मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भीमाचे गर्वहरण… लेख दुसरा  ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

??

☆ भीमाचे गर्वहरण… लेख दुसरा  ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

कौरवांच्या नाशानंतर, असे म्हणतात, की एकदा भीमाला आपणच जगात सगळ्यात बलशाली आहोत असा गर्व झाला. मग मारुतराया वृद्ध वानराच्या रुपात आला, माझी शेपूट हलवून बाजूला कर म्हणाला आणि भीमाचे गर्वहरण केले.

— — 

मी gym मध्ये अक्षरशः घाम गाळत होतो. यंदा सालाबादप्रमाणे होणारा माझा नवीन वर्षाचा gym ला जायचा संकल्प बराच तग धरून होता. माझी लेकही नेटाने gym ला जात होती, पद्धतशीर व्यायाम करत होती आणि डायटही फॉलो करत होती. आणि त्याचा सुडौल परिणामही दिसून येत होता. आणि त्यामुळे माझ्या gym ला जाण्यावर तिचं विशेष लक्ष होतं.

माझीही ताकत आणि वजनं उचलायची capacity वाढत चालली होती. लेकीच्या आग्रहामुळे आणि सुचनांमुळे वजनं उचलण्याच्या पहिल्या सेटनंतर मी आवर्जून पुढचा सेट जास्त वजनांचा घेत होतो. I was becoming pretty good at this.

आजही gym मध्ये छान लय मिळाली होती. आज gym मध्ये कोणी एक साठीच्या आजूबाजूच्या वयाचे काका नवीनच दिसत होते. शरीरात stiffness होता आणि dumb bells घेऊन त्यांना जमेल तसं, झेपेल तसं ते front raise, hammer curl वगैरे करत होते.

माझे घाम गाळणं चालू होतं आणि ते काका माझ्याकडे कौतुकानं बघत होते. मी squats मारत असताना, ते अगदी थांबून लक्षपूर्वक पाहत होते. माझे leg press करून झाल्यावर त्यांना राहवेना. ते मुद्दाम माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले, “व्वा, फारच छान करता हो तुम्ही. “

माझ्या शरीरावर मूठभर मांस चढले. मी हळूच तिरक्या नजरेने gym मधले आणखी कोणी या कौतुकसोहळ्याचे साक्षीदार आहेत का बघून घेतलं.

“फक्त, squats करताना तुम्ही खाली जाताना जोरात खाली जाता, तसं करू नका. आणि वर येताना spring action ने वर येता, तसंही करू नका. भार खांद्यांवर आणि गुडघ्यांवर नकोय, hip joint आणि मांड्यांवर हवा आहे. आणि त्या टाचा उचलल्या जातात, तेवढ्या सांभाळा, बरं का !”

“Leg press लासुद्धा तुमचा angle बदलायला हवा आहे. आणि वजन पुढे ढकलताना पाय गुडघ्यातून सरळ करत आहात तुम्ही, तेही टाळा. “

माझा तोंडाचा वासलेला “आ” तसाच राहिला होता. ते काका त्यांच्या पुढच्या gym routine कडे वळले आणि मी आमच्या gym trainer ला – राजू सरांना गाठलं.

“राजू सर, हे नवे काका कोण ?” माझी पृच्छा.

राजू सरांनी कानाच्या पाळ्यांना हात लावला, जीभ चावली आणि म्हणाले – “सर, चैनी सरांचं नाव ऐकलं आहेत का तुम्ही ? नातीचा वाढदिवस आहे म्हणून चार दिवस आले आहेत इथं चिंचवडला.

Weight lifting चे नॅशनल लेव्हल चॅम्पियन होते ते. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांत मेडल्स मिळवली आहेत त्यांनी. ७३ वर्षांचे आहेत, पण फिटनेस बघा त्यांचा.

एअर फोर्स मध्ये होते. आता बदलापूरला स्वतःचं gym आहे. Weight lifting, power lifting साठी मुलं तयार करतात ते. पुढच्याच आठवड्यात त्यांचे दोन विद्यार्थी रोमानियात स्पर्धेत भाग घ्यायला चालले आहेत. त्यांच्या अनेक शिष्यांनीही एशियाड, कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये यश मिळवलं आहे. “

माझा तोंडाचा वासलेला “आ” अजूनही तसाच राहिला होता.

— —

भीमाच्या ताकदीचे, पुन्हा एकदा, पार गर्वहरण झालं होतं.

(ताजा कलम : निवृत्त ज्युनियर वॉरंट ऑफिसर, श्री हेरंब चैनी, वायू सेना यांचा या मे महिन्यात (२०२६) लवकरच माननीय संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते दिल्लीला सत्कार होणार आहे.)

– लेख दुसरा

© डॉ मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पाणी…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

? मनमंजुषेतून ?

☆ “पाणी…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी

सकाळी बागेत चालायला गेले होते. नेहमीचा ग्रुप बसला होता. सगळ्याजणी पासष्ठ ते पंच्याहत्तरीच्या आहेत. एक, दोन राउंड घेऊन थोडा वेळ गप्पा मारत बसतात. संगीताचा खणखणीत आवाज लांबुनच कानी आला…

” इतकं गुण्यागोविंदानी शांततेत सगळं जग चाललं होतं तर… मी म्हणते कशाला भांडणं उकरून काढायची? “

” हो ग खरचं त्या ट्रम्पला युद्ध करायची काय गरज होती ?”

जया म्हणाली,

 ” त्यांचही काहीतरी कारण असेल ना?त्याशिवाय का कोणी युद्ध करेल.. ?

आज यांचा वेगळाच विषय ऐकून राऊंड न घेता मी तिकडेच गेले विचारलं,

” आज काय इराण अमेरिका विषय का?” 

” सध्याचा तोच ज्वलंत प्रश्न आहे. म्हणूनच आज आम्ही त्याची चर्चा करत आहोत. ये.. “

मी त्यांच्या गप्पा ऐकायला बसले.

” माझ तर ठाम मत आहे.. ट्रम्प यांच चुकलंच… “

” म्हणजे तू इराणची बाजू घेणार आहेस का? “

“खरं म्हणजे मी तटस्थ भूमिकेत आहे. (हीच मत कोण विचारणार आहे देव जाणे… मनात म्हटलं..) माझं म्हणणं इतकंच आहे की युद्धानंतर होणारे भयानक विनाशकारी परिणाम विचारात घ्या. “

सुधाताई मध्येच म्हणाल्या,

“एकेकांना पट्ट्या मारून सरळ केलं पाहिजे”

” अहो पट्ट्या कसल्या मारताय ?ती काय शाळा आहे का ?मुख्याध्यापिका म्हणून रिटायर्ड होऊन पंधरा वर्षे झाली तुम्हाला.. तरी अजून तीच शिक्षा सांगताय”

 ” तुम्हाला समजलं नाही.. मी प्रतिकात्मक बोलले. ज्याला जी भाषा समजते त्याला तसं उत्तर दिलं तरच त्याला ते समजते. “

मध्येच विनया म्हणाली,

” पंचमहाभूतातील जल आणि ही चराचर सृष्टी, ईश्वरानी सर्वांसाठी निर्माण केलेली आहे. अशा सखोल अध्यात्मिक विचारांची आपल्यासारखी त्यांना बैठक नाही. तिथे जाऊन कोणीतरी त्यांना हे शिकवायला पाहिजे. “

” हो ते पण खरं आहे. तुझं हे म्हणणं मात्र मला अगदी पटलं.. म्हणूनच शांततेत समाधान आहे.. हे त्यांना कळत नाही.

” मला तर वाटतं त्या होर्मुझ का काय सामुद्रधुनीतून जहाजांनी एकमेकांना वाट करून द्यायची. जरा कडेकडेनी जायचं.. जा बाबा तुम्ही जा.. आम्ही पण जातो. कोणी कोणत्या दिवशी जायचं आपापसात चर्चा करून ठरवून घ्यायचं. त्यासाठी युद्ध कशाला?”

“बरोबर आहे.. आणि एखादी गोष्ट करायचीच अस मनानी ठरवलं तर ती करता येते. “

” हो… आता रोजचच ऊदाहरण घे.. पुण्यात कसं आम्ही छोट्या गल्लीत.. कार, टेम्पो, रिक्षा, स्कूटर, शिवाय कडेला भाजीवाले, भेळ पाणीपुरीवाले असले तरी त्यातून वाट काढत जातो. “

निशा लगेच म्हणाली,

” याचं कसलं कौतुक.. तुम्ही पुणेकर कशाचाही अभिमान बाळगता. “

” निशा.. तुम्ही सोलापूरकर तर काही बोलूच नका. इतक्या वर्षात तुम्हाला तुमचा पाणी प्रश्न सोडवता आलेला नाही. पाच दिवसांनी तुमच्याकडे पाणी येतय”

विनिता म्हणाली,

” हो म्हणूनच तर पुढची पिढी पुण्यात राहायला येत आहे. “

” त्यांच्यामुळे इथल्या जागेचे भाव वाढले आहेत. पुढे या सर्वांना पाणी कसं पुरणार हीच चिंता आम्हाला आहे. “

आता यांची चर्चा आंतरराष्ट्रीय पातळीवरून एकदम जिल्हास्तरीयवर आली.

निशा म्हणाली,

” आमच्या सोलापूरची शेंगा चटणी, कडक भाकरी, हुरडा तुम्हाला आवडतो. “

“अग पण त्याचा इथे काय संबंध?”

खरंतर कशाचाच.. कुणाचाही.. कसलाच.. संबंध नव्हता. या मैत्रिणी बागेत येतात. येऊन कुठलीही मतं मांडतात. घरी त्यांचं कोणी… ऐकत नाही. आणि यांच्याशी बोलायला घरी कुणाला वेळही नाही.

 इथं कसं मैत्रिणींशी काहीही बोलता येतं. वाट्टेल ती मतं मांडता येतात.

आपण सगळ्या विषयावर कसं बोलू शकतो असं… ऊगीच आपल मनाचं समाधान करून घेता येत… या सहज आनंदासाठी… खरंतर सगळ्याजणी इथे जमतात.

स्वाती इतका वेळ गप्प होती. ती एकदम उभीच राहिली. म्हणाली, “अगं आज संध्याकाळी मी कैरीची डाळ करून आणायचं ठरल आहे ना? ती भिजत घालायची आहे. आत्ता पाण्यात घातली तरच ती चांगली भिजेल. “

आता पाण्याची चर्चा एकदम वैयक्तिक पातळीवर आली.

 सगळ्या भानावर आल्या.

“हो ग पाच-सहा तास तरी भिजली पाहिजे “… असं एकजण म्हणाली

मी स्वातीला विचारले,

“कैरीची डाळ घेऊन कुठे जाणार आहेस?”

” अगं अनुकडे.. तिचे मिस्टर बेड रिडन आहेत. ती बाहेर जाऊ शकत नाही. म्हणून आम्ही चार पाच जणी अधून मधून तिच्याकडे जातो. गप्पा मारतो. तिचा दिवस चांगला जातो. “

संगीता म्हणाली,

” मी गोड करंज्या नेणार आहे. ती विचारत असते मी काय करू? वय झालं.. दमते ग.. बिचारी… म्हणून तिला सांगितल आहे.. तू फक्त पाणी दे. “

” आमची अगदी वाट पाहत असते.. चला निघू या”

” ए सोलापूरकर गुडघे दुखतात ना.. चालत जाऊ नको. मी गाडीवर सोडते तुला घरी. “

 दोघींनी तिचा हात धरला. सगळ्याजणी घरी निघाल्या.

खरचं मनात सामंजस्य, प्रेम, माया आपुलकी, आपलेपणा असला की अनेक प्रश्न सोडवता येतात…

ट्रंप साहेबांनी खरतर आमच्या मैत्रिणींशी बोलून त्यांचा सल्ला एकदा घेतला पाहिजे.

आंतरराष्ट्रीय चर्चा करता करता सहजपणे रोजच्या जीवनातले प्रश्न सोडवणाऱ्या…

हातात हात घालून एकमेकींना आधार देत… घरी निघालेल्या या मैत्रिणींची मैत्री बघून माझ्या डोळ्यात आपोआप आलं… पाणी…

©  नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वटसावित्री! ☆ तृप्ती कुलकर्णी ☆

तृप्ती कुलकर्णी

🪷 मनमंजुषेतून 🪷

☆ वटसावित्री! ☆ तृप्ती कुलकर्णी

मानवी तृष्णेची तहान शमवणारी कथा.

अनादी कालापासून माणसाला मृत्यूबद्दलचे भय आणि आकर्षण दोन्हीही वाटत आले आहे. या भयावर मात करण्यासाठी त्याने सतत नाना प्रकारच्या युक्त्या शोधण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. तथापि मृत्यूचे वास्तव हे या सगळ्याला कायमच आव्हान देत आले आहे. या आव्हानाला उत्तमरीत्या प्रतिसाद देणारी कथा म्हणजे वटसावित्रीची कथा. त्यामुळे या कथेतल्या सावित्रीबद्दल, तिने मागितलेल्या वरांबद्दल आणि एकूणच यमाबद्दल एक उत्सुकता मनात निर्माण झाली. त्या उत्सुकतेतून ही कथा पुन्हा पुन्हा वाचण्याचा मोह झाला. आणि प्रत्येक वेळी त्याच्यात काय नवीन सापडते हे स्वतःशीच पडताळण्याचा प्रयत्न झाला. त्यातून गवसत गेलेल्या काही गोष्टी.

काही कथा काल्पनिक का खऱ्या या वादाच्या पलीकडे असतात. त्यांचं मूल्य कथा म्हणून स्वतःला सिद्ध करणं हे नसून त्यामध्ये सांगितल्या गेलेल्या गोष्टीचा विचार दुसऱ्या पर्यंत पोहोचवणं हा महत्त्वाचा असतो असं मला वाटतं. वटसावित्रीची कथा ही यापैकीच एक महत्त्वाची वाटते. याचं कारण या गोष्टीत असणाऱ्या मृत्यूच्या अनेक छटा…

साधारणपणे मृत्यू म्हटलं की आपल्या डोळ्यांपुढे शारीरिक मृत्यू हा चटकन येतो. परंतु मृत्यू हा शरीरापर्यंत पोहोचण्याआधीही अनेक पातळीवर मानसिकदृष्ट्या पोहोचलेला असतो. जसं की राज्य नसणं हा एखाद्या राजासाठी आणि राजकुमार म्हणून गणल्या जाणाऱ्या व्यक्तीसाठी मोठ्या प्रमाणावरती मानसिकदृष्ट्या मृत्यूच असतो. आपले सर्व राजभोग, राज कर्तव्य सोडून एखाद्या वनामध्ये अत्यंत सामान्य पातळीवरील जीवन जगावं लागणं. हा शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि बौद्धिक दृष्ट्या सुद्धा अक्षमता दाखवणारा, मृतवत अवस्था निर्माण करणाराच प्रसंग आहे. एक प्रकारे तो मृत्यूच आहे.

इथे हा राजा अंध दाखवलेला आहे. अंधत्व हे सुद्धा फक्त दृष्टी पूर्ती मर्यादित नसून संकुचित दृष्टी किंवा अज्ञानाची दृष्टी या अर्थाने सुद्धा महत्त्वाचं आहे. त्या दृष्टिकोनातून एखाद्या राजाचं राज्य नष्ट होण्यामागे त्याची संकुचित वृत्ती किंवा त्याचं अज्ञान हे मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असणे ही गोष्ट मान्य करावी लागेल. आणि त्याबाबतीतला अंधत्व हे तर राजाकडे होतं ते अंधत्व दूर करण्याची थोडक्यात त्याबाबतीत ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा, वर सावित्रीने यमाला मागितला. म्हणजे इथे राज्यप्राप्तीसाठीचा राज्य चालवण्यासाठीचा जो दृष्टिकोन, आवश्यक ती क्षमता लागते तिची प्राप्ती ही महत्त्वाची आहे. ती सावित्रीने मिळवली म्हणजे मृत्यूची एक छटा सामर्थ्यहीनता यावर मिळवलेला विजय आहे.

त्यानंतर आपल्या सासू-सासर्‍यांसाठी तिने मागितलेले आणखीन पुत्रांचे वरदान म्हणजे साम्राज्यविस्तारासाठी लागणारे शारीरिक, मानसिक सामर्थ्यशाली जीवांची वृद्धी आहे. ज्या वेळेला सासू-सासरे ज्ञानाने सामर्थ्याने युक्त होतील त्यानंतर त्यांचे होणारे पुत्र हे हे देखील त्याचे प्रतीक असतील. आणि त्यांची जेव्हा वाढ होईल संख्यात्मक दृष्टीने गुणात्मक दृष्ट्या तेव्हा ते साम्राज्य विस्तार पावेल यात शंकाच नाही. म्हणजे अशा अर्थाने साम्राज्याचा संकुचिकरण होण्याचा किंवा पुन्हा ते हातून न जाऊ देण्याचा विजय हा देखील तिने मागितला.

आणि सरते शेवटी स्वतःला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद मागून ते साध्य करण्यासाठी प्रत्यक्ष सत्यवानाला पुनर्जन्म मिळाला. यातून सावित्रीने पुन्हा एकदा चैतन्यमय तेजस्वी आनंददायी आणि धर्माधिष्ठित जीवनाची निवड केली. ज्या वेळेला राजा तसे पुत्र हे सर्व धर्माधिष्ठित जीवन जगतील त्यावेळेला ते  राज्य तेथील, वातावरण, तेथील इतरेजन यांचे जीवन देखील  सर्वच दृष्ट्या उन्नत ठरणारे असेल. थोडक्यात एका वरातून सावित्रीने संपूर्ण राज्याची तेही सामर्थ्यवान आणि नीतीवान राज्याची  पायाभरणी केली.

हा सर्व प्रसंग वटवृक्षाच्या झाडाखाली झाला म्हणून आज वटवृक्षाचे महत्व. परंतु वटवृक्षाचे आधीच पुराणातही पुष्कळ महत्त्व आहे. मुळात हा वृक्ष आपल्या पारंब्यातूनही पुन्हा नवनिर्मितीची क्षमता धारण करतो. म्हणजे या वृक्षातच मुळात अजेय राहण्याची वृत्ती आहे. विस्ताराचा ध्यास आहे. आणि अनेकांना आश्रय देण्याची क्षमताही आहे. थोडक्यात एखाद्या राजाला किंवा एखाद्या मनुष्याला ज्याप्रमाणे आपल्या वंश विस्ताराची किंवा साम्राज्यवाढीची इच्छा असते तशीच काहीशी इच्छा धारण करणारा वृक्ष आहे. असे सगळे साधर्म्य साधणारे योग या कथेत जुळून आले आहेत.

त्यामुळे सर्वच प्रकारच्या मृत्यूवर विजय प्राप्त करण्यासाठीच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची  प्रगाढ ज्ञानाची आणि विश्वासाची ही कथा आहे असं मला वाटते. जे लोक अधिक अभ्यासक आणि जाणकार असतील ते आणखीनही शोधतील. पण एकंदरी कथा मानवी तृष्णेची तहान शमवणारी आहे यात शंका नाही.

© तृप्ती कुलकर्णी

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ भीमाचे गर्वहरण… लेख पहिला  ☆ डॉ मकरंद पिंपुटकर ☆

डॉ मकरंद पिंपुटकर

??

☆ भीमाचे गर्वहरण… लेख पहिला  ☆ डॉ मकरंद पिंपुटकर 

कौरवांच्या नाशानंतर, असे म्हणतात, की एकदा भीमाला आपणच जगात सगळ्यात बलशाली आहोत असा गर्व झाला. मग मारुतराया वृद्ध वानराच्या रुपात आला, माझी शेपूट हलवून बाजूला कर म्हणाला आणि भीमाचे गर्वहरण केले.

— —

मी एकदा सोलापूर रस्त्याने संत श्री नारायण महाराजांच्या केडगाव बेटातून चिंचवडला इनोव्हा गाडीतून एकटाच परत येत होतो.

संध्याकाळी ६ चा सुमार होता. हायवेला भांडगावच्या सोनाक्षी मंगल कार्यालयातले लग्नकार्य आटोपत आले होते. कार्यालयाच्या दारात “बुढ्ढीके बाल” विकणारा पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांना लिफ्टसाठी हात करत उभा होता. in न केलेला काळा पिवळा चौकडीचा हाफ शर्ट, पायात साध्याशा चपला, खांद्यावरच्या दांडीला ५-१५ बुढ्ढीके बाल च्या पिशव्या लटकवलेल्या, खांद्याला रिकामीशी शबनम छाप झोळी.

म्हटलं आज याला AC गाडीतून lift द्यावी. हा तरी कधी गाडीत बसणार? त्याच्यासाठी गाडी थांबवल्याचे त्याला आश्चर्य वाटले. तो गाडीत बसला व माझी बडबड सुरू झाली. त्याचं नाव बबलू आणि तो हडपसरला भाड्याने रहात होता.

“ काय काय विकता?”

“बुढ्ढी के बाल, साबणाचे बुडबुडे व साधे मोठे फुगे.”

“दिवसाला किती बुढ्ढीके बाल विकले जातात?”

“तीन एकशे. पाच रुपयाला एक.”

“ते कसे बनवतात?”

– – मग बबलूने ती process सांगितली. २ किलो साखरेतून तीनशे पिशव्या बनतात. वगैरे वगैरे.

२ किलो साखर म्हणजे फारतर १०० रुपये आणि या पिशव्या विकून त्याला १५०० रुपये मिळत होते. म्हणजे १४०० रुपये नफा.. दिवसाला. म्हणजे महिन्याला??? माझ्या डोक्यात आकडेमोड वेगाने सुरू झाली.

“आणि बुडबुडे व फुगे कुठेत? ”

“संपले. ”

– – त्यांच्यातही कमीतकमी १००% नफा होता. बबलूच्या दिवसाच्या नफ्याचा आकडा माझ्या कल्पेनेपेक्षा खूपच मोठा होत चालला होता.

“इथे कसे काय? ”

“लग्न असलं की विक्री चांगली होते. पुण्यापासून (१०० किलोमीटर दूर असलेल्या) इंदापूरपर्यंतच्या सर्व मंगल कार्यालयांच्या मॅनेजरशी माझे कॉंट्रॅक्ट आहे. मी फोननुसार विक्रीला आलो की मॅनेजरला १०० रुपये द्यायचे. …” – उन्हाने रापलेला, साधासा दिसणारा पण दिवसाकाठी किमान २-३००० रुपये नफा करणारा बबलू सांगत होता.

“पण इतक्या सर्वांशी कॉंट्रॅक्ट करून काय उपयोग? तुम्ही तर एकाच ठिकाणी जाऊ शकता. ” – माझा चाणाक्ष सवाल.

“ मुलं ठेवली आहेत ना…”. त्याचं शांत उत्तर…..

“ गावचीच १८-२० मुलं आहेत. २ खोल्या भाड्याने घेतल्या आहेत. मेहुणा मार्केटिंग करून raw material आणतो. मी सगळ्यांसाठी बुढ्ढीके बाल बनवतो. मुलांना महिना १०-१२, ००० पगार देतो… ”

मला यातून दोनच आकडे डोळ्यांसमोर नाचत होते. हा माणूस महिना २ लाख रुपये पगार वाटतो. आणि रहाणं, खाणं, पिणं वगळता प्रत्येक मुलामागे महिना ७०-८०, ००० रुपयांचा नफा कमावतो. अशी १८-२० मुलं. म्हणजे स्वत:सकट महिन्याला याचा निव्वळ नफा लाख्खो रुपयांच्यावर जातो.

“दिल्लीजवळ ७० किलोमीटरवर मीरतला रहातो. तुमच्यासारख्यांच्या आशिर्वादाने तीन मजली इमारत आहे, ४ गाड्या आहेत… ” बबलू सांगत होता, आणि मी तोंड उघडे टाकून गाडी चालवत होतो.

— —

या प्रवासाच्या दुसऱ्या दिवशी मी व बायको म्हात्रे पुलाजवळ dp road वर एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. शेजारीच एक मंगल कार्यालय होतं. दारात एक मुलगा बुढ्ढीके बाल विकत उभा होता.

मी त्याच्याजवळ गेलो, विचारलं, “कुठे रहातोस? ”

तो म्हणाला : “ हडपसरला. ”

“बबलूकडे का? ”

तो चकित. ‘हो’ म्हणाला.

“त्याला सांग काल तो ज्या गाडीने आला त्याचा “ड्रायव्हर” भेटला होता. ”

भीमाच्या ताकदीचे पार गर्वहरण झालं होतं.

– लेख पहिला 

© डॉ मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “अशीही एक वटपौर्णिमा…” ☆ मुक्ता महेश अभ्यंकर ☆

मुक्ता महेश अभ्यंकर

??

“अशीही एक वटपौर्णिमा☆ मुक्ता महेश अभ्यंकर ☆

हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते.

माझ्या लग्नानंतर आम्ही पवना नगरला राहत होतो तेव्हा माझी लग्नानंतरची वटपौर्णिमा होती. अगदी मराठी सिनेमात दाखवतात तशी मी आठ दहा सुवासिनीं बरोबर वडाची पूजा केली होती.

त्या नंतरच्या वर्षी माहेरी वटपौर्णिमेला जायचा योग आला. नुकत्याच लग्न झालेल्या माझ्या मैत्रिणी बरोबर गणपती मंदिरात वडाची पूजा करायला गेले.

मंदिरात पूजेसाठी खूप बायका आल्या होत्या. मंदिरा बाहेर पाच फळांचा वाटा घेऊन विक्रेते व फुलवाले बसले होते.

मंदिराच्या आत पूजेसाठी खूप सारे गुरुजी होते.

मंदिराच्या परिसरातील वडाच्या झाडाभोवताली भरजरी साड्या नेसून असतील तेवढे दागिने घालून सुवासिनींनी गर्दी केली होती.

काही सुवासिनी गुरुजींच्या सल्ल्याप्रमाणे पूजा करत होत्या. नंतर नंतर वडाभोवती पांढरा धागा गुंडाळायला गोंधळ उडाला. आपला धागा कुठला हे ही कळेनासे झाले होते. हातात येईल तो धागा बायका वडा भोवतली गुंडाळून कशीबशी प्रदक्षिणा पूर्ण करत होते. पूजेसाठी इतकी गर्दी झाली की नंतर नंतर मोठ्या रांगा कराव्या लागल्या व फावल्या वेळेत बायकांच्या गप्पा सुरू झाल्या.

त्या मोकळ्या वेळेत बायका आपल्या घरच्यांबद्दल बोलू लागल्या. खूप जणी घरात होणाऱ्या मतभेदांबद्दल सांगत होत्या. त्यातील काही जणी आपल्या सासरी होणाऱ्या त्रासा बद्दल सांगत होत्या.

काही जणींना आपल्या पती कडून योग्य मान ही मिळत नव्हता तरीही त्या पूजेसाठी आल्या होत्या. एक जन्म ही ज्याच्या बरोबर सुखाने राहू शकत नाही त्याच्या बरोबर सात जन्माची सोबत मिळण्याची पूजा करायला आल्या होत्या. सुवासिनी एकमेकांना जी फळे देत होत्या ती फळे खूप कोवळी आणि खाण्यालायक ही नव्हती.

पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेर जायला मिळायचे नाही पुजेच्या निमित्ताने बाहेर जाऊन लोकांना भेटणे ह्या उद्देशाने सण वार साजरे करण्यात यायचे.

हल्ली पण वडाची फांदी तोडून सुवासिनी एकत्र जमून पूजा करतात तर काही वडाचे रोप लावून वटपौर्णिमा साजरा करतात. पण आता त्याच्या कडे एक इव्हेंट म्हणून बघितले जाते. रिल्स बनवणे स्टेट्स सारा दिखावा.

खरं तर नवरा-बायकोचे नाते विश्वास, आदर, प्रेम आणि मैत्री या पायावर आधारित असावे. दोघांनीही एकमेकांच्या भावना समजून घेऊन, सुख-दुःखात एकमेकांना खंबीरपणे साथ देणे हे एक सुखी वैवाहिक आयुष्याचे गमक आहे. असे झाले तर खरी वटपौर्णिमा साजरी झाली असे म्हणता येईल असे मला वाटते.

©  मुक्ता महेश अभ्यंकर

साहाय्यक प्राध्यापिका, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी , कोंढवा पुणे

संपर्क :  सन युनिव्हर्स फेज २, एम ५०३, नवले ब्रिज जवळ, नऱ्हे, पुणे.

फोन   : ७५०६२४३०५०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “पान खाये सैया हमारो…” ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ “पान खाये सैया हमारो…” ☆ श्री सुधीर करंदीकर

विड्याचे पान आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जेवणानंतर पान खाल्ल्याने तोंडाची चव वाढते. पान खाल्ल्याने तोंडातील अनेक जीवाणूंचा प्रभावीपणे सामना केला जातो ज्यामुळे तोंडाला दुर्गंध येत नाही. तसेच दात पोकळी, दात किडणे यांचा त्रास कमी होतो. जेवणानंतर पानाचा विडा किंवा नुसते पान चावून खाल्ल्याने आतड्या निरोगी राहतात. आरोग्यासोबतच ते सौंदर्य वाढवण्यातही फायदेशीर ठरते.

देशातच काय तर आता विदेशात देखील विड्याचे पान मोठ्या आवडीने खाल्ले जाते. प्राचीन काळापासून भारतात जेवणानंतर पान खाण्याची परंपरा आहे. मात्र, पान खाणं ही सवय चांगली नाही, यामुळे दात खराब होतात, असे तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा गैरसमज आहे.

मुळात विड्याचे पान खाणे ही चुकीची सवय नसून पान खाल्ल्याने अनेक आजारांपासून आपली सुटका होते. यात प्रामुख्याने सर्दी, खोकला, फुफ्फुसांशी संबधी आजार दूर होतात आणि अनेक लाभ मिळतात.

विड्याच्या पानांची चव ही तिखट स्वरूपाची असते. परंतु यामध्ये कॅल्शियम (Calcium), प्रोटीन (protein), खनिज (Minerals), कार्बोहायड्रेट (carbohydrate), फायबर (Fiber), व्हिटॅमिन सी (vitamin C) भरपूर प्रमाणात असतात. जे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे आणि अनेक आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात.

(conditions apply – पानामधे तंबाखू, गुटखा असे प्रकार टाकू नयेत)

पान खाण्याचे फायदे व त्यापासून मिळणारी पोषक तत्वे या विषयावर जो रिसर्च झालेला आहे तो असे दाखवतो की विड्याचे पान जर बायकोने तयार केले असेल तरच त्याच्यातली सर्व पोषक तत्वे जागृत होतात आणि त्याचा फायदा खाणाऱ्याला पूर्णपणे मिळतो.

इतर कोणी पान तयार केले असेल तर फक्त दिखाऊ फायदा होतो, म्हणजे ओठांना आणि जिभेला लाली येते एवढाच पान खाण्याचा फायदा त्यांना होतो.

म्हणून शक्यतोवर बायकोने केलेले पान खाण्यावरच भर असू द्यावा हेच रिसर्च सांगते.

एखादा महिना वर सांगितल्याप्रमाणे पान खाऊन बघा आणि अनुभव कळवा.

भाग २ —

बऱ्याच जणांचे मला यावर मेसेज आले /फोन आले, की आम्हाला हे फायदे नक्कीच मिळवायचे आहेत, पण बायकोने तयार केलेले पान रोज कसे मिळवावे, हा मोठा प्रश्न आहे, काय करता येईल?

उत्तर खूप सोपे आहे – बायकोला कायम खुश ठेवा.

बायकोला कायम खुश कसे ठेवावे याकरता – मला आनंदी राहायचे आहे, काय करू? , हा माझा लेख जरूर वाचा.

काही लेडीज नी असा प्रश्न विचारला, की विड्याच्या पानाचे फायदे मिळवण्याकरता पुरुषांनी बायकोने केलेले पान खावे असे तुम्ही लिहिले आहे. पण मग विड्याच्या पानाचे फायदे मिळवण्याकरता आम्ही बायकांनी कुणी केलेले पान खावे!

यावर उत्तर असे आहे, की कुणीही तयार केलेले पान स्त्रियांनी खाल्ले तरी त्यांना त्याचे सगळे फायदे मिळतातच. कारण पानामध्ये असलेली सर्व पोषक तत्वे जागृत करण्याची किमया देवाने जशी बायकोच्या हातात दिलेली आहे, तशीच किमया सर्व स्त्रियांच्या तोंडात पण दिलेली आहेत. बघा ना, स्त्रियांच्या आवाजात कायम गोडी असते आणि बोलण्यात कायम प्रेम असतं.

त्यामुळे स्त्रियांकरता पान कुणी केले आहे हे महत्त्वाचे नसून, त्यांनी रोज पान खाणे हेच महत्त्वाचे आहे.

टीप : आमच्या बागेत विड्याच्या पानांचा वेल आहे. त्यामुळे मी रोज बायकोनी तयार केलेले पान खातो. आणि बायको पण स्वतः केलेले पान खाते)

© श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वयाचा धाक आणि आदर… ☆ शीला पतकी ☆

शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ वयाचा धाक आणि आदर☆ शीला पतकी 

आपल्या भारतीय संस्कृतीत विशेषता महाराष्ट्रात वय वाढलेल्या व्यक्तींबद्दल प्रथमपासूनच आदर दाखवला जातो वयाने वाढलेल्या माणसांचा आपण मानसन्मान ठेवतो घरात सुद्धा पूर्वी मोठ्या माणसांसमोर बसून कोणी बोलत नव्हते. मोठी माणसे घरात आली की लहान मुलं सुद्धा पटकन उठून उभे रहात. मोठ्या माणसासमोर लोळत पडणे.. अशा गोष्टी होत नव्हत्या! बोलताना एक आदर होता मोठ्या भाऊ बहिणीला मान होता आणि त्यांच्या वयाचाही आपण आदर करत होतो. यामागे घरात असणारे छान संस्कार होते!

घरातच नव्हे तर आपण ज्या ठिकाणी नोकरी करायचो ते कार्यालय, शाळा, कचेऱ्या, व्यवसाय या ठिकाणी सुद्धा आपल्यापेक्षा वरिष्ठांना मान देण्याची पद्धत होती आणि आजही आहे. सिनिऑरिटी हा सन्मानाचा मुद्दा मानला जातो. आजही आम्ही शाळेत गेलो होतो तर सर्व ज्युनिअर शिक्षक वाकून नमस्कार करतात. शिक्षकी पेशामध्ये तर विद्यार्थी अगदी रस्त्यात भेटला आणि तो त्याच्या क्षेत्रात कितीही मोठा असला तरी तो पटकन वाकून नमस्कार करतो हा अनुभव आहे. या कृतीमध्ये नमस्कार करणाऱ्यांचा मोठेपणा दिसतो. त्यांच्यामध्येआपल्या प्रति आदर भाव आहे हे लक्षात येतं. पण काही वेळा ज्यांना आपण आदर देतो, मान ठेवतो ती माणसे आपल्या वयाचा धाक दाखवायला लागतात. आमच्या पुढे येणाऱे आमचे विद्यार्थी आमच्यापेक्षा प्रचंड हुशार असतात. त्यांनी निवडलेली क्षेत्र त्या ठिकाणी ते करीत असलेले काम हे स्पृहणीय असते. त्या मानाने आमचे शिक्षण तोकडे असते. पण त्यांच्याजवळ त्यांच्या पदाचा हुशारीचा शिक्षणाचा किंचितही गर्व नसतो. आणि नमस्कार करून घेणार माणूस उगाचच त्याला काहीतरी दोन गोष्टी कधी कधी ऐकतो सुद्धा.

अगदी आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्या मुलांना, आपल्या धाकट्या भावंडाना आपल्या वयाचा धाक घालतो. माझे एक ओळखीतले गृहस्थ आहेत वयाने मोठे आहेत. लोकात सन्माननीय. त्यांना अनेक ठिकाणी बोलवतात पण दरवेळी त्यांच्या अपेक्षा खूप वेगळ्या असतात. लोकांनी त्यांना येऊन घेऊन जावं आणून पोहोचवावं. त्यांची दखल घ्यावी. हे काही कारणाने काही वेळेला होत नाही मग ते घरी बोलावून कान उघडणी करतात.

सासवा सूनामध्ये नेमकं हेच घडतं सासूचा सदैव धाक आणि सातत्याने “आम्ही नाही असं केलं, आम्ही नाही तसं केलं. “… बदलत्या परिस्थितीच भान ठेवायला पाहिजे असं मला वाटते बरेच जण इतरांना टॉर्चर करत असतात आणि या धाकामुळे संबंध बिघडतात.

एका घरातला किस्सा आहे. मोठा भाऊ फारसा काही शिकलेला नाही कदाचित त्याच्यावरती जबाबदार्या असतील. धाकटी भावंडं हुशार निघाली त्यांना समाजात मान मिळाला, प्रतिष्ठा मिळाली, पैसा मिळाला, पण हा माणूस जिथे तिथे त्यांना ऐकवायचा ” गप्प काही सांगू नकोस तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी “किंवा “उगीच नाही आमचे केस पांढरे झाले शिकला म्हणजे मोठा झालास का “.. असे सदैव ऐकवत असे भावंडे बिचारी मोठा भाऊ आहे त्याचा मान ठेवण्यासाठी त्याच्या धाकात होती पण हे अनेक वेळा घडल्यावर वयाने लहान असलेला पण कर्तुत्वान असलेला धाकटा भाऊ म्हणाला, “दादा तू पावसाळे खूप पाहिले पण ते सगळे दुष्काळी होते रे त्या दुष्काळी पावसाळ्यात पाऊस पडला नाही त्यामुळे तुझ्या डोक्यात काही उगवलं नाही कुठल्या गोष्टीची पेरणी झाली नाही नव्याने काही घडलच नाही नव्या विचारांचे कुठले अंकुर फुटले नाहीत अशा नुसत्या दुष्काळी पावसाळ्याचा उपयोग काय? आणि केस पांढरे म्हणशील तर आता ते तरुण मुलांचे सुद्धा होत आहेत त्याचा वयाचा आणि अनुभवाचा संबंधच राहिला नाही”… त्यांच्यातले नातेसंबंध दुरावले गेले. कारण धाकामुळे मान देत असलेली भावंड स्वतःच्या किरकिरी मुळे एक दिवस बोलून बसली आणि मग ते टोचले मला वाटतं वयस्कर माणसाकडून ही होणारी मोठी चूक आहे.

केवळ वय वाढलं, आपले अनुभव काही वेगळे आहेत म्हणून दरवेळी आपण आदरणीय ठरतो असं असण्याचा काहीच कारण नाही. जग इतक्या झपाटाने बदलतय पिढीची भाषा बदलतीये, कौशल्य बदलताय, शिक्षण पद्धती बदलतीये,… अफाट हुशार मुलं आहेत. त्यांचे अनुभवही सुंदर आहेत ते खर तर आपण समजून घ्यायला पाहिजेत आणि दोन पिढीतील ही समज वाढली तर नातेसंबंध हे उत्तम होतील आणि मग उगाचच वयाचा आणि अनुभवाचा धाक कोणाला घालवा लागणार नाही.

काल सहज फोनवर बोलताना माझ्या मैत्रिणीने सांगितलेल्या अनुभवावर मी विचार केला आणि पटलं, *पावसाळ्यावर काही अवलंबून नसतं ते दुष्काळी असता कामा नयेत त्या अनुभवात आपल्याला काही रुजवता आलं पाहिजे काही उगवता आलं पाहिजे तर आपल आयुष्य समृद्ध आणि हिरवं होऊन जातं आणि दुसऱ्याच्या आयुष्यात आपण हिरवळ आणू शकतो* काल मला जगण्याचा छान मंत्र मिळाला. वाचा पटलं तर घ्या नाहीतर धाक दाखवा.

©  शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका, सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “देणगी…!!!” – भाग ३ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “देणगी…!!!” – भाग ३ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

कॅम्पमध्ये एका चर्च बाहेर अर्धनग्न (हा शब्द लिहिण्यासाठी योग्य आहे म्हणून वापरला, अन्यथा अवस्था याहून वाईट होती)अवस्थेत बेशुद्ध पडलेला हाच तो…

गलीच्छ वागतो, काम करत नाही, प्रसंगी आई-वडिलांना शिवीगाळ आणि मारहाण करणारा हाच तो…

शेवटी आई बापालाच नालायक ठरवून, घराबाहेर पडून, भीक मागून – दारू पिऊन कुठेही पडणारा हाच तो…

… दोनेक वर्षे अंघोळ नाही – स्किन इन्फेक्शन – रस्त्यावर उघडे झोपणे – शुद्ध नाही – अंगावर किमान दोन इंचाचा मळ – घोंगावणाऱ्या माशांचे, हक्काचे पार्टीचे ठिकाण… हाच तो…

– – यापुढचे त्याचे वर्णन आता मुद्दाम करत नाही, वाचतानाही घृणा येईल…

दोन वर्षांपूर्वी मी याला जेव्हा पाहिले तेव्हा मला याचा राग आला नाही, वाईट वाटलं…!

बेफाट वाहणाऱ्या पाण्याला बांध घातला की ते संथ होतं…

बेफाट वाहणाऱ्या मनाला बांध घातला कि ते संत होतं…

याच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं, याला कुणी बांध घातलाच नाही… तू नालायक आहेस, निकम्मा आहेस, दारुड्या आहेस, जगण्याच्या लायकीचाच नाहीस, मरत का नाहीस, माझ्या पोटी हि असली अवलाद नको होती… अशा वाक्यांनी त्याचे खच्चीकरण केले गेले…!

सगळीकडून धिक्कारला गेलेला तो, हाच तो…

तू तो है अलबेला… हजारो मे अकेला… असं एकदा तरी, भले खोटं खोटं तरी, कोणीतरी त्याला म्हणायला हवं होतं… नेमकं तेच घडलं नाही आणि हा बिघडत गेला…!

लागल्यावर प्रत्येक वेळी औषधच लागतं असं काही नाही, प्रेमाची एक फुंकर सुद्धा पुरेशी ठरते…!

– – Diagnosis झाल्यावरच उपचाराची दिशा कळते. त्याची दुखरी नस मला समजली होती, उपचाराची दिशा नकळत ठरून गेली…

“ बाळा… माझ्या सोन्या… “ म्हणत मी जेव्हा त्याला धुंदीतून प्रथम उठवले होते, तेव्हा त्याने माझा हात पकडून डोळ्यातून अश्रू काढले होते… त्याला वाटलं पोलीस असतील आणि आता काठी मारतील…

झालं उलटंच…! मी त्याच्या डोक्यावर मायेनं हात ठेवला होता.

जागा झाल्यावर पहिल्यांदा त्याच्या ओठी शब्द आले, “ पप्पा तुम्ही इथे कसे…? “

– – डोळे उघडल्याबरोबर, समोर नसूनही जी व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर येते तीच आपली…!

वडिलांच्या तो अगदी जवळ आहे हे मला जाणवलं, माझ्यासाठी एवढासा धागा पुरेसा होता आणि तेव्हापासून मी त्याचा “पप्पा” बनण्याचा प्रयत्न करत गेलो.

मध्ये अनंत गोष्टी घडल्या, ज्या अत्यंत भावुक होत्या, त्या काही आता लिहीत नाही, लेख खूप मोठा होईल.

सर्वप्रथम त्याला हाताने अंघोळ घातली, ऍडमिट केले, पूर्णतः त्याला माणसात आणले.

पूर्ण बरा झाल्यानंतर, तो मला म्हणाला, ‘ सर तुमी मला पप्पा सारकेच आहात, मी तुमाला कोनच्या स्वरूपात परतफेड करू? ”

– – मी चातकासारखी त्याच्या याच शब्दांची वाट पाहत होतो.

म्हटलं ‘नक्की करशील परतफेड…?’

.. क्षणाचाही विचार न करता म्हणाला… ‘हां सर… ‘

“मग आता कामाला लाग, नोकरी मी शोधतो… “ त्याच्या डोळ्यात डोळे घालून पहात मी म्हणालो.

काही क्षणांचा अवधी घेऊन, पण निर्धाराने म्हणाला “ हो सर, करतो… “

… निम्मी लढाई मी येथे जिंकली होती…!

प्रसंग दोन

शनिपार परिसरात असलेले एक मोठे दुकानदार, नेहमी मला फोन करतात आणि म्हणतात,

‘डॉक्टर तुमाला मला डोनेशन द्यायचं हाय, पण साला या कामांमंदी मी अडकून जाते, आनी राहूनच जाते, तुमाला कंदी टायम गावला तर तुमी या ना दुकानी ‘

(आजवर अकरा वर्षाच्या कामाच्या आयुष्यामध्ये कोणालाही मी देणगी मागितली नाही, पुढे सुद्धा कधी मागणार नाही, पण समाज म्हणून आपण इतके मोठ्या मनाचे आहात, की न मागताच माझ्या झोळीमध्ये आपण इतकं काही टाकता, की मला कुठे जाऊन पदर पसरायची गरजच पडत नाही, यानिमित्ताने माझा प्रणाम आपणा सर्वांना)

– – यावेळी आवर्जून मी शेठजींकडे गेलो, मला पाहून त्यांना आनंद झाला, मी त्यांना म्हणालो, ‘सर बरेच दिवस डोनेशन द्यायचे म्हणत होतात, ते घ्यायला आज आलो आहे… ‘

‘क्या बात है, आवो ने पधारो… पधारो म्हणत त्यांनी माझं स्वागत केलं, ड्रॉवर मधील चेक काढला, जिभेला बोट लावून, मला न विचारताच त्यांनी एक चेक फाडला.

मी हात जोडून म्हणालो, ‘सर पैसे नको आहेत… ‘

‘मंग…? ’ ते गोंधळून म्हणाले…

‘दुकान मदली तुमाला पसंत येईल ती कोणचीबी गोष्ट घिवून जावा, कायी वांदा नाय सायेब… ‘

माझ्याही-वडिलांच्या वयाचे असणाऱ्या त्या शेठजींचे हात मी हाती घेतले, कपाळी लावले आणि म्हणालो, ‘माऊली इतके कामगार तुमच्याकडे काम करतात, माझ्या एका मुलाला काम द्या… तेच माझ्यासाठी डोनेशन…! ‘

सुरुवातीला त्यांना काही कळलं नाही… यानंतर सविस्तर सर्व गोष्टी त्यांना सांगितल्या…

यानंतर ते हसत म्हणाले, ‘काय तुमी बी वार्ता करते… पोराला उद्यापासून पाठवून द्या आणि हा चेक बी घेऊन जा… ‘

– – तो चेक पुन्हा कपाळाला लावत मी त्यांना म्हणालो, “या चेकवर जी आपण रक्कम लिहिणार होतात, ती रक्कम माझ्या मुलाला दर महिन्याला पगार म्हणून द्या… हेच माझं डोनेशन…! “

वडिलांच्या वयाचे… व्यवसाय करून अनुभव सिद्ध झालेले… सहजासहजी न बधणारे शेठजी…

यावेळी चष्म्याआड त्यांच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते…! त्यांचे भरलेले डोळे पाहून, आता माझ्या डोळ्यात पाणी येईल, त्याच्या आत मला दुकानातून बाहेर पडणे आवश्यक होते…!

‘निघतो‘ म्हणत, मी त्यांच्या पाया पडलो आणि निघालो…

जाताना ते म्हणाले “ पोराला द्या पाठवून, कामाला लावतो…! आणि हो… पुढल्या वर्षी डोनेशन आणखी वाढवून देईन… ” डोळ्यात पाणी घेऊन मी फक्त त्यांना नमस्कार करून निघालो.

यानंतर या मुलाला तिथे कामाला लावला, त्याने माझे नाव राखले, मनापासून काम केले, , घरी पैसे देऊ लागला, आई-वडिलांचा सन्मान करू लागला, आई-वडिलांनी मनापासून याला स्वीकारलं…

सुरुवातीला त्याच्या भेटी होत होत्या परंतु पुढे पुढे तो त्याच्या कामात व्यग्र झाला आणि मी माझ्या…

याला एक वर्ष लोटलं…!

प्रसंग तीन

शनिवार दिनांक 13 जून… परत शनिपार, सर्व कामं आटपली… निघालो…

मोटरसायकल वर बसलो आणि एका हँडसम दिसणाऱ्या मुलाने माझ्या मोटरसायकलला त्याची सायकल आडवी लावली…

.. पुढच्या स्पॉटवर जायचे असल्याकारणाने, गडबडीत मी त्या मुलाकडे नीट पाहिलेच नाही, नेहमीची मवाळ भूमिका घेत मी त्या मुलाला म्हणालो, ‘बाळा माझं काही चुकलं का? थांब मी गाडी मागे घेतो… ‘

‘हो सर लय चुकलं तुमचं…? ‘ तो गुरगुरला

मी चमकून पाहिलं… हा तोच शेठजींकडे कडे काम करणारा…!

‘अरे तु…? किती बदल झाला आहे… मी ओळखलंच नाही तुला बाळा…!

‘एका जाग्यावर बसत जावा ना वो सर, शोधून पाय आन सायकल थकली… ‘ तो हसत बोलला.

‘एका जागेवर बसलो असतो, तर तू भेटला असतास का रे नालायका…? ’ जुन्या गोष्टींची आठवण करून देत, बाप असल्याचा गैरफायदा घेऊन बोललो.

तो सुद्धा हसला…

‘सायकल कोणाची रे…? ‘

‘सर पगारातून नव्वी कोरी सायकल हत्या हप्त्यानं घेतली’ त्याच्या चेहऱ्यावर कौतुक आणि समाधानाचे भाव होते.

… मुळचा गोरापान, अंगावर छान कपडे आणि नवीन सायकल… माझी नजर या पोरावरून हटेना, वाटलं याला माझीच दृष्ट लागेल.

… या नंतर तो माझ्या जवळ आला, खांद्यावर डोकं ठेवून अचानक रडू लागला… त्याला सर्व जुन्या गोष्टी आठवत होत्या… ‘ सर तुम्ही नसते तर… ’ वगैरे वगैरे बोलू लागला, मी फक्त हसत त्याची पाठ थोपटत होतो…!

बोलता बोलता त्याने माझ्या खिशात काहीतरी टाकले…

मी सहज काढून पाहिले, ते पाचशे एक रुपये होते…

माझ्या सर्व गोष्टी माझ्या कमरेला अडकवलेल्या बॅगेत असतात, खिशात काहीही नसते, मग हे 500 रुपये आले कुठून?

मी त्याला म्हणालो, ‘अरे बाळा हे पाचशे रुपये माझ्या खिशात तू ठेवलेस का? हे माझे नाहीत… ‘

तो म्हणाला, ‘सर तुमचेच आहेत… ‘

‘म्हणजे…??? ‘

“ मागच्या महिन्यामध्ये, कामावर एक वर्ष पूर्ण झालं, माजी बडती झाली, पगार वाडला, मी तुम्हाला कदीपासून शोधतोय तुम्ही सापडले नाहीत, आज शेवटी हितं घावले… मला तुमाला डोनेशन का काय ते द्यायचे होते ना, बडतीच्या पैशातून…!!! ”

– – त्याचं वाक्य संपायच्या आधी माझ्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले. गाडीवरून उतरून मी त्याला घट्ट मिठी मारली.

‘बाळा किती मोठा झालास रे…? ‘ मला खूप काही बोलायचं होतं पण, हुंदक्यांच्या घाटाघाटा मधून शब्दांची गाडी पुढे सरकेना…!

– – घासातला घास काढून देऊन, “परतफेड” या शब्दाचा अर्थ, आज मला नव्याने समजला.

त्यातला एक रुपया माझ्या बॅगेत ठेवून, उरलेले पाचशे मी त्याला परत केले, आणि म्हणालो, ‘जेव्हा मला लागतील तेव्हा मी परत मागून घेईन तुझ्याकडून. ‘

पुण्यात राहणाऱ्यांना माहित आहे, शनिपार हा चौक किती गजबजलेला असतो, इतक्या गर्दीच्या ठिकाणी तो माझ्या आणि मी त्याच्या गळ्यात पडून रडत होतो, लोक थांबून कुतूहलाने पहात होते… काय चाललंय हे त्यांना कळत नसावं…! माझ्या डोळ्यातून सतत अश्रू ओघळत होते, आणि माझे डोळे पुसत तो निरागसपणे म्हणत होता, ‘सर तुमी नगा ना रडू, तुमाला रडताना पायलं की मलाबी लय रडू येतं मंग… ‘

– – एवढ्या गर्दीतही मला फक्त तो आणि तोच दिसत होता… आणि डोक्यात गाणं सुरू होतं, ये तो है अलबेला… हजारो मे अकेला…!!!

त्याचा निरोप घेऊन मी पुढल्या मुक्कामी निघालो, गाडीवर जाताना सतत त्याचेच विचार…

… सहज डोक्यात आलं, इतर कर्मचारी सोडून शेठजींनी याच मुलाला एका वर्षात बढती कशी बरं दिली असावी? आणि पगार सुद्धा वाढवला…? आणि झटकन मला शेठजींनी त्यावेळी बोललेलं वाक्य आठवलं,

‘आणि हो… पुढल्या वर्षी डोनेशन आणखी वाढवून देईन… ‘

– – सहज बोललेल्या त्या वाक्यात किती गहन अर्थ होता, त्याचा उलगडा मला आज एका वर्षानंतर झाला.

डोळ्यात पुन्हा पाणी आलं… मनातल्या मनात मी शेठजींच्या पायांना स्पर्श केला…!

… शेठजींनी या मार्गाने दिलेलं हे “डोनेशन” आणि माझ्या पोरानं दिलेली “देणगी” मनातल्या तळ कप्प्यात साठवून, मी निघालो श्रीमंत बाप होऊन…!

 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ म्हातारा नव्हे महातारा! ☆ श्री नागेश शेवाळकर ☆

श्री नागेश शेवाळकर

? मनमंजुषेतून ?

☆ म्हातारा नव्हे महातारा! श्री नागेश शेवाळकर

वयाची पन्नाशी उलटली की मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे निवृत्तीनंतर काय करावे? वेळ कसा घालवावा? अनेक जण या विचाराने एवढे बेचैन, अस्वस्थ असतात की, निवृत्तीच्या दिवशी त्यांच्या डोळ्यात पाणी येते. नोकरी असताना वेळच नसतो आणि निवृत्तीनंतर वेळच वेळ असतो.

काही व्यक्ती अशाही असतात त्या निवृत्तीला विरक्ती समजतात! आपण सेवेतून निवृत्त होत आहोत म्हणजे आपण संसाराच्या मायाजालातून निवृत्त होत आहोत, असा विचार असतो. परंतु तसे नाही, संसार हे असे चक्रव्यूह आहे, त्यातून बाहेर पडणे भल्याभल्यांना जमत नाही. आजकाल बहुतेक कुटुंबातील मुलगा आणि सून दोघेही कामानिमित्त दिवसभर बाहेर असतात. त्यांच्या पश्चात नातवंडांची जवाबदारी साहजिकच कुटुंबातील ज्येष्ठांवर येऊन पडते. नातवांच्या बाललीला, त्यांची छोटी मोठी कामे करणे हा फार मोठा विरंगुळा असतो. नातवंडासोबत रमले की, सारे दुःख दूर पळून जातात.

निवृत्तीनंतर घरातील छोटी मोठी कामे करताना स्वतःच्या आवडीच्या छंदाकडे लक्ष दिले पाहिजे. अशा छंदामुळे आयुष्य सुसह्य होते, सकारात्मक होते. नोकरीमुळे आवडीच्या छंदाकडे दुर्लक्ष झालेले असते. भजनाची, लेखनाची, गायनाची, वाद्य वाजवण्याची, वाचनाची आवड अनेकांना असते. त्यामुळे निवृत्ती म्हणजे आपल्या आवडत्या छंदांना पुनरुज्जीवित करण्याची संधी सहर्ष स्वीकारली पाहिजे…

दुसरीकडे अनेक जण निवृत्ती ही आसक्ती समजून वाटचाल करतात. ‘मला हे हवं, ते हवं. मला हे मिळालेच पाहिजे… ‘ अशा हटवादी भूमिकेत वावरतात. निवृत्त होईपर्यंत असलेल्या ‘हम करे सो कायदा… ‘ ही सवय या वळणावर घातक ठरते. मुले मोठी झालेली असतात, कमावती असतात, त्यांचे अनुभव विश्व वेगळे असते त्यामुळे लहानसहान गोष्टींमध्ये वारंवार सल्ला द्यायलाच पाहिजे असे नसते. मुलांच्या चुका सातत्याने दाखवून दिल्याने मुले कंटाळतात. ते ज्येष्ठांपासून दुरावतात, संवाद कमी होतो. त्यामुळे ज्येष्ठांमध्ये आपण एकटे पडल्याची भावना बळावते. एकटेपणाची जाणीव होताच चिडचिड, संताप, अशा भावना बळावतात.

वयाची साठी गाठलेली व्यक्ती म्हणजे जणू छोट्या मोठ्या आजाराचे माहेरघर! गुरूवर्य प्राचार्य राम शेवाळकर यांनी असे म्हटले आहे की, साठीनंतर येणारा आजार कधी एकटा येत नाही तर सोबत अनेक आजारांना घेऊन येतो. एकदा का आजाराचा समूह मानवाच्या शरीरात शिरला की, हे आजार मानवाच्या अंतापर्यंत त्याच्या सोबतीला असतात. त्यामुळे प्रत्येकाने पन्नाशीनंतर असे कोणतेही आजार होऊ नयेत ही काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी निवृत्ती म्हणजे संसाराबाबतीत जशी विरक्ती नसावी तशीच संसाराबद्दल अतिरिक्त आसक्तीही नसावी.

प. पू. ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी एक छान मंत्र दिला आहे, ते म्हणतात, ‘स्वतः च्या मुलाकडे राहतानाही पाहुण्याप्रमाणे राहिले पाहिजे. ‘ वरवर पाहिले तर हे वाक्य अत्यंत साधे वाटत असले तरी आनंदी, समाधानी जीवन जगण्याचा तो एक साधा मार्ग आहे. सुखी जीवनाचे सार आहे…

त्यादिवशी नेहमीप्रमाणे आम्ही पाच-सहा ज्येष्ठ नागरिक एकत्र बसलो होतो. एकानंतर एक असे अनेक विषय चर्चेला येत होते. प्रत्येक जण, चर्चेत भाग घेऊन स्वतःचे मत मांडत होता. चर्चा सुरू असताना एक जण स्वतःचा उल्लेख ‘म्हातारा’ असा करत होता. ते ऐकून एक व्यक्ती म्हणाली,

“स्वतः ला म्हातारा समजू नका तर महातारा असे म्हणा. म्हातारा हा साडेतीन अक्षरांनी सुरू होणारा शब्द किती अर्थपूर्ण आहे ते लक्षात घ्या. म्हातारा या शब्दातील अर्धा ‘म’ आहे ना, त्याला आपण पूर्णत्व देऊ! म्हातारा या शब्दाचा झाला ‘महातारा’! महातारा किती छान संकल्पना आहे ना! आता या नवीन शब्दाचा थोडा वेगळा विचार करू या.

ग्रहमंडळातील महातारा म्हणजे प्रत्यक्ष सूर्यदेव! धरणीमातेला अंधारातून बाहेर काढून लख्ख प्रकाशमान करणारा महातारा म्हणजे भास्कर… रवी..! आपणही म्हातारे होऊन अडगळीत पडण्यापेक्षा महाताऱ्याप्रमाणे आपल्या गृहमंडळाला प्रकाशित करीत राहूया. मुलांच्या संसाराला, जमेल तसा प्रकाश देत राहू… अनुभवाची ऊर्जा देत राहू. म्हणजे मदत करीत राहू. “

त्या व्यक्तिने समोर ठेवलेली ही नवीन परिभाषा आणि ज्येष्ठांची थेट सूर्यासोबत केलेली तुलना ऐकून आम्ही सारे भारावून गेलो. त्याचवेळी आम्हाला आमच्याकडे असलेल्या एका अनोख्या तेजस्वी शक्तीची जाणीव झाली.

एका वेगळ्या स्फूर्तीदायक अवस्थेत निघताना वाटले, खरेच साठ वर्षाचे जीवन म्हणजे समृद्ध अनुभवाची शिदोरी गाठीशी असलेली एक नौका! सुख-दु:ख, संकटं, हाल अपेष्टा, अपेक्षा, समाधान, आनंद, यशापयश असे अनेक अनुभव असलेल्या महाताऱ्यांनी आपल्या समृध्द अनुभवाचे दालन हळूवार, सहजतेने खुले केले तर त्या लखलखीत प्रकाशात त्यांच्या घरातील ग्रहमंडळ तर प्रकाशित होईलच परंतु, आजूबाजूचे ‘ग्रह- उपग्रह’ यांच्याही जीवनात लख्ख प्रकाश पडेल. तेव्हा महाताऱ्यांनो, चला, उठा. पसरवा अनुभवाचा लख्ख प्रकाश! करा सारी सृष्टी प्रकाशमान! … अशा तेजोमय विचाराने प्रेरित होऊन मी घरी पोहोचलो. सौभाग्यवती वाहिनीवर एक नाटक बघत होती. मी महातारा या विचाराने एवढा प्रभावित झालो होतो की, मला त्या नाटकाचे नावही ‘म्हातारा नव्हे महातारा! ‘ असेच असल्याचे दिसत होते…

००००

© श्री नागेश शेवाळकर

पुणे

मोबा. ९४२३१३९०७१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “काळजी करण्यासारखी परिस्थिती” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “काळजी करण्यासारखी परिस्थिती…” ☆ श्री मंगेश मधुकर

काळजी करण्यासारखी परिस्थिती झालीये खरी…

झालं असं की,

 

सध्या 

स्त्री-पुरुष 

मुलं-मुली 

लहान 

मोठा 

श्रीमंत 

मध्यमवर्गीय 

गरीब 

पैसेवाला 

कफ्फलक 

या धर्माचा 

त्या धर्माचा 

या जातीचा 

त्या जातीचा

हुशार 

भोळा 

शिकलेला 

अडाणी 

पुढारी 

कार्यकर्ता 

उद्योगपती

कामगार 

शिक्षक

विद्यार्थी 

नोकरीवाला 

बिझनेसवाला 

बंगल्यातला 

फ्लॅटमधला 

झोपडपट्टीतला 

कारवाला 

रिक्षावाला 

बाईकवाला 

सायकलवाला

सगळ्यांची 

एकच गरज 

पाणी

—-

नेहमी चिंब भिजवणाऱ्या पावसानं आता डोळ्यात “पाणी” आणलयं.

धोक्याची घंटा जोरजोरात वाजतेय.

जुन्या सवयी बदला.

‘पाणी’ जपून वापरा.

आत्ताच नाही तर नेहमीच.

नाहीतर..

“पा णी बा णी”

 

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares