मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सद्गुण बीज… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ सद्गुण बीज… ☆ श्रीशैल चौगुले ☆

☆

 बीजाचे आयुष्य

घडवी भविष्य

पिढीला अवश्य

संस्कार फळे.

*

युगे-युगे मुळ

पसरुनी फांदे

विशालता नांदे

सुखावे कृपा.

*

रक्षण वारसा

संकटे पेलता

वादळ झेलता

खंबीर उभे.

*

करावी प्रार्थना

स्मरावे थोरवी

ज्ञानाची गोडवी

मृदेची धन्य.

*

वृक्ष-वल्ली श्वास

मानवाचे दास

शिकवण खास

गुणांने घ्यावी.

☆

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जिवलग मित्र सारे! ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? जिवलग मित्र सारे! ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

जन्माला जरी आलो एकटा,

मित्रांनी नाही जाणवून दिले एकटेपण!

अनेक सुख दुःख आली,

हाक न मारता धावून आले सारेजण!

*

बालवाडी खेळी एकत्र दमलो,

तारुण्यात मौजमस्तीत रमलो!

तिसरा अंक येईल तेव्हा येईल,

वर्तमानात एकमेकांसाठी जमलो!

*

कधी जरी उदास वाटे मनाला,

डोळे पाहून मनातले सारे वाचतात!

कष्ट करून यश मिळते तेव्हा,

माझ्यापेक्षा तेच आनंदाने नाचतात!

*

आर्थिक प्रगती पुढे मागे असे,

तुलना सुखाची कुणा अंतरी नसे!

एकाच कट्यावर एकत्र सारे बसे,

निखळ मैत्रीचा भाव ह्रदयात वसे!

*

आयुष्यभर साथ दिलीत,

भावनांचा केला नाही कधी धंदा!

अमरपट्टा नाही घेऊन आलो,

जाईन तेव्हा मित्रांचाच मिळू दे खांदा!

©️ वास्तवरंग

☆

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तो ऋतू कोणता असतो ? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? कवितेचा उत्सव ?

☆ तो ऋतू कोणता असतो ? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

☆

शब्दांना पाझर फुटून काव्यपंक्ती वाहू लागतात

कल्पनांचे पंख लेऊन शब्दपक्षी मुक्तपणे विहरु लागतात

अलंकारांनी सजलेले शब्दसमुह सौंदर्याने मिरवत असतात

अर्थांचे गंध प्रवाहित करत शब्दांच्या पाकळ्या उमलू लागतात

.

तो ऋतू कोणता असतो ?

*

काना, मात्रा, वेलांटी ची लेणी लेऊन

 अक्षरं शब्द रुपात सजू लागतात

मनातले भाव उचंबळून कागदावर टपटपू लागतात

सुखाची अनुभुती देणारा, दु:खावर उतारा ठरणारा

निर्मितीच्या सोहळ्यात नखशिखांत न्हाऊ घालणारा

.

तो ऋतू कोणता असतो ?

*

ऋतू चक्राच्या अस्तित्वाचे भान असून नसल्यासारखे करणारा

स्वतःच्या धुंदीत समाधिस्त होऊन सृजनाच्या क्षणांना कुरवाळणारा

आणि तरीही,

तरीही,

अतृप्ततेच्या डोहात स्वतःला शोधणारा

तो ऋतू कोणता असतो ?

.

सांगा ना, तो ऋतू कोणता असतो. ?

 ☆

© श्री सुहास रघुनाथ पंडित 

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्द कवीचा… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ शब्द कवीचा… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

☆

  वाऱ्यावरची वरात नाही शब्द कवीचा

 आभाळाचा सांगावा हो शब्द कवीचा

* 

उथळ जळाचा खळखळाट हा नाही केवळ

खूप खोलवर नेई रसिका डोह कवीचा

 *

 कृतार्थ केले दैवी देणे जपातपाने

 मंत्रमान्य तो अखेर झाला शब्द कवीचा

 *

 विसरुन वेदन विरुप पदांचे फुले पिसारा

 हिरव्या रानी असा नाचतो मोर कवीचा

 *

फटफटली ना पहाट कधीहि ज्यांच्यावरती

नव अरुणोदय त्यांच्यासाठी शब्द कवीचा

 *

 बर्फगार जे, मरगळलेले, मालवलेले

 दे संजीवन पुन्हा तयांना मंत्र कवीचा

 *

 काळजातले रक्तथेंब हे अक्षर अक्षर

 जाळामधले टिपुर चांदणे शब्द कवीचा

 *

अमानुषाची शिकार करणे बंधनकारक

लक्ष्य आपुले अचूक टिपतो बाण कवीचा

 *

दृष्टिपारची अनन्यसुंदर अद्भुत सृष्टी

त्या दुनियेचा वाटाड्या हा शब्द कवीचा

 *

मरणशरण तो अखेर असतो जन्म कवीचा

मृत्युंजय पण अंती होतो शब्द कवीचा!

(अनलज्वाला)

☆

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ देवाजीचं देणं… ☆ नीलांबरी शिर्के ☆

नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

☆ देवाजीचं देणं… ☆ नीलांबरी शिर्के ☆

☆

तबक भरून

फुले नजराणा

कोण देते कोणा

कळेचना!!

*

भुईतून आले

झाड उगवून

देवाजीचं देणं

सुगंधित!!

*

विविध रंगात

वेगळ्या ढंगात

सुवास अंगात

प्रत्येकाच्या!!

*

देवाजीचं देणं 

त्यालाच अर्पुन

उतराई होणं

आपसूक!!

*

देण्याचा आनंद

घेण्यातला हर्ष

मना होई स्पर्श

अलौकीक!!

*

गंधित देव्हारा

मनाचा गाभारा

होतोच ना दंग

आत्मानंदी!!

☆

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
1

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पान ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

? कवितेचा उत्सव ?

☆ पान ☆ शालिनी जोशी ☆

☆

 मांगल्य सांगे आंब्याचा डहाळा

 त्याचेच तोरण सण सोहळा

 .

तुळशीचे पत्र करी प्रसाद पवित्र

 जोडले त्याशी श्रीकृष्ण चरित्र

 .

 दुर्वा जुड्यांची गणेशाला प्रीती

 दाह या देवाचा दूर करिती

 .

 बेलाचे त्रिदल महादेवा शिरी

 विषाचा प्रभाव शांत करी

 .

आपट्याचे पान दसऱ्याची शान

 मिळे आज त्याला सोन्याचा मान

 .

विड्याच्या पानाविण पूजा अपूर्ण

 भोजनाची समाप्ती विडा रंगून

 .

 केळीच्या पानी पक्वानाची रांग

 राजाशाही भोजनाचे तेच आंग

 .

 वर्षप्रतिपदा कडूलिंबा मान

 वर्षभर देणारा आरोग्य दान

 .

 अशी पानांची कथा सांगता

 किती सांगावी नाही पूर्णता

☆

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पर्वणी… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆

श्री विनायक कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

☆ पर्वणी… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆

(वृत्त. केशवकरणी (समुदितमदना+ पर्वती))

(८-८-८-३) +(४/५-८-३)

☆ 

श्रावणात या हिरवाईला कुठेच नाही कमी

मनाला आनंदाची हमी

 *

रूप मनोहर रंगबिरंगी वसुंधरेचे नवे

विहरती नभी खगांचे थवे

 *

जणू बहरले गर्द पोपटी पर्ण फुलांचे खळे

चराचर गंधाने दरवळे

 *

अवतीभवती फुले पाहते हसे कोवळी कळी

होतसे उमलायाला खुळी

 *

भरभर वारा थडथड गारा सरसर सरसर सरी

पर्वणी सौख्याची भूवरी

 *

रविकिरणांची अन् वर्षेची भेट आगळी घडे

क्षितिजी रंग छटांचे सडे

☆

© श्री विनायक कुलकर्णी

☎️86000 81092

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # ३०७ – मित्र…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # ३०७ – विजय साहित्य ?

☆ मित्र…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(सोळाक्षरी द्विपदी…)

☆

दुःख जाणूनीया माझे,भाव मनीचे वाचतो,

ओठांवरी हास्य सदा, मन माझे सावरतो…!

*

शब्द तुझे आश्वासक,वादळात देतो साथ

जेव्हा उरतो एकटा, तुझ्या आठवांची बात…!

*

तेज किरणांचे होतो, हरवून जातो जेव्हा

“आहे मीच तुझ्या सवे!” बोल ऐकवीतो तेव्हा…!

*

शिकवतो जगायला, देतो आधाराचा हात

दुःख येता माझ्या दारी, होतो मदतीचा हात…!

*

मित्रा तुझे रूप असे, नाही शब्दातीत खेळ

सुख दुःख भावनांचा, आहे भावस्पर्शी मेळ…!

*

वेदनांचे दोन थेंब,जेव्हा दिसती डोळ्यात

डोळे पुसण्याला येतो, शब्द  धावत ओठांत..!

*

कधी चुका माझ्या झाल्या कधी वाटाच चुकल्या

रागावल्या दुरावल्या, नाही मैत्रीस मुकल्या…!

*

काळ जरी हा सरला,गेलो मित्रा दूर जरी ,

आपुलकी विश्वासाची बरसेल वर्षा उरी…!

*

जीवनाच्या सायंकाळी, नाही कुणावर रोष

अनुभवे आकळला, सारा स्वभावाच्या दोष…!

*

मैत्र आणि मैत्रीतला, तूच अनवट सेतू

शब्दाविना जाणतोस अंतरीचे सारे हेतू…!

*

धागा कधी न तुटतो, असा जरतारी शेला

सांभाळतो श्रृती स्मृती अनुराग, अलबेला…!

*

देवाकडे मागतो मी,”हात” तुझा हाती हवा

जन्मोजन्मी तूच मित्रा, दिठी मिठीत दिसावा…!

*

निरोपाचा नाही शब्द, माझ्या हृदय कोषात

तुझे संजीवन मित्रा, आठवांच्या आरशात…!

☆

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ जादू करांगुलीची ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक 

 

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

? जादू करांगुलीची ?  श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

बघून आपली पडछाया

राधिका मनी हरखली

मूर्ती ह्रदयी वसलेली 

जणू सामोरी साकारली

*

आनंद सांगे चेहऱ्यावरचा 

सारी किमया करांगुलीची 

जिथे जिथे मी स्पर्श करी 

तिथे तिथे मूर्ती दिसे हरीची

*

निस्सीम भक्ती केशवाची 

सगुण रूपात साकारली 

मूर्ती खट्याळ मोहनाची 

निर्जीव भिंतीवरी अवतरली 

*

प्रेमभऱ्या तिच्या स्पर्शाने 

अवतरे मुकुंदाची छाया 

सांगे सुहास्य मुखावरले 

आज दिसे तिज कन्हैया

आज दिसे तिज कन्हैया

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चला व्योमकेशी… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? चला व्योमकेशी… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

☆

अंतर्मन वसे

दिव्य प्रकाशात

दारामागून पाही

काय घडते अंगणात….

*

म्हणोन कर्मेही

होती तेजोमय 

कर्म असे होता

विमल अंतर्मन होय…

*

अशा निर्मळ मनी

देई अपार भक्ती बल,

भरतो मग कृपेचा कुंभ

वाढवी आत्मबल…

*

लाभता गरुडपंख साधनेचे

घालू गवसणी व्योमकेशी,

जरी असू वसुधरेवरची

रांगती बाळे आम्ही…

☆

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares