सकाळचा नेत्रसुखद मॉर्निंग वॉक घेऊन सोसायटीच्या जवळ आलो आणि माझा डावा डोळा फडफडायला लागला ! असा डावा डोळा अचानक फडफडायला लागला, तर आपल्यावर काहीतरी अरिष्ट येणार, असं जुन्या जाणत्या लोकांच मत ! माझा काही अशा गोष्टींवर विश्वास नाही, पण तुम्हाला सांगतो मंडळी, मी जिन्याची जसं जशी एक एक पायरी चढायला लागलो, तस तसा माझ्या डोळ्याचा फडफडण्याचा वेग पण वाढायला लागला ! मी बेल वाजवण्यासाठी बेलच्या बटनाला हात लावणार, तोच फ्लॅटच दार आपोआप उघडलं आणि माझा डावा डोळा फडफडायचा अचानक थांबला ! त्या धक्क्यातून सावरून समोर बघतोय तर दुसरा जोरदार धक्का मला बसला ! माझी एकुलती एक बायको हातात चहाचा कप घेऊन हजर ! आता हेच जर ते गोड अरिष्ट असेल तर ते मलाच काय, कुठल्याही नवरोबाला आवडेल, खरं की नाही ?
“अगं हे काय ? आज एकदम न मागता चहा आणि तो सुद्धा मी घरात शिरायच्या आधी?” “मी म्हटलं रोज रोज तुम्हाला कशाला ‘अगं जरा चहा देतेस का?’ अशी माझी विनवणी करायला लावायची ! आज आपणच तुम्ही न मागता, तुम्हाला चहा देवून सरप्राईज द्याव !” त्यावर तिच्या हातचा चहा घेऊन मी घरात येत तिला म्हटलं “माझे आई, गेल्यावेळच्या तुझ्या ‘सरप्राईजची’ शिक्षा अजून माझी आई मला देत्ये, ती पुरे नाही का झाली ?” “हे बघा, माझी त्या वेळेस काहीच चूक नव्हती बरं.” त्यावर मग मी चहाचा घोट घेता घेता बायकोला म्हटलं “अगं तू मला नुसतं म्हणालीस, आई येणार आहे म्हणून, मला वाटलं तुझी आई, म्हणजे सासूबाई येणार म्हणून !” “तुम्हाला तेव्हा तसं वाटलं यात माझी काय चूक ?” “बरं, चूक झाली माझे आई ! पण आता मला खरं खरं सांग, या आजच्या माझ्या स्वागता मागे कुठले छुपे कारण दडलं आहे ?” “अहो माझी ती पुण्याची मालू मावशी आठवते का तुम्हाला ?” “मालू मावशी… ” “अहो ती नाही का आपण आपलं लग्न झाल्यावर तिच्या पाया पडायला गेलो…..” “हां, हां आत्ता आठवलं, तिचा बंगला काय मस्त आहे ना कोथरूडला!” आता हिच माहेर पुण्यात त्यामुळे तिचे बहुतेक सारे नातेवाईक पुण्याचे आणि जवळ जवळ सगळ्यांचेच बंगले, म्हणून मी आपली अंधारात एक गोळी चालवून बघितली. पण तुम्हाला सांगतो मंडळी, ती बरोब्बर वर्मी लागली ! “हां, तिच ती, तर त्याच मालू मावशीचा मगाशी फोन आला होता.” “अस्स, काय म्हणतात मालू मावशी, तब्येत वगैरे बरी आहे ना त्यांची ?” “हो, अगदी ठणठणीत आहे ती आणि हो, तिच्या मुलीच्या, मुलीच लग्न आहे परवा त्याचच बोलावणं करायला तिनं फोन केला होता !” “अरे व्वा, मग जाऊया की आपण दोघं!” “दोघं नाही मी एकटीच!” मी मनांत आनंदून, पण वरकरणी तसं न दाखवता तिला म्हटलं “म्हणजे ? तुझं लग्न झालंय आणि तुला एक नवरा पण आहे, हे मावशी विसरली की काय?” “अहो तसं नाही, सध्याच्या करोना काळात लग्नाला फक्त ५० लोकं कार्यात सहभागी होऊ….” “ते माहित्ये गं मला, पण आपल्याकडून आपण दोघं….” “नाही जाऊ शकत” बायको ठामपणे म्हणाली. ते ऐकून माझ्या मनांत, चार पाच दिवसाच्या स्वातंत्र्याची स्वप्न पडायला लागली ! मी आणखी काही बोलणार, तर तीच पुढे म्हणाली “अहो माझाच नंबर ५० माणसात ५० वा आहे आणि तो सुद्धा मावशीच्या लंडनच्या भाच्याची बायको येणार नाही म्हणून! ती जर येणार असती तर, माझा पण पत्ता कट होता, कळलं.” मी मनातल्या मनांत त्या अज्ञात भाच्याचे आणि त्याच्या अज्ञात बायकोचे आभार मानत हिला म्हटलं “हे नक्की ना?” “म्हणजे ?” “म्हणजे, तू नक्की एकटीच पुण्याला लग्नाला जाणार हे.” “हो” “मग मी काय म्हणतो, आता अनायासे तू पुण्यात जात आहेस तर, लग्न झाल्यावर चार पाच दिवस आईकडे जाऊन ये.” “तेच माझ्या डोक्यात होतं, पण या करोनमुळे आपल्या स्वयंपाकाच्या मावशी येत नाहीत, मग तुमचे जेवणाचे हाल….” “अजिबात होणार नाहीत, हल्ली सगळ्या हॉटेलनी (आणि बारनी) होम डिलिव्हरी चालू केली आहे. त्यामुळे तू माझ्या जेवणाची अजिबात काळजी करू नकोस !” “ठीक आहे, मग परवाच लग्न लागलं की मी आईकडे चार पाच दिवस राहून येईन.” असं म्हणून बायको आनंदाने किचन मधे गेली आणि मी उद्या पासून मिळणारे चार पाच दिवसाचे स्वातंत्र्य कसे साजरे करायचे या विचारात मग्न झालो. रमेश, सुरेश, नंदन आणि योगेश यांना मोबाईलकरून सेलिब्रेशनचे आमंत्रण करून टाकले आणि अंघोळीला पळालो.
रात्री कधी नव्हे ती, बायकोला बॅग भरण्यात मदत करत होतो, तेवढ्यात बायकोचा मोबाईल वाजला. “अय्या मालू मावशीचा आहे” असं मला सांगत तिने फोन उचलला. “बोल गं मावशी, ही काय उद्याची बॅगच भरायला बसल्ये.” या बायकोच्या एका डायलॉग नंतर, तिचा मोबाईल नाही पण आवाज म्यूट झाला आणि तिच्या चेहऱ्यावरचे रंग बदलत जाऊन डोळ्यात पाणी उभे राहिलं. दहा मिनिटं अशीच म्यूट गेली आणि बायकोने “ठीक आहे” असं म्हणून मोबाईल बंद केला व रडायला आणि बॅग उपसायला एकदमच सुरवात केली. “अगं असं एकदम रडायला…..” “मी नाही जात आहे लग्नाला” ते ऐकून मला परत कोणीतरी पारतंत्र्याच्या बेडया ठोकल्याचा भास झाला ! “अगं पण का?” “माझा पत्ता कट झाला” असं म्हणून ती पुन्हा रडायला आणि बॅग उपसायला लागली. “पण लग्नाच्या वऱ्हाडी मंडळीत तुझा ५० वा नंबर होता…” “होता ssss ! पण आता मावशीच्या लंडनच्या भाच्याच्या बायकोला रजा मिळणार आहे आणि ती लग्नाला नक्की येणार आहे म्हणून मावशीने माझा पत्ता कट केला !”
बायकोचे ते वाक्य, मला मिळणाऱ्या चार पाच दिवसाच्या स्वातंत्र्यचा पण आपोआप पत्ता कट करून गेले आणि मी डोकयावर पांघरूण घेऊन, मित्रमंडळींना कसं पटवायचं याचा विचार करू लागलो !
☆ विविधा ☆ स्पॅनिश फ्लू-अ फरगॉटन पेंडेमिक – भाग 2 ☆ सौ. सुनिता गद्रे☆
जागतिक महामारीच्या बाबतीत विचार केला तर योगायोग म्हणा किंवा आणखी काही, (हा संशोधनाचाच विषय आहे ).पण1720पासून दर शंभर वर्षांनी जागतिक महामारी उद्भवलेली आहे, असं चित्र दिसतं.
1720 साली पुरत्या जगभरात प्लेगची साथ पसरली होती. ती पण एका फ्रेंच व्यापारी जहाजावरून निघालीआणि नंतर पुरतं जग संक्रमित झालं.एक लाख लोक मृत्युमुखी पडले होते.-ही युरोपातील आकडेवारी आहे. इतर ठिकाणची आकडेवारी उपलब्ध नाही. तेव्हाची तिथली लोकसंख्या लक्षात घेता हा आकडा मोठाच आहे.
पुढे शंभर वर्षांनी 18 20 मध्ये कॉलरा पसरला. त्याची सुरवात कलकत्याजवळच्या एका शहरापासूनझाली.इतर देशांपेक्षाआशिया खंडाचा मोठा भाग,ईस्ट आफ्रिका त्यामुळे जास्त प्रभावित झाले. थायलंड इंडोनेशियामधे तर दीड लाख लोक या मुळे मृत्युमुखी पडले अशी नोंद आहे. बाकी ठिकाणची आकडेवारी उपलब्ध नाही.
पुढे शंभर वर्षांनी 1918 ते 1920 या कालखंडात इन्फ्लूएंजा हा आजार पसरला. जगाची एक तृतीयांश लोकसंख्या … त्यावेळी जगाची लोकसंख्या पन्नास करोड होती… आणि त्यातले पाच करोड लोक एन्फूएन्जामुळे मृत्युमुखी पडले .त्यात 20 ते 35 वर्षे वयाच्या तरुण आणि सशक्त लोकांचा समावेश जास्त होता .
1914 ते 1918 या कालावधीत पहिले जागतिक युद्ध झाले होते. फ्रान्स जर्मनी बॉर्डरवर घनघोर युद्ध चालू होते. सैनिकांना डिफेन्स साठी खणलेल्या खंदकामधे पावसापाण्यात, थंडीवाऱ्यात, चिखलात महिनोंन महिने राहावे लागायचे. त्यांचं झोपणं उठणं, खाण पिणं, सर्व तेथेच चालायचं. ही स्थिती त्यांच्या आरोग्याला प्रतिकूल होती. त्यामुळे बरेच सैनिक निमोनियानं आजारी पडायचे. तिथेच एन्फ्लूएन्जाच्या एच वन एन वन या विषाणूचा जन्म झाला.हल्ली अधून मधून बर्ड फ्लूची साथ येत असते ते याचेच बदललेले रूप आहे .
सैनिक आजारी पडले की त्यांना घरी पाठवण्यात यायचं. ते आपल्याबरोबर हा आजार घेऊनच आपल्या गावात, घरात जात होते .त्यामुळे मिडल वेस्ट अमेरिका पुढे 1919 पर्यंत पुरत्या युरोपमध्ये हे संक्रमण पोहोचले… आणि नंतर पूर्ण जगभर.
1918मधे महायुद्ध संपल्यावर परत येणाऱ्या सैनिकांबरोबर प्रथम मुंबईत… आणि नंतर पुऱ्या भारतभर हे संक्रमण पोहोचले.
जे देश युद्धात सामील झाले होते त्यांच्या देशात सेन्सॉरशिप होती. भारतात सुद्धा….. त्यामुळे या बद्दलच्या बातम्या बाहेर येत नव्हत्या. इन्फ्लूएंजाला स्पॅनिश फ्लू म्हणायचे कारण फारच विचित्र आहे. स्पेनने या युद्धात भाग घेतला नव्हता.तो एकदम न्यूट्रल देश होता.त्यामुळे इन्फ्लूएंजा बद्दलच्या जगभरातल्या खऱ्या बातम्या स्पेनमधूनच बाहेर पडत होत्या. त्यामुळे ब्रिटन, अमेरिका सारख्या देशांनी त्याचं नामकरण स्पॅनिश फ्लू असं करून टाकलं आणि स्वतःच्या देशातून त्याचं अंडर रिपोर्टिंग केलं .
जरी प्रथम विश्व युद्ध 1918 मध्ये संपुष्टात आलं तरी युद्धामुळे जिंकलेल्या आणि हरलेल्या सगळ्याच देशांची अर्थव्यवस्था कोलमडली होती.
प्रचंड मनुष्यहानी झाली होती. स्पॅनिश फ्लूच्या उपचारासाठी जास्त बजेट पण बहुतांश देश काढून ठेवू शकत नव्हते. यामुळे दुर्लक्षित झालेल्या या स्पॅनिश फ्लूबद्दल जास्त रेकॉर्ड पण कुठल्याही देशाने ठेवलं नाही. त्यावर योग्य इलाज पण झाले नाहीत.त्यामुळे महायुद्धात चार करोड लोक मेले तर स्पेनिश फ्लूमुळे पाच करोड!
भारतात तर ब्रिटिश सरकारने या महामारी वर काही विशेष उपाययोजनाही केल्या नाहीत. इथं दीड ते दोन करोड लोक दगावले ही आकडेवारी तरी कशी पुढे आली .तर ब्रिटिश सरकारने 1901 पासून पुरत्या भारत देशात जनगणना करायला सुरुवात केली होती आणि तेव्हापासून प्रत्येक दहा वर्षांनी जनगणना करायची पद्धत आजतागायत चालू आहे. त्या वेळी 1911 सालच्या देशातील लोकसंख्येच्या आकड्यापेक्षा 1921 मधील लोकसंख्या दोन करोड ने कमी असल्याचे आढळून आले.त्या दहा वर्षाच्या कालखंडात लोकसंख्येत वाढ तर झालीच असेल आणि दुसरे म्हणजे कॉलरा, देवी, मलेरिया यासारख्या साथीत पण खूप लोक दगावले होते. बालमृत्यूचे ,बाळंतपणात मरणाऱ्या स्त्रियांचे प्रमाणही मोठे होते .त्यामुळे लोकसंख्येत घट पण झालीचअसेल.परंतू या गोष्टीचा विचार अजिबात न करता,स्पॅनिश फ्लूमुळे दोन करोड लोक मेले हे सरकार कडून जाहीर करण्यात आले. इतर देशातील आकडेवारी पण अंदाजपंचे देण्यात आली असावी.त्यामुळे हा पाच करोड चा आकडा पण खरा असण्याची शक्यता खूपच कमी आहे.
एकंदरीत त्या काळातले स्पॅनिश फ्लूबद्दलचे जास्त रेकॉर्ड उपलब्ध नसल्यामुळे आणि त्याचा त्यानंतर कोणी पाठपुरावा न केल्यामुळे जग त्या महामारीला विसरून गेले. त्यामुळे ‘फरगॉटन पेंडेमिक ‘ असा त्याचाउल्लेख होऊ लागला.
☆ विविधा ☆ स्पॅनिश फ्लू-अ फरगॉटन पेंडेमिक – भाग 1 ☆ सौ. सुनिता गद्रे☆
Covid-19 ची साथ चीन मधून निघाली…बघता बघता जगातल्या 195 देशांना तिनं आपल्या कब्जात घेतलं….आता जगभर माहिती-तंत्रज्ञानाचा इतका प्रसार झाला आहे की आजच्या तारखेला पूर्ण जगात किती कोविड -19 पॉझिटिव आहेत? किती जणांनी आजारावर मात केली? किती जण दुर्दैवानं मृत्युमुखी पडले? भारतातील आकडेवारी….. वगैरे सगळं एका क्लिकवर आपल्याला समजू शकतं.
याबद्दल आपण सर्वांना या दीड वर्षात खूप सारं वाचलंय, ऐकलंय आणि अनुभवलंय पण!
टीव्ही वरची याबाबतची चर्चा मी ऐकत होते.त्यावेळी शंभर वर्षापूर्वीच्या स्पॅनिश फ्लू चा उल्लेख आला.1918 ते 1920 पर्यंतच्या कालावधीत या महामारीने जगातल्या पाच करोड किंवा त्याहून अधिक लोकांचे प्राण घेतले ह़ोते….नुसत्या भारतातच दोन करोड लोक मृत्युमुखी पडले होते.
आज मितीस covid-19 मुळे भारतातल्या सर्व राज्यात मिळून या दिड वर्षात 5ते6 लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत.. त्या दृष्टीने पहाता स्पॅनिश फ्लूने आपण गमावलेल्याआपल्या प्रियजनांचा आकडा 2करोड,हा खूपच मोठा आहे. या महामारी मुळे त्याकाळीआपल्या देशात,गावागावातून.. शहरा शहरातून…राज्या राज्यातून किती तरी लोक मृत्यूमुखी पडले असतील. असे मला वाटते.मग 1918 ते 1920 मध्ये त्यावेळी तरुण,जागरूक (वर्तमानपत्र वगैरे वाचणार्या सुशिक्षित) असलेल्या आपल्या वडीलधाऱ्यां कडून उदाहरणार्थ दोन्ही आजोबा आणि आज्या, इतर परिजन यांच्याकडून त्याबाबत आपण काहीच कसे ऐकलेले नाही? लेखक,कवी यांच्या साहित्यातून त्याबाबतचा साधा उल्लेखही का नाही आढळत ? अशा शंका माझ्या मनात उत्पन्न झाल्या.
याउलट त्या मानाने…1896 मध्ये, म्हणजे स्पॅनिश फ्ल्यू या साथीच्या बावीस वर्षे आधी पसरलेल्या प्लेगबाबत आपल्याला खूप माहिती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भावाला झालेला प्लेग, लोकमान्य टिळकांचा मुलगा प्लेगमधे दगावला होता… (याबाबतची ही माहिती…) लोकमान्य टिळक त्यावेळी खूप महत्त्वाच्या राजकारणात गुरफटलेले होते. त्यांची गुप्त बैठक चालू होती. कोणीतरी त्यांना ही बातमी सांगितली.
तेव्हा टिळक म्हणालेहोते, “सगळ्या गावाची होळी पेटली आहे. त्यात माझ्या घरची एक गोवरी गेली.” दुःखाचे फार प्रदर्शन ते करत बसले नाहीत.हे पण खूप जणांना माहित आहे. अगदी माझ्या जवळचे उदाहरण सांगायचे तर, माझे पणजोबा (आईचेआजोबा )पण प्लेगने गेले होते. पणजीकडून,आजीकडून याबाबत आम्ही खूप ऐकले होते. बाधित उंदरामुळे हा रोग पसरला होता.सर्व लोक गावाबाहेर तंबूत वगैरे राहायला गेले होते.अशी वेगवेगळ्या लोकांकडून भरपूर माहिती ऐकली होती. मग 1918ते 20 च्या स्पॅनिश फ्लूबद्दल लोकांना अजिबात माहिती का नाही? हे जाणून घ्यायची तीव्र इच्छा माझ्या मनात जागृत झाली. त्यादृष्टीने मी काही वाचन केले, गुगल, यु ट्यूब ढवळून काढली आणि सगळी वस्तुस्थिती मला माहीत झाली.
तीच तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा प्रयत्न आहे.
प्रथम 1896च्या प्लेगबद्दल सांगते. हाँगकाँग येथे ही साथ 1894 पासून सलग तीन वर्षे उसळी मारत होती….. तिनेच पुढे मुंबईवर कब्जा केला.. आणि पुण्यात तर 1896 मध्ये तिने कहर माजवला. पुढे पुरत्या मुंबई राज्यात ती पसरली.प्लेगच्या काळात आपल्या लोकांचे जीवन विस्कळीत तर झालेच होते, शिवाय जीवितहानी ही खूप झाली होती.हजारोलोक दगावले होते.
त्या काळात मुंबई बंदरावरून भरभरून,बोटीने आपल्याकडचे अन्नधान्य इंग्लंड मध्ये जायचे. आणि धान्याच्या एवढ्या प्रचंड साठ्यात उंदीर तर खेळत असायचेच.बाधित उंदरामुळे हा रोग पसरतो त्यामुळे इंग्रज घाबरून गेले होते.ही साथ आपल्या देशात.. इंग्लंडमध्ये, जाऊ नये म्हणून ब्रिटिश सरकारने कलेक्टर रँड याच्याकरवी आपल्या सोल्जर्स कडून,लोकांना विश्वासात न घेता मोठ्या प्रमाणावर घर तपासणी सुरू केली.लोकांवर खूप अत्याचार करण्यात आले. धाकदपटशा, मारहाण, स्त्रियांची अब्रू लुटणे…. या प्रकाराने संतापलेल्या जनतेतील ‘चाफेकर बंधूंनी’ रँडची हत्या केली. मुंबई राज्यात मोठ्या प्रमाणात ही साथ पसरली होती…ही याची पार्श्वभूमी असल्याने प्लेग आपल्या लोकांच्या लक्षात राहिला.
सर्वांच्या जिव्हाळ्याचा, आनंदाचा, उत्साहाचा सण म्हणजे गणेशोत्सव ! तो कधीपासून सुरु झाला याची नोंद इतिहासात असणार, पण गणपती मळाचा की चिखलाचा ? आख्यायिकाही वेगवेगळ्या आहेत.कुणी पुराणात जाऊन पाहिलंय ? नाही, तेही कल्पनेनेच लिहिले त्यामागे तत्कालीन परिस्थिती, भौगोलिक, आर्थिक सामाजिक, वैज्ञानिक ही असेल कदाचीत पण ते प्रमाण मानत आपण पाळत आलो.त्या काळी काळाशी ते सुसंगत असेल ही !
ब्रिटिशांविरुद्ध समाजात एकी निर्माण करण्यासाठी लो.टिळकांनी घरातला गणपती चौकात ठेवला की जेणेकरून लोक एकत्र येतील मग त्यांना समजावणे, सांगणे सोपे जाईल. मग त्याला सार्वजनिक रूप आले.टिळकांचा मूळ उद्देश जनजागृती व लोकांना एकत्र येणे हे सफल झाले असतीलच, पण पुढे ही प्रथा तशीच राहिली अन मंडळे वेगवेगळ्या कल्पना लढवून कल्पकता अन सामाजिक प्रबोधन करू लागली.मनोरंजनाच्या विविधरंगी कार्यक्रमानी उत्सव बहरू आणि भारु लागले.एक चैतन्य संचारले. या उत्सवात नियमितच्या रुटीनमधून लोकांचे मनोरंजन होऊ लागले, विरंगुळा मिळू लागला.लोक शिकले, शिक्षित झाले उत्सवात बदल झाले.लोकसंख्या वाढली, आता खरे तर काळानुसार बदल व्हायला हवे होते पण उलटेच घडले.
भरमसाठ मंडळे, एकमेकांवर ईर्षा, भांडणे करू लागली. जबरदस्तीच्या देणग्या, उंचच उंच मुर्त्या, डॉल्बी, बीभत्स गाणी यांनी उत्सवाचे सात्विक रूप जाऊन हिडीस रूप आले.प्रसादाच्या नावाखाली जेवणावेळी, अन अन्नाचा अपव्यय होऊ लागला.रस्त्यावरची गर्दी, डॉल्बीचे शरीरावरील घातक परिणाम, पाणी प्रदूषण, ट्रॅफिक जॅम अन सामाजिक वातावरण गढूळ केलंय या सार्वजनिक उत्सवाने !म्हणजे आचार विचारात काळानुसार बदल होऊन सुसंस्कृतपणा यायच्या ऐवजी त्याची दिशा भरकटली अन दशा दशा झाली की हे आवरायला गणेशालाच बोलवावे वाटतेय.
सामाजिक वातावरण, पर्यावरण यांचा विचार आम्ही करत नसू तर मग कायदाच का करत नाहीत?’एक छोटे गाव एक गणपती’, मोठे शहर एक गल्ली एक गणपती ?’ मोठ्या मूर्ती बनवणे कायद्याने बंद का केले जात नाही ? पर्यावरण पुरकच मूर्ती तयार करा म्हणून कायदा का होत नाही ? घरगुती, सार्वजनिक मूर्तींना ठराविक उंचीचे प्रमाण का दिले जात नाही ?कारण या सर्वांना खतपाणी घालायला राजकारणी मंडळी कारणीभूत आहेत.उत्सव जवळ येताच मंडळांना शर्ट, भरमसाठ देणगी दिली जाते अन ऐतखाऊ, चंगळवादी पिढ्याना सवय झालीय की उत्सव आला की राजकारण्यांकडे भीक मागून जगायचे.टोकाच्या अस्मिता अन श्रद्धाही ! सामाजिक जागृती अशा विचित्र, ओंगळ वळणावर आलीय, करोडो रु चा चुरा पाच ते सात दिवसात होतोय.अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच मंडळे सामाजिक बांधिलकी, सलोखा अन विधायक उपक्रम राबवतात, बाकी सर्व तेच ते जेवणावेळी, रोषणाई अन डॉल्बी !
खरे तर भारत हा कृषिप्रधान देश आहे अन म्हणून सर्व सण उत्सव हे शेतकरी जीवनाशी निगडित होते.देवाचा प्रसाद अन फुले फळे ही त्या त्या ऋतूनुसार ! चिखलाचे देव पाण्यात विसर्जित करायचे म्हणजे पुन्हा ते निसर्गात मिसळावेत जसे मनुष्य जन्मास येतो अन शेवटी मातीत मिसळून एकरूप होतो ! तसेच या देवांच्या मूर्तीचे देखील ! बघा, नागोबा, बैल, मातीचेच अन गणपती ही मातीचाच ! बारा बलुतेदारांना वेगवेगळ्या सणाला महत्त्व होते अन त्यांचा चरितार्थ यातून होत असे म्हणून हे सण अन औपचारिक गोष्टींचे चक्र त्या गावगाड्याच्या गरजेनुसार फिरत असे ! आता ते सर्व सम्पले, शेती सम्पली, कृषिप्रधान देश व्यापार प्रधान अन नोकरीप्रधान झाला अन सगळे सण व्यापारी गणिते करू लागले ! शेतातून, परसातून फुले, पत्री, दुर्वा न मिळता थेट बाजारातून मिळू लागली. पाना फुलांचा, फांद्यांचा बाजार बसू लागला अन कसल्याही परस्थितीत ते केलेच पाहिजे ही मानसिकता वाढली.
अमुक सण अमुक स्पेसॅलिटी याचे स्तोम वाढले शेतात पिकापेक्षा तणकट फोपावल्यासारखे !
मला आठवतो माझ्या बालपणीचा गणेशोत्सव ! श्रावणातल्या झडीने अन भादव्याच्या उन्हाने पिकं तरारून यायची. सोबत गवत तणही फोपवायचे पिकांशी स्पर्धा करत, रस्त्याच्या दुतर्फा तरवड, गवतफुल फुललेली असायची.परसदारी विविधरंगी गौरी फुलायच्या रंगीबेरंगी फुलपाखरे सगळीकडे आनंदाने भिरभरायची.ज्वारी, मका कम्बरेला लागलेली असायची. मूग, काळा श्रावण, चवळीच्या शेंगा अंगणात ऊन खात पडायच्या.मुगातल्या लाल अळ्या अन चवळीच्या पांढऱ्या अळ्या शेंगेतून बाहेर पडून वाट दिसेल तिकडं धावायच्या. उन्हात टरफल फुटून शेंगा चट चट आवाज करत फुटायच्या अन कडधान्य बाजूला पडायची. चिमण्या दिवसभर या आळ्या गट्टम करण्यात व्यस्त अन शेतकरीन धान्याची उगा निगा करण्यात ! इकडे शेतीच्या पिकांची लगबग अन सण चौकटीत ! पटपट ही काम आवरून सणाच्या तयारीला लागायची ! घराघरात देवळीला सोनेरी बेगड लावून मखर करून गणपती विराजमान व्हायचा क्वचितच तो टेबल किंवा तत्सम वस्तूवर स्थानापन्न व्हायचा.शेतात दुर्वा दव बिंदूंचे मुकुट परिधान करून पावसाची नव्हाळी लेऊन हिरव्या कंच लुसलुशीत पेहरावात मुबलकपणे हवेवर डुलायच्या.आघाडा रस्त्याच्या कडेला कुंपणात आपली डोकी उंचावत अस्तित्वाची दखल घ्यायला भाग पाडायचा ! उदबत्ती, निरांजन, कागदाच्या झुरमुळ्या, दरवर्षी याच सणाला राखून ठेवलेले नवीन रंगीबेरंगी कापड टेबल वर बस्स इतकीच घरगुती गणपतीची आरास ! फार फार तर कागदाची एखादी प्रभावळ ! पेढे, पेरू, केळ, चुरमुरे बत्तासे, शिरा, मोदक प्रसाद इतकाच माफक !
सार्वजनिक मंडळ गल्लीत एकच साधी मूर्ती, छोटासा मंडप, विद्युत रोषणाई स्टेरीओवर तेव्हढाच गल्लीपुरता गाण्यांचा आवाज घुमायचा अन मनात आनंदी आनंद भरायचा. आमची गल्ली गावाच्या एका टोकाला, खूप मोठी ! जणू छोटेसे एक गावच ! गल्लीतल्याच नाटक कंपनीचं एखादं नाटक किंवा विविध गुण दर्शन बस इतकेच मनोरंजन ! गावात वेगवेगळ्या पेठांचे वैशिष्ट्य पूर्ण आरास, देखावे कधी जिवंत देखावे अन तीच स्टेरिओवरील गाणी त्या त्या काळातील मराठी हिंदी चित्रपटातील ! वातावरण आनंदान भरून जायचं ! वेगळं काही वाटत नव्हतं किंवा देव आणि गाणी यांचा काही संबंध असावा हे ध्यानी येत नव्हतं ! कुठेही धावपळ, ताण किंवा बोजा नसायचा.पाच दिवस घरोघरी विराजमान होऊन पुरणपोळी खाऊन, सार्वजनिक गणपती शिरा खाऊन त्यांच्या गावी जायचे मन हुरहूरते ठेऊन अन शेतकरी पुढील शेताच्या कामाच्या लगबगीत !
काल सेन्सेक्सने उसळी घेऊन आठ्ठावन्न हजाराचा टप्पा पार केल्यावर, एक सामान्य माणूस म्हणून, मी माझी प्रतिक्रिया नोंदवू इच्छितो, जी प्रत्येकाने आपापल्या जोखमीवर वाचावी, ही नम्र विनंती !
ही जी काय उसळ अठ्ठावन्न हजाराच्या तापमानला आज उसळी घेऊन रटरटते आहे, तिचा खरा बॉयलिंग पॉईंट काय असेल, असावा हे भले भले स्वतः अर्थशास्त्र कोळून प्यायलेले अभ्यासक सुद्धा आज पर्यंत सांगू शकले नाहीत, तिथे तुमच्या, माझ्या सारख्या सामान्य लोकांचा काय पाडाव लागणार ? कारण ही जी उसळ ज्या जी जी भाय टॉवर नावाच्या भांड्यात शिजायला ठेवली आहे, त्या भांड्या खालचा गॅस कोणता अदृश्य हात, स्वतःच्या मर्जीनुसार कमी जास्त करतो ते कळतच नाही ! त्यामुळे होतं काय, या उसळीचा स्वाद घ्यायला येणारे नवीन नवीन खवय्ये, ती थोडीशी चाखून सुद्धा, स्वतः गॅसवर गेल्याची अनेक उदाहरणं आपण सगळ्यांनी पहिली आहेत !
फार पूर्वी, शेअर मार्केटरुपी सट्ट्याच्या मुदपाकखान्याच्या वाटेला जाणे हे सामान्य मराठी मध्यमवर्गात निशिद्ध मानलं जात होतं !
माझ्या माहितीतले असेच अनेक मराठी मध्यमवर्गीय जे पूर्वी “कोटात” कामाला जायचे, ते या मुदपाखान्याची पायरीच काय, त्याच्या फुटपाथवरून (तेव्हा ते खरंच होते हो) सुद्धा जात नसत ! उगाच आत शिजणाऱ्या उसळीचा गंध नाकात जाऊन ती उसळ खायची दुर्बुद्धी व्हायला नको ! ही मंडळी तेंव्हा, आपल्या महिन्याच्या पगारात टुकीने संसार करून, त्यातून थोडे फार पैसे वर्षं भरात वाचलेच तर बँकेत किंवा पोस्टात FD रुपी खात्रीशीर “जनता थाळी” घेण्यात धन्यता मानत असतं ! असो ! जशी दृष्टी तसा कोन आणि तसे त्याचे फळ !
मला विचाराल तर माझ्या मते, ही जी जी भायच्या भांड्यात सतत शिजणारी, रटरटणारी उसळ म्हणजे एक अगम्य साईड डिश आहे ! ही उसळ काहींना कधीतरी चविष्ट लागते तर काहींची जीभ (आणि पर्यायाने खिसा) कधीतरी त्यातील तिखटामुळे पोळते ! त्यामुळे या जी जी भायच्या टॉवरमधे जाऊन त्या उसळीचा स्वाद घ्यायचा, का खात्रीशीर “जनता थाळी” घ्यायची हे ज्याचे त्याने ठरवलेले बरे !
मनुष्य प्राणी जन्माला आल्यापासून तो ज्या काही वस्तूंच्या संपर्कात येतो आणि जी वस्तू परिचयाची होते, त्यातली महत्वाची वस्तू म्हणजे आरसा.
मुलं रडायला लागलं की त्याला नादी लावण्यासाठी त्याला आरसा दाखवतात , त्यावेळी स्वतःचे प्रतिबिंब कुतूहलाने पाहत असताना त्याचे रडणे थांबते, ही आरश्याची जणू पहिली ओळख. प्रथम ते लहान मुलं ते प्रतिबिंब बघून घाबरले असेल पण नंतर त्या प्रतिबिंबाला बघून खुदकन हसते. त्यानंतर जणू आरसा त्याच्या रोजच्या जगण्याचा अविभाज्य घटक बनून जातो.
स्वतःचे प्रतिबिंब न्याहाळताना माणूस त्या प्रतिबिंबित व्यक्तिमत्वाशी इतका समरस होऊन जातो की दिवसभरात किती वेळा माणूस त्याचे प्रतिबिंब न्याहाळत असेल सांगता येत नाही.
आरश्यासारखी प्रामाणिक वस्तू नसेल, जे आहे ते स्पष्टपणे दाखवतो. आरश्यात सौंदर्य जसे खुलून दिसते तसे व्यक्तीमत्वामधील दोषही, आहे तसेच दाखवले जातात. चेहऱ्यामधील सौंदर्याची तफावत अथवा कमतरता पण स्पष्ट केली जाते. घरामधील महत्वाची वस्तू आणि अविभाज्य घटक म्हणून आरश्याचे स्थान आहे.
माणसाच्या उत्क्रांतीत आरश्याचे स्थान कधी आले असेल?असे म्हणतात, ‘माणूस तळ्याच्याकाठी पाणी पिण्यासाठी वाकला होता त्यावेळी संथ पाण्यात स्वतःचे प्रतिबिंब त्याला दिसले. त्या वेळेपासून त्याला कुतूहल निर्माण झाले आणि स्वतःचे प्रतिबिंब बघावे ह्या निकडीतून आरशाचा शोध लागला असावा.
काचेच्यामागे मुलामा चढविल्यानंतर जो चकचकीतपणा आला, त्यात बघणाऱ्या व्यक्तीचे प्रतिबिंब दिसले, ते बघून आरश्याची निर्मिती झाली असावी. ज्या माणसाने आरश्याचा शोध लावला, तोही स्वतःचे प्रतिबिंब बघून खुदकन हसला असेल .असा हा आरसा लहान बाळापासून अगदी आजी आजोबांपर्यंत सगळ्यांचा लाडका झाला.
बालपणात तसे आरश्याकडे दुर्लक्ष होत असेल पण वयात येताना तो एकदम जवळचा वाटू लागतो. किशोर वय असो वा तारुण्याचा काळ आरश्यात स्वतःचे प्रतिबिंब न्याहाळत केश रचना करणे, पेहेराव करणे, आरश्यात स्वतःला न्याहाळत स्वतःचे व्यक्तिमत्व कसे खुलले हे बघत राहणे, अश्या गोष्टी जणू अंगवळणी पडतात. त्यात तरुणींचा तारुण्यकाळातील खुपसा वेळ आरश्यापुढेच जात असेल.
‘दर्पण झूठ न बोले’ ह्या उक्तीप्रमाणे, जसे आहे तसे प्रतिबिंब आरसा दाखवत असतो. त्यामुळे एखादी सौंदर्यवती आरश्यापुढे स्वतःच्या सौंदर्याने मोहून जाते तर साधारण चेहऱ्याची व्यक्ती आरश्याकडे पाहत स्वतःचे सौंदर्य अधिकाधिक खुलवण्याचा विचार करत असते. आरश्यात दिसणाऱ्या प्रतिमेने माणसं आनंदतात तसेच चेहऱ्यावरील डाग बघून अस्वस्थही होतात. वाढत्या वयाच्या खुणा दर्शविणाऱ्या सुरकुत्या आणि पांढरे केस बघून मन चिंतीत होते. मग त्यावर तरुण दिसण्याचे उपायही आरश्यात पाहूनच केले जातात, जणू वृद्धत्वाच्या पाऊलखुणा पुसून टाकण्याची एक धडपड. त्याच आरशाच्या साह्याने सौंदर्य खुलवत ठेवण्याचा प्रयत्न सुरू असताना वाढत्या वयासोबत होणारा शारीरिक बदल स्वीकारण्याची मानसिकता मात्र वाढीस लागत नाही. आरश्यात चेहऱ्याचे वास्तव दर्शन होत असताना ते टाळणे असंभव पण तरीही स्वतःच्या व्यक्तिमत्वावर अफाट प्रेम करण्याची सवय आरश्यामुळेच लागते.
खरं तर सुंदर चेहरा अथवा सौंदर्य दाखवणे हाच आरश्याचा उपयोग नाही. आहे ते आहे तसे प्रतिबिंबित करणे हे आरश्याचे प्रामाणिक कर्तव्य. जेव्हा आहे तसे स्वीकारण्याची सवय लागते अथवा प्राप्त परिस्थितीचा स्विकार केला जातो त्यावेळी असलेले प्रतिबिंब अथवा प्रतिमा आपलीशी वाटू लागते.
आरसा हा व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब दाखवत असताना, त्या प्रतिमेकडे पाहत आपण स्वतःवर खुश होत असतो. काही वेळा आरश्यापुढे पाहत स्वतःमधील आत्मविश्वास जागृत करता येतो. Self Talk हा मानसशास्त्रातील महत्वाचा घटक आहे, ज्या योगे माणूस स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करतो. काही वक्ते त्यांच्या उमेदीच्या काळात आरश्यापुढे उभे राहून भाषणाचा सराव करत. आजही प्रेसेंटशन स्किल सुधारण्यासाठी आरश्याचा वापर करतात.
‘आरसा हा सर्वोत्तम मित्र आहे, कारण आपण जेव्हा दुःखी असतो त्यावेळी तो कधीच हसत नाही.’
कधीकधी हाच आरसा जणू तुमची साथ सोबत करत असतो. विचार करा, घरात एकटेच असाल आणि एकटेपण जाणवत असेल अश्यावेळी नकळत आपण आरश्यापुढे उभे राहतो.
कवि गुलजार म्हणतात,
“आईंना देख कर तसल्ली हुई।
हमको इस घर में जानता है कोई।।”
आरसा भलेही माणसाचे बाह्य सौंदर्य प्रतिबिंबित करत त्याला खुश करत असेल पण सौंदर्य काय फक्त तेवढेच आहे? शारीरिक सौंदर्याइतकेच मनाचे सौंदर्य महत्वाचे. चांगला स्वभाव, आनंदी स्वभाव, नितळ, निर्व्याज आणि संवेदनशील मन ह्या बाह्य सौंदर्याप्रमाणे महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या आरश्यात प्रतिबिंबित होत नाहीत पण त्या मानसिक सौंदर्यामुळे जाणवणारा आत्मविश्वास चेहऱ्यावर दिसतो आणि तो प्रतिमेत परिवर्तित होतोच.
समोरची जिव्हाळ्याची आणि प्रिय व्यक्ती,काही वेळेस आरश्याप्रमाणे प्रामाणिकपणे तुमचे गुण आणि दोष न्याहाळत असतात. त्या गुण दोषांचे समर्पक प्रतिबिंब त्याच्या प्रामाणिक मतानुसार परिवर्तित करत असतात. अश्यावेळी ते स्वीकारण्याचा, मनाचा मोठेपणा हवाच.
“आयुष्यात असे लोक जोडा की जे वेळ येईल तेव्हा तुमची सावली आणि आरसा बनतील.
आरसा कधी खोटे बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही.”
आपल्या प्रिय व्यक्तीच नाही तर आपल्या सभोवतालचे लोकही जणू आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असू शकतात. ही सभोवतालची माणसं काही फक्त बाह्य व्यक्तिमत्वाने प्रभावित होत नाहीत तर तुमचा चांगुल स्वभाव, तुमचे वागणे, बोलणे, बोलण्यातील मार्दवता, प्रेमळ भाष्य आणि निष्पाप मन ह्या अंतर्गुणांनी प्रभावित होत असतात आणि त्यांचा प्रतिसाद त्यांच्या वागणुकीतून दिसत असतो. जणू आपल्या वागण्याचे प्रतिबिंब समोरच्या माणसाच्या वागणुकीतून व्यक्त होत असते.
जे. कृष्णमूर्ती समर्पक शब्दात म्हणतात,
“समोरची व्यक्ती हा जणू तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा होय, तुमचे प्रतिबिंब त्यात दिसत असते.”
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं।पूर्णात्पूर्णमुदच्यते।।
पूर्णस्य पूर्णमादाय। पूर्णमेवावशिष्यते।।
ह्या उपनिशदातील उक्तीप्रमाणे थोडा वेगळा विचार केला तर,
पैसा घे पण ये बाबा!पैसा खोटा निघाला तरी चालेल पण तू येच.” असं खरच म्हणावं अशी दडी तू मारतोस तर कधी “थांब थांब,थोडी उसंत घे रे.” असाही बरसतोस.
शब्द म्हणजे काय; त्यांचा अर्थ काय हे कळण्याआधीच तू माझ्या मनात बरसू लागलास. आई -आजी बरोबर मी ही टाळ्या वाजवत तुझ्या संगे ताल धरला.माझ्या बोबड्या बोलाने आईचा घट आनंदाने भरुन वाहू लागला. गालावरून हात फिरवत आजीचे हसूही तिच्या कापर्या गालांवर पसरले.
थोडी मोठी झाले. पावसाची गाणी,गाण्यातले शब्द, शब्दांची गंमत समजू लागली.
‘सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय?’
मनातला भोलेनाथाला तथास्तु म्हणत हातात हात घालून तू माझ्या बरोबर खेळू लागलास. तुझ्याच साठलेल्या पाण्यात उड्या मारणं, डबक्यात साठलेल्या पाण्यातून मुद्दामच वेगानं सायकल चालवणं हे तूच तर मला शिकवलंस. कागदी नावा पाण्यात सोडून त्या बरोबर काठाकाठानं भिजत वाहतांना तूही माझ्या संगे मस्ती केलीस,हो ना?
टप टप थेंब वाजवत तू आलास की मी पाटी पुस्तक विसरून गारा वेचे,नाचे,खिदळे!! नक्कीच ते भोळे बालरुप तुलाही भावलं असावं. . . . . तरीही रंगीबेरंगी रेनकोटात मला लपेटून बोट धरून तू मला शाळेतही नेलेस! खोट नको बोलू!नवीन पुस्तकांचा वास तुलादेखीलआवडत असे.
‘पाऊस वाजे धडाडधूम
धावा धावा ठोका धूम
धावता धावता गाठले घर
पड रे पावसा दिवसभर ‘
बालबोलीतले हे कौतुक तुला देखील ऐकावेसे वाटे,काय ओळखलं ना बरोबर ?
बडबड गीतांचे अवखळ वय हळू हळू सरले. तुझे संगीत मनात गुंजी घालू लागले.
‘आला पाऊस मातीच्या वासात ग . . .
पहिल्या पावसाचा मातीचा वास मनाला वेड लावू लागला .पावसात भिजण्यापेक्षा पाऊस अनुभवण्याचा सुज्ञ पणा आला. तू कधी सर सर येतोस, कधी रिमझिम बरसतोस. कधी पाऊलही न वाजवता येतोस तर कधी तांडवनृत्य करतोस . कधी कडकडाटी गर्जन करतोस तर कधी वार्याबरोबर सगळ्यांची दाणादाण उडवत येतोस.तुझी रुपे बघण्याचं, स्वत:तच रमण्याचं वय आलं. तू ही बालीश पणा सोडून खट्याळ झालास. आता तू माझी फजिती करु लागलास. कॉलेजला जाताना छत्री सांभाळत,कपडे सावरत,खांद्यावरची कंडक्टर बॅग लटकवत मी चालले की तू फिदीफिदी हसू लागलास. तू मुद्दामच वात्रट वार्याला माझी छत्री उलटी करायला सांगायचास. नेमकं सबमिट करायच जरनल तुझ्या मुळे चिखलात पडत असे. पण मी त्या गावचा नाहीच अस दाखवत तू तिथून पळ काढायचास.मी तुझ्या वर तेंव्हा रागावतच असे थोडीशी !
पण तेव्हढ्यात तू गात आलास . . .
‘ऋतु हिरवा, ऋतु बरवा’
माझ्यासाठी इंद्रधनुची कमान उभी करुन आलास. असे वाटले की या कमानीवरुन सहजपणे चढून आकाशातल्या तुझ्या अंगणात पोचेन. खोट नाही . . अगदी खरचं!
निळ्यासावळ्या टेकडीवरून माझ्या चित्तचोरासमवेत हातात हात घालून फिरताना त्या पाचूच्या बनात सप्तरंगी कमान घेऊन भेटलास. पुढील सुखद सहजीवनाची तार कानात झंकारत रिमझिम बरसलास.
. . . . . . . वर्षे सरली. . . बेलबॉटमचे, नेलपेंटचे दिवस गेले,हातात इवलीइवलीशी झबली टोपडी आली, बाळलेणी आली. तू भेटायला यायचास पण बाळाचे वाळत घातलेले कपडे काढण्याची माझी धावपळ! तुझी रुपे निरखण्यापेक्षा बाळलीला जास्त मोहवत होत्या ना! स्वेटर मोजे विणण्याचे दिवस आले व गेलेही. पुन्हा एकदा मुलांच्या बरोबर मी लहान झाले . गारा वेचत व नाव पाण्यात सोडत आई पण विसरून किशोरी झाले .जोरात तुषार शिंपडून हसलास ना खुशीत?
शीळ घालत,सायकल वर स्वार होऊन तू माझ्या मुलांच्या सवे घरात येऊ लागलास. मी हातात टॉवेल तयार ठेवू लागले . पण जुन्या आठवणीने ओठांच्या कोपर्यात किंचित आलेले हसू तू अचूक हेरलेस ना?
मोठे डोळे करून मुलांना दटावत असे मी! पण लेक्चर चुकवून मैत्रिणींच्या बरोबर तुझ्या तालात केलेली झिबांड झिम्मड झिम्म्याने मनात फेर धरलाच रे!
आता मात्र तू येतोस सुंठ,आलं,काढ्याचा वास घेऊन ! तुझ्या आगमनाची वर्दी देत मातीचा दरवळ येतो. . . मी मात्र घरात काढ्याचे साहित्य आहे ना याची खात्री करते. तुला अंगाखांद्यावर घेऊन चिंब भिजावसं वाटतं पण तुझ्या सरींबरोबर मनातल्या मनातच फुगडी घालते.
कानटोपी चढवून, शाल गुंडाळून बाल्कनीतून ,खिडकीतून तुला न्याहळत राहते. थरथणारे हात बाहेर काढून ओंजळीत तुला साठवते.
गारांना घेऊन थाडथाड पावले वाजवत येणार्या किंवा सरसर धुंदीत येणार्या तुझ्या रुपापेक्षा संथगतीने येणारं तुझं म्हातारं रुपच आपलसं वाटू लागलय हल्ली. . . . .
संत सेना महाराज पुण्यतिथी – संत सेना महाराज प्रा. विजय जंगम
महाराष्ट्रातील थोर संत परंपरेत संत सेना महाराजांचं नाव आदराने घेतले जाते. कारण, अंधार युगात ज्या ज्या संतांनी जातीभेदाच्या, वर्ण व्यवस्थेच्या , लिंगभेदाच्या विरूद्ध उद्बोधन करून आधुनिक महाराष्ट्र घडविण्याचं काम केलं , त्यांच्या मध्ये संत सेना महाराजांचा वाटाही मोठा आहे.त्या काळी , संतांनी आपल्या व्यापक विचारांनी भरकटलेल्या समाजाला स्वतः दीपस्तंभ होऊन भक्ती मार्गातून मानव मुक्तीचा मार्ग दाखविला आणि, समाजात समते बरोबरच समानताही निर्माण करण्याचं फार मोठं काम संतांनी महाराष्ट्रात केलं.
मध्य प्रदेशातील रेवा संस्थान. त्याला रेवा खंड म्हणत असत. त्या खंडातील बांधवगड येथे देवीदास आणि प्रेम कुंवर बाई यांचे पोटी , विक्रम संवत १३५७ , इ.स.१३०१ , वैशाख वद्य द्वादशी ,वार रविवार रोजी संत सेनांजीचा जन्म झाला.जन्मत: च बाळ खूपच तेजस्वी. म्हणून त्याचे नाव सेना किंवा सैन असे ठेवले.सैन म्हणजे तेज: पुंज , प्रकाशमान . सेनाजी म्हणजे भीष्माचार्यांचा अवतार असे समजले जाते. कारण, भावी काळात परोपकारी, वचन निष्ठ , प्रतिज्ञा बध्द आणि पराक्रमी असेच त्यांचे जीवन चरित्र दिसून येते. देवीदास आणि प्रेम कुंवर बाई हे दोघेही धार्मिक आणि साधू संतांची सेवा करणारे एक आदर्श जोडपे होते.त्यामुळे ,सेनाजी्वर बालपणापासूनच चांगले संस्कार झाले.त्यांना साधू संतांचा संग लाभला. त्यांच्या बुद्धीची चमक, त्यांचा चांगुलपणा , धर्म ज्ञान आणि सेवा तत्परता तेव्हा पासूनच दिसू लागली.
त्याकाळी बांधवगड येथे वाघेला वंशाचा रामसिंह राजा राज्य करीत होता.त्याचे दरबारी देवीदास हे सन्मानीय न्हावी होते.देवीदास आणि सेना या दोघांचेही रामानंद हे गुरू होते. ते पुरोगामी विचारांचे असल्याने , सेनाजी पुरोगामी विचारांचेच घडले. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, महाराष्ट्रातील निवृत्ती, ज्ञानदेव, स़ोपान आणि मुक्ताबाई यांचे वडील विठ्ठलपंत हे देवीदासचे गुरू बंधू.त्यानी सेनाजींना महाराष्ट्रात जायची आज्ञा केली.
देवीदासच्या पश्चात राजदरबारातील सेवा सेनाजी कडे आली , मात्र ते त्यात रमले नाहीत.त्याना विठ्ठलाचा साक्षात्कार झाला आणि ते पंढरपुरात दाखल झाले. तेथे संत नामदेव, सावता माळी, गोरा कुंभार, चोखामेळा या संतांचा सहवास लाभला.विठ्ठलाच्या दर्शनाने ते भारावून गेले.ज्ञानदेवादी चारी भावंडांनी समाधी घेतल्याने त्यांचा विरस झाला.ते आळंदीला गेले.तेथे अनेक अभंग रचना केल्या. ज्ञानदेवांच्या चरणी त्या वाहिल्या.
सेना महाराजाना हिंदी, मराठी, पंजाबी , राजस्थानी भाषा येत होत्या. त्यांचे भाषेवर प्रभुत्व होते.गळा गोड होता. त्यांनी व्यसनाधीनता , बदफैली यावर रचना केल्या. ” गांजा भांग अफू घेऊ नका सूरा / “त्याच प्रमाणे आपल्या जातीचाही त्यांनी उल्लेख केला आहे.” न्हावीयाचे वंशी / जन्म दिला ऋषीकशी / ”
नामदेवांच्या समाधी नंतर सेनाजी उत्तर भारताकडे गेले. तेथून बांधव गड . तेथे सर्वांना आशीर्वाद देऊन ते आपल्या जन्म ठिकाणी समाधिस्थ झाले. महाराष्ट्रा बाहेरचे सेना महाराष्ट्रात आपला ठसा उमटवून अजरामर झाले.