मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “उठा, जागे व्हा…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

? इंद्रधनुष्य ?

☆ “उठा, जागे व्हा…☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

…. उठा, जागे व्हा, ध्येय गाठेपर्यंत थांबू नका!-

” उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका ” ही घोषणा १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात  तत्वज्ञानी स्वामी विवेकानंद यांनी लोकप्रिय केली होती.जगाला त्यांच्या संमोहित मनःस्थितीतून बाहेर पडा आणि त्यांचे खरे स्वरूप शोधा हा त्यांचा संदेश होता.

हे वाक्य त्यांनी लोकप्रिय केलेले असले तरी त्याच मूळ कठ उपनिषेदात मिळते.

कठ उपनिषदातील बालनायक नचिकेताला त्याचे वडील वाजश्रवा यांनी मृत्यूचे देव यम यांच्याकडे पाठवले होते. यमच्या निवासस्थानी त्याने नचिकेताच्या प्रश्नांची उत्तरे दिली आणि त्याला आत्मज्ञान आणि योगाच्या पद्धती शिकवल्या. “उठा, जागे व्हा…” हे शब्द पुस्तकाच्या १.३.१४ अध्यायात आढळतात, जिथे यम नचिकेताला सल्ला देत आहे..उठा! जागे व्हा! थोरांकडे जा आणि शिका.तो मार्ग वस्तऱ्याच्या धारदार धारेसारखा आहे,असे शहाणे म्हणतात – चालणे कठीण आणि ओलांडणे कठीण. अशा उपनिषेदात नमूद केलेल्या भाष्याचा वाकयांश स्वामी विवेकानंदानी तरुण पिढीला संदेश देताना अगदी योग्य पद्धतीने वापरला आहे.

स्वामी विवेकानंदांनी भारतीयांना त्यांच्या संमोहित मनःस्थितीतून बाहेर पडण्याचा संदेश दिला होता. हे वाक्य त्यांच्या देशवासियांना त्यांच्या “झोपलेल्या आत्म्याला” जागे करण्यासाठी आणि “प्राचीन माते” ने जगाला दिलेल्या शांती आणि आशीर्वादांचा संदेश प्रसारित करण्यासाठी आवाहन करण्यासाठी होते. “जागे व्हा” म्हणजे एखाद्याच्या वास्तविक स्वरूपाचे जागरण आणि परिणामी समृद्धीची सुरुवात आपल्या देशवासियांनी केली पाहिजे अशा तळमळीतून हे उद्गार त्यांनी काढले.

२४ एप्रिल १८९७ रोजी विवेकानंदांनी सरला घोषाल यांना एक पत्र लिहिले. त्या पत्रात त्यांनी जनतेला फक्त सकारात्मक शिक्षण देण्यावर भर दिला, कारण त्यांचा असा विश्वास होता की नकारात्मक विचार माणसांना कमकुवत करतात.  असे लिहून पुन्हा त्यांनी उठा, जागे व्हा, ध्येय गाठेपर्यंत थांबू नका! हे पत्रात नमूद केले.

१२ नोव्हेंबर १८९६ रोजी लाहोर येथे दिलेल्या व्याख्यानात ते म्हणाले…लाहोरच्या तरुणांनो, अद्वैताचा तो शक्तिशाली ध्वज पुन्हा एकदा उंच करा, कारण जोपर्यंत तुम्हाला तोच परमेश्वर सर्वत्र उपस्थित असल्याचे दिसत नाही तोपर्यंत तुम्हाला ते अद्भुत प्रेम इतर कोणत्याही ठिकाणी मिळू शकत नाही. प्रेमाचा तो ध्वज फडकावा! “उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका.” उठा, पुन्हा एकदा उठा, कारण त्यागाशिवाय काहीही करता येत नाही.

असे अनेक व्याख्यानातून प्रवचनातून जेव्हा जेव्हा जशी संधी मिळेल तसे हेच वाक्य तरुणाईवर बिबावण्यासाठी पुनः पुन्हा उदघोषित केले.

सिस्टर क्रिस्टीन यांनी त्यांच्या’स्मृतिचिन्हे ऑफ स्वामी विवेकानंद’ या निबंधात लिहिले की बाकी सर्व खोटे असू शकते, फक्त हेच खरे होते. विवेकानंदांना ते जाणवले. स्वतःच्या महान जाणीवेनंतर, जीवनाचा एकच उद्देश होता – त्याच्यावर सोपवण्यात आलेला संदेश देणे, मार्ग दाखवणे आणि त्याच सर्वोच्च ध्येयाच्या मार्गावर इतरांना मदत करणे. “उठा, जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका.”

असे अतिशय प्रभावशाली, परिणामकारी, प्रेरणादायी, चळवळीला आमंत्रित करणारे महत्वाचे वाक्य त्यांचेच घोषवाक्य म्हणून प्रसिद्ध झाले.

उठा म्हणजे देशाला राजकीय स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय जागृतीसाठी एक उत्कट आवाहन होते.

जागे व्हा म्हणजे जाणीव करून घ्या आपण कोणत्या परिस्थितीत आहोत हे समजून घ्या आणि ही परिस्थिती बदलण्या साठी जागृक व्हा. हे सांगणे होते.

“ध्येय” साध्य होईपर्यंत “थांबू” नये. हे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात  आवश्यक होते. त्याचे भान सगळ्यांना विशेषत: तरुणाईला द्यायचे होते.

जसा वडीलधाऱ्या माणसांचा आदेश आला की त्या पूर्ततेसाठी कोणी झटकन उठून त्या आदेशाचे पालन करतो, तसेच हा एक आदेश आहे त्याचे पालन आपण तंतोतंत केले पाहिजे असे वाटून स्वातंत्र्यासाठी प्रत्येकजण पेटून उठला होता आणि स्वतंत्रतेचे ध्येय गाठेपर्यंत खरंच शांत बसला नव्हता.

आजही हे वाक्य तेवढेच प्रभावशाली आहे. तितकेच प्रेरणादायी आहे. फक्त तरुणाईलाच नव्हे तर प्रत्येकाला लागू होईल असेच आहे. हे वाक्य नुसते वाचायचे, लिहायचे, ऐकायचे नसून प्रत्येकाने आचरणात आणायचे आहे. या आदेशाचे पालन करायचे आहे. तरच सगळ्यांची प्रगती होऊ शकते. आपली स्वप्ने, ध्येये  पूर्ण होऊ शकतात.

मला वाटतंय याचाच परिणाम म्हणून अलीकडे नव्याने आता थांबायचं नाय हा सिनेमा आला असावा.

पण खरंच उठा, जागे व्हा, ध्येय गाठेपर्यंत थांबू नका! हे वाक्य प्रत्येकाने अंगीकारायला काय हरकत आहे? निदान तसा प्रयत्न तरी करत राहायला हवा.

तेव्हा आता थांबायचं नाय…. काय बरोबर ना?

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “शबरी – साक्षात श्रद्धा…” ☆ सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “शबरी – साक्षात श्रद्धा…” ☆ सुश्री शोभा जोशी

शबरी संबंधी,काही माहिती वाचनात आली होती.त्याचा संदर्भ घेऊन लिहिलेला लेख.

(शबरी म्हटलं की आपल्याला आठवतात तिनं रामाला दिलेली उष्टी बोरं. पण त्याही पलिकडे शबरी कोण कुठली ती दंडकारण्यात कशी आली याविषयी फारच थोड्या लोकांना माहिती असते.तिच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा लेख.)

शबरी ही भिल्ल जनजातीतील एका राजाची मुलगी.तिचा जन्म कोजागिरी पौर्णिमेला झाला होता.ती राजकन्या होती.तिचं खरं नाव श्रमणा.भिल्ल जनजातीतील शबर  जातीशी तिचा संध होता म्हणून कालांतरानं तिचं नाव शबरी पडलं.

शबरी दिसायला खूप सुंदर होती.होनहार होती.खूप दयाळू आणि प्रेमळ होती.श्रीराम जेव्हा वनवासाला गेले तेव्हा या नवासी लोकांशी त्यांचा खूप जवळचा संबंध आला.खरं तर राम – रावण युध्दाच्या वेळी राम आयोध्येतून सैन्याची मदत मागू शकले असते परंतु श्रीरामांनी तसं केलं नाही.त्यांनी तिथल्याच वनवासी बांधवांची मदत घेऊन युध्द जिंकले.( वानर सेना म्हणजे वानरांचे मुखवटे धारण केलेले मानवच होते असं सांगितलं जातं. )त्यामुळे राम हे वनवासींचे दैवत बनले.त्यांच्या नसानसात राम वसलेला आहे.शबरीही त्याला अपवाद नव्हती.सार्‍या प्रजेची शबरी खूप लाडकी होती.तिला सर्व प्रजा मानत असे.असं असताना,शबरी राजकन्या असताना,आपलं राज्य सोडून ती दंडकारण्यात का आली असा प्रश्र्न पडणं अगदी स्वाभाविक आहे.

शबरी लग्नाच्या वयाची झाल्यावर (त्याकाळी ७/८ वर्षांच्या मुलींचे विवाह करण्याची पध्दत होती.) तिच्या वडीलांनी एका भिल्ल राजकुमाराशी तिचा विवाह ठरविला. राजकुमार सुध्दा खूप सुंदर आणि गुणवान होता.लग्नाच्या आधी दोन दिवस शबरीनं,शेकडो पशू राजवाड्याबाहेर बांधलेले बघितले.तिनं आईला विचारलं, “आई, एवढे पशू इथं कशाला आणलेत? “आई म्हणाली, “अग तुमच्या लग्नात द्यायच्या मेजवानीसाठी आणलेत.ती आपली परंपरा आहे.” हे ऐकून शबरी खूप व्यथित झाली. म्हणजे आपल्या विवाहासाठी एवढ्या पशूंची हत्त्या होणार? छे! तिला हे काही बरोबर वाटले नाही.ही कसली परंपरा? हे काही बरोबर नाही.तिला खूप वाईट वाटलं.

भूतदया ठेवी तया काय उणे। प्रथम साधन हेची असे।

असे जे साधन जया चित्ती वसे। मायाजाल नासे तुका म्हणे॥

संत तुकारामांची ही उक्ती शबरीनं हजारो वर्षांपूर्वीच आमलात आणली होती.ह्या मुक्या प्राण्यांची हत्त्या टाळण्यासाठी,संसाराच्या मायाजालात अडकण्यापूर्वीही राजकन्या लग्नाच्या आधी एक दिवस रात्रीच्या वेळी पळून गेली.

दुसर्‍या दिवशी,आपण घरात नाही हे पाहून, वडील आपल्याला शोधायला माणसं पाठवणार हे तिला माहित होतं.म्हणून ती दिवसा झाडावर बसून राही.झाडावरची फळं खाऊन उदरनिर्वाह करी आणि रात्र झाली की चालू लागे.असं करता करता एक दिवस ती दंडकारण्यात येऊन पोहोचली.

दंडकारण्यात मातंग ऋषींचा आश्रम होता.तिथे ते तपस्या करीत. शबरीला त्यांची सेवा करण्याची इच्छा होती. पण ती भिल्ल असल्याने मातंग ऋषी तिची सेवा स्वीकारतील की नाही,अशी तिला शंका होती.म्हणून ती काय करायची पहाटे लवकर उठून,ऋषी उठण्याच्या आधी आश्रमाचा परिसर आणि आश्रमापासूनचा नदीपर्यंतचा रस्ता साफ करून ठेवायची.रस्त्यावरील काटे कुटे उचलून टाकायची.कारण ऋषी पहाटे नदीवर स्नानासाठी जातात हे तिनं पाहिलं होतं. त्यांना काटे टोचू नयेत म्हणून ती काळजी घेई. हे सगळं कोण करतं आहे याचा कुणालाच पत्ता नव्हता.

पण एक दिवस मात्र ऋषींनी तिला पाहिलं.तिच्या सेवेमुळे ते संतुष्ट झाले आणि तिला आश्रमात स्थान दिले.आश्रमातील कामं करताना तिच्या तोंडी सतत राम नाम असे.तिची रामावर असलेली श्रध्दा पाहून ऋषी प्रसन्न झाले.आपला शेवट जवळ आल्यावर त्यांनी तिला सांगितले, “मी गेल्यावर सुध्दा आश्रमात राहूनच तू रामाची प्रतिक्षा कर.एक दिवस तुला भेटण्यासाठी ते नक्की येतील.

मातंग ऋषींच्या मृत्यूनंतर शबरीचा वेळ रामभक्तीत आणि त्यांची प्रतिक्षा करण्यात  जाऊ लागला.

अणूमाजी राम रेणू माजी राम।तृष्णी काष्ठी राम वर्ततसे।

बाहेरी अंतरी राम चराचरी ।विश्वी विश्र्वकारी व्यापलासे॥ 

ती राममय झाली होती. श्रीराम केव्हाही येतील म्हणून ती रोज,आश्रम अगदी साफसुफ करून ठेवायची.रामाला देण्यासाठी रोज ताजी फळं तोडून आणायची.त्याला आंबट, किडकी फळं दिली जाऊ नयेत म्हणून प्रत्येक फळ चाखून बघायची.असं करत करत कितीतरी वर्षं निघून गेली. शबरी म्हातारी झाली.पण तिचं रामाची प्रतिक्षा करणं थांबलं नव्हतं.

एक दिवस तिला कळलं की, दोन सुंदर युवक तिला शोधत आहेत.तिला समजलं की  प्रभू रामच आले आहेत.आता तिच्या अंगात एक प्रकारचा उत्साह संचारला.ती पळत पळत रामाजवळ पोहोचली.त्यांना आश्रमात घेऊन आली.त्यांचे पाय धुवून पूजा केली आणि ती रामाला म्हणाली, ” रामा जर रावणाचा वध करायचा नसता तर तू इथं कशाला आला असतास? “

त्यावेळी श्रीराम आणि शबरी यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाविषयी एका लेखकानं लिहिलं आहे.आपल्याला माहित आहे की, अनेक लेखकांनी रामायण,महाभारतावर आपल्या कल्पनाशक्तीने अनेक कथा लिहिल्या आहेत त्यामुळे हे काल्पनिकही असेल पण तो जो संवाद आहे तो आत्ताच्या परिस्थिला लागू पडतो.म्हणून मी त्याचा उल्लेख इथं केला आहे.

शबरीचा प्रश्र्न ऐकून राम गंभीर झाले.ते म्हणाले, ” माते तू संभ्रमात पडू नकोस.मी तुलाच भेटायला आलोय.जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा लोकांना कळेल की, सत्ता जेव्हा समाजातील शेवटच्या व्यक्तिपर्यंत पोहोचेल तेव्हा रामराज्य येईल.फक्त रावण, खर, दूषण, शुर्पणखा यांच्यासारख्या विघातक शक्तींचा बिमोड करून किंवा फक्त रामाच्या शक्तीनेच नाही तर वनामध्ये असलेल्या शबरी सारख्या मातांच्या आशीर्वादाने सुध्दा युध्दं जिंकली जातात. लोकांना कळावं की श्रध्देने केलेल्या प्रतिक्षेचे फळ निश्र्चित मिळते. “

रामाचे बोलणे ऐकून शबरीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले.काही वेळानं शबरीनं रामाला विचारलं ” बोरं खाणार? “राम म्हणाले, ”  मी बोरं खाल्याशिवाय जाणारच नाही.” शबरीनं ती चाखलेली बोरं रामाला दिली.रामानं ती आनंदानं खाल्ली.लक्ष्मणानं रामाचं मन राखण्यासाठी बोरं घेतली पण ती उष्टी बोरं तो खाऊ शकला नाही.असं म्हणतात की राम- रावण युध्दात जेव्हा लक्ष्मणाला बाण लागून तो मुर्च्छित झाला तेव्हा या बोरांपासून बनवलेली संजिवनी बुटी दिल्यानं त्याला शुध्द आली.

श्रीरामानं तिला उपदेश केला. त्यानं शबरीला पूर्णावस्था प्राप्त झाली.तिनं रामाच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाली, “श्रीरामा, तुझं दर्शन होताच माझे तप, ध्यान,अनुष्ठान सफल झाले.माझ्या गुरूंचं मी ऐकलं म्हणून मला आज तुझं दर्शन झालं. मी धन्य झाले.आता देहसंगाची निवृत्ती करण्यासाठी कृपा करून मला आज्ञा दे. ”  असं म्हणून तिनं रामाच्या पायावर लोटांगण घातले.राम म्हणाले, “माते तू देह सोडून सुखानं परलोकात जा. “रामाची ही आज्ञा ऐकून शबरीनं आसन घातलं  आणि आत्मतेज चेतवून देहाचं दहन केलं.आपली आत्मज्योत तिनं श्रीरामांमध्ये विलीन केली आणि ती स्वर्गवासी झाली.

© सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ यशोधरा… – लेख क्र. १४ ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ यशोधरा… – लेख क्र. १४ ☆ सौ. मंजिरी येडूरकर

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)

सात वर्षे झाली त्यांनी घर सोडून! ते कपिलवस्तुत येणार होते धर्मप्रसारासाठी! राजवाड्यात यायला प्रथम तयारच नव्हते पण महाराज शुद्धोधदनानी फारच आग्रह केल्यामुळे यायला तयार झाले. त्यांना आता काय म्हणून हाक मारायची? हा प्रश्न महाराजांसह आम्हा सर्वांना पडला होता. सिद्धार्थ? मला तर आधी नावानेच हाक मारायची सवय होती. लग्नानंतर ‘अहो’ म्हणणं, नाव तोंडात येऊ न देणं किती अवघड गेलं होतं! आता कसे दिसत असतील? मला तर आठवतात ते स्वयंवराच्या वेळचेच. त्यावेळी माता पमिता म्हणत होत्या, सिद्धार्थला संसाराची आवड नाही त्यामुळे त्याचा विचार करू नको. पण जमलेल्या राजकुमारांचे डोळे बघ व ज्या डोळ्यात तुला प्रेम वाटेल त्यालाच निवड. मी पाहिलं, सगळ्या राजकुमारांच्या डोळ्यात मला माझ्या सौंदर्याची ओढ, लालसाच दिसली. फक्त सिद्धार्थांचे डोळे तेजस्वी व शांत होते. त्यामुळे मी त्यांनाच निवडलं. लग्न थाटामाटात झालं. लग्नानंतर त्यांना कधी हाक मारायची पाळीच आली नाही. ते कधी माझ्या कक्षात आले नाहीत. त्यांच्या कक्षात जाण्याची मला परवानगी नव्हती. ते त्यांच्या कक्षात ध्यान लावून बसायचे. संन्यासी वृत्तीने राहायचे. दोघांचं वय अवघं सोळा वर्षांचं होतं. महाप्रजापती गौतमी, म्हणजे सासूबाईंना मी विचारलं, की असंच राहायचं होतं तर लग्न कशासाठी केलं? स्वयंवराला आपण होऊन कां आले? सासूबाई म्हणायच्या आता लग्न झालंय ना, बदलेल तो! त्यात तुझ्यासारखी रूपवान पत्नी मिळाल्यावर बघशील हळूहळू रमेल संसारात. पण त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडेना. सासूबाईंचाही धीर सुटायला लागला. त्या मला म्हणायच्या, तू त्याच्याशी बोल. त्याला आपलंसं कर. एकदा मूल झालं की मग ते निरागस रूप बांधून ठेवेल सगळ्यांना! महाराजांनाही प्रश्न पडला. सिद्धार्थांनी राजकारणात लक्ष द्यावं म्हणून ते प्रयत्न करत होते.पण सिध्दार्थना शाक्त संघाचे विचार पटले नाहीत. त्यांची न्याय प्रणाली पटली नाही. त्यामुळे शाक्त सभेत स्पष्ट बोलले व परिव्रजा घेईन म्हणून सांगून निघून आले.आता जर सिध्दार्थानी परिव्रजा घेतली तर राज्याला  वारस कसा मिळणार या विवंचनेत महाराज होते. शेवटी वारस दिल्यावर परिव्रजा घेण्याचे ठरले.पण त्यासाठी  एकमेकांची मने ही गुंतावी लागतात नं? लग्नानंतर तेरा वर्षांनी मुलगा झाला. कपिलवस्तूत सगळीकडे आनंदी आनंद झाला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहते तो सिद्धार्थ शय्येवर नव्हतेच. राजवाड्यात कुठेही नव्हते. लक्षात आलं की त्यांची फार वर्षांची इच्छा पूर्ण करण्यासाठी ते सगळं ऐश्वर्य त्यागून निघून गेलेत. पण ते मला कांही न सांगता कां निघून गेले?याचं मला फार वाईट वाटलं. त्यांचा  माझ्यावर एवढाही विश्वास असू नये. एका शब्दानं बोलले असते तर, मी त्यांना कधीच अडवलं नसतं! हे कधीतरी होणार हे मी जाणून होते. माझ्या सौंदर्याचा, पत्नी पदाचा किती वेळा अवमान झाला होता.किती सहजपणे ते पत्नीची व मुलाची जबाबदारी धुडकावून निघून गेले. “यशोधरा” हाकेने माझी विचारांची शृंखला तुटली. लगबगीने महाप्रजापती गौतमी आल्या. म्हणाल्या, “लवकर खाली चल. तथागत आले आहेत.” आणि मी एकदम चमकून पाहिलं. इतिहासाची सावली वर्तमानावर कितीही पडू द्यायची नाही म्हटलं तरी ती पडतेच. मी सासूबाईंना सांगितलं,” मी खाली येणार नाही. त्यांना जर मला भेटायची इच्छा असेल तर ते माझ्या कक्षात येतील. यापूर्वी आपल्याला भेटण्यासाठी त्यांनी नकार दिला होता. पुन्हा अपमान सहन करणार नाही.”

बिंदुसार राजाकडे ते जेंव्हा राहत होते तेव्हा त्यांच्या विषयीच्या सर्व बातम्या इकडे  कळत होत्या. ते भिक्षू झाले. परिव्राजक झाले. बोधिसत्व वृक्षाखाली त्यांना आत्मज्ञान प्राप्ती झाली. आणि ते तथागतही झाले. तशी या सात वर्षात मीही खूप बदलले होते. मीही शृंगार उतरवला होता. त्यांच्याप्रमाणे एकभुक्त राहत होते. धरणीची शय्या करून झोपत होते. मलाही आता कसलाच मोह, आसक्ती राहिली नव्हती.एकदम माझ्या मनात आलं, मला या रूपात पाहून त्यांना काय वाटेल? आश्चर्य कां आनंद! पण ते तर आता कांही वाटण्याच्या पलीकडे गेले आहेत. “यशोधरा” इतकी प्रेमळ हाक! मी वळून पाहिलं,तर ते खरंच माझ्या कक्षात आले होते. पण काय बोलावं ते दोघांनाही कळलं नाही. आणि तो तेजःपुंज चेहरा पाहून मी मात्र मंत्रमुग्ध झाले. ते कक्षातून कधी गेले कळलंच नाही. भानावर आल्यावर   मी  सासूबाईंना विचारलं की मी त्यांच्याबरोबर जावू का? तथागतांनी त्याला नकार दिला. पण मी ठरवलं राहुलला तरी त्यांच्याबरोबर पाठवायचं. मी राहुलला दाखवलं की ते तेजस्वी चेहऱ्याचे तुझे वडील आहेत त्यांना जाऊन सांग,आईने सांगितले आहे की तुमच्याकडे मौल्यवान खजिना आहे. तो तुम्ही मला देणार आहात. राहुल तथागतांकडे गेला. धाडसाने त्यांच्याशी बोलला. तथागत राहुलला म्हणाले माझ्याकडे जो खजिना आहे तो तुला देईन पण तुला बौद्ध धर्माची दीक्षा घ्यावी लागेल.अवघा सात वर्षाचा राहुल, त्याला त्यांच्या बोलण्याचा अर्थ कळला की नाही कुणास ठाऊक! पण तो ‘हो’ म्हणून  त्यांचा हात धरून दूर निघून गेला. महाराज शुध्दोदनांच्या निर्वाणानंतर मी व सासुबाईनी बुद्धांचे विचार पटणाऱ्या, त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरुन जायला तयार असणाऱ्या अशा ५०० महिला एकत्र केल्या. सर्वांनी केशवपन केले. भगवी वस्त्रे धारण केली. भिक्क्षुणी म्हणून त्यांच्या अनुयायात सामील झालो. बुद्धांनी सांगितलेली वासना, इच्छा, आसक्ती,आवड,ज्यावर नियंत्रण ठेवायला हवं, अशी ही चार आर्य सत्ये, नीती व सदाचाराचा अष्टांग मार्ग, धम्माची शील, समाधी  आणि प्रज्ञा ही तीन अंगे, दहा पारमिता म्हणजे जन्म मृत्यूच्या भव चक्रापलिकडे जाण्यासाठी आवश्यक गुण, पंचशील म्हणजे पवित्र जीवनाची आचारसंहिता. या सर्वांचे आचरण स्वतः करून व ते इतरांना करण्यासाठी प्रवृत्त करत होतो. हळूहळू अनुयायांची संख्या प्रचंड वाढली. बौद्ध धर्म प्रस्थापित झाला. अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही लोकांना सुख, शांती, समाधान मिळविण्याचा मार्ग दाखविण्याचे कार्य केले. पण माझ्या आयुष्याचं प्रयोजन काय होतं हे मात्र शेवटपर्यंत मला कळलं नाही. नियती ज्या दिशेला नेत होती त्या दिशेला मी फरपटत जात होते इतकंच!

– – – –

यातील काही शब्दांचे अर्थ – –

तथागत म्हणजे जी ज्ञानप्राप्ती झाली आहे त्याप्रमाणे वागणारे,सर्व क्षणभंगुर घटनांच्या पलिकडे गेलेले.

परिव्राजक म्हणजे सांसारिक जीवनाचा त्याग करून तपस्वी म्हणून जीवन जगणे.स्वतःचा शोध घेणे.

पण एकाच ठिकाणी वास्तव्य न करता परिभ्रमण करत समाजाला आध्यात्मिक ज्ञान आणि मार्गदर्शन करणे.

भिक्खू म्हणजे बौद्ध धर्मातील संन्यासी.. जे बुद्धांच्या शिकवणीनुसार विशिष्ठ नैतिक नियमांचे पालन करतात. स्वतःच्या घरादाराचा,भौतिक गोष्टींचा त्याग करून धम्माच्या प्रचारासाठी आणि आत्म उन्नती साठी आपले जीवन समर्पित करतात. उदरनिर्वाहासाठी लागेल एवढीच भिक्षा मागून जीवन कंठतात

– लेख क्र. १४

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ छेडियल्या तारा… लेखक: डॉ. नीलकंठ देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

सौ. स्मिता सुहास पंडित

? इंद्रधनुष्य ?

☆ छेडियल्या तारा… लेखक: डॉ. नीलकंठ देशपांडे ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता सुहास पंडित ☆

पंडित रवि शंकर – एक हृद्य आठवण

बेडरूम मधून अचानक अनंत याचा हर्षोद्गार ऐकू आला

‘ ओ हो, पंडित रवि शंकर, chance of a life time ‘….

आणि आश्चर्याने अनंताची आई आणि त्याची लाडकी लहान बहीण स्मिता बेडरूम कडे धावले

मुंबईतील एक कनिष्ठ मध्यम वर्गीय सोसायटीतील छोटा फ्लॅट, सकाळची वेळ.

अनंत १६ वर्षाचा अत्यंत हुशार, सतार प्रेमी मुलगा – व त्या प्रेमापोटी दोन वर्षापासून सतार वाजवायला ही शिकू लागला होता

स्मिता त्याची १४ वर्षाची बहीण

दुर्दैव हे की अनंत, कर्क रोगाच्या शेवटच्या अवस्थेत होता, बेडरूममध्ये अस्थिपंजर अवस्थेत खिळून होता

त्याच्या आईने व स्मिताने बघितले की त्याच्या हातात वर्तमानपत्र होते, दृष्टी पंडित रवि शंकर यांच्या षण्मुखानंद हॉल मध्ये होणाऱ्या कार्यक्रमाच्या जाहिरातीवर होती, चेहऱ्यावर बरेच दिवसांनी हसू उमटलेले होते.

आई आणि स्मिताच्या डोळ्यात अश्रू आले कारण तो अजून किती दिवसांचा सोबती आहे हे माहित नव्हते आणि त्यात त्याने उद्गारलेले वाक्य हृदय चिरून गेले – chance of a life time

कारण अनंता करता हा chance खरेच life time साठी होता

अनंत उत्साहाने रवि शंकर, सतार या बद्दल भरभरून बोलत होता पण त्याला, आईला, स्मिताला माहीत होते की तो त्या कार्यक्रमाला जाऊ शकणार नाही त्यामुळे खोलीत खिन्नता ही पसरली होती.

काही क्षण असे गेले, स्मिताने काहीतरी निश्चय केला – अखेर वेड्या बहिणीची वेडी माया, व म्हणाली की ती त्या कार्यक्रमाला जाईल व अनंताच्या स्वाक्षरी संग्रह वहीत त्यांची स्वाक्षरी घेऊन येईल.

हे ऐकून अनंत खूप आनंदला व बऱ्याच काळानंतर तो दिवस उल्हसित अवस्थेत गेला

ठरल्याप्रमाणे स्मिता कार्यक्रमाला त्या प्रचंड गर्दीत कशीबशी जाऊ शकली.

अत्यंत सुंदर सतार वादन झाले , कार्यक्रम संपल्यावर मोठ्या जिद्दीने ती स्टेज वर पोहोचली पण पंडितजी भोवती मोठा गराडा पडलेला, त्यात या छोट्या मुलीला कोण विचारणार व ती मलुल चेहऱ्याने उभी राहिली. काय कोण जाणे पण संवेदनशील  पंडितजींचे तिच्या कडे लक्ष गेले, त्यांनी तिला जवळ बोलावले – तो पर्यंत स्मिताला रडू कोसळले. पंडितजींनी तिच्या डोक्यावर हात ठेवला व तिने त्यांना सर्व हकीकत सांगितली. ते ही ते ऐकून हेलावले, त्यांनी मोठ्या प्रेमाने अनंत करता संदेश लिहिला, स्वाक्षरी केली व स्मिता आनंदाने परत जायला निघाली.

तितक्यात पंडितजी आपल्या जवळच्या शिष्याच्या कानांत काहीतरी बोलले आणि तो शिष्य स्मिताच्या मागे आला व तिच्या घरचा पत्ता घेतला.

स्मिता घरी आली, मैफलीचे रसभरीत वर्णन सांगितले, संदेश आणि स्वाक्षरी दिली.

अनंत किती तरी दिवसांनी समाधानाने गाढ झोपी गेला.

दोन दिवस गेले आणि रात्री ८ च्या सुमारास घराखाली मोठी गलबल ऐकू आली म्हणून स्मिता आणि तिची आई बाल्कनीत आले, तर खाली गाडीतून उतरून पंडितजी पत्ता विचारत होते, बरोबर उस्ताद अल्लारखा साहेब ही होते.

दोघींनी खाली धाव घेतली, पंडितजींना सादर नमस्कार करून अश्रूभरल्या डोळ्यांनी वर आपल्या छोट्या घरात घेऊन आले

अनंताचा आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना – पंडितजी म्हणाले  – तो येऊ शकत नाही तर मी तर येऊ शकतो ना

आणि त्या घरात एक अद्भुत मैफिल जमली, घर उजळून गेले, अश्रूंनी न्हाऊन गेले

भैरवी झाली, अनंताच्या डोक्यावर हात ठेऊन, आशीर्वाद देऊन पंडितजी सरळ विमानतळावर गेले – अमेरिकेला परतण्यासाठी, एक अमूल्य, चिरंतन आठवण ठेऊन, खरा कलाकार किती संवेदनशील असतो, देवदूत असतो हे दाखवून.

‘ मृदुल करांनी, मृदुल हृदयाने छेडीत तारा ‘

लेखक: डॉ. नीलकंठ दत्तात्रय देशपांडे

प्रस्तुती : सौ. स्मिता सुहास पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

हिन्दी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ इंद्रधनुष #२७५ ☆ बाढ़ पर कुछ दोहे… ☆ श्री संतोष नेमा “संतोष” ☆

श्री संतोष नेमा “संतोष”

(आदरणीय श्री संतोष नेमा जी  कवितायें, व्यंग्य, गजल, दोहे, मुक्तक आदि विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं. धार्मिक एवं सामाजिक संस्कार आपको विरासत में मिले हैं. आपके पिताजी स्वर्गीय देवी चरण नेमा जी ने कई भजन और आरतियाँ लिखीं थीं, जिनका प्रकाशन भी हुआ है. आप डाक विभाग से सेवानिवृत्त हैं. आपकी रचनाएँ राष्ट्रीय पत्र पत्रिकाओं में लगातार प्रकाशित होती रहती हैं। आप  कई सम्मानों / पुरस्कारों से सम्मानित/अलंकृत हैं. “साप्ताहिक स्तम्भ – इंद्रधनुष” की अगली कड़ी में आज प्रस्तुत है आपके बाढ़ पर कुछ दोहे आप  श्री संतोष नेमा जी  की रचनाएँ प्रत्येक शुक्रवार आत्मसात कर सकते हैं।)

 ☆ साहित्यिक स्तम्भ – इंद्रधनुष # २७५ ☆

☆ बाढ़ पर कुछ दोहे☆ श्री संतोष नेमा ☆

जन – जीवन भयभीत है, उजड़ गए खलिहान |

पशु- पक्षी व्याकुल हुए, टूट रहे अरमान ||

*

निगल रही यह बाढ़ भी, घर- गृहस्थ सामान |

बहे जानवर बाढ़ में, दुखी हुआ इंसान ||

*

चौतरफा इस बाढ़ ने, लिया सभी को लूट |

जाने कब इस दर्द से, हमें मिलेगी छूट ||

*

इस बारिश में गिर गए, कितने सेतु धड़ाम |

पर सत्ता ने मढ़ दिया, वर्षा पर इल्ज़ाम ||

*

टूटा पुल रोकर कहे, मुझे न देना दोष |

पकड़ें उसको खोज के, जिसने खाया कोष ||

*

नदियाँ पागल सी हुईं, खूब बढ़ा सैलाब |

आँखों में ही खो गए, टूटे सारे ख्वाब ||

*

शिखर फिसल कर गिर रहे,  नदियाँ करें कटाव |

नालों में भी आ गया, बारिश भरा बहाव  ||

*

दिखे हर तरफ त्रासदी, खड़ा प्रशासन मौन |

जन -जन की यह वेदना,  यहाँ सुनेगा कौन ||

*

छेड़ -छाड़ अब छोड़िए, करें नियति सम्मान |

होगा तब संतोष को, वृहद खुशी का भान ||

© संतोष  कुमार नेमा “संतोष”

वरिष्ठ लेखक एवं साहित्यकार

आलोकनगर, जबलपुर (म. प्र.) मो 70003619839300101799

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक (हिन्दी) – श्री विवेक रंजन श्रीवास्तव ‘विनम्र’ ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख २१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख २१ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।।

यथा व्रजगोपिकानाम् ॥ २१ ॥

अर्थ: आपल्या भक्तिलक्षणाकरिता नारदमहर्षी उदाहरण देतात – जशी गोकुळातील गोपिकांची (अवस्था होती.)

विवेचन: स्वतःचे भक्तिलक्षण नारद सोदाहरण पटवून देतात. कोणतीही महत्त्वाची भावना किंवा ज्ञान हे अमूर्तच असते. त्याच्या अभिव्यक्तीकरिता एखाद्या व्यक्त उदाहरणाची अपेक्षा असते. मूर्तात प्रविष्ट झाल्यावाचून अमूर्त प्रगट होऊ शकत नाही. नारदांनी ज्या भक्तीचे स्वरूप एकोणिसाव्या सूत्रात सांगितले, ती भक्ती उत्कटतेने पूर्ण रूपाने कोठे प्रगट दिसली असेल तर ती नारदांना गोकुळात दिसली. गोकुळातील पुरुष, स्त्रिया, गोप, बालक सर्वच भगवान श्रीकृष्णावर प्रेम ठेवणारेच होते. पण नारदोक्त भक्तिलक्षणाचा पूर्ण आविष्कार गोपिकांच्याच ठिकाणी दिसला म्हणून त्यानी गोपिकांचेच उदाहरण घेतले आहे. नुसते ‘गोपिकानाम्’ म्हटले असते तर कोणत्याही मोठ्या नगरात गोप गोपिकाची वस्ती असते. पण ते भक्त नसतात. केवळ गोकुळातील व्रज भूमीतील गोपिकाच भक्त होत्या. म्हणून ‘व्रजगोपिकानां’ म्हटले आहे.

गोपिका म्हणतात, “हे दीनबन्धो, तू जन्मल्यापासून हे गोकुळ अधिक उत्कर्षाला प्राप्त झाले आहे, येथे लक्ष्मी अखंड आश्रयाला आली आहे.” मुळात ती व्रजभूमी ही पुण्यभूमीच होती. पण श्रीकृष्णअवतारामुळे तिला फार श्रेष्ठत्व प्राप्त झाले. त्या व्रजवासी ज्या गोपिका होत्या, त्यांचे उदाहरण नारद आपल्या भक्तिलक्षणाच्या पुष्टीकरिता देतात.  आपल्या इंद्रियांच्याद्वारे जी श्रीकृष्णभक्तिरसाचे पान करते ती गोपी.

‘गोपायति’ इति गोपी म्हणजे आपल्या भक्तिभावनेचे जी रक्षण करते ती गोपी.

नाथ भागवतात गोपींचे वर्णन पुढील प्रमाणे आले आहे.

*”गोपिका करूनि माझी भक्ती । मी प्रसन्न केलों श्रीपती ।

रास मागीतला एकांतीं । माझी सुखप्राप्ती पावावया ॥६२॥

*

त्या जाण वेदगर्भींच्या श्रुती । श्रुतिरूपें नव्हे मत्प्राप्ती ।

तैं परतल्या म्हणोनि ‘नेति नेति’ । माझी सुखसंगती न पवेचि ॥६३॥

*

विषयबुद्धी तें मुख्य अज्ञान । तें असतां मी न भेटें जाण ।

असतां वेदोक्त जाणपण । तेणेंही संपूर्ण न भेटें मी ॥६४॥

*

जाणीवनेणीव गेलिया निःशेष । माझें पाविजे निजात्मसुख ।

श्रुति जाणोनि हें निष्टंक । गोकुळीं त्या देख सुखार्थ आल्या ॥६५॥

*

त्याचि जाण समस्त श्रुती । गोपिकारूपें गोकुळा येती ।

रासक्रीडामिसें एकांतीं । माझी सुखप्राप्ती पावल्या ॥६६॥

दुसरीही एक कथा उपलब्ध होते. त्रेतायुगात श्रीरामचंद्राचा अवतार झाला. सीतास्वयंवराकरता श्रीरामचंद्र मिथिला नगरीला आले, धनुर्भंग झाला, सीतेने रामचंद्राला माळ घातली, विवाहसोहळा समारंभपूर्वक पार पडला, तेथे ज्या मिथिला नगरीतील स्त्रिया जमल्या होत्या त्याही श्रीरामचंद्राचे ते कोटिकंदर्पदर्पहारी लावण्य बघून मोहित झाल्या. त्यांचीही उत्कट इच्छा झाली की आम्हांलाही हेच पती लाभले तर किती चांगले होईल, त्याकरिता आम्ही वाटेल तो त्याग करू. त्यानी आपली उत्कट वासनाही श्रीरामापुढे प्रगट केली, पण राम अवतार हा मर्यादापुरुषोत्तम होता, एकपत्नीत्वाची मर्यादा पाळणे अवश्य होते. त्या मिथिलानिवासी स्त्रियांचा उत्कटभाव पाहून श्रीरामचंद्र त्यांना म्हणाले, ‘तुम्ही शोक करू नका.’ द्वापार युगात तुम्ही गोपी व्हाल, त्यावेळी मी आपली इच्छा पूर्ण करेन.

.गोपिका गायीच्या दुधाचे दोहन करतेवेळी, साळी इत्यादी कुटताना, सडासंमार्जन करताना, बालकाना झोके देताना, दह्याचे विरजण घालताना, बालके रडत असताना गाणी म्हणत असता सर्व व्यवहारात प्रेमपूर्ण चित्ताने, अश्रुपूर्ण नेत्रांनी श्रीकृष्णाचे गुणगान करीत असत. गोपिकांना क्षणभरही श्रीकृष्णाची विस्मृती पडत नव्हती; पण जर क्षणही त्यांना श्रीकृष्णाचा वियोग झाला तर मात्र प्राणांतापेक्षाही त्यांना अधिक दुःख होत होते.

गोपींच्या प्रेमाचे वर्णन माउलींनी आपल्या विहरणी मध्ये केले आढळते. श्रीज्ञानेश्वरमहाराजांचे अभंग पुष्कळ आहेत. त्यापैकी प्रसिद्ध म्हणजे,

धनु वाजे घुणघुणा वारा वाजे रुणझुणा ।

भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा का ॥ १ ॥

चांदवो चांदणे चापे वो चंदनु ।

देवकीनंदनुविण नावडे वो ॥ २ ॥

चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी ।

कान्ही वनमाळी वेगी भेटवा का ॥ ३ ॥

सुमनांची सेज शीतळ वो निकी ।

ओले आगीसारिखी वेगें विझवा कां ॥ ४ ॥

यावर कोणी शंका घेईल की, गोपिका श्रीकृष्णाना परमात्मा समजत होत्या का? त्या तर त्याला एक सुंदर पुरुष म्हणून मानीत होत्या व जार बुद्धीने त्याच्यावर प्रेम करीत होत्या, त्या कामासक्त होत्या, असे असता त्यांच्या त्या वैषयिक प्रेमाला भक्ती कसे म्हटले जाईल? याच शंकेचे उत्तर देण्याकरिता पुढील दोन सूत्राची रचना झाली आहे.

जय जय रघुवीर समर्थ

नारद महाराज की जय!!!

– भक्तीसूत्र – क्र. २१

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक अस्त…एक उदय! ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

एक अस्त…एक उदय! ☆ श्री संभाजी बबन गायके 

मी वीरमाता श्रीमती कांतादेवी ओमकार सिंग. श्रीनगर…….

त्यादिवशी तो युद्धावर जायला निघाला तेंव्हा मी त्याला म्हणत होते “तुझी सुट्टी अजून संपायची आहे…तू जाऊ नकोस! त्यावर तो म्हणाला, “माझ्या फौजेला माझी गरज असताना जर मी गेलो नाही, तर मग फौजेत भरती होण्याचा अट्टाहास केला तो कशासाठी? ओठांवर मिसरूड फुटू लागले होते तेंव्हा पासूनच सेनेची ही वर्दी अंगावर मिरवण्याची स्वप्नं बघितली ती कशासाठी?”

आणि तो गेला. त्याला काही फार दूरवर जायचं नव्हतं…किमान त्यावेळी तरी. आमच्या राहत्या घरापासून जवळच होती युद्धभूमी….कारगिल!

उदयमान…आमच्या संसाराच्या क्षितीजावर उदय पावलेला कुलसूर्य…दोन मुलींच्या पाठीवर मोठ्या नवसाने झालेला मुलगा…आमच्या कुलाचं नाव हाच तर पुढे नेणार होता. प्रत्येक आईला तिचं बाळ देखणं वाटतंच…पण माझा उदयमान होताच मोठा देखणा. खरं तर त्यानं शिकावं आणि मोठं कुणीतरी व्हावं असंच मला वाटे. आमची शेतीवाडी आम्हांला पुरेल एवढं धान्य देत होतीच..उदयमानला नोकरीही करण्याची गरज नव्हती. पण तो अवघ्या सतराव्या वर्षीच फौजेत भरती झाला..घरी किंचितही कल्पना न देता. तो गणवेशात घरी आला तेंव्हा एकदम रुबाबदार दिसत होता..तरीही त्याने फौजेत जाऊच नये, असे माझ्या मातृहृदयाला सारखे वाटत राही…एकुलतं एक लेकरू ते! त्या वर्षात तो एक दोनदा घरी आला, नाही असं नाही…पण त्याचं सारं लक्ष त्याच्या युनिट मध्ये… ग्रेनेडियर होता तो. मोठमोठे अधिकारी त्याला त्यांच्या धाकट्या भावाप्रमाणे वागवत असत.

तो पहिल्यांदा सुट्टीवर घरी आला होता तेंव्हा आम्ही शेजारीपाजाऱ्यांना मिठाई वाटली होती.

पण का कुणास ठाऊक यावेळी त्याचे सुट्टी अर्धवट सोडून पलटणीत परत जाणं मला रुचलं नव्हतं…एक विचित्र भावना होती मनात दाटलेली…उदयमान सहीसलामत परतेल ना? सुट्टीवर आला होता त्यावेळी त्याने त्याच्या काही लढाईच्या कहाण्या बरंचसं हातचं राखून आम्हांला सांगितल्या होत्याच. पण ते काही युद्ध नव्हतं. आमच्या श्रीनगरमध्ये, काश्मीरमध्ये पाकिस्तानी अतिरेकी कारवाया आणि त्यावर भारतीय सैन्याच्या जबाबी कारवाया सुरूच असतात. पण १९९९ वर्षाच्या मे महिन्यापासून कानांवर भलतेच येत होते…पाकिस्तानी घुसलेत म्हणे भारतात. चिंतेने काळीज व्यापून टाकले होते. मन चिंती ते वैरी न चिंती…म्हणतात ते काही खोटं नाही!

आणि एके दिवशी निरोप आला…उदयमान अस्तास गेला..कायमचा! जगाचा सूर्य तरी पुन्हा सकाळी उगवतो..पण आमचा सूर्य परत दृष्टीस पडणार नव्हता.

तो नेहमी म्हणायचा…आई,सैनिकाने छातीवर गोळ्या झेलाव्यात…पाठीवर नव्हेत! तसंच झालं होतं…त्याच्या काळजात गोळ्या घुसल्या होत्या. त्याच्या छातीवरच्या खिशात असलेल्या कातडी पाकिटातून एक गोळी आरपार गेली होती..ते छिद्र पडलेलं पाकीट मी आजही जपून ठेवलं आहे. त्यावरचे त्याच्या रक्ताचे डाग कालांतराने नाहीसे झालेत..पण माझ्या काळजावरच्या खुणा अजूनही ताज्याच आहेत.

उदयमानला सख्खा भाऊ नव्हता..पण ती कसर त्याने फौजेत भरून काढली. महाराष्ट्राचे शूर सुपुत्र कर्नल सचिन निंबाळकर साहेब आणि आमचा उदयमान यांची पक्की गट्टी जमली होती. कित्येक अतिरेकी-विरोधी कारवायांमध्ये हे दोघे खांद्याला खांदा लावून लढले होते. निंबाळकर साहेब अधिकारी आणि उदयमान कनिष्ठ जवान…ग्रेनेडीयर! पूर्वीच्या काळात हातगोळे फेकत शत्रूवर समोरासमोर चाल करीत जाणा-या शूर सैनिकांना ग्रेनेडीअर्स म्हणत…हल्लीचे ग्रेनेडीअर्स सर्वप्रकारची शस्त्रास्त्रे लीलया चालवतात. माझ्या उदयमानच्या हाती रायफल असायची…नेम पक्का होता त्याचा. आणि शत्रूवर बेधडक चालून जायला घाबरायचा अजिबात नाही..म्हणून प्रत्येक मोहिमेत नेहमी अग्रभागी असायचा.

त्या दिवशी ४ तारीख होती जुलै,१९९९ची. रात्रीचे साडेआड वाजले होते. उदयमान पहाड चढण्यातही माहीर होता. कमरेला दोर लावून तो आणि त्याचे साहेब,साथीदार रात्रीच्या अंधारात बारा-पंधरा हजार फुटांचा उभा पहाड चढू लागले. शत्रू वर लपून बसलेला होता…खाली खोल दरी,त्यात बर्फ,धुकं आणि वरून कधीही बरसू शकणा-या शत्रूच्या गोळ्या. शत्रू अगदी आरामशीर बसून खाली गोळीबार करू शकत होता..आणि त्यामुळेच त्यांनी आपले अनेक अधिकारी,सैनिक अचूक टिपून मारले होते…आणि त्याचाच बदला घ्यायला आपले वीर निघाले होते.

पण आपले सैनिक पहाडाच्या या बाजूने वर येतील याची शत्रूने स्वप्नातसुद्धा कल्पना केली नव्हती. या पर्वतराजीमध्ये शत्रूने अशी काही ठिकाणे काबीज करून ठेवली होती कि तिथे बसून ते भारतात सहज डोकावू शकत होते, आणि भारतीय फौजेची रसद रोखू शकत होते. आणि म्हणूनच आधी तिथून त्यांना हुसकावून लावणे गरजेचे होते. काही मोहिमांमध्ये तर शत्रूच्या चौक्यांच्या अगदी आठ-दहा मीटर्सपर्यंत आपले जवान लपतछपत पोहोचायचे…आणि शत्रूच्या नजरेत यायचे. शत्रू मोठ्या संख्येने,हत्यारबंद असे. मग अशा वेळी पहाडाखाली असलेल्या बोफोर्स तोफा आणि त्या डागणारे कुशल हात यांचे साहाय्य मागितले जायचे. तोफेचे गोळे लक्ष्यापासून आठ-दहा मीटर्स मागे-पुढे पडले तरी ते नेम चुकले असे मानता येत नाही. आणि आपले सैनिक तिथेच आठ-दहा मीटर्स अंतरावर आहेत, आणि शत्रूवर गोळा टाकायचा आहे…अशावेळी नशीब बलवत्तर हवे आणि आपल्या लोकांवर विश्वास. आणि हा विश्वास प्रत्येकवेळी सार्थ ठरला आपल्या सुदैवाने. उदयमान सहभागी होता त्या मोहिमेतही असेच झाले. भीतीने गर्भगळीत झालेल्या शत्रूने मग निकराचा गोळीबार आरंभला…अंदाधुंद. उदयमान अर्थात त्यांच्या दिशेने धावत गेलाच…

…. हातघाईची लढाई..अगदी तलवारीच्या काळात होत असे तशी झाली…पण आधुनिक रायफलींच्या गोळ्यांना नेम धरावा लागत नाही…काही गोळ्या उदयमानच्या काळजाशी सलगी करायला धावल्या…थेट आत…खोलवर घुसल्या. डोळ्यात रक्त उतरलेला उदयमान थांबला नाही..जोवर श्वास थांबले नाहीत तोवर. काही बळी मिळवून शत्रू पायांत शेपूट घालून माघारी पळून गेला…पुन्हा लपून लपून येण्यासाठी!

या धुमश्चक्रीत उदयमानचा देह आणि त्याच्या सहकारी सैनिकांचे देह चार दिवस तिथेच पडून राहिले होते…आपल्या सैन्याच्या पुढच्या मोहिमांत हे दिव्यदेह हाती लागले..आणि उदयमान, तिरंग्यात गुंडाळलेला,पुष्पहारांनी सजलेला अंगणात आला! माझे दु:स्वप्न असे खरे ठरले होते…पण पाठीवर नव्हे तर छातीवर गोळ्या झेलून देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या माझ्या लेकाचा मला अभिमानही वाटला! पण आईच्या काळजाने काय करावे? लोकांती रडू लपवता येते.पण एकांत…खायला उठतो…मग आसवं येतात समजूत घालायला.

…. पण मग मला एकाएकी याद आली….एक लेक गेला..पण त्याचा थोरला भाऊ आहे की…मी त्याला पत्र लिहिलं! सचिन…माझा एक मुलगा गमावला..पण तुम्हीही मला मुलाच्या जागीच आहात!

सचिन या नावाचा अर्थ सत्य,खरेपणा असा सांगतात. उदयमानचे हे बंधू सुद्धा नावाला जागणारे. लढाईतील यशाबद्दल इतर सैनिक,अधिकारी जल्लोष करीत असताना, उदयमानच्या आठवणीने व्याकूळ होऊन एकांतात बसणारे सचिनजी! माझा कोवळा उदयमान त्यांच्या नजरेपुढून जाता जात नव्हता. त्यांनी माझे शब्द फुलासारखे झेलले…आणि मला एक मुलगा लाभला. माझ्या मुलींना मोठा भाऊ लाभला. त्या दोघींच्या लग्नात सचिनजी यांनीच पुढाकार घेतला आणि कार्य सिद्धीस नेले. आम्हांला सर्वप्रकारे धीर,आधार दिला. जगात कुठेही नेमणुकीस असले तरी वर्षातून एकदा तरी आमच्या घरी भेट देण्याचा त्यांचा क्रम चुकत नाही…गेली सव्वीस वर्षे! मागील वर्षी तर ते ४ जुलै रोजीच घरी आले होते…होय…१९९९ मध्ये ज्या रात्री उदयमान मोहिमेवर गेला होता…ती ४ जुलै….कर्नल सचिन निंबाळकर यांच्या रूपाने जणू उदयमानच परतून आला होता!

(हा लेख हुतात्मा सैनिक मरणोत्तर सेना मेडल प्राप्त ग्रेनेडियर उदयमान सिंग यांच्या मातोश्रींच्या भूमिकेतून लिहिला असून, प्राप्त माहितीवर आधारित आहे. काही बाबतीत कल्पनेचा आधार घेतला आहे. १९९९ मध्ये झालेल्या भारत पाकिस्तान कारगिल युद्धाने भारतीय सैनिकांचे अनेक पराक्रम पाहिले. भारतीय सैनिकांच्या अलौकिक साहसाच्या कथा अनुभवल्या. त्यातून सैनिक आणि अधिकारी कसा एकमेकांच्या जीवाला जीव देतात,हेही दिसून आले. महाराष्ट्राचे वीर सैन्याधिकारी कर्नल सचिन निंबाळकर साहेब यांनी त्यांचा बडी उदयमान यांचा बडा भाई बनून त्याच्या कुटुंबाशी जन्मोजन्मीचे नाते जोडले. निंबाळकर साहेब पुढे सैन्यसेवेसाठी परदेशीही गेले होते. पण तशाही धामधुमीत साहेबांनी वर्षातून एकदा तरी कांता देवी मातोश्रींना, त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्याचा क्रम चुकवला नाही…तो अगदी आजपर्यंत! वीर चक्र विजेते असलेल्या निंबाळकर साहेबांच्या पराक्रमाविषयी तर स्वतंत्र लेख लिहावा लागेल. परंतु सहकारी सैनिकाच्या कुटुंबाची काळजी घेण्याच्या त्यांच्या कृतीने भारतीय सैन्याची प्रतिमा अधिकच उजळून निघाली आहे. कर्नल सचिन आण्णाराव निंबाळकर साहेबांना अत्यंत मनःपूर्वक नमस्कार आणि शुभेच्छा! हुतात्मा उदयमान सिंग यांना वंदन. जय हिंद!)

(छायाचित्रे:-१.कर्नल सचिन निंबाळकर साहेब. २. हुतात्मा उदयमान सिंग. ३. उदयमान सिंग आणि त्यांच्या मातोश्री.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “बारा अमावस्यांचा हा गराडा सुटेल का कधी?” –  भाग – 2 ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

श्री मयुरेश उमाकांत डंके

? इंद्रधनुष्य ?

☆ “बारा अमावस्यांचा हा गराडा सुटेल का कधी?” –  भाग – 2 ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके

अनेक मानसशास्त्राचे अभ्यासक असं सांगतात की, अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या आयुष्यातल्या महत्वाच्या गरजा असतात आणि त्या पूर्ण करण्यासाठीच माणसं वेगवेगळ्या प्रकारची कामं करुन जगण्याचा प्रयत्न करतात. हे खरं आहे. पण भारतासारख्या अत्यंत प्राचीन अस्तित्व असणाऱ्या देशात ही थिअरी सगळ्यांनाच सरसकट लागू पडत नाही. प्राथमिक भौतिक गरजांपेक्षाही वेगळं काही उदात्त ध्येय असणाऱ्या आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी सर्वस्वाची होळी करणाऱ्यांची मांदियाळी आपल्या देशात फार मोठी आहे.

‘देव, देश आणि धर्म’ यांना आयुष्यात सगळ्यात पहिलं प्राधान्य देणाऱ्यांची नावं आपला इतिहास विसरलेला नाही. पण दुर्दैव हे आहे की, आपण त्या इतिहासालाच विसरलो. आणि हे कमी की काय म्हणून, आपलं महादुर्भाग्य इतकं थोर आहे की, आपल्याच देशातले अनेकजण त्या इतिहासाचं व्यक्तिगत स्वार्थासाठी भांडवल करतात.

केवळ स्वतःचं राज्य नव्हे तर, “हिंदवी स्वराज्य” उभं करण्याचं स्वप्न पाहिलेल्या आणि अनेक आव्हानांवर मात करुन मराठी साम्राज्याचं अभिषिक्त सिंहासन स्थापन करणाऱ्या शिवरायांना इतिहास कसा विसरेल? “मातृभूमी आणि तिची संस्कृती” मस्तकी धरुनच शिवरायांनी आयुष्यभर स्वराज्यसाधना केली. साधुसंत, लेकीबाळी, आयाबहिणी, गाईवासरं यांना सुखाचे दिवस आले. आपलं शील पवित्र राहिल का, याच्या चिंतेत अहोरात्र जगणारी स्त्री आणि वरुन दुष्काळ अन् खालून सुलतानी लूट अशा दुहेरी वरवंट्याखाली रोज भरडून निघणारा पुरुष, यांनी सुखाची आशाच सोडलेली..! कुठल्याही संवेदनशील माणसाची गात्रं सुन्न करणारं हे वास्तव महाराष्ट्र तीनशे वर्षं भोगत होता.

मराठी माणसाच्या कमरेला तेव्हाही तलवार होतीच. मनगटात ताकद होतीच. धमन्यांमध्ये शौर्य होतंच. बुद्धीचं बळ होतंच. पण, एकाच गोष्टीची कमतरता होती. आपल्याच आयाबहिणींच्या अब्रूला हात घालणाऱ्याचा हात तोडण्यासाठी ती तलवार म्यानातून बाहेर येत नव्हती. प्रजेवर चाललेला इस्लामी राजवटीचा जुलूम मोडून काढण्यासाठी मनगट फुरफुरत नव्हतं. देवळातले देव भ्रष्ट होत होते, तरीही शौर्य पांघरूण घेऊन झोपून होतं.

हे सगळं मोडीत काढून, नवं निष्कंटक राज्य निर्माण करण्याची प्रेरणा शिवाजीराजांच्या रूपानं महाराष्ट्राच्या भाग्यात अवतरली. वयाच्या केवळ सोळाव्या वर्षी राजांनी स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली. त्यावेळी त्या कोवळ्या वयात राजांनी त्यांच्या सवंगड्यांना जे सांगितलं, ते कवयित्री शांताबाई शेळक्यांनी किती अचूक शब्दबद्ध केलंय पहा –

स्वयें शस्त्र देशार्थ हाती धरावें,

पिटावे रिपुला रणीं वा मरावें,

तुझ्या रक्षणां तूच रें सिद्ध होई,

तदा संकटी देव धावून येई ||

मराठी मनगटातली कर्तृत्व प्रेरणा आणि शौर्य राजे वयाच्या सोळाव्या वर्षी जागी करु पाहत होते. “हे हिंदवी स्वराज्य व्हावें ही तो श्रींचीच इच्छा” अशी सामान्य जनमानसाची धारणा तयार करत होते. त्यांच्यातला वन्ही चेतवत होते. अन्यायाला, गुन्ह्याला तात्काळ शिक्षा करत होते. रांझ्याच्या पाटलाचा म्हणजे बाबाजी बिन भिकाजी गुजर याचा चौरंग करण्याची शिक्षा देताना शिवरायांचं वय किती? केवळ सोळा वर्षं..!

स्वराज्य स्थापनेची शपथ घेणं, रांझ्याच्या पाटलाचा चौरंग करणं आणि तोरणा जिंकणं या घटना राजांच्या वयाच्या सोळाव्या वर्षातल्याच आहेत. टाकोटाक त्यांनी तोरण्याच्या बाजूचा मुरुंबदेवाचा डोंगरही ताब्यात घेतला. कुवारीगड घेतला. दौलतराव मोऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या विधवा पत्नीच्या विनंतीवरून राजांनी नवा चंद्रराव गादीवर बसवण्यासाठी जावळी ताब्यात घेतले तेव्हा त्यांचं वय होतं सोळा पूर्ण..! म्यानातून तलवार बाहेरही न काढता कोंढाणा घेतला अन् लगेच तलवार उपसून सुभानमंगळ सुध्दा घेतला.

शहाजीराजे आपल्याच पदरी असतानाही त्यांचा मुलगा आपलीच दौलत स्वतःच्या ताब्यात घेऊन बंड करतो आहे, हे कळून इकडं विजापुरात बादशाह अस्वस्थ होताच. १६४७… याच वेळी शहाजीराजांचा मुक्काम कर्नाटकात जिंजीच्या पायथ्याशी होता. त्यांचेपाशी पंधरा हजाराची फौज होती. पण शहाजीराजांची तक्रार बादशाहकडं आली. ती ज्यानं केली, त्याचं नाव अफझलखान..! अन् १६४८ मध्ये मध्यरात्री बाजी- खंडोजी – अंबाजी – भानाजी घोरपडे, यशवंतराव वाडवे, मंबाजी भोसले, तुळोजी भोसले, याकुतखान, मसूदखान इत्यादींनी राजांच्या छावणीवर अकस्मात हल्ला चढवला. अन् बाजी घोरपड्यांनी बेशुद्धावस्थेत असलेल्या राजांना कैद केलं. सगळा सरंजाम जप्त केला. हातापायात लोखंडी बेड्या ठोकल्या. मुस्तफाखान, बाजी घोरपडे आणि अफझलखान..! १६४९.. लोखंडी बेड्या ठोकलेल्या शहाजीराजांना एका हत्तीवर बसवून अफझलखान विजापुरात पावता झाला..! शिवाजी राजांचं वय केवळ अठरा..!

एकाच वेळी सुभानमंगळावर लढाई, पुरंदरावर फत्तेखानाला तडाखा, आणि दिल्लीच्या मोगल सुलतानाला शाहजहानशी संधान बांधून विजापूरला शह देण्याचा डाव हे सगळं वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी राजांनी प्रत्यक्षात आणून दाखवलं आहे..!

वयाच्या अठराव्या वर्षी कोंढवे, शिवापूर, आंबिल ओढा अशी धरणं बांधणारे, पाट बंधारे बांधणारे शिवाजीराजे आम्हाला शाळेत पाठ्यपुस्तकांमध्ये कधी दिसलेच नाहीत..! आम्हाला शिकवले गेलेच नाहीत..!

१६५६ च्या सुमारास म्हणजे वयाच्या पंचविशीत राजांनी जावळी स्वराज्यात आणली. रायरी ताब्यात घेतला. अन् पारघाटाच्या तोंडावरच्या भोरप्या डोंगरावर गड बांधायला घेतला..! राजांच्या आज्ञेनं मोरोपंत पिंगळे गडाचं बांधकाम आकाराला आणत होते. तोच हा प्रतापगड..! सबंध मावळात असा बिकट अन् अडचणीचा गड दुसरा नव्हता..!

आपल्या वडिलांना झोपेत असताना कैद करून, लोखंडी बेड्या ठोकून, हत्तीवरून विजापुरास आणणारा अफझलखान.. कनकगिरीच्या वेढ्यात शिवाजीराजांचे थोरले बंधू संभाजीराजांना कपटानं मारणारा अफझलखान..! आणि राजांना गिरफ्तार करुन दरबारात पेश करण्याचा विडा उचलणारा अफझलखान…! श्रीरंग पट्टणच्या राजाचा पराभव करणारा अफझलखान..! कर्णपुरम, मदुराई, कांची, बेदनूर, बसवापट्टण, बेलूर, तुमकुर या हिंदूंना नामशेष करण्यासाठीच्या लढाया जिंकणारा अफझलखान..! खान महंमदाचे तुकडे उडवणारा अफझलखान..! अत्यंत विश्वासघातकी आणि हिंदूद्वेष्टा असलेला अफझलखान..! शिरेपट्टणच्या कस्तुरीरंग राजाला छावणीत भेटीला बोलावून दगाफटका करुन मारुन टाकणारा अफजलखान..! जावळीत येण्यापूर्वी तुळजापुरात अष्टभुजा भवानीमातेच्या विग्रहावर घाव घालणारा अफजलखान..! देवीसमोर गाय मारणारा अफझलखान..! पंढरपूरच्या देवळाला भ्रष्ट करणारा अफझलखान..! राजांचे मेव्हणे बजाजी नाईक निंबाळकरांना गळ्यात साखळदंड बांधून कैद करणारा अन् हत्तीच्या पायी देण्याचा डाव टाकणारा अफजलखान..!

शिवचरित्रातल्या प्रतापगड पर्वाची पूर्वपीठिका आहे ती अशी..!

पण अफजलखानाचा हा परिचय करुन देण्याचं काम प्रतापगडावरचा एकही गाईड करत नाही. अभ्यास नाही, वाचन नाही, माहिती नाही आणि इच्छाशक्ती तर त्याहून नाही..!

वास्तविक, प्रतापगड पर्व हे शिवचरित्रातील अत्यंत महत्वाचं पर्व आहे. ह्या पर्वातला राजांचा पराक्रम, त्यांची मुत्सद्देगिरी यांचं सत्यकथन करण्याचं काम कुणाचं?

प्रतापगडावर आईभवानीच्या मंदिराशेजारी आमच्या चंद्रकांत उतेकरांनी उभारलेलं एक हस्तकला केंद्र आहे. त्यांनी त्या केंद्राच्या बाहेर  शिवप्रताप दिनाच्या संग्रामाचा भलामोठा सुंदर नकाशा उभारला आहे. शिवरायांच्या कुशाग्र युद्धनीतीचं, सूक्ष्म नियोजनाचं आणि अभ्यासू स्वभावाचं दर्शनच तिथं घडतं. पण प्रतापगडावर जाणाऱ्या शंभरापैकी फार तर पाच-सात जणच तिथं तो नकाशा पाहत असतील..! गडाच्या पायथ्याशी त्यांनी अपार कष्ट घेऊन उभं केलेलं शिवकालीन गाव आहे. तेही आवर्जून पहायला हवं. पण मराठ्यांच्या इतिहासातल्या पहिल्या सुवर्णपानाचा मान असलेल्या गडाचा पिकनिक स्पॉट करुन टाकल्यावर काय अपेक्षा करावी?

प्रतापगड आणि तिथं येणाऱ्या माणसांची पोशाख आणि आचार विचार संहिता यांचा षडाष्टक योग दिवसेंदिवस अधिकाधिक घट्ट का होत चालला आहे? हा एक मराठी माणूस म्हणून मला पडलेला प्रश्न आहे.

प्रतापगड हे मराठी इतिहासातलं शौर्यतीर्थ आहे. तिथं मराठी मनगटांचा वीररसाचा आविष्कार घडलेला आहे. पण आता ह्या गडाला शृंगार रस, हास्य रस आणि बीभत्स रस यांत न्हाऊ माखू घालण्याचा जो आचरट आणि निर्लज्ज उद्योग पर्यटकांकडून चालवला जातो आहे, त्याला तातडीनं पायबंद घालणं आता अपरिहार्य झालं आहे..!

|| मर्यादेयं विराजते ||

— क्रमशः भाग दुसरा

©️ श्री मयुरेश उमाकांत डंके

मानसतज्ज्ञ, संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “हुतात्मा राजगुरू…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “हुतात्मा राजगुरू…” – माहिती संग्राहक : अज्ञात ☆प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी

पंजाबमधील लोकांच्या जागृतीमुळे, आपल्याला भगतसिंहांबद्दल त्रोटक तरी माहिती असते..!!

परंतु “राजगुरू” मराठी असूनही, आपल्याला त्यांची माहिती चार वाक्यांपलीकडे सांगता येणार नाही..!!

ही काय दर्जाची उपेक्षा. म्हणायची..??

या महायोद्ध्याला तर चित्रपटातही विनोदी पात्र बनून राहाणेच नशिबी आले..!!

मूळचा खेड (राजगुरुनगर) येथील असलेला हा तरुण, स्व-कर्तृत्वाने काशीला संस्कृतचा पंडित बनला होता..!!

ते इतके निष्णात होते की, संस्कृतमधून सहज संभाषणसुद्धा करीत असत..!!

कुस्तीत देखील त्यांचा हात धरणारा कुणीच नव्हता..!!

नेमबाजीतही ते शब्दवेधी होते..!!

एवढेच नव्हे तर उताणे झोपून, पाठीमागे असलेले लक्ष्यही, ते बाणाने सहज उडवित (कधीतरी प्रयत्न करा, मग कळेल ही गोष्ट किती अवघड आहे ते..!!)

स्वत:स कणखर बनविण्यासाठी रात्रीतून धावत-धावत १५-२० मैलांवरील स्मशानात जात, तेथील विहिरीत पोहत असत आणि तशीच दौड करीत पुन्हा येऊन झोपत, इतका त्यांचा दम (स्टॅमिना) होता..!!

तासनतास मुंग्यांच्या वारुळावर बसून दाखवत आणि दंश झाले तरीही चेहे-यावरील रेषही न हलवता..!!

एकदा तर राजगुरुंनी एक जळती चिमणी एका हाताने दाबून फोडली, लोखंडी सांगाड्याचाही पार चुरा केला.. हे करतांना हात भाजला, काचांनी रक्तबंबाळ झाला तरीही त्यांनी हुं की चूं देखील केले नाही..!!

आणि आता त्याहूनही मोठी गोष्ट सांगतो..!!

साँडर्स आपल्या टप्प्याबाहेर आहे, त्याला गोळी लागणे शक्य नाही अशी भगतसिंहांना शंका वाटत होती, परंतू राजगुरूंनी मात्र भगतसिंह नको नको म्हणत असतानाही, तितक्याच अंतरावरून चालवलेली गोळी साँडर्सच्या दोन भूवयांच्या बरोब्बर मधोमध कपाळातून आरपार गेली..!! त्यांना परत लक्ष्याकडे पाहायचीही आवश्यकता भासली नाही..!! (ऑलिम्पिक सुवर्णपदकाच्याही वरची कामगिरी होती ही..!!)

विश्वास न बसून भगतसिंहांनी नंतर त्या प्रेताला जवळून आठ गोळ्या मारल्या..!! असे होते राजगुरू..!!

हुतात्मा स्वातंत्र्यवीर मर्द मराठी वीर राजगुरु यांना त्रिवार मानाचा मुजरा आणि विनम्र अभिवादन..!!

माहिती संकलक: अज्ञात

प्रस्तुती : सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ वयाची अट नाही… – लेखिका: सुश्री सुधा मूर्ती ☆ सौ. अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

? इंद्रधनुष्य ?

☆ वयाची अट नाही… – लेखिका: सुश्री सुधा मूर्ती ☆ सौ. अंजली दिलीप गोखले

तेव्हा मी बारा वर्षांची लहानशी मुलगी होते. मी माझ्या आजीआजोबांबरोबर उत्तर कर्नाटकमधील एका खेड्यात राहत असे. त्यावेळी दळणवळणाची साधनं काही आजच्यासारखी उपलब्ध नव्हती, त्यामुळे सकाळचा पेपर आम्हाला दुपारीच मिळायचा. नियतकालिकंसुद्धा एक दिवस उशिरा येत. आम्ही सगळेजण पेपर, पत्र आणि मासिकं घेऊन येणाऱ्या बसची मोठ्या उत्सुकतेने वाट बघत असू.

त्यावेळी कन्नडमध्ये *त्रिवेणी* नावाची एक लेखिका फार लोकप्रिय होती. इतक्या चांगल्या लेखिका अभावानेच पाहायला मिळतात. तिची लेखनशैली सोपी, सुटसुटीत होती. तिचं लेखन सर्वसामान्यांच्या पचनी पडेल, त्यांना रुचेल असंच असे. ती माणसामाणसांच्या मूलभूत मानसिक समस्यांविषयी लिहायची, त्यामुळे तिचं लिहिणं आम्हाला आपलं वाटायचं. कन्नड साहित्याचं दुर्दैव असं, की ती लेखिका अकाली हे जग सोडून गेली. आज… अजून चाळीस वर्षं लोटल्यानंतरसुद्धा लोकांना तिच्या कादंबऱ्या आवडतात.

त्यावेळी *कर्मवीर* नामक कन्नड साप्ताहिकामध्ये तिची एक कादंबरी *काशीयात्रे* (काशीयात्रा) *क्रमशः* प्रसिद्ध होत असे. एक म्हातारी स्त्री आणि काशी किंवा वाराणसीला जाण्याची तिची दुर्दम्य इच्छा याविषयीची ही कहाणी आहे. काशीला जाणं आणि भगवान विश्वेश्वराची आराधना करणं ही बऱ्याच हिंदूंच्या मते अत्यंत पुण्यप्रद गोष्ट आहे. त्या म्हाताऱ्या स्त्रीचाही असाच गाढ विश्वास होता. काशीला जाण्यासाठी तिची जी धडपड चालली होती, त्याचं वर्णन त्या कादंबरीत रेखाटलेलं होतं.

त्याच कथेत एक अनाथ तरुण मुलगी असते. ती प्रेमात पडते, परंतु लग्न करण्यासाठी तिच्याकडे पैसे नसतात…

अखेर ती म्हातारी स्त्री स्वतःचे काशीला जाण्यासाठी जमवलेले सगळे पैसे त्या मुलीच्या हवाली करते व स्वतः काशीला जातच नाही… असं दाखवलं होतं. ती म्हणते, *या पोरक्या मुलीचा आनंद त्या काशीविश्वेश्वराच्या पूजनापेक्षा जास्त महत्त्वाचा आहे.*

माझी आजी कृष्तक्का कधी शाळेत गेली नाही, तिला लिहिता-वाचता येत नसे. दर बुधवारी ते साप्ताहिक आलं, की मी ही कथा तिला वाचून दाखवत असे. त्यावेळी तिला सगळ्या कामाचा विसर पडे. ती अक्षरश: जिवाचा कान करून त्यातला प्रत्येक शब्द ऐकत असे. ऐकून झाल्यावर तिला त्या कथेचा शब्दन्शब्द मुखोद्गत झालेला असे. माझी आजीसुद्धा कधीच काशीला गेलेली नव्हती, त्यामुळे कादंबरीतील त्या म्हाताऱ्या आजीबाईशी तिला खूप जवळीक वाटायची. त्यामुळेच गोष्टीत पुढं काय घडतंय याची उत्सुकता इतर कोणापेक्षाही तिलाच जास्त असे. म्हणूनच मला ती कथा तिला वाचून दाखवावीच लागायची. एखादी सुरेख लिहिलेली कादंबरी असेल तर वाचकाला तिचं किती जबरदस्त वेड लागू शकतं, हे मला आत्ता समजतं; पण लहानपणी मात्र मी माझ्या आजीला ती गोष्ट वाचून दाखवून लगेच खेळायला बाहेर पळून जायची.

देवळाच्या ओसरीत आजी व तिच्या मैत्रिणी रोज भेटायच्या. आम्ही तिथेच लपाछपी खेळत असायचो. त्या सगळ्या जमल्या की या कादंबरीवर त्यांच्यात हमखास चर्चा चाले.

एकदा मी आणि आमच्या घरची काही लहान मुलं… आम्ही सगळे शेजारच्या गावात लग्नासाठी गेलो होतो. त्याकाळची लग्नं म्हणजे भलंमोठं खटलं असायचं. आम्हा मुलांची तर नुसती चंगळ असायची. सगळी आतेमामेभावंडं जमायची…

आम्ही दिवसभर खादाडपणा करायचो…

मोठ्यांचा काही धाक नसायचा…

सगळं नुसतं स्वातंत्र्य, कारण मोठी मंडळी कामात गुंतलेली असत. मी जाताना दिवसांसाठी म्हणूनच गेले; पण नंतर चांगली आठवडभर तिथे राहिले.

मी गावी परत आले; आणि पाहिलं तर काय, आजीचे डोळे भरून आले होते. मला आश्चर्याचा धक्काच बसला. कितीही संकट कोसळली तरी आजीला कधी रडताना पाहिलं नव्हतं मी. काय झालं तरी काय? मला काळजी वाटली…

*अव्वा, सगळं ठीक आहे ना? तू बरी आहेस ना?* मी तिला अव्वा म्हणूनच हाका मारत असे. उत्तर कर्नाटकात *अव्वा* म्हणजे *आई.* तिनं नुसती मान हलवली, पण काही बोलली मात्र नाही. मला काहीच कळलं नाही. नंतर मी ते सगळं विसरूनही गेले. तेव्हा आम्ही रात्रीचं जेवण झालं की घराच्या गच्चीत झोपत असू. उन्हाळ्याचे दिवस होते. पौर्णिमा होती. अव्वा माझ्याजवळ येऊन बसली. आपला प्रेमळ हात माझ्या कपाळावर फिरवू लागली. तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. मला ते कळलं.

मी विचारलं, *काय: झालं गं?*

*अगं, मी अगदी लहान होते ना, तेव्हा माझी आई वारली. माझा सांभाळ करणारं, मला चांगलंवाईट काय ते समजावून सांगणारं कुणीच नव्हतं. माझ्या वडिलांचा व्याप खूप मोठा होता. त्यांनी दुसरं लग्न केलं. त्याकाळी मुलींना शिक्षण देणं काही इतकं महत्त्वाचं मानलं जात नसे. त्यामुळे मी कधी शाळेत गेलेच नाही. माझं लहान वयातच लग्न झालं, लगेच मुलं झाली. मी संसारात गुंतले. पुढे नातवंडं झाली. तुम्हा सगळ्यांना चांगलंचुंगलं करून खाऊ घालण्यातच मला इतका आनंद वाटायचा. आपण शाळेत गेलो नाही… अशी खंत कधीतरी वाटायची. म्हणूनच आपल्या मुलांनी व पुढे नातवंडांनी भरपूर शिकलं पाहिजे, असा माझा आग्रह असे…*

आपली ही बासष्ट वर्षांची आजी हे सगळं आत्ता मध्यरात्रीच्या वेळी आपल्याला का सांगते आहे, हे काही मला कळेना. मला ती खूप खूप आवडायची. फार प्रेम होतं माझं तिच्यावर. ती आत्ता आपल्याला हे जे सगळं सांगते आहे, त्या पाठीमागे नक्की तसंच काहीतरी कारण असणार…

असं मला तेव्हासुद्धा वाटलं. मी तिच्या तोंडाकडे पाहिलं. तिचा चेहरा दुःखी दिसत होता, डोळे पाण्यानं भरले होते. ती दिसायला छान होती, नेहमी हसतमुख असायची. पण त्या वेळेला तिच्या चेहऱ्यावर जी काळजी दाटून आलेली होती, ती मात्र आजही मला स्पष्टपणे आठवते.

मी पुढे झुकून तिचा हात हातात घेतला. *अव्वा, रडू नको ना. काय झालं? मी काही करू का तुझ्यासाठी?*

*हो. मला तुझीच मदत लागणार आहे. तुला ठाऊक आहे?… तू गेलीस आणि नेहमीप्रमाणे तो ‘कर्मवीर’चा अंक आला. मी तो उघडला. ‘काशीयात्रे’ गोष्टीचं पान उघडलं, चित्रं पाहिली… पण काय लिहिलंय, ते काही मला समजेना. मी कितीतरी वेळा त्या पानांवरून हात फिरवला. यात काय बरं लिहिलं असेल? माझ्या बोटांना स्पर्शातून ते कळलं तर किती बरं होईल… असं मला वाटत राहिलं. पण ते कसं शक्य होतं? मी जर शाळा शिकले असते तर…? म्हणून मग मी तुझी उत्सुकतेनं वाट पाहू लागले. मला वाटलं तू जर लवकर आलीस आणि मला वाचून दाखवलंस, तर किती बरं होईल. एकदा वाटलं, सरळ असंच उठावं, तिकडे त्या गावी यावं आणि तुला सांगावं वाचून दाखवायला! मला खरं तर आपल्याच गावातल्या कोणालातरी वाचून दाखवायला सांगता आलं असतं. पण तसं कुणी मिळालंच नाही मला. तेव्हा मला खूप परावलंबी आणि असहाय वाटलं. माझ्याजवळ इतका पैसाअडका आहे; पण मला जर स्वावलंबी होता येत नसेल, तर काय उपयोग त्या सगळ्याचा?*

यावर काय बोलावं, ते मला समजेना. अव्वा बोलतच होती…

*मी ठरवलंय… उद्यापासून कन्नडची बाराखडी शिकायची. मी आता खूप मेहनत करणार आहे. हेच आता मी माझं उद्दिष्ट ठरवलंय. दसऱ्याला सरस्वती पूजेच्या दिवशीची मुदत मी स्वतःला घालून घेणार आहे. त्याच्या आत मी लिहा- वाचायला शिकणार. त्यादिवशी बसून मी एकटीनं अख्खी कादंबरी वाचणार. मला स्वावलंबी व्हायचं आहे.*

तिच्या चेहऱ्यावर दृढ निश्चय स्पष्ट दिसत होता. मला मात्र तिचे शब्द ऐकून हसू फुटलं.

*अव्वा, या वयात… बासष्टाव्या वर्षी तू मुळाक्षरं शिकणार? तुझे सगळे केस पांढरे झाले आहेत… तुझ्या हातावर केवढ्या सुरकुत्या पडल्या आहेत. तुला चष्मा लागलाय… तुला स्वयंपाकघरात किती काम असतं…!* मी पोरकटपणानं माझ्या म्हाताऱ्या आजीची चेष्टा केली. पण तिनं मंद स्मित केलं…

*योग्य कारणासाठी जर आपण दृढ निश्चय दाखवला तर आपल्याला कोणत्याही संकटावर मात करता येते. मी कोणापेक्षाही जास्त मेहनत करीन. पण मी हे नक्की करून दाखवीन. शिक्षणाला वयाची अट नसते.*

दुसऱ्या दिवशीपासून आमच्या शिकवणीला सुरुवात झाली. ती इतकी हुशार होती. गृहपाठ करण्याचा तिचा झपाटा तर थक्क करून सोडणारा होता. ती वाचायची, घोकून म्हणायची, लिहायची आणि पाठ करायची. मी तिची एकमेव शिक्षिका होते आणि ती माझी पहिलीवहिली विद्यार्थिनी. मी एक दिवस कॉम्प्युटर सायन्स शिकवणारी अध्यापिका होणार आहे आणि शेकडो मुलांना शिकवणार आहे, हे तेव्हा मला कुठे माहीत होतं?

नेहमीसारखा दसऱ्याचा सण आला. एव्हाना *काशीयात्रे* ही कादंबरी पुस्तकरूपात प्रसिद्ध झालेली होती. मी गुपचूप ती विकत आणली. माझ्या आजीनं दसऱ्याच्या दिवशी सकाळी मला देवघरापाशी बोलावून घेतलं. तिथं तिनं मला चौरंगावर बसवलं. तिनं माझ्यासाठी फ्रॉकचं कापड आणलं होतं. त्यावेळी तिनं एक विलक्षण गोष्ट केली. तिनं मला वाकून नमस्कार केला. मला आश्चर्याचा धक्का बसला. मनातून खूप अवघडल्यासारखं झालं मला. आपण नेहमी देवाला, वडीलधाऱ्यांना आणि गुरुजनांना नमस्कार करतो. त्यांच्याविषयी आपल्या मनात असलेला आदरभाव व्यक्त करण्यासाठी. ही तर आपली फार मोठी परंपरा आहे.

पण आज मात्र काहीतरी विपरीतच घडत होतं. हे काही बरोबर नव्हतं. त्यावर ती म्हणाली, *हा नमस्कार माझ्या नातीला नव्हे, तर माझ्या गुरूला आहे. माझ्या या गुरु मला इतकं प्रेमानं लिहायला, वाचायला शिकवलं आहे. इतक्या आत्मविश्वासाने आणि तेही एवढ्या थोड्या वेळात. आता मी स्वावलंबी आहे. आपल्या गुरूचा मान राखणं, हे माझं कर्तव्यच आहे. लिंगभेदाचा किंवा वयाचा विचार न करता गुरूंना आदर दाखवला पाहिजे, असं आपल्या पूर्वजांनीच लिहून ठेवलेलं नाही का?*

मग मी पण तिच्या पाया पडले आणि या माझ्या पहिल्यावहिल्या बुद्धिमान विद्यार्थिनीला बक्षीस दिलं. तिनं ते तात्काळ उघडलं आणि पुस्तकाचं शीर्षक मोठ्यांदा वाचलं, *काशीयात्रे.* त्यानंतर तिने *त्रिवेणी* हे लेखिकचं नाव आणि पुस्तकाच्या प्रकाशकाचं नावही मोठ्यांदा वाचलं. आपली ही विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे, हे मला कळून चुकलं.

लेखिका: सुश्री सुधा मूर्ती

© सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares