☆ कोर्टाचा आगळावेगळा निर्णय – – लेख क्र. २ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
कोर्टाचा आगळावेगळा निर्णय – – घटना परदेशामधील कोर्ट
बेरोजगारी, कामधंदा न मिळणे, हा प्रकार सगळ्याच देशांमध्ये कमीजास्त प्रमाणात असतोच. त्यामुळे कमीजास्त प्रमाणात चोऱ्यामाऱ्या होणे, हे पण ओघानी येतेच.
परदेशामधली एक घटना आहे – एका माणसाला दोन दिवस काहीही काम मिळाले नाही, त्यामुळे ते दोन दिवस त्यानी उपाशी राहून कसेबसे काढले. काहीतरी काम मिळेल आणि पोटाला काही खायला मिळेल या आशेवर तिसरा दिवस उजाडला. तिसऱ्या दिवशी पण काम नाही आणि दोन दिवस पोटात अन्नाचा कण नाही, शेवटी अनावर होऊन त्यानी एका दुकानामधून ब्रेड चोरला आणि भूक थोडी शांत केली. दुकानदारानी त्याला पकडले आणि पोलीसांच्या हवाली केले.
कोर्टामधे केस उभी राहिली. उपस्थित मंडळी स्थानापन्न झाली. लिपिकानी केसची माहिती कोर्टाला वाचून दाखवली.
जज्ज : (आरोपी माणसाला) तू ब्रेडची चोरी केली, हे खरे आहे का? आणि केली असेल तर का केली? चोरी करणे हा गुन्हा आहे हे तुला माहित आहे ना?
माणसानी चोरी केल्याचे कबुल केले, चोरी करणे हा गुन्हा आहे, हे माहित असल्याचे पण कबुल केले, आणि चोरी का करावी लागली ते कारण पण त्यानी सांगितले.
त्याचे बोलणे ऐकून सगळ्यांनीच हळहळ व्यक्त केली. हा गुन्हा या वेळेस आरोपीला माफ करावा, अशी एका वकिलानी कोर्टाला विनंती केली. सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर जज्ज साहेबांनी असा निर्णय जाहीर केला – –
जज्ज : आरोपीनी चोरी का केली, याचे कारण जरी पटण्यासारखे असले आणि चोरी तशी किरकोळच असली, तरी, चोरी करणे हा कायद्याने गुन्हाच ठरतो. आणि चोरी करणाऱ्यांना शिक्षा ही असतेच. आणि शिक्षेचे प्रयोजन अशाकरिता असते, की, त्यानी पुन्हा चोरी करू नये. ही जी चोरी केली आहे, त्याकरता १० डॉलर दंड भरणे ही शिक्षा आरोपीला कोर्ट देत आहे.
सगळेच उपस्थित लोक चेहेऱ्यावर हळहळ व्यक्त करतात.
जज्ज : अजून निर्णयाचे काम संपलेले नाही. आरोपी हा दंड भरू शकत नाही, हे कोर्टाला पक्के समजते आहे. म्हणून आरोपीतर्फे १० डॉलर ही दंडाची रक्कम मी आरोपीच्या वतीने कोर्टाकडे भरत आहे. असे म्हणून जज्ज नी खिशामधून १० डॉलर ची नोट काढून बाजूला बसलेल्या लिपिकाकडे दिली.
सगळ्यांच्या चेहेऱ्यावर समाधान उमटले.
जज्ज : निर्णयाचा पुढचा भाग – आपल्या देशात पोट भरण्याकरता माणसाला काम मिळू शकत नाही, ह्याकरता आपण सगळेच जबाबदार आहोत आणि शिक्षेला पात्र आहोत. म्हणून कोर्ट इथे हजर असलेल्या सगळ्यांना १० डॉलर दंड करत आहे. सगळ्यांनी दंडाची रक्कम सरकारी लिपिकाकडे जमा करायची आहे आणि मगच बाहेर पडायचे आहे.
सगळ्यांनीच आनंदी चेहेऱ्यानी १० – १० डॉलर जमा केले. २ मिनिटात २०० डॉलर जमा झाले.
जज्ज : हे २०० डॉलर मिस्टर क्ष (चोरी करणारी व्यक्ती) यांना कोर्ट देत आहे. त्यांनी छोटा मोठा उद्योग सुरु करावा आणि मेहेनत करून आपली रोजी रोटी कमवावी. इथे कोर्टाचे या केसचे कामकाज संपते आहे.
मिस्टर क्ष नी खाली मान वाकवून जज्ज साहेबांचे आणि उपस्थितांचे आभार मानले.
सगळेजण जज्ज साहेबांना धन्यवाद देत आणि त्यांचे कौतुक करत बाहेर पडले.
☆ कोर्टाचा आगळावेगळा निर्णय – – लेख क्र. १ ☆ श्री सुधीर करंदीकर ☆
– – – घटना जंगलामधले कोर्ट.
ही घटना एका जंगलामधली आणि सिंह या राजाच्या दरबारामधली आहे.
फार पूर्वी जेव्हा राजे आणि राजवटी हा प्रकार होता तेव्हा कोर्ट कचेरी हा प्रकार नव्हता. भांडण तंटे, तक्रारी या राज दरबारात राजासमोर पेश केल्या जायच्या, आणि निर्णय राजा देत असे. आणि तो अंतिम असे.
हळूहळू राजवटी संपल्या आणि लोकशाही अस्तित्वात आली. आणि या बदलामध्ये कोर्ट कचेऱ्यांचा जन्म झाला. आणि तक्रारी न्याय मिळवण्याकरता कोर्टात जायला लागल्या.
जंगलांमध्ये मात्र अजूनही राजे आणि राजवट हा प्रकार सुरू आहे. प्राण्यांचे पण आपापसात भांडण तंटे असतात, काही तक्रारी असतात, अशा सगळ्या गोष्टी राज दरबारात सिंह या राजापुढे पेश केल्या जातात. आणि सिंह राजाचा निर्णय अंतिम समजला जातो.
आता जंगला मधली एक घटना आणि निर्णय बघूया —
एका घनदाट आणि खूप दूरवर पसरलेल्या जंगलामधली ही घटना आहे. जंगलामध्ये सगळेच पशु – प्राणी – पक्षी खेळीमेळीनी रहात होते. सिंहाला जंगलामध्ये नेहेमीच राजाचा मान असतो. पशु – पक्षी – प्राणी यांच्यामधे कधी भांडण तंट्याचा प्रसंग उद्भवला, तर त्याचा न्याय निवाडा सिंहाच्या दरबारामध्ये होत असे.
एक दिवस जंगलामधे फेरफटका मारत असतांना एका वाघाची भेट गाढवाशी झाली. गाढव एका गवत असलेल्या मोकळ्या जागेवर पाय मोकळे करत हिंडत होते. एकमेकांना हाय – हॅलो – नमस्कार करून झाले. काय म्हणताय? तब्येत कशी आहे? पाऊस पाणी, अजून काय नवीन? वगैरे गप्पा झाल्या.
गाढव : मी मुद्दामच गवतावर फेऱ्या मारतो आहे. गवतावर पायताण न घालता चालल्यामुळे ब्लड प्रेशर चा त्रास होत नाही, असे जवळच्या गावात माणसे बोलतांना मागे ऐकले होते. तेव्हापासून मी रोजच फिरत असताना जिथे कुठे गवत दिसेल तिथे गवतावर छान फेऱ्या मारतो. त्यामुळे ब्लड प्रेशर कायम १२०/८० असते. इथे छान गवत दिसले म्हणून गवतावर फेऱ्या मारतोय. इथे उन्ह पण छान आहे, त्यामुळे अनायसे डी व्हिटॅमिन पण मिळतंय.
वाघ : वा, छानच आहे
गाढव : निळंशार गवत बघतांना डोळ्यांना पण छान वाटतंय. तुम्हाला पण छान वाटत असेल ना!
वाघ : छान नक्कीच वाटतंय, पण गाढवदादा गवताचा रंग निळा नसून हिरवा आहे.
गाढव : दादा, गवताचा रंग निळा आहे.
गवताचा रंग निळा आहे, का हिरवा आहे यावर दोघांची वादावादी सुरु झाली. आणि वाढत वाढत हमरा तुमरी वर गेली. कुणीच माघार घ्यायला तयार नव्हते.
बाजूने जाणारा कोल्हा हे सगळे बघत थांबला होता. कोल्ह्याने दोघांना हात करून शांत व्हायला सांगितले.
कोल्हा : अशी वादावादी करून दोघांमध्ये ताणतणाव निर्माण करण्यात आणि तुमचे मैत्री सबंध खराब करण्यात काही पॉईंट नाही. माझ्याबरोबर आपले राजे सिंह यांच्याकडे जाऊन त्यांनाच आपण विचारू, कि, गवताचा रंग निळा आहे का हिरवा आहे. ते जो निर्णय देतील तो दोघेही मान्य करा.
तिघेही सिंहाकडे गेले. सिंहानी सगळ्यां प्राण्यांची सभा बोलावली. सगळे प्राणी जमले.
सिंह (दोघांना उद्देशून) : तुम्ही दोघं तुमचे म्हणणे अगदी थोडक्यात सांगा…
वाघ : युवर ऑनर, गवताचा रंग हिरवा असतो असे माझे म्हणणे आहे.
गाढव : युवर ऑनर, मीवाघोबा दादांना सांगतोय कि गवताचा रंग निळा असतो, इथे पण सगळीकडे छान गवत उगवले आहे आणि निळ्या रंगाचे आहे. महाराज, आता आपणच निर्णय द्यावा.
सिंह : मी दोघांच्या बाजू ऐकून घेतल्या आहेत. गाढवाचे म्हणणे बरोबर आहे, असा मी निर्णय देत आहे. आणि वाघाला छोटी शिक्षा फर्मावत आहे.
सर्व प्राण्यांनी आपापल्या आवाजात टाळ्या वाजवून गाढवाचे कौतुक केले. सभा इथे संपली.
आपल्या बाजूनी निर्णय लागला हे ऐकून गाढव खुश झाले आणि मी बरोबर आहे, मी बरोबर आहे, असे म्हणत, हुंदडत तिथून आनंदात पसार झाले.
सगळे गेल्यानंतर ….
वाघ (सिंहाला) : महाराज गवत हिरवे असते, तरी तुम्ही मला खोटे का ठरवले? आणि मला शिक्षा का दिली?
सिंह : गवत हिरवे असते, हे मला पण माहित आहे. आणि आपल्या राज्यामधल्या सगळ्यांनाच माहिती आहे. पण एक लक्षात घे, राज्यामधल्या आम जनतेला खुश ठेवण्याकरता कधी कधी असे निर्णय राजाला घ्यावेच लागतात. गाढवासारख्या आम जनतेला नेहेमीच खुश ठेवावे लागते. थोडंसं चुचकारले कि ते खुश असतात, त्यांना अक्कल नसते हे तुला पण समजते.
वाघ : महाराज, तुमचे हे म्हणणे मला पूर्णपणे पटले. पण मग मला शिक्षा कशाकरता?
सिंह : वादविवाद हे नेहेमी आपल्या तोडीच्या व्यक्तीबरोबर करायचे असतात. हे तुला पटतंय कां?
वाघ : पटतंय कां म्हणजे काय, शंभर टक्के पटतंय. तुम्हीच मागे मला हे समजावून सांगितले होते.
सिंह : गाढवाची आणि तुझी आकलन शक्तीची लेव्हल एक आहे कां?
वाघ : महाराज, हा काय प्रश्न झाला कां? आपण त्यांना गाढव म्हणतो यातच उत्तर दडलेले आहे.
सिंह : तुला शिक्षा का केली हे तुला आता समजले असेलच. आता लक्षात ठेव, वादविवाद हे नेहेमी आपल्या तोडीच्या व्यक्तीबरोबर करायचे असतात.
वाघानी दोन मिनिटे कान धरून उभे राहण्याची शिक्षा पूर्ण केली, सिंहाला वाकून नमस्कार केला आणि उड्या मारत मारत आपला मार्ग धरला.
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – ३२ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
गीतांजलीतील मृत्यूची परिकल्पना…
गीतांजलीतील बहुसंख्य कवितांमध्ये मृत्यूचा उल्लेख या ना त्या प्रकारे आलेला दिसतो. याचं कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर दोन शक्यता आढळतात.
पहिली शक्यता ही की, रविंद्रनाथांनी त्यांच्या तरुणपणीच, त्यांच्या अगदी जवळच्या, प्रिय व्यक्तींचे मृत्यू फार जवळून पाहिले किंवा अनुभवले म्हटलं तरी चालेल. ते फक्त १३ वर्षांचे असताना त्यांचं मातृछत्र हरपले. नंतर ते २२ वर्षांचे असताना त्यांची जिवलग मैत्रीण, त्यांचे प्रेरणास्थान असलेली, त्यांच्या साहित्याची प्रथम वाचक, श्रोता व टीकाकार असलेली त्यांची समवयस्क वहिनी, कादंबरी देवींचा अनपेक्षित व अनैसर्गिक मृत्यू रविंद्रनाथांना उध्वस्त करून गेला.
यानंतर तर काळाची वक्रदृष्टीच त्यांच्या कुटुंबावर पडली असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. त्यांची पत्नी मृणालिनी देवी ऐन तारुण्यात, पाच मुले मागे सोडून, १९०२ साली त्यांना एकटं करून गेल्या. या धक्क्यातून बाहेर येण्यापूर्वीच फक्त ९ महिन्यांच्या अंतरालानंतर, त्यांची मुलगी रेणुका टी बी च्या संसर्गामुळे अवघ्या १३ व्या वर्षी मृत्यू पावली. त्यानंतर एक वर्षाच्या आतच रविंद्रनाथांच्या वडिलांचा मृत्यू (१९०५) झाला. त्यांचा धाकटा मुलगा समींद्रनाथ ११ वर्षांचा असताना कॉलरा होऊन देवाघरी गेला (१९०७). पाठोपाठ सतीशचंद्र नावाचा त्यांचा तरूण, बुद्धिमान सहकारी, जो कलकत्त्यातील आपलं सगळं वैभव सोडून शांतिनिकेतनाच्या कार्यात रविंद्रनाथांना मदत करण्यासाठी आला होता तो अचानक वारला. अशा प्रकारे १९०२ ते १९०८ या सहा वर्षांत त्यांनी पाच जवळच्या व्यक्तींना गमावलं. यानंतर १९२३ साली बंधू सत्येंद्रनाथ व १९२५ ला बंधू ज्योतिरिंद्रनाथ स्वर्गवासी झाले.
रविंद्रनाथांना मृत्यूविषयी वाटणारा जिव्हाळा, जो त्यांच्या गीतांजलीतील कवितांमधून जाणवतो त्याचं दुसरं कारण असू शकतं, ते म्हणजे त्यांचा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास! या अभ्यासामुळे आत्मा अमर आहे व एक शरीर नष्ट झालं तरी दुसरं शरीर धारण करून तो पृथ्वीवर येतच असतो; या जन्ममृत्यूच्या चक्रावर त्यांचा दृढ विश्वास होता व म्हणूनच या चक्राचा उल्लेख अगदी पहिल्याच कविते पासून गीतांजलीत वारंवार आलेला दिसतो.
त्यांच्यातला कवी मृत्यूला कधी घाबरत नाही किंवा टाळण्याची इच्छाही व्यक्त करत नाही, उलट तो मृत्यूचं स्वागत करताना दिसतो.
ते म्हणतात, मृत्यूला का भ्यायचं? मरण म्हणजे दोन जन्मांमधली फक्त छोटीशी विश्रांतीच तर आहे.
आपण जन्म घेऊन जसे या जगात आलो, तसेच मृत्यू नंतर दुसऱ्या जगात प्रवेश करणार असतो. ते जग आपल्याला अनोळखी असतं म्हणून भीती वाटते म्हणावं तर जन्माआधी आपल्याला हे जग तरी कुठे माहीत होतं!
ज्या परमात्म्याच्या भेटीसाठी आपण जन्मभर तळमळतो, मृत्यूनंतर त्याचा चिरंतन सहवास आपल्याला मिळू शकतो, त्याच्याशी एकरूप होण्याची संधी आपल्याला मिळू शकते. या मर्त्य जगातून त्याच्या अमर्त्य जगात आपल्याला प्रवेश मिळतो. या सगळ्याचा टागोरांना अतिशय आनंद होतो. पतीगृही निघालेल्या नव्या नवरी प्रमाणे त्यांना त्या अमर्त्य जगाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. तिकडे जाण्याबद्दल आतुरता आहे.
तरूण वयातच मृत्यूच्या तांडवामुळे भावविश्वाच्या चिंध्या झाल्यानंतर, रविंद्रनाथांच्या जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली, पण मृत्यूच्या या अनुभवानेच त्यांना मृत्यू विषयी विचार करायला भाग पाडले असणार आणि मग त्यांचा मृत्यू कडे बघण्याचा दृष्टीकोनच पूर्णपणे बदलला असावा. प्रियजनांच्या कायमच्या वियोगामुळं, त्यांचं लौकिक गोष्टीत गुंतलेलं मन मुक्त झालं आणि त्यांना पटलं की मृत्यूच्या चष्म्यातून जीवनाकडं बघायला हवं तरच जीवनाचं सत्य लक्षात
येईल.
—–
☆ गीत : ९४ ☆
AT this time of my parting, wish me good luck, my friends! The sky is flushed with the
dawn and my path lies beautiful.
Ask not what I have with me to take there. I start on my journey with empty hands and
expectant heart.
I shall put on my wedding garland. Mine is not the red-brown dress of the traveller, and though there are dangers on the way I have no fear in my mind.
The evening star will come out when my voyage is done and the plaintive notes of the
twilight melodies be struck up from the King’s gateway.
☆ “जीवन’संपदा’ नष्ट करणाऱ्या संवेदनाहीनतेचे जाळे”☆ श्री संभाजी बबन गायके ☆
मानवी जीवनाला सर्वोच्च प्राधान्य या तत्वावरच मानवी समाजाची रचना झाली आहे… आणि त्यानुसारच कार्यपद्धतीही निश्चित करण्यात आली आहे. किंबहुना ती तशीच होणे अपेक्षित आहे. मृत्यू अटळ असला तरी तो नैसर्गिकपणे आला तरच त्याला अर्थ असतो. बाकी सर्व मृत्यू ‘बळी’ या प्रकारात मोडतात!
घरोघरी वीजपुरवठा, इंटरनेट, टेलीविजन वाहिन्या इत्यादी सुविधांसाठी वायर्स, केबल्स, पाईप्स वापरणे गरजेचेच असते. यात या केबल्स इत्यादी इकडून तिकडे ‘फिरवणे’ क्रमप्राप्त असतेच. वीजपुरवठा केबल्स भूमिगत टाकता येतात. पण इतर केबल्सचे तसे नाही. एक इमारत ते दुसरी इमारत, मध्ये असणारी झाडे, विजेचे खांब इत्यादीवरून या केबल्स दुसरीकडे नेताना त्या खाली अधांतरी लोंबकळत राहणार हे निश्चित. वादळ, मानवी हस्तक्षेप, केबल्स खराब होऊन तुटून जाणे, चोरी करण्यासाठी केबल्स कापून नेणे व उरलेली केबल तशीच ठेवणे, यांमुळे या केबल्स खाली येतात. काही ठिकाणी या केबल्सच्या गुंडाळ्या करून बाजूला लटकत ठेवल्या जातात, चोर केबल कापून उरलेली केबल तशीच लटकवत ठेवून जातात, आणि या केबल्स जर लोकांच्या जाण्या-येण्याच्या मार्गात असतील तर त्या त्वरीत तिथून दूर करणे अनिवार्य असते. पण नेमकी हीच बाब दुर्लक्षित राहिल्याचे दिसते. कारण कुणाच्या जीवाचे कुणाला काही सोयरसुतक राहिलेले आहे, असे अजिबात आढळत नाही. आग लागलेली ज्याला दिसते त्याने त्याचक्षणी बोंब ठोकत इतरांना सावध करणे, सूचना देणे जसे केले जाते, तसे या बाबतीत केले जात नाही. काहीजणांना हा धोकाच लक्षात येत नाही. केबल्स यंत्रणा राबवणा-या लोकांच्या लक्षात आणून दिले तर लगेचच हालचाल होईलच असेही नाही. हा सर्वस्वी दोष आपल्या समाजव्यवस्थेचा, प्रशासनाचा आहे.
कायद्याच्या भाषेत सदोष मनुष्यवध हा प्रकार असतो. भारतीय दंड (शिक्षा) संहितेच्या १००/१०१ कलमानुसार साधारणत: अशी परिभाषा आहे की, एखाद्याच्या एखाद्या कृतीने, मनुष्याचा मृत्यू ओढवू शकतो, याची कल्पना असतानाही त्याबाबत योग्य ती काळजी न घेतली जाणे याला त्या व्यक्तीला, संस्थेला जबाबदार धरले जाईल. यासाठी १० वर्षे ते आजन्म कारावास आणि आर्थिक दंडाची तरतूद आहे. या प्रकारच्या घटनांमध्ये झालेला मृत्यू ‘वध’ म्हटले गेले आहे, यातच सगळे आले!
या कायद्याची अंमलबजावणी कटाक्षाने झाली तरच इतरांना जरब बसेल. परंतू आपल्याकडील मानसिकता, पळवाटा असणारे कायदे, लपवण्याची, फसवण्याची कला अवगत असणारे तज्ज्ञ, आर्थिक हितसंबंध, राजकीय हेवेदावे यांत सर्व जिरून जाते… आणि हवेत विरूनही जाते.
खड्डे खोदून ठेवले जातात, त्यांच्या भोवती संरक्षक व्यवस्था ठेवण्याची तसदी घेतली जात नाही, अंधारात माणसे या खड्ड्यात कोसळतात. शेतात शेततळी तयार होतात, तिथेही हीच त-हा. पतंग उडवण्यासाठी वापरला जाणारा मांजा चीन मधून येतो आणि चिनी आपल्या लोकांचा युद्धाशिवाय बळी घेऊ शकतात आणि त्यांना हा नायलान धागा मांजा म्हणून नालायक व्यापारी साहाय्य करतात. वाहने विरुद्ध दिशेने चालवून, अतिशय बेदरकारपणे चालवून, चीनी हेडलाईट्स लावून समोरच्याला तात्पुरते आंधळे करून जाणारे, वाहने रिवर्स घेताना, पार्क करताना त्यांच्याखाली कुणी मनुष्य, प्राणी नाही न हे पाहण्याची काळजी न घेणारे, बांधकामाच्या ठिकाणी वाळूत एखाद्या कष्टकरी महिलेचे लेकरू निजवले गेले असू शकते याचा विचार मनातही न आणणारे चालक, एकमेकांशी समांतर वाहने चालवत बोलत चाललेले वाहनचालक… मरणासाठी ही अशी हजारो कारणे आहेत. आणि या मरणांना आपण कारणीभूत होऊ शकतो, याची तिळमात्र शक्यता मनात नसणारी माणसेही लाखो आहेत. जगायचे कसे?
स्वत:च्या चुकीमुळे स्वत:चाच अपघातात मृत्यू झाला आहे, अशा व्यक्तीवर सुरुवातीला एफ. आय. आर. दाखल होतो! पण मृत व्यक्तीला शिक्षा देता येत नसल्याने हा गुन्हा रद्दही केला जातो. पण यासाठी न्यायिक प्रक्रिया असल्याचे ऐकण्यात आले आहे. पण जे इतरांच्या मृत्यूस कारणीभूत आहेत, अशांवरही ही प्रक्रिया लागू असते. परंतू हे खटले खूप प्रलंबित राहतात, हे दुर्दैव आहे… अफाट लोकसंख्या हे कारण तर आहेच पण त्यापेक्षाही राजकीय, सामाजिक इच्छाशक्तीचा अभाव हेही सर्वांत मोठे कारण आहे… जीव महत्त्वाचा मानला तर सर्वकाही करणे शक्य आहे… पण असो.
त्याला काय होतंय, मला काय त्याचं आणि हे असंच चालायचं अशी सार्वत्रिक वृत्ती बळावल्याने आपण आपली जीवन संपदा गमावण्याच्या अगदी जवळ असतो… हे सत्य आहे. फक्त तू आधी की मी आधी? एवढाच काय तो प्रश्न उरतो. कधी न कधी मरायचेच आहे, ज्याचे दिवस भरले तो जातो, आपण काय करणार? देव माणसाच्या मृत्यूला स्वत: जबाबदार राहू नये म्हणून अशाच काही सबबी शोधतो असेही लोक बोलतात. एक व्यक्ती जेंव्हा अशी अचानक, विनाकारण, दोष नसताना या जगातून जाते अर्थात तिला जावेच लागते… तेंव्हा अनेकांवर अनेक संकटे ओढवतात… ही यादी मोठी आहे!
त्यामुळे जे आता जिवंत आहेत, त्यांनी आपणही किंवा आपलेही कुणी यात केंव्हा तरी सापडू शकते, अशा विचाराने, एखादी आग लागली की आपण जसे धावत सुटतो, त्या पध्दतीने काही उपाय केले तरच हे थांबेल. अन्यथा… आपल्या कर्माची फळे भोगायला वर जाण्याची हल्ली गरज नाही… इथंच सर्व व्यवस्था आहे!
माझ्या मित्राची पत्नी, संपदा संदीप पटवर्धन अशाच एका केबल जाळ्यात अडकून जीवाला मुकली. त्यानिमित्ताने हे मनातले लिहिले आहे. विसरून जाऊ नका. कारण संपदाच्या वधाचा दोष आपल्याही माथी आहेच. पुढे असे आणखी पाप आपल्या हातून घडू नये, ही अपेक्षा आहे.
हा वेदनेचा स्पर्श होत प्रकटलेला भावनांचा आवेगी ओघ आहे; जो…
विश्व कवी, कवी गुरू, गुरूदेव रविंद्रनाथ टागोर यांनी, आपल्या प्रिय पत्नीच्या निधनानंतर स्मरण या काव्यसंग्रहात प्रसृत करत ; प्रवाहित केला… स्मृती सुमन रुपात!!
रवींद्रनाथांच्या वडिलांच्या टागोर इस्टेट मध्ये व्यवस्थापक असलेल्या बेनीमाधव यांची कन्या… भवतारिणी रविंद्रनाथांची पत्नी म्हणून आली त्यावेळी तिचं वय होतं ९ वर्षे… आणि रविंद्रनाथांचं वय होतं २२. लग्नानंतर तिचं नाव बदलून मृणालिनी ठेवण्यात आलं. अतिशय साध्या, ग्रामीण भागातून आलेली ही निरक्षर बालिका! एक नाजूक वेल… जी एका विराट वृक्षाच्या छायेत… त्याच्या आधारावर जगू पहाणारी.
पण तिचं भाग्य थोर की, विवाहानंतर घरचीच कामं केली पाहिजेत अशी कुणीही जबरदस्ती नाही केली. स्वतः रवींद्रनाथांनी तिला लोरे टे हाऊस या शाळेत इंग्रजी भाषा शिकायला पाठवले. पाटी-पुस्तक, गणवेश ते दाखला काढणे, हे सगळं केलं. संस्कृत भाषा शिकवायला, गृह-शिक्षक नेमला. आणि बघता-बघता… मुळातच प्रतिभावंत असलेली ही मृणालिनी… पाकळी-पाकळीने उमलंत… फुलू लागली… संपूर्ण उन्मिलित होण्यासाठी, सर्वांगाने उमलंत फुलवण्यासाठी, सुरू झालं तिचं उन्मिलन!! आणि बघता-बघता ही मृणालिनी इंग्रजी, संस्कृत, बंगाली या तिन्ही भाषांवर प्रभुत्व प्राप्त करत, पारंगत झाली. ही वेल त्या विराट वृक्षाच्या आधाराने, गगनावरी जाण्यास उत्सुक झाली.
आणि मग सुरू झाला एक अनोखा प्रवास… एका मुलीचा… अशिक्षित ते अनुवादक होण्याचा!
लग्नाच्या वेळी निरक्षर असलेल्या मृणालिनी देवी भाषांतरकार म्हणून नावारूपाला आल्या.
प्राचीन भारतीय ग्रंथांचा सखोल अभ्यास करताना, त्यांना वाटले की, हे ज्ञान बंगाली वाचकांना ही मिळावे. म्हणून मृणालिनी देवींनी…
महाभारतातील अत्यंत क्लिष्ट आणि तत्वज्ञानाने भरलेल्या शांती पर्वाचा बंगालीत अत्यंत सोपा अनुवाद केला. अगदी ज्ञानेश्वर माऊलींच्या… ऐसी अक्षरे रसिके मेळविन… ची च आठवण आली.
इतकंच नाही तर कठोपनिषद याचे केलेले भाषांतर त्यांच्या भाषिक आणि वैचारिक प्रगती चे उत्तम उदाहरण म्हणावे!! त्यांनी अनुवादकाच्या भूमिकेतून या ग्रंथांचे सांस्कृतिक, आणि दार्शनिक महत्त्व दाखवून दिले.
मृणालिनी देवींची आपल्या पतीची ख-या अर्थानं सहचरी होण्याची ही तळमळ थेट पोहोचते आपल्या अंतरंगात!! टागोर घराण्याचा वारसा असलेल्या साहित्य, नाट्य या दोन कलांवर मृणालिनी देवींनी ही आपला स्वतः चा असा एक वेगळा ठसा उमटवला. नाटकांतून ही प्रमुख नायिकेची भूमिका केली. याशिवाय बालसाहित्य, कथा लेखन, बोधकथा लेखन ही केले.
टागोरांच्या वाड्याचा उंबरठा ओलांडून आल्यापासूनच… त्या घराण्याच्या साहित्यिक वारसा जपंत, पुढे पाऊल टाकत निघालेल्या मृणालिनी देवी जणू त्या वाटेवर मोठ्या आत्मविश्वासाने चालत राहिल्या याच विश्वासाने…
हाती अमृताचा वसा, साथ देई माझा सखा
त्याच्या कृतार्थ डोळ्यांत, झुले उंच माझा झोका…
आणि खरंच रवींद्रनाथांच्या खंबीर साथीने… आधी वयातील अंतरामुळे औपचारिक असलेलं नातं, हळूहळू एक नितांत सुंदर असं बौद्धिक, भावनिक साहचर्याचं नातं झालं! टागोरांच्या परिवरातही त्या समरस झाल्या होत्या. आपल्या अनुवादाच्या आनंदात त्या आपल्या सासुबाईंनाही सामावून घेत. म्हणुनच की काय त्याची छोटी मुलगी मीरा आपल्या डायरीत लिहिती झाली…
” शांतिनिकेतन च्या दुस-या मजल्यावरील व्हरांड्यात एक टेबललॅंम्प जळतोयं. माझ्या आईच्या हातात एक इंग्रजी कादंबरी आहे. ती वाचतीये आणि माझ्या आजी साठी अनुवाद करतीये. “
फक्त मृणालिनी देवींच्या या बौद्धिक पैलूंची इतिहासात म्हणावी तशी नोंद नाही घेतली गेली… हे जाणवतं!
वयात खूप अंतर असुनही टागोरांच्या जीवनावर आणि कलेवर मृणालिनी देवींचा खूप प्रभाव दिसून येतो.
रविंद्रनाथ जेव्हा कामानिमित्त, प्रवासासाठी घराबाहेर असायचे तेव्हा ते मृणालिनी देवींना आवर्जून पत्रे पाठवीत. त्या दोघांतील सुसंवाद आणि प्रेमच तर दिसून येतयं ना यांतून! पत्नी कडून उत्तर यायला उशीर झाला तर नाराजी ही व्यक्त करत. ही पत्रे… हा प्रेमाचा ठेवा… विसा भारती द्वारे प्रकाशित Letters by टैगोर (Volume 1) मध्ये संग्रहित करण्यात आली आहेत.
मृणालिनी देवींचं आणखी एक परिपक्व, प्रगल्भ असं रूप बघायला मिळालं ते रवींद्रनाथांनी शांतिनिकेतन मध्ये सुरू केलेल्या ब्रह्मचर्य आश्रम या शाळेच्या प्रारंभिक अवस्थेत! त्यावेळी पैशाच्या अडचणीमुळे रविंद्रनाथ खूप चिंतेत होते. त्यावेळी त्यांची ही सहधर्मचारिणी ख-या अर्थाने त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि तिने आपले लग्नातील सगळे दागिने विकून पैसा उभा केला. आणि, साकार झाली रवींद्रनाथांच्या कल्पनेतील ती शाळा!
स्वतः मृणालिनी देवी कलकत्त्यातलं ऐश्वर्य सोडून आश्रमात रहायला आल्या. आणि विद्यार्थ्यांच्या रहाण्याची, जेवणाची, आरोग्याची काळजी घेऊ लागल्या. मुळातच सुगरण असलेल्या मृणालिनी देवी, स्वतः च्या हाताने सात्त्विक, पौष्टिक आणि चवदार स्वयंपाक बनवत आणि मायेनं जेवू घालंत. शाळेला कुटुंब रूप देऊन, त्या स्वतः आई झाल्या त्या सगळ्या मुलांची! टागोर घराण्याची स्वयंपाकाचे नवनवे प्रयोग करण्याची परंपरा येथे ही सांभाळली आणि आश्रमातील जेवणाची चव समृद्ध केली या अन्नपूर्णेनं!!
आणि आपल्या पूर्वाश्रमीचं नाव भवतारिणी सार्थ करत… रविंद्रनाथांच्या शांतिनिकेतन चा भव… संसार तारिणी सिद्ध झाली.
मृणालिनी देवींचं मोठं दुर्दैव की त्या अल्पायुषी ठरल्या. फक्त २८ वर्षे आयुष्य लाभलं त्यांना. पण तरीही रविंद्रनाथांच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी पडद्यामागून मोठीच भूमिका बजावली. इच्छा असूनही आपल्या पतीला खूप वर्षे साथ मात्र नाही देऊ शकल्या त्या.
अचानकच मृणालिनी देवींना एका अज्ञात आजाराने ग्रासलं. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालवत गेली. रविंद्रनाथ त्यांना इलाजासाठी आपल्या जोरासांको ठाकुर बारी येथे घेऊन गेले. तेव्हा गाडी ६ तास लेट असल्याने त्यांना विलासपूर येथील स्टेशन च्या वेटिंग रूममध्ये थांबावे लागले. त्यावेळी त्या वेळेत ही त्यांनी फांकी नावाची एक कविता रचली. ती आजही बिलासपूर च्या प्लॅटफॉर्म वरील एका भिंतीवर शिलालेखाच्या रूपात आहे. रविंद्रनाथांनी शिलालेखात अक्षर रूपात… अ क्षर केले… आपल्या वेदनेला!
शांतिनिकेतनला युनेस्को जागतिक वारसा… स्थळाचा दर्जा मिळवून देणा-या वटवृक्षाचे पहिले बीज ठरला… मृणालिनी देवींचा… आर्थिक आणि नैतिक पाठिंबा! तिथे त्यांच्यातील समिधा समर्पणात कुठेही कमी पडली नाही.
मृणालिनी देवींच्या निधनानंतर रविंद्रनाथांनी मृणालिनी आनंद नावाचा बगिचा तयार केला. तिथं अनेक प्रकारची फुलझाडे लावली. आपल्या ख-या अर्थाने सहचरी ठरलेल्या, प्रेरणा आणि समर्थनाचा अखंड स्त्रोत बनून राहिलेल्या पत्नीच्या निधनानंतर ही… तिची उपस्थिती… तिचं नाव टागोरांच्या कवितेत आणि संगीतात निरंतर गुंजत राहिलं. त्यांच्यातील नातं एक वारसा म्हणून टागोरांच्या काव्यरचनांमधील प्रेम, विरह, औदासीन्य यांत बघायला मिळतं…
तू जिथे गेली आहेस, तिथे माझे डोळे पोहोचू शकत नाहीत
पण तरीही, तू माझ्या मनात एक शांत प्रकाशासारखी जिवंत आहेस…
☆ एक मराठी विक्रमी व्यक्ती.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे☆
जपान मधील टोकियो मध्ये कसाई भागात एक मराठी विक्रमी व्यक्ती रहाते.. पुण्यात शनिवार पेठेतील शनिवार पोलीस चौकी जवळ त्यांचा वाडा होता. तो माणूस आता १९९५ ला जपान ची स्कॉलरशिप घेऊन जपान मधे जातो आणि तिथे एका प्रायव्हेट शाळेचा प्रिन्सिपल होतो.
त्यांची आई तिथे पुरण पोळी ते साबुदाणा खिचडी पर्यंत सर्व भारतीय चटण्या तसेच भारतीय पोशाख शिवते व भारतीय रेस्टोरंटही चालवते.
हा माणूस टोकियो मधे स्वतः तीन मजली प्रचंड मोठ घर बांधतो. घरात मराठी पुस्तकांची लायब्ररी करतो, तसेच मराठी भाषा शिकवण्याचे क्लासेसही घेतो. सर्व जपानी शाळांना आग्रह धरतो. हाच भारतीय मराठी माणूस जपान मध्ये नंतर तिथं आमदार होतो.
अजून बरंच काही आहे. पण सगळ्यावर कळस म्हणजे आता त्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा आपल्या घराशेजारी उभारला आहे. पुण्यातील खटावकर यांनी तो तयार केला. तो जपानला विमानाने १० लाख रुपये फक्त वाहतूक खर्च करुन नेला व ८ मार्च २०२५ ला तेथे उभारला. सुमारे ९०० भारतीय लोक उपस्थित होते. यांच्याकडे महाराजांनी लिहिलेल्या सुमारे ३०० हस्तलिखित पत्रांचा खजिना आहे.
… ह्या माणसाचं नाव आहे योगेंद्र पुराणिक.
☆
माहिती संग्राहक : अज्ञात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७३ आणि ७४ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ७३ – –
देहेदंडणेचे महा दुःख आहे।
महादुःख ते नाम घेता न राहे।
सदाशिव चिंतीतसे देव देवा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।। ७३।।
अर्थ :देहाला कष्ट दिल्याने मोठया यातना होतात. परंतु रामनाम घेतल्याने या यातना राहत नाहीत. प्रत्यक्ष भगवान शंकर देखील देवाधिदेव म्हणजेच श्रीरामाचे चिंतन करतात. अशा श्रीरामाचे प्रभात समयी आपण चिंतन करावे.
(देहेदंडणे – देहाला कष्ट/यातना देणे )
विवेचन :अनेक लोक परमेश्वर प्राप्तीसाठी उपासतापास, नवस, तीर्थयात्रा आदी गोष्टी करतात. या सगळ्या गोष्टींनी देहाला कष्ट होतात. त्याच्या यातना किंवा दुःख भयंकर असते. सर्वांनाच या गोष्टी शक्य होतील असेही नाही. नर्मदा परिक्रमा करणे अतिशय पुण्यप्रद मानले जाते. परंतु सर्वांनाच ते शक्य होईल अशातला भाग नाही. बद्रीनाथ, केदारनाथ ही अत्यंत पवित्र धामे आहेत. पण जर शारीरिक क्षमता नसेल तर त्यांची यात्रा करणे कठीण होते. देहाला त्रास देणारी होते. पूर्वीच्या काळी ऋषीमुनी तप:साधना करीत असत. त्यासाठी एकांतात जाऊन बारा बारा वर्षे तपश्चर्या करीत. कोणी एका पायावर उभे राहून तप करीत असे तर कोणी नदीच्या पाण्यात उभे राहून. असे अनेक प्रकार होते. या सगळ्या गोष्टींचा उद्देश देहाबद्दलची आसक्ती नाहीशी व्हावी आणि परमेश्वर प्राप्तीकडे मनाचा कल व्हावा असा असायचा. परंतु देहाला एवढे कष्ट देऊन सर्वांनाच परमेश्वर प्राप्ती होईल अशी शाश्वती नव्हती. शिवाय काही कारणाने तप करणे मध्येच थांबले तर सर्वच व्यर्थ जायचे.
परंतु नामसाधनेत असे कष्ट देहाला पडत नाहीत. नामसाधना सोपी आहे. तुकाराम महाराज देखील सांगतात, “नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. “मग एवढे सोपे साधन सोडून देहाला ताडन करणारी इतर साधने का अवलंबावीत ?
या संसारात देखील मानवी देहाला अनेक प्रकारचे कष्ट होतात. नानाविध त्रासांना सामोरे जावे लागते. प्रारब्धाने वाट्याला आलेले दुःख भोगावेच लागते. या सगळ्या गोष्टीत शरीराला प्रचंड त्रास होतो. आपण म्हणतो की कोणी कोणाचे दुखणे वाटून घेऊ शकत नाही. हे खरेच आहे. प्रारब्धाने आलेले दुःख ज्याचे त्यालाच भोगावे लागते. पण सगळ्या परिस्थितीत रामनाम औषधाचे काम करते. देहाला वेदना होतील पण रामनामामुळे तो त्रास मनापर्यंत पोहोचत नाही. देहाच्या दुःखावर इतर औषधे तात्पुरती काम करतात पण रामनाम त्यावर मात करण्याची शक्ती देते. मात्र ते औषध नियमितपणे घोट घोट पोटात जायला हवे.
रामनामाचे इतके महत्व समर्थ पुन्हा पुन्हा सांगत आहेत. एखाद्याला एखादी गोष्ट सांगून, समजावूनही पटली नाही तर त्याला एखाद्या मोठया व्यक्तीचे उदाहरण देऊन समजवावे लागते. समर्थ म्हणतात, ” हे मना, अरे तुला किती आणि काय सांगू ? प्रत्यक्ष योगियांचा राणा असलेले भगवान शंकर देखील श्रीरामाचा जप करतात. त्याचेच चिंतन करतात. मग तुला करायला काय हरकत आहे ?” श्रीराम हे देवांचे देव आहेत. त्यांनीच देवांना रावणाच्या बंदिवासातून सोडवले आहे. आदी आणि अंत तेच आहेत. तेव्हा हे मना, प्रभात समयी रामाचे चिंतन कर.
स्वसंवाद ::
१. मी परमेश्वर प्राप्तीसाठी किंवा समाधानासाठी केवळ बाह्य कष्टांचे (उपासतापास, कठीण व्रतवैकल्ये) अवडंबर माजवत आहे का?
२. जेव्हा शारीरिक किंवा मानसिक व्याधींमुळे माझ्या देहाला ‘दुःख’ होते, तेव्हा मी निराश होतो की रामनामरूपी औषधाचा आश्रय घेतो?
३. “कोणी कोणाचे दुखणे वाटून घेऊ शकत नाही” हे त्रिकालाबाधित सत्य स्वीकारून, मी माझ्या मनाला नामस्मरणाने खंबीर बनवले आहे का?
४. जर प्रत्यक्ष भगवान शंकर (देवाधिदेव) निरंतर रामनामाचे चिंतन करतात, तर मग संसारी असलेल्या माझ्या मनाला नामस्मरणाचा संकोच का वाटावा?
==============
श्लोक क्र. ७४ – –
बहुतांपरी संकटे साधनाची।
व्रते दान उद्यापने ते धनाची।
दिनाचा दयाळू मनी आठवावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।। ७४।।
अर्थ :परमेश्वर प्राप्तीच्या साधनांमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येतात. व्रते, दानधर्म, उद्यापन करणे या गोष्टींसाठी गाठीशी पैसा लागतो. परंतु दिनांसाठी दयाळू असणाऱ्या भगवंताला आठवण्यासाठी यापैकी कशाची जरुरी नाही. म्हणून अशा या भगवंताचे पहाटेच्या सुमारास चिंतन करावे.
(बहुतांपरी – अनेक प्रकारचे, साधनांची – ईश्वर प्राप्तीच्या विविध मार्गांची, उद्यापन – एखाद्या व्रताच्या अखेरीस केलेला धार्मिक विधी )
विवेचन :ईश्वरप्राप्तीचे अनेकविध मार्ग आहेत. त्यासाठी कोणी व्रतवैकल्ये करतो, कोणी एखादे अनुष्ठान करतो, तर कोणी दानधर्माचा मार्ग अनुसरतो. आपण कोणता मार्ग निवडायचा याचे स्वातंत्र्य अर्थातच साधकाला असते. तरी समर्थ या मार्गातील धोके आणि अडचणी आपल्या निदर्शनास आणून देतात. या सगळ्या गोष्टींसाठी धनाची जरुरी असते. व्रत करायचे म्हटले तर काही तरी नियम आलाच. त्यानुसार शरीराला पडणारे कष्टही आले. शिवाय व्रताचे काही नियम असतात. त्यांचे व्यवस्थित पालन झाले पाहिजे. व्रत व्यवस्थित पूर्ण झाल्यानंतर त्याची विधिपूर्वक सांगता करावी लागते. त्यासाठी पुरोहितांना बोलावून धार्मिक विधी, दानधर्म, दक्षिणा आदी गोष्टी कराव्या लागतात.
व्रत, दानधर्म आणि उद्यापने या गोष्टी करायच्या तर पैशाची व्यवस्था आधी करावी लागते. बरे, या सगळ्या गोष्टी म्हणजे परमेश्वर प्राप्तीसाठीचे बाह्य मार्ग झाले. हे सगळे करीत असताना माणूस यातच गुंतून पडतो. परमेश्वर प्राप्तीसाठी अंतर्मुख होण्याची आवश्यकता असते. तो आपल्या अंतर्यामीच वसलेला असतो. सगळे लोक व्रतवैकल्ये, उद्यापन सोहळे, दानधर्म आदी गोष्टी समारंभपूर्वक करतात म्हणून आपल्यालाही असे करायलाच हवे नाहीतर लोक काय म्हणतील अशी भीती सामान्य माणसाच्या मनात असते. बऱ्याच वेळा मग इतरांना दाखवण्यासाठी देखील असे विधी मोठे समारंभपूर्वक करावे लागतात. यात आर्थिक आणि मानसिक कुतरओढ होते ती सर्वसामान्य माणसाची. त्याचा गोंधळ होतो. नेमके काय करावे ते कळत नाही. सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. पण परमेश्वर यापैकी कुठल्याच गोष्टीची अपेक्षा तुमच्याकडून करत नाही.
समर्थांसारख्या संतांना या गोष्टीची अचूक जाणीव असते. समर्थांच्या काळात तर सामान्य माणूस जपतप, अनुष्ठान, व्रते, उद्यापने यासारख्या कर्मकांडात अडकून पडला होता. तो बहिर्मुख झाला होता. त्याला अंतर्मुख करणे आवश्यक होते. समर्थांसारखे सद्गुरू लोककल्याणाचा कळवळा असल्यानेच नामस्मरणासारखा सोपा मार्ग सांगत आहेत. परमेश्वर हा अत्यंत दयाळू आहे. त्याची दीन होऊन म्हणजेच आर्ततेने भक्ती केली, तर तो आपल्या दासांवर कृपा करतो. ‘ नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ‘ असे समर्थांनी सांगितलेच आहे. आपणही तो मार्ग अनुसरावा. दीनांचा दयाळू असलेल्या भगवंताला मनी आठवावे. त्याचे रूपगुण अंतरी साठवावे. अशा या भगवंताचे प्रभात समयी चिंतन करावे. संत एकनाथ महाराज म्हणतात, ” आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. “
स्वसंवाद ::
१. मी करत असलेल्या धार्मिक गोष्टी (व्रतवैकल्ये किंवा पूजा) केवळ ‘इतरांना दाखवण्यासाठी’ किंवा एक सामाजिक प्रथा म्हणून करत आहे का?
२. भगवंत माझ्या अंतर्यामीच आहे हे ठाऊक असूनही, मी त्याला शोधण्यासाठी बाह्य कर्मकांडात आणि सण-समारंभांच्या अवडंबरातच गुंतून पडलो आहे का?
३. जेव्हा माझ्याकडे आर्थिक मर्यादा असतात, तेव्हा मी देवाचा कोप होईल या भीतीने व्याकुळ होतो, की “तो दीनांचा दयाळू आहे” या भावनेने त्याला आर्ततेने साद घालतो?
४. संत एकनाथ महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, मी सर्व चिंता त्या लक्ष्मीपतीवर सोडून देऊन कधी ‘आवडीने आणि भक्तीभावाने’ केवळ नामस्मरण केले आहे का?
सखारामच्या डोळ्यात पाणी. हळूच म्हणाला – “काका, मी 3 दिवसापासून गोड खाल्लं नाही. आई म्हणाली होती – वारीत ‘बुंदीचा लाडू’ मिळतो. तो नाही मिळाला… शिरा तरी…”
ऋषीने ऐकलं. GoPro बंद केला.
क्षणभर विचार केला. मग स्वतःच्या पानातला ‘शिरा’ उचलला.
सखारामच्या पानात टाकला.
म्हणाला – “घे बाळा. तुझा ‘बुंदीचा लाडू’. ”
सखारामचे डोळे चमकले. पण त्याने शिरा उचलला नाही.
त्याने पानाचे 4 भाग केले.
1 घास स्वतः खाल्ला.
2रा घास शेजारच्या 4 वर्षांच्या पोरीला दिला – “ताई, खा. “
हॉटेलमध्ये आपण ‘पोट’ भरतो. वारीत ‘पंगत’ भरते. फरक काय? हॉटेलात ‘मी’ जेवतो… वारीत ‘आम्ही’ जेवतो. म्हणूनच तिथला शिरा ‘अमृत’ लागतो.
|| ‘एक घास‘ची किंमत ‘एक लाखा‘पेक्षा मोठी ||
ऋषीचा 1 घास सखारामसाठी ‘बुंदीचा लाडू’ झाला. तुमचा ‘उरलेला’ घास कोणासाठी ‘पहिला’ घास होऊ शकतो. वाटून बघा.
|| मुलं ‘खात‘ नाहीत… ‘वाटतात‘ ||
मोठी माणसं ‘साठवतात’. सखारामसारखी मुलं ‘वाटतात’. म्हणूनच विठोबाला ‘बालरूप’ प्रिय आहे. कारण ‘मूल’ झालं की ‘मळ’ जातो.
|| ‘Vlog’ पेक्षा ‘लोग‘ महत्त्वाचे ||
ऋषी ‘Reel’ बनवायला आला होता… ‘Real’ होऊन गेला. कॅमेरा बंद करा… काळीज सुरू करा. तिथे ‘Like’ नाही… ‘जीवन’ मिळतं.
|| 137 रुपये ‘137 कोटी‘वर भारी पडले ||
सखारामचे पैसे ‘संख्येने’ लहान… ‘वृत्तीने’ मोठे. देव ‘दान’ नाही बघत… ‘भाव’ बघतो. 1 रुपया ‘ओढून’ दिला तर ‘कचरा’… ‘रडून’ दिला तर ‘कुबेर’.
|| वारी ‘मजा‘ नाही… ‘जबाबदारी‘ आहे ||
‘खाणं-पिणं-नाचणं’ वारी नाही. ‘खाऊ घालणं-पाणी पाजणं-सांभाळणं’ वारी आहे. पंढरीचा रस्ता ‘पायाने’ नाही… ‘परोपकाराने’ तुडवायचा असतो.
—
|| शेवटचा मंत्र || विठूमाऊलीचा ||
“बाळांनो, वारीला येताना ‘डबा’ भरून आणू नका…
‘दिल’ भरून या.
कारण ‘पोळी’ शिळी होते…
‘प्रेम’ शिळं होत नाही.
‘शिरा’ संपतो…
‘स्मरण’ संपत नाही.
एका घासात ‘विठ्ठल’ भेटतो…
जर तो घास ‘दुसऱ्याच्या’ मुखात गेला तर.
म्हणून या वर्षी ‘वारी’ करा…
पण ‘एकट्याने’ नको…
‘सोबत’ करा.
‘खाऊन’ मजा नाही…
‘खाऊ घालून’ मजा आहे.
तीच खरी ‘पंढरीची वारी’. ”
|| राम कृष्ण हरी || जय जय राम कृष्ण हरी ||
|| श्री स्वामी समर्थ ||
भक्तांनो, या वारीला जाताना ‘एक्स्ट्रा डबा‘ घेऊन जा. ‘एक्स्ट्रा बिस्कीट‘ घ्या. वाटेत ‘सखाराम‘ भेटेल… त्याला ‘शिरा‘ द्या. कदाचित तो तुमचा ‘ऋषी‘ करेल. ही गोष्ट 1 ‘वारी‘ मित्राला पाठवा… म्हणजे पंढरीच्या वाटेवर ‘भूक‘ नाही… फक्त ‘भक्ती‘ उरेल
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : डॉ. मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ७१ आणि ७२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ७१ – –
जयाचेनि नामें महादोष जाती।
जयाचेनि नामें गती पाविजेती।
जयाचेनि नामें घडे पुण्यठेवा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।। ७१।।
अर्थ :भगवंताच्या नामस्मरणाने मोठमोठी पापे नाहीशी होतात. साधकाला उत्तम अवस्था प्राप्त होते. पुण्याचा संचय होत जातो. असे सर्व काही ज्यामुळे प्राप्त होते त्या भगवंताचे नामस्मरण आणि चिंतन पहाटेच्या वेळी करावे.
विवेचन :भगवंताच्या नामाचा महिमा अपार आहे. सतत नामस्मरण केल्याने महादोष म्हणजे महापापे नाहीशी होतात. भगवंतांचे नाम आपले अंतःकरण शुद्ध करते. वाईट गोष्टी, पापकर्म करण्याची इच्छाच होत नाही. चोरी करणे, खोटे बोलणे, व्यभिचार करणे, हत्या करणे, अपेयपान (दारू)करणे या सारख्या गोष्टी या महापाप मानल्या जातात. परंतु सतत भगवंताचे नाम घेत राहिल्याने या गोष्टी करण्याची इच्छाच नाहीशी होते. व्यक्ती सदाचारी बनते. वाल्या कोळ्याचे उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. वाटमारी करणे, हत्या करणे यासारखी महापापे त्याच्या हातून घडली होती. परंतु महर्षी नारद आणि ऋषींच्या उपदेशामुळे त्याच्यात अंतर्बाह्य बदल झाला. आपल्या कर्माचा पश्चाताप होऊन त्याने रामनामाचा आश्रय घेतला. रामनामाची जादू एवढी मोठी आहे की वाल्या कोळ्याचे रूपांतर महर्षी वाल्मिकीत झाले. रामायणासारखा अद्वितीय ग्रंथ लिहून ते जगासाठी वंदनीय ठरले.
रामनामामुळे गती म्हणजे उत्तम अवस्था प्राप्त होते. अंतकाळी भगवंताचे नाम मुखात येणे यासारखे भाग्य नाही. ‘ अंते मती सा गती: ‘ असे म्हटले जाते ते यामुळेच. शेवटचा दिस गोड व्हावा असे तुकाराम महाराज म्हणतात याचा अर्थ हाच आहे. पण आयुष्याच्या अखेरच्या क्षणी माणसाच्या मुखात अचानक रामनाम येत नाही. त्यासाठी सतत मनाने भगवंताचे नामस्मरण करण्याची सवय असावी लागते. ही सवय असेल तरच अंतकाळी भगवंत आठवतो.
समर्थ तिसऱ्या ओळीत म्हणतात की नामाच्या योगाने पुण्यठेवा घडतो म्हणजे वाढतो. बँकेतील आपल्या खात्यात आपण बचत म्हणून थोडे थोडे पैसे टाकत राहतो. यात सातत्य असले तर ही पुंजी वाढत जाते. मुद्दलावरही व्याजही लागू होते. रामनाम ही तर अत्यंत मौल्यवान ठेव ! थोडीथोडी जमा करत गेलो की पुण्यसंचय वाढत जातो. संत मीराबाई म्हणतात, ” पायो जी मैने रामरतन धन पायो… ” हे असं अमोलिक धन आहे की ” खर्च न खुटे, चोर न लुटे. ” इतर धन खर्चल्याने संपतं. पण याची महती काही वेगळीच. हे तर दिवसेंदिवस वाढतच जातं. विशेष म्हणजे हे धन असं आहे की याला चोरही लुटू शकत नाही. सातत्याने रामनाम घेणाऱ्याचा पुण्यसंचय वाढतच राहतो.
नामस्मरणाने वासनांचा क्षय होतो. म्हणजे भगवंत प्राप्तीखेरीज इतर वासना हळूहळू नष्ट व्हायला लागतात. शेवटी केवळ भगवंत प्राप्तीची इच्छा उरते. आपल्या पुण्यसंचयानुसार ती या जन्मी किंवा पुढील जन्मी भगवंत नक्की पूर्ण करतो. तेव्हा हे मना, प्रभात समयी श्रीरामाच्या रूपगुणांचे चिंतन कर. दिवसभरही त्याचे नित्य स्मरण ठेव. हे नाम तुला मोक्षाकडे घेऊन जाईल.
स्वसंवाद ::
१. मी रोज माझ्या बँक खात्यातील शिल्लक (Balance) तपासतो, पण माझ्या खात्यात ‘पुण्यठेवा’ किंवा रामनामाची पुंजी किती जमा होत आहे, याचा हिशेब ठेवतो का ?
२. “शेवटचा दिस गोड व्हावा” असे मला वाटते, तर मग शेवटच्या क्षणी ते नाम सहज मुखात यावे म्हणून मी आजपासूनच अंतःकरणाला तशी सवय लावत आहे का?
३. माझ्या हातून कळत-नकळत होणारे छोटे-मोठे दोष किंवा वाईट विचार दूर व्हावेत म्हणून मी नामस्मरणाचा आधार घेतो का?
४. मीराबाईंनी म्हटल्याप्रमाणे, मला हे ‘अमोलिक धन’ मिळवण्याची खरी आस लागली आहे का की अजूनही चोरांनी लुटल्या जाणाऱ्या नश्वर धनामागेच धावत आहे ?
==========
श्लोक क्र. ७२ – –
न वेचे कदा ग्रंथीचे अर्थ काही।
मुखे नाम उच्चारिता कष्ट नाही।
महा घोर संसार शत्रू जिणावा।
प्रभाते मनी राम चिंतीत जावा।। ७२।।
अर्थ : रामनाम घेण्यासाठी पदरचे पैसे खर्च करावे लागत नाहीत. मुखाने रामनाम घेताना काही कष्ट पडत नाहीत. या रामनामाच्या साहाय्याने अत्यंत कठीण अशा संसाररूपी शत्रूवर मात करता येते. त्यासाठी प्रभात समयी श्रीरामाचे चिंतन करावे.
(न वेचे – खर्च करावे लागत नाहीत, ग्रंथीचे – पदरचे, अर्थ – पैसा, घोर – कठीण, जिणावा – जिंकावा)
विवेचन :माणसाची देहबुद्धी फार प्रबळ असते. देहासाठी आणि देहाच्या सुखासाठी जे जे लागेल, ते मिळवण्याच्या प्रयत्नात माणूस असतो. सगळी ऐहिक सुखे उपभोगण्यासाठी पैशाची मोठी गरज असते. त्यामुळे माणूस पैशाला फार जपतो. प्रसंगी देहापेक्षाही पैशाला महत्व देणारी माणसे व्यवहारात पाहायला मिळतात. आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करून ती पैसा मिळवण्याच्या मागे लागलेली असते. सामान्य माणूस स्वतःच्या मौजमजेसाठी हवे तेवढे पैसे खर्च करायला तयार असतो पण दानधर्माची वेळ आली की हात आखडता घेतो. सर्वसामान्य माणसांची ही मानसिकता समर्थ उत्तम प्रकारे जाणून आहेत. म्हणून रामनाम घेण्याबद्दल ते सांगतात की यासाठी पदरचा एक पैसाही खर्च करावा लागत नाही. वरील ओळीचा अर्थ आणखी एका प्रकारे घेता येईल. ते म्हणजे भगवंत प्राप्तीसाठी वेगवेगळे ग्रंथ वाचून त्यांचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न सामान्य माणूस करतो. आपली पारमार्थिक बैठक तयार होण्यासाठी आवश्यक त्या ग्रंथांचे वाचन अवश्य करावे. पण तेवढे झाल्यानंतर अधिक ग्रंथ वाचण्यात वेळ न घालवता नामस्मरण करावे. नामस्मरणासाठी ग्रंथ वाचनाची आवश्यकता नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, “वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी वाहावा भार माथा… “नुसते पुस्तकी ज्ञान किंवा शब्दपांडित्य महत्त्वाचे नसून, भगवंताच्या नामाची अनुभूती घेणे आणि अंतःकरणात भक्ती बाळगणे हेच वेदांचे खरे सार आहे हेच तुकाराम महाराजांना या ठिकाणी सांगायचे आहे.
दुसरी गोष्ट अशी की हे रामनाम मुखाने घेण्यास कोणतेही कष्ट पडत नाही. इतर तपसाधनेत तरी देहाला कष्ट पडतात. त्याचप्रमाणे तीर्थयात्रा वगैरे करायची म्हटले तरी देहाला कष्ट घ्यावेच लागतात. पदरचा पैसा खर्च करावा लागतो. पण रामनाम घेण्यासाठी यातील काहीही करावे लागत नाही. फक्त आपली इच्छा मात्र हवी. त्यासाठी स्वतंत्र वेळ देण्याची आवश्यकता नाही. सर्व संतांनी आपापली कामे करताना मुखाने हरिनामाचा जप सुरु ठेवला होता. आपणही आपली नित्यकर्मे करताना वाचेने किंवा मनाने भगवंताचे नाम घेऊ शकतो.
आपण सामान्य माणसे ! संसारात अडकलेलो असतो. बांधले गेलेलो असतो. पण हे बंधन दिसत नाही आणि कळतही नाही. आपले आयुष्य शेवटपर्यंत संसारासाठी धावाधाव करण्यातच जाते. शेवटी एक वेळ अशी येते की आपण हे सगळे कोणासाठी आणि कशासाठी केले असे वाटून पश्चाताप होतो. पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. संसार म्हणजे विवाहित माणसाचा पती, पत्नी, मुले, नातेवाईक असा साधारण अर्थ आपण घेतो. पण जो माणूस जन्माला आला तो या संसारात अडकला. मग तो विवाहित असो वा अविवाहित. एका संसार या शब्दाचा व्यापक अर्थ हे जग असाही आहे. जीवनाबद्दल एका हिंदी गीतात फार सुंदर ओळी आहेत. ‘ संसार हैं एक नदिया, दु:ख सुख दो किनारे हैं, ना जाने कहाँ जाए हम बहते धारे हैं… ‘अशा या संसाररूपी नदीतून तरून जायचं असेल तर रामनामाशिवाय तरणोपाय नाही.
संसार गोड वाटतो, जिव्हाळ्याचा वाटतो पण तो आपला मोठाच शत्रू आहे हे लक्षात येत नाही. ते लक्षात येते तेव्हा आयुष्याची किंमत आपण मोजलेली असते. एखाद्या गोष्टीचे माणसाला जेव्हा व्यसन लागते, तेव्हा ती गोष्ट त्याला अती प्रिय होते. मग ती वाईट आहे हे कळले तरी ती त्याला सोडवत नाही. तंबाखू, दारू इ. चे व्यसन लागलेल्यांची अशीच अवस्था होते.
समर्थ श्रीरामस्तुती करताना म्हणतात, ” संसारसंगे बहू शीणलों मी, कृपा करी रे रघुराज स्वामी. ” संसार हा आपला महाशत्रू आहे हे लक्षात घेऊन वागणाऱ्याला संसार बाधत नाही. तो संसारात असतो पण साक्षीभावाने प्रपंचाकडे पाहतो. हे सगळे प्रारब्धाचे खेळ आहेत हे तो जाणून असतो. सर्वसामान्यांना तो संसारात रमलेला दिसेलही पण त्याचे चित्त भगवंताकडे असते. आपण बसने किंवा रेल्वेने प्रवास करीत असतो. काहीवेळा सोबत असलेल्या सहप्रवाशांशी आपल्या छान गप्पा होतात. पण आपले स्टेशन आले की आपल्याला उतरावे लागणार हे आपण जाणून असतो. त्यामुळे त्या सहप्रवाशाना सोडून जाताना विशेष दुःख होत नाही. असेच आपण संसारातही असावे. पाण्यात राहूनही चिखलापासून अलिप्त असणाऱ्या कमलदलांप्रमाणे ! हे सगळे सांगणे सोपे पण आचरणे कठीण आहे. पण रामनाम घ्यायला तर सुरुवात करू या. तेव्हा हे मना, अधिक वेळ दवडू नकोस. प्रभात समयापासून भगवंताचे चिंतन कर असेच समर्थ आपल्याला या श्लोकातून सांगू इच्छितात.
स्वसंवाद ::
१. ज्या ऐहिक सुखांसाठी आणि पैशासाठी मी रात्रं-दिवस देह झिजवतो, ते सुख मला कधी चिरंतन शांतता देऊ शकेल का?
२. नामस्मरणासाठी पैशांचा खर्च नाही आणि देहाला कष्टही नाहीत, तरीही मी ते टाळण्यासाठी वेळेचे किंवा थकव्याचे निमित्त शोधतो का?
३. संसारातील नाती आणि कर्तव्यांमध्ये मी इतका गुरफटलो आहे का, की मला या सगळ्याकडे ‘साक्षीभावाने’ किंवा अलिप्तपणे पाहता येत नाहीये?
४. पाण्यात राहूनही चिखलापासून अलिप्त राहणाऱ्या कमळाप्रमाणे, मी संसारात राहूनही माझे चित्त भगवंतचरणी ठेवण्याचा प्रयत्न करतो का?
☆ आराम करा ?.. नाही.. नको.. – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆
– – – एका जेरियाट्रिशियन (वृद्धावस्था तज्ज्ञ) यांच्या मनातून उमटलेले शब्द
वृद्धापकाळात एखादी व्यक्ती दीर्घकाळ अंथरुणाला खिळून राहिली आणि तिची मुले फक्त “आराम करा… घाई करू नका… ” एवढेच म्हणत राहिली, तर अनेकदा तिथूनच सर्वात धोकादायक परिस्थितीची सुरुवात होते.
– – – “वृद्ध व्यक्तीसाठी अंथरुणावर पडणे सोपे असते; पण पुन्हा उठणे अत्यंत कठीण असते. अनेक वेळा आजार माणसाला मारत नाही, तर अंथरुण मारते. “
मी डॉ. सॉंग युआनमिंग, वय ५४ वर्षे.
… गेली २७ वर्षे एका नामांकित रुग्णालयाच्या जेरियाट्रिक्स (वृद्धावस्था चिकित्सा) विभागात कार्यरत आहे.
या काळात १६, ००० हून अधिक रुग्णांवर उपचार केले आणि २, ४०० पेक्षा अधिक गंभीर स्थितीची प्रमाणपत्रे लिहिली.
आज मी वैद्यकीय परिभाषा वापरणार नाही. मी फक्त माझ्या डोळ्यांसमोर घडलेल्या तीन सत्य घटना सांगणार आहे.
… या तिन्ही कथा प्रत्येकाच्या आई-वडिलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
—
पहिली घटना (२०१९ – शरद ऋतू)
रुग्ण: ८१ वर्षीय निवृत्त शिक्षक श्री. सन
त्यांच्या मांडीच्या हाडाला (Femoral Neck) फ्रॅक्चर झाले होते.
शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
तिसऱ्या दिवशी डॉक्टरांनी सांगितले,
“वॉकरच्या साहाय्याने चालण्याचा प्रयत्न सुरू करा. “
मात्र मुलगा म्हणाला,
“बाबा इतके वयस्कर आहेत… पुन्हा पडले तर? त्यांना आराम करू द्या. “
गेल्या २७ वर्षांत मी “आराम करा” हे शब्द किमान ५०० वेळा ऐकले आहेत.
आणि प्रत्येक वेळी माझ्या अंगावर काटा आला.
कारण ८० वर्षांवरील व्यक्तीसाठी हे तीन शब्द अनेकदा मृत्यूकडे नेणारे ठरतात.
श्री. सन यांनी मुलाचे ऐकले.
ते अंथरुणावरच राहिले.
– ७ वा दिवस – खोकला सुरू झाला.
– १२ वा दिवस – ३८. ७° ताप; CT मध्ये फुफ्फुसांचा Hypostatic Pneumonia आढळला.
– १८ वा दिवस – ICU मध्ये दाखल.
– २३ वा दिवस – निधन.
… त्यांचा मृत्यू फ्रॅक्चरमुळे झाला नाही.
शस्त्रक्रियेच्या गुंतागुंतीमुळेही झाला नाही.
तर दीर्घकाळ अंथरुणावर पडून राहिल्यामुळे झालेल्या न्यूमोनियामुळे झाला.
हाड बरे झाले… पण फुफ्फुसे अंथरुणामुळे निकामी झाली.
—
दुसरी घटना (जानेवारी २०२१)
रुग्ण: ७८ वर्षीय पक्षाघात (स्ट्रोक) झालेला रुग्ण – श्री. ली
दहा दिवसांनी त्यांची प्रकृती स्थिर झाली.
मी त्यांच्या मुलीला सांगितले,
“आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुनर्वसन (Rehabilitation). “
– दिवसातून किमान दोनदा बसवा.
– प्रत्येक वेळी ३० मिनिटे.
– शक्य असल्यास उभे करा.
– थोडे चालवा.
मुलगी अतिशय सेवाभावी होती.
२४ तास काळजी घेण्यासाठी केअरटेकर ठेवला.
जेवण, औषधे, अंघोळ, डायपर… सर्व काही व्यवस्थित.
पण एक गोष्ट झाली नाही… त्यांना हलवलेच गेले नाही.
तिला भीती वाटत होती—
दुखेल… थकतील… पडतील…
जेव्हा केअरटेकर त्यांना बसवण्याचा प्रयत्न करायचा, ती म्हणायची—
“जबरदस्ती करू नका… आराम करू द्या. “
तीन महिन्यांनंतर… त्यांचा दुसराही पाय निकामी झाला.
हा दुसरा स्ट्रोक नव्हता.
तर Muscle Atrophy (स्नायूंचे झपाट्याने क्षीण होणे) होते.
दीर्घकाळ अंथरुणावर राहिल्यास—
– दर आठवड्याला १. ५ ते ३% स्नायू नष्ट होतात.
– तीन महिन्यांत जवळपास ४०% स्नायू कमी होतात.
परिणाम—
अर्धांगवायू → पूर्ण अर्धांगवायू
“अजून उभे राहू शकतात”
→
“आता कधीच उभे राहू शकणार नाहीत. “
ते आणखी १४ महिने जगले.
– – या काळात त्यांना तीन बेडसोर झाले.
सर्वात मोठी जखम इतकी खोल होती की हाड दिसत होते.
ड्रेसिंग करताना ते टॉवेल घट्ट पकडून वेदना सहन करायचे…
डोळ्यांतून अश्रू वाहायचे.
प्रत्येक वेळी मुलगी रडत म्हणायची—
“बाबा… आराम करा… “
हेच शब्द… सर्वात मृदू… पण सर्वात क्रूर ठरले.
—
तिसरी घटना (२०२३)
रुग्ण: ८३ वर्षीय श्री. झाओ
Hip Replacement शस्त्रक्रिया झाली होती.
त्यांचा मुलगा अभियंता होता.
दुसऱ्या दिवशी तो वही घेऊन माझ्याकडे आला.
“डॉक्टर, कृपया सात दिवसांचा पुनर्वसन कार्यक्रम लिहून द्या. “
मी योजना तयार केली—
– दिवस १ – घोट्याचे व्यायाम (प्रत्येक तासाला २० वेळा)
– दिवस २ – पाय उचलणे (१० × ४)
– दिवस ३ – वॉकरच्या सहाय्याने २ मिनिटे उभे राहणे
– दिवस ५ – १० पावले चालणे (४ वेळा)
– दिवस ७ – ८ मीटर चालणे
त्यांना वेदना झाल्या का?
हो.
तिसऱ्या दिवशी उभे राहताना त्यांच्या कपाळावर घाम होता…
ओठ पांढरे पडले होते.
मुलाने मात्र असे म्हटले नाही—
“आराम करा. “
त्याने फक्त एवढेच म्हटले—
“बाबा… फक्त ३० सेकंद उभे रहा… मी टाइमर लावला आहे. “
फक्त ३० सेकंद…
त्यांनी दात ओठ खात ते पूर्ण केले.
आणि तेच ३० सेकंद त्यांच्या आयुष्यातील सर्वात प्रभावी औषध ठरले.
१४ व्या दिवशी…
ते स्वतःच्या पायांनी चालत वॉर्डच्या बाहेर आले.
हळूहळू… पण स्वतःच्या पायांवर.
त्या वर्षीच्या १८४ रुग्णांमध्ये त्यांची पुनर्प्राप्ती (Recovery) सर्वोत्कृष्ट होती.
—
२७ वर्षांच्या अनुभवातून शिकलेले ५ धडे
१. दोन आठवड्यांपेक्षा जास्त अंथरुणावर राहणे म्हणजे स्नायूंचा झपाट्याने ऱ्हास.
अंथरुण म्हणजे विश्रांती नव्हे…
तो विनाशाची सुरुवात असू शकतो.
२. पहिले ७२ तास हे सुवर्णक्षण (Golden Period) असतात.
याच काळात हालचाल सुरू झाली की नाही, यावर पुढील आयुष्य ठरते.
३. सर्वात धोकादायक तीन गोष्टी
– न्यूमोनिया
– रक्ताच्या गाठी (Blood Clots)
– बेडसोर
.. या अनेकदा मूळ आजारापेक्षाही अधिक जीवघेण्या ठरतात.
४. चुकीचा सेवाभाव
रुग्णाचे प्रत्येक काम आपणच करणे…
त्यांना अधिक अपंग बनवू शकते.
५. खरी सेवा म्हणजे…
त्यांना पुन्हा उभे करण्याचा प्रयत्न करणे.
कधी कधी त्यासाठी थोडे कठोर व्हावे लागले तरी.
—
शेवटचा संदेश
मला विचारले गेले—
“तुम्हाला सर्वात जास्त कशाची भीती वाटते?”
मी उत्तर दिले—
“मला गंभीर आजाराची भीती वाटत नाही. “
“मला भीती वाटते जेव्हा कोणी म्हणते— ‘आराम करा. ‘”
कारण त्या क्षणी…
प्रयत्न करण्याची इच्छा संपलेली असते.
मी माझ्या कुटुंबालाही सांगितले आहे—
“जर मी कधी अंथरुणाला खिळलो… तर मला कधीही ‘आराम करा’ असे म्हणू नका. “
“मला उठवा… चालवा… टाइमर लावा… आणि सांगा—
‘बाबा… फक्त अजून ३० सेकंद!'”
—
आपल्या सर्वांसाठी
देव करो, आपल्या आई-वडिलांवर अशी वेळ कधीच येऊ नये.
परंतु जर आलीच—
✖️ “आराम करा” असे म्हणू नका.
✔️”मी तुम्हाला उभे राहायला मदत करतो. ” असे म्हणा.
कदाचित ते ३० सेकंद…
त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतील.
कारण…
स्वतःच्या पायांनी चालत शौचालयापर्यंत जाणे—
ही वृद्धापकाळातील सर्वात मौल्यवान स्वातंत्र्याची भावना आहे.
ते जपा… आजपासूनच.
टीप: प्रत्येक रुग्णाची परिस्थिती वेगळी असते. शस्त्रक्रिया, स्ट्रोक किंवा गंभीर आजारानंतर हालचाल सुरू करण्याचा निर्णय नेहमी उपचार करणाऱ्या डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्ट यांच्या सल्ल्यानुसारच घ्यावा.
***
माहिती संग्राहक : अज्ञात
प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈