हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ आलेख # १९२ – देश-परदेश – त से तोता ☆ श्री राकेश कुमार ☆

श्री राकेश कुमार

(श्री राकेश कुमार जी भारतीय स्टेट बैंक से 37 वर्ष सेवा के उपरांत वरिष्ठ अधिकारी के पद पर मुंबई से 2016 में सेवानिवृत। बैंक की सेवा में मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगढ़, राजस्थान के विभिन्न शहरों और वहाँ  की संस्कृति को करीब से देखने का अवसर मिला। उनके आत्मकथ्य स्वरुप – “संभवतः मेरी रचनाएँ मेरी स्मृतियों और अनुभवों का लेखा जोखा है।” ज प्रस्तुत है आलेख की शृंखला – “देश -परदेश ” की अगली कड़ी।)

☆ आलेख # १९२ – देश-परदेश ☆

☆ त से तोता ☆ श्री राकेश कुमार ☆

आज प्रातः फ्लैट की बालकनी से पास के एक घर की छत पर तोतों का झुंड बैठा हुआ देखकर, हमारी दादी द्वारा पाले गए तोते की याद आ गई। घरों में पाला जाने वाला सबसे प्रिय पक्षी हमारा तोता। प्यार से इसको मिट्ठू भी बुलाया जाता है। “हरे रंग का है, ये तोता” बच्चों की एक पसदीदा कविता हुआ करती थी, अब तो “जैक एंड जिल” का समय भी जा चुका है।

पौराणिक कथाओं में राक्षस की जान तोते में हुआ करती थी। हमारे बॉलीवुड ने भी तोते का उपयोग अधिकतर “तोता मैना” के रूप में किया था। कहानियों में भी बहेलिये और तोते के बहुत सारे किस्से पढ़े और सुने थे।

तोते की संगत उसको राम राम कहना या फिर भद्दे शब्द भी सिखा देती है। कार्यालयों में जो लोग, उच्च अधिकारियों के करीब रहते है, उनको भी तोता कहा जाता है। जब किसी कार्यक्रम में जो लोग आयोजकों की तारीफ़ में कशीदे पढ़ने लग जाते हैं, उनको भी तोते की संज्ञा मिल जाती है।

यदि मुहावरों की बात करें, तो तोते के ऊपर बहुत सारे मुहावरे बन चुके हैं, जैसे कि तोता पालना, हाथ के तोते उड़ जाना, तोते की तरह आंखें फेरना, रट्टू तोता आदि। महिलाओं ने भी तोते के नाम से ही “तोतिया” रंग ईजाद कर दिया है। “तोतिया नाक” शब्द भी व्यक्ति के नयन नक्श की जानकारी देने के लिए उपयोग होता हैं।

तोते द्वारा पेड़ों पर कुछ फलों को चोंच मार दी जाती है। फल विक्रेता उसको सबसे मीठा होने का सर्टिफिकेट देकर, क्रेता को उल्लू बना देते हैं। तोतापरी आम की एक किस्म का रंग तोते जैसा ही होता हैं।

तोता पुराण को अब विराम देते हैं, वर्ना कुछ लोग हमें भी तोते का तोता कहने लग जायेंगे।

© श्री राकेश कुमार

संपर्क – B 508 शिवज्ञान एनक्लेव, निर्माण नगर AB ब्लॉक, जयपुर-302 019 (राजस्थान)

मोबाईल 9920832096

संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तृप्तता… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ तृप्तता☆ श्री अनिल वामोरकर ☆

आज एकांतात

हलकेच ध्यान लागले

अन् अंग प्रत्यंग

उर्जेत न्हाले…

 

श्वासही मंदावला

भोवतीचे कळेना

एका वेगळ्या विश्वात

मी मलाच पाहीले…

 

होता कुट्ट अंधार

पण तोही वाटे हवासा,

नव्हती भीती, होते कुतूहल

अंधारातही दिसू लागले…

 

हळूहळू अंधार

धूसर झाला

हलक्या प्रकाशात

मज सद्गुरू दिसले…

 

मंद स्मित

तेजोमय वदन,

सुवर्ण किरणांनी वलयांकित,

कृपांकीत केले…

 

मौनात मी

मौनातच त्या

कृपाकटाक्षे मज

उद्धरीले…

 

पून्हा तोच काळोख,

हवाहवासा,

शाश्वत तृप्ततेने

मन माझे मोहरले…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ व्यसनमुक्त तरुण: समृद्ध आणि सुदृढ भारताचा पाया… – भाग – २ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ व्यसनमुक्त तरुण: समृद्ध आणि सुदृढ भारताचा पाया… – भाग – २ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

आजकाल रेव्ह पार्ट्यांच्या बातम्या आपण बघतो. यातून स्वतःला वाचवायचे तर या ड्रगच्या पहिल्या डोसलाच नाकारणे हाच सर्वोत्तम प्रतिबंधात्मक उपाय आहे. राम गणेश गडकरींचे ‘एकच प्याला’ हे १९१२ सालचे आशयघन नाटक दुर्दैवाने आजच्या घटकेला तितकेच प्रभावी आणि समयोचित वाटते.) 

— इथून पुढे – – 

आजच्या आधुनिक काळामध्ये व्यक्तीला व्यसनाधीन करणाऱ्या ड्रग्सची यादी बरीच मोठी आहे. पण कांही मोजकी कुप्रसिद्ध नांवे म्हणजे दारू, बार्बिच्युरेटस (झोपेच्या गोळ्या), कोकेन, मॉर्फिन, हेरॉइन, अँफिटॅमिन, भांग, चरस, एल. एस. डी, इत्यादी. डायफेनहायड्रामिन या औषधाचे सेवन बहुचर्चित अशा बेनाड्रिल कफ सिरपद्वारे केल्या जात होते. म्हणून त्यावर बंदी घालण्यात आली. या औषधांमुळे रुग्णाला मतिभ्रम आणि वर सांगितलेली लक्षणे दिसतात. धूम्रपान केलेली आणि सरळ नील रक्तवाहिनीत घेतलेली औषधे रक्तात अति वेगाने प्रवेश करतात आणि त्यांचे प्रभाव अतिजलद होतात. म्हणूनच ते पट्टीच्या व्यसनाधीन लोकांच्या पसंतीस उतरतात. या उलट तोंडी औषधे, अगदी शुद्ध पावडर सुद्धा उशिरा परिणाम साधतात. कायद्यानुसार यात समाविष्ट असलेल्या अंमली पदार्थ अर्थात किंवा सायकोट्रॉपिक पदार्थाचे उत्पादन/ निर्मिती /शेती, मालकी, खरेदी, विक्री, वाहतूक, साठवणूक आणि सेवन करणे बेकायदेशीर आहे. गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार तुरुंगवास आणि दंडाच्या तरतूदी आहेत. दुर्दैवाने अशी औषधे डॉक्टर आणि परिचारिकांना उपलब्ध होतात आणि त्यांच्यापैकी थोडके जण या ड्रगसच्या आहारी गेल्याचे दिसून आले आहे.

‘सॉफ्ट टार्गेट’ अथवा ‘कमकुवत लक्ष्य’ असल्याने ड्रग ट्रॅफिकिंग करणाऱ्या टोळ्यांच्या जाळ्यात शालेय विद्यार्थी आणि नवयुवक विनासायास अडकतात. आपला मुलगा किंवा मुलगी ड्रगच्या प्रभावाखाली येत आहे हे कुटुंबियांनी कसे ओळखावे? यासाठी पालकांनी मुलांच्या बाबतीत कठोर निरीक्षण केले पाहिजे. त्यांनी खालील गोष्टी तपासून बघाव्यात.

  • आपला मुलगा दात घासणे, आंघोळ करणे, निसर्गाची हाक (शौच आणि लघवी), या नियमित स्वच्छतेचे पालन करत नाही. ड्रगच्या हँगओव्हरमुळे खूप उशीरा उठतो. त्याच्या डोळ्यांच्या बाहुल्या विस्तारलेल्या किंवा खूपच संकुचित असतात, म्हणजेच सामान्य नसतात. यामुळे डोळे लाल आणि सुजलेले असू शकतात.
  • तो बहुतेक वेळा स्वतःला त्याच्या बंद खोलीत कोंडून घेत असतो. खोलीत कांही विचित्र वास येऊ शकतो. त्याच्या खोलीत तुम्हाला अपरिचित पावडर किंवा इंजेकशन दिसू शकते.
  • तो तुमच्यासमोर विशिष्ट लोकांशी फोनवर बोलणे टाळतो, त्याला नवीन मित्र भेटतात.
  • तो जास्तीचे पैसे मागतो, तुमचे पैसे किंवा दागिने नाहीसे होतात.
  • तुमच्या हे लक्षात येते की, तो शाळेत किंवा कॉलेज मध्ये जातो असे सांगतो, पण तिथे पोचत नाही.
  • त्याच्या शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये घसरण होणे ही काळजी करण्यासारखी गोष्ट नाही का?
  • त्याच्या जीवनात त्याला रस नसणे ही धोक्याची घंटा आहे, हे त्याच्या वागण्या-बोलण्यातून तुम्हाला जाणवायला लागते.
  • व्यसनाधीन व्यक्तीचे स्वतःशी अन जगाशी असलेले नातेच संपुष्टात येते.

‘उपचारापेक्षा प्रतिबंध चांगला’. मंडळी, नल-दमयंतीच्या आख्यानातील ‘औषध मजला नलगे’ अशी शपथ घेणे हाच या समस्येवरील रामबाण उपाय! निरामय मैत्रीपूर्ण वातावरण आणि निरोगी कौटुंबिक जीवन हे निरोगी समाजाचा पाया आहे. कौटुंबिक स्तरावर धूम्रपान, मद्यपान व ओल्या पार्ट्या यासारख्या सवयी अति घातक आहेत. कुटुंबातील आणि समाजातील वडीलधाऱ्या मंडळींनी तरुण पिढीसमोर स्वतःचा आदर्श उभा करायला हवा. आईवडील मुलांचे रोल मॉडेल असतात हे पालकांनी विसरता कामा नये. शुचिर्भूत निरोगी सामाजिक व्यवस्था हा या समस्येवर प्रमुख उपाय आहे. समाजातील घटकांनी ग्लॅमर आणि प्रतिष्ठेच्या नांवाखाली वाईट सवयींना खतपाणी घालू नये आणि जमेल तितक्या स्तरांवर त्यांचा विरोध करावा. तरुणांवर लक्ष ठेवा, जर तुम्हाला या समस्या असलेल्या युवकाविषयी कांही कळले तर त्याच्या पालकांना तसे कळवा. इथे ‘मला काय त्याचे! ‘ हा ऍटिट्यूड नसावा. अंमली पदार्थांच्या व्यसनाशी संबंधित कायदेशीर आणि वैद्यकीय समस्यांबद्दल जागरूक रहा.

  • या सर्वव्यापी समस्येचा सामना करण्यास एकत्रित आणि एकसंघ प्रयास करायला हवेत. कुणा एकाने हा जगन्नाथाचा रथ खेचणे अशक्य! कुटुंब, समाज, वैद्यकीय क्षेत्र, मीडिया, शासन व्यवस्था, पोलीस दल, राजनैतिक व्यक्ती आणि न्यायव्यवस्था हे सर्व आपला अधिकार वापरून ऍडिक्शनच्या भीषण समस्येवर ताबा मिळवू शकतात.
  • हा रोग म्हणजे समाजाला लागलेली कीड आहे. म्हणूनच याला ‘मेडिको-सोशल प्रॉब्लेम’ म्हटल्या जाते. अर्थात ही एक वैद्यकीयच नव्हे तर सामाजिक समस्या आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. म्हणूनच या व्यसनाधीनतेवर उपचार करणे हे वैद्यकीय आणि सामाजिक संस्थांसाठी एक खूप मोठे आव्हान आहे. रोग्याचे ऍडिक्शन आणि त्यासोबत सुरु झालेल्या संबंधित समस्या, (उदा. इन्फेक्शन, निद्रानाश) आणि विथड्रॉव्हल सिंड्रोम यांसह सर्वसमावेशक उपचार हेच याचे मूलभूत तत्व आहे. मुख्यत्वेकरून व्यसनातून बाहेर येण्यासाठी रुग्णाची १०० टक्के इच्छा असणे अत्यावश्यक आहे. हे जर नसेल तर इतरांच्या प्रयत्नांना यश लाभणे अश्यक्यच आहे.
  • अमली पदार्थांचे व्यसन अचानक थांबवण्याचा कुणीही विचार करू नये. याने विथड्रॉव्हल सिंड्रोम होतो व क्वचित रुग्णाचा मृत्यू देखील होऊ शकतो. दवाखान्यात दाखल करून ऍडिक्शनचा वैद्यकीय उपचार केल्या जातो. व्यसन निर्माण करणारे अतिप्रभावशाली औषध हळूहळू कमी करून त्या मानाने कमी प्रभाव असलेले व्यसन निर्माण करणारे औषध दिल्या जाते. मग तेही हळूहळू बंद केल्या जाते. याने विथड्रॉव्हल सिंड्रोम होत नाही. निष्णात वैद्यकीय देखरेखीखाली हे उपचार केल्या जावेत. यात संयम आणि सहनशीलता यांची जणू परीक्षाच असते. यासोबत मानसशास्त्रीय समुपदेशन केल्या जाते. इथे रुग्ण आणि नातेवाईकांचा सकारात्मक दृष्टीकोन अत्यंत आवश्यक आहे. व्यसनमुक्त झालेल्या रोग्याला मानसिक आधार देणे, त्याचे कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणे ही पायरी अतिशय महत्वाची आहे. हा सर्वंकष आधार नसेल तर रुग्ण परत त्याच काटेरी वाटेने जाऊ शकतो.

पालक, नातेवाईक, मित्र आणि समाज यांची या संदर्भात खूपच महत्वपूर्ण भूमिका असते. मी पालकांना आवाहन करते की, तुम्ही तुमच्या मुलांचे मित्र व्हा, त्याला तुमच्या छत्रछायेखाली सुरक्षिततेची खात्री वाटू द्या. त्याच्याशी सतत प्रत्यक्ष सुसंवाद साधा, जेणेकरून तो त्याच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या तुमच्याशी शेअर करेल. त्याच्या मित्रमंडळीबद्दल अधिक जाणून घ्या. कुठलाही किरकोळ असो व प्रमुख मुद्दा असो, त्याला टोमणे मारणे किंवा रागे भरणे टाळा, अतिरेकी कठोर शिस्त आणि अतिरेकी सौम्यता, हे दोन्ही धोकादायक आहेत. त्यांचा सुवर्णमध्य तुम्हीच शोधा, म्हणजे तो नक्की सापडेल. त्याच्या दैनंदिन गरजांव्यतिरिक्त पॉकेटमनी देणे टाळा. त्याच्या पैशाच्या मागणीला, विशेषकरून इमोशनल ब्लॅक मेलिंगला बळी पडू नका. तुमच्या मुलाच्या सर्वांगीण वाढीत स्वारस्य असू द्या. आपल्या मुलावर अपेक्षांचे अनावश्यक ओझे टाळा. त्याचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्याचा मानसिक ताण कमी करणे हे आजच्या जगात महत्त्वाचे घटक आहेत. या संगोपनात आजी, आजोबा आणि वडीलधारे नातेवाईक पालकांना सामील होऊ शकतात. खरे मित्र तेच असतात जे रुग्णाच्या समस्या शेअर करू शकतात, त्याचे मनोबल वाढवू शकतात आणि त्याचा गमावलेला आत्मविश्वास वाढवू शकतात. सच्चे जिवाभावाचे निर्व्यसनी मित्र असतील तर सोन्याहून पिवळे!

व्यसनाधीन रोग्यांना दिलासा देणाऱ्या आणि त्यांना यातून बाहेर काढण्याचा वसा घेतलेल्या बऱ्याच गैर-सरकारी संस्था कार्यरत आहेत. या स्वयंसेवी संस्थांपैकी सर्वात जुनी संघटना ‘अल्कोहोल अनॉनिमस’ आहे. ही संस्था मद्यपींना समस्येवर मात करण्यास मदत करते. दिवंगत डॉ. अनिता अवचट आणि डॉ. अनिल अवचट यांनी २९ ऑगस्ट १९८६ रोजी मुक्तांगण पुनर्वसन केंद्राची स्थापना केली. या केंद्राने आज अंमली पदार्थ आणि दारू-व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट संस्थेचा दर्जा प्राप्त केला आहे.

२६ जून, २०२६ च्या जागतिक ड्रग दिनाचे घोषवाक्य “जागतिक ड्रग समस्या: कायमस्वरूपी प्रश्न, नवीन आव्हाने, नाविन्यपूर्ण उपाय” हे होते. या दिनाचे मूळ उद्दिष्ट मादक पदार्थांच्या सेवनाविरुद्धच्या लढ्यात आंतरराष्ट्रीय सहयोग वाढवणे आणि सुरक्षित, निरोगी जग निर्माण करणे हे आहे. याची मुख्य उद्दिष्टे आहेत.

  • अमली पदार्थांच्या बाजारात होत असलेले बदल आणि ओपिओइड-कोकेनच्या वाढत्या समस्येचे पुनरावलोकन करणे.
  • नाविन्यपूर्ण उपाय: सायबर तस्करी आणि कृत्रिम ड्रग्सच्या निर्मितीला आळा घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे.
  • जागरूकता आणि सहकार्य: मानवी हक्कांवर आधारित धोरणे आखणे आणि जागतिक पातळीवर यंत्रणांना बळकट करणे.

आजचा तरुण समृद्ध भारताचे प्रतिनिधित्व करतो. कालची आणि उद्याची पिढी या आजच्या सशक्त पिढीवर विश्वास ठेऊन आहे, त्याच्याकडून त्यांच्या खूप अपेक्षा आहेत. शारीरिक आणि मानसिक रित्या खंबीर असलेला तरुण हा भारताचा खरा चेहरा असायला हवा.

स्वामी विवेकानंद युवाशक्तीला आवाहन करीत म्हणतात:

“उठा, जागे व्हा आणि ध्येय मिळेपर्यंत अजिबात थांबू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःला कधीही कमकुवत समजू नका, जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी तुम्ही करू शकत नाही.”

– समाप्त – 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ”मेरा वाला ऐसा नहीं हैं!” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

🌸 जीवनरंग 🌸

☆ “मेरा वाला ऐसा नहीं हैं!” ☆ संध्या बेडेकर ☆

काल देशमुख परिवार थोडा disturbed च होता. कारण कालच पल्लवी ने सर्वांना प्रतीक बद्दल माहिती सांगितली. प्रतिक सिंह तिच्या च कंपनीत काम करणारा तिचाच कलीग. उत्तर भारतीय, हिंदी भाषी.

साधारण सहा महिनेच झाले असतील, दोघे बरोबर काम करतायेत. दोघांची ओळख होऊन. एकाच प्रोजेक्टवर रोज आठ दहा तास काम करतात, त्यामुळे ओळख मैत्रीत व मैत्री प्रेमात झाली. गोष्टी लग्न करण्यापर्यंत पोहचल्या.

पल्लवी ने आई बाबांना याबाबत सांगितले.

तसे आजकाल अशा सर्व गोष्टी म्हणजे नवीन, वेगळं असं काही वाटत नाही. दुसऱ्यांच्या बाबतीत आपण ऐकून,

 हो का!! असं म्हणून लगेच थांबतो. आणि काही वेळानंतर विसरतोही. परंतु तीच गोष्ट आपल्या घरात जेंव्हा ऐकतो, तेंव्हा स्तब्ध होतो. क्षणभर आपण ऐकलेली गोष्ट खरी का?

हा विचार येतो, त्या मागोमाग अनेक प्रश्न डोक्यात येतात. त्या प्रश्नांमध्ये भीती, आश्चर्य, शंका कुशंका असतात. अस्वस्थता असते. काल्पनिक सुनामी येते. आजूबाजूला घडलेली अनेक intercaste marriages लक्षात येतात. अनेक चांगल्या पेक्षा वाईट बातम्या पुन्हा पुन्हा आठवतात. अनेक प्रश्न त्याची अनेक उत्तर मनात येतात. टीव्ही वरही या संदर्भातील अनेक बातम्या आपणं ऐकतो. फसवाफसवी ची किती तरी उदाहरण वर्तमानपत्रात वाचतो. आता तर अशा बातम्यांना ऊत आला आहे की काय? ? असं वाटतं.

 जेंव्हा आपल्यावर वेळ येते तेंव्हा जीव घाबरतो. तेंव्हा स्वतः लाच समजावयाचे, स्वतः लाच सांगायचे की आजकाल तर हे सहज घडतंय. मग मी एवढी अस्वस्थ का होतेय? ? आपण शोधलेला मुलगा चांगलाच असेल कशावरून? कोणाच्या चेहऱ्यावर काही लिहिलं असतं का? आणि

 महाराष्ट्रातला चांगला आणि दुसरी भाषा बोलणारा असला तरी पण मुलगा च आहे ना.

आता हा प्रतीक सिंह ही चांगला असूच शकतो ना.

चांगला शिकलेला तर आहेच. नोकरी पण चांगलीच आहे. पल्लवी ने काही तरी विचार करूनच हा निर्णय घेतला असेल ना.

फक्त थोडी घाई करतेय का? सहा महिने काळ एखाद्या ला समजायला पूरेसा आहे का? ? तसं ३६ गुण मिळालेल जोडपं पण आयुष्य भर आनंदाने संसार करतातच असं नाही. वेगवेगळ्या परिस्थितीत स्वभावाचे वेगवेगळे रंग नेहमी दिसतच असतात.

वगैरे वगैरे.

आपणही जो मुलगा शोधणार आहोत / होतो, तो पण नवीनच असेल ना.

घरातील आई पदावर बसलेली व्यक्ती जास्त अस्वस्थ होते.

पल्लवी ने प्रतीक बद्दल सांगायला सुरुवात केली.

पल्लवी म्हणाली,

 आई बाबा!! तो हुषार आहे. कॉलेज चा Topper होता. त्यांचे future bright आहे. त्याचे बाबा सरकारी नोकरीत आहेत. आई बॅंकेत नोकरीला आहे. एक बहिण आहे. तिचे लग्न झाले आहे. आपल्या सारखाच मध्यम परिस्थिती चा परिवार असावा बहुतेक.

बाबा म्हणाले,

अग?! आपण श्रीमंत मुलांच्या शोधात तसाही प्रयत्न करत नव्हतोच. तो प्रश्नच नाही.

Intercaste marriages लाही आमचा विरोध नाहीच.

फक्त प्रतीक हुषार बरोबर शहाणा आहे का? हे महत्वाचे.

अग! कॉलेज मध्ये टॉप करायला हुषारी लागते पण जोडीदारा बरोबर समाधानी आनंदी आयुष्य काढायला शहाणपण लागत. येथे IQ पेक्षा EQ महत्वाचा असतो.. लग्नाबद्दल त्यांचे विचार मला समजून घ्यायचे आहेत. कारण 

लग्न करणे आणि संसार करणे म्हणजेच 

Wedding आणि marriage दोन्हीत खूप अंतर आहे. Wedding नंतर दुसऱ्याच दिवशी पासून संसार सुरू होतो.

 तसं बघितलं तर लग्न म्हणजे एक दिवसाचा सोहळा आहे. पण marriage म्हणजे पूर्ण आयुष्य भराचा साथ, सहवास commitment आहे. त्यात विश्वास असावा लागतो, भीती नाही. शाश्वती असावी, अनिश्चितता नाही.

जमलं तर जमलं नाही तर ड्रायव्हर्स हे option आहेच. अस नको.

 माझ्या मते या विचाराला तर स्थान नाहींच.

तू नही तो और सही. हा असा विचारही नसावा.

लग्न म्हणजे emotional connection.

तुम्ही कार्पोरेट मध्ये काम करणारी मुलं आमच्या पेक्षा खूप स्मार्ट, हुषार, प्रॅक्टीकल आहात. academics, knowledge, professionally हिशोब करण्यात एक नंबर आहात. इतर गोष्टीतही perfect असता.

 Pre wedding shoot पासून संगीत, मेहंदी and what not सर्व नवीन रितीरिवाज जीव ओतून पार पाडता. पण Pre wedding responsibilities, pre wedding training, pre wedding coaching, marriage concept हा विषय समजून घेणे जास्त आवश्यक आहे.

 मला हा प्रश्न आजच्या २५ ते ४० वयोगटाच्या सर्व मुलांनाच विचारायचा आहे.

Wedding च्या दुसऱ्या दिवशी पासून संसार सुरू होतो. नातं कसं सांभाळायचं? ? हे दोघांनाही समजावं लागेल, शिकावं लागेल.

नात्यातला जिव्हाळा मोजमाप करायला कोणतंही मशीन नाही किंवा स्केलपट्टी, तराजू नाही, तो वागण्या बोलण्यात जाणवला पाहिजे.

ते काय होऊन जाईल असं म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही.

लग्नानंतर togetherness ची भावना असावी.

 हे साध गणित आहे की दोन वेगवेगळ्या घरातील मुलगा मुलगी एकत्र रहायला सुरुवात करतात. संस्कार वेगळे, सवयी खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या. विचार करायची, खर्च करायची पद्धत वेगळी, मग एकत्र रहायला लागल्यानंतर हुषारी बरोबर शहाणपण पण लागतच.

कुठे, काय, किती बोलायच? ? बोलायचं की नाही? हे शिकावं लागतं. संयंम लागतो. त्यात दोन चार वर्ष सहज निघून जातात. तेवढा patience ठेवायला हवा. दोन्ही कडचे आई वडील महत्वाचेच, त्यांचा हात सोडायचा नाहीच पण तुम्ही दोघांनी दोन्ही हात घट्ट पकडून ठेवणे. येणाऱ्या प्रत्येक दिवसाचा सामना करणे, चर्चा करून एकमताने निर्णय घेणे. मग ती कोणतीही छोटी मोठी गोष्ट असो. कोणी दुसऱ्यां व्यक्तींच्या बोलण्याचा तुमच्या वर किती प्रभाव पडतो? ? हा पण महत्वाचा मुद्दा आहे.

कारण कोणाच्या ही बोलण्याचा स्वतः वर परिणाम करून घेणारी व्यक्ती मनाने कमजोर असते. थोडक्यात कच्च्या कानाचे नसावे.

 दोघांनी एकमेकांच्या मान ठेवणे, एकमेकांना सांभाळणे, आपले प्रश्न दोघांमध्येच सोडविणे हे महत्वाचे. म्हणजे पल्लवी तुझ्या आईने सूद्धा तुमच्या मध्ये मध्ये केलेले मला आवडणार नाही. चालणार तर अजिबात नाही.

 म्हणून प्रतीक ला समजून घे.

मी माझ्यापरीने चौकशी करणारच आहे.

प्रतीक चांगला असेलही. पण मला माझी जबाबदारी व्यवस्थीत पूर्ण करायची आहे. खात्री करून घ्यावी लागेल.

पल्लवी म्हणाली, बाबा! तो खरच चांगला आहे. इतर मुलांसारखा नाही.

बाबा म्हणाले,

अग!! हो तो चांगला असेलही. चेहरा नेहमी भोळाच असतो ग. चेहऱ्याला बघून काय कळते? मनातलं कळत का? ? माणसाचा खरा स्वभाव विपरीत परिस्थितीत, राग आल्यावर कळतो. या परिस्थितीत प्रत्येक मुलीला 

मेरा वाला वैसा नहीं हैं । वो बहुत अच्छा हैं ।

असच वाटत.

चौकशी करण गरजेचे आहे ग।

 अग!! तुम्ही भेटत रहा. त्याला घरी घेऊन ये. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे.

अजून थोडा वेळ घ्या. घाई करू नका. स्वतः बद्दल मोकळेपणाने बोला. फक्त स्वतः चे चांगले गुणच नाही तर वाईट गुणांची, आवडी निवडी बद्दलही चर्चा करा.

 हं! अजून एक गोष्ट लक्षात ठेवा. त्यावर चर्चा करा. ती म्हणजे तुम्ही दोघे professionals आहात. दोघांच्या नोकरीत ups and downs येतील. कधी तू पूढे असशील तर कधी तुमच्या दोघांपैकी कोणाला तरी दोन पावले मागे पण घ्यावी लागतील. तेंव्हा तुमचा ego मध्ये यायला नको. या सर्व गोष्टी लक्षात घ्या.

जीवनाची सुरुवात करताना दमदार पाऊल पडलं पाहिजे.

त्यात विश्वास, आधार, आपुलकी, सहनशीलता, एकमेकांबद्दल आदर सन्मान असावा. तेंव्हा च आयुष्यात येणाऱ्या समस्यांना तुम्हाला धैर्याने तोंड देणे जमेल 

Boy friend आणि girl friend चे casual relationship नसाव. तर त्यात commitment असावं लागतं. Dating करताना आपल्या values, boundaries लक्षात असू द्याव्यात.

 हे माझे सद्य परिस्थिती बघता अनुभवाचे बोल आहेत.

पल्लवी तुझ्या मतांचा, मी मान ठेवतो. कोणतेही चूकीचे पाऊल तू उचलणार नाही याची खात्री आहे मला.

सर्व व्यवस्थित होईल.

प्रतीक ला घरी घेऊन ये. आपण त्यांच्या घरी पण जाऊ. भरपूर गप्पा करू. एकमेकांना समजायचा वेळ देऊ आणि घेऊ.

 

म्हणतात ना,

Alone you can attack, together you have powerful defence.

Alone you can win the match, together you can win the tournament.

 आयुष्याची Tournament जिंकायला, नेहमी एकत्र असणं, एकमेकांना समजण आवश्यक आहे.

तेंव्हा बाबा बरोबर म्हणातायेत,

 मेरा वाला वैसा नहीं हैं,

अस म्हणून घाई करू नये.

हेच बरोबर आहे.

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खडू आणि फळा! ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ खडू आणि फळा! ☆ शीला पतकी 

नव्याने लग्न झालेली मुलगी जेव्हा माहेरी येऊन बोलायला लागते आमच्या घरी असं आहे, आमच्या घरी तसं करतात, आमच्या घरी हे चालत नाही, तेव्हा समजावे ती मुलगी तिच्या संसारात पूर्णपणे रुळली आहे तसे शिक्षकी पेशात नव्याने शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर फलक लेखन सुरू होते, सुरुवातीच्या फलक लेखनात लिहिलेले लिखाण तिरके तिरके तिरके होत जाते… जेव्हा फलकावरचे लिखाण सरळ रेषेत येईल तेव्हा समजावे आपण आता पूर्ण शिक्षक झालो आहोत. ही खरी शिक्षक होण्याची पहिली पायरी आहे.

खडू आणि फळा ही नुसती दोन साधने नाहीत तर विद्यार्थ्याच्या मेंदूवर दृश्य स्वरूपात काहीतरी साठवण्याचा तो भाग आहे. की बाईंनी किंवा सरांनी अशी आकृती काढली होती त्याला इथे नावे दिली होती आणि मग तो सगळा भाग आठवतो त्यामुळे हा दृकश्राव्य प्रकारातला अत्यंत साधा आणि पहिल्या पायरीचा प्रकारचा शोध लागला आणि तीच अनेक वर्षे शिकवताना वापरली जाऊ लागली 

ज्या शिक्षकाचे फलक लेखन उत्तम त्याचे पाठही सुंदर होतात. काही शिक्षकांची सवय असते की वर्गात गेल्याबरोबर फळा स्वच्छ पुसणे आपला विषय, आजच्या शिकवण्याचा विषय काय आहे तो फलकावर लिहिणे आणि शिकवायला सुरुवात करणे. नकाशा काढणे भूमितीच्या आकृत्या फलकावर काढणे हे शिक्षकाचे कौशल्य त्यामुळे तुमचे शिकवणे प्रभावी ठरते.

काही शिक्षकानी फलकावरती लिहिलेले किंवा फलकावरती काढलेल्या आकृत्या या आजही आपल्या स्मरणात असतील सुंदर हस्ताक्षराचे शिक्षक हे नेहमी मुलांच्या स्मरणात राहतात जिल्हा परिषद शाळेतअसंख्य शिक्षकांचे अक्षर, फलक लेखन हे पाहण्यासारखे असते. त्याला जर चित्रकलेची जोड असेल तर फळा उत्तम सजतोच.

प्रत्येक शिक्षकाच्या सवयीनुसार त्याचे फलक लेखन असते काही शिक्षक फळ्यावर न लिहिता लिहिले आहे असे समजून शिकवतात आमचे कॉलेजमधील एक शिक्षक पिरॉडिक टेबल एका बाजूला आहे असे गृहीत धरून आम्हाला मेटल शिकवत असत आणि पिरॉडिक टेबल मध्ये त्याचे स्थान सांगताना वारंवार त्या बाजूच्या कोपऱ्याला येरझाऱ्या घालत असत. काही शिक्षक मुद्दे फलकावर मांडून… काही जण उगाचच गोल खुणा मांडून… रेषा ओढवून टिंब देऊन गोल करून फलक लेखन कैल्याचे समाधान मिळतात ती त्यांची सवय असते

दारचे अंगण घराची कळा दाखवतात असे म्हणतात तसे शाळेच्या इमारती भोवती असलेले फळे हे शाळेचे वैभव सिद्ध करतात. आमच्या शाळेच्या बाह्य भागात तीस-पस्तीस फळे होते व सर्व शिक्षकांना आठवड्यातून तीन वेळा लेखन करणे कंपल्सरी असे आमचे मुख्याध्यापक रोज लिहीत असत तेव्हा google youtube असल काही नव्हतं त्यामुळे माहिती वाचून मिळवून लिहावी लागे. आमची एक विद्यार्थिनी माझ्याकडून कविता घेऊन लिहीत असे आज ती फार मोठी लेखिका आणि कवयित्री झाली आहे. तिच्या अनेक पुस्तकांना पारितोषिके प्राप्त झाली आहेत. हा फलक लेखनामधून निर्माण झालेल्या आवडीचाआणि संस्काराचा भाग आहे. वर्ग मॉनिटरला फळ्यावर लिहिण्याची मुभा असे. एकदा एका वर्गात एका मुलीने सुविचार लिहिला… एक रुपया चांदीचा सारा देश गांधींचा… मी कपाळावर हात मारून घेतला अगं हा कुठला सुविचार.. पण मला आता कळतंय हा सु नसला तरी विचार नक्की होता असो

फलक लेखनाच्या काही शिक्षकांच्या गमतीजमती आजही आठवतात दयानंद महाविद्यालयामध्ये झूलॉजीचे एक शिक्षक होते झूलॉजीच्या वर्गामध्ये एकावर एक दोन फळे होते म्हणजे एक फळा लिहून झाला की तो वर ढकलायचा दुसरा फळ खाली येत असे त्यावर कुणीतरी टारगट विद्यार्थ्यांनी मोठा बेडूक काढला त्या बेडकाला चश्मा दाखवला बेडकाच्या शरीराच्या मधल्या मोठ्या भागात लिहिले… सर इज अ बिग फ्रॉग… वर्ग शांतपणे शिकत होता सर बेडका संबंधी बोलत होते त्या फलकावर लिहून झाल्यावर तो फळा त्यांनी वर ढकलला आणि पाठीमागचा फळा खाली आला विद्यार्थी मोठ्यांना हसायला लागले. सर ही आकृती पाहून क्षणभर रागावले आणि मग त्या आकृतीचे कौतुक करीत मधले नाव पुसून त्यानी रंगीत खडूने बेडूक सजवला आणि म्हणाले धिस इज फ्रॉक आणि त्यांनी आपला चष्मा नेहमीच्या स्टाईलने सरळ केला… फळ्यावरील लेखनाच्या कितीतरी आठवणी आहेत आमच्या कॉलनीतील फळ्यावर दररोज एक सुविचार लिहीत असे सवय जात नाही ना कॉलनीतले एका गेट समोरून बिडी घेऊन जाणाऱ्या बायका कॉलनीतून ये जा करीत असतात त्यातील एक महिला आपल्या टोपलीतील छोटी वही काढून त्यात मी फलकावर लिहिलेला सुविचार लिहून घेऊन जात असे. ” तू फळ्यावरचे बघून काय लिहून घेतेस आणि कोणासाठी? ” ती लोधी समाजाची होती ती म्हणाली, ” आपका सुविचार बहुत अच्छा होता है बच्चों के लिए लिखके ले जाते है” आपल्या मुलांच्या चांगल्या जडणघडणीसाठी सकाळच्या गडबडीच्या वेळेतही एका छोट्या वहीत ते लिहून घेऊन जाणाऱ्या त्या महिलेचे मला कौतुक वाटले पुढे पुढे तर मी तिच्यासाठीच लिहीत होते.

सोलापुरातील हदे प्रशाला सेवासदन प्रशाला सुयश विद्यालय सरस्वती मंदिर ज्ञानप्रबोधिनी कुचन प्रशाला अशा कितीतरी शाळा आहेत की गेटमधून आत गेल्याबरोबर उत्तम हस्ताक्षरातले आणि सुंदर चित्रांनी सजवलेले फळे स्वागत करीत असतात. त्या शाळेतील विद्यार्थी हे फलक लेखन कधीच विसरू शकत नाहीत ते दृक असल्यामुळे मेंदूच्या पटलावर छापून गेले आहे.

महाराष्ट्रातील कित्येक शिक्षक उत्तम फलक लेखनात माहीर आहेत त्या त्या दिवशी चे वैशिष्ट्य जाणून घेऊन फलकावर रंगीबेरंगी चित्रे काढण्यात प्रसिद्ध आहेत त्यापैकी हिरे सर हे नाव… हे शिक्षक फार सुंदर फलक लेखन करतात आमच्या शाळेतील पोरे सर यांचे फलक लेखन कोणीही विद्यार्थिनी कधीच विसरू शकणार नाही इतके सुंदर असे आणि ते फार आत्मीयतेने लिहीत असत 

फळा आणि खडू यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसमोरआपला विषय शिकवणे हे कौशल्य पूर्वीच्या शिक्षकांकडे होते कारण कोणती आधुनिक उपकरणे हाताशी नव्हती या दोन साधनाने उत्तम आणि संस्कारक्षम पिढ्या घडविल्या केवळ खडू आणि फळा या माध्यमातून शिकवणाऱ्या शिक्षकांच्या या पिढीने या माध्यमातून खूप संस्कार दिला त्या समस्त शिक्षकांच्या पिढीला आदरपूर्वक नमस्कार.

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ खिडकी… ☆ राधिका भांडारकर ☆

राधिका भांडारकर

??

☆ खिडकी… ☆ राधिका भांडारकर ☆

घरातल्या प्रत्येक वस्तूला आपली एक जागा असते. खुर्चीला, टेबलाला, कपाटाला तशीच खिडकीलाही. खिडकीला जागा असतेच पण तरीही ती स्वतःच एक जागा असते. घराच्या आतली आणि बाहेरचीही!

आज इतकी वर्षं उलटून गेली, घर बदललं, माणसं बदलली, परिसर बदलला पण मनाच्या एका कोपऱ्यात ती खिडकी अजूनही तशीच आहे. तिच्या लाकडी चौकटीवर सकाळच्या उन्हाची सोनेरी किनार, बाहेर सोनचाफ्याचं झाड आणि खिडकीच्या शेजारच्या भिंतीवरचा महादेवाचा मोठा फोटो.

सोनचाफ्याचं ते झाड जणू आमच्या घराचंच एक सदस्य होतं. पहाटे खिडकी उघडली की त्याचा मंद, गोड सुगंध घरभर पसरायचा. वाऱ्याची एखादी हलकी झुळूक आली की झाडाची पानं सळसळायची आणि एखादं सोनचाफ्याचं फूल अलगद खिडकीच्या कठड्यावर येऊन पडायचं.

त्या फुलांना उचलताना मला एक विलक्षण आनंद व्हायचा.

पिवळसर, नाजूक पाकळ्यांचं ते फूल हातात घेतलं की वाटायचं, निसर्गानेच आपल्यासाठी काहीतरी सुंदर पाठवलं आहे.

आणि त्या खिडकीच्या शेजारच्या भिंतीवरचा महादेवाचा मोठा फोटो;आजीची महादेवावर अपार श्रद्धा होती. ती महादेवापुढे बसायची तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान दिसायचं.

मी तिच्या जवळ बसून तिचं सगळं पाहत राहायचे. त्या वेळी देव, श्रद्धा, अध्यात्म यांचा अर्थ मला कुठे कळत होता?

पण एक मात्र मनात घट्ट बसलं होतं, खिडकीतला हा नीळकंठ आपलं रक्षण करतो.

खिडकीतला सोनचाफा आणि भिंतीवरचा महादेव!

मला वाटायचं, आमच्या घराला यापेक्षा सुंदर रखवालदार असूच शकत नव्हता. निसर्ग आणि श्रद्धा जणू एका चौकटीत येऊन बसले होते.

कदाचित म्हणूनच ती खिडकी माझ्यासाठी केवळ खिडकी नव्हती.

ती आमच्या घराच्या आत्म्याची चौकट होती.

आमच्या जुन्या घराची ही खिडकी मोठी होती. लाकडी चौकट आणि त्याला दोन पाट्या. सकाळी आई त्या उघडायची आणि घरात सूर्यप्रकाशाचा एक सोनेरी तुकडा अलगद शिरायचा. त्या प्रकाशात हवेत तरंगणारी धुळीची कणंही मला तेव्हा चमचमणाऱ्या ताऱ्यांसारखी वाटायची.

लहानपणी मला हीच खिडकी म्हणजे घरातलं सगळ्यात आवडतं ठिकाण वाटायचं. तिच्या गजांना धरून उभं राहिलं की बाहेरचं जग अगदी जवळ यायचं. रस्त्यावरून जाणारी माणसं, शाळेत जाणारी मुलं, भाजीवाला, सायकलची घंटी, पावसात धावणारी माणसं. सगळं काही त्या खिडकीच्या चौकटीतून एखाद्या चित्रपटासारखं दिसायचं.

पावसाळा म्हणजे तर खिडकीचा ऋतूच!

पहिल्या पावसाच्या सरी आल्या की खिडकीत बसून पाऊस पाहण्यात एक वेगळाच आनंद असायचा. काचेवरून ओघळणारे पाण्याचे थेंब आपापल्या वाटेने खाली सरकत. त्यांची शर्यत लागायची. कोणता थेंब आधी खाली पोहोचतो, हे पाहताना कितीतरी वेळ सहज निघून जायचा.

आणि कधी कधी त्या खिडकीबाहेर आकाशात इंद्रधनुष्य उमटायचं.

क्षणभर वाटायचं, खिडकी उघडली तर हात पुढे करून ते रंग आपण पकडू शकू!

खिडकीने मला ऋतू शिकवले. उन्हाळ्यात तिच्यातून येणारा तापलेला वारा, पावसाळ्यातला मातीचा सुगंध, हिवाळ्यातली कोवळी ऊब आणि वसंतात फुलांचा मंद गंध. निसर्गाची ही सारी पत्रं खिडकीनेच तर घरापर्यंत आणली.

खिडकीवरचा आणखी एक कायमचा सोबती म्हणजे कावळा. रोज सकाळी तो कुठूनतरी उडत यायचा आणि खिडकीच्या कठड्यावर बसून कावकाव सुरू करायचा. त्याची ती कावकाव मला तेव्हा अगदी आपलीशी वाटायची. आजी म्हणायची, “कुणीतरी पाहुणं येणार असेल! ” मग मी उत्सुकतेने दाराकडे पाहत बसायचे. खरंच कुणी आलं तर कावळ्याचं भाकीत खरं ठरल्याचा मला फार आनंद व्हायचा. कधी कोणी आलं नाही तरी त्याची कावकाव मला खटकायची नाही. तो रोज यायचा, दोन-चार हाका मारायचा आणि उडून जायचा. खिडकीशी माझं जे नातं होतं, त्यात त्याचीही एक छोटीशी जागा होती.

आता मनात विचार येतो की, खिडकी फक्त बाहेरचं जग दाखवत नाही. ती माणसाच्या आतलं जगही उघडते.

कधी मन उदास असतं. कुणाशी बोलावंसं वाटत नाही. अशा वेळी आपण नकळत खिडकीजवळ जाऊन उभे राहतो. बाहेर पाहत राहतो. समोरचं आकाश तसंच असतं, झाडं तशीच असतात, रस्ता त्याच गतीने चाललेला असतो; पण आपल्या मनात मात्र काहीतरी हलत असतं.

खिडकीशी उभं राहिलं की जाणवतं;

आपल्या दुःखापेक्षा हे जग कितीतरी मोठं आहे.

एखाद्या अंधाऱ्या खोलीत फक्त एक खिडकी उघडी असेल, तरी प्रकाश आत येण्याची शक्यता कायम असते. म्हणूनच कदाचित ‘खिडकी’ हा शब्द मनालाही आश्वस्त करतो. बंद दरवाज्यापेक्षा खिडकी नेहमीच थोडी अधिक आशावादी वाटते.

दरवाजा आपल्याला बाहेर जाण्याची संधी देतो; पण खिडकी बाहेरचं जग आत आणते.

आजच्या उंच इमारतींमध्ये खिडक्या बदलल्या आहेत. काचेच्या मोठ्या भिंती झाल्या, पडदे आले, काचांवर सूर्यप्रकाश थोपवणाऱ्या फिल्म्स आल्या. खिडकीतून दिसणारं दृश्यही बदललं. पूर्वी झाडं, अंगणं, शेजारची घरं दिसायची; आता कधी समोर दुसरी उंच इमारत दिसते.

तरीही खिडकीचं महत्त्व कमी झालेलं नाही.

आजही एखाद्या आजीला खिडकीत बसून रस्त्याकडे पाहताना आपण पाहतो. एखादं मूल खिडकीतून आकाशात चंद्र शोधतं. एखादी आई मुलाच्या परतीची वाट पाहत उभी असते. एखादा वृद्ध माणूस खिडकीतून सकाळचं वर्तमानपत्र घेणाऱ्या जगाकडे पाहत असतो.

खिडकी म्हणजे प्रतीक्षाही.

कुणाच्या येण्याची, कुणाच्या जाण्याची, एखाद्या पत्राची, फोनची. कधी कधी तर फक्त एका ओळखीच्या आवाजाची.

आणि काही खिडक्या आठवणींच्या असतात.

त्या आता आपल्या घरात नसतात, पण मनात कायम उघड्या असतात. बालपणाची खिडकी, माहेराची खिडकी, शाळेच्या वर्गाची खिडकी, पहिल्या पावसाची खिडकी. काळ कितीही पुढे गेला तरी त्या खिडक्यांतून दिसणारी दृश्यं मनात तशीच राहतात.

कधी कधी वाटतं, त्या खिडकीने मला आयुष्याचा एक सुंदर अर्थ नकळत शिकवला.

बाहेर कितीही बदल घडले तरी घराला उब देणाऱ्या काही गोष्टी कायम आत राहतात.

एक सुगंध,

एक श्रद्धा,

एक आठवण,

आणि एखादी खिडकी.

जी वर्षानुवर्षं बंद असली तरी मनात मात्र सदैव उघडी असते.

“घर बदललं, खिडकी हरवली; पण माझ्या मनातली ती खिडकी अजूनही उघडी आहे. ”

ती खिडकी कधी स्वप्नांकडे उघडते, कधी आठवणींकडे, कधी आशेकडे.

बाहेरचं आकाश कधीच संपत नाही…

आणि खिडकीतून येणारा प्रकाशही!

© राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “केवळ भारतच हे करू शकतो!…” – लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “केवळ भारतच हे करू शकतो!…” – लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात  ☆ प्रस्तुती – प्रभा हर्षे ☆

कल्पक्कमने संपूर्ण जगाला थक्क केले, आणि भारताकडे पाहण्यास भाग पाडले!

प्रत्येक भारतीयाने अभिमानाने आपली मान उंच करावी, अशी ही ऐतिहासिक कामगिरी आहे!

आपण सहसा सोशल मीडियावर चित्रपटांचे प्रदर्शन किंवा क्रिकेटपटूंच्या यशाचा मोठा उत्सव साजरा करतो.

पण आपल्या भविष्याला एक नवी दिशा देणारा एक प्रचंड, खऱ्या आयुष्यातील चमत्कार चेन्नईपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्पक्कम येथे अत्यंत शांततेत घडला आहे.

होय!

२६ जून २०२६ रोजी भारताने जागतिक वैज्ञानिक इतिहासात एक सुवर्ण अध्याय लिहिला आहे.

अमेरिका आणि फ्रान्ससारख्या महासत्तांनी अब्जावधी डॉलर्स खर्च केले आणि शेवटी ” हे आमच्याकडून होणार नाही. ” असे म्हणून हात टेकले.

पण आपल्या भारतीय शास्त्रज्ञांनी हे आव्हान पेलले आणि स्वतःच्या बळावर ते साध्य करून दाखवले.

ही कामगिरी केवळ यंत्रांचा विजय नाही ; हा भारताचा स्वाभिमान आणि आपल्या शास्त्रज्ञांच्या अनेक दशकांच्या तपस्येचे फळ आहे.

प्रत्येक भारतीयाला या कामगिरीबद्दल माहिती का असायलाच हवी!

कारण ही आपल्या पुढील पिढ्यांच्या सुरक्षित भविष्याची हमी आहे.

चला, कल्पक्कममध्ये नक्की काय साध्य झाले आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊया.

कधीही न संपणारे ‘अक्षय पात्र’ : PFBR (प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टॉर)

६ एप्रिल २०२६ रोजी, कल्पक्कम येथील PFBR अणुभट्टने (Nuclear Reactor) आपले पहिले ‘ क्रिटिकॅलिटी ‘ (Criticality) – म्हणजेच शाश्वत अणु साखळी प्रक्रिया (sustained nuclear chain reaction) यशस्वीरित्या साध्य केली. ही जागतिक पातळीवरील एक फार मोठी कामगिरी आहे.

हे इतके खास का आहे?

एका सामान्य अणुभट्टीची तुलना लाकडाच्या चुलीशी करा. जर तुम्ही त्यात १ किलो लाकूड टाकले, तर ते जळते, उष्णता देते आणि त्याची राख होते.

पण आमच्या शास्त्रज्ञांनी कल्पक्कममध्ये बांधलेली फास्ट ब्रीडर रिएक्टॉर ही एका अक्षय पात्र चुलीसारखी आहे!

जर तुम्ही यात १ किलो इंधन टाकले, तर ते तुम्हाला हवी असलेली वीज तर देईलच, पण त्यासोबत १. २ किलो नवीन इंधन देखील तयार करेल!

म्हणजेच, हे इंधन वापरण्यापेक्षा जास्त इंधन तयार करते. हे ऐकायला एखाद्या जादूसारखे वाटते ना? पण हे पूर्णपणे सत्य आहे!

आपल्या मातीची संपत्ती, आपल्या हाती – थोरियमचे स्वप्न :

भारताकडे अणू इंधन म्हणून वापरण्यासाठी युरेनियमचा साठा खूप कमी आहे. त्यामुळे आपल्याला परकीय देशांवर अवलंबून राहावे लागते.

पण थोरियम हे खनिज केरळ आणि तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यावरील वाळूत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. खरे तर भारताकडे जगातील सर्वात मोठा थोरियमचा साठा आहे!

डॉ. होमी भाभा आणि डॉ. अब्दुल कलाम यांचे हेच स्वप्न होते :

आपल्याला वीज निर्मितीसाठी आपल्याच मातीतील थोरियमचा वापर करावा लागेल. “

कल्पक्कमच्या या यशाने त्या महान स्वप्नाचे दरवाजे उघडले आहेत.

आता इथून पुढे आपल्याला विजेसाठी कोणत्याही परदेशी देशासमोर हात पसरण्याची गरज नाही.

पुढील ३०० वर्षांपेक्षा जास्त काळ भारताला लागणारी संपूर्ण वीज आपण स्वतः निर्माण करू शकतो!

जगाला थक्क करणारी ” ग्रीन हायड्रोजन “ची कामगिरी…

आता येऊया त्या मोठ्या चमत्काराकडे जो २६ जून रोजी घडला.

कल्पक्कम येथे जगातील पहिल्या ‘ अणुऊर्जेवर चालणाऱ्या हायड्रोजन उत्पादन प्रकल्पाचे ‘ (Nuclear-powered Hydrogen Production Plant) उद्घाटन करण्यात आले आहे.

हायड्रोजन का महत्त्वाचा आहे?

हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे. पेट्रोल, डिझेल आणि कोळसा जाळल्याने काळा धूर निघतो आणि पर्यावरणाची हानी होते.

पण जेव्हा हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर केला जातो, तेव्हा शेवटी बाहेर पडणारी एकमेव गोष्ट म्हणजे ‘ शुद्ध पाणी ‘!

पण यात एक मोठी अडचण होती.

हे स्वच्छ हायड्रोजन तयार करण्यासाठी आपल्याला पाणी (H2O) वेगळे करावे लागते. त्यासाठी प्रचंड विजेची गरज असते.

आणि ती वीज तयार करण्यासाठी आपल्याला पुन्हा कोळसाच जाळावा लागत होता! म्हणजे हे ” घर स्वच्छ करण्यासाठी कचरा घरात आणण्यासारखे ” होते.

आमच्या शास्त्रज्ञांचा विलक्षण तोडगा:

IGCAR, कल्पक्कम येथील शास्त्रज्ञांनी यावर एक भन्नाट मार्ग शोधून काढला.

अणुभट्टीत वीज तयार करताना बाहेर पडणारी प्रचंड उष्णता वाया घालवण्याऐवजी, त्यांनी ‘ कॉपर-क्लोरीन सायकल ‘ (Copper-Chlorine Cycle) वापरून पाणी थेट गरम करण्यासाठी आणि हायड्रोजन वेगळा करण्यासाठी तिचा वापर केला.

याचा अर्थ असा की, कोणतेही प्रदूषण न करता आणि वातावरणात कार्बनचा एकही थेंब न सोडता, भारताने अणुऊर्जेचा वापर करून जगातील सर्वात स्वच्छ हायड्रोजन तयार केला आहे आणि जगाला नवा मार्ग दाखवला आहे.

आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील शास्त्रज्ञही हे पाहून थक्क झाले आहेत, आणि भारताचे कौतुक करत आहेत.

आगीशी खेळणारे ‘ मूक नायक ‘ (Silent Heroes)

हे यश एका रात्रीत मिळालेले नाही.

सामान्य अणुभट्ट्या उष्णता कमी करण्यासाठी पाण्याचा वापर करतात.

पण या फास्ट ब्रीडर रिएक्टॉरमध्ये कूलंट (थंड ठेवणारा पदार्थ) म्हणून ‘ लिक्विड सोडियम ‘ (द्रवरूप सोडियम) या धातूचा वापर करावा लागतो.

तुम्हाला माहीत आहे का सोडियम किती धोकादायक आहे?

तो हवेच्या संपर्कात आला की पेट घेतो आणि पाण्याचा स्पर्श झाला की त्याचा स्फोट होतो!

अशा धोकादायक द्रवरूप धातूला हाताळणे हे जादूच्या प्रयोगापेक्षाही कठीण आहे.

अनेक परदेशी देश या धोक्याला घाबरले आणि त्यांनी आपले संशोधन बंद केले.

पण आमचे भारतीय शास्त्रज्ञ?

त्यांनी अनेक वर्षे रात्रंदिवस मेहनत घेतली, विचार केला आणि या लिक्विड सोडियमला एखाद्या लहान मुलासारखे सुरक्षितपणे हाताळण्याचे स्वदेशी तंत्रज्ञान विकसित केले आणि ते यशस्वी करून दाखवले.

ज्या अज्ञात शास्त्रज्ञांनी आपले संपूर्ण आयुष्य यासाठी समर्पित केले, त्यांच्या चरणी आपण सर्वांनी नतमस्तक झाले पाहिजे.

याचा आम्हा सामान्य लोकांना काय फायदा होईल?

अतिशय स्वस्त वीज : आता कोळशाच्या टंचाईची चर्चा कधीच होणार नाही. संपूर्ण भारताला अखंड आणि परवडणारी वीज मिळेल.

आर्थिक विकास : आखाती देशांमध्ये युद्ध झाले तरी पेट्रोलचे भाव वाढतील अशी भीती आता आपल्याला राहणार नाही. आपले स्टील आणि खत यांसारखे मोठे उद्योग आपल्याच हायड्रोजन इंधनावर चालतील.

 स्वच्छ हवा : कार्बनचे उत्सर्जन कमालीचे कमी होईल आणि आपल्या पुढच्या पिढीतील मुलांना प्रदूषणापासून मुक्त, स्वच्छ हवा श्वास घेण्यासाठी मिळेल.

 राष्ट्रीय सुरक्षा : जेव्हा आपण ऊर्जेच्या बाबतीत स्वावलंबी बनू, तेव्हा जागतिक स्तरावर एक महासत्ता म्हणून भारताची पकड अनेक पटीने मजबूत होईल.

अभिमानाने शेअर करा!

कल्पक्कम हे आता केवळ एका ठिकाणाचे नाव राहिलेले नाही ; तर ते भारताच्या वैज्ञानिक आत्मविश्वासाचे प्रतीक बनले आहे.

सर्व अडथळे, तंत्रज्ञानावरील बंदी आणि परदेशी देशांची टीका झुगारून आज भारत अणुऊर्जा आणि हरित ऊर्जेच्या (Green Energy) क्षेत्रात अभिमानाने सिंहासनावर विराजमान झाला आहे.

आपण खेळांमधील विजय साजरे करतो. चला, हा महान वैज्ञानिक विजय देखील साजरा करूया जो देशाचे नशीब बदलणार आहे.

हे वाचणाऱ्या प्रत्येकाने कृपया हे इतरांसोबत शेअर करा, तुमच्या मुलांना कल्पक्कमच्या शास्त्रज्ञांच्या या विजयाची गोष्ट अभिमानाने सांगा.

भारत हे करू शकेल का? ” असा प्रश्न विचारणाऱ्या जगाला, आम्ही सिद्ध करून दाखवले आहे की – ” केवळ भारतच हे करू शकतो! “ 

अशा सर्व शूर वीर शास्त्रज्ञांना मानाचा मुजरा!

लेखक / माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती : प्रभा हर्षे 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ भारतीय सैनिकांची आठवणीतली श्रीकृष्ण जन्माष्टमी! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ भारतीय सैनिकांची आठवणीतली श्रीकृष्ण जन्माष्टमी! ☆ श्री संभाजी बबन गायके 

वर्ष होते १९९४. राजस्थानातील सुरतगढ येठून कुमाऊ रेजिमेंटची १७वी बटालियन नुकतीच पंजाबातील गुरदासपुर येथे येऊन स्थिरावली होती. या रेजिमेंटमध्ये दसरा आणि इतर सर्वच उत्सव अतिशय उत्साहात साजरे करण्याची परंपरा आहे. पण बटालियन इथं आल्याच्या दिवसांत लगेचच कोणताही मोठा सण-उत्सव नव्हता. पण आमच्या परंपरा, आमचा उत्साह आणि आदरातिथ्य नेमकं काय असतं ते ब्रिगेड हेडक्वार्टरला दाखवून देण्याची सर्वांनाच घाई झाली होती. पण दसरा तर खूप लांब होता. युद्ध सेवा मेडलने सन्मानित असलेले आणि श्रीलंकेत भारतीय शांतिसेनेत मोठी बहादुरी गाजवलेले कर्नल लिंकन लुईस Andrews हे आमचे कमांडिंग ऑफिसर होते… या साहेबांनी आदेशच दिला… आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी दस-यासारख्याच जोशात साजरी करायची! या कार्यक्रमासाठी ब्रिगेडच्या मोठ्या अधिका-यांना आमंत्रितही करण्यात आले. पण ब्रिगेड कमांडर साहेबांना त्याच दरम्यान महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जायचे असल्याने ते येऊ शकणार नव्हते. पण बाकीच्या मोठ्या साहेब लोकांना कुमाऊ सैनिक (ज्यांना प्रेमाने ‘भुल्ला’ म्हणजे धाकटा भाऊ म्हणले जाते) ते कुणापेक्षाही कमी नाहीत, हे दाखवून देण्याची संधी सोडून चालणार नव्हतं!

लष्करातील प्रत्येक कृती ही नियोजनबद्ध आणि शिस्तीत पार पाडली जाते. मंदिरात दर्शनासाठी जायचे असले तरी शिस्तीत संचलन करीत जातात. या जाण्याला ‘मंदिर परेड’ म्हटले जाते. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रात्री अकरा वाजून तीस मिनिटांनी कर्नल साहेबांच्या नेतृत्वात आमची ‘मंदिर परेड’ निघाली. या विशेष समारंभासाठी आमच्या युनिटचे मंदिर खूप छान सजवण्यात आले. मंदिरात भजने म्हणायाला सुरुवात झाली. कर्नल साहेब हे बॉक्सर, धिप्पाड, उंचेपुरे… तेही त्यांच्या ‘विशेष’ आवाजात भजने गाण्यात सामील झाले! मी त्यांच्या अगदी मागेच बसलेलो असल्याने मला साहेबांच्या सांगीतिक ‘क्षमतेचा’(? ) चांगलाच अनुभव येऊ लागला… पण करतो काय? साहेब माझे वरिष्ठ आणि मी साधा लेफ्टनंट. शिवाय माझ्या शेजारी बसलेले कॅप्टन आर. के. अनुजही मला वरिष्ठ! त्यामुळे साहेबांच्या आवाजाबाबत एखादी गंमतीदार टिपण्णी करण्याची अनिवार इच्छा दाबून ठेवावी लागली! साहेबांना भजनाच्या मधल्या ओळी फारशा पाठ नसाव्यात मात्र ‘ब्रिज में आयो मेरे नंदलाला’ या धृपदावेळी साहेब अगदी टिपेचा सूर लावीत…!

११. ५९ वाजता भजने एकदम थांबली… देवाच्या जन्माची घटिका जवळ आली होती… एवढ्यात युनिटच्या भटजी साहेबांनी म्हणजे पंडितजी यांनी जोरदार आज्ञा दिली… ”मंदिर परेड… सावधान बैठ! ” एका क्षणात तिथे जणू हजार पुतळे आहेत.. असा भास होऊ लागला… अशी शिस्त असतेच आमच्यात!

पंडितजी Andrews साहेबांच्या समोर लेफ्ट-राईट करीत आले… आणि म्हणाले, ”रामराम, साहब! श्री कृष्ण जन्म की अनुमती चाहता हूं, श्रीमान! ”

यावर कोणाला काहीही वाटलं नाही… प्रत्यक्ष देवाच्या जन्मासाठी माणसाकडे परवानगी मागितली जात होती… एरव्ही इतरांना हे अत्यंत हास्यास्पद, गंमतीचे वाटू शकले असते. पण लष्करी शिस्तीनुसार सर्व प्रक्रिया अत्यंत इमानदारीत पार पाडले जात होती… साहेबांनीही उत्तर दिलं, ”रामराम, पंडितजी! अनुमती है! ” हे म्हणताना साहेबांचा चेहरा उजळून निघाला होता, डोळ्यांत चमक दिसत होती! एक ख्रिस्ती अधिकारी हिंदू सैनिक असलेल्या सैन्य तुकडीचे नेतृत्व करत होता आणि त्यांच्या सणांत मन:पूर्वक सहभागीही झाला होता! किंबहुना जन्माष्टमी साजरी करण्याची कल्पनाही त्यांचीच होती. भारतीय सेनेचे हेच तर वैशिष्ट्य आहे… धर्मावर, जातीवर, प्रांतांवर आधारीत सैन्य तुकड्या निर्माण होत असल्या तरी त्यांचे कमांडींग ऑफिसर्स, इतर काही ऑफिसर्स विविध धर्मांचे, जातींचे असू शकतात. इथले सर्व सैनिक एकमेकांचे बंधू, साहेब लोक पालक, आई-बाप अशी भूमिका असते. सैन्यतुकडी एक कुटुंब असते… सर्वसमावेशक, व्यापक अशा मोठ्या सैन्यकुटुंबाचा एक अविभाज्य भाग असते! इथल्या तमिळ, मल्याळी अधिका-यांची मुलं सफाईदार पंजाबी भाषा बोलू शकतात… कारण त्यांचे वडील शीख तुकडीचे ऑफिसर असतात… अशीच साखळी असते… भक्कम! सैन्य हाच धर्म… देशसेवा हेच कर्म.. पूजा!

झालं… साहेबांची अनुमती मिळाल्याबरोबर मंदिराच्या छताला लटकवलेला सजवलेला सुंदर पाळणा खाली घेण्यात आला… त्यात भगवान श्रीकृष्ण बालकस्वरूपात विराजमान होते… आज त्यांचा जन्म होणार होता! इशारा होताच मंदिरापासून दूर ठेवण्यात आलेल्या छोट्या प्लास्टिक स्फोटकाचा प्रतिकात्मक फटाका म्हणून बार उडवण्यात आला… श्रीकृष्ण जन्माचा क्षण साजरा करण्यासाठी… संपूर्ण मंदिर देवाच्या स्तुतीने भरून गेले… एकाच वेळी हजारभर सैनिक, त्यांचे अधिकारी भक्तीभावाने भजने गाऊ लागले… वातावरणात शिस्तबद्ध धर्मभावना आकार घेऊन स्थिर झाली होती!

तेवढ्यात मंदिरातला टेलिफोन खणाणला… ब्रिगेडीअर साहेबांना कर्नल साहेबांशी तातडीने बोलायचे होते… समजलं… की… साहेब प्रवासातून घाईघाईने ब्रिगेडमध्ये परतले होते… त्यांच्या कानावर कुमाऊ तुकडीत साज-या केल्या जाणार असलेल्या जन्माष्टमीबद्दल खूप भारी भारी गोष्टी गेल्या होत्याच… आता साहेब म्हणत होते… मी येऊ का? म्हणजे मी येतोच!

कर्नल साहेब आता थोडे गडबडले.. एकतर कृष्णजन्म होऊन गेला होता… आणि आता साहेब यायचं म्हणताहेत! श्रीलंकेत असताना तेथील शत्रू कर्नल साहेबांचे नाव कानांवर पडताच गार पडत असे… पण इथे साहेबांचाच गळा सुकला… कितीही झाले तरी त्यांचे बॉस भेट देण्यास यायचे होते… आणि मुख्य कार्यक्रम तर होऊन गेला होती… तरीही ते म्हणाले, ”हो, साहेब. या ना! आपले स्वागत आहे! ”

काही मिनिटांनी पंडितजी पुन्हा जोरात म्हणाले… ”मंदिर परेड, सावधान बैठ! ” पुन्हा हजार सैनिक जागेवर शांतपणे बसले! पंडितजी ब्रिगेड कमांडर साहेबांसमोर तसेच लेफ्ट-राईट करीत गेले… सफाईदारपणे त्यांना salute बजावला… आणि म्हणाले, ”रामराम, साहब! श्री कृष्ण जन्म की अनुमती चाहता हूं, श्रीमान! ”

आता या दुस-यांदा होणार असलेल्या जन्माची अनुमती ब्रिगेड कमांडर साहेबांनी दिली! घाईघाईत पुन्हा ताला टांगलेला पाळणा पुन्हा हळुवार खाली घेण्यात आला… पुन्हा फटाका वाजला.. पुन्हा भजने गायली जाऊ लागली!

सुजीचा हलवा प्रसाद म्हणून मोठ्या प्रमाणात तयार केला गेला होता, तो सर्वांनी पोटभर खाल्ला… आणि आमच्या या मंदिर समारंभाची शान असलेले सुबेदार गोपाल सिंग सोईन यांनी आमची जोरदार युद्धगर्जना केली… कालिका माता की जय! … एकाच वेळी हजार कंठ ही गर्जना करू लागले… परिसराच्याही अंगावर शहारे उमटले असतील!

कर्नल Andrews साहेबांनी हात जोडले, डोळे मिटले… आणि ते उद्गारले, ”जय राम सर्व शक्तीमान! ’ मंदिर परेड समाप्त झाली होती!

आम्ही सर्वजण मंदिराबाहेर आलो.. तेंव्हा कर्नल Andrews साहेब ब्रिगेड कमांडर साहेबांशी मोठ्या उत्साहात बोलत असलेले दिसले… त्यांच्या चेह-यावर खूप आनंद होता!

या दिवशी मी लष्करी जीवनातील एक मोठा धडा शिकलो… जर तुम्ही भारतीय सेनेच्या तुकडीचे अधिकारी असाल तर तुमच्या जन्माचा धर्म दुस-या क्रमांकावर राहतो… तुम्ही ज्या सैनिकांचे नेतृत्व करता, त्या सैनिकांचा धर्मच तुमचा पहिला धर्म बनून जातो. तुमच्या त्यांच्यासोबतच जगता आणि प्रार्थना करता आणि प्रसंगी प्राणही अर्पण करता… देशासाठी!

मुसलमान धर्मीय सैनिक असलेल्या तुकडीचा हिंदू अधिकारी जेंव्हा रमझान पाळतो, दुपारच्या कडक उन्हात त्याला देऊ करण्यात आलेला थंड लिंबाचा रस नम्रपणे नाकारतो… आणि हे पाहून तेथे उपस्थित असलेले अन्य सैन्य तुकड्यांचे अधिकारीही त्यांच्या त्यांच्या हातांतील लिंबाच्या रसाचे प्याले त्या अधिका-याच्या कृतीचा सन्मान म्हणून तसेच न पिता खाली ठेवतात… तेंव्हा लक्षात येते… आपण भारतीय सेनेत आहोत! मनात विचार येतो… कोण आहेत ही माणसं… कशाची बनली आहेत?

हीच माणसं म्हणजे भारतीय सेना एकाच वेळी धार्मिकही आहे आणि पुरोगामीसुद्धा. पाकिस्तान्यांना कित्येक वेळा धूळ चारणारी, चिन्यांच्या समोर नेटाने उभी राहणारी, सीमांचे रक्षण करताना जीवाची रोज बाजी लावाणारी, हजारो अतिरेक्यांना यमसदनी धाडणारी आणि त्या प्रयत्नांत प्राणांची कुर्बानीही देणारी भारतीय सेना कश्मिरात स्थानिक मुस्लिमांसाठी इफ्तारही आयोजित करताना दिसते. हाती स्वयंचलित शस्त्रात्रे धारण केलेली सुमारे बारा लाखाची खडी फौज, त्यांतील स्त्री-पुरुष सैनिक, अधिकारी ही निधर्मी सर्वसमावेशक परंपरा अखंड सुरु ठेवतील… ही जणू काळ्या दगडावरची पांढरी रेघच आहे!

सन्मान, बंधुभाव, एकात्मता, निष्ठा, विश्वास, धैर्य आणि नैतिकता म्हणजेच भारतीय सेना. जे सत्य आहे त्याचे पाठराखण करणारी… सत्याचे रक्षण प्रत्येकवेळी लेखणीतून, फलकांवरच्या मजकुरातून, मेणबत्त्या हाती घेऊन काढलेल्या पदयात्रांतूनच केले जाते असे नाही… हाती शस्त्र धरलेला सैनिकही सत्याच्या रक्षणार्थ उभा असलेला असावा लागतो!

कुणाही सांगेल भारतीय ध्वजात तीन रंग असतात… भगवा… पांढरा… हिरवा! पण यात एक चौथा रंगही आहे… जो डोळ्यांना दिसत नसला तरी आहे… तो रंग ऑलिव ग्रीन… भारतीय लष्करी पोशाखाचा रंग!

(हे भारतीय सेनेच्या १७, कुमाऊ रेजिमेंटचे मेजर गौरव आर्य (सेवानिवृत्त) यांनी लिहिलेल्या व २५ मे, २०१८ रोजी प्रकाशित केलेल्या एका लेखाचे स्वैर भाषांतर आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीबाबतीत त्यांच्या बटालियन मध्ये घडलेल्या एका प्रसंगाचे वर्णन करताना मेजर साहेबांनी एकूणच भारतीय सैन्याच्या उच्च दर्जाच्या नैतिक मानसिकतेचे मनोहारी दर्शन घडवले आहे. माहितीचे आणि लेखनाचे सर्व श्रेय मेजर गौरव आर्य (सेवानिवृत्त) साहेबांचे आहे.).

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “गणपती होता टिळकांशी भांडत…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक ☆

शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “गणपती होता टिळकांशी भांडत…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – शशी नाडकर्णी-नाईक 

काल रात्री गणपती बाप्पा

होता टिळकांशी भांडत,

आपल्या अडचणींची कैफियत

होता पोटतिडकीने मांडत ||

देवघरातून तू मला

बाहेर का आणलंस?

तुमच्या लाडक्या देवाचं कौतुक

कशाला चार-चौघात मांडलंस?

 *

गायलास तू सुरुवातीला

ताल-सुरात आरत्या,

केलीस साधी फुलांची आरास

भोवती रंगीत बत्त्या.

 *

खूप मस्त छान असायचं

आनंद वाटायचा येण्यात,

सुख-शांती-समाधान मिळे

चैतन्य तुला देण्यात.

 *

दहा दिवस उत्सवाचे म्हणजे

असे, दिव्यत्वाची रंगत…

काल रात्री गणपती बाप्पा

होता, टिळकांशी भांडत ||

 *

पूर्वी प्रवचन, कीर्तन, गायनाने

मंगलमयी वाटायचे,

प्रबोधक, उद्बोधक भाषणांनी

विचार उंची गाठायचे

 *

आत्ता सारखा हिडीसपणा

मुळीच नव्हता तेव्हा,

शांताबाईच्याच नावाचा

आता अखंड धावा.

 *

पीतांबर, शेला, मुकुट

हे माझे खरे रुप,

शर्ट, पँट, टोपी, पागोटे

धिंगाण्याला फक्त हुरूप.

 *

शाडूची माती… नैसर्गिक रंग

गायब आता झाले कुठे?

लायटिंग केलेल्या देखाव्याने

मला दरदरून घाम फुटे!

 *

श्रध्दा, भक्तीभाव, आदर मनीचा

गेला ना रे सांडत…

काल रात्री गणपती बाप्पा

होता, टिळकांशी भांडत ||

 *

माणसां-माणसांनी एकत्र यावे

एकमेकांना समजुन घ्यावे,

देव-घेव विचारांची करतांना

सारे कसे एक व्हावे.

 *

जातीभेद नसावा…

बंधुभाव असावा,

सहिष्णुतेच्या विचारांनी

नवा गाव वसावा.

 *

मनातला विचार तुझ्या

खरंच होता मोठा,

पण, आज मात्र खऱ्या विचारांनाच

बघ मिळालाय फाटा. ओळख

 *

पूर्वी विचारांबरोबर असायची

खाण्यापिण्याचीही रेलचेल,

आता मात्र देखाव्यांमागे

दडलेला असतो काळा खेळ.

 *

पूर्वी बदल म्हणून असायचे

पोहे-चिवडा-चहा-काॅफी…

साग्रसंगीत जेवणा सोबत

लाडू-मोदक-पेढे-बर्फी.

 *

आता, रात्री भरले जातात

पडद्यामागे, मद्याचे पेले

डी. जे. वर नाचत असतात

माजलेले दादांचे चेले.

 *

नको पडूस तू असल्या फंदात

तेव्हाच मी होतो सांगत…

काल रात्री गणपती बाप्पा

होते, टिळकांशी भांडत ||

 *

कशासाठी उत्सव असा

सांग ना रे बांधलास?

देवघरातून गल्लोगल्ली

डाव माझा मांडलास!

 *

दहा दिवस कानठळ्यांनी

होतो मला आजार,

व्यवहारी दुनिया इथली,

इथे चालतो लाखोंचा बाजार.

 *

रितीरिवाज, आदर-सत्कार,

मांगल्याचा नाही पत्ता,

देवघरा ऐवजी माझा

रस्त्यावरती सजतो कट्टा.

 *

जुगार-दारु-सट्टा-मट्टा –

अनैतिकतेला येतो ऊत,

देवाऐवजी दैत्याचेच मग

मानेवरती चढते भूत.

 *

सामाजिक बाजू सोडून सुटतो

राजकारणालाच इथे पेव,

गौरी-गणपती सण म्हणजे –

गैरव्यवहाराची ठेव-रेव.

 *

नको रे बाबा, नको मला हा

मोठेपणाचा तुझा उत्सव,

मला आपले तू माझ्या जागी

परत एकदा नेऊन बसव.

 *

कर बाबा कर माझी सुटका

नको मला ह्यांची संगत…

काल रात्री गणपती बाप्पा

होता, टिळकांशी भांडत ||

 *

आपल्या अडचणींची कैफियत

होता पोटतिडकीने मांडत,

काल रात्री गणपती बाप्पा

होता, टिळकांशी भांडत ||

 

कवी : अज्ञात

प्रस्तुती: शशी नाडकर्णी -नाईक

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ युगंधर! ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? युगंधर! ? श्री आशिष  बिवलकर ☆

कारागृही जन्म | विष्णू अवतार |

जगाचा उद्धार | कृष्ण कृष्ण ||१||

*

देवकीनंदन | गोकुळी वाढला |

लिलांत रमला | बालपणी ||२||

*

पुतना संहार | कालियामर्दन |

ऋषी सांदीपन | गुरुथोर ||३||

*

सुदर्शन चक्र | युद्धात निशस्त्र |

रक्षे धर्मशास्त्र | युगंधर ||४||

*

गीतेतून ज्ञान | बोध पुरुषार्थ |

रणांगणी पार्थ | शस्त्रसिद्ध ||५||

*

षोडश सहस्त्र | कन्यांचे रक्षण |

नीती सुलक्षण | नारायण ||६||

*

अवतार कार्य | जीवन नश्वर |

लागताच शर | मोक्षत्वासी ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares