मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

गुरूदेव रविंद्रनाथ टागोरांच्या ‘गीतांजली‘ या इंग्रजी भाषेतील काव्यसंग्रहाला साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार १० डिसेंबर १९१३ रोजी प्रदान करण्यात आला. या घटनेला तब्बल ११२ वर्षे झाली. तथापि अद्याप अन्य कोणीही हा चमत्कार करून दाखवू शकलेलं नाही. ७ ऑगस्ट १९४१ रोजी वयाच्या ८०व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली.

त्यांच्या या जगद्विख्यात काव्यसंग्रहाचे मराठीत तुरळक अनुवाद झालेले आहेत, परंतु गेय काव्य स्वरूपातील अनुवाद हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेही नाहीत. कदाचित त्यामुळेच गीतांजली वाचलेला व समजलेला मराठी वाचक विरळाच! टागोर जरी ब्राम्होसमाजवादी असले तरी गीतांजलीतील बहुसंख्य रचना, ज्या एका ईश्वरी शक्तीला ते मानत तिला उद्देशून आहेत. आम्ही हा भावानुवाद करताना ‘त्या’ शक्तीला राम, कृष्ण, विठ्ठल अशी सामान्य मराठी मनाला भावणारी नावे वापरली आहेत. आपणास येथे मूळ इंग्रजी काव्य व त्याचा मराठी भावानुवाद वाचता येईल.

– – – – – – – 

गीत : १

Thou hast made me endless, such is thy pleasure. This frail vessel thou emptiest again and again, and fillest it ever with fresh life.

This little flute of a reed thou hast carried over hills and dales, and hast breathed through its melodies eternally new.

At the immortal touch of thy hands my little heart loses its limits in joy and gives birth to utterance ineffable.

Thy infinite gifts come to me only on these very small hands of mine. Ages pass and still thou pourest, and still there is room to fill.

मराठी भावानुवाद – 

गीत : १

मुरली घेऊन दर्‍याडोंगरी

सूर चिरंतन निर्मित जाशी

त्या रुपाचे चिंतन करता

माझे अंतर स्पर्शून जाशी – – 

*

स्पर्शाने त्या पुलकित होते

शब्दातीत तुजसवे बोलते

तूच भारिसी चैतन्याने

तूच रिकामा आणि करिसि – – 

*

कलश मम हा देहस्वरूपी

पुनःपुन्हा या धरणीपाशी

अमर्त्य आत्मा वेष बदलुनी

काळोखातून येत प्रकाशी – – 

*

माझी झोळी जरी तोकडी

दाता तू तर असीम असशी

युगे युगे तू देतचि जाशी

तरीही झोळीत जागा राही – – 

*
अनंत मी याचक युगांचा

असशी तू दाता कल्पांचा – – 

*

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : शोभना आगाशे, सांगली

संपर्क: ९८५०२२८६५८

– – – 

गीत : २

When thou commandest me to sing it seems that my heart would break with pride; and I look to thy face, and tears come to my eyes.

All that is harsh and dissonant in my life melts into one sweet harmony – and my adoration spreads wings like a glad bird on its flight across the sea.

I know thou takest pleasure in my singing. I know that only as a singer I come before thy presence.

I touch by the edge of the far spreading wing of my song thy feet which I could never aspire to reach.

Drunk with the joy of singing I forget myself and call thee friend who art my Lord.

*
मराठी भावानुवाद – गीत : २

तुझ्या कृपेने, तुझ्याचसाठी, तुवा दिलेले गीत सुमंगल।

गाण्यासाठी तव आदेशे बसता, स्मरतो तव मुखमंडल।

स्नेहासक्त त्या रूपा बघता, पूर अश्रूंचा होत अनावर।

अभिमानाने ऊर भरुनि तो, थिटे वाटते मज नभमंडल॥

*

जे जे असह्य आणिक कटू अन् जे जे जीवनी सूर विसंगत।

कृपाकिरण तव त्या सर्वांचा मिलाप करुनि दे गीत सुसंगत।

प्रीतपाखरा हे संवेदन देई मनोबल अन् भक्तीचे पर। 

भवसागर हा तरून जाईल, खचितचि आणिल सुरांत रंगत॥

*
माझ्या कवना आणि गायना श्रोता रसिक तू, पुलकित अंतर।

सामोरी तव गाता गीते, भक्तीरसात भिजते अभ्यंतर।

अप्राप्य होते चरण तुझे रे, थिट्या जीवनी, स्वप्नी देखिल।

परंतु आता या पंखांनी, नमितो, स्पर्शतो तव चरण निरंतर॥

*

भान नुरे मज, नशा गायनी, भक्तीची आळविता गीते।

स्वामी जगाचा तू, परी मजला सखा, सौंगडी, प्रियतम वाटे॥

*

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे, सांगली

 संपर्क: ९८५०२२८६५८

– – – – 

गीत : ३

I know not how thou singest, my master! I ever listen in silent amazement.

The light of thy music illumines the world. The life breath of thy music runs from sky to sky. The holy stream of thy music breaks through all stony obstacles and rushes on.

My heart longs to join in thy song, but vainly struggles for a voice, I would speak, but speech breaks not into song, and I cry out baffled. Ah, thou hast made my heart captive in the endless meshes of thy music, my master!

*

मराठी भावानुवाद – गीत : ३

*

मला न ठाऊक, अल्पमती मी

तव गीतांतील अवीट माधुरी

चकित होऊनी ऐकत राही

मूकपणाने अष्टौप्रहरी॥

*

गीत तुझे अन् संगीत तुझे

चराचर तो जाई उजळून

आभाळाचा श्वास होतसे 

चौदा भुवने टाकी व्यापून॥

*
दर्‍याडोंगरी, कडेकपारी

अडथळ्यांतुनी मार्ग शोधुनी,

वाहत जाती गंगौघापरी

तुझ्या गळ्यातील पावन गाणी॥

*
सुरात तुझिया सूर मिळावा

प्रयत्न करता व्यर्थचि जावा

कंठामधुनि स्वर ना यावा

चकवुनि मज चित्कार घुमावा॥

*
बंधक करिसी मम हृदयाला

तुझ्या स्वरांच्या अनंत जाला

जगन्नायका, तुझीच लीला

नमन तुझ्या या चातुर्याला॥

*

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ पोच पावती – लेखक : पत्रकार श्री विकास शहा ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ पोच पावती – लेखक : पत्रकार श्री विकास शहा ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

मागे एकदा पोस्टात गेलो असताना एक आजोबा स्टाफ ला विचारत होते.. “ह्याची पोचपावती मिळेल ना?

बरेचदा मी ही हिला सांगतो acknowledgment म्हणून जपून ठेव! “

नेहमीप्रमाणेच तो शब्द माझ्या मनात फिरू लागला आणि बोटं लिहू लागली…

*पोचपावती* ही आपल्या व्यवहारात जितकी महत्वाची, तितकीच आयुष्यातही का असू नये??

ही पोचपावती म्हणजे प्रत्येक वेळी कौतुक असाच अर्थ नसावा.

*कधीतरी एखाद्या गोष्टीची घेतलेली दखल किंवा म्हणतात ना appreciation असू शकतं. *

ह्या पोचपावतीचे माझ्या आयुष्यातील उत्तम उदाहरण म्हणजे आमचे आई- अप्पा.

घरात कोणताही एकत्र कार्यक्रम होवो किंवा एखादा नवीन पदार्थ केला, कोणतीही चांगली कृती केली की सुनांना ते तसं आवर्जून सांगतात *”छान झाला बर का आजचा कार्यक्रम”* आणि मग त्यांच्या ह्या शब्दांनी कार्यक्रमामुळे झालेली दमणूक एकदम निघून जाते आणि पुन्हा पुढचा कार्यक्रम करायला अजून उत्साह येतो!

*पोचपावती तुमच्या आयुष्यात मोठी जादूची कांडी फिरवते* 

… एखाद्याला त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींच *appreciation* देऊन बघा अगदी मनापासून त्याच्या चेहऱ्यावर कसं हसू फुलतं.

… आमची घरकामवालीला गजरे, फुल घालून यायची फार आवड, कधी त्या मोठा गजरा घालून कामाला आल्या की हिच्या तोंडून उस्फूर्तपणे येत “प्रमिला काय मस्त दिसतेय, चल एक फोटो काढते तुझा! ” ह्याने सुद्धा खूप खुश होतात.

*लहानांपासून मोठ्यांपर्यन्त आणि अगदी लहान गोष्टींपासून मोठ्या गोष्टींसाठी ही पोचपावती खूप मोठा परिणाम करून जाते आणि छान आठवण मनात ठेवून जाते. *

एखादं मोठं प्रोजेक्ट complete केल्यावर बॉसने त्याची घेतलेली दखल असो की वर्गात “छान निबंध लिहिलंस हो” अस म्हणून बाईंची मिळालेली शाबासकी असो, हिने खपून केलेल्या पदार्थाची घरातल्यानी केलेली स्तुती असो की, कधीतरी नवीन साडी नेसल्यावर हिला न बोलता दिलेली दाद असो.

ह्या पोचपावतीसाठी माणूस फक्त जवळचाच हवा असं नाही. कधीतरी दुकानदारालाही म्हणावं.. “काका तांदूळ चांगले होते हं तुमच्याकडून घेतलेले “

… *सामान्य माणसांपासून अगदी कलाकारांपर्यन्त ह्या पोचपावतीची गरज असतेच, ही दखल घायला आणि द्यायलाही वयाच बंधन नसावं.. कधीच. *

काही काही नाती ही पोचपावती पलीकडची असतात.. पण तरीही अधूनमधून ह्याचा शिडकावा नात्यात नक्की आनंद देऊन जातो..!

बरेचदा सततच घेतली जाणारी दखल काही खरी वाटत नाही. तसं करूही नये कारण पोचपावती जितकी उस्फुर्त, तितकीच जास्त खरी!

… *पोच पावती फक्त शब्दातूनच नाही तर डोळ्यातून तर कधी कृतीतून, स्पर्शातूनही व्यक्त व्हावी. जसं जसं ज्याच्याशी नातं तशी तशी ती पोचवावी. *

… कधी योग्य आदर ठेवून, कधी गळा मिठी मारून, अगदी कधी “च्यामारी भारीच काम केलंस तू भावड्या” अशी वेगळ्या भाषेतून ही यावी.

माणूस जितका दिलखुलास तितकीच ही दाद उस्फुर्त…. महत्वाचं म्हणजे ती स्वीकारणाराही तितकाच आजकालच्या मुलांच्या भाषेत cool dude हवा.

*ह्या पोच पावती ने काम करायला दुप्पट ऊर्जा मिळते, उत्साह मिळतो, नातं घट्ट व्हायला एक छोटासा धागा मिळतो. *

… आणि तसं म्हणाल तर ह्यासाठी काही लागत नाही 

… *फक्त मोकळं व स्वच्छ मन! *

☆

लेखक : पत्रकार श्री विकास शहा

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शब्द खेळती खेळ… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ शब्द खेळती खेळ …  ☆  श्री सुहास सोहोनी ☆ 

*गेल्या दोन-तीन महिन्यांत कुठे तरी काहीबाही वाचत असतांना दोन शब्द दिसले. “कुरवंडी” आणि “कुर्वंडी” उच्चार एकच पण पण अर्थ भिन्न! काल मराठी शब्दकोश चाळून पाहिला. कारण कुतुहल नांवाचं बाळ स्वतः स्वस्थ बसत नाही आणि दुसऱ्याला बसू देत नाही. त्याची मोठी बहीण सुद्धा तशीच! तिचं नांव उत्सुकता! दोघंही छळवादी!! *

*कुरवंडी=कुरडई=गव्हाच्या पिठापासून केलेली एक पाककृती. तळून कुरकुरीतच खायची. पापडदादासंगे हिची जोडी जमते. यांच्या कुरकुरीत सेवनाने जिव्हा खवळते! हिची बहीण म्हणजे साबुदाण्याच्या चिकापासून केलेली चिकवडी. तीही भाव खाऊन जाते! *

*कुर्वंडी=आरतीतला दिवा=रात्रीच्या काळोखात नदीच्या पात्रात सोडला जाणारा दिवा=ओवाळू आरत्या कुर्वंड्या येती, चंद्रभागेमध्ये सोडुनिया देती… *

*याच आरतीतली आणखी एक ओळ आठवली. “दर्शनहेळामात्रे तया होय मुक्ती”…. “हेळा” म्हणजे काय? कधी विचारच केला नव्हता! त्याच कोशातून अर्थ कळला की हेळा म्हणजे “क्षण”! आनंदमुक्तीसाठी माऊलीचं दर्शन हेळामात्र म्हणजेच क्षणमात्र पुरेसं होतं. *

*असो. असे खेळ करून दाखवणारे अनेक शब्द आहेत. पण आज इतकंच पुरे!! *

☆

श्री सुहास सोहोनी 

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆”कर्तव्य की धर्मनिष्ठा? ” इंग्लिश लेखक : ले. जन. सय्यद अता हसनैन (निवृत्त) ☆ कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त)

? इंद्रधनुष्य ?

☆ “कर्तव्य की धर्मनिष्ठा? ” इंग्लिश लेखक : ले. जन. सय्यद अता हसनैन (निवृत्त) ☆ मराठी अनुवाद – कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) ☆

कर्तव्य की धर्मनिष्ठा?

– – – – *एक सेनाधिकारी म्हणून मी ४० वर्षांत काय शिकलो? *

“लेफ्टनंट सॅम्युअल कमलेशन विरुद्ध भारत सरकार” या खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालामुळे एका संवेदनशील पण अत्यंत महत्त्वाच्या विषयाला तोंड फुटले आहे. तो विषय म्हणजे – सैन्यदलातील व्यक्तींच्या वैयक्तिक धार्मिक आस्था व त्यांची व्यावसायिक जबाबदारी, या दोन्हींमधला परस्परसंबंध.

लेफ्टनंट सॅम्युअल कमलेशन हा ख्रिश्चन तरुण एक भारतीय सेनाधिकारी होता. त्याच्या रेजिमेंटच्या मंदिर व गुरुद्वाऱ्यांमधल्या धार्मिक कार्यक्रमांमधे (सैन्यदलात या कार्यक्रमांनाही ‘धार्मिक परेड’ असेच संबोधले जाते) सहभागी होण्यास किंवा त्या परिसरातही येण्यास त्याने सातत्याने नकार दिल्याच्या कारणावरून त्याला सैन्यदलातून बडतर्फ करण्यात आले.

त्या बडतर्फीविरुद्ध त्याचा युक्तिवाद एकच होता की, “जे कृत्य माझ्या धार्मिक आस्थेशी विसंगत आहे ते मी करणार नाही. ” 

सन्माननीय न्यायालयाने आपल्या निकालात असे सुनावले की या अधिकाऱ्याचे वर्तन म्हणजे त्याची धार्मिक आस्था नव्हे तर, सैन्यदलाच्या एकसंधतेला आणि नेतृत्वालाच खिळखिळे करू पाहणारे कृत्य आहे. न्यायालयाने अत्यंत कठोर शब्दात त्या अधिकाऱ्याची बडतर्फी योग्य असल्याचे सांगितले इतकेच नव्हे तर, हे “शिस्तभंगाचे अत्यंत टोकाचे उदाहरण” असल्याचेही नमूद केले.

सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने या निकालाद्वारे कोणत्याही धर्मावर टीका केलेली आहे असे समजणे चुकीचे ठरेल. प्रत्यक्षात, सैन्यदलांशी निगडित असलेल्या एका मूलभूत तत्त्वाचेच न्यायालयाने पुष्टीकरण केले आहे असे म्हणता येईल. ते तत्व म्हणजे – एकदा का सैन्याचा गणवेष अंगावर चढवला की सैनिकाने स्वतःच्या वैयक्तिक आस्था आणि इच्छा आपल्या कर्तव्याच्या आड कधीही येऊ द्यायच्या नसतात.

भारतीय सेना ही धर्मनिरपेक्षतेच्या भक्कम पायावर निर्विवादपणे उभी असलेली देशातली कदाचित एकमेव संस्था असेल. आणि विशेष म्हणजे, धर्माविषयीच्या अनास्थेतून नव्हे तर सर्वसमावेशकतेच्या संकल्पनेतून ही धर्मनिरपेक्षता जन्मलेली आहे.

सैन्यदलातील मंदिरे, गुरुद्वारे, ‘सर्वधर्मस्थळे’ आणि चर्चेस ही धर्मसक्तीची किंवा धर्मपरिवर्तनाची ठिकाणे नसून त्या-त्या रेजिमेंटची परंपरा, एकता, सामूहिक मनोबल आणि सामूहिक ध्येयाची द्योतके असतात. ती केवळ पूजा-अर्चा-प्रार्थनेची ठिकाणे नव्हेत तर सर्वांच्याच मनात एक आपलेपणाची भावना निर्माण करणारी पवित्र स्थळे मानली जातात.

मी कुणी कायदेपंडित किंवा विश्लेषक नाही. धर्म आणि कर्तव्य यांच्यातल्या विरोधाभासातूनच जडत-घडत गेलेला एक सैनिक, या नात्याने मी हे लिहितो आहे. आधी एका रोमन कॅथॉलिक संस्थेत आणि नंतर एका प्रोटेस्टंट ख्रिश्चन संस्थेत माझे शिक्षण झाले. सैन्यदलातच नोकरी करणारे माझे वडील आणि त्यांच्यासोबत माझी आईदेखील, रेजिमेंटची मंदिरे, गुरुद्वारे, चर्चेस या ठिकाणी अगदी सहजतेने वावरत असत. मी एक मुस्लिम म्हणूनच वाढलो, परंतु जे संस्कार माझ्यात मुरले त्यातून मला हे उमजत गेले की धर्म ही सैन्यदलातल्या लोकांना एकत्र आणणारी शक्ती आहे, त्यांच्यात फूट पाडणारी नव्हे. पुढे सैन्यदलातल्या माझ्या ४० वर्षांच्या कारकीर्दीत मी हेच सूत्र अंगिकारले.

एक तरुण कंपनी कमांडर म्हणून किंवा नंतर माझ्या बटालियनचा कमांडिंग ऑफिसर असतानाही मी एक गोष्ट आवर्जून करत आलो. कोणतीही सैनिकी कारवाई सुरू करण्यापूर्वी आणि ती यशस्वीपणे पार पाडल्यानंतर, आमच्या जवानांनी तिथेच तात्पुरत्या उभारलेल्या ‘मंदिरात’ मी एक सभा घेत असे. ती काही ‘माझी’ धार्मिक प्रथा नव्हती. पण ते ‘आमच्या’ सामूहिक आस्थेचे मूर्त रूप होते.

सैन्यदलाचे हेच वैशिष्ट्य आहे – कुणीही आपल्या धर्माचा त्याग करत नाही, फक्त स्वधर्मपालनाचे रूप बदलतो. प्रत्येकाच्या मनात स्वतःची एक आंतरिक आस्था आणि स्वधर्माचे एक पूज्य स्थानही असतेच. पण ती आस्था त्याला इतरांपासून वेगळे काढत नाही. उलट सगळ्यांनाच एक सांघिक शक्ती देणारे आणि एकत्र बांधणारे ते एक अदृश्य सूत्र असते. अधिकाऱ्याने त्याच्या सैनिकांची आस्था योग्य की अयोग्य याचा निवाडा कधीच करायचा नसतो. त्यांचा एक विश्वासू साथीदार या नात्याने त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहायचे असते. त्या अधिकाऱ्याची प्रार्थना नव्हे, धार्मिक कार्यातला त्याचा सहभागही नव्हे, तर फक्त त्याचे भक्कम आणि आश्वासक अस्तित्वच कित्येक वेळा सैनिकांचे मनोबल शाबूत ठेवण्यासाठी पुरेसे असते.

त्या क्षणी तो अधिकारी ख्रिश्चन, शीख, मुसलमान, हिंदू, पारशी, जैन यापैकी कोणीच नसतो. तो असतो केवळ एक नेता, ज्याला सैनिक आपणहून जीव लावतात आणि ज्याच्या एका शब्दाखातर आपले प्राण पणाला लावायला तयार होतात.

सन्माननीय न्यायालयाने आपल्या निकालात एक योग्य निरीक्षण नोंदवले आहे. भारताचे संविधान प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्याची हमी अवश्य देते. परंतु, सैनिकी जीवनाच्या केंदस्थानी असलेले अनुशासन आणि सैन्यदलांची संस्कृती झुगारून वरिष्ठांची आज्ञा मोडण्याचे स्वातंत्र्य संविधानाने सैनिकाला दिलेले नाही. संविधानाच्या २५व्या अनुच्छेदानुसार आपली धर्मनिष्ठा अबाधित ठेवली गेली असली तरी आपल्या वैयक्तिक आवडी-निवडींना अमर्याद स्वातंत्र्य संविधानाने दिलेले नाही.

शिस्त आणि एकजूट ही केवळ सैनिकांची गुणवैशिष्ट्ये नसून त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणारे घटक असतात. अधिकाऱ्याने कधीकधी आपल्या सैनिकांच्या आसपास वावरणे इतकेच पुरेसे नसते. त्याने सदैवच तन-मनाने आपल्या सैनिकांजवळ असणे हेच त्यांची एकजूट टिकवण्यासाठी महत्त्वाचे ठरते. अर्थातच त्या सैनिकांसाठी पवित्र असलेल्या धार्मिक कार्यांमध्ये त्यांच्यासोबत नसणे हे कोणत्याही अधिकाऱ्याला शोभणारे वर्तन नाही.

हे जे मी लिहितो आहे त्याची अनेक उदाहरणे स्वतंत्र भारताच्या सैनिकी इतिहासात सापडतात.

ब्रिगेडियर डेस्मंड हेड या ख्रिश्चन अधिकाऱ्याने १९६५ च्या भारत-पाक युद्धात, ‘३ जाट’ या बटालियनचे नेतृत्व करत असताना, आपल्या सैनिकांसह तुंबळ युद्ध करून डोगराईच्या लढाईत विजय प्राप्त केला होता. ते या युद्धात एक महावीरचक्रविजेते तर ठरलेच पण त्यांनी 

आपल्या जवानांची असीम श्रद्धाही स्वतःसाठी कमावली. ते स्वतः त्यांच्या जवानांपेक्षाही सरस आणि सुरेल भजने गाऊ शकायचे.

‘पूना हॉर्स’ या रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल आर्देशीर तारापोर हे मरणोपरांत परमवीरचक्रविजेते पारशी अधिकारी, त्यांच्या धर्मामुळे नव्हे तर रणगाड्यांच्या युद्धात गिरवण्याचा एक आदर्श म्हणून आजही ओळखले जातात.

कित्येक ख्रिश्चन आणि मुस्लिम अधिकाऱ्यांनी अतिशय सक्षमपणे शीख रेजिमेंटचे नेतृत्व केलेले आहे.

मी स्वतः ज्या गढवाल रेजिमेंटमध्ये होतो त्याच्या कितीतरी बटालियन्सचे नेतृत्व भारतीय भूतलावरच्या एकन्एक धर्माच्या अधिकाऱ्यांनी केलेले आहे.

भारतीय सेनेच्या असंख्य कर्तबगार अधिकाऱ्यांनी आपल्या जवानांच्या धर्माचा नुसता आदरच केला असे नाही तर एका सच्च्या नेत्याच्या नात्याने आपल्या जवानांचे धर्मही त्यांनी शिरोधार्य मानले.

मुळात सैन्यदलामध्ये प्रश्न धर्माचा नाहीच – इथे परस्परविश्वास हाच परमधर्म मानला जातो. एक जवान केवळ अधिकाऱ्याच्या पदाला मान देऊन त्यांचा आदेश मानत नाही. त्याच्या मनात हा विश्वास असावा लागतो की, “माझा वरिष्ठ अधिकारी सदैव माझ्यासोबत आहे – धोक्याच्या क्षणी, अडीअडचणीच्या प्रसंगी, आणि हो, माझ्या प्रार्थनेमध्येसुद्धा! ” 

अधिकाऱ्याने आपल्या जवानांसोबत असणे हेच नेता म्हणून त्याचे कर्तव्य असते, आणि परस्परविश्वास व सैनिकांना दिलेली भक्कम साथ हेच त्याच्या नेतृत्वाचे खरे लक्षण!

याच कारणामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हा निकाल धर्म किंवा धर्मनिष्ठेला नाकारत नाही, तर सैन्यदलातील एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करतो. हा निकाल आपल्याला पुन्हा एकदा हे लक्षात आणून देतो की, सैन्यदलांमधली धर्मनिरपेक्षता म्हणजे एखादी अमूर्त संकल्पना नसून, एका चिरंतन आणि सामूहिक श्रद्धेचे जागृत प्रतीक असते. प्रत्येक सैनिकाचा धर्म ही केवळ त्याची स्वतःपुरती मर्यादित आस्था नव्हे तर त्याला इतर सर्वांशी जोडणारा एक दुवा असतो.

मला प्रकर्षाने असे वाटते की केवळ न्यायालयाच्या या निकालापुरता हा मुद्दा सीमीत राहू नये. या निमित्ताने सामान्य भारतीय नागरिकांच्या लक्षात हे आणून द्यायला हवे की जेंव्हा मंदिरे किंवा ‘सर्वधर्मस्थळ’ या ठिकाणी सैनिक जाऊन उभे राहतात तेंव्हा ते एखाद्या विशिष्ट धर्माचे अनुयायी नव्हे, तर बंधुभावनेने एकत्र काम करणाऱ्या एका गटाचे सदस्य असतात. हे जर सर्वच भारतीयांनी समजून घेतले तर त्यांना हेही उमगेल की सैनिक जेंव्हा एखाद्या धोकादायक किंवा अगदी प्राणघातक परिस्थितीशी सामना करायला आपल्या पायांनी चालत जातात तेंव्हा त्यांना त्यांचा वैयक्तिक धर्म नव्हे तर त्यांचा परस्परविश्वास आणि सांघिक शक्तीच बळ देत असते.

सैनिकी सेवा हे कदाचित एकमेव असे कार्यक्षेत्र असेल जिथे व्यक्ती आपल्या संस्थेसाठी काम करीत नाहीत, तर प्रत्येक सैनिक स्वतःच त्या संस्थेचे ‘व्यक्तिरूप’ होऊन जातो!

सैनिकाचा धर्म, एक व्यक्ती म्हणून असलेली स्वतःची ओळख व स्वाभिमान, आणि स्वतःच्या आवडी-निवडी हे सगळे त्याच्या कर्तव्याच्या पायी समर्पित होऊन जाते.

गणवेष धारण केलेला सैनिक आपला धर्म बदलत नाही, फक्त तो धर्माचे स्वरूप काहीसे बदलतो. तो आपला धर्म त्यागत तर नाहीच, उलट धर्मालाच तो एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो.

शेवटी मला इतकेच सांगावेसे वाटते की सन्माननीय न्यायालयाचा निकाल हा न्यायसंगत आहेच, पण तो सैन्यदलांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या निकालाने सैन्यदलातील अनुशासन अबाधित ठेवलेच आहे, शिवाय अधिकारी आणि सैनिकांमधील परस्परसंबंध सदैव सुदृढच राहतील हेही सुनिश्चित केले आहे. सैन्यदलांमध्ये सर्व धर्मांना उचित मान दिला जात असला तरी कर्तव्य हेच परमोच्च मानले जाते.

अधिकाऱ्याने एकदा का भारतीय सेनेचा गणवेष अंगावर चढवला की, “मी ज्यांचे नेतृत्व करणार आहे ते कोण आहेत? ” आणि “आमच्यावर सोपवलेली जबाबदारी काय आहे? ” इतकेच प्रश्न त्याच्या मनात येतात.

“माझा धर्म कोणता? ” या प्रश्नाला जागाच उरत नाही!

[२७ नोव्हेंबर २०२५ रोजी इंडियन एक्स्प्रेसमधे प्रकाशित झालेल्या मूळ इंग्रजी लेखाचा लेखकाच्या पूर्वानुमतीसह केलेला मराठी भावानुवाद]

इंग्रजी लेखक: लेफ्टनंट जनरल सय्यद अता हसनैन (सेवानिवृत्त)

मराठी अनुवाद : ©कर्नल आनंद बापट (सेवानिवृत्त) 

मो  9422870294

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ लुप्त होणाऱ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा — पाठराखीण ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

डॉ. धनंजय देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ लुप्त होणाऱ्या संस्कृतीच्या पाऊलखुणा — पाठराखीण ☆ डॉ. धनंजय देशपांडे ☆

पाठराखीण

चाळीस पन्नास वर्षांपूर्वीपर्यंत आपल्या संस्कृतीत खूपच चांगल्या काही गोष्टी होत्या. यामध्ये ज्ञान, विज्ञान आणि मानसिक आनंद असा संगम असायचा. ज्या आता लुप्त होत आहेत. त्याचा घेतलेला हा मागोवा…. क्रमशः स्वरूपातील ही सिरीज!

पूर्वीची लग्नच मुळात तीन तीन दिवस चालायची. आणि त्याची तयारी तर एक दोन महिने आधीपासून सुरु व्हायची. यामध्ये गावातली सगळी मंडळी लग्न ज्याच्या घरी त्याच्याकडे न बोलावता स्वतःहून मदतीला जायची. ज्यातून सामाजिक एकोपा निकोपपणे जपला जायचा.

अर्थातच तेव्हा लग्न ठरवून (म्हणजे अरेंज मॅरेज) व्हायची. दोन्हीकडील मंडळींना ओळखणारा, खात्रीचा असा एक मध्यस्त असायचा. जो लग्न जुळवून देऊन दोन्हीघरचे आशीर्वाद घ्यायचा. मात्र एखादे लग्न फसले तर तोच बिचारा त्याची काहीही चूक नसताना शिव्यांचा धनी व्हायचा. हा भाग वेगळा.

पण खरी गम्मत लग्नाच्या विविध चालीरीतींमध्ये होती. अगदी बस्ता बांधण्यापासून ते मुलीला सासरी पाठ्वण्यापर्यंत इतक्या सुरेख चालीरीती होत्या की ज्या आजच्या पिढीला माहीतही नसतील. त्यासाठीच ही पोस्ट सिरीज!!

बाकी रिवाजाबद्दल नंतरच्या भागात सांगेलच पण आज सांगतोय…. पाठराखीण या संकल्पनेबद्दल!

या नावातच त्याचा अर्थ आहे. म्हणजे असं की, त्या काळी नवरी मुलगी लग्नाआधी सासरच्या घरी कधीच गेलेली नसे. आणि मग लग्न झाल्यावर अचानक अशा नव्या घरी, नव्या माणसात त्या नवरीला बिचकायला होऊ शकत. तीच मन नर्व्हस होऊ शकत. अहो साधं एका कुंडीतलं रोप जरी दुसऱ्या कुंडीत नेवून लावलं तरी पहिले एकदोन दिवस ते मुरझलेले असते. नंतर हळूहळू मूळ धरू लागून रुजते. आणि इथे तर जितीजागती एखादी कन्या परघरी जाणार असते मग तिची मानसिकता किती भांबावलेली असेल?

याचा विचार आपल्या पूर्वजांनी करूनच “पाठराखीण” हा रिवाज रूढ केला.

पाठराखीण म्हणजे नवी नवरी जेव्हा लग्नानंतर सासरी जायला निघते तेव्हा तिच्यासोबत माहेरची एखादी स्त्री सोबतीला दिली जायची. विशेषतः नवरीच्या आवडीची अशी ती स्त्री निवडून माहेरचे लोक तिच्यासोबत पाठवायचे. जास्तकरून लग्नात जी करवली असेल तिची निवड व्हायची. हिलाच पाठराखीण असं म्हणतात. जेणेकरून सासरी गेल्यावर भांबावलेली नवरीं आणि सासरचे लोक यांच्या मधला दुवा सांधला जावा. या कामासाठी पाठराखीण असायची.

नवी नवरी नव्या घरी गेल्यावर मुळात तर दोन चार दिवस तिला काहीच काम करू दिले जात नसे. “तू नवी नवरी आहे बाई…. नको लगेच कामाला लागू… पुन्हा आयुष्यभर आहेच काम तुला करायचे…. म्हणून तू फक्त बसून पहा सगळं…. आम्ही करतो कामे…. असं सासरच्या महिला त्या नवरीला सांगून आश्वस्त करायच्या. अशावेळी एखाद्या खोलीत एकटीच बसलेल्या त्या नवरीला “एकटं” वाटू नये म्हणून मग हि पाठराखीण तिच्यासोबत गप्पा मारायची. त्यामुळे नवरीचे मन जे माहेर सोडून आल्याने सैरभैर झालेले असायचे ते मग हळूहळू स्थिर व्हायचे.

किती छान संकल्पना होती न…. ही पाठराखीण! ही पाठराखीण सासरी त्या नवरीसोबत सुमारे पंधरा वीस दिवस राहायची. मग नवरीसह तिची सन्मानाने साडीचोळी देऊन सासरचे लोक माहेरी पाठवणी करायचे. या दोघीना घेऊन माहेरी नेण्यासाठी शक्यतो मुलीचा मामा गाडी घेऊन यायचा. त्यावेळी मग त्या मामाचाही धोतर टोपी देऊन सन्मान केला जायचा आणि मग या तिघांना वाटेत जेवायला म्हणून “दशम्या” (टिफिन) बांधून दिल्या जायच्या तसेच माहेरच्या लोकांसाठी म्हणून गोडधोड (शक्यतो बुंदीचे लाडू) डबाभरून दिले जायचे.

अर्थात ती पाठराखीण छुपी सीआयडी पण असायची बरं का!

म्हणजे आजच्या काळातील सीसीटीव्ही सारखी!!

माहेरून निघतानाच तिला त्याबद्दल सूचना दिल्या जायच्या. की सासरी गेल्यावर त्या सगळ्या लोकांचे बारीक निरीक्षण करणे, सासू नणंदा कशा राहतात, कशा बोलतात हे टिपून घेणे, पुरुष मंडळींचा घरात वावर किती? लक्ष किती दिले जाते… असं सगळं ती पाठराखीण मनामध्ये नोंद करून घ्यायची. आणि हि सगळी बितंबातमी नंतर माहेरी आल्यावर घरच्यांना सांगायची. यामागेही पूर्वजांनी केलेला मानसिकतेचा अभ्यास आहे. तो म्हणजे, सासरची मंडळी कशी आहेत हे एकदा कळल्यावर मग नवरीचे आईवडील किंवा जुनीजाणति मंडळी त्यावर “नवरीने पुढील आयुष्यात कसे वागायचे” यावर जणू एक रेडी रेकनर गृहपाठ नवरीला देऊन तिचा संसार अधिक सुखी कसा होईल याची काळजी घेतली जायची. उदा. सासू फटकळ तोंडाची असेल तर अशावेळी नवरीने शांत बसावे, तोंडाला तोंड देऊ नये. चुकीचे बोलत जरी असली ती तरी त्यावेळी शांत बसून नंतर वातावरण निवळल्यावर प्रेमाने सासूला ते सांगावे…. किंवा नवऱ्याला काय केलं की आवडत ते ओळखून त्या गोष्टी कराव्यात. उदा. नवरीने सकाळी उठून सगळं लवकर आवरून दारात रांगोळी काढल्यावर नवरा खुश होत असेल तर ते काम लक्षात ठेवून करावे.

थोडक्यात काय तर हल्ली नवरा बायकोच्या वादात “कौन्सेलर” जे काम करतात ते काम त्याकाळी माहेरची जाणती मंडळी करायची.

एक म्हण त्याकाळी म्हातारी मंडळी त्या नवरीला सांगत असत….

“तडजोड केली की काडीमोड होत नाही”

(काडीमोड म्हणजे डिवोर्स)!

थोडी ऍडजेस्टमेंट करून पहा…. कदाचित वाद कमी होतील असं आज जे “कौन्सेलर” सांगतात तेच त्याकाळी कोणत्याही विद्यापीठाची मानसशास्त्राची पदवी न घेतली म्हातारी मंडळी सांगायची. हे किती भारी न!

तर अशी हि…. पाठराखीण संकल्पना!! ज्यांना माहित होती त्यांना नॉस्टॅलजियाचा आनंद आणि ज्यांना माहीतच नसेल त्यांच्यासाठी रंजनातून प्रबोधन!!

डॉ. डीडी क्लास : आजकाल पाठराखीण हा रिवाज जवळपास लुप्त झालाय. त्याचे कारण चौकोनी कुटुंबात आजकाल एक तर अशी एखादी “एक्स्ट्रा” महिला घरात नसतेच. त्यातून दुसरं म्हणजे आजकाल मुलीचा साखरपुडा एकदा का झाला (किंवा लग्न ठरले जरी) तरी एकमेकांना घरी / हॉटेलात भेटण्याची मुभा आहे. गावातच सोयरीक ठरली असेल तर मग काय विचारूच नका. होणारी नवरी आधीच त्या घरी जाणेयेणे सुरु करते. दोन्हीकडची मोठी मंडळीही एकमेकांना भेटणे, घरी जेवायला जाणे सुरु करतात. त्यामुळे नवी नवरी सासरी गेल्यावर तिथं तिला सगळं सवयीचे आणि ओळखीचे झालेले असते. त्यामुळे बिचकण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणूनच मग पाठराखीण काय करायची? असं म्हणत हळूहळू ही प्रथाच कालबाह्य झाली. हे चांगलं की वाईट…. ते माहित नाही. कदाचित काळानुसार काही गोष्टी आऊटडेटेड होतात तशी हि पाठराखीण आऊटडेटेड झाली आता!

पण जेव्हा पाठराखीण संकल्पना अस्तित्वात होती तेव्हा खरेच ती व्यक्ती महत्वाची भूमिका करायची…. हे नक्की!!

धन्यवाद! भेटूया पुढच्या भागात अशाच एका वेगळ्या पण लुप्त होत जाणाऱ्या रिवाजाबद्दल!

तोवर स्टे ट्यून!

© डॉ. धनंजय देशपांडे (dd)

(सायबर सिक्युरिटी तज्ञ, चित्रकार, लेखक, समुपदेशक, निवेदक)

मो न. ९४२२३०४३४४ 

1) Global Cyber Crime Helpline National Award winner

2) Digital Hero of the year National Award winner

3) HOD: Cyber Awareness Foundation, Maharashtra State

4) Mentor: Pune University (SPPU), CANADA and UK

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अस्पृश्यता निवारणाचा इतिहास… ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ अस्पृश्यता निवारणाचा इतिहास… ☆ श्री जगदीश काबरे ☆

अस्पृश्यता हा भारतीय समाजातील सर्वात घातक सामाजिक रोग आहे. शतकानुशतकांपासून धार्मिक व वर्णव्यवस्थेच्या नावाखाली निर्माण झालेल्या या विषमतेने भारतीय समाजाचे केवळ तुकडे तुकडे करून टाकले नाहीत, तर मानवी एकतेलाच खीळ घातली. या विषमतेच्या विरोधात महाराष्ट्रात अनेक थोर समाजसुधारकांनी क्रांतिकारी आवाज उठवला आणि एका दीर्घ संघर्षातून अस्पृश्यतेविरुद्धची लढाई पुढे सरकली. या लढ्याची सुरुवात महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रबोधनातून झाली आणि अखेरीस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाधारित चळवळीत ती परिपूर्णतेला गेली. परंतु या दरम्यान अनेक समाजसुधारक, धर्मप्रवर्तक, विचारवंत आणि क्रांतीशील कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या स्तरावर अस्पृश्यता निर्मूलनासाठी प्रयत्न केले. महाराष्ट्रातील या महान परंपरेचा मागोवा घेताना आपण एका व्यापक सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेकडे पाहतो, ज्यात धर्म, शिक्षण, सामाजिक संघटन आणि राजकीय दृष्टिकोन यांचा मिलाफ दिसतो.

महात्मा जोतीराव फुले हे अस्पृश्यता निवारणाच्या विचारांचे आद्य पुरस्कर्ते होते. त्यांनी ‘गुलामगिरी’, ‘शेतकऱ्याचा आसूड’ यांसारख्या ग्रंथांतून ब्राह्मण्यवादी धर्मरचनेवर टीका केली आणि समाजातील खालच्या घटकांना शिक्षण, स्वाभिमान आणि संघटनाद्वारे उभे राहण्याचे आवाहन केले. पुण्यात ‘सत्यशोधक समाज’ स्थापन करून त्यांनी अस्पृश्यतेच्या मुळावर घाव घातला. त्यांनी दलित, शूद्र, अतिशूद्र, स्त्रिया या सर्वांना शिक्षण आणि समान वागणूक मिळावी म्हणून शाळा उघडल्या. त्यांच्या विचारांनी पुढील पिढीतील सुधारकांना दिशा दिली. सावित्रीबाई फुले यांनीही बालिकांना शिक्षण देऊन या चळवळीला मानवी मूल्यांचा पाया दिला. फुले यांचा दृष्टिकोन समाजक्रांतीचा होता. त्यांनी धर्माला सामाजिक नैतिकतेच्या कसोटीवर तपासले आणि जेथे धर्म अन्यायाला पोसतो तिथे त्याला आव्हान दिले.

फुले यांच्यानंतर अस्पृश्यता निर्मूलनाच्या कार्यात गोपाळबुवा वलंगकर हे एक महत्त्वाचे नाव आहे. ते मूळचे सैनिक असले तरी नंतर त्यांनी समाजसुधारणेचा मार्ग स्वीकारला. त्यांनी ‘विवेकविलास’ हे नियतकालिक काढून अस्पृश्यतेविरुद्ध लेखन सुरू केले. वलंगकरांनी अस्पृश्यांना ‘हरिजन’ किंवा ‘आत्मबंधू’ म्हणत समानतेचा विचार मांडला आणि सामाजिक एकतेचा प्रचार केला. त्यांनी ‘असहिष्णुता निर्मूलन’ आणि ‘जातिभेद निर्मूलन’ हे सामाजिक अभियान म्हणून उभे केले. वलंगकरांच्या प्रेरणेतून अनेकांनी या चळवळीत सहभाग घेतला.

शिवराम जनाबा कांबळे हे सुद्धा एक लढाऊ कार्यकर्ते होते. ते अस्पृश्य वर्गाच्या शिक्षणासाठी झटले आणि पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी त्यांनी वसतिगृहे चालवली. कांबळे यांनी ‘सर्वजनहिताय’ या तत्त्वावर आधारित कार्य केले आणि अस्पृश्य समाजाला स्वावलंबनाचे बळ दिले. त्याचबरोबर किसन भागू यांनी धर्मसंस्थांच्या आड लपलेल्या जातीभेदांविरुद्ध आवाज उठवला. गणेश आकाजी गवई आणि कालीचरण नंदागवळी यांनी ग्रामीण भागात जाऊन लोकजागृती केली. गवई यांनी अस्पृश्य समाजाच्या शिक्षणासाठी निधी उभारला आणि युवकांना संघटनात आणले. नंदा गवळी यांनी धार्मिक अनुष्ठानांमधील अस्पृश्यतेच्या प्रथांचा विरोध केला आणि मंदिर प्रवेश आंदोलनाची बीजे पेरली.

या सर्वांच्या प्रयत्नांनंतर महाराष्ट्रात अस्पृश्यता निवारणाचे संघटित आणि पद्धतशीर कार्य विठ्ठल रामजी शिंदे यांनी केले. ते या चळवळीचे खरे आधारस्तंभ मानले जातात. त्यांनी १९०५ साली ‘अस्पृश्यता निवारण समाज’ ही संस्था स्थापन केली. हे भारतातील पहिल्याच प्रकारचे संघटित आणि योजनाबद्ध अभियान होते. शिंदे हे आर्यसमाजाच्या प्रभावाखाली आले होते, पण त्यांनी फक्त धार्मिक सुधारणा नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाचा कार्यक्रम आखला. त्यांनी अस्पृश्यांसाठी शाळा, वसतिगृहे सुरू केली आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यांच्या ‘भारतीय समाजाचे पुनरुत्थान’ या ग्रंथात अस्पृश्यतेचा धार्मिक आधार कोसळवणारे तर्क सापडतात. शिंदे यांनी ‘प्रबोधन’ नियतकालिकातून अस्पृश्यतेविरुद्ध लेखन केले आणि त्यातून त्यांनी समाजमन हादरवले. त्यांच्या कार्यामुळे पुढे अनेक सामाजिक संघटनांना दिशा मिळाली.

शाहू महाराजांचे कार्यही या चळवळीतील मैलाचा दगड ठरते. कोल्हापूर संस्थानात राज्यकर्ते असतानाही त्यांनी आपले सत्तास्थान समाजसुधारणेच्या सेवेसाठी वापरले. त्यांनी दलित विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केल्या, अस्पृश्यांना शिक्षण, नोकरी व न्याय मिळावा म्हणून कायदे केले. त्यांनी मंदिर प्रवेशाचा कायदा अमलात आणला आणि जातीभेदाच्या विरोधात उभे राहणाऱ्यांना सरकारी संरक्षण दिले. १९१९ मध्ये शाहू महाराजांनी कोल्हापूरात अस्पृश्यांना सार्वजनिक विहिरीतून पाणी घेण्याचा अधिकार दिला, जे त्या काळात एक क्रांतीकारी पाऊल होते. त्यांनी ‘समानतेशिवाय धर्म नाही’ असे स्पष्ट सांगून सामाजिक न्यायाच्या कल्पनेला राजकीय पाठबळ दिले.

अस्पृश्यता निर्मूलनासाठी काही व्यक्तींनी वैयक्तिक पातळीवरही उल्लेखनीय कार्य केले. श्री. म. माटे यांनी अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र शाळा स्थापन केल्या. सेनापती बापट यांनी आपल्या क्रांतिकारी विचारांमधून समाजातील विषमता दूर करण्याचे आवाहन केले. सावरकरांनी मात्र या विषयाला धर्म-सुधारणेच्या आणि राष्ट्रनिर्मितीच्या संदर्भात हाताळले. त्यांनी ‘हिंदुत्व’ या संकल्पनेत सर्व हिंदूंना एकसमान मानले आणि अस्पृश्यता ही हिंदू धर्मावरचा डाग असल्याचे ठामपणे सांगितले. रत्नागिरीत त्यांनी अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केला आणि सहभोजनाचा अंगीकार करून अस्पृश्यता निवारणाचा प्रयत्न केला. सावरकरांच्या दृष्टिकोनात अस्पृश्यता ही केवळ सामाजिक नाही, तर राष्ट्राच्या ऐक्यावर आघात करणारी गोष्ट होती.

या सर्वांनी केलेल्या कार्यामुळे महाराष्ट्रात सामाजिक वातावरण बदलू लागले. पण अस्पृश्यतेचा शतकानुशतकांचा अंधकार पूर्णतः दूर करण्यासाठी तात्त्विक आणि संविधानाधारित चळवळीची आवश्यकता होती. ही जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारली. आंबेडकर हे या लढ्याचे शिखर आहेत. त्यांनी अस्पृश्यतेचा केवळ सामाजिक नव्हे, तर आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय दृष्टिकोनातूनही अभ्यास केला. कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथील शिक्षणानंतर भारतात परतल्यावर त्यांनी अस्पृश्य समाजाच्या उन्नतीसाठी ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ स्थापन केली. ‘मूकनायक’, ‘बहिष्कृत भारत’, ‘जनता’ यांसारख्या पत्रिकांतून त्यांनी समाजप्रबोधन केले.

१९२७ च्या महाड चवदार तळ्याच्या आंदोलनाने अस्पृश्यता निर्मूलन चळवळीला ऐतिहासिक वळण दिले. आंबेडकरांनी तेव्हा सार्वजनिक पाण्याच्या हक्कासाठी अस्पृश्यांना एकत्र आणले आणि या प्रश्नाला मानवी हक्कांच्या पातळीवर नेले. त्यानंतर १९३० मध्ये ‘नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश आंदोलन’ झाले, ज्यात धार्मिक स्थळांवरील भेदभावाला थेट आव्हान देण्यात आले. आंबेडकरांनी अस्पृश्यतेचा मूळ आधार असलेल्या धर्माच्या अधिकाराला प्रश्नांकित केले. त्यांनी अखेर ‘मी हिंदू धर्मात जन्मलो हे माझे भाग्य, पण हिंदू म्हणून मरण पत्करणार नाही’, असे म्हणत बौद्ध धर्म स्वीकारला. १९५६ मध्ये नागपूरला झालेल्या दीक्षाभूमीच्या कार्यक्रमात लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारून त्यांनी भारतीय समाजाला नवीन दिशा दिली. संविधाननिर्मितीच्या वेळी आंबेडकरांनी अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्न राष्ट्रीय स्तरावर नेला. भारतीय संविधानातील कलम १७ ने अस्पृश्यता रद्दबातल ठरवली आणि त्यावरील आचरण दंडनीय अपराध ठरवले. ही जगातील पहिलीच घटना होती जिथे सामाजिक विषमता निर्मूलनाला संवैधानिक बळ देण्यात आले. त्यामुळे अस्पृश्यता केवळ समाजसुधारणेचा विषय राहिला नाही, तर तो राज्यघटनेच्या न्यायसिद्ध तत्त्वांचा भाग बनला.

या सर्व समाजसुधारकांच्या कार्याचा परिणाम असा झाला की, महाराष्ट्र हा भारतातील सर्वात प्रगत सामाजिक चळवळींचा प्रदेश ठरला. विठ्ठल रामजी शिंदे आणि शाहू महाराजांनी पेरलेली बीजे आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली विशाल वटवृक्ष बनली. त्याआधी फुले, सावित्रीबाई, वलंगकर, कांबळे, गवई, नंदा गवळी या सर्वांनी जमिनीचा पाया तयार केला होता. सावरकर, माटे, बापट यांसारख्या व्यक्तींनी त्या जमिनीवर विचारांचे खतपाणी घातले. या सर्वांच्या प्रयत्नांमुळे अस्पृश्य समाजात आत्मभान आणि स्वाभिमान जागा झाला. परंतु अस्पृश्यता निर्मूलनाची लढाई केवळ भूतकाळातील एक प्रसंग नाही, तर ती आजही चालू असलेली प्रक्रिया आहे. संविधानाने जरी कायदेशीररित्या अस्पृश्यता संपवली असली, तरी सामाजिक मानसिकतेतील भेदभाव अजूनही काही प्रमाणात शिल्लक आहे. म्हणूनच या सर्व समाजसुधारकांची आठवण आजही जिवंत ठेवण्याची गरज आहे. त्यांनी मांडलेल्या ‘समानता, शिक्षण, स्वाभिमान, आणि संघटन’ या चार मूल्यांवर भारतीय समाजाचे भविष्य उभे आहे.

महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारणाचा हा इतिहास केवळ काही व्यक्तींचा नव्हे, तर एका समाजाच्या आत्मजागृतीचा इतिहास आहे. फुले यांच्यापासून सुरू झालेला हा प्रवास शिंदे, शाहू महाराज, आंबेडकर यांच्यापर्यंत आला आणि अजूनही सुरू आहे. या प्रवासात समाजाच्या प्रत्येक घटकाने – शिक्षक, राजकारणी, क्रांतिकारक, लेखक, पत्रकार – आपापला वाटा उचलला. या सर्वांनी भारतीय समाजाला एक नवी दिशा दिली, जिथे माणूस हा धर्म, जात, पंथ यांच्या पलीकडे जाऊन विचारात घेतला जातो. म्हणूनच महाराष्ट्रातील अस्पृश्यता निवारण चळवळ ही फक्त सामाजिक सुधारणा नव्हे, तर मानवतावादी क्रांती होती. तिने केवळ अस्पृश्यांच्या नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या मुक्ततेचा मार्ग दाखवला. या क्रांतीचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे — मानवाला मानव म्हणून वागवणे हेच खरे धर्मकार्य आहे. हे लक्षात न घेतल्यामुळे आजही राजकारणी सत्तेसाठी जाती-जातीमध्ये वैमनस्य वाढवून ’फोडा आणि झोडा’ या पद्धतीने राज्यकारभार करत आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या 70 वर्षात कमी झालेला जात्याभिमान गेल्या दहा वर्षात पुन्हा एकदा वाढू लागलेला आहे. आपल्याकडे माणूस शिकला, साक्षर झाला, पण सुसंस्कृत झालाच असे नव्हे. तेव्हा नवीन पिढीने एका ’माणसाने दुसऱ्या माणसाशी माणसासारखे माणुसकीने वागणे’ हेच सुसंस्कृत मनाचे लक्षण आहे, हे कायम लक्षात ठेवले तरच अस्पृश्यता निवारणच्या इतिहासाला अर्थ प्राप्त होईल.

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र ३० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र ३० ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्ती सूत्र क्र. ३०.

स्वयंफलरूपतेति ब्रह्मकुमाराः ॥ ३० ॥

अर्थ : ब्रह्मदेवाचे पुत्र (सनकादिक तसेच नारद) भक्ती स्वयंफलरूप आहे असे म्हणतात.

विवेचन : भक्ती ही साधन मानली तर तिचे महत्त्व राहणार नाही. तसेच तिला ज्ञानादिकाचे साध्य मानले तरी पारतंत्र्य प्राप्त होते किंवा अन्योन्याश्रयत्व दोष प्राप्त होतो हे पूर्वीच्या सूत्रावरील विवरणात सांगितले आहे. ही दोन्ही मते नारदांना मान्य नसावीत म्हणून या सूत्रात नारद म्हणतात, ती स्वयंफलस्वरूप आहे.

भक्तीची स्वयंफलरूपता नारदांनी सूत्र सव्विसाव्यात ‘फलरूपत्वात्’ म्हणून सांगितलीच आहे. सनकादिक व नारद या उभय ब्रह्मकुमारांच्या मते भक्ती ही कोणाचे साध्य नाही व कोणाचे साधन नाही; ती स्वतःच फलस्वरूप आहे, तीच साध्य व तीच साधन आहे. ज्ञानाने भक्ती किंवा भक्तीने ज्ञान हे मत त्यांना मान्य नाही. ती स्वयंफलस्वरूपा कशी आहे याचे विस्तारपूर्वक विवरण, सव्विसाव्या सूत्रावर केले गेलेच आहे. कोणी म्हणेल की कोणते तरी साधन केल्याविना भक्ती तरी कशी प्राप्त होणार? कोणत्याही गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय त्याबद्दल मत प्रगट करणे अन्यायकारक होऊ शकते. आपण नामस्मरण भक्तीचे उदाहरण पाहू. कोणतेही नाम घेताना, कोणालाही सुरुवातीला त्याचा कंटाळाच येतो, हा जवळजवळ सर्वांचा अनुभव असेल. पण श्रीयुत तुकाराम आंबिले यांना त्यांच्या गुरूंनी स्वप्नात नाम दिले. त्यांनी त्या नामाचा घोषा लावला….! न कंटाळता, न थकता, प्राप्त परिस्थितीचा स्वीकार करीत, अगदी भंडाऱ्याच्या डोंगरावर जाऊन नाम घेतले…..! शेवटी एक वेळ अशी आली की श्री. तुकाराम आंबिले यांचे #”आकाशा एवढ्या तुक्यात”# रुपांतरण झाले….! हे सर्व परिवर्तन निव्वळ नामस्मरणाने झाले असे संत तुकाराम महाराज यांचे चरित्र वाचले की लक्षात येईल.

सामान्य मनुष्याच्या अंगी असलेल्या उपजत *गुणां*मुळे त्याच्यात भगवद्विमुखता, विषयवासना, अश्रद्धा हे असे अनेक रोग असतात, त्यामुळे त्याला भक्तीमार्ग गोड लागत नाही. पूजेत, भजनात, ध्यानात आनंद होत नाही; रुची निर्माण होत नाही. याचे औषधही हेच आहे की नामस्मरण सतत करीत राहणे. ते नाम ते सर्व विकार दूर करते, हृदयशुद्धी होते. मग संत तुकाराम महाराज म्हणतात,

नाम घेतां मन निवे । जिव्हे अमृतचि स्रवे *होताती बरवे । ऐसे शकुन लाभाचे ॥०१॥ मन रंगलें रंगलें । तुझ्या चरणीं स्थिरावलें । केलिया विठ्ठलें । ऐसी कृपा जाणावी ॥०२॥ जालें भोजनसें दिसे । चिरा पडोनि ठेला इच्छे । धालियाच्या ऐसें । अंगा येती उद्गार ॥०३॥ सुख भेटों आलें सुखा । निध सांपडला मुखा तुका म्हणे ||०४||”

संदर्भ: अभंग क्रमांक ८८४, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

तुकाराममहाराजांनी प्रथम आपल्या वाणीस नाम घेण्याची प्रेरणा दिली.

“घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे || १ || 

डोळे तुम्ही घ्यारे सुख | पाहा विठोबाचे मुख || २ || 

तुम्ही आइका रे कान | माझ्या विठोबाचे गुण || ३ || 

मन तेथे धाव घेई | राही विठोबाचे पायी || ४ || 

तुका म्हणे जीवा | नको सोडू या केशवा || ५ ||”

– – संत तुकाराम महाराज सतत नामाच्या मागे लागले, मनात असेल किंवा नसेल पण वाचेवर नाम वसोदे, असा नामजप, भजन चालू झाले. मग त्यांना पुढील प्रमाणे अनुभव आला… 

“विषयीं विसर पडिला निःशेष । अंगीं ब्रम्हरस ठसावला ॥१॥ 

माझी मज झाली अनावर वाचा । छंद या नामाचा घेतलासे ॥२॥ 

लाभाचिया सोसें पुढें चाली मना । धनाचा कृपणा लोभ जैसा ॥३॥ 

तुका म्हणे गंगासागरसंगमीं । अवघ्या जाल्या ऊर्मी एकमय ॥४॥”

(संदर्भ: अभंग क्रमांक १०३५, सार्थ तुकाराम गाथा धार्मिक प्रकाशन संस्था)

– – नामस्मरण भक्ति करता करता श्री. तुकाराम आंबिले ते संत तुकाराम महाराज हा प्रवास सुलभतेने घडून आला……!

… “स्वयंफलरूपता“ म्हणतात ती हीच एक अलौकिक अवस्था आहे.

!! जय जय रघुवीर समर्थ !!

!! नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. ६ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “नाझ -ए -हिंद! अभिमान आहे!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “नाझ -ए -हिंद! 🇮🇳 अभिमान आहे!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

नाझ-ए-हिंद! अभिमान आहे!

जगात आणि त्यातल्या त्यात भारतात सर्वाधिक धर्मनिरपेक्ष जर कुणी असेल तर ती भारतीय सेना. सेनेत जणू सबंध भारत नांदत असतो. एक सैनिक, एक सैन्याधिकारी त्याच्या कार्यकाळात भारताच्या जवळजवळ सर्वच राज्यांत, सीमांवर विविध राज्यांतून आलेल्या विविध अधिका-यांच्या नेतृत्वात सेवा बजावून निवृत्त होतो.

नेतृ या संस्कृत शब्दापासून तयार झालेल्या नेता या शब्दाचा एक अर्थ ‘धोका पत्करणारा’ असाही सांगितला जातो… अर्थात समूहाच्या अग्रभागी राहून, समुहावर येऊ घातलेले संकट जो प्रथम आपल्या शिरावर घेतो.. तो खरा नेता… नायक!

“शत्रूला माझ्या सैनिकांना इजा पोहोचवायचीच झाल्यास.. त्यांना प्रथम माझ्याशी दोन हात करावे लागतील… त्यात मी मरण पावलो तरच त्यांना माझ्या सैनिकांपर्यंत पोहोचता येईल! आणि मी माझ्या जवानांसाठी काहीही करू शकतो.. नव्हे करेन” असं छातीठोकपणे सांगणारा आणखी एक सेनानी भारतीय सेनेने अनुभवला… त्याची ही कथा! भारतीय सैन्याधिकारी त्यांच्या हाताखाली काम करणा-या जवानांना my boys म्हणतात… ते केवळ औपचारीकता म्हणून नव्हे… तर खरोखरीच संकटाच्या परिस्थितीत त्यांच्या मागे संरक्षक म्हणून उभे राहतात… हे सिद्ध करणारी!

बावीस ऑगस्ट, दोन हजार आठ… पहाटेचे साडेतीन वाजलेले आहेत… या दिवसाच्या सायंकाळी जम्मू-काश्मीरमध्ये तैनात ४५, राष्ट्रीय रायफल्सच्या अधिका-यांना एक पक्की खबर मिळाली आहे… पाकिस्तानी अतिरेक्यांचा एक मोठा गट सीमा ओलांडून भारतात प्रवेश करणार आहे! Insurgent म्हणजे प्रस्थापित सत्तेस धुडकावून त्या सत्तेविरुद्ध शस्त्र हाती घेतलेली व्यक्ती. या Insurgent विरुद्ध कारवाई करून त्याला नेस्तनाबूद करणे गरजेचे ठरते.. अन्यथा सत्ता धुळीस मिळायला वेळ लागत नाही. भारतात भारताची, भारतातल्या सर्वच्या सर्व भूभागावर एकछत्री सत्ता आहे.. आणि असेल. या सत्तेला कुणी आव्हान दिले तर ते आव्हान मोडून काढण्याच्या अखंडित मोहिमेला Counter-Insurgency अशी संज्ञा आहे.

अतिरेकी आपल्या सीमेच्या आत खोलवर येण्याआधीच त्यांना रस्त्यातच गाठायला त्यांना सामोरे जायचे आणि त्यांचा खात्मा करायचा… अशी सर्वसाधारण पद्धत असते. हे जणू एकप्रकारे मरणावर चालून जाण्यासारखेच. पण ही अशी चाल करून जाणेच भारतीय सैनिकांच्या अंगवळणी पडले आहे.

४५, राष्ट्रीय रायफल्सच्या अधिका-यांना या येऊ घातलेल्या अतिरेक्यांविरोधात मच्च्छल गावाजवळ, कुपवाडा सेक्टरमध्ये ‘नाव-नार’ नावाने एक मोहिम आखली. आपल्या कुटुंबियांसमवेत एक दीर्घ सुट्टी उपभोगून सैन्य तुकडीत नुकतेच परतलेले अनुभवी कमांडिंग ऑफिसर या मोहिमेत अग्रभागी राहून निघाले. साहेबांना प्रत्यक्ष सैनिकी कारवायांचा थोडाथोडका नव्हे तर तब्बल वीस वर्षांचा अनुभव होता. आपल्या नेतृत्वातील सैनिकांना स्वत:चे पुत्र मानणारे अधिकारी म्हणून या साहेबांची ख्याती होती. त्यांचे पिताजी सेनेत Honorary Captain होते. त्यांच्याच पावलांवर पाऊल टाकीत हे साहेब सेनेत अधिकारी म्हणून दाखल झाले होते… आणि त्यांच्या दोन भावांनी सुद्धा त्यांचाच कित्ता गिरवला होता… एकच कुटुंबातील चौघे पुरुष भारताच्या संरक्षण सेवेत होते!

त्या पहाटेचा अंधार अधिकच गडद होता. सावध पावले टाकीत आपली तुकडी पुढे पुढे सरकत राहिली… कर्नल साहेब त्यांच्यापुढे कुणालाही जाऊ देत नव्हते… इतक्यात समोरच्या झाडीत काही हालचाल दिसली… आणि एके-४७ मधून निघणा-या गोळ्यांचा चकचकाट त्या अंधाराला भेदून येऊ लागला… आपल्या सैनिकांनी प्रशिक्षणात शिकवल्यानुसार त्वरीत आपापल्या जागा घेतल्या… कर्नल साहेबांनी थेट पुढे घुसत त्यांची रायफल अचूक चालवली… दोन अतिरेकी त्यांच्या वर्षावात त्वरीत ठार झाले खरे… पण त्या अतिरेक्यांनी झाडलेल्या फैरीमध्ये (फैर=fire) साहेबांच्या शरीरात अनेक गोळ्या घुसल्या! साहेब जबर जखमी झाले… आणि कोसळले…. पण कोसळताना त्यांनी आणखी एक अतिरेकी पाहिला…. आधीच्या दोन अतिरेक्यांचे मुडदे पाहून त्या अतिरेक्याने डोंगर उतारावरील एका चिंचोळ्या जागेत आसरा घेतला आणि त्या सुरक्षित जागेवरून तो भारतीय सैनिकांवर जबरदस्त गोळीबार करु लागला! आपल्या सैनिकांना पुढे जाता येईना…. कर्नल साहेबांनी ही आणीबाणीची परिस्थिती जाणली…. प्रचंड जखमी अवस्थेत, एखादा जखमी वाघ चवताळून उठावा तसे साहेब उठले… तो अतिरेकी लपला होता त्या छोट्या डोंगराच्या दुस-याबाजूने वर चढले… आणि त्यांनी स्वत:ला त्या अतिरेक्याच्या दिशेने खाली लोटून दिले…. अगदी त्याच्या पुढ्यात जाऊन थांबले कर्नलसाहेब… त्या अतिरेक्याच्या समोर त्याचा मृत्यू साक्षात उभा होता….. कर्नल जोजन थॉमस साहेबांच्या रुपात! जोजन साहेब केरळमधील थिरुवला जिल्ह्यातील एका खेड्यात, कुट्टूर गावात २२ जुलै, १९६५ रोजी जन्मले होते. JOJAN हे JOHAN (जोहान) या शब्दाचे एक रूप आहे. जोहान चा अर्थ आहे देव दयाळू आहे! आणि Thomos हे प्रभू येशूच्या बारा शिष्यांपैकी एका शिष्याचे नाव होते. Jojan Thomos हे नाव धारण करणारा एक बहादूर सैनिक अधिकारी भारतीय सैन्याला लाभला, ही सुद्धा ईश्वरी कृपाच म्हणावी लागेल.

जोजन यांनी पदवी शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी प्रवेश परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आणि चेन्नईच्या सैन्य अधिकारी प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून ते रुजू झाले. आणि मार्च १९८६ मध्ये त्यांनी देशसेवेत प्रथम पग.. पहिले पाऊल ठेवले!

 जोजन साहेबांना रेजिमेंट मिळाली ती ११, जाट रेजिमेंट. एक केरळी माणूस हरियाणवी सैनिकांच्या सोबत काम करू लागला… जगातल्या इतर कोणत्याही सैन्यात असे वैविध्य आढळत नाही सहसा. सेनेत जणू सारा भारत एकवटलेला असतो. एकेक पायरी पार करीत करीत जोजन साहेब आता कर्नल बनले होते… त्यांची कार्यशैली, उत्साह आणि कार्यक्षमता लक्षात घेऊन वरिष्ठांनी त्यांना 45 राष्ट्रीय रायफल्समध्ये डेप्युटेशनवर पाठवलं…. राष्ट्रीय रायफल्समध्ये देशाच्या विविध भागातील उत्तमोत्तम सैनिक, अधिकारी हेरून त्यांना कर्तव्यावर विशेष कामगिरीसाठी बोलावून घेतले जाते… आणि यासाठी अनेक सैनिक, अधिकारी उत्सुक असतात… कारण राष्ट्रीय रायफल्स जम्मू-कश्मीरमध्ये तैनात असल्याने इथे नेहमी शौर्य गाजवण्याची संधी असतेच! जोजन साहेबांनी मोठ्या उत्साहाने काश्मिरात पदार्पण केले!

काश्मीर म्हणजे काही एखाद्या हाऊसिंग सोसायटी नव्हे… सिमेंटची संरक्षक भिंत असलेली. प्रवेशद्वारावर एखाद-दोन रखवालदार नेमले की झाले! प्रचंड लांबीची भारत-पाक सीमा… घनदाट जंगल… लहरी हवामान… पाकिस्तानी लष्कराकडून प्रशिक्षण दिले गेलेले, अत्याधुनिक शस्त्रसज्ज आणि भारतद्वेषाने पेटून उठलेले माथेफिरू अतिरेकी, त्यात काही स्थानिकांचा पाठिंबा, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कायदे, संघटना, जनता यांच्यामुळे सैन्यबलाचा थेट वापर करण्यावर असलेल्या मर्यादा….. एक ना अनेक कारणे आहेत. इथे प्रत्येक फुटावर सैनिक उभे करणे अशक्य आहे… पण तरीही भारतीय सैनिक असेल त्या स्थितीत पाय रोवून उभे असतात… एखादा सैनिक धारातीर्थी पडला की दुस-याच क्षणी दुसरा सैनिक त्याची जागा घेत असतो…. माघार नाही घेत…. म्हणून कश्मीर आणि पर्यायाने भारत आपला आहे!

 २२ ऑगस्ट, २००८ रोजी जोजन साहेबांचे वय होते ४३ वर्षे १ महिना. पोटी दोन मुले होती.. एक मुलगी मेघना आणि चिरंजीव फिलेमॉन. पत्नी गृहिणी बीना. बेचाळीस वर्षांच्या आयुष्यात त्यांनी अनेक मित्र जोडले आणि अनेक विषयांमध्ये कसब प्राप्त केले. एखाद्या वाघासारखी शरीरयष्टी लाभलेल्या जोजन साहेबांचे मन मात्र खूप हळवे होते. पत्नी आणि दोन मुले, आई, वडील यांच्यावर त्यांचे जिवापाड प्रेम होते. सैनिकी जीवनातील अनिश्चितता त्यांना ठाऊक असल्याने प्रत्येक क्षण पुरेपूर आनंदाने जगण्याचा त्यांचा प्रयत्न असत. त्यांनी हेलिकॉप्टरचालक प्रशिक्षण घेतले आणि भारताच्या सीमांवर तैनात असलेल्या शीघ्र कृती दलाचा एक महत्त्वाचा घटक म्हणून सहा वर्षे प्रभावी कामगिरी करून नाव कमावले… त्यांच्या गणवेशावर आर्मी एविएशन कोअरचे पंख सन्मानाने मिरवत राहिले.

कर्नल जोजन साहेब त्या अतिरेक्याच्या अगदी समोर उभे होते… इतक्या जवळून रायफल झाडता येत नाही… थेट भिडायला लागते… जोजन साहेबांनी त्या अतिरेक्यावर झडप घातली… त्याला जणू मरणमिठीच मारली…. जोरदार संघर्ष झाला…. आणि शेवटी वाघाने तो पिसाळलेला कुत्रा मारला! पण साहेब पुन्हा उठून उभे राहू शकले नाहीत. आपल्या इतर सैनिकांनी तोवर इतर तीन जनावरे यमसदनी धाडून दिली होती… एकूण सहा शिकारी झाल्या होत्या! अतिरेक्यांना टिपताना नाईक नीरज आणि शिपाई सुलतान सिंग हे दोघे जखमी होऊन हुतात्मा झाले होते! या दोघांना मरणोत्तर सेना मेडल जाहीर झाले.

प्रत्येक मोहिमेत वैद्यकीय साहाय्य दल सोबत घेऊन जाता येतेच असे नाही… डोंगर, रस्ते, अंधार, अंतर या अडचणी असतात… त्यातून जखमींना अतित्वरीत वैद्यकीय मदत देता येतेच असे होत नाही, गरज पडली आणि शक्य झाल्यास हेलीकॉप्टरमधून जखमींना लष्करी रुग्णालयात नेले जाते. पण त्यादिवशी एवढे सर्व करूनही जोजन साहेबांचे प्राण वाचू शकले नाहीत! पण त्यांनी त्यांचे शब्द खरे करून दाखवले…. अतिरेक्यांना माझ्या सैनिकांपर्यंत पोहोचायचे झाल्यास… त्यांना माझ्या मृतदेहावरूनच पुढे जावे लागेल!

‘अशोक चक्र’ हा शांतता काळात सैनिकांना प्रदान केला जाणारा सर्वोच्च सैनिक सन्मान मानला जातो. त्याचे मानकरी ठरले कर्नल जोजन… मरणोत्तर अशोक चक्र विजेते! हुतात्मा कर्नल जोजन थॉमस यांच्या धीरोदात्त पत्नी बीना यांनी तत्कालीन महामहीम राष्ट्रपती महोदया श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते राजधानी दिल्लीमध्ये २००९ मधील प्रजासत्ताक दिनी हा पुरस्कार स्वीकारला! पती गमावल्यानंतर बीनाताई यांनी अगदी कमी कालावधीत स्वत:ला सावरले… कारण त्यांच्या पदरात दोन मुले होती… मुलगी मेघना आणि मुलगा फिलेमॉन. बीनाताई यांनी कर्नल जोजन साहेबांच्या स्मृति कायम राहाव्यात यासाठी विशेष उपक्रम हाती घेतले. साहेबांची जीवनकहाणी सांगणारी चित्र-पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केली. साहेबांचे स्मारक उभारले.

भारतास धुळीस मिळवण्याचे स्वप्न पाहणा-या शत्रूला प्रत्युत्तर म्हणून, जिथे कर्नल जोजन साहेब आणि अन्य सैनिकांनी देह ठेवले, त्या स्थळी भारतीय सेनेने नाझ-ए-हिंद अर्थात हिंदुस्थानाचा अभिमान नावाने एक मोठे स्मृतिस्थळ उभारले गेले आहे. इथे शंभर फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर तिरंगा डौलाने फडकत असतो. इथे कर्नल साहेबांची शौर्यगाथा प्रकाशित केलेली आहे. इथल्या द-या-खो-यात केरळमधून काश्मिरात आलेल्या आणि देशाचे शत्रू असलेल्या अतिरेक्यांची शिकार केलेल्या वाघाची डरकाळी कायम घुमत असते… या वाघाचे नाव जोजन! हम रहे या न रहे… यह देश रहना चाहिये…. यासाठी असे अनेक वाघ आपले प्राण देत असतात! देशाने त्यांच्या प्रती कृतज्ञ रहायला हवे…. त्यांच्या कथा पुढच्या पिढीला सांगत राहायला हव्यात…. कारण पुढच्या पिढ्यांना त्यांचा वारसा घ्यावा लागणार आहे! जयहिंद!

कर्नल जोजन साहेबांची कहाणी तुम्हाला इतरांना सांगावी वाटली तर जरूर सांगा. जिन्हे नाझ है हिंद पर वह कहां है? .. या प्रश्नाचे उत्तर देणे गरजेचे आहे!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘नामलिंगानुशासनम् – अमरकोश…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘नामलिंगानुशासनम् – अमरकोश…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

“अमरकोश” हा संस्कृत भाषेतील सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध नामकोश (शब्दकोश) आहे. याची रचना अमर सिंह या विद्वानांनी केली आहे. खाली अमरकोश आणि त्याचे रचनाकार, रचना, महत्व, अभ्यासपद्धती व त्यावर झालेल्या टीकांचा संक्षिप्त आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.

१. रचनाकार – अमर सिंह

काल: अदमासे चौथ्या-पाचव्या शतकात (गुप्तकालात)

राजाश्रय: काही विद्वानांच्या मते अमर सिंह हे विक्रमादित्य (बहुधा चंद्रगुप्त विक्रमादित्य) यांच्या नवरत्नांपैकी एक होते.

व्यक्तिमत्व: संस्कृत भाषेतील शब्दविज्ञान, व्याकरण आणि काव्यशास्त्र यांचा गाढ अभ्यास असलेले पंडित. त्यांनी भाषेतील सर्व नामशब्द एकत्र करून त्यांची अर्थवर्गवारी केली.

२. अमरकोशाची रचना

अमरकोशाचे मूळ नाव आहे “नामलिंगानुशासनम्” (नाम आणि लिंग यांचे अनुशासन). त्यात तीन ‘निघंटु’ (भाग) आहेत, ज्यांना “काण्ड” असेही म्हणतात.

३. विभागणी

प्रथमकाण्डम् /स्वर्गादिकाण्डम्

यामध्ये आकारा वर्ग आहेत (स्वर्ग, देव, ब्रह्मांड इत्यादी विषय)

१ स्वर्गवर्गः २ व्योमवर्गः ३ दिग्वर्गः ४ कालवर्गः ५ धीवर्गः ६ वाग्वर्गः७ शब्दादिवर्गः ८ नाट्यवर्गः ९ पातालभोगवर्गः १० नरकवर्गः ११ वारिवर्गः

द्वितीयकाण्डम्/भूवर्गादिकाण्डम्

(पृथ्वी, देश, पर्वत, वनस्पती, प्राणी, मानव इ. विषय)

या कांडमध्ये दहा वर्ग आहेत:

१ भूमिवर्गः २ पुरवर्गः ३ शैलवर्गः ४ वनौषधिवर्गः ५ सिंहादिवर्गः ६ मनुष्यवर्गः७ ब्रह्मवर्गः ८ क्षत्रियवर्गः ९ वैश्यवर्गः १० शूद्रवर्गः

तृतीयकाण्डम्/सामान्यादिकाण्डम्

समानार्थक व विपर्ययार्थक शब्दकांड (गुण, दोष, मनोवृत्ती, काल, क्रिया इत्यादी)

या कांडामध्ये सहा वर्ग आहेत:

१ विशेष्यनिघ्नवर्गः २ संकीर्णवर्गः ३ नानार्थवर्गः४ नानार्थाव्यवर्गः ५ अव्ययवर्गः ६ लिंगादिसांगवर्गः

४. अमरकोशाचे महत्व

संस्कृतमधील सर्वात जुना आणि अधिकृत समानार्थी शब्दकोश. संस्कृत, प्राकृत, पाली, तसेच मराठी, हिंदी, गुजराती इ. भाषांमधील शब्दनिर्मिती, व्युत्पत्ती व समानार्थक शब्दांची परंपरा हाच कोश दर्शवतो. विद्यार्थ्यांना संस्कृत शब्दसंपदा वाढविण्यास आणि कविंना योग्य शब्द योजण्यास सहाय्य करणारा. नंतरच्या काळातील सर्व शब्दकोशांचा उदा. हेमकोश, विश्वकोश, राजतरंगिणीतील संदर्भ इ. आधारभूत ग्रंथ.

५. या कोशाचे वेगळेपण

अर्थवर्गांनुसार विभागणी केली आहे. उदा. देववर्ग, पाताळवर्ग, वनस्पतीवर्ग इ. समानार्थी शब्द एकत्र देऊन त्यांच्या लिंगनिर्देशासह -पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग उल्लेख केला आहे. छंदबद्ध शैलीमुळे तो इतर गद्य कोशांपेक्षा काव्यात्मक व स्मरणीय आहे. ही मोठी वैशिष्ट्ये आहेत अमरकाशाची. अमरकोशात व्याकरण, व्युत्पत्ती, लिंगशास्त्र आणि शब्दशास्त्र यांचा सुंदर संगम दिसतो.

६. अमरकोश कसा पहायचा, अभ्यासायचा?

अमरकोश छंदबद्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांनी तो कंठस्थ करून अभ्यासावा. प्रत्येक वर्गात येणाऱ्या शब्दांचा अर्थ, लिंग आणि उपयोग जाणून घेणे आवश्यक आहे. अमरकोशावरील टीका आणि भाष्यांसह त्याचा अभ्यास केल्यास अर्थ अधिक स्पष्ट होतो. उदा. “अमरकोशभाष्य”, “अमरटीका”, “रामाश्रयी टीका” इ. उपयुक्त आहेत. आधुनिक अभ्यासात “अमरकोशसंहिता”, “अमरकोशसोपान” अशी मराठी स्पष्टीकरणेही वापरली जातात.

७. प्रमुख टीकाग्रंथ

अमरकोशावर आज पर्यंत ४० पेक्षा अधिक टीकाकारांनी टीकाग्रंथ लिहिले आहेत. त्यातील काही प्रमुख टीका खालील प्रमाणे –

१. क्षीरस्वामीची टीका: सर्वात प्राचीन आणि प्रसिद्ध भाष्य.

२. ललितादित्य, रघुनाथ, भानुकीर्ति, भट्टोजी दीक्षित इत्यादी विद्वानांची भाष्ये.

३. मराठीतही काही टीका व अर्थसंग्रह झाले आहेत, उदा. “अमरकोशार्थदीपिका”, “अमरकोशसार” इ. महान अर्थशास्त्री आणि संस्कृत विद्वान स्व. चिंतामणराव देशमुखांना अमरकोश अत्यंत प्रिय होता. त्यांनीही अलिकडच्या काळात निवृत्तीनंतर, निधनापूर्वी काहीच वर्षे अमरकोशावर टीका लिहून प्रकाशित केल्याचे केवळ ऐकून आहे. प्रत्यक्ष वाचायला मात्र अजून उपलब्ध होऊ शकलेली नाही.

८. मराठीसाठी अमरकोशाचे महत्व

मराठीतील समानार्थी शब्द, लिंगभेद, आणि व्याकरण परंपरेवर अमरकोशाचा प्रभाव आहे. जुन्या मराठी कवींनी (ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, मोरोपंत, वामनपंडित इ.) जी संस्कृत शब्दसंपदा आपल्या रचनात उपयोजली तिचा पाया अमरकोश आहे. संस्कृत शिक्षणात अमरकोश अभ्यासक्रमाचा आवश्यक भाग म्हणून आजही आहे. पूर्वी विद्यार्थ्यांकडून तो मुखोद्गत करून घेतला जात असे

९. वागनीसाठी काही श्लोक*

 वानगीप्रीत्यर्थ प्रत्येक कांडातील दोन – दोन श्लोक त्यांच्या अर्थासह पुढे देत आहे –

१. स्वर्गादिकाण्डातील दोन श्लोक

(१) स्वर्गः त्रिदिवमाकाशं नभो व्योमान्तरीक्षदम् ।

द्यौर्द्यावा गगनं वियद् अन्तरिक्षं नभः नभः ॥

अर्थः 

‘स्वर्ग’, ‘त्रिदिव’, ‘आकाश’, ‘नभ’, ‘व्योम’, ‘अन्तरिक्ष’, ‘द्यौः’, ‘द्यावा’, ‘गगन’, ‘वियत्’ हे सर्व शब्द आकाश किंवा स्वर्ग या अर्थी वापरले जातात. म्हणजे या सर्वांचा अर्थ “आकाश / स्वर्ग” असा आहे.

(२) इन्द्रः शक्रः पुरन्दरः कोषिकः पाकशासनः।

मेघवाहनवज्री च देवराजो वज्रभृत् ॥

अर्थः 

‘इन्द्र’, ‘शक्र’, ‘पुरन्दर’, ‘कोषिक’, ‘पाकशासन’, ‘मेघवाहन’, ‘वज्री’, ‘देवराज’, ‘वज्रभृत्’ — हे सर्व शब्द देवांचा राजा ‘इंद्र’ याचे समानार्थक शब्द आहेत.

२. भूम्यादिकाण्डातील दोन श्लोक

(१) भूमिर्मेदा क्ष्मा वसुधा वसुन्धरा क्षोणिः क्षोणी वसुमती धरणी धरित्री ॥

अर्थः 

‘भूमी’, ‘मेदा’, ‘क्ष्मा’, ‘वसुधा’, ‘वसुन्धरा’, ‘क्षोणि’, ‘वसुमती’, ‘धरणी’, ‘धरित्री’ — हे सर्व पृथ्वीचे समानार्थक शब्द आहेत.

(२) नदी सरित् सरस्वती तोया आपोऽम्बु वारि सलिलम् ॥

अर्थः 

‘नदी’, ‘सरित्’, ‘सरस्वती’, ‘तोय’, ‘आपः’, ‘अम्बु’, ‘वारि’, ‘सलिल’ — हे सर्व शब्द ‘पाणी’ (जल) या अर्थाने वापरले जातात.

३. समान्यादिकाण्डातील दोन श्लोक

(१) वाचा गिरिर्वाग् गिरा गिरा गीः शब्दो ध्वनिः स्वरः ।

निःस्वनः स्फोट उच्छ्वासो नादो रावो रवः स्वनः ॥

अर्थः 

‘वाच्’, ‘गिरि’, ‘वाक्’, ‘गीः’, ‘शब्द’, ‘ध्वनि’, ‘स्वर’, ‘निःस्वन’, ‘स्फोट’, ‘उच्छ्वास’, ‘नाद’, ‘राव’, ‘रव’, ‘स्वन’ हे सर्व शब्द ‘ध्वनी’ (आवाज / शब्द) या अर्थाने वापरले जातात.

(२) ज्ञानं बुद्धिर्मतिर्धीः प्रज्ञा संवित्स्मृतिः स्मृति: ।

मेधा मनिश्च चेतश्च संज्ञा सञ्ज्ञेति चोच्यते ॥

अर्थः

‘ज्ञान’, ‘बुद्धि’, ‘मति’, ‘धी’, ‘प्रज्ञा’, ‘संवित्’, ‘स्मृति’, ‘मेधा’, ‘मनस्’, ‘चेतस्’, ‘संज्ञा’. हे सर्व शब्द ज्ञान, विचारशक्ती किंवा बुद्धी या अर्थाने वापरले जातात.

१०. सारांश

माहितीग्रंथाचे नाव ‘नामलिंगानुशासनम्’ अर्थात् ‘अमरकोश’ आहे. याचे रचनाकार : अमर सिंह. यांचा काल इ. स. चौथ्या–पाचव्या शतकातला. ग्रंथाची भागसंख्या: ३ – स्वर्गादिकांड, भूम्यादिकांड, सामान्यादिकांड. शब्दसंख्या अदमासे ३, ०००. शैली: छंदबद्ध. अनुष्टुभ्. महत्व: पहिला संस्कृत समानार्थी शब्दकोश. टीका: क्षीरस्वामी, ललितादित्य, भानुकीर्ति इ. मराठीभाषेवर गाढ प्रभाव, भाषिक परंपरेचा पाया, शब्दसंपदेचा आधार.

आपली भाषा संपन्न व्हावी, आपल्याकडे विस्तृत शब्दसंग्रह असावा, नवनवीन शब्द निर्माण करण्याची क्षमता असावी अशी इच्छा मनी बाळगणाऱ्या लेखक, कवीं, पत्रकारांनी अमरकोश अवश्य अभ्यासावा असे स्वानुभवाधारे आग्रहाचे सांगणे.

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वृक्षमाता सालूमरदा थिमक्का… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

श्री विश्वास विष्णु देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ वृक्षमाता सालूमरदा थिमक्का… ☆ श्री विश्वास विष्णु देशपांडे ☆

काही दिवसांपूर्वी सालूमरदा थिमक्का गेल्याची बातमी आपण सगळ्यांनी वृत्तपत्रात वाचली असेल. सालूमरदा हे त्याचं नाव नाही. कानडी भाषेत त्याचा अर्थ होतो ‘ झाडांची रांग. ‘ रस्त्याच्या दुतर्फा अशी झाडांची रांग या स्त्रीने उभी केली म्हणून ती सालुमरदा.

संत तुकारामांच्या ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या उक्तीचा अर्थ हजारो वर्षांनी एका अशिक्षित आणि गरीब स्त्रीने त्यांच्या रूपाने आपल्या कृतीने सिद्ध केला. औपचारिक शिक्षण नाही, पण पर्यावरणाचे सखोल ज्ञान उपजतच होतं. अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेली आणि मोलमजुरी करणारी ही स्त्री. तिचा विवाह बिक्कल चिक्कय्या यांच्याशी झाला. पण दोघांनाही अनेक वर्ष मूल होऊ शकलं नाही. या गोष्टीला त्यांनी नियतीचा शाप न मानता, वृक्षांनाच अपत्य मानण्याचं ठरवलं. त्यांच्या पतीनेही त्यांना या कामात मनापासून साथ दिली.

त्यांच्या गावाजवळून ९४ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जात होता. हुलीकल ते कुडूर या रस्त्यावर त्यांनी वडाची काही रोपे लावली. या रोपांना वाढवणे हा जणू त्यांच्या जीवनात कामचा एक भाग झाला. उन्हाळ्यात दूरवरून पाण्याचे हंडे घेऊन येणे, रोपांभोवती काटेरी कुंपण घालणे—हे त्यांचे रोजचे व्रत होते. ४० वर्षांहून अधिक काळ त्यांनी हा निस्वार्थ त्याग केला. त्यांच्या या ‘सालुमरदा’ (झाडांची रांग) मुळेच त्यांना हे आदराचे नाव मिळाले. या वाटेवर तब्बल ३८५ वडाची झाडे त्यांनी लावली. या झाडांवर पक्षी राहू लागले. वाटसरूंना आणि गुराढोरांना रस्त्यावर सावली मिळाली. एक नवीन विश्व उभे राहिले. एखाद्या व्यक्तीने ठरवले तर ती केवढे मोठे कार्य करू शकते हे त्यांच्या या कार्यातून सिद्ध होते.

असे सांगितले जाते की एकदा या रस्त्याने कर्नाटक मधील एक खासदार जात होते. दुपारच्या उन्हामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांनी रस्त्यावरील या वटवृक्षांच्या सावलीत थोडा वेळ विश्रांती घेतली. रस्त्याच्या दुतर्फा असलेली वटवृक्षांची रांग पाहून त्यांना खूप आनंद वाटला आणि हे एवढे मोठे काम कोणी केले असा प्रश्न त्यांना पडला. अधिक चौकशी केल्यानंतर त्यांना लोकांनी थिमक्का यांचे नाव सांगितले आणि अशा रीतीने त्यांचे कार्य प्रकाशात आले.

ज्या काळात पर्यावरण संरक्षणाचा फारसा गाजावाजा केला जात नव्हता अशा काळात त्यांनी ह कार्य केले. आज संपूर्ण जग जागतिक तापमानवाढीच्या (Global Warming) भीषण संकटाचा सामना करत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि निसर्गाचे संतुलन राखणे ही काळाची गरज बनली आहे. या पार्श्वभूमीवर, थिमक्का यांनी केलेले कार्य केवळ एक सामाजिक उपक्रम नाही, तर ते २१ व्या शतकातील पर्यावरण संरक्षणाचे प्रभावी मॉडेल आहे.

त्यांनी लावलेले प्रत्येक वडाचे झाड आज एक नैसर्गिक ‘कार्बन सिंक’ म्हणून कार्यरत आहे. ही वटवृक्ष पिढ्यानपिढ्या वातावरणातील कार्बन डायऑक्साइड (CO2) शोषून घेतात आणि त्या बदल्यात ऑक्सिजन बाहेर टाकतात. थिमक्का यांनी आपल्या निष्ठेच्या बळावर एक नैसर्गिक CO2 फिल्टर तयार केला. त्यांच्या कार्यामुळे भूजल संवर्धन झाले आणि मातीची धूप थांबली. त्यांचे कार्य म्हणजे जागतिक तापमानवाढीच्या विरोधात केलेली एक स्थलांतरित (Local) आणि अत्यंत प्रभावी कृती होती.

थिमक्का यांच्या कार्याला त्यांच्या मानसपुत्र उमेश यांचा मोठा आधार लाभला. उमेश यांनी केवळ थिमक्का यांची वृद्धापकाळात सेवा केली नाही, तर या वृक्षारोपण मोहिमेचे व्यवस्थापन केले. दूरवरून पाणी आणणे असो, की या कार्याची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवणे असो, उमेश हे थिमक्का यांच्या कार्याचे संवर्धक ठरले. त्यांच्या मदतीमुळेच थिमक्का यांच्या निस्वार्थ कार्याला पद्मश्रीसह अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

२०१९ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला त्यावेळी त्या १०७ वर्षांच्या होत्या. त्या स्वतः पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेल्या. त्यावेळेस ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांनी तो स्वीकारला. हा पुरस्कार स्वीकारत असताना त्यांनी आपला हात आशीर्वादासारखा रामनाथ कोविंद यांच्या मस्तकाला लावला. त्यामुळे आपण भारावून गेलो अशा प्रकारचे भावपूर्ण उद्गार राष्ट्रपतींनी काढले.

सालुमरदा थिमक्का यांना वटवृक्षाप्रमाणेच ११४ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले. त्यांनी शांतपणे जगाचा निरोप घेतला. पण त्यांचे कार्य आजही जिवंत आहे.

“वृक्ष लावणारे निघूनिया जाती, तळी विसावते सानथोर।”

या उक्तीप्रमाणे, थिमक्का आणि त्यांचे पती आज नसले, तरी त्यांनी लावलेले वटवृक्ष आजही दिमाखात उभे आहेत. त्यांच्या शीतल छायेखाली वाटसरूंना सावली मिळते, प्राणी-पक्षांना आश्रयस्थान लाभते आणि परिसर शुद्ध राहतो.

थिमक्का यांनी जगाला दाखवून दिले की, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची गरज नाही; त्यासाठी मनापासून इच्छा आणि निसर्गाप्रतीचे वात्सल्य आवश्यक आहे. त्यांचे जीवन चिरंतन प्रेरणास्रोत राहील आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या संकटावर मात करण्यासाठी त्यांची ‘वृक्षमाता’ म्हणून असलेली भूमिका जगाला नेहमी दिशा देत राहील.

©️ श्री विश्वास विष्णु देशपांडे

चाळीसगाव.

 प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares