☆ एक कडवट सत्य… — लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर☆
एके काळी आम्ही लालबागला रहाणारे अणि मुंबईतील इतरही सर्व मंडळी अगदी सहकुटुंब रात्रभर फिरत लालबागचे गणपती पहायला जायचे….
चिंचपोकळी लेन, रंगारी बदक चाळ, तेजूकाया, गरमखाडा, गणेश गल्ली, मार्केटचा गणपती, नरेपार्क, लाल मैदान …. मार्केटच्या गणपतीला बाहेरच्या मैदानात जत्रा भरायची. मग हे माग, ते माग, हट्ट कर…. पेटीत पैसे टाका, चमत्कार बघा. कांबळी, फाटक, पेडणेकर यांची चलत् चित्र प्रदर्शने हे त्यावेळचं मुख्य आकर्षण असायचं.
मग बघता-बघता गणपतीचं मार्केटींग सुरु झालं. तो नवसाला पावू लागला, राजा झाला …. पेटी मोठी झाली, चमत्कार सुद्धा मोठे झाले. रांग वाढली, भाव वाढला, प्रसिद्धी वाढली, पैसा वाढला, आकर्षण वाढलं …. अगदी बाप्पांचा आकारही वाढला …. काळ बदलला, समजलच नाही, काळाच्या ओघात कांबळी, फाटक, पेडणेकर लुप्त झाले, त्यांची प्रदर्शने लुप्त झाली.
सगळं बदललं, पण भाविक बदलले नाहीत. आज कुणाला मार्केटचा गणपती दाखवायला जायचे म्हणजे मोठा विचार पडतो.
साधी रांग, नवसाची रांग, व्ही.आय.पी रांग …. पायाचं दर्शन, पडद्याचं दर्शन, जवळून दर्शन, दुरून दर्शन …. प्रत्येक दर्शनाचा भाव (भावना नव्हे) निराळा….
आम्हाला आजही आठवतं, कोणे एके काळी त्या बाप्पाची दुपारची आरती पण होत नसे, परिसरातली लहान मुले दुपारी शाळा सुटली की जायची आणि आरती करायची. आता बाजूला रहिवाशांनाही तिकडे जाता येत नाही ….
श्रद्धा तेवढीच राहीली, पण पेटी आणि किर्ती मोठी झाली. आम्हाला त्या देवाची आठवण येते, पण त्या देवाला आमचा चेहरा आठवत नाही का …. ?
नसेल कदाचीत, कारण आता “राजा” अंबानी, तेंडुलकर, बच्चन, फडणवीस आणि सेलिब्रिटीज मध्ये व्यस्त आहे, “VIP” झाला आहे बाप्पा ….
आता आम्ही लालबागकर तमाम गणपतींना घरच्या गणपतीत शोधतो …. आमची सर्व श्रद्धा घरच्या गणपतीच्या पायावर ठेवतो …. “राजा”ला इथूनच साष्टांग दंडवत. हात येथूनच जोडतो.
” देवा तुझ्या दारापुढे उभी मोटारींची रांग । पायी आलो दर्शनाला, आत कसा येऊ सांग ?
देवा तुझ्या दर्शनाला मंत्री आणि नेते येती । बंदुका रे आम्हावरी, त्यांचे रक्षक रोखती.
देवा तुझ्या दर्शनाला फळे मिठाईची दाटी । कुठे लपवावी सांग गूळ-खोबऱ्याची वाटी.
देवा तुझ्या मुकुटात सोने आणि लाख हिरे । माझ्या हातातले नाणे ओशाळून मागे फिरे.
देवा तुझ्या अंगावर रोज नवीन दागिना । समजेल का तुला, माझी उपाशी वेदना.
देवा तुझ्या पायाखाली आता चांदीची रे वीट । तुझ्या दर्शनासाठी फाडावे लागते तिकीट.
देवा तुझ्या मंदिराची वाट जुनी ही सोडतो । तुला ठेवतो हृदयी, हात येथूनच जोडतो …. !!
|| गणपती बाप्पा मोरया ||
लेखक : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
एस्.डी. इंडस्ट्रीच्या मालकाच्या घरून आलेल्या गणपतीने विचारलं. लगेच दुसरा म्हणाला “थांबा थोडा वेळ ! झोपडपट्टीतला छोटा गुंड्या मोरयाला सोडतच नाहीय सारखा मोरयाला मिठी मारून ” नको ना जाऊस,” म्हणून जोरजोरात रडतोय. त्यामुळे मोरयाचाही पाय निघत नाहीय.येईलच आता तो. संध्याकाळ होत आली.आता आलच पाहिजे त्याला. तेवढ्यात मोरया गुंडा भाऊला सोडून कसाबसा धावत आला. त्याचे डोळे भरून आले होते. गळ्यात हुंदका दाटून आला होता.सगळ्यानी त्याच्या पाठीवर हात फिरवून त्याचं सांत्वन केलं.
“चला रे चांगला मोठा गोल करा” आज विसर्जन झालेले सर्व गणपती एकत्र आले होते.”आता शिदोरी सोडा बरं!” प्रथम मोरयाच्या सुचनेनुसार सगळ्यानी आपापली शिदोरी सोडली.
प्रथम आलेला मोरया म्हणाला.आणि हो! आपापला अनुभव पण सांगा बरं.
सगळ्यांनी गोल करून आपापली शिदोरी सोडली.तळलेले मोदक तर सगळ्यांच्याचकडे होते.पण प्रत्येकाला आलेला अनुभव मोदकांच्या सारणासारखा गोड होताच,असं नाही.शेवटी पदार्थ करणारीच्या भावना पदार्थात उतरतातच नाही का!
प्रथम आलेला मोरया म्हणाला मीच पहिल्यांदा माझा अनुभव सांगतो.
एस्. डी इंडस्ट्रिजच्या मालकाकडचा मी दीड दिवसाचाच पाहुणा होतो.घर कसलं भलामोठा बंगलाच होता तो.जागोजागी श्रीमंती ओसंडून वहात होती. मला बसायला मऊ मखमली आसन.समोर थुईथुई उडणारं कारंज.त्यात पोहणारे हंस.माफक प्रकाश योजना.दारातच चेहर्यावर वैतागलेला भाव असलेल्या,खूप नटलेल्या बाईनं जरा घाईघाईतच माझं स्वागत केलं.तिचं तिच्या नवऱ्याबरोबर भांडण झालं असावं.केवळ नाईलाज म्हणुन मला यानी घरी आणलंय असं मला वाटलं.ना कुणी “गणपती बाप्पा, मोऽऽरऽया” अशी आरोळी ठोकली, ना दणक्यात आरती ना घसघशीत नैवेद्य.ती बया नोकराना सारख्या सूचना करीत होती.”अगदी नैवेद्यापुरतंच करा .आम्ही दोघेही गोड खाणार नाही.” खरं सांगू का, माझातर मूडच गेला. दुसरे दिवशी घरच्या स्वयंपाकीणीनेच चांदीच्या ताटात नैवेद्य दाखवला.तो नैवेद्य माझ्या उंदराचंही पोट भरु शकला नसता.एवढुसाच होता .अगदी बाराच्या ठोक्याला माझ्या हातावर दही ठेवून बोळवण झाली सुद्धा. शिदोरी म्हणून चॉकलेटचे मोदक, विकत आणलेले मला दिले. हे पहा. हा दीड दिवसाचा पाहुणा म्हणजे मी केव्हा एकदा परत जातो असं घरातल्यांना झालं होतं. कामाच्या बायका स्वच्छता टापटीप करत होत्या. स्वयंपाकीण नैवेद्याचे पदार्थ करत होती. नुसतं पाणी फिरवून फक्त नैवेद्य दाखवायलासुद्धा मालकिणीला वेळ नव्हता. अगदी कोरड्या डोळ्यांनी माझी पाठवणी केली रे. फक्त एवढंच गाडीतून गेलो आणि गाडीतून परतलो.बस्स इतकंच .
प्रत्येकाला आपण गेलेल्या घरातला संवाद आठवत होता.
भल्या मोठ्या फोर बीएचके मध्ये राहणाऱ्या गोळे आजी-आजोबांना हौस दांडगी. शरीर साथ देत नव्हते तरीसुद्धा त्यांनी परंपरा सांभाळायची आणि आवड म्हणून म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश उत्सव केला. दरवर्षीप्रमाणे आजीनी माझ्यासाठी नवीन कुंची शिवून त्यावर मोती लावून ठेवलेली होती. घरात नैवेद्यासाठी डिंकाचे, बेसनाचे, रव्याचे,बुंदीचे, तिळाचे असे विविध प्रकारचे लाडू तयार केलेले होते.अत्यंत हंसतमुखानी त्यांनी माझं स्वागत केलं. मी घरी गेल्यावर मला कुठे ठेवू नी काय काय करू असं त्यांना झालं होतं.गोळेआजी रोज माझी फुलांनी दृष्ट काढायच्या. आजी गजरा घालून छान नटायची.तिच्या नटण्यापेक्षा तिच्या चेहर्यावरचं हंसूच मला जास्त विलोभनीय वाटायचं.आरामात लोडाला टेकून आजी आजोबांचे खुसखुशीत संवाद ऐकताना मला मोठी मजा यायची. आरतीसाठी आपार्टमेंट मधल्या सगळ्या बाळ गोपाळांना जमा करून दणक्यात आरती करायचे. केवळ खाऊ मिळतो म्हणून हे बाळ गोपाळ जमायचे. ना त्यांना आरती यायची ना मंत्रपुष्प. देवघरातली घंटीसुद्धा मुलाना वाजवायची माहित नव्हती.
आजी आजोबानी मनापासून केलेला पाहुणचार मला फारच आवडला. सकाळी सकाळी आजोबा माझ्यासाठी व आजीसाठी चहा करायचे. चहा काय फक्कड करायचे माहिती आहे!.मला चहाचा नैवेद्य दाखवून म्हणायचे.”गणराया,बघ जमलाय का चहा.अरे पृथ्वीवरचं अमृत आहे हे. तिथं स्वर्गात नाही मिळायचं.बघ..
आणखी एक कप हवा का?”आणि खळखळून हसायचे. मग मला नाश्ष्टा त्यानंतर सुग्रास जेवण. असं दोन्ही वेळेला मिळायचं. दोन्ही वेळची आरती अगदी सुगंधी फुलं अत्तर लावून असायची. फार फार आवडलं मला. येताना त्यांच्या डोळ्यातलं पाणी पाहून माझा पाय काय घरातून निघेना. मोठ्या प्रेमानं शिदोरी म्हणून 21 तळणीचे मोदक, गुळाचा खडा,पाणी देऊन हातावरास गोड दहीसाखर देऊन त्यानी माझी बोळवण केली. “तझा प्रवास सुखकर होवो.पार्वती मातेला महादेवाना आमचा नमस्कार सांग ” असा आशीर्वादही दिला.ही गोड शिदोरी मी कायम लक्षात ठेवीन . त्यांची मुलं अमेरिकेत ना! मग मलाच मुलगा म्हणून त्यांनी खूप प्रेम दिलं .वाईट इतकंच वाटते की मी त्यांच्यासाठी काही करू शकलो नाही.
द्रौपदी आजीच्या घरी गेलेला गणपती म्हणाला द्रोपदी आजीना तीन नातीच आहेत. सगळ्या हुशार चटपटीत,आपापल्या कामात एकदम हुशार . द्रौपदी आजी आपल्याला नातू नाही म्हणून त्या नातींचा राग राग करायच्या. त्यांच्याबरोबर माझाही त्यांनी राग राग केला.
म्हणाल्या परंपरा सांभाळायच्या म्हणून तुला आणला. मला एखादा नातू द्यायला तुला काय झालं होतं रे,? नाईलाजाने करतीय मी हे सगळं, लक्षात ठेव!.उद्या कोण बघेल हा संसाराचा पसारा”? मी मनात म्हंटलं आजीबाई “आपण गेलं,जग बुडलं” ही म्हण माहीत नाही का? जे नाही त्यासाठी का रडायचं? तरीही नातीने केलेली सेवा पाहून मला खूप छान वाटलं.
कुलकर्णी कडून आलेला गणपती म्हणाला, “अगदी ऐसपैस स्वागत झालं हं माझं.” सगळ्या जावा भावा एकत्र येऊन माझा उत्सव साजरा करत होत्या. अगदी गोकुळात गेल्यासारखा वाटलं मला.काय तो आग्रह…. जेवायला बोलावलेले गुरुजी जेवून तिथेच कलंडले तरी आग्रह संपेना.झोप म्हणून दिली नाही मला. भजन,पारंपरिक खेळ, हास्यविनोद आणि आरती सुद्धा दणक्यात हो. एक नाही चांगल्या दहा दहा आरत्या म्हटल्या जायच्या. त्यामुळे मला खरोखर झोपायला सुद्धा वेळ मिळाला नाही . त्यांची मोलकरीणसुद्धा खुष होती बर का! सणाचं जादा काम पडणार म्हणून कुलकर्णी वहिनींनी आधीच गणपतीसाठी म्हणून तिला एक हजार रुपये जादाचे दिले होते.मोठ्ठ घर तसं मन ही मोठ्ठ आहे हो त्यांच.त्याही आनंदाने काम करत होत्या. प्रेमाने माझ्याकडे बघायच्या माझी अलाबला घ्यायच्या. खूप खूप मजा आली.
गोखले आजींच्या कडे गेलेला गणपती म्हणाला गोखले आजीना दोन नातीच पण कोण कौतुक त्यांना. दोघी हुशार अभ्यासात तर हुशार आहेतच शिवाय गायन, वादन, नृत्य यातही त्या पारंगत आहेत. काय सुरेख नृत्य केलं त्यांनी. क्षणभर मलाही वाटले की आपणही त्यांच्याबरोबर नृत्य करावं.
पंत वाड्यातून परतलेला गणपती थोडा उदास होता शिसवी महिरपीचा खास गणपतीचा भला मोठा कोनाडा त्यासमोर फळांचा मांडव. चांदीच्या समया पासून सगळ्या वस्तू चांदीच्या. भल्या मोठ्या वाड्यात दोनच व्यक्ती राहतात . मुलं, सुना, नातवंडं सगळी परदेशात. त्यामुळे वाडा अगदी उदास दिसत होता. त्यांनी माझा आगत स्वागत खूप चांगलं केलं, पण उदास वातावरणानं मलाही उदास वाटायला लागलं.घर कायम भरलेलं हवं असं मला वाटलं.
शांतीनगर मधून आलेला गणपती आला तोच मुळी कानात बोटं घालून. आल्या आल्या डोळे मिटून शांत बसून राहिलेला होता. तो म्हणाला काय तो कर्कश आवाज. ते गलीच्छ नाच.ते पाहून केव्हा एकदा आपण आपल्या घरी जातो असं वाटलं मला.कैलासाची,पार्वती मातेची मलाखूप आठवण आली.
एक मोरया म्हणाला मी खरंच भाग्यवान बरं का! खाऊनपिऊन सुखी असलेल्या मध्यमवर्गीय रोकडेंकडे गेलो होतो मी.तिथे बाप लेक अगदी मित्रासारखे वागत होते. सुना हंसतमुख होत्या.नातवंड आजी आजोबांबरोबर दंगा मस्ती करत होते.शुभंकरोती,रामरक्षा म्हणत होती. संध्याकाळी मला नमस्कार करून वडीलधार्यानाही नमस्कार करत होती. फारच छान वाटलं मला.त्या आजी माझ्याशी तासनतास बोलायच्या.नातवंडांना माझ्यासमोर उभं करून म्हणायच्या “मुलानो पाहुण्यांपाशी बसा जरा.बोला त्याच्याशी.कसा आहेस तू,तुला घरची आठवण येते का विचारा त्याला.झोपण्यापूर्वी त्या एकट्या माझ्याशी बोलायला बसायच्या.कुठं दुखतं खुपतं सांगायच्या.मग तोंडभर हंसून आपणच म्हणायच्या “मी कांही मागत नाही हो तुला! मी कुणापुढं बोलणार सांग ना!तेवढंच मन मोकळं झालं . तू सुखी रहा.बरं का म्हणजे आम्हालाही सुखी ठेवशील.हो ना!”
गंमत म्हणून विचारते. आमच्या घरासाठी आम्ही तुझी निवड केली.खूष आहेस ना तू? का तुला अमिताभ बच्चनच्या, तेंडुलकरच्या, आमदार,खासदारांच्या घरात जावंस वाटत होतं??? आम्ही माणसं ना खूप सुंदर ,सुंदर स्वप्नं पाहतो. ती पुरी होणार नाहीत हे माहीत असतं पण ” वचने कीं दरिर्द्रता ” हो की नाही?.स्वप्नंच ती. मग मोठी बघितली म्हणून कुठं बिघडलं? खूप हसायच्या त्या.मला भरपूर शिदोरी दिलीय.मी निघताना सगळ्यांचेच डोळे पाणावले.खूप मस्त वाटलं मला.
पहिला मोरया म्हणाला. खूप छान अनुभव सांगितले सगळ्यानी.असं वाटतं आपण प्रत्येकाची इच्छा पूर्ण करावी.पण प्रत्येकाचं प्राक्तन असतं ना!त्यात आपण देव असूनही ढवळाढवळ करू शकत नाही.
सगळ्यात छोटा आवेकरांकडचा गणपती गंमतीनं म्हणाला.आपलं प्राक्तनतरी कुठं चुकलंय.कुणाच्या घरी आपण जायचं हे आपण थोडच ठरवलं होतं?तसं असतं तर सगळेच लालबागचा राजा झाले असते.यावर एकच हंशा पिकला.
आपण दरवर्षी विविध रुपात पृथ्वीवर जातो.माणसाना आपल्या येण्याने थोडाफार आनंद मिळतो. त्यांचं सुखदुःख ऐकतो.त्यात सामिलही होतो.आपण परत येताना ते म्हणतात.” पुढल्यावर्षी लवकर या “. आपणही एवढंच म्हणूया ….
सर्वे सुखिनः सन्तु……
आणि पुढच्या वर्षाची वाट पाहू या.
लेखक : अज्ञात
संग्रहिका : प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
🌺 “पुत्रसुख…” लेखक : अज्ञात 🌺 प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
कंडक्टरनं एस.टी.चं दार उघडलं. आणि सामंतकाका दारापाशी आले. हातात एक गोंडस बाल गणेशाची मूर्ती… कंडक्टरनं ते पाहिलं आणि काकांना आधार देत आत घेतलं. मागून दोन पॅसेंजर चढले..! एस.टी.सुरु झाली. कंडक्टरनं ड्राईव्हरला ओरडून सांगितलं,
” थांबा जरा ..गणपती मूर्ती आहे….!” त्यानं गाडी थांबवली. लोकांनी मागे वळून मूर्तीकडे पाहिलं.
ते गोंडस रुप पाहून काही जणांचे हात नकळत जोडले गेले.
कंडक्टरनं शेवटी सामंतकाकांना आपल्या शेजारी बसायला सांगितलं. डबलबेल दिली. एस.टी.सुरु झाली..! कंडक्टर इतरांची तिकीटं काढून येऊन काकांपाशी बसला…!
काकांच्या पँटच्या खिशात पैसे होते. पण मांडीवर मूर्ती असतांना त्यांना पैसे काढता येईनात तिकीटासाठी. त्यांची ती धडपड पाहून कंडक्टर म्हणाला, ” राहू दे काका. उतरतांना द्या. एस.टी. थांबवून माझ्या या सीटवर मूर्ती ठेऊ. तेव्हा द्या.”
थोडं अंतर जाताच कंडक्टरनं विचारलं, ” काका एक विचारू? तुमच्या गावात गणेशमूर्ती मिळत असेलच नं? मग दुस-या गावांतून ही घेऊन येणं ; ते ही एस.टी.च्या प्रवासाची दगदग करुन? “
सामंतकाकांनी स्मित केलं..मग म्हणाले, “आमच्या गांवात मिळतात मूर्त्या. पण अशी नाही. ही मूर्ती पाहिलीत नं? कशी गोंडस आहे? जिवंत वाटते. अगदी लहान बाळच..!”
कंडक्टरनं होकारार्थी मान हलवली व अगदी अंत:करणापासून पुन्हा हात जोडले. हलकेच स्पर्शही केला.
काका म्हणाले, ” आम्हा नवरा-बायकोला मूलबाळ नाही. सगळे उपाय करुन थकलो. मग प्रारब्ध म्हणून सोडून दिलं. माझी पत्नी या गावी पंधरा वर्षापूर्वी आली होती कामानिमित्त. तिनं अशी मूर्ती तिथं पाहिली अन् तिचं वात्सल्य जागं झालं जणूकाही… तिचे डोळे भरुन वाहू लागले. तोंडातून नकळत शब्द फुटले “माझं बाळ…! ” …. हे असं घडल्यापासून. ह्या गावातून मुर्ती नेणं हा प्रघात सुरु झाला. हिला सांधेदुखीनं आता प्रवास झेपत नाही. म्हणून मी आणतो “
कंडक्टर हे ऐकून स्तिमीत झाला. थोड्यावेळानं त्यानं विचारलं– ” पण काका तुमच्या तिथं दाखवून घ्यायची, मोल्ड बनवून गावात ..”
” ते ही केलं पण… जास्त मूर्त्या केल्या तरच त्यांना इंटरेस्ट.. आणि असे भाव येतीलच याची शाश्वती नाही “
हे संभाषण एव्हाना आजूबाजूचे ऐकत होते. एका स्त्रीनं विचारलं, ” काका मग विसर्जित करायचीच नाही मुर्ती ..!”
सामंतकाका फिकटसे हसले व म्हणाले, ” विरहामुळं प्रेम उदंड पाझरतं तिचं..! आत्ताही दारात वाट पहात बसली असेल… रांगोळी काय, आंब्याची तोरणं काय..! भाकरतुकडा काय.., दृष्ट काढण्यासाठी ..!! त्याच्या कपड्यांची छोटी बॅग आहे. छोटा तांब्या भांडं काय….. विचारु नका.. मला तिचं ते सुख हिरावून घ्यायचं नाहीये . “
यांवर कुणाचे डोळे पाणावले. कुणी स्मित केले. नंतर मौन राहिलं. काकांचं गाव आलं. एका व्यक्तीनं पुढं होऊन मूर्ती हातात घेतली, म्हणाला, ” काका तुम्ही तिकीट काढा. तोपर्यंत धरतो मी..” काहीजण त्या मूर्तीकडे जवळून पहात राहिले. आता लोकांची नजरच बदलली….! सामंतकाकांनी कंडक्टरला पैसे दिले
” दीड तिकिट द्या. एक हाफ आणि एक फुल “*
कंडक्टरनं आश्चर्यानं विचारलं, ” दीड ? तुम्ही तर एकटेच आला आहात नं? “
काकांनी स्मित केलं, ” दोघं नाही का आलो? मी आणि हा बालगणेश आमचा? “
हे ऐकून सगळे एकमेकांकडे पाहू लागले..!
काका म्हणाले, “असे कोड्यात का पडलात बरे? त्याला नमस्कार केलात. त्याला आपला देव मानता.. व प्राणप्रतिष्ठेपूर्वी तो केवळ माती आहे का हो? तो आपल्यापेक्षा जास्त जिवंत नाहीए? तुमचा भाव जागृत झाला नं? आपणच त्याला मातीची मूर्ती याच भावाने भजतो; पूजतो.. अगदी पूजा केल्यावरही … पण त्याला एकाच प्रेमाची गरज .. आपल्या आलिंगनाची .. द्या दीड तिकिट..!” .. हे बोलतांना काकांचा गळा दाटून आला होता. कंडक्टरनं दीड तिकीट दिलं..!
…. सामंतकाका जेव्हा एस.टी.तून उतरले तेव्हा एस.टी. तील प्रवाशांचे डोळे पाणावलेले व हात जोडले गेलेले ….. अगदी अनाहूतपणे …!!
लेखक : अज्ञात
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
‘ चांदण्यांचं खळं ‘ या सदरात श्रीअभिजीत साळुंखे यांनी दिलेले ग्रामीण लेखन. सीतामाईचे वनवासी जीवन हे स्त्री जीवनाच्या त्रासाचे मूळ आहे असे या महिलांना वाटते, हे या शब्दांमधून जाणवते. भाषेचा बाज पूर्ण ग्रामीण, ओवी रचनेत आहे. ….
न्हवायिळा ग राम बाई चैताचा गारयीवा
सीता ग मालनीचा रख रख वैशाखी जारयिवा
….. चैत्र पालवीच्या गारव्यात रामाचा जन्म झाला तर वैशाख शुद्ध नवमीला वैशाखाच्या उन्हात सीतामाईचा शेतात शोध लागला
आकाशाचा पाळणा खाली धरती मावली
नांगराच्या ताशी सीता जई- अभिव्यक्तीनकाला गावली
राम सीतेची जोडी लोक वाङ्मयात जानपद लोक घेतात ती एकरूप झाली आणि बाया बापण्यांनी आपली संसारीक सुख दुःख या भावभावनांची बिरुदं त्यांना लावून आपल्या आयुष्याशी जोडली.
कवसलीचा राम न्हाय शितंच्या तोलायाचा
शिता ग हिरकणी राम हलक्या कानायाचा
सीतेला तीन सासवांचा सासुरवास होता हे सांगताना म्हणतात-
कैकयी सुमती कवसला शितला तीन सासा
लेक धरतीची सीता त्यांनी धाडला वनवासा
शितला सासुरवास केला ग केशोकेशी
सयांस्नी वाटून दिला तिने गं देशोदेशी
बायांचा जाच हा सीतेचाच वाण-वसा असं त्या मानतात.
वनवास आला शितंसारख्या सतीला
बारा वर्ष झाली डुई धुतली नहिला
सासुरवासाचा फास शिते सारख्या सतीला
घडोघडी परीक्षा बाई जन्माच्या परतीला
रावणाच्या कैदेतून सुटल्यावरही तिला चारित्र्य शुद्धतेसाठी अग्नीपरीक्षा द्यावी लागली
सतीपणाचं सत्व दाह आगिनं इजल
सीता ग मालनिचं मन घडी घडी न झुंजल
गरोदर असतानाही तिच्याबरोबर कोणीही नव्हतं वार्ड चालू होती रडत होती
आटंग्या वनामध्ये कोण रडत ऐका
शीतंला समजावती बोरीबाभळी बायका…
सिता सतीला वनवास असा किती करतील
लवकुश पोटाला येतील सूड रामाचा घेतील
नंतर लवकुश्यासह सीतेचा स्वीकार केला आणि तिला आणायला लक्ष्मणाला रथ घेऊन पाठवला
लक्ष्मणदीर रथ सांगाती घेऊन
वहिनीला न्याया आला मुरळी होऊन
लक्ष्मण हाका मारी वहिनी चला व घराला
वाट बघती समधी डोळे लावून दाराला
सीता लव कुश बाळांना त्यांच्याकडे देऊन निश्चयाने म्हणते
‘आता कशाला जोडू बाई फिरून नातीगोती ‘
वर पडलाय जीव झाली आयुष्याची माती
वसर वसर माऊली माझे माय धरत्री
घेई लेकीला पोटात जीव निवू दे अंतरी
…. सीतेचं मातीत सापडणं आणि नंतर कौटुंबिक सुखदुःख भोगून फिरून मातीत जाणं याचा दुवा थेट आपल्या जगण्याबरोबर जोडून या मायमालयांनी मातीच्या लेकीने तिला आपल्या लोकगीतात लोकलयीनं अजरामर केलं.
लेखक : श्री अभिजित साळुंखे
माहिती संकलन : सौ. सुरेखा सुरेश कुलकर्णी
सातारा
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
लहानपणी गौरी गणपतीच्या दिवसांत पारिजातकाच्या झाडाखालची पांढरीशुभ्र, शेंदरी देठाची फुलं वेचताना आमची तारांबळ उडत असे. कोणाच्या परडीत, कमी वेळात जास्त फुलं जमतात, ह्याची जणू चढाओढच लागत असे. ‘माझी परडी’, ‘माझी फुलं’ ह्या’ मी’ पणाचा भारी अभिमान वाटे.
एकदा का ही फुलं देवाच्या चरणी अर्पण केली की मात्र ही फुलं, ‘माझी फुलं’ रहात नसून ‘त्याची फुलं’ होऊन जात. निर्माल्य होईपर्यंत ती त्याचीच फुलं बनून रहात. फुलांद्वारे ‘मी पणा’ देखील नकळत देवाला अर्पण होत असे.
खरंच, किती क्षणिक असते, मी पणाचे सुख! कळ्यांची फुलं होताना, ती अंगाखांद्यावर खेळवताना तो पारिजातकही अभिमानाने म्हणत असेल, ‘माझ्या कळ्या’ , ‘माझी फुलं’. पण एकदा का ही फुलं धरतीला अर्पण केली की होतोच की तोसुद्धा मीपणातून मुक्त!
आयुष्य देखील असंच असतं. ह्या क्षणभंगुर आयुष्यात माझं घर, माझे कपडे, माझे दागिने, हे किती काळ आपण मिरवणार असतो? एकदा का आपला नश्वर देह अनंतात विलीन झाला की ह्या माझेपणावर आपला काहीही हक्क उरत नाही. हे सगळं तत्त्वज्ञान माहीत असूनही आयुष्यात माझेपणाच्या मिठीतून केवळ वस्तूंनाच नव्हे, तर व्यक्तिंनादेखील सोडणं जमत नाही.
मुलाचं लग्न झालं, तरी आईला स्वतःला मुलापासून अलिप्त करता येत नाही. ‘तिचं घर’, ‘तिचा मुलगा’, ‘तिचा संसार’ सुनेच्या ताब्यात सोपवणं तिच्या ‘पझेसिव्ह’ स्वभावाला जमत नाही. सुनेचं स्वतःच्या वेळेनुसार उठणं, स्वतःच्या वेळेनुसार घर आवरणं सासूला बघवत नाही. सासूचा जीव स्वतःच्या संसारात गुंतलेला असतो. सासरच्या पद्धतीच नवीन सुनेने अंगीकाराव्यात अशी तिची मनोमन इच्छा असते.
वडील जेव्हा आपल्या व्यवसायात मुलाला सामावून घेतात, तेव्हा त्यांच्या पद्धतीनेच मुलाने व्यवसाय करावा असं त्यांना वाटतं. मुलाला त्याच्या कल्पनाशक्तीप्रमाणे व्यवसायाचा विस्तार करु देण्याइतकं अलिप्त त्यांना होता येत नाही.
आयुष्य जसं जसं पुढे जातं, तसा माणूस त्यात अधिकाधिक गुंतत जातो. गुंतण्यामुळेच कलह निर्माण होतात. सासू सुनेचं पटत नाही, बाप लेकात मतभेद होतात, आई मुलांत वाद होतात. आणि ह्या सर्व संघर्षांचं मूळ कारण असतं, ‘गुंतणं’.
आयुष्यात ‘सोडणं ‘जमलं पाहिजे. केवळ वस्तू अन् व्यक्तीच नव्हे, तर दुःख, भीती, यातना, वाईट आठवणी सुद्धा सोडता आल्या पाहिजेत. फुलं ज्याप्रमाणे परमेश्वर चरणी अर्पण केल्यावर ती त्याची फुलं होतात, त्याप्रमाणे दुःखसुद्धा परमेश्वर चरणी अर्पण करून आपल्याला त्यातून रितं होता आलं पाहिजे.
आयुष्य सुखदुःखाची झोळी आहे. दुःखं गाळता आली पाहिजेत. दुःखांना ‘डिलीट’ करण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. लोभ, मोह टाळता यायला हवेत. आशेपासून दूर रहाता आलं, तर निराशेचं दुःख पदरी पडत नाही.
साध्या साध्या गोष्टीतून देखील मोह सुटत नाही. माझ्या फेसबुक पोस्टला ‘लाइक’ केलं पाहिजे. ‘व्हाॅट्स अॅप पोस्टवर कॉमेंट टाकली पाहिजे. माझ्या जवळच्या लोकांनी माझी पोस्ट शेअर केली पाहिजे असा हट्ट, माझ्या कामाचं सगळ्यांनी कौतुक केलं पाहिजे हा आग्रह, मी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे अशी इच्छा, अशा सगळ्या अपेक्षांना जेव्हा पूर्णविराम देता येईल, तेव्हा आपल्याला खऱ्या दृष्टीने अलिप्त होता आलं, असा त्याचा अर्थ होईल.
अलिप्त होण्याचा प्रयत्न करुन तरी बघा. मनातील सारं मळभ निघून जाईल. कोसळून मोकळ्या झालेल्या निरभ्र आकाशासारखं मनदेखील स्वच्छ, सुंदर होईल, ज्यात दुःखद आठवणींचे काळे ढगही नसतील किंवा मोहमयी पांढरे ढग देखील नसतील.
रिक्त होण्यातही सुख आहे. आपलं जीवन कोणाच्या तरी उपयोगी पडतंय, ही भावनाच खूप सुखावह आहे. पारिजातकाचं झाड तेच तर सुचवतंय. अगणित फुलांचं दान अर्पित करून, परत नव्याने बहरण्यासाठी सज्ज होतोच की बापडा… अगदी रोज… कोणत्याही पाशात न अडकता… अलिप्तपणेच !
संग्राहक :श्री शामसुंदर महादेवराव धोपटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
☆ जुने कपडे… ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
जुन्या कपड्यांच्या बदल्यात नवीन भांडी घेण्यासाठी खूप घासाघीस करत असलेली, श्रीमंत घरातली ती महिला, एका मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या मोबदल्यात आपल्या दोन जुन्या साड्या दारावर भांडी विकायला आलेल्या त्या भांडेवाल्यास द्यायला शेवटी कशीबशी तयार झाली.
“नाय ताई ! मला न्हाय परवडत. एवढ्या मोठ्या स्टीलच्या पातेल्याच्या बदल्यात मला तुमच्याकडून कमीत कमी तीन तरी साड्या पायजेत.” म्हणत भांडेवाल्याने ते भांडे त्या बाईंच्या हातातून अदबीने काढून आपल्या हाती परत घेतले.
“अरे भाऊ …, फक्त एकदाच नेसलेल्या साड्या आहेत या दोन्ही. बघ अगदी नवीन असल्यासारख्याच आहेत. तुझ्या या स्टीलच्या पातेल्यासाठी या दोन साड्या तशा तर फार जास्त होतात. मी म्हणून तुला दोन साड्या तरी देतेय.”
” ऱ्हावू द्या, तीनपेक्षा कमीमध्ये तर मला अजिबातच परवडत न्हाय.” तो पुन्हा बोलला.
आपल्या मनासारखा सौदा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ते दोघं प्रयत्न करत असतानाच घराच्या उघड्या दारात उभं राहून भांडेवाल्याशी हुज्जत घालत असलेल्या घरमालकिणीकडे पाहात पाहात समोरच्या गल्लीतून येणाऱ्या एका पारोश्या, केस पिंजरलेल्या, वेडसर महिलेनं घरासमोर उभं राहून घरमालकिणीला ‘मला कांही खायला द्या’ अशा अर्थाच्या काही खाणाखुणा केल्या .
त्या श्रीमंत महिलेनं एकवार किळसवाण्या, जळजळीत नजरेनं त्या वेडसर महिलेकडे पाहिलं. तिची नजर त्या वेडसर दिसणार्या महिलेच्या कपड्यांकडे गेली. जागोजागी ठिगळ लावलेल्या तिच्या त्या फाटक्या साडीतून आपली लाज झाकायचा तिचा केविलवाणा प्रयत्न दिसून येत होता.
त्या श्रीमंत महिलेनं आपली नजर दुसरीकडे वळवली खरी, पण मग पुन्हा सकाळी सकाळी दारी आलेल्या याचकाला विन्मुख परत जाऊ देणं योग्य होणार नाही, असा विचार करीत आदल्या रात्रीच्या शिळ्या पोळ्या घरातून आणून देत त्या तिनं त्या वेडसर भिकारणीच्या ओंजळीत टाकल्या आणि भांडेवाल्याकडे वळून ती त्याला म्हणाली, “हं. तर मग काय भाऊ? तू काय ठरवलंयस ? दोन साड्यांच्या ऐवजी ते पातेलं देणार आहेस की परत ठेवू या साड्या?”
यावर काही न बोलता शांतपणे भांडेवाल्यानं तिच्याकडून मुकाटपणे त्या दोन्ही जुन्या साड्या घेतल्या, आपल्या गाठोड्यात टाकल्या. पातेलं तिच्या हवाली केलं आणि तो आपलं भांड्यांचं टोपलं डोक्यावर घेऊन लगबगीनं निघाला.
विजयी मुद्रेनं ती महिला हसत हसतच दार बंद करायला रेंगाळली आणि दार बंद करताना तिची नजर समोर गेली.तो भांडेवाला आपल्याजवळचं कपड्यांचं गाठोडं उघडून त्या वेडसर महिलेला त्यानं आताच पातेल्याच्या मोबदल्यात त्याला मिळालेल्या दोन साड्यांपैकी एक साडी तिचं अंग झाकण्यासाठी तिच्या अंगावर पांघरत होता. त्याने ती साडी पांघरली आणि तो शांतपणे तिथून निघूनही गेला.
आता मात्र हातात धरलेलं ते पातेलं त्या श्रीमंत महिलेला एकाएकी फार जड झाल्यासारखं वाटू लागलं. त्या भांडेवाल्यासमोर आता तिला एकदम खुजं झाल्यासारखं वाटायला लागलं. आपल्या तुलनेत त्याची कसलीच ऐपत नसतानाही भांडेवाल्यानं आज आपला पराभव केला हे तिला जाणवलं.
तासभर घासाघीस करणारा तो आता न कुरकुरता फक्त दोनच साड्या घेऊन ते मोठं पातेलं देऊ करायला एकाएकी का तयार झाला होता,याचं कारण तिला आता चांगलंच उमगलं होतं.
आपला विजय झाला नसून आज त्या यःकश्चित भांडेवाल्यानं आपल्याला पराभूत केलं आहे ह्याची तिला आता जाणीव झाली होती.
तर…कुणाला काही देण्यासाठी माणसाची ऐपत महत्त्वाची नसते, तर मनानं मोठं असणं महत्त्वाचं असतं.
आपल्याजवळ देण्यासारखे काय आहे आणि किती आहे यानं काहीही फरक पडत नाही.
ज्याच्याकडे जे आहे , ते त्याने द्यावं. मदत फक्त पैसा खर्च करूनच करता येते असं नाही. तर वेळ,मानसिक,भावनिक आधार देऊन एखाद्याचे जीवन आपण अधिक सुसह्य बनवू शकतो.
रस्ता ओलांडण्यास केलेली मदत,एखाद्याचं ओझं उचलून देण्यास केलेली मदत तितकीच मोलाची.
आपल्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहून जर एखाद्यात सकारात्मक बदल होत असतील, तर तीही एक प्रकारची मदतच.
गरज आहे ती आपले विचार करण्याच्या पद्धतीत व नियतीत शुद्धता असण्याची.
संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈