☆ “गृहीत धरलं जाण्याचा त्रास जास्त होतो…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
झालं असं की,
संध्याकाळची वेळ, सविताच्या डोक्यात विचारांचा कल्लोळ. काय करावं हे सुचत नव्हतं. घरातल्या घरात येरझारा चालू असताना समोर डाळिंब दिसल्यावर सवीताच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. एकाग्र चित्तानं डाळिंब सोलणं हा तिचा आवडता उद्योग. रोजच्या पेक्षा हटके गोष्ट केल्यानं मन शांत होतं हा आजवरचा अनुभव. डाळिंबाची सालं काढून एकेक दाणा साफ करत मोकळा करून भांड्यात ठेवयाचा आणि आख्ख सोलून झाल्यानंतर मगच खायचं. हा ठरलेला कार्यक्रम. थोडं कंटाळवाणं, वेळखाऊ काम पण सविताला छान वाटायचं.
एकाग्र होऊन डाळिंब सोलताना सविताच्या मनातली अस्वस्थता कमी झाली. डोकं शांत झालं.
तितक्यात मोबाईलवर बोलत मुलगी आली आणि तिनं थेट भांड्यात हात घालून डाळिंबाच्या दाण्यांचा बकाणा भरला आणि मूठभर दाणे घेऊन खोलीत गेली. काही वेळानं चिरंजीव आले त्यानीसुद्धा तसंच केलं. सविता मोठ्यानं ओरडली पण दोघांनी साफ दुर्लक्ष केलं. सविताच्या ओरडण्याचा काडीचाही फरक पडला नाही. नंतर ऑफिसवरुन आलेल्या नवरोबांनी मुलांचा कित्ता गिरवला. बघता बघता डाळिंब संपलं. सविता प्रचंड संतापली. रिकामं भांड पाहून आलेला हुंदका कसाबसा आवरला. खूप वाईट वाटलं. डोळ्यात पाणी आलं. घरात आपली गरज फक्त कामापूरती… काही किंमतच नाही या भावनेनं दुखावलेल्या सवितानं रिकामं भांडं जोरात फेकलं. आवाज ऐकून रूममधून मुलं आणि बेडरूममधून नवरा हॉलमध्ये धावत आले. सवीताचा आवेश पाहून “काय झालं” विचारायची हिम्मत कोणीच केली नाही उलट हॉलभर पसरलेल्या डाळिंबांच्या साली मुलीनं निमूटपणे गोळा केल्या. मुलानं भांडं उचललं आणि साफ करून शेल्फमध्ये ठेवलं. झाडू घेऊन साफसफाई सुरू केली आणि नवऱ्यानं ताबडतोब दुसरं डाळिंब सोलायला घेतलं.
—
डाळिंब फक्त एक निमित्त. सविताला खाण्यासाठी आहे की नाही याची जाणीवही कोणाला झाली नाही आणि कोणी तिचा विचारही केला नाही. नेमकं हेच सविताच्या जिव्हारी लागलं.
तसं पहायला गेलं तर ही अतिशय क्षुल्लक बाब पण घराघरात हेच घडतं.
अनेकदा आपल्या माणसाला गृहीत धरतो. त्यांच्या मनाचा विचारच करत नाही. खासकरून घरातल्या महिलांच्या बाबतीत असं सर्रास घडतं. कोणी मुद्दाम असं करत नाही पण बऱ्याचदा होतं.
आपल्या आई वडिलांना सुद्धा काही वेळा आपली हुशारी कळत नाही. मी आमच्या घरात विज्ञानाचे प्रयोग करत बसायची. मग त्याचा रंग देणे – खिळे मारणे हे माझ्या हातून व्हायचं नाही. ते मी आमच्या कामवाल्या बाईच्या नवऱ्याकडून करून घ्यायची.
– – एकदा चक्क मी ‘ तिहेरी उपयुक्त शेगडी ‘ नावाचं उपकरण तयार केले.
घरात आमच्या एक जुनं कुकर पडलं होतं – किर्लोस्कर कंपनीच! डबे डबे जोडलेले. माझ्या डोक्यात रात्री तीन वाजता ही कल्पना आली की याच्यामध्ये वाफ सोडली तर, (ते वाफेवर होणार कुकर होतं) म्हणजे त्या प्रत्येक डब्याला आतून एक नळीचा कनेक्शन होतं – म्हणजे पहिल्या डब्यातली वाफ दुसऱ्या डब्यात, दुसऱ्यातून तिसऱ्या या पद्धतीने..! ते मी शाळेत घेऊन गेले. नळाची शेगडी तयार केली. त्या नळातनं कमी व्यासाचा एक तांब्याचा पाईप आत मध्ये फिट केला. नळातून पाणी सोडल्यावर ते गरम होऊन बाहेर यायचं.. आत मध्ये बसवलेल्या तांब्याच्या नळातलं पाणी.. त्याची गरम वाफ होत असे, कारण शेगडीच्या आत तापमान जास्त.. त्या नळीवर कोळसा असायचा ना. तांब्याची नळी आणि कमी व्यास त्यामुळे
ती वाफ शेतावर फवारणी करतो तो पाईप असतो ना त्याच्याद्वारे त्या कुकरला जोडून आत सोडली. एका वेळेला तीन वस्तू होत होत्या.. म्हणजे शेगडी, शेगडी सारखी… बाजूला नळ जोडलेले.. याच्यातून पाणी येत होतं ते 56-57 अंश सेल्सिअस इतकं गरम, आणि डब्यामध्ये डाळ तांदूळ आणि बटाटे – –
– – ४0 मिनिटात शिजवून तयार…!
… कुकर शेगडीवर ठेवलेला नाही, ते सगळं वाफेवर व्हायचे. हे असलं काही काम मी घरात करत बसले की वडील आमच्या आईला सांगायचे, ” काय करते की येडं कुणास ठाऊक. काहीतरी जुनंपानं घेऊन खटपट करत बसतय झालं.. नादिष्ट आहे. कसे व्हायचे या पोरीचे कुणास ठाऊक?” घरात अशी चर्चाही चालायची. आई म्हणायची, “ जाऊदे, काहीतरी करून ती आपला आनंद घेतेना.. राहू दे “…
– – या उपक्रमाला राष्ट्रपती-सन्मान प्राप्त झाला त्यावेळेला रेडिओ होता. सातच्या बातम्यात त्याचा सन्मान झाल्याचेही सांगितले. लखनऊ येथील प्रदर्शनात त्याची मांडणी झाली. तत्कालीन राष्ट्रपती आदरणीय झैलसिंग यांनी गाडीतून उतरून उपकरण पाहून याचे अतिशय कौतुक केले. लखनऊच्या सर्व वृत्तपत्रांनी मुलाखती घेतल्या. इथे आल्यावर आमचे सोलापुरात अनेक ठिकाणी सत्कार झाले. कारण त्या काळात राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या एक दोनच शाळा होत्या. आता सुद्धा कमीच आहेत. सर्वत्र माझं कोड कौतुक…! वृत्तपत्रात मुलाखती… शाळेतल्या सगळ्या मैत्रिणींनी, शिक्षकांनी, घरी बोलावून सत्कार केले. – – पण आमच्या घरात – –
काय येडं काहीतरी करतंय झालं… ही प्रतिक्रिया होती. चालायचंच.. प्रेमापोटी बोलतात ते.
एकूण काय… कोण काय म्हणते याकडे फारसं लक्ष देऊ नये. यावर मी काल एक व्हिडिओ पाहिला.. चार छान सुटाबुटातली माणसं.. समोर एक माणूस उभा आहे.. ती चार माणसं एकत्र बोलत होती…
“आपण नेहमी विचार करतो ना की चार लोक काय म्हणतील?… ते चार लोक आम्हीच आहोत… आम्ही काही म्हणणार नाही…! आणि इथं ती फिल्म संपते.
☆ बॅंकेतल्या मुली ! – लेखक : हेमंत खेर ☆ श्री सुभाष धारणकर ☆
बॅंकांचे राष्ट्रीयीकरण झाल्यानंतर बॅंक शाखा उघडण्याचे प्रमाण वाढले आणि सेवा भरतीही वाढली. १९७४ ते १९९२ पर्यंत बॅंका, जनरल इन्शुरन्स, एल्आयसी ह्या मध्ये स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून भरपूर भरती झाली. ह्या भरतीत महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. पांढरपेशा आणि तुलनेने सुरक्षीत वातावरणातील कार्य संस्कृती मुळे ही क्षेत्रे त्यांना भावली. प्रथमच शिक्षीका, नर्सिंग, पोस्ट आणि सरकारी विभागा बाहेर एवढ्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या. महिला सक्षमीकरण हा शब्द खूप नंतर आला. त्या आधीच ही शांततापूर्ण क्रांती झाली होती.
बॅंक व्यवस्थापन आणि कामगार संघटनांनी सुद्धा सहानुभूतीचा आणि काहीसा उदार दृष्टिकोन स्विकारून ह्या महिलांचे जिणे सुखकर केले.
मी १९८४ साली बॅंकेत लागलो. आमच्या बरोबरचे सहकारी जवळपास सगळे गरीब ते कनिष्ठ मध्यमवर्गीय परिवारातून आले होते.
ह्या मुली सुद्धा अशाच परिवारातून आल्या होत्या. आपल्या बरोबर काटकसरीचे, निगुतीने काम करण्याचे, पापभिरू संस्कार घेऊन आलेल्या. जबाबदारीची जाणीव असलेल्या. काही जणींनी बॅंकेत प्रेमविवाह केले. तरी बहुतांशी जणींचे विवाह पारंपारिक मार्गाने झाले. उच्छृंखलपणा अत्यंत अपवादात्मक होता. नटवेपणाही जवळपास नव्हताच (बऱ्याच जणींनी आपल्या मुलीं बरोबर वा मुलांच्या लग्नात ब्युटी पार्लर बघितले असावे)
आणि कधी काळी कुणी केलाच तर केस हाताबाहेर जाऊ न देण्याचा सर्वांचा प्रयत्न असायचा. मत्सर हा स्त्रीसुलभ असला तरिही सहकार्य आणि सांभाळून घेणं असायचं. अनेकदा सासुरवास भोगणाऱ्यांना बॅंकेत एकमेकींशी बोलून मन मोकळं करता येत असे.
आजच्या तुलनेत तेंव्हा स्वातंत्र्य कमी होतं जबादाऱ्या जास्त होत्या. मुलाबाळांचे करण्यात वेळ मिळत नसे. सासू सासरे छान आणि नातवंडांना सांभाळतायत असं दृष्य कमीच.
खरं तर आमच्या पिढीचे नशीब म्हणजे आधी आई वडिल, सासू सासरे ह्यांची सेवा आणि नंतर मुलांची सेवा.
ह्या मुलींनी हसत हसत सगळं केलं. घरं बांधली, पर्यटन केलं, कर्ज काढून वस्तू केल्या.
अपवाद वगळता फार कोणी प्रमोशनच्या मागे लागल्या नाहीत. पण ज्यांनी घेतली त्या कुठेच कमी पडल्या नाहीत.
एकेकाळी जाड आणि जड लेजर उचलणाऱ्या. काऊंटर, खुर्च्या पुरुषांच्या उंचीच्या विचाराने असत त्यावर उशा टाकून किंवा जुनी लेजर टाकून बसणाऱ्या मुली, सफाईदारपणे संगणक चालवू लागल्या. नाकावर आलेल्या चष्म्यातून स्क्रीन पाहू लागल्या.
जवळपास सर्वांच्याच मुलांनी छान शिक्षण घेतलं. देश विदेशात कर्तृत्व गाजवत आहेत.
ह्या मुलींनी काय दिलं? त्यांच्या मुळे कार्यालयात सभ्यपणा टिकून राहिला.
येणाऱ्या अडाणी महिला ग्राहकांना आधार वाटला. समाजातील महिलांचे स्थान उंचावले.
माझ्या बदल्यांच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मला आमच्या पिढीच्या ह्या प्रतिनिधी भेटल्या.
त्यावेळी लढणाऱ्या मुली आज निवृत्त होत आहेत. जवळपास सर्व जणी आज निवृत्त होऊन सासू, आजी ह्या रोल मध्ये गेल्या आहेत. आमच्या पिढीने झगडून मिळवलेली पेन्शन अजूनही त्यांच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे.
त्यांनी चाललेल्या वाटेचा आज महामार्ग झाला आहे.
हे आज आठवण्याचे कारण म्हणजे मागच्या महिन्यात सिनकर मॅडम निवृत्त झाल्या. आणि ह्या महिन्यात लोटलीकर मॅडम निवृत्त होतील. त्यांना शुभेच्छा.
– वर सांगितलेल्या पिढीतील या बहुतेक शेवटच्या प्रतिनिधी.
त्यांना शुभेच्छा देताना हे विचार मनात आले. ते दिवस पुन्हा आठवले. म्हणून जमेल तसं लिहिलं. (काही चुकलं असेल तर कान उपटायला अजूनही अनेक जणी समर्थ आहेत.)
सध्या सगळीकडे तीन वर्षांनी येणाऱ्या पारंपारिक अधिक मासाची, म्हणजेच धोंड्याच्या महिन्याची जोरदार रेलचेल सुरू आहे. मुली-जावयांना हक्काने घरी बोलवणं, चांदीच्या ताटात पुरणपोळीचं सुग्रास जेवण देणं, आणि ते ३३ अनरसे देऊन जावयाला ‘लक्ष्मी-नारायण’ मानून त्याचे लाड पुरवणं सुरू आहे.
परवा दुपारी मी सुद्धा माझ्या घराच्या सोफ्यावर बसून जावयाला काय काय खरेदी करायची, याची मोठी यादी करत होते. माझा नवरा नेहमीप्रमाणे कोपऱ्यात बसून अगदी शांतपणे वर्तमानपत्र वाचत होते. बदल हवा असं त्यांना कधी वाटत नाही. बदल केला तर नक्कीच तो चांगला असं असं वाटतं.
जावयाच्या खरेदीची यादी बनवता बनवता अचानक माझ्या डोक्यात एक विचार चमकला. मी हातातली लेखणी बाजूला ठेवली आणि नवऱ्यालाम्हटलं, “अहो ऐकलंत का? जावई दुसऱ्याच्या घरातून आपल्याकडे दोन दिवस पाहुणा म्हणून येतो, तर आपण त्याला देव मानून त्याचे एवढे लाड करतो. पण जी मुलगी तिचं हसतं-खेळतं माहेर सोडून, स्वतःचं आडनाव बदलून, आपलं घर साभाळायला ‘सून’ म्हणून येते… तिच्यासाठी कॅलेंडरमध्ये असा एकही महिना का नसावा? म्हणून मी ठरवलंय, या अधिक मासाला छेद देत मी माझ्या सुनेसाठी कॅलेंडरमध्ये एक नवीनच सण सुरू करणार आहे— ज्याचं नाव असेल ‘वजा मास’!”
माझं हे बोलणं ऐकून नवऱ्यानी वर्तमानपत्र खाली ठेवलं, चष्मा नाकावर सरकवला आणि आश्चर्याने म्हणाले, “हा कुठला नवीन मास? कॅलेंडरमध्ये जेमतेम १२ महिने असतात, १३ वा अधिक मास असतो. हा ‘वजा मास’ कुठून टपकला?”
मी त्यांना हसून समजावून सांगितलं की, ‘वजा’ म्हणजे वजाबाकी नाही, तर सुनेच्या डोक्यावरचा घरचा, स्वयंपाकघराचा आणि जबाबदाऱ्यांचा सगळा ताण महिनाभरासाठी ‘वजा’ करणे! हा संपूर्ण महिना तिने फक्त तिचं आयुष्य बिंधास्त आणि आनंदाने जगायचं.
तेवढ्यात माझा मुलगा आणि सून दिवसभराचं काम आटपून घरात आले. सुनेच्या एका हातात कष्टाची पिशवी होती आणि दुसऱ्या हातात बाजाराची भाजी. तिची ती दमलेली अवस्था बघून मी लगेच तिच्या हातातली भाजीची पिशवी बाजूला घेतली आणि तिला प्रेमाने पाटावर बसवलं. मी घरात जाहीर केलं की, आजपासून या घरात माझ्या सुनेसाठी ‘वजा मास’ लागू झाला आहे!
सुनेने आश्चर्याने विचारलं, “वजा मास? आई, म्हणजे नक्की काय?”
मी तिला सांगितलं की, या संपूर्ण महिन्यात तुला स्वयंपाकघरात पाऊल ठेवायला सक्त मनाई असेल. जावयाला ५६ भोग चालतात ना? मग माझ्या सुनेला महिनाभर तिच्या आवडीचे पुरणपोळी, श्रीखंड-पूरी आणि सुग्रास जेवण तिची सासू स्वतःच्या हाताने बनवून भरवणार! सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत तिने फक्त सुखात बसायचं. “रात्री जेवणात काय बनवू?” हा प्रश्न तिच्या आयुष्यातून महिनाभरासाठी वजा केला जाईल.
मुलाने मध्येच विचारलं, “बरं, आणि हिची हौसमौज?” त्यावर मी मुलाला फर्मान सोडलं की, या महिन्यात सुनेला तिच्या मैत्रिणींसोबत फिरायला, बाजारात जाऊन हवी ती खरेदी करायला घरची तिजोरी खुली असेल! तिच्या आनंदावर आणि खर्चावर घरातून एकही प्रश्न विचारला जाणार नाही. साडी नेसण्याची किंवा घरकामाची अजिबात सक्ती नाही, अगदी सुती आणि सुटसुटीत कपड्यांमध्ये तिने फिरावं. रात्री हवं तितकं जागावं आणि सकाळी मनासारखं उशिरा उठावं, हिला घरात कोणीही उठवणार नाही!
माझा हा मराठमोळा आणि कल्पक विचार ऐकून सुनेच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. ती गदगद होऊन म्हणाली, “आई… खरंच? आजपर्यंत सासरी आल्यावर फक्त जबाबदाऱ्या वाढतात हेच ऐकलं होतं. पण सासू आपल्यासाठी असा विचार करू शकते, यावर माझा विश्वासच बसत नाहीये!”
मी तिचे डोळे पुसले आणि म्हटलं, “विश्वास ठेव बाळा! जावयाला आपण विष्णू रूप मानतो, पण सून तर साक्षात चालती-बोलती गृहलक्ष्मी असते. या वजा मासाच्या शेवटच्या दिवशी मी तुझी चांदीच्या ताटात ओवाळणी करणार आणि जावयाच्या ३३ अनरशांच्या ऐवजी, तुला तुझ्या आवडीच्या ३३ सुंदर वस्तू सासरकडून वाण म्हणून मिळणार!”
हे सगळं ऐकून माझे कारभारीही हळवे झाले. त्यांनी वर्तमानपत्र बाजूला ठेवलं आणि मुलाला म्हणाले, “बाळा, काढ घरची तिजोरी आणि दे हिच्या हातात… आजपासून घरात वजा मास लागू! आजपर्यंत आम्ही पुरुषांनी फक्त जुन्या परंपरा पाळल्या, पण नात्याला इतकं मायेचं आणि सुंदर रूप देता येतं, हे तुझ्या आईकडून शिकायला मिळालं. ” मुलानेही हसत हसत आईच्या या निर्णयाला होकार दिला.
सुनेने जेव्हा मला प्रेमाने मिठी मारली, तेव्हा मला जाणवलं की, परंपरा फक्त जुन्या चौकटीत जगण्यात नसते, तर नव्या पिढीला पोटच्या मुलीसारखं समजून घेऊन नात्यांना नवा श्वास देण्यात असते. जर प्रत्येक सासूने सुनेला अशी मायेची सुट्टी दिली आणि स्त्रीने स्त्रीचा असा आदर केला, तर महाराष्ट्रातलं प्रत्येक घर स्वर्गासारखं सुंदर होईल.
मी तर माझ्या कॅलेंडरमध्ये ‘वजा मास’ लिहून ठेवलाय, आणि माझी सून सासरी यायला आता रडत नाही, तर हसत हसत येणार आहे!
जावई हा केवळ पाहुणा असतो, पण सून ही नव्या पिढीला आणि वंशाला जन्म देणारी, संपूर्ण घराला उजळवून टाकणारी साक्षात महालक्ष्मी असते!”
त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात अधिक मासाचे अनरसे जावयाला भरवताना, आपल्या घरच्या लक्ष्मीच्या सुट्टीचा ‘वजा मास’ ठरवायला विसरू नका. सासूबाईंनो, कंबर कसा आणि कामाला लागा; कारण सुनेचा चेहरा खुलला की संपूर्ण घर कसं कडाडून हसतं!
बाकी, आमचा हा ‘वजा मास’ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या घरातल्या सुनेला हा सुखद धक्का कधी देताय?
लेखिका : सौ तृप्ती देव
भिलाई छत्तीसगड
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
“दूसरों को नहीं खुद को समझाना सबसे बड़ी चुनौती होती है।”
आयुष्य म्हणजे roller coaster ride, चढ उतार, चार धागे सुखाचे तर दहा धागे दुःखाचे. कधी स्वतः च्या चूकीमुळे तर कधी दूसऱ्यांच्या, कधी निर्णय चूकतात म्हणून, तर कधी (+, -, ×, ÷) ही चिन्हे योग्य वेळी, योग्य जागी वापरली जात नाहीत म्हणून. कधी ते सर्व आपल्या नशिबातच होत, असं समजून, वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. आयुष्य कधीच एक रंगी नसत. यात बघायला गेलं तर दोष असा कोणाचाच नसतो. वयाप्रमाणे अनुभव मिळतो, समज वाढते. हळूहळू आपण शहाणे होत जातो. प्रश्नांना हाताळायची कला आत्मसात करतो.
घर, बाहेर, ऑफिस अशा अनेक जागी काही ना काही चालूच असते. कधी कधी तर सर्व दिशांनी अटॅक होतो. म्हणजे अगदी वॉशिंग मशीन मध्ये जसे कपडे धुतले जातात ना, तसेच गोल गोल फिरत राहतो. एक प्रश्न सोडवा, जरा श्वास घ्या, तर दुसरा हजर. कदाचित त्यांनंतर आपण जास्त चकचकीत, हुशार होऊन आयुष्यात येणाऱ्या पूढच्या प्रश्नांना जास्त आत्मविश्वासाने उत्तर देण्यास समर्थ होत जातो. विचारांची क्लॅरिटी वाढते.
प्रश्न आयुष्याच्या प्रत्येक फेज मध्ये असतातच.
मला काही ही problem नाही. असं म्हणणारे या जगात कोणीच नाही. प्रोब्लेम ची डिग्री कमी जास्त असू शकते.
अडचणी आल्या की माणसाला सर्व दोष दिसतात गृहदोष, वास्तूदोष, पितृदोष सर्व दोष दिसतात. देव आठवतात.
आयुष्यात दुःख आहेत, म्हणून तर देव आहे. देऊळ आहे. नाही तर देवाला सुद्धा कोणी विचारलं नसतं बहुतेक. शनिवारी शनी देवता, मंगळवारी बजरंग बली ला कोणी विचारलं असतं का?? फक्त देवावर माझी श्रद्धा आहे, या विचाराने जाणारे किती लोक असतात??
देव सुद्धा म्हणत असेल,
अरे!! कधी फक्त भेटायला ही येत जा, नेहमी काही तरी मागायलाच येतो. बरे असो
तरीही आयुष्य छान, सुंदर, आनंदी असूच शकत. नाही का?? कारण,
“Happiness is not the absence of problems but it’s our ability to deal with them. ”
देवही आपल्याला त्याच समस्या देतो, ज्या सोडविण्याची क्षमता आपल्यात आहे. त्यात आपण उत्तीर्ण होणार, याची देवाला खात्री असते.
समजा एखादा प्रोब्लेम आलाच आणि जास्त दिवस घरात जम ठोकून बसलाच, तर थोडा काळ शांत बसावं. थोडा विसावा घ्यावा. प्रत्येक दुःखाचे ही एक ठराविक वय असतच. या BAD PATCH ला जाऊ द्यावे. आणि मग नव्याने सुरुवात केली तर काय हरकत आहे?? काही गोष्टी तिथल्या तिथे सोडून दिल्या तर त्रासही कमी होतो.
माझी आजी नेहमी म्हणायची,
सुख मिरवायचे नाही, दुःख गिरवायचे नाही.
प्रोब्लेम नेहमी मोठेच असतात, असं नाही. खूपदा तर प्रोब्लेम्स, self created असतात. म्हणजे,
चढाओढ, one up ship कार्यक्रम, सर्व गोष्टी माझ्या मनासारख्याच झाल्या पाहिजे हा आग्रह, लवकर श्रीमंत व्हायची इच्छा, उसकी साड़ी मेरे साड़ीसे सफ़ेद कैसे?? हा असा स्वभाव, काल्पनिक भीती, हे सर्व स्वतः च निर्माण केलेले अनावश्यक प्रोब्लेम असतात. दुसऱ्यांचे सुख बघून त्रस्त होणारेही असतातच.
आयुष्य म्हणजे सापसीढी चां खेळ. नवऱ्या बरोबर कागदी पत्रिकेत न जुळलेल्या गुणांबरोबर जुळवून घेण्याची कसरत, आयुष्य म्हणजे नियतीने जे पत्ते तुमच्या हातात दिले आहेत, त्यांचा चांगला डाव मांडणे, आयुष्य म्हणजे एक प्रवास हसत पूर्ण करायचा की रडतखडत करायचा ही प्रत्येकाची इच्छा.
आयुष्याच्या महाभारतात स्वतःलाच कधी कृष्ण, कधी अर्जुन बनून, रोज स्वतः च आपल्या रथाचा सारथी बनून लढाई जिंकायची असते. कधी कधी दोन पाऊल मागे घेण्यातही जीत दडलेली असते.
म्हणतात ना.
जीतने वाला ही नहीं, बल्कि कहां पे क्या हारना हैं । ये जानने वाला भी सिकंदर होता हैं।
कठीण काळात. दुसऱ्याला समजविण्यापेक्षा स्वतः ला समजाविणे हे सगळ्यात मोठ चॅलेंज आपल्या समोर असत.
म्हणतात ना,
जिंदगी में आप तब तक नहीं हार सकते, जब तक आप स्वयंसे ना हारो।
नियतीने आपली Excel Sheet तयार ठेवली आहे. आपल्या आयुष्यात कोण, कधी? केंव्हा? भेटणार?? काय घडणार?? हे script तयार आहे. तेंव्हा या सिनेमात आपल्याला काम करायचे आहे. आपला रोल ठरलेला आहे. त्यात आपल्याला काही खोडाखाड करता येणार नाही.
जे आहे ते आहे. तेच मान्य करायचे. देवाच्या/ नियतीच्या script वर पूर्ण विश्वास ठेवायचा.
जे होईल ते चांगलंच होईल.
देव आहे ना काळजी घ्यायला, सर्व काळजी आपणच केली तर मग देव काय करणार??
तेंव्हा,
मजेत रहा,
खाओ पिओ ऐश करो.
ये जिंदगी ना मिलेगी दोबारा ।
म्हणतात ना,
“जिस मनुष्य को परमात्मा के न्याय पर विश्वास है,
उसे संसार की कोई भी परिस्थिति विचलित नहीं कर सकती ।
☆ कुलकर्णी सरांचे अपेक्षित प्रश्न ☆ श्री अमोल केळकर ☆
साधारण 90 च्या दशकात आम्ही खाजगी क्लास ला जात होतो. (म्हणजे आमची इच्छा नव्हती पण आमच्या आई-वडिलांना वाटायचं, पोरगा शिकून मोठा व्हावा). आमच्या शाळेतील सरांकडेच आम्ही शनिवार रविवार क्लासला जात असू
ही शिकवणी म्हणजे आमच्यासाठी अभ्यास यथातथाच पण टवाळखोरी जास्त असा विषय होता. (मित्रांना भेटणे आणि मैत्रिणींना बघणे)
रविवारी सकाळी तर सकाळच्या दूरदर्शन वर लागणाऱ्या मालिका ( कच्छी धूप वगैरे वगैरे) सहित क्लासचा कॉम्बो पॅकेज असायचा.
परीक्षेच्या आधी काही दिवस मात्र वातावरण गंभीर व्हायचं. ( इतरांसाठी)
प्रत्येक विषयाच्या पाठ्यपुस्तकातील अपेक्षित कुठले प्रश्न येतील यावर कुलकर्णी सर टिकमार्क करून द्यायचे (भले एखादा त्यांचा विषय नसला तरी)
सगळेजण जाम खुश व्हायचे, आता हेच प्रश्न परीक्षेत येणार असं वाटायला लागायचं ( 10 पैकी 8 प्रश्नांवर टिक असायची).
परीक्षा झाल्यावर हातातली प्रश्नपत्रिका त्या क्षणी कचऱ्याच्या टोपलीत जायची, त्यामुळे सरांनी टिक करून दिलेले किती प्रश्न
पेपरात आले हे मात्र (मला) कधीच समजलं नाही.
70-80 % मार्क मिळवत गेलो आणि हे आम्हाला ‘यश ‘ वाटायचं.
आमची पिढी समाधानी होती.
आमचं गाव ‘ मोटे ‘ नसलं तरी लहान ही नव्हतं
शिक्षकांचे काही लाडके विद्यार्थी असले तरी कुणी ‘ चाटे’ गिरी करायचे नाहीत, शिक्षक करूही द्यायचे नाहीत
(आपल्या क्लासला विदयार्थी येत नाही म्हणून कुणी बदला घेत नसत)
(ढगफुटी आणि) पेपरफुटी न होण्याच्या काळात आमचे शिक्षण झाले हे आमच्या पिढीचे नशीब
टीप : 12 वीला बोर्डाच्या परीक्षेत, पेपराच्या आधी 10 मिनिटे आमचा एक मित्र 1-2 प्रश्न सांगायचा आणि ते प्रश्न हमखास यायचेच. तो सध्या ऑस्ट्रेलियात स्थायिक होऊन ज्योतिषी म्हणून प्रसिद्ध आहे, (त्याची नाशिकला शाखा नाही)
बालपणी फुगडी खेळताना, “चहा बाई चहा, गवती चहा, आम्हा मैत्रिणींची फुगडी पाहा” या गाण्याने झालेला चहाचा परिचय. ज्या वयात चहाची चवही माहीत नव्हती. पण गाण्यातून मात्र परिचय होता. त्याच वेळी घरात स्टोव्ह वर चहा मोठ्या पातेल्यात ठेवला जायचा त्या काळी, मी लहान असताना एकत्र कुटुंब पद्धती होती. एकत्र म्हणजे आई, वडील आणि मुलं नव्हे तर सगळे काका, त्यांची मुले असे मोठे कुटुंब असायचे. आणि चहाला बुडबुडे आलेत का? हे बघायला कोणीतरी सांगायचे. आणि ते छोटे मोठे कसे आलेत हे हात, गाल याच्या मदतीने सांगितले जायचे. आणि आत्या किंवा काकू चहा किती उकळला आहे ते ओळखायच्या. मग त्यात दूध घालून झाकण ठेवून थोडा वेळ मुरवायचा. मग दुसऱ्या पातेल्यात गाळून एकेकाला दिला जायचा.
असा चहाचा परिचय! पण प्यायला मात्र बंदी. चहा पिऊन काळी पडशील अशी भीती दाखवली जायची. अजूनही हे कळले नाही, चहा न पिता रंग मात्र चहा सारखा झाला कसा?
मोठे झाल्यावर कळले, इतक्या लहानपणी ज्याचा परिचय झाला तो चहा आपला नाहीच! कोणी एक शेन नुंग नामक चिनी शासक उकळते पाणी घेऊन झाडाखाली बसले होते. आणि अचानक झाडाचे पान त्यात पडले आणि त्या पाण्याचा रंग व चव बदलली हाच तो पहिला चहा. नंतर असेही वाचले, काही बौद्ध भिख्खू ध्यानाला बसताना विशिष्ठ झाडाची पाने खायचे, त्यामुळे त्यांना झोप येत नसे. हाच तो चहा व त्याची पाने. नंतर त्यात साखर, दूध घालून आपला चहा तयार झाला. आणि विविध नावांनी ओळखला जाऊ लागला. आसाम, दार्जिलिंग, निलगिरी अशी नावे घेऊन आला. पण आम्हाला हे काहीच माहिती नसायचे. आम्ही पुण्यातल्या जगप्रसिद्ध महाराष्ट्र टी डेपो समोर रांगेत उभे राहून फॅमिली मिक्सचर मिळाला की धन्यता मानणार. हाच आमचा चहा!
दिवसेंदिवस त्यात विविध पदार्थ मिक्स होऊन विविध उपयोगाचे, चवीचे चहा तयार झाले. आणि आता तर फारच विविधता घेऊन विविध नावांनी चहा येत आहेत. आणि त्याचे दुष्परिणाम होऊ नयेत याची पुरेपूर काळजी घेऊन चहाचे कप आकाराने लहान होत चालले आहेत. अगदी पोलिओ डोस घेतल्या प्रमाणे वाटते.
हे असे मसाला, गवती, आले, विलायची चहा घेता घेता एक दिवस आईस टी समोर आला. आणि गरम, कडक चहाच्या कल्पनेला पुन्हा धक्का बसला. आणि आता तर आपली चहा पावडरच चहातून गायब झाली. आणि याला चहा कसे म्हणावे? हा माझ्या बाल बुध्दीला प्रश्न पडला. मग धाव घेतली गुगल बाबांच्या कडे! त्यांनी सांगितले चहा/टी म्हणजे कोणतीही पाने उकळली की झाला टी आणि आताचे टी बघून गरगरलेच! कारण काही चहा मध्ये पाने पण नाही तर चक्क फुले, काहित झाडाच्या खोडाची साल असे वापरलेले असते.
१५ डिसेंबर हा दिवस मूळचा ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. २००५ मध्ये भारतात (नवी दिल्ली) या दिवसाची सुरुवात झाली. ज्याचा मुख्य उद्देश चहा उत्पादक देशांमधील कामगारांच्या हक्कांना आणि चहा उद्योगाला प्रोत्साहन देणे हा होता. तथापि संयुक्त राष्ट्राने (UN) भारताच्या प्रस्तावानुसार २१ मे हा दिवस अधिकृत ‘आंतरराष्ट्रीय चहा दिवस’ म्हणून घोषित केला आहे. २१ मे रोजी बहुतांश देशांमध्ये चहाचा हंगाम सुरू होत असल्यामुळे हा बदल करण्यात आला.
असे चहाचे अवतार बघता बघता आपल्या चहाचे अस्तित्व धोक्यात आले की काय अशी भीती वाटू लागली आहे. आणि मग चहा, पोहे कार्यक्रमात काय दिले जाणार? आणि चाय पे बुलाया है या ऐवजी कोणते पेय येणार? आणि हाच चहा कोणत्या स्वरूपात मिळणार? आणि चहाच्या टपरीवर गप्पा मारत काय प्यायचे? घरी आलेल्या पाहुण्यांना काय द्यायचे? असे बरेच प्रश्न मनात आहेत. पण सध्या तरी याची काळजी नाही. अजून तरी हाच चहा प्रचलित आहे. आणि चहाला भेटू या! हे आमंत्रण अजून तरी कायम आहे.
सध्या चालू असलेले नवीन वाक्य.. रोज FM वर ऐकू येतय.
“धुन बदल के तो देखो”
म्हणजे “थोडा बदल करून तर बघा ” हे सांगणं आहे.
प्रत्येक जण वेगळा आहे. ते वेगळेपण त्याची ओळख आहे. प्रत्येकाची विचार करायची एक पद्धत असते. संस्कार वेगळे असतात. सवयी सर्वच वेगळं असतं. आणि त्या त्या प्रमाणे सर्व जण आपल आयुष्य जगत असतात. पण आपलं आयुष्य इतरांबरोबर ही जुडलेलं असतं. परिवार मित्र मैत्रिणी, शेजारी, समाजातील इतर लोक. सर्वांशी संबंध येतात आपले. तेंव्हा adjust करणे accept करणे avoid करणे या गोष्टी करणं आलच.
परिस्थिती प्रमाणे, काळाप्रमाणे वयोमानानुसार, थोडे थोडे बदल करणे गरजेचे असते. ते आपल्या फायद्याचेच असतात.
– – यालाच वेगळ्या शब्दांत “धुन बदल के तो देखो “असं म्हटलं आहे.
नवीन व जुन्या पिढीतील अंतर कमी करायला, दोघांनी थोडे बदल केले तर उत्तमच. दोन्ही पिढ्यांना त्याचा उपयोग होईल. सामंजस्य वाढेल. difference कमी होतील. सासू -सुनेचे नातं छान होईल. जून्या आणि नवीन पद्धती, विचारांचे, चालीरीतींचे right combination एका नवीन संस्कृती ला जन्म देईल. जी सर्वांना मान्य असेल.
प्रकृतीचे नियम बदलणे आपल्या हातात नाही. पण एक काम असही आहे, जे आपण करू शकतो. आणि ते करताना कोणाला विचारायचीही गरज नाही. आणि ते म्हणजे स्वतः ला बदलणे.
खरं तर खूप मोठे बदल करायची गरज नसतेच. छोटे -छोटे बदल करूनच खूप मोठा बदल झाल्याचे लक्षात येते. थोडे विचार बदलले. थोडी सहनशीलता वाढविली, दुर्लक्ष करायचे ठरवले, परिस्थिती ला मान्य केले. शांत रहायला शिकले. वादविवाद टाळायला शिकले. माघार घ्यायला शिकले कौतुक करायला शिकले. नवीन पिढी ला charge द्यायची वेळ आली आहे. हे समजलं. तर झाला की बदल. आणि तुम्ही ही बदललेली धुन ऐकुन तर बघा. किती आनंद देईल ती तुम्हाला.
अहो!! साधी घरात ” seating arrangement ” बदलली. दोन गुलाबाची फुले flowers pot मधे लावली, तरी आपल्या ला वेगळे पणा जाणवतो. व छान वाटत. “ज्याला नेहमी टीमचा मेंबर रहायचे असेल मग ती टीम “घरची ” किंवा”बाहेरची” कोणतीही असो तर धुन बदलत रहावी लागेल. “
तसं सध्याच्या परिस्थिती ने बदल घडवून आणलेला आहेच. हा जबरदस्तीने झालेला बदल आपण स्विकारलाच ना. म्हणजे बदल करणे शक्य आहे आपल्याला.
बदलत्या जगाबरोबर चालायचे असेल, तर बदलणे हे प्रत्येक क्षेत्रात गरजेचे आहे. हा “success” मंत्र आहे.
… काल रेडिओ वर ऐकलं. सासूबाई म्हणतायेत “यावर्षी अधिक महिन्याचे सौभाग्याचे वाण मी माझ्या लाडक्या सुनेला देणार आहे ” या सासुबाईंनी धुन बदलायचे ठरविले आहे. असं दिसतंय.
म्हणतात ना
” प्रत्येकाला खूष ठेवणं ही जगातील सर्वात कठीण गोष्ट आहे. पण सर्वांबरोबर खुष राहणे ही सोपी गोष्ट आहे. “
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “पण मी नाही दिलं तर..?” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
नमस्कार. मी आमच्या भिक मागणाऱ्या वृद्ध आजी-आजोबांबरोबर रोज बसतो, उठतो बसतो जेवतो खातो… त्यांचं काही बीनसलं तर त्या मला शिव्या, (प्रेमाच्या… एक आई आपल्या मुलाला बोलेल तसं) देतात…
मी चिडलो तर मग मी पण काहीतरी त्यांना बोलतो…
मग त्या रुसून बसतात… मग मी त्यांना म्हातारे म्हणत, लाडीगोडी लावून चिडवत मनवतो…
ती तरी राग किती वेळ मनात ठेवणार…?
गालावरून हात फिरवून ती गालाचा मुका घेते… डोक्यावरून हात फिरवते… हात हातात घेते…
मगाशी आलेला राग कुठल्या कुठे पळून जातो तिचाही आणि माझाही…
मग तिच्याकडे साठलेला खाऊ ती मला देते… !
– – हे मी रोजच गणित सांगितलं… असं रोज अर्धा पोतं मला खायला मिळतं… (त्यासाठी रोज एक रिकामी पिशवी मी घेऊन जातो)
– दुसऱ्या दिवशी मी ते गरजूंना वाटून टाकतो पण त्यातला एखादा घास प्रसाद म्हणून नक्की खातो… !
अशीच एक आजी आहे.. ती आजी घरात राहते, घरात राहते म्हणजे फक्त शरीराने…
सुनेला आजी (सासू)अजिबात आवडत नाही, म्हणून ती तिला दिवसभरातून कोणतेही जेवण किंवा नाश्ता देत नाही… बायकोचा रोष नको म्हणून मुलगा तिला कोणत्याही खर्चाला पैसे देत नाही…
मग या आजीनं जगायचं कसं…?… म्हणून ती एका परिसरात भीक मारायला येते…
(राहायला घर आहे, मुलगा आहे, सून आहे, नातवंडं आहेत.. परंतु जपत नाहीत, हिच्या नावावरील सर्व प्रॉपर्टी आणि इतर गोष्टी मुलाने आणि सुनेने स्वतःच्या नावावर करून घेतले आहेत, हिला मात्र जगण्यासाठी भीक मागावी लागते)
तर… या आजीची आणि माझी काही कारणावरून, या सोमवारी म्हणजे 18 मे ला घनघोर लढाई झाली…
.. अर्थातच माझा पराभव झाला, हे सांगणे नकोच… ! पराभूत योद्धाप्रमाणे मी मान खाली घालून निघालो, “बचेंगे तो और भी लढेंगे”… अशी शाळेतल्या धड्यात वाचलेली वाक्य मनात घोळवत मी निघालो…
… तेवढ्यात ही आजी पाठी मागून आली, मी असेपर्यंत जेवढी काही भीक म्हणून अन्न मिळालं असेल ती ते पदराची ओटी करून घेऊन माझ्याकडे येत होती…
आजीचं वय असेल 70 – 75 वर्ष…
जे काही भिकेत मिळालं असेल ते ती माझ्या बॅगेत भरत होती गुपचूप… तिने या वस्तू बॅगेत भरेपर्यंत मी साळसुदाप्रमाणे चूप राहिलो… तिने या सर्व वस्तू भरल्यानंतर मी तिला खोट्या खोट्या रागाने म्हणालो, “आजपासून मी तुझं काहीही खाणार नाही…”
ती म्हणाली, “ माझ्या हातचं तर माझा मुलगा आणि सून सुद्धा खात नाही.. तू तर लांबचा… तू कसा खाशील…? “.. असं म्हणून ती तोंड पाडून निघाली… !
मला वाईट वाटलं, पाठमोऱ्या जाणाऱ्या आजीचा पदर मी ओढला आणि म्हणालो “ मी तुला खरच लांबचा वाटतो…???”
“ न्हाय रं बाळा तूच तर माझा मुलगा हायस… “ असं म्हणत तिने माझ्या डोक्यावरून हात ठेवून बोट कडाकडा मोडली…
– – युद्ध तिथंच संपलं…
मी तिचा हात हातात घेऊन म्हटलं, “ म्हातारे सगळेच जर मला दिलंस तर तू खाशील काय? तुझी सून आणि मुलगा तर तुला खायला काहीच देत नाहीत. ,.. ”
ती हसत परंतु रडवेला चेहरा करत म्हणाली, “ बाळा माझं पोट केवढं? माझ्या पोटापुरतं मी माझ्यापुरतं काढून घेतलं आणि बाकी सर्व तुला देतेय… पण मी नाही दिलं तर तुला कोण देणार बाळा, खा माज्या सोन्या… !!! “
“पण मी नाही दिलं तर तुला कोण देणार बाळा…?”
… तिच्या या वाक्यावर मला खरोखर रडू कोसळलं… ती मला खरोखर भिक्षेकरी समजत होती, याहून अभीची जीत कोणती असेल…???
मी त्यांच्यातलाच एक आहे हे मी समजतो, ते वेगळं…
परंतु त्यांच्यातलाच मी एक आहे हे ते सुद्धा समजतात.. यात खूप फरक आहे…
स्वतःला लागेल तेव्हढंच ठेवून बाकी सर्व तिने मला दिलं होतं…
काय म्हणू या दातृत्वाला…????
– – एरवी शे 200 किलो डोक्यावर अंगावर खांद्यावर घेऊन नाचत फिरत असतो मी…
… पण आजीने दिलेला खाऊ मात्र मला उचलता येईना… तिच्या या दातृत्वामुळे बॅग जड झाली होती…
बॅग उचलता उचलता ती म्हणाली, ‘ तू हे माझ्यासमोर खा… ‘ मग तिने दिलेल्या गोष्टी मी तिच्या समोरच खाल्ल्या… ती भरून पावली…
… देवीने आज प्रत्यक्ष हातात प्रसाद दिला म्हणून मी सुद्धा भरून पावलो…
मला नेहमी असं वाटतं, देव देवी अल्ला ईश्वर येशु हे आता मंदिर मस्जिद चर्च गुरुद्वारा मध्ये राहत नाहीत, ते वेषांतर करून बाहेर पडले आहेत.. माणूस, माणूसच आहे का हे पाहायला.. ,?
.. ही आजी तीच देवी तर नसेल…? वेषांतर केलेली…? मी कोण आहे हे पाहायला आलेली…?
… माहित नाही.. ,.
आजी समोर खाल्लेला एक घास… ! आता माझी बॅग कापसासारखी हलकी झाली… कशी कोण जाणे…?
मी ती हलकी बॅग खांद्यावर घेतली… तिने दिलेला प्रसाद माझ्या तोंडी होता… आजीही गालातल्या गालात हसत होती…
खांद्यावरची बॅग इतकी हलकी कशी झाली याचा विचार करत मी पुढे निघालो…
… सहज मागं वळून पाहिलं… सुरकुतलेल्या चेहऱ्यातून आजी अजूनही हसतच होती…
☆ “उगीचच खरेदीचं प्रमाण वाढतंय!!…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
झालं असं की,
रविवारची आळसावलेली, कंटाळवाणी संध्याकाळ,
“मी काय म्हणते”चहाचा कप हातात देत सौ म्हणाल्या.
“बोला!!”
“मॉलमध्ये जायचं का?”
“कशाला? काय घ्यायचयं”
“काहीच नाही. खूप दिवसात विंडो शॉपिंग केलं नाही म्हणून जरा…. ”
“आतापर्यंतचा अनुभव वेगळायं. तिथं गेल्यावर शॉपिंग होतचं. गरज नसलेल्या वस्तू घरात येतात. ”
“स्वस्त असतात आणि डिस्काउंट पण मिळतो म्हणून खरेदी होते. बचत कशी करावी हे तुम्हांला समजतच नाही. ”
“मला काय समजतं आणि काय नाही हा मुद्दाच नाहीये. ”
“एवढी गर्दी उगीच होते का?”
“गर्दीचं कौतुक सांगू नकोस. रस्ता खणत असताना ते बघायला सुद्धा गर्दी होते. ”
“उगीच लेक्चर नको. जायचं की नाही तेवढं बोला. काही घेत नाही फक्त फिरून येऊ. त्याला पैशे पडत नाही” सौंच्या आग्रहाला नाही म्हणता आलं नाही. स्वस्ताई साठी प्रसिद्ध (???)मॉलमध्ये पोचलो. तुफान गर्दी. लोक झपाटल्यासारखं खरेदी करत होते. ओसंडून वाहणारी ट्रॉली आणि मुलं यांना सांभाळत बायकोच्या पाठोपाठ फिरणाऱ्या नवऱ्यांच्या गर्दीत मीही सामील झालो. फक्त विंडो शॉपिंग. काही म्हणजे काहीच घ्यायचं नाही असा पक्का निर्धार होता त्याविषयी सौंना आठवण करून दिली तरीही तिनं ट्रॉली घेतली तेव्हा “खरेदी नाहीच” हा निर्धार ढासळायला सुरवात झाल्याची जाणीव झाली. हळूहळू एकेक गोष्टी ट्रॉलीमध्ये येत होत्या. तासा-दीड तासानं बिलिंग काउंटर पोचलो तेव्हा ट्रॉली गच्च भरलेली. वैतागून सौंकडे पाहिल्यावर उत्तर आलं “माझ्याकडं बघू नका. दोनचार वस्तु घरात लागत होत्या आणि नेमक्या त्या स्वस्त मिळाल्या म्हणून घेतल्या. तसंही इथं सारखं सारखं येणं होतं नाही आणि आत्ता लागणार नसल्या तरी नंतर उपयोगाला येतील. घर म्हटलं की काही ना काही चालूच असतं. मी स्वतःसाठी काहीच घेतलेलं नाहीये उलट तुम्हीच शेविंग क्रीम वगैरे घेतलं. अजून बिल दिलं नाहीये. तुम्ही म्हणत असाल तर सगळ्या वस्तु काढून ठेवते. उगीच वाद आणि मला बोल नको. ”साधारणत: बायकोनं असा पवित्रा घेतला की बहुतेक नवरेमंडळी जे करतात तेच मी केलं. निमूटपणे बिल देण्यासाठी रांगेत उभा राहिलो. तीन हजाराची खरेदी झालेली. हातात तीन पिशव्या घेऊन रिक्षाची वाट बघताना आळस पार नाहीसा झालेला.
“तुमचे साडे चारशे वाचवले” बिलाचा हिशोब केल्यावर ख़ुशीनं सौ म्हणाल्या.
“हंssssम” मुद्दाम एवढंच म्हणालो. जास्त काही बोललो तर… !!!!
मध्यमाशांच्या पोळ्याला विनाकारण दगड मारायचा नसतो. कुठं अन काय प्रतिक्रिया द्यायची हे नवऱ्यांना अनुभवानं बरोब्बर कळतं.
एक मात्र नक्की की, उगीचच खरेदीचं प्रमाण मात्र वाढलयं.