श्री विश्वास देशपांडे
इंद्रधनुष्य
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९५ आणि ९६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ९५ – – –
अजामेळ पापी वदे पुत्रकामे ।
तया मुक्ति नारायणाचेनि नामे ।
शुकाकारणे कुंटणी राम वाणी ।
मुखे बोलता ख्याति झाली पुराणी ।।९५।।
अर्थ : दुराचारी असलेल्या अजामेळाने अंतकाळी आपल्या नारायण पुत्राचे नाव घेतले. त्या मुलाचे सतत नाम घेतल्याने त्याला मुक्ती मिळाली. एका गणिकेने ‘ राम राम ‘ हे आपल्या पोपटाचे नाम सतत घेतल्याने तिचा देखील उद्धार झाला. आपल्या अंतकाळी भगवंताचे नाम घेणाऱ्या व्यक्तींच्या या कथा पुराणात प्रसिद्ध झाल्या.
(शुक – पोपट, कुंटणी – गणिका/वेश्या)
विवेचन : भगवंताच्या नामाचे महत्व पटवून देण्यासाठी समर्थ या श्लोकात पुराणातील दोन वेगळी उदाहरणे आपल्या देतात. अजामेळ ब्राह्मणाची कथा भागवतात आली आहे. अजामेळ हा दुराचारी होता. आपल्या आयुष्यात त्याने कधी भगवंताचे नाम घेतले नाही. आपला अंतकाळ जेव्हा जवळ आला तेव्हा त्याला आपल्या लाडक्या नारायण या पुत्राची आठवण होऊन तो त्याच्या नावाचा जप करू लागला. तेव्हा विष्णुदूतांनी येऊन त्याला मुक्ती दिली अशी कथा आहे. दुसरी कथा आहे पिंगला या गणिकेची. तिने देखील आपल्या संपूर्ण आयुष्यात परमेश्वराची भक्ती केली नाही. परमेश्वराबद्दल तिला एक प्रकारचा तिरस्कार होता असे म्हटले तरी चालेल. त्याच भावनेतून तिने आपल्या आवडत्या पोपटाचे नाव ‘राम ‘ असे ठेवले. अजाणतेपणी का होईना पण त्यानिमित्ताने ती रामनाम घेत गेली. त्यामुळे तिचा उद्धार झाला. खरी गोष्ट अशी आहे या सगळ्यांना मृत्यूसमयी आपल्या चुकीचा पश्चाताप होऊन त्यांनी भगवंताचे नाम घ्यायला सुरुवात केली. पुढे त्यातूनच त्यांचा उद्धार झाला.
तर्कशास्त्राच्या कसोटीवर या कथा आजच्या काळात टिकणाऱ्या नाहीत. नास्तिक आणि बुद्धिवादी लोक तर या पुराणातील भाकडकथा आहेत म्हणून सहज उडवून लावतील. पण समर्थांच्या काळात या कथा प्रचलित होत्या. लोकांनी परमेश्वराचे नाम कोणत्याही प्रकारे का होईना पण घ्यावे आणि त्यांना रामनामाचे महत्व पटावे एवढाच समर्थांचा या कथा सांगण्यामागील उद्देश असावा. आपणही तो उद्देश लक्षात घेऊ या. आपल्यासाठी त्या कथांपेक्षा समर्थांचा संदेश महत्वाचा आहे. ज्याप्रमाणे आपण धान्य निवडताना आपण फोलपट टाकून देऊन सार आपल्याकडे ठेवतो त्याप्रमाणे बाकी निरुपयोगी फोलपट टाकून सार तेवढे ग्रहण करू या. रामनाम हेच सार आहे. सुज्ञास अधिक सांगणे नलगे.
स्वसंवाद ::
१. पुराणातील कथांमधील चमत्कारिक गोष्टींवर तर्क लढवत बसण्यापेक्षा, त्यामागे संतांनी दिलेला ‘नामस्मरणाचा’ मूळ संदेश (सार) मी स्वीकारू शकतो का?
२. “अजाणतेपणी किंवा मुलाच्या ओढीने घेतलेले नाम जर अजामेळाला तारू शकते, ” तर मग मी जाणीवपूर्वक आणि मनापासून नाम घेतले तर माझ्या आयुष्यात किती सकारात्मक बदल घडू शकेल?
३. संसाराच्या वेगवेगळ्या विवंचनेत अडकलेला असतानाही, मी माझ्या रोजच्या बोलण्यात किंवा व्यवहारात भगवंताच्या नामाचे अधिष्ठान ठेवतो का?
४. संतांनी सांगितल्याप्रमाणे, “रामनाम हेच अंतिम सार आहे” हे स्वीकारून मी मनातील निरर्थक शंकांचे ‘फोलपट’ टाकून द्यायला तयार आहे का?
=====
श्लोक क्र. ९६ – – –
महाभक्त प्रल्हाद हा दैत्यकूळी ।
जपे रामनामावळी नित्यकाळी ।
पिता पापरूपी तया देखवेना ।
जनीं दैत्य तो नाम मूखे म्हणेना ।।९६।।
अर्थ : भगवंताचा महान भक्त असलेला प्रल्हाद याचा जन्म दैत्यकुळात झाला. परंतु तो नित्य भगवंताच्या नामाचा जप करीत असे. अत्यंत पापी असलेला त्याचा पिता हिरण्यकश्यपू याला ते पाहवेना. त्याने आपल्या आयुष्यात कधीही नामस्मरण केले नाही.
विवेचन :
भगवंताच्या नामाचे महत्व पटवून देण्यासाठी समर्थ आपल्याला प्रत्येक श्लोकात वेगवेगळी उदाहरणे देत आहेत. एखाद्या कुशल शिक्षकाने ज्याप्रमाणे विविध उदाहरणे देऊन आपल्या विद्यार्थ्यांना समजावून सांगावे तसे समर्थ आपल्याला सांगत आहेत. या अर्थाने समर्थ हे लोकशिक्षक आहेत. जन उद्धाराची तळमळ त्यांना आहे. ‘बुडते हे जन न देखवे डोळा ‘ या भावनेतून ते आपल्याला रामनामाचे महत्व सांगत आहेत.
प्रल्हाद हा विष्णूचा महान भक्त होता. पण त्याचा जन्म एका दैत्यकुळात झाला होता. दैत्यकुळातील मंडळी म्हणजे साधारणपणे भगवंताला विरोध करणारी किंवा त्याला आपला शत्रू मानणारी होती. अशा प्रतिकूल ठिकाणी प्रल्हादाचा जन्म झाला. पण भगवद्भक्तीचे संस्कार प्रल्हादाला गर्भातूनच मिळाले होते. त्याची आई कयाधू ही गर्भारपणी महर्षी नारदांच्या आश्रमात राहिली होती. तिथेच भगवद्भक्तीचे संस्कार प्रल्हादावर झाले.
प्रल्हादाला आपल्या घरातील परिस्थिती भगवंताचे नामस्मरण करण्यासाठी अनुकूल नव्हती. पण भगवंताचा खरा भक्त होण्यासाठी जे गुण लागतात, त्या गुणांनी तो परिपूर्ण होता. त्याच्या मुखात भगवंताचे नाम अखंड येत असे. ‘ ओम नमो भगवते वासुदेवाय ‘ या मंत्राचा नित्य जप तो करीत असे. इथे आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की प्रल्हाद नारायणाचे म्हणजे विष्णूचे नाम जपत होता. पण वरील श्लोकात समर्थांनी ‘ जपे रामनामावळी ‘ असे म्हटले आहे. नारायण असो की राम, तो सर्वव्यापी ईश्वर एकच आहे हेच समर्थ या श्लोकातून आपल्याला दाखवून देतात. त्यामुळे आपण देखील भगवंताच्या नामात भेदभाव करणे योग्य नाही.
परमेश्वराला आपला शत्रू मानणाऱ्या हिरण्यकश्यपूला अर्थातच हे आवडणे शक्य नव्हते. हिरण्यकश्यपू हा भगवान शंकराचा भक्त होता. त्याने कठोर तपश्चर्या करून शंकरांकडून असा वर मागून घेतला होता की ज्या वरामुळे त्याला सहजासहजी कोणी मारू शकत नव्हते. त्यामुळे तो स्वतःला अमर समजू लागला. आणखीनच उन्मत्त झाला. प्रजेवर आणि भगवंताच्या भक्तांवर जुलूम करू लागला. पण आपला स्वतःचाच मुलगा आपले ऐकत नाही असे पाहिल्यावर त्याने प्रल्हादाला मारण्यासाठी कोणतीही कसूर बाकी ठेवली नाही. पण प्रल्हादाची भगवंतावर अविचल श्रद्धा होती. भगवंताने हर प्रकारे त्याचे सर्व संकटातून रक्षण केले. हिरण्यकश्यपू पापी असला तरी प्रल्हादासारखे भगवंतावर अविचल निष्ठा असणारे पुत्ररत्न त्याच्या उदरी जन्मले हे त्याचे केवढे भाग्य! त्यामुळेच आपल्या अंत्यसमयी हिरण्यकश्यपूला नरसिंहरूपाने भगवंताचे दर्शन झाले आणि त्याला मुक्ती मिळाली.
प्रल्हादाचा जन्म जरी दैत्यकुळात झाला तरी इच्छा असली तरी विपरीत परिस्थितीत देखील भगवंताचे नाम घेऊन तरून जाता येते हेच समर्थ या श्लोकातून आपल्याला सांगतात. आपणही प्रल्हादाप्रमाणे भगवंताचे नाम घेऊन या भवसागरातुन तरून आपला उद्धार करून घेऊ शकतो. तो आपल्याला सर्व संकटातून सोडवेल.
स्वसंवाद ::
१. माझ्या सभोवतालची परिस्थिती किंवा घरचे वातावरण परमार्थ साधण्यासाठी अनुकूल नाही, असे रडत न बसता मी प्रल्हादासारखा ‘अविचल’ राहून नामस्मरण करू शकतो का?
२. राम, कृष्ण, विष्णू किंवा शिव यांच्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद करून मी माझ्या मनाची ऊर्जा वाया घालवतो आहे, की सर्वव्यापी ईश्वर एकच आहे हे सत्य स्वीकारतो?
३. हिरण्यकश्यपूप्रमाणे मीही उन्मत्त होऊन माझ्या जवळच्या माणसांवर किंवा सत्प्रवृत्तींवर अन्याय तर करत नाहीये ना?
– क्रमशः श्लोक ९५ आणि ९६
© श्री विश्वास देशपांडे
चाळीसगाव
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈




