मराठी साहित्य – विविधा ☆ बाई… – लेखक: अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री मीनल केळकर

☆ बाई… – लेखक: अनामिक ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

(आधुनिक साहित्यातील काही शिंपल्या शोधत असताना अचानक लेखकाच्या नजरेस आलेला हा लेख)

***

बाई ऽऽ केवढा हा पाऊस सतत कोसळतोय….,

बाई ऽऽ आणि या विजांची तर आता भीती वाटते”… ही ‘बाई’ कोण बरं? नेहमी हा प्रश्न पडतो मला… या बाईचा पत्ता एकदा शोधून काढायला हवा. गोंधळात पडलात ना? मला असं म्हणायचं आहे की, तुम्हीच बघा हं… लहान मुलगी असू दे, तरुणी असू दे किंवा अगदी आजीबाई असू दे, ‘बाई’ हा शब्द प्रत्येक बाईच्या तोंडी असतोच…आता हेच बघा ना, मी काय म्हटलं, “बाई केवढा हा पाऊस!” म्हणजे भीती वाटली तरी ‘बाई’ असं म्हटलं जातं आणि “अगंबाई थांबला वाटतं हा पाऊस” असा आनंद झाला तरी ‘बाई’ हा शब्द येतो, म्हणून मी विचारलं ही बाई कोण?

पाऊस कोसळत असताना आपल्या प्रियकराच्या आठवणीने काळजीनं नायिका काय म्हणते ऐकलं आहे ना गाणं, “झिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेलाही पूर चढे, पाणीच पाणी चहूकडे गं ‘बाई’, गेला मोहन कुणीकडे”

मोठ्या वयाच्या बायका असं “बाई” असं म्हणतात का… तर नाही एखादी छोटीशी चिमुरडी सुद्धा गाण्यातून काय सांगून जाते

“तुझी नी माझी गंमत वहिनी

ऐक सांगते कानात

आपण दोघी बांधूया गं

दादाचं घर’बाई’ उन्हात”

दादाची तक्रार करताना सुद्धा ‘बाई!’ ‘बाई’ शब्दाचा उगम शोधायला गेलो तर काही मिळत नाही. बहुतेक प्रत्येक बाईच्या तोंडी उपजत, नकळतच हा शब्द येत असावा. खूप वर्षांपूर्वी नागपंचमीच्या सणानिमित्त म्हटली जाणारी एक ओवी एका पुस्तकात वाचायला मिळाली… “पंचमीचा सण बाई दणादणा आला मुराळी भाऊ आला

बाई जाते मी माहेराला… सासूबाई आत्याबाई तुमच्या लेकाला जेऊ घाला दही साखर भाकरीला

मी तर निघाले माहेराला…” बघितलं सख्यांनो ‘बाई’ हा शब्द किती वेळा आणि किती सहज या ओळींमध्ये आलाय…

अगदी हे गाणं सुद्धा आपण ऐकलं असेलच

कबिराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई

कौसल्येचा राम….

सख्यांनो लहानपणी खेळलेला भोंडला आठवतोय?

खिरापत ओळखणं, पाटावरचा हत्ती, भोवती धरलेला फेर, भोंडल्याची गाणी… अगदी मजा असायची…

त्या गाण्यांमध्ये दडलेला हा ‘बाई’ शब्द हळूच या गाण्यातून कसा डोकावतो बघा…

अस्सं माहेर सुरेख बाई

खेळाया मिळतं

अस्सं सासर द्वाड बाई

कोंडूनी मारीतं…

म्हणजे बघा माहेरची आठवण काढून भावूक झालं म्हणून बाई आणि सासरची तक्रार करताना राग आला म्हणूनही बाईच…

“कठीण कठीण कठीण किती पुरुष हृदय बाई” आपल्याला या नाट्यपदाची सुद्धा आठवण येते….

असा हा शब्द ‘बाई ‘…

कवी आणि गीतकार मग ते पुरुष असले तरी त्यांनासुद्धा ‘बाई’ शब्द कवितेत, गाण्यात वापरल्याशिवाय राहवलं नाही. केदार शिंदे सारख्या दिग्दर्शकानं सुद्धा सिनेमाचा विषय बाईच्या मनातले ओळखता येतं, ऐकू येतं.. असा ठरवला आणि सिनेमाचं नाव ठेवलं “अगंबाई अरेच्या!!”

अगदी ग दि माडगूळकर यांना सुद्धा आपल्या गाण्यांमध्ये, गीतांमध्ये हा ‘बाई’ शब्द वापरावासा वाटला आणि गाणं तयार झालं

ऐन दुपारी यमुनातीरी

खोडी कुणी काढली…

गं बाई माझी करंगळी मोडली…

आपल्या मराठी भाषेवर संत आणि धार्मिक वाड़मयाचा पगडा होता आणि अजूनही आहे. पूर्वी भावना व्यक्त करताना कवीला देवाधिकांचा आधार घ्यायला लागायचा असा एक काळ होता. राधाकृष्णा शिवाय प्रेम या विषयाला हात घालणं थोडंसं गैर समजलं जायचं. त्यामुळे पूर्वी स्त्रीच्या केशसंभाराविषयी लिहिताना सुद्धा कवी म्हणतात,

कसा गं बाई केला

कोणी ग बाई केला

राधे तुझा सैल अंबाडा…

हे लिहिता लिहिता अजून एका गाण्याची आठवण झाली ती म्हणजे

“नाही खर्चली कवडी दमडी नाही वेचला दाम

बाई मी विकत घेतला शाम”

काय करणार… रेडिओवर RJ म्हणून पंधरा वर्ष आणि त्याहून अधिक असं काम केल्यामुळे कोणताही लेख लिहिताना, काहीही बोलत असताना गाणी आणि बोलणं याची सांगड आपोआप घातली जाते. गाणी आठवायला लागतात भराभर.. आपण रिमिक्सचा जमाना बघितला, “बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला” हे गाणं रीमिक्स झालं आणि तरुणाईला आवडलं…भांगडा पाॅपवर ठेका धरणारी तरुणाई हळूहळू मराठी गाणी सुद्धा ऐकायला लागली… अर्थात ही किती चांगली गोष्ट नाही का!

आपण बघितलं की कितीही आपण माॅडर्न झालो, इंग्रजी भाषा शिकलो,तरी ‘अगंबाई’ (अर्थात OMG सारख्या अनेक इतर शब्दांनी किंवा मोबाईलच्या शॉर्ट शब्दांनी हळूहळू ती जागा काबीज केली आहे) च्या जागी दुसरा कोणताही शब्द पटकन वापरला जात नाही.

एक छोटीशी आठवण इथे सांगावीशी वाटते. आम्ही 10 – 12 वर्षांपूर्वी कोकणातल्या एका छोट्याशा घरी गेलो होतो… आमच्या नातेवाईकांकडे….. तेव्हा नुकतेच डिजिटल कॅमेरे नवीन आलेले होते. त्या कॅमेराच्या स्क्रिनवर चित्र दिसतं ही गोष्ट नवीन होती. आम्ही त्या घरातल्या आमच्या छोटुकलीचा नाच आणि तिचं गाणं जेव्हा त्याच्यावरती रेकॉर्ड केलं आणि तो स्क्रीन तिने बघितला मात्र… आणि तिने एका विशिष्ट कोकणी स्वरात एक हात कमरेवरती आणि दुसरा हात गालावरती ठेवून “अग्गेऽऽ बाऽयऽऽ” असं कोकणी विशिष्ट स्वरात म्हटलं, तेव्हा आमचे आम्हाला इतकं मस्त वाटलं आणि हसूच आलं.

आपल्या लहानपणी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असताना आपल्याला, “दांडेकर बाई, कुलकर्णी बाई, देशपांडे बाई” अशी आपल्या शिक्षकांना बाई म्हणण्याची पद्धत होती… अर्थात मध्यंतरीच्या काळात बाई या शब्दाला काही चा वेगळा अर्थ सुद्धा प्राप्त झालेला होता. पण तरीही ‘बाई’ म्हटल्यानंतर मला तरी अजूनही शाळेतल्या बाईच आठवतात.

जुन्या मराठी चित्रपटातले सुप्रसिद्ध व्हिलन निळू फुले यांचा ‘बाई वाड्यावर या’ हा डायलॉग तर इतका प्रसिद्ध झाला की अजूनही आजच्या मोबाईल व्हाट्सअप च्या जमान्यात त्याचे अनेक मिम्स तयार होतात….

मराठी किंवा हिंदी मालिकातून एक बाई दुसर्‍या बाईला कशी छळते, कट कारस्थान करते हे हल्ली भरभरून दाखवलं जातं… प्रत्यक्षात असं होतही असेल/नसेल, पण मला माहित नाही. मुंबईसारख्या ठिकाणी ट्रेनमधून प्रवास करताना एकमेकींशी कचाकचा भांडणाऱ्या बायका प्रसंगाला बायकाच बायकांची मदत करतात हे ही मी डोळ्यांनी पाहिलं आहे…..

काय घ्यायचं, काय सोडायचं, कोणाशी कसं वागायचं, नाती कशी जपायची, संवाद कसा साधायचा… घराचं घरपण टिकवायचं, नोकरी – घर – मुलं – नातेवाईक या सगळ्यांचा बॅलन्स कसा ठेवायचा या सगळ्या गोष्टी बायकांना छान जमतात.

तसे हे बाई पुराण न संपणारी कहाणी आहे. त्यात म्हणाल तेवढी भर घालता येते व साहित्य पंगतीची रंगत वाढविताही येते.

शेवटी आपला नेहेमीचा संवाद लिहितो….

बरं बुवा आज तरी इथेच थांबवितो हे बाई पुराण.

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ होईल ना सगळं नीट? : लेखिका: सुश्री धनश्री दाबके  ☆ सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ होईल ना सगळं नीट? : लेखिका: सुश्री धनश्री दाबके ☆ सौ. अंजली दिलीप गोखले ☆

माझ्या दोन्ही डिलिव्हरीज अगदी सुरळीत पार पडल्या. पहिल्या वेळेला थोडा जास्त वेळ लागला इतकंच. कुठच्याच प्रकारची शारीरिक कॉम्प्लिकेशन्स नसल्याने दोन्ही वेळेला गुटगुटीत बाळ घेऊन मी सुखरूप घरी आले. पहिल्या वेळेला आई बरोबर होती आणि दुसऱ्या वेळेला सासूबाई. पण दोघींनीही सारखीच माया, ममता आणि आधार दिला.

पुढचे दोन अडीच महिने माझी व बाळाची इतकी छान काळजी घेतली गेली की शरीराने आईपण झटकन स्वीकारलं. पण आईपणाची मानसिक कॉम्प्लिकेशन्स जी त्यावेळेपासून सुरू झाली ती आजतागायत अजूनही तशीच आहेत.

डिलिव्हरीनंतर रोज संध्याकाळी आई मला, बाळाला मांडीवर घेऊन रामरक्षा आणि अथर्वशीर्ष  म्हणायला लावायची. खरंतर हे दोन्ही लहानपणीच आईने शिकवलेलं होतं. पण आईचं न ऐकण्याच्या मधल्या गुलाबी काळात ते जरा मागे पडलं  होतं. आता आई झाल्यावर बाळावर संस्कार करता यायला हवे, त्यासाठी ते तुला आधी म्हणता यायला हवं असं म्हणून आईने माझ्यावर परत नव्याने संस्कार केले. तेव्हा वाटायचं की हीचं आईपण अजूनही संपत नाहीये. माझं  तर आत्ताच सुरु झालंय.  ‘होईल ना सगळं नीट माझ्या बाळाचं?’

‘होईल ना सगळं नीट?’ या प्रश्नाने तेव्हापासून जे मनात घर केलंय, त्याचा आजतागायत अंबानींना सुद्धा लाजवेल असा मोठ्ठा बंगला तयार झालाय. आणि तरीही ‘वाढता वाढता वाढे’ अशी त्याची गत आहे.

मला वाटतं ‘होईल ना सगळं नीट?’ हे प्रत्येक आईने तिच्या पाचवीला पुजलेलं पालुपद असावं आणि त्यामुळेच त्यावरचं उत्तर तिला कधीच मिळत नसावं.

दोन्ही मुलांनी पटापट मोठं होऊन आता आपापल्या आयुष्याच्या रथाचं सारथ्य स्वतःकडे घेतलेलं आहे. मोठ्याचं  शिक्षण संपून नोकरी सुरू झालेली आहे. धाकटा  नुकताच युके मधल्या ए लेव्हल्सची (म्हणजे भारतातल्या बारावीची) परीक्षा पास करून त्याला हव्या त्या लांबवरच्या युनिव्हर्सिटी मध्ये पुढच्या शिक्षणासाठी निघाला आहे. म्हणजे मुलांना हवा तो मार्ग आणि त्यासाठीचा योग्य वेग त्यांनी पकडलेला आहे. मला आता फक्त दिमाखात मागच्या सीटवर बसायचं आहे. पण नेमकं तेच जमत नाहीये.

लेक तर मोठा झालाय, पण पंधरा वर्षांपूर्वी  त्याला नर्सरीत सोडतानाची मी आणि आज त्याला युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये सोडतानाची मी तशीच आणि तिथेच उभी आहे. कारण आई म्हणून मी मोठी झालेलीच नाहीये.

कधी मला सोडून न राहिलेला धाकटा, एकटा तिकडे कसा राहील? सगळं नीट मॅनेज करेल का? जेवण खाण्याचे कसं करेल? सगळं सांभाळून इतका भलामोठा अभ्यास कसा करेल? हे आणि असे अनेक प्रश्न माझ्या मनातल्या बंगल्यावर मजलेच्या मजले चढवत आहेत.

आई चिल मार, एवढी काय काळजी करतेस, मी राहीन ग नीट, अजून एक महिना आहे अशी समजूतीची वाक्य सध्या मी सकाळ, संध्याकाळ ऐकते आहे.

‘तू आता मनाची तयारी कर’ असं घरातले तिघेही मला आणि काही अंशी स्वतःलाही सांगत आहेत. पण काही गोष्टींची तयारी कधीच पूर्ण होत नसते. त्यावर ‘go with the flow’ हा एकच उपाय असतो. कितीही ठरवलं तरी मन आणि त्याच्या तालावर फितूर होऊन डोळे भरून येतातच.

“अगं बघता बघता चार वर्ष जातील” काल माझ्या मूडचा अंदाज घेऊन नवरा म्हणाला. त्यावर धाकटा म्हणाला “हो बघता बघता चार वर्ष जातील आणि मग आई डीग्री तर मिळाली आता माझं करीअर नीट होईल ना याची काळजी करेल.” त्याचं हे म्हणणं मात्र मला मनोमन पटलं आणि नकळत चेहऱ्यावर स्माईल उमटलं.

मुलाला जन्म देतांना नाळ तोडण्यासाठी एक्सपर्ट डॉक्टर आईसोबत असतात. पण तेच मूल मोठं झाल्यावर दुसऱ्यांदा तोडायची नाळ मात्र आईला स्वतःलाच डॉक्टर होऊन तोडावी लागते जे अजिबात सोपं काम नाही. पण हे तुला कसं रे कळणार, असा मनोमन विचार करुन मी पुढच्या कामात मनाला गुंतवायचा प्रयत्न सुरु केला.

लेखिका: सुश्री धनश्री दाबके

© सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आदर फक्त उच्चारी नको” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “आदर फक्त उच्चारी नको” ☆ श्री जगदीश काबरे ☆

परवाच एका पाश्चात्य प्राध्यापकाशी ओळख झाली. त्यांना मी अहोजाहो करू लागलो तेव्हा ते म्हणाले, मला फक्त नावानेच हाक मार. Name has nothing to do with respect. त्यांच्या या वाक्याने मी चमकलोच. लहानपणापासून माझ्या मनात हे कुठेतरी पक्कं बसलं होतं की, एखाद्या व्यक्तीविषयी आदर दाखवायचा असेल तर तो बोलण्यातनं ‘दाखवायला’ हवा. माझ्या आजूबाजूच्या समाजाचीही अशीच अपेक्षा होती. पण या प्राध्यापक महाशयांनी सागितलं की, आदर ही केवळ शिष्टाचारांमधून ‘दाखवण्याची’ गोष्ट नव्हे. आदर हा वागण्यातून दिसला पाहिजे. आपल्याकडे मात्र आपण कामात कितीही कार्यमग्न असलो तरी साहेब आल्यावर आदर दाखवलाच पाहिजे, म्हणून उठून उभे राहत असतो. याचाच अर्थ आपण कामातलं तादात्म्य महत्वाचं न मानता आदर दाखवण्याच्या उपचाराचे अवास्तव स्तोम माजवत असतो, असं नाही वाटत?

वय आणि अनुभव या दोहोंना मान देऊच नये असं नक्कीच नव्हे. पण तो आदर व्यक्त करण्याच्या पद्धतीची जी सक्ती लादली जाते ती जाचक वाटू शकते. दुसऱ्याला अवास्तव आदर दाखवणं ही आपल्याला लागलेली सवय मानसिक गुलामगिरीचे तर लक्षण नाही ना? हुद्दा, वय, शिक्षण यांचं आपण स्तोम का माजवतो आहोत? हा बागुलबुवा आपल्याला दिवसेंदिवस खुजा तर बनावत नाही ना? खरं तर एखाद्या व्यक्तीविषयीच्या आदरयुक्त भावना या मनापासून यायला हव्यात. हात जोडावेसे वाटले तर आपोआप जुळतीलच आणि कुणासमोर नतमस्तक व्हावसं वाटलंच तर ते मनोमन झालं तरी पुरे!

कुणीतरी मला महत्त्व द्यावं असं वाटणं किवा मी कुणालातरी महत्त्व देणं गरजेचं आहे, अशी गरज निर्माण होणं, ही एक प्रकाराची मानसिक गुलामगिरी नव्हे का? या मनोवृत्तीमुळे आपण माणसा-माणसांतील निखळ नात्याला पारखे होत जाऊ अशी भीती वाटते. कारण आपण आपल्या मनाला सतत हे संगत असतो की, आपण सर्व एकाच दर्जाचे नाही आहोत. इथेच उच्चनिचतेची सुरूवात होते. हे सर्वप्रथम थांबायला हवं. स्वत:ला अति महत्त्व देणंही नको आणि मानसिक गुलामगिरीत डांबणंही नको. खराखुरा आदर राखण्यासाठीच आदर दाखवण्याच्या या उपचारांचा ‘आदरपूर्वक पुनर्विचार’ करायला हवा.

नेमकं आजच हे ‘आदर पुराण’ लावण्याचे कारण काय? त्याचं असं झालं की, नुकत्याच मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात काॅ. गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचा केवळ संदर्भ देताना शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून अवमान केल्याप्रकरणी एका प्राध्यापिकेवर कारवाईचा बडगा उगारला गेला. तिच्या विरोधात विभागीय चौकशीसाठी महाविद्यालय व्यवस्थापनाला चक्क एका पोलीस अधिकाऱ्यानेच पत्र लिहिलं! त्या पत्रातही त्याने मराठी भाषेच्या व्याकरणातील असंख्य चुका केल्या होत्या. याचा अर्थ त्या पोलीस अधिकाऱ्याला खरंच मराठी भाषा आणि भाषेचं व्याकरण कळतं का, हा प्रश्न पडतो. अशा प्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणं ही कोणत्या प्रकारची लोकशाही झाली? हे प्रकरण अर्थातच न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने त्या पोलीस अधिकाऱ्याला ‘तुम्ही हे पुस्तक वाचलं आहे का? आणि राज्यघटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्यासंबंधित जो परिच्छेद आहे तो तरी तुम्हाला माहीत आहे का?’, असे प्रश्न विचारून त्या अधिकाऱ्यांची संतप्तपणे स्पष्ट शब्दात चांगलीच कानउघडणी केली, ते बरं झालं.

हे ‘उच्चारी आदर’ देण्याचं प्रकरण गेल्या काही वर्षात व्हाट्सॲप विद्यापीठातून पदवीधर झालेल्या तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात फोफावलेलं दिसतंय. म्हणून हल्ली कुणी शिवाजी राजांचा एकेरी उल्लेख केला तर अंध शिवभक्तांच्या भावना लगेच दुखावतात, आणि ते दरडावून सांगू लागतात की, त्यांचा एकेरी उल्लेख करू नका. तो त्यांचा अपमान आहे. अशा वेळी मला हसू येतं. कारण आपल्याकडे शिवजयंती साजरी करणारे हेच तथाकथित शिवभक्त मिरवणुकांमधून दारू पिऊन डीजेवरील सवंग गाण्याच्या तालावर आचकट-विचकट नाचत असतात, तेव्हा ते शिवाजीराजांचा अपमान करत नाहीत, असं त्यांना वाटतं काय? हा तर दांभिकपणा झाला. पण अस्मितेचं राजकारण करणाऱ्या माणसांना मोठ्या माणसांचे गुण आचरणात आणण्यापेक्षा त्यांना उच्चारी आदर देणंच महत्वाचं वाटतं. खरंतर शब्दांपेक्षा त्याच्यामागील भूमिकेवर लक्ष केंद्रित करणं आवश्यक असतं. पण आपल्याकडे आपण उच्चरवाने काय बोलतो यालाच महत्व दिलं जातं.

विकसित पाश्चात्य देशात नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञाच्या हाताखाली काम करणारे ज्युनियर शास्त्रज्ञही त्यांना त्यांच्या पहिल्या नावाने हाक मारतात. याचा अर्थ ते त्यांचा अपमान करतात असा होत नाही. तो एक प्रेमाचा आणि आपुलकीचा भाग असतो. आपल्याकडेही देवाला मानणारे सगळे आस्तिक लोक सगळ्या देवांना अरेतुरेच करतात ना? तसंच देवी आणि आईलासुद्धा अगंतुगंच करतात ना? त्यावेळी देव, देवी आणि आई यांचा अपमान झालेला अंधभक्तांना वाटत नसेल तर त्यांना शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख का खटकावा?

‘शिवाजी कोण होता?’ या कॉ. गोविंद पानसरेलिखित पुस्तकामध्ये शिवरायांच्या नावाचा उल्लेख एकेरी आहे. खरं तर असा एकेरी उल्लेख कित्येक पोवाड्यांत आढळतो, इतकंच काय कित्येक ठिकाणी, माझं राजं, माझा शिवबा, असाही उल्लेख आहे. बरं, हे लोक सक्काळ-संध्याकाळ जय हनुमान, जय श्रीराम करत असतात… जय हनुमानजी किंवा जय श्रीरामजी नाही. जयंतीही साजरी करताना ‘हनुमान जयंती’ असा करतात, श्रीरामाचा कित्येक गीतात, अध्यायात थेट ‘रामा’ असा उल्लेख आहे. म्हणून तर, नको तिथे वाद उकरून काढणाऱ्या या लोकांचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. आणि समजा, उद्या पानसरेंच्या पुस्तकाचं नाव बदललं तर त्यातला मथितार्थ बदलणार आहे का?

तसंही पानसरेंनी त्यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकात शिवाजी राजांचा एक उत्तम प्रशासन करणारा माणूस असा उल्लेख केला आहे, आणि व्याकरण दृष्ट्या तो एकेरीत असणं आवश्यक आहे. पण ज्यांचं भाषेचं ज्ञान शब्दार्थापलीकडे नाही आणि जे शिवाजीला देव बनवू पहात आहेत त्यांना एकेरी उल्लेख खटकल्यास नवल नाही. अशा लोकांना या महान व्यक्तीचा आदर्श आचरणापेक्षा नुसतं नामस्मरणच महत्वाचं वाटतं. कारण त्यात बिनडोकपणे जयजयकार करण्यापलीकडे करायचं काहीच नसतं. तेव्हा मुद्दा निव्वळ एकेरी उल्लेखाचा नसून त्यांच्या विचारांचा आणि ते विचार आचरणात आणण्याचा आहे, हे लक्षात घ्या.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ७० ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग 70 ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- मी देवघरासमोर नतमस्तक होऊन उभा राहिलो. आता जे कांही सांगायचं ते इथंच आणि याच क्षणी! समोर पाटावर बसलो. अलगद डोळे मिटले आणि मनात रुतून बसलेली, मला नुकतीच जाणवलेली रुखरुख नि:शब्दपणे ‘त्या’च्यासमोर व्यक्त होत राहिली. मनातला अंधार विरुन गेला. मन शांत झालं! मनावरचं ओझं त्याच क्षणी हलकं झालं.आता जे होईल ते ‘तो’ म्हणेल तसंच!)

माझं पोस्टींग पुण्याला झाल्यामुळे अकोल्यातल्या प्रतिकूल परिस्थितीतून अतिशय सन्मानाने माझी एक प्रकारे सुटकाच होणार होती. खरंतर त्यामुळेच मला निश्चिंत

करणारा आनंद माझ्या मनात भरून राहिलेला होता. पण हळूहळू तो विरून गेला. कां कुणास ठाऊक पण हा आनंद निखळ वाटेनाच. कां तेच समजत नव्हतं. गेल्या अठ्ठावीस वर्षांत मी जिथे जिथे काम केलं होतं तिथले माझे सर्व वरिष्ठ आणि माझे सहकारी, अकोला ब्रॅंचमधले सध्याचे स्टाफ मेंबर्स सर्वांकडूनच चोहोबाजूंनी माझ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत होता पण हसतमुखाने ते स्वीकारत असताना आतून मात्र मी कोरडाच होतो! एक अनामिक अशी रुखरुख मनाला जाणवत होती पण कारण मात्र समजत नव्हतं. त्या रात्री खूप उशीरा अंथरुणाला पाठ टेकली, त्या निवांत क्षणी मनातली ही बोच अधिकच तीव्र झाली. अचानक नजरेसमोर तरळून गेला तो आमच्या पुण्यातल्या झोनल ऑफिसमधील डी.जी.एम् साहेबांचा रागीट चेहरा! त्यांची संतप्त नजर माझ्यावर रोखलेली. एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा पांघरूण दूर करीत मी ताडकन् उठून बसलो. मनाला स्पर्शून गेलेला भासच तो, पण मनातली रूखरूख अधिकच तीव्र करणारा! त्याच क्षणी मनातल्या त्या अस्वस्थतेचं कारण त्या संतप्त नजरेतच लपलेलं असल्याचं मला लख्ख जाणवलं. कधीकाळी एका ब्रँच मॅनेजर्स मिटिंगमधे आम्हा सर्वांनाच समज देताना त्यांनी आम्हाला ऐकवलेल्या दमदाटीची आठवण मनात ताजी झाली…

“नाऊ यू फरगेट युअर प्रमोशन. आय वुईल टीच यू अ लेसन. माईंड वेल”.. हे त्यांचे जळजळीत शब्द आठवले. आता झोनल ऑफिसमधे जॉईन होणं म्हणजे रोजच्या मरणाला समोर जाण्यासारखंच होतं हेही लक्षात आलं. माझं झोनल आॅफीसमधे पोस्टिंग झाल्याचं समजताच आनंदून गेलेल्या माझ्या गाफील मनाला या वस्तुस्थितीची जाणीव नव्हतीच.माझ्या अंतर्मनात मात्र ती अव्यक्त रुपात मला टोचणी देत पडून राहिली होती!!

धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी माझी अवस्था झाली. मला नवीन जबाबदारी आनंदाने स्वीकारायची तर होतीच, माझ्या कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने सुद्धा अकोल्यापेक्षा माझं पुण्यात असणं कितीतरी पटीने जास्त सोयीचं आणि सुखावहही असणार होतं, पण या सगळ्या सकारात्मकतेला डी.जी.एम. साहेबांच्या रूपातलं भयावह वास्तव छेद देत राहिलेलं! एक प्रकारच्या केविलवाण्या अगतिकतेने मन एकदम मलूलच होऊन गेलं. चोहोबाजूंनी अंधारून आलेल्या अशा मन:स्थितीत ‘त्या’च्याशिवाय मला सावरणारं त्या एकटेपणात दुसरं होतंच कोण? मी पांघरूण दूर सारुन आत धाव घेतली आणि देवघरासमोर नतमस्तक होऊन उभा राहिलो. त्या प्रसन्न, हसतमुख दत्तमूर्तीसमोर बसलो. अलगद डोळे मिटून हात जोडले आणि मनातलं हे सगळं माझ्याही नकळत नि:शब्दपणे आपसूक ‘त्या’च्यापर्यंत पोचत राहिलं! ‘कोणत्याही परिस्थितीत त्या माणसाच्या हाताखाली काम करणं सोडाच, त्याचं तोंड बघायचीही माझी इच्छा नाहीय’ ही माझ्या मनातली भावनाच त्याच्यापर्यंत नेमकी पोचलेली आहे याचं त्याक्षणीचं समाधान येईल त्या परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी मला पुरेसं होतं!

आता आहे त्या परिस्थितीत शेवटच्या क्षणी कांहीही बदल होऊ शकणार नाहीय हे स्पष्टपणे माहित होतं.तरीही गच्च भरून आलेलं आभाळ गार वाऱ्याची एखादी झुळूक येताच तिच्या हळूवार स्पर्शाने एका क्षणात मळभ दूर होऊन मोकळं व्हावं तसा माझ्या मनातला अंधार क्षणार्धात नाहीसा झाला! कारण मला माहित होतं, आता यापुढे जे काही होईल ते ‘तो’ म्हणेल तसंच आणि तेच माझ्या हिताचं असणार आहे! आश्चर्य म्हणजे माझ्या मनातला हा विश्वास काय आक्रीत घडवू शकतो याची प्रचितीही मला लवकरच येणार आहे याची मात्र मला त्याक्षणी कल्पनाच नव्हती!

सर्वांचा निरोप घेऊन मी अकोल्याहून प्रस्थान ठेवलं त्या क्षणी आणि पुढे रात्रीच्या पूर्ण प्रवासातही मनावर कसलंच दडपण नव्हतं. नगर आणि अकोला या दोन्ही ब्रॅंचेसमधे मी काम करीत होतो तेही पुण्याच्या त्याच डीजीएम् साहेबांच्या अधिपत्याखाली. पण तेव्हा त्यांच्या नजरेपासून मी कितीतरी दूरच्या अंतरावर होतो. पण आता मात्र उद्यापासून त्यांच्याच ऑफिसमधे त्यांच्या लहरीप्रमाणे काम करायचं म्हणजे रोज नव्या संकटाला आमंत्रण देत रहाण्यासारखंच होतं. पण म्हणून काय झालं? तिथे त्यांच्या हाताखाली इतरही पाच-पन्नास जणं काम करत होतीच की. त्यांच्यापरीनं ते निभावतच आहेत ना? तसंच आपणही निभवायचं. त्यात घाबरण्यासारखं काय आहे? खरं सांगायचं तर हे असे दिलासा देणारे विचार प्रथमच माझ्या मनात येत होते! एखाद्या नकोशा परिस्थितीला सामोरं जाताना जे कांही दुःख, प्रश्न किंवा अडचणी असतात त्या फक्त आपल्यालाच आहेत असंच प्रत्येकाला वाटत असतं. मन जेव्हा शांत, समतोल विचार करतं तेव्हा मात्र त्यातली निरर्थकता आणि दुसरी बाजूही स्वच्छ दिसू लागते. माझंही तसंच झालं होतं. या उलटसुलट विचारांत प्रवासातली ती संपूर्ण रात्र मी जागाच होतो!

पुण्याला ऑफिसमधे सकाळीच मला रिपोर्ट करायचं असल्याने पुरेसा आराम मिळणं शक्यच नव्हतं.

आमच्या झोनल ऑफिसच्या त्या भव्य इमारतीत ब्रॅंचमॅनेजर्स मिटिंगज् किंवा इतरही कांही कामांच्या निमित्ताने यापूर्वी मी अनेकदा आलेलो होतो. त्यामुळे ती वास्तू आणि तो परिसर माझ्या ओळखीचा होता. तरीही आज तिथे मी येत होतो ते तिथलाच एक वरिष्ठ अधिकारी म्हणून. त्यामुळे मनात उत्सुकता होती, चलबिचल होती आणि पुढं काय वाढून ठेवलेलं असेल ही भीति आणि अनिश्चितताही!

मी लिफ्टमधून बाहेर येऊन कॉरिडॉरमधे पाऊल ठेवलं. डी.जी.एम् साहेबांच्या केबिनच्या दिशेने चालू लागलो. मी त्यांच्या प्रशस्त अशा त्या ए.सी.केबीनच्या बंद दाराबाहेर उभा. केबीनचं दार अलगद ढकलून मी तिथंच थबकलो.

“मे आय कम इन सर?”

समोर पाहिलं तर आतील प्रशस्त टेबलामागील रिव्हाल्व्हींग चेअरवर नेहमीचे डी.जी.एम् नव्हतेच. अतिशय प्रसन्न आणि हसतमुखाने माझं स्वागत करणारा हा चेहरा मला ओळखीचा वाटतोय पण यांचं नाव मात्र…..

” वेलकम मिस्टर लिमये. नो फाॅरमॅलिटीज्.प्लीज डू कम..” त्यांनी अतिशय आपुलकीने माझं स्वागत केलं.

यांना मी पूर्वी कधीतरी पाहिलंय पण यांचं नाव…..

हा भास तर नसेल? की स्वप्न?

” आय अॅम मिस्टर वखरे. बेसिकली आय अॅम फ्राॅम नागपूर रिजन. कालच मी चार्ज घेतलाय.”

” आणि इथले आधीचे डी.जी.एम्? ते रजेवर आहेत कां?” ही शक्यताही नाकारता येत नव्हतीच.

” ओह्..यू डिडन्ट नो द एपिसोड?”

“न..नाही सर”

” खूप भयंकर आहे ते. अॅन्ड व्हेरी अनफाॅर्च्युनेट फाॅर हीम. बोलू आपण. आणि तसंही बाहेर दिवसभर याचीच चर्चा चालणाराय. कळेलच तुम्हाला…’ वखरे साहेब हसत म्हणाले.

हा एक चमत्कारच होता माझ्यासाठी. मला हवं ते हवं तसं आणि नेमकं हवं तेव्हा घडवणारा  आणि जे घडेल ते माझ्या हिताचंच असेल हा माझ्या मनातला विश्वास सार्थ ठरवणारा चमत्कार!..पण स्वप्नवत वाटावा असा हा चमत्कार घडला कसा हा मनातला प्रश्न मात्र अजून तरी अनुत्तरीतच होता…!!

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “यमुनोत्री…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “यमुनोत्री…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

हा खरंतर आमच्या केदारनाथ यात्रेचा पहिला टप्पा. अगोदर लिहिलेल्या केदारनाथ यात्रेचा पूर्वार्ध. यमुनोत्री यात्रेत घोडेबाजार सह रस्ता, पायी, घोड्यावर, पीट्टू, आणि डोली ने प्रवास कसा होतो हे पाहण्याचा सगळा अनुभव पहिल्यांदा आला. आणि काहीप्रमाणात पुढील केदारनाथ प्रवास कसा असेल याची थोडीफार जाणीव झाली ती याच प्रवासात. पण जाणीव असणं आणि प्रत्यक्ष परिस्थिती, यात काहिवेळा प्रत्यक्ष परिस्थिती थोडी बिकट असते असा अनुभव येतो. तो मात्र केदारनाथलाच आला.

एखाद्या पैसे गुंतवण्याच्या जाहिरातीत जसं काही जोखीम किंवा आर्थिक धोका असणार्या काही गोष्टी पटापट सांगीतल्या तर जातात, पण आपल्याला त्या नीट कळत नाहीत. तसाच काहीसा प्रकार यमुनोत्री आणि केदारनाथ प्रवासात जाणवला.

यमुनोत्री यात्रेत केदारनाथ यात्रेची कल्पना आली असली तरी ती फक्त चुणूक होती. कारण या यात्रेचा प्रवास छोटासाच होता. अंतर जास्त नव्हतं. वातावरण बदलाचा प्रभाव तेव्हढा नव्हता. आणि पायी, घोडा, किंवा डोलीच्या प्रवासाच्या अगोदर आणि नंतर पायी चालण्याचा प्रसंग आला नाही.

पण घोड्यावर बसण्याचा त्रास लक्षात आला तो इथेच. आम्ही घोडे करायचे ठरवल्यावर त्या घोडेवाल्यांना आपलाच घोडा घेऊन आपल्यालाच पैसे मिळावेत याची इतकी घाई झाली की आमच्यापैकी दिसेल त्याला, बाई आणि माणूस यांना उचलून घोड्यावर बसवायची स्पर्धाच सुरु झाली आहे असं वाटलं.

मी वर जावं की नाही. जायचच असल्यास घोडा करावा की डोली. याचा विचार करण्याअगोदरच चारपाच जणांनी जमेल तसं उचलून एखाद पोतं चढवून त्याला हलवून नीट कराव तसं समोर असलेल्या घोड्यावर मला चढवलं सुध्दा. त्यातही पहीला प्रयत्न थोडा असफल झाल्यावर माझ्या शरीराकडे आणि हालचालींकडे पाहून एक त्यातल्यात्यात कमी उंचीचा घोडा आणला.

यावेळी मला दहीहंडी उत्सवाची आठवण झाली. फक्त तिथे पहिला प्रयत्न असफल झाल्यावर दुसरा संघ येतो. पण लक्ष्य तेवढंच उंच असतं. इथे मला घोड्यावर चढवणारा संघ त्याच घोडेवाल्यांचा होता. पण कमी उंचीचा घोडा आणून गोंविंदाला (मला) कमी उंचावर चढवलं जाणार होतं. यात मी मात्र कदाचित मनातल्यामनात खऱ्या गोंविंदाचा धावा केला असावा.

या सगळ्या गदारोळात आमच्यापैकी दोन तीन जणांना याच पध्दतीने घोड्यावर चढवलं सुध्दा होतं. असा प्रसंग अगोदर आला नसल्याने जवळपास प्रत्येकाच्या तोंडातून कमी अधीक प्रमाणात, वेगवेगळे आवाज निघाले होते. या आवाजात भिती, किंचाळणं, सवय नसणं, या प्रकारे उचलतील याचा अंदाज नसणं याचे संमिश्र भाव होते. मला त्रास झाल्याने माझ्या तोंडातून आवाज येत नव्हता, तर मला घोड्यावर बसायचंच नाही म्हणून मी चक्क ओरडत होतो. पण ते ऐकणार कोण……. कारण सगळ्यांच्याच बाजूला घोडे आणि घोडेवाले यांचीच गर्दी.

मी घोड्यावरुन काहिही करून खाली उतरण्यासाठी धडपडत होतो. आणि आलेलं गिर्‍हाईक जाऊनये याचा खटाटोप घोडेवाले करत होते. यात थोडा गोंधळ झाला. पण या सगळ्या गोंधळात एकच जण त्यातल्यात्यात शांत होता….. तो म्हणजे घोडा…….

म्हणजे माणसं घोड्यासारखी आणि घोडा माणसासारखा वागत होता…….

मी अगदी थोडावेळच घोड्यावर होतो. पण तेवढ्या अल्पकाळात माझ्या नजरेसमोर घोड्यावर बसून, हातात तलवार घेऊन, ती घोड्यांबरोबर चालवणारे मावळे. आणि पाठीशी लहान मुलाला बांधून मेरी झांसी नही दूंगी असं ठणकावून सांगणारी झाशीची राणी येऊन गेले. आणि मनातल्यामनात त्यांची माफी मागत. तडफेने घोड्यावरुन पायउतार झालो.

राजकारणात पायउतार व्हाव यासाठी खटाटोप असतो. तर इथे मी पायउतार होवूनये म्हणून प्रयत्न सुरु होते. पण शेवटी विजय माझाच झाला असलातरी आता काय करावं?……. या विचारात घोडेवाले आणि माझ्या बायकोसह ज्यांनी मला बरोबर नेले होते ते सगळेच मान खाली घालून वीचार करत होते. शेवटी तुुम्ही सगळे जा…… मी यमुनोत्रीच दर्शन घेतलं नाही तरी चालेल….. या विचारावर माझा प्रवास थांबला आणि इतरांचा सुरु झाला.

यांच्या पूर्ण प्रवासाला दोनतीन तासांचा कालावधी अपेक्षीत होता. पण जेमतेम अर्धाच तास झाला असेल. माझ्या बायकोच्या सांगण्यावरून परत एक सहकारी कुलकर्णी यांचा फोन…….. काय विचार करताय….. परत केव्हा येणार आहोत…. करा हिंमत….. डोली करा पाहिजेतर……. आम्ही रस्त्यात, नाहीतर वर थांबतो, वाट बघतो.

मग काय?……. माझ्या अंगात परत एकदा झाशीची राणी, आणि मावळे यांच स्फुरण चढलं. फक्त चढाईसाठी घोड्याएवजी डोली वापरावी असा निर्णय माझाच झाला. (कधीतरी मी एकटासुध्दा धाडसी आणि ठोस निर्णय घेऊ शकतो. यामुळे आत्मविश्वास वाढला.) आणि परत आमच्या चारचाकीच्या सारथ्याला सोबत घेत मी एक डोली ठरवून त्यात त्याच डोलीवाल्यांच्या साहाय्याने अगदी पेशवाई थाटात नाही, पण पाय जमतील तसे जवळ लांब करत वीराजमान झालो. सुदैवाने वातावरण चांगले होते.

मी वीराजमान झाल्यावर आमचा प्रवास सुरु झाल्याची वार्ता उलट टपाली भ्रमणध्वनी द्वारे पाठवण्याची काळजी मीच घेतली. ती पोहोचेपर्यंत त्यांचा गड सर होत आला होता. त्यांच्यासाठी ही आनंदी वार्ता होती. बायको जवळ त्या वेळी तिथे साखर असती तर कदाचित तीने त्या बसल्या घोड्यावरुनच साखर वाटायचा आनंदही घेतला असता. पण तो योग नव्हता.

मी सुखरुप वर पोहोचलो. आमची मंडळी आणि सोबतचे सहकारी यांची भेट झाली. आणि यमुनोत्री दर्शन व परतीचा प्रवास सुखरुप झाला.

या वेळी एक गोष्ट घडली ती आमचे सहकारी नंदेश परदेशी यांनी लक्षात आणली. बर्‍याचशा सिनेमात लग्नाची द्रृश्य आवर्जून दाखवली जातात. या सगळ्या सोहळ्यात नयनरम्य द्रृश्य असतात. असच नयनरम्य द्रृश्य आमच्या या प्रवासात पण होतं. फक्त सिनेमात वर हा घोड्यावर असतो. आणि वधू डोलीत असते. आमचा लग्न सोहळा कधीच पार पडला होता. पण आज माझी बायको घोड्यावर स्वार होती. आणि मी मात्र डोलीत होतो. आज खर्या गोष्टीला क्रूतीची साथ होती. आणि साक्ष होती यमुनोत्री.

आजच नाही तर आजच्या आधीच्या इतर प्रवासातच काय….. बाहेर जातांना सुध्दा खर्या अर्थाने ती पुढाकार घेत असते, आणि मी त्यातल्यात्यात सुरक्षित आणि कमी खडतर मार्ग माझा असतो, आणि खडतर तिचा. पण आज ते घोडा आणि डोली या प्रवासात जाणवलं.

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आईपणाच्या कळा!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? विविधा ?

☆ “आईपणाच्या कळा!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

मुलं जसजशी मोठी होत जातात तसतसा आईच्या अंगणातला किलकिलाट कमी कमी होत जातो! एक शांतता भरत भरत जाते मनाची विहीर. घर अबोल होऊ लागतं… आणि या अबोलपणाचा अदमास आईला आधी आलेलाच नसतो….काळीज मूर्ती नसलेल्या गाभा-यासारखं होतं!

मुलांना त्यांचं त्यांना सारं काही करता येऊ लागलेलं असतं…त्यामुळे त्यांनी आईला काही विचारावं अशी गरज उरलेली नसते. मुलं आईशिवाय जगू पाहत असतात आणि त्यात त्यांना सावकाश का होईना…एक गती प्राप्त होत जाते…आईचं बोट सोडलं तरी आपण भेलकांडत नाही हे त्यांना उमगत जाते.

आई हसते…कारण मुलांनी स्वतंत्र पंखांनी आभाळात विहार करावा हीच तर तिची आंतरिक इच्छा असते….पण तरीही तिच्या आत काही तरी तुटत असतं!

लहान मुलांची आणि मोठ्या मुलांची आई असणं यात खूप फरक असतो. लहानग्यांचं काही चुकलं तर आई बोलू शकते…मोठ्यांच्या चुका बघत राहाव्या लागतात… सवयीने ओठांवर आलेले सल्ल्याचे शब्द गिळून टाकावे लागतात. मुलं हाकेला सहजी ओ देत नाही हे माहीत झाल्याने त्यांना हाक मारण्याआधी दहादा विचार करावा लागतो… आता त्यांच्या आयुष्यात लुडबूड होणार नाही अशी काळजी घेत घेत प्रेम करायला शिकावं लागतं आईला! डोंबा-याची पोर अधांतरी बांधलेल्या दोरीवर तोल सावरत सावरत एक एक पाऊल टाकीत दुस-या टोकाला जात असते….डोंबारीण ढोलकी बडवत असली तरी तिचं सारं लक्ष पोरीच्या पायांकडे असते…काही झालंच तर आपण काहीही करू शकणार नाही…ही जाणीव तिचं आतडं कुरतडत असतं! पण ज्याची वाट त्यानंच चालायची असते… हेही तिला मनोमन ठाऊक असते.

मुलं आईला काही गोष्टी सांगतात कधी कधी…पण कधी कधीच. आणि त्यांचं हे असं कधीकधी व्यक्त होणं तिला टोचत असतं… पण ती ते सांगत नाही! आपण आता यांच्या आयुष्यातलं एकमेव झाड नाही आहोत सावली देणारं… ही भावना मूळ धरू लागते.

पण तरीही त्यांनी याच झाडाखाली विसाव्याला यावं… कारण झाडालाही सवयीचं झालेलं असतं. मुलांना बाहेरच्या,दुस-याच्या हातची चव माहीत झालेली किंबहुना माहीत करून घ्यावी लागलेली असते… आईचा हात काही कायमचा हात राहणार नाही… हे त्यांनी बहुदा समजून घेतलेलं असतं. तरीही आई त्यांच्या आवडीचं काहीबाही त्यांच्या पानात वाढत राहतेच. त्यांच्या लहानपणीचे फोटो उगाचच बाहेर काढून त्यांवरची धूळ झटकत राहते… तिला ती चित्रं जुनी होऊ द्यायची नसतात! पोरांना सुखाचं ठेव… अशी आर्जवं आई करीत असतेच… पोरांना त्यांची त्यांची प्रार्थना म्हणायची असतानाही! पण काळजी करायचं आईचं काळीज काही थांबवत नाही..थांबवू इच्छित नाही! फक्त ही काळजी आता स्पर्शातून नाही…तर मनातून वाहू लागलेली असते….आणि नेमका हाच प्रवाह नजरेआड होऊन जातो पोरांच्या! पण त्यांना हे ठाऊक नसतं… त्यांच्या ओढ्यांना आलेल्या वेगवान प्रवाहात याच विहिरीतलं पाणी झिरपत झिरपत उतरलेलं असतं… आणि हा अंतस्थ प्रवाह चिरंजीव असतो… ही सरस्वती गुप्त असली तरी वाहती मात्र असते!

आपण मुलांच्या केंद्रस्थानी राहिलेलो नाही आहोत…हे स्विकारून त्यांच्यावर तसंच प्रेम करीत राहणं…त्यांना आपल्या डोळ्यांच्या केंद्रस्थानी ठेवून न्याहाळत राहणं…हे आई करीत राहते…तिच्या प्रेमाला आता प्रतीक्षा करायची सवय करून घेणं अपरिहार्य झालेलं असतं.. न जाणो कधी मूल हाक देईल…ओ देण्यासाठी आपण तयार असायला पाहिजे!

(Sacred Divine Feminine वेब पेज वरील मजकुराचे स्वैर मराठी रुपांतरण. सहज वाचनात आलेले काही. – संभाजी बबन गायके.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ पाऊले…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ पाऊले… ☆ सौ शालिनी जोशी ☆

माझी मुलगी भक्ती म्हणाली मला मोत्याची गौरीची पावले करायची आहेत. मनात आले का बरे असावे एवढे पावलांना महत्त्व गौरीचे पावले, संतांचे पाय,भगवंताचे पद,सद्गुरु चे चरण,महात्म्यांच्या पादुका अशा विविध प्रकारे आपण पावलांचा उल्लेख करतो.

याला कारण पाय हे अधिष्ठान आहेत.त्याचे वर सर्व शरीराचा भार म्हणजे शरीराचे सर्व कर्तुत्व सामर्थ्य या पायात सामावलेले.म्हणून चरणांच्या किंवा चरण चिन्हांच्या दर्शनाने त्या महात्म्याच्या सामर्थ्याचा प्रत्यय येतो.पदस्पर्शाने किंवा त्यावर डोके ठेवल्याने ते सामर्थ्य आपल्यात प्रवाहित होते असे म्हणतात.हीच चरणांची महती म्हणून संतांच्या प्रत्यक्ष मूर्ती नसल्या तरी चालतात. त्यांच्या पादुकांना चरणांच्या प्रतिमेला नमन केले जाते.क्षेत्राच्या ठिकाणी त्या त्या संत महात्म्यांच्या पादुका असतात. त्यांच्या पदस्पर्शाने ती भूमी पावन झालेली असते. त्याचे क्षेत्र होते.अशा संतांच्या पदस्पर्शाने तेथील रजःकणही पावन होतात त्यांचे वास्तव्य सूक्ष्म रूपाने तेथे राहते.

पुराणकथातही चरणांचे महत्त्व सांगितले आहे. रामाच्या पदस्पर्शाने गौतम पत्नी अहिल्याचा उद्धार झाला. ती शाप मुक्त झाली. तर वामन अवतारात भगवंतांनी चरणाने बळीला पाताळा ढकलले. राम वनवासात गेल्यावर लक्ष्मणाने रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य केले.

गौरीच्या पावला नाही असेच महत्त्व आहे.गौरी घरात आणण्यापूर्वी तिच्या मार्गावर हळदीकुंकू व रांगोळीची पावले काढली जातात. त्यावरून ती घरात येते हा तिच्या स्वागताचा प्रकार.मान सन्मानाने तिला घरात आणून या पावलावरून घरभर फिरवले जाते. घरातले वैभव दाखविले जाते.तिचा वास अखंड घरात असावा म्हणून ही पावले नेहमी आत येणारी असतात आणि बाहेर जाणारी अलक्षमीची. कोणी श्रेष्ठ पूज्य व्यक्ती घरी आल्यास त्याची पाद्य पूजा करतात लग्नातही जावयाचे व बहिणीचे पाय धुतले जातात यात त्यांच्या सन्मानाचा हेतू असतो.आदर व्यक्त केला जातो. लग्नातील सप्तपदी हा विधी दोघांनी आयुष्यभर सहकार्याने एकमेकांच्या पावलावर पाऊल ठेवून चालावयाचे आहे असे दाखवतो.

पावलावर पाऊल ठेवणे असा एक वाक्प्रचारही आहे म्हणजे चांगल्या माणसाचा आदर्श ठेवून तसे वागणे.आणि पाऊल वाकडे पडणे म्हणजे मार्ग चुकणे. पाऊलवाट म्हणजे पायी चालता येईल अशी अरुंदवाट पुढील मार्ग दाखवणारी म्हणून संतांच्या पाऊलवाटेने आपण चालावे असे म्हणतात.बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी आपल्याकडे एक म्हण आहे म्हणजे बाळाच्या पायांच्या हालचालीवरून पुढील त्याच्या कर्तुत्वाचा अंदाज येतो. मेंदिने रंगलेल्या पावलांनी नववधू घराचा उंबरठा ओलांडते तेव्हा पायाने तांदळाचे माप आज सांडते.लक्ष्मी रूपाने आलेली ही वधू घरातील लक्ष्मी घरातच ठेवते. नर्तकीचे नृत्यही तिच्या पायाणच्या हालचालीच्या तालावरच होत असते.वारकऱ्यांची पावले पंढरीचा मार्ग चालतात तेही विठ्ठलाच्या चरण स्पर्शाच्या ओढीने. स्वातंत्र्यवीरांच्या पावलावर पाऊल ठेवून सैनिक देशाचे रक्षण करतात. एव्हरेस्टवर उमटलेली आणि अंटार्टिकावर उमटलेली भारतीयांची पावले देखील आपली सत्ता दाखवणारी तर चंद्रावरील माणसाचे पावले चंद्रालाही गवसणी घालणारी.अशा प्रकारे पावलेही समृद्धीकडे नेणारी प्रगतीचा मार्ग दाखवणारी म्हणूनच म्हटले आहे.

एक एक पाऊल चालनिश्चयाने

नकोय बावरून जाऊ नियतीच्या भयाने.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ एकविसाव्या शतकातील गुरु… + संपादकीय निवेदन – सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

🪻 अभिनंदन 🪻

इनरव्हील क्लब, डोंबिवली यांनी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेत आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका सौ. पुष्पा प्रभूदेसाई यांना द्वितीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. ई अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐

निबंधासाठी ‘ एकविसाव्या शतकातील गुरु ‘ असा विषय दिला होता. त्यांनी मोबाईलला गुरु मानून लेखन केले आहे.

आज त्यांचा हा निबंध “एकविसाव्या शतकातील गुरु…“, ‘विविधा ‘ या सदरात देत आहोत.

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

☆ ☆ ☆ ☆ ☆

?  विविधा ?

☆ पुरस्कृत लेख – एकविसाव्या शतकातील गुरु… ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

गुरुः ब्रम्हा, गुरुःविष्णु, गुरुःदेवो महेश्वराः

गुरुः साक्षात, परब्रम्ह, तस्मै श्री गुरवे नमः

हा श्लोक आपण लहानपणापासून सकाळी उठल्यानंतर म्हणत आलो आहोत. अत्यंत महत्त्वाचा श्लोक आहे हा.

‘ गुरु ‘ या दोन अक्षरी शब्दाचा अर्थ असा आहे की, ‘ गु ‘म्हणजे अंधकार. आणि ‘ रू’ म्हणजे प्रकाश. जो आपल्या अज्ञानाचा अंधःकार दूर करून प्रकाश देतो तो गुरु. जो शिष्याचे आई-वडीलही होतो; मी पणा

बाजूला ठेवून निरपेक्षपणे ज्ञानाची गोडी लावतो; शिष्याला कठीण प्रसंगी मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणून आधार देतो, तो ‘गुरु. ‘

पूर्वी प्रत्येक ऋषींना विशिष्ट विषयाचे सखोल ज्ञान असे. ते शिष्यांना देत असत. वर्तुळातील व्यास ही रेषा परीघाच्या प्रत्येक बिंदूला स्पर्श करते. आणि विभाजनही करते. त्याप्रमाणे सृष्टीचक्राचे सर्वंकष उपयुक्त ज्ञान आणि अनुभव देणारे आद्य गुरु म्हणजे ‘व्यास’

आज काळ पालटलाय. मुलं शाळेत जातात. शिक्षक शिकवितात. चार पैसे मिळविण्यासाठी ज्ञान देणारे ते शिक्षक. हातचे न राखता, मनापासून आणि सर्वतोपरी शिष्याला ज्ञान देणारे ते ‘गुरु. ‘ जन्मदाते माता पिता हे तर गुरु असतातच. पण पुढे आयुष्यात ज्ञान मिळवून यशस्वी व्हायचे असेल तर आणखीही गुरु हवेत.

आज 21व्या शतकात विज्ञानाच्या कक्षा रुंदावत चालल्या आहेत. इतकं विस्तृत ज्ञान जर आत्मसात करायचं असेल तर वैज्ञानिक उपकरणांच्या गुरुचा आधार घ्यावा असं मला वाटतं. तुम्हाला मजा आणि कदाचित आश्चर्य वाटेल माझा गुरु ऐकून. प्रत्येक व्यक्तीला हवाहवासा वाटणारा, सर्वांचा लाडका, पावलोपावली गरज असणारा, हवं ते ज्ञान देणारा, एका हातात मावणारा, ‘ ”भ्रमणध्वनी’ किंवा ‘मोबाईल’ हा एकविसाव्या शतकातला माझा सच्चा ‘गुरु’.! त्याची महती किती सांगावी तितकी कमी. त्याच्या उपकाराची फेड करणं कठीणच आहे. मनात इच्छा झाली की, एक छोटेसे बटन दाबल्यासरशी मैत्रिणी, नातेवाईक सर्वांशी बोलता येते. अंतर कितीही असो, अगदी साता समुद्रापार असलेल्या व्यक्तीशी केवळ बोलणेच नाही, तर त्याला पाहता ही येते. केवढा आनंद मिळवून देतो ना हा गुरु! अगदीच वेळ नसेल तर केवळ मेसेजही दुसऱ्याला सांगण्याचे काम करतो. काही वेळा ज्येष्ठ नागरिकांना कंटाळा येतो. अशा वेळी हा ‘मोबाईल गुरु’ त्यांना सिनेमा दाखवू शकतो. गाणी ऐकवून त्यांची कर्मणूक करतो. त्यांचा मित्र बनतो जणू तो! आपल्याला परगावी जायचे असेल तर, अगदी घरात बसून रेल्वे, बस, विमानाचे आरक्षणही करून देतो. ठिकठिकाणची अंतरं सांगतो. आपल्या गाडीतून इच्छित ठिकाणी जाताना, कोणत्या मार्गाने जायचं, तो मार्गही दाखवत राहतो. मोबाईल गुरु शेतकऱ्यांवरही किती उपकार करतो ना? आपल्या भागात अगदी भारतातही पाऊस कुठे, किती, कधी पडेल याचा अंदाजही देतो. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे काम सुलभ होते. बातम्या म्हणाल तर, लोकल ते ग्लोबल इतक्या या गुरू मोबाईल मुळे मिळू शकतात. आपल्याला हव्या असलेल्यांचे नंबर तो स्वतः जवळ साठवून ठेवतो. व हवे तेव्हा सांगतो. एखादा कार्यक्रम असेल तर हा गुरु फोटो काढून ते साठवून ठेवतो. आणि केवढा तरी आनंद मिळवून देतो ना! गणिताचा, हिशोबाचा ताळमेळ करायचा असेल तर तो काही सेकंदात बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्गमूळ, घनमूळ, अनेक घात, क्षेत्रफळ सांगून आपल्याला चकित करून सोडतो. एखादा निबंध, एखाद्या व्यक्तीचे चरित्र लिहायचे असेल, एखाद्या शब्दाचा अर्थ हवा असेल किंवा तो शब्द इतर भाषांमध्ये कसा भाषांतरित होईल याची उत्तरे द्यायला हा गुरू क्षणात तयार असतो हो. किती वाजले याची वेळ सांगतो. इतकच नाही तर तारीख, वार अशी दिनदर्शिका ही थांब सांगतो तुला अस म्हणतो. गजर लावला की, ठराविक वेळेला बरोबर उठ म्हणतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आरोग्य. कोणीतरी क्लास घेत असेल तर घरी बसून ऑनलाइन धडे घेऊ शकतो. इतकच काय व्यायाम म्हणून जर चालायचे असेल तर, आपण किती अंतर चाललो याची मोजदाद ठेवून ती आपल्याला सांगतो हो हा गुरू मोबाईल. या मोबाईल गुरुंनी अगदी लहान बाळापासून ते ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांनाच आपलंसं केलंय. बाळ रडायला लागलं, जेवत नाहीस झालं तर, गुरु गाणं सुरू करतो. आणि खरंच बाळ रडायचं थांबत. या गुरुचे अनेक ॲप्स वेगवेगळी कामे करतात. ज्ञान, मनोरंजन, माहिती या तीनही गोष्टी क्षणार्धात आपल्याला सांगण्याचे एक महान कार्य हा गुरु मोबाईल करतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (ए आय)च्या आगमनाने तर या मोबाईल गुरुला आणखीच मोठं बळ मिळालय. त्यामुळे विस्तारित (व्हास्ट)ज्ञान जर आत्मसात करायचं असेल तर अशा वैज्ञानिक उपकरणांच्या गुरुचा आधार घ्यायला काय हरकत आहे? ‘ संगणक ‘ हा मोबाईल गुरुचा मोठा बंधू गुरु. पण आमच्यासारख्या पंचाहत्तर च्या पुढे गेलेल्यांना तो कितपत पेलवेल? हा आपला छोटा, हातात राहणारा गुरु छान. आता तर मुलींच्या सुरक्षेसाठी जी. पी. एस. त्यांच्या दप्तरात ठेवून, त्यांचा कनेक्ट पालकांच्या मोबाईल गुरुशी जोडलेला असतो. कोणाला लेखन पाठवायचे तर, हा मोबाईल गुरु म्हणतो, ” तू मला सांग मी टाईप करून देतो. अगदी सुंदर अक्षरात बरं”या गुरुचे उपकार (सर्वांवरच) तर आहेतच पण तरीसुद्धा त्याच्याकडून ज्ञान मिळविताना, त्याला ऊर्जा (चार्जिंग)द्यावी लागते. ऊर्जा संपली की गुरु गप्प बसतो. ऊर्जा दिली तरी त्याला वेळच्यावेळी गुरुदक्षिणाही (रिचार्ज) द्यावी लागते बरं! . हे सगळं जरी खरं असलं तरी त्याच्या आहारी जाण्यात अतिरेक केला तर, लहान थोरही त्याच्या सापळ्यात अडकू शकतात. केवळ वेळ वाया जाणं हा एकच दुष्परिणाम नाही तर त्यामुळे मनोविकारही बळावत आहेत. झोपेवर परिणाम होऊन अवेळी भूक लागते. डोळ्यांना त्रास होतो. डिजिटल आय स्ट्रेनची लक्षणे दिसू लागतात.. विस्मरण व्हायला लागतं. शरीरातील ग्रंथी आणि मेंदूच्याक्षमतांवर परिणाम होतो. त्याच्या कार्यातील संदेश प्रणाली नीट काम करेनाशी होते. कमी हालचालींमुळे स्पर्शज्ञान व सजगता कमी होते. न्यूरोलॉजिकल आजार होऊ शकतात. स्क्रीनचा ब्ल्यू लाईट डोळ्यावर पडल्याने शारीरिक चक्र बिघडतं. आणि मग थकवा मरगळ यायला लागते. कोविड च्या काळात करमणूक करणारा मित्र म्हणून त्याच्या वापराचा अतिरेक झालाआणि मग नंतर घातक परिणाम दिसायला लागले. तसेच लहान मुलांच्या डोळ्यांच्या तक्रारीचे मोबाईलचा अतिवापर हे एक कारण आहे. मग यासाठी आपण काय करायला हवं आपणच आपल्यावर बंधन घालायला हवं दिवसा काठी काही ठराविक वेळच त्याला जवळ ठेवायचं. त्यालाही विश्रांती हवी ना? आपण झोपण्यापूर्वी दोन तास अगोदर टीव्ही संगणक मोबाईल यांनाही झोपू द्यायचं. झोपतानाही या मोबाईल गुरूला लांबच ठेवायचं. गुरु मधील ब्ल्यू कलर कमी केला की शरीरातील मेलाटोनिनची पातळी बिघडत नाही. या मोबाईल गुरुशी जर नियमबद्ध राहून ज्ञान घेतले तर त्याच्यासारखा गुरु दुसरा नाही. अगदी थोडक्यात त्याचे महती सांगायची तर असे म्हणता येईल

चैतन्य: शाश्वत: शान्तो व्योमातीतो निरंजन।

बिंदूनादकलातीतस्तस्मै श्री गुरवे नमः।।

अशा श्री गुरूंना माझा नमस्कार असो.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मानसुमने ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? विविधा ?

☆ मानसुमने ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सोनियाच्या ताटी

उजळल्या ज्योती

ओवाळीते भाऊराया

वेड्या बहिणीची वेडी ही माया

या ओळी वातावरणातून कधीही लहरत आल्या की कान आणि मन तृप्त होतं. बहीण हा शब्द कधी एकट्याने येतच नसावा. अदृश्यपणे बहीण या शब्दाबरोबर भाऊ हा शब्द असतो आणि ज्या ज्या वेळी बहीणभाऊ असा जोडशब्द उच्चारला जातो तेव्हा नकळत त्या भोवती मायेची, प्रेमाची, भावबंधनाची झालर सहजपणे विणली जाते.

हिंदू संस्कृतीत बहीणभावाच्या या नात्याला अपरंपार महत्त्व आहे आणि हा ममतेचा रेशीमबंध सदैव जपला जावा म्हणूनच रक्षाबंधन, भाऊबीज यासारखे सण बहीणभावामधली प्रेमाची गाठ अतूट राहण्यासाठी साजरे केले जातात. परंपरा आणि संकेतात गुंतलेला हा भावनिक धागा अशा रीतीने जपला जातो.

अर्थात बहीणभावाचं सांस्कृतिक पातळीवरचं नातं असं असावं अशी सामाजिक अपेक्षा असते. प्रत्यक्षातले अनुभव कदाचित निराळे असू शकतात. मुळातच नाती टिकवणं, नाती जपणं, नात्यातला बंध पाळणं, नात्याला अधिक सुंदर करणं या गोष्टी आजच्या यंत्रयुगात मात्र काहीशा धूसर झालेल्या जाणवतात.

जगण्याच्या कल्पनाच बदलल्या आहेत का? की यांत्रिकतेत, कमालीच्या गतिमानतेत, स्पर्धेच्या युगात, स्वातंत्र्याच्या अफाट कल्पनेत, स्थळ काळानुसार कुठेतरी या संकेतांनाच नकळत पायदळी चिरडले जात आहे का?

एक हजारो मे मेरी बहना है

सारी उमर हमे संग रहना है।।

हे फक्त गाण्यापुरतंच उरलं आहे का?

पण या साऱ्या सांस्कृतिक पारंपरिक प्रश्नांची उत्तरे शोधण्यापूर्वी एक गमतीदार विचार मनात येतो तो सध्या राजकीय क्षेत्रात गाजत असलेल्या लाडकी बहीण या शब्द समूहामुळे. वास्तविक या लेखाला मला कुठलंही राजकारणी स्वरूप नक्कीच द्यायचं नाही अथवा राजकारणावर टीका करण्याचा माझा हेतूही नाही पण समाजात जगत असताना “जगणं आणि राजकारण” याची फारकत कशी करणार? शिवाय एका राजकीय पक्षाकडून लाडक्या बहिणीला मिळणारं हे अनुदान नक्की कशासाठी? हा प्रश्न दुर्लक्षित कसा काय करणार? “आवळा देऊन कोहळा” काढण्यासारखं नाही का वाटत हे? घ्या अनुदान करा मतदान अशी एक अंतस्थ घोषणा नाही का ऐकू येत? भेटीत दानाची भूमिका असेल पण या दानात बहिणीचा मान, सन्मान खरोखरच राखला आहे का आणि तसं असेलच तर मग पुढचा अत्यंत महत्त्वाचा आणि ज्वलंत प्रश्न निर्माण होतो तो महिलांच्या सुरक्षिततेविषयी.

प्रत्येक मिनिटाला तीन ते पाच बलात्कार होत असलेल्या आपल्या देशात लाडकी बहीण या शब्दरचनेला कुठला अर्थ प्राप्त होतो? पंधराशे रुपयाची भेट तिच्या खात्यात जमा करा आणि तिच्या स्त्रीत्वाचे, स्वाभिमानाचे, अस्तित्वाचे धिंडवडे पहात रहा.

परवाच मी माझी मदतनीस कविता हिला सहज विचारलं, “ का गं! तू लाडकी बहीण योजनेत तुझं नाव नोंदवलंस की नाही? ” तेव्हा तिने ताठ मानेने डोळे रोखून माझ्याकडे पाहिलं आणि ती म्हणाली, ” ताई मला दान नको मला मान हवा. “

घरोघरी ती काम करते, चार पैसे कमावते. मुलाच्या शिक्षणाचे स्वप्न पाहते आणि दारुड्या नवऱ्याचा रोज मार खाते. रस्त्यातून चालत येताना तिला असंख्य विकारी नजरा झेलाव्या लागतात तेव्हा कुठे जातो हा लाडक्या बहिणीचा भाऊ आणि त्याच्या मनगटावर असंख्य भगिनींनी रक्षाबंधनाच्या दिवशी बांधलेले ते धागे?

ओवाळणीच्या ताटात दिलेल्या भाऊबीजेतून बहिणीला हवा असतो विश्वास. भेटीत केवळ काहीतरी दिल्याचा भाव नको. राखला जावा तिचा मान, जपली जावी तिची सक्षमता, तिचा जगण्याचा अधिकार, तिची आत्मनिर्भरता.

महिला सक्षमतेच्या विविध कायद्यांची अंमलबजावणी आणि कायद्याचे ज्ञानदान तिला मिळावे. वडिलोपार्जित मालमत्तेतला तिचा हक्क तिला सन्मानाने मिळावा. तिच्या स्त्रीधनाची बूज राखली जावी. एका ओवाळणीने तिला लाचार किंवा उपकृत करुन एक प्रकारच्या अदृश्य दास्यात बांधण्यापेक्षा तिच्यासाठी सन्मानाची दालनं खुली करून द्या.. जिथे नसतील हिंसा, मानहानी, निर्भत्सना, अत्याचार, तिच्या देहाची केलेली लक्तरे, तिच्या जन्माची झालेली हेळसांड. तिथे फक्त असावी मानाच्या सुमनांची शुद्ध मोकळी उधळण.

अपेक्षा ही आहे नुसत्या दानाची नव्हे तर सन्मानाची.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘कुणाच्या खाद्यावरी संस्कारांचे ओझे’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘कुणाच्या खाद्यावरी संस्कारांचे ओझे’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

पालकांनी लहानपणापासूनच आपल्या पाल्यांवर उत्तम संस्कार करून त्यांना कर्तृत्ववान, सुशिक्षित, सज्जन, शक्तिशाली आदर्श नागरिक करावे – असे नागरिक जे समाजात, व्यवसायात, आपापल्या कार्यक्षेत्रात उत्तम योगदान देऊ शकतील. कुटुंबाचा, गावचा, देशाचा लौकिक वाढतील. आपल्या मुलांवर सुसंस्कार करण्यात निःसंशय पालकांचे व नंतर शाळेचे दायित्व सर्वाधिक असते.

तत्वतः हे मान्यच आहे की पालकांनी मुलांवर घरातच उत्तम संस्कार करावेत. शाळेने सुद्धा मुलांवर उत्तम संस्कार करावेत. त्यातून जर एखादे मूल बिघडले तर त्याला पालक व शाळा जबाबदार आहेत असे सहज म्हणून आपण मोकळे होतो. आपल्या या म्हणण्यात कितपत तथ्य आहे हे कधी आपण तपासलं आहे का हो?

मूल मुळात घरी आपल्या आई-वडील-आजी-आजोबा-भावंडे (सध्या घरात आजी- आजोबा, भावंडे असणे तसे दुर्मिळच झाले आहे) यांच्या सहवासात खरंच किती वयापर्यंत आणि किती वेळ असते? घराबाहेर किती वेळ असते? मुलावर संस्कार केवळ घरातूनच होतात की बाहेरील जगाकडून? त्यावर घरच्यांचे संस्कार अधिक होतात की घराबाहेरच्या समाजाचे?

घरात आजोबा-आजी बाळाची मनापासून काळजी घेतात. त्याच्याशी त्याच्या वयाचं होऊन खेळतात, काऊ-चिऊच्या, साळू-ससुल्याच्या, भीमा-बलभीमाच्या, राम-कृष्णाच्या गोष्टी सांगत घास भरवतात, आंगाई गाऊन निजवतात. असे भाग्य काहींच्याच वाट्याला येते. आजी-आजोबांच्या सुखद सहवाच्या स्मृतींची शिदोरी बालकाला जन्मभर पुरते.

घरात कोणी जेष्ठ व्यक्ती नसतील आणि आई-वडील नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर जाणारे असतील तर त्या ३-४-५ महिन्यापासूनच बाळाला पाळणाघरात रहावे लागते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते लेकरू पाळणाघराच्या संचालिकेच्या ताब्यात असते. तिथे बाळाच्या घरचे, मायेचे, परिचयाचे असे कोsणी नसते.

ती संचालिका सुसंस्कृत सुशिक्षित असल्यास उत्तम पण त्या सहसा तशा नसतात आणि प्रशिक्षित तर नक्कीच नसतात. आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून त्या हा व्यवसाय पत्करतात येवढेच. समाजालाही या सेवेची गरज असते. संचालिकेकडे वेगवेगळ्या कुटुंबातील, वेगवेगळ्या संस्कृतीत जन्माला आलेली, भिन्न भिन्न आर्थिक स्थिती असलेली, अनेक प्रदेशातून आलेली, बहुभाषी अशी १०-१२ मुले तरी येतात. त्यांचा वयोगट कदाचित वय पाच-सहा महिने ते आठ-दहा वर्षेही असू शकतो.
लहान बालकाला ६ महिन्यापासून घरच्यांपेक्षा अधिक काळ त्या संचालिकेच्या आणि वैविध्य असलेल्या लोकांच्या सहवासात रहावे लागते. ते मूल त्यांचे बोलणे, चालणे, वागणे, वेषभूषा पहात पहात मोठे होत असते. तिथेच त्याचा अनुभवसंग्रह, स्मृतिसंग्रह, दृष्यसंग्रह व शब्दसंग्रह विकसित होत असतो. इतरांच्या डब्यातल्या पदार्थांच्या विविध चवी चाखत ते वाढत असते. अशा पाळणाघरात मुलावर घरच्यासारखे संस्कार कसे व्हावेत? संस्कार होतात ते समाजातील विविध व्यक्तींचे, लोकांचे, घटनांचे आणि संचालिकेचे.

पाळणाघरातले मूल असो की घरी कुणाच्या निगराणीत वाढलेले असो, वयाच्या दोन-तीन वर्षापासून त्याच्या शालेय शिक्षण व जीवन प्रवासास आरंभ होतो. प्ले ग्रुप, ज्युनियर के जी, सिनियर के जी, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी……!
बाळ वाढत असते. त्याला घरून न्यायला आणि परत घरी सोडायला रिक्षा किंवा स्कूल व्हँन किंवा स्कूल बस येते. या वाहनातून जाता-येतानाच्या रोजच्या प्रवासात एक नवीन पात्र त्याच्या आयुष्यात येते, ते म्हणजे रिक्षावाले किंवा व्हँनवाले काका. त्यांचे बोलणे, वागणे, सूचना देणे, त्यांच्या सवयी, असतील तर व्यसने ते मूल बारकाईने पहाते.

हे बाळ आता घराबाहेरील समाजात मिसळत असते, प्रवासात विविध शब्द, स्वर, चित्रे, बोली, विविध पोषाखातील माणसे, स्त्री-पुरुष, मुले-मुली, सजवलेली दुकाने, माँल्स, डिपार्टमेंटल स्टोअर्स, राजकीय पक्षांची अवाढव्य बँनर्स, कटाऊटस्, भडक आकर्षक, उन्मत्त जाहिराती, रस्त्यावरील वाहने, गर्दी, आपघात, बाचाबाची, भांडणे, सिग्नलपाशी होणारी पुढे जाणाऱ्यांची धडपड इ. ते विस्फारलेल्या नेत्रांनी पहात राहते. हे गतिमान विश्व नुकतेच घराबाहेर पडलेल्या बालकाला विस्मयकारक, कदाचित अंगावर आल्यासारखे भयावह वाटते. त्यातून तो टिपकागदाप्रमाणे अनेक संस्कार मनात साठवत असतो, त्यांचे अर्थ लावीत असतो. त्यातले काही प्रसंग त्याला रिझवतात, हवेहवेशे वाटतात तर काही नकोसे वाटतात. बालक हे सारे संस्कार घरातून नाही, समाजाकडून घेत असतो. त्याच्यावर होणारे संस्कार समाजाकडून घडत आसतात.
शाळेतून घरी आल्यावर त्याला हायसे वाटते. आई – बाबाही दमूनभागून घरी येतात. जुजबी बोलणे होते. जरा विसावल्यावर बाबा टीव्ही लावतो. ती बातम्यांची वेळ असते. वार्ताहार कडकडत बातम्या सांगत असतो. अमक्याने तोफ डागली, तमक्याने पलटवार केला, ढमक्याला अटक केली इ. इ. दुसरा चँनेल लावला तरी तिथेही तेच चालू असते. मग बाळाची आई एखादी मराठी सिरियल लावते. त्यात दोन बाया एक तर भांडत असतात, एकमेकांवर काही खुनशी कुरघोड्या करीत असतात किंवा टोमणे मारताना दिसतात. आई पुन्हा चँनेल बदलते. कुठे तरी सिनेमा, कुठे बेछुट गोळिबार, कुठे प्रणय तर कुठे राजकीय चर्चा. असं कुठे काही अन् कुठे काही चालू असतं. एकमागे एक चँनेल्स बदलत असलेले पाहून बाळ गोंधळून जाते. कशाचा कशाला मेळ नसतो. टीव्हीवर चालू असतो, बाळाला दिसत असतो आणि त्याच्या इवल्याश्या डोक्यात उडालेला असतो केवळ ताणयुक्त गोंधळ!

शेवटी टीव्ही बंद करून आई बाळाच्या जवळ बसते. दिवसभरचा वृत्तांत विचारते. थोड्या गप्पा गोष्टी, हास्यविनोद होतात. बाबा मोबाईलवर कुणाशी बोलत असतो. बाळाला भूक लागल्याचे तिच्या लक्षात येते. ती त्याला जेऊ घालते. बाळ थोड्याच वेळात झोपी जाते. बालकाला आई-वडिलांचा सहवास आणि त्यांच्याकडून होणाऱ्या संस्कारांना अशा मर्यादा असतात.

असे दिवस जात असतात. बाळ वाढत असते. सातवी-आठवीतले बाळ आता मित्रांबरोबर सायकलने शाळेत जा-ये करू लागते. त्याच्या जीवनातील एक नवा थरार ते अनुभवू लागते. शाळेनंतर ट्यूशन, नंतर एखादा कोचिंग क्लास, असा दिनक्रम सुरू होतो. आईबाबापाशी बसून बोलायलाही वेळ नसतो त्याला. इथे कसे आणि कसले होणार घरचे संस्कार!

बाळ मोठा होतो. काँलेजला जाण्यासाठी त्याला कौतुकाने मोटरबाईक घेऊन दिली जाते. वर खर्चासाठी बाळाला दरमहा पाँकेट मनी मिळू लागतो, बरोबरच्या इतर मित्रांनाही अशी पाँकेटमनी त्यांचे पालक देत असतात. बाळ खूष असतो!

नवे मित्र-मैत्रिणी, नवे सवंगडी, नवे छंद, सुरु होतात. काँलेजच्या निवडणुका, गँदरिंग्ज, ट्रिपा, पिकनिक्स, कुणाच्या बर्थडे पार्ट्या, फ्रेंडशिप डे, व्हँलेंटाईन डे, यात वर्षे कापरासारखी उडून जातात. बाहेरच्या जगातली अनेक प्रलोभने त्याला आकर्षित करीत असतात. युवावस्था प्राप्त झालेला बाळ आता घरी कमी बाहेर समाजात अधिक काळ आसतो. घरी वेळी अवेळी, रात्री-अपरात्री येऊ लागतो. विचारले तर आई-बाबाला उडवाउडवीची उत्तरे मिळतात. मुलाची पावले वाकड्या वाटेवर पडू लागतात. बाळ भरकटू लागतो. नको त्या वयात नको ते करू लागतो. परीक्षेत नापास होतो. एखाद्या मुलीच्या प्रेमात किंवा व्यसनात अडकतो. बघता बघता पोर अखेर वाया जाते. पालकांना हा मोठा धक्का असतो. लोक म्हणतात आईबापाने मुलावर नीट लक्ष दिले नाही, संस्कार केले नाहीत तर मग दुसरं काय होणार!

हे एक प्रातिनिधिक उदाहरण झाले. तपशीलात फरक असेल पण साधारणपणे मूल बिघडण्याचा घटनाक्रम हा असाच असतो.
अशी भरकटलेली अनेक मुले-मुली घरोघर दिसतील. त्या साऱ्यांचे पालक खरंच त्याच्या भरकटण्याला, अधःपतनाला उत्तरदायी आहेत का हो? कुठल्या पालकांना वाटते की आपले मूल वाया जावे, गुंड, मवाली, व्यसनी व्हावे! तरीही अशी पिढी घडतेय, असा समाज निर्माण होतोय हे वास्तव आहे. निरुपयोगी, उपद्रवी, उनाड, अवैध व्यवसाय करणारी, व्यसनी, मादक पदार्थ सेवन करणारी, त्यांची खरेदी-विक्री विकणारी, अनैतिक व्यवहार करणारी, दंगेधोपे घडवणारी, तरूण मुले समाजात वाढत आहेत.

हे असले नको ते उद्योग मुले का करतात? कुठे शिकतात? घरी की समाजात? यावर गंभीर चिंतन व्हायला हवे. शीघ्रगतीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला हव्यात. शासनाच्यावर हे प्रश्न सोडून आपण हतबल होऊन बसू शकत नाही, यातून सुटू शकत नाही. नागरिक म्हणून आपलीही काही कर्तव्ये आहेत हे आपल्याला विसरून चालणार नाही.

परवा मी दुपारी तीनच्या सुमारास आमच्या सोसायटीच्या लिफ्टमधून बाहेर पडलो. पार्किंगमधे पाच-सहा अलिशान गाड्या उभ्या होत्या. त्यातल्या जरा बाजूला पार्क केलेल्या एका कारकडे माझे सहज लक्ष गेले. कारमधे दोन-तीन शाळकरी (१०-१२ वी तली) मुले कारचे दार बंद करून आत बसून तन्मयतेने मोबाईलवर काही बघत बसली होती. माझ्याकडे त्यांचे लक्ष नव्हते. आतून कारचा ए सी चालू होता.

कुतुहल म्हणून मी वाट वाकडी करून कारपाशी गेलो. मुलांचे माझ्या येण्याकडे लक्ष नव्हतेच. मी हातातल्या किल्लीने कारच्या काचेवर टकटक केले. चपापून मोबाईलधारक मुलाने हातातला मोबाईल बंद केला आणि चमकून माझ्याकडे पाहिले. मी त्याला कारचे दार उघडायला खुणावले. दार उघडून तिघेही कारबाहेर आले. माझ्या अचानक येण्याने ते जरा घाबरलेलेच दिसले. मी चौकशी केली. तर त्यातला एक मुलगा सोसायटीत राहणारा आणि इतर दोन दुसरीकडे राहणारे त्याचे वर्गमित्र होते. चौकशीत समजले की ते आज शाळत न जाता घरीच थांबले आहेत. त्याचे पालक आँफीसला गेले होते. त्यांची कार सर्व्हिसिंगला द्यायची होती. मेकँनिक घरी येऊन कार नेऊन सर्व्हिसिंग करून परत आणून देणार होता. म्हणूनच कारची किल्ली घरी मुलाजवळ दिली होती. मुलाने या संधीचा फायदा उठवून मित्रांबरोबर ए सी कारमधे बसून पिक्चर पहायचा घाट घातला होता.

मी त्यांना जरा समजावले. वाँचमनला बोलावून त्याच्या समोरच त्यांना त्वरित घरी जायला सांगितले. मुले चडफडत तिथून निघून गेली. मी वाँचमनलाही समज दिली आणि आजची घटना मुलाच्या पालकाच्या कानावर घालायला सांगितली. पुढे काय झाले मला समजले नाही. कारण काय घडले हे सांगायला ना वाँचमन माझ्याकडे आला ना मुलाचे पालक आले. विषय तिथेच थांभला. मी हे योग्य केले की अयोग्य हे आपण ठरवा पण मी जेष्ठ नागरिकाचे माझे कर्तव्य केले होते असे मला तरी वाटते!

माझ्या लहानपणी पुण्यात शाळेच्या वेळात एखादे मूल चित्रपट गृहात चित्रपट पाहण्यासाठी आलेले दिसल्यास चित्रपटगृहाचे व्यवस्थापक स्वतः जातीने त्याची चौकशी करीत. त्याचे नाव, शाळा, इयत्ता विचारीत. काही संशयास्पद आढळल्यास त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क करून त्यांना ही माहिती देत. शाळातून आलेल्या शिपायाच्या ताब्यात त्या मुलाला सुपूर्त करेपर्यंत त्याला स्वतः कार्यालयात, स्वतःच्या निगराणीखाली ठेवीत. सध्या असे कोणी दक्षतेने वागताना दिसते का आपल्याला? हाँटेलमधे मुलं आली तर त्यांना सेवा मिळे पण बिलाचे पैसे देताना काऊंटरवरचा मालक त्या मुलांची अवश्य चौकशी करीत. पैसे कुणी दिले, कुठून आणले असे प्रश्न विचारले जात. त्याला काही संशयास्पद वाटले तर तो वाट वाकडी करून ही गोष्ट मुलांच्या पालक-शिक्षकांच्या कानावर अवश्य घाली. गारुड्याचा खेळ पहाणाऱ्या मुलांना तिथला एखादा नागरिक अवश्य विचारी, ‘काय रे बाळांनो, शाळेत जायला निघालात ना? मग इथं का टाईमपास करताय. पळा, निघा, शाळेत जा’.

आमच्या गल्लीत रिकामटेकडी मुले रस्त्यावर वेळी-अवेळी भोवरे, पतंग, सिगरेटची रिकामी चपटी केलेली पाकिटं, गोट्या, लगोऱ्या इ खेळ खेळत खेळत वेळ घालवीत, उडाणटप्पूपणा करीत फिरत. दिवसभर त्यांना आवरणारं कोणी नसायचं. ‘बांदल’ नावाचा एका माणसाला मात्र ती मुले जाम टरकायची. ‘बांदल आला’ असं कुणी म्हटलं तरी पोरं खेळ सोडून धूम ठोकायची. येता-जाता उनाड, भटकणाऱ्या मुलांना, तो आवर्जून हटकायचा. त्यांची चौकशी करायचा. वेळप्रसंगी त्यांना तंबी द्यायचा. बुधवार चौक, प्रभात टाँकीज, दक्षिणमुखी मारूती, शनिवारातला मनपाचा दवाखाना, नवापूल, घारपुरे हाँस्पिटल (आताचे सूर्या)सात तोटी चौक, कसबा गणपती, जिजामाता बाग हे त्याचे कार्यक्षेत्र होते. या भागातील मुलांवर बांदलचं बारीक लक्ष असायचं. मुलांचे पालकही कधी त्या बांदलशी भांडायला आल्याचे पाहण्यात नाही. असा एखादा जागरुक बांदल आता कुठे दिसतो का तुम्हाला? परिसरात सोडा, आपल्या सोसायटीमधे तरी अशी एखादी व्यक्ती आपल्याला दिसते का? ‘बांदल’ नावाचा हा पायजमा शर्टातला अतिसामान्य माणूस हे काम सामाजिक जाणिवेतून, एक जागरूक नागरिक म्हणून स्वयंस्फूर्तीने करीत होता.

पुस्तके, वह्या, वर्तमानपत्रे यांची रद्दी विकायला एखादा विद्यार्थी रद्दीच्या दुकानात आला तर तो रद्दीवाला सुद्धा त्याची सखोल चौकशी करून, योग्य वाटले तर त्याने आणलेली रद्दी खरेदी करीत असे. त्यालाही मुलांची काळजी वाटत असे. असे गावातले सामान्य पण जागरुक नागरिक मुलांवर उच्च संस्कार करीत असत. आता कुणीच कुणाला विचारी नाही. एकेकाळी प्रामाणिकपणाचे संस्कार समाजाकडून मुलांना मिळत, पालकांना न विचारता, सांगता समाजातील जागरुक नागरिक हे सहज करीत. ही सामाजिक व्यवस्था मुलांची काळजी घेई.

थोडक्यात काय तर सध्याच्या या अधुनिक गतिमान जगात मुले घरी कमी वेळ असतात. घरच्या तुलनेत समाजात अधिक वावरत असतात, वाढत असतात, समाजाकडूनच घडत असतात, संस्कारित होत आसतात.

म्हणून मुलांवर उत्तम संस्कार करण्याचे दायित्व केवळ त्याच्या पालकांचे किंवा शाळेतील शिक्षकांचे आहे असे म्हणून समाजाने त्रयस्थपणे, तटस्थपणे गंम्मत पहात बसू नये. आपल्या जबाबदाऱ्या ओळखून आपल्या वर्तणुकीतून आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या मुलांवर सुसंस्कार करावेत. ‘मी आणि माझा परिवार’ ही संकुचित वृत्ती सोडून गावातली मुलंही आपली आहेत या भावनेने त्यांच्याशी वागावे.

इथे मला, आँर्थर मिलर’ याचे एक नाटक आठवते. नाटकाचे नाव आहे, ‘आँल माय सन्स’. त्या नाटकात लेखकाने हाच संदेश दिलाय. जगातली सर्व बालके ही माझीच मुले आहेत असे समजून जेष्ठांनी स्वार्थ दूर सारून त्यांच्या हिताचा विचार करावा. आपल्या व्यवहारातून, वागण्यातून, त्यांच्यावर सुसंस्कार करावेत.

विचार करा आणि ठरवा की मुलांवर सुसंस्कार करणे ही केवळ पालकांची व शाळांची जबाबदारी आहे की समाज म्हणून आपलीही आहे. एखाद्याचे मूल पालकांच्या दुर्लक्षामुळे बिघडले की समाज म्हणून आपणही त्याच्याकडे दुर्लक्ष केले म्हणून बिघडले? मुले घडवण्यात केवळ शिक्षक, पालक कमी पडतायत की आपण, आपला सारा समाजच कमी पडतोय?

ही वेळ समाजातील प्रत्येक घटकाने कठोर आत्मपरीक्षण करण्याची आहे. भावी पिढी चारित्र्यवान, कर्तृत्ववान, गुणसंपन्न व्हावी असे वाटत असेल तर प्रत्येकाने प्रत्येक मुलांचे पालकत्व स्वयं स्वीकारून त्याच्यावर घरी-दारी, शाळेत-समाजात, जिथे संबंध येईल तिथे उत्तम संस्कार होतील असे बघावे, स्वतः तसे वागावे.

त्यासठी प्रथम आपण स्वतः सुसंस्कृत व्हावे. प्रत्येक व्यवहारात जबाबदारीने वागावे. आपल्या वर्तनातून आणि कृतीतून पुढील पिढ्यांसमोर आदर्श नागरिकत्वाचे दर्शन घडवावे. लक्षात ठेवा, मुले सदैव जेष्ठांचेच अनुकरण करत घडत असतात, वाढत असतात. त्यांचे यशापयश हे समाज म्हणून आपलेच यशापयश आहे असे मला ठामपणे म्हणावेसे वाटते!

सारांश, सुसंस्कृत मुले घडविण्यात पालकांचा व शाळांचा वाटा महत्वाचा असला तरी समाजाचा अधिक मोठा वाटा असतो. जसा समाज तशीच त्याची पुढची पिढी निपजते.

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares