मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुहास्य तुझे मनास मोही… भाग -2 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

?मनमंजुषेतून ?

☆ सुहास्य तुझे मनास मोही… भाग -2 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

(— म्हणून ‘एखादी तरी स्मितरेषा…’ असे म्हणावे लागते.) इथून पुढे —-

पण आपण जर खळखळून हसलो तर त्याचे अनेक फायदे होतात. चेहऱ्याच्या स्नायूंना व्यायाम मिळून चेहरा प्रसन्न दिसतो. हृदय, फुफ्फुसानाही अधिक प्राणवायू मिळतो, व्यायाम होतो. असं म्हणतात की चालणाऱ्याचं नशीब चालतं, बसणाऱ्याचं नशीब बसून राहतं. त्याच धर्तीवर हसणाऱ्याचं नशीबही हसतं, रडणाऱ्याचं नशीबही रडतं असं म्हणायला हरकत नाही. हसतमुख असणारी माणसं संकटांना अधिक चांगल्या प्रकारे सामोरे जाऊ शकतात. 

नॉर्मन कझिन्स या नावाचा एक पत्रकार होता. तो एका दुर्धर आजाराने बिछान्याला खिळून होता. रुग्णालयात त्याच्यावर अनेक प्रकारचे उपचार सुरु होते. अनेक प्रकारची वेदनाशामक औषधें घ्यावी लागत होती. त्याशिवाय त्याला झोप लागत नव्हती. एक दिवस त्याने चार्ली चॅप्लिनचा चित्रपट बघितला. तो खळखळून हसला. त्याला असे आढळून आले की त्या दिवशी त्याला वेदनाशामक औषधांशिवाय झोप लागली. मग त्याने विनोदी साहित्य वाचायला सुरुवात केली. औषधोपचारांच्या जोडीला रोज तो खळखळून हसू लागला आणि काय आश्चर्य ! काही दिवसांनी तो पूर्ववत बरा झाला. त्याची वेदनाशामक औषधे थांबली. तो पूर्ववत सगळी कामे करू लागला. आपल्या अनाटॉमी ऑफ इलनेस या पुस्तकात त्याने ही सगळी माहिती लिहून ठेवली आहे. त्याला असे आढळून आले की आपण जेव्हा हसतो तेव्हा आपल्या शरीरात एन्डॉर्फिन नावाचा एक स्त्राव स्त्रवतो. हे एन्डॉर्फिन वेदना शांत करण्याचे कार्य करते. मनाची मरगळ दूर करते आणि आपल्याला ताजेतवाने वाटते. खळखळून हसण्याने रक्तदाब आणि रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. शरीरातील अँटीबॉडीजचे प्रमाण वाढते. प्रख्यात मानसशास्त्रज्ञ डॉ सिगमंड फ्राईड यांनीही हसण्याचे फायदे सांगताना हसण्यामुळे मनातील राग, द्वेष, ताण तणाव यासारख्या नकारात्मक भावना नष्ट होतात असे म्हटले आहे. हसण्याबद्दल लिहिताना नॉर्मन कझिन्स म्हणतो, ‘ हसणं हे एखाद्या ब्लॉकिंग एजंटसारखं आहे. ते जणू बुलेटप्रूफ जाकीट आहे. नकारात्मक भावनांपासून ते तुमचं रक्षण करतं. ‘ 

विनोदी चित्रपट, विनोदी नाटके यांना लोकांची कायमच पसंती असते ती यामुळेच. तास दोन तास खळखळून हसल्याने मनातली मरगळ निघून जाते, नकारात्मक भावनांचा निचरा होतॊ आणि आपल्याला प्रसन्न वाटू लागते. पु ल देशपांडे, आचार्य अत्रे, मार्क ट्वेन यांच्यासारख्या लेखकांचे विनोदी साहित्य म्हणजे अक्षय आनंदाचा ठेवा आहे. मधुकर तोरडमल हे विलक्षण ताकदीचे कलाकार होते. त्यांच्या ‘ तरुण तुर्क म्हातारे अर्क ‘ या नाटकातील ‘ ह हा हि ही ‘ ची बाराखडी कमालीची मजा आणते. त्यातून वेगळा विनोद, वेगळा अर्थ निर्माण होतो. प्रत्यक्ष जीवनातही आपल्याला या ‘ ह ‘ च्या बाराखडीचा वापर करणारे पुष्कळ लोक भेटतात. त्यांचं बोलणं ऐकताना मोठी मजा येते. प्रसंगी स्वतःच्या चुकांवरही हसता आले पाहिजे. अशी माणसे मनाने निर्मळ असतात. 

पूर्वी आमच्याकडे एक दूधवाला दूध घालण्यासाठी यायचा. तो ‘ दूध घ्या ‘ म्हणायच्या ऐवजी त्याच्या खर्जातल्या आवाजात  ‘ चला, भांडं घ्या ‘ असं म्हणायचा. मला त्याची खूप गंमत वाटायची. आमच्याकडे भांड्याधुण्यासाठी येणाऱ्या बाई बाहेरच उभ्या राहून फक्त ‘ ताईsss ‘ असा आवाज देतात. मग आपण समजून घ्यायचं की त्यांना भांडीधुणी करायची आहेत. कधी कधी एखाद्या ठिकाणी स्फोटक किंवा तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आणि अशा वेळी कोणी एखादा हलकाफुलका विनोद केला तर वातावरणातील तणाव लगेच निवळायला मदत होते. आमच्या शाळेत घडलेला एक किस्सा आहे. एकदा वार्षिक परीक्षा सुरु असताना झालेल्या पेपर्सचे गट्ठे तपासण्यासाठी शिक्षकांना वाटप करण्यात येत होते. विद्यार्थी आणि वर्गसंख्या वाढल्याने एका शिक्षिकेला तपासण्यासाठी जास्त पेपर्स दिले गेले. साहजिकच त्या चिडल्या. तेथे असणाऱ्या अधिकाऱ्यांचे आणि त्यांचे दोन दोन शब्द झाले. वातावरण तापले. त्या शिक्षिका रागाने त्या अधिकाऱ्याला विचारू लागल्या, एवढे पेपर्स मी कसे तपासायचे ? ‘ एक ज्येष्ठ पण मिश्किल शिक्षक तिथे हजर होते. ते म्हणाले, ‘ लाल पेनने तपासा…’ आणि एकदम हास्याचा स्फोट झाला. तणावपूर्ण वातावरण क्षणात निवळले आणि गंमत म्हणजे त्या शिक्षिकाही हास्यात सामील झाल्या. 

हसण्याची क्रिया ही अशी एक क्रिया आहे की ज्यामध्ये आपल्या मेंदूचा डावा आणि उजवा भाग एकाच वेळी काम करतात. आपण ऐकलेली गोष्ट किंवा वाचलेली गोष्ट मेंदूचा डावा भाग समजून घेतो. उजवा भाग ती गोष्ट गंभीर आहे की विनोदी याची छाननी करतो. विनोदी गोष्ट असेल तर आपल्याला हसू येते. अशा रीतीने शरीराचे सर्व अवयव जेव्हा एकत्र येऊन काम करतात तेव्हा ते काम उत्तम होते. व्यायाम, हसणे, चालणे यासारख्या गोष्टीत आपल्या शरीरातील सर्व अवयवांचा सुरेख समन्वय घडतो. आरोग्यासाठी जसा उत्तम आहार आणि व्यायाम महत्वाचा तसाच निरोगी मनासाठी हास्योपचारही महत्वाचा. 

सखी शेजारिणी तू हसत राहा या गीतात ते सखी शेजारणीला उद्देशून म्हटले असले तरी ते आपल्या सगळ्यांसाठी पण आहे असे समजायला हरकत नाही. ‘ प्रकाशातले तारे तुम्ही ‘ या कवितेत कवी उमाकांत काणेकर म्हणतात, ‘ रडणे हा ना धर्म आपुला, हसण्यासाठी जन्म घेतला. ‘ पुढे ते म्हणतात, ‘ सर्व मागचा विसरा गुंता, अरे उद्याच्या नकोत चिंता…’ खरंच मागचा सगळा गुंता, समस्या टाकून देऊन हसता आले पाहिजे म्हणजे ‘ आनंदाच्या शिखरावरती खुशाल जाऊन बसा ‘ अशी स्थिती प्राप्त होईल. 

– समाप्त – 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सुहास्य तुझे मनास मोही… भाग -1☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

?मनमंजुषेतून ?

☆ सुहास्य तुझे मनास मोही… भाग -1 ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

अशी कल्पना करू या की बाजारात आपण फेरफटका मारायला गेलो आहोत. एका दुकानात तऱ्हेतऱ्हेचे मुखवटे विक्रीस ठेवले आहेत. काहींचा चेहरा हसरा आहे, काही रागट आहेत, काही रडके आहेत, काही उदास दीनवाणे आहेत तर काही भयंकर किंवा भेसूर वाटताहेत. असे वेगवेगळे भाव त्यांच्या चेहऱ्यावर आहेत. आपल्याला सांगितले की तुम्ही यातून तुम्हाला जो आवडेल तो चेहरा निवडा. आपण सगळे कोणता चेहरा किंवा मुखवटा पसंत करू ? तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे. हसतमुख असलेला मुखवटा कोणीही हसत हसत पसंत करील. आपल्या जीवनातही असेच आहे. हसतमुख, सुहास्य मुखावर विलसत असलेली व्यक्ती सर्वांना हवीहवीशी वाटते. काही काही लोक अगदी प्रतिकूल परिस्थितीतही आनंदी राहतात तर सगळे काही अनुकूल असूनही काहींच्या चेहऱ्यावर कायम बारा वाजलेले असतात. 

आमचे एक नातेवाईक होते. त्यांचा चेहरा नेहमी गंभीर असे. त्यांच्या शेतात आमचाही वाटा असणारी काही आंब्याची सामाईक झाडे होती. वर्षातून एकदा आंबे आल्यानंतर ते माणसं लावून उतरवावे लागत. असे आंबे उतरवून ते त्यांच्या घरी बैलगाडीने घेऊन येत. मग आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांना उतरवण्याचा आणि आणण्याचा जो काही खर्च आला असेल तो देऊन आंबे घरी आणत असू. आंबे कधी येतात आणि काकांचा निरोप कधी येतो याची आम्ही वाटच पाहत असू. तर आंबे उतरवले की काका आमच्या घरी ते सांगायला येत असत. अर्थात ते कशासाठी आले आहेत याची आम्हाला अजिबात कल्पना नसायची. ते माझ्या वडिलांपेक्षा वयाने मोठे असल्याने त्यांना नावाने हाक मारत. हाश हुश्श करीत घरात प्रवेश करीत. आधी मला हाक मारून, ‘ विश्वास, पाणी आण. ‘ असे म्हणत. मी पाणी दिले की, ‘ विष्णू कुठे आहे ? ‘ अशी माझ्या बाबांच्या संदर्भात विचारणा करीत असत. मग वडील समोर आले की, ‘ विष्णू, अरे आंबे आले आहेत खेड्यावरून. ते घेऊन जा बाबा. ‘ तोपर्यंत आम्ही सगळे मानसिक तणावात असायचो. आम्हाला वाटायचे की काका काहीतरी गंभीर बातमी घेऊन आले आहेत. पण आंबे आले आहेत ही तर आनंदाची बातमी असायची. पण एवढी आनंदाची बातमी देखील ते अत्यंत गंभीरपणे सांगायचे. मग लक्षात आले की अरे हा तर यांचा स्वभावच आहे. मग मनातल्या मनात त्यांचे नाव गंभीरराव ठेवले होते. 

Smile and the world smiles with you असे एक छान इंग्रजी वाक्य आहे. तुम्ही हसलात तर जग हसेल. तुम्ही जसे असाल तसेच जग तुम्हाला वाटेल. लहान मुलं किती आनंदी असतात ! त्यांच्याकडे पाहिले की आपल्यालाही आनंद वाटतो. आनंदही एखाद्या व्हायरस सारखा असतो. तो सभोवताली पसरत जातो. भोवतालच्या माणसांना आपल्या आनंदात सामील करून घेतो. अशा वेळी चेहऱ्यावर गंभीरतेचा मास्क लावायचा नसतो. त्यात सामील व्हायचे असते. लहान मुलं खूप आनंदी का असतात यामागील कारणाचा आपण कधी विचार केला आहे का ? त्याचे कारण आहे ती दिवसातून अनेक वेळा खळखळून हसतात. त्यांना काही कारण लागत नाही. ते हसतात म्हणून आनंदी असतात. आणि आनंदी असतात म्हणून हसत राहतात. 

जसजसे आपले वय वाढते तसतसे आपले हसणे कमी होत जाते. पण हे तितकेसे खरे नाही. आपले हसणे कमी होत जाते म्हणून आपले वय वाढत जाते. सदैव हसतमुख असणारी माणसे वयाला पराभूत करतात. वय ही त्यांच्यासाठी फक्त एक संख्या असते. आपण जेव्हा एखाद्या मंदिरात जातो तेव्हा तेथील देवाच्या मुद्रेवरचे प्रसन्न भाव पाहून आपलेही मन आनंदित होते. परमेश्वर आनंदस्वरूप आहे. म्हणूनच परमेश्वराच्या मूर्ती कायम प्रसन्न असतात. श्रीकृष्णाचे वागणे बोलणे कसे होते हे आपण प्रत्यक्ष तर पाहिले नाही पण आतापर्यंत त्याच्याबद्दल जे काही वाचले, मालिकांमध्ये पाहिले, त्या सगळ्यात त्याच्या प्रसन्न आणि हसतमुख व्यक्तिमत्वाचा प्रभाव आपल्यावर पडतो. संकटांना सुद्धा हसतमुखाने सामोरे जा ही आपल्या राम कृष्ण आदी देवांनी दिलेली आपल्याला शिकवण आहे. आपण नेमकी तीच विसरतो. 

साधना, तपश्चर्या करणाऱ्या मंडळींच्या, साधू संतांच्या मुखावर एक विलक्षण तेज आणि प्रसन्नता विलसत असते. त्यांची मुद्रा कायम आनंदी असते. कारण हा आनंद आतून एखाद्या फुलासारखा उमलून आलेला असतो. वृत्ती आनंदी असली की आपला चेहरा ती आपोआपच दर्शवतो. चेहरा हा मनाचा आरसा आहे. मन स्वच्छ तर चेहरा स्वच्छ. चेहऱ्यावर मुखवटे लावून फिरणारांची गोष्टच वेगळी. त्यांच्याबद्दल मी बोलत नाही. पण शरीराच्या स्वच्छतेसाठी जसा साबण आवश्यक तसाच मनाच्या निर्मळतेसाठी हास्ययोग आवश्यक. परमेश्वराने हास्य ही मानवाला बहाल केलेली देणगी आहे. इतर कोणत्याही प्राण्याला ती नाही. गोष्टीतले प्राणीच फक्त हसतात. 

समोरच्या ओळखीच्या व्यक्तीला पाहून तर आपण स्मितहास्य करतोच पण अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात आल्यानंतरही आपण जर सुहास्य मुद्रेने त्यांना सामोरे जाऊ शकलो तर संबंधात एक मोकळेपणा, नैसर्गिकपणा येतो. काही व्यक्ती हसण्यातही काटकसर करतात. मोजून मापून हसतात. कोणी कोणी तर चेहऱ्यावरची गंभीरतेची इस्त्री मोडू देत नाहीत.

— म्हणून ‘ एखादी तरी स्मितरेषा…’ असे म्हणावे लागते. 

– क्रमशः भाग पहिला. 

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे 

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ॥ अगा वैकुंठीच्या राया॥ ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

सुश्री विनिता तेलंग

? मनमंजुषेतून ?

☆ ॥ अगा वैकुंठीच्या राया॥ ☆ सुश्री विनिता तेलंग

(॥ विठ्ठल नामाचा रे टाहो ॥)

‘हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले मजलागी जाहले तैसे देवा ‘ म्हणणारी कान्होपात्रा !

समस्त संतजन माथ्यावर काही ना काही दुःखभार घेऊनच चालत होते .पण कान्होपात्रेची व्यथा आपण कधी समजू तरी शकू का , असं वाटतं .गणिकेच्या पोटी जन्माला आल्यानं कुणाचं तरी प्रियपात्र होऊन रहाणं हा भोग तिला अटळ होता .पण मंगळवेढ्याच्या पवित्र भूमीत तिला जन्माला घालून परमेश्वरानं तिला जणू उःशापच दिला .ती वारकर्‍यांसमवेत पंढरपूरला आली नि तिला तिचा अलौकिक प्रियतम गवसला .

पण तिची वाट तर पतित म्हणवल्या गेलेल्या हीन जातीच्या भक्तांपेक्षा दुष्कर होती .कारण तिच्या देहावरचा तिचा अधिकारही मुळी समाजाला मान्य नव्हता .जर तिनं बिदरच्या बादशहाची आज्ञा मानली असती ,तर तिच्या पायाशी सारी सुखं आली असती .पण तिच्या मनात त्या सावळ्याच्या अलौकिक प्रेमाचा दीप उजळला होता .त्यापुढं तिला आता देहभाव, देहलावण्य ,देहसज्जा काहीच नको होतं .पण तिचा हा आकांत ऐकणारं तरी कोण होतं ? एका त्या पतितपावनाचाच काय तो तिला भरवसा वाटत होता .पण त्याच्याकडे जाण्याची वाट तरी सोपी कुठं होती ? एक विठ्ठलाशिवाय कुणाचाही अधिकार न मानणारं तिचं मन व तिचं शरीर जेव्हा वासनेची शिकार बनायची वेळ आली तेव्हा तिला सुटकेचा कोणताही मार्ग उरला नाही .आता देहत्याग करुन त्याच्या रुपात विलीन होऊन जाणं हेच तिच्या हातात होतं .तिथवरचा प्रवास धैर्यानं तिलाच करायचा होता… एकटीला. पण तेही सर्वस्वी आपल्या हातात कुठं असतं ? त्यानं बोलवावंच लागतं .मग त्याला हाक घालायची .

कान्होपात्रेचा अवघ्या आठ ओळींचा अभंग.. .संगीत संत कान्होपात्रा या नाटकाकरता मा.कृष्णराव व विनायकबुवा पटवर्धन यांनी भैरवीत बांधलेली अप्रतिम चाल. बालगंधर्वांनी गाऊन अजरामर केलेलं हे पद म्हणजे मूर्तीमंत आर्तता आहे .पूर्ण होऊन पूर्णात विलीन होण्याचा हा भाव ……  अशावेळी त्याला बाकीचं काहीच सांगावं लागत नाही … काही मागणं, काही मनीषा उरलेलीच नाही ….. फक्त त्याला हाक मारायची आणि त्यानं ये म्हणायचं …..

अगा वैकुंठीच्या राया

अगा विठ्ठल सखया

अगा नारायणा

अगा वसुदेवनंदना

अगा पुंडलिक वरदा

अगा विष्णू तू गोविंदा

अगा रखुमाईच्या कांता

कान्होपात्रा राखी आता ॥

लौकिक जगापेक्षा मौल्यवान असं वैकुंठाचं सुख मला भोगायचंय .तुझं सख्यत्व अनुभवायचंय .नरदेह सोडून नारायणत्वात मिसळून जायचंय .वसुदेवनंदनाला भेटायचं आहे . पुंडलीकासारखा वरप्रसाद हवा आहे .तूच सर्वपालक श्रीविष्णू आहेस.  तूच गोविंद आहेस .रखुमाईकरता सारं सोडून आलास तसं मलाही तुजकडे बोलाव ! —-

— त्याच्या सगळ्या नावांनी त्याला हाक मारुन शेवटी फक्त एका ओळीत मागणं मागितलंय की बाकी काही तुला सांगायला नकोच .माझं सत्व राख !

तिला समाजानं पतितेचं स्थान दिलं होतं , तिचं कर्म न पहाता .जन्मानं असो वा कर्मानं , पतिताला जेव्हा स्वतःला त्यातून बाहेर पडायची इच्छा होते, तेव्हा तो हात पुढे करतोच. कोणत्याही संकटात त्याला आर्ततेनं केलेला धावा ऐकू जातोच .

आपणही तेवढंच करायचं .त्याला मनापासून हाक मारायची …

अगा वैकुंठीच्या राया !……

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ॥ आता जाग बा विठ्ठला॥ ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

सुश्री विनिता तेलंग

? मनमंजुषेतून ?

☆ ॥ आता जाग बा विठ्ठला॥ ☆ सुश्री विनिता तेलंग

(॥ विठ्ठल नामाचा रे टाहो ॥)

प्रभातसमयो पातला, आता जाग बा विठ्ठला ! 

संत जनाबाई या चित्रपटातली ही भूपाळी रचली ‘आधुनिक संत ‘ ग.दि .माडगूळकर म्हणजे गदिमांनी .सुधीर फडके म्हणजे बाबूजींचं संगीत आणि स्वरही त्यांचाच. विठ्ठल, चित्रपट ,गदिमा ,बाबूजी अशी मराठी माणसाची सगळी प्रेमं एकाठायी एकवटलेल्या गीताची माधुरी अवीट असणारच ! 

१९४९ साली हा चित्रपट आला .१ जून १९२९ ला स्थापन झालेल्या प्रभात कंपनीची तुतारी चांगलीच दुमदुमू लागली होती .गदिमा व बाबूजी ही जोडीही गीत संगीतामुळं लोकप्रिय होत होती .पण दुसर्‍या महायुद्धाच्या काळात कच्च्या फिल्मच्या तुटवड्यामुळे चित्रपटनिर्मितीला परत उतरती कळा लागली .त्यातच हिंदी चित्रपटांची स्पर्धा सुरु झालेली .त्यात टिकून रहाण्याकरता प्रभातनंही अनेक हिंदी चित्रपट काढले .प्रभातचा शेवटचा चाललेला मराठी चित्रपट म्हणजे ‘ संत जनाबाई .’ 

गदिमांनी चित्रपटांकरता अनेक अभंग लिहिले .अनेकदा ज्या संतावरचा तो चित्रपट आहे त्याच्या रचनांव्यतिरिक्तही काही रचना चित्रपटाची गरज म्हणून हव्या असत . गदिमांच्या या रचना पाहिल्या तर ते त्या संतांचेच अभंग वाटावेत इतक्या त्या शब्द व भाव यांनी संतरचनांच्या जवळ जातात .

प्रभातसमयो पातला ,आता जाग बा विठ्ठला ! 

विठ्ठलाच्याच निद्रिस्त रूपासारखी भासणारी निशा सरते आहे .. आकाशाचा निळसर काळा पडदा हळूहळू उतरतोय नि तिथं उगवतीचा लालिमा फुटायच्या बेतात आहे .. चंद्रभागेच्या काठची वाळू ओलसर झाली आहे नि तिचं पाणी सुटलेल्या पहाटवार्‍यांनी हळूहळू हेलकावे घेतं आहे ..वाळवंटात देवळाच्या प्रांगणात विठ्ठलाचे भक्तगण जमलेत. आत तो त्रिभुवनाचा स्वामी निद्रेत आहे .खरंतर तो अहर्निश जागृत आहे म्हणूनच तर हे विश्व चालतंय ..आपण त्याला आपल्या त्रासापासून थोडा काळ मुक्ती देतो ! मग आता परत आपली गार्‍हाणी ऐकवण्याकरता त्याला सामोरं जायचं तर त्याला आधी हळुवारपणे विनंती करायला हवी ! मग त्याच्या अंगणात दाटी करायची .टाळ मृदंगाचा दंगा न करता हलकेच वीणेच्या एकतारीच्या साथीनं ,हलक्या, मऊ आवाजात भूपाळ्या गायच्या ..जणू देव-देवांगना  अन् नारदादि दिग्गज आपल्यासाठी गाताहेत असं ते गायन त्याला कर्णसुखद वाटायला हवं ! डोळे उघडताच त्याला दिंड्या पताकांचे धुमारे दृष्टीस पडायला हवेत ..

…. आणि मग त्याला हलकेच सादावायचं , जाग बा जगजेठी …जाग रे भक्तश्रेष्ठी ..तुझे कमलनयन कधी उघडतात अन तुझ्या  कृपादृष्टीचं चांदणं कधी बरसतं याकरता आमची दिठी तहानली आहे ..हजारो नेत्र टक लावून वाट पहात आहेत तुझ्या दर्शनाची ! आमच्या वाणीतून येणारं तुझं नाम ऐकून आमचेच कान धन्य होत आहेत ..आम्ही दीन दुबळे भक्त , तुला अर्पण तरी करणार ! तुझ्या तेजाला ओवाळता येईल अशा ज्योतीतरी कुठून आणणार ! घे ,आमच्या प्राणांनीच आरती करतोय आणि आमच्या नेत्रज्योतींचाच  काकडा शिलगावलाय ….स्वीकार ही आरती आणि लवकर आम्हाला तुझं श्रीमुखकमल दिसूदे !  कृपा कर ,दर्शन 

दे , जाग पांडुरंगा ,जाग बा विठ्ठला !!

 

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ॥ दळिता कांडिता॥ ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

सुश्री विनिता तेलंग

? मनमंजुषेतून ?

☆ ॥ दळिता कांडिता॥ ☆ सुश्री विनिता तेलंग

(॥ विठ्ठलनामाचा रे टाहो ॥)

‘विठ्ठल आवडी प्रेमभावो, विठ्ठल नामाचा रे टाहो ‘ असं म्हणणार्‍या नामदेवांनी आणि त्यांच्या बरोबर सर्वच संतांनी विठुरायाला अभंग ,भारुडं ,विरहिणी, गवळणी आरत्या ,भूपाळ्या असे अनेक शब्दालंकार घातले .. पण पहाटेच्या अंधारात विठुरायाच्या अंगावर आपल्या जीवनानुभवांची रंगीबेरंगी ठिगळं लावलेली मायेची वाकळ पांघरली, ती महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या घरोघरच्या मालनींनी ! 

त्यांनी गायलेल्या जात्यावरच्या ओव्यांतून त्यांच्या साध्यासुध्या जगण्याचे सारे रंग दिसून येतात .

लग्न होऊन अजाणत्या वयात आईचा पदर नि बापाची मायेची पाखर याला अंतरलेली ही सासुरवाशीण .पहाट फुटायच्या आधी ही उठायची .कुटुंबाच्या मुखात घास घालणारं जातं हा तिचा देवच ! त्या देवापुढं मिणमिणता दिवा लावून हिची श्रमसाधना सुरु व्हायची .घासामागून घास जात्याच्या मुखात सारल्यावर जात्यातून पीठ झरावं तशा तिच्या मुखातून ओव्या झरु लागायच्या.

तिच्या मनाच्या बारीक सारीक दुखापती ,तिला असलेली माहेराची ओढ ,कंथाचं (पतीचं),दिराचं, लेकरांचं कवतिक ,तिच्या गावचं निसर्गवैभव, सूर्य चंद्र नदी पाखरं अशा तिच्या सार्‍या निसर्गदेवतांचं वर्णन ,असं सारं त्या ओव्यांमधे ती सहज गुंफायची .अंगावर लपेटलेला पदर कमरेशी घट्ट खोचून, ओचा आवरून ,एक पाय लांब पसरून ती  जात्याशी बसायची ..जात्याचा नि त्या बरोबर फिरणार्‍या  हातातल्या काकणांचा नाद आणि तिचं पुढं झुकून त्या लयीशी एकरूप होणं ..तीच लय पकडून दळदार शब्दफुलं तिच्या मुखी यायची . एकामागून एक तिच्या सहजसुंदर स्वरात त्यांना ओवताना तयार व्हायच्या त्या ओव्या ! महदंबा, जनाबाई यांच्या आोव्यांवर श्रेयाचा टिळा लागला .पण महाराष्ट्रातल्या आदिमायांनी पिढ्यानपिढ्या जे ओव्यांचं पीक काढलं ते अनामच राहिलं .त्या काळातल्या स्त्रीजीवनाचं प्रातिनिधिक रूप ओव्यांमधे बंद झालं .कुरुंदाच्या दगडाचं जातं हा त्यांच्या भावविश्वाचा,त्यांच्या साहित्यिक जाणिवांचा साक्षीदार .प्रगती गिरण्या घेऊन आली तसा तो साक्षीदारही मूक झाला .पण महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातल्या घराघरांमधे पिढ्यानपिढ्या ज्याच्या नावाची आळवणी झाली तो मालनींचा पिता- भ्राता- सखा विठुराया मात्र अजूनही त्या मायेच्या गोधडीची ऊब विसरला नसेल ! 

ओव्यांमधे विठ्ठल ,पंढरी ,वारी याला फार जिव्हाळ्याचं स्थान आहे .इंदिरा संतांनी दीर्घकाळ, परिश्रमपूर्वक  ओव्या गोळा केल्या व त्याच्या भावानुसार गाथाही बांधल्या. महाराष्ट्राचा एक अमूल्य ठेवा त्यांच्यामुळं जिवंत राहिला .मालनींच्या नि विठ्ठलाच्या अनेकपदरी नात्याचं सुरेख वर्णन इंदिराबाई करतात ..

“भाऊ ,बाप, दैवत ,प्रियकर अशा सर्व नात्यांच्या पाकळ्या नि त्याच्या गाभ्यात मैतरभाव असलेल्या फुलाचे , अशा स्नेहाच्या अविष्काराचे नाव ‘सखा ‘ . पांडुरंगाला वाहिलेले हे फूल मालनींच्या हृदयात परिमळत असते .याच्या परिमळात सर्व जिव्हाळे एकवटून दरवळत असतात !” 

पंढरी हे मालनींचं माहेर .बाप विठ्ठल ,आई रखुमाई , पुंडलीक भाऊ नि चंद्रभागा भावजय ! 

जीवाला वाटईतंऽ   

पंढरीला जावं ऽ जावं ऽ ऽ

आईबापा भेटू यावं 

कुंडलिकालाऽ लूटावं ऽ ऽ

त्यांना जशी माहेराची ओढ तशी तिकडं विठुरायालाही यांच्या भेटीची आस .मग तो पुंडलीकाला मुराळी पाठवतो ..

पांडुरंगऽ पीता ऽ    

रुकमीन माझी बया ऽ ऽ 

आखाडवारीला गऽ  

कुंडलीक ऽ आला ऽ नेया ऽ ऽ

तो तिची येण्याची सोय करतो .रोज घरी कष्टणार्‍या मालनीला दिंडीत आयतं खायला मिळेल असं पहातो .

पंढरीला जाते ऽ             

कशाचं ऽ पीठऽ कूऽटऽऽ

न्याहारी काल्याला गं ऽ      

देव खजिन्याचा ऊठं ऽ ऽ 

पण कुणी एक मालन अगदी अंथरुणाला खिळलीय .ती मुळीही हलू शकत नाहीय , पण त्याच्या भेटीची तळमळ काही कमी होत नाहीये ! तिला कोण नेणार ? मग ती त्यालाच हक्कानं साकडं घालते.

“ बाबारे, मला काही येववत नाही पण तुला पाहिल्याबिगर मी डोळे मिटायची नाही .मग तूच ये कसा !” आणि तो तिचा भावसखा तिच्याकरता गरुडावरुन येतो .तिच्या मनात चांदणं पसरतं .आणि विठूच्या अंगच्या कस्तुरीगंधानं या भाबड्या मालनीचं जिणं गंधाळून जातं ! 

माझ्या जीवाला जडभारी ऽ  

कूनाला घालू वझ्झ्ं ऽ ऽ

इट्टला देवा माझ्या ऽ            

तातडीनं ऽ येनं ऽ तूझं ऽ ऽ

जीवाला जडभारी ऽ           

उभी मीऽ खांबाआड ऽ ऽ 

इटूबा ऽ देवाजीऽलाऽ         

विनवीते अवघऽडऽ

जीवाला माझ्या जड ऽ     

न्हायी कूनाला माया येतऽ ऽ

सावळ्या पांडुरंगाऽ         

यावं गरुडासहीतऽऽ

आला गंऽ धावतऽ     

माझा पंढरीचा हरीऽ ऽ

चंद्रावाचून ऽ गऽ       

उजेड पडला माझ्या घरीऽ ऽ

कस्तूरीचा ऽ वासऽ    

माझ्या अंगाला ऽ कूठूला ऽ ऽ

इट्टल सावळा गऽ      

मला भेटूईनऽ गेला ऽ ऽ 

या मालनीचा हेवा वाटतो .तिच्या अंगाच्या तुळशी कस्तुरीच्या दरवळात मन गुरफटून रहातं .वाटतं पळभर तरी तिचा निर्मळ ,निर्हेतुक, निर्व्याज भाव आपल्या व्यवहारी मनात उजळावा .ते सख्यत्वाचं फूल आपल्याही मनात कधीतरी उमलावं ! 

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ॥ हरिनामाचा सरवा ॥ ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

सुश्री विनिता तेलंग

? मनमंजुषेतून ?

॥ हरिनामाचा सरवा ॥ ☆ सुश्री विनिता तेलंग ☆

(अगा वैकुंठीच्या राया …)  

विठ्ठल हा मालनीचा जिवलग .त्याला एकदा भेटून तिचं मन निवत नाही. पण संसाराची ,मुलालेकरांची, गायीगुरांची जबाबदारी तिच्यावर असते .ती जबाबदारी तिला दर वारीला जाऊ देत नाही .मग तिला वाटतं की आपण ‘बाईमाणूस’ म्हणून जाऊच नये .पंढरीच्या वाटेवरचं काहीही होऊन रहाणं तिला चालणार आहे .

किंवा कदाचित मनुष्यजन्म सरल्यावरही तिला त्याचा सहवास हवा आहे .तो कसा ? तर 

पंढरपुरीचाऽ           

मी का व्हयीन खराटा ऽऽ

इट्टलाच्या बाईऽ       

लोटंऽन चारी वाटा ऽऽ

पंढरपुरीची ऽ           

व्हयीन देवाची पायरी ऽऽ

ठेवील गऽ पाय ऽ      

सये येता जाता हरी ऽऽ

पंढरपुरीची ऽ           

मी गं व्हयीन परात ऽऽ

विठूच्या पंगतीला ऽ   

वाढीन साखरभात ऽऽ

याचा अर्थ कळण्याजोगा आहे ..पण याचा शेवट मोठा लोभस आहे ! 

पंढरपुरामंदी ऽ          

मी का व्हयीन ऽ पारवा ऽऽ

येचीन मंडपात ऽ        

हरिनामाचा सरवा 

तिला पारवा होऊन हरिनामाचा सरवा वेचायचा आहे !

किती विलक्षण प्रतिभा आहे या मालनीची ..

शेतातल्या पिकाची कापणी, मळणी करताना धान्याचे काही दाणे भुईवर सांडतात .तो सरवा .त्याला पाखरं टिपतात . पंढरपुरात मंदिरात जागोजागी हरिनामाचा गजर होतच असतो .नामसंकीर्तन ,भजन ,कीर्तन झाल्यानंतर भक्त बाहेर पडतात. त्यांच्या मुखातूनही तेच ऐकलेलं नाम बाहेर सांडत असतं .हा नामाचा सरवा तिथं मंदिराच्या सभामंडपात, प्रांगणात सांडून रहातो तो तिला वेचायचा आहे ! 

अशाच एका मालनीला वाटेवरचं गवत होऊन , वारकर्‍यांनाच विठू समजून त्यांचे पाय कुरवाळायचेत ! मातीचा डेरा होऊन त्यांचे पाय आपल्या आतल्या पाण्यानं, मायेनं भिजवायचेत .पण पुढं तिला बाभूळ, तुळस व्हावं वाटतं यामागे मात्र वारकर्‍याचं मोठं मन दिसून येतं .ती म्हणते ,‍

पंढरीच्या वाटं ऽ       

मी तं व्हयीन बाभूळ ऽ ऽ 

येतील मायबाप ऽ    

वर टाकीती ऽ  तांदूळ ऽ ऽ

पंढरीच्या वाटं ऽ     

मी  ग व्हयीन तूळस ऽ ऽ

य‍ेतील मायबाप ऽ   

पानी देतील मंजूळसं ऽ ऽ

वारीला जाताना वारकरी सोबत पीठमीठ घेतात ,तसे तांदूळही घेतात .आपल्यासोबत चालणारा, भेटणारा कुणीही उपाशी रहायला नको ,याकरता ते दक्ष असतात. एकांड्या साधू संन्याशाला ते तयार भाजी भाकरी देतात .कुणाला ते चालत नसलं तर त्याला शिधा म्हणजे तांदूळ देतात .चालताना बाभळीचं झाड आलं की पालवी दाट नसल्यानं त्यावरची पाखरं लगेच दिसतात .मग ते त्यांना तांदूळ टाकतात . पाखरांनाही दाणे फेकलेले दिसतात व खाली येऊन ती ते टिपू लागतात.

बाभळीच्या झाडोर्‍यासारखी ही मालन .तिच्याकडं काहीच साहित्य नाही .पण ही सार्‍यांची सेवा करते.  सामान वहाते, पाणी आणते, भाकर्‍या बडवू लागते ,पाय चेपून देते .ही वारीची लेक होते .मग मायबाप तिलाही दाणा घालतात ,जेवू घालतात .वारीत बाया डोईवर तुळस नेतात .तिला, किंवा वाटेतही तुळस दिसली की तिला पाणी द्यायची रीत आहे .वारकरी या तुळसाबाईलाही जवळचं पाणी देतील .पण ती पिईल कशात ? तर ओंजळीत हलकेच ओतलेलं मंजुळसं पाणी तिला मिळेल ! वारीला जाण्यामागं विठ्ठलाची ओढ तर आहेच पण कदाचित तिच्या रूक्ष, खडतर संसारात तिला न मिळणारी माया, आपलेपणा तिला वारीत मिळतो . रोजच्या कामच्या रगाड्यातून सुटका तर होतेच पण मुक्तपणाचा एक निर्भर आनंदही तिला हवाहवासा वाटत असणार .वारीत सारे सारखे … एकमेकांकडे सख्यभावानं, आत्मीय भावानं पहाणारे.  तिथल्या सार्‍या बंधूंना ती साधू म्हणते .तिथं ती सासुरवाशीण नाही. कपड्याचे, केसाचे -तिच्या संस्कृतीतल्या नियमांचे काच वारीत नसतात .मग तीही जरा सैलावते आणि निगुतीनं तेलपाणी करुन जपलेले आपले केस मोकळे सोडू शकते .वारीत उन्हापावसात चालणं ,कधी घामानं तर कधी पावसानं भिजणं, नदीत स्नान करणं ,यामुळंही ती कायम केस बांधत नाही .कितीतरी मालनी या साध्याशा सुखाबाबत भरभरून बोलतात ..

पंढरीला जातेऽ         

मोकळी माझी येनी 

साधूच्या बराबरी ऽ    

मी ग आखाड्या केला दोनी ऽ ऽ

पंढरीच्या वाटं ऽ       

मोकळा माझा जुडा ऽ ऽ

साधूच्या संगतीत      

मीळाला दूध पेढा ऽ ऽ

पंढरी मी गऽ जातेऽ    

मोकळं माझं क्यास ऽ ऽ

साधूच्या संगतीनं ऽ    

मला घडली एकादस ऽ ऽ 

हे एक प्रकारचं प्रबोधन, एक प्रथा मोडण्याचं इवलं धाडसच ती करते आहे .असे केस सोडले तरीही माझं काही वाईट तर झालं नाहीच ,उलट एकादशा -उपवास- दर्शन यानं मी पुण्यच जोडलं असं ती सांगते ..

पण या प्रतीकात्मक मुक्तीशी मालन थांबत नाही . तिचं सुखनिधानच इतकं उंचावर आहे की त्याच्या ओढीनं ती देहभोगांच्या पार जाते ! 

पंढरीच्या वाटं ऽ       

वाटंऽ पंढरी कीती दूरऽऽ

नादावला जीवऽ      

वाजंऽईना गऽ बिदीवर ऽ ऽ 

पंढरीची वाट, मुक्तीची वाट दूरची खरी .अती खडतर .पण त्या वाटेवर चालताना त्याच्या नामात स्मरणात त्याच्या ओढीत पावलं अशी दंग होतात की कसलंच भान रहात नाही. जीव नादावतो .बीदी म्हणजे वाट .त्या वाटेवर आता तिला नादही ऐकू येईना .ती वाट म्हणजे एकतारीची तार आणि तिची पावलं हाच त्याचा झणात्कार .तिचं चालणंच वीणेचं वाजणं झालंय .आता तिला ना देहाची जाणीव उरलीय ना चालीची .सारं एकच झालंय .सगळ्यातून एकच नाद उमटतोय ..

विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ….. 

© सुश्री विनिता तेलंग

सांगली. 

मो ९८९०९२८४११

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिंडी चालली, दिंडी चालली… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆

सुश्री तृप्ती कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

दिंडी चालली, दिंडी चालली… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी

काल पुण्यात पालखीचं आगमन झालं. वाहतूक काही वेळासाठी थांबली होती. लोक ती सुरु होण्याची आतुरतेने वाट पाहत होते. मीही रहदारीचा अंदाज घेत होते. इतक्यात मला काही वारकरी लोकं गर्दीतून वाट काढत चालत जाताना दिसली. त्यांच्या सोबत हातात झेंडा घेतलेली दोन छोटी मुलंही होती. मोठ्या उत्साहात आणि आनंदात ती इतक्या गर्दीतूनही अनवाणी चालत होती. ते पाहून मला माझ्या शाळेतली दिंडी आठवली.

इयत्ता पहिली ते चौथी मी नवसह्याद्रीमधल्या ज्ञानदा प्रशालेत शिकत होते. त्यावेळीस आमच्या शाळेची दिंडी निघायची. शाळेपासून ते आजच्या राजारामपुलाच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात जायची. आजही निघतेच म्हणा. त्या दिंडीची आठवण झाली. आषाढी एकादशीला सकाळी सात वाजता आमच्या दिंडीला सुरुवात व्हायची. स्वच्छ धुतलेला गणवेश, हातात टाळ, झांजा, फुलं, तुळशीची रोपं, रामकृष्ण हरी असे लिहिलेले फलक असे आपल्याला हवं ते घेऊन दिंडीत सहभागी व्हायचो. शाळेत मोठ्या वर्गातल्या मुलांनी आणि शिक्षकांनी पालखी फुलांनी सजवून ठेवलेली असायची. त्यात ज्ञानेश्वर, तुकाराम आदी संतमंडळींचे फोटो असायचे. शाळेत छान रांगोळी काढली जायची. फुलांचा आणि उदबत्तीचा  मंद वास दरवळत असायचा. सगळे जमले की कोणी तरी शिक्षक जोरात म्हणायचे, “बोला पुंडलिक वर देव ! हारी विठ्ठल ! श्रीनामदेव तुकाराम ! पंढरीनाथ महाराज की जय ! टाळ, झांजा जोरात वाजू लागल्या की आम्ही चालायला सुरुवात करायचो. पावसाची रिपरिप, मधेच उन्हाची तिरीप आजूबाजूला आम्हा सर्वांचा हरिनामाचा गजर, मधूनच दरवळणारा मातीचा वास, झांजांचे, लेझीमचे खेळ, नाच सुरु व्हायचे. त्यावेळी आजच्या सारखा गाजावाजा करण्याची पद्धत नव्हती त्यामुळे शाळेच्या आसपासच्या लोकांना, विद्यार्थ्यांना आणि मंदिराच्या जवळच्या लोकांनाच या दिंडीची माहिती असायची. रस्त्यावरच्या गर्दीतून, वाहतूकीचा खोळंबा न करता वाजतगाजत ही दिंडी चालायची. मग अनवाणी चालताना मऊमऊ माती पायाला लागायची, तर कधी छोटे दगडही टोचायचे पण तेव्हा त्याचं काहीच वाटायचं नाही. रस्त्यावरून झेंडा फडकवत, टाळ, झांजा, लेझीमच्या गजरात ‘ज्ञानोबा माउली ज्ञानराज माउली तुकाराम’ असा गजर करत आम्ही अक्षरशः नाचत-गात जायचो.

मध्येच एखाद्या घरातून पालखीतल्या माउलींच औक्षण केलं जायचं. लोकं नमस्कार करायचे. आमच्या हातावर प्रसाद दिला जायचा. तहान लागली असेल म्हणून पाणी दिलं जायचं. तेव्हा बिसलेरी वैगरे प्रकार नव्हते आणि गरजही. अगदी गरज लागली तर ऐनवेळी आमच्यासाठी एखाद्या घरातलं स्वच्छतागृह देखील वापरायची सोय केली जायची. पण रस्त्यात कोठेही कसलाही कचरा किंवा घाण करायला सक्त मनाई असायची. आम्ही सारेजण ती शिस्त आवर्जून पाळायचो. एकमेकांचे हात हातात धरून एकसाथ एकसुरात विठ्ठल नामाचा गजर करताना एक वेगळाच उत्साह जाणवायचा. आम्हाला त्यावेळी ना विठ्ठल भक्तीची ओढ होती, ना कसलं मागणं होतं, ना या साऱ्यातलं काही कळत होतं. विठठलाच्या ताला-सुरात निरपेक्षपणे पावलं चालायची.

आता वाटतं तीच खरी भक्ती. जिथं काहीतरी मागायचं म्हणून सेवा नव्हती. केवळ आनंद होता एकमेकांसह चालण्याचा, गणवेशामुळं एक सारखे भासायचोच पण एकत्र चालणं, एकमुखानं गजर करणं, एकच अन्न वाटून खाणं आणि मुख्यत्वे दिंडीत जो कोणी सहभागी असेल त्याला आपला मानणं. लहानमुलं मोठ्या मुलाचं ऐकायचे, मोठी मुलं लहानांची काळजी घ्यायची. त्यांना चालताना, नाचताना मार्गदर्शनही करायची. कोणाला काही दुखलंखुपलं तर हे ताई-दादा काळजी घ्यायचे. अगदीच अडचण झाली तरच शिक्षक मध्ये पडायचे. ही एकी, हे प्रेम, हे नातं चार भिंतींपलीकडचं होतं. इथं जातपात, हुशारी, श्रेष्ठत्व काही काही नव्हतं. मला या दिंडीत सहभागी व्हायचं आहे हीच फक्त भावना होती आमचीही आणि आम्हाला साथ देणाऱ्या माणसांचीही.

आम्ही सगळे मंदिरात पोहोचलो की विठ्ठलाशी गाठभेट व्हायची मग आरती, भजन आणि प्रसाद असं भरगच्च कार्यक्रम असायचा आणि मग आम्ही आपापल्या घरी परतायचो ते विठठल विठ्ठल म्हणतंच. विठ्ठल देव आहे म्हणून नाही… तर आनंद मिळतो म्हणून… आमच्यासाठी विठ्ठल आहे तर दिंडी आहे… दिंडी आहे तर आजचा आनंदाचा दिवस आहे… हीच भावना मनात ठेवून…

आज या गोष्टींचा अर्थ वेगळाच वाटतो. आज विठ्ठलाचं स्मरण हेतुपूर्वक केलं जातं म्हणूनच कदाचित तो आनंद मिळत नसावा. विठ्ठलाची किंवा त्याहीपेक्षा म्हणा साध्यासाध्या गोष्टींतून आनंद मिळवण्याची वृत्ती आमच्यात रुजली ती मात्र या दिंडीमुळेच.

अलीकडची परिस्थिती पाहता असं वाटतं…

दोन्ही घरचा पाहुणा मी

राहिलो सदा उपाशी !

विठ्ठलाचे नाम जरी मुखाशी

प्रपंचाचा काटा रुते पायाशी !

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ अल्बम… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

☆ अल्बम… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

दरवर्षी चार जुलैला वाढदिवस असतो माझा आणि दरवेळी मागचे किती वाढदिवस कसे झाले, ते डोळ्यासमोर येऊन जातात! जणू फोटोच्या अल्बमची पाने मी उलटत होते! पन्नास वर्षांपूर्वी फोटो काढणे हे तितकेसे कॉमन नव्हते. कॅमेराच मुळी नवीन होता तेव्हा! साधारण ६०/६५ वर्षांपूर्वी आमच्या घरी कॅमेरा होता, अर्थात ही माझ्यासाठी ऐकीव गोष्ट! माझ्या वडिलांना फोटोग्राफीची आवड होती. फोटो काढणे, ते स्वतः डेव्हलप करणे हे ते शिकले होते, त्यामुळे आमच्याकडे खूप जुने फोटो अजूनही बघायला मिळतात! स्वातंत्र्यापूर्वी वडिलांचे कुटुंब कराची ला होते, तेथील त्यांच्या घराचे, कराची शहरातील फोटो अजूनही आमच्या अल्बम मध्ये आहेत.

अगदी पूर्वीच्या कॅमेरात आठ फोटो निघत असत. नंतर छोटे छोटे सोळा आणि 24 फोटो निघणारे रोल आले. कॅमेरा मध्ये जसजशा सुधारणा होऊ लागल्या तस तसे अधिक चांगले आणि जास्त फोटो मिळू लागले.आणि खर्च ही कमी येऊ लागला. फोटोंचा अल्बम ही लोकांच्या आवडीची गोष्ट बनू लागली. घरातील लग्न,मुंजी, बारसे किंवा कोणताही कार्यक्रम असला की फोटो काढून त्यांचा अल्बम बनवला जाऊ लागला. आमचे दादा मग प्रत्येक अल्बम ला नाव देत. “गोड स्मृती” नावाचा पहिला अल्बम अजूनही माझ्या माहेरी आहे. तिथे गेले की मी कौतुकाने ते जुने फोटो बघू शकते आणि त्यामुळे मनाला खूप आनंद मिळतो. अल्बम मधील काही व्यक्ती आता काळाच्या पडद्याआड गेल्या असल्या तरी आपल्याला फोटो बघून ते जुने दिवस आणि माणसे यांचे स्मरण होते! आता तर काय मोबाईल मुळे फोटो काढणे खूपच सोपे झाले आहे, पण प्रिंटेड फोटो अल्बम ची शान मला वेगळीच वाटते!

स्वतःच्या आयुष्याचा हा अल्बम उघडताना माझ्याही डोळ्यासमोर माझ्या छोट्या छोट्या छबी दिसू लागल्या. आईच्या कडेवर बसलेली मी, तर कधी रडत असलेली, नुकतीच पावले टाकू लागलेली मी, मला फोटोतून दिसली. नवीनच पंजाबी ड्रेस घालून शाळेला जायच्या तयारीत असलेली चार-पाच वर्षाची ऋजू ही एका फोटोत दिसली. दोन वेण्या वर बांधलेल्या आणि काळ्या रंगाचे पांढरे खडी असलेले परकर पोलके घालून वडिलांबरोबर समुद्रावर फिरायला गेलेली मी, मला फोटोत दिसली. त्यानंतर स्कर्ट ब्लाउज घालून शाळेत जाणारी मी मला जाणवून देत होती की,’ तू आता मोठी झालीस!’ नकळत 1964 साल उजाडले आणि मी दहा वर्षाची झाले!

शाळेत असताना  माझ्या वाढदिवसाला आई माझ्या मैत्रिणींना घरी फराळाला बोलवत असे. आणि मग छोटासा मनोरंजनाचा कार्यक्रम ही होत असे. त्यात चिठ्ठ्या टाकून उचलायला सांगितले जाई आणि चिठ्ठीत असेल त्याप्रमाणे गाणे, नाच, नक्कल किंवा खेळ करून दाखवावे लागत असे. तेव्हा खायच्या पदार्थात पावभाजी, केक नसे पण घरी केलेले दडपे पोहे, चिवडा, लाडू यासारखे पदार्थ असत. मग आमची पार्टी मजेत होत असे. असे वाढदिवस साजरे करता करता अल्बम मध्ये मॅट्रिकच्या वर्षीचा ग्रुप फोटो आला आणि त्यामुळे आपण एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो याची जाणीव झाली.

कॉलेजची वर्षे सुरू झाली आणि घरचा वाढदिवस बंद होऊन बाहेर हॉटेलात वाढदिवस साजरा होऊ लागला. फोटोसेशन होऊ लागले. मित्र मैत्रिणींबरोबर वाढदिवस मजेत साजरे होऊ लागले. छान छान गिफ्टची देवाणघेवाण होऊ लागली आणि हा अल्बम विस्तारत गेला.

अजूनही कधी ते फोटो बघते तेव्हा पुन्हा एकदा मनावर आठवणींचे मोरपीस फिरते! बघता बघता किती वाढदिवस साजरे झाले ,परंतु खरी मजा आणि प्रेम मिळाले ते लग्नानंतरच्या पहिल्या वाढदिवसाला! सरप्राईज म्हणून मिळणारी साडी किंवा दागिना वाढदिवसाला शोभा आणू लागला. मग नवऱ्याबरोबर केक कापतानाचा फोटो अल्बम मध्ये आला. मुलांच्या जन्मानंतर आपल्यापेक्षा मुलांचे वाढदिवस साजरे करत असलेले फोटो अल्बम मध्ये दिसू लागले. ते चौकोनी कुटुंब असे आमचे फोटो आता अल्बम खुलवू लागले!

मध्यंतरीच्या काळात मुलांनी आमचे वाढदिवस साजरे केले.’ आई, तुझ्या वाढदिवसाला मी तुला सरप्राईज गिफ्ट देणार आहे’. म्हणत मुले त्यांनी साठवलेल्या पैशातून माझ्यासाठी आठवणीने छोटी मोठी वस्तू आणू लागली आणि माझा ऊर आनंदाने आणखीनच भरून  येई! अरेच्या! किती मोठे झालो आपण! असे म्हणतच अल्बम मधल्या फोटो भर पडत होती!

आता काय साठी उलटली! मुलांची लग्न कार्ये झाली. सून, जावई, नातवंडे यांच्या आगमनाने वाढदिवस पुन्हा एकदा जोरात साजरे होऊ लागले! फॅमिली ग्रुप फोटोंची अल्बम मध्ये भर पडली. छोटी नातवंडे अंगा खांद्यावर विसाऊ लागली. काळ्या केसांमध्ये रुपेरी चांदीची भर पडली. वय जाणवायला लागले. वाढदिवसाला आणलेला गजरा माळण्याइतके ‘ केस नाही गं उरले’ असं लेकीला म्हटलं तरी,’ आई तुला मोगरीचा गजरा आवडतो ना, म्हणून मी मुद्दाम आणलाय ‘ असं म्हटलं की त्या छोट्याशा केसांवर तो घालावाच लागे. असे वाढदिवस साजरे करता करता हळूहळू साठी उलटली. सांधे कुरकुरायला लागले. आता काही नको तर वाढदिवस असे वाटू लागले. इतकी वर्षे काढलेले फोटो अल्बम मध्ये बघताना आपल्या मधला फरक जाणवू लागला!

कुठे ती लहान ऋजू, नंतर लग्नानंतरची उज्वला आणि आता तर उज्वला आजी! अल्बम मधील सरकती वर्षे बघता बघता मी रंगून गेले! फोटो मुळेच ही किमया झाली आहे. खरंच, मन:चक्षुपुढे येणाऱ्या छोट्या मोठ्या व्यक्ती आपण वर्णन करून सांगू नाही शकत! पण फोटो मुळे मात्र व्यक्ती जशीच्या तशी डोळ्यासमोर उभी राहते ,ही तर आहे फोटो अल्बम ची किमया!

आता दरवर्षी चार जुलैला वाढदिवस येतो. मुलांच्या सोबत साजरा करताना केक कापला जातो. फोटो काढून होतात. पुन्हा एका नवीन वर्षात पदार्पण केले म्हणून! आठवणींच्या अल्बम मध्ये आणखी एका फोटोची भर! अशाच आनंदात वाढदिवस साजरा करत राहायचंय, जोपर्यंत भिंतीवरच्या फोटोमध्ये आपण जाऊन बसत नाही तोपर्यंत….

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मन वढायं वढायं… ☆ सौ उज्ज्वला केळकर ☆

सौ उज्ज्वला केळकर

??

☆ मन वढायं वढायं… ☆ सौ उज्ज्वला केळकर

आयुष्याची ८ दशके सरली. सरली म्हणजे, कशी-बशी गेली नाहीत. छान मजेत गेली. आताशी मी त्याला म्हणते, ‘ये. लवकर ये. मी तयार आहे, गाठोडं बांधून.’ मग माझं मलाच हसू येतं. तो तर माझी कायाही घेऊन जाणार नाहीये. गाठोडं कुठलं न्यायला? तो माझ्यात कुठे तरी असलेलं प्राणतत्त्व घेऊन जाणार. हे सगळं माहीत असतं, तरी मी माझी गाठोडी कवटाळून बसते. दोन गाठोडी आहेत माझी…..  

… पहिले एक गाठोडे आहे… ज्यात सुखद स्मृतींची तलम, मुलायम, नजरबंदी करणारी, बेशकीमती महावस्त्रे आहेत. त्यांच्या आठवणींनी मनावर मोरपीस फिरल्यासारखं वाटतं, पण कसं आणि का, ते कळत नाही, हे गाठोडं क्वचितच कधी तरी उघडलं जातं. दुसऱ्या गाठोडयाच्या तुलनेने हे गाठोडं आहे अगदीच लहान, चिमुकलंच म्हणता येईल, असं.  

… दुसरं आहे, ते आहे एक भलं मोठं गाठोडं….  पर्वताएवढं.. नव्हे त्यावर दशांगुळे उरलेलं….. 

अनेक विवंचना, चिंता, काळज्या, समस्यांच्या चिंध्या, लक्तरे, चिरगुटे…  जगताना घेतलेल्या कटु स्मृतींचे हे गाठोडे. माझ्या बाबतीत कोण, कधी, काय चुकीचे वागले, कुणी माझा जाणीवपूर्वक अपमान केला, कुणी, केव्हा दुर्लक्ष केले, मला तुच्छ लेखले,  या सगळ्या दु:खद आठवणी, .. आणि कुणी कधी दिलेल्या दु:खाचं, केलेल्या अपमानाचं, दुखावलेल्या अस्मितेचं, चिंता काळज्यांचं, ताण- तणावांचं, विवंचनांची चिरगुटं असलेलं …… हे असं सगळं… नकोसं – क्लेशकारक वाटणारं..तरीही मनात घट्ट चिकटून राहिलेलं सगळंसगळं या गाठोड्यातून ओसंडून वहात आहे.  हा कचरा बाहेर टाकून देण्यासाठी मी हे गाठोडं पुष्कळदा उघडते. . कचरा बाहेर काढते. पण बहिणाबाईंनी म्हटले आहे त्याप्रमाणे, 

‘मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर — 

किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर’

किती प्रयत्न केला, हा कचरा काढून फेकून द्यायचा…  केशवसुत म्हणाले आहेत  त्याप्रमाणे जाळून किंवा पुरून टाकण्याचा…. पण नाहीच.. हा कचरा जणू अमरत्व लाभल्यासारखा आहे. पुन्हा पुन्हा येऊन गाठोड्यात बसतो. बुमरॅँग जसं ते फेकणार्‍याकडेच परत येतं, अगदी तसंच आहे हे.

हे मोठं गाठोडं, कटू स्मृतींचं….. सतत उघडलं जातं. विस्कटलं जातं. तो सारा कचरा, चिंध्या, चिरगुटं गाठोड्यातून बाहेर काढून फेकून द्यायचं ठरवते. फेकून देतेही. पण त्या पुन्हा लोचटासारख्या गाठोड्यालाच येऊन चिकटतात.

आता साधीशीच गोष्ट. मी एम. ए., एम. एड. पर्यन्त शिकले. 30 वर्षे अध्यापनाची नोकरी केली. निवृत्त होऊनही 20 – 22 वर्षे झाली. नशिबाने आणखी काय द्यायला हवं? पण सारखं मनात येत रहातं , मी पी. डी. सायन्स झाल्यावर आर्टसला का आले? आले तर आले, इकॉनॉमिक्स, मॅथ्स यासारखे चलनी विषय का घेतले नाहीत? ग्रॅज्युएट झाले. नोकरी मिळाली . मग लोकसेवा आयोगाच्या परीक्षा का दिल्या नाहीत? अधिक चांगल्या संधी मिळाल्या असत्या. आता या काळात आणि या वयात या विचारांना काही अर्थ आहे का? त्यांचा काही उपयोग आहे का? पण तो विचार उगीचच येत रहातो आणि मन खंतावत रहातं. ही झाली एक गोष्ट. अशा किती तरी जुन्या गोष्टी अकारणच मनात साठून राहिल्या आहेत आणि पुन्हा पुन्हा उफाळून येत दु:खी करताहेत.

कधी कधी मैत्रिणी जमलो, की सहजच घरातल्या गोष्टी निघतात. ‘ सासू तेव्हा असं म्हणाली, नणंद तसं बोलली. कितीही करा आमच्या विहीणबाईंचा पापड वाकडाच. मुलांसाठी किती केलं, पण त्यांना कुठे त्याची पर्वा आहे.’ असंच काही- बाही बोलणं होतं. मी त्यांना म्हणते, “ नका ना या जुन्या आठवणी काढू ! अशा दु:खद आठवणी काढायच्या म्हणजे तेच जुनं दु:ख आपण पुन्हा नव्याने जगायचं. कशाला ते….”   

अर्थात दुसर्‍याला सांगणं सोपं असतं. स्वत:च्या बाबतीत मात्र ‘ लोकासांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण ‘ अशीच माझी स्थिती. मीही जुन्या जुन्या दु:खद आठवणी पुन्हा पुन्हा  मनात घोळवत रहातेच.

परवा परवा ‘उमेद’ ग्रुपवर एक पोस्ट वाचली. 1 जून … एक टास्क.. आपल्या मनातील दु:खे, वाईट विचार, चिंता, काळज्या, लिहून काढा आणि त्यातून बाहेर पडा. आपली पाटी स्वच्छ ठेवा. मी म्हंटलं, बरी संधी आहे, आपण मोकळं व्हायला. मनाची पाटी कोरी करायला. मी सगळं लिहून काढलं. नंतर पाटी पुसू लागले. पण ती काही पुसली गेली नाही. त्यावरचं सारं लेखन शीलालेखासारखं अमीट झालं.

सध्या रहाते, तो माझा बंगला छान आहे. 37-38 वर्षे आम्ही या घरात रहातोय. इथले शेजारी-पाजारी चांगले आहेत. कामवाल्या घरच्यांसारख्याच आहेत. गरज पडली तर मदतीला कोणीही येईल, अशी परिस्थिती आहे. छान बस्तान बसलं आहे आमचं सध्याच्या घरी. पण सात-आठ महिन्यात बसेरा बदलायचा आहे. हे घर सोडून नव्या घरी फ्लॅटवर रहायला जाण्याची शक्यता आहे. आम्हा म्हातारा-म्हातारीला जमेल का सगळं? जुनाट वृक्ष नव्या वातावरणात रुजवायचे आहेत. रुजतील? तिथली फ्लॅट संस्कृती पचनी पडेल आमच्या? शेजारी कसे असतील? काही होऊ लागलं, तर कुणाची मदत मिळेल? मुलगा आणि सून आपआपल्या कामातून किती वेळ काढू शकतील? प्रश्न… प्रश्न… आणि फक्त प्रश्न ….खरं तर पुढच्या श्वासाची शाश्वती नाही, असं मी मनाला सतत बजावत असते आणि त्याचवेळी भवितव्याचा अनावश्यक विचार करत व्यथित होते. आपलंच टेन्शन वाढवते. ‘ देवा आजचा दिवस सुखाचा दाखवलास, उद्याची भिस्त तुझ्यावरच रे बाबा !’ असं म्हणण्याइतकी आध्यात्मिक उंचीही मनाने गाठलेली नाही.

अनेक गोष्टी अशा असतात, ज्या बाबतीत मी प्रत्यक्ष काहीच करायचं नसतं. तरीही काही गोष्टी, काही विचार भाकड गायीप्रमाणे मनात हुंदडत असतात आणि मन तणावग्रस्त करतात. आता हेच बघा,     ‘ मुलाला प्रमोशन कधी मिळेल? सुनेला नोकरी मिळेल ना? नातीला मेडीकलला अ‍ॅडमिशन मिळेल ना? नातवाची टी.व्ही. ची क्रेझ जरा कमी होऊन तो थोडा मनापासून अभ्यास करायला लागेल का?’ …. यापैकी कशावरही माझं नियंत्रण नाही. पण तरीही याबाद्दलचे विचार काही मनातून हद्दपार होत नाहीत. आताशी एक विचार मनात घोळू लागलाय. अर्चनाताईची समुपदेशनासाठी अपॉईंटमेंट घावी. बघूया, त्याचा तरी काही उपयोग होतोय का?

अगदी अलीकडे अनघा जोगळेकर यांची .हॅँग टिल डेथ या इंग्रजी नावाची हिन्दी लघुकथा वाचली होती, ती अशावेळी हमखास आठवते. ती कथा मराठीत अशी आहे —

“  हॅँग टिल डेथ 

‘ मीनू, मी बघतोय, जेव्हा जेव्हा तुला वैताग येतो, किंवा तू काळजीत, चिंतेत असतेस, तेव्हा तेव्हा तू खोलीत जाऊन कपाट उघडतेस. तिथेच थोडा वेळ उभी रहातेस. मग थोड्याच वेळात तुझा चेहरा हसरा होतो. अखेर त्या कपाटात असं आहे तरी काय?’

पलाशचं बोलणं ऐकून मीनू हसली.

‘छे छे, केवळ हसून काम भागणार नाही. आज तुला हे रहस्य उलगडून दाखवावंच लागेल. ‘ पलाशच्या आवाजात थोडा आवेश होता. मग नजर चुकवत म्हणाला, ‘तुझ्या अपरोक्ष मी ते कपाट अनेक वेळा उघडून पाहिलं. शोधाशोध केली पण….. अखेर असं आहे तरी काय तिथे?’ तो जवळ जवळ ओरडतच म्हणाला.

मीनू थोडा वेळ त्याच्याकडे बघत राहिली. मग तिने त्याचा हात धरला आणि त्याला खोलीत घेऊन आली. तिने कपाट उघडले.

‘ ते बघ माझ्या खुशीचं रहस्य!’

‘अं… तो तर एक हँगर आहे. …. रिकामा हँगर…’ 

‘ होय पलाश. तो हँगर आहे, पण रिकामा नाही. याच्यावर मी माझ्या सार्‍या चिंता, काळज्या, त्रास, वैताग लटकवून ठेवते आणि कपाट बंद करण्यापूर्वी  त्यांना म्हणते,— ‘ मरेपर्यंत लटकत रहा ! ’ मी माझ्या काळज्या, त्रास, वैताग माझ्या डोक्यावर स्वार होऊ देत नाही. त्या माझ्यापासून दूर केल्यानंतरच त्या निपटून काढते. ‘

… आणि आता त्या कपाटात एकाऐवजी दोन हँगर लटकलेले आहेत….. 

मी सध्या त्या कथेतील मिनूच्या शोधात आहे. एकदा भेटली की विचारणार आहे, “ बाई ग, तू त्या सार्‍या सार्‍या चिंता, काळज्या, त्रास, वैताग रिकाम्या हँगरवर कशा लटकावून ठेवतेस? एकदा प्रात्यक्षिक दाखव ना ! प्लीज…..” 

©️ सौ उज्ज्वला केळकर

संपर्क –17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ || थोडं मनातलं – सलणारं, बोचणारं ||… लेखक – श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

|| थोडं मनातलं – सलणारं, बोचणारं ||लेखक – श्री मयुरेश उमाकांत डंके ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर

दरवर्षी शिवराज्याभिषेकाच्या दिवशी आम्ही अनेक विद्यार्थी घेऊन रायगडी जातो अन् गडावरचा प्लॅस्टिकचा कचरा गोळा करुन खाली घेऊन येतो. या उपक्रमाचं हे सोळावं वर्ष होतं.. गेली पंधरा वर्षं हे व्रत आम्ही सगळे नित्यनेमाने करतो आहोत. माझे अनेक विद्यार्थी, विद्यार्थिनी यात आनंदानं सहभागी होत असतात. एक दीड महिना आधीपासूनच आमच्या या स्वच्छता अभियानाच्या तयारीची सुरुवात होते. मे महिन्यात आमच्यापैकी काहीजण गडावर येऊन नीट पाहणी करून जातात आणि मग अधिक कचरा जिथं जिथं असेल तिथून तो हलवण्याचं नियोजन सुरु होतं. सगळ्या नोंदी विद्यार्थ्यांचा गट करत असतो. मी फक्त निमित्तमात्र असतो. स्वच्छता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा संस्कार याच वयात मुलांच्या व्यक्तिमत्वावर कोरला गेला तर त्याचे उत्तम परिणाम समाजात दिसून येतात. 

कोण आहेत ही मुलं मुली? ज्यांच्या पायाशी सगळी सुखं लोळण घेत आहेत, अशा कुटुंबातली ही मुलं. पण पुण्याहून निघून पायथ्यापासून ते वरच्या बालेकिल्ल्यापर्यंत प्लॅस्टिकच्या बाटल्या, त्यांची टोपणे, पिशव्या, फाटकी तुटकी पादत्राणे, प्लॅस्टिकचे चमचे, ग्लास, चहाचे कप, कागदी प्लेट्स, द्रोण, पत्रावळी अशा कितीतरी प्रकारचा कचरा गोळा करायचा, तो व्यवस्थित पॅक करून त्याची नोंद करायची आणि तो गडाखाली पाठवायचा हे काम तसं पहायला गेलं तर मुळीच सोपं नाही. “हे असलं काम मी का करु?” आणि “बाकी लोकं वाट्टेल तसे वागतात त्याचा कचरा मीच का उचलायचा?” असे प्रश्न मनात येऊ न देता काम करत रहायचं, हे किशोरवयीन गटासाठी कठीण असतं. दोन दिवस सफाई कामगाराच्या भूमिकेत राहण्यापेक्षा ॲडलॅब्स इमॅजिका’ला गेली असती तर कुणाला त्यात काहीही गैर वाटलं नसतं, अशा वयातली ही मुलं..! पण त्यांनी प्रेरित होऊन हे काम करावं, यातच खऱ्या महाराष्ट्रधर्माचं दर्शन घडतं..! 

रात्री पावणे दोन वाजता आम्ही गड चढायला सुरुवात केली आणि महादरवाजा ओलांडून पहिली प्लॅस्टिकची बाटली उचलली ती पहाटे चार वाजता.. तिथून आमचे हात कचरा उचलण्यात जे गुंतून गेले ते शेवटची बॅग दुपारी बारा वाजता भरेपर्यंत अखंड काम करत होते..! आम्ही नेलेल्या बॅग्ज आणि पुन्हा वरती घेतलेल्या काही जम्बो बॅग्ज असा मिळून जवळपास तीन ट्रक खचाखच भरतील इतका कचरा गोळा करण्याचं काम आम्ही केलं..!

आपल्याकडं हे एक भारी असतं बघा. कचरा करणाऱ्यांनाही कुणी विचारत नाही अन् कचरा गोळा करण्याचं काम करणाऱ्यांचीही दखल कुणी घेत नाही. हजारो लोक गडावर होते, कुणी हुल्लडबाजी करत होते, कुणी तलवारी घेऊन नाचत होते, कुणी पारंपरिक पद्धतीच्या पोशाखात सजूनधजून आले होते. हौशे नवशे गवशे सगळे होते. पण, “चला, मीही तुमच्यासोबत काम करतो” असं एकही जण म्हणाला नाही. उलट, अनेकांना खरोखरच आम्ही सफाई कामगार वाटलो. त्यांनी शिट्टी वाजवून आम्हाला बोलावलं अन् त्यांच्या उष्ट्या खरकट्या पत्रावळी उचलायला लावल्या..! आदल्या दिवशी गडावर कुणीतरी पॅक फूड वाटलं होतं. ते उष्टं, सडलेलं, माशा घोंगावणारं जेवण जागोजागी तसंच पडलेलं होतं. कुणीतरी एक गृहस्थ आम्हाला “अरे मुलांनो, ते खरकटं अन्न सुध्दा उचला रे” असं सांगत होते. त्यांच्या हातात बिस्किटांचा पुडा होता. आम्हाला सांगताना त्यांनी बिस्किटे खाल्ली अन् रिकामा प्लॅस्टिकचा कागद तिथंच टाकून निघून गेले…! 

दोन जण तटावर बसून दाढी करत होते. इतक्या उंचावर येऊन थंडगार हवेचा आनंद घेत घेत दाढी करणं म्हणजे सुख असणार.. दाढ्या आटोपल्यावर उभयतांनी आपापली रेझर्स तटावरून खालच्या दरीत फेकून दिली..! 

आर ओ’चा प्लांट होळीच्या माळावर बसवण्यात आला होता. काही महाभाग ते पाणी घेऊन आडोशाला जाऊन पोट रिकामं करण्यासाठी वापरत होते. चार-पाच जणांनी आर ओ’चं पाणी बादल्यांमध्ये भरुन घेतलं आणि हत्ती तलावापाशी जाऊन चक्क आंघोळी केल्या..! 

आपल्या समाजातल्या लोकांच्या बुद्धीची आभाळं अशी फाटलेली आहेत. कुठं कुठं आणि किती ठिगळं लावायची? 

“एक जमाना असा होता की, आम्हाला हीच कामं हे लोकं करायला लावत होते, आता यांच्यावर ही वेळ आली” असं म्हणून एकमेकांच्या हातांवर टाळ्या देऊन छद्मीपणानं हसणारं सुध्दा एक टोळकं आमच्या मागं होतं. मी फक्त ऐकत होतो. पण मागं वळून पाहत नव्हतो. सावरकर, टिळक, पेशवे अशा अनेक विशिष्ट लोकांविषयी येथेच्छ टिंगलटवाळी चालली होती. माझे डोळे लाल झाले होते, पाण्यानं भरले होते. “आज कचरा उचलायला लावलाय, उद्या नासवलं पाहिजे”, हे शब्द कानांवर पडले, मग मात्र मी मागं वळून त्यांच्याकडं बघितलं. डोळ्यांत डोळे घालून बघितलं. अठरा वीस वर्षं वयाची पोरं होती ती. माझा चेहरा बघूनच त्यांच्या पोटात कळ आली असावी. पुढच्या क्षणाला तिथून सगळे पळून गेले..! असो. 

यावेळी आमच्या गटानं केवळ गडाची स्वच्छताच केली असं नाही. गडाच्या पायथ्याशी राहणाऱ्या दहा कातकरी कुटुंबांसाठी आम्ही भरपूर साहित्य गोळा करुन आणलं होतं. कपडे, भांडी, खेळणी, धान्य, तेल, चहा- साखर, धान्य साठवण्यासाठी डबे, पाणी साठवण्यासाठीचे बॅरल असं पुष्कळ साहित्य तिथल्या परिवारांना दिलं. जवळपास दोनशे किलोहून अधिक धान्य दिलं. त्यात गहू, ज्वारी, तांदळाची पोती, तूर आणि मुगाची डाळ, तिखट, मीठ, हळद, जिरे, मोहरी असं सगळं सामान होतं. जवळपास पन्नास कुटुंबाकडून मुलांनी हे सगळं गोळा केलं होतं. कपड्यांमध्ये साड्या होत्या, पुरुषांसाठी शर्ट्स, पँट, जीन्स, टी शर्ट, रेनकोट, मोठ्यांसाठी स्वेटर्स, लहान मुलांसाठी कपडे आणि स्वेटर्स, बेडशीट्स, चादरी, ब्लँकेट्स, सतरंज्या असं सामान दिलं. हे गोळा करण्यासाठी मुलं घरोघरी फिरली. लोकांनीही मुलांना चांगला प्रतिसाद दिला. या सगळ्या मुलांच्या पालकांनी यात आर्थिक बाबतीत सक्रियता दाखवली. 

चाळीस-चाळीस वर्षं वीज नाही, पाणी नाही, रस्ता नाही अशा दुर्गम भागात ही कुटुंबं राहत आहेत. कुणाही राजकीय नेत्याला त्यांच्याकडं बघायला सवड नाही. आता ऑगस्ट महिन्यात या दहा कुटुंबांसाठी आम्ही सोलार दिवे घेऊन जाणार आहोत, असा संकल्प केला आहे. इच्छा तेथे मार्ग…! आमच्या या संकल्पाला नक्की यश येईल. 

आज रायगडाचे तट अन् खालचे कडे प्लॅस्टिकनं भरून गेले आहेत. प्रचंड कचरा पडला आहे. तो भारतीय नागरिकांनीच केला आहे, यात शंका नाही. मराठी साम्राज्याची राजधानी प्लॅस्टिकच्या विळख्यात अडकत चालली आहे. रायगडाचं पक्षीजीवन, वन्य प्राणीजीवन दिवसेंदिवस खराब होत चाललं आहे. कुणाचंच तिकडं लक्ष नाही. येणाऱ्या कुणालाही त्याविषयी आस्था नाही. (रायगडावर सावली देणाऱ्या झाडांची नितांत गरज आहे. पुरातत्व खात्याच्या नियमांनुसार कदाचित जमिनीत झाडं लावता येणार नाहीत. पण मोठमोठ्या आकाराच्या आकर्षक कुंड्यांमध्ये निश्चित लावता येतील. महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठांना सोबत घेऊन हा विषय उत्तम करता येईल. पण इच्छाशक्ती नाही.)  ‘भ’ आणि ‘मा’ च्या भाषेत बोलणाऱ्या पर्यटकांची संख्या कमी नाही.  माणसांना ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी वावरण्याचं भान नसतं, हेच सत्य आहे. हा केवळ कपड्यांच्या बाबतीतल्या आचारसंहितेचा मुद्दा नाही. आपली वाणीसुध्दा नियंत्रित असणं आवश्यक आहे. पिण्याचं पाणी आणि वापरण्याचं पाणी यातला फरक आजही लोकांना कळत नसेल तर,आजवरचं सगळं औपचारिक शिक्षण निरुपयोगीच आहे,असं मान्य करावं लागेल. नियमांच्या पाट्या लावून उपयोग होत नाही, किंवा दंड करुन उपयोग होत नाही. “स्वयंशिस्त” आणि “तारतम्य” हे दोन गुण अविरतपणे शिकवत राहण्याची गरज आहे. महाराजांच्या गडकोटांची आजची परिस्थिती चिंताजनक असली तरीही, स्वतः छत्रपती शिवाजीमहाराजांच्या नीतीचं समग्र दर्शन घडवणारं आज्ञापत्र मात्र आजही उपलब्ध आहे. 

शिवाजीमहाराजांचं आज्ञापत्र हा केवळ ऐतिहासिक दस्तऐवज नाही. तो प्रत्यक्ष आचरण करण्याचा विषय आहे. आज्ञापत्र शाळांमधून मुलांना शिकवलं गेलं पाहिजे. त्याचा अभ्यास मुलांनी केला पाहिजे. आज्ञापत्राचे प्रशिक्षण वर्ग, अभ्यास वर्ग झाले पाहिजेत. मुलांसाठी शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रावर आधारित ज्ञान परिक्षा महाराष्ट्रात सुरु व्हायला हवी. कारण, त्यातून शिकावं असं प्रचंड आहे. 

लिहिण्यासारखं खूप काही आहे. व्यक्त करण्यासारखे अनुभव खूप आहेत. पण व्यक्त होण्यालाही शेवटी चौकट असतेच. ज्याला बदल घडवून आणण्याची इच्छा आहे, त्यानं अखंड कृतिशील राहिलंच पाहिजे. 

“आचारशीळ विचारशीळ | दानशीळ धर्मशीळ | सर्वज्ञपणें सुशीळ | सकळां ठायीं ||” असं शिवाजीमहाराजांचं वर्णन आहे. त्याचंच आचरण करण्याची गरज आहे. 

|| अधिक काय लिहावें, सर्व सूज्ञ आहेति ||

|| मर्यादेयं विराजते ||

लेखक – श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

संग्राहक : श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares