मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ द्रौपदी… – लेख क्र. १० ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ द्रौपदी… – लेख क्र. १० ☆ सौ. मंजिरी येडूरकर ☆

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.)

(अशा स्त्रिया ज्यांच्या कर्तृत्वाची, त्यागाची दखल कधीच घेतली गेली नाही, कौतुकही कधी झाले नाही.) 

स्त्री आधी आई होते मग तिच्यात वात्सल्य निर्माण होतं की आधी वात्सल्य येतं म्हणूनच मग ती आई होते? मला वाटतं दोन्हीही नाही. आपण जन्माला आल्यानंतर आई कुशीत घेते, मांडीवर झोपवते, हाताने भरवते. त्यावेळी ते वात्सल्य, माया बाळ आत्मसात करतं. मग प्रौढ झाल्यावर ती माया, वात्सल्य आपल्या बाळावर बरसतं. माझ्या बाबतीत बालपणच नव्हतं. एक प्रौढा म्हणून जन्माला आले. मग कुठलं वात्सल्य, कुठली माया? जे अनुभवलंच नाही ते बाळाला कुठून देणार? ज्यावेळी अभिमन्यूचा युद्धात मृत्यू झाला तेंव्हा सुभद्रा उत्तरेला कुशीत घेऊन किती रडली होती. पण माझ्या डोळ्यातून टिपूसही आलं नाही. एवढंच काय माझी पोटची मुलं अश्वत्थाम्याने मारली तरी मी रडले नाही. कदाचित असे असेल कि नियतीने मला तसा वेळच दिला नाही, की मी शोक करत बसेन. माझ्या डोळ्यात फक्त धगधगता सुडाग्नी असायचा आणि मग मला हवी ती गोष्ट करून घेण्यासाठी माझं कोणत्याही पायरी पर्यंत अधःपतन व्हायचं. पण मी तो सूड घेऊनच शांत व्हायची. तुम्ही याला मला जबाबदार धरू नका. कदाचित माझं सौंदर्य याला जबाबदार असू शकेल. खरं म्हणजे अर्जुनांनी ‘पण’ जिंकला होता पण मोठ्या भावाच्या आधी लग्न करणं त्यांना अवघड वाटत होतं. आणि पाचही पांडव माझ्यावर आरक्त झाले होते. स्त्रियांना पुरुषाची नजर फार लवकर समजते. पुढे एकत्र राहणं अवघड होऊ नये म्हणून मी पाच जणांची पत्नी म्हणून राहिले. आणि हेच सौंदर्य दुर्योधन, दुःशासन यांच्या मनातही असूया निर्माण करण्यास कारणीभूत ठरलं असावं.

एकाच माणसानं किती वेळा आयुष्यात अपमान सहन करायचा? यज्ञवेदीतून माझा जन्म झाला तो म्हणजे अधर्माचं निर्दालन आणि धर्माचं संस्थापन या कार्याला कृष्णाला मदत करण्यासाठी, असं म्हणतात. पण म्हणून या कार्यात मी किती वेळा माझं चारित्र्य हनन सहन करायचं? वास्तविक मी विवाहाला तयार झाले ते पण पूर्ण करणाऱ्या वल्लभ नावाच्या एका ब्राह्मण मुलाशी! पण नंतर समजलं की तो ब्राह्मण तर नाहीच पण आपल्याच वडिलांशी, द्रुपद राजाशी, युद्ध करून त्यांना हरवणारा क्षत्रिय माणूस अर्जुन आहे. माझा पांडव कुटुंबातला प्रवेशच असा फसवणुकीतून झाला. त्यातच पाच माणसांबरोबर विवाह व संसार करण्याची कसरत करावी लागली. त्यवरून कौरवांनी मला वेश्या ठरवलं. नंतर तर कहरच झाला. कौरव सभेत लक्षात आलं की आपण षंढ लोकांशी विवाह केला आहे. यांचा धर्म, पत्नीच्या चारित्र्याचं रक्षण करणं हा नाही का हो? भर सभेत तुमच्या पत्नीला विवस्त्र करण्याचा, तिच्या चारित्र्याला हात घालण्याचा खेळ चालला होता. तरी सगळे मूग गिळून गप्प, खाली माना घालून बसलेले. दुसरे कोणी असते तर एकेकाची जीभ हासडून हातात दिली असती. वेगळं काय झालं असतं? बारा, तेरा वर्षानंतर जे युद्ध झालं, त्याला त्याच दिवशी तोंड फुटलं असतं. त्या सभेने मला शिकवलं की भावनिक गुंतवणूक, ही एक मानवी भावना आहे, ती चुकीची नाही पण ती जर आपल्या आयुष्यावर, निर्णयांवर व आत्मसन्मानावर हावी होऊ लागली तर मोडायलाच हवी. आणि मी ताठ उभी राहिले. आणि विचारलं, माझ्यावर हक्क सांगणारे हे कोण हो? मी काय यांच्या दावणीला बांधलेला घोडा की हत्ती ? मला पणाला लावण्यापूर्वी यांनी मला विचारलं होतं? युधिष्ठिर जेंव्हा हरले तेंव्हा त्यांनी आपले उत्तरीय काढून ठेवले, म्हणजे त्यांनी दास्यत्व स्वीकारले. मग यांचा माझ्यावर अधिकार कसा राहतो, कफल्लक झाल्यावर ! तिथे भीम उठले आणि म्हणाले, सहदेवा जा, अग्नी घेऊन ये. दूत खेळणाऱ्या धर्माचे हात जाळून टाकतो. एवढे बोलून थांबले नाहीत तर दुर्योधन, दुःशासन यांच्या वधाच्या प्रतिज्ञा केल्या. म्हणाले, ज्या हातानं दुःशासनानं पांचालीच्या केसांना धरलं ते हात आणि पांचालीला मांडी दाखवून आवाहन करणाऱ्या दुर्योधनाची मांडी नाही फोडली तर बघा. भीमाचा तो अवतार, त्याची प्रतिज्ञा बघून धृतराष्ट्र घाबरले. आणि त्यांनी माझी सुटका तर केलीच पण पांडवांची दास्यातून सुटका करून त्यांना हरलेलं सगळं वैभव परत केलं.

मला युधिष्ठिरांचं तर इतकं आश्चर्य वाटतं. एकदा इतका वाईट अनुभव आल्यावरही माणूस शहाणा होत नाही कां हो? अपमानित पांडव सूड घेणार या भीतीने कौरवांनी पुन्हा द्यूत खेळण्यास बोलावल्यावर हे निर्लज्जपणे पुन्हा खेळायला गेले. त्यांनी पांडव वनातून परत कसे येणारच नाहीत अशी सोय करणारा पण लावला आणि आम्ही मूर्खासारखे पुन्हा त्यांच्या कपटामध्ये अडकलो.

अज्ञातवासात असताना कीचक, जयद्रथ यांनी माझ्या चरित्र्याला हात घालण्याचा प्रयत्न केला. अज्ञातवासात आहोत त्यामुळे गप्प बसूया असे सर्वांचे मत होते. म्हणजे मी वनवासातून परत यायला उरलेच नसते. कौरवांच्या लक्षात आलं नाही की त्यांनी एक भीमाला वनवासाला जाता येणार नाही म्हणून सांगितलं असतं तर माझे अज्ञातवासात धिंडवडे निघाले असते. आणि कौरवांना असुरी आनंद उपभोगता आला असता. भीम गप्प बसणाऱ्यातले नव्हतेच, त्यांनी अपरात्री किचक व इतर राक्षसांचा वध केला, जयद्रथाला अद्दल घडवली, माझी दोघांपासून सुटका केली. सुदेष्णाची दासी म्हणून मला रहावे लागले. मी इतके अपमान सहन केले. चारित्र्याशी चाललेले खेळ पचवले. तरी लोकांच्या मते मी चुका केल्या म्हणून महाभारताचे युद्ध झाले. कुठेतरी अपमानाचा सूड घ्यावा, प्रत्युत्तर करावं अशी इच्छा होणे स्वाभाविक नव्हतं कां ? 

शेवटी धर्माचं संस्थापन झालं की नाही माहित नाही. पण कुरुक्षेत्रावर प्रत्येक स्त्री आपल्या पतीच्या, भावाच्या, मुलाच्या कलेवराजवळ जाऊन मला, पांडवांना व कृष्णाला दूषण देत होती. हे पाहिल्यावर मनात आलं, आपण काय मिळवलं? लौकिकार्थानं राज्य मिळालं, राणीचा मुकुट मिळाला. पण असा एकही दिवस गेला नाही की मला भर सभेतला माझा अपमान आठवला नाही की पांडवपुत्रांची झालेली हत्या डोळ्यासमोर दिसली नाही. कुरुक्षेत्रावरचा प्रेतांचा ढीग डोळ्यासमोरून हलला नाही. मग कसला आनंद साजरा करू? भकास हस्तिनापुराचा की उध्वस्त राजवाड्याचा! आनंद इतका क्षणिक असतो की तो फक्त देहापुरता राहतो, पण दुःख इतकं अनंत असतं की ते अंतरात्म्यालाही दुखावतं आणि तिथेच घर करून राहतं!!

तुमच्यासमोर फक्त माझ्या व्यथाच मांडल्या पण माझ्या मनाचा एक हळवा कोपराही आहे, त्यात आहे माझा सखा, कृष्ण! सखा कसा असावा याचं मूर्तीमंत उदाहरण! ज्याच्याशी आपलं सख्य असतं त्याला सखा म्हणावं अशी व्याख्या असली तरी सख्य असणं आणि सखा असणं यात एका हृदयाचं अंतर असतं आणि असं दुसऱ्याचं हृदय पार करून जायचं व त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचं म्हणजे काय असतं —नाही ते मला शब्दात सांगता येणारच नाही.

माझ्या या सख्याला काही सललं जरी असतं तरी एक शालूच काय पण मी माझं अख्खं आयुष्य ओवाळून टाकलं असतं. त्यानं मात्र त्याचं आयुष्य खरंच माझ्यासाठी ओवाळून टाकलं. एक हाक– हाक तरी कशाला, मी संकटात आहे हे त्याला न सांगताच कळायचं आणि जीवाच्या आकांताने धावून यायचा, कधी मनानं कधी शरीरानं! सखा हे नातं असं असतं की, नाही हो, नातं नसतं हे! नात्या पलीकडे काहीतरी असतं. कारण नात्यांना बंधनं असतात, मर्यादा असतात, नात्याला समाज रचनेची बैठक असते. सखा या सर्वांपलीकडे जाऊन आपला आधार, आपला अभिमान, आपल्या दुःखातला साथी, सतत मदतीचा हात देणारा देव, अहो, दिनकरासारखा स्वार्थ परायण असतो. आपलं सर्वस्व असतो. तो नसता नां तर मी अस्तित्वहीन, अभिमान शून्य झाले असते.

पण या हळव्या कोपऱ्याला नां, एक दुखरी नस आहे. सांगू? त्याने माझ्यासाठी काय केलं, तो माझ्यासाठी कोण होता, हे सांगितलं. सखा कसा असतो तेही सांगितलं. पण मी त्याची सखीच होते नां? मी काय केलं? त्याची दुःखं त्याची संकटं होतीच की. अर्थात त्यासाठी तो समर्थ ही होता. पण मी त्याच्या हृदयाचं अंतर पार करू शकले नाही. मी माझ्यातच अडकले होते. सखी म्हणून एकदा चिंधी बांधली की झालं? कुरुक्षेत्रावरचा संहार त्यानं पाहिला, गांधारीने दिलेला शाप त्याला बोचला, नव्हे काळजातून आरपार गेला. यादवांचाही संहार त्याला पहावा लागला. आणि तो विमनस्क अवस्थेत भटकत राहिला. त्यानंही मला कांही सांगितलं नाही अन् मी ही ओळखू शकले नाही. अगदी एकटा पडला तो! खरं म्हणजे मी जर त्याच्याजवळ तेंव्हा असते नां तर त्याचा हा असा अंत होऊ दिला नसता. ही बोच, हा सल मात्र कायम मनात राहिला. खरं म्हणजे सख्या समोर मन मोकळं करता आलं पाहिजे. एकमेकांना एकमेकांची मनं कळली पाहिजेत, अगदी न सांगता सुद्धा! असा एक सखा आयुष्यात हवाच जो जगण्याची उर्मी देतो, मनोबल वाढवतो, जगण्याचा हव्यास निर्माण करतो. याबाबतीत मात्र मी फार नशीबवान ठरले. जन्मोजन्मी मला हाच सखा लाभावा आणि असाच सखा तुम्हा सर्वांना मिळावा, हीच मनीषा !!

☆

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — लेख १६ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

“या देवी सर्वभूतेषु भक्ती-रूपेण संस्थिता। 

नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥”‘

सगुणोपासना करायची याचा सरळ अर्थ म्हणजे मूर्तीची, छायाचित्राची, प्रतिमेची, प्रतिकाची पूजा करायची. मनुष्याला स्वाभाविकपणेच चांगुल्याची आवड असते. जरी मनुष्याला नित्य आदर्श वागता आले नाही, आदर्श राहता आले नाही तरी समोरच्या मनुष्याने मात्र आदर्शच वागावे असे त्याला मनोमन वाटत असते. ही सुद्धा एक प्रकारची सगुण उपासना म्हटली पाहिजे. सगुणोपासना म्हणजे एक मूर्तीची म्हणजे त्या मूर्तीत प्रत्यक्ष भगवंत सजीवरूपात अवतीर्ण झाला आहे असे मानून केलेली उपासना किंवा आराधना.

मूर्तिपूजा भारतात खूप आधी पासून अस्तित्वात किंवा प्रचलित आहे. ती आज आहे आणि जोपर्यंत ह्या भूमीवर शेवटचा मनुष्य राहील, तोपर्यंत ती नक्कीच अस्तित्वात राहील, असे म्हणता येईल. भले मनुष्य कितीही स्खलनशील असला तरी आपण किती खोल गेलो हे कळण्यासाठी का होइना त्याला एका प्रतिमेची, मर्यादेची स्वाभाविक गरज असते. अशा मर्यादापुरुषोत्तमापुढे (इथे स्त्री सुद्धा असू शकते) नतमस्तक व्हायला मनुष्याला आवडते. मनुष्य कितीही वाईट मार्गात असला, तरी आपल्या संततीनें आपला वाईट मार्ग अनुसरावा असे त्यास कधीच वाटत नाही, म्हणून तो आपल्या संततीस मर्यादापुरुषोत्तमाचा आदर्श घालून देतो आणि तसे होण्याचा प्रयत्न कर असे सांगतो. या नश्वर जगात जन्म घेतलेल्या मनुष्याला खरं तर पूर्ण पुरुष (म्हणजे खरा देव: माणसाशी माणसाप्रमाणे वागणारा) बनायचे असते, पण मनुष्य आपल्या पूर्व संस्कारामुळे किंवा वृत्ती बदलू शकत नसल्यामुळे एक प्राणी बनून या जगात वावरतो आणि हा मनुष्य एक प्राणी म्हणूनच अखेरचा श्वास घेतो. खरंतर प्ररमेश्वराने फक्त मनुष्यालाच ‘मनुष्य ते देवत्व’ असा अनंताचा प्रवास करण्याचे वरदान दिले आहे, पण मनुष्य धड मनुष्य होत नाही आणि देवत्व तर खूप दूर राहते.

सर्व संतांनी मनुष्य प्राण्याची ही खूप जुनी खोड बरोबर समजून घेतली आणि भक्तिमार्गासारखे सुंदर आणि सुलभ तंत्रज्ञान पुन्हा एकदा आपल्या हाती दिले. ज्यामध्ये मूलभूत असे सगुण भक्ती आणि निर्गुणभक्ती असे दोन प्रकार सांगितले आहेत. सामान्य मनुष्याला आचरणीय असा मार्ग म्हणजे सगुणभक्ती. साधुसंतांनी सगुणभक्तीचा उच्छेद करून निर्गुण भक्तीचे प्रतिपादन केलेले आही. समर्थ म्हणतात,

“सगुणाचेनि आधारें । निर्गुण पाविजे निर्धारें ।सारासारविचारें । संतसंगें ॥”

(दास. ०६. ०६. ५५)

संत चोखामेळा म्हणतात,

‘निर्गुणाचे भेटी आलो। सगुणाचे संगे।’

श्रीरामकृष्ण परमहंस म्हणतात – ‘गाईच्या वासराला गाईचे दूध प्यायचे असेल तर त्याला गाईच्या आचळालाच तोंड लावावे लागेल, इकडे तिकडे लावून चालत नाही ? त्याप्रमाणे निर्गुणाचा अनुभव घ्यायचा असेल तर सगुणातूनच घ्यावा लागतो. सामान्य माणूस सगुणभक्तीच करतो पण आंधळेपणाने करतो, ती डोळसपणे करणेच आवश्यक आहे. सगुणात आपल्या आराध्यदेवतेची पूजा करायची असते. ती आर्तभावाने करावी, भक्तीत भावाला महत्त्व आहे. भाव शुद्ध हवा. ‘ समर्थांनी केवळ सगुण भक्ती सांगितली आणि ते चुप बसलेत असे नाही तर त्यांनी सगुण भक्तीकरता श्रीराम हे दैवत जाणीवपूर्वक निवडले. कारण राम मर्यादा पुरुषोत्तम होता, कुशल राज्यकर्ता होता, दैवी गुणसंपन्न होता. तो अलौकिक पुत्र होता, अलौकिक शिष्य होता, अलौकिक बंधू होता, अलौकिक पती होता, अलौकिक मित्र होता आणि अलौकिक शत्रूही होता. अशा अलौकिक रामाचा आदर्श समर्थांनी लोकांपुढे ठेवला. उद्देश हा की त्यातील एकेक गुण, एकेका व्यक्तीने जरी उचलला तरी त्याची प्रचंड शक्ती समाजात निर्माण होईल. त्या प्रचंड शक्तीने समाजाचे सामर्थ्य वाढेल. म्हणून त्यांनी श्रीरामाची उपासना सांगितली. श्रीरामाचे दैवत समाजापुढे ठेवले. श्रीगुणांच्या सामर्थ्याची शक्ती म्हणजेच भगवंताचे अधिष्ठान!

उपासनेची शक्ति आणि शक्तीची उपासना. सध्या समाजाला या दोन्हीची तितकीच गरज आहे.

गुरूला आवडते ते करणे म्हणजेच सद्गुरुंची सेवा करणे होय. बरेच वेळा साधक त्याच्या आवडीची कृती करतो आणि सद्गुरूंची सेवा करीत आहोत असे दर्शवितो. परमार्थाची चार चाके आहेत. एक अखंड रामनाम, दुसरे शरणागती, तिसरे सत्संग आणि चवथे रामकृपा होय. संसारामध्ये अहंकार व स्वार्थ हे वैराचे मूळ आहे. वैराचे मूळ स्मृती मध्ये आहे. निर्वैर होण्यासाठी स्मृती नाहीशी झाली पाहिजे. स्मृतीमध्ये रामनाम सतत भरले पाहिजे. म्हणजे परमार्थ उत्तम चालतो. भूतकाळाची स्मृती नाही व भविष्याची चिंता नाही. असा जीव फक्त वर्तमानातच जगतो. हाच जीव निवैर होऊ शकतो. या मार्गाचा अवलंब भक्तीमध्ये होतो. तो ईश्वराचा दास होतो व त्याच्या हृदया मध्ये सतत ईश्वराचे चिंतन चालू असते. असा जीव कालातीत होतो, निर्वैर होतो. देहबुद्धीचे देवबुद्धीमध्ये रुपांतर प्रयत्न साधकाने करावा. त्यासाठी आपल्या सर्व कृती कडे तो परमात्मा पाहत आहे अशी भावना तीव्र करावी. असा भाव वाढीस लागल्यास त्यास परमात्मा सर्व ठिकाणी दिसू लागतो. हेच सगुण भक्तीचे बृहत रूप होय. यालाच साक्षात्कार असे म्हणतात.

सगुणभक्ती ही सर्वार्थाने सुलभ अशीच आहे, कोणीही त्याचे अनुसरण करू शकतो. सगुण हा शब्द ऐकून मूर्तिपूजा करणारे सगुणाची पूजा करतात असे म्हटले तर ते अर्धसत्य होईल असे मला वाटते. सगुण याचा सरळ अर्थ, स म्हणजे चांगले आणि गुण म्हणजे गुण. जिथे चांगल्या गुणांची कदर होते, पूजन होते ती सगुणभक्ती. कोणत्याही चांगल्या मनुष्याच्या अंगचे गुण आपल्या अंगी यावेत म्हणून प्रयत्न करणे हे सगुणभक्ती म्हटली पाहिजे. प्रचलित सगुण भक्ती म्हणजे पाणी, पुष्प, गंध, वस्त्र आणि नैवेद्य किंवा संपूर्ण षोडशोपचारे पूजा करणे म्हणजे सगुणभक्ती असे मानले जाते, हे स्थूलमानाने योग्य असेलही, पण आराध्य देवतेचे गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न सुरु केला जातो तेंव्हा खरी सगुणभक्तीला सुरुवात झाली असे म्हणता येईल. नाहीतर ते “नाव सोनुबाई आणि हाती कथिलाचा वाळा” असे व्हायचे. षोडशोपचार करणे हे म्हणजे hardware म्हणता येईल आणि आराध्य देवतच्या गुणांचे दैनंदिन व्यवहारात आचरण करण्यास सुरुवात करणे हे सॉफ्टवेअर समजावे. हे सर्व समजायला थोडं जड आहे पण थेट अंतर्मनात बदल घडविणारे आहे. ह्या सोबत नाम घेता आले तर दुधात साखरच!

समजा एखाद्याने रामास आपले आराध्य मानले तर त्याने रामचरित्र वाचावे. रामाचा भक्त आहे, म्हणून त्याचीही पत्नी चोरायला कोणी रावण येईल आणि त्यालाही रामासारखा पराक्रम गाजविता येईल असे नाही. तर दैनंदीन जीवनात आपले आचरण रामासारखे ठेवण्याचा प्रयत्न त्याने करावा. आपली पत्नी सितारुप आहे, वडील दशरथा समान आहेत, थोडक्यात राम जसा आपल्या कुटुंबातील सदस्यांशी वागला, तसे त्याने आपल्या कुटुंबातील सर्वांशी वागावे. नाम घेतले तर उत्तम, पण असे आचरण मात्र काटेकोरपणे करावे. आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येकामध्ये एकच राम आहे हे जाणून त्याप्रमाणे जीवन जगणे म्हणजेच सगुण भक्ती करणे.

सध्या कलियुग आहे, त्यामुळे जरी श्रीकृष्णाने गीतेत मी परत अवतार घेईन असे सांगितले असले तरी गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी जशी सर्व गोपांनी आपापली काठी लावली अगदी तसेच आपल्या आपली साधना करायला हवी. आपण सर्वांनी आपापली काठी लावली की आपले काम झाले. कारण भगवंत आहेच, तो करंगळी लावतोच.

आपल्याला दैनंदिन जीवनात आधीपासून उपस्थित असलेले परमेश्वराचे अस्तित्व जाणवायला लागले म्हणजे आपली प्रगती सुरु झाली असे म्हणता येईल. अशी भक्ती करावी की आपल्याला डोळ्यात पाणी आले तर भगवंतांच्या डोळ्यात पाणी यावे. अशी भक्ती संतांनी करून दाखवली. याचे सर्वात चांगले आणि आपल्या घरातील उदाहरण म्हणजे आपली आई. आपल्या डोळ्यात पाणी आले तर आपल्या आईच्या डोळ्यात पाणी येते. किंबहुना आपल्या डोळ्यात कधीच पाणी येऊ नये म्हणून प्रत्येक आईचा प्रयत्न असतो, मग ती आई गोरी असो व काळी, गरीब असो व श्रीमंत. आई आईच असते, तीला पर्याय नाही.

आपल्या ‘आईची’ मान जगामध्ये कायम ताठ राहील, तिला समाजात आपली ओळख करू देताना आपण अमक्याची आई आहोत असे सांगण्यात गौरव वाटेल आणि आपल्याला आपल्या आईमध्येच देवाचे अस्तित्व जाणवेल तीच खरी सगुणोपासना !!

पूजा करण्या आधी आतुरता, पूजा करताना आनंद आणि पूजा करुन झाल्यावर चित्त शांत होत असेल, समाधान लाभत असेल तर आपली सगुणोपासना योग्य दिशेने चालू आहे असे म्हणायला हरकत नाही…… !

साधनेच्या अंतिम टप्प्यात साधकाला भागवतांचा साक्षात्कार झाला तरी तो साधक आपले साधन, अर्थात सगुणोपासना सोडत नाही. सगुणोपासना करताना चाखायला मिळणारा भक्तिरस काहीतरी और असेल, अन्यथा स्वतः पांडुरंग झाल्यावरही संत तुकाराम बुवांनी विठ्ठलाची पूजा केलीच नसती…. ! ते एका ठिकाणी म्हणतात,

“आधी होता वाघ्या | दैवयोगें झाला पाग्या | त्याचे यळकोट राहिना | देहस्वभाव जाईना ||१|| आधी होता ग्रामजोसी। राज्यपद आले त्यासी ॥ त्याचें पंचांग राहीना। देहस्वभाव जाईना ||२|| आधी होती दासी। पट्टराणी केलें तिसी ॥ तिचें हिंडणे राहीना। देहस्वभाव जाईना ||३|| आधी होता संतसंग| तुका झाला पांडुरंग | त्याचे भजन जाईना |मूळ स्वभाव जाईना ||४||”

जय जय रघुवीर समर्थ 

नारद महाराज की जय!!!

– क्रमशः लेख क्र. १६ 

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नऊ नरकासूर आणि एक श्रीकृष्ण! – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ नऊ नरकासूर आणि एक श्रीकृष्ण! – भाग – २ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

मेजर जनरल सुनीलकुमार राझदान (सेवानिवृत्त)

(पण जाताना त्याने थोडक्यात पण महत्त्वाची माहिती दिली…. तिथून दोन किलोमीटर्स उंचीवरील एका मोक्याच्या जागी काही घरे आहेत… त्यातील एका घरात काही लोक आहेत! या चार मजली घराला मोठे कुंपण आहे… चौथ्या मजल्यावर एक रायफलधारी पहारेकरी कायम उभा असतो… इत्यादी इत्यादी!)

इथून पुढे – – – 

चालून चालून सैनिक थकले होते.. भुकेले होते. साहेबांनी स्वयंपाक करण्याच्या सुचना दिल्या… साहेबांनी खिचडीवर त्यादिवशीचा उपवास सोडला.. भूक भागवली गेली… उद्या सकाळी लवकर त्या घराकडे जाऊ असा विचार होत असतानाच… साहेब उठले… आता थांबून चालणार नाही! जे काही करायचे ते आजच, आत्ताच! त्यांचा निर्धार पाहून सैनिकांना स्फुरण चढले! ते दोन किलोमीटर्स चालून जायला पथकाला दोन तास लागले… अत्यंत काळजीपूर्वक पावले टाकावी लागत होती… अंधार दाटून आला होता… आभाळात चांदण्या चमकत होत्या तोच काय तो उजेड. त्या घराजवळ आणखी काही घरे होती. भटकी कुत्री होतीच. त्यांना शांत करण्यासाठी सैनिकांनी एक निराळेच हत्यार नेले होते.. मांसाचे तुकडे! ही कुत्री शांत राहिली तरच ते कुत्रे टिपता येणार होती! त्यांना चाहूल लागली की खेळ खराब होणार! पथकाने अंदाज लावून त्या ठिकाणाला वेढा घातला. सुमारे दहा सैनिक बाहेरच्या वर्तुळात, सहा जवान आतल्या वर्तुळात आणि साहेबांसोबत चार खंदे वीर. पण नेमके घर कोणते? कारण कुठून काही आवाज येत नव्हता. उंच टेकाडावरील एका घरामध्ये मिणमिणता कंदील दिसला… आणि एक वास येऊ लागला…. तुपाचा वास! त्या भागातील गरीब नागरिक मोहरीच्या तेलात स्वयंपाक करीत… मग हा तुपाचा वास जेथून येतोय… ती स्थानिक प्रजा नक्कीच नसणार… पाकिस्तानी अतिरेकीच असणार… साहेबांनी ताडले. रात्रीची दहा वाजून दहा मिनिटे झाली होती… साहेबांचा वाढदिवस आणि जन्माची हीच वेळ.. आणि आठ तारीख म्हणजे जणू जन्माष्टमीच! काश्मिरातील घरांची रचना लक्षात घेऊन भारतीय सैनिकांना त्या घरांत कशी कारवाई करायची याचे प्रशिक्षण दिले जाते. सहा पैकी दोन सैनिक बाहेर थांबले… दोन जवान दुस-या बाजूने पहिल्या मजल्यावर गेले… आणि दोघे साहेबांसोबत थेट आत जाणार होते. सर्वांनी काळ्या कापडाने चेहरे झाकले होते.. फक्त डोळे तेवढे झाकले नव्हते! रायफली सज्ज करीत साहेब आणि चार जवान घराच्या रोखाने निघाले… महिलांच्या बोलण्याचा आवाज येऊ लागला… साधी कुजबूज ती. साहेब तळमजल्यावरील स्वयंपाक घराच्या खिडकीशी पोहोचले…. इथपर्यंत भारतीय सेना पोहोचेल हे अतिरेक्यांच्या स्वप्नातही नव्हते… त्यामुळे ते पहिल्या पहिल्या मजल्यावर निवांत बैठक करीत होते… योजना आखीत. स्वयंपाकघरात एक महिला अतिरेक्यांसाठी ऑम्लेट बनवीत होती. साहेब खिडकीतून आत शिरले… त्या महिलेला त्यांनी हळूच काही विचारले… तिला वाटले हा सुद्धा अतिरेकीच आहे! तिने काहीशा रागातच म्हटले… ”तुम्हीच काम सांगता आणि तुम्हीच विचारता काय करतेस?” साहेबांना तिला खास भाषेत समजवावे लागले.. साहेबांनी त्या महिलेला काझीगुंडमधील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचा-याचा संदर्भ दिला…. तेंव्हा कुठे ती आणि इतर महिला बाहेर पळू लागल्या… सैनिकांनी एकेकीला खिडकीतून बाहेर घेतले… त्यातल्या एका चौदा वर्षांच्या पोरीने मात्र पळून जाताना अतिरेक्यांच्या नावाने ठेवणीतल्या शिव्यांची लाखोली वाहिली… का नाही? त्या सर्व भगिनी महिनाभराहून अधिक काल बलात्कार सहन करीत होत्या! 

ही शिवीगाळ आणि त्या महिलांच्या पायांतील आभूषणांचा आवाज झाला.. आणि अतिरेकी सावध झाले. तोवर दोन सैनिक पहिल्या मजल्याच्या वरच्या पायरीवर पोहोचले…. अंधार होताच… बैठकीच्या खोलीच्या बाहेर लाकडी स्टूलवर पहा-यासाठी बसलेल्या एका साडे सहा फूट उंचीच्या रायफलधारी अतिरेक्याने अंधारात या दोघांचे लालबुंद डोळे पाहिले… तो आधीच उंच… बसल्या जागेवरून त्याने वर उडी मारली… त्याचे डोके लाकडी छताला लागले… त्याला वाटले पिशाच्च आले! तो जिन्न जिन्न म्हणून किंचाळू लागला… आपल्याही सैनिकांनी एवढा प्रचंड उंच माणूस पाहिल्यावर तेही गडबडले आणि मागे सरकले… काय झाले हे पाहण्यासाठी साहेबांच्या सोबत असलेले दोघे जवान खोलीबाहेर पडले… साहेब त्या खोलीत एकटेच उरले….. दोन अतिरेकी पहिल्या मजल्यावरून जिन्याने खाली उतरून आले… त्यांच्या हातात रायफल्स होत्याच… ते दोघे व्हरांड्यामध्ये आले… सुनीलकुमार साहेबांनी खोलीतील एकमेव कंदील मालवला… त्यांच्या जवळ असलेल्या एका अतिरेक्यावर झेप घेऊन त्याची रायफल डाव्या हाताने हिसकावून घेतली, त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या दुस-याची रायफल सुद्धा काढून घेतली.. त्याच रायफलच्या दस्त्याने त्यांच्या डोक्यांवर प्रहार केले.. ते खाली पडताच त्यांना धडाधड गोळ्या घातल्या आणि ते दोन्ही राक्षस यमसदनी धाडून दिले… पण आणखी किती अतिरेकी असतील याचा अंदाज नव्हता! आतून गोळीबाराचा आवाज ऐकून आपल्या सैनिकांना वाटले की साहेबांनाच गोळ्या लागल्या… आणि त्यातच त्यांचे प्राण गेले… त्यांनी बाहेरून त्या घरावर तुफान गोळीबार आरंभला… वरच्या मजल्यावरून अतिरेकी प्रत्युत्तर देऊ लागले होते.. साहेबांनी बाहेर मेसेज दिला…. गोळीबार थांबला! तेवढ्यात आणखी एक अतिरेकी जिना उतरून येताना दिसला.. त्याचे पाय दिसले… साहेबांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या… तसा तो धडपडत खाली येऊन पडला… साहेबांकडे त्यांची स्वत:ची एक आणि त्या दोघा अतिरेक्यांच्या दोन अशा तीन रायफल्स होत्या. या तिस-या अतिरेक्याची रायफल काढून घेण्यासाठी साहेब पुढे सरसावले…. तो अतिरेकी मेला नव्हता तोवर….. मेल्याचे सोंग घेतलेल्या त्या अतिरेक्याने त्याच्या हाताजवळ आणि आधीच लोड असलेली रायफल झाडली…. ती नेमकी साहेबांच्या पोटात मध्यभागी… नऊ-दहा गोळ्यांचा फवारा आतडी फाडून पाठीचा कणा तोडत घुसल्या… साहेबांनी तशाही स्थितीमध्ये अतिशय त्वेषाने त्याला पुन्हा गोळ्या घातल्या… साहेबांची आतडी बाहेर पडू लागली… रक्त सांडू लागले… साहेबांनी डोक्याचा पटका काढला… आतडी आत ढकलली… आणि त्यांवर तो काळा पटका करकचून बांधला… दोन्ही हातांवर सरपटत साहेब त्या खोलीच्या बाहेर पडले… नंतर आतून गोळीबार सुरु राहिला… पहाटे तीन पर्यंत. बाहेरील सैनिक साहेबांच्या सोबत आले… तोवर मुख्यालयात संदेश पाठवून आणखी कुमक मागवली गेली.. पण त्यांना येण्यास प्रचंड वेळ लागणार होताच.. तोपर्यंत या अतिरेक्यांना रोखून धरणे अत्यावश्यक होते. साहेब लाकडाच्या एका ढिगा-यामागे लपले! तिथून हल्ल्याचे नेतृत्व करू लागले… पोटातून रक्त वाहत होतेच… बांधलेल्या पटक्यामुळे रक्ताचा वेग कमी झाला होता… वेदना? वेदनेपासून शरीर वेगळे केले होते साहेबांनी. साथीदार सैनिकांनी साहेबांना तिथून हलवण्याचा प्रयत्न केला.. पण साहेबांनी स्पष्ट नकार दिला! मोहिम पूर्ण झाल्याशिवाय इथून हलणार नाही?

या मोहिमेत कुणी नर्सिंग असिस्टंट सोबत आणलेला नव्हता. प्रसंगावधान राखून त्यांनी एक आदेश दिला… गावात येण्याच्या आधी त्यांनी रस्त्यावरच्या एका औषधांच्या दुकानदाराशी संवाद साधला होता.. त्या दुकानात ग्लुकोज, सलाईन त्यांनी पाहिले होते. सैनिकांना सांगून त्यांनी सलाईन मागवून घेतले… सैनिकांच्या साहाय्याने, सिगारेट लायटरच्या उजेडात साहेबांनी स्वत:ला सलाईन लावून घेतले… पण जागा सोडली नाही.. आपत्कालीन परिस्थितीत काय करता येते याचे सैन्यात दिले गेलेले प्रशिक्षण साहेबांनी प्रत्यक्ष आचरणात आणले होते! पहाटे चार वाजता आणखी तीन अतिरेकी पळून जाण्याच्या इराद्याने बाहेर पडू लागले… साहेबांनी काश्मिरी लहेजामध्ये त्यांना उद्देशून जोराने आवाज दिला… ”उधरसे मत जाव… इंडियन आर्मीवाले हैं वहां… इस तरफ आ जावो भाईयों!” अतिरेक्यांना वाटले त्यांचेच स्थानिक साहाय्यक लोक आहेत… मग ते तिघे भाई आपल्या या भाईकडे अलगद आले… भाईंनी त्यांना ताब्यात घेतले.. हातपाय, तोंड बांधून ठेवले! साहेबांची शौर्यगाथा कित्येक तास सुरु होती. सकाळी दहा वाजता जादाची कुमक पोहोचल्यावर आतले आणखी तीन अतिरेकी ठार केले गेले. नऊ पैकी सहा ठार आणि तीन ताब्यात आले होते. सुनीलकुमार साहेबांना रुग्णालयात नेण्याची तयारी सुरु झाली. तोवर घटनास्थळी शेकडो लोक जमा झाले होते. त्यात ज्यांच्या घरातल्या महिलांची सुटका करण्यात आली होती, त्या महिलांचे नातेवाईक होते. एका बाईच्या देखतच अतिरेक्यांनी तिच्या मुलीवर आणि सुनेवर अत्याचार केले होते! पकडल्या गेलेल्या तीन अतिरेक्यांचा हिशेब या महिलेने आणि इतरांनी पूर्ण केला! नरकासूर वधात श्रीकृष्ण भगवंताला एका महिलेची, रुक्मिणीचे साहाय्य झाले होते, त्याचीच ही एका अर्थी पुनरावृत्ती म्हणावी की काय? या लष्करी कारवाईमध्ये लष्कर-ए-तोयबा आणि लष्कर-ए-हिक्मतेयार या अतिरेकी संघटनेचे एकूण नऊ धोकादायक अतिरेकी ठार मारले गेले आणि चौदा महिलांची सुटका करण्यात आली! अतिरेक्यांच्या या लपण्याच्या ठिकाणावरून दोन यु. एम. जी. (युनिवर्सल मशीन गन्स), सात ए. के. ४७ रायफल्स, एक पोते भरून काडतुसे, दहा किलो स्फोटके इत्यादी ऐवज जप्त केला गेला! ही मृत्यूची दहीहंडी श्रीकृष्णाच्या भूमिकेत शिरून सुनीलकुमार राझदान साहेबांनी जणू नऊ थर लावून फोडली! यात एकाही गोविंदाला साधे खरचटले सुद्धा नाही… पण नेतृत्व करणारा कान्हा मात्र कायमचा जायबंदी झाला होता! साहेबांना हेलिपोर्ट करून त्वरीत सेनेच्या रुग्णालयात दाखल केले गेले. त्यांचे सुमारे नऊ फूट लांबीचे आतडे कापून काढण्यात आले. एल वन ते एल फोर मणके तुटून गेल्याने साहेब आयुष्यात पुन्हा कधीही चालू, फिरू शकणार नाहीत.. असे डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले! आयुष्याच्या मध्यावरच लष्करी अधिकारी कारकीर्द संपुष्टात येणार होती… घरी दोन मुलगे, पत्नी… भविष्य अंधारमय झाले! एकाकी वाटू लागले… पण अंधारात कुणीतरी उजेड घेऊन येण्याची वाट पाहण्यात काही अर्थ नव्हता.. स्वत: उजेड होणे गरजेचे होते! निम्मे शरीर निकामी झाले… पण बुद्धी, मन शाबूत होते!

श्रीनगरमध्ये, दिल्लीत रुग्णालयात तब्बल नाऊ महिने मुकाम झाला… पुढे पुण्यात उपचारांसाठी पाठवण्यात आले! उपचारांचा खर्च सेना करीत होतीच… पण आर्थिक घडी विस्कटून गेली.. मुलांचे शिक्षण सुरु होते. ज्या मुलीची सुटका साहेबांनी केली होती… त्या मुलीचे आई-वडील तिला घेऊन साहेबांना भेटण्यासाठी श्रीनगरवरून खास पुण्याला आले होते.. कामावर नाही म्हणजे साहेबांना पगार दिला जात नसेल… म्हणून त्यांनी पैसेही देऊ केले होते… पण साहेबांनी ते नाकारले! हा देश माझा आहे, याचे रक्षण मी नाही करणार तर कोण करेल? मी माझे कर्तव्य केले.. आता सेना माझी काळजी घेईल. देशाने सुनीलकुमार राझदान यांनी केलेल्या या अविस्मरणीय कामगिरीसाठी त्यांना कीर्ती चक्र पुरस्कार प्रदान केला! साहेबांच्या आजारपणाच्या प्रदीर्घ कालावधीत त्यांच्या धर्मपत्नी श्रीमती मंजू राझदान यांनी साहेबांची अखंड सेवा केली. मुलगा ईशान या धकाधकीत सुद्धा अभ्यास करून सेनेत अधिकारी झाला. दुसरा चिरंजीव पार्थ डॉक्टर झाला आहे! या श्रीकृष्णाचा उपदेश घेऊन हा पार्थ युद्धाच्या मैदनात उतरला तर आश्चर्य वाटणार नाही! व्हीलचेअर मध्ये बसावे लागत असले तरी साहेब त्यांची बहुतेक सर्व कामे स्वत:च करतात! पिस्टल नेमबाजी करतात, त्यांना दोरीच्या साहायाने हेलिकॉप्टर मधून खाली यायचं आहे… हे प्रत्यक्ष युद्धात करता येईल.. असं त्यांना वाटतं! तीन मोठ्या शस्त्रक्रिया साहेबांनी पचवल्या… तारुण्यात दिल्ली-आग्रा अंतर बुलेटवरून अवघ्या दोन तासांत कापायची सवय असलेल्या साहेबांनी पुढे व्हीलचेअरमध्ये वावरण्याचा सराव केला… आणि साहेब सेनेतील सेवेत परतले! ब्रिगेडीअर म्हणून त्यांना बढती मिळाली! गणिताचे प्रचंड ज्ञान, अतिरेकीविरोधी कारवायांचे नियोजन आणि अंमलबजावणीचा अनुभव असल्याने अचूक मार्गदर्शन करण्याची उच्च क्षमता, आणि जागरूक बुद्धी यांच्या जोरावर सुनीलकुमार राझदान साहेबांनी मोठ्या उत्साहाने सैन्यसेवा जारी ठेवली. साध्या कॅलक्युलेटर मधील सोलर पॉवर वर चालून फायर होऊ शकेल, अशी रायफल साहेबांनी बनवली होती. असिस्टंट चीफ ऑफ इंटीग्रेटेड डिफेन्स स्टाफ म्हणून त्यांची नेमणूक झाली. भारतीय सेनेतील व्हीलचेअरमध्ये बसून कार्य करणारे पहिले मेजर जनरल म्हणून ते ख्याती पावले. काश्मिरी युवकांनी सेनेत भरती व्हावे, म्हणून मेजर जनरल सुनीलकुमार उर्फ एस. के. राझदान साहेबांनी खूप यशस्वी प्रयत्न केले… काश्मीरमधील स्थानिक प्रश्नांची त्यांना अधिक जाण आहे. त्यांनी काश्मिरी तरुणांवर विश्वास दाखवला… भरती कार्यक्रम राबवले… तीनशे जागांसाठी तीन हजार तरुण स्पर्धा करीत, यातच सर्व आले. बंगळूरू येथील प्रशिक्षण केंद्रात त्यांनी काश्मिरी तरुणांना खूप प्रभावी मार्गदर्शन केले.. देश सुरक्षित तर आपले अस्तित्व राहील, असे ते म्हणतात. त्यांच्या हाताखाली तयार झालेल्या लेफ्टनंट फैय्याज नावाच्या तरुणाने अतिरेकी विरोधी कारवाईत बलिदान देऊन साहेबांचा विश्वास सार्थ ठरवला!

दिल्लीत मुक्कामी असताना त्यांच्या बंगल्याबाहेरील रस्त्यावर एक काश्मिरी माणूस शाली विकत होता.. त्याला जेंव्हा समजले की नौगावचे नायक इथे राहतात, तेंव्हा त्याने मोठ्या आदराने त्याच्याकडची सर्वांत महागडी शाल साहेबांच्या खांद्यावर पांघरली… म्हणाला… ”साहब आपने हमारी इज्जत बचा ली!” हुतात्मा सैनिकांच्या पत्नी, मुले यांच्या कल्याणासाठी साहेब झटत असतात. विशिष्ट सेवा मेडल त्यांच्या पोशाखावर शोभत असते. साहेब विविध ठिकाणी व्याख्याने देतात.. विशेषत: दिव्यांग व्यक्तींसाठी साहेब प्रेरणेचा मोठा स्रोत बनले आहेत!

काश्मिरात जन्मून मथुरेत वाढलेला आणि पुन्हा काश्मिरात येऊन मोठी देशसेवा बजावलेल्या या ज्येष्ठ योद्ध्यास श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पावन दिवशी खूप खूप शुभेच्छा आणि सादर वंदन… सल्यूट मेजर जनरल साब! जय हिंद! 

(नरकासुराच्या तावडीतून भगवान श्रीकृष्णांनी सोळा हजार एकशे महिलांची सुटका केली. मेजर जनरल सुनीलकुमार राझदान (सेवानिवृत्त) यांनी यशस्वी केलेल्या अशाच कारवाईत काहीसे साम्य जाणवले… म्हणून त्यादृष्टीने लिहिले.) 

– समाप्त –

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “हॅडविग किस्लर…” – लेखक : सलिल सुधाकर चौधरी ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘हॅडविग किस्लर’ – लेखक : सलिल सुधाकर चौधरी ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆

१९३० चं दशक. व्हिएन्ना शहर.

फ्रिट्झ नावाच्या एका उद्योजकाच्या घरी चाललेली डिनर पार्टी. मेणबत्त्यांच्या प्रकाशात उजळलेली जेवणाची टेबलं. रेशमी गाऊन्स घातलेल्या स्त्रिया. भरलेल्या ग्लासांच्या टकटक आवाजात मिसळलेल्या उद्योजकांच्या आणि सत्ताधाऱ्यांचा गप्पा… आणि त्या टेबलाच्या टोकाला बसलेली एक मोहक, थक्क करणारी सुंदर स्त्री — हॅडविग किस्लर.

ती फ्रिट्झ ची पत्नी होती. तो एक श्रीमंत शस्त्र व्यापारी होता. पण फ्रिट्झचं तिच्यावर प्रेम नव्हतं. त्याच्यासाठी, ती एक शोभेची वस्तू होती, एक दागिना होती, ज्याचं प्रदर्शन तो मोठ्या सोसायट्यांमध्ये करत असे. तिच्यासाठी, या पार्ट्या म्हणजे एक तुरुंग होता, जिथे ती शांतपणे बसून शक्तिशाली पुरुषांना येणाऱ्या युद्धासाठी बनवल्या जाणाऱ्या शस्त्रांबद्दल बोलताना ऐकत असे. यामध्ये भौतिकशास्त्रज्ञ, संशोधक, राजकारणी…… आणि हो, नाझी (Nazis) सुद्धा होते.

हेडविगला त्यांचा तिरस्कार वाटत होता. तिला आवडत नव्हतं की ते तिच्या घरात हसत-खेळत होते, किंवा तिचा नवरा त्यांना शस्त्रात्रं विकत होता. आणि एका संध्याकाळी तिने ठरवलं — बस्स, आता पुरे झालं.

पुढच्या पार्टीत तिने योजना आखली.

“मेकअप लावायला जाते” असं सांगून ती उठली. आणि परत आलीच नाही.

दुसऱ्या सकाळी, पॅरिस रेल्वे स्टेशनवर ती उतरली — एकटी, स्वतंत्र, नव्या सुरुवातीस तयार असलेली!

पुढे लंडनमध्ये तिची भेट झाली चित्रपट सम्राट लुई बी. मेयर यांच्याशी. चित्रपटात काम करण्यासाठी ती त्याच्यासोबत अमेरिकेला निघाली. अमेरिकेच्या जहाजावर बसताना तिने नवीन नाव घेतलं हेडी लामार.

थोड्याच दिवसांत ती पडद्यावर झळकली आणि १९४१ पर्यंत तिची ओळख झाली — जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून.

पण सौंदर्यही कैद बनू शकतं.

तिला फक्त सौंदर्यासाठी काम मिळायचं. डायलॉग्ज मिळत नव्हते, चांगले रोल्स मिळत नव्हते. फक्त उभं राहायचं आणि मोहक दिसायचं. लोक तिला (आणि सर्वच सुंदर स्त्रियांना) मूर्ख समजायचे!

पण हेडी मूर्ख नव्हती. उलट — ती एक हुशार स्त्री होती. तिला तंत्रज्ञानात रस होता. सतत काही न काही नवीन शोधण्याचा ती प्रयत्न करत असे.

त्याचवेळी अटलांटिकमध्ये जर्मन पाणबुडींनी शत्रूची जहाजं बुडवल्याच्या बातम्या तिच्या आल्या. तिला व्हिएन्नातील त्या डिनरपैकी एक संभाषण आठवलं — लष्करी वापरासाठी रेडिओ लहरींचा वापर करण्याबद्दल कोणी तरी शास्त्रज्ञ तिच्या पतीबरोबर बोलत होता.

तिला सुचलं —

जर टॉर्पेडोला (पाणबुडीतून सोडलेले क्षेपणास्त्र) नियंत्रित करणारा सिग्नल एका फ्रीक्वेन्सीवर न थांबता सतत बदलत राहिला, तर शत्रूला तो पकडता येणार नाही?

तीनं यावर काम सुरु केलं. ही कल्पना प्रत्यक्षात आणली, पेटंट मिळवलं आणि अमेरिकन नेव्हीला जर्मन जहाजांविरुद्ध वापरण्यासाठी मोफत दिलं.

पण नेव्हीला हे मान्यच नव्हतं की जगातील सर्वात सुंदर स्त्री त्यांच्या अभियंत्यांना न सुटलेली समस्या एकटी सोडवू शकते. त्याऐवजी तिला सल्ला देण्यात आला “ते कर जे तुला जमतं! ” (थोडक्यात फक्त उभं राहायचं आणि मोहक दिसायचं!). ते करून युद्धात मदत करता आली तर करा असं सांगण्यात आलं. Netbhet

हेडीला वाईट वाटलं. पण तिला नाझींचा इतका तिटकारा होता की तिने हेही करण्याचं ठरवलं! तिला माहित होतं — लोक तिच्या सौंदर्यासाठी पैसे देतील.

ती युद्धासाठी फंड गोळा करायला लागली. जे लोक मदत करतील त्यांना चक्क चुंबन द्यायला सुरुवात केली. तिला किस करता यावं म्हणून लोक मदत करायला लागले. लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या — एका रात्रीत तिनं $७ मिलियन जमा केले. आणि एकूण $२५ मिलियन जमा केले.

हे इथे संपलं असतं तरी मोठीच स्टोरी झाली असती —

जगातील सर्वात सुंदर स्त्रीने नाझींना चुंबनाने हरवलं!

पण खरी कथा इथे संपत नाही.

त्यानांतर काही दशकांनी १९६२ मध्ये — क्यूबन मिसाईल क्रायसिस मध्ये, नेव्हीने अखेर हेडीचं तंत्रज्ञान वापरून पाहिलं. आणि ते अफलातून निघालं.

तिला त्याचं श्रेय मिळालं नाही, पैसेही दिले नाही, तिने मागितलेही नाही — पण तिचं “फ्रिक्वेन्सी हॉपिंग” तंत्रज्ञान पुढे उपग्रह संप्रेषण, जीपीएस मध्ये वापरलं गेलं. आणि हो जे तंत्रज्ञान वापरून तुम्ही आता हा लेख वाचत आहात…. त्या Wi-Fi चा पायाभूत आधारामध्ये पण तिच्या संशोधनाचा हातभार आहे!

आज तुम्ही मोबाईलवरून मेसेज पाठवताय, व्हिडिओ बघताय, हे सगळं त्या स्त्रीमुळे शक्य झालं — जी एका रात्री व्हिएन्ना सोडून गेली… आणि अख्खं जग बदलून गेली! कधी कधी जग बदलण्यासाठी बंदुका, बॉम्ब किंवा सैन्याची गरज नसते… फक्त एका धाडसी पावलाची, एका चांगल्या कल्पनेची आणि जिद्दीची गरज असते!

*******

लेखक : सलिल सुधाकर चौधरी 

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स, मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया!

प्रस्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ नऊ नरकासूर आणि एक श्रीकृष्ण! – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ नऊ नरकासूर आणि एक श्रीकृष्ण! – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

मेजर जनरल सुनीलकुमार राझदान (सेवानिवृत्त)

तो भगवान श्रीकृष्णासारखा मथुरेत जन्माला आलेला नसला तरी त्याचं बालपण, तारुण्य मथुरेत आकार घेत गेलं. त्याच्या मूळ जन्मस्थानाला दिल्या जाणा-या ‘नंदनवन’ या उपमेत ‘नंद’ हा शब्द आहे.. हेही एक साम्य म्हटले तर ते वावगे ठरणार नाही! त्याची कृती प्रत्यक्ष श्रीकृष्णासारखीच बरीचशी! भौमासुर उर्फ नरकासुर.. होय तोच नरकासूर ज्याचं कंसाशी सख्य होतं.. कंस आणि नरकासुर म्हणजे एकाला झाकावा आणि एकाला दाखवावा असे! त्यावेळच्या प्राग्ज्योतिषपुरवर (म्हणजे आताचा असाम) नरकासुर राज्य करीत होता आणि तो मातला होता… अत्याचार एवढे की त्याने तब्बल सोळा हजार एकशे माता-भगिनी कैदेत ठेवल्या होत्या… पुढे भगवान श्रीकृष्ण यांनी माता रुक्मिणी यांच्या साथीने नरकासुर नरकात धाडला… ओघात मुरा नावाचा असुर मारून मुराचा अरी म्हणजे शत्रू अर्थात मुरारी हे नाव मिळवले…! देवाच्या या लीलेची आठवण यावी, असाच पराक्रम आपल्या कथानायकाने करून जन्म सार्थकी लावला…. ती ही कथा… मराठी जणांना बहुदा काहीशी अपरिचित अशी!

भारताचे नंदनवन म्हणवल्या जाणा-या जम्मू-कश्मीरमधील श्रीनगरमध्ये त्याचा जन्म आठ ऑक्टोबर, १९५२ रोजी झाला… ठिकाण होते दहाव्या शतकातील पुरुश्यार शिवमंदिरासाठी प्रसिद्ध असलेले पुरुश्यार गाव… इथला झेलम नदीवरील हब्बा कडाल नावाचा लाकडी पूल प्रसिद्ध. यांचे कुलनाम राझदान.. अर्थात लढवय्ये आणि जहागीरदार.. जमीनदार लोक… शिवाय पंडित! जन्मवेळ श्रीकृष्णासारखीच रात्रीची…. दहा वाजून दहा मिनिटे.. धनिष्ठा नक्षत्र. मंगळाशी संबंधित असलेल्या या नक्षत्रावर जन्मलेली माणसं शिस्तबद्ध आणि प्रचंड धाडसी असतात, असं म्हणतात… याचा प्रत्यय या मुलाच्या, अर्थात सुनील कुमार राझदान यांच्या जन्मानंतर बरोबर बेचाळीस वर्षांनी आला!

सुनील कुमार राझदान यांचे आजोबा दुस-या महायुद्धात ब्रिटीश सेनेतून लढले. आणि सुनील कुमार यांच्या वडिलांनीही भारतीय सेनेत तोफखाना रेजिमेंट मध्ये सेवा बजावली. त्यांची शेवटची नेमणूक श्रीकृष्ण जन्मभूमी मथुरा येथे होती… सेवानिवृत्तीनंतर ते मथुरेतच स्थायिक झाले.

आरंभी अभ्यासापेक्षा गोट्या खेळण्यात अतिशय रुची असलेल्या सुनील कुमार यांना एकदा वडिलांनी गोट्या खेळण्यात वेळ घालवतो म्हणून श्रीमुखात भडकावली… हे बाल महाशय यामुळे अतिशय अपमानित झाले.. कारण परिसरात ते बाल राजकुमार म्हणून ओळखले जात असत… सर्वांसमोर वडिलांनी राजकुमाराला मारावे म्हणजे काय? त्यांनी थेट यमुनातीरावरचे चामुंडा देवीचे मंदिर गाठले. पुढे याच मंदिरात त्यांचा अधिकाधिक वेळ जाऊ लागला…. आणि देवभूमीचा गुण म्हणावा… सुनील कुमार हे अध्यात्मिक वृत्तीत रममाण झाले. याच मंदिराच्या परिसरात सैनिकी अधिका-यांचा गोल्फ क्लब होता. येथे खेळायला आलेल्या अधिका-यांशी तारूण्यात पदार्पण करीत असलेल्या सुनील कुमार यांचा परिचय आणि संभाषण होत असे. परंतु वडिलांसारखे लष्करात जाण्याचे त्यांच्या मनातही नव्हते. अध्यात्मासोबत त्यांनी गणित विषयाच्या अभ्यासाचा प्रचंड ध्यास घेतला होता… हेच गणित त्यांना पुढे उपयोगी पडणार होते! वडिलांकडून काहीही घ्यायचे नाही, शिकवण्या घेत घेत शिकायचे हा त्यांचा खाक्या होता! गणितात पदव्युत्तर पदवीचा अभ्यास करताना त्यांचा बराच वेळ महाविद्यालयाच्या ग्रंथालयात जाई. त्याच ग्रंथालयात त्यांचा एक सहपाठी सी. डी. एस. अर्थात कम्बाईन्ड डिफेन्स सर्विसेस परीक्षेचा अर्ज भरत बसला होता. या परीक्षेतून इंडियन मिलिटरी अकादमी, इंडियन नेवल अकादमी, इंडियन एअर फोर्स अकादमी, ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी साठी प्रशिक्षणार्थी अधिकारी निवडले जातात. त्या सहपाठी विद्यार्थ्याने सुनीलकुमार यांना म्हटले… ”तुझ्या क्षमतेच्या बाहेरची आहे ही गोष्ट… तू पंडित, अभ्यासू कीडा! तू पाहूही नकोस हा अर्ज. तू प्रोफेसर हो गणिताचा! ”

यावर अपमानित झालेल्या सुनील कुमार दिल्लीला पोहचले… काहीसा रागानेच सीडीएस परीक्षेचा फॉर्म भरला… अभ्यास केला… सहपाठी त्यावर्षी अनुत्तीर्ण झाला आणि सुनीलकुमार ऑफिसर्स ट्रेनिंग मधून लष्करी अधिकारी म्हणून प्रशिक्षित होऊन देशसेवेत रुजू झाले.. त्यांना हिणवणारा तो विद्यार्थी एक वर्षाने उशीरा उत्तीर्ण झाला, आणि यांना ज्युनिअर ठरला! वर्ष होते १९७२ आणि वय होते अवघे २२ वर्षे. सेवेच्या पहिल्याच वर्षात त्यांची सेनेने एक फार मोठी परीक्षाच घेतली! पॅरा एस. एफ. अर्थात पॅराशूट रेजिमेंट स्पेशल फोर्सेस हा भारतीय सैन्याचा एक अत्यंत खडतर काम असलेला विख्यात विभाग आहे. इथे सामान्य लोकांच्या कल्पनेतही येणार नाही, असे कठीण प्रशिक्षण पूर्ण केल्यावरच सैनिकाला मरून रंगाची बेरेट अर्थात विशिष्ट प्रकारची कॅप परिधान करता येते…. आणि ही कॅप मिळवणे खरंच कर्मकठीण मानले जाते! पण अभावितपणे ही कॅप डोक्यावर घालून सुनीलकुमार साहेब या विभागात रुजू होण्यासाठी आग्रा येथील पॅराशूट रेजिमेंट स्पेशल फोर्सेसच्या तळावर गेले आणि मोठ्या रुबाबात तेथील कॅप्टन एस. एम. कुंजरू साहेबांसमोर उभे राहिले… सुनीलकुमार यांच्या डोक्यावर असलेली ती बेरेट पाहून अडज्यूटंट साहेबांच्या तळपायाची आग अगदी मस्तकात गेली. साहेब काही बोलले नाहीत… त्यांनी सुनीलकुमार या सेकंड लेफ्टनंट तरुणाचा उपरोधाने ‘सर’ असा उल्लेख केला आणि बजावले… ”ही बेरेट कमवावी लागते! ” त्यांनी सुनीलकुमार साहेबांची एक परीक्षा आयोजित केली….. काही नाही… वीस-पंचवीस किलोचा सिमेंटचा ठोकळा, युद्धासाठी सैनिकाकडे असावे लागते ते साहित्य, रायफल इत्यादी पाठीवर घेऊन वीस किलोमीटर जायचे आणि तेवढेच अंतर परत यायचे… मी-जून महिन्यातले दुपारचे कडक ऊन, दुपारची वेळ… अंगावर डांगरी नावाचा पोशाख… दहा मिनिटांत एक किलोमीटर अंतर चाललेच पाहिजे ही अट. सुनीलकुमार यांनी मोठ्या आत्मविश्वासाने वाटचाल सुरु केली खरी… पण काहीच वेळात पिशवीचे बंद खांद्यांना काचू लागले… तेथील कातडी सोलवटून निघाली… रक्ताने बनियन भिजून गेला… पण थांबायचे नव्हते… पायांत गोळे येऊ लागले होतेच… उस्ताद सायकलवर मागे होतेच… त्यांनी केवळ थोडे ग्लुकोजचे पाणी प्यायला दिले मध्ये… एकदाच! एक क्षण सुनीलकुमार यांना वाटले.. उगाच पडलो या फंदात… सरावात घाम गाळला तर युद्धात रक्त गाळावे लागणार नाही… असे म्हटले जाते… इथे तर रक्तच गळत होते.. पण दुस-याच क्षणी त्यांनी केलेला अध्यात्मिक अभ्यास त्यांना आठवला… अष्टावक्र गीता.. त्यातील तत्वज्ञान स्मरले… शरीर आणि मन वेगळे करता येते… या वेदना शरीराच्या… मन वेगळे त्यापासून. गुरु गोबिंदसिंग साहेबांचे शब्द त्यांना पाठ होते… देशासाठी मस्तक अर्पण करण्याची वेळ आली तर… विलंब करू नये! आईचे शब्द आठवले… सर्व उपकार फेडता येतात.. पण पृथ्वीचे, मातृभूमीचे उपकार फेडता येत नाहीत… पण प्रयत्न मात्र केलाच पाहिजे… निश्चय झाला… आणि हा साधक ती चार तासांची शर्यत साडेतीन तासात पूर्ण करूनच थांबला… चेह-यावर वेदना नावालाही नव्हती! … अंगावर प्रचंड जखमा झालेल्या होत्या… त्या पाहून कमांडर साहेबांनी सुनील कुमार यांना थेट रुग्णालयात धाडले… खांद्यावर टाके पडले… साहेबांनी दोन दिवसांची सुट्टी दिली… आणि सन्मानाची मरून बेरेट सुद्धा! ही सुनीलकुमार साहेबांची पहिली कमाई…. या प्रसंगाने साहेबांना प्रचंड आत्मविश्वास आणि सहकारी अधिका-यांचा सन्मान, आदर मिळवून दिला!

देशाच्या विविध भागांत विविध जबाबदा-या सांभाळत सुनीलकुमार साहेब सर्वार्थाने एक सैन्याधिकारी म्हणून घडत गेले! त्यांनी मणिपूरमध्ये जीवाचा धोका पत्करून अतिरेकीविरोधी कारवाईत शौर्य गाजवले. कैलास पर्वत मोहिमेमध्ये धाडसाने सहभागी झाल्याबद्दल वरिष्ठ अधिका-यांनी सुनील कुमार यांना सन्मानित केले होते. एका मोहिमेत सहकारी सैनिक बर्फाच्या वादळात गाडले गेल्याचे वृत्त कानी येताच त्यांची सुटका करण्याच्या मोहिमेवर निघायचा आदेश सुनील कुमार यांनी वरिष्ठ अधिका-यांना मागितला. परंतु तशा वातावरणात पर्वतावर जाणे धोक्याचे आहे, असे त्यांना सांगण्यात आले. परंतु सुनील कुमार साहेबांनी आग्रह धरला… वेदिक गणिताचे कसब पणाला लावून दिशा शोधल्या, पावले मोजली.. बर्फात मार्ग शोधला, बर्फात गाडल्या गेलेल्यांचा ठावठिकाणा अचूक शोधला आणि कित्येक जीव वाचवले! दूर अंतराच्या धावण्याच्या स्पर्धेत सुनीलकुमार नेहमीच अव्वल असत… त्यांना सहकारी ग्रे हाउंड (प्रचंड वेगाने धावणारी एक श्वान प्रजाती) नावाने हाक मारीत. पिस्टल शुटिंग (नेमबाजी)मध्ये सुनीलकुमार अव्वल होतेच. दूरपर्यंत ते अचूक नेम साधीत असत… लहानपणी गोटया खेळण्याचा असाही फायदा! नेमबाजीसाठी दिला जाणारा प्रतिष्ठेचा चेटवुड चषक त्यांनी जिंकला होता. योगाभ्यास होताच… पाण्याखाली श्वास रोखून राहणे याचा त्यांनी मोठा सराव केला होता. मथुरेत असताना तिथल्या गोल्फ कोर्स मध्ये ते ज्या अधिका-यांना खेळताना पहात असत, त्यांच्या बरोबरीने आता तेही त्याच गोल्फ क्लबमध्ये सन्मानाने जाऊ शकत होते. त्या ठिकाणी पी. टी. प्रशिक्षकाने सुनीलकुमार यांना ओळखले… हाच तो तरुण जो चामुंडा मंदिरात असायचा, दिवसभर अभ्यासात मग्न असायचा, आणि गोल्फ क्लबमधील सैनिक-अधिकारी लोकांशी संवाद साधायचा! खरे तर सुनील कुमार साहेब नौदल विभागासाठी निवडले गेले होते. ऐरा गैरा.. नत्थू खैराचे हे कामच नव्हते… १३५ जणांच्या समुहातून सुनील कुमार यांची एकट्याची निवड झाली होती! मुष्टियुद्ध आणि पोहण्यात, पळण्यात ते अत्यंत तरबेज होते. पण दैवाने त्यांना पायदळ विभागात धाडले! काही तांत्रिक कारणांमुळे साहेबांची तुकडी एक महिना उशिराने प्रशिक्षण सत्रात रुजू झाली होती. पण याच तुकडीने तब्बल चार जनरल भारतीय सेनेला दिले!

प्रारंभिक सेवा लेह मध्ये झाल्यानंतर सुनील कुमार साहेबांना त्यांच्या जन्मभूमीत सेवा करण्याची संधी प्राप्त झाली… काश्मीर! साहेबांना काश्मीर मधील एक नव्हे तर तीन तीन लोकभाषा अवगत होत्या, तिथल्या चालीरीती ठाऊक होत्या… त्यांनी थोडेसे जरी वेषांतर केले की ते तिथले स्थानिक नागरिक भासत असत. स्थानिक जनतेत स्थानिक वेश परिधान करून ते मिसळून जात.. त्यामुळे अनेक गुप्तवार्ता त्यांना आपसूक समजत असत… त्याचा उपयोग अतिरेकी विरोधी मोहिमांमध्ये खूप होत असे.

एका नेमणुकीत त्यांना काश्मिरातील दोन नद्यांच्या संगमाजवळ राहणायची संधी मिळाली… साहेब त्या संगमावर जाऊन ध्यान करण्याची संधी साधत असत. अशाच एका रात्री त्यांना स्वप्न पडले… अर्जनसागर येथे तुमची आणि गुरुंची भेट होईल… त्यावेळी नेमका पितृश्राद्ध महिना सुरु होता.. ते तिथे पोहोचले…. सरोवरात स्नान करून मंदिरात पोहोचले… तिथले पुजारी बाहेर आले… म्हणाले… कुणी साधक गुरुदीक्षा घेण्यासाठी येणार आहेत.. असे मी स्वप्न पाहिले… तुम्ही तेच आहात का? आणि त्यांनी गुरुदीक्षा दिली… असे हे योद्धा साधक… सुनील कुमार राझदान… त्यांच्या संपूर्ण आयुष्यास एक मोठे वळण देणारी घटना पुढे घडायची होती….

 राष्ट्रीय रायफल्समध्ये कर्तव्यावर असताना वेषांतर आणि नामांतर करून साहेब आणि त्यांचे पाच सहा सहकारी तेथील स्थानिक नागरीकांच्या भूमिकेत वावरत होते. सहा ऑक्टोबर १९९४ तारीख होती… काझीगुंड मधील एका चहाच्या टपरीवर साहेब आणि त्यांचे सहकारी चहा पीत बसले होते. स्थानिक आरोग्य केंद्रात काम करणा-या एका व्यक्तीची आणि सुनील कुमार साहेबांची उत्तम जानपहचान होती… सुनीलकुमार हे अस्सल कश्मीरी मुसलमान आहेत अशी त्या माणसाची खात्रीच होती. त्याने एक भयावह बातमी दिली… तेथून सुमारे पंचवीस किलोमीटर्स दूर असलेल्या त्याच्या डोंगरी गावात हिजबुल मुजाहिद्दीन, हिक्मतेयार या अतिरेकी संघटनांच्या अतिरेक्यांनी त्या गावातील अर्थात दमाल हाजीपूर गावातील तब्बल चौदा तरुण महिलांचे गेल्या महिनाभरापासून अपहरण केले आहे… त्या महिलांचे लैंगिक शोषण सुरु आहे… बंदुकीच्या धाकावर… विरोध केल्यास आई-वडिलांना ठार मारू अशा धमक्या देत… हा बलात्कार सुरु होता. या महिलांना या अतिरेक्यांसाठी स्वयंपाकही करावा लागत होता… आणि सुनीलकुमार साहेबांना ही बातमी देणा-या माणसाची मुलगी सुद्धा या दुर्दैवी महिलांपैकी एक होती! त्या गावात तब्बल नऊ नरकासुर वावरत होते… त्यांचे निर्दालन करायला भगवान श्रीकृष्ण हवे होते.. जे सुनीलकुमार साहेबांच्या रूपाने अवतरले जणू!

सुनील कुमार साहेबांच्या हृदयात प्रचंड कालवाकालव झाली… नवरात्रीचे दिवस सुरु होते… साहेबांचा कडक उपवास सुरु होता… महिला मग त्या कोणत्याही जातीच्या, धर्माच्या असोत.. त्यांचा सन्मान राखणे हे प्रत्येक पुरुषाचे आद्य कर्तव्यच आहे… ही आईची, भारतीय सेनेची शिकवण त्यांना प्रकर्षाने आठवली! त्यांनी त्यांच्या वरिष्ठ अधिका-यांच्या कानावर ही बाब त्वरीत घातली… कारण घटनास्थळ साहेबांच्या जबाबादारीच्या क्षेत्राच्या बाहेरचे होते… त्यामुळे मुख्यालयातून परवानगी घेणे गरजेचे होते, अतिरेक्यांची नेमकी संख्या माहीत नव्हती. साहेबांनी सात ऑक्टोबर रोजी सेक्टर कमांडर साहेबांपुढे योजना मांडली.. आणि रीतसर परवानगी घेऊनच मोहीम आखली गेली. मोहीम सुरु करण्याचा दिवस अर्थात आठ ऑक्टोबर हा योगायोगाने साहेबांचा वाढदिवसच होता. अतिरेक्यांवर छापा घालण्यासाठी दोन अधिकारी, चोवीस जे. सी. ओ. आणि इतर कमांडोज हे सुद्धा पथकात सामील झाले. पंचवीस किलोमीटर्स अंतर तसे बोलायला कमी वाटेल.. पण हा जंगली, डोंगरभाग… उंच उंच कडे… बर्फ. गुप्तता राखण्यासाठी साहेबांनी आणखीन लांबचा रस्ता निवडला. वीर भल्या पहाटे कामगिरीवर निघाले… त्या गावाजवळ पोहोचायला सायंकाळ झाली… सुमारे सतरा तास सैनिक चालत होते. अंधार पडू लागला. आरोग्य कर्मचा-याने सांगितलेल्या ठिकाणाजवळ साहेब पोहोचले… पण निश्चित काही समजेना. तेवढ्यात एक गदडीया अर्थात मेंढपाळ डोंगर उतरून खाली येत होता. साहेबांनी त्यांच्या खास काश्मिरी बोलीभाषेत त्याच्याशी संवाद साधला… मेंढपाळ लगबगीने, भीतीने पुढे निघून गेला… पण जाताना त्याने थोडक्यात पण महत्त्वाची माहिती दिली…. तिथून दोन किलोमीटर्स उंचीवरील एका मोक्याच्या जागी काही घरे आहेत… त्यातील एका घरात काही लोक आहेत! या चार मजली घराला मोठे कुंपण आहे… चौथ्या मजल्यावर एक रायफलधारी पहारेकरी कायम उभा असतो… इत्यादी इत्यादी!

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “घंटा.. आणि चर्चचे चिन्ह” – लेखक : अज्ञात ☆प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? इंद्रधनुष्य ?

☆ “घंटा.. आणि चर्चचे चिन्ह” – लेखक : अज्ञात ☆प्रस्तुती – सुश्री शोभा जोशी ☆

मी श्री भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी रांगेत उभा होतो, अचानक माझी नजर माझ्या समोर असलेल्या घंटावर पडली… ती काहीतरी वेगळीच दिसत होती. दर्शनानंतर, उत्सुकतेपोटी मीही तिथे गेलो. ती घंटा महादेव गर्भगृहासमोरील एका लहान शनी मंदिरावर बसवण्यात आली होती… मी जाऊन ती पाहिली… त्यावर चर्चचे चिन्ह होते आणि त्यावर १७२९ ची तारीख लिहिलेली होती,

माझी उत्सुकता आणखी वाढली… शनी मंदिराच्या पुजाऱ्याला विचारल्यावर मला कळले की ही घंटा पेशव्यांनी पोर्तुगीजांना पराभूत केल्यानंतर कोकण किल्ल्याच्या चर्चमधून आणली होती, पण ही माहिती पुरेशी नव्हती… म्हणून आम्ही महान मराठा इतिहासाची जुनी पिवळी पाने शोधली आणि आढळले की ही आश्चर्यकारक, काहीशी वेगळी दिसणारी घंटा सामान्य घंटा नाही… तर महान हिंदू शौर्याचे प्रतीक आहे.

ते पेशवे बाजीरावांनी आणले नव्हते… तर त्यांचे धाकटे बंधू वीर चिमाजी अप्पा यांनी जिंकल्यानंतर आणले होते… आणि पोर्तुगीजांचे हात चिरडून मराठा साम्राज्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून महाराष्ट्रातील पाच वेगवेगळ्या मंदिरांच्या प्रांगणात अशा एक नव्हे तर पाच घंटा बसवण्यात आल्या. त्या घंटा “स्मारक आणि शौर्य स्मृती” म्हणून ठेवण्यासाठी, चर्च आणि त्यावरील काळाचा शिक्का जतन करण्यात आला.

मला माहित नाही की आपल्या भावी पिढ्यांना अशा हजारो गौरवशाली इतिहासांबद्दल माहिती मिळेल की नाही??

लेखक : अज्ञात  

प्रस्तुती : सुश्री शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ यमुनाष्टकम् ॥ — (स्तोत्र दुसरे) ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ यमुनाष्टकम् ॥ — (स्तोत्र दुसरे) ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

☆ ☆ ☆ ☆

नमामि यमुनामहं सकल सिद्धि हेतुं मुदा,

मुरारि पद पंकज स्फ़ुरदमन्द रेणुत्कटाम।

तटस्थ नव कानन प्रकटमोद पुष्पाम्बुना,

सुरासुरसुपूजित स्मरपितुः श्रियं बिभ्रतीम॥१॥

*

कलिन्द गिरि मस्तके पतदमन्दपूरोज्ज्वला,

विलासगमनोल्लसत्प्रकटगण्ड्शैलोन्न्ता।

सघोषगति दन्तुरा समधिरूढदोलोत्तमा,

मुकुन्दरतिवर्द्धिनी जयति पद्मबन्धोः सुता॥२॥

*

भुवं भुवनपावनीमधिगतामनेकस्वनैः,

प्रियाभिरिव सेवितां शुकमयूरहंसादिभिः।

तरंगभुजकंकण प्रकटमुक्तिकावाकुका,

नितन्बतटसुन्दरीं नमत कृष्ण्तुर्यप्रियाम॥३॥

*

अनन्तगुण भूषिते शिवविरंचिदेवस्तुते,

घनाघननिभे सदा ध्रुवपराशराभीष्टदे।

विशुद्ध मथुरातटे सकलगोपगोपीवृते,

कृपाजलधिसंश्रिते मम मनः सुखं भावय॥४॥

*

यया चरणपद्मजा मुररिपोः प्रियं भावुका,

समागमनतो भवत्सकलसिद्धिदा सेवताम।

तया सहशतामियात्कमलजा सपत्नीवय,

हरिप्रियकलिन्दया मनसि मे सदा स्थीयताम॥५॥

*

नमोस्तु यमुने सदा तव चरित्र मत्यद्भुतं,

न जातु यमयातना भवति ते पयः पानतः।

यमोपि भगिनीसुतान कथमुहन्ति दुष्टानपि,

प्रियो भवति सेवनात्तव हरेर्यथा गोपिकाः॥६॥

*

ममास्तु तव सन्निधौ तनुनवत्वमेतावता,

न दुर्लभतमारतिर्मुररिपौ मुकुन्दप्रिये ।

अतोस्तु तव लालना सुरधुनी परं सुंगमात्तवैव,

भुवि कीर्तिता न तु कदापि पुष्टिस्थितैः॥७॥

*
स्तुति तव करोति कः कमलजासपत्नि प्रिये,

हरेर्यदनुसेवया भवति सौख्यमामोक्षतः।

इयं तव कथाधिका सकल गोपिका संगम,

स्मरश्रमजलाणुभिः सकल गात्रजैः संगमः॥८॥

*

तवाष्टकमिदं मुदा पठति सूरसूते सदा,

समस्तदुरितक्षयो भवति वै मुकुन्दे रतिः।

तया सकलसिद्धयो मुररिपुश्च सन्तुष्यति,

स्वभावविजयो भवेत वदति वल्लभः श्री हरेः॥९॥

*
☆ मराठी भावानुवाद ☆

*

प्रसन्नतेने सिद्धी कारण यमुनेला नमन

मुरारीचरण कमल उत्कट वालुकाकण

तटावरील काननात घालित सडा सूमन

सुरासूरही पूजिती श्रिया शिवासी सन्मान ॥१॥

*
गिरीशिखरावरी झेप घेउनी कालिंदी तेजस्वी

शैल कपारींवरुनी विलासे वाहतसे उल्हासी

उच्च रवाने विविध गतीने वाहे हासत डोलत 

जय हो पद्मबंध तनये मुकुंद प्रीती करि वर्धित ॥२॥

*

गुंजन करीत बहुध्वनींचे करी धरिती पावन

पूजा मयूर हंस शुकादि द्वारा अर्चने समान 

प्रवाह मोहक जैसे करीचे मौक्तीक कंगण

जणू सुंदरी नितंब किनारा कृष्णप्रियेला नमन ॥३॥

*

ब्रह्मा विष्णू महेश स्तवती असीम गुणालंकृत

घनपापहारिणी सदा ध्रुव पराशर इष्ट दैवत

तटावरी पावन मथुरा नगरी गोप-गोपी वेष्टित

कृपानिधे तुजला शरण मना सदैव ठेवी सुखात ॥४॥

*
धारण केले रूप सुप्रिय पद्मजा मुरारीस्तव

समागमाने प्रदान करिते सिद्धी भक्तांस्तव

हरी कमलजा प्रिय कालिंदी बहूकलायुक्त

मनी निरंतर वास करोनी तिथेच राही स्थित ॥५॥

*

सदैव तुजला नमन अद्भुत चरित्रगुणी यमुना

जलपानाने तव कदापि होत ना यमयातना 

भक्ती करता गोपी जैसे प्रिय होत श्रीकृष्णा

यमराज कदापि भगिनी पुत्रा प्रकोप करीत ना ॥६॥

*

तव सन्निध्ये देहासीया नवप्रफुल्लता दान

मुरारी मुकुंद प्रिये भक्तीने दुर्लभ काही न

हे सुरसरिते तव भक्तांना सुलभ कृपादान

कीर्तिमान तव महिमा भूवर समृद्धाही स्मरण ॥७॥

*

मुमुक्षु जन हे सारे करती प्रिये तुझे स्तवन 

भगवान हरी भक्तीने प्राप्ती मोक्षाची जाणुन

श्रम नि आंसवे गात्रोत्पन्न कणाकणापासून

कहाणी तुझी अधीक श्रेष्ठ गोपीमिलनाहुन ॥८॥

*

अष्टश्लोक हे देवसुते पठण करील आनंदाने 

दुरितांचा सकल विनाश होइल मुकुंदप्रीतीने

हरीकृपेने राहिल अंकुश अपुल्या मनावरी

प्राप्ती सकल सिद्धींची संतुष्ट होऊनी मुरारी ॥९॥

☆

॥ इति निशिकान्त भावानुवादित श्रीयमुनाष्टक स्तोत्र संपूर्ण ॥

☆ ☆ ☆ ☆

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘ उमवेल्ट (Umwelt)’ – लेखक : श्री सलिल सुधाकर चौधरी ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

सुश्री सुलू साबणे जोशी

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘ उमवेल्ट (Umwelt)’ – लेखक : श्री सलिल सुधाकर चौधरी ☆ प्रस्तुती – सुश्री सुलू साबणे जोशी ☆

कल्पना करा, तुम्ही तुमच्या पाळीव कुत्र्याला घेऊन बाहेर फेरफटका मारायला गेला आहात. तुम्ही आजूबाजूला दिसणाऱ्या ओळखीच्या माणसांना भेटताय, थांबून बोलताय. वातावरणातला गंध, गाड्यांचे आवाज आणि वाऱ्याची झुळूक तुम्हाला जाणवते आहे.

तुमचा कुत्रा सोबत चालतोय. पण तो इथेतिथे ओळखीच्या खुणा हुंगत चाललाय. ओल्या नाकपुड्या हवेतील असंख्य गंध साठवतायत, गंधांवरून तो जगाचा अर्थ लावतोय. त्याला ते आवाज ऐकू येत आहेत, जे तुम्हाला ऐकू येत नाही. त्याला ते दिसतंय, जे तुम्हाला दिसत नाही, किंवा तुम्ही सवयीने दुर्लक्ष करताय.

त्या कुत्र्याच्या अंगावरील केसात एक गोचीड लपून बसली आहे. त्या अंध आणि बहिऱ्या जिवासाठी जगाचा अर्थ फक्त दोनच गोष्टी आहेत – सस्तन प्राण्याच्या शरीराचे तापमान आणि त्याच्या त्वचेतून येणारा (ब्युटीरिक ॲसिडचा) गंध. या पलीकडे जग आहे, हे त्याला माहीतच नाही.

तुम्ही एका झाडापाशी थांबलात. त्या झाडावर वटवाघूळ लटकलेलं आहे. ते डोळ्यांनी नव्हे, तर प्रतिध्वनीने (echolocation) जग ‘पाहत’ आहे. वस्तूवर आदळून परत येणाऱ्या ध्वनिलहरींमधून ते आपल्या मनात जगाचं चित्र उभं करतं. प्रकाशाचे रंग, झाडांची हिरवी पानं याला त्याच्या जगात काहीच अर्थ नाही.

– – हे आहे ‘उमवेल्ट‘!

१९०९ मध्ये, जेकब वॉन युक्सकुल (Jakob von Uexküll) नावाच्या एका जीवशास्त्रज्ञाने ‘उमवेल्ट’ ही संकल्पना मांडली.

– – उमवेल्ट’ म्हणजे एकाच परिसरात राहणारे वेगवेगळे प्राणी, जगाला वेगवेगळ्या पद्धतीने अनुभवतात. थोडक्यात सांगायचं तर, जगाचा तो छोटासा, मर्यादित भाग जो एखादा प्राणी आपल्या ज्ञानेंद्रियांनी ओळखू शकतो, तो म्हणजे त्याची ‘उमवेल्ट’… जग अफाट आहे. पण आपण तेवढंच जग अनुभवू शकतो, जेवढी आपली ज्ञानेंद्रिये पाहू शकतात. प्रत्येक जीव आपल्या ‘उमवेल्ट’लाच संपूर्ण आणि अंतिम वास्तव समजतो.

‘द ट्रुमन शो’ हा एक प्रसिद्ध इंग्रजी चित्रपट आहे. ही ट्रुमन बरबँक नावाच्या एका माणसाची कथा आहे, जो एक सामान्य आणि आनंदी जीवन जगतो. तो सीहेवन नावाच्या एका सुंदर, शांत आणि परिपूर्ण शहरात राहतो. त्याचे मित्र आहेत, त्याची पत्नी आहे आणि एक चांगली नोकरी आहे. पण त्याला एक गोष्ट माहीत नसते – त्याचे संपूर्ण आयुष्य एक खोटं आहे. तो जन्मापासून एका विशाल स्टुडिओमध्ये (जो शहरासारखा दिसतो) राहत आहे आणि त्याचे आयुष्य हा २४ तास चालणारा, जगभरात प्रसारित होणारा एक प्रचंड लोकप्रिय रिॲलिटी टीव्ही शो आहे.

या चित्रपटातील नायकाप्रमाणेच, “आपल्यासमोर जे जग सादर केले जाते, तेच आपण वास्तव म्हणून स्वीकारतो. ” आपणही आपापल्या ‘उमवेल्ट’ स्वीकारतो आणि तिथेच थांबतो.

माणसाची ‘उमवेल्ट’ जास्त गुंतागुंतीची आहे, कारण ती फक्त ज्ञानेंद्रियांवर अवलंबून नाही. ती अनेक पातळ्यांवर तयार होते:

१. जैविक ‘उमवेल्ट‘ (The Biological Umwelt):

आपल्या प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते. जो व्यक्ती रंगांधळा आहे, त्याचं आणि आपलं दृश्य जग वेगळं आहे. काही लोकांना इतरांपेक्षा जास्त तीव्र गंध येतो, किंवा चव समजते. काहीजण अतिशय मंद आवाजही ऐकू शकतात. हा आपल्या ‘उमवेल्ट’मधील नैसर्गिक फरक आहे.

२. अनुभवांची ‘उमवेल्ट‘ (The Experiential Umwelt):

हा आपल्यासाठी सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. आपले आयुष्यभरातील अनुभव आपल्या वास्तवाची आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाची निर्मिती करतात.

उदाहरणार्थ, सुरक्षितता: ज्या व्यक्तीचं बालपण युद्धजन्य परिस्थितीत गेलं आहे, तिच्यासाठी फटाक्याचा मोठा आवाज म्हणजे ‘धोक्याचा संकेत’ असतो.

या उलट, शांत वातावरणात वाढलेल्या व्यक्तीसाठी तोच आवाज फक्त ‘एक गोंगाट’ असतो.

इथे आवाज (संकेत) एकच आहे, पण दोन्ही ‘उमवेल्ट’मध्ये त्याचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे.

उदाहरणार्थ, आर्थिक स्थिती: गरिबीत वाढलेल्या व्यक्तीसाठी पैशाचं, बचतीचं आणि सुरक्षिततेचं महत्त्व वेगळं असतं. तिच्या जगात प्रत्येक निर्णय आर्थिक गणितावर अवलंबून असतो.

दुसरीकडे, श्रीमंतीत वाढलेल्या व्यक्तीच्या ‘उमवेल्ट’मध्ये हे संकेत तितकेसे तीव्र नसतात.

३. ज्ञान आणि संस्कृतीची ‘उमवेल्ट‘ (The Knowledge and Cultural Umwelt): आपलं शिक्षण, आपली नोकरी आणि आपली संस्कृती आपली ‘उमवेल्ट’ घडवते.

एकाच पुलाकडे पाहताना, एका इंजिनिअरला त्यातील ‘लोड-बेअरिंग स्ट्रेस’ आणि ‘टेन्साइल स्ट्रेंथ’ दिसेल, तर एका इतिहासकाराला त्या पुलाने शहराच्या विकासात बजावलेली भूमिका दिसेल. एका कवीला त्यात विरह किंवा मीलनाचं प्रतीक दिसेल. पूल तोच आहे, पण प्रत्येकाची ‘उमवेल्ट’ वेगळी आहे.

समस्या तेव्हा सुरू होते, जेव्हा आपण हे विसरतो की समोरच्या व्यक्तीची ‘उमवेल्ट’ आपल्यापेक्षा वेगळी असू शकते. आपण आपल्याच अनुभवांच्या आणि ज्ञानाच्या चष्म्यातून जगाला पाहतो आणि आग्रह धरतो की समोरच्यानेही ते तसंच पाहावं. इथूनच मतभेद आणि संघर्षाला सुरुवात होते. (सोशल मीडियावर तर हे २४ तास चालू असते! )

‘उमवेल्ट’ आपल्याला शिकवते की आपलं ज्ञान आणि अनुभव मर्यादित आहेत. आपण जगाचा एक छोटासा तुकडाच पाहू शकतो. ही जाणीव आपल्यातील अहंकार कमी करते. “मी सर्व काही जाणू शकत नाही आणि माझं जग हे एकमेव सत्य नाही”, ही भावना मनात रुजवणं, ही विकासाची पहिली पायरी आहे.

जेव्हा तुमचा कोणाशी वाद होईल, तेव्हा त्याला ‘जिंकण्याची लढाई’ म्हणून पाहू नका. त्याकडे ‘समोरच्याची उमवेल्ट समजून घेण्याची संधी’ म्हणून पाहा.

“तुझं चुकतंय! ” असं म्हणण्याऐवजी, “तू या निष्कर्षापर्यंत कसा पोहोचलास, हे मला समजून घ्यायचं आहे, ” असं म्हणून पाहा.

“हे असं कसं असू शकतं? ” या ऐवजी, “तुला असं का वाटतं, हे सांगशील का? ” असं विचारा. यामुळे संवाद तुटण्याऐवजी अधिक अर्थपूर्ण होतो.

सहानुभूती म्हणजे फक्त समोरच्यासाठी वाईट वाटणं नाही, तर त्याची ‘उमवेल्ट’ कशी असेल याची कल्पना करण्याचा प्रयत्न करणे (सह-अनुभूती). त्याचे अनुभव, त्याच्या भीति, त्याच्या आशा-आकांक्षा कोणत्या जगात घडल्या आहेत, हे समजून घेण्याचा प्रयत्न करणे. यामुळे आपण माणसांना त्यांच्या वागण्यावरून नाही, तर त्या वागण्यामागील कारणांवरून समजून घ्यायला लागतो.

एका टीममध्ये किंवा समाजात जितके जास्त प्रकारचे लोक असतील, तितक्या वेगवेगळ्या ‘उमवेल्ट’ एकत्र येतात. यामुळे होतं काय की, सगळ्यांच्या मर्यादित जगांना एकत्र करून, वास्तवाचं एक मोठं आणि अधिक स्पष्ट चित्र दिसू लागतं. जिथे एकाला धोका दिसतो, तिथे दुसऱ्याला संधी दिसू शकते. म्हणूनच, कामाच्या ठिकाणी किंवा समाजात विविधता असणं हे केवळ नैतिकदृष्ट्या चांगलं नाही, तर तेच व्यावहारिकदृष्ट्याही अत्यंत फायदेशीर आहे.

आपल्या रोजच्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग येतात, जेव्हा आपल्याला खात्री असते की, ‘आपणच बरोबर आहोत’ आणि समोरची व्यक्ती ‘चुकत आहे’. मग ते कौटुंबिक वाद असोत, ऑफिसमधील मतभेद असोत, किंवा मित्रांसोबतची चर्चा असो. आपण आपल्या मतांवर ठाम राहतो आणि समोरच्याला आपलं म्हणणं पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. पण या सगळ्यात आपण एक मूलभूत गोष्ट विसरतो. कदाचित हा संघर्ष ‘बरोबर’ विरुद्ध ‘चूक’ असा नसून, ‘एक जग’ विरुद्ध ‘दुसरं जग’ असा असेल तर? आपण जेव्हा हे स्वीकारतो की आपलं जग मर्यादित आहे, तेव्हाच आपल्याला इतरांचं जग शोधण्याची प्रेरणा मिळते. आणि याच जाणिवेत अधिक समृद्ध मानवी संबंधांची शक्यता दडलेली आहे.

पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला वाटेल की ‘मीच बरोबर आहे’, तेव्हा क्षणभर थांबा आणि स्वतःला विचारा: “मी माझ्या ‘उमवेल्ट’मधून बोलतोय की समोरच्याची ‘उमवेल्ट’ समजून घेण्याचा प्रयत्न करतोय? “

या एका प्रश्नाने तुमच्या जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात अफाट बदल घडू शकतो.

लेखक : श्री सलिल सुधाकर चौधरी 

 नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स 

 (मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया! )

प्रस्तुती : सुश्री सुलू साबणे जोशी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ यमुनाष्टकम् ॥ — (स्तोत्र पहिले) ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ यमुनाष्टकम् ॥ — (स्तोत्र पहिले) ☆ मराठी भावानुवाद – डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

☆ ☆ ☆ ☆

मुरारिकायकालिमाललामवारिधारिणी

तृणीकृतत्रिविष्टपा त्रिलोकशोकहारिणी ।

मनोनुकूलकूलकुञ्जपुञ्जधूतदुर्मदा

धुनोतु नो मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा ॥ १ ॥

*

मलापहारिवारिपूरिभूरिमण्डितामृता

भृशं प्रवातकप्रपञ्चनातिपण्डितानिशा ।

सुनन्दनन्दिनाङ्गसङ्गरागरञ्जिता हिता

धुनोतु नो मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा ॥ २ ॥

*

लसत्तरङ्गसङ्गधूतभूतजातपातका

नवीनमाधुरीधुरीणभक्तिजातचातका ।

तटान्तवासदासहंससंवृताह्निकामदा

धुनोतु नो मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा ॥ ३ ॥

*

विहाररासस्वेदभेदधीरतीरमारुता

गता गिरामगोचरे यदीयनीरचारुता ।

प्रवाहसाहचर्यपूतमेदिनीनदीनदा

धुनोतु नो मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा ॥ ४ ॥

*
तरङ्गसङ्गसैकतान्तरातितं सदासिता

शरन्निशाकरांशुमञ्जुमञ्जरी सभाजिता ।

भवार्चनाप्रचारुणाम्बुनाधुना विशारदा

धुनोतु नो मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा ॥ ५ ॥

*

जलान्तकेलिकारिचारुराधिकाङ्गरागिणी

स्वभर्तुरन्यदुर्लभाङ्गताङ्गतांशभागिनी ।

स्वदत्तसुप्तसप्तसिन्धुभेदिनातिकोविदा

धुनोतु नो मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा ॥ ६ ॥

*

जलच्युताच्युताङ्गरागलम्पटालिशालिनी

विलोलराधिकाकचान्तचम्पकालिमालिनी ।

सदावगाहनावतीर्णभर्तृभृत्युनारदा

धुनोतु नो मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा ॥ ७ ॥

*

सदैव नन्दिनन्दकेलिशालिकुञ्जमञ्जुला

तटोत्थफुल्लमल्लिकाकदम्बरेणुसूज्ज्वला ।

जलावगाहिनां नृणां भवाब्धिसिन्धुपारदा

धुनोतु नो मनोमलं कलिन्दनन्दिनी सदा ॥ ८ ॥

*

इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यस्य श्रीगोविन्दभगवत्पूज्यपादशिष्यस्य

श्रीमच्छङ्करभगवतः कृतौ यमुनाष्टकं सम्पूर्णम् ॥

— — 

मराठी भावानुवाद – – 

*

कायेचा धारिलासी तू मुरारी वर्ण अंधकार

तिन्ही लोक तृणसमान त्रिलोक शोकहार

तीरावर रम्य उपवन रमवी हटवुन अहंकार

मळभ मनी दाटता कालिंदानंदिनी करी दूर ॥१॥

*

जल सरितेचे नष्ट करिते घोर अशुद्धी सावट

पापांसी गुण अमृताचे शाश्वत करिती नष्ट

पावन पदस्पर्शाने करी नन्दनन्दन मंगलकर

मळभ मनी दाटता कालिंदानंदिनी करी दूर ॥२॥

*
तेजोमयी लहरी भूतांची पातके विमोचित

भक्तीचातक नवमाधुरी कामना करी तृप्त

निवास करिती कितीक जमती श्रद्धेने तटावर

मळभ मनी दाटता कालिंदानंदिनी करी दूर ॥३॥

*
स्वेदे रासलीलेच्या ओलेता झाला तीर

प्रवाह सुंदर इतुका असे वैखरीच्या पार

साथ धारानादाने वसुंधरा होत पवित्र 

मळभ मनी दाटता कालिंदानंदिनी करी दूर ॥४॥

*
प्रवाही तरंगे तीररेतीसी सदैव चमक

शरच्चंद्र चांदणे प्रवाहा तटा देई चमक

जलप्रवाहे पावन शोभायमान हो संसार

मळभ मनी दाटता कालिंदानंदिनी करी दूर ॥५॥

*
लावण्यवती राधिका जलक्रीडे गेली रंगोनी

पोषण करिसी जगताचे तव पवित्र स्पर्शानी

सप्तसिंधु समवेत कार्य तुज दुष्कर करणे पार

मळभ मनी दाटता कालिंदानंदिनी करी दूर ॥६॥

*
रंग अच्युताचा जलास तव वनिता देहांवर

मथुमक्षिका क्रीडा करीत जणू गोपीकायांवर

नारदादि ऋषी येत स्नानास्तव राधाकुंतल हार 

मळभ मनी दाटता कालिंदानंदिनी करी दूर ॥७॥

*

सदैव खेळत तीरावरच्या उपवनी नन्दकुमार

मल्लिका कदंब परागकणे तेजोमय रेणूतीर

स्नान करिता तव प्रवाहे पार हो भवसागर 

मळभ मनी दाटता कालिंदानंदिनी करी दूर ॥८॥

*

॥इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यांचे श्रीगोविन्दभगवत्पूज्यपादशिष्याचे

श्रीमच्छङ्करभगवत रचित निशिकान्त भावानुवादित यमुनाष्टक संपूर्ण॥

☆ ☆ ☆ ☆

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४ ईमेल nishikants@gmail. com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘आधी करते वेणी-फणी…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ ‘आधी करते वेणी-फणी…’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

☆

आधी करते वेणी-फणी

मग सजते लक्षुमीवाणी!

प्रास्ताविकः-

आपले शरीर सजवणे, शृंगारणे ही माणसाची एक विशेष आवड आहे. माणूस जेव्हापासून टोळ्या करून राहू लागला तेव्हापासून ही प्रवृत्ती अधिक वाढीस लागली असावी. तरुण वयात दुस-याला आकर्षित करण्यासाठी तरुण- तरुणी, आपण अधिक आकर्षक दिसावे म्हणून असे प्रयोग करू लागले असावेत.

आरंभी आदिमानव निसर्गात उपलब्ध असलेल्या नैसर्गिक वस्तूंचा शरीर शृंगारण्यासाठी उपयोग करी होता. त्यात पाने, फुले, फळे, झाडांच्या साली, शंख, शिंपले, माशांचे खवले, रंगीत खडे- दगड-गोटे, माती, प्राण्यांच्या त्वचा, केस, हाडे, दात, नखे, शिंगे इ. वस्तूंचा समावेष असे. या वस्तू तो अलंकार म्हणून वापरू लागला. यात हजारो वर्ष गेली असतील. वस्त्रे आणि धातूंचा शोध लागल्यानंतर विविध धातू आणि वरील नैसर्गिक सामग्री यापासून अलंकार घडवण्याची कला विकसित होत होत पुढे तर संस्कृति विकासाबरोबर हे स्वतंत्र, समृद्ध, नेत्रदीपक असे कलाक्षेत्रच विकसित झाले!

यादवकालीन, शिवकालीन, पेशवेकालीन अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंतचा काळ कसा होता, या काळात स्त्रिया कोणते अलंकार परिधान करीत हे समजून घेणे रंजक ठरेल.

फणेरपेटी

रोजच्या प्रसाधनासाठी स्त्रियांकडे एक आयताकृती ‘फणेरपेटी’ (मेकप बाॕक्स) असायची. ती सागवान, शिसम, चंदन अशा सुंदर लाकडाची असायची. तिचे लाकडी झाकण पितळी, रुपेरी, चांदीची फुले, पाने बसवून सुशोभित केलेले असे. पेटीच्या पुढे पितळी कडी-कोयंडा असे. झाकणाला मधोमध आडवी बिजागिरी असायची. अर्धे झाकण उघडले की आतले दर्पण बाहेर यायचे. ते पेटीच्या पुढील फळीवर कोन साधून उभे केले की त्यात सहज मुखावलोकन करता यायचे.

पेटीमध्ये विविध आकाराचे कप्पे असायचे. त्यात वस्तूंच्या आकारमानाप्रमाणे विविध प्रसाधनद्रव्ये व साधने ठेवली जायची.

या फणेरपेटीत केस विंचरण्याच्या विविध आकाराच्या फण्या असायच्या. या फण्या लाकूड, हस्तिदंत अशा पदार्थापासून घडवलेल्या असत. पेटीत पिंजर, मेण, काजळाच्या चांदीच्या डब्या, केसांचे आकडे, चाप, सोन्या-रुप्याची नाजुक फुले, वेण्यांची टोके बांधण्यासाठी लागणारी रेशीम-लोकरीची अगुळे, आंबाड्यावर घालायच्या जाळ्या, आत्तराच्या कुप्या असे साहित्य ठेवलेले असे. स्त्रिया त्यांची वेणीफणी एकांतात, एका ठराविक वेळी, ठराविक जागी बसून करीत. वेळीअवेळी, पुरुषांसमोर, चारचौघात, कुठेही करीत नसत.

आता स्त्रियांचे अलंकार, आभूषणे कशी होती ते पाहू.

यादवकालीन समृद्ध महाराष्ट्रः-

एके काळी महाराष्ट्रातील स्त्रिया नखशिखांत आभूषणे ल्यायच्या. थोडक्यात म्हणजे त्या वेळच्या ‘गृहलक्ष्या’ दागिन्यांनी अक्षरशः लगडलेल्या असायच्या. नदीवर धुणीभांडी करताना त्यांच्या हातातले सोने घाटाच्या दगडी पाय-यांवर जायफळासारखे झिजायचे! (ब. मो. पुरंद-यांची उपमा- पहा ‘राजा शिवछत्रपती’)

स्त्रिधनः-

विवाहात वधुपिता यथाशक्ती आपल्या कन्येला विविध अलंकारांनी मंडित करून मग जामाताला तिचे ‘सालंकृत कन्यादान’ करीत असे. पित्याने विवाहात दिलेले हे मौल्यवान अलंकार हेच तिचे स्त्रिधन. विवाहानंतर पतीही वेगवेगळ्या सणवारांच्या निमित्ताने, मंगल प्रसंगी, विजयप्रसंगी, आनंदाच्या प्रसंगी आपल्या पत्नीला कौतुकाने वेळोवेळी यथाशक्ती अलंकार भेट देत असे. अशा रीतीने तिचे स्त्रिधन वाढत राही. या स्त्रिधनावर पती सहसा आपला अधिकार सांगत नसे.

या गृहलक्ष्मीची कन्या जेव्हा उपवर होई तेव्हा तिच्या विवाहात तिची आई आपल्या माहेरकडून मिळालेले स्त्रिधन कन्येला देत असे. एकापेक्षा आधिक मुली असतील तर ते स्त्रिधन त्या मुलींमधे समान प्रमाणात वाटले जाई. अशा रीतीने स्त्रियांच्या आर्थिक सुरक्षिततेची, स्थैर्याची समाजव्यवस्था आणि आर्थिक शिस्त पिढ्यानपिढ्या पाळली जात होती.

अलंकार द्रव्येः-

विविध आभूषणांची सूची पुढे दिली आहे. हे अलंकार सोने, चांदी, रुपे, तांबे, रेशीम यापासून घडविले जात. काही अलंकारात मौल्यवान रत्ने, प्रवाळ, मोती, दुर्मिळ खडे जडविलेले असत. ज्याच्या त्याच्या वर्णाप्रमाणे, सामाजिक प्रतिष्ठेप्रमाणे, आर्थिक परिस्थितीप्रमाणे विविध दागिने वापरले जात.

पुढे दिलेली अलंकारसूची वाचल्यावर कळेल आपल्या पूर्वजांची समृद्धी, संपन्नता, सुसंस्कृतता, रसिकता, कलात्मकता, कलासक्तता!

अलंकारसूची

शिरोभूषणे :-

केतकीपत्र, मागच्या बाजूस मूद, राखडी, अग्रफूल, चूडामणी, सोनवेणी.

केशसंभार/ केशकलापावर धारण करण्याचे अलंकारः-

केसांची तिपेडी, पाचपेडी, सातपेडी वेणीच्या शेपट्यावर चांदीसोन्याचे घुंगरांचे रेशमी गोंडे, वरपासून टोकापर्यंत खोचायची सोन्याची गुलाबपुष्पे, फुलाची वेणी, वेणीत सीस फूल, मोर (सोन्याचा वा रत्नांचा), बोर, वेणीऐवजी अंबाडा असल्यास पाणीदार नाजुक मोत्याची जाळी.

भाळ/कपाळ:-

फरा, पिंपळपान, बिंदी, बिजवरा

कर्ण भूषणे :-

लोंबते भोकर, त्यावर कासव, मासा, कुडी, बुगड्या, बाळ्या, लवंगा, झुबे, वेल, मासबाळी, चंद्रबाळी, चौफुले, सर्वमान्य लटलटणारे पाचू-माणकाचे डूल. कानातील आभूषणांच्या भाराने कानाच्या पाळीची छिद्रे ओघळू नयेत म्हणून एक साखळी कानापासून केसांवर खोचलेली असे.

नासिका आभूषणे :-

सुंकले, चमकी, मोरणी, नथ वा नथनी. नाकापासून कानापर्यंत वेल.

कंठ/गळा :-

हंसली, चोकर, पोत, दूड, मंगळसूत्र, मोतीसर अनेकपदरी, कंठी, साज कोल्हापुरी, कंठी बहुकोनी, मणिमाळ आखूड वा लांब, लफ्फा, पेट्या, तन्मणी, चंद्रहार, चंद्रहार- टिकल्यांचा बहुपदरी, दोन किंवा पाच पदरी चपलाहार, छोटा चंद्रहार, मोहनमाळ, बोरमाळ, रायणमाळ, एकदाणी, राणीहार, सरी, गळसरी, टिका, ठुशी, वज्रटीक, श्रीमंतहार, लक्ष्मीहार, चिंचपेटी, सावित्रीहार. एकदाणी, एकसर, ओवेर साज, कंठा, काशी ताळी, गहू माळ, गोखरू माळ, गोफ, चंद्रहार चपलाकंठी, चपलाहार, कोल्हापुरी साज, चाफेकळी माळ, चिंचपेटी, चितांग, चौसरा, जोंधळी पोत, टीकमणी सर (टिका), डोरले, डाळी टिका, तन्मणी, ताईत, तांदळी पोत, तायत्या, दुल्लडी, नळ्याची पोत, पाभर, पुतळ्यांची माळ, पोहेहार, बकुळहार, मंगळ सूत्र, माळ, मोहनमाळ, लड, लफ्फा, लक्ष्मीहार, वज्रटीक, बन बव शिरण, श्रीमंतहार, सर, सरी, साखळी, साज, हरपर रेवडी हार, हार, वाघनखे, फलकमाला (कवचासारखी दिसणारी मोठ्या आकाराची कॉलर)

बाहुभूषणे :-

दंडपट्टा, वाकी, नागफणी, बाजूबंद

मणिबंध/मनगट :-

बांगड्या, गोठ, पाटल्या, बिलवर, तोडे, कंगन, कडे, शिंदेशाही तोडे, पिछोडी, पोहोची

हाताची बोटे :-

पवित्रक, अंगठी, अंगुळबंध (चार अंगठ्यांचा), नाग, नागमूद, मुदी, मुद्रा, मुद्रिका, वळे, सिका, दर्भाची अंगठी.

कटिबंध/कंबर :-

करगोटा किंवा करदोटा, कंबरपट्टा, माजपट्टा, छल्ल्ला, मेखला, शृंखाला.

अलंकार धारण करण्याचा संकेतः-

मस्तकापासून कटीपर्यंत सुवर्णालंकार आणि कटीपासून पायापर्यंत चांदी, रुपे, तांब्याचे अलंकार धारण करावेत असा संकेत कटाक्षाने पाळला जात असे. राजाला मात्र पायात सुवर्णालंकार धारण करण्यास शास्त्राची अनुज्ञा होती. चांदी शीतगुणी असल्याने ती पद्मभागी धारण करावी हे याचे आयुर्वेदीय शास्त्रिय कारण आहे.

पद्मभूषणे :-

पैंजण, वाळे, घुंगरू, साखळ्या, तोरड्या

पायाचा अंगठा :-

पोतदार (पोल्हार), अनवट

पायाची बोटे:-

वळे, जोडवी, मासोळ्या, विरोली, मंजीर

अन्य अलंकारः-

बाळलेणीः –

कडे, कमर साखळी, कांडवळे (कांडोळे), कुयरी, घुंगरू, सुंकले, चुटक्या, डूल, ताईत, तांबोळे, दसांगुळे, बिंदल्या, बेडी, मनगट्या, वाकडा ताईत, वाघनखे, वाळा (एक दागिना), साखळी, हंसळी, दृष्ट मण्यांची माळ, आस्वलाच्या केसांचा ताईत.

पुरुषांचे अलंकारः-

शिरपेच, कुंडले, भिकबाळी, कंठा, कडे, सलकडे, वेढे, वाघनखे, कमरसाखळी, अंगठी, कलगी, कांडवाळे, मौलमणी, शिरस्त्राण

अलंकार संग्रहाची रीत-

हे अलंकार सहसा पितळी पेढेघाटी डब्यात, लाकडी पेट्यात, रेशमी वस्त्रात गुंडाळून, केवडा, कापूर, चंदनचूर्ण अशा सुगंधी जंतुनाशक द्रव्यांच्या सहवासात, तिजोरी, बळद, कपाट अशा ठिकाणी कडी-कुलुपात सुरक्षित ठेवले जायचे. दरवर्षी सगळ्या दागिन्यांना तसेच रेशीम, लोकर व जरीच्या महावस्त्रांना चैत्रातले ऊन दाखविले जाई. झळाळीसाठी धातूचे अलंकार शिकेकाई आणि रिठ्याच्या कोमट पाण्याने धुऊन कोरडे केले जात. मोत्यांच्या अलंकारांना मात्र भाताच्या साळीच्या कोरड्या भुश्श्यात हलक्या हाताने चोळून, घोळवून चमकवले जायचे.

समारोपः-

काय मग? कशी वाटली ही अलंकारांची नेत्रदीपक दुनिया? मजा आली ना वाचताना? यातला कुठला आयटम सिलेक्ट करताय या वर्षी तुम्ही आपल्या स्वतःसाठी, आपल्या आई, पत्नी, लेक, भगिनीसाठी? म्हणजे तशी पु. ना. गाडगीळ, किंवा चंदूकाका किंवा रांका, किंवा अष्टेकर किंवा लागू बंधू किंवा तनिष्काकडे आर्डर द्यायला हो!

गमतीचा भाग सोडू द्या.

लेखाचा समारोप करताना मात्र मला समर्थांच्या दासबोधातील ओव्या आठवतात. समर्थ म्हणतात माणसाने बाह्य शरीर शृंगारले तसे अंतरंगही सजवावे. विविध विद्या, कला, कौशल्ये, संपादन करुन गुणसंपन्न व्हावे. आपले व्यक्तिमत्व गुणांनी सजवावे, चतुर, बहुगुणी व्हावे. लोक त्याकडे अधिक आकृष्ट होतील. समाजोद्धारासाठी त्याची अधिक आवश्यकता आहे. समर्थ म्हणतात….

देहे नेटकें श्रुंघारिलें l

परी चातुर्येविण नासलें l

गुणेंविण साजिरें केलें l 

बाष्कळ जैसें ll

 

अंतर्कळा श्रुंघारावी l 

नानापरी उमजवावी l 

संपदा मेळऊन भोगावी l 

सावकाश ll

चातुर्ये श्रुंघारे अंतर l 

वस्त्रे श्रुंघारे शरीर l 

दोहिमधे कोण थोर l 

बरे पाहा ll

बाह्याकार श्रुंघारिलें l 

तेणे लोकांच्या हातास काये आलेंl 

चातुर्ये बहुतांसि रक्षिलें l 

नाना प्रकारें ll

ll जय जय रघुवीर समर्थ ll

(दासबोध द. १४ स. ६)

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares