मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खरी कृतज्ञता कशी असावी, तर… – शब्दांकन : श्री जयंत जोशी ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् ☆

सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

? इंद्रधनुष्य ?

☆ खरी कृतज्ञता कशी असावी, तर… – शब्दांकन : श्री जयंत जोशी ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

नवी दिल्लीतील ग्रँड कन्व्हेंशन सेंटर मधील एक उबदार संध्याकाळ. सर्वत्र कॅमेऱ्यांचे फ्लॅश झळकत होते. सुरक्षारक्षक वॉकी टाॅकीवर संभाषण करीत होते आणि सुटा बुटातील लोकांची लगबग चालू होती. मंत्री, व्यापारी, मान्यवर प्रतिष्ठित, आणि परदेशी पाहुण्यांनी हॉल गच्च भरलेला होता. पहिल्या रांगेत देशातील सर्वात शक्तिशाली स्त्री-पुरुष बसलेले होते.

तिसऱ्या रांगेतील एका कोपऱ्याच्या खुर्चीत एक फिकट रंगाची कॉटन साडी परिधान केलेली लहानखोर स्त्रि बसलेली होती. तिची उपस्थिती तशी काही फार कोणाच्या नजरेत येण्यासारखी नव्हती. त्या स्त्री चे नाव होते लक्ष्मी पिचाई. ती कोण आहे हे फारच थोड्या लोकांना माहीत होतं. प्रकाशझोतात होता तो त्या स्त्रीचा मुलगा सुंदर पिचाई- गुगलचा सीईओ आणि भारताची शान.

सुंदर पिचाई असा माणूस ज्याने या पदावर पोहोचण्यासाठी अनेक अग्निदिव्य पार केली होती.

आज आजच्या या संध्याकाळी भारत सरकारकडून या भरतपुत्रास गौरविण्यात येणार होते. त्याचा सत्कार ही एक दुर्मिळ घटना होती, यासाठी देशातील हुशार मनांना एकत्र आणले होते. सुंदर ची नजर सारखी आईकडे वळत होती. तिला असं आपल्याकडे लक्ष दिलेले आवडत नव्हते. ती शांतपणे मांडीवर हात ठेवून बसली होती मात्र तिचे डोळे शांत भावनेने भरून आलेले होते.

पंतप्रधान मोदी व्यासपीठावर येताच टाळ्यांच्या कडकडाटात कार्यक्रमाला सुरुवात झाली. अत्यंत प्रभावी शब्दांनी आणि स्वप्नपूर्तीचा ध्यास त्यासाठीचे कष्ट आणि मूलभूत संस्कार यांनी ओतप्रोत भरलेले ते भाषण अत्यंत शक्तिशाली होते. त्यांनी उद्योगपती, शास्त्रज्ञ आणि कलाकारांच्या नावांचा उल्लेख केला ज्याने उपस्थितांमध्ये उत्साह संचारला. मग त्यांचा आवाज गहिवरून आला. आणि ते म्हणाले, आज आम्ही काही केवळ सुंदर पिचाई यांचा सन्मान करत नाही आहोत तर आम्ही अशा एका मातेच्या जीवन प्रवासाचा सन्मान करत आहोत जिने आपल्या मुलाला शिकता यावे म्हणून एकेकाळी आपले जेवण सोडले होते.

सुंदर च्या हृदयाची धडधड वाढली. त्याने हे कधीच जाहीरपणे सांगितलेले नव्हते. सभागृहात निरव शांतता पसरली. कॅमेरे हा प्रसंग टिपण्यासाठी फिरले. लोकांनी आजूबाजूला आपल्या नजरा फिरविल्या.

मोदीजी शांतपणे व्यासपीठावरून उतरले, पण ते सुंदर च्या दिशेने गेले नाहीत तर ते गेले त्या तिसऱ्या रांगेच्या कोपऱ्यात बसलेल्या सामान्य कॉटनची फिकट रंगाची साडी परिधान केलेल्या स्त्री पाशी. लक्ष्मी गोंधळली. तिने वर पाहिले. तिचे हात थरथरले. प्रत्येकाचा जणू श्वास रोखला गेला. मोदीजी अत्यंत नम्रपणे उद्गारले, केवळ तुमच्या त्यागाने हे शक्य झाले आहे 

आणि मोदीजींनी वाकून त्या माऊलीला पदस्पर्श करून नमस्कार केला. संपूर्ण हॉल नि:शब्दपणे उभा राहिला. धडाधड कॅमेऱ्यांचे फ्लॅश झगमगले. वार्ताहरांची धावपळ झाली. सुंदर चे डोळे अश्रुंनी डबडबले. त्यांनी अशी अपेक्षा स्वप्नातही केली नव्हती. त्याने अनेक वर्ष सिलिकॉन व्हॅलीत घालविली होती, अनेक राष्ट्रांच्या अध्यक्षांशी, पंतप्रधानांशी, राजांशी तिथे त्याची भेट झाली होती. पण कोणी त्याच्या आईचा असा सन्मान केला नव्हता. लक्ष्मीने उभे राहायचा प्रयत्न केला. मोदीजींनी तिला आधार दिला आणि हळुवारपणे त्यांनी तीला स्टेज समोर सर्व उपस्थितांच्या समोर उभे केले. तिने विरोध केला पण मोदीजींनी खंबीरपणे तीला उभे केले. आणि उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांचा गजर केला. सुंदर अत्यानंदाने त्यांच्याजवळ येऊन उभा राहिला. जेव्हा तो स्टेजवर आपल्या आई समवेत उभा होता तेव्हा भूतकाळातील आठवणींनी त्याच्या मनात गर्दी केली.

त्याला आठवले आपले चेन्नईतील रंग उडालेले दोन खोल्यांचे घर ज्या घरात साधा फ्रिज देखील नव्हता‌. सुंदर चे वडील एक इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून काम करत होते. ते घरी नकाशे आणि सोल्डरिंग वायर आणत. आपल्या मुलांना खेळणी आणण्याची देखील त्यांची ऐपत नव्हती. म्हणून ते मुलांना तुटके फुटके रेडिओ घेऊन येत असत जेणेकरुन ते उघडून ते शिकतील असे त्यांना वाटे. सुंदर तासन तास त्यांना प्रश्न विचारत असे. त्याची आई त्याला धान्याच्या दाण्यांचा उपयोग करून गणित शिकवीत असे. सुंदरला जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तेव्हा त्याच्या आईने आपल्या लग्नातील सोन्याच्या बांगड्या विकल्या होत्या हे त्याचे आईने कोणालाही कधीही सांगितले नव्हते ती फक्त म्हणत असे “आपण व्यवस्था करू. “

शाळेत असताना सुंदर अतिशय शांत मुलगा होता. तो कधीही आक्रमक नव्हता. पण अतिशय चौकस होता. त्याचे शिक्षक म्हणत,

“सुंदर ची स्मरणशक्ती आरशासारखी आहे. एकदा डायल केलेला नंबर अथवा लिहिलेला कोड त्याचा तोंड पाठ होत असे. “

कधी कधी त्याचे शाळेतले मित्र त्याच्या जुना बुटांवरून आणि घरून आणलेल्या डब्यावरून त्याची टर उडवत असत. पण त्याने कधीही कोणालाही प्रतिउत्तर केले नाही. तो केवळ स्मित असे करत असे आणि तेथून काढता पाय घेत असे.

कधी कधी घरी रात्रीच्या वेळी लाईट गेल्यामुळे पंखे चालत नसत. सुंदर आणि त्याचा भाऊ जमिनीवर झोपलेले असताना घामाघुम होत असत. त्यावेळी त्यांची आई त्यांना पुठ्ठ्याने कित्येक तास न झोपता वारा घालत असे आणि सकाळी लवकर उठून कामाला लागत असे.

जेव्हा सुंदरला अमेरिकेत शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली तेव्हा आपण जाऊ शकू याचा सुंदरला विश्वास नव्हता. कारण अमेरिकेत जाण्याचे तिकीट फार महाग होते. पण आई म्हणाली, तु जा मी बँकेशी बोलते. पण ती बँकेशी बोलली नाही. तिने आपल्या जवळचा शेवटचा सोन्याचा दागिना विकला.

आणि आज दिल्लीतील अतिशय मानाच्या प्रतिष्ठित हॉलमध्ये तो आपल्या आईसोबत भारताच्या पंतप्रधानांच्या समोर स्टेजवर उभा होता. आणि क्षणभर त्याला संपूर्ण जगाचा विसर पडला त्याला फक्त आईचा संथ सौम्य श्वास आणि आईच्या हाताची उब जाणवत होती. पत्रकारांनी या तंत्रज्ञानाच्या सम्राटाविषयी आणि पंतप्रधानांबद्दल अनेक लेख प्रसिद्ध केले.

परंतु सुंदर च्या आठवणीत राहिली ती त्या रात्री शांतपणे हॉटेलवर परतल्यावर आईने लहानपणीसारखा त्याचा हात हातात घेऊन म्हटले,

“तू विसरला नाहीस, एवढेच मला पुरेसे आहे. ” 

त्यावर सुंदर उत्तरला, “आई तू कधीही काहीही मागितले नाहीस हेच आम्हाला कधीही विसर न पडण्यास कारण आहे. “

शब्दांकन : श्री जयंत जोशी

प्रस्तुती : सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ राजदूत योद्धा… ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

☆ राजदूत योद्धा☆ श्री संभाजी बबन गायके 

श्री जितेंदर पाल सिंग अर्थात जेपी सिंग

ती कशीबशी दोनच आणि ती सुद्धा अर्धवट वाक्ये उच्चारू शकली… मी भारतीय आहे आणि प्रचंड संकटात आहे… मदत करा!

पाकिस्तानात असलेल्या भारतीय दुतावासातल्या नुकत्याच उघडलेल्या खिडकीसमोर ती उभी होती. अंगावर स्थानिक महिलांचा परंपरागत पेहराव, चेहरा झाकलेला… पण केवळ ही दोन वाक्ये बोलण्यासाठी चेह-यावरील बुरखा बाजूला केलेला. डोळ्यांमध्ये भय आणि चेह-यावर एखाद्या हरिणीचे भय दाटून आलेले. कोणत्याही सहृदय, संवेदनशील व्यक्तीला शब्दांपेक्षा चेह-यावरील भाव अधिक लवकर उमजतात. संकटात असलेली समोर उभी असणारी व्यक्ती भारतीय आहे इतकं त्याला पुरेसे होते. मूळात दूतावासाचे कामच असते आपल्या देशाच्या नागरीकांना साहाय्य करण्याचे त्यामुळे परिस्थिती लक्षात येताच त्या अधिका-याने तिला त्याच्या कार्यालयाच्या विशिष्ट दरवाजातून आत बोलावले.. तिच्या सोबत असलेल्या दोन पुरुषांना ती त्या दरवाज्याच्या दिशेला का पळत निघाली असावी, याचा बहुदा अंदाज आला असावा… ते दोघेही मोठ्या त्वेषाने त्या दिशेला धावले.

पूर्वीच्या काळी एका देशाचा राजदूत दुस-या देशात जायचा तो प्रसंगोत्पात्त. पण बदलत्या जागतिक राजकीय परिस्थितीत, एका देशाला दुस-या देशांत आपापले दूतावास आणि राजदूत ठेवावे लागतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या १४७ प्रमुख देशांमध्ये भारताचे राजदूत सदैव कार्यरत असतात… पाकिस्तानातही!

दूतावास जरी परकीय भूमीवर असला तरी प्रत्यक्ष दूतावासाच्या आत संबंधित पाहुण्या देशाचा कायदा लागू असतो. अतिशय विशिष्ट परिस्थिती निर्माण झाली तरच यजमान देशाचे सैनिक, अधिकारी आत प्रवेश करू शकतात. अन्यथा यजमान देशाने नेमलेले सुरक्षा रक्षकही आत परवानगीविना प्रवेश करू शकत नाहीत.

I. F. S. (इंडीयन फॉरेन सर्विस) अर्थात भारतीय परराष्ट्र सेवेमधील अधिकारी एका अर्थाने जागतिक पातळीवर आपल्या देशाचे प्रतिनिधीत्व करीत तर असताच तसेच एका अर्थाने देशासाठी, त्या देशातील आपल्या नागरीकांसाठी लढतही असतात.

मदतीची याचना करीत आलेल्या महिलेसोबत आलेल्या दोघा पुरुषांनी आत शिरण्याचा प्रयत्न करताच त्यांना सुरक्षारक्षकांनी रोखून धरले.

आत शिरलेल्या या महिलेची अवस्था अत्यंत कठीण होती. तिची संरक्षणदृष्ट्या पूर्ण तपासणी करण्यात आली… कारण अफगाणिस्तानमध्ये सुसाईड बॉम्बर्सचा आपल्याला अनुभव आहेच… पाकिस्तानातसुद्धा असे शक्य होतेच. परंतु दुतावासात प्रवेशाच्या वेळी तिची व्यवस्थित तपासणी झाली होतीच. मात्र दुस-या तपासणीतही या महिलेकडे कोणतीही शस्त्रे किंवा आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या नाहीत. मात्र तिच्या शरीरावर प्रचंड छळ केला गेल्याच्या अनेक खुणा महिला अधिका-यांना आढळून आल्या… लैंगिक अत्याचार झाल्याचेही स्पष्ट दिसत होते.. एकंदर स्थिती बिकट आणि त्वरीत निर्णय घ्यावा लागेल, अशी होती.

यावेळी या पाकिस्तानातील भारतीय दूतावासात डेप्युटी हाय कमिशनर या पदावर एक अत्यंत अनुभवी, कर्तबगार आणि निर्णयक्षम व्यक्ती नियुक्त होती…. जितेंदर पाल सिंग अर्थात जेपी सिंग यांची. सामाजिक शास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या आणि २००२ मध्ये परराष्ट्र सेवेत पदार्पण केलेल्या जेपी साहेबांनी आरंभी मॉस्को (रशिया) आणि नंतर काबुल (अफगाणिस्तान) मध्ये सुरु असलेल्या भारतीय मोहिमांमध्ये सेवा बजावली होती. त्यावेळी सुद्धा अफगाणिस्तानात प्रचंड संघर्ष सुरूच होता. राजकीय धामधुमीत भारताचे हितसंबंध जपत काम करण्याचे कौशल्य जेपी साहेबांनी दाखवले. त्यामुळेच त्यांच्यासारख्या कुशल राजनैतिक अधिका-याला पाकिस्तानी दुतावासात नेमले जाणे साहजिकच होते. भारतीय परराष्ट्र मंत्रालायाच्या पाकिस्तान-अफगाणिस्तान-इराण विभागाचे संयुक्त सचिव म्हणून त्यांचा अनुभव दांडगा होताच. अगदी काल परवापर्यंत त्यांचे नाव सर्वसामान्य भारतीय नागरीकांच्या समोर प्रकर्षाने आलेले नसले तरी अनेक अतिरेकी कारवाया, भारत-पाक सीमेवरील चकमकी, दोन्ही देशांदरम्यान उद्भवलेले राजनैतिक पेचप्रसंग यांत जेपी यांनी अत्यंत प्रभावी काम केले होते. त्यांच्या कामाचे स्वरूप भारतीय चित्रपट, कादंब-या यांतून नीटसे लक्षात येईल, असेही नाही. पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आणि भारताने तक्रार केली आणि पाकिस्तानी राजदूताला बोलावून घेतले की कांगावेखोर पाकिस्तान अशीच कृती पाकिस्तानमध्येही करीत असे. जेपी यांनी अशी अनेक बोलावणी येत. त्या प्रत्येकवेळी त्यांनी भारताची बाजू कुशलतेने मांडली. भारताचे माजी नौसेना अधिकारी श्री. कुलभूषण जाधव साहेब यांना पाक्सितानने अवैधरीत्या ताब्यात ठेवले आहे. या प्रकरणातही जेपी यांनी कणखरपणे अनेक बाबींचा पाठपुरावा केला आहे.

दुतावासात आश्रय मागणा-या या महिलेला जेपी साहेबांच्या समोर आणण्यात आले. अत्यंत अनुभवी नजर असलेल्या साहेबांनी काही वेळातच या महिलेचा खरेपणा तपासून पाहिला आणि तिला भारतीय दुतावासात आश्रय देण्याचा मोठा निर्णय घेतला. वरवर ही बाब अतिशय सोपी वाटेल कदाचित. परंतु भारत पाकीस्तान मधील ताणले गेलेले संबंध, त्यात कुलभूषण जाधव साहेबांची अटक, सरबजीत सिंग या भारतीयाचा पाकिस्तानातील तुरुंगात झालेली हत्या आणि अशा अनेक गोष्टी लक्षात घेऊन पावले उचलावी लागली.

एक तर संबंधित महिला उझ्मा अहमद ही एका पाकिस्तानी नागरिकाची तेथील कायद्यानुसार निकाह झालेली पत्नी. पतीच्या परवानगीशिवाय उझ्मा पाकिस्तान सोडून जाऊ शकणार नव्हती. आणि तो तर तिला तेथून घेऊन जायला बेचैन होता.

संबंधित महिलेची जीवनकथाही अत्यंत वेगळी आहे. एका मुलाखतीत तिनेच सांगितल्यानुसार ती अनाथ आहे. तिला एका कुटुंबाने तिला दत्तक घेतले होते. तिचे दत्तक वडील अनिवासी भारतीय असल्याचे समजते. उझ्माचे पहिले लग्न अयशस्वी ठरले होते. पण त्या संबंधातून तिला एक मुलगी झाली होती आणि दुर्दैवाने या मुलीला थाल्सेमिया नामक खर्चिक व्याधी होती. या मुलीला भारतात आजीकडे ठेवून उझ्मा मलेशियात एम. बी. ए. किंवा तत्सम काही शिकायला गेली होती. तिथून भारतात परतल्यानंतर ती पुन्हा पर्यटनासाठी म्हणून मलेशियात गेली. मलेशियात तिची एक परिचित महिला पतीसह नोकरी करीत असे. या पर्यटन-भेटीदरम्यान त्यांनी ठरवलेला वाहन चालक आलाच नाही. त्याऐवजी ताहीर नावाचा एक बदली चालक आला. या पर्यटन प्रवासात उझ्मा आणि ताहीरचे वैय्यक्तिक बोलणे झाले असावे. ताहीरने पाकिस्तानातही स्वित्झर्लंड सारखी पर्यटनस्थळे असल्याचे सांगितले होते. तसेच पाकिस्तानमध्ये उझ्माच्या मुलीवर उत्तम आणि स्वस्त उपचार होऊ शकतात, असेही नमूद केले होते. उझ्मा भारतात परतल्यावर ताहीरने तिला वारंवार फोन केले आणि तिने पाकिस्तानात तिच्या घरी एकदा भेटीस यावे असे सुचवले… आणि खूप प्रयत्नांती ताहीर यशस्वी झाला. ताहीर अविवाहित होता अशी उझ्माची कल्पना होती. तो वागायला शालीन, शिवाय मुलीची काळजी घेणारा आहे असे वाटले असावे तिला. पहिला संसार मोडलेला, मुलीची जबाबदारी या सर्व बाबी उझ्माला ताहीरकडे आकर्षित करण्यास कारणीभूत झाल्या असाव्यात. अर्थात उझ्मा याबाबत संदिग्ध बोलते. पण ती स्वत: पाकिस्तानात गेली, हे ही खरेच. मात्र तिच्या पाकिस्तान प्रवेशाच्या कागदपत्रात सर्वच बाबी कायदेशीर नव्हत्या. ताहीरने विशेष व्यवस्था करून प्रवासी परवान्यावर उझ्माला पाकिस्तानात दाखल करून घेतले. तिची पाकिस्तानातील एक मावशी आजारी असल्याचे कारण त्याने दाखवले होते. आणि उझ्माने याकडे डोळेझाक केली होती!

ताहीर आणि त्याचा एक कथित भाऊ उझ्माला न्यायला अटारी सीमेवर आले. त्यांच्या मोटारीतून प्रवास करताना तिला खराब रस्त्याचा त्रास होऊ नये या सबबीखाली ताहीरने तिला काही औषध खायला दिले… आणि ती बेशुद्ध झाली. तिला जाग आली तेंव्हा ती पाकिस्तान-अफगानिस्तान सीमेवरील, तालिबानी नियंत्रण असलेल्या एका खेड्यात, एका विचित्र घराच्या दारात होती. ताहीर बहुदा विवाहित होता आणि त्याला एकापेक्षा जास्त पत्नी होत्या. घरात चार लहान मुलेही होती.. पण ती ताहीरच्या मयत भावाची आहेत, असे ताहीरने तिला सांगितले. त्या घरात उझ्माला जणू नजरबंदीमध्ये ठेवण्यात आले… विरोध करताच मारहाण झाली… लैंगिक अत्याचार झाले. तिला विकण्याचाही अयशस्वी प्रयत्न झाला. भारतात असलेल्या तिच्या लेकीचे अपहरण करून तिला ठार मारण्याची धमकी देण्यात आली… आणि बंदुकीच्या धाकात तिचा ताहीरशी निकाह लावण्यात आला. तशी कागदपत्रे तयार करण्यात आली. उर्दू लेखी भाषा अवगत नसलेल्या उझ्माची स्वाक्षरी घेण्यात आली. आणि उझ्माचा ताहीरशी संसार सुरु झाला… चार पाच दिवसांसाठी. तिथून सुटका होण्याचा एक मार्ग तिथे तिच्यासारख्याच फसवून आणलेल्या एका मुलीने मोबाईल उपलब्ध करून दिल्याने तिला सापडला.. तिच्या मलेशियातील मैत्रीणीच्या नव-याने तिला एक युक्ती सांगितली. भारतीय लोक जावयांना महिलांना लग्नात हुंडा म्हणून मोठी रक्कम देतात… माझा भाऊ पाकिस्तानी दुतावासात कामाला आहे… त्याच्या माध्यमातून ही रक्कम भारतातून मागवून घेता येईल… त्यासाठी इस्लामाबाद येथे असलेल्या भारतीय दुतावासात जाणे गरजेचे आहे… असे ताहीरला पटवण्यात ती यशस्वी झाली… आणि आता ती जेपी साहेबांच्या समोर उभी होती… मला भारतात पाठवा! अशी विनंती करीत होती. अन्यथा मला विष द्या.. मी आत्महत्या करते असेही तिने सांगितले.

जेपी सिंग साहेबांनी भारतात संबंधित मंत्री, अधिकारी यांच्या कानावर ही गोष्ट घातली. भारतीय मंत्री, अधिकारी यांनी साहेबांना हिरवा कंदील दाखवला… पण जपून पावले उचलायला सांगितली.

ताहीर न्यायालयात गेला. भारतीय दुतावासाने माझ्या बायकोचा बेकायदेशीर ताबा घेतल्याचे त्याने नमूद केले. तोवर इकडे जेपी सिंग साहेबांनी उझ्माचा जबाब नोंदवून तो प्रसिद्धी माध्यमांत पोहोचेल अशी व्यवस्था केली होती. ही वेगळी घटना पाकिस्तानी आणि भारतीय माध्यमांनी लगेच उचलून धरली. दरम्यान उझ्माला फसवून, धाकदपटशा दाखवून लग्नाच्या बंधनात टाकण्यात आले आहे, असे सिद्ध करणे गरजेचे होते. जेपी सिंग साहेबांनी या कामी पाकिस्तानातील मानवतावादी वकील मलिक शहनवाज नून यांची मदत घेतली. नून यांनी पाकिस्तानी लोकांचा रोष पत्करून उझ्माची बाजू मांडली. उझ्माला जबरदस्ती करून निकाह करायला लावला हे न्यायाधीशांनी लक्षात घेतले. जेपी सिंग साहेबांनी या खटल्याचा रीतसर आणि अचूक अभ्यास केला. उझ्माला पाकिस्तानात आणले गेल्याची कोणतीही अधिकृत नोंद ताहीरने केलेली नव्हती. हाही मुद्दा महत्वाचा मानला गेला. पाकिस्तानी जनमत ताहीरच्या बाजूने होते. परंतू जेपी साहेबांचे पाकिस्तानी दूतावासातील अधिका-यांशी असलेले व्यावसायिक पण तसे सौहार्दाचे संबंध, नून साहेबांनी हिरीरीने मांडलेले मुद्दे, पाकिस्तानातील न्याययंत्रणा आणि परराष्ट्र खात्यातील लोकांनी केलेले सहकार्य आणि न्यायाधीश महोदयांनी घेतलेला योग्य निर्णय यामुळे उझ्मा सुटली! २५ मे, २०१७ रोजी ती भारतात आली!

तिला वाघा सीमा मार्गे भारतात नेले जात असताना तिच्या संरक्षणाची व्यवस्थाही पाकिस्तानी सरकारने पुरवली. विविध कायदेशीर अडथळे पार करीत उझ्मा भारतीय सीमेत दाखल झाली. जेपी सिंग साहेब आणि त्यांचे सहकारी तिला सुरक्षित पोहोचवायला अगदी सीमेपर्यंत आले होते. भारताच्या सीमेवर तत्कालीन परराष्ट्र मंत्री महोदया श्रीमती सुषमा स्वराज उपस्थित होत्या. त्यांनी उझ्मा ही भारताची कन्या असल्याची भूमिका अगदी आरंभापासून घेतली, तिची सुटका करण्याच्या कामी रात्रंदिवस परिश्रम घेतले… सुषमाजी यांच्या योगदानाविषयी स्वतंत्र लेख यानंतर लगेचच लिहिणार आहेच.

उझ्माने भारतीय मातीत पहिले पाऊल ठेवण्याआधी ती माती आपल्या कपाळाला लावली.. आणि तिची भयकथा समाप्त झाली! उझ्मा प्रकरणाला अनेक पैलू आहेत आणि ते त्यावेळी प्रचंड गाजले होते. पण इथे आपण जेपी सिंग यांच्या अफाट कर्तृत्वाविषयी विचार करतो आहोत.

सैनिक सीमेवर लढत असतात. तसेच राजनैतिक अधिकारी, मुत्त्सद्दी जीवाचा धोका पत्करून अहोरात्र कार्यरत असतात. यासाठी प्रचंड अभ्यास, अनुभव आवश्यक असतो… जेपी सिंग साहेब हे गणवेश नसलेले सैनिकच आहेत! त्यांना प्रणाम. जेपी सिंग साहेब हल्ली इस्रायलमध्ये विशेष कामगिरीवर नियुक्त आहेत.

उझ्माच्या कथेवर आधारीत Diplomat नावाचा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटात कलात्मक स्वातंत्र्य घेण्यात आलेले आहेच. त्यामुळे हा चित्रपट म्हणजे संपूर्ण घटना आहे, असे नसावे. भारतात सुखरूप परतल्यावर उझ्माने केलेल्या वक्तव्याबाबतही इथे चर्चा करणे गरजेचे नाही. हा लेख म्हणजे संबंधित चित्रपटाची भलावण, जाहिरात नाही. मात्र जे. पी. सिंग साहेब आणि दिवंगत श्रीमती सुषमाजी स्वराज यांचे कर्तृत्व पडद्यावर समजून घेणे या निमिताने शक्य आहे! जय हिंद!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मस्तानी… – लेख क्र. २ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ मस्तानी… – लेख क्र. २ ☆ सौ. मंजिरी येडूरकर

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)

मस्तानीचा एक दुर्मिळ फोटो

दिल्लीचा वजीर, मोहम्मद खान बंगेश, बुंदेल खंडावर चालून आला. छत्रसाल राजाला त्याच्यासमोर शरणागती पत्करावी लागली. त्याने छत्रसाल राजाला बंदिवान केले. धूर्त छत्रसालने हेराकरवी बाजीराव मराठ्याला पत्र पाठवले व त्याच्याकडे मदतीची याचना केली. दिल्लीलाही डोईजड झालेला तोच एक परम प्रतापी पुरुष भारतात होता. पत्र मिळायचा अवकाश ३० – ४० हजाराची फौज घेऊन खुद्द बाजीराव बंगेश वर चालून गेले. हे सगळं इतकं जलद घडलं की बंगेश खानाला काही समजलंच नाही. तो एका गढीत अडकला आणि त्याला पळून जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे खुश होऊन छत्रसालाने ३२ लाखाचे उत्पन्न असणारा मुलुख बाजीरावला नजर केला. त्याबरोबर बाजीरावला आपली मुलगी दिली. जिचं सौंदर्य आरस्पानी होतं. आई यवन होती पिता प्रणामी पंथाचा (सेक्युलर) त्यामुळे नृत्य, गायन कला आईकडून तर युद्ध कौशल्य, राज्यकारभाराची जाण पित्याकडून वारसा हक्काने मिळालेली. पित्याच्या मांडीला मांडी लावून ही युद्धात उतरायची. नमाज पढायची आणि कृष्णाची पूजा पण करायची. तिचा उर्दू साहित्य, कुराणाचा अभ्यास होता. तसंच संत कबीर, मीराबाई, केशवदास, तुलसीदास तिला मुखोद्गत होते. छत्रसाल राजा म्हणाला, “हा आमचा हिरा आहे, त्याला पैलू पडले आहेत. बाजीराव, आपल्या सारखा धाडसी, कर्तृत्ववान माणूसच हा हिरा सांभाळू शकेल. “

तीच आम्ही मस्तानी! पित्याकडून निघालो तेच मुळी रेशीमबंध गुंफून व परतीचे दोर कापून! पुण्याला आलो, कोथरूडच्या बागेत. त्यावेळी आमची ओळख सांगितली, एक कलावंतीण आणली आहे, जन्माष्टमीसारख्या दिवशी नाचगाण्याला उपयोगी पडेल. आणि आमच्या स्वप्नांचा इमला इथेच कोसळला. आम्ही धीर सोडला नाही. त्यांची कांहीतरी मजबुरी असेल, असा विचार केला.

एक दिवस बाजीराव आमच्याकडे आले, म्हणाले तुझ्या गाण्यात एवढी काय जादू आहे की हरणे सुद्धा मंत्रमुग्ध होतात. आम्हालाही ऐकायचं आहे. आम्ही ‘ निस दिन बरसत नैन हमारे ‘ गाण्याने सुरवात केली. मैफिल रंगली. आम्ही गात होतो नि ते ऐकत होते. रात्र सरली पण मन भरलं नाही. त्यानंतर यादगार झाला, जन्माष्टमीचा उत्सव! कीर्तनानंतर आमचा नाच होता. आम्ही बेभान होऊन नाचत होतो. वाहवा होत होती. नाच झाला, आम्ही माहुलीच्या वाड्यात येऊन सगळा साज उतरवत होतो. तेवढ्यात रेशमी पडदा सारून बाजीराव उभे! आम्ही गोठून गेलो, पायात पडलेली ओढणी उचलायचं भानच राहिलं नाही. पिस्वादीच्या गुंड्या काढलेल्या तशाच. थरथरत विचारलं, इतनी रात, नदीका ये पानी, आप कैसे आये? क्यूँ आये? “कां, आमचं चुकलं कां? ” “नहीं, नहीं! माफ करना, हमारा ये मतलब नहीं था! ” काहीही न बोलता त्यांनी मेणबत्ती विझवली. आणि आम्ही अनंत जन्मासाठी एकमेकाचे झालो. असाच दिवाळीचा पाडवा आला. आमच्यासाठी बाजीरावांनी खानदानी स्त्री सारखा सगळा साज, शृंगार पाठवून दिला. हिरवा गर्द शालू, खोपा, त्यावर मोत्यांच्या मुदी, कानात मोत्यांचे वेल, गळ्यात सुवर्णालंकार, कंबरपट्टा, गोट, तोडे, बाजुबंद, नाकात टपोऱ्या मोत्यांची नथ! बाजीराव पहातच राहिले. पर माॅं अल्ला! हमपे तो तोहमत आ गयी| बाजीरावांनी बसंतीला कुंकवाचा करंडा आणायला सांगितला. आणि ते कुंकू आमच्या कपाळावर रेखलं. म्हणाले, “एवढी एकच कमतरता होती, पूर्ण केली. ” हमने कितना समझाया| हुजुर ये नहीं हो सकता| ये एक नाचीज औरत है| वो नहीं माने| इस दासीने हुजुरके कदमोंपर अपना दिल रख दियाही था, आज जान भी रख दी|

बाजीराव आता आमच्या सन्मानासाठी, अस्तित्वासाठी घरच्यांशी लढत होते. पहिली गोष्ट केली, ती म्हणजे मस्तानी कधीही नाचणार नाही, हे सांगितले. आम्हीही आदबीनं पायातले चाळ श्रीमंतांसमोर ठेवले. दुसरी गोष्ट, आम्हाला रोज त्यांच्याबरोबर घोड्यावरून रपेट मारण्यासाठी नेत होते. एक दिवस आम्ही येण्यासाठी नाही म्हणून सांगितले. पण ऐकायलाच तयार नाहीत. आणि आम्हाला ते गुपित सांगावं लागलं. त्यादिवशी पहिल्यांदा आम्ही त्यांना ‘राऊ ‘ अशी हाक मारली. त्यांनीही पहिल्यांदाच आमच्या ताटात आमचं अन्न स्वीकारलं. असे मिळणारे एकेक सुखाचे क्षण मनाच्या कुपीत बंद करून ठेवत होतो, नजर लागू नये म्हणून!

पण, नजर लागलीच! राऊंचं आमच्याकडे येणं वाढलं ही गोष्ट सगळ्यांनाच खटकत होती. राऊ नाहीत असं बघून आम्हाला पुण्यातून हाकलून दिलं. जाणार कुठे? पोटातल्या बाळाची काळजी वाटायला लागली. पहिल्यांदाच इतकं निराधार वाटलं. राऊ आल्यावर आम्हाला शोधून पुन्हा पुण्याला घेऊन गेले. मग मात्र आम्ही आमच्या चोळी बांगडीचा हट्ट धरला. त्यामुळं आम्हाला दोन गावं इनाम मिळाली.

काशीबाईंना मुलगा झाला, तेव्हा आम्ही बाळंतविड्याचा थाट करून पाठवला. राऊ बरेच दिवस आले नाहीत. वाटायचं, काशीबाईंजवळ बसले असतील. बाळाकडे दोघे कौतुकानं पहात असतील. आपल्याला बाळ होईल तेंव्हा राऊ जवळ असतील? शंकेची पाल चुकचुकली. खरंच राऊ आले नाहीत. आम्ही एकटेच बाळाकडे बघत होतो, त्याच्या भविष्याच्या चिंतेनं. दहा दिवस झाल्यावर राऊ आले. नाव काय ठेवायचं, म्हणाले. आम्ही सांगितलं, आपली खरी भेट कृष्णाष्टमीला झाली म्हणून कृष्णसिंग ठेऊया. राऊ म्हणाले, आमचा मुलगा समशेर बहाद्दर होणार, तेच नाव ठेऊया.

काही दिवसांनी अचानक आले. शनिवार वाड्यात आमच्यासाठी महाल बांधला होता, तिथे नेण्यासाठी. लाख मनानेके बावजूद, एक यवनी, ब्राह्मण लोगोंके बीच लानेकी हिम्मत कर रहे थे| आम्हालाही वाटलं, सहवास वाढला की अपोआप प्रेम निर्माण होईल. पर नही, धर्मसे हम अछूत थे, अछूत ही रह गये| उलट चातुर्मासाचं निमित्त करून आमच्या पासून दूर राहण्याचं राऊंकडून वचन घेतलं. आम्ही चार दिवसातच बेचैन झालो. तिकडेही तशीच अवस्था होती. आणि कुणाला न सांगता, वचन मोडून, राऊ आले. काशीबाईंना वाटलं, यवनीच्या नादाला लागून आपल्याला विसरले, आणि त्यांनी राऊंना आपल्या महालाचे दरवाजे बंद केले. हा घाव त्यांना सोसला नाही. त्यांचं शराब पिणं वाढलं. खूप वाटत होतं, काशीबाईंना जाऊन सांगावं, ‘ ही मस्तानी असली तरी तुमचं त्यांच्या मनातलं स्थान अबाधित आहे. तुम्ही मंदिर आहात तर ही मस्तानी त्याची एक पायरी आहे. तुम्ही देवघरातील मंद तेवणारी ज्योत आहात तर मस्तानी त्याचा एक अंधारा कोपरा आहे. ‘ जन्माष्टमीला आम्हाला नाचण्याचं आमंत्रण दिलं, आमचा अपमान करण्यासाठी! आम्ही फक्त एक रखेल, नाचणारी आहोत आणि आता राऊ आमच्यापासून दूर गेले आहेत, याची जाणीवकरून देण्यासाठी! तरीही आम्ही ते स्विकारलं, काढून ठेवलेले चाळ पुन्हा बांधले, वाटलं या निमित्तानं राऊंना निदान पाहता येईल, व काशीबाई भेटतील, त्यांना मनातलं सगळं सांगता येईल. पण आमचा नाच पूर्ण होण्यापूर्वीच काशीबाई दरबारातून निघून गेल्या. आम्ही बिदागीचं ताट घेऊन मागे फिरलो.

दिवाळीच्या पाडव्याला काशीबाई ओवाळणार नाहीत हे कळल्यावर काशीबाईनी दिलेली नवग्रहाची अंगठी आम्हाला ओवाळणीत देऊन टाकली. म्हणाले, “आज बाजीरावाचा त्याच्या कुटुंबाशी उरला सुरला संबंध ही संपला. ” आम्ही खूप सांगितलं, आमच्याशी संबंध तोडा पण त्यांच्याशी नको. मानसिक ताण सगळ्यांचाच वाढला.. हे आमच्या मुळे झालं याचं वैषम्य कायम राहिलं. वाईट एवढंच वाटतं, आई यवन असली तरी पिता हिंदू होता तरीसुद्धा आम्ही यवन च राहिलो, तसाच आमचा मुलगाही पिता ब्राह्मण असूनही यवनच राहिला.

आम्हाला राऊंच्यापासून तोडण्यासाठी आमचा छळ सुरू झाला. काशीबाईंचा अबोला, आम्हाला दिल्या जाणाऱ्या त्रासाच्या बातम्या, सहन न झाल्यामुळं, राऊ मोहिमेवर मोहिमा करत राहिले. याचा फायदा घेऊन आम्ही घर, गाव सोडून जावे म्हणून त्रास देणं सुरू झालं. तवायफ म्हणून हिणवलं. आम्ही जात नाही हे पाहिल्यावर, राऊंना पुण्याचे रस्ते बंद केले. आम्हाला नजर कैदेत ठेवलं. आमचा गुन्हा काय होता तर आम्ही बाजीरावांवर जिवापाड प्रेम केलं. आणि बाजीरावांनी आमच्यावर! तरी आम्ही सगळे साखळदंड तोडून त्यांना भेटायला गेलोच. पण आमचं प्रेम त्यांना नाही तारु शकलं. आजार बळावला. शेवटी काशीबाईंना पाठवलं पण फार उशीर झाला होता.

राऊंच्या नंतर ह्या माणसांच्यात आम्ही जिवंत राहणंच शक्य नव्हतं. मान, सन्मान सोडाच, पण आमचं चारित्र्य तरी सांभाळू शकलो असतो का नाही कुणास ठाऊक! राऊंना भेटायला जाणं शक्य नव्हतं, पण आम्ही त्यांना सांगत होतो, तुमच्याबरोबर आम्हालाही घेऊन जावा. आमचं नशीब थोर, आमचा धावा त्यांनी ऐकला आणि आमचा हात धरून आम्हाला अंतिम प्रवासास घेऊन गेले.

ना आमच्या नृत्य कलेचा सन्मान झाला, ना आमच्या युद्धकलेचा! ना आमची बुद्धी उपयोगी पडली, ना आमचं प्रेम सांभाळू शकलो. ज्या भितीपोटी आमच्या पिताश्रींनी आम्हाला या शूर योद्ध्याबरोबर पाठवलं, ती भिती इथेही पोखरत राहिली. जे प्रेमाचे काही क्षण आमच्या वाट्याला आले, त्या क्षणांसाठी आम्ही राऊंचे अत्यंत ऋणी आहोत. व जो त्रास भोगावा लागला ते आमचे प्राक्तन होते. त्यासाठी कोणावरही आमचा राग नाही. राऊंचं काशीबाईंवरचं प्रेम पाहून आम्हाला त्यांच्याबद्दल कधीच असूया वाटली नाही तर त्यांच्याबद्दलचा आदरच वाढला! एकच सुख जे राऊंनी दिलं, त्यासाठी असे सात जन्म त्यांच्यावरून ओवाळून टाकू, ते म्हणजे अंतिम क्षणी त्यांनी दिलेली साथ!!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ऑपरेशन रांदोरी बेहाक…. अर्थात थेट भेट गनिमांना! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

ऑपरेशन रांदोरी बेहाक…. अर्थात थेट भेट गनिमांना! ☆ श्री संभाजी बबन गायके 

जपानी युद्धसदृश खेळांमध्ये प्रतिस्पर्धी एकमेकांवर सर्व शक्तिनिशी चालून जातात… निकराचा हल्ला चढवतात…. आपल्या जीवाची पर्वा न करता… कारण शत्रूही तसाच चालून आलेला असतो… एखाद्या मस्तवाल रानडुकरासारखा. या युद्धप्रकाराला रांदोरी म्हणतात बहुदा. एप्रिल, २०२० मधील ही घटना आहे. लोकांना आपल्या जीवाची भ्रांत असल्याने इतर ठिकाणी काय सुरू आहे, याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती!

 कोरोनामुळे सर्व जगासारखाच हिंदुस्थानही थांबला होता. जीवघेण्या रोगाच्या भीतीने रस्ते ओस पडले होते…. पण सीमेवर गस्त सुरू होती. हिंदुस्थान-पाकिस्तान सीमेवर तुफान बर्फवृष्टी होत होती. दोन्ही देशांच्या सीमांना एकमेकांपासून अलग करणारी काटेरी तारांची कुंपणेही बर्फात गाडली गेलेली होती. आसमंतात बर्फाच्या पांढ-या रंगाशिवाय दुसरे काहीही दिसत नव्हते. पण अत्याधुनिक यंत्रांना बरेच काही दिसत होते. अत्यंत कमी दृश्यमानता असल्याचा आणि सीमेपलीकडून झालेल्या फायरींगचा आडोसा घेत पाच प्रशिक्षित पाकिसानी अतिरेकी भारतीय सीमा ओलांडून काश्मिरात दाखल झालेही होते… रक्तपात घडविण्यासाठी… स्थळ कुपवाडा सेक्टर मधील केरन भाग. भारताच्या Unmanned Ariel Vehicle अर्थात छोट्या चालकविरहीत विमानांत बसवलेल्या कॅमे-यांनी आणि इतर उपकरणांनी शत्रूच्या त्या पाच जणांच्या पावलांचे ठसे अचूक टिपले आणि नियंत्रण कक्षाला पाठविलेही होते… दिवस होता १ एप्रिल, २०२०.

अधिका-यांनी त्वरीत योजना आखली. आदेश दिले गेले आणि जवान त्या तसल्या भयावह हवामानात अतिरेक्यांच्या मागावर निघाले. बर्फवृष्टी, तुफान वारा आणि कमी प्रकाश याची तमा न बाळगता आपले वाघ पिसाळलेल्या लांडग्यांच्या मागावर निघाले. त्यादिवशी अतिरेकी टप्प्यात आले नाहीत. दोन आणि तीन एप्रिल या दोन्ही दिवशी ही शोधमोहिम सुरू राहिली. या दिवशी मात्र एकदा नव्हे तर दोन-तीन वेळा आपले जवान आणि अतिरेकी यांच्यात गोळीबाराच्या फैरी झडल्या… पण त्या अवलादी निसटून जाण्यात यशस्वी ठरल्या. पण पळून जाताना त्यांना त्यांच्याजवळची जड हत्यारे टाकून पळावे लागले होते. रांदोरीचा आजचा पाचवा दिवस. लांडग्यांना सीमेपलीकडे पळूनही जाऊ द्यायचे नव्हते आणि आपल्या सीमेत घुसूही द्यायचे नव्हते…. त्यांना वर पाठवणे गरजेचे होते.

ते पाचही जण एक नाल्यात लपून बसले. आधुनिक दळणवळण साधने, खाण्या-पिण्याचे मसालेदार पदार्थ, मद्य, वेदनाशामक औषधे, दारूगोळा…. असा सगळा जामानिमा करून आली होती मंडळी. त्यांचा ठावठिकाणा लक्षात आला. पण एकतर शेकडो मीटर्स उंचीवरची रणभूमी. गळ्याइतके बर्फ साठलेले. श्वास घेणे महाकठीण. आता रामबाण सोडायला पाहिजे असे लक्षात आले…. पॅरा एस. एफ. अर्थात स्पेशल फोर्स कमांडोज मैदानात उतरवण्याचे ठरले. भीती आणि अशक्य या शब्दांची साधी तोंडओळखही न झालेले नीडर, उच्च दर्जाचे आणि शारीरिक, मानसिक क्षमातांची अंतिम कसोटी पाहणारे प्रशिक्षण प्राप्त केलेले सहा-सहा कमांडोंचे दोन गट हेलिकॉप्टरमधून अतिरेक्यांच्या लपण्याच्या संभाव्य ठिकाणाच्या जवळ उतरवण्यात आले. शस्त्रसज्ज असलेले हे बहाद्दर जमिनीवर उतरले तेंव्हा त्यांच्या कमरेपेक्षा जास्त उंचीचा बर्फ तिथे साठलेला होता.. जणू ते एखाद्या सरोवरातच उतरलेले असावेत. एका तुकडीचे नायक होते सुभेदार संजीव कुमार साहेब. सोबत पॅराट्रूपर बाल कृष्णन, पॅराट्रूपर छत्रपाल सिंग, पॅराट्रूपर अमित कुमार, हवलदार दवेंद्र सिंग आणि इतरांनी दिवसभर माग काढला गेला…. रात्र पडली आणि उलटून जाण्याच्या बेतात होती. पहाट झाली.

रस्ता कसा होता? मूळात रस्ताच नव्हता. प्रचंड चढ-उतार, काही ठिकाणी गळ्याइतके बर्फ, तर काही ठिकाणी जीवघेणी खोली असलेल्या द-या. एका दरीच्या किना-यावर जमा झालेले बर्फ घट्ट होऊन दरीच्या बाजूस साठून राहिलेलं. जमीन ते दरीची किनार यातील फरक लक्षात येणं अशक्य झालेलं. पण अतिरेक्यांच्या पावलांचे ठसे तर त्याच आसपास दिसले होते… ते तिथेच लपून बसलेले असावेत! सुभेदार संजीवकुमार साहेब नेतृत्व करीत पुढे पावले टाकीत होते… सावधानतेने. त्यांच्या अर्था पाऊल मागे बाल कृष्णन आणि छत्रपाल सिंग होते… त्यांचे एकत्रित वजन त्या बर्फाच्या तुकड्याला पेलवले नाही आणि ते तिघेही दीडशे फूट खाली कोसळले….. अत्यंत वेगाने. त्यांच्या शरीरातील अनेक हाडं तुटली….. पण त्यांना आपल्या वेदनांचा विचार करायला सवडच मिळाली नाही! त्यांच्या समोर ते पाच अतिरेकी उभे होते… म्हणजे ते लपून बसलेले अतिरेकी ही तीन शरीरं आपल्या पुढ्यात अचानक कोसळलेली पाहून ताडकन उभे राहिले होते. यांच्या रायफल्स सज्ज होत्या… नेम धरण्याची गरज नव्हतीच. काही फुटांचंच तर अंतर होतं…. त्यांनी अंदाधुंद फायरींग सुरू केलं. या तिन्ही जखमी वाघांनी डरकाळी फोडत प्रत्युत्तर दिलेच…. गोळीबाराचा आवाज ऐकून वर असलेल्या वीरांनी आपल्या सहका-यांच्या रक्षणार्थ त्या तेवढ्या उंचीवरून बेधडक खाली उड्या घेतल्या…. त्यात पॅराट्रूपर सोनम शेरींग तमंग सुद्धा होते. सुभेदार संजीवकुमार साहेब आणि अमितकुमार समोरच्या लांडग्यांवर तुटून पडले होते… जखमी हातांनी मारामारी सुरू केली…. त्यांच्या शरीरात तोवर पंधरा गोळ्यांनी प्रवेश केला होता. इतर दोघांची गतही काही वेगळी नव्हती… तमंग यांनी एका अतिरेक्याला अगदी जवळून टिपले. एकावर हातगोळा टाकला. अमित कुमार जागीच हुतात्मा झाले होते. संजीवकुमार साहेब गंभीर जखमी होतेच. तमंग यांनी त्यांना मागे खेचलेही होते…. पण उशीर झाला होता. पण या पाचही वाघांनी स्वर्गाकडे प्रयाण करताना त्या पाच जनावरांना नरकात नेऊन फेकण्यासाठी स्वत:च्या दातांत घट्ट धरले होते…!

एक अतिरेकी तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरला… पण आपल्या इतर जवानांच्या गोळ्या तो चुकवू शकला नाही.

आपल्या सहका-यांचा पराक्रम सांगण्यासाठी दैवाने पॅराट्रूपर सोनम शेरींग यांना सुखरूप ठेवले होते जणू! पण देशाने पाच वाघ गमावले होते. देशाने या पाचही योद्ध्यांचा मरणोत्तर यथोचित गौरव केला. सोनम शेरींग यांना मा. राष्ट्रपती मा. श्री. रामनाथजी कोविंद साहेबांच्या हस्ते शौर्य चक्र स्विकारताना आपल्या हुतात्मा सहका-यांच्या आठवणींनी गहिवरून आले होते!

५ एप्रिल, २०२३ रोजी या बलिदानाला तीन वर्षे झाली! भारतमातेच्या पांढ-या शुभ्र हिमभूमीवर आपल्या लालभडक रक्ताचे शिंपण करणा-या या वीरांचे स्मरण होणं साहजिकच आहे, नाही का?

(सामान्य लोकांना या असामान्य बलिदानाची पुन्हा माहिती व्हावी म्हणून हे सामान्य लेखन. प्रतिक्रिया देताना या हुतात्म्यांचं एकदा स्मरण आणि त्यांच्या आत्म्यांच्या कल्याणासाठी आराध्य देवतांकडे प्रार्थना तुम्ही करालच, याची खात्री आहे. जय हिंद.. जय हिंद की सेना.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ८ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख ८ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

|| श्री नारद उवाच || 

निरोधस्तु लोकवेदव्यापारन्यासः ॥ ८ ॥

अर्थ : लौकिक आणि वैदिक (समस्त) व्यापारत्याग म्हणजेच निरोध होय.

विवेचन: निरोध याचा पुस्तकी अर्थ रोखून धरणे. आता साधकाला अथवा भक्ताला काय रोखून धरायचे आहे, कशाचा निरोध करायचा आहे ते आपण समजून घेऊ.

समर्थ मनाच्या श्लोकांत सांगतात.

मना सज्जना भक्तिपंथेंचि जावे।

तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे।

जनीं निंद्य ते सर्व सोडोनि द्यावे।

जनी वंद्य ते सर्वभावें करावे।।२।।

(मनाचे श्लोक ०२)

मनाचा एक गुण असा आहे की ज्या ठिकाणी ते एकदा रमते त्याच विषयाची त्याला तहान लागते. त्याच विषयाचे ग्रहण अधिकाधिक करण्यासाठी ते आसुसलेले असते. समर्थाना मनाच्या या गुणाचा फायदा करून घेऊन मनाला अध्यात्माची गोडी लावावीशी वाटते. यामुळे मन पारमार्थिक विषयावर स्थिर होईल आणि त्यासाठी भक्तिमार्गाचा आधार घ्यायला हवा असा खास सल्ला ते मनाला देताल आहेत. मात्र त्यासाठी मनुष्याला आपल्या वासनांवर विजय मिळवावा लागेलं. या वासना प्रामुख्याने चार प्रकारच्या आहेत.

१. प्रसुप्त वासना:- या पुनर्जन्मातून येतात, मागील जन्माचे अपुऱ्या इच्छांचे संस्कार घेऊन माणूस जन्माला येत असतो.

२. तनु वासना :- क्षणिक शाररिक इच्छा.

३. विच्छिन्न :- मानसिक मूल्यांमध्ये या वासनांचा पाया आहे. या वासना शाररिक, रागद्वेषादी, मानसिक आणि बौद्धिकही असतात.

४. उदार वासना :- या अवस्थेत अशुभ वासना दुर्बल होत माणूस सत्कृत्य करण्याकडे झुकू लागतो. हळूहळू पापवासना क्षीण होत जातात व नंतर स्मृतिरुपाने राहतात.

थोडा वेगळा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की मनुष्याला कर्माचा निरोध करायचा आहे. इथे थोड नीट समजून घेण्याची गरज आहे. सर्व संतांनी कर्मत्याग न सांगता कर्मफळ त्याग सांगितला आहे, तसेच साधनेच्या अंतिम टप्प्यात कर्माचा निरोध करायला सांगितले आहे.

कोणत्याही संतांचे चरित्र अभ्यासले तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी कधीही कर्माचा त्याग केलेला नाही, किंबहुना सामान्य मनुष्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक कार्य करून ठेवले आहे. अनेक संतांनी लिहिलेलं साहित्य एका जन्मांत वाचून होईल की नाही याची खात्री देता येत नाही, ते समजून घेणं तर फार पुढची गोष्ट. पटतंय ना?

– – – मग सर्व संत किंवा नारद महाराज असे का बोलत असतील….?

मनुष्याला दैनंदिन आयुष्यात अनेक प्रकारची कर्मे करावी लागतात. त्याचे ढोबळमानाने वर्गीकरण करायचे झाल्यास व्यावहारिक आणि वैदिक कर्मे असे करता येईल. यात कोणत्याही कर्माचा त्याग कसा करायचा हे आपण आधी समजून घेऊ. कर्माचे वर्गीकरण फार महत्वाचे नाही, असे मला वाटते.

एक प्रवाह असा आहे की अमुक एक कर्म करण्यासाठी मनात वृत्ती उठली किंवा निर्माण झाली की तिचे त्वरित दमन करावे…..! काही लोकांना ते जमू शकते. पण सामान्य साधकाला ते शक्य होईलच असे नाही. संत दयासिंधु असतात. त्यांनी एक अधिक सुलभ मार्ग सुचविला. यात आपण केलेले कर्म तत्काळ भगवंताला अर्पण करायचे असते.

– – ही वाचायला, लोकांना सांगायला सोपे आहे, पण आचरणात आणायला महाकठीण.

कोणत्याही आश्रमातील (ब्रह्मचर्य आश्रम, संन्यास आश्रम आदी) मनुष्य असो, त्याला कर्म केल्याशिवाय जगणे अशक्य होईल. त्यामुळे कर्म केलंच पाहिजे. भक्त ते खालील क्रमाने आणि समजून करता आले तर मनुष्य त्या कर्मात अडकणार नाही. त्यावेळी तो फक्त तिथे साक्षीभावाने उपस्थित असेल.

साधकाने आपल्या समोर आलेले कर्म भगवंताचे, भगवंताने दिलेले आहे असे समजून कारणे. श्रीमहाराज एक उदा. नेहमी सांगायचे. वकील एखाद्या अशिलाचा खटला न्यायालयात स्वतःचा म्हणून लढतो, पण त्यात हार झाली किंवा जीत झाली तर त्याच्या सुखदुःखात अडकत नाही. मनुष्याने दैनंदिन व्यवहार करताना वकिलाला समोर ठेवावे.

आणिक एक उदा. पाहू… पावसाळा सुरू झाला की नदी नाले भरून वाहू लागतात. त्यावेळी मुले पाण्यात होड्या सोडतात, काही वेळा किंवा काही वेळ त्या तरंगतात, तर काही वेळा त्या बुडतात. मुले मात्र दोन्हींचा आनंद घेतात. त्या मुलांसारखे आपल्याला व्यवहारात वागता आले तर फारच उत्तम….!

“खेळा ऐसा प्रपंच मानावा ||”

– – श्री. गोंदवलेकर महाराज

अहंकार कमी होण्यासाठी आणि शरणागती वाढण्यासाठी आपला प्रपंच भगवंताने आपल्याला दिला आहे, त्याची मालकी स्वीकारून करण्याचा आपण प्रयत्न केला तर साधकाची प्रगती अधिक वेगाने होऊ शकेल, असे नारद महाराजांना सांगायचे असावे.

॥ जय जय रघुवीर समर्थ॥ 

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. ६ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महाकवी ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? विविधा ?

☆ महाकवी ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

(आषाढ मासारंभ निमित्ताने – कालिदास दिनानिमित्त)

लग्नाच्या रात्रीच त्यांच्या पत्नीच्या, तेथील राजकन्येच्या लक्षात आहे की आपला पती निर्बुद्ध आहे. तेव्हा संतापाने ‘अस्ति कश्चित वाग्विशेषः (वागर्थः)’ अशा शब्दात त्याची निर्भत्सना करून तिने त्याला खिडकीतून बाहेर ढकलून दिले.

अपमानाने व्यथित झाल्यानंतर काली देवीची उपासना करून ते अतिशय विद्वान पंडित झाले; म्हणून ते कालिदास या नावाने ज्ञात झाले.

त्या नंतर आपल्या पत्नीने आपली निर्भत्सना केलेल्या प्रत्येक शब्दापासून प्रारंभ होणारे एक एक महाकाव्य त्यांनी रचले.

१. कुमारसंभव

अस्त्युत्तरस्यां दिशि देवतात्मा हिमालयो नाम नगाधिराजः।

पूर्वापरौ तोयनिधीव ग्राह्यः स्थितः पृथिव्या इव मानदण्डः॥

२. मेघदूत

कश्चित् कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात् प्रमत्तः

शापेनास्तम्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः |

यक्षः चाक्रे जनकतनयास्नानपुण्योदकेषु

स्निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु. ||

३. रघुवंशम्

वागर्थाविव सम्पृक्तौ वागर्थप्रतिपत्तये।

जगतः पितरौ वन्दे पार्वतीपरमेश्वरौ।

 

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लढाईच्या आभाळातील ‘श्रवण’सरी! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

 

? इंद्रधनुष्य ?

☆ लढाईच्या आभाळातील ‘श्रवण’सरी! ☆ श्री संभाजी बबन गायके 

त्याच्या आधीच्या पिढ्यांनी १९६५, १९७१, १९९९ या वर्षांत अगदी अशीच दृश्यं पाहिली होतं… यावेळी सुद्धा युद्ध त्याच्याच अंगणातून खेळलं जाणार होतं.. त्या खेळाचे ‘रण’गाडे त्याच्या भल्या मोठ्या शेतात तयारीत उभे होते… शत्रूकडे तोंड करून. मे महिन्याचं ऊन रणरणत होतं. उन्हाळी वारं-वावधान, त्यात रणगाड्यांची ये-जा.. त्याच्या वावरात नुसता फुफाटा उधळत होता. कोणत्याही क्षणी सीमेपलीकडून तोफांचे गोळे गावावर बरसू शकत होते… सर्व गाव सावध, बंद दारांआड लपून बसलं होतं. काही लोक तर दूर सुरक्षित ठिकाणी निघूनही गेले होते.

पंजाबच्या सीमा गोळीबाराला तशा सरावलेल्या आहेत. पण यावेळी आपल्या सेनेचा आवेश काही निराळाच होता. तारावाली आणि आसपासच्या गावांतून सेनेच्या वाहनांची ये-जा… आणि लोकांच्या हृदयाची गती वाढली होती! रणगाडयांवर झेंडे फडकत होते… काही तरी मोठं निश्चित होणार होतं!

वातावरणात तणाव होताच. एक प्रकारची भयाण शांतता पसरली होती.. बहुदा वादळ होण्याआधी असते तशी… फक्त सेनेला आदेशाची प्रतीक्षा होती… तो एकदा प्राप्त झाला की सेना पुढे सरकण्यास सिद्ध होती… तिथून म्हणजे फिरोजपूर पासून शत्रूची सीमा काही फार दूर नव्हती आणि यांना राखू शकणारीही नव्हती!

दहा वर्षांचं पोरगं ते… श्रवण त्याचं नाव… श्रवणसिंह… मोठं झालं की इतर हजारो शीख तरुणांप्रमाणे फौजेत जायचं हे त्यानं मनाशी ठरवूनही ठेवलं होतं. त्याच्या मनात काय आलं कुणास ठाऊक? त्याने आईपाशी हट्ट धरला… ”लस्सी बनवून दे भरपूर. छान बर्फ घाल. खूप लोकांना पुरेल एवढी दे! ” घरात दुधाला तोटा नव्हता. “अरे, कशाला हवी आहे एवढी लस्सी? ” तिने त्याला विचारले. त्यावर तो म्हणाला, ”आई, आपले सैनिक तहानलेले असतील या उन्हात. तू लस्सी बनवून तयार ठेव… तोवर मी त्यांना पाणी देऊन येतो” असं म्हणत श्रवण पाण्याचे भांडे घेऊन शेताकडे धावत सुटला सुद्धा!

सैनिक कुठेही तैनात असले तरी त्यांच्या खाण्या-पिण्याची सेनेची अशी स्वत:ची खास व्यवस्था असतेच आणि याही वेळी तशी व्यवस्था होतीच. पण सैनिक या छोट्या बालकाच्या आग्रहापुढे नाही म्हणू शकले नाहीत. त्यांच्या वरीष्ठांनी सुद्धा या मुलाचे मन मोडू नये म्हणून परवानगी दिली. इकडे येण्यात धोका आहे.. पुन्हा येऊ नकोस म्हणून बजावले सुद्धा. पण श्रावण थोड्याच वेळात परतून आला… लस्सी घेऊन… मोठाले पेले सुद्धा आणले होते त्याने. यावेळी मात्र आपल्यापैकी एक सैनिकाने त्याला रणगाड्यापासून सुरक्षित अंतरावरच रोखले. त्याने पुन्हा आग्रह केला… प्रेमाने आणि निग्रहाने. त्यावर त्याचा नाईलाज झाला… त्याने त्याच्या हातून ती भेट स्वीकारली आणि त्याच्या सहका-यांपर्यंत पोहोचवली! उन्हाच्या तडाख्यात तापलेल्या रणगाड्यांमध्ये तयारीत बसलेल्या सैनिकांना त्यांच्या गावी, त्यांच्या मातांनी प्रेमाने पाजलेल्या लस्सीच्या आठवणी ताज्या झाल्या.. त्यात हस-या चेह-याचा श्रवण त्यांच्याकडे बघून हात हलवत होता… मी पुन्हा येणार आहे… असं जणू सांगत होता.

सलग दहा दिवस श्रवण ही सेवा बजावत राहिला… न कंटाळता त्याने ही ड्युटी बजावली… कुणीही न सांगता! एक भावी सैनिक युद्धाचा जणू अनुभव घेत होता… अंगावर लष्करी गणवेश जरी नसला तरी तो परिधान करण्याचा निर्धार त्याच्या डोळ्यांत पाहिला की त्या सैनिकांची खात्री पटत चालली होती की… भविष्यात आपली जागा घेणार हा पोरगा!

ऑपरेशन सिंदूर मधला श्रवणसिंग सर्वांत छोटा सैनिकच ठरला असे म्हणावे लागेल. त्याच्या या भावनेचा आदर करताना भारतीय सैन्याने श्रवणाचे कौतुक केले.

७व्या इन्फंटरी डिविजन चे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल रणजीत सिंग मनराल साहेबांनी श्रवणबाळाला स्मृतिचिन्ह, त्याच्या आवडीचा खाऊ आणि आईस-क्रीम भेट दिले! त्याचे वडील सोना सिंग डोळ्यांत अभिमानाचे चांदणे लेवून लेकाचा सन्मान पहात होते…. त्यांच्या शिवारात उन्हाळ्यातही जणू सुगीचे दिवस आले होते!

देशाच्या संरक्षणासाठी आधीच सज्ज असलेल्या या छोट्या जवानासाठी.. एक कडक सल्यूट तो बनता ही है! जय हिंद!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “गुलाबो…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “गुलाबो…” –  लेखिका : सुश्री आसावरी इंगळे ☆ सुश्री प्रभा हर्षे

मुलगी झाली म्हणून जन्मानंतर तिला पुरलं.. काही वर्षानंतर ती मोठी झाली.. आणि तिने तिच्या परिवाराचं नाव ‘रोशन’ केलं..

फिल्मी वाटणारी ही सत्यकथा आहे राजस्थानमधील पुष्कर गावातील. वडील गारुडी असलेल्या एका गरीब परिवारात धनत्रयोदशीच्या पवित्र दिवशी एक मुलगी जन्माला आली. वडील घरी नव्हते. आधीच तीन मुली झालेल्या.. ही चौथी होती.. समाजात अमान्य होती म्हणून तिच्या घरी कोणतीही कल्पना न देता आयांनी तासाभरातच त्या नवजात पोरीला जवळच्या जंगलात जिवंत गाडलं..! आई शुद्धीवर आली.. मृत पोरीला एकवेळ स्पर्श तरी करू द्या म्हणून टाहो फोडला. शेवटी ती आणि तिच्या बहिणीने ५ तासानंतर जेंव्हा गड्डा उकरला तेव्हा ती पोरगी चक्क जीवंत होती..! वडिलांनी मुलीला जवळ केलं म्हणून समाजाने त्यांच्या परिवाराशी संबंध तोडले. त्यांच्या मते मातीत गाडलेली मुलगी जिवंत असूच शकत नाही.. ती चुडेल आहे. वडिलांनी मात्र खंबीर भूमिका घेतली.. धरतीतून धरतीमाताच निघू शकते, असं म्हटलं खरं पण आपल्या मुलीला कोणी मारू शकतं या भीतीने ते सापांसोबत पोरीलाही सोबत नेऊ लागले.

दोन वर्षाची ही बालिका सापाच्या बीनवर नृत्य करू लागली. तिला स्टेजवर नाचताना पाहून समाजाने बहिष्कृत करण्याची धमकी दिली. नाईलाजाने सहा वर्ष वयात तिचा ३५ वर्षांच्या गृहस्थाशी विवाह ठरवण्यात आला. पण मुलगी दिवसभर नृत्य करते पाहून वराने लग्न मोडलं आणि इकडे समाजाने तिच्या परिवाराला टाकलं! जे होतं ते भल्यासाठीच! हळूहळू मुलगी मोठी झाली तशी कालबेलिया नृत्यात निपुण झाली.. तिच्या नृत्यकलेकडे पाहून तिला देश विदेशात नृत्यप्रदर्शनच्या संधी मिळू लागल्या. एवढंच नव्हे तर तिला काही चित्रपटात काम मिळालं. ती ‘बिग बॉस ५’ या कार्यक्रमात देखील सहभागी झाली होती.

कालबेलिया नृत्य हे राजस्थानमधील गारुडी (सपेरा) जमातीचे प्रसिद्ध लोकनृत्य आहे. हे नृत्य केवळ स्त्रिया करतात, पुरुष इकतारा किंवा तंदूरा घेऊन नृत्यांगनांना साथ देतात. वर्ष २००० मध्ये युनेस्कोने या नृत्याला अमूर्त सांस्कृतिक विरासतचे प्रतिनिधी सुचित सहभागी केलंय. या नृत्यावर एक डाक तिकीट देखील निघालंय!

कालबेलिया नृत्यांगना गुलाबोने राजस्थानच्या ग्रामीण भागात विनामूल्य शिक्षण, नृत्यशाळा सुरु केली आहे.. डेन्मार्कमध्ये देखील तिने नृत्यशाळा सुरु केली आहे. राजस्थान लोककलेच्या प्रचारासाठी तिने जवळपास १६५ देशांची यात्रा केली आहे. तिच्या नावाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. कला आणि संस्कृती क्षेत्रातील तिच्या अतुलनीय योगदानासाठी वर्ष २०१६ मध्ये गुलाबोला पद्मश्रीने, तर वर्ष २०२१ मध्ये भारत गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. यावर्षी अयोध्येला रामलला प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी पीएम व इतर मान्यवरांसमोर गुलाबोला तिचं नृत्य सादर करायची संधी मिळाली!

जे वडील तिच्यासाठी, तिच्यातील कलेसाठी समाजाच्या विरोधात गेले, दुर्दैवाने तिच्या पहिल्याच विदेशी यात्रेच्या पहिले त्यांचं देहावसान झालं! पण वडिलांनी तिच्यासाठी पाहिलेलं स्वप्न तिने पूर्ण केलं! ..

देव तारी त्याला कोण मारी! .. पण इथे देवाने केवळ तारलंच नाही तर ज्या समाजाने तिला व तिच्या परिवाराला अत्यंत हलाखीचे दिवस दाखवले, त्याच समाजाची ती भूषण झाली.. देशाची गौरव झाली! आज तिच्या समाजात मुलींना मारत नाही तर मुलीच्या जन्मानंतर आमच्या घरी ‘गुलाबो आली’ म्हणतात! किती हे जबरदस्त परिवर्तन!!

राजस्थानी कालबेलिया लोककलेला देशविदेशात मानाचं स्थान मिळवून दिलेल्या गुलाबोचं मनःपूर्वक अभिनंदन.. पण त्याहीपेक्षा अभिनंदनास आणि कौतुकास जास्त पात्र आहेत ते तिचे आईवडील..!! आईने जीवनदान दिलं आणि वडिलांनी तिच्यात खऱ्या अर्थाने जीव ओतला!! .. निःशब्द आणि नतमस्तक आहे मी त्याच्यापुढे!! __ 

लेखिका-  सुश्री आसावरी इंगळे 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘प्रोफेसर माधवी लता…’ – लेखक : श्री वेदकुमार ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘प्रोफेसर माधवी लता’ – लेखक : श्री वेदकुमार ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

या प्रोफेसर माधवी लता आहेत. या सध्या भारतीय विज्ञान संस्था (IISc), बेंगळुरू येथे प्राध्यापक आहेत आणि Centre for Sustainable Technologies च्या अध्यक्षपदावर आहेत.

त्यांची शैक्षणिक वाटचाल :

Ph. D – IIT मद्रास

  1. Tech – NIT वारंगल
  2. E – JNTU काकीनाडा

त्यांचे संशोधन क्षेत्र आहे :

  • भूकंप भू-अभियांत्रिकी (Earthquake Geotechnical Engineering)
  • जिओसिंथेटिक्स आणि रॉक इंजिनीअरिंग

प्रोफेसर माधवी लता यांचे ७०+ संशोधन पेपर्स जगभरातील नामांकित जर्नल्समध्ये प्रकाशित झाले आहेत. २०१६ ते २०२२ या काळात त्या Indian Geotechnical Journal च्या संपादक पण राहिल्या आहेत. २०२२ मध्ये भारताच्या Top ७५ Women यादीत त्यांचा समावेश झाला होता तर २०२४ मध्ये Indian National Academy of Engineering मध्ये ‘फेलो’ म्हणून त्यांची निवड झाली होती.

चिनाब नदीवरील रेल्वे पूल तयार करण्यामागे जिथे अनेक इंजिनीअर्सची टीम होती, तिथे माधवी लता यांच्या भूमिकेचा एक खास ठसा आहे. पुलाचा पाया, रचना आणि सुरक्षा याची अत्यंत जटिल जबाबदारी त्यांच्यावर होती. भूस्खलन, भूकंप-प्रवण भाग, उंच खोऱ्यांमधील हवेचा वेग, अशा सगळ्या अडचणींवर त्यांनी विज्ञान, चिकाटी आणि जिद्द याच्या जोरावर मात केली.

तब्बल १७ वर्षे या प्रकल्पावर सातत्याने काम करून, त्यांनी भारतीय रेल्वे आणि संपूर्ण देशाला गर्वाचा क्षण मिळवून दिला. प्रोफेसर माधवी लता यांच्या कार्याला मी सॅल्युट करतो!

जय हिंद!  

लेखक : श्री वेद कुमार.

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ☆ Believe-विश्वास आणि Trust-विश्वास…  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ Believe-विश्वास आणि Trust-विश्वास…  लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले

दोन्ही शब्दांचा अर्थ “विश्वासच” आहे. पण तरीही दोन्ही विश्वासात अंतर आहे.

एकदा शेजारी शेजारी असलेल्या दोन उंच इमारतींच्या मधे केबल टाकून ती घट्ट बांधून व हातात मोठा बांबू घेऊन एक डोंबारी त्या केबल वरून या इमारती वरून त्या इमारतीवर जात होता.

त्याच्या खांद्यावर त्याचा लहान मुलगा होता.

दोन इमारतींच्या मधे हजारो माणसे जमा झाली होती व श्वास रोखून त्याची ती जीवघेणी कसरत पहात होती.

हलणारी केबल, जोरदार वारा, स्वतःचा आणि मुलाचा जीव पणाला लावून त्याने ते अंतर पूर्ण केलं.

जमलेल्या लोकांनी उत्साहाने टाळ्या, शिट्या वाजवल्या, तोंड भरून कौतुक केले.

तो इमारतीच्या खाली लोकांमधे आला. लोक त्याच्या बरोबर फोटो. सेल्फी काढू लागले. त्याचं अभिनंदन करू लागले. तो डोंबारी सगळ्यांना उद्देशुन म्हणाला,

“ मला हे पुन्हा एकदा करावसं वाटतं. तुम्हाला विश्वास वाटतो का मी हे पुन्हा करू शकेन? ”

सगळी माणसं एक आवाजात म्हणाली “ हो, तू हे परत एकदा नक्कीच करू शकतोस. ”

डोंबारी म्हणाला “तुम्हाला विश्वास आहे ना, मी हे परत करू शकेन? ”

पुन्हा सगळे ओरडले “ हो हो आम्हाला विश्वास आहे तू पुन्हा हे नक्कीच करू शकशील. ”

“ तुम्हाला नक्की विश्वास आहे ना? ”

“हो. तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू खात्रीने करू शकशील. ”

डोंबारी म्हणाला, “ ठीक आहे. मग तुमच्यापैकी कोणीतरी मला तुमचा मुलगा द्या. मी त्याला खांद्यावर घेऊन मी या केबल वरून चालतो. ”

जमावामधे एकदम शांतता पसरली. सगळे चिडीचूप झाले. डोंबारी म्हणाला, “ काय झाले. घाबरलात का?

अरे आताच तर तुम्ही म्हणालात ना की माझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून? ”

— तात्पर्य :- जमावाने जो डोंबाऱ्यावर दाखवलेला विश्वास हा Belief आहे… Trust नाही.

तसेच हाच भ्रम सगळ्यांना आहे, परमेश्वर आहे. पण परमेश्वराच्या सत्तेवर विश्वास नाही.

You only belive in God, But you don’t trust him.

परमेश्वरावर विश्वास असेल तर चिंता आणि ताण – तणाव कशाला हवेत.

त्याच्या नामाने दगड तरले तर आपण का नाही तरणार?

परमेश्वरावर ठाम विश्वास बसण्यासाठी आपण चमत्काराची वाट पाहत बसतो. पण खरा चमत्कार हाच आहे की रोज तो आपल्याला नवीन करकरीत कोरा दिवस देतो आणि आपल्या गत चुकांमधून शिकण्यासाठी आणि नवीन क्षितिजे पादाक्रांत करण्यासाठी.

आपल्या जीवनात प्रत्येक क्षणाला आपला परमेश्वर आपल्यासोबत असतोच आणि आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाची खबर त्याला असतेच हा विश्वास असला तर आपल्यासाठी जगातील कोणतीही गोष्ट अशक्य नाही…!

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares