मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ अंधारातून प्रकाशाकडे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती– उज्ज्वला केळकर ☆

उज्ज्वला केळकर

? इंद्रधनुष्य ?

☆ अंधारातून प्रकाशाकडे… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती– उज्ज्वला केळकर

खूप वर्षापूर्वी`रिडर्स डायजेस्टमध्ये वाचलेली ही कथा. ती मनाच्या कुपीत कायमची वसली.

तेरा-चौदा वर्षाचा अंध मुलगा डेव्हिड हार्टमन, आपल्या बाबांना मोठ्या उमेदीने विचारतो, `बाबा… अगदी मनापासून सांगा हं… मी डॉक्टर होऊ शकेन? ‘

स्वभावाने प्रॅक्टिकल आणि व्यवसायाने बँकर असलेले त्याचे बाबा आतून हलतात. एकदम गप्प होतात. गहन विचारात गढून जातात. `काय सांगायचं या अंध मुलाला? पण या अति उत्साही आणि उमद्यामुलाचा तेजोभंग तरी कसा करायचा? ‘

ते म्हणतात, `डॉक्टर? बेटा, तू प्रयत्न केल्याशिवाय तुला कसं कळेल? तू प्रयत्न करशील ना? ‘

जन्मताच डोळ्याच्या लेन्समध्ये प्रॉब्लेम घेऊन आलेला डेव्हिड, आठ वर्षाचा झाला आणि त्याला पूर्ण अंधत्व आलं. तेव्हापासून तो आपल्या बाबांना, `मी हे करू शकतो का? .. ते करू शकतो का? … ‘ असं सतत विचारायचा.

दहा वर्षाचा असताना त्याने बाबांना विचारले, `बाबा, मी बेसबॉल खेळू शकेन? ‘

`वेल, चल! प्रयत्न करूया. ‘ त्याचे बाबा म्हणाले. त्या दोघांनी मग त्यावर विचार करून मार्ग शोधला. बाबांनी तो बॉल जमिनीवरून सरपटत त्याच्या दिशेने सोडायला सुरुवात केली. डेव्हिड हळूहळू बॉलच्या गतीचा आवाज ओळखून बॉल पकडायला शिकला. नंतर तो बॅटिंग शिकला. गवतातून फिरत येणार्‍या बॉलचा आवाज एकदम आतून ऐकून तो बॉल कॅच करायला शिकला. काही काळाने त्याने यात प्राविण्य मिळवले.

Realm of possibility… काही अशक्यप्राय गोष्टी शक्य होतात… या तत्वानुसार डेव्हिडच्या कुटुंबाने दृढ निश्चय केला आणि त्याला कठोरपणे स्वावलंबी बनवायला सुरुवात केली. काही वेळा काहीच न दिसल्यामुळे तो रडायला लागायचा आणि म्हणायचा, `ममा, मी काहीच करू शकत नाही. ‘ मग त्याची आई त्याला कुशीत घेऊन म्हणायची, `माहीत आहे रे… ‘ डेव्हिडची बहीण बार्बरा मात्र कठोर होती. अर्थात त्याच्या भल्यासाठीच. आपलं ब्रेलचं घड्याळ जर पहिल्या मजल्यावर विसरला, तर डेव्हिड तिला आणून द्यायला सांगायचा. बार्बारा म्हणायची, `तुझा तू जा आणि आण. तुला काय वाटतं, कायम तुझ्या दिमतीला कुणी ना कुणी असणार आहे? ‘ 

– – तर असा डेव्हिड मोठा होऊ लागला. त्याला नक्की कळलं, की अंधत्व ही ट्रॅजिडी नाहीये. आपण काहीही करू शकतो. त्याचा हा आत्मविश्वास दिवसेंदिवस बळावत गेला. तेराव्या वर्षी त्याने आपल्या आई-बाबांना आणि बहिणीला सांगून टाकलं, की त्याला डॉक्टर व्हायचय…

डेव्हिडने शिक्षणाचा मार्ग नक्की केला आणि त्या नवीन करिअरचा अभ्यास सुरू केला. त्याने अंध मुलांसाठी असलेली स्थानिक शाळा सोडली आणि त्याने आपलं नाव `हारटाउन्स हायस्कूल ‘ मध्ये घातलं. सगळ्यांना Realm of possibility चं.. तत्व मान्य होतं, तरीही… मनोदोष चिकित्सक होणं, त्या Realm of possibilityच्या नक्कीच बाहेरचं होतं. त्यांना वाटत होतं, डेव्हिडची महत्वाकांक्षा मूर्खपणाची आहे. कॉलेजमध्ये त्याच्या शिक्षकांनीदेखील त्याला समजावायचा खूप प्रयत्न केला. ते म्हणाले, `तुझ्या आवाक्यातले इतर विषय का निवडत नाहीस? म्हणजे इतिहास वगैरे… ‘

डेव्हिड म्हणाला, `मी काही इतर माणसांपेक्षा वेगळा नाहीये. `मला दिसत नाही, हे खरय, पण प्रत्येक माणसात काही ना काही अपंगत्व असतंच! मला वाटतं, जे कुणी काही विशेष किंवा आव्हानात्मक गोष्टी करत नाहीत, ते खरं तर अपंग आहेत. मी सायकीअ‍ॅट्रिस्ट व्हायचं ठरवलय, कारण माझा माझ्यावर ठाम विश्वास आहे. मी डॉक्टर झाल्यावर माझ्यासारख्या दृष्टी नसलेल्या असंख्य माणसांना नक्की मदत करू शकेन. ‘

कॉलेजच्या दुसर्‍या वर्षात त्याची भेट, मेडिकलची विद्यार्थिनी असलेल्या चेरील वॉकरशी झाली. हिरवे डोळे असलेली ही चेरील वॉकर अतिशय हुशार होती. नंतर त्यांच्या मैत्रिचं रुपांतर त्यांच्या प्रेमात झालं. १९७२मध्ये कॉलेजमध्ये असताना त्याला सगळ्यात जास्त मार्क मिळाले.

डेव्हिडने दहा मेडिकल कॉलेजमध्ये अर्ज केले. त्यापैकी आठ कॉलेजेसनी त्याला प्रवेश द्यायला नकार दिला. २७ एप्रीलच्या दुपारी त्याला नवव्या कॉलेजमधूनही नकाराचं पत्र मिळालं. त्याला वाटत होतं, की हे कॉलेज तरी त्याला प्रवेश देईल. पण इथेही नकारच आला. डेव्हिड मनातून एकदम खचला. हताश झाला.

– – फिलाडील्फियामधलं दहावं कॉलेज, टेंपल युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन… त्याचे असिस्टंट डीन आणि प्रवेश प्रक्रियेचे प्रमुख होते, डॉ. एम. प्रिन्सब्रिगहॅम. त्यांनी डेव्हिडच्या अर्जाचं जोरदार समर्थन केलं. त्यांनी सांगितलं, `जर आपण ऑलिम्पिकच्या समितीत असतो, आणि शंभर मीटरच्या शर्यतीत एक पाय नसलेला स्पर्धक आला असता, तर आपण त्याला धावू दिलं असतं ना! … डेव्हिडने आधीच अनेक अशक्यप्राय गोष्टी यशस्वीरित्या करून स्वत:ला सिद्ध केलं आहे. आपण त्याला प्रवेश देऊया आणि बघूया, तो कुठपर्यंत जातो. ‘

दुसर्‍या दिवशी डेव्हिडला त्याच्या आईचा फोन आला, ती म्हणाली, `तू खूप दिवस ज्याची वाट पाहत होतास, ते पत्र तुला आलय. ‘ त्याच्या आईचा आवज दाटून आला. तिला पुढे फोनवर बोलणं अशक्य झालं. बार्बाराने फोन घेतला आणि म्हणाली, `यू हॅव डन इट… ‘ तिलादेखील अश्रू आवरले नाहीत. `तुला टेंपल युनिव्हर्सिटीने स्वीकारलय. ‘ आणि डेव्हिड ध्येयाच्या वाटेवर चालू लागला.

… वाट बिकट होती. डेव्हिडला त्याची कल्पनाही होती. पण त्याला डोंगरमाथा आणि तिथून दिसणारं निसर्गाचं दिव्य रूप… त्याचं ध्येय दिसत होतं.

सुरुवातीलाच त्याला अ‍ॅनाटॉमीच्या इंट्रोडक्टरी कोर्सेसच्या वेळीच अनेक अडचणी यायला लागल्या. हातात रबराचे ग्लोव्हज घालून, अनेक मोठे अवयव तो चाचपून ओळखायला लागला. पण लहान अवयव विशेषत: nerve plexuses ओळखायला त्याला ग्लोव्हज काढावे लागले. त्याची बोटं formaldehyde preservative मुळे बधीर होत. हे सगळं चालू असताना डेव्हिडने या विषयांना अनुसरून असलेली असंख्य पुस्तके विकत घेतली. या विषयाच्या अनेक ध्वनिमुद्रिकाही विकत घेतल्या.

मेडिकलच्या पहिल्या वर्षात डेव्हिड आणि चेरीने लग्न केले. तिसर्‍या वर्षात असताना खरं आव्हान सुरू झालं. युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये रोग्यांना तपासणं, त्यांना ट्रीटमेंट देणं सुरू झालं. त्याला x-ray बघता येत नसल्याने, तो कान, डोळे, तोंड आपल्या सहका-यांच्यावाचून तपासू शकत नसे. x-ray चं वर्णन त्याला त्याचे सहकारी किंवा नर्स सांगतील, त्याप्रमाणे त्याला उपचार करावे लागत. त्या बाबतीत तो त्यांच्यावर अवलंबून होता, पण पुढे त्याने स्टेथॉस्कोप आणि स्पर्शज्ञान खूप विकसित केलं.

२७ मे १९७६ला त्याला मेडिकलची डिग्री मिळाली. त्याने एक गोष्ट नक्कीच सिद्ध केली, की तो इतरांपेक्षा वेगळा नाही. त्याला अगोदर नकार देणारे प्रोफेसरही पदवीदान समारंभाला आले होते. ते म्हणाले,

` Devid is not normal… he is super normal… ‘

अमेरिकेतला तो पहिला अंध डॉक्टर. त्यानंतर त्याच्यासाठी एक मोठा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. अनेक लोक त्याच्या जिद्दीवर, अथक परिश्रमावर, दिगंत आत्मविश्वासावर भरभरून बोलले. RFB चे प्रेसिडेंट जॉन कॅसल, त्याचं कौतुक करताना म्हणाले, ‘माणसाच्या अत्युच्च तेजाचं हे दर्शन आहे. ‘ भाषण संपवताना ते म्हणाले, `डेव्हिडच्या या उदाहरणाने, आपल्याला एक नवीन विश्वास मिळालाय, तो म्हणजे, माणसाला काहीही मिळवणं शक्य आहे. ‘

… सभागृहातील सगळे जण त्याला मानवंदना द्यायला उभे राहिले.

– – डेव्हिडने या सगळ्याला शेवटी दोनच वाक्यात उत्तर दिलं, `माझ्या बाबांचं बरोबर होतं. ते म्हणायचे, ‘ प्रयत्न केल्याशिवाय तुला कसं कळेल, तू काय करू शकशील ते? ‘

– – – आपण आपल्याकडे सगळं आणि भरभरून असलं, तरी `हे नाही, ते नाही’, म्हणून रडगाणं गातो. डेव्हिडचं आभाळाएवढं कर्तृत्व आपल्याला नक्कीच प्रेरणा देईल.

लेखक :  अज्ञात 

प्रस्तती : उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – १५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

आमचे एक सुहृद शांतिनिकेतनच्या विश्वभारती संग्रहालयाला भेट देण्यासाठी गेले होते. तेंव्हा त्यानी मला हा फोटो पाठवला व सांगितले की हे रविंद्रनाथ टागोर यांचे नोबेल पुरस्कार पदक आहे पण मूळ पदक नाही तर त्याची प्रतिकृती आहे कारण मूळ पदक २५ मार्च २००४ रोजी चोरीला गेलं म्हणून नोबेल फाउंडेशनने ही प्रतिकृती डिसेंबर २००४ मध्ये विश्वभारती संग्रहालयाला भेट दिली आहे.

मला हे ऐकून धक्काच बसला. ज्या पदकाचा अभिमान प्रत्येक भारतीयाला वाटला पाहिजे, ते पदक कुणी चोरू कसं शकतं? जे पदक आजपर्यंत दुसरं कुणीही मिळवू शकलं नाही. एवढी दुर्मिळ, लाख मोलाची वस्तू, जी पुढच्या पिढ्यांना शतकानुशतके प्रेरणा देत राहिली असती ती कांही पैशांसाठी चोरायची? नोबेल फाउंडेशनने त्याची प्रतिकृती दिली म्हणून बरे, नाहीतर पुढील पिढ्यांना हे पदक डोळे भरून बघायला सुद्धा मिळालं नसतं. तरीपण त्या खालच्या ‘Replaced’ या शब्दाने प्रत्येक भारतीयाची मान शरमेने खाली जातच असणार आणि जातच राहणार. हा भारतमातेच्या शुभ्र वसनावरचा कधीही पुसला न जाणारा डाग आहे. ज्या पदकामुळे भारतमाता गौरवान्वित झाली होती, त्याच पदकाच्या चोरी मुळे ती अवमानित झाली आहे. याहून शरमेची गोष्ट म्हणजे आजतागायत या चोरीचा छडा लागलेला नाही. असो. आपण प्रतिकृती मध्येच समाधान मान

 

गीत : ४३

THE day was when I did not keep myself in readiness for thee; and entering my heart 

unbidden even as one of the common crowd, unknown to me, my king, thou didst press 

the signet of eternity upon many a fleeting moment of my life.

And to-day when by chance I light upon them and see thy signature, I find they have lain scattered in the dust mixed with the memory of joys and sorrows of my trivial days forgotten.

Thou didst not turn in contempt from my childish play among dust, and the steps that I heard in my playroom are the same that are echoing from star to star.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ४३ ☆

*

अज्ञानाचा मेरू

लिप्त मी संसारू

मनाचे ते वारू

उधळतसे॥

*

ना सांगावा धाडला

नकळत आला

प्रवेश त्वां केला

माझ्या काळजात॥

*

माझे किती क्षण

तुझे स्पर्श लेवून

अमर होऊन

विस्मरतो मी॥

*

आज पाही जेंव्हा 

त्या क्षणांकडे तेंव्हा

तुझिया स्पर्शाची

अनुभूती येते॥

*

जपून ना ठेविले

मोल ना जाणिले

उदारे जे दिले

पडे धुळीमध्ये॥

*

माझे मूढपण

बाल्य समजून

मान अपमान

लेखिशी समान॥

*

अप्रुप त्या दिसाचे

तुझ्या पदरवाचे

दैवी अस्तित्वाचे

कळले नाही॥

*

ब्रम्हांडी ध्वनीत

पदरव होत

ताऱ्यांवर तेथ

ऐकू येती॥

*

आता चमत्कार

फोल बाह्यात्कार

होई साक्षात्कार 

अंतिम वेळी॥

*

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

——

☆ गीत : ४४ ☆

THIS is my delight, thus to wait and watch at the wayside where shadow chases light and the rain comes in the wake of the summer.

Messengers, with tidings from unknown skies, greet me and speed along the road. My heart is glad within, and the breath of the passing breeze is sweet.

From dawn till dusk I sit here before my door, and I know that of a sudden the happy moment will arrive when I shall see.

In the meanwhile I smile and I sing all alone. In the meanwhile the air is filling with the perfume of promise.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत : ४४ ☆

*

कधीतरी बसतो, रस्त्याच्या कडेला

प्रकाश सावल्यांचा खेळ पाहण्या

आणि अनुभवतो पहिला पाऊस,

जो येतो ग्रीष्माची चाहूल देण्या

*

असेच भेटतात प्रेषित मजला,

नभाशी अनामिक बंध बांधण्या

अशीच वाऱ्याची झुळूक येते,

सुवासांचा गोडवा चाखण्या

*

बसतो दारी, उषेपासून निशेपर्यंत,

क्षण सुखाचा अवचित वेचण्या

झोका हवेचा अलगद येतो,

सुगंध आश्वासक वचनांचा भरण्या

*

एकटाच मग मी मन भरुन हसतो,

बंद मुठीतील सुख वाटण्या

अजूनही दारी मी बसतोच आहे

आलाच तो, तर संधी न दवडण्या

*

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

☆ गीत : ४५ ☆

HAVE you not heard his silent, steps? 

He comes, comes, ever comes.

Every moment and every age, every day and every night he comes, comes, ever comes.

Many a song have I sung in many a mood of mind, but all their notes have always proclaimed, “He comes, comes, ever comes. ” 

In the fragrant days of sunny April through the forest path he comes, comes, ever comes.

In the rainy gloom of July nights on the thundering chariot of clouds he comes, comes, ever comes.

In sorrow after sorrow it is his steps that press upon my heart, and it is the golden touch of his feet that makes my joy to shine

—–

मराठी भावानुवाद : गीत ४५ ☆

*

दिवस असो वा रात्र असो,

बाल्य असो वा जरा

त्याचे पदरव पडती कानी,

तो येतो, येतोच खरा॥

*
गीते गातो प्रीतीची,

कधी विरहाची 

कितीक त्या तऱ्हा

परि शब्दांचा घोष एकच,

तो येतो, येतोच खरा॥

*

वसंतातला सुगंध प्राशिता 

वा धुंद बरसता जलधारा

दौडत दौडत मेघ-रथातून,

तो येतो, येतोच खरा॥

*

चरण कमल ते हृदयी उमटे,

हरवता जीवनी किनारा

हेम-स्पर्श तो कुशीत घेतो,

तो येतो, येतोच खरा॥

*

– क्रमशः भाग १५.

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “बुद्धी दे रघुनायका” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ “बुद्धी दे रघुनायका” ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

साधक समर्थांच्या अंतःकरणातील आर्त स्वर

प्रस्तावना

दुर्गुणांशी झुंज, असहाय्यतेची कबुली आणि शरणागतीतील तेजस्वी साधना.

समर्थ रामदासांच्या साधनाकाळात उमटलेले हे आर्त उद्गार म्हणजे एका संताच्या अंतःकरणातील निखळ प्रामाणिकपणा. _“युक्ति नाही बुद्धि नाही”_ अशी स्वतःच्या अपूर्णतेची निर्भीड आणि प्रांजळ कबुली देत ते ज्या स्वरात रामरायाला साद घालतात, तो स्वर केवळ भक्तीचा नाही, तर आत्मपरिक्षणाचा, आत्मनिवेदनाचा आणि अखेरीस संपूर्ण शरणागतीचा आहे !

ही कविता म्हणजे एका साधकाच्या अंतर्मनातील वादळाचे काव्यमय चित्रण. मनाची चंचलता, वासनांची चक्रावर्ते, विवेकाचा अभाव, सामाजिक अपयश, आत्मविश्वासाची ढासळलेली भिंत— या सर्वांचा अत्यंत हळवा, तरीही धैर्यवान स्वीकार येथे दिसतो. समर्थांचा हा आर्त स्वर त्यांना अधिक महान करतो; कारण येथे संतत्वाचा गर्व नाही, तर साधकाची नम्रता आहे.

आत्मस्वीकाराचा निर्भय प्रकाश

युक्ति नाही बुद्धि नाही। विद्या नाही विवंचिता॥

या आरंभीच्याच ओळीत समर्थ जणू आपल्या मनाच्या दर्पणात स्वतःकडे पाहतात. आत्मप्रौढीचा लवलेश नाही. स्वतःच्या उणिवांची जाणीव हेच खरे साधनाचे पहिले पाऊल.

साधक जेव्हा आपल्या दुर्गुणांना ओळखतो, तेव्हा तो त्यांच्यापासून सुटण्याच्या मार्गावर निघतो. समर्थांची ही कबुली म्हणजे आत्मशुद्धीचा आरंभबिंदू. येथे संतत्वाचा दिव्य तेजोमय मुकुट नाही, तर साधकाची विवंचना आहे—एक जिवंत, धडधडणारी, प्रामाणिक विवंचना.

मनाचा उच्छाद आणि वासनांची वावटळ

मन हे आवरेना की। वासना वावडे सदा॥ कल्पना धावते सैरा…

मनाची ही चंचलता म्हणजेच साधनेतील सर्वांत मोठा अडसर. समर्थांनी या अवस्थेचे केलेले वर्णन अत्यंत जिवंत आहे. कल्पना सैरभैर धावते, वासना विवेकाला झाकोळून टाकते, आणि मनावरचे नियंत्रण सुटते.

ही अवस्था केवळ समर्थांची नाही, तर प्रत्येक साधकाची आहे. म्हणूनच ही कविता सार्वकालिक ठरते. समर्थांचे मनही आपल्यासारखेच चंचल आहे, हे जाणवले की त्यांच्या संतत्वाशी आपली जवळीक वाढते.

परंतु या चंचलतेवर ते स्वतःच्या सामर्थ्याने विजय मिळवण्याचा गर्व करीत नाहीत; ते विनम्रतेने म्हणतात, “बुद्धी दे रघुनायका.

हा ‘दे’ शब्द म्हणजे संपूर्ण शरणागतीचा उत्कट स्वर.

सामाजिक अपुरेपणाची वेदना

बोलता चालता येना। कार्यभाग कळेचिना॥ बहुत पीडिलो लोकी…

येथे समर्थांची वेदना अधिक गडद होते. समाजात स्वतःचे अपुरेपण जाणवणे ही फार मोठी मानसिक वेदना असते. लोकांच्या हसण्याने, टोमण्याने, दुर्लक्षाने मन विदीर्ण होते.

संसारी श्लाघ्यता नाही। सर्वहि लोक हासती॥

या ओळींतून त्यांच्या मनातील असहाय्यता झिरपते. एक संत म्हणविणारा पुरुष स्वतःला “टोणपा” म्हणतो—याहून मोठी आत्मनम्रता कोणती?

ही वेदना त्यांच्या अहंकाराला भेदून जाते आणि त्यांना अधिकच शरणागत बनवते.

असहाय्यतेचे सावट आणि शरणागतीचा प्रकाश

चित्त दुश्चित होता हे। ताळतंत्र कळेचिना॥ आळसू लागला पाठी…

मन, बुद्धी, चित्त, वर्तन—सर्वच स्तरांवर अपयशाची छाया आहे. परंतु समर्थ या अंधारात हरवून जात नाहीत. उलट, त्या अंधारातूनच ते रामरायाच्या चरणांपाशी जाऊन प्रकाश मागतात.

कायावाचामनोभावे। तुझा मी म्हणवितसे॥ हे लाज तुजला माझी…

येथे भक्तीचा परमोच्च क्षण येतो. ‘मी तुझा आहे’ ही जाणीव आणि ‘माझी लाज तुला’ हा भाव—हीच खरी भक्तीची पराकाष्ठा. भक्त स्वतःचे अपुरेपण देवाच्या चरणी अर्पण करतो आणि त्याच्या कृपेची याचना करतो.

निराशेच्या उदरात दडलेली आशेची कळी

आशा हे लागली मोठी। दयाळुवा दया करी॥ आणीक नलगे काही…

ही ओळ म्हणजे या कवितेचा उत्कर्षबिंदू. सर्व अपुरेपण, दुर्गुण, असहाय्यता—यांच्या पलीकडे समर्थांची आशा अढळ आहे. निराशेच्या उदरात आशेची कळी दडलेली असते; तीच येथे फुलते.

समर्थ अन्य काहीही मागत नाहीत— ना संपत्ती, ना कीर्ती, ना वैभव. ते केवळ “बुद्धी – सद्बुद्धी” मागतात. कारण बुद्धी म्हणजे विवेक, संयम, साधनेचे सामर्थ्य आणि आत्मोद्धाराचा मार्ग.

समाप्ती : आर्ततेतील सौंदर्य आणि संतत्वाचा पाया

ही कविता म्हणजे संताच्या अंतःकरणातील निर्मळ अश्रूंची माळ आहे. समर्थांची आर्तता त्यांना लहान करत नाही; उलट तीच त्यांच्या संतत्वाचा पाया ठरते.

स्वतःच्या दोषांचे निर्भीड स्वीकार, मनाच्या चंचलतेची जाणीव, समाजातील अपयशाची वेदना, आणि अखेरीस दैवी कृपेची उत्कट याचना—या सर्वांचा संगम म्हणजे बुद्धी दे रघुनायका.

ही कविता आपल्याला शिकवते की, साधनेचा मार्ग हा दोषरहित नसतो; तो दोषांच्या जाणीवेने आणि त्यागाच्या आकांक्षेने उजळतो. जेव्हा साधक आपल्या अपुरेपणाला देवाच्या चरणी अर्पण करतो, तेव्हाच त्याच्या अंतःकरणात खऱ्या बुद्धीचा, खऱ्या प्रकाशाचा उदय होतो.

समर्थांचा हा आर्त स्वर आजही प्रत्येक साधकाच्या अंतर्मनात निनादतो—

मी कमी पडतोय देवा… मला सद्बुद्धी दे.

– – – 

☆ “संध्या तांडव” ☆ श्री दिवाकर बुरसे

(राग शंकरा)

समर्थांची मूळ कविता…

 बुद्धि दे रघुनायका 

*

युक्ति नाही बुद्धि नाही। विद्या नाही विवंचिता॥

नेणता भक्त मी तुझा। बुद्धी दे रघुनायका॥१॥

*

मन हे आवरेना की। वासना वावडे सदा॥

कल्पना धावते सैरा। बुद्धी दे रघुनायका॥२॥

*

बोलता चालता येना। कार्यभाग कळेचिना॥

बहुत पीडिलो लोकी। बुद्धी दे रघुनायका॥३॥

*

तुझा मी टोणपा झालो। कष्टलो बहुतापरी॥

सौख्य ते पाहता येत नाही। बुद्धी दे रघुनायका॥४॥

*

नेटके लिहीता येना। वाचिता चुकतो सदा॥

अर्थ तो सांगता येना। बुद्धी दे रघुनायका॥५॥

*

प्रसंग वेळ तर्केना। सुचेना दीर्घ सूचना॥

मैत्रिकी राखता येना। बुद्धी दे रघुनायका॥६॥

*

संसारी श्लाघ्यता नाही। सर्वहि लोक हासती॥

वीसरु पडतो पोटी। बुद्धी दे रघुनायका॥७॥

*

चित्त दुश्चित्त होता हे। ताळतंत्र कळेचिना॥

आळसू लागला पाठी। बुद्धी दे रघुनायका॥८॥

*

काया वाचा मनोभावे। तुझा मी म्हणवितसे॥

हे लाज तुजला माझी। बुद्धी दे रघुनायका॥९॥

*

आशा हे लागली मोठी। दयाळुवा दया करी॥

आणीक नलगे काही। बुद्धी दे रघुनायका॥१०॥

*

– – – सद्गुरु श्री समर्थ रामदासस्वामी

© श्री  दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ … आणि पायऱ्या बोलू लागल्या… ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

? इंद्रधनुष्य ?

☆ … आणि पायऱ्या बोलू लागल्या… ☆ श्री जगदीश काबरे ☆

राष्ट्रीय विज्ञान दिनी सांगली जवळील जयसिंगपूर येथील ‘अनेकांत इंग्लिश मीडियम’च्या शाळेमध्ये प्रमुख पाहुणे आणि व्याख्याता म्हणून जायची संधी मिळाली होती. त्या शाळेला भेट दिल्यानंतर प्रथमदर्शनी नजरेत एक अशी विशिष्ट गोष्ट भरली की, जी मला संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या शाळांमध्ये गेली 40 वर्षे व्याख्यानासाठी जात असतानाही कुठेही निदर्शनास आलेली नव्हती – अगदी इंटरनॅशनल बिरुद लावलेल्या शाळेतही. ती म्हणजे या शाळेच्या पायऱ्या बोलक्या आहेत. आश्चर्य वाटले ना! बोलक्या पायऱ्या…? त्या तर निर्जीव असतात. मग त्या कशा काय बोलतील? थांबा साथींनो, असे आश्चर्यचकित होऊ नका. सांगतोच तुम्हाला नेमके त्या पायऱ्यांनी मला काय दाखवले ते…

तुम्हाला माहीतच आहे की, जिन्यावर साधारणत: दहा पायऱ्यानंतर सपाटी असते. तर अशा प्रत्येक दहा पायऱ्या विविध रंगात रंगवलेल्या होत्या आणि विद्यार्थ्यांना चढताना शिक्षित करत होत्या. म्हणजे असे की, पहिल्या दहा पायऱ्यांवर ‘2 ते 10’चे पाढे लिहिलेले होते. दुसऱ्या दहा पायऱ्यांवर ‘2 ते 30’चे वर्ग आणि एक ते दहा पर्यंतचे घन लिहिलेले होते. तिसऱ्या दहा पायऱ्यांवर रासायनिक पदार्थांची नावे आणि त्यांची सूत्रे लिहिलेली होती. चौथ्या दहा पायऱ्यांवर वजन, लांबी आणि आकारमानांची मापे लिहिली होती. तर पाचव्या दहा पायऱ्यांवर विज्ञानातील शोध आणि शोधक यांच्या जोड्या लिहीलेल्या होत्या. सहाव्या दहा पायऱ्यांवर देशातील विविध राज्ये आणि त्यांच्या राजधान्या लिहिल्या होत्या. सातव्या दहा पायऱ्यांवर सेकंदापासून वर्षापर्यंतची कालगणना लिहिलेली होती. आठव्या दहा पायऱ्यांवर 11 ते 30 पर्यंतचे पाढे लिहिलेले होते. महत्त्वाचे म्हणजे जिथे फक्त दोन-दोन पायऱ्या होत्या तिथे त्यांनी विषम संख्या आणि सम संख्यांची मांडणी केली होती.

आता मला सांगा, ही अभिनव कल्पना आहे की नाही? कारण दररोज विद्यार्थी त्या पायऱ्या चढत असताना या गणिती संख्या त्यांच्या डोक्यात घट्ट बसतील आणि त्यांची गणिताविषयीची भीती कमी होईल, अशी या पायऱ्यांची तजवीज केलेली आहे. म्हणूनच म्हटले की, या बोलक्या पायऱ्या शिक्षकांची पुस्तकी ज्ञानापलीकडे शिक्षण देण्याची वृत्ती दाखवतात. असे जर संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांमध्ये घडले तर किती चांगले होईल! नाही? अनेक विद्यार्थ्यांच्या मनातून गणिताची भीती तर पळून जाईलच; पण शिक्षणाची गोडीही त्यांच्यात निर्माण होईल. या शाळेतील शिक्षकांचे त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

(सूचना : छायाचित्रावर क्लिक करून ते झूम करून पहावे म्हणजे पायऱ्या तुमच्याशीही बोलू लागतील.)

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कोई मौसम नहीं होता… – लेखिका : वसुंधरा काशीकर ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? इंद्रधनुष्य ?

☆ कोई मौसम नहीं होता… – लेखिका : वसुंधरा काशीकर ☆ प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

एक इंचसुद्धा अवैध बांधकाम करणार नाही अशा दुर्मिळ तत्ववादी माणसांपैकी एक असलेला तो आर्किटेक्ट. महानगर पालिकेत त्याच्या सहीचा बांधकाम प्लॅन आला की, अधिकारी तो न बघता मंजूर करत. कारण त्याने प्लॅन केला आहे तर त्यात काहीही गैर नसणारच ही खात्री होती.

ती भारतीय शास्त्रीय संगीताची प्राध्यापक. अभिजात-अभिरुचीसंपन्न जोडपं. त्यांना मधुरा नावाची एक गोड, ८-९ वर्षांची चुणचुणीत मुलगी. असं सगळं छान. पण सगळं छान छान राहत नाही… हीच तर जीवनाची खरी गंमत आहे… एक दिवस मधुरा मैत्रिणींसोबत नदीवर खेळायला जाते आणि जे होऊ नये ते होतं… नदीच्या पाण्यात मधुरा वाहून जाते. जीवनात कोणतंही दु:ख चालेल पण अपत्य जाण्याचं दु:ख शत्रूच्याही वाटयाला येऊ नये.

अमरावतीचे गझललेखक, शायर आणि आर्किटेक्ट विश्वजीत तुळजापूरकर यांच्या जीवनात घडलेली ही सत्य घटना. तुळजापूरकरांचं आयुष्य या घटनेनं बदलून गेलं. त्यानंतर तुळजापूरकर यांनी ‘मधुरा’ नावाचा कवितासंग्रह लिहिला जो मौज प्रकाशनानं छापला. ‘किसी पर दिल के आने का कोई मौसम नहीं होता’ ही तुळजापूरकरांनी मुलगी गेल्यानंतर लिहिलेली गझल. तुळजापूरकरांच्या ‘बात ज़रासी’ या गझल संग्रहात ही गझल आहे. ही गझल वेगळ्या दृष्टीनं महत्वाची आहे कारण शायर स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यात आत्यंतिक दु:खाला सामोरा गेला आहे. पोटचं मुल जाण्याचं दु:ख शायरनं भोगलं आहे.. अनुभवलं आहे… तरीही शायर म्हणतो ‘’खुशी के लौट आने का कोई मौसम नहीं होता’’… एवढं दु:ख भोगल्यावर असं लिहायला खूप ‘कलेजा’ लागतो… आणि म्हणून या गझलेला वेगळं मूल्य आणि महत्व प्राप्त होतं ते यामुळेच.. सलाम!!

सामान्यत: गझलेबाबत फार कमी गझला या आशावाद दर्शवणाऱ्या असतात असं म्हटलं जातं. पण ही गझल मात्र त्याला अपवाद आहे.

दरिचा एक कमसे कम खुला रखिये सदा घर का

खुशी के लौट आने का कोई मौसम नहीं होता..

दरिचा म्हणजे खिडकी… घराची किमान एक खिडकी कायम उघडी ठेवा. ही खिडकी प्रतिकात्मक वापरली आहे.. ही खिडकी उमेदीचे प्रतिक आहे… शक्यतेचे प्रतीक आहे… सध्याच्या घडीला आयुष्यात कदाचित दु:ख असेल, प्रतिकूलता असेल पण ही परिस्थिती अशीच राहणार नाही. तुम्ही लढाई हरत असाल पण युद्ध जिंकू शकता. भविष्य सुंदर.. आश्वासक असू शकतं.. म्हणून ‘खुशी के लौट आने का कोई मौसम नहीं होता’… अनेकदा आयुष्यात नाती तुटतात. नात्यांमध्ये दुरावा येतो. त्यावेळी होणारी मनाची तगमग, घालमेल भयंकर असते. काही लोक आयुष्यभर ते नात्यांचं तुटलेपण घेऊन जगाशी फारकत घेऊन बसतात. अशा लोकांसाठी शायर म्हणतो… ”ज़रा हँस कर किसी से बात करने में बुरा क्या है”???….

एका नात्यात अपयश आलं म्हणून सर्वच नात्यात अपयश येईल असं थोडंच आहे. आणि नवं नातं जोडणं हा काही गुन्हा असू शकत नाही. ‘नयें रिश्ते बनाने का कोई मौसम नहीं होता’.. या शेरवर मला नारायण सुर्वेंची एक कविता आठवतेय.. कविता पत्नीला उद्देशून आहे. स्वत:च्या मृत्यूनंतर कवी बायकोला तीनं काय करावं याबद्दल काय सुंदर सांगतोय..

जेव्हा

मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन,

तेव्हा तू एक कर,

तू नि:शंक मनाने डोळे पूस.

ठीकच आहे,

चार दिवस धपापेल जीव गदगदेल

उतू जाणारे हुंदके आवर

कढ आवर, नवे हिरवे चुडे भर

उगीचच चिरवेदनेच्या नादी लागू नको !

खुशाल, खुशाल तुला आवडेल असे एक नवे घर कर!

मला स्मरून कर

हवे तर, मला विस्मरून कर !

यातलं चिरवेदनेच्या नादी लागू नको… हे किती महत्वाचं.. जगणं हा कायम उत्सवंच असायला हवा… म्हणून ‘नये रिश्ते बनानें का कोई मौसम नहीं होता’… जे मनात आहे ते सांगून दयावं मोकळेपणाने.. तो राग असेल वा प्रेम.. ’ज़ुबा पर बात लाने का कोई मौसम नहीं होता… ’

ही गझल ऐकताना मला खूपदा Shawshank Redemption या चित्रपटातलं वाक्य आठवतं. नायक म्हणतो, Remember Red, hope is a good thing, may be the best of things, and no good thing ever dies. फारच अप्रतीम सिनेमा… कितीतरी अर्थांच्या शक्यता दाखवणारा हा सिनेमा. पण यातला मला अत्याधिक आवडलेला एक अर्थ म्हणजे आशा.. उम्मीद.. Hope.. आणि प्रयत्नवाद.. बायकोच्या खुनाच्या खोट्या आरोपात अडकलेला नायक… जेलमध्ये गेल्यावर कसल्या कसल्या संकटातून स्वत:ला निभावत नेत तो स्वत:ची सुटका करुन घेतो. त्याचा अतूट आशावाद… प्रयत्नांची पराकाष्ठा हे बघण्यासारखे आहे. मी Spoiler होणार नाही तुम्ही प्रत्यक्ष सिनेमातच ते बघावं.

‘किसी पर दिल के आने का कोई मौसम नही होता’ ही गझल ऐकताना मला हा चित्रपट आठवतो. आयुष्यामध्ये जोवर आपण डाव सोडून उठत नाही तोवर संपलं असं काही नसतंच. आयुष्यात कोणत्याही वयामध्ये तुम्ही नवी इनिंग सुरू करु शकता.

दाजीसाहेब पटवर्धनांनी वयाच्या ५६ व्या वर्षी कुष्ठरोग्यांसाठी अमरावतीला तपोवन सुरू केलं. शरद जोशींनी वयाच्या ४५ व्या वर्षी शेतकरी संघटना काढली. नेल्सन मंडेला २७ वर्ष तुरूंगात राहिल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. अगदी आताच उदाहरण घ्यायचं झालं तर मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथीर मोहम्मद हे वयाच्या ९४ व्या वर्षी २०१९ साली मलेशियाचे पंतप्रधान झाले. तेव्हा आयुष्य कुठुनही सुरू करता येतं.

मला स्वत:ला या गझलेची चाल खूप म्हणजे खूपच आवडते. गझल गायक आणि माझा मोठा भाऊ आल्हाद काशीकर याने ही गझल गायली आहे. या गझलेच्या मूडला साजेशी अशी चाल त्यांनी दिलीय. अतिशय सुंदर… मेलोडियस अशी कंपोझिशन आहे.. आणि आल्हाद काशीकर यांनी अतिशय मन लावून ही गझल त्यांच्या सुकुनभऱ्या आवाजात गायली आहे. आत्मस्तुतीचा दोष पत्करुन सांगते मी अक्षरश: हजारो गझला ऐकल्या आहेत. आणि मला त्या तोंडपाठ आहेत. कोणी विचारलं की सगळ्यात आवडती गझल कोणती तर मी निर्विवाद ‘किसी पर दिल के आने का’ ही गझल सांगेन… कारण त्यातील आशावाद आणि तुळजापूरकरांनी ज्या Background वर ही गझल लिहली आहे ती पार्श्वभूमी… क़ैफी आज़मींच्या शब्दात…

जिस तरह से हंस रहा हूं मैं पी पी के अश्क़ो ग़म

कोई दुसरा हसे तो कलेजा निकल पड़े… असं आहे ते…

तुम्ही दु:खात असाल तर ही गझल सांत्वना आहे, तुम्ही विरहात असाल तर दिलासा आहे आणि वर्तमानात अपयशी असाल तर भविष्यातली यशाची आशा आहे… क्यूँ की, ‘’खुशी के लौट आने का कौई मौसम नहीं होता.. नए रिश्ते बनाने का कोई मौसम नहीं होता’’…

नवीन वर्षात खूप देखणी नाती तयार करा… प्रेमात पडा… पडा आणि पुन्हा उभे रहा… कारण ‘किसीपर दिल के आने का कोई मौसम नहीं होता’… शुभेच्छा!

*

किसी पर दिल के आने का, कोई मौसम नहीं होता

के हाले दिल सुनाने का, कोई मौसम नहीं होता

*

दरिचा एक कमसे कम, खुला रखिये सदा घर का

खुशी के लौट आने का, कौई मौसम नहीं होता

*

ज़रा हँस कर किसी से बात करने में बुरा क्या है?

नये रिश्ते बनाने का कोई मौसम नहीं होता

*

बता दे जो बताना है, अभी है वक़्त दीवाने

ज़ुबाँ पर बात लाने का, कोई मौसम नहीं होता…

– – – विश्वजीत तुळजापूरकर

लेखिका : वसुंधरा काशीकर

मुक्त पत्रकार, निवेदक आणि लेखक.

प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “देवाघरचे ज्ञात कुणाला – –” ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ “देवाघरचे ज्ञात कुणाला – –” ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

नारायण गंगाराम सुर्वे बाळ कोल्हटकर

देवाघरचे ज्ञात कुणाला – –

२०२५, २०२६ मध्ये बऱ्याच लेखक, कवी, नाटककार, संगीतकार, गायक यांची जन्मशताब्दी होती आणि काहींची अजून आहे. त्यातील दोघांच्या स्मृती जागविण्याचा मी प्रयत्न केला आहे. एक आहेत नारायण सुर्वे, जन्म १५ ऑक्टोबर १९२६ आणि दुसरे आहेत बाळ कोल्हटकर, जन्म २५ सप्टेंबर १९२६

१) देवाघरचे ज्ञात कुणाला, विचित्र नेमानेम या ओळींची सत्यता पटवणारा प्रसंग!

कुणीतरी एक बाळ रस्त्यावर टाकून देतं, एका पन्नाशी ओलांडलेल्या गिरणी कामगाराला ते दिसतं, तो उचलून घरी आणतो, दोन घास स्वतःला मिळायची मारामार पण त्यातलाच एक घास देऊन पोराला जगवतो, वाढवतो, आपलं नांव देतो. तुम्हाला वाटेल व्वा! अनाथ मुलाला घर मिळालं, माणसं मिळाली. नशीबवान आहे पोर! पण नाही, अजून त्याचे हाल संपले नव्हते. जरा पोर मोठ्ठं होत नाही तोच हा उसना बाप रिटायर होतो. आता खायचं काय? मोठ्ठा प्रश्न आवासून उभा राहतो. मग तो बाप गावाकडे जाऊन रहाण्याचा विचार करतो. आपल्याच पोटापाण्याचं काय नक्की नाही, हे पोर नेऊन काय करायचं? इथं काहीतरी काम करेल पण जगेल, याविचारानं मुलाच्या हातावर १० रुपयाची नोट ठेवतो, आणि म्हणतो, पुढचं आयुष्य कसं जगायचं तुझं तू ठरव. आणि ते पोर पुन्हा एकदा अनाथ होतं. मुंबईच्या अफाट जनसागरात लोटलं जातं. मग काय हॉटेल मधल्या पोऱ्यापासून मिळेल ते काम करून पोटाचं खळगं भरू लागलं. कधी कधी ते ही भरायचं नाही, पण मिळेल तिथलं पाणी होतंच. हाच तो मुलगा पुढे साहित्यिक होणारा नारायण गंगाराम सुर्वे!

नंतर त्यांना गिरणी कामगार म्हणून नोकरी मिळाली, आणि ते कामगार चळवळीशी जोडले गेले. त्यावेळी पत्रकं तयार करणं, ती वाटणं, भाषणे करणं, मतदान कसं करायचं याचं कामगारांना प्रशिक्षण देणं, पोस्टर्स चिकटवणं, ही कामे करताना कामगारांच्या वेदनेने त्यांना कवी बनवलं. त्यामुळे त्यांच्या कवितात कष्टकरी वर्गाची भाषा होती. मारकस बाबा या कवितेत ते आपली कार्ल मार्क्सशी ओळख कशी झाली ते सांगतात. मार्क्स वादाने ते प्रभावित झाले होते. त्याच दरम्यान कामगार वस्तीमधील आपल्या काकांच्या घरी राहणाऱ्या अनाथ मुलीबरोबर प्रेमसंबंध निर्माण झाले, परिणिती लग्नात झाली.

मुळातच हुशार होते. त्यांनी एका शाळेत शिपाई म्हणून नोकरी धरली. कविता करणं सुरूच होतं. त्यांची पहिली कविता नवयुग मासिकात ‘ डोंगरी शेत माझं गं ‘ प्रसिद्ध झाली. नोकरी करता करता सातवीची परीक्षा पास झाले. अध्यापक प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केला व त्याच शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले.

त्यांना स्वतःचं पुस्तक काढायचं होतं. पण खिसा कधीच परवानगी द्यायचा नाही. शेवटी पत्नी कृष्णाबाई यांनी गळ्यातलं मंगळसूत्र काढून दिलं आणि पाहिलं पुस्तक ‘ऐसा गा मी ब्रह्मा’ प्रकाशित झालं. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचे १००० रु बक्षिसही मिळाले. त्यामुळे कृष्णाबाई नव्या मंगळसूत्रात मानाने सजल्या. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिलंच नाही. त्यांच्या ‘ माझे विद्यापीठ ‘ ह्या काव्य संग्रहाची अनेक भाषांत भाषांतरे झाली. प्रतिष्ठेचा सोविएत लँड नेहरू पुरस्कार मिळाला. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झाले.

त्यांनी अनेक साहित्य संमेलने गाजवली. काव्य मैफिलीत ते खड्या सुरात कविता म्हणायचे. ‘ मास्तर तुमचंच नाव लिवा ‘ ही त्यांची कविता प्रचंड गाजली. त्यांच्या साहित्यात जीवनानुभव होते. त्यांनी जीवनातील संघर्षाच्या कविता केल्या पण कधीच जातपात, उच्चनीच, ईश्वरवाद, प्रारब्ध यांचा कधीही उल्लेख केला नाही. अशा या वल्लीचा पदपथापासून विद्यापीठापर्यंत व कामगारापासून बुद्धिनिष्ठ समीक्षकापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. शेवटी त्यांच्याच ‘माझे विद्यापीठ’ मधून

ना घर होते, ना गणगोत, चालेन तेवढी पायाखालची जमीन होती

दुकानांचे आडोसे होते, मोफत नगरपालिकेची फुटपाथ खुलीच होती ———

२) दुसरे आहेत नाट्य वेडे म्हणजे अक्षरशः वेडेच, छोटा गडकरी, बाळ कोल्हटकर! एक नाट्यलेखक, कवी, दिग्दर्शक, उत्कृष्ठ कलाकार असे बहुगुणसंपन्न!

लहानपणीच मातृ – पितृ छत्र हरवलं. साताऱ्याला एकत्र कुटुंबात राहणाऱ्या बाळ ने १५ व्या वर्षी नाट्यगृह पाहू न शकलेलं जोहार हे नाटक लिहिलं. नाटकाच्या वेडाने पछाडल्याने घर सोडलं आणि मुंबईचा रस्ता धरला.

ह्या नाती व माणसं सांभाळणाऱ्या अवलियाचाही खारच्या झोपडपट्टीपासून अंबरनाथच्या भूषण बंगल्यापर्यंतचा प्रवास कल्पनातीत आहे.

सुरवातीला तर हा माणूस नाटक लिहायचा, त्यातील गाणी लिहायचा, महत्त्वाची भूमिका स्वतः करायचा, बाकीचे नट शोधायचा, नाटक बसवायचा, वेशभूषा, मेकअप स्वतः करायचा, नाटकासाठी स्टेज मिळवणं, प्रकाशयोजना, स्टेज सजावट सगळी कामं एकहाती करायचे. कारण पैसा नसायचा. अशी एक दोन नाहीत तर ३० पेक्षा जास्त नाटके त्यांनी लिहिली. सुरवातीला साधी कौटुंबिक नाटके होती. त्यांचे विषय, प्रेमविवाह त्याला विरोध, मुलांच्या शिक्षणात आर्थिक अडचणी, मुलीचं लग्न, सासर माहेर यातली ओढाताण

असे सामान्यांचे प्रश्न घेतले होते. त्यांचे काव्यात्मक संवाद, सुभाषित वजा वाक्ये अशी की टाळ्यांचा कडकडाट झाल्याशिवाय राहायचा नाही. त्यांना प्रेक्षकांची नस सापडली होती. पडदा उघडल्यावर घराला छोटे फाटक, बाहेर टाकलेली खाट, पाय धुवायला छोटी मोरी, दारात रांगोळी, तुळशी वृंदावन, त्यासमोर तेवणारी पणती, मनाच्या श्लोकाचे पडसाद इतकं प्रभावी, पवित्र वातावरण बघूनच प्रेक्षक भरवून जायचे. प्रत्येक प्रेक्षकाला आपल्या घरी किंवा आपल्या आसपास घटना घडताहेत असंच वाटायचं. इतकी नाटकातल्या पात्रांशी जवळीक निर्माण व्हायची. त्याचे संवाद इतके प्रभावी, संवेदनशील असायचे की प्रेक्षक नाट्यगृहात ढसाढसा रडताना, मनमोकळं हसताना दिसायचे. त्यांच्या काही नाटकांवर, कथानकांवर खूप टीकाही झाल्या, पण त्यांची नाटके प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. दुरितांचे तिमिर जावो, वाहतोही दुर्वांची जुडी, मुंबईची माणसं, एखाद्याचे नशीब या नाटकांचे तर १०००ते २००० प्रयोग झाले.

त्यांनी काही वेगळे प्रयोगही केले. देव दीनाघरी धावला, या नाटकातून कृष्ण व सुदामा यांच्यातील निःस्वार्थ मैत्री दाखवतात. त्या काळातील राजकारणावरही भाष्य करतात. सीमेवरून परत जा, या नाटकात अलेक्झांडर व पौरस यांच्यातील संघर्ष मांडला आहे. त्यातून देशप्रेम, संघटन यांचे महत्व प्रतीत होते. उघडले स्वर्गाचे दार यात वशिष्ठ व विश्वामित्र यांच्यात राजर्षी की महर्षी म्हणावे यातून झालेला बौद्धिक वाद आहे. त्यांची नाटके व्यावसायिक असली तरी प्रत्येक नाटक काही मूल्यं अधोरेखित करतं.

त्यांची गेय काव्य लिहिण्याची हातोटीही वाखाणण्याजोगी आहे. काही गाजलेली गाणी, आई तुझी आठवण येते, मलयगिरीचा चंदन गंधित, निघाले आज तिकडच्या घरी, ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, तू जपून टाक पाऊल जरा इत्यादी.

त्यांना शिक्षणात, शाळेत फारसा रस नव्हताच पण नशीब चांगले की याच शाळेत त्यांना शां. गो. गुप्ते यांच्यासारखे नाटककार शिक्षक म्हणून लाभले. पण खरं सांगू, मला असं वाटतं हे जर नाटक वेड नसतं तर यांनी सहज ३० एक कादंबऱ्या, ३० एक कथासंग्रह, ३० एक कवितासंग्रह सहज प्रसिद्ध केले असते, इतका अफाट कल्पनासंग्रह, भाषेवर प्रभुत्व, लेखनासाठी लागणारे बारीक सारीक तपशील, लिखाणात सातत्यता त्यांच्याकडे होती. नाही, पण मग हा इतका विविध विषयांवरील नाटकांचा खजिना आपल्याला कसा मिळाला असता?

दोघांच्याही स्मृतींना त्रिवार वंदन!!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ एक ‘बेल्जियन’ गुपित – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

डॉ. ज्योती गोडबोले 

? इंद्रधनुष्य ?

☆ एक ‘बेल्जियन’ गुपित – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले ☆

एक ‘बेल्जियन’ गुपित – – – 

पुरणयंत्राची रंजक कहाणी – – 

बाहेर रणरणतं ऊन पडलंय आणि स्वयंपाकघरातून खमंग हरभऱ्याच्या डाळीचा आणि गुळाचा सुवास घरभर दरवळतोय. आजी एका लाकडी पाटावर बसून, समोर एक स्टीलचं चक्र असलेलं यंत्र घेऊन वेगाने हात फिरवतेय. वरून डाळ टाकली की खालून अगदी मऊशार, लोण्यासारखं पुरण बाहेर पडतंय. “हे यंत्र आलं आणि आमचं मरण चुकलं गं, ” असं म्हणत आजी कपाळावरचा घाम पुसते. पण तिला किंवा आपल्यालाही हे ठाऊक नसतं की, ज्याला आपण अगदी ‘आपलं’ मानतो, ते पुरणयंत्र खरं तर सातासमुद्रापारून आलेला परका पाहुणा आहे.

****

ऐका तर, ही गोष्ट सुरू होते आजपासून साधारण १०० वर्षांपूर्वी, बेल्जियमची राजधानी असलेल्या ब्रुसेल्समध्ये. वर्ष होतं १९२८. व्हिक्टर सायमन नावाचा एक गृहस्थ आपल्या किचनमध्ये बसून काहीतरी विचार करत होता. युरोपमध्ये त्या काळी भाज्या उकडून त्या हाताने स्मॅश करणं किंवा त्याचं सूप बनवण्यासाठी त्या गाळून घेणं हे खूप जिकिरीचं काम होतं. व्हिक्टरला वाटलं, हे रोजचं काम सोपं करण्यासाठी काहीतरी जुगाड करायला हवा.

त्याने एक गोल भांडं तयार केलं, ज्याच्या तळाला छिद्र असलेली जाळी होती आणि वरून फिरवण्यासाठी एक हँडल असलेला फिरता ब्लेड. याला त्याने नाव दिलं ‘फूड मिल’ (Food Mill). बेल्जियमच्या त्या छोट्याशा प्रयोगशाळेत जन्मलेलं हे यंत्र पुढे जगभर प्रवास करेल, असं व्हिक्टरला स्वप्नातही वाटलं नसेल.

****

आता इथे एक जबरदस्त ट्विस्ट आहे. हे यंत्र युरोपमध्ये बटाटे स्मॅश करण्यासाठी किंवा टोमॅटो प्युरी करण्यासाठी वापरलं जाऊ लागलं. पण जेव्हा हे यंत्र भारतात, विशेषतः महाराष्ट्रात पोहोचलं, तेव्हा आमचा खाद्यसंस्कृतीचा वारसा इतका तगडा होता की आम्ही त्या यंत्राचा चेहरामोहराच बदलून टाकला.

बघा काय होतं, महाराष्ट्रात पुरणपोळी म्हणजे सणासुदीचा राजा. पण ते पुरण पाटा-वरवंट्यावर वाटणं म्हणजे बाईच्या जिवाचं अक्षरशः पाणी व्हायचं. तो जड वरवंटा तासनतास फिरवून हात गळून जायचे. पण जेव्हा हे ‘फूड मिल’ भारतात आलं, तेव्हा कुणा एका कल्पक महाराष्ट्रीयन माणसाने ओळखलं की, अरे, हे तर आपलं पुरण बारीक करायचं हुकमी अस्त्र आहे!

आणि मग काय? ज्या यंत्राचा जन्म बटाटे स्मॅश करण्यासाठी झाला होता, त्याला आम्ही ‘पुरणयंत्र’ हे नाव देऊन आपल्या स्वयंपाकघरात मानाचं स्थान दिलं. एका संस्कृतीचं यंत्र दुसऱ्या संस्कृतीत इतक्या सहजपणे कसं सामावून घेतलं जातं, याचं हे उत्तम उदाहरण आहे. आज आपल्याला वाटतं की पुरणयंत्र हे आपल्या मातीतलं आहे, पण त्याचा शोध मात्र ब्रुसेल्सच्या व्हिक्टर सायमनने लावला होता.

****

ही गोष्ट इथेच संपत नाही. थांब, अजून पुढे ऐका. आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला ‘देशी’ वाटतात, पण त्या आहेत विदेशी. दाण्याचं कूट करायचं ते छोटं मशीन आठवतंय? लाल किंवा पांढऱ्या रंगाचं, वरून दाणे टाकले की खालून कूट पडणारं. हे मशीन सुद्धा युरोपातूनच आलं. खलबत्त्यात दाणे कुटताना होणारा तो आवाज आणि श्रम या मशीनमुळे वाचले.

भाजलेले शेंगदाणे कुटण्याच्या त्रासातून सुटका करण्यासाठी हे युरोपियन तंत्रज्ञान आपल्या मदतीला धावून आलं. आपण फक्त ते आपलं करून घेतलं. खरं तर हीच आपली म्हणजे माणसांची खासियत आहे. जगातलं जे जे चांगलं आणि सोयीचं आहे, ते आपण आपल्या संस्कृतीत असं काही मिसळून घेतो की काही काळाने ते परकं राहतच नाही.

****

आज जेव्हा आपण पुरणयंत्राचं हँडल फिरवून झटपट पुरण काढतो, तेव्हा त्यामागे व्हिक्टर सायमनची ती १९२८ सालची रचना असते. पाटा-वरवंट्याची जागा या यंत्राने घेतली आणि कष्ट कमी झाले. पण गंमत बघा, यंत्र परकं असलं तरी त्यातून बाहेर पडणाऱ्या पुरणाची चव आणि त्यामागचं प्रेम मात्र अगदी अस्सल मराठीच राहिलं. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पुरणपोळीचा घास घ्याल, तेव्हा त्या मऊशार पुरणामागे लपलेला बेल्जियमचा तो व्हिक्टर सायमन आठवल्याशिवाय राहणार नाही. आपल्या रोजच्या जगण्यात अशा कितीतरी गोष्टी असतील ज्यांची मुळं सातासमुद्रापार आहेत, पण त्या आता आपल्या कुटुंबाचा हिस्सा बनल्या आहेत.

कधी विचार केलाय का, आपल्या स्वयंपाकघरातलं अजून असं कोणतं गुपित आहे, जे स्वतःची खरी ओळख लपवून बसलं असेल?

****

लेखक : अज्ञात  

प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “सर्वोच्च अपवाद!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

☆ “सर्वोच्च अपवाद!!” ☆ श्री संभाजी बबन गायके

गाभाऱ्यातील मूर्ती प्राणप्रतिष्ठित असतात आणि त्यांचे केवळ डोळ्यांनी दर्शन घेणे अपेक्षित असते, असे मानले जाते. बाकी, सुरक्षितता हा मुद्दा आहेच. आणि शिवाय संबंधित धार्मिक संस्था त्या देवतांची अधिकृत छायाचित्रे प्रसिद्ध करून विक्रीस उपलब्धही करून देत असतात. पण तरीही लोक प्रत्यक्ष त्या धार्मिक स्थळी अगदी आत जाऊन त्या देवतांचे फोटो, विडीओ करण्याचा प्रयत्न का करीत असतात, हे समजण्याच्या पलीकडे आहे. बहुतांश सर्वच मंदिरांत फोटो काढण्यास मनाई असे फलक असतातच. शिवाय तिथले सेवेकरी तशा सूचनाही सातत्याने देत असतात.

– – शेगावही याला अपवाद नाही. फक्त इथे सूचना देण्यासाठी लाऊड स्पीकरचा वापर अजिबात केला जात नाही. केवळ संबंधित माणसाच्या समोर सूचनांचा फलक धरला जातो. तरीही अतिउत्साही लोक मोबाईलमध्ये चोरून चित्रण करताना सापडतात. सुरक्षा रक्षकांच्या लक्षात ही बाब येतेच, मग ते संबंधित मोबाईल ताब्यात घेऊन ते चित्रण पुसून टाकतात. प्रदक्षिणा मार्गावर इतर भाविकांना अडथळा होऊ नये म्हणून तिथे उभे राहून फोटो घेऊ दिले जात नाहीत, त्याऐवजी पर्यायी ठिकाण सुचवले जाते. पण या सा-या कामांत सेवेक-यांचा बराच वेळ जातो, हे लोकांच्या ध्यानात येत नाही. रील बनवून पैसे कमवण्याचा उद्योग तर हल्ली सर्रास दिसतो. मग त्यासाठी आपण पवित्र स्थळांचे पावित्र्य धोक्यात आणतो आहोत, हे लोक विसरतात. श्री गजानन महाराज संस्थानने श्री गजानन महाराजांचे अतिशय उत्तम दर्जाचे फोटो उपलब्ध करून दिलेले असताना आपल्याच मोबाईलमध्ये फोटो घेण्याचा अट्टहास लोक करीत राहतात. असो.

– – – भारताच्या सन्मानीय राष्ट्रपती महोदया श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी नुकतीच शेगांव मंदिरास भेट दिली. विशेष अपवाद आणि कार्यालयीन संदर्भ या कारणांनी, मा. राष्ट्रपती महोदया प्रत्यक्ष गाभा-यासमोर उभ्या असतानाचे एकच छायाचित्र प्रसिद्ध केले गेले आहे. या छायाचित्रात श्री गजानन महाराज यांची मूर्ती दिसते आहे. मंदिराच्या आतल्या भागातील कोणतीही छायाचित्रे किंवा चित्रफिती प्रसिद्ध केल्या गेल्या नाहीत.

सामान्य लोकांना फोटो काढू देत नाहीत, मग राष्ट्रपती दौ-यात ही परवानगी कशी, असा प्रश्न काही स्वयंघोषित फेसबुक पेजवाल्यांनी उपस्थित केले आहेत. त्यावर उतावळ्या वाचकांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरफायदा घेत विविध प्रकाराच्या comments केलेल्या आढळतात. भारताच्या सर्वोच्च घटनात्मक पदावर असलेल्या मा. राष्ट्रपती महोदयांची प्रत्येक भेट ही अधिकृत/आधिकारिक/official मानली जाते. यावेळी प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगांची छायाचित्रे घेतली जातात. श्री गजानन महाराज संस्थानने याबाबत one time exception म्हणून कदाचित त्यांच्या अधिकारात ही परवानगी दिलेली असावी, आणि यात काहीही गैर दिसत नाही.

 

भारतातील एकूण परिस्थिती लक्षात घेता अतिमहत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणे अपरिहार्य आहे. यासाठी विहित नियमावली तयार केली गेलेली आहे. अर्थात याचा त्रास सर्वसामान्य जनतेस होणे साहजिकच आहे. परंतू अशा भेटींची पुरेशी आगाऊ सूचना दिलेली असते, हे ध्यानात घेतले पाहिजे. संतांपेक्षा, देवापेक्षा कुणीही मोठे नाही, हे जरी खरे असले तरी ज्या वेळी देशाचे सर्वोच्च नेतृत्व मोठ्या भक्तिभावाने एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देते, त्यावेळी काही गोष्टी काही काळापुरत्या सहन करणे गरजेचे असते. या संपूर्ण भेटीदरम्यान संस्थान आणि प्रशासनाने जनतेला होऊ शकणारा त्रास कमीत कमी कसा राखता येईल, या गोष्टीला प्राधान्य दिलेले दिसले. गावापासून ब-याच अंतरावर मुख्य कार्यक्रम स्थळ असल्याने गावात फारशी अडचण झाली नाही. आनंद विहार मध्येच मा. राष्ट्रपती महोदयांची विश्रांती-अल्पोपहार इत्यादीची व्यवस्था आनंद विहार या भक्त निवास संकुलात अत्यंत देखणी व शिस्तबद्ध केलेली होती. तसेच बंदोबस्तासाठी तैनात पोलिस इत्यादी व्यक्तींची निवास व्यवस्थाही याच ठिकाणी होती. परंतु याच संकुलात निवासासाठी येणा-या भाविकांची गैरसोय होऊ नये याची पुरेपूर दक्षता घेतली गेली. दौऱ्यादरम्यान उपद्रव होऊ नये म्हणून परिसरातील भटक्या श्वानांना पकडून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्राणी कल्याण संस्थेला दिली गेली होती आणि या श्वानांची योग्य ती काळजी घेतली गेल्याचे दिसले.

 

– – या व इतर सर्वच गोष्टींसाठी श्री गजानन महाराज संस्थान तसेच स्थानिक प्रशासन आणि पोलिस दल कौतुकास पात्र आहे, असे मला वाटते. जय गजानन.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ११ आणि १२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ११ आणि १२ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक ११ वा – – 

जनी सर्वसुखी असा कोण आहे?

विचारे मना तूचि शोधूनि पाहे|

मना त्वां चि रे पूर्वसंचित केले|

तयासारिखे भोगणे प्राप्त झाले |११|

अर्थ : हे मना तू बारकाईने निरीक्षण कर आणि हे शोधण्याचा प्रयत्न करू की जगामध्ये संपूर्णतः सुखी अशी कोणी व्यक्ती आहे का? प्रत्येक माणूस आपल्या मागील जन्मांमध्ये चांगली वाईट कृत्ये करतो. त्यांचे पूर्वसंचित त्याच्याजवळ जमा झालेले असते आणि त्यानुसारच त्याला या जन्मात सुखदुःखे भोगावी लागतात.

आधीच्या श्लोकात समर्थ म्हणतात देहेदुःख ते सुख मानीत जावे. परंतु हे एकदम होत नाही. त्यासाठी मनोभूमिका तयार करावी लागते. ती मनोभूमिका तयार करण्याचे काम समर्थ या श्लोकात करतात. जो जन्माला आला, त्याला सुखदुःख भोगणे क्रमप्राप्त आहे. कोणाचीच त्यापासून सुटका नाही. कदाचित सुखदुःखाचे प्रमाण कमी जास्त असेल परंतु प्रत्येकाला ते भोगावेच लागतात. असे म्हणून चालत नाही की माझ्याच वाट्याला एवढे दुःख का?

म्हणून समर्थ मनाला (म्हणजे आपल्याला)उपदेश करताना म्हणतात, ” जरा आजूबाजूला पहा. उघड्या डोळ्यांनी शोध घे. म्हणजे तुझ्या लक्षात येईल की जगात सर्व सुखी म्हणजे सुखाने परिपूर्ण अशी कोणीही व्यक्ती नाही. ” लग्न करणाराही दुःखी असतो आणि लग्न न करणारा देखील! ज्याला संतती नाही तो तर दुःखी असतोच परंतु ज्याला संतती आहे आणि ती संतती जर कुलक्षणी निघाली तर तो त्यापेक्षाही जास्त दुःखी असतो. एखाद्या श्रीमंताला सगळे वैभव असते परंतु संतती नसते. एखाद्याकडे अमाप पैसा असतो परंतु आरोग्याची देणगी नसते. परंतु माणसाला नेहमी दुसऱ्याचे चांगले दिसते आणि माझ्या वाटेला आलेले तेवढे वाईट असे वाटते. आपण परदुःख शीतल असे म्हणतो त्याचा अर्थ हाच!

परंतु समर्थ तिसऱ्या ओळीत सांगतात की बाबा रे मागील जन्मांमध्ये तू जी काही बरी वाईट कर्मे केलीस, त्यांचे संचित जमा झाले आणि त्यानुसार या जन्मात तुला सुखदुःख भोगावे लागत आहे. या जन्मातील हे सुखदुःख अचानक किंवा अपघाताने आलेले नाही. हा भारतीय संस्कृतीमध्ये ऋषीमुनींच्या चिंतनातून आलेला कर्मविपाकाचा सिद्धांत आहे. ईश्वरी सत्तेचे नियम माणसासाठी अनाकलनीय असतात. परंतु हा कर्मविपाकाचा सिद्धांत या जन्मातील सुखदुःखांच्या कारणांची मीमांसा करतो. हा सिद्धांत विज्ञानाच्या कसोटीवर पारखून घेता येत नाही म्हणून बुद्धिवादी माणसे हा सिद्धांत नाकारतात. परंतु आपण तर्कशुद्ध विचार केला तर हा सिद्धांत आपल्याला पटतो कारण कोणतीही गोष्ट कारणाशिवाय घडत नाही. आधुनिक विज्ञानाने लावलेले शोध जेवढे महत्त्वाचे आहेत तेवढाच आपल्या पूर्वसुरींनी शोधून काढलेला हा सिद्धांत महत्त्वाचा आहे असे मला वाटते.

गीतरामायणात देखील भरताची समजूत काढताना राम त्याला सांगतो, ‘ खेळ चाललासे माझ्या पूर्वसंचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ‘ साक्षात परमेश्वराचे अवतार असलेल्या राम, कृष्ण यांना देखील दुःख, संकटे यांना तोंड द्यावेच लागले. संत ज्ञानेश्वरांना समाजाचा छळ सहन करावा लागला तर तुकारामांना लोकनिंदा सहन करावी लागली. अनेक संतांच्या नशिबी अशा प्रकारचे प्राक्तन आले. पण ते त्याचा शोक करीत बसले नाहीत. अग्नीतच सोने उजळून निघते. तसेच संकट समयीच माणसाची परीक्षा होते. आलेल्या दुःखातून आणि संकटातून तावून सुलाखून निघालेल्या माणसांचे जीवन उजळते आणि इतरांसाठी दीपस्तंभ बनते.

संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध असे आपल्या कर्माचे तीन भाग होतात. आपण जे प्रत्यक्ष करीत असतो ते क्रियमाण, जे प्रत्यक्ष भोगत असतो ते प्रारब्ध आणि जे निर्माण झाले आहे आणि भोगावयाचे राहिले आहे ते संचित. पूर्वजन्म आणि पुनर्जन्म हे देखील या कर्मांचाच एक भाग असतात असे म्हणता येईल.

हा सिद्धांत जेव्हा आपण समजून घेतो तेव्हा आपल्या असे लक्षात येते की मागील जन्मात जे काही घडले, त्याबद्दल मला आता काही करता येणार नाही. त्यानुसार जी सुखदुःखे येतील ती तर भोगावी लागतीलच. परंतु या जन्मात मी जर चांगली कर्मे केली तर माझा भविष्यकाळ हा चांगला असेल. अशा प्रकारे आपल्या कर्मावर, प्रयत्नांवर आत्मविश्वास दृढ करणारा हा सिद्धांत आहे.

म्हणूनच जगामध्ये संपूर्ण सुखी असा कोणी नाही. सुखदुःखे ही प्रत्येकाला येणारच. ही गोष्ट स्वीकारू या आणि आपल्या हातात आज जे आहे ते कर्म उत्तम प्रकारे करण्याचा प्रयत्न करूया असेच या ठिकाणी समर्थ आपल्याला सांगत आहेत.

स्वसंवाद :: 

  • जगात खरोखरच कोणीही पूर्णपणे सुखी नाही ही गोष्ट मला पटते का?
  • पूर्वसंचिताचा सिद्धांत लक्षात घेऊन माझ्या वाट्याला आलेली सुखदुःखे मी सहजपणे स्वीकारतो का?
  • वर्तमानात माझ्या हातून अधिकाधिक चांगली कर्मे घडली तर माझा भविष्यकाळ उज्वल होईल या गोष्टीवर माझा विश्वास आहे का?
  • माझ्या जीवनातील परिस्थितीबद्दल मी तक्रार करतो की जबाबदारी स्वीकारून पुढे जातो? (क्रमशः)

– – – – 

श्लोक १२ वा – – 

मना मानसी दुःख आणू नको रे|

मना सर्वथा शोक चिंता नको रे|

विवेके देहेबुद्धी सोडूनि द्यावी|

विदेहीपणे मुक्ति भोगीत जावी |१२|

अर्थ : हे मना (मानवा) तू आपल्या अंतर्यामी दुःखाला थारा देऊ नकोस. व्यर्थ शोक आणि चिंता करू नकोस. विवेकाच्या सहाय्याने देहबुद्धीवर विजय प्राप्त कर. विदेही म्हणजे देहात असूनही देहापासून अलिप्त राहणे. तसे राहून मुक्तीचा (आनंदाचा) भोग घे.

आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला जे सुखदुःख प्राप्त झाले आहे ते आपल्या पूर्वसंचितानुसार प्राप्त झाले आहे असे सांगतात. या श्लोकात आपल्याला ते सुखदुःखापासून अलिप्त कसे राहावे त्याचे साधन सांगतात. प्रपंचामध्ये माणसाला अनेक प्रकारची संकटे आणि दुःखे प्राप्त होतात. मनुष्य माझ्याच वाट्याला हे दुःख का असे म्हणून शोक करत बसतो आणि स्वतःला दुःखी करून घेतो. समर्थ म्हणतात आपल्या अंतर्यामी दुःखाला थारा देऊ नकोस. बऱ्याच वेळा माणूस भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचा विचार करून दुःख करत बसतो. परंतु ‘गतं न शोच्यम्’ म्हणजे जे घडून गेले त्याचा विचार करण्यात अर्थ नाही. बीत गयी सो बात गयी. त्याचप्रमाणे उद्या काय होईल याची चिंता करत बसण्यात देखील अर्थ नाही. वर्तमानकाळ आपल्या हातात असतो आणि त्याचा वापर कसा करायचा तेही आपल्या हातात असते. म्हणून जे क्षण आपल्या हातात आहेत. ते व्यर्थ दवडू नका, व्यर्थ शोक करत बसू नका असेच समर्थांचे सांगणे आहे.

देहदुःख ते सुख मानीत जावे असे समर्थ आपल्याला सांगतात. आपल्याला कुठले तरी आजार होतात. ताप येतो, संधीवातामुळे हात पाय दुखतात. मग हे आजार किंवा दुखणे देहाला आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करायचे का? असा समर्थांच्या सांगण्याचा उद्देश नाही. त्याकडे जरूर लक्ष द्यावे त्यावर उपचारही करावेत परंतु अंतर्यामी त्याचेच दुःख धरून शोक करीत बसू नये. आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर काही माणसे मोठ्या आजारांना देखील धैर्याने तोंड देताना आपल्याला दिसतात आणि काही माणसे थोड्याशा दुखण्याचा देखील बाऊ करताना दिसतात. अशी माणसे स्वतःचा त्रास तर वाढवून घेतातच परंतु त्यांच्याबरोबरच इतरांना देखील त्रास होतो.

जगात जी महान माणसे होऊन गेली, त्यांनी संकटाचे रूपांतर संधीमध्ये केले. ते शोक करीत बसले नाहीत. तुकाराम महाराजांच्या आयुष्यात तर किती संकटे आणि दुःखाचे प्रसंग आले, दुष्काळ पडला, दिवाळे निघाले, पोरेबाळे दुष्काळात मृत्युमुखी पडली. त्यांना दुःख निश्चितच झाले असणार. परंतु त्याचा शोक न करत बसता त्यांनी आपल्याला परमेश्वर साधनेची मिळालेली ही संधी आहे असे समजून उपयोग केला. म्हणून ते ‘बरे झाले देवा, निघाले दिवाळे… ‘ असे म्हणू शकले.

समर्थ या श्लोकात आपल्याला ‘ विवेके देहेबुद्धी सोडून द्यावी’ असे सांगतात. आपली देहबुद्धी फार प्रबळ असते. आपल्याला दुःख होते ते या देहबुद्धीमुळेच. जन्मल्यापासून आपण आपल्या देहाचे लाड पुरवत असतो. खायला प्यायला चांगले हवे असते ते देहाला, बसायला उत्तम गाद्या गिरद्या हव्या असतात तेही देहालाच. उंची पोशाख, सौंदर्यप्रसाधने, आरामदायक गाडी इ सर्व गोष्टी देहासाठीच आपल्याला हव्या असतात. देहबुद्धीमुळेच माझा मुलगा, माझी पत्नी, माझे नातेवाईक इत्यादी सर्वांबद्दल ममत्व निर्माण होते. माझे घर, माझे संपत्ती, माझी गाडी हे सगळे सुद्धा देहबुद्धीमुळेच! या देहबुद्धीचा जर आपल्याला त्याग करता आला तर आपल्या बऱ्याच समस्या दूर होतील. मग हा त्या करायचा तरी कसा तर समर्थ म्हणतात विवेकाच्या सहाय्याने. आपण स्वतःला देह समजतो हीच मोठी चूक आहे. आपण म्हणजे देह नाही हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल तेव्हा देहात असूनही आपण देहापासून अलिप्त राहू शकू. हा बौद्धिक निष्कर्ष नसून अनुभवातून दृढ होणारी जाणीव आहे. देहाच्या सुखदुःखात न अडकणे म्हणजेच विदेहीपण असेही म्हणता येईल. हे जमले तर आपण मुक्तीचा आनंद भोगू शकू. त्यासाठी मनाला सातत्याने भगवद्‌चिंतनात ठेवण्याची सवय लावावी.

स्वसंवाद :: 

  • मी भूतकाळातील घटनांवर अनावश्यक शोक करत बसतो का?
  • भविष्याच्या चिंतेमुळे माझा वर्तमानकाळ व्यर्थ जात आहे का?
  • देहाला झालेले दुःख आणि ‘मी’ यांमध्ये फरक करण्याचा प्रयत्न मी करतो का?
  • विवेकाच्या साहाय्याने मी साक्षीभावाने जगण्याचा प्रयत्न करतो का?
  • माझे मन नियमितपणे भगवद्‌चिंतनात स्थिर राहते का?

 – क्रमशः श्लोक ११ आणि १२.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ती सूत्र क्र. ५० / ५१ / ५२ / ५३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ती सूत्र क्र. ५० / ५१ / ५२ / ५३ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले 

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्तिसूत्रे ५०

स तरति स तरति स लोकान्स्तारयति ॥ ५० ॥

अर्थ : जो या भवसागरातून(आपण माया नदी असेही म्हणू शकतो) तरून जातो, तो आपल्या सोबत इतरांना ही तारतो.

विवेचन : सेहेचाळिसाव्या सूत्रात आरंभी ‘कस्तरति माया’ मायेतून कोण तरून जातो असा प्रश्न उपस्थित करून एकोणपन्नासाव्या सूत्रापर्यंत माया तरून जाणार्‍या भक्ताची लक्षणे सांगितली आहेत. “जो संगत्याग करतो, महानुभवांची सेवा करतो, निर्मम होतो, एकांतवासाचा आश्रय करतो, लोकबंधाचे उन्मूलन करतो, निस्त्रैगुण्य होतो, योगक्षेमाचाही त्याग करतो, तसेच कर्मफलांचा त्याग करतो, कर्माचाही त्याग करतो, निर्द्वंद्व होतो, जास्त काय वेदांचाही त्याग करतो, तो या दैवी दुरत्यया गुणमयी मायेतून तरून जातो हे निश्चयपूर्वक द्विरुक्तीने या सूत्रात सांगतात. मायातारण म्हणजेच मोक्ष, उद्धार, कैवल्य इत्यादी होय हे मागील सूत्रात सांगितलेच आहे.

आसक्तीचा त्याग, सत्पुरुषांची सेवा, ममत्त्वाचा त्याग, एकांत सेवन, लौकिक गोष्टीचा त्याग, त्रिगुणातीत होणे, योगक्षेमाचा त्याग, कर्मफळाचा त्याग, कर्म संन्यास, द्वंद्वाच्या पलिकडे जाणे, तसेच वेदांचा साक्षेपाने अभ्यास 

करून ज्याला भगवंता विषयी निरतिशय प्रेम प्राप्त होते, तो साधक स्वतः या मायनदीतून तरून जातोच, तसेच स्वतः सोबत अनेकांचे कल्याण करतो, त्यांनाही तारुन नेतो असे नारद महर्षी आपल्याला सांगतात.

भक्त स्वतः भक्ती करतात व लोकाना भगवद्‌भक्तीचे, भगवन्नामाचे महात्म्य अट्टाहासाने पटवून अनेकांना या भक्तिमार्गाकडे प्रवृत्त करतात. श्री देवर्षी नारदाचे सर्व जीवन अनंत जीवांना मायानदीतून तारून नेण्यातच गेले नाही काय? ‘यारे यारे लहान थोर । याती भलते नारी नर । करावा विचार । न लगे चिंता कवणाची ॥’ हे तुकाराममहाराजांचे उद्‌गारही लोकतरणच दर्शवितात. ते लोकांना का तारून नेतात? याचे उत्तर भक्ताच्या अंतःकरणातील करुणावृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही. *”बुडता हे जन न देखवे डोळा । येतो कळवळा म्हणउनि॥’* हे उद्‍गार याचीच साक्ष देतात. त्याच्या अवतारकार्याचे प्रयोजनच हे सांगितले जाते. ‘अवतार तुम्हा धराया कारण । उद्धराया जन जडजीव ॥’ चंदन हा जसा समीपवर्ती वृक्षांना आपला सुगंध प्रदान करतो त्यामुळे त्या सर्व वृक्षांचेही महत्त्व वाढते, त्याचा उद्धार होतो त्याप्रमाणेच भक्तिमान पुरुष हा अनेक लोकांचा उद्धार करतो. गंगा आपल्या सामर्थ्याने ओहोळास पावन करते, परिस आपल्या सामर्थ्याने लोहास सुवर्ण बनवितो, कस्तुरी आपल्या गुणाने मातीस मुल्यवान बनविते त्याप्रमाणे हा भक्तिमान पुरुष आपल्या सामर्थ्याने अनेकाना या मायानदीतून तारून नेतो.

संत तुकाराम महाराज म्हणतात,

“अहर्निशी सदा परमार्थ करावा पाय न ठेवावा आडमार्गी ॥ १॥ आडमार्गी कोणी जन जे जातील । त्यांतून काढील तोचि ज्ञानी ॥ २॥तोचि ज्ञानी खरा दुजीयासी । वेळोवेळां त्यासी शरण जावे ॥ ३ ॥ आपण तरेल नव्हें ते नवल । कुळॆं उद्धरील सर्वांची ती ॥ ४ ॥ शरण गेलियानें काय होतें फळ । तुका म्हणें कुळ उद्धरिले ॥ ५ ॥”

जय जय रघुवीर समर्थ 

– – – – 

नारद भक्तिसूत्र ५१

अनिर्वचनीयम् प्रेमस्वरूपम्

अर्थ: प्रेमाच्या स्वरूपाचे शब्दांत वर्णन करणे अवघड आहे.

विवेचन: भक्तीची व्याख्या करताना ती परम प्रेम रुपा आहे असे आधी सांगितले आहे. त्यानंतर ती अमृत स्वरूपा आहे असे सांगितले आहे. रूप आणि स्वरूप यात फरक आहे. रूपात वस्तूचा आकार, रंग, बाजनझ आवरण आदी बाह्य गुणधर्माचा समावेश होतो. स्वरूप वस्तूच्या अंगभूत स्थायीभावाचे लक्षण सांगते. नट वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वेगवेगळा दिसतो पण प्रत्यक्षात मात्र त्याचा विशिष्ट असलेला स्थायीभाव जे त्याचे स्वरूप असते ते मात्र वेगळे असते.

प्रेम हा शब्द प्री या धातूपासून तयार होतो. संतोष पावणे, तृप्त होणे. प्रेम हा मनाचा असा अनुभव अथवा अवस्था आहे की ज्यामुळे मनुष्य समाधानी होत असतो.

प्रेम फक्त अनुभवता येते. जशी हवा दाखवता येत नाही, आकाशाची उंची मोजता येत नाही तसे प्रेम मोजून दाखवता येत नाही. प्रेम असते तरी नसते. असे कोणी म्हणू शकत नाही की मी अमक्या वर पाच रुपयांचे प्रेम करतो. प्रेम व्यक्त करण्यासाठी एकदा मनुष्य नवनवीन क्लुप्त्या शोधून काढेल. चित्रपटामध्ये दाखवतात त्याप्रमाणे चंद्र सूर्य आणून देतो अशा थापा मारू शकेल. अर्थात हे सारे वर्णन असेल किंवा प्रेम व्यक्त करण्यासाठी केलेली कृति असू शकेल…! याला फारतर प्रेमाचा आविष्कार म्हणता येईल…

पण प्रेम म्हणता येईल का? तर नाही…

प्रेम हे अदृष्ट, अदृष्य असल्याने ते पाहता येत नाही. ज्याला अशा प्रेमाचा लाभ होतो, अनुभूति मिळते, तो एका विलक्षण आनंदात असतो. त्या आनंदाचा तो आस्वाद घेऊ शकतो, पण सर्वार्थाने त्याचे वर्णन करू शकत नाही..

संत तुकाराम महाराज प्रेमाबद्दल म्हणतात,

“प्रेम नये सांगता बोलता दाविता। अनुभव चित्ता चित्त जाणे ।।”

(अभंग क्रमांक २७२९, सार्थ तुकाराम गाथा, धार्मिक प्रकाशन संस्था)

महाराज म्हणतात, प्रेम ही काही प्रदर्शन करायची भावना नाही. प्रेम ही मनापासून ते मनापर्यंत पोहचणे आवश्यक असते. हल्लीच्या काळात खरे प्रेम मिळणे तसे खुप अवघड आहे. कारण प्रेम हा काय प्रकार आहे. ही भावना काय आहे. हे किती जनांना माहीत आहे. हाच खुप मोठा प्रश्न आहे असे मला वाटते. कारण सद्यपरिस्थितीत आकर्षणाला व वासनेलाच प्रेम म्हटले जाते.

आपण इथे भगवंतावर अकारण केल्या जाणाऱ्या प्रेमाबद्दल चर्चा करीत आहोत. पण समाजाची, समाजातील सद्यस्थिती लक्षात यावी म्हणून त्याचा वरती उल्लेख आला आहे.

प्रेम म्हणजे देव

प्रेम म्हणजे भक्ती,

प्रेम म्हणजे साधना

प्रेम म्हणजे शक्ति।।

प्रेम, त्यातून मिळणारा आनंद याचे अचूक वर्णन करणे अशक्य आहे, पण सर्व संतांना सामान्य मनुष्याबद्दल कळवळा असल्याने ते या प्रेमाचे वर्णन करतात, अर्थात ते सुद्धा चपखल वर्णन करू शकत नाहीत असे नारद महाराज आपल्याला सांगत आहेत.

जय जय रघुवीर समर्थ 

– – – – 

नारद भक्तिसूत्र ५२

मूकास्वादनवत्

अर्थ : प्रेमाचा अनुभव हा मुक्या माणसाने घेतलेल्या रसास्वादाप्रमाणे असतों. (… त्यामुळे त्याला तो शब्दाने सांगता येत नाही.)

विवेचन : मुका मनुष्य बोलू शकत नाही. त्याला झालेल्या, होत असलेल्या वेदना तो सांगू शकत नाही. इथे नारद मुनी आपल्याला मूक्याचे उदाहरण देऊन साधक अनुभूतीच्या विशिष्ट टप्प्यावर मौन होऊन जातो. बाह्यांगावरून तो मूक झाला, अबोल झाला असे आपण म्हणू शकतो. परंतु त्या पातळीवर पोचलेल्या साधकाला जगात घडणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे भगवतांची लिला आहे, याची अनुभूती आलेली असते. त्याच्या आयुष्यात तसेच त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत त्याला भगवंताचे अस्तित्व जाणवत असते. सर्व जाणल्यावर बोलायचे काही शिल्लक रहात नाही.

एक छान वाक्य आहे.

“वेदना जास्त बोलते आणि सुख कमी बोलते. “

भक्तिमार्गात या विशिष्ट टप्प्यावर आल्यावर साधक मौन न झाला तर नवल…! साखर दुधात पूर्णपणे मिसळून गेली की त्यातून स्वतः साखरेला तिचे वेगळेपण दाखवता येत नाही आणि आपण ते वेगळे करून पाहू शकत नाही.

समर्थ दासबोधात याचे वर्णन करतात…

“मुक्यानें गूळ खादला । गोडी न ये सांगायाला । याचा अभिप्रायो मजला । निरूपण कीजे ॥”

 (दास. ०६. १०. ०२)

जय जय रघुवीर समर्थ 

– – – – 

नारद भक्तिसूत्र ५३

प्रकाशते क्वापि पात्रे”

अर्थ: त्या परम प्रेमाचा प्रकाश क्वचितच, कधीतरी एखाद्या अधिकारी व्यक्तीत पाहायला मिळतो.

विवेचन : भगवंतावरील प्रेम हेच खरे प्रेम आहे, असे सर्व संत सांगतात. पण हे प्रेम वेगळे काढून दाखवता येत नाही, त्याची फक्त अनुभूती घेता येते. ज्याप्रमाणे नदी सागराला जाऊन मिळण्यासाठी धडपड करीत असते. ती सागराला जाऊन मिळाली की नदीचे अस्तित्व संपुष्टात येते. नदी पुन्हा बाहेर सांगू शकत नाही की मी नदी आहे. तसे खरा ज्ञानी मनुष्य कधीही सांगत फिरत नाही की मी ज्ञानी आहे. तर, त्याच्या चित्तात प्रकट झालेला ज्ञानाचा प्रकाश आपसूक सर्वदूर पसरतो. साखर सांडली की मुंग्यांना आमंत्रण द्यावे लागत नाही, त्या आपसूक येत असतात.

संतांचे अनेक वैशिष्ट्यांपैकी एक प्रमुख वैशिष्ट्य पुढील प्रमाणे सांगता येईल. ज्याच्याकडे अकारण शांतता लाभते, ज्याच्याकडे जाऊन भौतिक गोष्टी मिळत नाही, तरी त्याच्याकडे पुन्हा जावेसे वाटते, अगदी सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास ज्याच्याकडे गेल्यावर परत येऊ नये असे वाटते, (अर्थात माहेरी गेल्यासारखे वाटते) त्याला संत अर्थात ज्ञानी म्हणता येईल.

एक व्यवहारातील उदाहरण पाहू. अनेक उमेदवार स्पर्धा परीक्षा देत असतात, पण त्यातील फार कमी लोक त्या परीक्षेत उत्तीर्ण होतात.

खरंतर जीव हा मुळात ज्ञानी आहे, पण त्याच्यावर असलेला मायेचा पडदा ज्याला काढता येतो, तो ज्ञानी होतो. वाचायला /लिहायला एकदम सोपे आहे, पण ही माया जाणणे फार अवघड.

“लक्षावधीत एखादा मोक्षार्थ झटतो कधी|

झटणाऱ्यात एखादा तत्त्वतां जाणतो मज||”

(गीताई ०७. ०३)

एखादा मनुष्य जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करतो, अर्थात प्रेम व्यक्त करतो तेव्हा त्या व्यक्तीला जे आवडते ते करतो. त्या व्यक्तीच्या आवडत्या गोष्टी त्याला देण्याचा प्रयत्न करतो. त्या व्यक्तीने बनवलेल्या, आणलेल्या, भेट म्हणून दिलेल्या वस्तूंचा आदर करतो, त्यांना अत्यंतिक प्रेमाने सांभाळतो. याच अनुषंगाने जेव्हा साधक भगवंतावर प्रेम करू लागतो, त्याचवेळी त्याने भगवंताने निर्माण केलेल्या चराचर सृष्टीवर प्रेम करणे अपेक्षित आहे, नव्हे अनिवार्य आहे. असे प्रेम करणारा मनुष्य विरळाच असतो. पण त्याच्या या निःस्वार्थ प्रेमाचा प्रकाश पडल्या शिवाय रहात नाही.

साधकाने साधना करीत रहावी, दयासिंधु आसलेल्या सद्गुरूंना त्याची दया आल्याशिवाय राहणार नाही. अर्थात त्याचा प्रकाश पडल्याशिवाय राहणार नाही. पुढील सूत्रात आपण परमप्रेम कसे असते, ते शब्दाने सांगण्याचा प्रयत्न नारद महर्षींनी केला आहे त्याचा अभ्यास आपण करू.

जय जय रघुवीर समर्थ!! 

नारद महाराज की जय!!!

– भक्ती सूत्र क्र. ५० / ५१ / ५२ / ५३.

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares