☆ “दृढ निश्र्चयाचा महामेरू ” – इंग्लिश लेखक : अज्ञात ☆ मराठी अनुवाद व प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
– – आपल्या उदाहरणाने लाखो लोकांना स्फूर्ती आणि हिंमत देणारी ही एक सत्यकथा आहे.
1983 मध्ये मेरठ येथे जन्मलेल्या इरा सिंगला यांना जन्मतःच पाठीच्या कण्याच्या एका दुर्धर आजाराने ग्रासले होते. त्यांच्या हातांच्या हालचालींना काही बंधने आली होती. मात्र अशा अवस्थेतही त्यांच्या आई वडिलांनी त्यांना कुठलीच वेगळी आणि विशेष वागणूक दिली नाही. आणि म्हणूनच त्या आपले कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करू शकल्या. शिवाय नंतर दिल्ली विद्यापीठाची m. b. a. ची पदवीही मिळवू शकल्या, आणि लगेचच कॅडबरी इंडिया या नामांकित कंपनीत strategic manager म्हणून व कोकाकोला कंपनीत मदतनीस म्हणूनही त्यांनी काम सुरू केले.
2009 मध्ये त्यांनी I. A. S. होण्याचे ठरविले आणि 2010 मध्ये पहिल्या प्रयत्नातच त्या U. P. S. C. ची सिव्हिल सर्विस मधील परीक्षा यशस्वीपणे पास होऊ झाल्या.
त्यांना भारतीय महसूल विभागाची (Revenue Dept.) जबाबदारी देण्यात आली.. पण सरकारकडून, ‘शारीरिक दृष्ट्या असमर्थ’.. हा निकष लाऊन त्यांना नाकारण्यात आले.. सरकारतर्फे असे सांगण्यात आले की त्यांच्यातील गंभीर स्वरूपाच्या शारीरिक व्यंगामुळे त्यांच्या हालचालींवर मर्यादा आहेत.. एखादी गोष्ट ढकलणे.. ओढणे.. किंवा उचलणे या क्रिया त्या करूच शकत नाहीत, आणि म्हणून I. A. S. Officer म्हणून काम करण्यास त्या सक्षम नाहीत.
या गोष्टीचे त्यांना अतिशय दु:ख झाले. पण अतिशय निश्चयाने त्यांनी ‘केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण’ या विशेष अर्धन्यायिक संस्थेकडे सरकारच्या या निर्णयाविरुद्ध तक्रार नोंदवली. बराच काळ लोटला पण सरकार काही त्यांच्या भूमिकेत बदल करायला तयार नव्हते….. आणि आता इराही थांबायला तयार नव्हत्या…
… 2011 साली त्या पुन्हा यूपीएससी च्या परीक्षेला बसल्या आणि पासही झाल्या. या वेळी त्यांना रेल्वे विभाग देण्यात आला, पण पुन्हा त्याच शारीरिक व्यंगाच्या सबबीखाली यावेळीही त्यांना नोकरीसाठी अपात्र ठरविण्यात आले.
2013 साली त्या पुन्हा एकदा UPSC च्या परीक्षेला बसल्या आणि अर्थातच पासही झाल्या. पण याही वेळी सरकारकडून पुन्हा तेच कारण दिले गेले. जगातील सर्वात कठीण असलेल्या एका परीक्षेत एक मुलगी तीन वेळा उत्तम गुणांनी पास होते, पण तिच्यातील शारीरिक व्यंगामुळे नोकरी करण्यास ती असमर्थ आहे हेच दरवेळी अधोरेखित केले गेले.. ही खरोखर फार खेदाची आणि तितकीच संतापजनक बाब आहे.. आणि याही वेळेस केंद्रीय न्यायाधिकरणाकडून त्यांना न्याय मिळाला नाही.
– – आता प्रकरण न्यायालयात गेले. दरम्यान 2014 साली त्या पुन्हा एकदा UPSC च्या परीक्षेस बसली. या वेळेस एक विशेष गोष्ट घडली… त्या नुसत्या पासच झाल्या नाहीत, तर संपूर्ण जगातल्या सर्वात जास्त कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत त्या सबंध भारतात पहिल्या आल्या. आजपर्यंतच्या यूपीएससीच्या इतिहासात प्रथमच इतके जास्त गुण त्यांना मिळाले होते.. म्हणजे एकूण 2025 पैकी 1082 गुण !
… आता मात्र सरकारला त्यांचा पवित्रा बदलावाच लागला आणि इरा यांची अलीपुर, नवी दिल्ली येथे “सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट” म्हणून नेमणूक झाली. या नेमणुकीच्या पहिल्याच वर्षात त्यांनी जवळजवळ 340 बालमजुरांचे जीव वाचवले होते. त्यांना सक्तीने बालमजूर म्हणून पाठविले जात असताना इरा यांच्या सक्त आदेशानुसार त्यांची सुटका करून त्यांना त्यांच्या कुटुंबियांच्याकडे सुपुर्द करण्यात आले होते…
आणि इथेच सरकारची खात्री झाली की IAS Officer ची जबाबदारी स्वीकारल्यावर त्या उत्तम काम करू शकतात… त्यांचे शारीरिक व्यंग कुठल्याही कामात अडसर ठरत नाही.
सध्या त्या अरुणाचल प्रदेशात अतिरिक्त सचिव म्हणून काम करताहेत. या शिवाय त्या भारत सरकारच्या न्याय आणि अधिकारी मंत्रालयातील दिव्यांग विभागाच्या मुख्य प्रतिनिधी म्हणूनही काम पाहत आहेत.
… या व्यतिरिक्त महिला व बाल संगोपन आणि नीती आयोग यांच्या मुख्य प्रतिनिधी, केंद्रीय निवडणूक मंडळाच्या सुलभ निवडणुकीच्या राष्ट्रीय मंडळावर प्रतिनिधी म्हणूनही त्या कार्यरत आहेत.
अशा या जिद्दी आणि संयमी आणि प्रचंड बुद्धिमान असलेल्या इरा सिंघल यांनी तरुणांना केलेला उपदेश खूपच बोलका आहे.
त्या म्हणतात…
” तुमची स्वप्ने दुसरे कोणीतरी सत्यात उतरवून देईल याची वाट बघत कधीच थांबू नका.. त्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्नशील रहा “.
दृढ निश्चय आणि दुर्दम्य हिंमत यांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणायला हवे अशा IAS ऑफिसर इरा सिंघल यांची ही सत्य गोष्ट लाखो लोकांना प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही.
इंग्लिश लेखक : अज्ञात
मराठी अनुवाद व प्रस्तुती : मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ पॅरालिम्पिक्स (Paralympics) क्या है ?☆ श्री मकरंद पिंपुटकर☆
सन २०१९. गोविंदगढ, तालुका जेवर, जिल्हा गौतम बुद्ध नगर, उत्तर प्रदेश.
… जन्मतःच एक पाय दुसऱ्या पायापेक्षा लहान असलेल्या प्रवीण कुमार ने गुगलवर एक प्रश्न टाकला – “पॅरालिम्पिक्स क्या है ?” क्षणार्धात उत्तर आलं – “दिव्यांग (अपंग) खेळाडूंसाठीचे ऑलिंपिक”. (दुसऱ्या महायुद्धात जखमी / अपंग झालेल्या सैनिकांसाठी १९४८ साली सुरू झालेल्या या स्पर्धा सुरू झाल्या होत्या.)
हा प्रश्न विचारला तेव्हा प्रवीण अवघ्या १६ वर्षांचा होता. खेळांची आवड होती, व्हॉलीबॉल खेळायचा तो, पण धावताना मात्र अधू पाय त्याला त्रास द्यायचा. उंच उडी मारणे मात्र सहजसुलभ वाटायचे.
२०१९ मधील त्या एका गूगल सर्चने सर्व काही बदलून टाकले.
प्रविण आता उंच उडीवर कसून मेहनत घेऊ लागला, शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊ लागला. २०२० साली टोकियो, जपान इथे होणाऱ्या पॅरालिम्पिक्समध्ये तो भारताचे प्रतिनिधित्व करत होता.
टोकियोमध्ये तो पुरुषांच्या उंच उडी T६४ प्रकारात २. ०७ मीटरची उडी मारतो आणि रौप्यपदक घेऊनच बाहेर पडतो. (शारीरिक पंगुत्वाचे वेगवेगळे गट केले आहेत, त्यातील एकातरी पायामध्ये गुडघ्याखालून व्यंग असण्याचा गट T६४ आहे.) भारतात जल्लोष झाला, पण स्वतः प्रविण समाधानी नव्हता.
त्याने प्रशिक्षक डॉ. सत्यपाल सिंग यांना सांगितले, “पुढच्या वेळी सुवर्णपदक. ” प्रत्येक वेळी पहिल्याच प्रयत्नात अडथळा पार करणाऱ्या त्या मुलासाठी रौप्यपदक पुरेसे नव्हते.
भारत सरकारने २०२१ साली अर्जुन पुरस्काराने प्रविणला गौरवले.
प्रशिक्षकांना दिलेल्या वचनाप्रमाणे, पुढच्या स्पर्धेत, २०२२ च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये प्रविणने आपल्या पहिल्या सुवर्णपदकाला गवसणी घातली. २०२३ साली जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आणि आता पाळी होती २०२४ सालच्या पॅरिस पॅरालिम्पिक्सची.
६ सप्टेंबर २०२४. स्टेड डी फ्रान्स. पुरुषांची उंच उडी T६४ अंतिम फेरी.
… बार वर वर जात राहतो. १. ८९ मी. पार. १. ९३ मी. पार. १. ९७ मी. पार. २. ०१ मी. पार. २. ०३ मी. पार. २. ०६ मी. पार. सहा उड्या, प्रत्येक वेळी पहिल्याच प्रयत्नात पार. अजिबात डगमगला नाही. दुसऱ्या संधीची गरजच नाही.
… आता बार २. ०८ मी. उंचीवर लावलेला, आशियाई विक्रम. वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी. सुवर्णपदकाचा बार.
… प्रवीण वेगाने धावतो. आपल्या मजबूत पायावर जोर लावतो, झेप घेतो. एका क्षणासाठी तो पॅरिसच्या आकाशात तरंगत असतो, त्याच्या जर्सीवरील तिरंगा दिव्यांच्या प्रकाशात चमकत असतो. तो बारवरून कमान करून उडी मारतो आणि पलीकडे गादीवर उतरतो – सफाईदारपणे.
… आणि बार अजूनही तिथेच आहे – स्थिर.
एकच जल्लोष.
सुवर्णपदक. पॅरिस २०२४ मध्ये भारताचे सहावे सुवर्णपदक. प्रविणने अमेरिकेच्या डेरेक लोक्सिडेंटला २ सेंटिमीटरने हरवले. २०२० पॅरालिम्पिक्सचा इंग्लंडचा सुवर्णपदक विजेता जोनाथन पाचव्या क्रमांकावर फेकला गेलेला.
आणि वयाच्या २१ व्या वर्षी, प्रविण हा मरियाप्पन थंगवेलू यांच्यानंतर पॅरालिम्पिक उंच उडीत सुवर्णपदक जिंकणारा दुसरा भारतीय ठरलेला.
तो आपल्या प्रशिक्षकाला मिठी मारतो. आपल्या खांद्यावर ध्वज गुंडाळतो. ज्या मुलाने काही वर्षांपूर्वी गुगलवर पॅरालिम्पिक्स शोधले होते, त्याने नुकतेच जगाला हरवले होते.
☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २६ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆
श्री रविंद्रनाथ टागोर
नाटककार रविंद्रनाथ (१)
वैश्विक काव्य जगतात मानाचं स्थान प्राप्त केलेल्या रविंद्रनाथांनी नाट्य जगताला लहान मोठ्या अशा जवळपास ५०-५५ उत्कृष्ट नाटकांनी समृद्ध केले आहे. परंतु दुर्दैवाने हे सत्य कुठेच अधोरेखित झालेलं नाही. त्यांच्या नाटकांमधील डाकघर, रक्त करबी, विसर्जन, राजा ही नाटके तसेच चित्रांगदा, श्यामा, नटीरपूजा, चंडालिका, ताशेर देश या नृत्यनाटिका जास्त चर्चिल्या गेल्या आहेत. पण त्यांची छोटी छोटी नाटकं, आपल्या वगनाट्य सदृश नाटिका, प्रहसनं, नाट्यछटा देखील समाजमनावर छाप सोडणाऱ्या आहेत. तसेच त्या थट्टा विनोदाच्या अंगानं सामाजिक, धार्मिक व राष्ट्रीय जीवनातील विसंगतीवरही प्रकाश टाकणाऱ्या आहेत. रविंद्रनाथांची नाटके कलात्मक सौंदर्याचा अनुभव देता देता सामाजिक प्रबोधनही करतात. त्यांच्या कवितांप्रमाणेच त्यांची नाटके देखील त्यांच्या अंतरात्म्याचा आवाज आहेत. आत्ताच्या भाषेत आपण ज्यांना प्रायोगिक नाटके म्हणतो तशी प्रायोगिक नाटके देखील त्यांनी प्रायोगिकतेचं कसलेही अवडंबर न माजवता लिहिली, बसवली व प्रस्तुत केली.
परंतु त्या काळातली मेलोड्रॅमॅटिक नाटके बघण्याची सवय असलेल्या बंगाली प्रेक्षकांना रविंद्रनाथांच्या नाटकांतील तरलता, अस्फुट संघर्ष लक्षात येत नसल्यामुळे म्हणा किंवा धार्मिक, सामाजिक व्यंगावर भाष्य असल्यामुळे म्हणा रविंद्रनाथांना नाटककार म्हणून जे स्थान कलाजगतात मिळायला हवं होतं ते कांही मिळालं नाही. अर्थात टागोरांनीही हे मान्य केलं होतं. ते म्हणत, “मला नाटक लिहिता आलं नाही. एक मध्यवर्ती कल्पना घेऊन त्यावर नाटक तोलण्याची कला माझ्यात नाही. ” अर्थात त्यांच्या नाटकांकडे पाहिलं असता लक्षात येतं की, हा त्यांचा विनय होता. त्यांच्या मधला कवी त्यांच्या नाटकांतही डोकावतो, हे मात्र खरे आहे. त्यांची कांही नाटकं तर गद्य काव्य असल्यासारखी वाटतात.
वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी शेक्सपिअरच्या ‘मॅकबेथ’ नाटकाचं बंगालीत भाषांतर केलं होतं. त्या काळात इंग्रजी नाटकांच्या अनुकरणाचं वारं होतं. त्यामुळे पारंपरिक बंगाली नाट्यकला व नवदरबारी लोकांची नाट्यकला यात मोठं अंतर आलं होतं. रविंद्रनाथांनी लोकरंगमंचातली शक्ती ओळखून, त्यावर आपले संस्कार करून हे अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. नाटकाविषयी त्यांच्या मनात कोणतेही व्यावसायिक विचार नसल्यामुळे त्यांनी कुठल्याही नाटक कंपनीसाठी नाटक लिहिले नाही.
(अपूर्ण–पुढील भागात)
—–
☆ गीत : ७६ ☆
DAY after DAY, O lord of my life, shall I stand before thee face to face? With folded
hands, O lord of all worlds, shall I stand before thee face to face?
Under thy great sky in solitude and silence, with humble heart shall I stand before thee
face to face?
In this laborious world of thine, tumultuous with toil and with struggle, among hurrying crowds shall I stand before thee face to face?
And when my work shall be done in this world, O King of kings, alone and speechless shall I stand before thee face to face?
I KNOW thee as my God and stand apart ⎯ I do not know thee as my own and come
closer. I know thee as my father and bow before thy feet ⎯ I do not grasp thy hand as
my friend’s.
I stand not where thou comest down and ownest thyself as mine, there to clasp thee to
my heart and take thee as my comrade.
Thou art the Brother amongst my brothers, but I heed them not, I divide not my earnings
with them, thus sharing my all with thee.
In pleasure and in pain I stand not by the side of men, and thus stand by thee. I shrink to give up my life, and thus do not plunge into the great waters of life.
महाराष्ट्रातील सर्व शाळांतून ‘हिंद की चादर’ नावाचा उपक्रम सुरु आहे. हिंदू धर्माच्या रक्षणार्थ बलिदान दिलेले सिख गुरु श्री तेग बहादूरजी यांच्या स्मरणार्थ अनेक उपक्रम केले जात आहेत. या इतिहासाची विद्यार्थ्यांना शालेय वयातच ओळख व्हावी यादृष्टीने गुरुजींच्या आयुष्यावर आधारित निबंध, गीतगायन, चित्रकला अशा अनेक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत.
गुरु श्री तेग बहादूरजी
प्रसिद्ध पंजाबी गायक श्री. सतिंदर सरताज यांनी श्री गुरु तेग बहादूर यांच्या पराक्रम आणि बलिदानाची कहाणी अगदी मोजक्या शब्दांत अतिशय प्रभावीरीत्या गाण्याच्या विडीओच्या माध्यमातून मांडली आहे. शालेय विद्यार्थ्यांना हे गीत ऐकवण्यात येत आहे. इतरांनीही हा इतिहास जाणून घ्यायला पाहिजे, असे वाटते!
शिखांचे सहावे गुरु गुरु हरगोबिंद सिंग यांच्या पोटी श्री त्यागमल यांचा १ एप्रिल, १६२१ रोजी अमृतसर येथे जन्म झाला. त्यांच्या मातोश्रींचे माता नानकी असे होते. मुघल सेनेविरोधात करतारपूर येथे झालेल्या लढाईत केवळ तेरा वर्षांचे वय असलेल्या त्यागमल यांनी मोठे शौर्य गाजवले. या पराक्रमामुळे त्यांचे नाव तेग बहादूर असे ठेवण्यात आले. तेग म्हणजे तलवारीची धार, तेज. आठवे गुरु म्हणून श्री हरीरायजी गादीवर असताना त्यांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांत शिखांचे नववे गुरु बाबा बकाला गावात वास्तव्यास असून त्यांचा शोध घ्यावा, असे सुचवले.
त्यानुसार बाबा बकाला गावात अनुयायांनी मोठा शोध घेतला. स्वत:ला गुरु म्हणवून घेणारे अनेक लोक त्या गावात निघाले. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला.
त्याच दरम्यान माखन शा लुबाना नावाचा एक व्यापारीही गुरुंच्या शोधात बाबा बकाला गावात येऊन पोहोचला. या व्यापाऱ्याचे जहाज समुद्रात अचानक आलेल्या वादळात बुडणार होते. त्याने मनोमन गुरुंची प्रार्थना केली होती. माझे प्राण वाचले तर मी गुरुंना पाचशे सुवर्णमुद्रा भेट म्हणून देईन, असे त्याने ठरवले होते. परंतू एवढ्या मोठ्या संख्येने स्वत:ला गुरु म्हणवणारे लोक पाहून त्याच्यापुढे खरे गुरु कोण? हा पेच उभा राहिला. पण बुद्धीमान असलेल्या या व्यापा-याने एक युक्ती केली. तो प्रत्येक तथाकथित गुरुंकडे गेला. आपण माझे प्राण वाचवलेत, त्याबद्दल मी तुम्हांला दोन सुवर्णमुद्रा भेट देऊ इच्छितो असं म्हणत त्याने त्या गुरुंना दोन दोन सुवर्णमुद्रा देऊ केल्या. आणि त्या सर्वांनी त्या स्वीकारल्या!
– —- व्यापारी निराश झाला. पण इतक्यात त्याला कुणीतरी तेग बहादूर यांचेकडे जाण्यास सुचवले. गुरुंच्या समोर दोन सुवर्णमोहरा ठेवताच गुरु तेग बहादूर म्हणाले… यात ४९८ सुवर्णमुद्रा कमी आहेत! समुद्रात जहाज बुडत असताना गुरुंना व्यापा-याने पाचशे सुवर्णमुद्रा देण्याचा नवस मनातल्या मनात केला होता… त्यामुळे कुणालाही सुवर्णमुद्रांची पाचशे ही संख्या माहीत असणे अशक्य होते. हे सामर्थ्य केवळ सिद्ध पुरुषांच्या अंगीच असू शकते, हे व्यापा-याने ओळखले… त्याचा गुरु शोध तेग बहादूर यांच्यापाशी थांबला! त्याने घराबाहेर धाव घेतली आणि आनंदातिशयाने ओरडून लोकांना सांगितले… गुरु सापडले! तेंव्हापासून शिखांचे नववे गुरु म्हणून श्री तेग बहादूरजी यांचे नाव प्रसिद्धीस आले. त्यांनी माता नानकी यांच्या नावाने एक नवीन नगर वसवले. जे पुढील काळात आनंदपूर म्हणून प्रसिद्ध झाले.
काश्मिरातील हिंदू पंडित समुदायाने इस्लाम धर्माचा स्विकार करण्याची सक्ती औरंगजेबाने केली. अन्यथा वाईट परिणामास तयार रहा असा इशाराही दिला. त्यामुळे घाबरून गेलेल्या पंडितांनी मदतीसाठी गुरु तेग बहादूर यांचेकडे धाव घेतली. हिंदू समुदायाने हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शीख समुदायाकडे साहाय्य मागणे ही विशेष बाब होती. श्रीगुरू तेग बहादूर यांनी आपल्या अनुयायांना घेऊन दिल्लीकडे कूच केले.
त्यावेळच्या मुघल बादशाह औरंगजेबाची भेट घेऊन काश्मिरी पंडितांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रसंगी सशस्त्र संघर्ष करण्याचीही त्यांची तयारी होती. औरंगजेबाने गुरु तेग बहादूर आणि त्यांच्या अनेक अनुयायांना आग्रा येथेच कैद केली. मग दिल्लीत आणून त्यांच्यावर आणि त्यांच्या अनुयायांवर अमानुष अत्याचार केले. इस्लाम धर्माचा स्वीकार केल्यास अभय देण्याचे आमिषही दाखवले. पण धर्मवीर श्री गुरु तेग बहादूर यांनी स्पष्ट नकार दिल्यावर आधी त्यांचे अनुयायी भाई मतीदासजी, भाई सतीदासजी, भाई दयालाजी यांचे शस्त्राने कापून, आगीत जाळून आणि अशाच अत्यंत क्रूर पद्धतीने प्राण घेतले. तरीही कुणी इस्लाम धर्म स्वीकारला नाही. शेवटी गुरु तेग बहादूर यांचा औरंगजेबने जाहीर शिरच्छेद करवला.
– – – या सर्वांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची कुणाची हिंमत नव्हती. तेवढ्यात त्या जागी एक मोठे वादळ उठले… धूळ उठली. गुरुजींचे अनुयायी जैता जी यांनी गुरुंचे मस्तक तिथून पळवले व ते आनंदपूर येथे पोहोचले. गुरुंचे सुपुत्र गुरु गोबिंदसिंग यांनी या मस्तकावर तेथे अंत्यसंस्कार केले. इकडे गुरुंचे दुसरे अनुयायी बंजारा लखी शा यांनी गुरुजींचे धड स्वत:च्या घरी नेले. व मुघल सैनिकांच्या नजरा चुकवून घरातच त्यांचे अग्निसंस्कार केले. त्यासाठी त्यांनी घरातच चिता रचली व घरच पेटवून दिले!
– – हिंदू समाजाच्या रक्षणासाठी शिख गुरुंनी अशाप्रकारे बलिदान दिले. या त्यांच्या कामगिरीमुळे गुरु तेग बहादूर यांना ‘ हिंद दी चादर ‘ अर्थात हिंदू धर्मावर घातले गेलेले संरक्षक वस्त्र, कवच अशी उपाधी दिली गेली.
… गुरु तेग बहादूर यांनी रचून ठेवलेल्या पायावरच पुढे गुरु गोबिंदसिंगजी यांनी खालसा अर्थात पवित्र लढाऊ गटाची स्थापना केली व पुढे मुघलांविरोधात सशस्त्र संघर्ष केला!
– वाहे गुरु:-अद्भूत परमात्मा.
– खालसा:- शुद्ध. फतेह:-विजय.
– जो बोले सो निहाल… जो कुणी शुद्ध मनाने म्हणेल की ईश्वर शाश्वत सत्य आहे.. सत श्री अकाल… तो सुखी, मुक्त होईल!
नीलम माणगावे या लक्षवेधी साहित्यिका म्हणून प्रसिद्ध आहेत. कथा, कविता, ललित, वैचारिक, माहितीपर, समीक्षणात्मक, संशोधनात्मक लेख, कादंबरी, संकीर्ण, बालसाहित्य इ. विविध प्रकारचे विपुल लेखन त्यांनी केलय. आत्तापर्यंत त्यांची 69 पुस्तके प्रकाशित झालीत. केवळ ‘ विपुल ‘ एवढेच विशेषण त्यांच्या लेखनासाठी पुरेसे नाही. कारण त्यासाठी त्यांनी निवडलेले विषय आणि त्यातील आशय यातील वेगळेपणामुळे त्यांचं लेखन ‘ लक्ष्यवेधी ‘ ही ठरत गेलं. त्यांनी लिहीलेल्या प्रत्येक पुस्तकाला.. मग तो कविता संग्रह असो, कथासंग्रह असो, कादंबरी असो.. कुठला ना कुठला पुरस्कार मिळालेलाच आहे.
नुकताच त्यांना २००५ मधील कसदार बालवाङ्मयाच्या लेखनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ‘शांताबाई आणि बाबुराव शिरोळे’ पुरस्कार प्राप्त झाला. तूच आमचा हीरो, चिंगळी, आक्कुबाईचं तळं यासारखे त्यांचे कथासंग्रह मुलांना खूप आवडतील, असे आहेत. त्याशिवाय, बिलोरी कवडसे, आणि माठ हसला, पळ सोने पळ यासारखे त्यांचे ५ विज्ञान कथासंग्रह आहेत. बालवाङ्मयातील एक वैशिष्ट्यपूर्ण पुस्तक म्हणजे ‘गाथा उत्क्रांतीची’.. हे सचित्र दीर्घ काव्य आहे. तिची प्रयोगशील वृत्ती यातून दिसून येते. याशिवाय, ‘परीराणी आणि छान छान गाणी’, ‘अंगणगाणी आणि रिंगण गाणी’, ‘गड्डम् गड्डम् गाणम् बडबडम्’ यासखे अनेक कविता संग्रह त्यांचे मुलांना आवडतील असे आहेत. नीलमताई शाळाशाळातून आणि वेगवेगळ्या संमेलनातून कथाकथन आणि कवितावाचन करतात म्हणजे आणि थेट मुलांशी संवाद साधतात.
नीलमताईंच्या साहित्याचा अभ्यासक्रमात, पाठयक्रमातही समावेश झालेला आहे.
महाराष्ट्र स्टेट बोर्ड इ. ५वी (लोअर मराठी) ‘कोणापासून काय घ्यावे’ या कवितेचा समावेश. याच कवितेचा कर्नाटक राज्यच्या ८ वीच्या पाठ्यपुस्तकात, (थर्ड लँग्वेज) समावेश आहे.
शिवाजी विद्यापीठ – कोल्हापूरच्या एम. ए. – भाग १ पार्ट १मध्ये ‘पळ सोने पळ’ या बालकथेचा अमावेश झाला आहे.
लवाङ्मयाच्या त्यांच्या एका वेगळ्या प्रकारच्या पुस्तकाचा उल्लेख करायचा झाला तर, ‘डॉलीची धमाल’या कादंबरिकेचा उल्लेख करायला हवा. ‘डॉली समवयस्क मुलांशी खेळणारी एक मुलगी. सर्वांना ती हवीहवीशी वाटते. एकदा ती सर्वांचा निरोप घेते. कादंबरीच्या शेवटी रहस्य उलगडते. ‘डॉली हे मुळी मुलगीच नसते. ती असते रोबोट॰ आता तिची बॅटरी संपत आलेली असते. नवीन तंत्रज्ञानाचा किती सुरेख वापर करून घेतला आहे इथे. या बालकादंबरीला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
म. सा. प. चा नीलमताईंना मिळालेला हा पहिला पुरस्कार नाही. त्यापूर्वी त्यांना एकंदर कविता लेखनासाठी ‘ना. घ. देशपांडे’ पुरस्कार मिळाला होता.
विषय-वैविध्याबरोबर आशयातील वेगळेपणा, नाविन्य, कल्पकता, प्रयोगशीलता ही त्यांच्या कवितांची काही ठळक वैशिट्ये सांगता येतील. त्यांच्या ‘खचू लागली भुई ‘ या कविता संग्रहाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे.
‘पैंजण’ ही नीलमताईंची अतिशय गाजलेली कविता. कविता चार पिढ्यातील ‘स्त्री’च्या स्थिती-गतीचा, मन-विचारांचा वेध घेते. पैंजणाच्या प्रतिकातून अतिशय संवेदनशीलतेने आणि कलात्मकतेने, पिढी-दर-पिढी, भावना-विचारात झालेले परिवर्तन यात दाखवले आहे…
… आजी जड, वजनदार पैंजण घालून आपल्या साम्राज्यात मिरवायची. तिचे साम्राज्य तरी केवढे? स्वैपाकघर, माजघर एवढेच. पण त्यात ती साम्राज्ञीच्या रुबाबात वावरायची. पैंजण पायाच्या घोट्याशी घासले जायचे. पाय दुखायचे. कळ यायची. जखम व्हायची. पैंजण जसे घोट्याशी जखडलेले, तसे मन संसाराशी, परंपरेने आलेल्या संस्काराशी जखडलेले. त्यामुळे दुखलं, खुपलं, तरी ती संस्काराची पट्टी बांधून जखमेला ऊब द्यायची. मनाची समजूत घालायची. आपल्या या राज्यात ती खूश असायची.
… आईने जड, वजनदार पैंजण वापरणं सोडून दिलं. त्याऐवजी ती नाजूक तोरड्या वापरू लागली. परंपरेचं थोडसं जोखड तिने कमी केलं. आपल्या आईपेक्षा ती थोडी मोकळी झाली. तिचा वावर ओसरी, अंगण, गच्ची असा होऊ लागला. तरी पण कधी कधी तोरडीचा हूक अडकायचा. साडीचा जरीचा काठ फाटायचा. दोरे लोंबायचे. जरतारी संसारात थोडं विसंवादाचं फाटकंपण अनुभवाला यायचं, पण तरीही ती आपलं घर, अंगण, गच्ची यात खुशीनं भिरभिरायची.
… तिसर्या पिढीतली ‘मी’ घराच्या फाटकातून बाहेर पडले. भोवतालाचं जग विस्तारलं. मोकळा श्वास घेता येऊ लागला. टोचणं, बोचणं, दुखणं, खुपणं, जखमा नकोत, म्हणून मी पैंजण, तोरड्या दोन्ही टाकून दिल्या. नाजूक, हलके, सॅंडल्स, चपला, बूट ‘मी’ वापरू लागले. तरीही कधी चपला टोचायच्या. बूट चावायचे. पण बाहेर मिळणार्या स्वातंत्र्यासाठी, मुक्त श्वासासाठी ’मी’ हे सगळं सहन केलं.
… आता चौथ्या पिढीतली ‘माझी मुलगी’ म्हणते, ‘आई पैंजण, तोरड्या, सॅंडल्स, चपला काहीच नको. पायच होऊ देत कणखर, पोलादी, काटेकुटे तुडवणारे, जखमा सहन करणारे, निदान पुढलं शतक येण्यापूर्वी… ’ मुलीला आत्मभान आलय. बाहेर येणार्या संकटांचा सामना करण्यासाठी आपण आत्मनिर्भर व्हायला हवं, अशी तिची आकांक्षा आहे.
– – स्वैपाकघर, माजघरात मिरवणारी आजी, अंगण-गच्चीपर्यंत भिरभिरणारी आई, सॅंडलल्स घालून घराबाहेर पडणारी कवितेतली मी आणि, पैंजण, तोरड्या चप्पल, बूट, सॅंडल काही नको. पायच होऊ देत आता… घट्ट, मजबूत, पोलादी ’ असं म्हणणारी माझी मुलगी सगळ्या जणी कशा लख्खपणे डोळ्यापुढे उभ्या राहतात.
– – ही कविता मुक्तछंदात आहे. प्रत्येक कडव्यात समानार्थी प्रासयुक्त आलेले शब्द कवितेला एक वेगळंच नादसौंदर्य प्राप्त करून देतात. उदा. सांगायचं तर, आजीचे ‘पाय भरून यायचे, दुखायचे, खूपायचे, घोटे काळे ठिक्कर पडायचे. किंवा जखम व्हायची, चिघळायची… ’ किंवा नाजूक तोरड्या घालायला सुरुवत करताना आई म्हणते, ‘ना पाय दुखणं, ना खुपणं, ना चिघळणं, ’ तर तोरड्याही नको, म्हणताना ‘मी’ म्हणते, अडकणं, बोचणं, चिघळणं, फाटणं काहीच नको… ’ असे शब्द वाचताना वाटतं, ‘शब्दांनो मागुते या’ असं कवायत्रीला म्हणावंच लागलं नसणार. शब्द आपोआपच तिच्या लेखणीच्या मागे मागे आले, नव्हे. तसं नव्हेच ! आपोआप लेखणीतून उतरत गेले असणार.
… २०व्या शतकाच्या अखेरीस लिहिलेली ही कविता. स्त्रीमुक्तीचा प्रवास अगदी सहज-साधेपणाने अधोरेखित करते. कुठेही आक्रोशी स्वर नाही. कमीत कमी शब्दातून अतिशय कलात्मकतेने ही वाटचाल कवयत्रीने आपल्यापुढे मांडली आहे… महाराष्ट्र राज्यशिक्षण मंडळाने इयत्ता 11 वी साठी मराठी भाषेचे जे पाठपुस्तक तयार केले आहे, त्या ‘युवा भारतीत’ नीलम माणगावे यांच्या ‘पैंजण‘ या कवितेचा समावेश आहे.
नीलमताईंचं, ‘जसं घडलं तसं’ हे आत्मकथन मुंबई विद्यापीठाच्या एम. ए. च्या भाग १ साठी पाठ्यपुस्तक म्हणून लावण्यात आले आहे. त्यांच्या एकूण कवितांवर एक प्राध्यापक एम. फील. करत आहेत. तर, दुसरे प्राध्यापक त्यांच्या एकूण कथांवर एम. फील. करत आहेत.
नीलमताईंच्या अनेक कवितांना प्रयोगशीलतेचा स्पर्श आहे. उदा. सरोगेट मदरवरील कविता ‘भांडवली ज्ञान’,
– – पण तिची अलीकडे प्रकाशीत झालेली ‘बापूजी तुम्ही ग्रेटच!’ आणि ‘सूर्याला कोंडता येत नाही. ’ ही दोन पुस्तके म्हणजे तिच्या प्रयोगशीलतेचा आगळा-वेगळा आविष्कार म्हणावी लागतील. मुक्तछंदात लिहिलेले काव्यात्म संवाद यात आहेत. ‘बापूजी तुम्ही ग्रेटच!’ मध्ये बापूजी आणि त्यांचा चरखा यातील काव्यात्म संवाद आहे. तर, ‘सूर्याला कोंडता येत नाही. ’ या पुस्तकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बोधीवृक्ष यांच्यातील संवाद आहे. सध्याची राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक परिस्थिती याच्या अनुषंगाने हे संवाद आहेत. संवादांच्या विषयात साम्य आहे, पण दोन्हीतील आशय वेगवेगळा आहे.
लेखिकेच्या प्रयोगशीलतेचे आणखी एक उदाहरण सांगायचं, तर तिने ‘खेळखंडोबा’ नावाची एक लघु कादंबरी लिहिली आहे. या कादंबरीत तिने हत्तींच्या माध्यमातून अनेक महत्वाचे प्रश्न, विशेषत: धर्माबद्दलचे प्रश्न उपस्थित केलेत.
नीलमताईंच्या आणखी एका वैशिष्ट्यपूर्ण पुस्तकाचा इथे उल्लेख करावासा वाटतो. ‘निर्भया अजून लढते आहे. ’ हा त्यांचा दोन वर्षांपूर्वी प्रकाशित झालेला कथासंग्रह. या संग्रहातील सर्वच कथांचे ‘बलात्कार’ हे सूत्र आहे. यात बलात्काराचे वर्णन कुठेच नाही. त्यामागची कारणमीमांसा, मानसिकता, तशी मानसिकता निर्माण होण्यामागची विशिष्ट परिस्थिती याचे दर्शन या कथांमधून लेखिकेने घडवले आहे. वृत्तपत्रातून आपण बलात्काराच्या बातम्या वाचतो, टी. व्ही. वरून ऐकतो. क्षणभर हळहळतो. मग सोडून देतो. लेखिकेने ती बीजे आपले विचार, मनन-चिंतन यांचे खत-पाणी घालून जोपासली. आपल्या कल्पक रचना कौशल्याच्या निगराणीने, त्यातून सशक्त झाडे निर्माण केली. जोपासली.
– या संग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार मिळाला. त्याचप्रमाणे नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाचा पुरस्कार या पुस्तकाला मिळाला.
नीलमताई एक प्रतिभासंपन्न, यशस्वी लेखिका आहेत, तशाच त्या बंडखोरही आहेत. सत्य, शिव, सुंदर या मूल्यांवर त्यांचा विश्वास आणि निष्ठा आहे. त्यांची जिथे पायमल्ली होताना दिसते, तिथे त्यांची बंडखोर वृत्ती उफाळून येते.
नीलमताई स्वत: जैन धर्मीय. तरीही जैन धर्मातील चुकीचे रीतिरिवाज, वा परंपरा, वाईट चाली-रीती, काही अनुयायांचे बेताल वर्तन, भ्रष्टाचार यावर त्यांनी आपल्या लेखनातून टीका केली. ही त्यांची मोठीच बंडखोरी म्हणायला हवी… कधी लेखाच्या, कधी कवितेच्या, कधी कथेच्या माध्यमातून. उदा. ‘शांते तू जिंकलीस. ’ ही कथा. इथे शांता मंदिरासाठी पट्टी द्यायला नकार देते. म्हणून गाव तिच्यावर बहिष्कार टाकतो. तिला वाळीत टाकतो. पुढे तिच्या मुलाचा मृत्यू होतो. त्याचे अंत्यसंस्कार करायला कुणीच येत नाही. तेव्हा ती आणि तिची सासू चादरीची झोळी करून त्यातून त्याला स्मशानाकडे नेऊ लागतात. नंतर ते पाहून हळूहळू गाव त्यात सामील होतो. – – याच शीर्षकाच्या त्यांच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार लाभला.
नीलमताईंच्या या धर्मावर टीका करणार्या लेखनाने समाजातील अनेकांची अस्मिता दुखावली. आपल्याच धर्माविरुद्ध ती असं कसं लिहू शकते? समाजातील अनेक प्रतिष्ठितांनी तिने यापुढे असं लेखन करायचे थांबवावे, असा तिला समज दिला. इतकेच नाही, तर असं काही यापुढे लिहिलं, तर तुमच्या घरावर आम्ही दगडफेक करू, अशी त्यांना धमकीही देण्यात आली. पण त्या आपल्या जागी अढळ राहिल्या. जे मनाला पटेल, योग्य वाटेल, ते अव्याहतपणे लिहीत गेल्या. या सर्व प्रकरणात त्यांचे जोडीदार भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले. मुळात ते स्वत: अं. नि. स. चे कार्यकर्ते. वैचारिकदृष्ट्या ते त्यांच्याशी सहमत होते.
नीलमताईंच्या प्रतिभेचे नवनवोन्मेष नित्यश: बहरत, फुलत, दरवळत राहोत. त्याने वाचकांना आनंद मिळो. त्यांचे भोवतालचे भान जागृत करो, संवेदनशीलता निर्माण करो… या त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा.
☆ अनारसा शिळा का मानत नाहीत… लेखक: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆
अनारसा शिळा का मानत नाहीत?
— परंपरा आणि Food Science
अधिक महिन्यात अनारसाचे दान करण्याची जुनी परंपरा आहे.
शास्त्रात अनारसाला “अपूप” म्हटले जाते आणि विशेष म्हणजे —
अनारसा हा शिळा मानला जात नाही!
पूर्वीच्या लोकांनी हे फक्त श्रद्धेपोटी सांगितले नव्हते… त्यामागे खूप सुंदर Food Science दडलं आहे.
साधारण भात, पोळी, भाजी यामध्ये moisture जास्त असतो. त्यामुळे त्यामध्ये सूक्ष्मजंतू लवकर वाढतात आणि अन्न लवकर खराब होते.
– – पण अनारसा वेगळा आहे..
१) Deep Frying Science
अनारसा तुपात / तेलात व्यवस्थित तळला जातो.
तळताना : त्यातील बराच moisture कमी होतो. बाहेरचा भाग crisp होतो. high temperature मुळे बरेच microorganisms नष्ट होतात, म्हणून तो जास्त टिकतो.
२) गूळ आणि साखरेची कमाल
अनारसामध्ये गूळ आणि साखर भरपूर असते.
हे दोन्ही :
✔️ नैसर्गिक preservative सारखे काम करतात
✔️ moisture bind करून ठेवतात
✔️ खराब होण्याची प्रक्रिया मंदावतात
म्हणून अनारसा पटकन आंबत नाही.
३) Fermentation चा फायदा
अनारसाचे पीठ मुरवले जाते. या fermentation मुळे texture सुधारते, shelf life वाढते, पचनास मदत होते… पूर्वी refrigerator नसतानाही लोकांना अनुभवाने हे माहिती होते.
४) Low Moisture = जास्त टिकाऊ
अनारसामध्ये पाणी फार कमी उरते.
Food Science मध्ये एक नियम आहे —“जितका कमी moisture तितके अन्न जास्त टिकते. ”
म्हणूनच चिवडा, शेव, पापड, अनारसा
हे पदार्थ जास्त दिवस टिकतात.
५) म्हणूनच दानासाठी योग्य
पूर्वी प्रवास, दानधर्म, व्रतवैकल्य यासाठी टिकणारे पदार्थ महत्वाचे होते.
– – अनारसा : पौष्टिक, टिकाऊ पोटभर ऊर्जा देणारा आहे.
म्हणून अधिक महिन्यात “अपूप दान” करण्याची परंपरा निर्माण झाली.
खरंतर आपल्या जुन्या पदार्थांमध्ये फक्त चव नाही तर अनुभव, ऋतुचक्र, आरोग्य आणि अप्रतिम Food Science दडलेले आहे.
आज विज्ञान जे सांगतंय…ते आपल्या आजीला अनुभवाने आधीपासून माहिती होतं
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : स्मिता सुहास पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
लंकेच्या रणभूमीवर ची ती काळ रात्र! नजर जाईल तिथे शवांचा खच पडलेला, रक्ताचे पाट वहाताहेत, आणि अशातच… चतुर्वेद, सहा उपनिषदे, आयुर्वेद यांचं संपूर्ण ज्ञान असलेला ज्ञानी, विश्रवा ऋषींचा आणि उच्च दानव कुळातील माता कैकसी चा पुत्र… दशानन… रावण… रक्तरंजित अवस्थेत, धराशायी होत मृत होऊन पडलेला. तिन्ही मुलं ही युद्धात मारली गेलेली.
पतीच्या आणि पुत्रांच्या मृत्युची वार्ता कानी येताच, जीवाच्या आकांताने, दु:खावेगाने वेडीपिशी होत धावत गेली रणभूमीवर! पतीच्या शवाजवळ बसली… शोकमग्न मंदोदरी च्या मुखातून शब्द बाहेर पडले…
राम विमुख अस हाल तुम्हारा,
रहा न को कुल रोवन हारा!
उठली दु:खावेगाने आणि आक्रंदन करीत विचारती झाली… ” कुठे आहे तो, ज्याने माझ्या पतीला मारलं?? “
तिला अंगुली निर्देशाने दाखविले आणि सांगितले गेलेल्या दिशेला ती गेली.
तिथे एका शीळेवर प्रभू श्रीरामचंद्र खाली मान घालून, दु:खी, उदास, हताश बसलेले. युद्धात झालेल्या जीव हानी ने किंकर्तव्यमूढ बसलेले. अचानक एक सावली दिसते पायाजवळ… लक्षात येते की कुणा स्त्री ची सावली आहे… लगेच उभे रहातात, वळून मोठ्या अदबीने म्हणतात, ” माते, प्रणाम ! कोण आहेस तू? “…….. मर्यादा पुरूषोत्तम राम तिच्या पुढ्यात, विनम्रपणे नतमस्तक झालेला… मंदोदरी ला परस्त्रीचे अपहरण करणा- या रावणाला हरविणा-याची खरी ताकद दिसली आणि कळली ही !! तिच्या पुढ्यात झुकून उभा होता… ब्रह्मा पुत्र, मांधाता ला आव्हान देणा-या, कुबेराला खाली आणणा-या, सा-या जगाला हरविणा-या रावणाला ठार मारणारा… श्रीराम!!! तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळतं. मर्यादा पुरूषोत्तमाच्या या… स्त्री च्या सावलीचं ही भान ठेवणा-या, पर स्त्री मातेसमान मानणा-या या पुरूषोत्तमाच्या उंची पुढे तिला… परस्त्रीचं अपहरण करून आणणारा तिचा लंकापती दशानन अगदीच थिटा वाटला. ती वरमून परतली.
मंदोदरी…. नित्य स्मरणीय अशा पंचकन्यांपैकी एक! पण ही येवढीच तिची ओळख नाही. याच्या पलिकडे ही तिच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू, कंगोरे आहेत जे अलक्षित राहिले आहेत. रामायण म्हणजे… राम, सीता, लक्ष्मण, हनुमान… हेच डोळ्यासमोर येतात लगेच! पण यां व्यतिरिक्त ही अशी व्यक्ती चित्रे आहेत ज्यांच्या बद्दल फारशी माहिती नाही अधोरेखित झाली. त्यातीलच एक आहे… रावणाची पत्नी मंदोदरी!!
मंदोदरी… असुरांचा राजा मयासुर आणि अप्सरा हेमा यांची कन्या. पुराणात तिच्या जन्माविषयी वेग वेगळ्या कथा आहेत. तरीही मान्यतेनुसार ती मधुरा नावाची शापित अप्सरांचे, जी बेडकीरूपातून पूर्व रूपात आल्यावर मयासुर आणि हेमा तिला दत्तक घेतात.
…. सुंदरता, बुद्धीमत्ता, आणि नैतिकता याचा अद्वितीय संगम म्हणजे मंदोदरी! अतिशय धर्मपरायण!! रावणाशी विवाह होऊन लंकेला येते आणि सोन्याच्या लंकेची महाराणी बनते. वेद, शास्त्र, विविध कला संपन्न असलेली मंदोदरी, अगदी ख-या अर्थाने…
अशी… षट्कर्मयुता कुलधर्म पत्नी होती. तिचा भविष्याचा ही अभ्यास होता. असं म्हणतात की ती रावणाशी बुद्धिबळाचा खेळ ही खेळत असे. बुद्धिबळाची सुरुवात तिनेच केली असं म्हंटलं जातं!
अशा या बुद्धी मान आणि भविष्य जाणणा-या मंदोदरी ला जेव्हा रावणाने सीताहरण केल्याचे कळते तेव्हा तिला अतिशय क्लेष होतात. पर स्त्री, तीही विष्णू चा अवतार असलेल्या प्रभु रामचंद्रांची पत्नी सीता… हिच्या विषयी असा काम आणि मोह भाव जागृत होऊन तिचं हरण करणा-या रावणाला विनाशकाले विपरीत बुद्धी सुचली आहे हे तिला लक्षात आले… रावणावर निरतिशय प्रेम आणि निष्ठा असलेल्या मंदोदरी ने त्याला वारंवार धर्माच्या मार्गावर चालण्यासाठी समजावले, सल्ला दिला. तिने लंकेची नीती आणि रावणाची चेतना शक्ती बनून राहण्याची सतत धडपड केली.
सीतेला सन्मानाने श्रीरामाकडे परत पाठविण्यातच लंका आणि लंकाधिपतीचं भलं आहे हे ती पुन:पुन्हा समजावत राहिली, विनवत राहिली…..
विनंती करी मंदोदरी|
वाया आणिली जानकी घरी|
*
लाज झाली तिहीं लोकी||
*
मज पाहता हे विवसी|
क्षय आणिला कुळासी||
अभिलाषिता पर सती|
हे तो नव्हे राजनीती|
ज्याते ध्यानी ध्याती योगी|
तो मज येतो भेटीलागी|
तया रामासी विन्मुख होणे|
जळो जीणे लाजिरवाणे||
– – संत नामदेव.
संत नामदेवांनी सुद्धा मंदोदरीच्या, रावणाला समजावण्याची, तिच्या पत्नी धर्माची, दखल घेतली आहे हे विशेष!! अधर्मात ही धर्म सांभाळण्याची पराकाष्ठा आणि निकराचे प्रयत्न करणा-या मंदोदरी चे पती प्रेम आणि विवेक ; रावणाच्या अहंकार आणि क्रोधापुढे हारलं!!
तिला पतीची हार, रक्तरंजित शेवट दिसत होता, पण तरीही या पतीला प्रेरित करणा-या, पतीची चेतना बनलेल्या समिधेचं तेज, सामर्थ्य, चेतना निस्तेज झाली, स्फुल्लिंग मंदावलं पतीच्या क्रोधाहंकाराच्या धगधगत्या होमकुंडापुढे!! आणि तिच्या नशिबी आलं ते एकटेपण!! एकटीने जळत रहाणं!!
…. जळो जिणे हे लाजिरवाणे!!…. हाच सल, हाच चटका, हाच डाग उरी घेऊन ही समिधा जळत राहिली!!
☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ४९ आणि ५० ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
श्लोक क्र. ४९ – –
सदा बोलिल्यासारीखे चालताहे|
अनेकी सदा एक देवासी पाहे|
सगुणी भजे लेश नाही भ्रमाचा|
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा|४९|
अर्थ : जो बोलण्याप्रमाणे वागतो, परमेश्वराची जरी अनेक रूपे असली तरी तो एकच आहे या दृष्टीने त्याच्याकडे पाहतो, सगुण परमेश्वराची उपासना करताना त्याच्या मनामध्ये कोणतीही शंका असत नाही असा भक्त त्या सर्वोत्तमाचा श्रेष्ठ भक्त असतो.
विवेचन : खऱ्या भक्ताची फार सुंदर लक्षणे समर्थांनी या ठिकाणी सांगितली आहेत. परमेश्वराचा प्रिय भक्त होणे ही सोपी गोष्ट नाही. जशी रोगातून बरे होण्यासाठी अनेक पथ्ये पाळावी लागतात, तशीच पथ्ये भक्ताला देखील पाळावी लागतात. आपले संत म्हणजे “बोले तैसा चाले” या तुकोबांच्या उक्तीचे मूर्तिमंत उदाहरण होत.
व्यवहारामध्ये आपण बऱ्याच वेळा खोटे बोलत असतो. बऱ्याच व्यक्ती बोलतात एक आणि करतात दुसरे ! अशा व्यक्ती दुसऱ्याला उपदेश करण्यात आघाडीवर असतात. परंतु स्वतःवर वेळ आली की त्यांचे वागणे वेगळे असते. आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये घाला असे सांगणाऱ्या बऱ्याच व्यक्तींची मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना दिसतात. लग्नप्रसंगी हुंडा घेऊ नये, अवास्तव खर्च करू नये अशी सांगणारी मंडळी त्यांच्या मुलांच्या लग्नामध्ये या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून वारेमाप खर्च करताना दिसतात. असे वागणे म्हणजे दुटप्पी वागणे होय.
संतांच्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता असते. “काय उणे आम्हां विठोबाचे पायी… “असे तुकाराम महाराजांनी म्हटले. किंवा “सोने रूपे आम्हां मृत्तिकेसमान, ” असे जे त्यांनी म्हटले ती त्यांची अंतरंगातून आलेली निरपेक्ष वृत्ती होती. विरक्ती त्यांच्या रक्तात भिनली होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा त्यांना सोने, नाणे, वस्त्र इत्यादी स्वरूपात नजराणा पाठवला तेव्हा त्यांनी तो नाकारला. छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदासांन आपले गुरु मानत. एकदा तर त्यांनी आपले राज्य समर्थांना चिठ्ठी लिहून झोळीत अर्पण केले होते. परंतु समर्थांनी ते त्यांना परत केले. अशी असते संतांची निरपेक्ष वृत्ती !
अशी भक्ती आणि विरक्ती अंगात भिनली पाहिजे. आपण सर्वसामान्य माणसे आहोत परंतु संतांनी दाखवलेल्या या मार्गावर वाटचाल तर करू शकतो ! माझ्या प्रपंचासाठी आवश्यक तेवढे धन मी मिळवीन. इतरांचे धन किंवा पैसा माझ्यासाठी मृत्तिकेसमान असेल. परस्त्रीकडे मी माता किंवा भगिनी म्हणून पाहीन या गोष्टी तर आपल्याला सहज करता येण्यासारख्या आहेत.
ज्याप्रमाणे आपल्या देशाबद्दल बोलताना आपण म्हणतो की आपल्या देशात अनेकतेत एकता आहे. त्याप्रमाणे परमेश्वराची विविध रूपे आणि विविध नावे असली तरी चैतन्यरूपी असलेला तो परमेश्वर एकच आहे. अनेक संतांनी हे सत्य एकमुखाने सांगितले आहे. गीतेत श्रीकृष्णाने सांगितले आहे की ज्याप्रमाणे विविध नद्या एकाच समुद्राला येऊन मिळतात त्याप्रमाणे विविध देवदेवतांना केलेली प्रार्थना माझ्यापर्यंत येऊन पोहोचते. पण आम्ही सामान्य माणसे हे समजून घेताना गोंधळ करतो. देवामध्ये कोण श्रेष्ठ, कोण कनिष्ठ अशा प्रकारचा भेदभाव करत बसतो.
स्थुलाकडून सूक्ष्माकडे तशी सगुणाकडून निर्गुणाकडे आपली वाटचाल झाली पाहिजे. भगवंताचा श्रेष्ठ भक्त ही गोष्ट जाणून असतो. निर्गुण निराकाराप्रती त्याची श्रद्धा असते. परंतु तरी देखील सर्वसामान्यांच्या मनामध्ये भगवंताबद्दल विश्वास निर्माण व्हावा आणि त्यांचीही वाटचाल सगुणाकडून निर्गुणाकडे व्हावी अशी त्याची इच्छा असते म्हणूनच तो सगुणाची देखील पूजा करतो. असे करताना त्याच्या मनामध्ये कोणतीही शंका किंवा कोणताही भ्रम असत नाही. मंदिरात अंतरात तोच नांदत आहे हे तो जाणून असतो. असा भक्त भगवंताचा त्या सर्वोत्तमाचा श्रेष्ठ भक्त होय.
स्वसंवाद ::
१. माझ्या बोलण्यात आणि वागण्यात एकवाक्यता आहे का? मी इतरांना जे सांगतो ते स्वतः पाळतो का, याचा मी कधी प्रामाणिकपणे विचार केला आहे का?
२. परमेश्वराची विविध रूपे पाहताना माझ्या मनात श्रेष्ठ-कनिष्ठाचा भेद येतो का? “अनेकी एक” हे तत्त्व माझ्या उपासनेत उतरले आहे का?
३. संतांच्या निरपेक्ष वृत्तीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून माझ्या दैनंदिन जीवनात मी एखादी तरी गोष्ट निरपेक्षपणे करतो का?
४. सगुण उपासना करताना माझ्या मनात शंका, भ्रम किंवा न्यूनगंड येतो का? माझी श्रद्धा अविचल आहे का?
५. “सर्वोत्तमाचा दास” होण्याच्या दिशेने माझी वाटचाल सुरू आहे असे मला वाटते का?
– – –
श्लोक क्र. ५० – –
नसे अंतरी कामकारी विकारी |
उदासीन जो तापसी ब्रह्मचारी|
निवाला मने लेश नाही तमाचा|
जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा |५०|
अर्थ :ज्याच्या मनामध्ये कामवासनेसारख्या निरनिराळ्या प्रकारच्या विकार उत्पन्न करणाऱ्या वासना उत्पन्न होत नाहीत, जो वृत्तीने विरक्त असून ब्रह्मचारी राहून तपस्या करतो, ज्याच्या मनात क्रोधाचा लवलेशही उरत नाही, ज्याचे मन अत्यंत शांत आणि क्रोधरहित होते, असा मनुष्य त्या सर्वोत्तम भगवंताचा जगातील उत्कृष्ट भक्त होय.
विवेचन : मागील काही श्लोकांपासून समर्थ आपल्याला खऱ्या भक्ताची लक्षणे सांगत आहेत. एकेक श्लोक वाचून त्याचा अर्थ लक्षात घेतला की आपणही मानसिकदृष्ट्या खऱ्या अर्थाने समृद्ध होत जातो. आपण जर साधक असू, तर आपण कसे असायला हवे हे यातून कळते.
कामवासना ही माणसाच्या मनातील इतर वासनांपेक्षाही अधिक बलवान असलेली वासना असते. ती अनेक विकार म्हणजेच विकृती उत्पन्न करते. जेव्हा कामवासनेवर माणसाचे नियंत्रण नसते, तेव्हा त्याची बुद्धी काम करत नाही. त्याचा विवेक हरवतो आणि मग नको त्या गोष्टी त्याच्या हातून घडतात. समाजात अनेक राजकारणी व्यक्ती, साधू, संत, बुवा, बाबांचे असे अधःपतन होताना आपण पाहतो.
भगवंताचा सच्चा भक्त मात्र कामवासनेला आपल्या मनाचा ताबा घेऊ देत नाही. वृत्तीने तो उदासीन असतो. या ठिकाणी उदासीन या शब्दाचा अर्थ आपण समजावून घेऊया. सामान्यतः आपण असे समजतो की उदासीन म्हणजे उदास, कंटाळवाणा, ज्याला कशातच गोडी वाटत नाही अशी व्यक्ती. परंतु इथे समर्थांनी हा शब्द त्या अर्थाने वापरलेला नाही. उद् म्हणजे वरच्या दिशेने. लिफ्टला मराठी शब्द उद्वाहक असा आहे. या अर्थाने उदासीन म्हणजे वरची पातळी. सामान्य लोकांपेक्षा साधक एका वेगळ्या वरच्या पातळीवर स्थिर झालेला असतो. देहसुखाला महत्त्व न देता भगवंताच्या नामात तो स्थिर असतो. असा साधक म्हणजे उदासीन.
तो तापस असतो म्हणजे तपस्या करणारा. तपस्या करण्यासाठी आपल्याला कोणी ऋषीमुनी व्हावे लागेल असे नाही तर भगवंताच्या मार्गावर चालण्यासाठी एक प्रकारची साधना आणि त्यातील सातत्य आवश्यक असते. ही साधना म्हणजेच तपस्या असे म्हणता येईल.
‘ब्रह्मचारी’ या शब्दाचा अर्थ देखील या ठिकाणी आपण समजून घेऊ. व्यवहारात आपण ब्रह्मचारी म्हणजे लग्न न केलेला किंवा ब्रह्मचर्य पाळणारा असा अर्थ घेतो. जो विवेकाचा वापर करून आपल्या मनावर संयम ठेवतो आणि ब्रह्मचर्याचे पालन करतो अशी कोणतीही व्यक्ती म्हणजे ब्रह्मचारी. मग ती लग्न झालेली असो किंवा नसो. संसारात राहून देखील ब्रह्मचर्याचे पालन करता येणे शक्य असते आणि खरा साधक त्याचे पालन करतोच. आरोग्य किंवा विद्या प्राप्त करण्यासाठी जसे ब्रह्मचर्य पाळणे आवश्यक असते त्याप्रमाणेच साधना मार्गातही ब्रह्मचर्याचे अतिशय महत्त्व आहे.
तिसऱ्या ओळीत समर्थांनी साधकाचे आणखी एक लक्षण सांगितले आहे. ते म्हणजे त्याच्या मनात तमाचा म्हणजे मोह, अज्ञान आणि त्यातून उत्पन्न होणाऱ्या क्रोधाचा लवलेशही नसतो. काम आणि क्रोध हे बहुधा जोडीनेच आपल्या मनामध्ये वास करत असतात. काम आणि क्रोध या दोन्हींचा अतिरेक झाला की माणूस आपली विचारशक्ती आणि विवेक हरवून बसतो मग त्याच्या हातून नको त्या गोष्टी घडतात. साधनेच्या मार्गावर चालणाऱ्या आणि ज्यांनी बऱ्यापैकी त्यात प्रगती केली आहे अशा व्यक्तींना देखील काम आणि क्रोध यावर नियंत्रण न ठेवता आल्यामुळे त्यांचे अधःपतन झालेले दिसून येते. महर्षी विश्वामित्रांचे उदाहरण तर आपणा सर्वांना माहिती आहे.
खरा भक्त या सगळ्या वासना आणि विचारांवर नियंत्रण ठेवतो. त्याचे मन शांत आणि तृप्त असते. म्हणून आपण जे खरे संत किंवा साधक आहेत, त्यांच्याजवळ शांतीचा अनुभव घेतो. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण प्रसन्नता आणि तेज असते. ते त्यांच्या साधनेतून आणि मानसिक शांततेतून आलेले असते. संत तुकाराम म्हणतात…
शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघेंची दुःख ॥१॥
म्हणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ध्रु. ॥
खवळलिया कामक्रोधीं । अंगी भरती आधिव्याधी ॥२॥
तुका म्हणे त्रिविध ताप । जाती मग आपेआप ॥३||
– – म्हणून काम, क्रोध आदी विकारांवर नियंत्रण असलेला, ब्रह्मचर्याचे पालन करणारा आणि साधना मार्गावर सातत्याने वाटचाल करणारा भक्त म्हणजे त्या सर्वोत्तम परमेश्वराचा जगातील उत्कृष्ट असा भक्त होय.
स्वसंवाद ::
१) माझ्या मनावर कामवासना आणि क्रोध यांचे किती प्रमाणात नियंत्रण आहे – हे मी प्रामाणिकपणे तपासले आहे का ?
२) “उदासीन” म्हणजे वरच्या पातळीवर स्थिर राहणे – माझी साधना मला या पातळीकडे नेत आहे का की मी अजून सांसारिक गोष्टींमध्येच गुंतलेलो आहे ?
३) संसारात राहूनही ब्रह्मचर्य पाळता येते – माझ्या दैनंदिन जीवनात मनावर संयम ठेवण्याचा माझा प्रयत्न किती प्रामाणिक आहे ?