☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र २९ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले☆
।। श्री नारद उवाच ।।
नारद भक्तीसूत्र क्र. २९.
अन्योन्याश्रयमित्यन्ये ॥ २९ ॥
अर्थ : दुसरे काही आचार्य ज्ञान आणि भक्ति परस्परांना आधारभूत आहेत असे प्रतिपादन करतात. थोडक्यात, भक्तीस ज्ञानाचा आश्रय आणि ज्ञानास भक्तीचा आश्रय आहे असे मानतात.
विवेचन : संत एकनाथ महाराज सांगतात,
“भक्तीचे उदरीं जन्मलें ज्ञान । भक्तीनेंक ज्ञानासी दिधलें महिमान ॥१॥ भक्ति तें मुळ ज्ञान तें फळ। वैराग्य केवळ तेथीचें फुल ॥२॥ फुल फळ दोनी येरयेरा पाठीं । ज्ञान वैराग्य तेविं भक्तिचें पोटीं ॥३॥ भक्तिविण ज्ञान गिवसिती वेडे । मूळ नाहीं तेथें फळ केवी जोडे ॥४॥ भक्तियुक्त ज्ञान तेथें नाहीं पतन । भक्ति माता तया करितसें जतन ॥५॥ शुद्धभक्तिभाव तेथें तिष्ठे देव । ज्ञानासी तो ठाव सुख वस्तीसी ॥६॥ शुद्ध भाव तेथें भक्तियुक्त ज्ञान । तयाचेनी अंगें समाधी समाधान ॥७॥ एका जनार्दनीं शुद्ध भक्ति क्रिया । ब्रह्मज्ञान त्याच्या लागतसे पाया ॥८॥”
थोडक्यात भक्ति आणि ज्ञान यांचा परस्पर संबंध आहेच आहे.
– – भक्तीने ज्ञानाची प्राप्ती होणे सहज शक्य आहे. अनेक संतांनी ते स्वानुभवाने सांगितले आहे. तसेच भगवतांची प्राप्ती झाल्यावर सुद्धा भक्ति करणारे अनेक साधक आहेत, संत आहेत. एखाद्या माउलीला दिवस राहिले. ज्यादिवशी तिला आपण आई होणार हे कळते, त्यादिवसापासून ती होणाऱ्या बाळावर जिवापाड प्रेम करू लागते. इथे त्या माउलीने बाळ स्त्री होईल की पुरुष, ते काळ असेल की गोरे, ते सदृढ असेल की पंगू ? यातील तिला काहीच माहीत नाही, तिला इतकंच माहित आहे की काही महिन्यांत तिला बाळाचे दर्शन होणार आणि अनंत काळासाठी आई होणार, ती कोणाची तरी आई होणार….. आणि हीच तिची कायमची ओळख ठरणार… !
इथे गर्भारपणात आई जे आपल्या लेकरांवर प्रेम करते ते ज्ञानपूर्व प्रेम आहे. तिची प्रसूती झाली, की तिला आपण आई झालो याचे खरेज्ञान तिला प्राप्त होणार आणि मग ती आई झाली म्हणून त्या बाळावर ती प्रेम करणार, माया करणार, त्याची सर्वोतोपरी काळजी घेणार…. ! सर्व संत हेच करतात… आणि आपण ही तसेच करावे असे त्यांची अपेक्षा असते.
निर्गुण निराकार असलेल्या भगवंताला भक्त आपल्या भावाने सगुणात आणतो. साधनेच्या विशिष्ट टप्प्यावर जिवाशिवाची भेट होते. थोडक्यात ज्ञान प्रसवते. पण आता भक्ताला भगवंत आणि यातील भेद पूर्णपणे गळून गेलेला असतो. भगवंत आणि भक्त एकच झाल्याने आधी तो जे नाम घ्यायचाझ तेव्हा त्याला जाणवायचे की मी नाम घेतो, आता तोच नाम घेतो, पण आता तो एक उपकरण झालेला असतो.
☆ “रौद्र निसर्गदेवतेला प्रसन्न करून घेणारे वीर!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
जोजिला पास अर्थात खिंड… म्हणजे एका पहाडातून दुसऱ्या पहाडाकडे जाण्यासाठी असलेला अगदी निमुळता रस्ता.. नव्हे पायवाट. जोजिला ही इथली ऋतू देवता. ही खिंड काश्मीर ते लडाख अशी वाट तिच्या उरात मिरवते. जोजिला तशी रागीट स्वभावाची… कोपली तर तिच्याकडे दयेचा लवलेश मिळत नाही. उंची आणि तेवढीच भयावह खोली.. कडेलोट झाला की संपलं!
त्या भागात तसा बाराही महिने गारठा असला तरी थंडीचा विशेष ऋतू असतोच… बर्फाचे साम्राज्य!
या काळात इथल्या जगाचा इतर जगाशी संपर्क ठप्प होतो. म्हणून ही विशेष थंडी सुरू होण्याआधी जीवनावश्यक वस्तू साठवून ठेवाव्या लागतात… अगदी मीठ ही मिळणार नाही नंतर.
ऑक्टोबर महिना सुरू होतो आहे… नोव्हेंबर बर्फवृष्टी सुरू होईल… रसद येणे अशक्य होऊन जाईल. आणि जोजिला खिंडीवर शत्रूचा पक्का ताबा आहे. पाकिस्तानी सैन्य आणि टोळीवाले लुटारू बंडखोर लडाख मध्ये भारतीय मुंगीलाही शिरू देण्यास तयार नाही अशी स्थिती. स्वतंत्र भारताच्या सैनिकांचा हा पहिलाच युद्ध अनुभव होता. इथे तैनात असलेली फौज आणि जनता लवकरच उपासमारीची बळी ठरणार हे दिसत होतं… कारण रसद मार्ग पूर्ण बंद होता. राजधानी लेह आता भुकेने व्याकुळ होऊ लागली होती… लवकरच काहीतरी आणि अपूर्व असे करायलाच पाहिजे होते. पण पराजय डोळ्यांना स्पष्ट दिसत होता!
पाकिस्तान वरून गंमत पाहत निवांत बसला होता.. मन मानेल तेंव्हा आणि त्याठिकाणी अचूक गोळीबार करू शकत होता. एकदा का भारतीय सैन्य इथून मागे हटले की हा संबंध भूभाग पाकिस्तानचा होणार… !
१/११ गोरखा बटालियनचे मोजके सैनिक युद्धाच्या धामधुमीत इथे घाईने.. airlift करून आणून ठेवले होते.. कारण पुरेसा वेळ हातात नव्हता… गोरख्यांच्या जोडीला जम्मू काश्मिर राज्य दलाचे काही सैनिकही होते तिथे. चिवटपणा रक्तात भिनलेले गोरखा प्राणपणाने लढत तिथे तग धरून राहिलेले होते… पण सैन्य पोटावर चालतं… अन्न, औषधं, शस्त्रं हाताशी असेल तरच सैन्य उभं राहू शकतं! आणि नेमका हाच पुरवठा बंद करण्यात, रोखून धरण्यात पाक यशस्वी होताना दिसत होता. जोजिला खिंड भारताच्या ताब्यात असायलाच पाहिजे.. अन्यथा पहिली लढाई.. आणि पहिला पराजय जणू निश्चीत!
भारतीय पायदळाने कित्येक हल्ले चढवले होतेच.. पण मोक्याच्या ठिकाणी बसलेला शत्रू तिथून मागे सरकत नव्हता. त्यावेळी मेजर जनरल असलेले के. एम. करिअप्पा काळजीत होते.. आणि या काळजीतून त्यांनी एक अशक्यप्राय कल्पनेला जन्मास घातले. साडे अकरा फूट उंचावर असलेल्या या युद्धभूमी नव्हे युद्ध शिखरावर रणगाडे उतरवायचे.. वाटेत उंच कडे, खडक, बर्फ, दऱ्या आणि वरून शत्रूचा अखंड अग्निवर्षव होत असताना…. जगाच्या इतिहासात हे तोवर झाले नव्हते आणि पुढेही होण्याची शक्यता नव्हती!
त्या स्थितीमध्ये असे करणे हा शुद्ध वेडेपणा दिसत होता आणि होताही!
पण या वेड्या निर्णयाला शहाणपणात रुपांतरित करण्याची जबाबदारी १६१, इन्फंट्री ब्रिगेडच्या ब्रिगेडियर के. एस. थिमय्या यांच्या जोजी ला फोर्सच्या खांद्यावर आली. थिमय्या साहेबांनी या वेडेपणात यशाची बीजे दडलेली पाहिली! या मोहिमेचे बारसे करण्यात आले… ऑपरेशन बायसन! आपल्या सेनेकडे त्यावेळी एम ५ स्टुअर्ट जातीचे एम के ६ रणगाडे होते… ज्यांचे संचालन ७व्या लाईट कॅवलरी च्या सी कंपनीकडे होते.
सपाट जमिनीवरून हे अवजड रणगाडे शत्रूला समजणार नाही अशा रीतीने वर पोहोचवायचे.. मग हल्ला करायचा! कागदावर, मनात, कल्पनेत किती सोपे.. एका वाक्यात काम! रणगाडे त्या उंचीवर नेण्यात यश मिळवायचे असेल तर चमत्कारच करून दाखवावा लागणार होता.
जम्मू, अखनूर येथे असलेल्या या रणगाड्यांचे विविध भाग उघडून सुटे करण्याचे काम तातडीने सुरू झाले. म्हणजे हे भाग ट्रकमध्ये भरून वाहून नेता येतील!यासाठी तीन टन वजन वाहून नेण्याची क्षमता असलेले अनेक ट्रक्स आवश्यक होते.
शक्य ती सर्व गुप्तता पाळून रणगाड्यांचे सुटे भाग भरलेले हे ट्रक्स मोहिमेवर रवाना झाले. जम्मू… श्रीनगर… सोनमर्ग.. बालाटाल असा मार्ग निश्चित झाला. पण ट्रक्स धावत नव्हते… रांगत होते जणू… कारण शत्रूला जराही सुगावा लागू नये म्हणून अंधारात प्रवास करायचा होता… ट्रक्सचे मुख्य दिवे सुद्धा बंद ठेवून! रस्त्याच्या कडेला छोटे, मंद प्रकाश परावर्तित करणारे रिफ्लेक्टर्स लावले जात.. चालक डोळ्यांत तेल घालून या प्रकाशमार्गावर ट्रक्स चालवत नेत… पीर पंजाल मधला निमुळता रस्ता, वेडा आणि वाकडा सुद्धा. एखादा इंच अंदाज चुकला की कायमचे खोल दरीत कोसळण्याचे हे निश्चित. दिवस पहिला किरण घेऊन उगवायचा त्याआधी हा काफिला जगाच्या अर्थात पाकिस्तानच्या दृष्टीआड करावा लागे. कारण दिवसा पाकिस्तानी टेहळणी विमाने घिरट्या घालीत. हे ट्रक झाडीत, पुलाखाली, आडोशाला उभे करून त्यांच्यावर छद्म आवरणे घातली जात.
सोनमर्ग येथून बालताल इथपर्यंत एक गुप्त रस्ता तयार करण्याचे काम समांतर वेळी सुरू करण्यात आले… डोंगर फोडून मार्ग कोरून काढायचा होता. मद्रास सॅपर्स सज्ज होती… मेजर आर. पी. राय, मेजर थंगराजू आणि सेना..
कुदळ, फावडे घेऊन कामाला लागली. म्हणू वानरसेना! तापमान उणे पेक्षा उणे… अंधार! दगड फोडण्यासाठी स्फोट घडवून आणावे लागत.. वरून त्वरित पाक भुंकायला सुरुवात करी… मग पुन्हा शांत बसायचे काही वेळ… एक अदृश्य शक्ती.. एक अदृश्य मार्ग बांधत होती. फक्त याक नावाचा प्राणीच जाऊ शकेल अशा चिंचोळ्या रस्त्याचे रणगाडा जाईल असे रुपांतर करायचे होते… शत्रू गोळीबार करीत असताना! नऊ हजार फुटापासून हा रस्ता साडे अकरा फूट उंचीवर चढत गेला!हे अंतर केवळ अडीच मैल होते.. पण एक एक सेंटीमीटर सत्वपरीक्षा घेत होता. एका मैलासाठी २५ टन स्फोटके वापरावी लागली.. तेवढाच गोळीबार पाकिस्तान करीत होता.. त्यांना समजत नव्हते की हे हिंदुस्तानी इथे नेमके कसले काम करत आहेत… कारण युद्ध तर ते हरत आले होते.. केवळ काही दिवसांचाच प्रश्न होता. लडाखचा गळा पुरता आवळला की भारताचा श्वास कोंडला जाणार होता! पण इकडे आपल्या बहादूर जवानांनी रस्ता बांधण्याची लढाई जिंकली! आता या रस्त्यावरून रणगाड्यांचे सुटे भाग भरलेले हे ट्रक्स चढवत जोजिला खिंडीपर्यंत न्यायचे! हे सुद्धा अंधारात करायचे… कुणालाही खबर लागू नये म्हणून त्या परीसरात सक्तीची संचारबंदी सर्वांनाच लागू केली गेली. या शांततेचा आवाज पाकच्या कानांत मोठ्याने गोंगाट करीत होता… ट्रक्स मधील सुटे भाग तिथे उतरवून घ्यायचे, त्यांची जुळणी करायची.. निष्णात इंजिनियर्स रात्रंदिन कामाला जुंपले… एक नोव्हेंबर मुहूर्त काढला गेला… याच दिवशीच्या आधीच्या रात्री प्रचंड हिमवादळ सुटले… पाकिस्तानी खुश झाले.. अशा वातावरणात तर भारताच्या अडचणी वाढत जातील! पण हे भारतीय फौजेचे वादळ घोंगावत होते पाकिस्तानच्या डोक्यावर.. ते निर्धास्त, बेखबर होते. पण बर्फाचे वादळ आपल्या बाजूने झाले.. रस्त्यावर बर्फाची जाड चादर पसरली.. सगळीकडे एकच रंग… पांढरा!
सकाळचे पहिले किरण बर्फाच्या डोंगरावरून डोकावले… १, मद्रास चे वीर पुढे झाले… हे एक आत्मघातकी पाऊल होते… कारण शत्रूवर थेट चालून जायचे होते… शत्रू पाहत असताना! शत्रूचे लक्ष भलतीकडे वेधून घ्यायचे होते… कारण एका बाजूने रणगाडे आक्रमण करणार होते!
पण पाकिस्तानने तुफान गोळीबार आरंभला…. भारतीय सैनिकांच्या रक्ताने बर्फ लालेलाल होऊ लागला… पाकिस्तानी सैनिक या गोंधळात अडकले मात्र होते… आणि अचानक.. केवळ याक चालू शकतील अशा रस्त्यावरून कित्येक भारतीय रणगाडे बर्फाचा पडदा फाडत फाडत पुढे मुसंडी मारून निघाले! सर्वांत पुढे रणगाडा होता लेफ्टनंट बी. एस. चंडेल साहेबांचा. रणगाडा मोठा आवाज करीत पुढे आला… रस्ता तयार केलेला असला तरी चढ एखाद्या उभ्या भिंती सारखा होता… पण हे बायसन.. म्हणजे मस्तवाल रानगवे पुढे सुसाट सरकत राहिले.. समोर असलेल्या पाकिस्तानी सैन्य चौक्यांत असलेल्या सैनिकांना भास झाल्या सारखे वाटले.. रणगाडे आणि इथंवर? त्यांच्या प्रशिक्षणात असं कुठंच आलं नव्हतं… त्यांच्याच काय जगातल्या कोणत्याच सैन्य अभ्यासक्रमात डोंगरावर रणगाडा ही कल्पना विरळ असावी!
पाकिस्तानने धक्क्यातून सावरत या रणगाड्यांवर त्यांच्याकडच्या शस्त्रांनी गोळीबार केला… पण त्या गोळ्या या रणगाड्यांचे कवचावर आदळून उडून जायच्या… स्टुअर्ट रांगड्यावर काहीही परिणाम होत नव्हता!
या दरम्यान एका पाकिस्तानी सैनिकाने त्याच्या वरिष्ठाला संदेश पाठवला.. हिंदुस्तानी टैंक ऊपर आये है…. तिकडून उत्तर आले.. दिमाग खराब हो गया है क्या…. याक होंगे पागल!
स्टुअर्ट ने आग ओकायला सुरुवात केली… ३७ मिमी व्यासाची तोफ.. अचूक फायर! भयंकर विध्वंस! यापेक्षाही पाकिस्तानी सैनिकांनी जणू सैतान पाहिल्यासारखे केले… आणि तिथून जीव मुठीत घेऊन ते पाकिस्तानी हद्दीकडे पळत निघाले.. ही त्यांची सवय त्यांना कायमची चिकटली!
भारताला जोजिला निसर्गदेवी प्रसन्न झाली होती… पण घाम आणि रक्ताचा सर्वांग अभिषेक मात्र तिने करवून घेतला होता स्वतःला! कित्येक बळी तिने घेतले होते! पण लडाख मुक्त झाले… भारतीय प्रदेश भारतात आला होता!
ही मोहीम जगाच्या युद्धाच्या इतिहासात एक उदाहरण म्हणून नोंदली गेली!
आज एक नोव्हेंबर…. याच दिवशी १९४८ मध्ये हा पराक्रम घडला… त्याचे स्मरण करूयात. ज्यांनी ही योजना आखली, प्रत्यक्षात उतरवली त्यांना नमस्कार करूया… ज्या वीरांनी प्राण देऊन देश राखला त्यांना वंदन करुयात… अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख होतो.. सैनिक अज्ञात राहतात… त्यांच्या नावांचा शोध घेऊयात! ही आणि एकूण सर्व मोहिमा मिळून भारताने 1104 सैनिक गमावले… तीन हजार पेक्षा जास्त सैनिक जखमी झाले! जय हिंद !!
(हा लेख म्हणजे एका इंग्रजी लेखाचे स्वैर भाषांतर आहे..).
☆ वेगवेगळे कवी …. वेगवेगळे बाज!… ☆ श्री सुहास सोहोनी ☆
गांवाहून घरी परततांना गाडी चुकली. खरं म्हणजे आमचीच वेळ चुकली. गाडी वेळेवरच येऊन गेली होती. शेवटी जवळच्या मार्गाने – पायवाट, रस्ता – असं करत करत घरी दाखल झालो. नाही म्हटलं तरी सात-आठ मैलांचा फटका पडलाच. घरी आल्यावर तांब्याभर पाणी ढोसलं तेव्हा कुठे बरं वाटलं.
– – – बस्. प्रसंग घडला तो एवढाच. वेगवेगळ्या कवींनी तो कसा वर्णिला असता त्याची झलक!!
☆ बाज रघुनाथ पंडितांचा – ☆
(शार्दूलविक्रीडीत)
कालापव्यय व्यर्थ कारणवशात्
होवोनि तत्कारणे
गेलो तैलरथा मुकोनि नशिबी
येई महाचालणे
मार्गी कंटकयुक्त शाख तरुची
तैसी क्षते वीवरे
हाटाया श्रम कंठशोष अवघा पाणी पिणे हे बरे
☆
☆ बाज वामन पंडितांचा – ☆
(दिंडी)
कटिक वेगे देखिली दूर जाता
निबिड कांतारी मार्ग लुप्त होता
मनी केला निर्धार चालण्याचा
समय वाचविण्या त्वरे धावण्याचा
(शिखरिणी)
प्रयत्ने धावावे, पद पळविता
मार्गहि सरे
श्रमतिल बहु कष्टे चरण अणि की
शक्तिहि नुरे
तृषेने कंठासी बहुत पडता
शोषहि जरी
मुखे लावोनीया सुगड अवघे
रिक्तच करी
☆
☆ बाज मोरोपंतांचा – ☆
(आर्या)
समय अलक्षित होता
चुकला वाहनप्रबंध जो केला
श्रम शमण्यासि जलाचा
प्राशन केला संबंध तो पेला
बाज रामदास स्वामींचा
वाहन चुकता रडू नये
बोल नशीबा लावु नये
एक्या जागी थांबु नये
प्रयत्न कधिही सोडु नये
सदा सर्वदा राम डोळा दिसावा
पथाच्या वरी वीवरीही पहावा
खडे आणि कांटेहि त्या राघवाचे
अरे मन्न घ्यावे सदा नाम वाचे
बहू चालता तैल लावे पदासि
बहू शोषता कंठ प्यावे जलासी
श्रमे भागताही करी फक्त तर्क
करी ना उपायासि तो येक मूर्ख
☆
☆ बाज विंदांचा – ☆
हा रस्ता अटळ आहे
खड्ड्याशिवाय, चिखलाशिवाय‘
काट्याशिवाय, श्रमाशिवाय
उखडलेल्या खडीशिवाय
वितळलेल्या डांबराशिवाय
जिवंत प्रेते, मर्तिक जीव
पाहू नको, डोळे शीव
गर्दीमधल्या गाड्या चुकवुन
धडधाकट घरी पोचलास
डोके, हात, पाय शाबुत
राखुन अख्खा शिल्लक ऱ्हायलास
श्रमक्षुधा शमनासाठी
लोटाभर पाणी प्यायल्यास
इतके यश तुला रगड
माझ्या मना बन दगड
बाज मर्ढेकरांचा
पाय चालुनी फुटक्या दमले
दुखरे रस्ते, माज माजले
चावत बसलो नुसतिच काडी
कधिची सुटून गेली गाडी
शिशिरर्तूने गळले पान
करूनिया निजलो जलपान
☆
☆ बाज मंगेश पाडगांवकरांचा – ☆
(वात्रटिका)
बसगाडी
एखाद्या वात्रट पोरीसारखी
माझ्याकडे बघून हसली
दांत काढून कवटाळिण मग
नाक खाजवत निघून गेली
सरळ चालत सुटलो झपझप
अर्ध अंतर चालून आलो
मोडकी बस रस्त्यात दिसता
हुर्यो करून भरपूर हसलो
घरासि येता व्याकुळ जीवा
लोट्यात मोडकी गाडी दिसली
चावून चावून पाणी प्यालो
भली मोठी खोड मोडली
☆
☆ बाज – ग्रेसांचा – ☆
ती गेली तेव्हा मणभर
धूळ उडाली होती
डोळ्यास पाठमोरी
जातांना दिसली होती
रस्त्यातच गमले मजला
खस्त्यांची धुळकट वाट
खोलित एकटा माझ्या
पाण्याचा लोटा होता
पोचताच दिसला लोटा
उघडाच रिकामा होता
ज्यातून मिळावे पाणी
तो नळहि नागडा होता
☆
श्री सुहास सोहोनी
मो ९४०३०९८११०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
पूर्वीच्या काळी इतक्या सुरेख चालीरीती होत्या की ज्या आजच्या पिढीला माहीतही नसतील. त्यासाठीच ही पोस्ट सिरीज !! बाकी रिवाजाबद्दल नंतरच्या भागात सांगेलच पण आज सांगतोय…. साडीची घडी मोडायला देणे…. या संकल्पनेबद्दल !
या नावातच त्याचा अर्थ आहे. म्हणजे असं की, एखाद्या महिलेने तिच्या स्वतःसाठी नवी साडी घेतली असेल तर लगेच ती स्वतः नेसायची नसते. तर आपल्या जवळच्या एखाद्या दुसऱ्या स्त्रीला ती नवीकोरी साडी देऊन म्हणायचं असत की, “घे ग हि नवी साडी….. घडी मोडायला दिलीय” आणि मग त्या दुसऱ्या स्त्रीने ती नवी साडी स्वतः एक दिवस नेसून (वापरून) मग जिची साडी आहे तिला दुसऱ्या दिवशी परत द्यायची. अर्थात परत देताना बहुतेकवेळी ती दुसरी स्त्री तिच्या घरी काही जे गोडधोड असेल ते डब्यात भरून त्यासह ती साडी परत द्यायची….. अशी साधारण हि प्रथा होती.
अर्थात यामागे खूप चांगले आणि विविध अर्थ दडलेले आहेत. ज्यावर फारस कुणी कधी बोललं नाही. आपली संस्कृती ज्या मुख्य खांबावर टिकली आहे तो म्हणजे, त्याग !! आपल्या अत्यंत आवडीचं जे काही असेल ते आधी दुसऱ्याला देणे…. हि संस्कृती आहे. तीच बाब साडीबद्दल होती. स्त्रियांना आजही साडी म्हणजे जीव की प्राण असतो. भले बाकी वेस्टर्न आऊटफिट, पंजाबी सूट, लेहेंगा इत्यादी रूढ झाले असतील तरी आजही वस्त्र म्हटलं की स्त्रियांना साडी हाच पहिला प्रेफरन्स असतो. विशेषतः सणावाराला, लग्नसमारंभाला *”साडी इज मस्ट” कारण…. “साडी इज मस्त”*
आपल्यासाठी घेतलेली नवी साडी दुसरीला एक दिवस का होईना वापरायला देण्यामागचे मानसशास्त्रीय कारण आहे. ते म्हणजे, आपलं चांगलं ते इतरांना दिलं तर त्यांच्याकडूनही नंतर चांगलं आपल्याकडे येते. इतरांना आनंद दिल्याने आपला आनंद वाढतो. कारण तिथेही कर्मा रिटर्न्स असतात. जे द्याल ते परत येणार आहे. मग आनंद द्यायला शिकूया न ! असं “साडीची घडी मोडणे” शिकवते.
घडी मोडणे याचा निव्वळ अर्थ म्हणजे नवी साडी उघडणे (घडी उघडली की तो मोडली गेली या अर्थाने) म्हणजे थोडक्यात उदघाटन करणे.
जसे एखाद्याने नवीन दुकान टाकले. आणि त्याचे उदघाटन त्याच्या गुरूच्या हस्ते अथवा वडीलमाणूस कोण असेल त्याच्या हस्ते केले तर त्यावेळी मालकाच्या खुर्चीत पहिल्यांदा बसायचा मान त्या उद्घाटन करणाऱ्याला दिला जातो. जणू थोडा वेळ का होईना त्या दुकानाची जणू “मालकीचं” त्या उदघाटकाला प्रेमाने प्रदान केली जाते.
अगदी तसेच साडीची घडी मोडणे म्हणजे साडीच्या वापरण्याच्या उद्घाटनाचा मान आवडीच्या दुसऱ्या व्यक्तीला देणे… अशी ती प्रथा ! ज्यातून एकमेकाबद्दल प्रेम वाढीव राहते, मैत्र भाव वाढीव राहतो त्याचवेळी साडीच्या मालकिणीला “त्याग” भावना पण नात्यात महत्वाची असते हेही नकळत शिकवून जाते…. अशी हि साडीची घडी मोडणे परंपरा !! किती छान न !!
यामागे अजून एक कारण असावे (असं मला वाटत) ते म्हणजे आपली साडी आपल्या अंगावर कशी दिसते हे पाहण्यासाठी त्याकाळी सगळ्याच्या घरी पूर्ण मोठ्या आकाराचे (फुल साईज मिरर) आरसे नसायचे. मग ती साडी नेसल्यावर नेमकी कशी दिसते हे आपल्याला कसे कळणार? म्हणून मग ती साडी दुसरीला नेसायला द्यायची व तिच्या अंगावर आपली साडी पाहून आपण अंदाज घ्यायचा की…. “अरेच्या अशी दिसतेय का साडी? दुकानात नीट अन्दाज आला नव्हता. आता कळल….. नीट !! छान दिसतेय की” असं स्वतःला म्हणायच.
दुसरं अजून एक कारण असेल असं मला वाटत. अर्थात त्यात थोडा स्वार्थी खोडकरपणा दडलेला आहे. तो म्हणजे, एखाद्या साडीच्या धाग्याची ऍलर्जी असं नाही पण नेसल्यावर शरीराला इतर काही अडचण होते का? खाज वगैरे होते का? हे आपल्याला कस कळणार? मग अशावेळी ती दुसरीने नेसलेली जी व्यक्ती असते ती मग त्या साडीचे काही ड्रॉ बॅक असतील तर मालकिणीला त्याबद्दल सावध केलं जात असेल. उदा. बाई ग, साडी छानच आहे पण धुतल्यावर कशी निघेल माहित नाही पण आता तरी अंगाला कडक वाटतेय…. कमरेवर काचतेय इत्यादी इत्यादी जे काही असेल ती दुसरी स्त्री मग मालकिणीला हे सांगून तिला पुढं काय काळजी घ्यायची हेही मार्गदर्शन करत असेल असं मला वाटत.
पण ओव्हरऑलच आपली साडी दुसऱ्याला नेसायला देऊन मग आपण नेसणे हि प्रथा जितकं प्रेमाच प्रतीक आहे तितकंच त्यागाचं प्रतीक आहे असं मला वाटत. तर अशी हि साडीची घडी मोडायला देण्याची प्रथा….
जी आता लुप्त होत जातेय असं वाटत. अर्थात अजूनही काही स्त्रिया हि प्रथा हा रिवाज जपताना आढळतात. माझ्याही पाहण्यात आहेत अशा स्त्रिया ! मात्र ते प्रमाण वरचेवर कमी होत जातेय हे नक्की !
असो… कालाय तस्मेय नमः !!
डॉ. डीडी क्लास : आताच्या पिढीला हे कदाचित माहित नसेल म्हणून सांगितलं आणि चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच्या महिलांना त्या सगळ्या जुन्या आठवणी आठवतील म्हणून हि पोस्ट ! आता मुळात सर्रास फक्त साड्या वापरणं हेच कमी झालं आहे. इतर ड्रेसेस आल्याने. मात्र साडी हा एकमेव प्रकार आहे जो “साईज”च्या बंधनात नाही. त्यामुळे कुणाचीही साडी दुसरी कुणीही नेसू शकते. तसे ड्रेसेस मध्ये होत नाही.
घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव (म्हणजे ड्रेस साईज) वेगळे !!
त्यामुळे जशी साडीची घडी मोडायला दिली जायची तशी आता ड्रेसची घडी मोडायला दिल्याचे मला तरी ऐकिवात नाही बुआ !
मात्र पूर्वीच्या काळची ती “घडी मोडायला देणे” प्रथा खरेच सुंदर होती. ज्यामध्ये गरीब श्रीमंत, उच्च नीच असा कोणताही भेद नसायचा. प्रेमाच्या एकाच पातळीवर दोघी स्त्रिया यायच्या. हे जास्त मोलाचे वाटते.
असो.
धन्यवाद ! भेटूया पुढच्या भागात अशाच एका वेगळ्या पण लुप्त होत जाणाऱ्या रिवाजाबद्दल !
या कवितेत विचारल्या गेलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं शोधताना प्रसिद्ध मानसशास्रज्ञ एरिक एरिक्सन यांचं मुलांसंदर्भातलं एक वाक्य वाचनात आलं. ते म्हणतात, “मुलं म्हणजे केवळ होणारे प्रौढ नसतात, तर ती स्वत: एक पूर्ण व्यक्तिमत्त्व असतात. त्यानाही आदर, न्याय आणि प्रेमाची गरज असते. ” तर नेल्सन मंडेला म्हणतात, “समाज कसा आहे हे पाहायचं असेल, तर त्या समाजातील मुलांशी कसं वागलं जातं हे पाहा. “
एरिक एरिक्सन आणि नेल्सन मंडेला यांच्या या विचारांनुसार, बालकांचं कल्याण हा मानवी विकासाचा पाया आहे. बालकांच्या कल्याणात जगणं, सुरक्षितता, विकास आणि सहभाग यांचा हक्क समाविष्ट आहे. या हक्कांवर संयुक्त राष्ट्रसंघाचा करार आधारित आहे. या करारावर इतर अन्य देशांसह भारताचीही स्वाक्षरी आहे. याचा अर्थ भारताने संयुक्त राष्ट्र संघासमोर जागतिक स्तरावर करारातील बालहक्कांची अंमलबजावणी भारतात केली जाईल याची हमी दिली. त्यानुसार बालहक्क संरक्षण आयोग, बालमजुरी प्रतिबंधक कायदा, शिक्षण हक्क कायदा अशा राष्ट्रीय धोरणांमधे अनुकूल बदल केले. बालकांचे हक्क जपणे, कायद्याने त्याची अंमलबजावणी करणे आणि जागतिक स्तरावर त्याची जबाबदारी स्वीकारणे ही बांधलकी जपण्याचं आव्हान भारताला पेलावं लागतं. त्यामुळं बालकल्याणासाठी भारताला युनिसेफ सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून आर्थिक मदतीबरोबरच वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन, प्रशिक्षण असे तांत्रिक म्हणजे बालकांच्या सुरक्षिततेसाठीची धोरणं, कायदे याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मदत मिळते.
भारतात बालहक्क संरक्षण आणि संवर्धनाचं काम राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोग, राज्य बालहक्क संरक्षण आयोग, महिला आणि बालविकास विभाग, बालकल्याण समिती, बाल न्याय मंडळ, चाईल्डलाईन या शासकीय आणि बिगर शासकीय संस्था कार्यरत आहेत. त्याचबरोबर युनिसेफ, सेव्ह द चिल्ड्रन, केअर इंडिया, क्राय, बालग्राम या आंतरराष्ट्रीय आणि बिगर शासकीय संस्था कार्यरत आहेत.
बालकांच्या कल्याणाकडे जगभरातील देश कमी अधिक प्रमाणात अशाच प्रकारे लक्ष देत आहेत. तरीही बालकांच्या समस्या वाढतच आहेत. भारतात तर भविष्यात या समस्यांचा महापूर येईल की काय अशी परिस्थिती संभवते आहे. त्यासाठी बालहक्क समजून घेऊ या.
बालकांचे हक्क – प्रत्येक बालकाला सन्मानाने जगता येणे. उत्तम आरोग्य, लसीकरण, स्वच्छ पाणी, योग्य आणि पुरेसा पौष्टीक आहार, शारीरिक – मानसिक विकासासाठी आवश्यक वातावरण मिळणे. बालकांना भावनिक, लैंगिक आणि आर्थिक शोषण तसेच बालमजुरी, बालविवाह, मानवी तस्करी, पालकांचे दुर्लक्ष, शारीरिक मारहाण, मानसिक छळ यापासून सुरक्षित ठेवणे. विशेष बालकांना विशेष संरक्षण मिळणे. मोफत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळणे. प्रत्येकाला उच्च शिक्षणाची संधी मिळणे. स्वत:ची भाषा, संस्कृती जपणे, मत व्यक्त करण्याची संधी असणे. निर्णयामधे सहभागी करून घेणे अशा प्रकारचे बालहक्क आहेत.
भारतासमोरील आव्हानं – बालमजुरी आणि बालतस्करी, शिक्षणापासून वंचित मुलं, बालमृत्यू, शिक्षणाचा दर्जा हे विषय चिंता वाढवतात. सरकारी योजना आणि कायदे गरजूंपर्यंत पोहोचवणे, बालकांच्या मानसिक आरोग्यासाठी पुरेशी यंत्रणा उभी करणे, मुलांना त्वरीत न्याय आणि संरक्षण देणे. सरकारी संस्थांमधील कर्मचार्याना प्रशिक्षण देणे. डिजिटल व्यसनाधिनता कमी करणे.
गंभीर आकडेवारी – (अलिकडची आकडेवारी बदललेली असू शकते.)
१) युनिसेफच्या २०२१ च्या अहवालानुसार भारतातील १५ ते २४ वयोगटातील दर सात पैकी एकाला नैराश्यग्रस्त वाटते. हे प्रमाण १४ % आहे.
२) २०११ च्या जनगणनेनुसार, देशात १ कोटी १ लाख बालकं मजुरी करतात.
३) आयुष्यातील जवळपास ५०% मानसिक आरोग्य समस्यांची सुरूवात वयाच्या १४ वर्षाच्या आतच होते.
४) राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार ३३. ३% बालविवाह होतात.
५) राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार, पाच वर्षाखालील ३५. ५% बालकांची वाढ खुंटलेली आहे.
६)युनिसेफच्या अंदाजानुसार, भारतात साधारणपणे अंदाजे ६७, ३८५ बाळं दररोज जन्मतात. म्हणजे दर मिनिटाला ५६ बाळांचा जन्म होतो.
पालकांची जबाबदारी – बालहक्क करारामधे पालकांचे कर्तव्य आणि मार्गदर्शक नियम सांगितले आहेत. मुलांचं सन्मानानं जगणं, त्यांचा विकास आणि संरक्षण यासाठी आवश्यक अशा सर्व गोष्टींची जबाबदारी पालकांचीच असते. ती त्यानी घ्यावी आणि मुलांच्या विकासावर भर द्यावा.
१) मुलांचे सर्वोत्तम हित जपणे – पालक स्वत:च्या सोयीनुसार मुलांकडे लक्ष देतात. त्यांचं मुल ही त्यांची प्रतिष्ठेची बाब असते. मुलांना महागडी शाळा, महागड्या वस्तू, महागडी शिकवणी मिळवून देतात. सतत त्याने काहीतरी शिकत राहावं म्हणजे जास्त शिकेल ही त्यांची भावना असते. मुलांना स्वत: वेळ देत नाहीत. त्यांना स्वत:चा वेळ मिळू देत नाहीत. मुलांचे सर्वोत्तम हित जपायचे असेल तर त्यांना ‘वस्तू नाही, वेळ देण्याची गरज आहे. तसा गुणात्मक वेळ देणं, त्यांना मनसोक्त खेळू, बागडू देणं हे अपेक्षित आहे.
२) प्राथमिक जबाबदारी – पौष्टीक अन्न, पुरेशी वस्त्र आणि सुरक्षित निवारा देणे, गरजेनुसार वैद्यकीय उपचार मिळवून देणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असल्याची खात्री करणे, सामाजिक विकासासाठी प्रयत्न करणे, त्यांच्या जबाबदार्यांची जाणीव करून देणे या प्राथमिक जबाबदार्या पालकांनी पार पाडाव्यात.
३) सामायिक जबाबदारी – आई आणि वडील दोघेही बालकाच्या सर्वांगिण विकासासाठी तितकेच जबाबदार असतात. त्यामुळे दोघानीही बालकाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. अलिकडच्या पालकांमधील वाढत्या घटस्फोटामुळे बालकांचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. त्या समस्या सामंजस्याने सोडवणे गरजेचे आहे.
४) संरक्षण आणि सुरक्षितता – मुलांच्या बोलण्या – वागण्याकडे, त्यांचे शारीरिक मानसिक छळ होत असेल तर त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवं. त्यांच्या भावनिक गरजांची पूर्तता घरातूनच होत असते हे लक्षात घ्यायला हवं. मुलांना प्रेम, प्रेमाचा स्पर्श पालकांकडूनच मिळणं अपेक्षित आहे.
५) शासकीय योजनांच्या मर्यादा – शासकीय योजना या मुलांच्या विकासासाठी बाहेरून सहकार्य करतात. पण पालकच त्याची अंमलबजावणी करू शकतात. शासन शैक्षणिक मदत, पोषण आहार, गणवेष, पाठ्यपुस्तकं, समुपदेशन सेवा, कायदा आणि सुरक्षा देतं. पण नैतिक मूल्ये, भावनिक शिक्षण, सामाजिक कोशल्ये शिकवणे, समुपदेशकाकडे मुलाना घेऊन जाणे, त्याना सुरक्षित घर देणे, प्रेम, आपुलकी, आनंद या भावना देणं पालकांची जबाबदारी आहे.
बालकांचं भविष्य – भविष्यात बालकांच्या मानसिक आरोग्य समस्येत वाढ होईल. मानसिक आरोग्याशी झगडणार्या व्यक्तींमधे भारत जगात पहिल्या क्रमांकावर असण्याची शक्यता आहे. नैराश्य, पॅनिक अॅटॅक, सायबर बुलिंग, गेम्सचे व्यसन, सोशल मिडिया व्यसन, वर्तन समस्या, आक्रमकता, चिडचिडेपणा, एकाग्रतेचा अभाव, झोप – भूक कमी होणे याचे प्रमाण वाढेल. तरूण वयातील आत्महत्याचे प्रमाण वाढेल. शिक्षण आणि नोकरी व्यवसायातील उत्पादकता कमी होईल.’
उपाययोजना – प्रत्येक शाळेत तज्ज्ञ समुपदेशक असावा. भावनिक संतुलन आणि ताण व्यवस्थापन असे विषय अभ्यासक्रमात घ्यायला हवेत. पालकत्त्व कार्यशाळा शाळाशाळांमधे व्हाव्यात. मुलांमधील संभाषण कौशल्य, निर्णय क्षमता, व्यवहार कुशलता यांच्या विकासासाठी प्रयत्न व्हावेत. ‘सुरक्षित स्पर्श – असुरक्षित स्पर्श कार्यशाळा’ सक्तीच्या व्हाव्यात. मानसिक आरोग्याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती व्हावी. मानसिकता बिघडल्यास तो एक सामान्य आजार आहे हे लक्षात घेऊन गरजेनुसार उपचार द्यावेत. मुलांना भरपूर वाचन करू द्यावे. भरपूर खेळू द्यावे. अपेक्षांचे ओझे टाळावे. कुटुंबातील संवाद वाढवावा. आपल्या आजूबाजूला बालमजूर किंवा मुलांवर अत्याचार होताना दिसले तर चाईल्डलाईन – १०९८ या नंबरवर संपर्क साधावा. चूक बरोबर याची जाणीव करून द्यावी. बालदिन समाजाला त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणारा ठरावा.
भारतातील बालमन असं कोमेजलं तर भारताचं मानसिक आरोग्य धोक्यात येईल. मुलं जशी देवाघरची फुलं असतात तशीच ती राष्ट्राचं भविष्य असतात. ही फुलं कायमची टवटवीत ठेवू शकत नसलो तरी ती पटकन मान खाली टाकणार नाही, कमरेतून वाकणार नाही, खांद्याला बाक येवू देणार नाही, पाय वाकडा पडणार नाही, स्वत:चं अस्तित्त्व विसरणार नाही याची काळजी तर घ्यावीच लागेल ना. बालकांविषयीची ही सगळी काळजी वाटण्याचं कारण म्हणजे २० नोव्हेंबर रोजी ‘जागतिक बालदिन’ साजरा करू. नुकताच १४ नोव्हेंबर रोजी ‘राष्ट्रीय बालदिन’ साजरा केला. यादिवशी मुलांना भेटवस्तू दिल्या जातात. त्यांच्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन केलं जातं. पण मुलांसाठी एकच दिवस आनंदाचा आणि वर्षातील ३६४ दिवस शारीरिक कष्टाचे, मानसिक ताणतणावाचे असतील या दिनाचा दिखावा करून काहीही साध्य होणार नाही. ‘देवाघरची फुलं’ या कवितेतील प्रश्नांची उत्तरं मिळणार नाहीत. म्हणून बालदिन कितीही जोमात साजरा केला तरी बालमन धोक्यात आहे याकडे लक्ष द्यावंच लागेल.
Operation Bahadur!! Indian Army’s another rescue Operation!!
अथांग सिआचीन… जणू बर्फाचा महासागर. पलीकडे शत्रू.. कधीही सीमा ओलांडून इकडे पावलं वळवेल सांगता यायचे नाही. इथं पहारा देणं म्हणजे प्रत्येक क्षणी मरणाशी हस्तांदोलन. शत्रूच्या गोळीपेक्षा इथल्या वातावरणाचा धोका अधिक. आणि तरीही इथेच बर्फात पाय रोवून उभे ठाकावेच लागते!
आपल्या सहका-यांशिवाय माणसं इतर माणसं नजरेस पडत नाहीत कित्येक महिने. हल्ली तरी आधुनिक संपर्क साधने आहेत हाताशी आहेत, हे बरे!
इथे आमची एक पोस्ट अर्थात पहारा चौकी स्थित आहे. अनेक समस्यांना तोंड देत आम्ही इथे टिकून राहतो. डबाबंद अन्न कित्येक दिवस खावे लागते. रसद घेऊन येणारे हेलिकॉप्टर कित्येक वेळा खराब हवामानामुळे पोहोचूच शकत नाही. मग आम्ही इथे सोबत शोधतो… प्राण्यांची. कुत्रे सोबत करतात. त्यांची खूप मदतही होते. एकेरात्री कुत्री जोरदार भुंकू लागली… पहा-यावरील शिपाई आणखी सजग झाले… अंधारातून काही आकृत्या पोस्टकडे येताना दिसल्या…. बारकाईने पाहिले… हिमालयीन अस्वलांचे एक कुटूंब आले होते… अन्नाच्या शोधात. प्रचंड बर्फात त्यांना अन्न मिळणे दुरापास्त झालेले असावे. आम्ही आमच्याकडचे खाद्यपदार्थ त्यांच्यासाठी पोस्टपासून थोड्या दूर अंतरावर ठेवायला सुरुवात केली… आणि मग हे कुटुंब अधून मधून रात्रीचे येत राहिले.. आमच्याकडून यांना धोका नाही अशी त्यांची खात्री पटल्यावर तर हे दिवसाही येत.
यांच्यात एक साधारण एखाद्या वर्षाचे वय असलेले एक पिल्लूही असे. पण गेली सहा महिने झाले.. हे एकटेच येई. कदाचित त्याची आई त्याला सोडून गेली असावी किंवा हेच वाट चुकले असावे!
एके दिवशी हे पिलू पोस्टजवळ आले.. तेंव्हा मोकळा असलेला कुत्रा जोरदार त्याला काही जवळ येऊ देईना. आम्ही त्या कुत्र्याला बांधून ठेवले… तेंव्हा कुठे स्वारी जवळ आली… निवांतपणे खाल्ले आणि निघून गेले.. आईच्या शोधात!
…. आम्ही त्याचे नाव ‘बहादूर’ ठेवले… आमच्या सैन्य तुकडीचे अर्थात कंपनीचे नाव ‘बहादूर’ होते म्हणून… गंमतीने!
पुढे कित्येक दिवस ‘बहादूर’ आलाच नाही.
आमची एक पोस्ट कित्येक दिवस संपर्कक्षेत्राच्या बाहेरच असे… साठ साठ फूट बर्फ साठल्यावर तिथे पोहोचणे अशक्यच असे. आमच्या कंपनी-हेडक्वार्टर पासून ही पोस्ट ८०० मीटर्स दूर होती…! इथे एक मीटर चालायला कित्येक मिनिटे लागतात… हे लक्षात घेतल्यावर ८०० मीटर्स किती मोठे अंतर असेल, याची कल्पना करा! या पोस्टवरून एक संदेश आला… बहादूर दिसतो आहे… पण त्याचे तोंड पत्र्याच्या डब्यात अडकलेले दिसते आहे… कित्येक दिवस खाणे मिळू न शकल्याने त्या पिल्लाने त्याला दिसलेल्या रिकाम्या डब्यात तोंड घातले आणि त्याचे तोंड अडकले…. आणि निघेचना. ते असेच भुकेले फिरत राहिले…. कुठे जावे ते दिसत नसताना!
‘बहादूर’ला वाचवले पाहिजे… ’मिशन बहादूर रेस्क्यू’ सुरु करावे… मी माझे सहा जवान सोबत घेतले. तिथल्या त्या परिस्थितीमध्ये जवानांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मनात होताच.. नाही असे नाही. पण ‘बहादूर’ची सुटका करणेही महत्त्वाचे वाटत होते!
‘बहादूर’ ज्या जागेत गोल गोल फिरत होता… ती जागा म्हणजे एक cornice होते…. डोंगराच्या अगदी टोकावर साठलेला बर्फ टणक बनतो… त्या डोंगराचा हा एक भागच दिसू लागतो… दरीच्या बाजूला असणारा. पण टणक दिसत असला तरी फारसे वजन पेलू शकत नाही…. यावर उभे राहिले.. पाय निसटला…. तिथून खाली कोसळले की शेकडो फूट खाली दरीत कोसळणे साहजिकच. आणि हा बर्फाचा मोठा तुकडा तुटून पडला तर मोठे हिमस्खलन होऊ शकते… avalanche!
यामुळे ‘बहादूर’ पर्यंत पोहोचणे आव्हानत्मक होते. मी माझ्या तुकडीतील सैनिकांपैकी एक अंगाने सडपातळ सैनिक निवडला… त्याच्या कमरेला दोर बांधला… ’बहादूर’ला गाठून त्याच्या गळ्याभोवती एक दोर बांध असे त्याला सांगितले. पण त्याला काही ‘बहादूर’ काबूत येईना. मग मी त्याला मागे बोलावले आणि मी स्वत: कमरेला दोर बांधून त्या cornice वर काळजीपूर्वक चालत गेलो…. जवळ गेल्यावर गुडघ्यांवर सरपटत, आवाज न करता ‘बहादूर’च्या जवळ पोहोचलो. पिल्लू असले तरी त्याचे वजन भरपूर होते… त्याने फार जोरात हालचाल केली आणि बर्फ तुटला तर आफत येणार होती! मी त्याला हळूहळू खेचत मागे आलो…. आम्ही त्याला ‘बहादूर’ अशी हाक देत असू तेंव्हा तो कुठे असेल तिथून आमच्याकडे येत असे… या ओळखीचा फायदा झाला! ‘बहादूर’ एकदाचा तिथून मागे आला… पण त्याला आवरायला आम्ही सर्व कामाला लागलो…. पायांखाली दोन-तीन फुटांचा बर्फ.. त्यात ‘बहादूर’ला काही दिसत नसल्याने टो भेलकांडत होता. त्याला आमच्या पोस्टमध्ये आणले… आणि मग मिळेल त्या साधनांनी जणू सर्जरी सुरु झाली. अत्यंत काळजीपूर्वक तो पत्रा कापून काढला…. तासाभराने हे ऑपरेशन पूर्ण झाले.. आम्ही या पाहुण्याला व्यवस्थित खाऊ घातले…. ’डर मत यार.. आरामसे बैठ के खा! ” असे आम्ही म्हणालो तेंव्हा त्याने आमच्याकडे पाहिले… खाऊन झाल्यावर “आता जा” म्हणालो! स्वारी तीन तास आमच्या पोस्टवरून जायला तयारच नव्हती! यानंतर ‘बहादूर’ जणू आमच्याच कंपनीचा सदस्य असल्यासारखा जवळपास वावरतो… आमच्या कुत्र्यांनीही त्याची सोबत स्वीकारली आहे!
ही गोष्ट वाचताना वाचकांना… आपले सैनिक कोणत्या वातावरणामध्ये सियाचीन मध्ये राहतात, कोणत्या प्रकारच्या निवासात… जीवघेण्या थंडीला तोंड देत कसे राहतात… याची जाणीव व्हावी! भयावह वातावरणात आपले मनोबल टिकवून ठेवणे ही तर फार मोठी गोष्ट आहे. इथे ड्यूटी करण्यासाठी सैनिक अधिक मजबूत असावा लागतो… किंबहुना ही ड्यूटी त्याला आणखी मजबूत बनवते.
काही ठिकाणी सरासरी ३५ फूट बर्फवृष्टी होत असते. आणि पारा शून्याच्या खाली ५० पर्यंत घसरतो. आणि हा परिसर ७०० किलोमीटर्स एवढा विशाल आहे.. आणि सीमा ७४ किलोमीटर्स. इथे ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस सैनिकाला ठेवत नाहीत. ‘बाणा’ पोस्टवर हा कालावधी ३० दिवसांचा आहे… दर सहा महिन्यांनी इथे सैन्य तुकड्या बदलल्या जातात….
साधारणपणे दर महिन्याला सरासरी दोन सैनिक इथे प्राणांस मुकतात… बर्फाचे कडे कोसळणे, हिमस्खलन, वाहने दरीत घसरून पडणे, वाहनांवर कडे कोसळणे अशा घटना कोणत्याही क्षणी घडतात… पण असे असूनही आपले बहादूर आपल्या देशासाठी इथे ठाम उभे असतात!
— — (एका सैन्य-अधिका-याने ही ‘बहादूर’कथा त्यांचे नांव उघड न करता, ठिकाण उघड न करता सामान्य लोकांना तेथील वास्तवाची जाणीव व्हावी, या उद्देशाने पाठवली आहे. उमाताई कुलकर्णी यांच्या पेजवर मी ही कथा वाचली… पाहिली.. अनुभवली आणि मूळ इंग्रजीत असल्याने मराठीत जमेल तेव्हढी भाषांतरीत केली. आकडेवारी सदोष असू शकते.)
☆ नदी आपली वाट विसरत नसते….!!!!– लेखक : डॉ. नानासाहेब थोरात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
२६ जुलै २००५ च्या महाप्रलयानंतर मुंबईकरांना आणि महाराष्ट्राला समजले कि मुंबईत मिठी नावाची नदी आहे.
मी ९ वर्षे कोल्हापुरात राहिलोय. शेकडो वर्षांपासून कोल्हापूरच्या मध्यातून एक छोटी नदी वाहत होती. हळू-हळू तिच्या दोन्ही तीरावर अतिक्रमण करून, घर-दुकान बांधून, लोकं एवढ्यावरच थांबली नाहीत, तर सगळ्या कोल्हापूरची गटार त्यामध्ये आणून सोडली आणि नदीचच नाव बदलल “जयंती नाला” २०१९ आणि २०२१ मध्ये याच जयंती नाल्यान निम्मं कोल्हापूर चार दिवस पाण्यात बुडवलं होत. माणसांनी नदीचा नाला केला म्हणून नदी स्वतःच अस्तित्व विसरत नाही. तीच अवस्था चेन्नईची. चाळीस तलावांना जोडणारी एक छोटीसी नदी चेन्नईतून जाऊन पुढे समुद्राला मिळत होती. हपापलेल्या माणसांनी चाळीस तलाव मुजवून सिमेंटची जंगल उभा केली एवढयावरच थांबली नाहीत तर चेन्नईतील नदीचं गायब केली. एका दिवसाच्या पावसानं नदी आणि तलावांनी मिळून चेन्नई पाण्यात बुडवली. जोडीला विमानतळावरची विमान बदकासारखी पाण्यावर पोहायला सुद्धा लावली. हीच अवस्था पुण्याची झाली आहे. मुळा-मुठा नद्यांपेक्षा युरोप-अमेरिकेतील गटार मोठी असतील अशी अवस्था या नद्यांची पुणेकरांनी केली आहे. गेल्या सहा-सात वर्षांपासून पावसाळ्यात एकदा तरी पुणेकरांच्या घरी या नद्या राहायला येतात आणि चांगलेच भाडे देऊन जातात.
खरंतर नदी आपल्याकडं राहायला येत नाही आपणच नदीत जाऊन राहिलोय.
गेल्या वर्षी पावसाळ्यात मी कुर्डुवाडीच्या पुढे जाताना एक बोर्ड पहिला “सीना नदी” बाजूला बघितले तर ऐन पावसाळ्यात कोरडाठाक पडलेला ओढाच वाटला तो. मनात विचार आला याला नदी का म्हणत असतील, उजाड माळरानागत दिसणारे पात्र याचा काय फायदा शेतीला? आज त्याच नदीन सोलापूर जिल्ह्यातील तीन लाख एकर शेती पाण्यात बुडवली आहे.
हीच अवस्था धाराशिव आणि बीड, जालना, नगर जिल्ह्यातील छोट्या नद्यांनी सातशे गावातील लोंकाची केली आहे. जीव मुठीत घेऊन जगायला लावलंय त्यांना. बीड, जालना, नगर, सोलापूर ते सातारा-सांगली पट्ट्यात कोरड्या दुष्काळाचे आगार असणारे अनेक तालुके आज ओल्या दुष्काळाच्या पुढे निघून गेले आहेत.
एका व्हिडिओत पहिले एका आजीचे सगळे घर पुरात वाहून गेले. पुढे ती सांगत होती या घरात आम्ही दोघीच राहायचो मी आणि माझी मुलगी. माझा मुलगा आणि या मुलीचा नवरा दोघेपण मेलेत, मुलीला पोरंबाळं पण नाहीत. रोजंदारी करून जगतोय आम्ही…. आता कुठं राहायचं?
तर दुसऱ्या एका व्हिडिओत पहिले, नेहमी तोऱ्यात बोलणाऱ्या एका माजी मंत्र्यांच्या जहागिरीत नदी राहायला आली होती. त्यांच्या दरातील फॉर्च्युनर पाण्यावर तरंगत होत्या.
निसर्ग वेळ आली कि गरीब श्रीमंत काही बघत नाही. पण मला नेहमी वाटत निसर्गपण स्वार्थी असतो श्रीमंतावर अन्याय करतो पण गरिबांवर तो ज्यास्तच अन्याय करतो. दारात बसून रडणारी आज्जी आणि शेतकऱ्याच्या गोठयात दाव्यासहित मेलेली जनावर पहिली कि निसर्गाच्या स्वार्थीपणाची अजूनच खात्री होते.
पण असो… येणारा काळ अजूनच अवघड असणार आहे. गावोगावची हीच अवस्था आज नहितर उद्या होणार आहे.
मागे एकदा कुठेतरी वाचले होते कोकणकड्यातील डोंगरातून वाहत येणाऱ्या नदीचा मार्ग बदलून त्यावरती एक मोठं विमानतळ राज्यात होतंय. भविष्यात ती नदी आपली वाट काढत आली तर? शंभर वर्षानंतर या पावसाळ्यात अशीच एक नदी सोलापूरमध्ये आपली वाट काढत अवतरली आहे. नदीच्या काठाला पिढ्यान पिढ्या गेलेल्या सोलापूरकरांना आता समजलं आपण नदीत राहत होतो. ९९. ९९% सोलापूरकरांना या नदीचं नावसुद्धा माहित नाही.
नदी मांजरीसारखी असते आपली वाट कधी विसरत नसते.
निसर्गाला एवढपण कमी लेखून आपली लोभी साम्राज्यं उभा करता येत नाहीत आणि केलीच तर तो स्वतःच अस्तिव दाखवूनच देतो.
“जंगलात उभं राहिलेल्या मुंग्यांच्या एका वारुळानपण हत्तींना जंगल सोडावं लागत”
☆
लेखक : डॉ. नानासाहेब थोरात
प्रस्तुती – श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ माती भिडली आभाळा… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे☆
नेवासा येथील संत ज्ञानेश्वर मंदिर
(आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा दिवस. त्यानिमित्ताने माझ्या ‘ चांदणे शब्दफुलांचे ‘ या पुस्तकातील लेख.)
‘गारंबीचा बापू’ या चित्रपटात शांता शेळके यांचं एक सुरेख आणि अर्थपूर्ण गाणं आहे.
‘अजब सोहळा, माती भिडली आभाळा…’
रवींद्र साठे यांनी असं काही भावपूर्ण आवाजात गायिलं आहे की मला हे गीत नेहमी गूढ, गंभीर आणि रहस्यमय वाटत आलं आहे. पण त्यातील अर्थ जाणवावा, त्याचा प्रत्यय यावा असाच काहीसा अनुभव परवाच्या दिवशी आला. मी पुण्याहून गावाकडे परत येत असताना नगर-औरंगाबाद रस्त्यावर नेवासे फाटा लागतो. अनेकदा येताना जाताना या गावावरून गेलो आहे. पण परवा सहज मनात आलं की हेच ते नेवासा ना जिथे ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली? आपण कधी गेलो का तिथे? मग ठरवलंच की परत जायला कितीही वेळ होवो, आज आपण तिथे जायचंच आणि त्या पवित्र ठिकाणाचं दर्शन घ्यायचं.
मुख्य रस्त्यापासून आणि नेवासे फाट्यापासून नेवासे गाव साधारणपणे पाच किमी आत आहे. जाताना मध्ये थोडाफार कच्चा रस्ता लागतो. पण माऊलींचं दर्शन घ्यायचं एकदा मनानं घेतलं की रस्ता कच्चा असो की चांगला, सहज पार होतो. गावात शिरता शिरता एकाला विचारलं, ‘ माऊली? ‘ एवढा एकच शब्द पुरेसा होता. त्याने लगेच मंदिराच्या दिशेकडे बोट दाखवलं. माऊली म्हटलं की झालं. कोण माऊली असा प्रश्न पडत नाही एवढी थोरवी त्या एकाच माऊलीची. मंदिराकडे जाताना सुंदर हिरवीगार शेतं मन आकर्षून घेत होती. माऊलींच्या मंदिरासमोरचा परिसर निसर्गरम्य, शांत आणि प्रसन्न भासत होता. मंदिरासमोर चिंचा लगडलेली छान चिंचेची झाडं. झाडाखालीच एक माऊली हार आणि प्रसाद विक्रीसाठी घेऊन बसलेली. तिच्याकडून दोन हार आणि प्रसाद घेतला. कमानीतून मंदिराच्या आवारात प्रवेश केला.
मंदिराचे आवार प्रशस्त, शांत, स्वच्छ अन प्रसन्न. थोड्याशा पायऱ्या चढून मंदिरात पोहोचलो तो भव्य सभामंडप दिसला. पाहतो तो त्यात पंचवीस तीस स्त्री पुरुष ज्ञानेश्वरीचं पारायण करतानाचे सूर कानी आले. त्यामुळे मंदिराचं वातावरण आणखीनच प्रसन्न वाटत होतं. ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील ओव्या कानावर पडत होत्या.
उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।
हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥
*
ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसें ।
हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥
जे जे उपजते किंवा जन्म घेते ते ते नाश पावते. नाश पावलेले पुन्हा दुसऱ्या रूपाने प्रत्ययास येते. सूर्य आणि चंद्राचा उदय अस्त हे अखंडित सुरूच असतात. त्याचप्रमाणे जन्ममरणाचे हे चक्र अविरत सुरु राहते. तेव्हा एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल आसक्ती मनात धरणे आणि तिच्या नष्ट होण्याने शोक करणे व्यर्थ आहे. ‘ या अर्थाच्या या सुंदर ओव्या कानी पडल्या. ज्या ठिकाणी साक्षात माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली, त्याच ठिकाणी तिचे मनन, पठण किंवा पारायण करणारी ही मंडळी किती भाग्यवान आहेत असा विचार मनात आला.
मंदिरात प्रवेश केला की उजव्या बाजूला प्रथम दर्शन घडते ते शिवलिंगाचे. नंतर ज्ञानेश्वरांनी ज्या खांबाला (पैस) टेकून ज्ञानेश्वरी सांगितली तो पैसाचा पवित्र खांब. आणि त्याच्या शेजारी असलेल्या भागात संत ज्ञानेश्वर, जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि ज्यांनी ज्ञानेश्वरी उतरवून घेतली ते सच्चिदानंदबाबा यांच्या सुंदर मूर्ती आहेत.
पूर्वी ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली, तेव्हा या ठिकाणी करवीरेश्वराचे मंदिर होते. तेथील खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली.
शके बाराशे बारोत्तरे । तैं टीका केली ज्ञानेश्वरे ।
सच्चिदानंदबाबा आदरें । लेखकु जाहला ॥
अशी ही तेराव्या शतकात लिहिलेली ज्ञानेश्वरी. काळाच्या ओघात ते करवीरेश्वराचे मंदिर नष्ट झाले पण माऊलींनी ज्या खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली, तो खांब मात्र तसाच राहिला. त्या खांबानं जणू आभाळ पेललं. आभाळ पेलण्याइतका तो उंच झाला. माऊलींनी त्याला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वर म्हणजे आभाळच. ज्ञानेश्वरी म्हणजे सुद्धा आभाळ. इथला खांब हा पृथ्वीवरल्या मातीचेच प्रतीक. पण ही माती ज्ञानदेवांच्या पावन स्पर्शाने एवढी पुनीत, एवढी विशाल झाली की ती आभाळाला भिडली. म्हणून मला शांताबाईंच्या ‘ अजब सोहळा, माती भिडली आभाळा ‘ या गाण्याच्या ओळी आठवल्या.
तो खांब तरी किती भाग्यवान म्हणायचा! अखिल विश्वाला वंदनीय असलेल्या ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचा आधार घेतला. तो त्यांच्या स्पर्शानं पावन झाला. आपली कठोरता त्यानं त्यागली आणि माऊलींच्या व्यक्तिमत्वातली शीतलता, पावित्र्य धारण केलं. महाराष्ट्र ही संतांची भूमी. इथल्या मातीचा कण न कण त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. इथल्या शिळा सुद्धा पवित्र आहेत. गोविंदाग्रजांनी उगीच नाही असे सुंदर महाराष्ट्राचे वर्णन केले! – –
मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा
प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा
नाजूक देशा, कोमल देशा, फुलांच्याही देशा
इथले दगडही पावन आहेत. हा खांब तर एवढा पवित्र की पुढे त्याच्याभोवती मंदिर उभारले गेले. एरव्ही मंदिरात खांब असतात, पण खांबासाठी मंदिर उभारले जावे हा ही एक ‘ अजब सोहळा ‘. त्याचं कारणच तसं आहे. ज्या ज्ञानेश्वरांची पाठ समाधीस्थानीही जमिनीला टेकली नाही, त्याची पाठ या खांबाला टेकली. प्रख्यात लेखिका दुर्गा भागवत आपल्या ‘ पैस ‘ या पुस्तकात त्याबद्दल बोलताना म्हणतात, ‘ ख्रिस्ती धर्म जसा जगभर पसरला, तसा वारकरी पंथ पसरला असता, तर ख्रिस्ताच्या क्रुसाप्रमाणे हा स्तंभही जगभर गेला असता. पण बरे झाले तसे नाही झाले ते. तो इथेच राहिला. वारकऱ्यांना त्याचे दर्शन घ्यायला इथेच यावे लागते. ‘ ज्ञानेश्वरी इथे सांगितली गेली म्हणून वारकरी संप्रदायाचे हे आद्य पीठ आहे.
पण माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितल्यानंतर साधारणपणे तेरा ते एकोणिसाव्या शतकापर्यंत हे अत्यंत पवित्र असे स्थान विपन्नावस्थेत होते. संत ज्ञानेश्वरांची कर्मभूमी असलेले हे स्थान! या स्थानाची लोकांना विस्मृती झाली होती. या स्थानाला उर्जितावस्थेत आणण्यासाठी एखाद्या समर्पित त्यागी साधकाची आवश्यकता होती. आज हे स्थान आपल्याला आपल्याला ऐश्वर्यसंपन्न भासते त्यामागे वारकरी संप्रदायाचे महान उपासक वै. सोनोपंत दांडेकर मामांचे शिष्य ह. भ. प. बन्सी महाराज तांबे यांचे मोठे योगदान आहे.
पैठणहून आळंदीला जाताना ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताबाईंनी या ठिकाणी काही दिवस मुक्काम केला. असे म्हणतात की पैठणला ज्या रेड्याकडून ज्ञानेश्वर माऊलींनी वेद वदवून घेतले, तो रेडा देखील या ठिकाणी त्यांच्या सोबत होता. इथेच निवृत्तीनाथांनी ज्ञानोबा माऊलींना ज्ञानेश्वरी लिहिण्याची आज्ञा दिली. इथेच त्यांना तसे का वाटावं? तर या स्थानाचा महिमाच तसा होता. या ठिकाणी साक्षात श्री विष्णूंनी मोहिनीरूपात दहा दिवस निवास केला होता. त्यांनी निवास केला म्हणून हे ‘ नेवासे ‘ असे म्हटले जाते. त्या मोहिनीराजांचं सुंदर हेमाडपंती मंदिर इथे आहे.
समुद्रमंथनातून जेव्हा चौदा रत्ने बाहेर पडली, तेव्हा त्यात अमृताचा कलश हाती घेऊन धन्वंतरी प्रकट झाले. अमृत हे अमरत्व प्रदान करणारे होते. म्हणून देव आणि दानव यांच्यात अमृत वाटपावरून भांडणे सुरु झाली. त्यात भगवान विष्णूंनी मोहिनीरूप धारण करून देवांना अमृत आणि दानवांना सुरा म्हणजे मदिरा वाटप केली. हे राहू आणि केतूच्या लक्षात आले. राहू अमृत प्राशन करण्यासाठी आपले रूप बदलून देवांमध्ये जाऊन बसला. श्री विष्णूंच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राच्या साहाय्याने राहुचा शिरच्छेद केला. त्याचे शीर उडून ज्या ठिकाणी पडले त्या गावाला राहुरी असे नाव प्राप्त झाले तर त्याचा देह म्हणजे काया ज्या ठिकाणी पडली, ते कायगाव म्हणून प्रसिद्ध झाले अशी दंतकथा आहे.
तात्पर्य हे इतके पवित्र ठिकाण आहे. इथे एकदा श्री विष्णूंनी अमृत वाटप केले. दुसऱ्यांदा ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपात साऱ्या जगाला अमृत प्रदान केले. ज्ञानेश्वरी म्हणजे मराठी सारस्वताचे सौभाग्यलेणे. काव्य आणि तत्वज्ञान यांचा सुरेख संगम. यानंतर त्याठिकाणी अमृतासमान अनुभव देणारा अमृतानुभव हा ग्रंथ ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिला. ज्या प्रवरा नदीच्या काठावर हे तीर्थक्षेत्र वसले आहे, त्या प्रेवरेला ‘ अमृतवाहिनी ‘ असे संबोधले जाते. येथून जवळच गोदावरी आणि प्रवरेचा संगम आहे. या संगमावर देवगड हे पवित्र स्थान आहे. जवळच शनी शिंगणापूर आहे. असा हा रम्य आणि पवित्र परिसर. या पवित्र, शांत आणि रम्य स्थळी खरोखरच वेळ काढून जायलाच हवं.
☆ त्या ‘मुलांच्या’ गंधकोशी… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे☆
काही वर्षांपूर्वी मी अमरावतीच्या शाश्वत स्कूल या शाळेला भेट देण्यासाठी गेलो होतो. तिथे गेल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांच्या टेबलवर एक बोर्ड होता. त्यावर लिहिले होते Every child is unique. ‘ तारे जमीपर ‘ हा चित्रपट आपल्यापैकी अनेकांनी पाहिला असेल. त्यातील ईशान अवस्थी आठवतो का ? त्याला जेव्हा होस्टेलमध्ये दाखल केले जाते तेव्हा तो अतिशय दुःखी होतो आणि कोणाशीही बोलत नाही कारण तो आपल्या घरापासून आणि आईपासून तुटतो. या ईशानला डिस्लेक्सिया नावाची एक व्याधी आहे. तो b आणि d, 6 आणि 9 यासारख्या गोष्टींमध्ये फरक करू शकत नाही. पण ही व्याधी बुद्धिमत्तेशी संबंधित नाही. अशा मुलांना समजून घेणे जरुरीचे असते. या चित्रपटातील शिक्षकाचे काम आमिर खान या गुणी नटाने केले आहे. तो त्या मुलाला समजून घेतो आणि त्याच्यातील सुप्त गुणांना वाव देतो. त्याला असे आढळून येते की ईशान हा चित्रकलेमध्ये अतिशय प्रगती करू शकेल आणि तो त्याच्या त्या गुणांना प्रोत्साहन देतो. आणि होतेही तसेच. पुढे जी चित्रकला स्पर्धा घेतले जाते, त्यात ईशानच्या चित्राला प्रथम पारितोषिक मिळते. या चित्रपटातील हर बच्चा खास होत आहे हे वाक्य म्हणजे वरील Every child is unique हीच गोष्ट ध्वनीत करते.
पण आम्ही मुलांना शिकवताना नेमकी हीच गोष्ट विसरतो. सगळ्या मुलांना जणू एकाच साच्यात बसवण्याचा प्रयत्न करतो. पण ही मुले वेगवेगळी आहेत, त्यांना प्रत्येकाला वेगळे व्यक्तिमत्व आहे, त्यांची आवड निवड वेगळी असू शकते या गोष्टी आम्ही दुर्लक्षित करतो किंवा सोयीस्कर विसरतो. आम्हाला हवी असते सतत ए ग्रेड किंवा 90% च्या पुढे परीक्षेतील गुण. आम्ही त्यांना रेसचे घोडे बनवतो. पण या सगळ्या खटाटोपात आम्ही त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी प्रोत्साहन देत नाही. त्यांचे बालपण या सगळ्यात खुरटते. या फुलांना नीट उमलायला आम्ही वावच देत नाही ही आजची शोकांतिका आहे.
पक्षी छान उडू शकतात, मासे छान पोहू शकतात, हरणे धावू शकतात. पण हरणांना उडायला सांगता येणार नाही, पक्षांना पोहायला सांगता येणार नाही किंवा माशांना धावायला सांगता येणार नाही कारण प्रत्येकाचे गुणवैशिष्ट्य वेगळे आहे. हीच गोष्ट मुलांच्या बाबतीत सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवी. एखादा मुलगा उत्तम खेळाडू होऊ शकतो, एखादा उत्तम चित्रकार होऊ शकतो, एखाद्याला गाण्याचे अंग असते. अशा विविध प्रकारच्या क्षमता प्रत्येक मुलाच्या अंगी असू शकतात. एकाच मुलाकडून सर्व गोष्टींची अपेक्षा आपण करू शकत नाही. ज्या परमेश्वराने किंवा निसर्गाने आपल्याला घडवले आहे किंवा जन्म दिला आहे त्याची सुद्धा तशी अपेक्षा नाही.
रवींद्रनाथ टागोर हे थोर शिक्षणतज्ज्ञ होते आणि महान कवी, साहित्यिक. पण त्यांना शिक्षणाची पारंपारिक चौकट मान्य नव्हती. त्यांना स्वतःला देखील लहानपणी शिकताना अशा प्रकारच्या शिक्षणात रस वाटत नव्हता. म्हणूनच तर मोठेपणी त्यांनी त्यांच्या स्वप्नातल्या शाळेची म्हणजेच शांतीनिकेतनची निर्मिती केली. या शाळेत प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या आवडीनुसार शिकण्यासाठी वाव दिला गेला. त्यांच्या मते शिकणं हा आयुष्याचा ‘ उत्सव ‘ व्हावा. त्यांचे हात सर्जनशील व्हावेत. पु ल देशपांडे यांच्यासारखा महान लेखक आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेली व्यक्ती रवींद्रनाथांच्या या शिक्षण पद्धतीने भारावून गेली. त्यांनी रवींद्रनाथांच्या शांतिनिकेतनात अनेक दिवस मुक्काम करून त्यांची शिक्षण पद्धती समजावून घेतली आणि ती वंगचित्रे, रवींद्रनाथ : तीन व्याख्याने यासारख्या पुस्तकातून आपल्यासमोर मांडली.
मुलांना केवळ पुस्तकातील किडे न बनवता त्यांना जीवनाचा सर्व बाजूंनी आनंद घेता यावा अशी दृष्टी विकसित करणे आवश्यक आहे. त्यांच्यात प्रेम आणि नैतिक मूल्ये रुजतील असे वातावरण आपण त्यांना उपलब्ध करून द्यायला हवे. त्यासाठी त्यांच्या स्तरावर जाऊन त्यांना समजून घेतील आणि समजून देतील अशा शिक्षकांची आवश्यकता आहे. म्हणून क्रीडांगणे मुलांच्या गजबजाटाने फुलली पाहिजेत, वाचनालयात मुलांची गर्दी हवी, वर्गामध्ये कठोर शिस्तीच्या ऐवजी हसत खेळत शिकता यायला हवे. अनावश्यक विषयांचे आणि पाठीवरील दप्तराचे ओझे कमी व्हायला हवे. मुलांना शाळेत जाणे ही आनंदाची गोष्ट वाटली पाहिजे ती शिक्षा वाटता कामा नये. हे उगवते तारे आहेत, उमलती फुले आहेत ती कोमेजून जाता कामा नये याची दक्षता आपणच घ्यायला हवी. ही मुले म्हणजे आपले भविष्य आहे. यात पालकांची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. आज मुलांना खेळण्यासाठी घरामध्ये भावंडं नाहीत, आजीआजोबा नाहीत. अशा वेळी आई वडिलांनी मुलांसाठी वेळ काढणे आणि त्यांना समजून घेणे, प्रसंगी त्यांच्यामध्ये खेळणे आवश्यक आहे.
वर्षातून केवळ एक दिवस बालदिन साजरा करून भागणार नाही. मुलांच्या चेहऱ्यावरील हास्य, त्यांच्या जीवनातील आनंद कायम राहायला हवा. त्या कळ्या आपल्या पूर्ण शक्तीनिशी उमलायला हव्या. त्या फुलांच्या गंधकोषी असे एक सुंदर गाणे आहे. त्यात कवीला फुलांच्या गंधकोषात परमेश्वराचाच वास आहे असे सुचवायचे आहे. त्यात एका अक्षराचा बदल करून त्या मुलांच्या गंधकोषी असे म्हणता येईल. त्यातही त्या परमेश्वराचा वास आहे. फक्त ही फुले आम्हाला नीट फुलवता आली पाहिजेत. म्हणजे त्यांचा सुगंध दूरवर पोहोचू शकेल.