झपूर्झा !

अशा ह्या प्रतिभावान कवींचे दिनांक 7 नोव्हेंबर 1905 रोजी दुःखद निधन झाले. 

©  कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘प्रकाशाच्या सावल्या…’ ☆ शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

?जीवनरंग ?

☆ ‘प्रकाशाच्या सावल्या…’ ☆ शांभवी मंगेश जोशी ☆

पालखी खांद्यावर घेतली नि माझा रोम-रोम शहारला!, भक्तिभावानं अवघी काया पुलकित झाली, डोळे आनंदाश्रूंनी भरून गेले.

त्या गुरुवारी प्रथेप्रमाणं सायंकाळी साग्रसंगीत पूजा आरती झाली नि पूर्व दरवाजापासून प्रदक्षिणा सुरू झाली. पश्चिम दरवाजाला पालखीला आधार देऊन उभं केलं. दत्तमहाराजांची पदं आणि स्तोत्रं सुरू झाली. ईश्वरीय जाणिवेनं माझ्या सर्वांगातून विजेचं चैतन्य वहात होतं. ह्यालाच साक्षात्कार म्हणत असावेत असं मनोमन वाटून गेलं. समोर उभा असलेला अफाट

 जनसमुदाय मला दिसत नव्हता. फक्त दत्तमहाराजांची मूर्ती डोळ्यांना दिसत होती. अननुभूत अशा प्रसन्न जाणिवेनं मी पूर्णपणे विलीन झालो होतो. तीन प्रदक्षिणा पूर्ण झाल्या आणि अत्यानंदात मी हरखून गेलो.

याचसाठी केला होता अट्टाहास… !

खरोखर! दत्तमहाराजांच्या पालखीची सेवा मिळणं ही साधी सोपी गोष्ट नव्हती. अनेकजण त्यासाठी आस लावून बसले होते. ते भाग्य माझ्या पदरात पडलं होतं. एवढ्या दिवसांची तपश्चर्या होती. व्रतस्थ आणि नेमस्त जीवनाची ती फलश्रुतीच होती. शिवाय माझ्या वडिलांची आणि आजोबांची पूर्वपुण्याई.

मी श्रीपाद अवधूत पंत! आप्पा म्हणजे माझे वडील अवधूत महामुनिश्वर पंत! महामुनिश्वर गोरक्षनाथ पंत म्हणजे माझे आजोबा. माझ्या वडिलांच्या जन्मानंतर लगेचच माझी आजी वारली. तेव्हापासून आजोबांनी स्वतःला दत्तमहाराजांच्या सेवेत झोकून दिलं. वडिलांना वेदांचं, उपनिषदांचं ज्ञान दिलं. कठोर अनुशासनात ते त्यांच्याकडून ध्यानधारणा, जपतप सारंकाही करून घेत. आजोबांसारखेच वडीलही अधिकारी पुरुष बनले. आजोबांची दत्तात्रेयांवर नितांत श्रद्धा होती. वडीलही आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून दत्तभक्त झाले. आजोबांची परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवली. योगायोग असा की आजीसारखीच माझी आईपण माझ्या जन्मानंतर लगेच निवर्तली. म्हणून लग्न करायचंच नाही, अविवाहित राहून भक्तिमार्गात राहायचं असं मी ठरवून टाकलं होतं. वडिलांनाही माझं अध्ययन आणि दत्तमहाराजांची सेवा याशिवाय दुसरं विश्वच उरलं नाही. म्हणूनच माझ्या खांद्यावर पालखी पाहून त्यांना कृतकृत्य वाटलं. रात्री झोपतांना आप्पांनी अपार कौतुकानं माझ्याकडं पाहिलं. पालखीची सेवा मला मिळाली म्हणून त्यांच्या उरीपोटी माझ्याबद्दल प्रेम दाटून आलं. ज्या असोशीनं त्यांनी मला ज्ञान दिलं, त्याचं सार्थक झालं. त्यांच्या जन्माची तीच जणू इतिकर्तव्यता होती.

त्यांचा प्रेमळ हात माझ्या मस्तकावर ठेवून आप्पा म्हणाले, ‘‘गुरुदेवांनी सोनं केलं बघ आपल्या जन्माचं! आता हे पालखीचं कार्य तू पुढं नेशील, मी डोळे मिटायला मोकळा. ’’

माझे डोळे मात्र भरून आले. त्यांच्या हातातून, स्पर्शातून त्यांचे आशीर्वाद मला मिळाले. आशीर्वादाबरोबर साता जन्माचं संचितच जणू त्यांनी मला दिलं.

त्या रात्री अतीव समाधानानं मी झोपी गेलो. सारी रात्र खांद्यावर पालखीची जाणीव मला होत होती. पहाटे रोजच्यासारखी जाग आली. स्नान, संध्या, पूजा, उपासना झाली. प्रत्येक क्षणी खांद्यावर पालखीत दत्तमहाराज असल्याची जाणीव होती. त्याचवेळी पुढच्या गुरुवारच्या पालखीची मी वाट पहात होतो. गुरुवार आला. पुन्हा खांद्यावर पालखी घेऊन प्रदक्षिणा झाल्या. तीच धन्यता, तेच समाधान! अपूर्व! तरीही अपुरं! पुन्हा-पुन्हा, पुन्हा-पुन्हा आणि पुन्हा-पुन्हा! प्रत्येक गुरुवारी. नित्याचंच. समाधानही तेच होतं मन व्यापून टाकणारं नि काळजात भरून रहाणारं. दर गुरुवारी खांद्यावर पालखीत आणि एरवी पालखीशिवाय दत्तमहाराज सतत माझ्यासवेच असायचे आणि त्यांच्याबरोबर मी दिव्य आनंदात! हा दिव्य आनंदाचा कुंभ माझ्या काळजात ओतप्रोत भरलेला होता. त्याला कधीही ओहोटी लाहणार नाही याची मला खात्री होती. कारण माझी श्रद्धा आणि वाडवडिलांचे आशीर्वाद यांची मोठी पुंजी माझ्याजवळ होती. माझं रोजचं जगणं, रोजची दिनचर्या, दत्त, दत्त आणि दत्तमय होऊन गेली होती.

दररोज सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत मी मंदिरात असे. अनेक भक्तांची पादुकांना अभिषेक करण्यासाठी रांग लागलेली असे. ते सर्व अभिषेक करण्याची नित्यसेवा माझी होती. गाभार्‍यात कुणालाच प्रवेश नव्हता. गाभार्‍याचा एक दरवाजा म्हणजे एक छोटीशी कमान होती. त्या कमानीतून लोक फक्त अभिषेकाचे ताट आत सरकवत आणि गोत्र सांगत. त्यांचे पूर्ण दर्शनही आम्हाला आतून होत नसे. त्या दिवशी खूप अभिषेक झाले. दहा वाजता दोन सुंदर हातांनी एक तबक आत सरकवले. मला वाटतं तोच क्षण होता. बहुधा! ज्या क्षणी माझ्या काळजातला आनंदाचा कुंभ डळमळायला सुरुवात झाली असावी. पण मला मात्र त्याची यत्किंचितही जाणीव नव्हती.

ते गोरेपान सुंदर हात मी पहातच राहिलो. लांबसडक, निमुळती बोटं आणि नक्षीदार बिलवर! त्यातच माझी नजर अडकून पडली.

आप्पा पण तिथेच होते गाभार्‍यात. ते म्हणाले, ‘‘दहा वाजले. आता वेळ संपली अभिषेकाची. उशीर झाला आहे. ’’

‘‘हो उशीर झालाय, पण मी खूप वेळची रांगेत उभी आहे. कृपया नाही म्हणू नका, माझा नवसाचा अभिषेक आहे. ’’

‘‘मागे किती लोक आहेत रांगेत? ’’ आप्पांनी विचारलं. ‘‘नाही, आता कुणीच नाही. ’’

आप्पा म्हणाजे, ‘‘ठीक आहे, पण नेहमी दहाच्या आत येत जा. ’’

‘‘हो गुरुजी. ’’

‘‘गोत्र सांगा. ’’

‘‘गार्ग्य’’.

 एवढा मंजुळ आवाज मी कधीच ऐकला नव्हता आणि एवढे सुंदर हातही मी कधीच पाहिले नव्हते. आप्पांनाही बहुदा त्या मंजुळ आवाजातलं आर्जव ऐकून नाही म्हणायला जमलं नसावं.

 ‘‘श्री अभिषेक करून घे. ’’

मी आप्पांनी दिलेली आज्ञा शिरसावंद्य मानली.

शेवटचा अभिषेक केला. प्रसाद दिला नि रोजच्या दिनक्रमात मी बुडून गेलो. दुसर्‍या दिवशी त्या सुंदर हातांनी अभिषेकाचं ताट सरकवलं. गोत्र सांगितलं. तिसर्‍या आणि चौथ्या दिवशी तर सकाळी आठ वाजता पहिलंच तबक त्या हातांनी सरकवलं. मीच विचारलं ‘‘गार्ग्य का? ’’ आप्पांनी चमकून माझ्याकडं पाहिलं.

‘‘रोज अभिषेक करता का? ’’

‘‘हो अकरा दिवसांचा नवस आहे. ’’

नकळत मी त्या सुंदर हातांची वाट पहात राहिलो. काही कारण नसतांना. खरचंच त्यानंतर सात दिवस ते हात मला दिसत राहिले आणि मी आनंदीत होत राहिलो. इथंच धोक्याची सूचना माझ्या लक्षात यायला हवी होती. ती आली नाही, कारण पुढं खूप काही वेगळंच घडायचं होतं माझ्या आयुष्यात.

माझी नित्यसेवा, उपासना चालूच होती मनोभावे. एक दिवस पंचांग घेऊन सभामंडपात बसलो होतो. रोज तासभर बसत असे, तो शिरस्ताच होता. कुणा-कुणाचे प्रश्न असत. त्यांना पंचांगात पाहून उत्तर देत असे.

अचानक त्या सुंदर हातांनी एक कागद माझ्या पुढे ठेवला. त्या ओळखीच्या हातांकडे मी पहात राहिलो. तेवढ्यात तो ओळखीचा मंजुळ आवाज कानावर पडला, ‘‘पत्रिका पहायची होती’’. हातांसारखाच तो आवाजही सुखावणारा होता.

‘‘काय प्रश्न आहे? ’’

‘‘लग्न कधी होईल? ’’

मी पत्रिका नीट पाहिली आणि सांगितलं, ‘‘तुळशीच्या लग्नानंतर पहिल्या मुहूर्ताला. ’’

‘‘खरंच? ’’ तिनं आनंदून विचारलं. मी वर पहात म्हटलं ‘‘खरंच’’.

त्या सुंदर हातांइतकीच ती सुंदर होती. अप्रतिम लावण्यवती.

माझ्या उत्तरानं ती आनंदून गेली. तिच्या सुंदर हातांनी मला नमस्कार केला. मी समोरच पहात राहिलो. ती निघून गेली तरी तिचा सुंदर चेहरा मला दिसत राहिला.

उठून उभा राहिलो. तेव्हा समोरच्या आरशात माझं लक्ष गेलं. मला आश्चर्यच वाटलं. यापूर्वी असं कधीच माझ्या प्रतिमेकडे लक्ष गेलं नव्हतं. आरसा तर पूर्वीपासून होता. माझ्या आयुष्यात काही नवीन प्रतिमा उभरण्याची तर चिन्ह नसावीत?

छे! काहीतरीच! मी मान झटकली. पुन्हा स्वतःच्या आरश्यात न्याहाळू लागलो. ‘‘तसा मीही चांगला आहे दिसायला. शेंडी काढून भांग पाडला तर अजूनच देखणा दिसेन. ’’

हे काय चाललं होतं माझ्या डोक्यात? आजपर्यंत कधी असे विचार माझ्या ध्यानीमनी नव्हते. मी असं कधी स्वतःला मोठ्या आरशात पाहिलं नव्हतं. हंऽ काहीतरीच. म्हणून मी पुन्हा मान झटकली.

‘‘मी तुमची दक्षिणा दिलीच नाही. ’’ ती पुन्हा आली होती. मी चमकून पहात राहिलो. खरं तर मी भान हरखून पहात होतो. तिनं भानावर आणलं.

‘‘नाही का, लग्न कधी होईल म्हणून प्रश्न विचारला. ’’

‘‘कुणाचं लग्न. ’’

‘‘इश्य! ’’ म्हणून ती लाजली.

भानावर आलेला मी परत भान हरपून पहात राहिलो.

‘‘सांगा ना!… दक्षिणा? ’’

दचकून मी म्हटलं, ‘‘छे छे काहीतरीच! दक्षिणा कसली? ’’

ती हसली आणि निघून गेली. तिचं हसणं म्हणजे गुलाबपाण्याचं शिंपणच. त्यानं सुखावून माझं लक्ष पुन्हा आरशातल्या माझ्या छबीकडे गेलं. क्षणभर माझ्या शेजारी ती मला दिसली. वाटलं छान दिसतोय जोडा. या विचारासरशी माझं मन आकाशात तरंगू लागलं.

‘‘श्रीपाद अरे चल, कीर्तनाची वेळ झाली. ’’ माझं विमान धाडदिशी जमिनीवर आदळलं. माझ्या अधीर मनाला मी गप्प केलं. लग्न, स्त्री याचा कधी विचार केला नव्हता. मला करायचाही नव्हता. ‘‘श्रीपादऽ’’ पुन्हा आप्पांची हाक आली. ‘‘आलो… आलो. आप्पा’’ म्हणून मी धावत कीर्तनगृहात गेलो. आप्पा पेटीचा भाता उघडून तयार होते. मी येताच त्यांनी सूर धरला. मीही ठोकून ठोकून तबला लावू लागलो. खरं तर माझे विचार… सैरभैर धावणारे… ठोकून लावण्याची गरज होती. ते जमेना म्हणून तबलाही सुरात लागेना. माझ्या मनात त्या सौंदर्यवतीचा लागलेला सूर मात्र सुटेना!

शेवटी मी तबल्यावर थाप दिली. भास्करबुवांचं कीर्तन सुरू झालं. सुरू झालं अन् संपलं. संपल्यावरही मी वाजवतच होतो. आप्पा ओरडले, तेव्हा दचकून थांबलो. सार्‍या कीर्तनभर मी काय वाजवत होतो कुणास ठावूक! माझ्या डोळ्यासमोर आमची दोघांची… माझी आणि त्या लावण्यवतीची आरशात प्रतिमा दिसत होती. रात्री झोपतांना आप्पा म्हणाले, ‘‘श्री, अरे आज भजनी ठेक्याच्या ऐवजी त्रिताल वाजवत होतास, बुवा भजन म्हणत असतांना बुवा तुझ्याकडे बघत होते. तुझं अजिबात लक्ष नव्हतं. काय चाललंय तुझ्या डोक्यात? ’’

‘‘हं… ! दमला असशील. झोप आता. ’’ मी कुशीवर वळून झोपण्याचा प्रयत्न करीत होतो. पण डोळ्यापुढं तीच दिसत होती. ती, तिचं हसणं, तिचं ते गुलाबपाण्याचं शिंपण, तिचे सुकोमल हात… तिचा मृदुमधूर कानात रुंजी घालणारा आवाज!! छे छे छे काय पहात होतो मी? कशासाठी? माझा काय संबंध तिच्याशी? ती… ती कोण – ती? मला तर तिचं नावही माहीत नव्हतं. पत्रिका पाहिली पण तिचं नावही नाही विचारलं. हे सारं थांबवलंच पाहिजे. असा निश्चय करून मी झोपेची आराधना करू लागलो.

त्यानंतर दोन-चार दिवस ती कुठेच दिसली नाही. वाटलं बरं झालं. विषयच संपला. पण दुसरे दिवशीच पहाटे-पहाटे ती दिसली. मी मंदिराच्या पायर्‍या चढतांना अचानक तिच्या हातातली फुलांची परडी माझ्या पायाशीच लवंडली. हा खूपच शुभसंकेत वाटला मला. ती लगबगीने तिच्या सुंदर हातांनी फुलं वेचू लागली. तिच्या चेहर्‍यावर लज्जेचे भाव मला जाणवले. म्हणजे तिच्याही मनात… ? छे! चालली परत माझी गाडी रूळ सोडून!

त्याच दिवशी माझ्या मनाचं पाखरू पुन्हा पंख लावून उडू लागलं. ती एका वयस्कर स्त्रीसमवेत आप्पांसमोर बसली होती. ती स्त्री आप्पांना काही कागद दाखवत होती. ती लाजत होती. मला वाटलं तिची आई… की कोण माझ्यासाठी ह्या सौंदर्यवतीचा प्रस्ताव मांडत होती, किंवा मांडत असावी. असं वाटल्यावर माझ्या मनाचं पाखरू उडणारच ना! उंच… उंच… ! पण… पण मी तर निश्चय केला होता ना लग्न न करण्याचा?

रात्री झोपतांना आप्पा त्या संबंधात मला काही विचारतील, सांगतील असं मला वाटत होतं. किंबहुना मी वाट पहात होतो. पण आप्पांनी चकार शब्दानं काही विषयसुद्धा काढला नाही.

त्यानंतर जवळजवळ महिनाभर ती दिसलीच नाही. कुणाजवळ काय न् कशी चौकशी करणार? माझी बेचैनी वाढत होती. जेवढा मी तिच्या विचारापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होतो तेवढा त्यात अधिकाधिक अडकत चाललो होतो. रात्रीची झोप लागेना. थोडी लागली तरी स्वप्नात ती दिसत होती.

त्याचा परिणाम पहाटे उठण्यावर, माझ्या जपावर, साधनेवर होत होता. जेवणही जात नव्हतं. अशक्तपणा आला होता. सगळं आरोग्य बिघडलं होतं. कशातच स्वारस्य वाटत नव्हतं. बुद्धीला समजत होतं, तिचा विचार करण्यात काहीच अर्थ नाही. काही संबंध नाही. पण मन काही ऐकत नव्हतं. वाटत होतं कदाचित आप्पांना त्या स्त्रीनं माझ्यासाठी विचारलं असेल. आप्पांनी परस्पर नाहीम्हणून सांगितलं असेल का? आप्पांना काही विचारण्याचा धीरही होत नव्हता. आप्पांना नको आहे का माझं लग्न? या विचारासरशी मी सटपटलो. आप्पांना काय मला तरी कुठं हवं होतं लग्न आतापर्यंत? पण आता… ? माझ्या मनातल्या युद्धामुळं माझी हालत दिवसेंदिवस खराब होत चालली होती.

आप्पांच्याही लक्षात आलं असावं. आप्पा म्हणालेसुद्धा, ‘‘कारे श्री नीट जेवत नाहीस? चेहरा सुरकुतल्यासारखा दिसतोय. काही होतंय का? तब्येतीकडे दुर्लक्ष करू नकोस रे बाळा. काही त्रास होत असेल तर विश्रांती घे चार दिवस… ’’

‘‘नाही आप्पा तसं काही नाही. ’’

‘‘अरे नाही काय, मी पहातोय तुला नीट जेवण जात नाही. वैद्यांना तब्येत दाखवायची का? ’’

‘‘नाही आप्पा काही काळजी करू नका. ’’

हे सगळं थांबवायला हवं. मी मनाला कठोरपणं बजावलं. दत्तमहाराजांच्या सेवेत खंड पडता कामा नये. उद्या गुरुवार आहे. पालखीची सेवा रुजू करायलाच पाहिजे. आमची तीन पिढ्यांची सेवा, साधना… अशी खंडीत होता कामा नये. दत्तमहाराज काही वावगं होऊ देणार नाहीत. माझ्या भरकटणार्‍या मनाला मी श्रद्धेनं बांधून ठेवलं. आता ती दिसूच नये असं मी म्हटलं. खरंच माझं मन

शांत झालं असं मला तरी वाटलं.

आणि तो क्षण आला. जे हवंसं होतं. पण मी टाळत होतो. गुरुवारची पालखी नेहमीप्रमाणे निघाली. दोन प्रदक्षिणा झाल्या. तिसर्‍या प्रदक्षिणेला पालखी पश्चिम दरवाजाला मी टेकवली. स्तोत्र आणि पदं झाली. करुणात्रिपदी झाली, शेवटचं पद सदानंदानं सुरू केलं. सुरेख आवाज लागला होता. अंतरीच्या तळमळीनं तो गात होता.

 ‘‘आवर मना तू आवर मना

 सांगे तुजला दत्तराणा! ’’

माझं मन शांत होत होतं. तेवढ्यात पुढं वीज चमकावी तसं झालं. पश्चिम दरवाजाच्या समोर काळ्या नक्षीदार खांबाला टेकून ती उभी होती. डोळे मिटून भक्तिभावानं पदं ऐकत होती. ऐकतांना तिची निश्चल समाधी लागली होती. ती… तीच ती! जिला मी विसरू म्हणता विसरू शकत नव्हतो. तिलाही बंद डोळ्यांपुढे मीच दिसत असेन का?

मी भान हरपून तिच्याकडे पहात राहिलो. पहातच राहिलो. तिचा केतकी वर्ण, कमानदार भुवया, कमनीय आकृती… काळ्या दगडात कोरलेलं सुरेख चकाकणारं शिल्प असावं तशी! केवळ अनुपम लावण्य! मी भान हरपून पहातच राहिलो. पद संपल्यावर सदानंदानं मागच्या बाजूनं पालखी उचलली. पण मी जागेवरच उभा… पुतळ्यासारखा! ‘‘श्रीऽ अरे श्रीऽ… ’’ तो हाका मारत होता. पण माझ्या कानात काहीच शिरत नव्हतं. सारा जनसमुदाय मला खाणाखुणा करू लागला पण मी ढिम्म! हळूहळू लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. ती वाढत गेली. जगदीशनं मला हलवून हाक मारली. पण माझ्या सार्‍या संवेदनाच गोठून गेल्या होत्या. सारं शरीर जडशीळ झालं होतं. माझी पापणीही हलत नव्हती. शेवटी माझ्या बाजूने पालखी सदानंद आणि जगदीशने हलकीच पुढे नेली.

प्रसाद घेऊन जनसमुदाय परतला. तीही निघून गेली. पण ती माझ्या नजरेत तशीच! मीही जागेवर तसाच. थोड्यावेळानं जगदीश व सदा आले. तरीही मी तसाच होतो. त्यांनी पुन्हा मला हलवलं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, माझं अंग तापानं फणफणत होतं. त्यांनी उचलून मला घरी नेलं. आप्पांना सांगितलं. वैद्यांना घरी बोलावलं. कपाळावर पट्ट्या, चाटण, काढा सारं काही झालं. मी बराही झालो. पण माझी मनःस्थिती पार बदलून गेली होती. ऐन पौर्णिमेला अंधार दाटून आला.

पालखीचा दिव्य आनंद कुठे लुप्त झाला? दत्तमहाराजांची कृपा, आजोबांची, आप्पांची पुण्याई मला त्यांच्याकडून मिळालेलं संचित, सारं.. सारं कुठे गेलं? त्या सर्व जाणीवाच माझ्या मनातून लुप्त झाल्या. खांबाला टेकून उभी असलेली ती तरुणीच मला दिसत होती. हे काय होत होतं? ज्या गोष्टीचा मी चुकून कधी विचार केला नाही ते माझ्या मनात कुठून आश्रयाला आलं. छे छे हे योग्य नाही अशी मनाची समजूत काढेपर्यंत बुधवार आला.

‘‘श्रीपाद बरा आहेस ना? ’’ रात्री झोपतांना आप्पांनी विचारलं. ‘‘हो आप्पा’’ असं म्हणून मी डोळे मिटले. पण माझी मलाच खात्री नव्हती. ‘‘पालखीच्या स्पर्शानं नक्की बरं वाटेल तुला’’ त्यांच्या भाबड्या आशीर्वादाने मला भडभडून आलं. मी हो म्हटलं न् आतल्याआत कढ दाबत राहिलो.

गुरुवारी संध्याकाळी पालखी घेऊन निघालो. खाली बघतच दोन प्रदक्षिणा पूर्ण केल्या. पश्चिम दरवाजाला मात्र माझ्या नजरेनं दगा दिला. त्या खांबाकडे नजर गेली. खांबापाशी ती सौंदर्यवती होतीच. पण आज तिच्या शेजारी एक देखणा तरुण उभा होता. हो माझ्यापेक्षाही खूप देखणा… दोघं एकमेकांकडे बघत होते. माझ्या काळजात तीव्र कळ आली. पुन्हा मागच्या गुरुवारसारखं होऊ नये म्हणून मी जगदीशच्या खांद्यावर पालखी दिली न् खाली बसलो.

बसलो, ते पुन्हा उठूच शकलो नाही. प्रसादाचं आवरल्यावर सदा नि जगदीश आले. मला उचलून घरी घेऊन गेले. काढा, औषधं, चाटण सारं झालं… पण गुण येईना. माझ्या पायातलं त्राणच गेलं. पायातलं नि मनातलंही!

ती सौंदर्यवती दिसली नि माझ्या खांद्यावरच चढून बसली पालखीत! म्हणजे मीच बसवली. पण पालखीतल्या दत्तमहाराजांचं काय? आयुष्यभर मला दत्तमहाराजांशिवाय विषय नव्हता. हे असं का झालं, कळत नव्हतं! हे चूक आहे हे कळत होतं, पण वळत नव्हतं. आज तर तिच्या शेजारी त्या तरुणाला पाहून मी विद्ध झालो.

सदा नि जगदीशकडून मला कळलं, तिचं नाव नक्षत्रा साने. शहरातून इथे तिच्या मावशीकडे आली होती आणि तो उद्धव क्षेत्रमाडे. भारतीय विमानसेवेत पायलट आहे. त्या दोघांचं पुढच्या महिन्यात लग्न आहे.

हे ऐकल्यावर माझी जगण्याची इच्छाच संपली. मी खाणंपिणं सोडलं. औषधं बंद केली. वैद्य म्हणाले, ‘‘ह्याला काहीतरी मनाचा आजार असावा. शहरात मानसोपचार तज्ज्ञाला दाखवायला हवं. ’’ आप्पांनी खूप समजावलं, पण मी नाहीच गेलो शहरात किंवा मानसोपचार तज्ज्ञाकडे.

आप्पांची आता सारी भिस्त दत्तमहाराजांवर होती. पण मला आता महाराजांसमोर जाण्याचीही लाज वाटत होती. त्यांच्या जागी मी तिला बसवलं होतं. तिच्या गावीही ते नव्हतं. पण मी मात्र स्वतःला अपराधी समजून खंगत होतो.

तिचं लग्न झाल्याचं कळलं. आता तर जीवच नकोसा झाला. बळं बळं आप्पा मला कसेबसे दोन घास खाऊ घालत. तेही बिचारे हतबल झाले होते. दिवसेंदिवस माझी हालत फारच वाईट झाली. शरीराचा सापळा झाला. केस, दाढी वाढली. हातापायातलं त्राण गेलं. एक दिवस सदानी मला देवळाच्या ओसरीत नेऊन बसवलं. खांबाला टेकून आणि आता तो रोजच मला तिथंच बसवू लागला. जरा शुद्ध हवा लागेल म्हणून. पण मी तसाच! आणखी खंगत चाललेला. अशी किती वर्ष गेली कुणास ठाऊक. आता मला भगवे कपडे घातले जायचे. दर्शनाला येणारे सहज नमस्कार करायचे.

एक दिवस सदानी मला सांगितलं तिच्या नवर्‍याच्या विमानाचा अपघात झाला आहे आणि तो बेपत्ता आहे. आणि चमत्कारच झाला. एवढ्या दिवसानंतर मी स्वतःच्या पायावर उभा राहिलो. स्वतःच्या हातांनी थोडं दूध प्यायलो. पुन्हा भगव्या कपड्यांत तिथंच बसून राहिलो. आप्पांच्या डोळ्यांना घळाघळा धारा लागल्या. त्यांनी दत्तमहाराजांचे आभार मानले. मी मात्र आणखीनच तोंड खाली घातलं. दत्त महाराजांना दिसू नये म्हणून.

एक दिवस सहज म्हटलं ‘‘आज पाऊस पडेल… ’’ खरंच पाऊस पडला. कुणाला तो माझ्या शब्दांचा परिणाम वाटला. कुणाची गाय हरवली म्हटलं, ‘‘घाटाच्या पायर्‍यांवर असेल. बोला फुलला गाठ पडली गाय सापडली. ’’

हल्ली वरचेवर असं होऊ लागलं. लोक माझ्या पाया पडू लागले. मला काही-बाही विचारू लागले. मी सांगितलेलं खरं होऊ लागलं असं लोक म्हणू लागले. पालखीच्या सेवेचं फळ इथं दिसत असावं. दत्तमहाराजांची सेवा कधी वाया जाणार नाही. माझं ते झालं ते माझ्यामुळेच. पूर्वसुकृतच असेल ते… तर माझ्या भाकितामुळे मला बराच बोलबाला झाला. दत्तमहाराजांनंतर

लोक माझ्या दर्शनाला येऊ लागले.

एक दिवस ‘ती’ आली. माझ्या पायांवर डोकं ठेवून रडू लागली. म्हणाली, ‘‘महाराज माझं सौभाग्य आता कुठं असेल? कधी भेटेल? अपघातात बेपत्ता झाले आहेत ते. कसे असतील? ’’

मला काय वाटलं कुणास ठाऊक! म्हटलं पौर्णिमेला चालत येईल आपल्या पायांनी. खरंच पौर्णिमेला तो चालत आला. दत्तमहाराजांनी माझ्या तोंडून तिचं भविष्य सांगितलं. ते खरं झालं. दोघंही जोडीने आले माझ्या दर्शनाला. दोघांनी माझ्या पायावर डोकं ठेवलं. मी हातानं आशीर्वाद दिला ‘‘अखंड सौभाग्यवती भव’’ असं म्हणायचं होतं. पण तोंडून शब्दच फुटेना. माझी वाचाच गेली कायमची. ती मात्र दर पौर्णिमेला येते माझ्या दर्शनाला.

माझ्या जीवनात भर अमावस्येला चांदणं पसरतं लख्ख! त्या चांदण्यांच्या प्रकाशात. माझं जगणं म्हणजे त्या प्रकाशाच्या सावल्याच. सतत प्रकाशाच्या शोधात, स्वतः मात्र कायम अंधारलेल्या.

© शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, shambhavijoshi76@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “पितृपक्षातील आगळं वेगळं कायमस्वरूपी अन्नदान… !!!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “पितृपक्षातील आगळं वेगळं कायमस्वरूपी अन्नदान… !!!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

नुकतंच गणपती विसर्जन झालेलं, तरीही रस्त्यावर अफाट गर्दी, त्या गर्दीतून मी वाट काढत चाललो होतो, डोक्यात पितृपक्ष, पैशाचे नियोजन, अन्नदान कोणत्या योग्य ठिकाणी करता येईल याची ठिकाणं मनात आठवत चाललो होतो…. एकूण डोक्यात सगळा सावळा गोंधळ….

अंगावरचे दीडशे किलोचे साहित्य, त्यात ही गर्दी आणि उन्ह, मी वैतागून गेलो होतो.

अशात आमच्या भिक मागणाऱ्या परंतु एका चुणचुणीत मुलाने मला सर सर म्हणून हाक मारली आणि मला थांबवलं. मी गाडी बाजूला घेतली.

‘काय रे बोल पटपट पुढे जायचं आहे… ‘ 

‘सर एक बोलायचं होतं… ‘

‘बोल ना पटपट थोडा गडबडीत आहे… ‘

‘सर कसं बोलू? ‘

तो त त प प करायला लागला.

‘बोल रे कसा पण…. पण पटपट बोल’ 

मी हातातल्या घड्याळाकडे पाहत म्हणालो 

‘ते सर कसं आहे ना… ‘

‘अरे मुद्द्याचं बोल ना बाबा… ‘

‘सर मी एक लाकडी टेबल बघितला आहे, कॅम्पमध्ये एक मस्जिद आहे, त्याच्या आड बाजूला एक जागा आहे, तिथे मी एक धंदा लावायचा म्हणतोय, तिथली परमिशन मिळाली आहे, आता तुमची मदत लागेल. ‘ एका दमात आवंढा गिळत तो बोलला.

‘सांग ना काय लागेल? ‘

 ‘सर कसं सांगू? कसं मागू? ‘ 

‘कसं पण सांग रे बाबा, पण बोल ना’ 

– – मी पुन्हा घड्याळाकडे पाहत म्हणालो.

‘नाही म्हणजे तुम्हाला जमेल का? असा विचार करत होतो, आधीच तुमच्या मागे एवढे खर्च आहेत, त्यात तुमच्या अंगावर पुन्हा माझा खर्च…. ‘

‘अरे काय खर्च आहे तो तरी सांग ना बाबा… ‘

‘सर… सर… काय बोलू…. ‘ त्याला पुढचे शब्द आठवत नव्हते.

‘आठवल्यावर बोल, मला आता जाऊ दे गडबडीत आहे. ‘ असं म्हणून मी गाडीला किक मारली.

सर सर म्हणत त्याने गाडीवरचा हात ओढून धरला…. मला पुढेच जाऊ देईना.

त्याची एवढी अजिजी आणि तळमळ पाहून मला लगेच लक्षात आलं, एखादा व्यवसाय टाकण्यासाठी याला अफाट खर्च लागणार आहे आणि तो त्याला माझ्याकडून हवा होता…

मी परत थांबलो…

थांबल्यावरही पुन्हा तेच… ‘सर सर कसा बोलू… ?

आता माझी खात्री पटली, याला अपेक्षित असणारा खर्च खूप मोठा आहे.

लटक्या रागाने मी त्याला म्हणालो, ‘आता बोल नाही तर फटका खाशील.

खूप मोठी ताकद एकवटून शेवटी तो बोलला, ‘सर मला जिथे जागा मिळाली आहे, तिथे इस्त्रीचे एकही दुकान नाही, मी जर हा इस्त्रीचा व्यवसाय तिथे टाकला तर चांगला चालेल. ‘

पैशाचा भला मोठा आकडा ऐकायची तयारी ठेवून मी तोंडावरचा रुमाल काढून त्याच्याकडे रोखून पहात विचारले, ‘यात मी तुला काय मदत करू? ‘

‘सर मला धंद्याला लागते ती इस्त्री फक्त तुम्ही घेऊन द्या…. ‘

मी उडालोच, “ ही इस्त्री मागण्यासाठी तू माझा तास घालवलास? “

‘हां सर धंद्याला लागणाऱ्या इस्त्रीची किंमत जास्त असते, साडेतीन ते चार हजार रुपये तरी लागतात. तुम्ही इतक्या लोकांचे करता त्यात माझा हा खर्च तुमाला झेपेल का, याचा विचार आला, म्हणून तोंडातून शब्द येत नव्हते. ‘

.. अंगठ्याने जमीन टोकरीत तो खाली मान घालून म्हणाला.

मी गाडीवरून खाली उतरून त्याला जवळ घेतले.

बाब एका किरकोळ इस्त्रीची, पण माझ्या अंगावर असणाऱ्या आधीच्या जबाबदाऱ्यांचा विचार करून, त्याने ती सुद्धा किती नम्रतेने मागितली होती…. मला त्याचं कौतुक वाटलं…!

आपल्या आयुष्यात आपण एखाद्याला कोणतीही गोष्ट मागताना, खरंच त्याची आपल्याला काही देण्याची परिस्थिती आहे का? त्याच्या इतर काही व्यथा आहेत का? सध्या आपल्याला काही देण्याच्या मनस्थितीत तो आहे का, याचा आपण विचार तरी करतो का… ?

आणि हा… ???

ज्याला आजपर्यंत लोकांनी भिकारी म्हणून दूर लोटले, अशा या माणसामध्ये समोरच्या व्यक्तीची परिस्थिती जाणून घेऊन मग आपली मागणी पुढे घेऊन येणे, तेही अत्यंत नम्रतेने…. हा संस्कार याच्यात कुठून आला असेल… ?

– – आपली वेदना कुणीतरी संवेदना म्हणून जपतंय याचा आनंद खूप मोठा असतो… !

डोक्यात हे विचार सुरू होते, मी गप्प उभा होतो, माझं हे गप्प बसणं म्हणजे त्याला नकार वाटला. माझ्या हातातून हात सोडवत तो अत्यंत नम्रतेनं पाया पडून निघाला, जाताना म्हणाला हरकत नाही सर, पुन्हा कधीतरी बघू, यावेळी त्याचा चेहरा रडवेला झाला होता…

…. चंदन हे शितल असतंच, पण मनापासून केलेलं वंदन हे त्याहून जास्त शीतल असतं…. !

ऑक्टोबर हिटच्या रणरणत्या उन्हात त्याचं वागणं म्हणजे थंडगार वाऱ्याची झुळूक वाटली मला….

बाब होती एका इस्त्रीची, आपल्या सर्वांच्याच घरात एखादी इस्त्री कुठल्यातरी कोपऱ्यात पडलेली असते, ही इस्त्री एखाद्याच्या जगण्याचं साधन बनून त्याला माणसात आणू शकेल, असा कधी विचारही आपल्या डोक्यात येत नाही.

(अशा अनेक वस्तू आपल्या घरात आजही पडून आहेत, ज्यांचा आपल्याला फारसा काही उपयोग नसतो, परंतु समोरच्या व्यक्तीला दिल्या तर यातून तो सन्मानानं जगू शकतो, असो, याविषयी पुन्हा केव्हा तरी)

मी त्याला प्रेमाने थांबवलं, ‘ इस्त्री ची किंमत काय आहे? ‘ 

‘सर धंद्याला लागणाऱ्या इस्त्रीची (Heavy Duty Commercial) किंमत जास्त असते साधारण साडेतीन ते चार हजार रुपये’ त्याने पुन्हा खाली मान घातली.

त्याला म्हटलं “ इथून पुढे चार दिवस बाजारात फिर, चांगल्यात चांगली heavy duty commercial इस्त्री शोधून ठेव. चांगल्यातल्या चांगल्या चांगल्या कंपनीची असावी, गॅरंटी वॉरंटी असावी, पैसे लागू देत कितीही…. येत्या दोन दिवसात आपण मोटरसायकल वरून जाऊ आणि तुला हवी ती इस्त्री घेऊन येऊ, करू आपण व्यवसाय सुरू…. ”

त्याचा विश्वासच बसेना, ‘खरंच सर? खरंच सर?? ‘ म्हणत चार वेळा तरी त्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्याने ते पालथ्या-मुठीने पुसले.

‘दुकानाला नाव पण मी सोहम म्हणूनच देणार आहे सर’, हे बोलताना आनंद त्याच्या चेहऱ्यावर मावत नव्हता.

या जगात आईच फक्त अशी आहे…. जी नऊ महिने सांभाळते…… कळा सोसते, जन्माला घालते आणि जन्म झाल्यानंतर आनंदाने त्या बाळाला दुसऱ्याचं नाव देते… !

…. मला या आई सम हा वाटला…. !

येड्या म्हणत मी त्याला छातीशी लावणार, इतक्यात तो पायाशी झुकला, यावेळी त्याचा हात खरोखर चंदनासारखा भासला…. !

येत्या चार ते पाच दिवसात त्याला हवी ती इस्त्री घेऊन देण्याचे वचन देऊन मी तिथून निघालो.

गाडीवर पुन्हा पितृपक्षातील अन्नदानाचेच विचार…

आपण रोज अनेकांना अन्नदान करत आहोत, परंतु ते एका व्यक्तीला एकाच वेळी पुरते…

.. हा जेव्हा कामाला लागेल त्यावेळी तो रोजच्या रोज सन्मानाने स्वतः खाईल आणि स्वतःची ऐपत निर्माण झाल्यावर इतरांनाही नक्की अन्नदान करेल… !

.. आपोआप एक साखळी निर्माण होईल, अन्नदानाची आणि माणुसकीची सुद्धा… !

एका वेगळ्या अर्थाने पितृपक्षात घडलेले हे एक वेगळ्या प्रकारचे अन्नदान होते.

– – पितृपक्षात खऱ्या अर्थाने घडलेले हे अन्नदान माझ्यासाठी सर्वोच्च होते आणि पुढेही राहील…. !

 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मैं भी नाना! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

??

☆ “मैं भी नाना!”  ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

☆

मैं भी नाना!

सामान्य जनता एकेरीच संबोधते अशा माणसांच्या यादीत नाना पाटेकरही आहेत. ते आज गेले आणि प्रथेप्रमाणे मिडिया, वृत्तपत्रे, दूरचित्रवाहिन्या प्रसिद्ध लोकांच्या प्रतिक्रिया घेत आहेत. या प्रतिक्रियांमध्ये नाना कसे होते हे पाव भाग आणि ते मला मी कसा भारी, महान इत्यादी आहे हे म्हणायचे हा उर्वरीत भाग असतो, हे लक्षात येतेच. असो.

जी गोष्ट मी इथं आता लिहितो आहे, ती मला गेल्या कित्येक वर्षांत जाहीर सांगायची होती आणि नशिबात असेल तर प्रत्यक्ष नानांच सांगायची होती! तो प्रसंग आता आयुष्यात येणार नाही!

मी आता ५९ वर्षांचा झालो आहे आणि त्यासाठी मला स्वत:ला काहीही करावं लागलं नाही. पण माझ्या आयुष्यात असा चार-दोन वर्षांचा काळ येऊन गेला की बरेच लोक मला नाना म्हणून संबोधायला लागले… ते का हे मला अगदी सुरुवातीला उमगले नव्हते. १९९३ वर्ष होते आणि मी एका महाविद्यालयात नियमित शिकण्याचा जाण्याचा प्रयत्न करीत होतो. त्यावेळी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहावेत इतके पैसे जवळ नसायचे. आणि त्यामुळे चित्रपटगृहांकडे फिरकण्याचीही फारशी वेळ येत नसे. नव्याने प्रदर्शित होणार असलेल्या, झालेल्या चित्रपटांची पोस्टर्स तिथेच बाहेर लावलेली असायची. क्रांतिवीर प्रदर्शित झाला त्याचे पोस्टरही त्यामुळे माझ्या पाहण्यात आलेले नव्हते. विविध भारती रेडीओ स्टेशनवर चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी श्राव्य कार्यक्रम लागत असत. त्यातही क्रांतिवीर कानांवर पडला नाही.

राष्ट्रीय सेवा योजनेच्या एका युवक महोत्सवासाठी मी अमरावती विद्यापीठात गेलो होतो. या महोत्सवात मी एका नाट्यात भाग घेतला होता आणि निवेदकाचं काम पार पाडलं होतं… नाटक संपलं आणि प्रेक्षकांतून आवाज आला… ए… नाना! ही आरोळी काही चिडवणे या प्रकारातील नव्हती.

नंतर कुणीतरी मला असं सांगितलं की क्रांतिवीर हिंदी चित्रपट आला आहे, त्यात नाना पाटेकर मुख्य भूमिकेत आहेत… आणि तुझा आताच अवतार दिसतो तसाच नानांचाही आहे… अर्थात थोडाफारच! बारीक केस, बारीक दाढी, भेदक डोळे आणि मुख्य म्हणजे वेगवान गोलंदाजासारखं भरभर बोलणं! त्यावेळी माझी शारीरिक ठेवणही जवळजवळ तशीच होती. पण नानांशी साधर्म्य असलंच तर अगदी दोन एक टक्के असावं. पण बोलण्याची पद्धत नाना ज्यावेळी वेगवान संवाद म्हणतात तशी होती आणि आहे. अर्थात संवादाची ती शैली नानांची स्वत:ची आहे… आणि माझा वाचादोष! नानांचे संवाद लोकांना समजत होते म्हणून आवडत होते… तसं माझं नाही…. जे माझ्या दीर्घ सहवासात आहेत त्यांनाच सवयीने माझे बोलणे समजू शकते. इतरांसाठी वंदे भारत जवळून निघून जावी आणि डबे मोजता येऊ नयेत.. अशी स्थिती होते. खरं तर मी भाषण करायला नको… मात्र मला ती करावी लागत. आणि भाषण करताना करताना मानसिक तणावामुळे कदाचित या स्पीडला ब्रेक लागत असावा. अमरावती विद्यापीठाच्या त्या कार्यक्रमात मला गटप्रमुख म्हणून एका विषयावर बोलणे भाग होते… मी बोललो… आणि काही क्षणांसाठी नाना झालो बहुदा.

१९९१ मध्ये नानांचा ‘प्रहार’ येऊन गेला होता.. पण पाहता आलेला नव्हता.. पण विषय माहीत झाला होता… भारतीय लष्कराचा विषय हाताळला होता त्यात. त्यावेळी मलाही लष्करातच जायचं होतं… आणि त्यामुळे बोलण्यात, वागण्यात त्याचं प्रतिबिंब पडणे साहजिकच होतं. त्यावेळी स्वत:चे फोटो फक्त कॉलेज आय कार्डसाठीच काढावे अशी आर्थिक स्थिती होती. पुढे भोपाळ विद्यापीठातही अशाच एका कार्यक्रमासाठी निवडलो गेल्याने जावेच लागले… अर्थात अवतार तसाच होता. मूळात त्या कार्यक्रमाला तत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा साहेब यायचे असल्याने तपासणी कडक होती. मला पोलिसांनी आत सोडलं नव्हतं सुरुवातीला… विविध कागदपत्रं दाखवावी लागली. याही कार्यक्रमात मी बोललो आणि माझ्यावरच नाना शिक्का त्यावेळेपुरता तरी पक्का झाला. कालांतराने शारीरिक बदल होत गेलेच. आणि माझ्यात नाना आता औषधालाही उरलेले नाहीत!

मी नानांच्या आवाजाची, संवादफेकीची नक्कल करावी, असे मला सुचवले गेले होते. हा प्रयत्न मी कधीच केला नाही. नानांच्या आवाजाची नक्कल सर्वांत जास्त केली जाते हे सर्वांना ठाऊक आहे. याबद्दल विचारले गेले की नाना म्हणायचे… माझ्या आवाजाच्या नकलेमुळे त्यांची घरं चालत असतील तर बरंच आहे की!

आधी प्रहारच्या रूपाने भारतीय लष्करविषयक प्रेम, त्यासाठी त्यांनी बेळगावच्या कमांडो प्रशिक्षण केंद्रात पूर्ण केलेलं प्रशिक्षण, त्यांचं कारगिलमधील प्रत्यक्ष सीमेवर जात सेवा बजावणं, पुढे मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांसाठी केलेल्या अतुलनीय कामावर उमटलेली नाम-मुद्रा या वर इतर अनेक गोष्टींमुळे नाना आपले वाटत गेले. त्यांच्या सारखं आपल्याही वागता, बोलता आलं पाहिजे असं अनेकांना वाटतं यात नवल नाही. ANGRY YOUNG MAN म्हणून अमिताभ बच्चन यांनी त्यांची एक IMAGE उभी केली होती. नानांना यासाठी विशिष्ट वयोगट लागला नाही…. ते ANGRY MAN म्हणून जनमानसात रुजून गेले!

नानांना सतत काहीतरी व्यक्त करायचं आहे, असं त्यांच्या प्रत्येक मुलाखतीत वाटत राहायचं आणि ते तसं निर्भीडपणे करीतही असत. नाम अर्थात नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नावांच्या आद्याक्षरांनी बनलेलं नाम फौंडेशनच्या माध्यमातून नानांनी उभं केलेलं काम त्यांच्याविषयीचा आदर कमालीचा दुणावून गेलं. अशा नानाविध बाबी सांगता येतील आणि येणा-या ब-याच दिवसांत नाना चर्चेत दिसत राहतील.

अशाच एक मुलाखतीत नाना अगदी उद्वेगाने म्हणाले होते… ”विहिरीच्या काठावर बसावं… एकटंच. जवळपास ऐकायला, बघायला कुणीही नसावं, दोन कॅमेरे लावावेत आपल्यावर रोखलेले आणि सांगून टाकावं…. सगळं खरं खरं…. आणि मग.. ! ” पुढचे ते काही बोलले नाहीत…. आपण समजून घ्यायचं!

आता त्यांना जे सांगायचं होतं ते त्यांच्यासोबत चितेत जळून जाईल… ते उठून म्हणतील कदाचित.. आ गये मेरी मौत का तमाशा देखने!

असो. आपण नानांसारखं असावं, असं वाटण्यात काहीही गैर नाही… पण तसं कुणी असू शकतं का?

मी शोधाशोध केली तर माझा नानासदृश अवतारातील एखादा फोटो गावेलही कुठं तरी.. पण तो कुणाला दाखवण्याची हिंमत मी करणार नाही…. कुठं नाना आणि कुठं मी? मी फार तर मनातल्या मनात म्हणून शकेन… मैं भी नाना!

(नानांना भावपूर्ण निरोप देताना मनातलं.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ११५ आणि ११६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ११५ आणि ११६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ११५ – – – 

तुटे वाद संवाद तेथे करावा ।

विवेके अहंभाव हा पालटावा ।

जनीं बोलण्यासारखे आचरावे ।

क्रियापालटे भक्तिपंथेचि जावे ।।११५।।

अर्थ : ज्या चर्चेतून काही तत्व किंवा सार हाती लागू शकेल अशाच चर्चेत भाग घ्यावा. आपल्याला आपल्या ज्ञानाचा जो अहंकार झालेला असतो, त्यात विवेकाच्या साहाय्याने बदल घडवून आणावा. आपले वागणे आणि बोलणे यात एकवाक्यता असावी. भक्तिमार्गामुळे आपल्या चित्तात बदल होतो, म्हणून भगवंत प्राप्तीसाठी भक्तिमार्गाचा अवलंब करावा.

विवेचन : समर्थांनी आधीच्या श्लोकात केलेल्या उपदेशाची पुनरावृत्ती या श्लोकात झालेली आपल्याला आढळते. परंतु त्यांचे महत्त्व पुन्हा आपल्या मनावर ठसावे आणि आपल्या अंतरंगात बदल व्हावा यासाठीच चांगल्या गोष्टींची ही पुनरावृत्ती! आजच्या धकाधकीच्या काळात सर्वसामान्य माणसाचे जीवन ताणतणावाचे झाले आहे. मानसिक शांती मिळावी, आपल्या मनातील प्रश्नांची योग्य ती उत्तरे मिळावीत म्हणून माणूस विसाव्याची ठिकाणे शोधत असतो. याचाच फायदा घेऊन आजकाल भोंदू बुवा, बाबा यांनी परमार्थाचा बाजार मांडलेला आपल्याला दिसतो. सर्वसामान्यच काय परंतु शिकलेले लोक देखील त्याला कसे बळी पडतात आणि आपले सर्वस्व कसे गमावतात याची अनेक उदाहरणे वर्तमानपत्रातून आपल्याला वाचायला मिळतात.

अशा लोकांसाठी समर्थांनी तळमळीने इशारा देऊन ठेवला आहे की जिथे आपल्या प्रश्नांची योग्य उत्तरे मिळतील, शंका निरसन होईल आणि जी काही चर्चा होईल त्यातून साररूपी नवनीत हाती लागेल, अशाच ठिकाणी माणसाने जावे. बुवाबाजी आणि व्यर्थ चर्चांमध्ये अडकू नये.

परिश्रमपूर्वक ज्ञान प्राप्त करणे ही चांगलीच गोष्ट आहे. जेवढे ज्ञान अधिक तेवढा माणूस अधिक नम्र व्हावा अशी अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात होते उलटेच! माणसांना आपल्या ज्ञानाचा अहंकार व्हायला लागतो. अशा वेळी पुढील प्रगती हळूहळू मंदावते. कारण मला काही जाणून घ्यायचे नाही, मला सगळेच माहिती आहे असा अहंकार माणसाला होतो. अशा माणसांसाठी समर्थ म्हणतात की विवेकाचा आश्रय घ्यावा. विवेक म्हणजे योग्यायोग्य, बरेवाईट यातील फरक करण्याची क्षमता. त्याच्या साहाय्याने हे जाणून घ्यावे की आपला अहंकार हा आपल्या प्रगतीच्या आड येणारा आहे. हे लक्षात आले की त्यावर मात करणे सोपे होते. जगामध्ये अपरंपार ज्ञान आहे आणि आपल्याला अजून खूप शिकायचे आहे. आपल्याला जे काही माहिती आहे ते एखाद्या वाळूच्या कणापेक्षा सुद्धा कमी आहे हे सुद्धा विचार केल्यानंतर लक्षात येते. आईन्स्टाईन सारखा बुद्धिमान शास्त्रज्ञ एकदा म्हणाला होता की मला जे माहिती आहे ते वाळूच्या एखाद्या छोट्याशा कणा पेक्षा सुद्धा कमी आहे.

भगवंत प्राप्तीसाठी केवळ कोरडे ज्ञान उपयोगाचे नसते. त्यामध्ये भक्तीचा ओलावा हवा. परमेश्वराला भक्ती प्रिय आहे. भक्तिमार्गाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. खरी भक्ती माणसाला नम्र बनवते. हनुमंत, समर्थ रामदास हे रामाचे परमभक्त होते पण त्यांची नम्रता केवढी! ते स्वतःला रामाचा दास किंवा सेवक म्हणवून घेतात. संत ज्ञानेश्वर असो की आणखी कोणतेही संत. या सगळ्या संतांमध्ये कमालीचे नम्रता होती आणि आपण जे काही बोलतो आहोत ते आपल्या गुरूंचे कृपेमुळेच बोलतो आहोत असे ते म्हणत. आपण परमेश्वराची जी भक्ती करतो किंवा गुरूंची सेवा करतो त्यातून आपल्या चित्तामध्ये परिवर्तन घडवून आले पाहिजे. खरी भक्ती चित्तात अंतर्बाह्य पालट घडवून आणते. तेव्हा आपणही हा भक्तिमार्गच स्वीकारावा. ‘ मना सज्जना भक्तिपंथेचि जावे’ ही समर्थांची शिकवण कायम लक्षात ठेवावी.

स्वसंवाद :

१. ताणतणाव आणि प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी खऱ्या ‘सुखसंवादाचा’ आधार घेतो, की भोंदू बुवा-बाबांच्या दांभिक प्रचाराला बळी पडतो?

२. माझ्याकडे असलेल्या ज्ञानामुळे किंवा पदव्यांमुळे मी अधिक नम्र झालो आहे, की “मला सगळेच माहीत आहे” असा अहंकार माझ्या प्रगतीच्या आड येत आहे?

३. माझ्या रोजच्या वाचनात आणि आचरणात केवळ ‘कोरडे ज्ञान’ आहे, की भगवंताला प्रिय असणारा ‘भक्तीचा ओलावा’ (प्रेम) मी आत्मसात केला आहे?

४. हनुमंत आणि समर्थ रामदास यांच्याप्रमाणे, मी स्वतःला नम्रपणे भगवंताचा केवळ ‘दास’ किंवा ‘सेवक’ मानतो का?

=====

 श्लोक क्र. ११६ – – – 

बहू श्रापिता कष्टला अंबऋषि ।

तयाचे स्वये श्रीहरी जन्म सोशी ।

दिल्हा क्षीरसिंधू तया उपमानी ।

नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ।।११६।।

अर्थ : अंबरीश राजाला (दुर्वास ऋषींनी) शाप दिल्यामुळे त्याला फार कष्ट झाले. त्याच्यासाठी भगवंताने स्वतः गर्भवास सोसला. उपमन्यू या आपल्या भक्तासाठी त्यांनी त्याला क्षीरसागराचे वरदान दिले. अशा रीतीने देव आपल्या भक्तांची काळजी घेतो. आपल्या भक्तांचा अभिमान असलेला हा भगवंत त्यांची कधीही उपेक्षा करीत नाही.

(श्रापिता – शाप दिल्याने, क्षीरसिंधु – दुधाचा समुद्र, नुपेक्षी – उपेक्षा /दुर्लक्ष करीत नाही)

विवेचन : ११६ ते १२६ या अकरा श्लोकात समर्थ आपल्याला परमेश्वर आपल्या भक्तांची कशी काळजी घेतो आणि त्यांची उपेक्षा कशी होऊ देत नाही हे सांगतात. या श्लोकाचा अर्थ लक्षात येण्यासाठी आपल्याला त्याच्यामागील पौराणिक कथा समजून घ्यावी लागेल. अंबऋषी म्हणजे अंबरीष राजा. त्याची कथा महाभारत आणि भागवतात येते. हा राजा अत्यंत पराक्रमी आणि भगवंताचा परमभक्त होता. तो एकादशीचे व्रत नियमितपणे करीत असे. एकदा त्याने असेच एकादशीचे व्रत केले असता, त्याच्याकडे दुर्वास ऋषी मुक्कामासाठी आले. दुसऱ्या दिवशी द्वादशी असल्याने उपवास सोडण्यासाठी राजाने त्यांना आपल्यासोबत भोजनासाठी थांबण्याची विनंती केली. दुर्वासांनी ते मान्य केले. दुसऱ्या दिवशी ते सकाळी नदीवर स्नानासाठी गेले. तिकडेच ते ध्यानात रमल्यामुळे भोजनासाठी येण्यासाठी त्यांना खूप उशीर झाला. राजाने त्यांची वाट पाहून उपवास सोडण्यासाठी भगवंताचे तीर्थ घेऊन आचमन केले. दुर्वास आल्यानंतर त्यांना जेव्हा राजाने एकादशीचा उपवास आपल्याशिवाय सोडला हे कळले तेव्हा ते अतिशय संतापले. ते मुळातच शीघ्रकोपी स्वभावाचे होते. वास्तविक राजाने भोजन केले नव्हते. पण तरीही दुर्वासांनी त्याला मनुष्य आणि प्राण्याचे दहा जन्म प्राप्त होतील असा शाप दिला. शिवाय आपल्या डोक्यावरील एक केस उपटून त्याच्यातून राजाला मारण्यासाठी कृत्या निर्माण केली. (कृत्या म्हणजे काळ्या जादूने किंवा तांत्रिक विधीने दुसऱ्याला मारण्यासाठी निर्माण केलेली विनाशकारी शक्ती)

ही कृत्या जेव्हा अंबरीष राजाला मारण्यासाठी धावली, तेव्हा आपल्या भक्ताचे रक्षण करण्यासाठी भगवंत धावून आले. त्यांनी सुदर्शन चक्राच्या साहाय्याने कृत्याचा नाश केला. पण आता ते सुदर्शन चक्र दुर्वासांच्या मागे लागले. तेव्हा दुर्वासांनी भगवंताचा धावा केला. भगवंताने आपले सुदर्शन मागे घेतले. पण दुर्वासांनी दिलेल्या शापाच्या पूर्ततेसाठी स्वतः भगवंताने गर्भवास सोसून जन्म घेतले अशी ही कथा आहे.

दुसरी कथा उपमन्यूची आहे. उपमन्यू हा व्याघ्रपाद ऋषींचा मुलगा. त्याच्या घरी अत्यंत गरिबी होती. त्याला लहानपणी पिण्यासाठी गायीचे दूध देखील मिळत नसे. त्याची आई त्याला पाण्यात पीठ कालवून ते दूध म्हणून देई. एकदा त्याला शेजारच्या ऋषींच्या आश्रमात गायीचे धारोष्ण दूध प्यायला मिळाले. खरे दूध कसे असते हे त्याला कळले. आपल्या आईकडे त्याने तशा दुधासाठी हट्ट धरला. आईने त्याला सांगितले की बाळा आपण गरीब आहोत. आपल्याला गायीचे दूध परवडत नाही. मागील जन्मी आपण काहीतरी पाप केले असले पाहिजे म्हणून आपल्याला ही अशी अवस्था प्राप्त झाली. तेव्हा लहानगा उपमन्यू भगवंताची उपासना करू लागला. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी त्याच्यासाठी क्षीरसागरच निर्माण केला. क्षीरसागर प्रतीकात्मक अर्थानेही घेता येईल. आनंदाचा आणि सर्व सुखांचा सागर या अर्थाने. आपल्या भक्ताला त्यामुळे काहीही कमी पडणार नाही अशी व्यवस्था भगवंताने केली.

अशा रीतीने जो कोणी मनापासून त्याची भक्ती करतो अशा आपल्या भक्ताची भगवंत कधीही उपेक्षा होऊ देत नाही. तो आपल्या भक्ताचा अभिमान बाळगणारा आहे. म्हणून आपणही भक्तिमार्गाचा अवलंब करावा असेच समर्थांचे सांगणे आहे.

स्वसंवाद :

१. दुर्वास ऋषींसारखा मोठा संताप किंवा कोणतीही विनाशकारी ‘कृत्या’ (संकट) समोर आली, तरी मी अंबरीष राजासारखा शांत राहून भगवंताच्या स्मरणाचा आणि विवेकाचा आश्रय घेतो का?

२. उपमन्यूच्या कथेप्रमाणे, माझ्या आयुष्यात किंवा कुटुंबात एखादी मोठी उणीव अथवा गरिबी आली, तर मी इतरांचा हेवा करत नशिबाला दोष देत बसतो, की माझ्या प्रामाणिक कर्माने व साधनेने त्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो?

३. “माझा देव भक्ताभिमानी आहे आणि तो माझी कधीही उपेक्षा करणार नाही, ” हा दृढ विश्वास माझ्या मनात सुखाच्या काळाप्रमाणेच संकटाच्या वादळातही अढळ राहतो का?

४. ईश्वराकडे केवळ संसारातील छोट्या-छोट्या भौतिक गोष्टींची मागणी करण्याऐवजी, मी कधी उपमन्यूसारखा अनन्यभाव ठेवून साक्षात ‘क्षीरसागर’ (परमानंदाचा सागर) मिळवण्याची इच्छा बाळगतो का?

– क्रमशः श्लोक ११५ आणि ११६

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नानाच्या गावाला जाऊ या… –  लेखक : श्री पुरुषोत्तम बेर्डे ☆ संकलक / प्रस्तुती – श्री अमोल केळकर ☆

श्री अमोल केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ नानाच्या गावाला जाऊ या… –  लेखक : श्री पुरुषोत्तम बेर्डे ☆ संकलक / प्रस्तुती – श्री अमोल केळकर ☆

अलीकडे नानाला कधीमधी फोन केला की नानाकडून एकच उत्तर असायचे.. शेतावर आहे..

नानाचे शेत, म्हणजे नानाची वाडी.. आणि त्या वाडीत पसरलेले विविधांगी शेत.. त्यात मळे तर आहेतच, वाफे आहेत… छान सुंदर रस्ते आहेत.. एक तलाव आहे.. त्यात मासे बदके सोडलेली आहेत, जवळच विहीर आहे, फळाफुलांनी बहरलेली झाडें आहेत, सुशोभित खुराडे आहेत, त्यात कोंबड्या आहेत. प्रशस्त आणि सुसज्ज गोठे आहेत, त्यात गाई गुरे आहेत, खिल्लारी उंचीपुरी बैलजोडी आहे, त्यांच्यासाठी बैलगाडी आहे. त्या बैलगाडीच्या जोखडाच्या पुढच्या टोकावर ‘ नानाची वाडी ‘ चा डिझाईन केलेला सिम्बॉल आहे. जणू काय मर्सिडीजच आहे. तितक्याच डौलाने तो सिम्बॉल तिथे विराजमान आहे.

स्वतःच्या गाड्यांसाठी आणि पाहुण्यांसाठी पार्किंग शेड्स आहेत..

हे सर्व झालं शेताचं..

त्यात एक टुमदार बंगला आहे. त्याची बांधणी अप्रतिम आहे. वाडाच जणू… अत्यंत मोजक्या पण कलात्मक ऐवजानी सजवलेला बंगला… त्याला लागून एक अद्ययावत अशी जीम…

असायलाच हवी ना?

पहाटे पाचलाच तिथली मशिनरी खणखणीत आवाजात जागी होते मालकाच्या हस्तक्षेपाने…

या शेताचे प्रवेशद्वार भक्कम किल्ल्याच्या प्रवेशद्वारासारखे आहे. तिथे २४ तासाच्या ड्युटीवर कोणी वाचमन नाही… तर त्या शेतात फिरत असतात मालकाच्या जिव्हाळ्याचे पाचेक कुत्रे.. विना परवानगी आत घुसणाऱ्याची वर्दी त्यांच्या डरकाळ्यानी आतल्या मालका पर्यंत जाते… मग आतून मालकाचा त्याही पेक्षा मोठ्या आवाजात आदेश जातो..

‘ए ssss येऊ दे त्यांना आत…. ‘ तेव्हा ते पंचवॉचमन शांत होतात…

रात्री अपरात्री चोरीच्या उद्देशाने कोणी आत शिरलाच तर जिवंत बाहेर पडेल याची गॅरंटी नाही. शिवाय मालकाकडे परवानाधारक लांब पल्ल्याच्या बंदुका आहेत ते वेगळेच…

हे सर्व सिंहगडाच्या पायथ्याशी आहे… आणि याचा मालक हि सिंहगडाच्या पायथ्याला शोभेल असाच आहे.. त्याचं नाव नाना पाटेकर…

दक्षिणेतला सुपरस्टार रजनीकांत आणि नाना पाटेकर यांच्यात बरच साम्य आढळतं. रांगडेपणा आणि मातीशी असलेलं नातं. याची सांगड प्रत्यक्ष जीवनात दोघांनीही जबरदस्त घालून ठेवलेली आहे. जसे आहोत तसे दाखवायला दोघांच्याही आड त्यांचा सुपरस्टार असल्याचा स्टारडम येतं नाही. अलीकडच्या काळात तुम्ही राजनीकांतना पाहिलं असेल… गेलेले केस, दाढी वाढलेली… सफेद झब्बा, लुंगी हा प्रादेशिक लिबाज, रजनीकांत याच वेशात तुम्हाला कुठेही दिसेल. नानाच्याही अंगावर असेच काहीतरी प्रादेशिक दिसेल… मराठमोळा लेहंगा, गुडघ्यापर्यंत पायघोळ झब्बा…. त्याला समोर दोन फ्लिपवाले खिसे.. एकात स्केच पेन वगैरे.. आणि एकात चष्मा वगैरे. शेतात असताना हातात पांढरा स्वच्छ नॅपकिन अथवा उपरणं. नाना हॉलिवूडमध्ये असो, बॉलिवूडमध्ये असो,… अलीकडे तो सगळीकडे असाच दिसेल…

ड्रायव्हर नाही, मेकपमन नाही, छत्री धरायला बॉय नाही. तारखा बुक करायला मॅनेजर नाही. नाना पाटेकर.. म्हणजे वन मॅन इंडस्ट्री..

‘नाना.. तू तुझा स्टारडम कसा मॅनेज करतोस? ‘

‘म्हणजे? ‘

‘गर्दीचा त्रास होत नाही… ? ‘

‘छे रे.. कोणी पुढेच येतं नाही… प्रेमाने आलं तर गळाभेट, अंगावर आलं तर देतो एक ठेवून… ‘

नानाने त्याच्या स्टाईल ने उत्तर दिलं..

खरंय.. नानाच्या एकूण प्रथम दर्शनी व्यक्तिमत्वाचा हाच दरारा आहे. व्यक्तिमत्वात इतक्या वर्षांच्या अनुभवातून एक परिपक्वता आलेली आहे. नाहीतर एखादंदुसऱ्या सिनेमांत हिट झालेल्या स्टार लोकांचे तोरे बघा… नसलेल्या गर्दीला खेचून घेण्याची स्पर्धा असतें…..

या उलट नाना…

‘पुर्ष्या… कामाठीपुरा बघूया जाऊन… ‘ 

‘चालेल.. कधी जाऊ या? ‘

‘उद्या सकाळी ११ वाजता… दादरला जिप्सीत भेटू.. ‘

एका मित्राच्या ड्रायव्हरला गाडीसकट बोलवून घेतले… छोटीच गाडी होती… लोकेशन वर कळू नये म्हणून… मी, नानाचा मुलगा मल्हार, तो ड्रायव्हर आणि नाना.. असे चौघेच निघालो.. मल्हारच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत होतं.. कामाठीपुरा सारख्या भर गर्दीत नाना खाली उतरला, तर पुरेशी सिक्युरिटी सुद्धा नाही…. पण नाना भायखळा, कामाठीपुरा, खेतवाडी, गिरगावात चांगलाच रमला होता. गोलपिठ्या जवळच्या गोलदेवळाच्या बाजूच्या गल्लींत काही वर्षे नानाचे बालपण गेले होते. त्याच वयाचा होऊन नाना एकेक बारकावे दाखवत होता… फार दिखावा न करता, खाली न उतरता, शांतपणे तो विभाग आम्ही फिरून आलो…

मधला बराच काळ लोटला होता… नानावर त्या विभागाचे झालेले संस्कार त्याच्या अनेक भूमिकांतून पुढे कधी कधी डोकावले… त्याच्या गाजलेल्या भूमिकांमधून कुठे न कुठेतरी त्या संस्कारांची रग दिसून येतेच.

आजही नानाने आपल्या सिनेमांत काम करावं म्हणून निर्माते धडपडतात…. पण त्यांना नानाच्या अनेक परीक्षेला तोंड द्यावे लागतं… तेव्हा कुठे त्यांना नाना मिळतो.. नानाला घेऊन एखादं प्रोजेक्ट करायचे म्हणजे शिवधनुष्यच… नाना त्यात इतका घुसतो की समोरचा अवाक होऊन जातो… तो त्यासाठी त्याचा वेळ घेतो… समोरच्याला वाटतं.. हा करेल की नाही? की उगाच वेळ काढतोय?..

पण एवढा किस काढल्या नंतर लोकांच्या समोर येतं ते ‘अब तक छपन्न ‘ सारखं काही तरी भन्नाट..

तीन वर्षे नाना त्यावर घासत होता.. निर्माता हवालदिल झाला होता… त्याचा पार्टनर राम गोपाल वर्मा, त्याला नानाची सवय होती… पण निर्माता अस्वस्थ होता… दिग्दर्शक ‘शिमीत अमीन’ न्यूयॉर्क रिटर्न उच्च शिक्षित… त्याच्या डोक्यात अमेरिकन क्राईम…. आणि नाना या मातीतला… अख्खा सिनेमा या मातीत कसा मुरेल यासाठी नाना कंबर कसून होता.. अखेर सिनेमा झाला… दीर्घकाळ वाट पाहून जेव्हा रिलीज झाला तेव्हा निर्मात्याचे उखळ पांढरे झाले.. तुफान रिस्पॉन्स.. अगदी मुंबईतल्या रस्त्यावरचा सिनेमा.. रसिकांनी डोक्यावर घेतला.. दोन भाग निघाले त्यानंतर… thats नाना…. पेशंन्स ठेवा.. नाना बरोबर काम enjoy करा….

जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मध्ये आमच्या तीनएक वर्ष पुढे होता नाना.

कॉलेज मधल्या निवडणुकीत आपल्या सहकाऱ्यांबरोबर छोटी छोटी भाषणे करुन धमाल उडवणारा नाना, कॉलेज संपताच आपल्यातल्या कमर्शिअल आर्टिस्टला व्यवसायासाठी काही स्कोप मिळतो का, याच्या प्रयत्नात होता. पण बोलण्यावरची हुकूमत, विचारांमधला पक्केपणा आणि रांगडं रुपडं या भांडवलावर हौशी आणि प्रायोगिक रंगभूमीकडे ओढला गेला. आविष्कारच्या नाटकांमधून दिसू लागला… आणि एके दिवशी…..

पहिला ब्रेक

विजय तेंडुलकर यांच्या ‘पाहिजे जातिचे ‘ या नाटकात नानाचे कास्टिंग झाले बबन्याच्या भूमिकेसाठी… दिग्दर्शक अरविंद देशपांडे यांनी त्याच्यावर विशेष काम करुन नाना मधला तो बेफिकीर आणि द्वाड तरुण, जो वरवर बघीतल गेलं तर जमीनदार बापाच्या धाकतला, पण बाहेर त्याला न जुमानता बेदरकारपणे वावरणारा बबन्या, तुफान लोकप्रियता मिळवत गेला….

रंगमंच अक्षरशः कवेत घेउ शकेल असे नाना मध्ये गुण अनेक दिग्दर्शकानं दिसू लागले. आणि व्यावसायिक रंगभूमी नानाला खुणावू लागली. विजयाबाई मेहता यांच्या सारख्या दिग्दर्शिकेचे संस्कार नाना वर झाले आणि हमीदाबाईची कोठी, महासागर, पुरुष सारखी नाटके नानाच्या कारकिर्दीला पक्की दिशा देऊ लागली.

दुसरा ब्रेक

‘पुरुष ‘ मधल्या गुलाबराव या पुढाऱ्याच्या स्त्रीलंपट पण धूर्त आणि बेरकी व्यक्तिरेखेने नाना नाट्यरसिकांच्या गळ्यातला ताईत झाला. अफाट लोकप्रिय गर्दीत ‘पुरुष’ नाटक पहिले जाऊ लागले.

या नाटकाने नानाला मराठी आणि हिंदी चित्रपटाचे दरवाजे उघडून दिले…

तिसरा ब्रेक

एन. चंद्रा या तरुण मराठी दिग्दर्शकाने नवीन नटांची फौज घेऊन त्यात एका अस्वस्थ मराठी तरुणाच्या भूमिकेत नाना पाटेकरला घेऊन ‘ अंकुश ‘ हा हिंदी सिनेमा केला, सर्वांनी या सिनेमासाठी अपार कष्ट केले आणि परिणामी हा कमी बजेटचा हिंदी सिनेमा त्यातल्या लाव्हारसयुक्त विचारांमुळे प्रचंड यशस्वी झाला त्यातूनच मराठी व्यतिरिक्त इतर हिंदी भाषिक दिग्दर्शकांना नानातले अनेक गुण दिसले.  

आणि एके दिवशी हिंदी सिनेमाला, एक थंड डोक्याचा, पण गरम विचारांचा तिरसट आणि खुनशी असा लोभस ‘अन्ना ‘ सापडला… परिंदा सिनेमातला ‘अन्ना ‘…

त्यानंतर मात्र नाना पाटेकर हे नाव भारतीय चित्रपट विश्वात चर्चिले जाऊ लागले.

यापूर्वी थंडपणे निर्घृण कत्तली करत फिरणारा गब्बरसिंग लोकांनी पहिला होता.. त्याला डोक्यावर घेतले होते… तरीही तो दऱ्याखोऱ्यात वाढलेला, घोड्यावरून फिरणारा डाकूच होता. सहसा जनसामान्यांच्यात न वावरणारा.. पण तुमच्या आमच्यातला एक थंड डोक्याचा अत्यंत हुशार खलपुरुष एकदा नाही दोनदा… म्हणजे ‘पुरुष’ नाटकात एकदा आणि दुसऱ्यांदा ‘परिंदा’ मध्ये. सहज पटेल असा, सहजासहजी मुंगी मारावी तसा वाटेत येणाऱ्या अडथळ्यांचा खात्मा करणारा सो कॉल्ड व्हिलन नानाच्या रूपाने पडद्यावर वावरला… इतका परिणामकारक की प्रत्यक्ष नानाच्या आईने त्याला निक्षून सांगितले, की ही असली काम करुन मोठ्या दिमाखात माझ्या पाया पडायला येणार अशील तर येऊ नकोस, हाकलून देईन…

नानाची आई हा नानाचा सर्वात मोठा गुरु, सहकारी, मैत्रीण आणि सर्व काही… तिने त्याला दिलेले एकेक शिक्षणाचे बाळकडू, नानाला आयुष्यभर पुरले. आईचा शब्द नाना साठी अंतिम. कारण त्या आईने काढलेल्या आपल्या मुलांसाठीच्या खस्ता नानाला बरच काही शिकवून गेल्या होत्या. नानाच्या आईचे माहेर म्हणजे जणू गॉडफादर मधली कॉर्लीऑन फॅमिली. मन्या सुर्वे हा नानाचा मामेभाऊ. या सर्व भावंडांचा आपल्या गरम डोक्याच्या लेकावर परिणाम होऊ नये म्हणून या माउलीने नानाला त्यांच्या पासून लांब ठेवले. त्याच्या शिक्षणात रस घेतला. शिकवले.  

वरवर नास्तिक वाटणारा नाना केवळ आईला दिलेल्या शब्दाखातर दरवर्षी घरात येणाऱ्या गणपतीबाप्पाची मनोभावे सेवा व पूजा करीत असे. स्वतः फुलांची आरास तयार करुन त्या मखरात मोठ्या डौलात बाप्पा विराजमान होत. पारंपरिक वेशात आगमन व विसर्जनाच्या मिरवणुका नानाच्या उपस्थितीत होतं. हे सर्व नाना त्याच्या आईला दिलेल्या शब्दाखातर करीत असे.

ब्रेक के बाद… 

मधुर पाण्याचे झरे जसे खडकाळ ओढ्यातून वाहतात तसें नानाचे आहे. हा रांगडा पहाडी व्यक्तिमत्वाचा खडकाळ माणूस आतून प्रेम भावनेने ओथंबलेला आहे. हे त्याचे सामाजिक कार्य बघितले की लक्षात येते. बाबा आमटे यांच्या पासून ते अगदी अलीकडच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना आधार देण्यापर्यंत नाना तन, मन आणि धन यांच्यासह हिरीरीने उतरतो. आपल्या उत्पन्नातला खूप मोठा भाग या कार्यासाठी वापरण्याची धमक नाना मध्ये आहे…

तीच गोष्ट मला रजनीकांत यांच्या मध्येही दिसते. अशी माणसं मग लोकांच्या गळ्यातला ताईत होऊन फिरतात त्याचे आश्चर्य वाटायला नको.

अगदी आमच्यात सहजपणे वावरणारा नाना, गेल्या तीस चाळिस वर्षात कधी लार्जर दॅन लाईफ झाला कळलेच नाही. नानाने जितके सिनेमे केले त्याच्या दुप्पट तिप्पट त्याने नाकारले. न आवडलेली कुठलीच गोष्ट दयेपोटी नानाने केल्याचे जाणवत नाही. ज्या मूळ स्वभावावर, म्हणजे पंजाब्यांची हाजी हाजी करणे, उठता बसता सलाम ठोकणे आणि कामे मिळवत राहणे, हे सर्व करण्याची वेळ नानावर कधी आलीच नाही. उलट शब्दांचे फटकारे आणि सडेतोड उत्तरे देऊन प्रसंगी हातघाईवर येऊन समोरच्याचे बिनडोक विचार जमीनदोस्त करण्याचा बुलडोझर घेऊनच नाना हिंदी सिनेसृष्टीत वाववराला. अनेक आरोप झाले, प्रकारणे झाली, पण नानाच्या कर्तृत्वाला खिंडार पडले नाही. ते बुलन्दच राहिले.

एखादी गोष्ट आवडली की मनापासून दाद देण्याची वृत्ती मात्र नाना मध्ये आजही दिसून येते.

अलीकडे मी ‘क्लोज एनकौन्टर’ या माझ्या कथा संग्रहातील एकेक कथा लिहून झाली की सर्व मित्रांना पाठवीत असे. त्यात नाना अग्रक्रमाने होता. कथा वाचून झाली की नानाची प्रतिक्रिया येत असे. ‘छान… ‘ उत्तम’… एवढेच त्यात असे. पण तेवढीही पुरेशी असे. त्यातच सर्वकाही असे. या पुस्तकाच्या प्रकाशनाला नाना उपस्थित राहिला आणि त्याच्याच हस्ते प्रकाशन झाले… इतकेच नव्हे तर यातल्या एका कथेवर एखादी कलाकृती सादर करण्याची व त्यात भूमिका करण्याची घोषणाही नानाने केली.

परंपरेच्या जोखडाखाली नाना कधी अडकलेला दिसला नाही… पण संस्कृती जपायची वेळी आली की नाना पुढे असतो. आईच्या रूपात तो या भारतमातेलाही पाहतो.

प्रहार चित्रपटातल्या कमांडोच्या भूमिकेसाठी नाना प्रत्यक्ष कमांडोचे शिक्षण घ्यायला मिलिटरीत दाखल झाला. इतकेच नाही तर कारगिलच्या युद्धात खास परवानगी मिळवून प्रत्यक्ष सहभाग घेतला. कारगिलच्या बर्फाळ माथ्यावर भारतीय सैनिकाच्या खांद्याला खांदा लावून लढला. मुंबईच्या दंगलीत पोलिसांबरोबर लोकाना शांततेचे आवाहन करीत उघड्या जीप मधून फिरला. क्रांतीवीर सिनेमात टाळ्या घेणारा नाना केवळ ‘ ये हिंदुका खून, ये मुसलमानका खून ‘ म्हणून गप्प नाही बसला… प्रत्यक्ष त्या विचारांच्या परीक्षेलाही उतरला.

हिंदी चित्रपट सृष्टीतल्या अफाट यशाच्या जोरावर ग्लॅमरस आयुष्य एखाद्या आलिशान बंगल्यात घालवणे नानाला सहज शक्य होते.. पण अगदी कारकिर्दीच्या ऐन भरात बाबा आमटे, यांच्यासारख्या महात्म्याचे संस्कार नानावर होतात.. आणि विचारांची दिशाच बदलल्याचे जाणवते..

एकेकाळी एखादा मित्र भेटला की त्याच्यावर प्रेमाने शारीरिक अटॅक करुन नाना त्याला घुसळून काढायचा.. त्याला शिव्यांची लाखोली वाहून मग प्रेमाने आपुलकीने त्याची चौकशी करायचा.. आज त्या सर्व घुसमुसळेपणाची जागा आदरातिथ्याने घेतलीय… इथेही त्याच्या आईचेच संस्कार…

वेब सिरीज च्या निर्मितीच्या चर्चेसाठी कधी लोखंडवाला तरी कधी शेतावर, तर कधी पुण्याच्या घरात.. नाना बोलावत असे.. पण एकदाही हॉटेलातून जेवण मागवले नाही. स्वतः किचन मध्ये उभा राहून त्याच्या हाताने जेवण करून वाढणे यात त्याला अथक आनंद मिळतो… फोडणी देता देता आपली चर्चा सुरु असते.. तशात नाना प्रत्येक पदार्थाचे महत्व सांगून ते डायट किती उपयोगाचे हेही सांगत असतो…

‘पुर्ष्या.. घावण (मराठी डोसा) खाल्ले असशीलच ना? त्यात हे असे ओल्या खोबऱ्याचे तुकडे आणि बारीक अद्रक पेरले आणि जर दाताखाली आले तर मज्जाच येते… ‘

सराईतपणे नानाने तव्यावर घावण टाकलेले असतें.. त्यानंतर दुसऱ्या बाजूला सांडग्याची भाजी… तिचे महत्व सांगत नाना बरोबर जेवण… सोबत मग एखादी नुकतीच वाचलेली कविता… त्याचं रसग्रहण… किंवा एखाद्या सिनेमात दिग्दर्शकाबरोबर झालेलं कडाक्याचं भांडण आणि शेवटी त्याचा अफलातून रिझल्ट….

मिटिंग संपल्यावर गाडी पर्यंत सोडायला आलेला नाना साईड मिरर मधून लांब जाताना दिसतो… पण प्रत्यक्षात खूप जवळ आलेला असतो…

मित्र या संकल्पनेची प्रचिती तो पर्यंत आलेली असतें..

पडद्यावरचा ‘नाना’ व्यक्तिरेखेतला ‘नाना’… आणि प्रत्यक्षातला ‘नाना’…

तीन वेगळे ‘नाना’ तोपर्यंत मनाच्या पडद्यावर छापून उरलेले असतात…..

नानाच्या गावाला जाऊया.. 

 

लेखक : पुरुषोत्तम बेर्डे.

संकलन / प्रस्तुती : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “घास..” – कवी : श्रीधर म्हद्ये ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

शामला पालेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “घास..” – कवी : श्रीधर म्हद्ये ☆ प्रस्तुति – शामला पालेकर ☆

☆

काल घराघरातून खिडक्यात, अंगणात, टेरेसवर पान

वाढून ठेवलं गेलं. श्रद्धा अंधश्रद्धा भाग सोडून देऊ.

त्यावरच्या चर्चेतून निष्पन्न काही होत नाही. प्रत्येकाची

श्रद्धा वेगळी. ती अंध आहे की डोळस हे आपण कशाला

ठरवूयात… 

 *

मला त्याच्या मागची भावना दिसते. खरंतर अनेक माणसं

आयुष्यातून भरल्या पानावरून उठून जावं तशी कायमची

निघून जातात परत न येण्यासाठी. त्यामुळे ठेवलेलं पान

नेमक्या कुणासाठी हा प्रश्न चेष्टेने विचारतात लोक,

त्याला उत्तर नाही आणि देऊही नये… 

 *

जिने ठेवलं तिला ते रिकामं उचलताना हुंदका फुटला असेल.

तिच्या मनातला माणूस येऊन गेला, जेवला,

आशीर्वाद दिला आणि गेला. या न घडलेल्या गोष्टी

 कदाचित तिच्या दु:खावर पांघरुण घालत असतील… 

*

ते शल्य / सल यावर फुंकर बसत असेल. वर्षभर आठवण

येतेच की, येतंच असणार पण रोज रडू येणं शक्य नाही,

 तसं केलं तर जगणंही मुश्किल होईल. आपणही त्याच

मार्गावर आहोत, पुढे गेलेल्यांच्या आठवणी काढत

* 

आपणही तिकडेच चाललोय मग का जीव गुंततो एवढा?

 गुंततो, त्याला उत्तर नाही… 

 *

माणूस निर्वतला म्हणजेच आठवण येते? काही लोक

आयुष्यातून दूर जातात. चूक कुणाची, कारणं काय वगैरे

 मुद्दे सोडा, प्रत्येकाची एक बाजू असते आणि ती त्याच्या

मते खरी असते. तरीपण त्या मोकळ्या जागा आपल्या

लक्षात रहातात… 

 *

घासातला घास आपण ज्याला देत होतो किंवा जो

आपल्याला देत होता, त्याची आठवण होते. आपण

कुणासाठी किंवा कुणी आपल्यासाठी काही चांगलं चुंगलं

केलं तर दोन घास बाजूला काढायची पद्धत होती… 

 *

 आज्जी म्हणायची, ‘राहू दे थोडं, मुलं डोकावली तर हातावर

द्यायला राहू दे’. माया असायची. गुप्तधन ठेवल्यासारखं

भांड्यात ठेवलेला खरवस, साखरभात, मोडकळीला आलेली

अर्धी पुरणाची पोळी, नारळाच्या दोन वड्या, बेसनाचा बुडाला

चिकटलेला लाडू, खारट गाळ जास्ती असलेला चिवडा कुणी

मायेचं माणूस घासभर काढून ठेवायचं. जिभेवर ती काढलेल्या

घासाची अमृतचव अजून रेंगाळत आहे… 

 *

 आता सुबत्ता आली. पैसा, माणसं मुबलक झाली, लोक

घास जेवढे खातात त्याच्यापेक्षा दुप्पट वाया घालवतात.

 आता लोक वगळून खातात, दोन घास वगळून, काढून

ठेवायचे दिवस गेले. कधीतरी आज्जी आठवते, जेवायला

थांबणारी ती आठवते, आठवण उफाळून येते आणि मग

घास अडकतो… 

 *

डोळ्यात पाणी येतं. त्या सगळ्यांसाठी प्रथा म्हणून

आपण घास ठेवत नाही तर ज्यांच्यासाठी घास अडकतो

त्यांच्यासाठी ठेवतो, एवढाच मी त्यातला काढलेला अर्थ आहे…

☆

कवी : श्रीधर म्हद्ये

प्रस्तुती : शामला पालेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – पुस्तकांवर बोलू काही ☆ “धर्मरेषा ओलांडतांना” –  संवादक : हिना कौसर खान ☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? पुस्तकावर बोलू काही ?

☆ “धर्मरेषा ओलांडतांना” –  संवादक : हिना कौसर खान ☆ परिचय – श्री जगदीश काबरे ☆

पुस्तक : धर्मरेषा ओलांडताना

संवादक : हिना कौसर खान 

प्रकाशक : साधना प्रकाशन, पुणे 

धर्मरेषा ओलांडताना : माणूसपणाच्या शोधात ओलांडलेल्या धर्मरेषा – – – 

धर्म माणसाला ओळख देतो. त्याच वेळी तो माणसांमध्ये सीमाही आखतो. घर, कुटुंब, संस्कार, सण, रूढी, श्रद्धा आणि सामाजिक व्यवहार यांच्या माध्यमातून या सीमा बालपणापासून मनात रुजत जातात. त्यामुळे दोन भिन्न धर्मांत वाढलेली माणसे विवाह करून एकत्र आली की दोन व्यक्तींचेच नव्हे, तर दोन वेगवेगळ्या सांस्कृतिक अनुभवविश्वांचे सहजीवन सुरू होते. ‘धर्मरेषा ओलांडताना’ हे पुस्तक याच सहजीवनाचा शोध घेते. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, जैन आणि बौद्ध अशा विविध धार्मिक पार्श्वभूमी असलेल्या आंतरधर्मीय विवाहितांच्या पंधरा मुलाखती या पुस्तकात आहेत. या मुलाखतींच्या माध्यमातून प्रेमविवाहानंतरचे प्रत्यक्ष जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

आंतरधर्मीय विवाहाविषयी बोलताना समाजात दोन टोकाच्या कल्पना आढळतात. एका बाजूला प्रेम सर्व भेद विसरते अशी रोमँटिक समजूत असते. दुसऱ्या बाजूला धर्मभेदामुळे असे विवाह कायम संघर्षग्रस्त राहतात असे मानले जाते. ‘धर्मरेषा ओलांडताना’ या दोन्ही कल्पनांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष अनुभवांकडे पाहते. प्रेमाने दोन व्यक्तींना एकत्र आणले. त्यानंतर त्यांना रोजच्या जगण्यात अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले. धर्म, कुटुंब, परंपरा, सामाजिक दबाव, मुलांचे संगोपन, सण-समारंभ आणि वैयक्तिक श्रद्धा या सर्वांचा त्यांच्या सहजीवनावर परिणाम झाला. या प्रक्रियेचा मागोवा घेणे हे पुस्तकाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या पुस्तकाची सर्वांत मोठी ताकद त्याच्या अनुभवाधारित स्वरूपात आहे. लेखक किंवा अभ्यासक स्वतःहून आंतरधर्मीय विवाहाबद्दल सिद्धान्त मांडत नाही. संबंधित जोडप्यांना बोलू दिले जाते. त्यामुळे वाचकाला त्यांच्या अनुभवांच्या जवळ जाता येते. प्रेमाच्या सुरुवातीपासून विवाहानंतरच्या व्यवहारापर्यंतचा प्रवास समोर येतो. कुठे संघर्ष आहे, कुठे समंजसपणा आहे, कुठे तडजोड आहे, कुठे हट्ट आहे आणि कुठे परस्परांच्या जगण्याचा आदर आहे, हे या अनुभवांतून समजते.

या मुलाखतींचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे स्वतःच्या नात्याकडे पाहण्याची जोडप्यांची तयारी. पुस्तकातील जोडपी आपल्या नात्यातील गुंतागुंत मान्य करतात. त्यामुळे त्यांच्या अनुभवांना भावनिक प्रामाणिकपणा प्राप्त होतो. प्रेमविवाह केला म्हणजे सर्व प्रश्न सुटले, असे त्यांना वाटत नाही. विवाहानंतर माणसाच्या स्वभावाचा, संस्कारांचा आणि कुटुंबीय संबंधांचा नव्याने परिचय होतो. काही समजुती बदलतात. काही दृढ होतात. काहींचा अर्थच बदलून जातो. आंतरधर्मीय विवाहाचा एक महत्त्वाचा परिणाम स्वतःच्या धर्माकडे नव्या नजरेने पाहण्यात होतो. एखाद्या व्यक्तीला आपल्या धर्मातील अनेक गोष्टी बालपणापासून स्वाभाविक वाटत असतात. त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करण्याची गरज तिला कधी जाणवत नाही. विवाहानंतर वेगळ्या धार्मिक परंपरेत वाढलेल्या व्यक्तीसोबत राहताना आपल्या रूढींचे बाहेरून निरीक्षण करता येते. त्याच वेळी दुसऱ्या धर्माबद्दलच्या मनातील कल्पनांचीही परीक्षा होते. प्रत्यक्ष व्यक्ती आणि तिच्या धर्माबद्दल समाजात प्रचलित असलेली प्रतिमा यात किती अंतर आहे, हे लक्षात येऊ शकते. या अनुभवातून धार्मिक पूर्वग्रहांचा पुनर्विचार केला जातो. काही जोडपी धार्मिक बाबतीत स्वातंत्र्य स्वीकारतात. काही जण सामायिक मार्ग शोधतात. काही वेळा एका व्यक्तीवर दुसऱ्याच्या धार्मिक संस्कारांचा अधिक प्रभाव पडू शकतो. या सर्व शक्यता आंतरधर्मीय सहजीवनाच्या वास्तवाचा भाग आहेत. या विविधतेला स्थान देणे हे पुस्तकातील मुलाखतींचे बलस्थान आहे. विवाह दोन व्यक्तींमध्ये होतो. पण त्याचे पडसाद दोन कुटुंबांमध्ये उमटतात. धार्मिक ओळख, सामाजिक प्रतिष्ठा, नातेवाईकांची मते, भविष्यातील मुलांचा धर्म आणि कौटुंबिक परंपरा यामुळे अनेकदा तणाव निर्माण होतो. प्रेम करणाऱ्या दोन व्यक्तींनी एकमेकांना स्वीकारले असले तरी त्यांचे कुटुंबीय मात्र अनेक वर्षे त्यांच्याशी फटकून राहतात. त्यामुळे आंतरधर्मीय विवाह हा वैयक्तिक स्वातंत्र्य आणि सामाजिक वास्तव यांच्यातील संघर्ष समजून घेण्याची संधी देतो. या संघर्षाची विविध रूपे मुलाखतींमधून समोर येतात.

मुलांच्या संगोपनाचा प्रश्न या सहजीवनातील अधिक गुंतागुंतीचा भाग आहे. मुलाला कोणत्या धर्माची ओळख द्यायची, कोणते सण साजरे करायचे, धार्मिक विधींमध्ये त्याचा सहभाग किती असावा, दोन्ही परंपरांची माहिती द्यायची का, की त्याला स्वतःची निवड करण्याची संधी द्यायची, असे अनेक प्रश्न पालकांसमोर येतात. या प्रश्नांना एकच योग्य उत्तर नसते. प्रत्येक कुटुंब आपल्या अनुभवातून मार्ग शोधते. त्यामुळे या पुस्तकातील अनुभव पालकत्व आणि धार्मिक संस्कार या विषयावरही विचार करायला लावतात. एखादा सण कसा साजरा करायचा, कोणत्या घरात कोणत्या पद्धतीने जायचे, धार्मिक विधीत सहभागी व्हायचे की नाही, मुलाला काय सांगायचे, नातेवाईकांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचे, अशा छोट्या प्रसंगांतून मोठे सामाजिक प्रश्न उलगडतात. या अनुभवांमुळे पुस्तकाला एक वेगळीच वैचारिक उंची मिळाली आहे. मुलाखतींमध्ये व्यक्ती स्वतःच्या जीवनाकडे मागे वळून पाहत असते. त्यामुळे आठवणींमध्ये निवडकपणा असू शकतो. काही प्रसंग अधिक ठळकपणे आठवतात. काही अनुभव विस्मरणात गेलेले असू शकतात. स्वतःच्या निर्णयाचे समर्थन करण्याची मानवी प्रवृत्तीही काही उत्तरांमध्ये काम करू शकते. म्हणून अशा मुलाखतींना अंतिम सामाजिक सत्य मानण्यापेक्षा वैयक्तिक अनुभवांचे प्रामाणिक दस्तऐवज म्हणून वाचणे अधिक फलदायी ठरते.

‘धर्मरेषा ओलांडताना’चे मोठे योगदान एका साध्या जाणिवेत आहे. माणसाची ओळख एका धार्मिक चौकटीत पूर्ण होत नाही. प्रत्येक व्यक्तीच्या मागे तिचे बालपण, शिक्षण, कुटुंब, स्वभाव, अनुभव, विचार, आवडी-निवडी आणि मूल्ये असतात. विवाहामुळे दोन वेगवेगळ्या धार्मिक ओळखी जवळ येतात तेव्हा या सर्व मानवी स्तरांवर संवाद सुरू होतो. त्या संवादातून धर्माविषयीचे प्रश्न उभे राहतात आणि माणूसपणाविषयीचे प्रश्नही उभे राहतात. धर्मरेषा ओलांडणे म्हणजे धर्म विसरणे असे नाही. स्वतःची ओळख टिकवून दुसऱ्याच्या ओळखीचा आदर करता येतो का, हा खरा प्रश्न आहे. मतभेद असूनही सहजीवन शक्य आहे का, याची परीक्षा अशा विवाहांत रोज होत असते. या प्रक्रियेत परस्परांची समज वाढू शकते. स्वतःच्या श्रद्धांकडे पाहण्याची दृष्टी बदलू शकते. काही पूर्वग्रह गळून पडू शकतात. काही भिन्नता कायम राहू शकतात. तरीही संवाद टिकवून ठेवण्याची क्षमता निर्माण होणे ही मोठी मानवी उपलब्धी आहे. म्हणून ‘धर्मरेषा ओलांडताना’ हे पुस्तक आंतरधर्मीय विवाहांमधून उलगडणाऱ्या मानवी अनुभवांचे चिंतन आहे. त्यातील पंधरा मुलाखती पंधरा वेगळ्या जीवनप्रवासांची साक्ष देतात. त्या अनुभवांतून धर्म, प्रेम, कुटुंब, ओळख, स्वातंत्र्य, समायोजन आणि माणूसपण यांचे परस्परसंबंध दिसतात. धर्मांच्या सीमांवर उभे राहून दुसऱ्या धर्माकडे पाहण्याऐवजी त्या सीमांच्या पलीकडे जाऊन समोरच्या माणसाकडे पाहण्याची दृष्टी या अनुभवांतून विकसित होते.

धर्मरेषा समाज आखतो. त्या मनातही रुजतात. त्या ओलांडताना संघर्ष होतो. काही जखमा होतात. काही नाती तुटतात. काही नाती अधिक घट्ट होतात. काही माणसे बदलतात. काही माणसे स्वतःला नव्याने ओळखतात. या सगळ्या प्रक्रियेची संवेदनशील नोंद ‘धर्मरेषा ओलांडताना’ करते. म्हणून हे पुस्तक आंतरधर्मीय विवाहांचा अभ्यास करणाऱ्या वाचकांसाठी महत्त्वाचे आहेच; त्याचबरोबर धर्म आणि माणूसपण यांच्या संबंधाचा विचार करणाऱ्या प्रत्येक वाचकांना ते अंतर्मुख करणारे आहे. प्रेमापलीकडचे सहजीवन समजून घेणारे हे पुस्तक प्रत्येकाने वाचलेच पाहिजे एवढ्या त्या मुलाखती हृद्य आणि विचार करण्यासारख्या झालेल्या आहेत.

☆

परिचय : श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य #३४० ☆ अनदेखे फलित सपने… ☆ डॉ. मुक्ता ☆

डॉ. मुक्ता

(डा. मुक्ता जी हरियाणा साहित्य अकादमी की पूर्व निदेशक एवं माननीय राष्ट्रपति द्वारा सम्मानित/पुरस्कृत हैं। साप्ताहिक स्तम्भ “डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य” के माध्यम से  हम  आपको प्रत्येक शुक्रवार डॉ मुक्ता जी की उत्कृष्ट रचनाओं से रूबरू कराने का प्रयास करते हैं। आज प्रस्तुत है डॉ मुक्ता जी की मानवीय जीवन पर आधारित एक विचारणीय आलेख अनदेखे फलित सपने। यह डॉ मुक्ता जी के जीवन के प्रति गंभीर चिंतन का दस्तावेज है। डॉ मुक्ता जी की  लेखनी को  इस गंभीर चिंतन से परिपूर्ण आलेख के लिए सादर नमन। कृपया इसे गंभीरता से आत्मसात करें।) 

(डॉ मुक्ता जी द्वारा रचित एक भजन – मन को मंदिर बनाना / स्वर- अर्चना पांड्या, सौजन्य – स्वरांजलि चैनल – अर्चना पांड्या)

☆ साप्ताहिक स्तम्भ – डॉ. मुक्ता का संवेदनात्मक साहित्य  # ३४० ☆

☆ अनदेखे फलित सपने… ☆ डॉ. मुक्ता ☆

‘कुछ लोग उन चीज़ों को देखते हैं; जिनका अस्तित्व है और पूछते हैं कि वे ऐसी क्यों हैं? मैं उन चीज़ों के स्वप्न देखता हूं; जो कभी नहीं थीं और कहता हूं–वे क्यों नहीं हो सकतीं?’ जार्ज बर्नार्ड शॉ का यह कथन उनकी कुशाग्र बुद्धि का परिचायक है कि संसार में जिन वस्तुओं का अस्तित्व है; उनके बारे में ज्ञान प्राप्त करना सामान्य सी बात है। वास्तव में जिनका अस्तित्व नहीं है,जो कल्पना व स्वप्न हैं; जिनका अस्तित्व कभी नहीं था; उनके बारे में भी अपनी धारणा बनानी चाहिए कि वे क्यों नहीं हो सकतीं? ऐसी कल्पना विलक्षण प्रतिभा का धनी व्यक्ति ही कर सकता है। इस कथन को सार्थक करती हैं दुष्यंत की पंक्तियां– ‘कौन कहता है/ आकाश में सुराख़ हो नहीं सकता/ एक पत्थर तो तबीयत से उछालो यारो।’ संसार में असंभव कुछ भी नहीं है। जो नहीं है,उसके बारे में चिंतन व शोध करना और उसे सबके के समक्ष प्रकट कर देना ही चमत्कार है। न्यूटन का गुरुत्वाकर्षण व एडिसन का बल्ब की खोज व अन्य वैज्ञानिकों द्वारा विभिन्न क्षेत्रों में उन वस्तुओं के अस्तित्व व रूपाकार को स्पष्ट करना किसी अजूबे से कम नहीं है। ऐसे कार्य प्रभु-प्रदत्त प्रतिभा,दृढ़ निश्चय व अथक परिश्रम द्वारा संभव हो सकते हैं। इसमें सबसे अधिक योगदान रहता है आत्मविश्वास का; जो हमें निरंतर कर्म करने की प्रेरणा देता है तथा बीच राह से लौटने नहीं देता; न ही थककर निराशा का दामन थामने देता है।

सपने में होते हैं, शजो हम खुली आंखों से देखते हैं,क्योंकि वे हमें सोने नहीं देते और बंद आंखों से देखे गए सपनों का कोई अस्तित्व नहीं होता। अब्दुल कलाम की यह सोच मानव मन को ऊर्जस्वित करती है और वह इंसान तब तक चैन से नहीं बैठता; जब तक उसके सपने साकार नहीं हो जाते। इस संदर्भ में महात्मा बुद्ध का यह कथन अत्यंत सार्थक है कि ‘मनुष्य युद्ध में सहस्त्रों पर विजय प्राप्त कर सकता है, लेकिन जब वह  स्वयं पर विजय पा लेता है; सबसे बड़ा विजयी होता है,क्योंकि उसे आत्मावलोकन द्वारा प्राप्त किया जा सकता है। जीवन में कठिनाईयाँ तो हमसाये की भांति हमारे अंग-संग रहती हैं। यदि हम उन्हें कष्टकारी मानते रहेंगे,तो वे हमें असीम पीड़ा व दु:ख पहुंचाएंगी। यदि हम उन्हें परछाई के रूप में स्वीकार लेंगे तो वे हमारा पथ- प्रशस्त करेंगी और हम आत्मविश्वास के बल पर दाना मांझी की भांति पर्वत काटकर बीस किलोमीटर लंबी सड़क अकेले ही बना पाने का साहस जुटा पाएंगे। वास्तव में चुनौतियां हमें प्रेरणा देती हैं और जब हम उन्हें जीवन का हिस्सा स्वीकार लेते हैं; वे हमारी पथ-प्रदर्शक बन निरंतर कार्य-रत रहने को प्रेरित करती हैं। सो! उनसे मुक्ति पाने का उपाय,उनकी  सहज-स्वीकार्यता ही है।

बाबा आमटे बचपन में मन के अनुकूल न होने पर नाराज़ हो जाते थे,जो उनकी माता को बहुत अखरता था। एक बार वे पतझड़ के मौसम में उन्हें बगीचे में ले गयीं और दिखाया कि वृक्ष अपने पत्तों का त्याग कर रहे हैं और उनके स्थान पर नए पत्ते आकार ग्रहण कर रहे हैं। सो! मानव को भी सुखद जीवन जीने के लिए मन के दुराग्रह व धारणाओं का त्याग करके संबंधों को नवीन ढंग से सींचना चाहिए और अपने अप्रिय अनुभवों को पुराने पत्तों की भांति त्याग देना चाहिए। आमटे पर उक्त सीख का सकारात्मक प्रभाव पड़ा और वे तुरंत अपने नाराज़ मित्र से मिलने पहुंच गए। वास्तव में यही जीवन है; सृष्टि का क्रम है। जीवन-मृत्यु का सिलसिला तो निरंतर चलता रहता है। संतोषानंद जी की यह पंक्तियां ‘जीवन का मतलब तो आना और जाना है/ परछाइयाँ रह जाती रह जातीं, रह जाती निशानी है।’ आज तक कोई भी इस रहस्य को नहीं जान पाया है कि इंसान कहाँ से आता है और कहाँ चला जाता है? धन-दौलत, महल-चौबारे व सगे-संबंधी सब यहीं धरे रह जाते हैं; केवल उसके कर्मों की गठरी ही उसके साथ जाती है। इसलिए मानव को सत्कर्म व सबसे प्रेम-पूर्वक व्यवहार करने की सीख दी गई है।

मालवीय जी के मतानुसार ‘जो मनुष्य अपनी निंदा सुन लेता है; वह सारे जगत् पर विजय प्राप्त कर लेता है अर्थात् वह सामर्थ्य केवल उसी व्यक्ति में होता है; जिसमें अहं भाव नहीं होता। टैगोर का ‘एकला चलो रे’ संदेश भी अनुकरणीय है कि ‘जो लोग बने-बनाए रास्ते पर न चलकर अपनी राह का निर्माण ख़ुद करते हैं; वे ही मील के पत्थर स्थापित करते हैं।’ टैगोर की भांति वे अपने सृजन अर्थात् कृत-कर्मों से कभी भी संतुष्ट नहीं होते। जीवन के अंतकाल में जब टैगोर बीमार पड़ गए थे तो विनोबा भावे उन्हें देखने गए और उनकी भूरी-भूरी प्रशंसा की। उन्होंने पचपन हज़ार गीतों की रचना कर इतिहास रच दिया है तथा टेनिसन, शैले आदि गीतकारों को भी पीछे छोड़ दिया है। परंतु उन्होंने यह उत्तर दिया कि ‘वे संतुष्ट नहीं हैं, क्योंकि अभी वे उन गीतों का सृजन नहीं कर पाए हैं; जो वे करना चाहते थे। वास्तव में वे गीत, जो गाये नहीं गए; आज भी उनके ज़हन में हैं,अधूरे हैं।’

सृजन एक साधना है और उत्तम साहित्यकार निरंतर साधना-रत रहता है और उसके हृदय में उत्कृष्ट सृजन का भाव सदैव विद्यमान रहता है। प्रत्येक साहित्यकार एक नयी कृति के सृजन को पाठकों तक पहुंचाने के मध्य प्रसव-पीड़ा से गुज़रता है। उस स्थिति में समाज के हर व्यक्ति की पीड़ा उसकी पीड़ा बन जाती है और वह उसे आत्मसात् कर जब तक उसकी अभिव्यक्ति नहीं कर लेता; चैन से नहीं बैठ सकता। उसे उन पात्रों के दर्द को जीना पड़ता है और जब तक वह अनुभूत पीड़ा उसी रूप में पाठकों के हृदय को आंदोलित नहीं करती; उसका सृजन सार्थक नहीं होता। काव्य-शास्त्र में यह विधा साधारणीकरण कहलाती है और नाटक में त्रासदी को देखते हुए जब दर्शकों के नेत्रों से अश्रुपात होने लगता है और वे उस क़िरदार की मनोदशा में पहुंच जाते हैं,तो वह सृजन सफल माना जाता है; जिसे पाश्चात्य काव्य-शास्त्र में विरेचन की संज्ञा से अभिहित किया जाता है। सोहनलाल द्विवेदी जी की ये पंक्तियां ‘कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती/ लहरों से डरकर नौका पार नहीं होती’ अर्थात् जो लहरों से डरकर किनारे पर बैठे रहते हैं; उनकी नौका कभी भी पार नहीं उतर सकती। सो! मानव को निरंतर प्रयासरत चाहिए।

किंग ब्रूसली ने एक मकड़ी को अपने जाले से बार-बार गिरते व चढ़ते देख उससे प्रेरणा प्राप्त की और पुन; युद्ध करने पर उन्हें विजय प्राप्त हुई। सो! जीवन में निरंतर संघर्ष-रत रहना चाहिए; कभी पराजय को स्वीकार नहीं करना चाहिए, क्योंकि ‘मन के हारे हार है,मन के जीते जीत।’ वैसे भी जो हम सोचते हैं और जैसा हमारा नज़रिया होता है; वही घटित हो जाता है। इसलिए कहा जाता है कि नज़रें बदलने से नज़ारे बदल जाएंगे और नज़रिया बदलने से ज़िंदगी बदल जाएगी; जीवन के प्रति हमारा दृष्टिकोण बदल जाएगा। अंत में स्वरचित पंक्तियों के माध्यम से मैं यह कहना चाहूंगी कि ‘मौसम भी बदलते हैं/ दिन रात बदलते हैं/ यह समां बदलता है/ जज़्बात बदलते हैं/ यादों से महज़ मिलता नहीं/ दिल को सुक़ून/ ग़र साथ हो सुरों का/ नग़मात बदलते हैं’ अर्थात् समय के साथ परिस्थितियां बदलती हैं,परंतु सृष्टि का क्रम अनवरत चलता रहता है। इसलिए ‘दु:खों से मत घबरा मानव/ यह समां भी गुज़र जाएगा।’ रात्रि के पश्चात् स्वर्णिम भोर नयी आशा व नवीन स्वप्न लेकर दस्तक देती है और हमें ऊर्जस्वित करती है। इसलिए आशा का दामन थाम रखिए; जीवन में अप्रत्याशित करिश्में हो जाएंगे; जिसकी आपने कभी कल्पना भी नहीं की होगी।

●●●●

© डा. मुक्ता

माननीय राष्ट्रपति द्वारा पुरस्कृत, पूर्व निदेशक, हरियाणा साहित्य अकादमी

संपर्क – #239,सेक्टर-45, गुरुग्राम-122003 ईमेल: drmukta51@gmail.com, मो• न•…8588801878

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares