मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “प्रवासी आणि नावाडी…” लेखक – डॉ. सचिन लांडगे☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “प्रवासी आणि नावाडी…” लेखक – डॉ. सचिन लांडगे☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

एक जुनी गोष्ट आहे. आपण खूपदा वाचली असेल.. एकदा एक प्रवासी त्याच्या छोट्या बोटीतून नदी ओलांडत असतो. अचानक त्याची बोट खडकावर आपटून फुटते व प्रवासी पोहता येत नसल्याने पाण्यात गटांगळ्या खाऊ लागतो..

भाग एक –

प्रवासी वाचवा वाचवा म्हणून जोरजोरात ओरडू लागतो. त्याचा आरडाओरडा ऐकून एक प्रवासी वाहतूक करणारा नावाडी आपली बोट घेऊन तेथे येतो.

प्रवासी त्याला जीव वाचविण्याची कळकळीची विनंती करतो.. त्याबदल्यात त्याची सगळी संपत्ती तो नावाड्याला देईल असे वचन देतो..

नावाडी त्याला आपल्या बोटीत घेतो..

भाग दोन –

जशी बोट पुढंपुढं जाऊ लागते, तसंतसं प्रवाश्याला त्यानं दिलेल्या वचनाबद्दल पश्चाताप होऊ लागतो..

तो जरासा सावरून नावाड्याला म्हणतो, जरी मी सगळी संपत्ती देईन असं वचन दिलं असलं तरी माझी बायकापोरं काही ते मान्य करणार नाहीत.. सबब मी तुला अर्धीच संपत्ती देईन..

.. यावर नावाडी काहीच बोलत नाही..

भाग तीन –

किनारा अगदी जवळ आल्यावर तर प्रवाश्याला आपण दिलेल्या अर्ध्या संपत्तीच्या वचनाचं सुध्दा खूपच वाईट वाटतं.. तो स्वतःशी विचार करतो की, नावाड्याने त्याला नदीतून वाचवून अशी कोणती मोठी गोष्ट केली आहे!! ती तर नावाड्यांची ‘ड्युटी’च असते.. आणि शेवटी माणुसकी नावाची काही गोष्ट असते की नाही..? सगळ्या गोष्टी पैशात थोडंच मोजता येतात..!! जर नावाड्याने आपल्याला वाचविलं नसतं तर त्याला पाप लागलं असतं.. आपणच उलट नावाड्याला पाप लागण्यापासून वाचवलंय..!!

मग तो नावाड्याला म्हणतो, अर्धी प्रॉपर्टी काही शक्य नाही, गड्या.. मी तुला पाव हिस्सा देईल फारतर..

नावाडी तरीही काहीच बोलत नाही..

भाग चार –

किनाऱ्यावर सुरक्षित उतरल्यावर तो नावाड्याला दहा रुपये देतो, आणि म्हणतो- जा ऐश कर.. चहा वगैरे पी, आणि घरी जाताना मुलांसाठी काही बिस्किटं पण घेऊन जा..

…. थोड्या वेळाने जेंव्हा त्या प्रवाश्याच्या आजूबाजूला त्याचे मित्र गोळा होतात, तेंव्हा तर तो नावाड्याची खरडपट्टी काढू लागतो.. त्याला खडकावरून ओढून नावेत घेताना ज्या खरचटण्याच्या जखमा त्याच्या अंगावर झाल्या त्याबद्दल तो नावाड्याकडून भरपाईची मागणी करतो.. अन्यथा कोर्टात जाण्याची धमकी देतो..

गोष्ट संपली….

 **

तुम्हाला राग आला का प्रवाशाचा..?

पण त्याला शिव्या देण्यापूर्वी जरा थांबा..

– – – कारण हा प्रवासी म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपलाच समाज आहे.. आणि तो नावाडी म्हणजे डॉक्टर..!!

…आणि ही गोष्ट आहे भारतातल्या वैद्यकीय परिस्थितीची..!!

**

… या गोष्टीतला भाग एक ”इमर्जन्सी रूम” मध्ये घडतो.. तेंव्हा डॉक्टर हा प्रत्यक्ष देवच असतो..

“डॉक्टर काहीही करा, कितीही पैसे लागू द्या, पण याला वाचवा हो.. प्लिज डॉक्टर प्लिज”.. असं पंचवीसेक तरी नातेवाईक विनवत असतात..

** 

… भाग दोन आयसीयू मध्ये घडतो, जेंव्हा डॉक्टर हा प्रत्यक्ष देव नसला तरी अजून देवदूत तरी असतोच..

** 

 … गोष्टीतला भाग तीन हा हॉस्पिटलच्या वॉर्ड मध्ये घडतो, जेंव्हा पेशंटला ICU मधून धोक्याच्या बाहेर काढलेले असते.. आता डॉक्टर हा एक तद्दन व्यावसायिक असतो.. आणि ट्रीटमेंट देणं हा त्याच्या ड्युटीचा भाग असतो.. त्यात त्यानं माणुसकी (एकतर्फी) जपणं भागच असतं..

** 

 … आणि भाग चार म्हणजे डिस्चार्ज घेण्याची वेळ..!! तेंव्हा मात्र डॉक्टर हा लुटारू असतो..

बिल भरताना ते सुरुवातीचे पंचवीसेक जण गायब असतात आणि आता नातेवाईकांसोबत वेगळाच मॉब समोर असतो.. आणि डॉक्टरची नजर “डॉक्टर, कितीही महाग औषधे लागली तर लागू द्या, सगळा खर्च आम्ही करू” असं म्हणणाऱ्या माणसाला शोधत असते..

…. आणि समोर बिल कमी करण्यासाठी किंवा बुडविण्यासाठी लोक डॉक्टरला त्यांच्याच हॉस्पिटलच्या उणिवा दाखवत असतात किंवा छोट्या मोठ्या लोकल पुढाऱ्यांचे फोन आणत असतात..

 

 – – – आणि, हे काही आजचंच नाही.. “ गरज सरो, आणि वैद्य मरो.. ” ही म्हण खूप जुन्या काळापासूनच आपल्याकडे प्रचलित आहे..

 

 असो… या गोष्टीचं सार इतकंच आहे की –

.….. तुम्हाला व्याधीतून बाहेर काढणाऱ्या किंवा तुमचा जीव वाचविणाऱ्या उपकारकर्त्याच्या प्रयत्नांची आणि कष्टाची जाणीव तरी ठेवा, किमान त्याच्या उपकाराची फेड अपकाराने तरी करू नका..

 

लेखक : डॉ. सचिन लांडगे

भुलतज्ञ, अहमदनगर.

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अहो! कैलास जीवन… ओह! कैलास जीवन! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ अहो! कैलास जीवन… ओह! कैलास जीवन! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

भारताचे पहिली चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ कैलासवासी बिपीनजी रावत साहेब यांच्या दुर्दैवी अपघाती मृत्यूच्या संदर्भात मी त्यादिवशीच्या रात्री एक फेसबुक पोस्ट लिहिली होती. या पोस्टच्या निमित्ताने माझ्याशी अनेकांनी फोनवर संपर्क साधला होता.

एके दिवशी सिंहगडावर गेलो असता असाच एक फोन आला. पोस्टसंदर्भात सुरुवातीला सविस्तर बोलणे झाले. शेवटी पलीकडून ‘कुठे राहता? ” “भेटू या! ’ असे आमंत्रण आले. कुठे राहता? या प्रश्नावर मी उत्तर देताच “मग तर निश्चित भेटू शकतो आपण..! ” असे जवळकीने सांगणे झाले! संभाषणाच्या आरंभी त्यांनी त्यांचे नाव, आडनाव सांगितले होते.

“तुम्हांला कैलास जीवन कारखाना माहीत आहे! ” मी हो म्हणाल्यावर ते म्हणाले “दुपारी एक ते चार असतो मी कैलास जीवनमध्ये! ” मी विचारले, ”तिथे काय करता आपण? ” ते म्हणाले “रखवालदार आहे कंपनीचा! ” तोपर्यंत कोल्हटकर आडनाव आणि कैलास जीवन हा सहसंबंध माझ्या डोक्यात नव्हता. जिथे मी राहतो, त्याच्या अगदी जवळच कैलास जीवन असा फलक मात्र नित्य बघण्यात येई. हो, मात्र कैलास जीवनाची जाहिरात मात्र माझ्या खूप आवडीची होती. त्यातील आजी आजोबांच्या तळपायाला कैलास जीवन चोळताना आजोबांनी केलेला अभिनय अगदी अस्सल होता. शिवाय कैलास जीवन कोणत्याही कारणासाठी वापरता येते आणि चक्क खाताही येते हे समजून तर भारीच वाटले होते.

मी माझ्या नोकरीत पडेल ती सर्व कामे करत असल्याने मी स्वत:ला कैलास जीवांची उपमा देत असे गंमतीने. यात डोकं दुखतंय.. अहो, कैलास जीवनच्या धर्तीवर मी डोकं फिरलंय.. अहो, कैलास जीवन असंही मी म्हणत असे. असो.

रखवालदार म्हणून नोकरी आणि तीही फक्त चार तास कशी… रखवालदार तर बारा बारा तास असतात! मग माझी ट्यूब कैलास जीवन न लावताही पेटली….. कोल्हटकर बोलताय ना तुम्ही?” मी अगदी संकोचून विचारले.. त्यावर ते जोरदार हसले! या मोठ्या माणसाच्या साधेपणाबद्दल मला अत्यंत आदर वाटला! त्यानंतर ती जाहिरात, डोकं फिरलंय.. इत्यादी बाबतीत बोलणे झाले आणि अर्थात हास्यविनोदसुद्धा! भेटायला आलात तर कैलास जीवांची डबी भेट म्हणून देईन असंही ते सांगायला विसरले नाहीत. पण माझ्याकडे ते आधीच भरपूर आहे हे मी त्यांना सांगितलं. “तरीही देईन!” ते म्हणाले. पुढे त्यांनी राजा केळकर संग्रहालयाजवळचा त्यांचा पत्ताही सांगितला. मी आणि कैलास जीवन हा सहसंबंध पुन्हा सविस्तर ऐकतानाही ते मनमोकळेपणाने हसले होते. जाहिरातीत काम केलेल्या अभिनेत्याचे नाव त्यांनी आवर्जून सांगितले होते.. पण ते नाव आता आठवत नाही. ती जाहिरातही शोधली पण आढळली नाही. असो.

मी whatsapp वर श्री. राम कोल्हटकर साहेबांचा DP पाहिला… नातवासोबत हास्यविनोद करणारे राम कोल्हटकर… कैलास जीवन या बहुपयोगी आणि प्रसिद्ध, आणि आंतरराष्ट्रीय brand चे निर्माते आणि मूळचे शिक्षक, कीर्तनकार असलेल्या कै. वासुदेव कोल्हटकर यांचे चिरंजीव. त्यांनी प्राप्त केलेल्या व्यावसायिक यशाबद्दल एक मराठी माणूस म्हणून मला कौतुक तर होतेच.

जवळ राहूनही कैलास जीवनची भेट जीवनात अजून घडली नाही. मात्र आज संतोष कारखानीस, ठाणे यांनी कैलास जीवन बद्दल लिहिलेली सविस्तर सुंदर पोस्ट स्वामीनी बाबतीवाले यांनी share केली. कैलास जीवनच्या बाटलीचे छायाचित्र पाहून उत्सुकता चाळवली आणि पोस्ट वाचली. त्यावरून कोल्हटकर, कैलास जीवन आठवले…. विस्मरणावरही कैलास जीवन हे मराठी माणसाने मोठ्या जिद्दीने प्रसिद्धीस आणलेले औषध काम करत असावे, असे वाटते.

(धन्यवाद श्री. संतोष कारखानीस आणि सौ. स्वामिनी बाबतीवाले — या माहितीसाठी)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “पुण्याचा ब्रांड : “कैलास जीवन” –  लेखिका : सुश्री सुश्री संपदा सोवनी ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “पुण्याचा ब्रांड : “कैलास जीवन” –  लेखिका : सुश्री सुश्री संपदा सोवनी ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

‘कैलास_लोण्या’चे ‘ कैलास_जीवन’ होऊन आता साठ वर्षे उलटून गेली आहेत. या काळात ‘सात दिवसांत लख्ख गोरे बनवणारी’ किंवा ‘पायांच्या भेगा चुटकीसरशी घालवणारी’ अनेक ‘स्किन क्रीम’ बाजारात आली, पण कोणताही अचाट दावा न करताही कैलास जीवन टिकून राहिले. आपला आब राखून विस्तारले आणि आता ते रशिया, पोलंड आणि स्वित्र्झलडलाही पोहोचले आहे.

‘कैलास जीवन’ नामक ‘स्किन क्रीम’शी बहुसंख्य मराठीजनांचा संपर्क बालपणीच येतो. कुठेतरी खरचटून किंवा हात भाजून घेऊन आलेल्या नातवंडांना एखादी आजी आपल्या थरथरत्या हातांनी हळुवारपणे कैलास जीवन लावते आणि पिवळसर लोण्यासारख्या दिसणाऱ्या त्या क्रीमचा थंड स्पर्श आणि कापराचा वास त्या वेळी लक्षात राहतो तो कायमचा! कैलास जीवनला ‘स्किन क्रीम’ म्हणणेही कृत्रिम वाटावे इतके ते घरगुती होऊन गेले आहे.

या क्रीमचे पहिले नाव चक्क ‘कैलास लोणी’ असे होते! आंजल्र्याहून ‘व्हाया गोवा’ पुण्याला आलेल्या आणि इथेच वसलेल्या वासुदेव कोल्हटकर या धडपडय़ा पुणेकराचे ते संशोधन. त्या ‘कैलास लोण्या’चे ‘कैलास जीवन’ होऊन आता साठ वर्षे उलटून गेली आहेत. या काळात ‘#सात_दिवसात_लख्ख_गोरे_बनवणारी’ किंवा ‘#पायांच्या_भेगा_चुटकीसरशी_घालवणारी’ अनेक स्किन क्रीम बाजारात आली, पण कोणताही अचाट दावा न करताही कैलास जीवन टिकून राहिले. आपला आब राखून विस्तारले आणि आता तर पार #रशिया, #पोलंड आणि #स्वित्झरलँडलाही पोहोचले.

वासुदेव कोल्हटकर हे मूळचे शिक्षक, पण त्यांना कीर्तनाचा नाद होता. कीर्तनासाठी संस्कृत यायला हवे म्हणून त्यांनी सांगलीच्या संस्कृत विद्यालयात धडे घेतले आणि १९२३-२४ मध्ये पुण्यात स्थायिक झाले. आयुर्वेद आणि होमिओपॅथीची आवड त्यांना होतीच. त्यांनी स्वत:ची वेगळ्या पठडीतली कीर्तने सुरू केली. कीर्तनाच्या दोन भागांच्या मध्ये ते दहा मिनिटांचे मध्यंतर घेत आणि या मध्यंतरात काहीतरी सल्ला देणारी घोषणा करीत. या वेळी लोकांना काही साधी औषधे सांगता येऊ शकतील असे त्यांना वाटले आणि कैलास जीवनच्या कल्पनेचे बीज तिथे रुजले. या क्रीमची प्रेरणा आली आयुर्वेदातील ‘शतधौतघृत’ (विशिष्ट पद्धतीने शंभर वेळा घासलेले/ फेटलेले तूप) या औषधावरून. परंतु या तुपाला एक प्रकारचा उग्र वास येई. तशीच प्रक्रिया खोबरेल तेलावर करून पाहूया, या विचारातून कोल्हटकरांनी त्यात शंखजिरे पावडर (टाल्क पावडर), राळ, चंदनाचे तेल, कापूर असे विविध घटक घालून त्यापासून ‘कैलास लोणी’ बनवले. या उत्पादनाचे हे माजघरातील नाव फार दिवस राहिले नाही आणि ‘कैलास जीवन’ याच नावाने उत्पादन विकायचे ठरले.

जोडधंदा म्हणून १९५५-५६ मध्ये जन्मास आलेल्या या स्किन क्रीमचे आगळे ‘#मार्केटिंग’ हे त्याचे आणखी एक वैशिष्टय़. पहिली जवळपास दहा वर्षे कीर्तनाच्या मध्यंतरात या क्रीमचे नाव आणि उपयोग जमलेल्या लोकांसमोर पोहोचवण्याचा प्रयत्न होत असे. राजा केळकर संग्रहालयाशेजारी असलेल्या कोल्हटकरांच्या घरातील अदिती वामन मंदिर, खुन्या मुरलीधराचे देऊळ, मोदी गणपती, सदाशिव पेठेत केसकर विठोबा, कँपातील मारुती मंदिर, शिवाजीनगरचा रोकडोबा अशी सगळीकडे त्यांची कीर्तने होत. या निमित्ताने समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना कैलास जीवन माहिती झाले. तारुण्यपिटिका, त्वचेच्या इतर तक्रारी, भाजणे, मूळव्याध अशा विविध गोष्टींवर चालणारे व औषध म्हणून पोटातही घेता येणाऱ्या या क्रीमची ६० ग्रॅमची बाटली तेव्हा एक रुपयाला मिळे. तोपर्यंत वासुदेव कोल्हटकरांची मुलेही शिक्षण पूर्ण होऊन हाताशी आली होती. त्यांच्या एका मुलाने आणि एका मुलीने वैद्यकीचे शिक्षण, तर एका मुलाने औषधनिर्माण शास्त्राचे शिक्षण घेतले होते. आणखी एक मुलगा एमए पूर्ण करून वडिलांना मदत करण्यास तयार झाला होता. असे सगळे घरच उद्योगासाठी एकत्र आले.

‘आयुर्वेद संशोधनालय पुणे प्रा. लि. ’ या कंपनीतर्फे धायरीत कैलास जीवनचे उत्पादन होते. राम कोल्हटकर, परेश आणि वेधस कोल्हटकर आणि अनुराधा कोल्हटकर हे कंपनीचे आताचे संचालक. मधल्या काळात या क्रीममध्ये कालानुरूप बदल झाले. हे क्रीम ‘इमल्शन’ स्वरूपातील असल्यामुळे त्यात पाणीसदृश चुन्याची निवळी असते. क्रीम बाटलीत भरल्यावर त्यातून पाणी वेगळे होऊ नये यासाठी सुरुवातीच्या काळात विविध प्रयोग झाले. नंतर जाड काचेच्या बाटल्या आणि पत्र्याची झाकणेही बदलली गेली. ‘पॅकिंग’ बदलले पण उत्पादनाचे मूळ तेच राहिले.

पुण्याने कैलास_जीवनला जिव्हाळा दिला हे मान्य करतानाच ‘आमची कुठेही शाखा नाही’चा पुणेरी बाणा मागे टाकून व्यावसायिक म्हणून मोठे होण्याचा प्रयत्नही #कोल्हटकर कुटुंबीयांनी केला, हे विशेष. आपले उत्पादन विकत घ्यायला लोकांना थेट आपले घरच गाठावे लागणे बऱ्या व्यावसायिकाचे लक्षण नव्हे. उत्पादकाला व्यापाऱ्याला भले कमिशन द्यावे लागो, पण त्याच्यामार्फत उत्पादन लोकांपर्यंत पोहोचेल तेव्हाच त्याचा अधिक प्रसार होईल, हे व्यवसायाचे साधे तत्त्व त्यांनी दूर लोटले नाही. कैलास जीवन परदेशी गेले ते इथल्यापेक्षा वेगळ्या वेष्टनात आणि वेगळ्या नावासह. व्यावसायिक म्हणून आम्हाला वाढायचे आहे, ही स्पष्ट भूमिका त्यांनी ठेवली. आपल्याला ज्या नवीन शहरात उत्पादन घेऊन जायचे आहे त्या शहराचा भूगोल पक्का माहीत हवा, तरच विपणन उत्तम करता येईल, ही अभ्यासू वृत्ती सोडली नाही, शिवाय उत्पादनाबद्दल अचाट दावेही केले नाहीत. इतर अनेक उत्पादनांपेक्षा कैलास जीवन वेगळे ठरले ते कदाचित त्याच्या विश्वासार्हतेमुळेच. पुणेकरांनी त्याला केव्हाच आपलेसे केले होते, पण पुण्याचा ‘#ब्रँड’ म्हणून बाहेरच्या बाजारपेठेत गेलेले हे उत्पादन तिथेही स्थिरावले आणि त्याचा थंडावा देणारा स्पर्श आणि कापराचा वास अनेकांच्या बालपणीच्या आठवणी जाग्या करू लागला.

 (#आठवण_स्वदेशी_ब्रँडची….)

लेखिका-  सुश्री संपदा सोवनी

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ आभाळाची माणसं ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆

श्री मकरंद पिंपुटकर

🌈 इंद्रधनुष्य 🌈

☆ आभाळाची माणसं ☆  श्री मकरंद पिंपुटकर ☆

हृदयरोग तज्ज्ञ डॉ अनिल तेंडोलकर – 

“आभाळाची माणसं – ज्योतीने तेजाची आरती” ही you tube वर असलेली जाई काजळ निर्मित, स्मृतीगंध (smrutigandha) प्रस्तुत मुलाखतींची मालिका. प्रसिद्ध हार्मोनियम वादक आदित्य ओक हे विविध क्षेत्रांतील दिग्गजांशी या मुलाखतींद्वारे संवाद साधतात. नुकताच या मालिकेअंतर्गत मुंबईचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिल तेंडोलकर यांच्या “ये हृदयीचे ते हृदयी” या मुलाखतींचे दोन भाग पाहण्याचा योग जुळून आला, त्याबद्दल थोडंसं……….

Cardiology क्षेत्रातील “अनिल तेंडोलकर” हे एक जुने आणि प्रसिद्ध नाव.

वैद्यकीय प्रवेश परीक्षेत पाचवा क्रमांक, मग GS मेडिकल, मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण, १९७९ साली मास्टर ऑफ सर्जरी (जनरल सर्जरी) मध्ये मुंबई विद्यापीठात तिसरा क्रमांक, पुढे cardiovascular and thoracic सर्जरी (हृदय आणि छाती संबंधित शस्त्रक्रिया) या विषयात दुसरी MS पदवी, त्यात विद्यापीठात सर्वप्रथम, मग केईएम, लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल, प्रिन्स अली खान हॉस्पिटल, होली फॅमिली हॉस्पिटल येथे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असा या हृदयरोग शल्य विशारदाचा (caridac surgeon) अतिशय प्रथितयश प्रवास.

अशा सगळ्या बिरुदावलीच्या माणसाची मुलाखत म्हणजे बोजड, क्लिष्ट, गंभीर, मख्ख असेल असं वाटणं स्वाभाविक आहे, पण प्रत्यक्षात या मुलाखतीत डॉक्टर आणि आदित्य या दोघांनी अगदी बहार उडवली आहे.

डॉक्टरांचे आई वडील त्या काळीसुद्धा उच्च विद्याविभूषित. वडील इंग्लंडला जाऊन phd करून आलेले, इथे आयआयटीमध्ये प्राध्यापक, आई UDCT मध्ये गणिताची प्राध्यापिका. १९४८ सालीसुद्धा हे दोघं पुरोगामी विचाराचे होते. त्याकाळीसुद्धा त्यांनी कुटुंब नियोजन केलं होतं.

डॉक्टरांच्या अमावस्येला झालेल्या जन्माची कहाणी, त्यांचं नाव अनिल का आणि कसं पडलं इथून या गप्पांना सुरुवात होते.

डॉक्टरांचे आई, वडिल, बहीण हे तिघंही शास्त्रीय संगीत गायक, त्यामुळे डॉक्टरांवर संगीताचे संस्कार बालपणापासूनच झाले होते. पण फक्त शास्त्रीय संगीतच ऐकायचं, चित्रपट संगीत ऐकायचं नाही, चित्रपट पहायचे नाहीत असा कर्मठपणाही होता.

आई वडिलांचे कडक शिस्तीचे नियम, त्यातून पळवाटा काढण्याच्या मुलांनी लढविलेल्या शकला, चित्रपट बघायला परवानगी मिळवण्यासाठी केलेल्या मिनतवाऱ्या आणि या सगळ्यामागचं प्रेम – आदर कदाचित आजच्या तरुणाईला उमगणार नाही, पण आमच्या पिढीला मात्र ते नक्कीच भावेल.

बालपणापासूनच पंडित मनोहर बर्वे, यशवंतबुवा जोशी, राम मराठे, गजाननबुवा जोशी, वसंत जोशी यांचे गायन आणि वादनाचे संस्कार त्यांच्या कानांवर झाले होते.

डॉक्टरांचे शालेय शिक्षण दादरच्या किंग जॉर्ज शाळेतले. “ती जेव्हा किंग जॉर्ज शाळा होती तेव्हा मराठी माध्यमातली होती, आता राजा शिवाजी शाळा आहे, पण माध्यम इंग्रजी झाले आहे, ” अशी कोपरखळी डॉक्टर मारतात.

डॉक्टर गोरेगावात पाटकर कॉलेजात शिकले.

मुलगा आयआयटीमध्ये गेला की तो हॉस्टेललाच राहणार, आपल्यापासून दूर राहणार, असं व्हायला नको, म्हणून डॉक्टरांच्या आईने त्यांना वैद्यकीय क्षेत्राकडे जायचा आग्रह धरला. एका नजरचुकीने डॉक्टर फिजिओथेरपीला ॲडमिशन घेत होते, पण झालेली चूक वेळीच लक्षात आली आणि गाडी योग्य दिशेला निघाली.

आपल्या संपूर्ण शिक्षणामध्ये आणि पर्यायाने आयुष्यात ज्यांचा पगडा राहिला अशा आपल्या आईवडिलांचा आणि आपल्या शिक्षक प्राध्यापकांचा डॉक्टर आवर्जून उल्लेख करतात. आईने आपल्या संभाषणात, भाव – लय – चढउतार कसे आणले, आणि आयुष्यभर कसा त्याचा उपयोग होत गेला हेही डॉक्टर मिश्कीलपणे नमूद करतात.

व्हिटॅमिन “मरणं”, शिकवताना / ऑपरेशन थिएटरमध्ये नर्सेसना डॉक्टरांबद्दलचे विनोद सांगणं, लहान बाळाला तेलमालिश करणाऱ्या दाई, ग्रामोफोन – त्याच्या (पुन्हा एकदा) (फक्त) शास्त्रीय संगीताच्या तबकड्या (long playing records) – आणि केईएम मधील तामिळ शेजाऱ्यांची होणारी पंचाईत या सगळ्या गंमतीजंमती आपल्याला गुदगुल्या करून जातात.

अत्यंत निरपेक्ष वृत्तीने विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणाऱ्या, रुग्णाला बरे करण्यासाठी रात्रीचा दिवस करणाऱ्या आपल्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. रेगे, रवी बापट, परुळकर, शरद पांडे आदि गुरुजनांचा डॉक्टर अतिशय आदरपूर्वक उल्लेख करतात आणि आजचं आपलं यश हे आईवडील आणि हे सर्व गुरुजन यांच्याचमुळे आहे, हे आग्रहाने नमूद करतात.

रुग्णाचा निव्वळ x ray बघून याला हृदयातून निघणाऱ्या दोन प्रमुख रक्तवाहिन्या नसून फक्त एकच रक्तवाहिनी आहे, हे सांगणारे डॉक्टर, रुग्णाला आलेला ताप हृदयाच्या संसर्गाचा (इन्फेक्शन) नसून urinary tract infection चा आहे हे निदान करणारे गुरुजन आम्हाला घडवत गेले याचे डॉक्टर आभार मानतात.

“नजर हटी, दुर्घटना घटी” आणि “जरासी सावधानी, जिंदगीभर आसानी” ही वाक्यं पूर्णतः cardiac surgeon साठीच आहे असं डॉक्टरांचं ठाम मत आहे. संपूर्ण शस्त्रक्रिया पूर्ण होइस्तोवर फक्त आणि फक्त हृदयाकडेच लक्ष ठेवणारे सर्जनगुरू डॉ. भट्टाचार्य यांचा ते आवर्जून उल्लेख करतात. आणि “अगदी शेवटपर्यंत हार मानायची नाही” हे सूत्र घेऊनच आम्ही सर्जरी करायचो असा ते आठवणींना उजाळा देतात.

हृदयांच्या non return valve वर केलेल्या शस्त्रक्रियांतून मिळालेल्या अनुभवाचा उपयोग ते आज त्यांच्या गोरेगावातील सोसायटीच्या इमारतीच्या पाईप लाईन, पंप आणि ड्रेनेज लाईनच्या झडपांना (व्हॉल्वना) तंदुरुस्त ठेवण्यासाठी करतो अशी मिश्किल टिप्पणी ते जोडतात.

आपल्याला जे जे ठाऊक आहे ते मोफत आणि हातचे काहीही न राखता देण्याचे संगीत आणि वैद्यकीय क्षेत्रातल्या गुरूंचे ऋण फेडण्यासाठी डॉक्टरांनी वैद्यकीय माहिती देणारी अनेक e books लिहिली आहेत, प्रकाशित केली आहेत आणि ती संपूर्णपणे निःशुल्क उपलब्ध आहेत.

तालयोगी सुरेश तळवलकर, हार्मोनियमपटू विद्याधर ओक, राष्ट्रीय विजेते बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, शाळेतले गायनमास्तर / नाट्यगुरू नेवरेकर मास्तर, साहित्यसंघाचे भालेराव सर, नाट्यकर्मी कमलाकर नाडकर्णी, नटश्रेष्ठ मधुकर तोरडमल, नेपथ्यकार मोहन वाघ अशा अनेकांच्या आठवणी मुलाखतीत ठायीठायी येत राहतात.

डॉक्टर स्वतः उत्कृष्ट नकलाकार आहेत, शिट्टीवर गाणी म्हणतात – अगदी नाट्यसंगीतही वाजवतात, हॉस्पिटलमधील गमतीजम्मतीवर आधारित “फजित वाडेकर” हा त्यांचा एकपात्री प्रयोग ते करतात, त्यांनी एकांकिका लिहिल्या आहेत, “तरुण तुर्क म्हातारे अर्क, मोरूची मावशी” अशी नाटकं बसवली, त्यांचं हे असे सगळे बहुआयामी व्यक्तिमत्व या गप्पांतून खुलत जातो.

खुद्द गोविंदराव पटवर्धन आणि वडिल डॉ. विद्याधर ओक अशा रथी – महारथींकडून हार्मोनियम आणि पायपेटीचे शिक्षण प्राप्त केलेले आदित्य ओक यांनी अत्यंत सहजगत्या डॉ. तेंडोलकर यांच्याशी हा संवाद साधला आहे. बालगंधर्व, अजिंठा, कट्यार काळजात घुसली, बंदिश बॅन्डिट अशा एकाहून एक सरस प्रोजेक्ट्समध्ये संगीत दिग्दर्शन, आयोजन यात आदित्य यांचे महत्त्वाचे योगदान आहे. या मुलाखती घेताना मात्र आदित्य हे डॉ. अनिल यांच्याशी असलेल्या घरगुती मैत्रीपूर्ण नात्यामुळे अतिशय समरस झाले आहेत. त्यामुळे “मुलाखत” असे औपचारिक स्वरूप न राहता अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणातल्या घरगुती मनसोक्त गप्पा असंच स्वरूप या दोन्ही भागांना आहे.

पंच्याहत्तरी गाठलेल्या, अति उच्च विद्या विभूषित, हृदयरोगासारखा गंभीर विषय आयुष्यभर हाताळलेल्या डॉक्टरांची ही मुलाखत ऐकताना ही वयस्कर माणसाची नसून, एखाद्या कॉलेजवयीन तरुणाची मुलाखत आहे असंच पदोपदी जाणवत राहतं. आपल्या विषयांवर मनापासून प्रेम करणं, पुल म्हणतात तसं “हे जग मी सुंदर करून जाईन” या वृत्तीमुळे, सतत काहीतरी नवीन शिकण्याच्या वृत्तीने चित्तवृत्तींमधील हे तारुण्य कायम राहिलेलं आणि खुलत जाताना दिसतं – 

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “संत गाडगेबाबा” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ “संत गाडगेबाबा” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे ☆

(आषाढवारी निमित्त प्रकट चिंतन) 

वैष्णव परंपरा वैदिक म्हणजेच चातुर्वर्ण्यावर आधारित ब्राह्मणी धर्माला जवळची तर शैव परंपरा उघडपणे भेदभावाला प्राधान्य देणाऱ्या वैदिकांना विरोध करणारी होती. या दोन्ही संप्रदायांमधील संघर्ष संपवून तसेच त्यांच्यामध्ये समन्वय साधून सामाजिक समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय अस्तित्वात आला. त्याचप्रमाणे शिव आणि विष्णू यांच्या मूर्तिविधानामध्ये कुठेही न आढळणारी लक्षणे लेऊन विठ्ठल मूर्ती साकारली गेली. अशा लोकविलक्षण मूर्तीला पूजणारा वारकरी संप्रदाय अठरापगड जातींना आपल्या कवेत घेणारा आहे.  त्यामुळेच दरवर्षी आषाढी एकादशीला वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी आतुरतेने पंढरीची वारी करतात.  अशाच वारकरी वर्गामधील कर्मयोगी संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विदर्भातील संत होते.

कर्मयोगी संत गाडगेबाबा 

अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यात असलेल्या शेणगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ रोजी जन्मलेल्या गाडगेबाबांचे बालपणीचे नाव डेबू असे होते. बाळसेदार व गोऱ्या डेबूला हे नाव मिळण्यामागे त्यांच्या पोटाचा गरगरीत आकार होता. त्यांची आई सखुबाई आणि वडील झिंगराजी जानोरकर .  झिंगराजी व्यसनी व कर्जबाजारी होते व त्यात त्यांना पुढे कुष्ठरोग जडला. त्यामुळे गावातील लोक त्यांना टाळू लागले,म्हणून त्यांनी गाव सोडले.   डेबू आठ वर्षाचा असतानाच झिंगराजी मरण पावले. अशा स्थितीत सखुबाईने आपले माहेर गाठले. डेबूचे यापुढील आयुष्य मामांच्या छायाछत्राखाली आजच्या भातकुली तालुक्यातील दापुरा येथे गेले. तेथून जवळ असलेल्या ऋणमोचन या गावी त्याने शिवमंदिरात गोपाळकाला म्हणजे सहभोजनाचा कार्यक्रम घडवून आणला.     जातीपातीचा भेद नसणाऱ्या या सहभोजनात गावातील इतर मुलांसह महार-मांगांच्या मुलांनीही भाग घेतला. त्यामुळे गावातील सनातनी लोकांच्या मनात संताप निर्माण झाला.  आपला धर्म डेबूने बुडविला असे ते म्हणू लागले, परंतु त्याची डेबूने पर्वा केली नाही.

वयाच्या बारा-तेरा वर्षाच्या काळातच डेबूला मामाच्या शेतात कष्टाची कामे करावी लागलीत. त्याच्या कर्तबगारीचा दिंडीम दापुराच्या पंचक्रोशीत पसरला होता. त्यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षी त्याचा विवाह कमालपूर येथील धनाजी खल्लारकर यांची कन्या कुंताबाईशी झाला. एक कुशल शेतकरी म्हणून नावारूपाला आलेल्या डेबूला एक वेगळ्याच संकटाला सामोरे जावे लागले. कर्जबाजारी झालेल्या मामाची शेती चंद्रभान सावकाराने आपल्या घशात घातली होती. चौसष्ट एकर जमीन गहाण ठेवून सावकाराने तिच्यावर आपला हक्क सांगितला होता. त्यामुळे डेबूच्या मामाने या धक्क्यानेच आपला प्राण सोडला. डेबूला त्यामुळे संताप येऊन सावकाराशी दोन हात करावे लागले. शेवटी सावकाराने त्यातील पंधरा एकर जमीन त्याला परत केली. या जमिनीवर त्याच्या कुटुंबाची गुजराण होऊ लागली. परंतु डेबू केवळ आपल्या कुटुंबापुरता मर्यादित नव्हता. बालपणीच त्याला आपल्या अवती-भवतीच्या लोकांविषयी आस्था होती. समाजातील आळस, व्यसनाधीनता, कर्जबाजारीपणा,जातिभेद, अंधश्रद्धा या समस्यांशी दोन हात करावेत असे त्याला नेहमीच वाटत असे. अध्यात्माविषयी ओढ असलेल्या डेबूने गुरूमंत्र घ्यायचे ठरविले. त्यांच्या गावाजवळच दौलात्गिरी गोसावी नावाचा बुवा प्रसिद्धीस आला होता. त्याचे दर्शन घ्यायला गेल्यावर डेबूला कळले की,दारू प्यायला दिल्याशिवाय तो गुरुमंत्र देत नाही. बुवाची अशी कीर्ती ऐकल्यावर डेबू आल्या पावली परत गेला. 

पंढरपुरात डेबूजी

आपल्या मनाच्या शान्तीकरिता त्याने तीर्थयात्रा करायचे ठरविले व तो पंढरपूरला आला. आषाढी एकादशीच्या वारीसाठी सारे पंढरपूर फुलून गेले होते. वारकऱ्यांचा उत्साह एकीकडे शिगेला पोचला असताना काही भुरटे चोर मात्र त्यांचे खिसे रिकामे करण्याच्या उद्योगात मग्न होते. व्यापारी व पुजारी भाविकांची लूट करताना त्याने पाहिले.  धनिकांसाठी विठूमाउलीची सहज भेट तर भाविक मात्र रांगेत उभे असलेले पाहून त्याला या भेदभावाची अतिशय चीड आली. विठुरायाच्या चरणावर डोके ठेवणाऱ्या भक्तांना गचांडी देणारे बडवे पाहून तर त्याला उद्वेग आला. विठोबाच्या दर्शनापेक्षा तेथे येणाऱ्या गोर-गरीब भाविकांची सेवा करण्याचे त्याने ठरविले. नंतर त्याने कधीही विठ्ठलाचे दर्शन घेतले नाही. परंतु भाविकांच्या सेवेसाठी तेथे धर्मशाळा बांधली.

डेबूजीचा गाडगेबाबा झाला

भातकुली जवळील ऋणमोचन येथे दरवर्षी पौष महिन्यात यात्रा भरते. १९०५ च्या यात्रेला डेबूजी आपल्या कुटुंबासह आला होता. तेथे भाविकांची होणारी गैरसोय पाहून त्याने त्यांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. आपले बिऱ्हाड सोडून त्याने अंगावर फटके कपडे घातले व एका हातात गाडगे तर दुसऱ्या हाती काठी घेऊन तो निघाला. लोकांच्या सेवेत मग्न झालेला डेबूजी आता गाडगेबाबा या नावाने ओळखला जाऊ लागला. त्याच्या लोकसेवेच्या कार्यात लोकांचाही सहभाग वाढू लागला. गावोगावी फिरून गाडगेबाबांनी कीर्तने सुरू केलीत.  अंगावर फाटक्या कपड्यांची ठिगळे लावलेले कपडे आणि चिंध्या पाहून कुणी त्यांना चिंधेबाबा,गोधडे महाराज या नावांनीही  संबोधू लागले. गावात गेल्यावर प्रथम ते सारा गाव आपल्या खराट्याने झाडून काढीत आणि नंतर त्याच गावात कीर्तन करीत असत. त्यांचे कीर्तनही प्रचलित कीर्तनकारांपेक्षा वेगळे होते, तसाच त्यांचा पेहेरावही वेगळाच होता. फाटक्या चिंध्याचे वस्त्र,कानात फुटलेल्या बांगड्यांची कर्णभूषणे तर डोईवर फुटलेल्या गाडग्याचे शिरोभूषण. तर पायातील मोजेही वेगवेगळ्याप्रकारचे असत. प्रस्थापित कीर्तनकारांसारखी वाद्यांची साथ-संगतही त्यांच्याजवळ नव्हती. गावातीलच कुणी त्यांना वेळेवर साथ करीत असे.

महाराष्ट्रात वारकरी,पुणेरी व रामदासी अशा कीर्तनाच्या तीन परंपरा आहेत,त्यात कुठेही गाडगेबाबांचे कीर्तन बसत नव्हते. कारण की,ते या प्रकारच्या कोणत्याही परंपरेतून आलेले नव्हते,तर विपरित परिस्थितीतून त्यांनी आपली वेगळी कीर्तनशैली शोधली होती. त्याचप्रमाणे त्यांची निवेदन पद्धतीही वेगळीच होती. परंतु,या पद्धतीला एक प्राचीन परंपरा होती. जगातील सर्वच प्राचीन प्रबोधनकार आपल्या श्रोत्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडून त्यांची उत्तरे मिळवीत असत. असे प्रश्नोत्तर पद्धतीने त्यांचे कीर्तन रंगत असे. आजच्या आधुनिक शिक्षण पद्धतीत प्रश्नोत्तर पद्धतीला महत्त्व आले आहे. गाडगेबाबांनी तिचा स्वीकार कितीतरी आधीच केला होता. म्हणून त्यांना लोकशिक्षक म्हटले जाते. 

वारकरी संप्रदायाचा प्रभाव, पण…

आपल्या कीर्तनातून गाडगेबाबा निरर्थक कर्मकांडे आणि अनिष्ट प्रथा-परंपरांवर कठोर प्रहार करीत असत. त्यासाठी ते नेहमी संत तुकोबाराय व संत कबीर यांच्या वचनांचा आधार घेत असत. ईश्वर केवळ मंदिरात नाही,तर सर्वत्र आहे,त्याची भक्ती मंदिरात नाही तर दीन-दुबळ्या लोकांची सेवा करून करा ; असा उपदेश ते आपल्या कीर्तनातून करीत असत. प्रचलित वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांच्या मांडणीपेक्षा त्यांची मांडणीही वेगळी होती. वारकरी संप्रदायातील समतेचे तत्व खऱ्या अर्थाने आत्मसात करून त्याला विवेकवादी विचाराची जोड देवून त्यांनी महाराष्ट्रभर कीर्तने केलीत. त्यांचे मुंबई येथील बांद्रा पोलीस स्टेशनच्या आवारात ८ नोव्हेंबर १९५६ रोजी झाले व तेवढेच ध्वनिमुद्रित स्वरुपात उपलब्ध आहे. त्यातील त्यांच्या मांडणीवरून त्यांच्या विचारांचा परिचय आपणास होतो.

त्यांच्या कीर्तनातून बुद्धाची करुणा,तुकारामांचा परखडपणा आणि कबीराचा बिनतोड युक्तिवाद यांचे दर्शन आपणास होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतर विभागांपेक्षा विदर्भातील वारकरी संप्रदायाचे स्वरूप वेगळे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचा प्रारंभही त्यामुळेच विदर्भात झाला. भुकेलेल्यांना अन्न,तहानलेल्यांना पाणी,उघड्या-नागड्या लोकांना वस्त्र,निरक्षरांना शिक्षण,बेघरांना घर,रोग्यांना औषध,बेरोजगारांना रोजगार,मुक्या प्राण्यांना अभय,गरीब व दुर्बलांना लग्नासाठी मदत आणि दुःखी-कष्टी लोकांना आधार द्यावा असे गाडगेबाबा नेहमी सांगत असत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊसाहेब पाटील आणि डॉ.पंजाबराव देशमुख यांच्यावर त्यांचे विशेष प्रेम होते. या तिघांच्याही कार्यात त्यांनी मोलाचे योगदान केलेले आहे. आपल्या पंढरपूर येथील धर्मशाळेचे विश्वस्त म्हणून त्यांनी डॉ.आंबेडकरांना नेमले होते. १४ नोव्हेंबर १९५६ रोजी त्यांचे शेवटले कीर्तन पंढरपूर येथे झाले. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. ६ डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महानिर्वाण झाल्याची बातमी त्यांनी ऐकली आणि त्यांचे सारे अवसान गळाले. शेवटी २० डिसेंबर १९५६ रोजी गाडगेबाबा आपल्यातून गेलेत. त्यांच्या विचारांचा वसा घेतलेले अनेक विचारवंत आणि अनुयायी आजही महाराष्ट्रात आझेत. त्यापैकी एक आहेत,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.   विदर्भातील हे दुसरे संत होत. त्यांनी गाडगेबाबांचा अंत्यसंस्कार केला.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : सुनील देशपांडे

ईमेल : sunil68deshpande@outlook.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जी पी…” – लेखक –  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

? इंद्रधनुष्य ?

☆ “जी पी…” – लेखक –  अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

आमच्या लहानपणी म्हणजे जेव्हा जनरल प्रॅक्टिशनर किंवा जीपी ही जमात अस्तित्वात होती तेव्हा त्यांना फॅमिली डॉक्टर म्हणत असत. 100 ते 200 फुटांच्या जागेचे 2 किंवा 3 भाग केलेले असत. एक दर्शनी भाग जिथे डॉक्टर स्वतः सर्व रोगांशी लढायला सज्ज असलेल्या योध्यासारखे गुबगुबित रिव्हॉल्विंग चेयर मध्ये डोके टेकायच्या ठिकाणी टॉवेल ठेऊन स्थानापन्न असत. खुर्चीच्या पुढ्यात त्यांचेे प्रचंड आकाराचे लाकडी टेबल. टेबलावरची काच आणि टेबल ह्यांच्या मधे अनेक मेडिकल रिप्रेझेंटिटिव्हनी सरकवलेली व्हिजिटिंग कार्ड्स. डॉक्टरांच्या डोक्यावर मधोमध मोठ्ठा गोल असलेला एक पंखा. गळ्यात स्टेथोस्कोप उपरण्यासारखा लटकवलेला. समोर पेशन्ट्सचे रब्बर बँडनी बांधलेले, काचेच्या पेपरवेटने सांभाळलेले केस पेपर्स, हाताशी आपले नाव, डिग्री, नोंदणी क्रमांक लिहिलेले लेटर हेड आणि फक्त त्यांच्या कम्पाउंडरला किंवा मेडिकल दुकानातील लोकांना कळेल अश्या अगम्य भाषेत काहीतरी लिहायला एक पेन. दवाखान्यात रुग्णांना बसायला समोरासमोर बनवलेले लाकडी बाक. ते संपले की दवाखान्याबाहेर ओसंडून जाणारी रुग्णांची गर्दी!

दुसरा भाग रुग्णाला चेक करायचा. दोन फूट बाय सहा फुटाचे एक टेबल ज्यावर रेगझिन घातलेले असे. त्यावर बसायचे म्हणजे खाली ठेवलेल्या स्टुलावर पाय ठेउनच “चढावे” लागे. बहुतेक डॉक्टरना प्रत्येक वेळेला वाकायला लागू नये म्हणून रुग्णांना एकदाच वरती चढून बसवायची सोय असावी. बाहेरच्या खोलीत रुग्णाची एकंदर कथा ऐकून आणि स्थिति पाहून डॉक्टर त्याला ह्या खोलीत बोलावत. रुग्ण शक्यतो त्या टेबलावर चढून बसत असे. मग डॉक्टर “आडवे व्हा” असे म्हणाले की कपडे सावरत झोपत असे. मग डॉक्टर हाताने पल्स मोजत, मग छातीत असलेल्या हृदयाचे ठोके डॉक्टर  छाती, पोट, पाठ सर्वत्र स्टेथोस्कोप लाउन मोजत! मग स्वतःच्या कपाळावर एक पट्टी बांधत ज्याच्या पुढे एक गोल आरसा असे. मग रुग्णाला “आsss” करायला लावून त्या आरशातून परावर्तित होऊन रुग्णाच्या घशात खोलवर जाणाऱ्या उजेडात ते मुखमंडलाचे दर्शन घेत. “काय खाल्ले?” असले जुजबी प्रश्न विचारात आणि “काळजी करू नको” इतके सांगून तिथेच असलेल्या छोट्याश्या बेसिन मध्ये साबणाने हात धुवून, शुभ्र टॉवेलला हात पुसून परत बाहेर आपल्या खुर्चीत स्थानापन्न होत. रुग्ण “काळजी करू नको” ह्या शब्दांनीच अर्धा बरा झालेला असे. क्वचित पितळ्याच्या, उकळवलेल्या सिरिंजमधून एखादे इंजेक्शन! बास. कम्पाउंडर ने बाहेरून डोसाचा नाक्षीदार कागद चिकटवून आत लाल रंगाचे औषध भरून बुचाची बाटली हातात दिली आणि तिच्या बरोबर 3 प्रकारच्या गोळ्या “ह्या सकाळी, ह्या दोन जेवणानंतर आणि ही फक्त रात्री” असे सामोर ठेवलेल्या गोळ्या कॅरमवरील सोंगट्या फिरवाव्या त्या गतीने फिरवत, त्याच्या सामोर असलेल्या छोट्याश्या खिडकीतून रुग्णाला फ़टाफ़ट सांगून “दहा रुपये” असे म्हणत व्यवहार पूर्ण केला की कम्पाउंडरच्या कॉन्फिडन्समुळे उरलेला आजार देखिल पळून जात असे. 

ह्या फॅमिली डॉक्टर्सना प्रत्येक रुग्णाची तब्बेत, त्याचा फॅमिली  इतिहास, आर्थिक स्तर सर्व माहीत असे. अनेक रुग्णांच्या शुभकार्याला त्याला जावे लागत असे. नाडी परीक्षा, स्टेथोस्कोप आणि घसा बघुन त्याच्या गोडट लाल औषध आणि चार गोळ्यानी कोणताही रोग दहा रूपयात बरा करणारा तो धन्वंतरी त्या भागातील हजारो लोकांचा देव असे. हातात लेदरची बॅग घेऊन डॉक्टर कधी होम व्हिजिटला आले की मामला गंभीर आहे ह्या जाणिवेबरोबर कोणीतरी सेलिब्रिटी इमारतीत आल्यासारखी त्यांना पहायला गर्दी व्हायची. रुग्णांच्या किमान दोन ते तीन पिढ्या एखादे फॅमिली डॉक्टर जगवायचे, फुलवायचे. ते  कुटुंबाचा भागच होऊन जायचे म्हणून बहुतेक त्यांना “फॅमिली डॉक्टर” असे नाव पडले असावे.

आज असे दवाखाने काढून समाजसेवा करणाऱ्या फॅमिली डॉक्टरचे प्रमाण कमी झाले आहे. नाडी आणि घसा पाहून औषध न मिळता अनेक टेस्ट करायला लागत आहेत. अर्थात मेडिकलची फी आणि दवाखाना टाकायचा प्रचंड वाढलेला खर्च हे देखील कारण आहेच. तसेच समाज वाढला तसे रोगही वाढले. ते रोग आमच्या जीपीच्या साध्या निदान प्रक्रियेतून कदाचित लक्षात येत नसतील. आज जे आहे ते वाईट खचितच नाही पण हल्ली डॉक्टर किंवा इस्पितळात जाताना जी भीती वाटते ती फॅमिली डॉक्टरकडे जाताना वाटत नसे. उलट काही महिन्यात त्यांना भेटल नाही तर निदान सर्दी तरी होऊ दे. त्या निमित्ताने “डॉक्टरांची” विचारपूस करता येईल असे विचार अनेक फॅमिली डॉक्टरांच्या रुग्णांच्या मनात यायचे! असो!

आज डॉक्टर्स डे आहे. त्या निमित्ताने आमचे फॅमिली डॉक्टर तसेच माणसांच्या जीवन मृत्यु किंवा सुदृढता आजार ह्यांच्यामधे कुठेतरी राहून आजार व मृत्युवर विजय मिळवत सुदृढ़, दीर्घायुषी समाज बनवायचा वसा घेतलेल्या तमाम उरले सुरले फॅमिली डॉक्टर्स, स्पेशलिस्ट, सर्जन, कन्सल्टंट असलेल्या तमाम डॉक्टरांचे मनापासून धन्यवाद आणि ‘ डॉक्टर्स डे ‘ च्या शुभेच्छा !!

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री मोहन निमोणकर

संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो.  ८४४६३९५७१३.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ रखमाबाई राऊत – लेख क्र. ४ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ रखमाबाई राऊत – लेख क्र. ४ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)

रखमाबाई राऊत – सावे.

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.) 

मी रखमाबाई राऊत किंवा रखमाबाई सावे! सावे हे माझ्या सख्ख्या वडिलांचं आडनाव तर राऊत हे माझ्या सावत्र वडिलांचं आडनाव! माझ्या आईचा बालविवाह झाला आणि तिच्या वयाच्या चौदाव्या वर्षी माझा जन्म झाला. 17 व्या वर्षी बिचारी विधवाही झाली. मग माझाही बालविवाह झाला. पण आजोबांनी माझे पती दादाजी यांना सांगितलं की तुझे शिक्षण पूर्ण कर मग तिला नांदायला घेऊन जा. त्यामुळे मी आईकडेच राहिले. देव काही सगळी दुःखंच आपल्या वाट्याला देत नाही, काही थोडे चांगले दानही टाकतो. माझे आजोबा हरिश्चंद्र यादव हुशार होते. इंग्रजी शिकलेले, आधुनिक विचारांचे होते. त्यांनी ‘रायबहादूर’, ‘जस्टिस ऑफ पीस’ अशा स्थानांवर काम केले होते. इंग्रज लोकांच्यात त्यांची उठ बस होती. त्यांनी माझ्या आईचा पुनर्विवाह करण्याचे ठरवले. ते माझे सावत्र वडील, डॉक्टर सखाराम राऊत, शल्यचिकित्सक व प्रोफेसर होते. हेही एक चांगलं दान देवानं माझ्या पदरात घातलं. तेही सुधारक विचारांचे होते म्हणून हा विवाह होऊ शकला. नाही तर त्याकाळी कांहीं प्रगत लोकांच्या विचारांमुळे विधवा विवाह होत होते, पण सापत्य विधवा विवाह मात्र अशक्य होता. त्यामुळे हे लग्न झाल्यावर त्यावर जोरदार टीका सुरू झाली. पण माझ्या वडिलांनी त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून माझ्या आईला आधार दिला. बाल विधवा विवाह की प्रौढ विधवा विवाह यावर वाद होऊन दोन गट पडले. एक पुरोगामी व दुसरा प्रतिगामी! अशा रीतीने हा विवाह गाजला.

 

मला अभ्यासाची अतिशय आवड होती. त्यामुळे मी ब्रिटिश लायब्ररीतून पुस्तके आणून घरीच अभ्यास करीत होते. कदाचित डॉक्टर सखाराम यांच्यामुळे असेल पण मला डॉक्टर व्हावं असं वाटत होतं. १८८५ साली, मी २० एक वर्षाची होते, अचानक एक दिवस मला नांदायला पाठवा, असा दादाजींकडून निरोप आला. माझ्या पायाखालची जमीन सरकली. वाटलं, आता सगळं संपलं. आपल्या सगळ्या स्वप्नांची राख होणार. दादाजींनी शिक्षणाकडे पाठ तर फिरवली होतीच. पण त्यांच्या आई-वडिलांच्या निधनानंतर ते त्यांच्या मामाकडे राहायला आले होते. मामाने तर घरात दुसरी बाई ठेवली होती. पत्नीचा छळ चालू केला होता. तिने आत्महत्येचाही प्रयत्न केला होता. दादाजी काहीही काम धंदा करत नव्हते. रंगेल आणि व्यसनी होते. त्यामुळे मला डॉक्टरांनी पाठिंबा दिला की, तू जाण्याची काहीही गरज नाही, मी त्याला सांगतो. खरं म्हणजे दादाजींनी माझ्या मागं लागावं असं काहीही माझ्यात नव्हतं. त्यांनी दुसरं लग्न केलं असतं. पण माझ्या सख्ख्या वडिलांची काही थोडी इस्टेट होती व आईने पुनर्विवाह केल्यामुळे तिने ती माझ्या नावावर केली होती. त्यामुळे दादाजींना माझी गरज निर्माण झाली होती. मी येत नाही हे पाहिल्यावर त्यांनी कोर्टात दावा दाखल केला. नशिबाने वकील चांगले होते. त्यांनी नांदायला जाण्यासाठी जबरदस्ती करणे हे रानटीपणाचे ठरेल असा निर्णय दिल्याने दावा फेटाळला गेला. पण काही समाजकंटक असतातच. त्यांनी दादाजींना वरच्या कोर्टात जाण्याचा सल्ला दिला. वरच्या कोर्टात मात्र मला नांदायला जाणं हेच माझं कर्तव्य आहे, इच्छेचा प्रश्न नाही असं सांगितलं. त्यामुळे नांदायला जा नाहीतर सहा महिन्यांचा तुरुंगवास भोगायला लागेल असा निर्णय दिला. मी ही जिद्दीची होते. नांदायला जाणार नाही, तुरुंगवास भोगेन असं निक्षून सांगितलं आणि सगळीकडे खळबळ माजली. हा माझा उद्दामपणा वाटला, व तो शिक्षणाचा परिणाम आहे, असा निष्कर्ष काढला गेला. माझ्या मनात विचार आला की हा फक्त माझ्या एकटीचा प्रश्न नाही, कितीतरी स्त्रियांवर असे अन्याय होत असतात. याला कोणीतरी वाचा फोडली पाहिजे. मग मी स्त्री-पुरुष भेद, स्त्रीचे हक्क, सामाजिक विषमता यावर लेख लिहायला सुरुवात केली. ते ‘अ हिंदू लेडी ‘ या टोपण नावाने ‘द टाइम्स’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध केले. आणि मग पुन्हा दाव्याची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू झाली. आजोबांमुळे बरेच इंग्रज लोक ओळखीचे होते. त्यामुळे ही चर्चा भारतातच नाही तर इंग्लंड, युरोपमध्येही सुरू झाली. मध्यंतरीच्या काळात माझंही आई-वडिलांचे छत्र हरवलं होतं. मी एकटी पडले होते. तोपर्यंत काही लोकांनी मध्यस्थी करून दादाजींना फक्त पैसे हवे आहेत हे सांगितल्यावर मीही थोडे पैसे देऊन दादाजींना केस मागे घ्यायला सांगितले. पण पैशाचा हा ससेमिरा तसा थांबणार नाही म्हणून मी घटस्फोटाची केस दाखल केली.

 

हरायचं नाही, हे मी मनाशी पक्क ठरवलं होतं. मी राणी विक्टोरिया यांनाही मला घटस्फोट मिळावा. मला या लग्न बंधनातून मुक्त करावं. मला शिक्षणाची, डॉक्टर होण्याची संधी द्यावी. अशी विनंती करणारं पत्र पाठवलं आणि काय आश्चर्य त्यांनीही माझ्या बाजूने निर्णय दिला. या घडामोडींचे दोन फायदे झाले. एक म्हणजे ‘एज ऑफ कन्सेंट ॲक्ट १८९०’ हा कायदा, मी उभ्या केलेल्या मुद्द्यांमुळे संमत झाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ब्रिटिश साम्राज्याने बालविवाह प्रतिबंधक कायदा संमत केला. विवाहाचे कमीत कमी वय दहा वरून बारा केले.

 

तीन वर्षं या कोर्ट कचेरीत गेली. आता भूतकाळ मागे टाकायचा. डॉक्टर व्हायचं, आणि स्त्रियांच्या उन्नतीसाठी, स्त्री स्वातंत्र्यासाठी काम करायचं असं मनाशी ठरवलं. इंग्लंडमध्ये काही लोकांनी माझ्या शिक्षणासाठी फंड उभा केला. त्यामुळे डॉक्टर होण्याचा माझा मार्ग मोकळा झाला. हा एक मोठा फायदा मला मिळालेल्या प्रसिद्धीचा झाला. महिलांसाठी असलेल्या लंडनमधील कॉलेजमधून मी डॉक्टर ही पदवी घेतली. तिथे एक विचित्र नियम होता. मुलींना डॉक्टर होता येत होतं पण पदवीदान केलं जात नव्हतं. तिथेही मी या गोष्टीचा निषेध नोंदवला आणि एम. डी. ची परीक्षा ‘ऑन जॉईंट बोर्ड ऑफ द कॉलेज ऑफ फिजिशियन्स् अँड सर्जन्स् ऑफ एडिंबरा ॲन्ड ग्लासगो ‘ या संस्थेत दिली. चांगल्या प्रकारे उत्तीर्णही झाले. मग ‘लायसनशिएट ऑफ द रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियनस् अँड सर्जनस् ‘ ही पदवी मिळाल्यानंतर माझं नाव इंग्लंडच्या मेडिकल रजिस्टर मध्ये सनदशीर रीतीने दाखल झालं.

 

मी भारतात परत आल्यावर निरनिराळ्या इस्पितळातून नोकरी केली. माझ्यासाठी इंग्लंडमध्ये गोळा केलेल्या फंडामधून भारतात सात इस्पितळे उभी करण्यासाठी मी अर्थसहाय्य केले. नोकरीबरोबरच स्त्रियांसाठी कार्य सुरू केले. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडायची हे ठरवलेलं होतं. त्यामुळे पुन्हा लग्नाच्या बंधनात न पडता विधवा, परित्यक्ता, अनाथ बालके यांचे आश्रम काढले. त्यांना स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. स्त्रियांना घरचे लोक घराबाहेर पाठवायचे नाहीत. त्यामुळे साक्षरता वर्ग घेऊ शकत नव्हते. मग मी भजन, प्रवचन, कीर्तन या गोष्टी सुरू केल्या व त्यामधून स्त्रियांना साक्षर केलं. आरोग्य विषयक चर्चा घडवून आणल्या. हॉस्पिटलच्या कामातून निवृत्त झाल्यावर सुद्धा स्त्रिया, बालके यांच्यासाठी काम करणं शेवटच्या श्वासापर्यंत थांबवलं नाही. एकच ध्यास होता स्त्रीमुक्ती झाली पाहिजे. अस्पृश्यतेची समाजातील कीड नष्ट झाली पाहिजे. त्यासाठी व्याख्याने ठेवली. आजोबांच्या मालकीचं गावदेवीचं मंदिर सर्वांसाठी खुलं केलं. असमर्थ, दुर्लक्षित अशा समाजातील घटकांवर जास्त लक्ष केंद्रित केलं. माहित नाही किती जणींच्या लक्षात मी राहिले असेन. माझं समर्पण, माझा त्याग यांची जाणीव कुणाला झाली की नाही कुणास ठाऊक ! ९२ वर्षांचं आयुष्य मिळालं. खूप काम करता आलं त्यामुळे मी समाधानी होते.

 

– – – शेवटपर्यंत माझं एकच तत्व, एकच ध्यास होता की मी अन्याय सहन करणार नाही व इतर कुठल्याही स्त्रीवर अन्याय झाला तर तिला तो सहन करू देणार नाही !

 

—- लेख क्र. ४.

शब्दांकन : मंजिरी येडूरकर

☆

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सत्य-संकल्पाचा दातारु | बापरखुमादेवीवरु ||” – भाग-२ ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ “सत्य-संकल्पाचा दातारु | बापरखुमादेवीवरु ||” – भाग-२ ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

अशी लोकं मला भेटवून ज्ञानोबाराय नेमकं काय सुचवत असतील? अर्धवट शाळा सोडून दिलेला आणि मजुरी करणारा एक साधा माणूससुद्धा किती निष्ठेनं नेम पाळतो, अन् आपण काय करतो? आपण चालढकल करतो आणि फक्त कारणं सांगत राहतो. मानवी मनाची ती व्यवहाराची पद्धतच आहे. आपल्यासाठीच गरजेच्या असलेल्या आणि आपण स्वतःच ठरवलेल्या कितीतरी साध्या साध्या गोष्टींमध्ये सुद्धा आपण पळवाटा शोधतो, कारणं शोधतो, टाळाटाळ करतो. काहीही कारण नसतानासुद्धा आपण वेळकाढूपणा करतो.

सातत्य टिकवणं ही गोष्ट वाटते तितकी सोपी नव्हे. “मीही केलं असतं, पण मला वेळच नसतो” हे वारंवार म्हणण्यातलं सातत्य मात्र बहुतांश माणसं टिकवतात. नकारघंटा वाजवतच राहतात. मग त्या नकारघंटेचा आकार देवघरातल्या छोट्याशा घंटीएवढा असो किंवा पार त्या नारोशंकराच्या घंटेएवढा.. !

कुठल्याही साध्या वारकऱ्याचं निरीक्षण करा. काय वाटेल ते झालं तरी तो वारी चुकवत नाही. तो काहीही जुळवाजुळव करेल, पण वारी करेल. अनेक वर्षं नियमित वारी करणाऱ्या अनेक वारकऱ्यांना मी पाहतो. वास्तविक पाहता, तो वाहनाने पंढरपूरला येऊ शकतो, लॉज मध्ये राहू शकतो, ऑनलाईन दर्शन पास घेऊन भगवंताला भेटू शकतो. कुणीच कुणाला आडकाठी केलेली नाही. “वारी पायीच केली पाहिजे” असा आग्रह कुणी कुणाला केलेला नाही आणि ” पायी वारी केलीच पाहिजे ” असंही बंधन नाही. इतकंच नव्हे तर, ” वारी केलीच पाहिजे” असं सुद्धा कुणी म्हटलं नाहीय. हा वैयक्तिक आस्थेचा, श्रद्धेचा, जिव्हाळ्याचा विषय आहे आणि लोक तो आजही वैयक्तिकच मानतात.

मी अशी अनेक माणसं अगदी जवळून पाहिली आहेत, ज्यांनी पायी वारी व्रत म्हणून स्वीकारलेली आहे. वारीकडे पाहण्याची स्वतःची एक वेगळी दृष्टी त्यांनी स्वतंत्रपणे विकसित केली आहे आणि त्या अनुभवालाच ते अमृतानुभव मानतात. शिक्षण, विद्वत्ता, संपत्ती, सत्ता, सौंदर्य, आणि अपेक्षा यांचे पाश ज्यांना तोडता येतात, तेच पायी वारी करु शकतात. ज्यांचं मीपण सुटलेलं नाही, त्यांना पायी वारी शक्यतो जमतच नाही, असं माझं निरीक्षण आहे.

वारकरी भौतिक सुविधा सहज सोडू शकतात आणि जे भौतिक सुविधा सहज सोडू शकतात तेच वारकरी होऊ शकतात. बाकीच्यांना त्यात गैरसोयी दिसू शकतात, अर्थात त्याचंही स्वातंत्र्य आहेच. दहा पंधरा लाख माणसं एकाच दिवसासाठी एका छोट्या गावात मुक्कामी येतात, तर त्यांना लागणाऱ्या सगळ्या सुविधा पंचतारांकित पातळीवर देणं अशक्यच असतं. आणि वर्षानुवर्षं वारी करणाऱ्यांची तशी अपेक्षाही नाही. दहा लाख लोकांची परिस्थितीशी जुळवून घेण्याची तयारी आहे अन् एक हजार लोकांना ती गैरसोय वाटत असेल तर, शेवटी ते एक हजार लोकच वेगळे पडतात. वारी त्यांच्याशिवाय सुद्धा सुरुच राहते. आपण कुणाकडं पाहून वारीविषयी मत व्यक्त करायचं ते आपण ठरवायचं. “माऊली कुणाला काहीही कमी पडू देत नाहीत” हा अनुभव लाखो लोक स्पष्ट सांगतात, तेव्हा ‘पाचामुखी परमेश्वर’ हा न्याय त्याला नि:संशय लागू करावा.

आम्ही एका ठिकाणी विसाव्याला थांबलो होतो. मोकळी जागा होती. भुईमुगाच्या शेंगा, फुटाणे, केळी असं खाणं सुरु होतं. जागेच्या मालकांनी चहा वाटपाचा मंडप उभारला होता. सगळं कुटुंब चहा वाटत होतं. आम्ही त्या मंडपापासून थोडे लांब बसलो होतो. त्या जागा मालकांचा मुलगा आमच्यासाठी चहा घेऊन आला. रस्त्याच्या लगतची मोठी मोकळी जागा. आमच्यातला एक जण म्हणाला, ” माऊली, सोन्यासारखी जागा आहे, मोकळी कशाला ठेवलीय? हॉटेल बिटेल बांधा. भरपूर पैसा मिळेल. ” साधारण विशितला तो मुलगा म्हणाला, “इथं काही बांधकाम नाही करणार. ही जागा अडवली तर वारकरी कुठं थांबतील?” त्याच्या उत्तरातला एक नैसर्गिक आपुलकीचा स्वर अजूनही माझ्या कानात आहे आणि तो मी आयुष्यभर विसरु शकणार नाही. वर्षातल्या एका दिवसासाठी आयुष्यभराच्या आर्थिक लाभावर पाणी सोडणारे असे अनेकजण आपल्याला भेटतील. पाच मिनिटं त्यांच्याशी गप्पा मारल्या की, त्यांच्या अंतःकरणाचा उलगडा होतो.

वारीच्या आडून काहीतरी निराळाच हेतू साध्य करु पाहणाऱ्यांची संख्या जरा वाढीस लागतेय. पण वारीत नव्यानं सहभागी होणाऱ्या तरुण पिढीची संख्या त्याहून कैक पटींनी जास्त आहे. तरुणांना, तरुणींना वारी करावीशी वाटते, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दरवर्षी टप्प्याची वारी करणारेही हजारो जण आहेत. कुटुंबात वारीची परंपरा नसूनही दरवर्षी वारी करणारे अनेकजण आहेत. अनेक कारणामुळं वारी करणं जमत नसलं तरीही आपापल्या गावी वारकऱ्यांची शक्य तितकी सेवा करणारे लोक आहेत. त्यात अनेक जण उच्चविद्याविभूषित आहेत, विद्यावाचस्पती आहेत, उद्योजक आहेत, व्यावसायिक आहेत, नोकरदार आहेत. शेतकरी तर बहुसंख्य आहेत.

अनुभवाशिवाय, प्रचितीशिवाय एवढा मोठा समुदाय कुठल्याही परंपरेला सुरु ठेवेल, असं वाटत नाही. दुसऱ्यानं स्वार्थापोटी उभ्या केलेल्या भ्रमाला आपण भुलू नये, एवढं शहाणपण त्यांच्यात निश्चित आहे. म्हणूनच, तर संप्रदायाची चौकट ते आनंदानं स्वीकारतात आणि आयुष्यभर पाळतात. स्वाभाविकच प्राणमय कोषापासून ते आनंदमय कोषापर्यंतचा त्यांचा प्रवास ते स्वतः अनुभवतात. आता कुणाची शब्दसंपदा कितीही संपन्न असली तरीही त्या आनंदाचं वर्णन शब्दांत करणं भल्याभल्यांना साधलेलं नाही.

“माऊली कधी कुणाला कमी पडू देत नाहीत” ही श्रद्धा भाबडी की रोकडी? असा शास्त्रार्थच करायचा झाला तर माऊलींची रोकडी प्रचिती असलेले ठायीठायी भेटतील. ज्याचा संकल्प सत्याचा आहे, त्याला माऊलींच्या अस्तित्वाचा, त्यांच्या सोबतीचा अनुभव येतोच. ‘जो जे वांछील तो ते लाहो’ असं ते स्वतःच म्हणतात, तेव्हां ते आपल्यासारख्या सगळ्यांचाच कैवार घेत असतात. माऊलींनी आपलाच घेतलेला कैवार समजतो की नाही, हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न.. ! 

– समाप्त –

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सत्य-संकल्पाचा दातारु | बापरखुमादेवीवरु ||” – भाग-१ ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ “सत्य-संकल्पाचा दातारु | बापरखुमादेवीवरु ||” – भाग-१ ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

वारीत माझी एका तरुणाची भेट झाली. वारीच्या वाटेवर तो भाविकांना गंध बुक्का लावण्याची सेवा करतो. अगदी दरवर्षी नियमितपणे वारी करतो. जागा मिळेल तिथं पथारी पसरुन झोपतो, मिळेल तिथं आंघोळ करतो, जिथं मिळेल तिथं जेवतो. महिनाभर गंधसेवा करतो. पैसे ऐच्छिक असतात.

“माऊली, बाकी वर्षभर पोटापाण्यासाठी काय करता? ” मी विचारलं. “मी लाकडाच्या गोडाऊन मध्ये कामाला हाये. सात हजार पगारावर.. ” त्यानं ठसक्यात सांगितलं.

“सात हजारात महिना? माऊली, आता गॅस सिलेंडरच हजाराच्या घरात गेला की. एवढ्या महागाईत घर कसं चालायचं? ” 

“गॅस लागतच नई. लाकडाचं सरपण मिळतंय मला. कांडी कोळसा आणला की झालं. “

“पण बाकी खर्च असतोच ना. ” 

“बायको यार्डात धान्य निवडायला जाती. तिला अर्धी हजेरी २०० रुपये अन् पूर्ण हजेरी ३०० रुपये पडती. तिचे पैशे येतातच ना. तेवढ्यात भागतंय आपलं. ” तो एकदम आनंदात सांगत होता.

“मग हे गंध बुक्क्याचं काम करुन किती पैसे मिळतात? ” मी उत्सुकतेनं विचारलं.

” माऊली कधी कुणाला कमी पडू देत नाहीत. रोजचा तीनशे चा नेम आहे माझा. ” 

” तीनशेचा नेम म्हणजे? माझ्यासाठी हा प्रकारच नवीन होता. ” 

” वारीला प्रस्थानाच्या आधी माउलींना भेटतो, दर्शन घेतो आणि नेम धरतो. तीनशेचा नेम म्हणजे रोज तीनशे जणांना गंध लावायचं. त्याशिवाय दिवस पुरा करायचा नाही. पैशे किती मिळतात ते बघायचं नाही. ” 

“मग मिळतात का पैसे? “

” हो तर. निदान रुपया तरी देतातच लोकं. कुणी रुपया देतात, कुणी दोन रुपये, कुणी पाच रुपये, कुणी दहा रुपये पण देतात. माऊली तळावर समाज आरती असती. तिथं आरतीला उभा राहतो. नंतरच दिवस मोजतो. रात्री जिथं कुठं प्रसाद सुरु असेल तिथं घेतो. जागा मिळेल तिथं बसून दुसऱ्या दिवशी साठी गंध भिजवतो अन् मग झोपतो. “

” चांगलंय की मग तुमचं. ” मी सहज बोलून गेलो.

” हो तर. पण कधी कधी परीक्षा बघतात देव. आज परीक्षाच होती. एक तास झाला, गंध लावून घ्यायला कुणी तयारच होईना. तीनशेला एकच कमी होता. पण इतकी लोकं असूनसुद्धा मला तासभर कुणी मिळालं नाही. शेवटी तुम्ही सापडलात. माझा नेम पुरा झाला. ” त्याला आनंद झाला होता.

” पण एखाद्या दिवशी समजा नाहीच तीनशे पूर्ण झाले तर काय बिघडणार आहे? आता आज एकच राहिला होता ना? तो उद्या मिळाला असता. देव काय शिक्षा करणार आहे का? ” मी म्हटलं.

“अहंकाराचा वारा न लागो राजसा” असं संतवचन आहे ना, ते “उफराट्या नवमतवादाचा वारा न लागो राजसा” असं म्हणायला पाहिजे. ज्यातलं आपल्याला काही ढेकळं कळत नसतं, त्यातही स्वतःचं शहाणपण दाखवण्यासाठी “ह्याला काय होतंय? “, “देव काय स्वतः असं सांगतो का? “, “हेच कर्मकांड आहे” असला अर्धवटपणा अनेक लोक करत असतात. स्वतःला काही कळत नसतं, समजून घ्यायचं नसतं, करायचं तर त्याहून नसतं. पण करणाऱ्याच्या डोक्यात हळूच पिल्लू सोडण्यात मात्र ही माणसं तरबेज असतात. एखाद्याच्या श्रद्धेवर आपल्या मनोरंजनासाठी शंका घेणं हा एक मोठा अपराध. आपणही कधी कधी आपल्याही नकळत यांच्या पंगतीला जाऊन बसतो. मोठी चूक होते. मी म्हटलं खरं, पण आपण चुकीचं बोललो आहोत हे पुढच्याच क्षणी लक्षात आलं.

“एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, असंच असायला पाहिजे. तीनशे जणांना गंध लावायला देवानं मला सांगितलं होतं का? मीच देवांना तसं सांगितलं. आपला शब्द आपण पाळायला पाहिजे. ” तो सहजपणे म्हणाला. दिलेल्या शब्दाची पूर्ण जबाबदारी घेण्याची आणि तो शब्द पाळण्यासाठी वाटेल तितके कष्ट करण्याची त्याची तयारी होती.

केवळ पैसे कमावण्यापुरतीच बाब असती तर तो वारीत दुसरं काहीही विकू शकला असता. वारीत गंध- बुक्का लावणारे जसे असतात तसेच, चहा विकणारे असतात, ऊसाचा रस विकणारे असतात, चपला विकणारे असतात, कपडे विकणारे असतात आणि अगदी तंबाखू चुना विकणारेही असतात. पण यापेक्षा गंध बुक्का लावण्याचं काम करणं त्याला योग्य वाटलं.

“मी वारीत गंध बुक्का लावतो म्हणजे देवाचं काम करतो, धर्माचं काम करतो” अशी त्याची श्रद्धा. स्वतःच्या कृतीमधून, कर्मामधून प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही साधणारा तो तरुण मला फार श्रेष्ठ वाटला. आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही त्यानं माऊलींची वारी सोडली नाही अन् माऊलींनीही त्याला सोडलं नाही. त्याचा नेम रोज पूर्ण करुन घेतला..!

प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. त्याचे प्रश्न वेगळे असतात. अडचणी असतात. विवंचना असतात. लाखो माणसं अशी आहेत, ज्यांच्या खिशात पैसे नाहीत. कित्येकजण रोजंदारीवर, मजुरीवर काम करतात. त्यांना रोज काम करुन घर चालवावं लागतं. पण तरीही तो वारीला पर्याय शोधत नाही. काहीही झालं तरी तो वारी करतोच. पंचवीस दिवस वारीत चालायचं अन् रोज नेमानं तीनशे जणांना गंध लावायचं. म्हणजे जवळपास साडे सात हजार लोकांना गंध लावायचं. सोपं नाहीय हे सगळं..!

– क्रमशः भाग पहिला 

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

अन्याश्रयाणा त्यागोनन्यता ।|

अर्थ : नारद महाराज सध्या आपल्याला आपल्या सद्गुरूंच्या किंवा आपल्या आराध्य देवतेच्या बाबतीत अनन्यता कशी असावी हे सांगत आहेत.

विवेचन — 

समर्थांनी करुणाष्टके लिहिली आहेत. त्यामध्ये एक चरण पुढील प्रमाणे आहे… 

मुक्त केल्या देवकोटि भूभार फेडिला बळें । भक्तासि आश्रयो मोठा बुद्धि दे रघुनायका ॥९॥

(अष्टक क्रमांक ५)

यात ते प्रभू श्रीरामाला म्हणतात की तुझा आमच्या सारख्या भक्तांना मोठा आश्रय वाटतो, आधार वाटतो…!

पूर्वी राजेशाही होती. तेव्हा अनेक विद्वान, कलाकार मंडळी राजाकडे आश्रय मागत असत. तर काही वेळेस स्वतः राजा समोरच्या व्यक्तीचे गुण हेरून त्याला आश्रय देत असे. अशावेळी त्या आश्रिताचा संपूर्ण भार त्या राजावर असे.

मागील श्लोकांत आपण पतिव्रता आणि पती यांचे उदाहरण पाहिले. इथे नारद महाराज अनन्यातेचा थोडा वेगळा भाव सांगत आहेत. सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास भागवतांचे आश्रित होऊन राहणे. सर्वसामान्य आश्रित असतात, त्यांना त्यांच्या आयुष्यात फार आवडनिवड ठेवता येत नाही. समजा एखादा कलाकार एखाद्या राजांच्या आश्रयाला आहे, तर त्या आश्रित कलाकाराला राजाच्या इच्छेनुसार आपली कला सादर करावी लागते, त्यासाठी त्याला सदैव तत्पर असावे लागते. राजाची मर्जी किंचितही कमी होणे, त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न ठरू शकतो. अशावेळी त्या आश्रितास अखंड सावधान आणि अतिशय तत्पर रहावे लागते.

नारद मुनी भक्ताला हेच करायला सांगतात. की तू ज्याप्रमाणे भगवंत ठेवेल त्याप्रमाणे राहण्याची मानसिक तयारी ठेव किंवा मनाची अशी जडणघडण कर की तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेत तुला भगवतांचा हात दिसेल.

संत तुकाराम महाराजांसारखे भक्त आपल्या मनाची अशी मशागत करतात आणि मग त्यांच्या मुखातून त्यांची मनोभूमिका अभंगाच्या रूपात प्रकाशित होते.

कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता ।

बहिणी बंधु चुलता कृष्ण माझा ॥१॥

कृष्ण माझा गुरू कृष्ण माझें तारूं ।

उतरी पैल पारू भवनदीचा ॥ध्रु. ॥

कृष्ण माझें मन कृष्ण माझें जन ।

सोइरा सज्जन कृष्ण माझा ॥२॥

तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा ।

वाटे न करावा परता जीवा ॥३॥

(सार्थ तुकाराम गाथा अभंग क्रमांक २३३, धार्मिक प्रकाशन संस्था)

ज्याला भक्त व्हायचे असेल त्याने सर्वात आधी तक्रार करणे बंद केले पाहिजे असे सर्व संत सांगतात. तू जसा ठेवशील तसा राहीन, पण तुझ्या नामाचे गुणगान करीन. अशी मनोभूमिका तयार होणे हे उत्तम साधकाचे लक्षण म्हणता येईल.

श्रीगोंदवलेकर महाराज म्हणायचे की संत तुकाराम महाराजांचे जीवन प्रापंचिक साधकांसाठी अधिक आदर्शवत आहे.

संत तुकाराम महाराजांचे चरित्र आपण अभ्यासले असेल. भक्तीमार्ग आचरायला लागल्यावर त्यांच्या आयुष्यात अनेक घटना घडल्या. आईवडिलांचे छत्र हरपले, मोठा भाऊ संसार सोडून तीर्थयात्रेला निघून गेला आणि धाकट्या भावाने वाटणी मागितली, त्यात अस्मानी संकट आले. “न भूतो…! ” असा दुष्काळ आला. महाभयंकर दुष्काळ होता तो. त्याकाळात लाखो माणसे देशोधडीला लागली, लाखों जीव प्राणास मुकले, याची झळ तूक्याच्या कुटुंबाला बसणे हे ही स्वाभाविक होते. तसा तो बसलाही आहे. कुटुंबातील अनेक माणसे अन्न अन्न करीत प्राणास मुकली. एक काळी सावकार असलेल्या कुटुंबास घासभर अन्नास मोताद व्हावे लागले. कल्पना करा, सावकार असलेल्या कुटुंबावर अन्न-अन्न करण्याची पाळी आली तर त्यांची काय मनःस्थिती असेल. जे कुटुंब अनेकांचा पोशिंदा होते त्यावर भिकेची पाळी यावी!! यापेक्षा ‘दैवदुर्विलास’ काय असू शकतो. त्याकाळातील शेतकरी दुष्काळ आला म्हणून आत्महत्या करून कर्तव्यच्युत होत नव्हते, त्यामुळे या तुक्यानेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न सोडून देऊ, कधी विचारही केला नाही. त्याने यातून धीराने मार्ग काढायचा प्रयत्न केला आणि ‘प्रयत्नांनी परमेश्वर’ या उक्तीनुसार ते यशस्वीही झाले. त्यांनी विठ्ठलाचा आश्रय सोडला नाही. देव परीक्षा पाहत असतो. त्यात जो यशस्वी होतो, त्याला भगवंत हृदयाशी धरतो.

आणिक एक उदा. पाहू.

रावणाने हाकलून लावल्यावर बिभीषण श्रीरामाच्या आश्रयाला आला. लंका जिंकण्याआधी रामाने त्याचा राज्याभिषेक केला आहे. नुसता राज्याभिषेक करून प्रभू थांबले नाहीत, त्याला चिरंजीवपद प्रदान केले. दैनंदिन व्यवहार करताना मनुष्याला अनेक लोकांना शरण जावे लागते, त्याचे आश्रित बनून रहावे लागते. पण जो रामाला शरण जातो, त्याला……!!

!! जय जय रघुवीर समर्थ !!

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. १० 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares