मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ती सूत्र क्र. ५० / ५१ / ५२ / ५३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ती सूत्र क्र. ५० / ५१ / ५२ / ५३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्तिसूत्रे ५०

स तरति स तरति स लोकान्स्तारयति ॥ ५० ॥

अर्थ : जो या भवसागरातून(आपण माया नदी असेही म्हणू शकतो) तरून जातो, तो आपल्या सोबत इतरांना ही तारतो.

विवेचन : सेहेचाळिसाव्या सूत्रात आरंभी ‘कस्तरति माया’ मायेतून कोण तरून जातो असा प्रश्न उपस्थित करून एकोणपन्नासाव्या सूत्रापर्यंत माया तरून जाणार्‍या भक्ताची लक्षणे सांगितली आहेत. “जो संगत्याग करतो, महानुभवांची सेवा करतो, निर्मम होतो, एकांतवासाचा आश्रय करतो, लोकबंधाचे उन्मूलन करतो, निस्त्रैगुण्य होतो, योगक्षेमाचाही त्याग करतो, तसेच कर्मफलांचा त्याग करतो, कर्माचाही त्याग करतो, निर्द्वंद्व होतो, जास्त काय वेदांचाही त्याग करतो, तो या दैवी दुरत्यया गुणमयी मायेतून तरून जातो हे निश्चयपूर्वक द्विरुक्तीने या सूत्रात सांगतात. मायातारण म्हणजेच मोक्ष, उद्धार, कैवल्य इत्यादी होय हे मागील सूत्रात सांगितलेच आहे.

आसक्तीचा त्याग, सत्पुरुषांची सेवा, ममत्त्वाचा त्याग, एकांत सेवन, लौकिक गोष्टीचा त्याग, त्रिगुणातीत होणे, योगक्षेमाचा त्याग, कर्मफळाचा त्याग, कर्म संन्यास, द्वंद्वाच्या पलिकडे जाणे, तसेच वेदांचा साक्षेपाने अभ्यास 

करून ज्याला भगवंता विषयी निरतिशय प्रेम प्राप्त होते, तो साधक स्वतः या मायनदीतून तरून जातोच, तसेच स्वतः सोबत अनेकांचे कल्याण करतो, त्यांनाही तारुन नेतो असे नारद महर्षी आपल्याला सांगतात.

भक्त स्वतः भक्ती करतात व लोकाना भगवद्‌भक्तीचे, भगवन्नामाचे महात्म्य अट्टाहासाने पटवून अनेकांना या भक्तिमार्गाकडे प्रवृत्त करतात. श्री देवर्षी नारदाचे सर्व जीवन अनंत जीवांना मायानदीतून तारून नेण्यातच गेले नाही काय? ‘यारे यारे लहान थोर । याती भलते नारी नर । करावा विचार । न लगे चिंता कवणाची ॥’ हे तुकाराममहाराजांचे उद्‌गारही लोकतरणच दर्शवितात. ते लोकांना का तारून नेतात? याचे उत्तर भक्ताच्या अंतःकरणातील करुणावृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही. *”बुडता हे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणउनि॥’* हे उद्‍गार याचीच साक्ष देतात. त्याच्या अवतारकार्याचे प्रयोजनच हे सांगितले जाते. ‘अवतार तुम्हा धराया कारण । उद्धराया जन जडजीव ॥’ चंदन हा जसा समीपवर्ती वृक्षांना आपला सुगंध प्रदान करतो त्यामुळे त्या सर्व वृक्षांचेही महत्त्व वाढते, त्याचा उद्धार होतो त्याप्रमाणेच भक्तिमान पुरुष हा अनेक लोकांचा उद्धार करतो. गंगा आपल्या सामर्थ्याने ओहोळास पावन करते, परिस आपल्या सामर्थ्याने लोहास सुवर्ण बनवितो, कस्तुरी आपल्या गुणाने मातीस मुल्यवान बनविते त्याप्रमाणे हा भक्तिमान पुरुष आपल्या सामर्थ्याने अनेकाना या मायानदीतून तारून नेतो.

संत तुकाराम महाराज म्हणतात,

“अहर्निशी सदा परमार्थ करावा पाय न ठेवावा आडमार्गी ॥ १॥ आडमार्गी कोणी जन जे जातील । त्यांतून काढील तोचि ज्ञानी ॥ २॥तोचि ज्ञानी खरा दुजीयासी । वेळोवेळां त्यासी शरण जावे ॥ ३ ॥ आपण तरेल नव्हें ते नवल । कुळॆं उद्धरील सर्वांची ती ॥ ४ ॥ शरण गेलियानें काय होतें फळ । तुका म्हणें कुळ उद्धरिले ॥ ५ ॥”

जय जय रघुवीर समर्थ 

– – – – 

नारद भक्तिसूत्र ५१

अनिर्वचनीयम् प्रेमस्वरूपम्

अर्थ: प्रेमाच्या स्वरूपाचे शब्दांत वर्णन करणे अवघड आहे.

विवेचन: भक्तीची व्याख्या करताना ती परम प्रेम रुपा आहे असे आधी सांगितले आहे. त्यानंतर ती अमृत स्वरूपा आहे असे सांगितले आहे. रूप आणि स्वरूप यात फरक आहे. रूपात वस्तूचा आकार, रंग, बाजनझ आवरण आदी बाह्य गुणधर्माचा समावेश होतो. स्वरूप वस्तूच्या अंगभूत स्थायीभावाचे लक्षण सांगते. नट वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वेगवेगळा दिसतो पण प्रत्यक्षात मात्र त्याचा विशिष्ट असलेला स्थायीभाव जे त्याचे स्वरूप असते ते मात्र वेगळे असते.

प्रेम हा शब्द प्री या धातूपासून तयार होतो. संतोष पावणे, तृप्त होणे. प्रेम हा मनाचा असा अनुभव अथवा अवस्था आहे की ज्यामुळे मनुष्य समाधानी होत असतो.

प्रेम फक्त अनुभवता येते. जशी हवा दाखवता येत नाही, आकाशाची उंची मोजता येत नाही तसे प्रेम मोजून दाखवता येत नाही. प्रेम असते तरी नसते. असे कोणी म्हणू शकत नाही की मी अमक्या वर पाच रुपयांचे प्रेम करतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी एकदा मनुष्य नवनवीन क्लुप्त्या शोधून काढेल. चित्रपटामध्ये दाखवतात त्याप्रमाणे चंद्र सूर्य आणून देतो अशा थापा मारू शकेल. अर्थात हे सारे वर्णन असेल किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी केलेली कृति असू शकेल…! याला फारतर प्रेमाचा आविष्कार म्हणता येईल…

पण प्रेम म्हणता येईल का? तर नाही…

प्रेम हे अदृष्ट, अदृष्य असल्याने ते पाहता येत नाही. ज्याला अशा प्रेमाचा लाभ होतो, अनुभूति मिळते, तो एका विलक्षण आनंदात असतो. त्या आनंदाचा तो आस्वाद घेऊ शकतो, पण सर्वार्थाने त्याचे वर्णन करू शकत नाही..

संत तुकाराम महाराज प्रेमाबद्दल म्हणतात,

“प्रेम नये सांगता बोलता दाविता। अनुभव चित्ता चित्त जाणे ।।”

(अभंग क्रमांक २७२९, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

महाराज म्हणतात, प्रेम ही काही प्रदर्शन करायची भावना नाही. प्रेम ही मनापासून ते मनापर्यंत पोहचणे आवश्यक असते. हल्लीच्या काळात खरे प्रेम मिळणे तसे खुप अवघड आहे. कारण प्रेम हा काय प्रकार आहे. ही भावना काय आहे. हे किती जनांना माहीत आहे. हाच खुप मोठा प्रश्न आहे असे मला वाटते. कारण सद्यपरिस्थितीत आकर्षणाला व वासनेलाच प्रेम म्हटले जाते.

आपण इथे भगवंतावर अकारण केल्या जाणाऱ्या प्रेमाबद्दल चर्चा करीत आहोत. पण समाजाची, समाजातील सद्यस्थिती लक्षात यावी म्हणून त्याचा वरती उल्लेख आला आहे.

प्रेम म्हणजे देव

प्रेम म्हणजे भक्ती,

प्रेम म्हणजे साधना

प्रेम म्हणजे शक्ति।।

प्रेम, त्यातून मिळणारा आनंद याचे अचूक वर्णन करणे अशक्य आहे, पण सर्व संतांना सामान्य मनुष्याबद्दल कळवळा असल्याने ते या प्रेमाचे वर्णन करतात, अर्थात ते सुद्धा चपखल वर्णन करू शकत नाहीत असे नारद महाराज आपल्याला सांगत आहेत.

जय जय रघुवीर समर्थ 

– – – – 

नारद भक्तिसूत्र ५२

मूकास्वादनवत्

अर्थ : प्रेमाचा अनुभव हा मुक्या माणसाने घेतलेल्या रसास्वादाप्रमाणे असतों. (… त्यामुळे त्याला तो शब्दाने सांगता येत नाही.)

विवेचन : मुका मनुष्य बोलू शकत नाही. त्याला झालेल्या, होत असलेल्या वेदना तो सांगू शकत नाही. इथे नारद मुनी आपल्याला मूक्याचे उदाहरण देऊन साधक अनुभूतीच्या विशिष्ट टप्प्यावर मौन होऊन जातो. बाह्यांगावरून तो मूक झाला, अबोल झाला असे आपण म्हणू शकतो. परंतु त्या पातळीवर पोचलेल्या साधकाला जगात घडणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे भगवतांची लिला आहे, याची अनुभूती आलेली असते. त्याच्या आयुष्यात तसेच त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत त्याला भगवंताचे अस्तित्व जाणवत असते. सर्व जाणल्यावर बोलायचे काही शिल्लक रहात नाही.

एक छान वाक्य आहे.

“वेदना जास्त बोलते आणि सुख कमी बोलते. “

भक्तिमार्गात या विशिष्ट टप्प्यावर आल्यावर साधक मौन न झाला तर नवल…! साखर दुधात पूर्णपणे मिसळून गेली की त्यातून स्वतः साखरेला तिचे वेगळेपण दाखवता येत नाही आणि आपण ते वेगळे करून पाहू शकत नाही.

समर्थ दासबोधात याचे वर्णन करतात…

“मुक्यानें गूळ खादला । गोडी न ये सांगायाला । याचा अभिप्रायो मजला । निरूपण कीजे ॥”

 (दास. ०६. १०. ०२)

जय जय रघुवीर समर्थ 

– – – – 

नारद भक्तिसूत्र ५३

“प्रकाशते क्वापि पात्रे”

अर्थ: त्या परम प्रेमाचा प्रकाश क्वचितच, कधीतरी एखाद्या अधिकारी व्यक्तीत पाहायला मिळतो.

विवेचन : भगवंतावरील प्रेम हेच खरे प्रेम आहे, असे सर्व संत सांगतात. पण हे प्रेम वेगळे काढून दाखवता येत नाही, त्याची फक्त अनुभूती घेता येते. ज्याप्रमाणे नदी सागराला जाऊन मिळण्यासाठी धडपड करीत असते. ती सागराला जाऊन मिळाली की नदीचे अस्तित्व संपुष्टात येते. नदी पुन्हा बाहेर सांगू शकत नाही की मी नदी आहे. तसे खरा ज्ञानी मनुष्य कधीही सांगत फिरत नाही की मी ज्ञानी आहे. तर, त्याच्या चित्तात प्रकट झालेला ज्ञानाचा प्रकाश आपसूक सर्वदूर पसरतो. साखर सांडली की मुंग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही, त्या आपसूक येत असतात.

संतांचे अनेक वैशिष्ट्यांपैकी एक प्रमुख वैशिष्ट्य पुढील प्रमाणे सांगता येईल. ज्याच्याकडे अकारण शांतता लाभते, ज्याच्याकडे जाऊन भौतिक गोष्टी मिळत नाही, तरी त्याच्याकडे पुन्हा जावेसे वाटते, अगदी सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास ज्याच्याकडे गेल्यावर परत येऊ नये असे वाटते, (अर्थात माहेरी गेल्यासारखे वाटते) त्याला संत अर्थात ज्ञानी म्हणता येईल.

एक व्यवहारातील उदाहरण पाहू. अनेक उमेदवार स्पर्धा परीक्षा देत असतात, पण त्यातील फार कमी लोक त्या परीक्षेत उत्तीर्ण होतात.

खरंतर जीव हा मुळात ज्ञानी आहे, पण त्याच्यावर असलेला मायेचा पडदा ज्याला काढता येतो, तो ज्ञानी होतो. वाचायला /लिहायला एकदम सोपे आहे, पण ही माया जाणणे फार अवघड.

“लक्षावधीत एखादा मोक्षार्थ झटतो कधी|

झटणाऱ्यात एखादा तत्त्वतां जाणतो मज||”

(गीताई ०७. ०३)

एखादा मनुष्य जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करतो, अर्थात प्रेम व्यक्त करतो तेव्हा त्या व्यक्तीला जे आवडते ते करतो. त्या व्यक्तीच्या आवडत्या गोष्टी त्याला देण्याचा प्रयत्न करतो. त्या व्यक्तीने बनवलेल्या, आणलेल्या, भेट म्हणून दिलेल्या वस्तूंचा आदर करतो, त्यांना अत्यंतिक प्रेमाने सांभाळतो. याच अनुषंगाने जेव्हा साधक भगवंतावर प्रेम करू लागतो, त्याचवेळी त्याने भगवंताने निर्माण केलेल्या चराचर सृष्टीवर प्रेम करणे अपेक्षित आहे, नव्हे अनिवार्य आहे. असे प्रेम करणारा मनुष्य विरळाच असतो. पण त्याच्या या निःस्वार्थ प्रेमाचा प्रकाश पडल्या शिवाय रहात नाही.

साधकाने साधना करीत रहावी, दयासिंधु आसलेल्या सद्गुरूंना त्याची दया आल्याशिवाय राहणार नाही. अर्थात त्याचा प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. पुढील सूत्रात आपण परमप्रेम कसे असते, ते शब्दाने सांगण्याचा प्रयत्न नारद महर्षींनी केला आहे त्याचा अभ्यास आपण करू.

जय जय रघुवीर समर्थ!! 

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ५० / ५१ / ५२ / ५३.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “मैं और मेरी ख्वाहिश!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “‘मैं और मेरी ख्वाहिश!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

(महिला दिन विशेष)

“हाय, अबला!  तेरी यही कहानी… आंचल में है दूध और आँखों में पानी!” प्रियाने शाळा-कॉलेजात असताना ह्या ओळी कधीतरी वाचल्या असतील. पण प्रत्यक्ष आपल्या आयुष्यात आपण कधी ‘अबला’, ‘बिचारी’ म्हणवल्या जाऊ, असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

देहरादून सारख्या शहरात परंतू सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली प्रिया अभ्यासात अव्वल होती. वडिलांचे छत्र हरपले होते. बारावी शास्त्र शाखेत शिकत असतानाच तिच्या लग्नाच्या गोष्टी घरात सुरु झाल्या. पालकांनीच हे निर्णय घ्यायचे असतात अशा वातावरणात वाढलेली प्रिया कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असतानाच विवाहबद्ध झाली.

१४, राजपूत रायफल्स या भारतीय सैन्याच्या रेजिमेंटमध्ये शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या सैनिकाशी प्रियाची लग्नगाठ बांधली गेली. अमित शर्मा काहीच दिवसांनी नाईक पदावर पदोन्नत झाले. भारतीय सैन्यात हे पद Other Rank अर्थात कनिष्ठ पातळीवरील म्हणून ओळखले जाते. एखादा तरुण सैन्यात ‘जवान’ म्हणून दाखल होतो त्यावेळी त्याचे वय सुमारे सतरा-साडेसतरा वर्षे असते आणि शिक्षण फारतर दहावी-बारावी. अमित कमी शिकलेले असले तरी त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजलेले होते. त्यांनी प्रियाला पुढे शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. यामुळेच प्रिया गणित विषय घेऊन पदवीधर (बी. एस्सी.) आणि पुढे याच विषयात पदव्युत्तर पदवी (एम. एस्सी.) मिळवू शकली. संसारामध्ये ख्वाहिश अर्थात ‘आशा’ नावाचे सुंदर फूल उमलले होते. प्रियाने पुढे शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रम (बी. एड.) पूर्ण केला आणि शिक्षक पात्रता परीक्षाही तिने उत्तम गुणांनी उत्तीर्ण केली! संसाराला हातभार म्हणून प्रिया देहरादूनमधील एका खाजगी शिकवणी वर्गात शिक्षिका म्हणून नोकरी करीत होत्या.

सैनिक जेंव्हा प्रत्यक्षात विवाह करतो तेंव्हा तो त्याचा एका अर्थी पुनर्विवाहच असतो. कारण सैन्यातील नोकरी ही त्याची ‘पहली पसंद’ मानली जाते. आणि सैनिक पत्नींना या नोकरीत त्यांच्या कुंकवाला असलेल्या धोक्याची जाणीव असतेच असते!

९ जून, २०१२चा दिवस प्रिया यांच्यासाठी एक अशुभ बातमी घेऊन आला. दोनच दिवसांपूर्वी अमित सुट्टीवरून परत त्यांच्या पलटणमध्ये परतले होते. त्यावेळी १४, राजपूत अरुणाचल प्रदेशातल्या उत्तर-पूर्व प्रदेशात तिथल्या देशविघातक शक्तींच्या विरोधात युद्धात होती. १७ जून रोजी कर्तव्यावर पोहोचलेले नाईक अमित शर्मा त्यांच्या कामाच्या ठिकाणी वाहनाने निघालेले असताना त्यांचे वाहन दरीत कोसळून त्यांना वीरगती प्राप्त झाली!

 पदरात लहान मुलगी असलेल्या प्रिया यांच्यासमोर आयुष्य आ वासून उभे होते. सैन्याकडून वीरपत्नींना, कुटुंबाला आर्थिक नुकसान भरपाई उत्तम दिली जाते. पण पुढे काय करायचे हा प्रश्नच असतो. शिवाय शैक्षणिकदृष्ट्या कमी शिकू शकलेल्या जवानांच्या पत्नी सुद्धा साधारणपणे अल्पशिक्षितच असतात. त्यामुळे त्यांना पुढे फार मोठी झेप घेता येत नाही… मात्र प्रिया यांच्याकडे उत्तम शैक्षणिक योग्यता होती. आणि हीच बाब हुतात्मा अमित शर्मा यांचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अरुण पी. आगरवाल साहेब यांनी हेरली! कारण अमित शर्मा त्यांच्या हाताखाली काम करीत असताना त्यांनी कित्येकवेळा प्रिया यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत साहेबांना सांगितले होते… आणि एक अल्पशिक्षित जवान आपल्या पत्नीला एवढे उच्च शिक्षित करतो आहे, याचे त्यांना कौतुकही होते!

 कर्नल साहेबांनी प्रिया यांच्या कुटुंबियांपुढे एक प्रस्ताव मांडला… प्रिया सैन्याधिकारी बनू शकतात! अर्थातच एवढ्या मोठ्या दु;खाच्या ओझ्याखाली दबून गेलेल्या त्या कुटुंबास हे पचनी पडणे अवघड होतेच. प्रिया यांच्या बंधूने तर हा प्रस्ताव एकदम धुडकावून लावला… अबला, बिचारी म्हणवून घेण्याची अजिबात इच्छा नसलेल्या प्रिया यांच्या हृदयात मात्र एक ख्वाहिश जन्म घेत होती… आपल्या नव-याचा गणवेश परिधान करण्याची इच्छा… केवळ सैनिकाचा नव्हे तर सैनिक अधिका-याचा गणवेश. त्यांनी हे शिवधनुष्य पेलण्याची तयारी दाखवली… आणि पती-निधनाला काही दिवस उलटले असतानाच त्या दिशेने प्रयत्न सुरु केले. मार्गदर्शन करण्यासाठी भारतीय सैन्यातील सहृदय अधिकारी होतेच… त्यात कर्नल आगरवाल साहेब आघाडीवर होते. शालेय जीवनात खेळांत प्रवीण असलेल्या प्रिया यांना शारीरिक चाचणी आणि अभ्यासात हुशार असल्याने बौद्धिक चाचणी अजिबात कठीण नव्हती.

परंतू, लष्करात भरती होण्यासाठी अत्यंत काटेकोर शारीरिक तपासण्या केल्या जातात. खूप वर्षांपूर्वी प्रिया यांना किडनी स्टोन झाला होता आणि त्यासाठी सर्जरी करून घेतली गेली होती. यामुळे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांनी नियमांनुसार प्रिया यांना बाद केले! प्रिया अर्थातच प्रचंड निराश झाल्या. त्यांचा भाऊ प्रवेश तर त्या अधिका-यासमोर धाय मोकलून रडला… पण नियमापुढे काहीही होणार नव्हते!

 परंतु कर्नल आगरवाल साहेबांनी विशेष प्रयत्न करण्याचे ठरवून प्रिया यांना धीर दिला. त्यांनी तिला कमांडंट साहेबांची भेट घेण्याची सूचना केली. विशेष बाब म्हणून प्रिया यांना कार्यालयीन नोकरी देऊ केली गेली! यावर प्रिया यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या त्या निर्णायक ठरल्या. त्या म्हणाल्या, “नोकरी मिळावी म्हणून मी एवढा आटापिटा करत नाहीये… मी उच्च शिक्षित आहे. माझे पती हुतात्मा झाले आहेत, त्या आधारावरही मला शिक्षिकेची नोकरी किंवा दुसरी एखादी शासकीय सहज मिळू शकेल. पण मला माझ्या दिवंगत पतीच्या स्मृती चिरंतन जपून ठेवायच्या आहेत… त्यांच्या सारखीच वर्दीमध्ये देशसेवा करायची आहे… आणि त्यासाठी सर्वकाही करण्याची माझी शारीरीक आणि मानसिक तयारीही आहे… मला संधी मिळावी! ” 

 आणि एका जवानाच्या पत्नीची सैन्यात अधिकारी होण्याची वाटचाल सुरु झाली… एक इतिहास घडू पहात होता. कारण सैन्यात अधिकारी असलेल्या व हुतात्मा झालेल्या अधिका-यांच्या पत्नींपैकी काही शूर महिलांनी ही वाट यशस्वीपणे चोखाळली होती तोपर्यंत… पण जवानाची पत्नी अधिकारी होऊ पाहते आहे हे प्रथमत:च घडू पहात होते!

 अंगभूत हुशारी, कष्ट करण्याची जिद्द, वैय्यक्तिक दु:ख बाजूला ठेवून कर्तव्यपथावर दमदार पावले टाकण्याची जबरदस्त इच्छाशक्ती, त्यासाठी लहान मुलीपासून कित्येक महिने दूर राहण्याचा ताण सहन करण्याची तयारी… या सा-या बाबी प्रिया सेमवाल-शर्मा यांना लेफ्टनंट पदापर्यंत घेऊन जाण्यात साहाय्यक ठरल्या. प्रशिक्षणादरम्यान प्रिया यांनी अनेक पारितोषिके पटकावली… एक कार्यक्षम सैन्याधिकारी आकार घेत होता! प्रशिक्षणाच्या एका टप्प्यावर त्यांनी कंपनी सार्जन्ट मेजर (Coy Sergeant Major) हे प्रतिष्ठेची जबाबदारीही मिळवली होती!

 Officers’ Training Academy, Chennai या लष्करी अधिकारी प्रशिक्षण केंद्रामध्ये Commandant Lieutenant General एस. एस. जोग साहेबांच्या मार्गदर्शनात त्यावर्षी ६२ महिला आणि १९४ पुरुष सैन्याधिकारी भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून दाखल झाले… यांत प्रिया सेमवालसुद्धा होत्या!

 लेफ्टनंट प्रिया सेमवाल यांना आरंभी Corps of the Electrical and Mechanical Engineering (EME) मध्ये रुजू करून घेण्यात आले. या विभागातील कामासाठी गरजेची असलेली B. Tech. ही पदवीही आपली इतर कामी करीत असताना प्रिया यांनी प्राप्त केली! पुढे त्या मेजर बनल्या.

२०२२ मध्ये भारतीय नौसेनेने President’s Fleet Review अंतर्गत भारतीय नौसेनेचे सामर्थ्य दर्शवणारे एक विशेष अभियान योजले होते. म्हादेई, तरिणी, हरियाल, कदलपुरा, आणि नीलकंठ या नौकांसमवेत आय. एन. एस. बुलबुल नावाची नौका गोवा, कारवार, मुंबई ते कोच्ची १६६७ किलोमीटर्स हे समुद्री अंतर विशिष्ट वेगाने आणि आखलेल्या योजनेनुसार पार करणार होत्या… या मोहिमेत मेजर प्रिया सेमवाल यांनीही सहभाग घेतला होता… आणि आपल्या नेतृत्वगुणांची चमक दाखवली होती!

 पुढे संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांति-सेनेत लेबानन-इस्रायल सीमेवर मेजर प्रिया सेमवाल यांनी अतिशय प्रभावी कामगिरी करून दाखवली. पूर्वी महिलांना भारतीय सैन्यात ‘पर्मनंट कमिशन’ अर्थात कायम नेमणूक मिळत नसे. महिलांना Short Service Commission दिले जाई, त्याचा कार्यकाळ दहा ते चौदा वर्षे असू शकतो. मात्र ‘पर्मनंट कमिशन’ मध्ये अधिकारी अधिक दीर्घकाळ आणि सेवानिवृत्तीपर्यंत कार्यरत राहू शकतात. मेजर प्रिया सेमवाल यांनी हे कमिशन प्राप्त केले आहे!

 महिलांना समान न्याय देण्याच्या बाबतीत भारतीय सैन्य, भारतीय न्यायव्यवस्था यांचा नेहमीच पुढाकार असतो. महिलाही सर्वच क्षेत्रांत प्रभावी काम करू शकतात, हे मेजर प्रिया सेमवाल-शर्मा यांनी पुन्हा सिद्ध केले आहे. कर्नल अरुण पी. आगरवाल साहेबांनी एका सामान्य सैनिकाच्या वीरपत्नीला दिलेले प्रोत्साहन सुद्धा प्रशंसनीय आहे. येणा-या महिला दिनानिमित्त मेजर प्रिया सेमवाल आणि कर्नल अरुण पी. आगरवाल यांना कडक अभिवादन. जय हिंद!

(पहिले छायाचित्र कर्नल अरुण पी. आगरवाल साहेबांचे आहे. दुसऱ्या छायाचित्रात हुतात्मा नाईक अमित शर्मा, प्रिया सेमवाल-शर्मा आणि त्यांची कन्या ख्वाहिश, हे आहेत.) 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कालगणना आणि दिनदर्शिका… ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ कालगणना आणि दिनदर्शिका… ☆ श्री जगदीश काबरे ☆

भारतातील कालगणनेचा इतिहास हा केवळ दिवस, महिने आणि वर्षे मोजण्याचा तांत्रिक प्रश्न नसून तो मानवी संस्कृती, धर्म, शेती, राज्यव्यवस्था आणि वैज्ञानिक समज यांच्याशी घट्ट जोडलेला आहे. मानवाने ज्या क्षणी ऋतूंचे पुनरावर्तन, चंद्राची कला आणि सूर्याच्या गतीचा अभ्यास सुरू केला, त्या क्षणी कालगणनेची गरज निर्माण झाली. भारतीय उपखंडात ही प्रक्रिया अतिशय प्राचीन काळात सुरू झालेली दिसते. वैदिक काळातच दिवस, रात्र, मास, ऋतू आणि वर्ष यांचा उल्लेख आढळतो. ऋग्वेद, यजुर्वेद आणि ब्राह्मणग्रंथांमध्ये चंद्राच्या कलांवर आधारित मासांची आणि सूर्याच्या गतीवर आधारित ऋतूंची सूक्ष्म निरीक्षणे नोंदलेली आहेत. त्यामुळे भारतातील कालगणनेचा पाया हा खगोलशास्त्रीय निरीक्षणांवर आधारित होता, केवळ धार्मिक कर्मकांडापुरता मर्यादित नव्हता.

प्राचीन भारतात पंचांग ही संकल्पना विकसित झाली. पंचांग म्हणजे पाच अंगांवर आधारित कालगणना—तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण. यातील तिथी ही चंद्राच्या स्थितीवर आधारित असल्याने भारतीय पंचांग मुख्यतः चांद्र कालगणनेवर आधारित होते. अमावास्या ते पौर्णिमा आणि पुन्हा अमावास्या असा चंद्राचा एक फेरा म्हणजे एक मास अशी संकल्पना रूढ झाली. परंतु केवळ चांद्र मास स्वीकारल्यास ऋतूंचा मेळ बसत नाही, हे भारतीय खगोलशास्त्रज्ञांच्या लक्षात आले. चंद्रवर्ष हे सुमारे ३५४ दिवसांचे असते, तर सौरवर्ष सुमारे ३६५ दिवसांचे. त्यामुळे दरवर्षी सुमारे अकरा दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी अधिक मासाची संकल्पना विकसित करण्यात आली. यामुळे भारतीय चांद्र-सौर पद्धतीचा जन्म झाला. धार्मिक सण, व्रते आणि विधी चांद्र मासांवर आधारित राहिले, तर ऋतूंची संगती राखण्यासाठी सौर गतीचा विचार करण्यात आला.

ही पंचांग व्यवस्था भारतीय समाजाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली. शेती, लग्ने, उत्सव, यात्रा, राजकीय निर्णय आणि युद्धसुद्धा शुभ तिथी-नक्षत्र पाहूनच ठरवले जात. त्यामुळे पंचांग हे फक्त दिनदर्शिका नसून समाजनियंत्रणाचे आणि सांस्कृतिक सलगतेचे साधन होते. प्रत्येक प्रांतात स्थानिक खगोलशास्त्रज्ञांनी आणि पंडितांनी आपापल्या पंचांगांची निर्मिती केली. त्यामुळे कालगणनेत एकसंघता न राहता विविधता निर्माण झाली. एकाच दिवशी वेगवेगळ्या पंचांगांमध्ये तिथीभेद आढळू लागला. ही विविधता धार्मिक दृष्ट्या स्वीकारली गेली, पण प्रशासकीय आणि वैज्ञानिक दृष्ट्या ती अडचणीची ठरू लागली.

जगाच्या इतर भागांतही कालगणनेचा विकास वेगवेगळ्या मार्गांनी झाला. प्राचीन इजिप्तमध्ये नाईल नदीच्या पुरावर आधारित सौर कालगणना विकसित झाली. बाबिलोनियन संस्कृतीत चांद्र-सौर पद्धत होती. ग्रीक आणि रोमन साम्राज्यांत सुरुवातीला चांद्र पद्धतीचा वापर झाला, पण पुढे सौर कालगणनेचे महत्त्व वाढले. रोमन सम्राट ज्युलियस सीझरने इ. स. पू. ४६ मध्ये ज्युलियन कॅलेंडर लागू केले, जे पूर्णतः सौरवर्षावर आधारित होते. मात्र या कॅलेंडरमध्ये वर्षाची लांबी थोडी जास्त धरली गेल्याने शतकानुशतके जाताना ऋतू आणि दिनांक यांत फरक पडू लागला.

हा फरक दुरुस्त करण्यासाठी १५८२ साली पोप ग्रेगरी तेराव्याने ग्रेगोरियन कॅलेंडर लागू केले. यात लीप इयरची सुधारित पद्धत स्वीकारली गेली. या कॅलेंडरमुळे सौरवर्ष आणि दिनदर्शिका यांचा मेळ अधिक अचूक बसला. सुरुवातीला हे कॅलेंडर केवळ ख्रिस्ती राष्ट्रांतच स्वीकारले गेले, पण व्यापार, वसाहतवाद आणि वैज्ञानिक संवाद यांमुळे हळूहळू ते जागतिक स्तरावर प्रचलित झाले. आधुनिक विज्ञान, उद्योग आणि जागतिक व्यवहारांसाठी एकसमान कालगणना आवश्यक असल्याने ग्रेगोरियन कॅलेंडर आंतरराष्ट्रीय मानक बनले.

भारतावर ब्रिटिश राजवटीत ग्रेगोरियन कॅलेंडरचा वापर प्रशासकीय पातळीवर सुरू झाला. न्यायालये, महसूल व्यवस्था, शिक्षण आणि लष्करी कारभार यासाठी इंग्रजी दिनदर्शिका वापरली जाऊ लागली. तरीही सामान्य जनतेच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात पंचांगाचे स्थान कायम राहिले. स्वातंत्र्यानंतर भारतासमोर प्रश्न उभा राहिला की, राष्ट्रीय ओळख जपणारी पण वैज्ञानिकदृष्ट्या सुसंगत अशी कालगणना कोणती असावी. पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित आधुनिक भारत उभारायचा होता. त्याच वेळी भारतीय परंपरेची नाळ तोडायची नव्हती. याच पार्श्वभूमीवर ‘भारतीय राष्ट्रीय कालगणना’ किंवा ‘शक संवतावर आधारित राष्ट्रीय दिनदर्शिका’ तयार करण्याची कल्पना पुढे आली.

या उद्देशासाठी मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली. मेघनाथ साहा हे केवळ खगोलशास्त्रज्ञ नव्हते, तर विज्ञान आणि समाज यांचा मेळ घालणारे विचारवंतही होते. समितीने विविध भारतीय कालगणनांचा अभ्यास केला. अखेरीस शक संवतावर आधारित सौर कालगणना स्वीकारण्यात आली. या दिनदर्शिकेत चैत्र हा पहिला महिना मानण्यात आला आणि वर्षाची सुरुवात वसंत ऋतूशी जोडली गेली. हे महिने मराठी आणि इतर भारतीय सौर महिन्यांशी साधर्म्य राखणारे होते—चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. ही कालगणना पूर्णतः सौर असल्याने ऋतू आणि महिने यांचा मेळ अचूक बसत होता. १९५७ साली भारतीय राष्ट्रीय कालगणना अधिकृतपणे लागू करण्यात आली. सरकारी गॅझेट, आकाशवाणी आणि काही अधिकृत दस्तऐवजांमध्ये तिचा वापर सुरू झाला. मात्र ती सर्वसामान्य जीवनात फारशी प्रचलित झाली नाही. यामागे अनेक कारणे होती.

पहिले कारण म्हणजे जनमानसाची सवय. शतकानुशतके चालत आलेली पंचांग परंपरा आणि ब्रिटिश काळात रुजलेली ग्रेगोरियन दिनदर्शिका या दोन्हींच्या मध्ये राष्ट्रीय कालगणनेला स्वतंत्र सामाजिक अवकाश मिळाला नाही. सामान्यजनांसाठी धार्मिक सणांसाठी पंचांग आवश्यक होते आणि आधुनिक व्यवहारांसाठी ग्रेगोरियन कॅलेंडर अपरिहार्य होते.

दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे प्रशासकीय अर्धवटपणा. भारतीय राष्ट्रीय कालगणना सक्तीने लागू करण्यात आली नाही. सरकारी कार्यालयांतही तिचा वापर दुय्यम स्वरूपात राहिला. बहुतांश कागदपत्रांत ग्रेगोरियन दिनांकासोबत कंसात शक दिनांक दिला जाई. त्यामुळे लोकांना स्वतंत्रपणे ही कालगणना वापरण्याची गरजच वाटली नाही. शिक्षण व्यवस्थेतही तिचे सखोल शिक्षण देण्यात आले नाही. परिणामी नवीन पिढीला या दिनदर्शिकेशी भावनिक किंवा व्यावहारिक जडणघडण झाली नाही.

तिसरे कारण म्हणजे सांस्कृतिक आणि धार्मिक व्यवहार. भारतीय समाजात सण, व्रते आणि उत्सव अजूनही चांद्र तिथींवर आधारित आहेत. दिवाळी, होळी, गणेशोत्सव, एकादशी, शिवरात्र यांसारखे सण चंद्राच्या स्थितीवर अवलंबून आहेत. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका सौर असल्याने ती या सणांची तिथी थेट सांगू शकत नाही. त्यामुळे सामान्य माणसासाठी पंचांग अपरिहार्यच राहिले. राष्ट्रीय कालगणना धार्मिक जीवनाशी जोडली गेली नाही.

चौथे कारण म्हणजे जागतिकीकरण. स्वतंत्र भारताने आंतरराष्ट्रीय व्यापार, कूटनीती, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश केला. या सर्व क्षेत्रांत ग्रेगोरियन कॅलेंडर हेच आंतरराष्ट्रीय माध्यम होते. विमानसेवा, बँकिंग, शेअर बाजार, संगणक प्रणाली आणि इंटरनेट या सर्वांनी ग्रेगोरियन दिनदर्शिकाच स्वीकारली. अशा परिस्थितीत एक स्वतंत्र राष्ट्रीय कालगणना वापरणे व्यवहार्य वाटले नाही.

या सगळ्या प्रक्रियेमुळे आज आपण एका द्विधा स्थितीत सापडलो आहोत. धार्मिक-सांस्कृतिक जीवनासाठी चांद्र किंवा चांद्र-सौर पंचांग वापरले जाते, तर प्रशासकीय, वैज्ञानिक आणि जागतिक व्यवहारांसाठी ग्रेगोरियन सौर दिनदर्शिका वापरली जाते. भारतीय राष्ट्रीय कालगणना ही या दोहोंच्या मध्ये अडकून पडलेली आहे. ती वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आणि भारतीय परंपरेशी सुसंगत असली, तरी तिचा वापर मर्यादित राहिला आहे. यातून एक महत्त्वाचा निष्कर्ष समोर येतो की, कालगणना ही केवळ तांत्रिक व्यवस्था नसून सामाजिक स्वीकारावर अवलंबून असते. कोणतीही दिनदर्शिका लोकांच्या दैनंदिन गरजांशी, श्रद्धांशी आणि व्यवहारांशी जोडली गेली नाही, तर ती कागदावरच मर्यादित राहते. भारतीय राष्ट्रीय कालगणनेच्या बाबतीत हेच घडले. ती वैज्ञानिकदृष्ट्या योग्य असली, तरी सामाजिकदृष्ट्या अपरिहार्य बनू शकली नाही.

आज आपण जी कालगणना स्वीकारली आहे ती मुख्यतः सौर मासावर आधारित आहे, कारण आधुनिक जीवनाला ऋतूंची अचूकता, वेळेची एकसंधता आणि जागतिक सुसंगती आवश्यक आहे. चांद्र कालगणना भावनिक आणि धार्मिक पातळीवर महत्त्वाची राहिली आहे, पण ती आधुनिक प्रशासनासाठी पुरेशी नाही. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका हा एक समन्वयाचा प्रयत्न होता—भारतीय महिने आणि सौर शास्त्र यांचा मेळ घालणारा. मात्र तो प्रयत्न अपूर्ण राहिला असे म्हणावे लागेल. चंद्राच्या कलांपासून सूर्याच्या अचूक गतीपर्यंतचा मानवाचा हा प्रवास म्हणजे अंधश्रद्धेपासून निरीक्षण, गणित आणि विज्ञानाकडे झालेली वाटचाल आहे. प्रत्येक धर्माची कालगणना त्याच्या काळातील गरजांची पूर्तता करत होती. मात्र आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहता, सौर कालगणना हीच सर्वाधिक अचूक, स्थिर आणि सार्वत्रिक ठरते, तर चांद्र कालगणना ही सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा अविभाज्य भाग म्हणून आजही आपले स्थान टिकवून आहे. भविष्यात या कालगणनेचे पुनर्मूल्यांकन होऊ शकते. डिजिटल युगात अनेक कालगणना एकत्र वापरणे शक्य आहे. परंतु त्यासाठी केवळ सरकारी आदेश नव्हे, तर सामाजिक संवाद, शिक्षण आणि सांस्कृतिक पुनर्संवाद आवश्यक आहे. कालगणनेचा इतिहास आपल्याला हेच शिकवतो की वेळ मोजण्याची पद्धत ही मानवी गरजांनुसार बदलत जाते. चंद्रापासून सूर्यापर्यंत आणि स्थानिकतेपासून जागतिकतेपर्यंतचा हा प्रवास म्हणजे मानवी संस्कृतीच्या विकासाचा आरसाच आहे.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९ आणि १० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९ आणि १० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक ९ वा – – – 

नको रे मना द्रव्य ते पुढीलांचे |

अति स्वार्थबुद्धी न रे पाप साचे|

घडे भोगणे पाप ते कर्म खोटे |

न होता मनासारिखे दुःख मोठे |९|

अर्थ : 

समर्थ मनाला उपदेश करताना म्हणतात की पुढीलांचे म्हणजे दुसऱ्याचे द्रव्य किंवा पैसा त्याज्य समजावा. पैशाची हाव सुटली की माणूस फक्त स्वार्थाचा विचार करतो आणि त्यातून पापाचाच संचय होतो. आणि ज्यामुळे पापकर्माची फळे भोगावे लागतात असे कर्म खोटे म्हणजे त्याज्य आहे. स्वार्थाची इच्छा धरणारा माणूस त्याच्या मनासारखे झाले नाही की दुःखी होतो.

मागील श्लोकात समर्थांनी आपला देह चंदनाप्रमाणे झिजवून सज्जनांना संतुष्ट करावे असे सांगितले आहे. या श्लोकात समर्थ आपल्याला दुसऱ्याच्या पैशाचा किंवा संपत्तीचा लोभ ठेवू नये असे सांगत आहेत. पुढीलांचे या शब्दाचे अनेक अर्थ होतात. पुढीलांचे म्हणजे पूर्वजांचे असाही अर्थ घेता येतो आणि दुसऱ्यांचे हाही अर्थ या ठिकाणी लागू होतो. त्याचप्रमाणे दुसरा अर्थ म्हणजे पुढच्या पिढीसाठीचे. आपल्या पूर्वजांनी कमावलेले धन आयतेच आपल्याला मिळावे असे प्रत्येकाला वाटते. परंतु अशा प्रकारची अभिलाषा धरली तर आपल्या कर्तृत्वाला फारसा वाव मिळत नाही. माणूस आळशी बनतो आणि अनेक दुर्गुण त्याच्या अंगात प्रवेश करतात. पूर्वजांच्या संपत्तीसाठी (वारसा हक्कासाठी)होणारी भांडणे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भानगडी, कोर्टकचेऱ्या आपणा सर्वांना परिचित आहेत.

स्वार्थ कोणाला चुकला आहे? लहान मुलाला सुद्धा आपला स्वार्थ कळतो. त्यामुळे आपली गरज भागेल एवढे जरूर मिळवावे. परंतु गोंधळ होतो तो अती स्वार्थ बुद्धीमुळे. आपल्या चरितार्थासाठी आवश्यक तेवढा पैसा जरूर मिळवावा. पण पुढील पिढ्यांसाठी त्याचा संचय करू नये असेही समर्थ आपल्याला सुचवत आहेत. गोंदवलेकर महाराज म्हणत, “घरात तीन दिवसांचे अन्न असले म्हणजे चौथ्या दिवसाची चिंता करू नये. ” परंतु प्रत्यक्षामध्ये आपण असे पाहतो की साधारणतः तीन पिढ्यांना पुरून उरेल एवढी संपत्ती असतानाही लोकांना अधिकाधिक संपत्तीची हाव असते.

पुढीलांचे म्हणजे दुसऱ्याचे द्रव्य किंवा पैसा नको. ते कोणत्याही प्रकारे घेणे म्हणजे एक प्रकारची चोरीच आहे. मग पैसा मिळवायचाच नाही का? प्रापंचिक माणसाला तर पैसा आवश्यकच असतो. अगदी साधू संन्यासी यांना देखील अन्न, वस्त्र, निवारा यांची आवश्यकता असतेच. मग पैसा कसा मिळवावा? याचे उत्तर संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ‘ जोडोनिया धन उत्तम व्यवहारे हे आहे. अशा पद्धतीने पैसा मिळवला तर तो धर्माला मान्य आहे. सरळमार्गी राहून पैसा मिळवता येत नाही अशा प्रकारची साधारण समजूत आहे. परंतु कष्टाने आणि सरळ मार्गाने पैसा मिळवून श्रीमंत झालेल्यांची अनेक उदाहरणे समाजात आहेत. परंतु त्याकडे आपले फारसे लक्ष जात नाही. पण अशी उदाहरणे आदर्श म्हणून समाजासमोर ठेवली गेली पाहिजेत.

असे म्हणतात की माणसाच्या गरजा पूर्ण करता येतात परंतु हाव पूर्ण करता येत नाही. म्हणून गरजेपुरते असले की माणसाने समाधानी असावे. परंतु तसे होत नाही. म्हणून आपल्यापेक्षा खालच्या स्तरावर असलेल्या व्यक्तीकडे पहावे असे म्हटले जाते. कारमध्ये फिरणाऱ्या माणसाने मोटरसायकलवर फिरणाऱ्या माणसाकडे पाहून आपण त्यापेक्षा भाग्यवान आहोत असे समजून समाधान मानावे. मोटरसायकलवाल्याने सायकल चालवणाऱ्याकडे, सायकलवर असणाऱ्याने पायी चालणाऱ्याकडे लक्ष द्यावे म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत हे लक्षात येईल. परंतु असे होत नाही. आपण नेहमी उलटच करत असतो. श्रीमंत अतिश्रीमंताकडे पाहत असतो आणि स्वतःला दुःखी करून घेत असतो.

अतिस्वार्थ बुद्धीमुळे आपल्याला अधिक हवे असे वाटत असते आणि मग ते कोणत्याही मार्गाने मिळवण्यात काही गैर वाटत नाही. परंतु असे करत असताना आपण पापकर्मांचाच संचय करत जातो. गैरमार्गाने पैसा कमावणारे लोक समाजात सुखाने जगताना दिसतात. ते पाहून आपणही तसे करावे असे वाटणे साहजिक असते. परंतु कर्माच्या सिद्धांतानुसार अशा लोकांना देखील आपल्या पापाचा हिशेब द्यावाच लागतो. ज्यांच्यावर अनेक घोटाळ्यांचे आरोप आहेत असे भ्रष्ट नेते एखाद्यावेळी न्यायालयातून निर्दोष सुटतीलाही परंतु नियती हे असे न्यायालय आहे की जिथे आपल्या कर्मांचा योग्य तो हिशेब होतोच. तिथे कोणाचीही सुटका नाही. अधिकाधिक पैसा कमावण्याचा हव्यास लागतो तेव्हा अनेक प्रकारच्या चिंता, दडपण, स्पर्धा यासारख्या गोष्टींना सामोरे जावे लागते. त्यातूनच मग दडपण, निद्रानाश, अपचन, रक्तदाब, हृदयविकार यासारख्या अनेक विकारांना निमंत्रण मिळते. त्यामानाने सरळ मार्गाने वागणारा माणूस खाऊन पिऊन सुखी आणि समाधानी असतो. पैशाची, संपत्तीची आणि सत्तेची हाव सुटलेल्या माणसाला जेव्हा त्याच्या मनासारखे होत नाही तेव्हा मोठ्या दुःखाला सामोरे जावे लागते. धनवृद्धीसोबत जर चिंतावृद्धी होत असेल तर काय उपयोग? समर्थांचा इशारा स्पष्ट आहे —

– – द्रव्य मिळव, पण द्रव्याचा दास होऊ नकोस.

– – संपत्ती कमव, पण स्वार्थाचा संचय करू नकोस.

स्वसंवाद : 

  • माझ्या मनात दुसऱ्याच्या संपत्तीबद्दल आकर्षण किंवा हेवा आहे का?
  • मी गरज आणि हाव यातील फरक ओळखतो का?
  • पैसा कमावताना माझा मार्ग प्रामाणिक आणि नीतिमान आहे का?
  • अधिकाधिक मिळवण्याच्या धडपडीत माझे समाधान हरवत तर नाही ना?
  • धनवृद्धीबरोबर माझी चिंताही वाढते आहे का?

– – – 

श्लोक १० वा – – – 

सदा सर्वदा प्रीती रामी धरावी|

दुःखाची स्वये सांडी जीवी करावी|

देहेदुःख ते सुख मानीत जावे| 

विवेके सदा सस्वरूपी भरावे |१०|

अर्थ:

या श्लोकात समर्थ आपल्याला भगवंतावर प्रेम करायला सांगतात. प्रारब्धामुळे जे दुःख आपल्याला प्राप्त झाले आहे त्याचे वाईट वाटून न घेता त्या जाणिवेचा त्याग करायला शिकावे. देहाच्या दुःखाला सुख मानण्याचा अभ्यास करावा. योग्य आणि अयोग्याचा विवेक करून आपले मन सस्वरुपी स्थिर करावे.

प्रेम करणे हा मनुष्यस्वभाव आहे. प्रत्येकाचे कोणावर तरी किंवा कोणत्यातरी वस्तूवर प्रेम असते. कंजूष माणसाचे धनावर प्रेम, विषयलंपट माणसाचे विषयावर प्रेम, कोणाला सत्ता प्रिय असते. असे प्रेमाचे विविध विषय असतात. प्रेमातून आनंद मिळतो परंतु हा आनंद चिरकाल टिकणारा नसतो. प्रेमाचा विषय चुकला तर दुःख पदरी पडणारच! मदिरेच्या प्रेमात धुंद होऊन (चित्रपटात दाखवल्याप्रमाणे)देवदास बनण्यापेक्षा भगवंताचे प्रेम लागून त्याचे म्हणजे देवाचे दास होणे कधीही चांगले. या प्रेमातून जो आनंद मिळेल तो चिरंतन असेल. म्हणूनच समर्थ म्हणतात ‘सदा सर्वदा प्रीती रामी धरावी. ‘

आपण मनुष्य जन्मात आलो आहोत तेव्हा सुखदुःख हे असणारच. परमेश्वराने जेव्हा मानवी अवतार धारण केला तेव्हा त्याला किंवा संतांना देखील सुखदुःखे चुकली नाहीत. मग आपल्यासारख्या सामान्य माणसाची काय कथा! आपण सुखाने आनंदतो आणि दुःखाने दुःखी होतो. परंतु या ठिकाणी दुःखाचा त्याग करायला शिका असे समर्थ आपल्याला सांगतात. थोडक्यात असे म्हणता येईल की दुःखाची जाणीवेला आपल्या मनात स्थान देण्यापेक्षा परमेश्वराच्या चिंतनाकडे जर लक्ष दिले तर दुःख हलके होईल.

हा दुःखाचा त्याग करणे म्हणजे मनाला एक प्रकारचे वळण लावणे आहे. ही गोष्ट सहजासहजी होणारी नाही. त्यासाठी समर्थ सांगतात की देहाला जे दुःख होते त्यालाच सुख मानून पुढे चालावे. याचा अर्थ प्रारब्धाने जे दुःख आपल्याला प्राप्त झाले आहे त्याचे वाईट वाटून न घेता त्याचा स्वीकार करावा आणि आपले कर्म करावे. बऱ्याच लोकांना आपल्या आजाराचा आणि दुःखाचा बाऊ करण्याची सवय असते. दुसऱ्यासमोर आपल्या दुःखाचे वारंवार प्रदर्शन करून ते सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतात परंतु त्यामुळे फारसे काही साध्य होत नाही. सतत अशी तक्रार करणारी माणसे इतरांना नकोशी होतात. प्रारब्धाने जे दुःख आपल्या वाट्याला आले आहे ते स्वीकारण्याची आणि त्यालाच सुख मानण्याची वृत्ती जेव्हा आपली होईल तेव्हा सुखाचा वेगळा शोध घेण्याची आवश्यकता राहणार नाही. असेल त्या परिस्थितीतही आपण आनंदी, सुखी आणि समाधानी राहू.

आपल्या अवतीभवती जर नजर टाकली तर आपल्याला ज्यांना अनेक प्रकारचे शारीरिक त्रास किंवा व्याधी आहेत असे लोक आपल्या दृष्टीस पडतात. परंतु त्यातील बरेच लोक त्यांचा स्वीकार करून आपले जीवन ध्येय जे आहे त्या मार्गावर वाटचाल करताना दिसतात. प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांना मज्जासंस्थेचा गंभीर आजार झाला तरी देखील त्यांनी आपले संशोधन कार्य सुरूच ठेवले. प्रसिद्ध नृत्यांगना असलेल्या सुधा चंद्रन यांना आपला एक पाय अपघातात गमवावा लागला. परंतु त्यांनी जिद्दीने त्यावर मात केली. अशी कितीतरी उदाहरणे आहेत. थोडक्यात सांगायचे तर: या व्यक्तींनी आपल्या शारीरिक मर्यादांना आपली कमकुवत बाजू न बनवता, त्यांना आपली ताकद बनवले. “शरीराला अपंगत्व असू शकते, पण मनाला नाही, ” हेच त्यांनी जगाला दाखवून दिले.

म्हणून समर्थ म्हणतात की माणसाने विवेकाची कास धरून स्वस्वरूपाचे चिंतन करावे. मी म्हणजे देह नाही. त्यामुळे देहाला होणाऱ्या दुःखाशी माझा खऱ्या अर्थाने संबंध नसून मी म्हणजे एक आनंदस्वरूप आत्मा आहे अशी भावना मनाशी दृढ करावी. त्यासाठी भोवतालच्या परिस्थितीकडे साक्षी भावाने पाहता यायला हवे. साधकाने आत्मस्वरूपाच्या चिंतनातच (म्हणजेच भगवंताच्या नामस्मरणात)इतके रंगून जावे की त्याला त्यामुळे दुःखाची जाणीव सुद्धा होणार नाही.

स्वसंवाद : 

  • माझे प्रेम नेमके कशावर आहे — नश्वर गोष्टींवर की चिरंतन तत्त्वावर?
  • एखादे दुःख आले की मी त्याचा बाऊ करतो, की शांतपणे स्वीकारून पुढे चालतो?
  • माझ्या देहाच्या त्रासाशी मी पूर्णपणे एकरूप होतो का, की मी त्याचा साक्षी राहू शकतो?
  • विवेकबुद्धी वापरून मी परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांमध्ये फरक करू शकतो का?
  • माझे मन नामस्मरणात किंवा आत्मचिंतनात किती वेळ रमते? (क्रमशः)

 – क्रमशः श्लोक ९ आणि १०.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “एक अस्वस्थ करणारे वास्तव…” –  लेखक : डॉ. राजेंद्र गर्गे  ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

☆ “एक अस्वस्थ करणारे वास्तव…” –  लेखक : डॉ. राजेंद्र गर्गे  ☆ सुश्री प्रभा हर्षे ☆

 एक अस्वस्थ करणारे वास्तव

 – – – डॉक्टरांचे अकाली मृत्यू आणि आधुनिक वैद्यकीय क्षेत्रापुढील यक्षप्रश्न…  

“डॉक्टर, तुम्ही तर आमचे प्राण वाचवले! ” असे म्हणत रुग्ण जेव्हा डॉक्टरांचे आभार मानतो, तेव्हा त्या डॉक्टरांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचे हास्य असते. पण, दुर्दैवाने आज चित्र बदलत आहे. दुसऱ्याचे आयुष्य वाढवणारा, समाजाला आरोग्याचा मंत्र देणारा ‘आरोग्य रक्षक’च आज अकाली मृत्यूच्या जाळ्यात ओढला जात आहे. सध्या वैद्यकीय वर्तुळात एक अतिशय वेदनादायक घटना वारंवार घडताना दिसते—एखादा तरुण, तडफदार डॉक्टर, जो कालपर्यंत परिषदांमध्ये उत्साहाने सहभागी होत होता, हसत-खेळत होता, तो अचानक एका रात्रीत हे जग सोडून जातो. ‘सडन कार्डियाक अरेस्ट’ (Sudden Cardiac arrest) किंवा हृदयविकाराचा तीव्र झटका हे आज वैद्यकीय क्षेत्रातील मृत्यूंचे सर्वात मोठे कारण बनले आहे. ज्या वेगाने आपण आपले सहकारी आणि मित्र गमावत आहोत, ते पाहता आता यावर केवळ चर्चा करून चालणार नाही, तर गंभीर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. धक्कादायक आकडेवारी व वास्तव: काय सांगते?

 समाजातील सामान्य व्यक्तीपेक्षा डॉक्टरांचे आयुष्य अधिक असावे, असा आपला एक समज असतो. कारण त्यांना रोगांचे ज्ञान असते. पण, संशोधनातून समोर आलेले सत्य अत्यंत धक्कादायक आहे.

 १) केरळमधील संशोधन: केरळमध्ये डॉक्टरांच्या मृत्यूदराचा तब्बल १० वर्षे अभ्यास करण्यात आला. त्यातून असे सिद्ध झाले की, सामान्य जनतेच्या तुलनेत डॉक्टरांचे आयुष्य सरासरी १३ वर्षांनी कमी आहे.

२) आयएमए (IMA) पुणे अहवाल: इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पुणे शाखेने सुमारे १५, ००० डॉक्टरांच्या आरोग्याचा अभ्यास केला. त्यांचा निष्कर्षही असाच भयावह होता—डॉक्टरांचे आयुष्य सर्वसामान्यांपेक्षा १० ते १५ वर्षांनी कमी होत चालले आहे. प्रश्न हा उरतो की, असे का घडतेय? रोगाचे निदान करणाऱ्या डॉक्टरांना स्वतःच्या मृत्यूची चाहूल का लागत नाही?

डॉक्टरांचे आयुष्य कमी होण्यामागे केवळ एकच कारण नाही, तर तो अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम (Cumulative Effect) आहे.

डॉक्टरांच्या अकाली मृत्यूची ५ प्रमुख कारणे

१. निसर्गाच्या विरोधात काम – (Biological Clock Disruption) निसर्गाने मानवी शरीराचे एक घड्याळ (Circadian Rhythm) निश्चित केले आहे. दिवसा काम आणि रात्री विश्रांती हे त्याचे सूत्र आहे. मात्र, वैद्यकीय पेशात या सूत्राचा बळी जातो.

 * डॉक्टरांना आठवड्याला ५०, ६० किंवा अनेकदा ७० तासांपेक्षा जास्त काम करावे लागते.

 * प्रशिक्षण काळात आणि त्यानंतरही सलग २४-२४ तास ड्युटी करावी लागते.

 * रात्रपाळी (Night Shifts) आणि अपुरी झोप यामुळे शरीरातील चयापचय क्रिया (Metabolism) बिघडते. यामुळे शरीरात ‘इन्सुलिन रेझिस्टन्स’ तयार होतो, जे पुढे जाऊन मधुमेह आणि हृदयविकाराचे मूळ कारण बनते.

२. तणावाचा स्फोट (High Stress Levels)आज डॉक्टर केवळ रुग्ण तपासत नाहीत, तर ते एका प्रचंड मानसिक दबावाखाली असतात.

 * निर्णय घेण्याचा ताण: आपत्कालीन स्थितीत एका सेकंदात घेतलेला निर्णय रुग्णाचा जीव वाचवू शकतो किंवा गमावू शकतो. हा तणाव सतत मनावर असतो.

 * कायदेशीर आणि सामाजिक दबाव: “रुग्णाला काही झाले तर डॉक्टर जबाबदार, ” ही समाजाची मानसिकता आणि त्यातून उद्भवणारे कायदेशीर खटले (Consumer Protection Act) यामुळे डॉक्टर सतत दहशतीखाली असतात.

 * या तणावामुळे शरीरात अडरिणालीन(adrenalin) व कार्टीसोल (cortisol)ही हार्मोन्स शरीरात सतत वाढलेली राहतात. त्याचा हृदयावर प्रचंड ताण येतो व तो घातक असतो. आपत्कालीन परिस्थितीत असे होते पण जेव्हा तसे वारंवार होते, तेव्हा रक्तदाब वाढतो, हृदयाचे ठोके खूप वाढून अनियमित आणि अनियंत्रित होतात(ventricular fibrilation) व अचानक हृदयाचे स्पंदन थांबते, आणि कार्डियाक अरेस्ट (cardiac arrest)होतो, त्यामुळे मेंदूचा रक्त प्रवाह थांबतो व मृत्यू ओढवतो.

 वास्तव असे आहे की, डॉक्टर स्वतः सर्वात वाईट रुग्ण असतात.

 * छातीत दुखले तरी “अॅरसिडिटी असेल” म्हणून दुर्लक्ष करणे.

 * स्वतःची नियमित तपासणी (Check-up) टाळणे.

 * “मला काही होणार नाही, ” हा फाजील आत्मविश्वास बाळगणे.

 ३) बिघडलेली जीवनशैली आणि आहार – कामाच्या व्यापात डॉक्टरांच्या जेवणाच्या वेळा निश्चित नसतात.

 * दुपारचे जेवण संध्याकाळी आणि रात्रीचे जेवण मध्यरात्री घेणे.

 * ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आल्यावर पटकन भूक भागवण्यासाठी वडापाव, समोसा किंवा जंक फूड खाणे.

 * व्यायामाचा पूर्ण अभाव.

 या दुर्लक्षामुळे जेव्हा आजार समजतो, तेव्हा अनेकदा खूप उशीर झालेला असतो. या सवयींमुळे ‘मेटाबॉलिक सिंड्रोम’ (Metabolic Syndrome) जडतो—ज्यात उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि लठ्ठपणा हे चारही शत्रू एकत्र येतात.

४) व्यसनाधीनता हे दुर्दैवी असले तरी सत्य आहे की, काही प्रमाणात वैद्यकीय क्षेत्रातही धूम्रपान आणि मद्यपानाचे प्रमाण वाढले आहे. तणाव कमी करण्यासाठी (Stress Buster) म्हणून सुरू झालेले व्यसन शेवटी हृदयाचा घात करते.

५) आता वेळ आली आहे बदलाची! जर आपल्याला समाजाचे आरोग्य टिकवायचे असेल, तर आधी डॉक्टरांना जगावे लागेल. यासाठी काही कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे:

 * नियमित ‘फिटनेस ऑडिट’: वयाच्या पस्तीशीनंतर किंवा चाळीशीनंतर प्रत्येक डॉक्टरने स्वतःची सखोल आरोग्य तपासणी (Cardiac Profile, TMT, Lipid Profile) वर्षातून एकदा करणे बंधनकारक करावे.

 * ‘नो’ म्हणायला शिका: कामाचा अतिरेक होत असेल तर त्याला नकार देण्याची हिंमत ठेवा. कामाचे तास मर्यादित करा आणि विश्रांतीला प्राधान्य द्या.

 * कुटुंबाला वेळ द्या: रुग्णालयाच्या बाहेरही एक जग आहे. आपले कुटुंब, मित्र आणि छंद यांच्यासाठी वेळ काढा. हा ‘क्वॉलिटी टाइम’ तुमचा मानसिक तणाव निम्म्याने कमी करतो.

 * व्यायाम हाच धर्म: दिवसातील किमान ४५ मिनिटे स्वतःच्या शरीरासाठी द्या. चालणे, योगासने किंवा ध्यानधारणा (Meditation) याला पर्याय नाही.

निष्कर्ष आयुष्य किती अनिश्चित आहे, हे आपण दररोज आपल्या रुग्णांच्या रूपाने पाहतो. तरीही आपण स्वतःला अमर समजण्याची चूक करतो.

आपण १०० वर्षांचे नियोजन करतो, घरांचे हप्ते भरतो, मुलांच्या भविष्याची चिंता करतो; पण पुढच्या क्षणी श्वास सुरू राहील की नाही, याची कुणालाच खबर नसते.

म्हणूनच, सर्व डॉक्टर मित्रांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना माझे कळकळीचे आवाहन आहे— दुसऱ्यांची हृदये सांभाळताना, स्वतःच्या हृदयाचे ठोके ऐकायला विसरू नका. डॉक्टर निरोगी राहिला, तरच समाज निरोगी राहील!

एका प्रसिद्ध शायरने म्हटले आहे:

 “आगाह अपनी मौत से कोई बशर नहीं,

 सामान सौ बरस का है, पल की खबर नहीं… “

 

लेखक : डॉ. राजेंद्र गर्गे 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १४ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १४ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

टागोरांच्या कुटुंबात अनेक सुप्रसिद्ध चित्रकार होते. मात्र रविंद्रनाथांनी वयाच्या पन्नाशीनंतर चित्रं काढायला सुरवात केली. तरीही त्यांनी जवळ जवळ १५ वर्षांच्या कालावधीत अंदाजे २३०० कलाकृती निर्माण केल्या होत्या. त्यांचे कथासंग्रहदेखिल समर्पक चित्रांनी सजवलेले असत.

कलेच्या अभ्यासकांच्या मते टागोरांची चित्रं Art Nouveau या कलाप्रकारामुळे जगापर्यंत पोहोचली. Art Nouveau ही एक कला चळवळ होती. त्यात लोककलेचं मोठ्या प्रमाणात चित्रण असायचं.

१९३० मध्ये टागोरांची ३०० चित्रं असलेली प्रदर्शने युरोपात लंडन, पॅरिस व बर्लिन मधे भरवण्यात आली होती.

त्यांनी आपली अनेक चित्रं निरनिराळ्या कलासंग्रहालयांना भेट दिली होती. बर्लिनच्या नॅशनल गॅलरीला १०० एक पेंटिंग्ज त्यांनी भेट दिली होती. त्यातील अनेक पेंटिंग्स नंतर लंडनमधील संग्रहालयात गेली. जी पाच चित्रं बर्लिनच्या संग्रहालयात शिल्लक होती, त्यात पक्ष्यांची आणि माणसांची चित्रं होती, पैकी एक लाल रोबमध्ये असलेल्या मुलीचंही चित्र होतं. ही चित्रं त्यांनी शाई आणि पाण्याच्या रंगाने काढली होती. असं म्हणतात की नाझींनी ही चित्रं तिथून काढून टाकली. कांही लिलावात खाजगी संग्राहकांना दिली असावीत. कांही चित्रं टागोरांना परत पाठवली असावीत. शेवटी त्यांचं फक्त एकच चित्र बर्लिन येथील संग्रहालयात शिल्लक राहिलंय, हे मात्र खरं!

—– 

☆ गीत ४० ☆

THE rain has held back for days and days, my God, in my arid heart. The horizon is fiercely naked ⎯ not the thinnest cover of a soft cloud, not the vaguest hint of a distant cool shower.

Send thy angry storm, dark with death, if it is thy wish, and with lashes of lightning startle the sky from end to end.

But call back, my lord, call back this pervading silent heat, still and keen and cruel, burning the heart with dire despair.

Let the cloud of grace bend low from above like the tearful look of the mother on the day 

of the father’s wrath.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत ४० ☆

☆

कोरड्या हृदयात माझ्या, थेंब एक ना पाण्याचा 

कितीक दिस झाले, मागमूस ना मेघाचा

*

दयाघना, थांबव ही उपेक्षा, या व्याकुळ मनाची

करूणेस मी पात्र नसेन तर, बरसात कर क्रोधाची

*

देवा, पाठव वादळ, जे दाविल तांडव मृत्यूचे

थरथरता हे नभमंडल, बसतील फटके विजेचे

*

क्रोधाग्नीने पेटून उठती, कधी कधी बाबा जसे

डबडबलेले डोळे दिसती, आईचे मग मला तसे

*
लवू देत ढग खाली, कृपा प्रसाद बरसणारे

असू देत ते क्रूर, भयानक काळजाला कापणारे

*

परत बोलाव, ती भयाण शांतता, मला घेरणारी

अन् उपेक्षेची धग, निराशेच्या गर्तेत लोटणारी

☆
भावानुवाद © मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—– 

☆ गीत ४१ ☆

WHERE dost thou stand behind them all, my lover, hiding thyself in the shadows? They push thee and pass thee by on the dusty road, taking thee for naught. I wait here weary hours spreading my offerings for thee, while passers by come and take my flowers, one by one, and my basket is nearly empty.

The morning time is past, and the noon. In the shade of evening my eyes are drowsy with sleep. Men going home glance at me and smile and fill me with shame. I sit like a beggar maid, drawing my skirt over my face, and when they ask me, what it is I want, I drop my eyes and answer them not.

Oh, how, indeed, could I tell them that for thee I wait, and that thou hast promised to come. How could I utter for shame that I keep for my dowry this poverty. Ah, I hug this pride in the secret of my heart.

I sit on the grass and gaze upon the sky and dream of the sudden splendour of thy coming ⎯ all the lights ablaze, golden pennons flying over thy car, and they at the roadside standing agape, when they see thee come down from thy seat to raise me from the dust, and set at thy side this ragged beggar girl a-tremble with shame and pride, like a creeper in a summer breeze.

But time glides on and still no sound of the wheels of thy chariot. Many a procession passes by with noise and shouts and glamour of glory. Is it only thou who wouldst stand in the shadow silent and behind them all? And only I who would wait and weep and wear out my heart in vain longing?

—– 

☆ मराठी भावानुवाद : गीत ४१. ☆

☆

सावळ्या, उभी मी इथे युगानुयुगे

तू मात्र सावली होऊन, भक्तांच्या मागे

*

अनभिज्ञ ते, ढकलून जाताहेत तुला

माझ्या परडीतली फुले घेऊन, तुला वहायला

*

परडी झाली रिकामी, आता तरी ये माझ्यापाशी

तुझ्यासाठी पसरली ही दारिद्र्याची राशी

*

दिवस सरला, हसताहेत सारी मला

परतताना विचारतात ‘काय हवं तुला’

*

नजर खाली झुकवून ‘कांही नाही’ म्हणते

तुझी वचनं, माझं प्रेम, सारं काही लपवते

*

रात्री नभाकडे पहात, पहुडले होते गवतावर

आकाश उजळलं, तू होतास सुवर्णरथावर

*

अचानक उतरलास, मला उचललेस

तुझ्याजवळ बसवून, अनंताकडे नेलेस

*

सारी माणसं स्तब्ध होऊन पहात राहिली

जीर्ण वस्त्रातील ही भिकारीण, लज्जेने थरथरली

ग्रीष्मातल्या वाऱ्याच्या झुळुकेने जशी वेल सुखावली

*

पण दिवास्वप्नच ते… अचानक मी पुन्हा सत्यात

काळ पुढे सरकला, मी मात्र तिथेच त्या रस्त्यात

*

दिंड्या चालल्या, तुझा जयजयकार करत

तू अजून भक्तांच्या सावलीत, मी मात्र रडत

हृदयाच्या पायघड्या अंथरून, तुझी वाट बघत

☆

भावानुवाद © मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—— 

☆ गीत ४२ ☆

EARLY in the day it was whispered that we should sail in a boat, only thou and I, and never a soul in the world would know of this our pilgrimage to no country and to no end.

In that shoreless ocean, at thy silently listening smile my songs would swell in melodies, free as waves, free from all bondage of words.

Is the time not come yet? Are there works still to do? Lo, the evening has come down upon the shore and in the fading light the seabirds come flying to their nests.

Who knows when the chains will be off, and the boat, like the last glimmer of sunset, vanish into the night?

——

☆ मराठी भावानुवाद : गीत ४२ ☆

☆
सकाळी हलकेच म्हणालास

अथांग सागर, दूरचा प्रवास

फक्त तू अन् मी

अनंताच्या वाटेवर

अन् सारे जग अनभिज्ञ…

*

शांत, संथ लाटातून

वाहणारे माझे गाणे

सुरेल धून होईल,

सागर लाटांसारखी

अन् शब्दबंधनातून मुक्त…

*

बघ, संध्याकाळ झाली

पक्षी घरट्याकडे निघाले

संथावलेली संध्या सुद्धा

निशेच्या कुशीत शिरली

अन् मी तुझ्या प्रतीक्षेत…

*

पण अजून ती वेळ

नाही कां रे आली?

कर्मबंधनातून मुक्ती

नाही कां रे मिळाली?

अन् हेच असावं विधिलिखित…

*

साखळ्या कधी सुटणार?

बोट कधी मुक्त होणार?

का अशीच लुप्त होईल

रात्रीच्या गर्द अंधारात?

अन् माझी आशा, सावळ्यात…

☆

–  क्रमशः भाग १४.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “‘बीज’ पेरून गेलेले तुकोबाराय!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “‘बीज’ पेरून गेलेले तुकोबाराय!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज

जगदगुरू श्री संत तुकाराम महाराजांनी या जगास ‘आमुचा राम राम घ्यावा’ म्हणत दिलेल्या निरोपाच्या दिवसाचे स्मरण म्हणजे ‘श्री तुकाराम महाराज बीज’! 

तुकोबारायांच्या संदर्भात ‘बीज’ म्हणजे द्वितीया तिथी. यावर्षी हा दिवस ५ मार्च, २०२६ आहे. महाराष्ट्र वाड्मय हे अभंग आहे. कारण ते केवळ शाब्दिक रचनेपुरते जुळवलेले शब्द नसून प्रत्यक्ष जीवनाच्या अनुभवातून उमटलेले उदगार आहेत. कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव श्री माऊली ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी, जगदगुरू श्री संत तुकोबारायांचा गाथा, समर्थ श्री रामदास स्वामी महाराजांचा दासबोध, भक्त शिरोमणी श्री नामदेव रायांचा गाथा, किंवा संत श्री एकनाथ महाराजांचे भागवत… किंवा अगदी अलीकडचे श्री गजानन विजय यांसारखे ग्रंथ शोधू पाहता असे कळते की… प्रत्येक वाचनाच्या वेळी वाचकांस काही तरी नवीन गवसत जाते… म्हणूनच पारायणाचे महत्त्व आहे! वर्तमानपत्रासारखे एकदा वाचले आणि झाले असे नाही… हे तर आपले भविष्यपत्रच आहे. जीवनातील प्रत्येक क्षणासाठी या वाड्मयात काही न काही आहे… अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत! 

श्री तुकोबारायांनी रचलेल्या हजारो रचनांपैकी आता केवळ ४४०० उपलब्ध आहेत, असे दिसते. यातही काही क्षेपक (म्हणजे इतरांनी आपल्या रचना श्री तुकोबारायांच्या म्हणून प्रचारात आणलेल्या) आहेत, असे अभ्यासक सांगतात. जवळपास प्रत्येक अभंगात आपणांस एखादा तरी नवा शब्द, नवा विचार आढळून येईल! 

सहज गंमत म्हणून सांगतो, एका व्यक्तीला एका व्यक्तीने श्री ज्ञानेश्वरी वाचावयास दिली. ती व्यक्ती त्या दिवसाचे वाचन संपले की पुढील वेळेस कुठून सुरुवात करावी हे लक्षात येण्यासाठी ग्रंथात बुक मार्क (दोरा) ठेवत. परंतु त्यांचा नातू ते घरात नसताना तो बुक मार्क अनावधानाने आधीच्या पानांत ठेवी. हे गृहस्थ तिथून वाचनास सुरुवात करीत. असे सलग काही दिवस झाले! ते एकेदिवशी म्हणाले… ओव्या छान आहेत… पण ज्ञानेश्वर महाराजांनी तेच तेच पुन्हा पुन्हा लिहिले आहे! असो.

हे वाड्मय चिंतन करण्यासाठी असल्याने सतत नजरेखालून घालणे श्रेयस्कर असते. कुणी कितीही विद्वान असले तरी त्यांना वक्तृत्वात या संतांनी लिहून ठेवलेल्या ओव्यांचा, अभंगांचा, पदांचा, समासांचा संदर्भ, दाखला द्यावाच लागतो. ‘तुका म्हणे’ हे शब्द तर जणू एखाद्या विचाराला दिलेला भक्कम पुरावाच जणू. माउलींच्या ओव्या, समर्थांचे समास ज्याला अर्थासह तोंडपाठ असतील, त्याच्या मुखातून प्रत्यक्ष सरस्वतीच प्रवाहित होत राहते! महाराष्ट्रात होऊन गेलेले सर्व वक्ते याच अमोघ भांडवलाच्या आधारे श्रीमंत होऊ शकले. आचार्य प्र. के. अत्रे यांचा श्री तुकोबारायांच्या अभंगांचा गाढा व्यासंग होता. प्राचार्य राम शेवाळकर यांच्या वाणीत माऊली विराजमान असत. भारतरत्न लतादीदी, भारतरत्न भीमसेनजी जोशी, वाड्मय- ‘पुरुषोत्तम’ पु. ल. देशपांडे यांनी संतांचे शब्द मनापासून जनापर्यंत पोहोचवले… ते केवळ या शब्दांत सामर्थ्य होते म्हणूनच.

ज्ञानोबारायांनी आईसारखे कोमल शब्द लिहावेत आणि तुकोबारायांनी वरपांगी कडक बापासारखे शब्दांचे प्रहार करावेत… पण या मायबापांची माया एकाच जातीची! तुकोबाराय हाती वाग्बाण अर्थात शब्दांचे बाण घेऊनच फिरत तर कधी काठी पण ते केवळ ज्ञानदीप लावू जगी या विचाराने! स्वत: घेत असलेला आनंद इतरांनीही घ्यावा यासाठी तुकोबाराय… तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू… नका चरफडू घ्या रे तुम्ही! असे ज्यावेळी म्हणतात त्यावेळी हा आनंद इतरांनी घ्यावा असे त्यांना किती प्रकर्षाने वाटते, हे दिसून येते.

ज्ञानदेव पाया आणि तुकोबाराय कळस असं संत बहिणाबाईंनी प्रतिकात्मक म्हणून ठेवलेलं असलं तरी पाया दुय्यम आणि कळस सर्वोत्तम असा त्याचा अर्थ नाही. एखाद्या नदीचा उगम आणि तिचा प्रत्यक्ष विस्तार हे एकमेकांपासून वेगवेगळे करता येत नाहीत, किंवा त्यांची क्रमवारी लावता येत नाही.

श्रीमद भगवद्गीता नावाची सोन्याची जाडजूड वीट, तिच्यापासून घडवलेले देखणे अलंकार म्हणजे ज्ञानेश्वरी… गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी! तसं श्री संत तुकोबारायांचा गाथा म्हणजे श्रीमद भगवद्गीता आणि श्री ज्ञानेश्वरी यांतील अर्थांचा परिपाक. आणि तुकोबाराय याचे सारे श्रेय माऊलींना देतात! तुका म्हणे नेणो युक्तीचिया खोली… म्हणोनि ठेविली पायी डोई! तुकोबाराय स्वत:ला ‘पामर’ म्हणवून घेतात ते माऊलींच्या तुलनेमध्ये… इतरांच्या नव्हे. इतरांसाठी ते तुकोबाराय… तुकाराम महाराजच होते आणि आहेत. तुकोबा आणि भगवान विष्णू हे एकच आहेत, असे रामेश्वर भट यांनी म्हणले आहे… आणि हे रामेश्वर भटांसारख्या अधिकारी पुरुषाने म्हणले आहे, हे ध्यानात घेण्यासारखे आहे! 

इंद्रायणी देहूतून पुढे येते आणि माऊलींचे चरण स्पर्शून पुढे जाते. तुकोबाराय देहूतून पुढे वहात आले… ज्ञानोबारायांच्या चरणाशी नतमस्तक झाले आणि पुढे स्वत: प्रवाह बनून पुढे जात राहिले. जसं आपण पत्रावळीचा गठ्ठा उचलताना एक हात खालच्या पत्रावळीला आणि दुसरा हात वरच्या पत्रावळीला लावतो, तसंच ज्ञानेश्वरी आणि गाथा या अक्षर वाड्मयाबाबत म्हणता येईल. याचा अर्थ या गठ्ठ्यातील कोणतीही पत्रावळ दुय्यम आहे, असे मात्र अजिबात नाही. या गठ्ठ्यात असलेली प्रत्येक पत्रावळ ही ज्ञानाच्या, भक्तीच्या पदार्थांना योग्य ती जागा देत अभ्यासक, भाविकांस तृप्त करण्याचे सामर्थ्य अंगी बाळगते.

संत देहाने जगातून गेले आहेत… पण जाताना विचारांचा वारसा देऊन गेले आहेत! जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांना त्यांच्या ३७७व्या बीजोस्त्वानिमित्त वंदन. त्यांनी पेरलेल्या बीजातून भक्तीचा, सदसदविवेकबुद्धीचा मळा फुलला आहे… आणि हीच महाराष्ट्राची खरी दौलत आहे! राम कृष्ण हरी!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “स्त्री म्हणजे…” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “स्त्री म्हणजे…” ☆ संध्या बेडेकर ☆

स्त्री म्हणजे शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीचे Perfect combination आहे.

“26 th August” महिला समानता दिवस. ” अमेरिकेत ‘1893 ‘ साली सुरू झालेला हा दिवस तेथील महिलांना voting rights मिळावे, याकरिता सुरू झाला होता 1920 साली 26 th August. ला हा अधिकार त्यांना मिळाला. ••••

हा दिवस खूप महत्वाचा दिवस आहे. या आधी स्त्री ला, पुरुषांच्या बरोबरीने समान आदर, हक्क मिळावे. ही स्त्रियांची मागणी होती. या विचाराला चालना मिळाली. जनजागृती ची सुरुवात झाली होती. कोणत्याही चळवळीची सुरुवात होणे, हा नेहमीच एक महत्वाचा Turning Point असतो. ••••

आजची स्त्री याच चळवळीचा परिणाम आहे. •••

महिला आणि पुरुषांची तुलना करणे ही गोष्ट मला खूप आवडतं नाही. पटतही नाही. सृष्टी ने स्त्री व पुरुष दोघांची शारिरीक व मानसिक रचना खूप विचारपूर्वक केली आहे. ते एकमेकांचे पूरक आहेत. ••• दोघे एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. ••• दोघे एकमेकांचे आधार आहेत. •••दोघांचे जन्मजात गुण मिळुनच प्रकृतीची /सृष्टीची काळजी घेण्यात ते समर्थ आहेत. •• त्यांच्यात स्पर्धा नसावी. ती एक टीम आहे. अशा अर्थाने घ्यावे. ••••

स्त्री प्रकृतीची ची अलौकिक अदभुत सर्वोत्तम कलाकृती आहे. ती जगाची ओळख आहे. ती नसेल तर संपूर्ण जगात काळोख आहे. •••

स्त्री पुर्वीपासून अशीच आहे. आपण इतिहासातील तिच्या पराक्रमाच्या, सहनशीलतेच्या, त्यागाच्या, गाथा ऐकलेल्या आहेत. आज जेव्हा तिला अधिकार मिळाले. स्वतंत्रता मिळाली. तेव्हा सामान्य स्त्री सुध्दा चौखटीतुन बाहेर पडली. ती मोकळी झाली. व्यक्त होऊ लागली. काळा बरोबर धावणे तिला जमू लागले. तिची उपस्थिती समाजात जाणवू लागली. तिच्या गुणांचा प्रभाव समाजात दिसू लागला. व समाजात त्यामुळे झालेला बदलही दिसू लागला. •••

स्त्री म्हणजे ‘शस्त्र ‘आणि ‘शास्त्र ‘ दोन्ही च perfect combination आहे. शौर्य आणि संस्कृती जपणारी, दोन्हीत प्रविण. आपल्या परिवाराची काळजी घेणारी. जीव ओवाळून टाकणारी स्त्री. जेंव्हा प्रतिष्ठेचा प्रश्न येतो, मग ती प्रतिष्ठा नवऱ्याची असो, नाही तर देशाची असो, ती आपले शौर्य दाखविण्यात मागे पूढे बघत नाही. •••

आजच्या स्त्रीने प्रगतीची तलवार कंबरेला खोचली आहे. आज ती गल्ली पासून दिल्ली पर्यंत पोहोचली आहे. एक पाउल घरात तर एक अंतराळात ठेवले आहे. •• ••••मंत्री बनून देश चालवते •••. टीचर बनून अंधार घालवते. •••आज ती पूढे येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला सज्ज आहे. •••

** अनवाणी ते कॅटवॉक ** 

प्रत्येक क्षेत्रात तिने आपली योग्यता वेळोवेळी दाखवून, ती समानतेची अधिकारी आहे. हे सिद्ध केले आहे. आता समानतेचा प्रश्न उरतच नाही. •••

स्त्री व पुरुष जेव्हा एकमेकांना आधार देतात. एकमेकांबरोबर खंबीर पणे उभे राहतात, तेंव्हा दोघांची शक्ती द्विगुणित होते. ••••

– – ही आजच्या स्त्रीची एक सशक्त बाजू झाली. पण दुर्दैवाने तिची दुसरी बाजूही आहे. ती तेवढी सशक्त नाही खरं तर नाजूक च आहे. ••••

आजही आपण

“बेटी बचाव बेटी पढाव “.

“स्त्री भ्रूण हत्या ” “acid attack'” “बलात्कार ” सारख्या बातम्या वर्तमानपत्रात वाचतो. शंभर दीडशे वर्षांपूर्वी चालू झालेली चळवळ आज ही चालू ठेवायला हवी आहे. अजून ही उद्देश्य पूर्ण झालेला नाही. •••

आजही ‘स्त्री स्वतंत्रता ‘व ‘स्त्री सुरक्षा ‘ हे दोन मुद्दे महत्त्वाचे आहेतच. •••••

ही विकृती, असे मनोरुग्ण आजही स्त्रीचा आदर मान ठेवण्यात असमर्थ आहेत.

” महिला समानता ” आता ही चळवळ घरोघरी चालू ठेवायला हवी आहे. पण आजही मुलगा झाला तर कणभर का होईना, जास्त आनंद होतोच. ही विचारधारा बदलायला हवी. स्त्रियांच्या संबंधित नियम, कानून, शिक्षा जास्त कडक व्हायला हवी.. •••

प्रत्त्येक वर्षी या दिवसांचे celebration म्हणजे आजच्या परिस्थितीची चाचणी करणे व त्यात सुधारणा करणे होय. ••••

ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. ••••

© संध्या बेडेकर 

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘स्त्री सक्षमीकरण: राष्ट्रोन्नतीचा उन्नत राजमार्ग…’ – भाग – २ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘स्त्री सक्षमीकरण: राष्ट्रोन्नतीचा उन्नत राजमार्ग…’ – भाग – २ ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

(असे आर्थिक गणित सोडवण्यासाठी महत्त्वाची आर्थिक आणि सामाजिक संकल्पना समजून घेण्याची आवश्यकता आहे. या संकल्पनेचे निम्नलिखित मुख्य पैलू स्त्रीच्या आर्थिक आणि सामाजिक उत्कर्षासाठी अत्यंत महत्वाचे आहेत असे माझे मत आहे.) 

इथून पुढे – – 

मूल्य निर्मिती- संपत्ती फक्त एकाकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित होत नाही. उद्योग, नाविन्य आणि गुंतवणुकीतून नवीन संपत्ती निर्माण होते, ज्यामुळे सर्वांचे जीवनमान सुधारू शकते. स्त्रियांचा स्वयंरोजगार म्हणजेच तिला स्वयंसिद्धा बनवण्याचा प्रयत्न वर निर्देशित तात्पुरत्या योजनांपेक्षा कित्येक पटीने महिलांचे कल्याण साधणारा आहे. म्हणजेच कुणाची भूक भागवण्यासाठी त्या व्यक्तीला एका वक्तासाठी मास्यांचे कालवण न देता त्या व्यक्तीला मासे पकडण्याकरता प्रवृत्त करा वे ही खरी व्यावहारिक दानशूर वृत्ती.

मानसिकता- श्रीमंत लोक संधी शोधतात, तर गरीब लोक केवळ कमावण्याचे साधन शोधतात. स्त्रीची सकारात्मक मानसिकता आणि आर्थिक साक्षरता तिला आपसूकच स्वःत्व शोधायला मदत करील.

शिक्षण आणि कौशल्य- महिलांना असे भाकड भत्ते देऊन परावलंबी आणि लाचार बनवण्यापेक्षा योग्य ते शिक्षण, कौशल्य प्रदान करणे आणि तिला स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वार्थाने मदत करून स्वावलंबी बनवणे ही कायमस्वरूपी भाऊबीज देणेच योग्य नाही कां?

संधींची समानता- श्रीमंत लोक त्यांच्या पैशाचा वापर करून अधिक गुंतवणूक करतात, ज्यामुळे संपत्ती वाढते. आर्थिक विषमता दूर करण्यासाठी सर्वांना सारखी संधी दिल्यास, संपत्ती निर्माण करणे शक्य आहे. इथे पैशांचे डोंगर उभारणे हा उद्देश नसून स्त्रीला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवणे हाच उद्देश आहे. एक उद्यमी स्त्री अनेक स्त्रियांना रोजगार देऊन त्यांना सक्षम बनवू शकते.

 थोडक्यात, संपत्ती वर्धमान करणे ही काळाची गरज आहे आणि संपूर्ण समाजाच्या खऱ्याखुऱ्या प्रगतीचे लक्षण आहे, कारण अमक्याच्या खिशातून निधी घेत (तो आपणच देतोय असे भासवत) तमक्याला कांही क्षणांकरता आभासी श्रीमंत बनवण्याची कला मते उकळण्यापलीकडे कांहीही साध्य न करता केवळ समस्या हस्तांतरित करण्याचे उथळ साधन आहे.

एकत्रितपणे, जमेल तसे आंगिक, कार्यिक आणि सामाजिक ‘दान’ देणे म्हणजे लिंग समानता निर्माण करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांना मदत करणे हे प्रत्येक नागरिकाचे आणि नागरिक गटाचे कर्तव्य आहे. आपल्या देशाची लोकसंख्या बघता सरकारी आणि गैरसरकारी यंत्रणा निश्चितच अपुऱ्या आहेत. एकच उदाहरण द्यायचे तर गरीब मुलींची शैक्षणिक जबाबदारी घेणे, याला आपण खारीचा वाटा म्हणू या. पण दात्यांची संख्या असंख्य असेल तर हा स्त्री विकासाचा सेतू बांधणे शक्य आहे. मंडळी, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या अवाढव्य लोकसंख्येबाबत सकारात्मक आणि विकासाभिमुख दृष्टिकोन मांडला होता. ते म्हणत, “भारताची लोकसंख्या ही केवळ समस्या नसून ती एक शक्ती आणि संपत्ती देखील आहे. ” म्हणूनच आपल्या दात्यांचे संख्याबळ हीच आपली ताकद आहे. गरज आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची. आमच्या संकुलात ‘गूंज’ या संस्थेचे कार्यकर्ते वापरण्याजोगे जुने कपडे, भांडी, स्टेशनरी, पुस्तके इत्यादी सामान नेण्याकरिता ट्रक घेऊन येतात. दिवाळीच्या आधी या उपक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळतो आणि ट्रक काठोकाठ भरतो. गरजू व्यक्तींना या सामानाचे यथायोग्य वाटप केल्या जाते. हा अगदी लहानसा वाटणारा उपक्रम मुंबईतील कित्येक संकुलात राबवल्या जातो तेव्हा हा ज्ञानयज्ञ अतिव्यापक होतो.

रूढीवादी कल्पनांना छेद देत मुलीला मुलाइतकाच सकस आहार देणे, घरकामाची विभागणी करतांना किंवा आर्थिक पाठिंबा देतांना मुलांमध्ये लिंगभेद न करणे, मुलीचे लग्न ती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यावरच योग्य वयात करून देणे, या सारख्या गोष्टी स्वतःच्या कुटुंबापासून सुरु होतात. मुलगी सासरी गेल्यावर तिला योग्य ती वागणूक मिळाली नाही, हुंड्यासाठी किंवा इतर कारणांसाठी तिचा छळ होत असल्यास तिच्या माहेरच्यांनी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, यामुळे कित्येक हुंडाबळी टाळल्या जाऊ शकतील. आपल्या शेजारी किंवा जवळपासच्या कुटुंबात असे होत असेल तर “मला काय त्याचे? ” असा उपरा सवाल न करता समाजातील एक घटक या नात्याने या अन्यायाला वाचा फोडणे आपले कर्तव्य आहे.

एका मुद्द्याकडे आपले लक्ष वेधू इच्छिते. स्त्रियांची कार्यक्षेत्रे मर्यादित ठेवण्यात पारंपारिक दृष्टिकोन महत्वाची भूमिका बजावत आलेला आहे. मोजकी क्षेत्रे म्हणजे कार्यालयांतील किंवा हॉटेलातील रिसेप्शनिस्ट, दवाखान्यातील परिचारिका, विमानातील हवाईसुंदरी इत्यादी! मात्र आता ‘हे स्त्रियांचे, ते पुरुषांचे’ असा लिंगभेद नष्ट करण्याची वेळ आलेली आहे. अन्यथा कांही क्षेत्रांत स्त्रियांची अफाट गर्दी तर कांही क्षेत्रात पुरुषमंडळींची वानवा अशी परिस्थिती उद्भवू शकते. स्त्रीची कार्यक्षमता लक्षात घेता असा कुठलाच प्रांत नाही ज्यात ती आपला ठसा उमटवू शकत नाही, हे मर्यादित संख्येत कां होईना स्त्रियांनी दाखवून दिलेले आहे. यासाठी मुलींना मळलेल्या वाटा सोडून इतर क्षेत्रात शिक्षण घ्यावे लागेल. इथे ‘स्टेम’ (STEM- Science, Technology, Engineering, Maths) ही संकल्पना स्त्रियांना अफाट कार्यक्षेत्रे उपलब्ध करून देऊ शकते. ‘स्टेम’ मुख्यत्वेकरून अमेरिकेत २००० सालापासून अस्तित्वात आली, आपल्या देशात २०२० च्या “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण” या अंतर्गत या संकल्पनेचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे. या विषयी थोडक्यात सांगते.

या संकल्पनेचे निम्नलिखित घटक आहेत. कंसात संबंधित व्यवसायाची मोजकीच उदाहरणे दिलेली आहेत.

  • विज्ञान आणि आरोग्यसेवा: नैसर्गिक जग समजून घेणे – (डेटा सायंटिस्ट, अनुवांशिक संशोधक आणि वैद्यकीय व्यावसायिक.
  • तंत्रज्ञान: डिजिटल साधने आणि प्रणालींचा वापर- (सॉफ्टवेअर डेव्हलपर, एआय/मशीन लर्निंग इंजिनिअर, सायबरसुरक्षा विश्लेषक)
  • अभियांत्रिकी: डिझाइनिंग, बांधकाम आणि संबंधित समस्या सोडवणे- (एरोस्पेस, बायोमेडिकल, सिव्हिल आणि रोबोटिक्स अभियंता)
  • गणित आणि वित्त: डेटाचे विश्लेषण, संगणन आणि मॉडेलिंग- (अ‍ॅक्च्युअरी {विमा उतरवणा-या कंपनीकडे असलेला संख्याशास्त्रज्ञ}, सांख्यिकीशास्त्रज्ञ आणि आर्थिक विश्लेषक) 

कांही तज्ज्ञ मंडळी यांच्यासोबत कलाक्षेत्र देखील जोडून या संकल्पनेस STEAM (‘स्टीम’) असे संबोधतात. त्यात A म्हणजे आर्ट अर्थात अतिभव्य असे कलाक्षेत्र देखील समाविष्ट केले जाते. कलेचे प्रांगण अतिशय विस्तृत असून त्यात प्रामुख्याने सर्जनशीलतेस भरपूर वाव आहे. एआयच्या जगात या अभिनव सृजनाचे महत्व आपण सर्व जाणतो. किंबहुना अत्युच्य पातळीवरील सर्जन हेच मानवाचे मूल्याधारित अस्त्र आहे असे दिसते. म्हणून मला स्टेम ऐवजी स्टीम ही संकल्पना अधिक भावली. या अभिनव शैक्षणिक धोरणाचे महत्व जर समजून घ्यायचे असेल तर वर निर्देशित प्रमुख शाखांचे एकात्मिक शिक्षण देणे गरजेचे आहे. मंडळी, या योजनेतील आदर्शांनुसार अगदी केजीपासून तर पदव्युत्तर शिक्षणापर्यंत या संकल्पनेची व्याप्ती असायला हवी आणि त्यात प्रत्येक बालक आणि बालिकेला शिक्षणाचा समसमान अधिकार असावा. हा दृष्टिकोन केवळ पुस्तकी ज्ञानाऐवजी प्रात्यक्षिके, समस्या निवारण आणि गंभीर विचार क्षमतेवर भर देतो. व्यावहारिक ज्ञान मिळवून देणारे हे शिक्षण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना २१ व्या शतकातील व्यवसायाच्या असंख्य संधी उपलब्ध करून देईल अशी आशा आहे. यामुळे प्रत्येक व्यवसायात लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन केवळ गुणवत्तेच्या आधारावर मूल्यमापन होऊन स्त्रियांना आपसूकच प्रवेश घेता येईल.

नवीन कल्पनांवर काम आणि प्रयोग करण्याची संधी देणाऱ्या या पद्धतीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना भविष्यातील तांत्रिक आव्हानांसाठी सक्षम बनवणे हा आहे. जेव्हा आपण कांही देतो, तेव्हा त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. स्त्री सक्षमीकरणाने निव्वळ तिचाच नव्हे तर सर्वांगाने राष्ट्राचा फायदा होणार आहे. “गिव्ह टू गेन” चा खरा आश्वासक संदेश हाच आहे. शिक्षित स्त्री ही एक सशक्त कुटुंबाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा आधारस्तंभ आहे. यात चूल आणि मूलच्या पल्याड जाऊन ती जेथे पाऊल ठेवेल ते तिचे कार्यक्षेत्र असायला हवे. नवनवीन आव्हाने पेलण्यासाठी तिची ऊर्जा कार्यान्वित व्हायला हवी. आधुनिक काळात विविध क्षेत्रातील महिलांचे नेतृत्व वाढवणे आणि त्यांच्यातील कौशल्यांचा विकास करणे हे लैंगिक समानता आणि शाश्वत प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे.

“आपल्या जगाचे रूपांतर करण्यासाठी आपल्याला जादूची गरज नाही. आपल्याला आवश्यक असलेली सर्व शक्ती आपण आधीच स्वतःमध्ये बाळगतो. “ 

 – जे के रोलिंग

– समाप्त –

©  डॉ. मीना श्रीवास्तव

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – drmeenashrivastava21@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पुरणपोळ्या आणि युरोपियन होळ्या… लेखिका : अवनी दाते – पोलंडकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर☆

सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

☆ पुरणपोळ्या आणि युरोपियन होळ्या… लेखिका : अवनी दाते – पोलंडकर ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

मंडळी, हुताशनी पौर्णिमा. म्हणजेच होळी. परदेशात राहत असल्यापासून माझ्यासाठी या दिवसाचं महत्व फक्त पुरणपोळी खाण्याचा दिवस इतकंच आहे. कारण इथे काही मला होलिका दहन साजरे करता येत नाही आणि फारसे भारतीय नसल्याने रंगपंचमी सुद्धा साजरी होत नाही.

तर आज मी निगुतीने पुरण शिजवून साग्रसंगीत पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला होता. संध्याकाळी एका पोलिश मैत्रिणीला भेटायला जायचे होते. जाताना तिच्यासाठी म्हणून तीन – चार पुरणपोळ्या डब्यात घालून नेल्या. तिने पहिला घास खाताच मस्त म्हणून दाद दिली. मग कशापासून बनवल्या, कशा बनवल्या, आणि मग शेवटचा प्रश्न का बनवल्या? आज काय विशेष असे प्रश्न एकामागून एक सुरू झाले. तिला होळी(हिंदीमधली रंगांची “होली”) याबद्दल जुजबी माहिती होती. पण मग आपली होळी, होलिका दहन, रंगपंचमी या गोष्टी तिला सांगत असतानाच ती मला म्हणाली, तू माझी मस्करी तर करीत नाहीस. मी म्हणाले, नाही गं, असं का वाटलं पण तुला? तर तिने जे काही सांगितलं ते माझ्यासाठी पण अचंबित करणारं होतं. तुम्हाला ऐकायचंय? मग ऐका तर.

आपण आपल्या भारत देशात होळी, होलिका दहन किंवा रंगपंचमी म्हणून ज्या काही प्रथा साजऱ्या करतो त्या करणारा आपण भारत एकमेव देश नसून अनेक युरोपियन देशांमध्ये थोड्या फार फरकाने तशाच प्रथा साजऱ्या केल्या जातात. आपण जसे थंडी संपून उन्हाळ्याची चाहूल लागली की होळी पेटवतो तसेच हे देश त्यांच्या त्यांच्या हवामानानुसार थंडी संपून वसंताची चाहूल लागताच त्यांच्या त्यांच्या होळ्या पेटवून या प्रथा साजऱ्या करतात.

पोलंड मध्ये वसंत ऋतूचा पहिला दिवस आणि हिवाळ्याचा शेवटचा दिवस म्हणजेच २१ मार्च रोजी त्यांच्या पद्धतीची होळी साजरी केली जाते. ज्याला “तोपीयेन्ने माझान्ने” म्हणजेच “माझान्ना ला बुडवणे” असे म्हणतात. माझान्ना ही मृत्यू आणि हिवाळ्याची स्लाव्हिक देवी असून, तिचे प्रतिनिधित्व करणारा, वाळलेल्या गवताच्या पेंढ्यापासून एक पुतळा बनवला जातो. त्याला स्त्रीचा वेश परिधान केला जातो, त्याची गावातून अंत्ययात्रा काढली जाते. नंतर सर्वजण मिळून त्यास पेटवून देतात आणि तो नदी, तलाव किंवा अन्य पाणवठ्यावर फेकून देतात. पोलिश लोकांच्या श्रद्धेनुसार हा विधी मृत्यूवरील विजय, हिवाळ्यातील काळोख्या दिवसांचा शेवट आणि निसर्गाच्या पुनर्जन्माचे प्रतीक आहे.

त्या नंतर काहीच दिवसात पोलंडमधील प्रमुख सण इस्टर येतो. ईस्टरच्या पवित्र सोमवारी पोलंडमध्ये “श्मीगुस डिंग्युस” नावाची प्रथा साजरी केली जाते जी आपल्या रंगपंचमीची आठवण करून देते. मात्र यात रंग न वापरता फक्त पाणी उडवून एकमेकांना भिजवले जाते. ईस्टरच्या काही दिवस आधी बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पिचकाऱ्या विक्रीसाठी येतात. पाणी हे जीवनाचे प्रतीक मानले जात असल्याने, अश्या पद्धतीने पोलिश लोक हास्य आणि आनंदाच्या शिडकाव्याने (आणि भरपूर पाण्याने) वसंत ऋतूचे स्वागत करतात.

हे सगळं मैत्रिणीकडून ऐकल्यानंतर मी इतरही युरोपियन देशांमध्ये अशा काही परंपरा आहेत का याचा अभ्यास केला आणि मी थक्क झाले. त्यापैकी काही देशातील पद्धतींबद्दल मी तुम्हाला सांगते.

चेक रिपब्लिक: 

चेक रिपब्लिकमध्ये ३० एप्रिल रोजी ही होळीसदृश प्रथा मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. या प्रथेचा मुख्य उद्देश हा वसंताचे स्वागत आणि हिवाळ्यातील चेटकीणी आणि अंधारातील दुष्ट आत्म्यांना पळवून लावणे हा आहे. चेक लोकांचं असं मानणं आहे की हिवाळा ऋतू हा चेटकिणींना (आणि इतर दुष्ट आत्म्यांना) शक्ती देतो आणि वसंत ऋतू सुरू होताच या चेटकीणी अस्वस्थ होतात आणि मग इतर दुष्ट आत्म्यांसोबत त्या मोठ्या पार्ट्या करतात ज्या थांबवाव्या लागतात.

आता तुम्हाला प्रश्न पडेल की चेटकिणींची पार्टी थांबवायची कशी?

तर चेक लोक मोठ्या उद्यानात अथवा मोकळ्या मैदानात भल्यामोठ्या शेकोट्या पेटवतात आणि काड्या व पेंढ्यापासून बनवलेल्या एका चेटकीणीचा पुतळा त्या शेकोटीच्या टोकावर ठेवला जातो आणि हिवाळ्याच्या समाप्तीचे प्रतीक म्हणून जाळला जातो.

आणि चेटकिणींना उष्णता आणि आगीचा तिटकारा असल्यामुळे त्या पुढील हिवाळ्यापर्यंत काढता पाय घेतात.

तसेच चेक लोक देखील पोलंडप्रमाणेच इस्टरच्या सोमवारी पाण्याची प्रथा साजरी करतात. मात्र येथे फक्त पुरुष त्यांच्या बायको अथवा प्रेयसीवर खेळकरपणे पाणी उडवतात. आणि त्यांना पाम झाडाच्या फांदीने हळुवार प्रतिकात्मक फटके मारतात. जे प्रजनन क्षमता, आरोग्य आणि तारुण्याचे प्रतीक आहे. ही परंपरा येत्या वर्षासाठी महिलांना सुंदर आणि निरोगी ठेवते असे मानले जाते.

जर्मनी: 

जर्मनीतील होळी ज्याला “वालपुरगिसनाख्त” असे म्हणतात, दरवर्षी ३० एप्रिलच्या रात्री सुरू होऊन १ मे रोजी संपणारा उत्सव आहे.

वालपुरगिस नाईट ही आठव्या शतकातील संत वालपुरगा हिच्यामुळे ओळखली जाते. ही संत वालपुरगाबाई ख्रिश्चन धर्माचा प्रसार, तसेच जादूटोण्याला दूर ठेवण्यात आणि विविध आजार बरे करण्याच्या तिच्या कथित गुणांसाठी ओळखली जाते. तिच्या निधनानंतर, जादूटोण्याला लांब ठेवण्यासाठी लोक तिची प्रार्थना करीत असत.

पूर्वीच्या काळी लोकांचा असा विश्वास होता की चेटकिणी आणि सैतान दरवर्षी ब्रोकेन पर्वतररांगातील हार्ज पर्वतांमध्ये वसंत ऋतूच्या स्वागतार्थ एकत्र येतात. तेथे ते नृत्य करतात आणि ख्रिश्चनांना हानी पोहोचवण्यासाठी कट रचतात.

म्हणून मग लोक डोंगराच्या कडेला मोठाली शेकोटी पेटवत आणि त्यात वाळलेल्या गवतापासून बनवलेल्या चेटकिणी सारख्या दिसणाऱ्या बाहुल्या फेकून देत. आणि चेटकिणींना घाबरवण्यासाठी मोठमोठाली भांडी वाजवून, कर्कश्श आवाजात गाणी म्हणून किंवा बोंब ठोकून शक्य तितका मोठा आवाज काढीत असत.

आजही ही वालपुर्गीस नाईट जर्मनीमध्ये हिवाळ्यातील दुष्ट अंधाऱ्या शक्तींना दूर ठेवण्यासाठी, मुख्यत्वे डोंगराळ प्रदेशात साजरी केली जाते.

स्लोवाकिया, हंगेरी: 

या देशातही जर्मनीप्रमाणेच ३० एप्रिल रोजी ही वालपुर्गीस नाईट साजरी केली जाते.

तसेच ईस्टरच्या पवित्र सोमवारी चेक रिपब्लिक सारखीच पाणीपंचमी खेळली जाते ज्यास “ओब्लिएवाचका” असे म्हटले जाते. मात्र यात शक्यतो बिनलग्नाच्या तरुण मुलींना तरुणांकडून थंडगार पाण्याने चिंब भिजवले जाते. असे करणे त्या मुलींसाठी चांगले आरोग्य, प्रजननशक्ती, आणि सौंदर्य घेऊन येते असे स्लोवाकियन लोक मानतात. आपल्याकडे देखील होळी अथवा रंगपंचमीला वृंदावनात गोप गोपिकांवर रंग उधळीत असत, नाही का?

स्कॅन्डिनेव्हिया:

कालांतराने जर्मनीमधून ही वालपुर्गीस नाईट ची प्रथा स्कॅन्डेनेव्हियन देशांमध्येही आली आणि आज या देशांतही मोठ्या प्रमाणावर ३० एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. स्वीडिश लोक एकत्र येऊन हिवाळ्यात वाळून पडलेल्या झाडाच्या फांद्या आणि वाळके गवत एकमेकांवर रचून खूप मोठ्या शेकोट्या पेटवतात, रात्रभर गाणी म्हणतात, शेकोटीत सॉसेजेस भाजून खातात आणि हिवाळ्यातील दुष्ट शक्तींना हाकलून लाऊन, वसंताचे जोरदार स्वागत करतात.

त्याचबरोबर २३ जून रोजी संध्याकाळी “संकथानसाफ्टेन” नावाचा एक होळीसारखाच सण नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन आणि फिनलंड मध्ये साजरा केला जातो. या दिवशी या देशांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण, मोठ्या मोठ्या शेकोट्या पेटवल्या जातात. येथे अशी शेकोटी पेटवण्याची प्रथा पूर्व-ख्रिश्चन काळापासून आहे, जेव्हा लोक उन्हाळ्यातील दीर्घकाळ राहणाऱ्या सूर्याचा सन्मान करण्यासाठी ही प्रथा साजरी करीत असत. सूर्य म्हणजे जीवन, प्रजनन क्षमता आणि निसर्गाच्या शक्तीचे प्रतीक. तेव्हा अग्नीला प्रतीकात्मक आणि जादुई महत्त्व होते. अग्नी हा वाईट आत्म्यांना दूर करण्यासाठी, पिकांची भरभराट आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी महत्त्वाचा मानला जात असे. स्कॅन्डेनेव्हियन लोकांचे असे म्हणणे होते की या विशिष्ट रात्री, चेटकिणी सक्रिय होतात आणि सैतानाला भेटण्यासाठी आणि वाईट कृत्य करण्यासाठी एकत्र येतात. शेकोटी पेटवणे हे या वाईट शक्तींना दूर ठेवण्याचा उपाय होता.

ग्रीस: 

ग्रीसमध्ये देखील वसंतादरम्यान ग्रीक पद्धतीने होळी साजरी केली जाते. त्याला “बर्निंग ज्यूडा” असे नाव आहे. ज्युडा म्हणजेच यहूदी.

तर ही यहूदाला जाळण्याची प्रथा प्राचीन काळापासून ग्रीसमध्ये मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. ग्रीक लोकांच्या मानण्यानुसार यहूदा हा येशू ख्रिस्ताच्या बारा प्रेषितांपैकी एक होता, ज्याने त्याचा विश्वासघात केला आणि त्याला क्रूसावर चढवले. ग्रीक इतिहासात, यहूदा विश्वासघात दर्शवितो आणि त्याचा पुतळा जाळण्याची प्रथा त्याच्या कृत्यांसाठी त्याला प्रतीकात्मक शिक्षा देण्याचा एक मार्ग आहे. आपण रावणदहन करतो साधारण काहीसं तसंच.

ईस्टरच्या पवित्र शनिवारी संध्याकाळी, गावातील रस्त्यांवरून एक मिरवणूक निघते, ज्यामध्ये यहूदाचा पुतळा घोड्यावरून नेण्यात येतो. नंतर हा पुतळा खांबावर टांगला जातो आणि त्याला आग लावली जाते. या मिरवणुकीदरम्यान लोक कर्कश्श आवाज काढतात. कधीकधी न आवडणाऱ्या राजकीय नेत्यांच्या नावाने बोंब सुद्धा ठोकतात. पुतळा जाळताच, फटाक्यांची आतषबाजी होते आणि लोक टाळ्यांच्या गजरात जल्लोष करतात. ही प्रथा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे आणि नकारात्मक ऊर्जा काढून टाकून सकारात्मक गोष्टींचे स्वागत करण्याचा एक मार्ग आहे.

इटली:

इटालियन लोक मात्र त्यांची होळी एकदम स्टायलिश पद्धतीने साजरी करतात. विशेषतः इटलीमधील फ्लॉरेन्समध्ये हा उत्सव अगदी नेत्रदीपक पद्धतीने साजरा करण्यात येतो. दरवर्षी इस्टरच्या पवित्र रविवारी अख्खे फ्लॉरेन्स शहर “स्कॉपियो डेल कॅरो”(“कार्टचा स्फोट”) नावाचा होळी सारखाच सण साजरा करण्यासाठी एकत्र जमते. या चमकदार देखाव्यामध्ये फटाक्यांनी भरलेली 30 फूट उंच अशी प्राचीन बैलगाडी असते.

ईस्टर प्रार्थने दरम्यान, कॅथेड्रलच्या आतून एक यांत्रिक कबुतर (ज्याला ‘कोलंबिना’ म्हणतात) बाहेरील बैलगाडीकडे तारेद्वारे सोडले जाते. हे कबुतर रॉकेट्सने भरलेले असते, आणि इटालियन लोक असे मानतात की ते पवित्र अग्नी घेऊन जाते. जेव्हा हे कबुतर गाडीवर आदळते तेव्हा गाडीत भरलेले फटाके जोरात फुटतात, ज्यामुळे एक नेत्रदीपक आतषबाजीचे प्रदर्शन होते.

इटालियन लोकांची अशीही श्रद्धा आहे की जर कबुतर यशस्वीरित्या गाडीवर आदळले आणि व्यवस्थित स्फोट होऊन आतिषबाजी झाली तर तो अतिशय शुभसंकेत मानला जातो, जो चांगले पीक, शांती आणि भरभराट घेऊन येतो.

स्वित्झर्लंड: 

येथील होळीसमान प्रथा थोडी मजेदार असते. त्याला “झेक्सएहलाऊतेन” असे नाव आहे. तो एप्रिल महिन्यातील तिसऱ्या सोमवारी साजरा केला जातो. यामध्ये कापूस आणि लोकरीपासून एक मोठा बूग नावाचा स्नोमॅन बनवला जातो. आणि मोठ्या शेकोटीच्या टोकावर उभा करून तो बरोब्बर संध्याकाळी ६ च्या ठोक्याला जाळून टाकला जातो. हा स्नोमॅन हिवाळा आणि थंडीचे प्रतीक मानला जातो. आग लागल्यानंतर जितका लवकर हा स्नोमॅन पेट घेईल तितका उन्हाळा ऊबदार आणि सुखकर होईल असे मानतात. आणि हळू पेट घेणारा स्नोमॅन पावसाळी आणि गारठा असणारच उन्हाळा सूचित करतो.

आता बरोबर ६ च का? तर एरवी तिथे कामगार दररोज ५ वाजेपर्यंत काम करतात, पण एकदा डे लाईट सेव्हिंग सुरू झालं की ते रोज ६ वाजेपर्यंत काम करू लागतात.

तर मंडळी, आहे की नाही नवल? मला तर हे सगळं वाचून कुठेतरी प्रत्येक धर्मातील पाळेमुळे एकमेकांशी जोडलेली आहेत याचा पक्का विश्वास वाटतो. आपली होलिका राक्षसी असो, पोलंडची मार्झन्ना असो, हिवाळी चेटकीणी असोत, ज्युडा असो किंवा मग हिवाळ्याचे प्रतीक बूग स्नोमॅन असो, सगळ्यांचा उद्देश एकच, अंधाऱ्या कडाक्याच्या दिवसांवर मात करून, नवीन प्रकाशमय ऋतूची चाहूल माणसाला पुन्हा एकदा आयुष्य पूर्ण उत्साहाने जगण्यासाठी सज्ज करते, सकारात्मक ऊर्जा देते आणि पुन्हा एकदा निसर्ग नितांतसुंदर असण्याची प्रचिती आणते. हो की नाही?

तुम्हाला अजून कुठल्या वेगळ्या देशातील निराळी होळी माहित असल्यास मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा बरं का.

लेखिका : अवनी दाते – पोलंडकर

प्रस्तुती – मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares