मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “दयाळू व्हा…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “दयाळू व्हा…” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आपल्याकडे कितीही संपत्ती असू द्या पण जाताना रिकाम्या हातानेच जायला लागते तेव्हा दयाळू व्हा..

नुकतीच म्हणजे २८ सप्टेंबरला लता मंगेशकर यांची 96 वी जयंती झाली आहे. त्या निमित्ताने बऱ्याच आठवणींना उजाळा देण्यात आला. पण मला मात्र त्यांच्या मृत्यूच्या आधी दोन दिवस त्यांनी वार्ताहरांशी साधलेला वार्तालाप आठवला. दुर्दैवाने तो त्यांचा शेवटचा वार्तालाप ठरला.

त्यावेळी त्यांना जीवनाचे अंतीम सत्य उलगडले. त्याची जाणीव झाली आणि या ओघात त्यांनी बरेच चप्पल जोड आहेत पण आता अनवाणी रहावं लागतंय… बरेच उंची कपडे आहेत पण हॉस्पिटल मधल्या गाऊनवर रहावे लागतंय… पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवले पण आता दोन गोळ्या औषधे यावर रहावे लागतय असे सांगून त्या ओघात त्या म्हणाल्या आपल्याकडे कितीही संपत्ती असू द्या पण जाताना रिकाम्या हातानेच जायला लागते तेव्हा दयाळू हा.

एक परमसत्य त्या सांगून गेल्या. पूर्ण विश्वालाच हे गीतासार स्वानुभवातून शिकवून गेल्या.

खरंच मृत्यू हे अंतीम सत्य असले तरी त्या बरोबरच आपण काही घेऊन येत नाही काही घेऊन जात नाही हे पण तितकेच खरे आहे.

कहोना प्यार हैं सिनेमात देखील एका गाण्यात लकी अली म्हणतो 

एक पल का जीना फिर तो है जाना

तोफा क्या लेके जाए दिल ये बताना

खाली हाथ आए थे हम

खाली हाथ जाएँगे

बस प्यार के दो मीठे बोल झिल मिलाएँगे

तो हंस क्यूँ की दुनिया को है हसाना

ऐ मेरे दिल तू गाए जा…

याच भावनेने लता दीदी आपल्या मनाला ए मेरे दिल तू गाये जा सांगत आल्या. आणि शेवटी पण हाच संदेश अखील विश्वाला दिला.

पुढे त्यांनी दयाळू व्हा असे पण सांगितले आहे. कारण तुमची दयाळू वृत्तीच तुमच्यपर्यंत पीडितांची संवेदना पोहोचवत असते. म्हणून तुम्ही मिळवलेल्या संपत्तीचा विनियोग दयाळू वृत्तीने लोकांची मदत करण्यात करावा असा महान सांगीतला आहे.

याचे कारणही आपल्याच अनुभवातून दिले आहे. कारण तुम्ही काही घेऊन आले नाहीत काही घेऊन जाणार नाही ही उक्ती चुकीची असल्याचे दर्शवून दिले आहे. मनुष्य रिकाम्या हाताने आला असला हे जरी खरे असले तरी तो येताना आपले भाग्य घेऊन येतो हे त्याहीपेक्षा मोठे सत्य आहे. म्हणूनच आपल्या जीवनात कितीही अडथळे, अडचणी आल्या,… गरीबी, विषप्रयोग, अपयश जे त्यांनी स्वतः अनुभवले तरी आपले कर्म, यावर निष्ठा ठेऊन त्यालाच देव मानून आपले काम सातत्याने करत राहिले तर प्रारंभी दुर्भाग्य वाटलेले आयुष्यच सौभाग्यदायी होऊन जाते.

तसेच जाताना इथले काहीच बरोबर नेता येत असले तरी आपल्या पुण्यकर्माची पुंजी आपण आपल्या बरोबर नेऊ शकतो हा विश्वास वाटून दयाळूपणातून पुण्यपुंजी वाढेल म्हणून दयाळू होण्याचा संदेश त्यांनी दिला.

तेव्हा लता दीदींना आदर्श मानणाऱ्या, त्यांचा अभिमान बाळगणाऱ्या, त्यांच्या आवाजावर, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनीच त्यांचा कितीही संपत्ती असू द्या पण जाताना रिकाम्या हातानेच जायला लागते तेव्हा दयाळू हा.

हा संदेश मान्य करायला पाहिजे. मनावर कोरून ठेवला पाहिजे. त्या प्रमाणे वागायचा प्रयत्न करायला पाहिजे.

हीच लता दीदींना आदरांजली ठरेल.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मदत…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆

श्री मंगेश मधुकर

? मनमंजुषेतून ?

☆ “मदत…” ☆ श्री मंगेश मधुकर

रविवार सकाळ, निवांत पेपर वाचत असताना समरचा फोन “काय करतोयेस”

“काही नाही. ”

“आमच्या क्लबचा फराळ वाटप इव्हेंट आहे. चल. ”

“नको. बोर होईल. ”

“आमचं सोशल वर्क तर बघ. ”

“तुम्ही लोकं सोशल नाही सोसल तेवढं वर्क करता. पैशेवाल्यांचा टाइमपास क्लब. ”

“असं काही नाही. खूप चांगली कामं केलीत. ”

“तुमची कामं म्हणजे सोयीस्कर समाजसेवा. ”

“आता तर तू चलच. टोमणे नंतर मार. खाली ये”समरनं फोन कट केला. दहा मिनिटांतच आम्ही निघालो. सरकारी हॉस्पिटलच्या आवारातल्या जुन्या अनाथ आश्रमात कार्यक्रम होता. व्यवस्थापकांनी स्वागत केल्यानंतर आम्ही बाकीच्या मेंबरची वाट बघत दारात थांबलो. काही वेळानं दहा-बारा उच्चभ्रू मेंबर जमले. आल्या आल्या सर्वांनी आधी आश्रमाच्या बोर्डसोबत सेल्फी घेऊन पोस्ट केला. मग हाय, हॅलो, गुडमॉर्निंग वगैरे करून मेंबर्सच्या इंग्लिशमध्ये गप्पा सुरु झाल्या. एकमेकांचे खोटं खोटं कौतुक, औपचारीक बोलणं. सगळंच नाटकी. एकूणच हा सगळा प्रकार असह्य झाल्यानं तिथून सटकलो. आश्रमात फिरताना कुतुहलानं पाहणारी मुलं दिसली. मी हसल्यावर मुलांनी सुद्धा मनमोकळ हसत प्रतिसाद दिला. त्यांच्याशी बोलणार तितक्यात मुलांना हॉलमध्ये बोलावल्याची सूचना आली.

हॉलमधल्या छोट्या स्टेजवर दोन खुर्च्या आणि टेबलावर पाण्याचं तांब्या-भांडं. बाजूला फराळाची पाकीट ठेवलेली होती. समोर मुलं खाली सतरंजीवर बसलेली. तिथल्या मळकट प्लॅस्टिक खुर्च्यांवर बसताना क्लबच्या सभासदांचे चेहरे पाहण्यासारखे झाले. त्यातही काहीजण कपडे खराब होऊ नये म्हणून उभे राहिले. क्लबचे प्रेसिडेंट आल्यावर सगळ्यांनी उभं राहत टाळ्या वाजवल्या. प्रेसिडेंट प्रचंड खुष. कार्यक्रमाला सुरवात झाली. व्यवस्थापकांच्या प्रास्ताविकानंतर प्रेसिडेंटनी भाषणाला सुरवात स्वकर्तुत्व, मिळवलेलं यश, मान-सन्मान आणि सामाजिक बांधिलकी नंतर क्लबची माहिती, गरीबांना केलेली आर्थिक मदत आणि आपल्या लीडरशिपखाली सुरू असलेलं जोरदार काम वगैरे वगैरे विषयावर प्रेसिडेंट स्व-कौतुकाचा ढोल जोरजोरात वाजवत होते. मराठीत बोलताना अडखळत होते म्हणून बऱ्याचदा ते इंग्लिशमध्ये बोलत होते. आपण कुठं आहोत. काय बोलतोय, समोरचा प्रेक्षक कोण आहे याचं भान सुटलेलं. माईकवर बोलताना अनेकांना तारतम्य राहत नाही. माईकचा नाद सुटता सुटत नाही. पुन्हा एकदा अनुभवायला हे आलं. एकदम रटाळ कार्यक्रम चाललेला. मुलं तर जाम कंटाळलेली, खाली माना खालून आपसात कुजबुजत होती. हसत, खिदळत होती. बोर झालेले क्लब मेंबर मोबाइलवर गेम खेळत होते. एक मेंबर वेगवेगळ्या बाजूने फोटो काढत होता. बहुतेक प्रेसिडेंटचा चमचा असावा. सर्वात जास्त गोची स्टेजवर बसलेल्या व्यवस्थापकांची. सहन होईना अन सांगता येईना अशी अवस्था. चेहऱ्यावरचं केविलवाणं हसू आणि हलणारा उजवा पाय हलवण्यावरून अस्वस्थपणा सहज लक्षात येत होती. मी रोखून पाहिल्यावर समरनं नजर फिरवली. सगळेच कंटाळलेले. मुलांची चुळबुळ वाढली. शेवटी न राहवून मी जोरजोरात टाळ्या वाजवायला लागलो तेव्हा मुलांनी आरडाओरड करत साथ दिली त्यामुळे भाषण थांबलं.

आणि लगेच फराळ पाकिटं वाटप सुरू झालं. क्लबच्या बॅनरसमोर चार मुलांना पाकिटे हातात देऊन प्रेसिडेंटसोबत फोटो काढले गेले. नंतर फराळ वाटताना जोरदार फोटोसेशन सुरू झालं. प्रत्येक मेंबर फराळ वाटतानाचा फोटो काढून समाजसेवेची हौस भागवत होता. मुलांना मात्र यासगळ्याची गंमत वाटत असल्यानं ती हौसेनं फोटो साठी पोझ देत होती तर काहींनी पाकिट फोडून फरळावर ताव मारायला सुरुवात केलेली. औपचारीक आभार प्रदर्शन झाल्यावर मुलं रूममध्ये गेली. कार्यक्रम संपला. स्वतःवरच खुष झालेले मेंबर्स फोटो शेयर करण्यात, पोस्ट करण्यात बिझी झाले. एकानं प्रेस नोट लिहायला घेतली. व्यवस्थापकांनी चहा-नाश्ता साठी आमंत्रण दिल्यावर मेंबर्स विचित्र चेहरा करून एकमेकांकडे पहायला लागले. “त्यासाठी नंतर नक्की येऊ. आता दुसऱ्या कार्यक्रमाला जायचंय ”असं सांगून प्रेसिडेंटनं सगळ्यांची सुटका केली. अजून एक चकचकीत समाजसेवा केल्याच्या आनंदात मेंबर्स आश्रमातून बाहेर पडले. समर अजूनही माझ्याकडे बघणं टाळत होता.

“तुला तरी पटलं का? ”

“सॉरी यार!! ”समर

“एवढं करून काय मिळवलं”

“असे कार्यक्रम करावे लागतात. ”

“मदत करताय ही चांगली गोष्टयं पण इतका गाजावाजा, भाषणबाजी कशासाठी? ? कुणासाठी? ? ’

“नुसतं काम करून चालत नाही तर ते दाखवावं लागतं. सगळे हेच करतात”

“मला सांग. या कार्यक्रमातून तुला खरंच समाधान मिळालं? ? ? ”

“प्रामाणिकपणे बोलायचं तर अजिबात नाही पण मुलांना फराळ मिळाला हे महत्वाचं. ”

आमचं बोलणं सुरु असताना समोर आमचा मित्र मुरली भल्या मोठ्या पिशव्या घेऊन रिक्षातून उतरला. खूप आश्चर्य वाटलं. ज्या बिल्डिंगमध्ये मुरली गेला आम्ही तिथं पोचलो. जनरल वॉर्डमधे मुरली पेशंटला फराळ वाटत होता. आम्हांला पाहून त्याला आश्चर्य वाटलं “तुम्ही आणि इथं!!! ”

“आश्रमात कार्यक्रमासाठी आलो होतो”

“तुझं हे काय चाललयं”

“वार्षिक दिवाळी आनंद”

“म्हणजे”

“दरवर्षी दिवाळीच्या आनंदात इथल्या पेशंटला सहभागी करून घेतो. वॉर्डमधील पेशंटला फराळ देतो. दहा वर्ष झाली”

“का? म्हणजे चांगलं काम आहे पण कधी बोलला नाहीस” समर.

“फार छोटी गोष्टयं. काही विशेष नाही. ”

“याचा खर्च”

“मीच करतो”

“वा वा!!. एक मिनिट फोटो काढतो. ”मी खिशातून मोबाइल काढला.

“फोटो नको. “

” का?

“गरज नाही. हे काम मी स्वतःसाठी करतोय. कुणाला दाखवायला नाही. आजपर्यंत एकही फोटो काढलेला नाही. दुनिया दिवाळीच्या आनंदात असताना याठिकाणी गरीबी, दु:ख, वेदना यांच्या सोबत जगणाऱ्या पेशंटसाठी कोणी येत नाही. म्हूणन यायला लागलो आणि ही काही ग्रेट मदत वगैरे नाही. त्यांच्या दिवाळी आनंदात माझा मुंगीचा वाटा म्हणा. पेशंटच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तोंड भरून दिलेला आशीर्वाद यामुळे माझी दिवाळी सार्थकी लागते. ”मुरलीचं ऐकून समर आणि मी नि:शब्द झालो.

“मुरली, यार काय बोलू. शब्दच नाहीत. आजच्या काळातही प्रसिद्धी पासून दूर राहून दुसऱ्यांना मदत करणारी माणसं आहेत असं कोणी सांगितलं तर विश्वास बसला नसता पण… मित्रा जिंकलस. ” समरनं मुरलीला कडकडून मिठी मारली.

“आम्हीही तुझ्या सोबत असणार, चालेल ना” मी विचारलं तेव्हा प्रसन्न हसत मुरली म्हणाला

“आतापासूनच सुरुवात करा. ”

“नक्कीच!! पण फोटो नको”समरच्या बोलण्यावर सगळेच खळखळून हसले.

© श्री मंगेश मधुकर

मो. 98228 50034

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “उसनवारी…” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “उसनवारी – –” ☆ सुश्री शीला पतकी 

‘वारी’ या शब्दाचा अर्थ जाणे आणि येणे.. ॲक्शन आणि रिऍक्शन.. देणे घेणे…. त्यामुळे तो ‘उसनवारी’ साठी फार महत्त्वाचा ठरतो. उसने घेतलेले पदार्थ पुन्हा परत द्यावयाचे असतात.

– – आता ही उसनवारी किंवा उसने घेणे हा शब्द हळूहळू अपरिचित होत जाईल, कारण आता कोणी कोणाकडे काहीही मागायला जात नाही कारण त्यात कमीपणा असतो, त्यांना तो वाटतो आणि मुळात समृद्धी एवढी झाली आहे की कोण कशाला कोणाकडे मागेल?…

ही उसनवारी पूर्वी वाडे आणि चाळी यांच्यामध्ये चाले. वाड्याचे आणि चाळीचे रहिवासी हे गरीब आणि मध्यमवर्गीय अशा गटातलेअसायचे. सर्वसाधारणपणे सर्वांची परिस्थिती सारखीच. 23 /24 तारखेपासून महिनाअखेर सुरू होई व शेवटच्या आठवड्यात चणचण नावाची प्रक्रिया सुरू होई. मग हा पदार्थ आहे तर तो पदार्थ नाही, ती वस्तू आहे तर ही वस्तू नाही… मग चाळी-वाड्याचे हे गणित उसनवारीवर चालू राहायचे. त्यांची आर्थिक घडी बळकट करणारी उसनवारी एक संस्था होती. त्यामुळे कोणाला कमतरता जाणवली नाही. मुळात मागायला लाज वाटली नाही. उणेपणा वाटला नाही आणि परकेपणाही वाटला नाही कारण प्रत्येकाला अशा उसनवारीची गरज भासायची. त्यामुळे उसने मागणं हे कमीपणाच आहे ही संभावनाच नव्हती. साधारण उसनवारी किंवा उसने घेणे हे 24 ते 30 या तारखेला चालत असे. महिनाभर उसनवारीचे पदार्थ ठरलेले… त्यामध्ये साखर, चहा, दूध, यांचा प्रामुख्याने समावेश असे. हे कधीही मागावेत. जसा जसा शेवटचा आठवडा येईल तसे ज्वारीचे गव्हाचे पीठ, तांदूळ, डाळ, तेल यापैकी कोणत्याही उसनवारीला मज्जाव नव्हता. ज्याच्याकडे ते असे तो दुसऱ्या माणसाला तो पदार्थ देऊन टाकत असे. आणि त्याच्याकडे जे असे ते त्याच्याकडून मागून घेत असे. अशा तऱ्हेने शेवटचे सहा सात दिवस सामाजिक सहयोगाने तडीस जात असत… पण यामुळे कुणी दुःखी नव्हता… आपण कमी आहोत ही भावनाही नव्हती… उलट सगळे एकमेकांना उपयोगी पडत असल्यामुळे बंधू आणि भगिनी भाव हा वाढीस लागत असे.

भाजी मार्केटवरून एखादा माणूस आला तर शेजारचा हमखास यायचा आणि म्हणायचा “ काय कोथिंबीर कढीपत्ता आहे का जादा? ”.. जादा कधी नसायचं पण आहे त्यातली चार पानं त्यालाही दिली जायची. उसने, देवाणघेवाण यामुळे वाडा आणि चाळी यांच्या अर्थव्यवस्था बळकट असत. बरं उसने फक्त डाळ पीठ चहा दूध इतकेच मागत नसत… वस्तूरुपी उसनवारी सुद्धा व्हायची…. उदाहरणार्थ… एखाद्याच्या घरी मुलगी बघायचा कार्यक्रम असेल तर चाळीतली वाड्यातली एकमेव खुर्ची, कोणाच्या घरातला चांगला गालिचा, चांगल्या कप बशा, पोह्यासाठी असलेल्या छोट्या डिशेस, असं सगळं तातडीने पुरवलं जायचं. इतकंच काय त्या मुलीसाठी कुणाकडे असलेली एखादी चांगली साडीसुद्धा नेसायला दिली जायची. ही झाली प्रासंगिक उसनवारी…

याशिवाय तातडीची उसनवारी वेगळीच असे. त्यामध्ये एखाद्याचे अचानक रॉकेल संपे आणि स्टोव्ह बंद पडायचा.. मग तुमचा स्टोव्ह देता का अर्धा तास? (किंवा पुढे गॅस सिलेंडरची उसनवारी सुरू झाली.) पाहुणेरावळे घरी आले तर शेजाऱ्याच्या सतरंज्या घेऊन जाणे, चटई आणि पाणी भरण्यासाठी हंडे नेणे, लग्न कार्यामध्ये शेजारपाजारच्या घरातील मोठाली पातेली नेणे, हे आवर्जून होत असे. वाड्यात बंब एका शेजारी एक असे. एखाद्याला घाई असली तर शेजारच्या बंबातले पाणी एक बादली तो घेऊ शकत होता आणि त्यांच्यात तापल्यावर त्यांच्या घरातला माणूस ते पाणी घेत असे.

या उसने देणे घेणे प्रकारामध्ये एखादे आपल्या जिव्हाळ्याचे घर असे आणि ते गरीब असतील तर आम्ही आईला सांगत असू, “ अगं त्या विमलकाकूंना एक आठवाभर पीठ पाहिजे. ” (आठवा हे माप आहे) आई म्हणायची ” नेऊन दे की “.. आम्ही त्या मापात ते पीठ दाबून दाबून भरत असू आणि मग विमलकाकूंना ते पीठ दिले जाई…ज्यामुळे विमलकाकूंकडे जास्तीत जास्त पीठ जावे हा उद्देश.

साखरेचे तसेच.. “अग त्या कांताच्या आईला साखर हवी आहे” आणि “दे” म्हणाली की दोन पेले साखर देऊन आणखीन दोन पेले त्यात घालत असू आणि आईला सांगायचे दोन पेले साखर दिली बरं.. कारण कांताची आईच्या एकट्या राहण्यावर आमचं प्रेम होते..

…. या उसने मागण्याने एकमेकांची गरज लागत असे.. जिव्हाळा वाढत असे.. प्रत्येकाला समोरच्याच्या परिस्थितीचा नेमका अंदाज असायचा. चार वेळा कोणी उसनं मागायला आले म्हणून कोणीही त्यांना असं कधी म्हणलं नाही की ” आले बाबा वाटी घेऊन. ” त्यामुळे मागणाऱ्याला मोकळेपणा वाटायचा. या उसनवारीने सगळ्यांच्या तात्कालीक गरजा भागवल्या. कोणी कोणाला श्रीमंत केलं नाही, पण वेळ मात्र मारून नेली, सारून नेली, आणि तारुनही नेली. एकमेकातला जिव्हाळा वाढवला.. संवाद वाढवला… आपलेपणा वाढवला… जो आज कुठेही दिसत नाही. आज कोणाची कोणाला गरजच वाटत नाही. सगळं ऑनलाईन असल्यामुळे आपण या आपलेपणाच्या सगळ्या लाईन ऑफ करून टाकल्यात… आणि आपण सदैव ऑनलाइन असतो. काही कमी की गेली ऑर्डर… अर्ध्या तासात माणूस हजर…

…. हे अर्थात त्यावेळेला परवडणारंही नव्हतं आणि ती सोयही नव्हती. गरिबांचा- मध्यमवर्गीयांचा खरा मोठा आधार होता उसनवारी. आज असं उसनं मागणारी कुटुंबे आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा आमचे ते दिवस आठवून डोळे भरून येतात. आजच्या फक्त ऐश्वर्यापेक्षा ते अपुरेपण फार सुंदर होतं. एकमेकांना जोडणारं.. एकमेकांशी बांधलं गेलेलं!

त्या वेळा संपल्या, ती गरिबी संपली, त्या गरजाही संपल्या.. पण त्या जिव्हाळ्याचे.. प्रेमाचे ऐश्वर्य मात्र आजही मनामनामध्ये कायम आहे. तीच एक गोष्ट न परत केलेली आहे.

वाचक हो, तुम्हाला आठवते का अशी केलेली उसनवारी? मला आठवते शेजारच्या काकूंना व्हीक्सची डबी आणणं परवडायचं नाही. त्या कधीतरी एखादी डबी आणायच्या आणि मग सगळ्यांना थोडं थोडं विक्स लागेल तसे द्यायचे. पण त्यांना लागेल तेव्हा त्या बोटभर विक्स उसने म्हणून घेऊन जायच्या.

म्हणायच्या.. ” एक बोट विक्स उसने घेतलं गं… “

…. आज या सगळ्या गोष्टीची गंमत वाटते…! हे सगळं आठवलं का.. तर दुधाची पिशवी होती म्हणून गवळ्याला सांगितले ‘आज दूध नको’. दूध तापवले. पिशवी कालची होती.. ते नासले. आता दूध आणणार कोण? आणि उसने मागावं कोणाला? त्यावरून हा सगळा लेखन प्रपंच.

– – बघा आवडते का…..! हो आणि लिहा की आपलाही एखादा अनुभव!!!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ माझी जडणघडण… भाग – ६१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… – भाग – ६१ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

एक महत्वाचा काळ

जळगावात ब्रुक बाॅन्ड कॉलनीत आम्ही जवळजवळ १४ वर्षे राहिलो. आमच्या सहजीवनातली ही १४ वर्ष खूप महत्त्वाची होती. आयुष्यातला तो एक अत्यंत महत्त्वाचा काळ होता. दगदगीचा, खूप धावपळीचा, सुंदर भविष्याचा भक्कम पाया रचण्याचा, पैसे मिळवायचा, साठवायचा, आणि त्याहीपेक्षा मुलींच्या संगोपनाचा.

ज्योतिका नंतर चार वर्षांनी मयुराचा जन्म झाला. एक मोठ्या डोळ्यांचं, डोक्यावर विरळ जाऊळ असलेलं, गुलाबी रंगाचं, गुबगुबीत गोंडस बाळ बघून आम्ही दोघेही हरखून गेलो होतो. तिच्या जन्माच्या वेळेची एक गंमत सांगते. प्रसूती झाल्यानंतर डॉक्टर कणबूरांंनी (त्यावेळचे ठाण्यातले नामांकित स्त्रीरोगतज्ञ) मला कितीतरी वेळ “मुलगा की मुलगी” हे सांगितलंच नाही. नंतर ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, ” पहिली मुलगी आहे ना तुम्हाला? ”

“ हो! ”

“ मग आता काय वाटतं? ”

“डॉक्टर मला अगदी छान वाटतंय. एकच सांगा माझं हे दुसरं कन्यारत्न कसं आहे? सर्व ठीक आहे ना? ”

डॉक्टर कणबूर ज्या पद्धतीने माझ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते त्यावरूनच मी ओळखलं होतं “मला देवानं आणखी एक छान कन्या दिली आहे”. संपूर्ण नऊ महिन्याच्या गर्भारपणात आमच्या दोघांच्याही मनात “आता मुलगाच व्हावा” असा कधीही विचार आला नव्हता पण त्या लेबर रुममध्ये थकलेल्या अवस्थेतही मला, “अजूनही काळ बदललेला नाही. मुलीच्या जन्माचा आनंद सोहळा होत असल्याचाचा अनुभव डॉक्टर कणबुरांनाही अभावानेच आला असेल म्हणून ते असे काठाकाठावरून माझ्याशी बोलत असावेत” असा विचार आला आणि माझे मन नाराज झाले. जेव्हा माझ्या चेहऱ्यावरचं खुलं हास्य, आनंद त्यांनी पाहिला, तेव्हा त्यांनी माझं अभिनंदन केलं.

त्यावेळचा आणखी एक लक्षात राहिलेला क्षण म्हणजे चार वर्षाच्या ज्योतिकाची निरागस भाबडी प्रतिक्रिया. विलास तिला घेऊन भेटायला आला तेव्हा मला अशी हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेली पाहून तिला बिलकुल आवडलं नाही. ती लगेच रडवेल्या सुरात म्हणाली,

“बाबा मम्मीला आपल्याबरोबर घरी घेऊन जाऊया. हिलाही घेउन जाऊया. इथे काय करताहेत या दोघी? ”

तिचे ते चिंतातूर बाळबोल ऐकून आम्हाला दोघांनाही खूपच हसू आलं. पालकत्वाची खरी सुरुवात त्या क्षणापासून सुरू झाल्यासारखे वाटले. आत्तापर्यंतचं पालकत्व हे प्रायोगिक होतं. आता काही अनुभवांचं अॅप्लीकेशन करण्याची वेळ आली आहे असेही वाटलं तेव्हा. आनंदा बरोबरच जबाबदारी वाढल्याची जाणीव झाली.

दोन भिन्न वयाची, प्रकृतीची, स्वभावाची, आवडीनिवडीची मुलं वाढवताना पालकत्व म्हणजे काय याचे विविध धडे शिकायला मिळत होते. खरं म्हणजे बालसंगोपनाची मी भरपूर पुस्तके वाचली होती पण पुस्तक आणि प्रात्यक्षिक यात जमीन आसमानाचा अंतर असावं हे तेव्हाच कळलं. “चूक असेल की बरोबर असेल “पण माझ्या मुलींना वाढवताना नकळतच मी माझी स्वतःची अशी एक चाईल्ड थीअरी निर्माण केली होती. त्यातला पहिला मुख्य मुद्दा होता तो “प्रेमाची समान वाटणी, कुणाच्याही मनात न्यूनगंड न यावा याची बाळगलेली सावधानता, एकीला एक वागणूक तर दुसरीला थोडी झुकती, किंवा ‘ तू मोठी ही लहान” असा भेद निर्माण करणाऱ्या पालकत्वाचा अवलंब चुकूनही करायचा नाही हे मनाशी पक्क ठरवलं होतं. तरीही दोघींच्या प्रतिक्रिया मला कधी कधी गोंधळात टाकायच्या. ज्योतीका नेहमीच शांतपणे माझं ऐकून घ्यायची. मयुराचा बाणा थोडा वेगळा असायचा. ती तिचे मोठे पाणीदार डोळे रोखून माझ्याकडे पहायची. तेव्हा तिने न बोललेलेच मला कळून जायचे. ” असं काय माझं चुकलं? मी नाही भिंतीकडे तोंड करून उभी राहणार मला नाही आवडत ते. ”

दोघींच्या आवडीनिवडी वेगळ्या होत्या. त्यांना हसत खेळत वाढवताना आणि त्या वाढत असताना, त्यांच्यासाठी सुखाची दारं उघडून देताना कधी नियमबद्ध शिस्त तर कधी नियमांना शिथील करून काही निर्णय घेताना आम्हा दोघांची खूप दमछाक व्हायची. शिवाय प्रत्येक वेळी आम्ही दोघं मुलींच्या बाबतीत एकाच रेषेवर असायचो असंही नाही. विलास मुलींच्या बाबतीत अत्यंत हळवा. कित्येक वेळा तर मुलींच्या डोळ्यात अश्रू जमले की याच्याच डोळ्यातून पाणी गळायला लागायचं. (आजही ते तसंच आहे) अशावेळी माझं त्यांच्यावर रागावणं, त्यांचा कसकसून अभ्यास घेणं, करच, केलंच पाहिजे, धआलंच पाहिजे, येईलच. या ‘च ला च” नियम रेषा आणि त्यामुळे नकळत दुखावली जाणारी मुलींची मनं पाहून तो माझ्याच विरोधात जायचा. असं असूनही मुली माझे नियम तोडायच्या नाहीत पण ‘बाबा’ त्यांना जास्त जवळचा वाटायचा. त्याचा मानसिक आधार म्हणजे ‘बाबाच’ होता. त्यांच्या सुखासाठी, भविष्यासाठी, आज त्यांना कळत नाही याचं महत्त्व म्हणून कशाकशासाठी मी झटत होते, ते माझं झटणं हे या हळव्या बापाच्या प्रेमापुढे नगण्य, विनाकारण, नको तेवढं कठोरपणाचं होतं. कोण बरोबर होतं? माझ्यातली तळमळणारी आतुरलेली चिंतातुर ‘आई’ की कुठल्याही परिस्थितीत फूल कोमेजूच न देणारा त्याच्यातला ‘बाबा’ याचे उत्तर मला आजही मिळालेलं नाही. त्यावेळी मला माझं आणि माझ्या पप्पांचं नातं आठवायचं आणि इतिहासाची कशी पुनरावृत्ती होते हे जाणवायचं.

जणू काही कौतुकाचे बोलू कानात साठवण्याचेही ते दिवस होते.

ज्योतिका शिशुवर्गात असताना एका तोंडी परीक्षेत तिला आईचे नाव विचारले तेव्हा तिने उत्तरच दिले नाही. तिचा एक गुण कमी झाला. मी तिला विचारले, ”तू आईचं नाव का नाही सांगितले? ”

मम्मी तुझं नाव बिंबा. ते कसं सांगू? मिस हसली असती ना? ”

घरी मला माहेरच्याच ‘बिंबा’ या नावानेच हाक मारतात. राधिका हे फक्त कागदोपत्री. ज्योतिकाच्या या उत्तराने मला हसू आले आणि मी अचंबितही झाले. मुलं किती खरं बोलतात!

मयुरा तर शब्दरचनेत फारच गंमतीदार होती. आजही आहे.

एकदा आम्ही गणपती विसर्जन बघायला दादर चौपाटीवर गेलो होतो. मयुरासाठी हे पहिलेच सागरदर्शन होते. तो अथांग सागर पाहून ती अगदी प्रतिक्षिप्तपणे चित्कारली, ”बाबा! पाणाss”

खूप पाणी असं अनेकवचनात तिला पाणी म्हणायचं असेल. पण तिचं ते उत्तेजित होऊन ‘पाणा’ म्हणणं आजही कानात रुणझुणतं.

कधी कधी मागे वळून बघताना माझ्या पालकत्वातल्या चुका माझी मीच शोधत राहते. माझ्या हृदय पटलावर मुलींच्या पहिल्या दिवसापासून ते अगदी आज पर्यंतचे त्यांचे हसरे, अचंबित, व्यथित, आनंदी, अमान्यतेतले, विरोधातले चेहरे कोरलेले आहेत आणि हे सारे चेहरे सुप्तपणे माझ्याशी आजही संवाद करतात.

आता कधी मी माझ्या नातीच्या बाबतीत मुलींना काही विरोधात बोलले, तर त्याच उलटून मला म्हणतात, ” मम्मी तूच तर आम्हाला हेच सांगत आलीस ना? ” मुलींच्या बाबतीत एक आणि नातींच्या बाबतीत एक असं का व्हावं? हाही एक गूढ प्रश्नच आहे नाही का? रंग प्रेमाचे निराळे.

पण तो जो काही आयुष्याचा एक लांबलचक टप्पा होता तो मात्र खूप महत्त्वाचा होता हे नक्कीच. सुखाचा, आनंदाचा तर तो होताच पण त्याचबरोबर तणावाचा, दडपणाचा, धाकधुकीचाही होता. एकेका वळणावरचे निर्णय घेताना पुढे पाऊल टाकतानाचा तो काळ धपापवणारा होता. पण १४ वर्षाचा ब्रुक बाॅन्ड कॉलनीतल्या वास्तव्याचा काळ खरोखरच सुंदर आणि आधारभूत होता. तो एक संयुक्त परिवार होता म्हणाना! घराघरात साधारण एकाच वयाची मुलं वाढत होती आणि ती सारीच मुलं एखाद्या कुटुंबातली असावीत तशी एकत्र खेळत, बागडत, शिकत मोठी होत होती. सुचु, बाली, अनु, पंकज, चेतन, केतन, योगेश, पराग, मकु आणि त्यांच्यात माझ्या ज्योतिका मयुरा अतिशय चांगल्या पद्धतीने रमल्या होत्या. त्यांची परिपूर्ण मानसिक वाढही होत होती. कॉलनीत होणारे गणपती, दहीहंडी, रक्षाबंधन, दसरा दिवाळी संक्रांत, होळीसारखे सण त्यांच्यावर परंपरेचे सुसंस्कार घडवत होते. मैत्रीतून, रुसव्याफुगव्यातून, एकमेकांशी भांडणातूनही ही मुलं आपोआपच शेअरिंगही शिकत होती. मुलांना फक्त आई-वडील घडवत नसतात तर अगदी बालपणापासूनच समाजही घडवत असतो. ब्रुक बाॅन्ड कॉलनीच्या निमित्ताने माझ्या मुली नेहमीच एका चांगल्या समाजाला जोडल्या गेल्या होत्या त्यामुळे त्यांचं शरीराबरोबर मनही निरोगी होत होतं. आयुष्यातली केवढी मोठी जमेची बाजू होती ही! त्यावेळी मला माझं स्वतःचं धोबी गल्लीतलं बालपण आठवायचं आणि तशाच प्रकारचे रम्य बालपण माझ्या मुलींनाही मिळाल्याचं सुख मी अनुभवायची.

खाच खळगे, टक्केटोणपे कोणाच्या जीवनात नसतात? टंचाई, उणीव, कमतरता, मनोभंग, फसवणूक, विश्वासघात कधी ना कधी सर्वांच्या वाटेला येत असतात. जीवनातली कधी कधी भेडसावणारी असुरक्षितता, अस्थैर्य, संकट काळ, अपघात, दुखणी, भावनिक वादळं यातून प्रत्येकालाच जावं लागतं. वादळं येतात, वादळ जातात. उरलेला पालापाचोळा ही विरून जातो पण जीवनाचा जमा खर्च मांडताना जेव्हा जमेची बाजू वरचढ असल्याचं लक्षात येतं तेव्हा सारे दुर्भोग आपोआपच विस्मरणात जातात हेच खरं आणि जीवनाच्या जडणघडणीतले हेच मोती असेच चमकत राहतात.

– क्रमशः भाग ६१.

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “जग काय म्हणेल?” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “जग काय म्हणेल?” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

‘जग काय म्हणेल? ‘– – या तीन शब्दांची आपल्याला विलक्षण भीती असते. ह्या जगाला सतत आपण घाबरून जगत असतो.

एखादी जराशी वेगळी कृती करण्यापूर्वी आपण विचार करतो… हे करू का नको?

असं केलं तर जग काय म्हणेल?

आणि हे जग कधी चांगले म्हणत नाही. नेहमी नाकं मुरडत असते, चुका काढत असते, नावं ठेवत असते.

ज्या तथाकथित जगाला आपण भीत असतो ते जग असते तरी कसे? … कुठे आहे हे जग? …. मुख्य म्हणजे ” जग “या शब्दाचा अर्थ तरी काय?

हा जो विश्वाचा अफाट पसारा पसरलेला आहे त्याला जग असे म्हणतात. अनेक देश, गावं, तालुके, प्रांत, गल्ल्या मिळून जे होते ते म्हणजे जग आहे.

मग आपण आपल्या पुरती जर एखादी कृती केली तर ती यापैकी कुणापर्यंत जाते? त्याचा यातल्या कुठल्या गोष्टीवर परिणाम होतो? आपण कधी याचा विचार केलेला नसतो.

जग म्हणजे आपल्याला जे लोक ओळखतात ते लोक.. म्हणजे नातेवाईक, मित्र-मैत्रिणींचा परिवार, व्यवसाय, नोकरी करतो तिथले आणि आपल्या आसपासचे लोकं एवढ छोटस् तर आपल जग असतं.

साधीशी मनाला आवडणारी कृती करताना सुद्धा आपण सावध होतो. आपणच आपल्या मनात बागुलबुवा उभा केलेला असतो. ज्या मुठभर लोकांना आपण जग समजत असतो त्यांचा आपण सतत विचार करत असतो… स्वतःच्याच वागण्यावर निर्बंध घालत असतो. शक्यतो चौकटीत राहायला बघत असतो. ती चौकट मोडायचे धैर्य आपण करत नाही.

…. रस्त्यात गरम खारे दाणे विकणारा माणूस आपण बघतो. त्याचा तो खरपूस वास नाकाला यायला लागतो.. ते दाणे खावेसे वाटतात. तरीपण रस्त्यात खातं खातं गेलं तर लोक काय म्हणतील? या छोट्याशा कृतीसाठी सुद्धा आपण जगाचा विचार करतो.

टपरीवरची भजी खायला जावेसे वाटते पण आपण आपले पाय तिकडे वळवत नाही. कोणी बघितलं तर काय म्हणेल? नावं ठेवली तर…..

माझ्या मैत्रिणीच्या मुलीनी आंतरजातीय विवाह ठरवला. तेव्हा मैत्रीण म्हणाली, “ मुलगा खूप हुशार, प्रेमळ, समंजस आहे, घरचे लोक छान आहेत ”… पण जग काय म्हणेल? … या विचारांच्या धसक्याने ती इतकी अस्वस्थ झाली की तिला मानसोपचार तज्ञांची मदत घ्यावी लागली.

लोकं बोलणार हे तिच्या नवऱ्याने स्वीकारले होते. आणि लोकं बोललेच.. त्यांनी ते मनाला लावून घेतले नाही. त्यामुळे त्यांना त्रास झाला नाही.

काही महिन्यानंतर लोकं तिचा विवाह विसरूनही गेले. मुलगी नवऱ्याबरोबर गेली वीस वर्षे मजेत आहे… म्हणजे बघा…..

ही तर मोठी गोष्ट झाली. साडीपेक्षा पंजाबी ड्रेस सुटसुटीत वाटतो पण ही जगाची भीती माझ्या ओळखीतल्या अजूनही किती जणींना आहे…. एक मैत्रीण मला म्हणाली सुध्दा… ‘नको बाई लोकं काय म्हणतील? ’

यात्रा कंपनीबरोबर एकटीने ट्रीपला कसे जायचे? मोठ्या दुकानातून खरेदी न करता कसे बाहेर पडायचे? या प्रश्नांची मनात भीती असल्याने त्याची उत्तरे नेहमी नकारार्थीच येतात.

‘जाऊदे… मोठ्या दुकानात जाऊ नकोस.. एकटीने ट्रीपला नाही जायचं.. ’ आपलं मन आधीच उत्तर देऊन टाकतं.

हेच जग जरा दृष्टीआड झाले की आपलं आतलं मन उफाळून वर येतं. ट्रीपला गेलो की आपण काडीवालं आईस्क्रीम घेऊन रस्त्यात खात खात चालतो… वर म्हणतो…

” इथं कोण येणार आहे मला बघायला? ”

.. म्हणजे तिथे जे कोणी बघत असतात तेच आपलं जग असते. केवळ त्यांच्या इच्छेखातर आपण आपले मन मारून जगत असतो.

हे जग खरोखरच इतक्या बारीक सारीक गोष्टींचा विचार करून आपल्यावर लक्ष ठेवत असते का?

त्यातूनही समजा जगाने काही म्हटले तर त्यांचे किती ऐकायचे आणि त्याला किती किंमत द्यायची हे आपण ठरवायचं असते.

खूप मोठं जगावेगळं काही करायची आपल्यात हिम्मत नसते. तशी आपण करतही नाही. पण अगदी लहान सहान गोष्टी करायला का घाबरायचे?

साधी गोष्ट म्हणजे हॉटेलात हातानी डोसा खायला सुद्धा… ” आसपासचे लोक काय म्हणतील? ”

यासाठी आपण घाबरतो. काटे चमच्यांनी कसरत करत डोसा खातो. त्यापेक्षा गरम कुरकुरीत डोसा हातानी मस्त खाऊन घ्यायचा…..

आपण असे का वागलो.. याचा दरवेळी प्रत्येकाला भेटून आपण खुलासा करू शकत नाही. सांगू शकत नाही. शंकेचं निरसन करू शकत नाही. मग या लोकांच्या म्हणण्याला का घाबरायचे?

आपण आपल्या मनाला पटेल योग्य वाटेल तो निर्णय घ्यावा.

कारण त्यावेळी त्या त्या परिस्थितीचा विचार करून आपण आपल्या विवेक बुद्धीने वागत असतो.

मग यात लोकांचा संबंध येतोच कुठे?

आपण प्रत्येकाचे समाधान करू शकणार नाही हे आपण पक्के लक्षात ठेवायचे असते.

काही लोक मात्र या जगाची पर्वा न करता जगत असतात आपण त्यांना लांबून बघतो. घरी बसून त्यांच कौतुक करतो.

“यांना कसं हे जमतं? … ”

असं म्हणतो आणि सोडून देतो. कारण तो आपला मार्ग नाही हे आपण पक्के ठरवलेले असते.

हे लोकं आपल्यापेक्षा वेगळे.. निराळे नसतात. पण मनाने खंबीर, कणखर ठाम, सुदृढ विचारांचे असतात.

यांच्या कृतीबद्दल कोणी काही विचारलं तर उत्तर द्यायची त्यांची तयारी असते. त्यामुळे अशा लोकांच्या वाटेला सहसा कोणी जात नाही.

माझ्या ओळखीच्या एका काकांनी मला सांगितले की कोणी गरज नसताना फार चौकशी करायला लागलं की मी त्यांना सरळ म्हणतो,

” तुम्ही फारच प्रश्न विचारता बुवा” मग समोरचा गप्प बसतो…

.. काकांचे हे मला फारच आवडले..

गाढवाला घेऊन जाणाऱ्या वडील आणि मुलाची गोष्ट आपण लहानपणापासून ऐकलेली असते. गोष्टीतला मतीतार्थ आपल्याला माहित असतो. यावरून कुठला बोध घ्यायचा हे पण आपल्याला कळते.

पण आपण तो घेतो का?

” ऐकावे जनाचे करावे मनाचे ” हेही आपल्याला माहीत आहे पण त्याप्रमाणे आपण कृती करतो का?

या काल्पनिक जगाच जोखड मनावरून काढून टाकून मुक्तपणे जगावं आणि जीवनाचा आनंद घ्यावा. तुमच्या अंतर्मनाला योग्य वाटेल असं वागुन तर बघा…. हळुहळु त्याची सवय होईल…

आपलं मन आपणच कणखर बनवायचं असतं.. हे लक्षात ठेवायचं … मगच आपल्याला या तथाकथित जगाची भीती वाटत नाही.

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ दिवाळी पहाट ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

??

☆ दिवाळी पहाट ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

मंडळी, नमस्कार. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

आज मंगळवार. दिवाळी तर सुरू झालीय. कदाचित सध्या बऱ्याच ठिकाणी काही दिवस ‘दिवाळी पहाट’ चे आयोजन असेल. आजपर्यंत टीव्हीवर लाईव्ह/ किंवा यू ट्यूब्जवर पाहिलेल्या कार्यक्रमातून एक गोष्ट लक्षात आली ती अशी — – 

भक्ती गीते / अभंग हा दिवाळी पहाट कार्यक्रमाचा प्रमुख गाभा असतो. आता कुठलाही अभंग घ्या

उदा. ‘ अवघा रंग एक झाला ‘..

आता हे गाणे रेडिओ, टीव्ही किंवा कुठल्याही कार्यक्रमात गायक/ गायिका सादर करताना पहिल्या ओळीपासून (धृ) म्हणजे ‘ अवघा रंग एक झाला ‘ पासून गायला सुरवात करतात.

…. पण, जिथे गायक / गायिका ‘रंगी रंगला श्रीरंग ‘ पासून सुरवात करुन, मुळ २-४ आलाप असताना वेगवेगळे ५-६ आलाप घेऊन ३ मिनीटाचे गाणे १० मिनिटांनी संपवतात तो कार्यक्रम म्हणजे – – 

” दिवाळी पहाट “

(निवेदन चालू असताना ना तिकडे गायक – वादकांचे लक्ष असते ना रसिकांचे, हा वेगळाच मुद्दा)

अशी अनेक उदाहरणे पुढील काही दिवसात ऐकायला/ पहायला मिळतील.

अशा दिवाळी पहाट/ पाडवा पहाटने तुमची दिवाळी खूप मस्त जावो याच मनापासून शुभेच्छा.

© श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ Memory? नाही.. नाही… “आठवण”!!!  – भाग – २ ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ Memory? नाही.. नाही… “आठवण”!!!  – भाग – २ डॉ. माधुरी जोशी 

(अन् एक दिवस फोनच आला शाश्वती दीदीचा गायनसाथ करण्यासाठी, महाराजजींना, सवाईमधे….. केवढं भाग्य, गौरव… दूरवरून रंगमंचावर ते मार्दवयुक्त तरी ताकदीचं नृत्य पहात होते… आता सूरसंगत करणारी उजवी बाजू झाले. तो सवाई महोत्सव अविस्मरणीय!!!!) 

इथून पुढे – – 

ज्या दिवशी रात्री गायचं होतं त्याच दिवशी सकाळी पहिली भेट झाली.. काय गायचं हे कळायची, शिकायची, ते स्वर आपले करायची…. महाराज जी उत्तम गात असत… एकेक रचना उलगडायला लागली… माझ्या रितीनुसार आधी टेक्स्ट, मग चाल, नोटेशन, रिपीटीशन मग ती सगळ्या अंगांनी फुलवायची… असा आराखडा… लहान वॉकमन होता सोबत… कारण आजचं रचनेची ओळख, आजचं रचना मनात तोंडात दृढ करणं आणि आजचं गाणं ते ही सवाईत… भयंकर चॅलेंज होतं…. खूप दडपण आलं… यापूर्वी बेबीताईंकडे ते शांत शिकलेलं, मुरलेलं असे… ओळखीचं होई.. आत्मविश्वास वाटे… इथे रचना स्वतःची वगैरे व्हायला वेळंच नव्हता… त्यातही शिकवताना महाराजजींची गायनातही उपज सुंदर खरी पण दडपण वाढवणारी.. ‌बापरे हे सगळं लक्षात राहील? सगळं वूळेवर आठवेल? ते तुडुंब गात होते. स्वरात रंगत होते.. आणि मी गोंधळत होते. मन अस्वस्थ… इतक्या स्वरावली ऐकून डोकं भंजाळलेलं…. काय आठवेल? होईल ना नीट?

 सकाळी साडेनऊला सुरु झालेलं हे सत्र दोन अडीचला संपलं. एकूण चार रचना होत्या. प्रॅक्टीस संपलं. रिक्षानं घरी गेले. परत आठपर्यंत पोहोचायचे होतं कार्यक्रमासाठी… तो वॉकमन, ते महाराजजींचे स्वर, नवीन अनोळखी रचना, मांडणी…. फक्त ओळख होण्यात उरलेले तास संपले…. मनावर प्रचंड ताण, दिवसभराची दगदग… पोहोचले तरी जागेवर… वेळेत आणि ग्रीन रूममधे मनासारखा आवाजंच लागेना… महाराज जी म्हणाले, “टेंशन मत लो! तुम अच्छा गाती हो! बहुत सुंदर होने वाला है… आशीर्वाद…!! “त्या शब्दांनी एकदम रिलॅक्स झाले. आणि खरंच पहिली मालकंस मधली वंदना अत्यंत सुरेल मधुर जादू व्हावी तशी मांडवभर पसरली, तरंगली… मी थक्क… काय होईल ही भितीची भावनाच संपली… अक्षरशःरंगून गायले. दिवसभर ऐकलेल्या महाराजजींच्या स्वररचना सामोऱ्या झाल्या… चित्तात रमायला लागल्या.. सगळं आठवायलाच लागलं. इतकंच नाही तर काही ऊपजही झाली… सगळं सुखद, सुरीलं, सुंदर…. नृत्य करतांना उजव्या बाजुला त्यांची दाद मिळाली.. सारं अनमोल…. शिकलेलं गायलेलं “माझं” झालं होतं…. त्या दिवसाची आठवण कधीच मिटली नाही… मिटणारही नाही… एका महान नृत्य कलाकारांची संगीतावरची हुकूमत, शिकवण्याची हातोटी, प्रचंड उपज पाहून थक्क झाले होते. अलीकडे बिंदादीन महाराजांवर पुस्तक लिहीतांना त्यांना भेटत राहिले. कालकाबिंदा घराण्यावर कुणी काही लिहीतंय या भावनेनीच ते प्रसन्न झाले. त्यांच्या आजोबांच्या मायेनं, आदरानं, गौरवानं अनेक आठवणी, किस्से, रचना त्यांचे राग किती तरी भरभरून बोलले… खरंच ते म्हणाले तसं, “बरगत का पेड कभी खत्म नहीं होता! “…. मी पहात होते पिढ्यान् पिढ्या चालत आलेला कथकचा वारसा आणि कथकची कसलीही परंपरा नसणाऱ्या बेबीताईंचा तो रियाज… दोन्ही कथकचे कलाकार माझ्या पत्रिकेतल्या भाग्याने आठवणीत कायमचे घर करुन राहिले आहेत… “माझ्या आठवणींची” श्रीमंती होऊन….

कधी कधी मी देवाच्या दैवाच्या देणगीनं आश्चर्यचकित होते. एका साधारण घरातल्या मुलीला हे भविष्यात मिळेल असं म्हणणं खोटं वाटलं असतं तेव्हा… पिंपळखरे सर, बेबीताई, महाराज जी.. असाच एक देखणा योग… असा परीसस्पर्श….

पं. जितेंद्र अभिषेकींसारखे प्रचंड अभ्यासू, व्यासंगी, ज्ञानी, बहुआयामी श्रेष्ठ कलावंत उशीरा पण अनमोल असे “गुरू” लाभले…. केवळ नाट्यसंगीत एवढंच श्रेयच नाहीच बुवांचं… तर अनेक अनवट राग आपल्या सहज ओळखीचे केले त्यांनी आणि ओळखीचे राग अनोखे सजवले ही ती मौल्यवान देणगी… किती बंदिशी मिळवल्या, बांधल्या, डोळस शिष्यवर्ग घडवला, मुक्त हस्तानी विद्या दिली… निरपेक्षपणे…. अन् एकीकडे भावगीतं, कविता, अभंग, पदं, ठुमऱ्या, निर्गुणी, तराणे, सरगम, चतुरंग हे पण मनामनात रुजवलं… किती ताल, किती लयकारी… आणि हे सगळं घडतांना शब्द, भावार्थ, साहित्य साऱ्याला भावनेच्या ओलाव्याचं अस्तर… इतक्या मिती असणारा कलावंत खरंच दुर्मिळ.. एकाचवेळी इतकं बहुविध कर्तुत्व…. ८०च्या आसपास बुवा पुण्यात आले आणि माझा शिकण्याचा मार्ग मिळाला. नोकरी, लहान मुलं, घरात वडीलधारी हे सांभाळूनच करायचं होतं गाणं. मग अनेक राग, वेगळ्याच मात्रांवरून ऊठान असणाऱ्या बंदिशी, आपण चुकणार असं मनात येईपर्यंत अलगद समेवर आणून सोडणाऱ्या अशा तालाशी घट्ट…. तरी भाव जपणारी रचना.. असं वाटे हे यांनी कधी मिळवलं? जपलं? वाढवलं? फुलवलं? सारं बुद्धीवादी तरी लडीवाळ.. न ऐकले देखले राग सुंदर सजवत… ते मांडायचे कसे? कोणत्या फ्रेजेस? का? टाळायचं काय? राग रूप शुद्ध कसं ठेवायचं? चुकलं तर रस्ता कसा बदलायचा? फार कमी बोलणं तरी गायकीतून सगळं सांगत. सारा बुद्धीचा वारसा भेटत राही…. या साऱ्यातून मी काही मिळवत होते. घडंत होते बदलंत होते. ते सुगम संगीत शिकवत नसत… ते कॅसेटवर पहा म्हणायचे. तरी मी विनंती करून “विष्णुमय जग”शिकवा म्हंटलं. तो अभंग चारूकेशी रागात… म्हणून जरा स्वर गुणगुणते… बुवा म्हणाले, “चारूकेशी नाही तुकाराम महाराज काय सांगतात ते चारुकेशीतून गा” केवढी शब्दांची महती!! गायकीचं मर्म!! एकदम लख्ख दर्शनंच…. तोच धागा ख्याल गातांना, बंदिशीतही…. खरंच किती सुंदर तत्व…. माझं भावपूर्णतेशी नातं होतंच… आता ते परी पूर्ण झालं.. अशा भावपूर्ण, लयदार, सुरिल्या आठवणींनी “माझा” खजिना अनमोल झाला पुन्हा!!!

या साऱ्या भावपूर्णतेला उत्तरेच्या मातीचा, लोकसंगीताचा, ठुमरी दादऱ्याचा गंध लाभला पंडिता शोभा गुर्टुंकडून शिकतांना.. माझी नोकरी… त्या मुंबईला… मग दर रविवारी सिंहगडनी दादर.. वरळी… शिकणं झालं की परत दादर पुणं…. पण साडे अकरा ते दीड फक्त मी आणि त्यांचे स्वर… शिकवणं… पहाटे जातांना स्वरांची ओढ… परततांना नवीन स्वरांची संगत… ती गर्दी, भांडणं, विक्रेते, कोलाहल… सगळ्या पल्याड ते स्वर नेत. तो मधाळ ताकदीचा स्वर… ते भक्ती रसात चिंब “म्हारो प्रणाम”, रंगपंचमीच्या रंगात, मोरीत नटलेले “केसरीया अंगिया”, “रंगी सारी गुलाबी”… तर विरह रसातली “पतझड. “.. “सैंय्या निकस गये” आर्त सिंध भैरवी… किती काय काय त्यांच्यापाशी… प्रचंड… नित्य नवं… प्रत्येकाचं आपलं रूप रंग भाव रस… गातांना रागावरची पकड आणि नजाकत… सहज राग बदलायची हुकूमत… तालाच्या चौकटीतच पण तरिही मोकळं गाणं… स्वरवलयं सहज समेवर… सारं जसं काही श्वासात, रक्तात भिनलेलं.. सहज… प्रयास नाही फक्त आनंद उधळणं!! आवाजाला सुंदर वजन, गोलाई तरी खटके, मुरक्या, मिंड, हरकतींची पखरण

खरंच मी तो अनुभव घेतांना हरकून जाई…..

तो जुलै महिना होता. रविवारी सकाळपासून पाऊस लागला होता. जायचय तर मुंबईला.. तो मुंबईतला पाऊस… जावं की नाही? ते स्वर सतत साद घालत होते. तशीच धाडस करुन निघाले. नशीबानं पावसाचा जोर जरा ओसरला होता. पडत होता पण सुसह्य.. त्या दिवशी त्यांचा काय मूड होता काय जाणे? एकदम तोडीचे स्वर पसरले… मी खूषंच… कारण ठुमरी सम्राज्ञीकडून इतका आवडता राग…. न मागता… त्यांनी द्रुत एकतालातला तराणा सांगितला.. तबला नव्हता पण एकतालानी हात सोडला नव्हता आणि एक त्रितालातली बंदिश…. मला तरी ते दोन्ही नवीन होतं.. मी तोडीच्या स्वरात चिंब आणि तो तोडी रिमझिम पावसात… त्या एकदम थांबल्या गातांना… म्हणाल्या, “पाऊस ऐक… ऐक त्याचा स्वर, लय… ते शब्दही त्या दिवशीच्या तोडी सारखाच खोल आनंद देऊन गेले.. ‌निसर्ग आणि स्वर… आगळं दर्शन.. आजही ते शब्द आणि तोडीत भिजलेला पाऊस तसाच आहे आठवणीत आणि…..

डोळ्यात पाणी कृतज्ञतेचं देव, दैव, हे गुरूजन साऱ्यांसाठी… दरवेळी नव्या टप्प्यावर, त्याच स्वर, लय, भाव रस तत्वांची नव्यानं ओळख देत राहिले… साऱ्यांची ऋणी.. अखेरच्या श्वासापर्यंत……

एक ओळ आठवली. ‌‌

“सूर बिना सब शून्य

गुरू बिना सुर अंधा “

खरंच एकाच आयुष्यातले सारे सुरेल रस्ते.. ‌प्रत्येक गुरूंनी फुलवले… एकटीला हे असं दान मिळेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं… स्वर, लय, शब्द, भाव, राग, रचना, बंदिशींची सप्तरंगी इंद्रधनुष्य आजही मनात रंग उधळतात…. आठवणींची तोरणं सजवतात…. मग आठवणींची कुपी डोळस सुरांनी भरून वाहते… त्या साऱ्या गुरूजनांच्या, सुरेल रस्त्यांची, भावपूर्ण अस्तराची…. “आठवण”. सदैव मनात स्वर भरते.. कारण खरं आहे.. “गुरू बिन सूर अंधा”

देवा… दैवा आणि गुरूजनांनो

धन्यवाद या सुरेल आठवणीसाठी!!!

– समाप्त –  

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “झटपट किल्ला – –” ☆ सुश्री शीला पतकी ☆

सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “झटपट किल्ला – – “ ☆ सुश्री शीला पतकी 

चला किल्ला बनवूया अशा स्वरूपाचा एक लेख माझ्या मैत्रिणीचा माझ्या व्हाट्सअप वर आला खूप सुंदर लेख आहे सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि खरंच जाणवलं तेव्हा किती खटाटोप करावा लागत होता.. माती कुठून तरी, विटा कुणाला तरी विचारून किंवा चोरून पळवून आणणे, अजून काही कुठे मटेरियल मिळते का ते पाहणे, पुठ्ठे साड्यांच्या दुकानाच्या तिथे जाऊन त्यांनी टाकून दिलेले पुठ्ठ्याचे कागद घेऊन येणे, हे सगळे प्रकार आम्ही करत होतो. मग ते पुठे कंगोऱ्यात कंगोऱ्यात कापायचे म्हणजे त्या किल्ल्याची तटबंदी.. त्याच्यावरचे ते कंगोरे.. मग काळा रंग लावायचा…. हे आणि असं खूप करायचं!

मला स्वतःला किल्ले बनवायची खूप हौस. मी शाळेत असताना म्हणजे शिक्षिका असताना शाळेच्या शेवटच्या दिवसानंतर माझ्या संस्थेतल्या बालवाडीच्या मुलांसाठी आम्ही किल्ला बनवत असू. त्याच्यासाठी असे मटेरियल गोळा करायचे, नंतर ते सगळं काढायचं. विटा जागेवर लावायच्या, दगड कुठेतरी टाकून यायचे.. खूपच उपद्व्याप व्हायचा.

मग मध्यंतरी मी एक बातमी वाचली की आमच्या सोलापूरपासून जवळ असलेल्या अणदूर या गावच्या एक महिला.. मला तर त्यांचे नाव स्मरत नाही, त्यांनी पुण्यामध्ये किल्ल्यांचे प्रदर्शन भरवले होते. मी त्यांचा पत्ता काढून त्यांची भेट घेतली आणि त्या झटपट किल्ला कसा बनवतात ते शिकवत होत्या.. त्यांचा दोन दिवसाचा वर्ग मी माझ्या संस्थेमध्ये ठेवला. एक दिवस शंखाकृती आकाश कंदील बनवणे, आणि एक दिवस किल्ला बनवणे. आश्चर्य म्हणजे त्यांनी दोन ते अडीच तासात सुंदर किल्ला तयार केला दगड विटा विरहित व त्यांनी केलं काय – – तर तुमच्या घरात असलेले डबे डुबे, लाकडं, झाडाच्या फांट्या, मोडलेल्या कुंड्या, असं काहीही कसंही पसरवा वेडे वाकडे. त्यानंतर एका बादलीत माती घालून अर्धी बादली चिखलाचा राडा तयार केला आणि त्याच्यामध्ये घरातील टाकाऊ फडके वगैरे बुडवून कापडाचे तुकडे, फरशी पुसण्याचे तुकडे, हे सगळं मटेरियल बुडवून घेतलं आणि त्या सगळ्या वेड्यावाकड्या अरेंज केलेल्या भागांवरती ते अंथरून टाकलं म्हणजे तो भाग सगळा त्याच्यामुळे झाकून जाईल असा टाकला. त्यानंतर सुताराच्या दुकानातून लाकडाचा भुसा आणला होता त्याला काची हिरवा रंग दिला तर त्याला तो थोडा हडकू दिला होता.. तो सगळ्या त्या कापडांवरती पसरून टाकला. मधून मधून थोडीशी रांगोळी पसरवली आणि कमाल झाली… सगळा परिसर जणू काही झाडी डोंगर यांनी व्यापला आहे असा दिसायला लागला. मग त्यांनी पुठ्ठ्यावर कापलेले आणि किल्ल्याच्या भिंतीसारखे चौकोनी चिरे असलेले पुठ्ठ्यांचे रंगवलेले तुकडे काढले आणि ते मातीत कडेने रोवले.. किल्ल्याला तटबंदी तयार झाली. पुठ्ठ्याचा एक दरवाजाही त्यांनी कापून आणला होता त्याला थोडासा चिखल फासला आणि तो मातीत रोवला. त्यानंतर सोललेल्या मक्याच्या कणसाचे बुडखे हिरव्या काची रंगात बुडवून मधून मधून ते रोवून टाकले. वाळक्या झाडाच्या काही फांट्या मध्ये मध्ये रोवून टाकल्या. खिडकीच्या जुन्या तुटलेल्या जाळ्या कापून त्याच्या शिड्या बनवल्या आणि त्या शिड्या खंदकामध्ये टाकून दिल्या आणि रस्ता तयार केला. वेगवेगळ्या ठिकाणच्या तटबंदी, शीड्यांचे पूल, नारळाच्या करवंट्या वापरून केलेली गोड्या पाण्याची तळी, प्लास्टिकच्या खाली निळ्या रंगाची रांगोळी टाकून प्लास्टिक वर पांढऱ्या रंगाची रांगोळी टाकून खंदकामधील पाण्याचा आभास…… बघता बघता तासाभरात किल्ला तयार झाला. किल्ल्याच्या अगदी वरच्या भागात विरळ झाडे दाखवण्यासाठी त्याने जोंधळ्याची रिकामी धाटे वापरली.. अर्थात त्याला हिरव्या काची रंगात बुचकळले होते. वरच्या बाजूला चौथरा म्हणून एक पाट बसवला. त्याला खाली राहिलेला जरासा घट्ट चिखलाने माखून घेतले. शिवाजी महाराजांचे आसन आणि त्यावर विराजमान झालेले छत्रपती, त्यांच्या पाठीमागे कागदाने बनवलेला भगवा झेंडा चढवला गेला. बुरुजांवर आणि गडांवर जागोजागी मावळे सज्ज झाले.

….. बघता बघता चार-पाच फुटाचा मोठा किल्ला सहज तयार झाला… मग पुढील डेकोरेशन… तुम्हाला किती करायचे तेवढे करा! खंदकाच्या पाण्यात नावा सोडा, शिड्यांवर चढणारे मावळे लटकवा, छोट्या छोट्या खेळण्याची श्वापदे मध्ये रानात भटकू द्या … बाकी सगळं तुमच्या कल्पनाशक्तीवर अवलंबून आहे.

तासाभरात फारशा चिखल माती दगड धोंडे याशिवाय तयार झालेला तो किल्ला मुलांना खूप आवडला. हे होईपर्यंत संध्याकाळ झालीच होती. त्याच्यावर लाईटच्या माळा सोडण्यात आल्या, पणत्या लावल्या, बाजूच्या परिसराची थोडी साफसफाई केली. मग मुलांना थोडा खाऊ पण दिला.

इथं पावतो चांगलाच काळोख झाला होता. हिरव्या रानामध्ये रांगोळीच्या पांढऱ्या वाटा चमकून दिसत होत्या. त्या पणत्या.. त्याचा प्रकाश आणि प्रकाश माळांची उघड झाप किल्ल्याचे देखणे पण वाढवत होती. झटपट किल्ल्याकडे पाहून मुलं खुश झाली आणि सगळ्यांनी एक दणदणीत आरोळी ठोकली ….

छत्रपती शिवाजी महाराज की जय 

तुळजाभवानी माता की जय

मुलांच्या त्या आरोळीने अंगावर सरसरून काटा आला… काय जादू आहे.. छत्रपती शिवाजी महाराज हे नुसते नाव नाही.. हा ‘स्वराज्याचा मंत्र’ आहे … तो आम्हाला सतत फक्त प्रेरणा देत राहणार आहे हे मात्र खरे……!

मग काय मंडळी आवडली का झटपट किल्ल्याची आयडिया? मग करून टाका घरी एक मस्तपैकी किल्ला … संध्याकाळपर्यंत तयार……!

शुभ दिपावली!!!

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ उत्सव म्हणजे … ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ उत्सव म्हणजे … ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

“उत्सव म्हणजे एकत्र येणे, उत्साह, आनंद घेणे व देणे दोन्ही. “

काल ताई कडे गेले होते. नुकताच नवरात्रीचा सण झाला होता. म्हंटल ताईला भेटून यावं. ताईला भेटल्यावर एक वेगळीच उर्जा मिळते. आयुष्याचे गणित किती सोपं आहे, हे कळत. काही तरी नवीन शिकायला मिळतं. मी ताईला नेहमी गमतीत म्हणतेही, •••• अग !! सुखी, आनंदी आयुष्य कसं जगायचं? ?  याचे क्लासेस का घेत नाही तू? ?  किती तरी जणांना मदत होईल. आज लोकांजवळ सर्व आहे. परंतु आयुष्यात कशाला, केंव्हा महत्व द्यायचे? ? ?  हेच खूप लोकांना समजत नाही. सुखी सर्वांनाच रहायचे आहे, पण नेमकं सुख कशात आहे? ?  हे कळत नाही. नोकरी, पैसा, नातेवाईक, संबंध, सर्वच आवश्यक.. तरी केंव्हा?  कुठे?  कशासाठी वेळ द्यायचा, हे गणित ज्याला कळते, तो आयुष्य सरळ सोप्या पद्धतीने, आनंदाने सहज जगू शकतो.? ?  हे गणित ताई कडून शिकावे. ••••

ताईचे घर म्हणजे जोशी परिवार उदाहरण देण्यासारखा परिवार. चार भाऊ, दोन बहिणी. आता तर प्रत्येकाकडे सुना, जावई, नातवंडे यांची भर पडली आहे. घरी सर्व सणवार आहेत. प्रत्येकाने हौशी ने आपापल्या घरी एकेक सण घेतला. सर्वांनी तो सण साजरा करायला यायचेच. असा एक अलिखित नियमच आहे त्यांच्या कडे.. असे सर्व घरी एकत्र जमले की तो आकडा वीस पंचवीस सहज होतो. सर्व एकत्र येतात तेंव्हा घर लहान आहे की मोठे हा प्रश्न उद्भवतच नाही. मिडिल क्लास फॅमिली मधे सहजतेने सामावून घेणे. हा एक मोठा गुण असतो. पण तो सर्वांमध्ये दिसतोच असंही म्हणता येणार नाही. म्हणून हे विशेष वाटत. •••

घरातले जेष्ठ आता रिटायर्ड आहेत. नवीन पिढी चांगली शिकलेली व चांगल्या नोकऱ्या करणारी आहे. मुली, सुना जावई म्हंटल तर आपापल्या क्षेत्रात उत्तम यश मिळवून काम करत आहेत. ••••

एकत्र जमले की कोण कोणाचा मुलगा -जावई, सुना -मुली हे नवीन माणसाला कळणार सुद्धा नाही. ओळखताच येणार नाही. ••••

घरच्या जेष्ठांनी काही प्रथा विचारपूर्वक, दूरदृष्टी ठेवून सुरवातीपासून लक्षपूर्वक पाळल्या. व त्या चालू ठेवल्या. वर्षातून तीन पिढ्या चार दिवस तरी एकत्र येतात. मजेत वेळ घालवतात. ••••

ताई कडची एक पध्दत मला खूप आवडते. सर्व मिळुन मिसळून काम करतात. सणवार व्यवस्थित, जास्त अवडंबर न करता साजरे करतात. सर्व कामांमध्ये पुरुषांचा बरोबरीने सहभाग असतो. ••••

मुलांची तर खूप मजा असते. एखादा काका सर्वांसाठी आइस्क्रिम आणतो, तर एखादा त्यांच्या बरोबरीने मस्ती करतो. आजी गोष्ट सांगते. तर आजोबा पार्क मध्ये खेळायला नेतात. ••••

ताईचे म्हणणे बरोबर आहे. आता प्रत्येक परीवारात बहुतेक एकच मूल असल्याने मुलांना जवळचे नातेवाईक, भाऊ बहिण यांचा सहवास असणे गरजेचे आहे. भावाबहिणींचा आधार असला पाहिजे. त्यांच्या मध्ये आपुलकी निर्माण व्हायला त्यांना एकत्र येणे गरजेचे आहे. वर्षातुन तीन चारदा तरी आम्ही सणाच्या निमित्ताने एकत्र येतो. ••••

काही अलिखित नियम पाळतो. असं नाही की सर्वांना सर्वांचे सगळेच खूप पटते. वेगवेगळे विचार असतातच तसे सर्व स्वतंत्रच राहतात.

म्हणतात ना, •••••

” रिश्तों को जोड़े रखने के लिए कभी अंधा, कभी गुंगा, कभी बहरा बनाना पड़ता हैं ।”•••

हे दोन चार दिवस आम्ही सर्व एकत्र मजेत राहतो. सुना मुलींमध्ये काही ही फरक करत नाही. ‘young generation’ एकत्र बसून मनसोक्त गप्पा मारतात. त्यांच्या बिझी लाइफ मध्ये थोडा निवांत वेळ मिळतो त्यांना. आपापसात गप्पा होतात. एकमेकांचे अनुभव शेअर करतात त्यामुळे मन हलकं होतं. बऱेच प्रश्न सहज सुटतात. एकमेकांचा आधार वाटतो. माहेरपण enjoy करून सर्व मुले ताजेतवाने होऊन पुन्हा आपल्याला कामाला लागतात. ••••

सणांचे निमित्त असते ग. !!!

‘एक पंथ दो काज’ ••••

उत्सव उत्साहात साजरा करायची जिम्मेदारी आपली असते. नाही तर असे कितीतरी सण येतात आणि जातात. सर्व एकत्र आले की एकमेकांबद्दल आपुलकी वाटते. भेटीची ओढ असणे आवश्यक आहे. भेटीत दडपण नसावं. उत्साह, आनंद असावा. मनातलं सहज, वेळेवर बोलायचा chance मिळतो म्हणजे मनात साठत नाही. बाहेरच्या लोकांचा आधार शोधण्यापेक्षा घरच्यांचा आधार केंव्हा ही चांगला नाही का? ?  माझ्या पाठीशी कोणी आहे ही भावना खूप आधार देणारी आहे. एकमेकांच्या संपर्कात राहिल्यास हे सहज घडते. आपण जेष्ठ अजून काय करू शकतो.? ? ?  ही अशी मदत करता आली, तर ती करायची. आपलाही वेळ छान जातो. ••••

झुकलेल्या मानेने मोबाईल वर अनेक अनोळखी लोकांशी आपण नातं जोडतो. तर मग खरोखरच्या नात्यांमध्ये मान झुकवायला काय हरकत आहे. उत्तम वेळेची वाट बघायची नसते. हातात असणाऱ्या वेळेला उत्तम बनवायचे असते. वर्तमान छान जगून घ्यायचे. ••••

सणांचे रितीरिवाज तर व्यवस्थित करतोच. त्याहीपेक्षा सर्वांना एकत्र बांधून ठेवणे, जास्त महत्वाचे. ही घरच्या ज्येष्ठांची जबाबदारी आहे. प्रत्येकाला मान दिला, सर्वांच्या छोट्या मोठ्या आवडीनुसार लक्ष दिले, तर प्रत्येक जण आनंदात असतो. ••••

देवीची आराधना करायची. मग घरच्या मुली सुनांच्या रूपात असणाऱ्या देवींना आनंदी ठेवायलाच हवे. आता बघ ना, •••• आपटे, कुलकर्णी, पाटील, आणि अग्रवाल, मिश्रा या घरच्या मुली जोश्यांच्या घरी आल्या आहेत. त्यांचा मान ठेवायलाच हवा. ••••

मधून मधून असे एकत्र येणे म्हणजे मनाला शिस्त लावणेच असते. लहान मुलं घरात नकळत किती तरी गोष्टी सहज शिकतात. ••••घरचे सणवार ही कळतात. मुलं आई बाबा सर्वांना काम करताना बघतात. काही गोष्टी कृतीतून शिकवायच्या असतात•••

काल नेहाने मुलांना छान गोष्ट सांगितली. देवीचे नवरात्र या विषयावर देवी म्हणजे स्त्री. तिचे महत्व, तिचा आदर, तिची शक्ती, पराक्रम, सहनशीलता, त्याग, हिम्मत, बुध्दीमत्ता, अशा अनेक गुणांचे छान वर्णन केले. आजच्या संदर्भात एका स्त्री बरोबर कसे वागायचे? ? ?  मग ती कोणीही असो आई, बहिण, मैत्रीण, घरी कामाला येणाऱ्या मावशी, सहप्रवासी किंवा ऑफिसमध्ये तुमच्या बरोबर काम करणारी स्त्री असेल. तिने छान समजावून सांगितले. ••••

मोठ्यांनी मोठ्यांसारखे वागताना, नवीन पिढी ला आपल्या बरोबर घेऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक करणे. एकमेकांचा मान ठेवणे. ज्याला जे जमतं ते करू देणे. तुलना न करणे. हे म्हणणं सोपं आहे ग. पण ते प्रत्येकाला जमतच असं नाही. पण असं वागायचं ठरवलं तर प्रत्येक जण तसा प्रयत्नही करतो. आज ही काळाची गरज आहे. •••••

म्हणतात ना, •••••

“माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात समाधान व सुख मिळण्यासाठी आपापसातील प्रेम व आपल्या माणसांची साथ असणे गरजेचे असते. नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल तर ती तुटत नाही. “

“मनुष्य की संपत्ती न धन है, न दौलत.

उसकी संपत्ती तो उसका हसता हुआ परिवार हैं। “

“उत्सव म्हणजे एकत्र येणे, उत्साह, आनंद घेणे व देणे दोन्ही. “

© सुश्री संध्या बेडेकर 

वारजे, पुणे. 

7507340231

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ Memory? नाही.. नाही… “आठवण”!!!  – भाग – १ ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

? मनमंजुषेतून ?

☆ Memory? नाही.. नाही… “आठवण”!!!  – भाग – १ डॉ. माधुरी जोशी 

काहींना वाटेल.. हे काय?  सेम तर शब्द आहेत. फक्त भाषा वेगळ्या वेगळ्या….. पण मला नाही तसं वाटंत.. इतर भाषांमधल्या उत्तम साहित्याचे अनुवाद आपण वाचतो… पण ते “भाषांतर”नाही.. “रूपांतर”हवं… प्रत्येक भाषेचा लहेजा, सांगणं वेगळं असतं… ते केवळ पर्यायी शब्दांनी दुसऱ्या भाषेत त्याच feelings नी उमटेलच असं नाही. आणि इथेच मला memory आणि आठवण यात फरक वाटतो… मला तरी memory शब्द स्मरणाशी, तपशीलाशी, नोंदीशी कोरडा बांधलेला वाटतो. Mechanical वाटतो जरा… पण “आठवण” मात्र ह्रदयाशी, मनाशी जोडलेली खूप जपून ठेवलेली वाटते. अर्थात काहींना पटेल काहींना नाही… पण मला तरी दोन्हीत भावनिक अंतर वाटतं… नवीन तंत्रज्ञानात तर मेमरी फुल होऊ शकते… मशीन सांगतं तसं… काही तरी डिलीट करायला लावतं… ते जातंच मग…. पण आठवणींचं तसं नाही… त्या अंतिम क्षणापर्यंत सोबत असतात… नवनवीन साठंत राहतात… खोल मनाच्या गाभ्यात. सुखरूप.. सुखद… दु:खद… सुकून देणाऱ्या… अस्वस्थही…. मुलायम अन् यातनामय पण… सुरेल… बेसूर.. त्यांना डिलीटचा पर्यायच नाही… असतातच सोबत..

प्रत्येकासारखं माझंही आयुष्य चढ ऊतारांचं, सुखदुःखांचं, यश अपयशांचं…. पण ती सारी यादी बाजुला सारून मी फक्त माझ्या सुरेल प्रवासातल्या अशा “आठवणी” सांगणार आहे ज्या फक्त ” माझ्या “आहेत. त्यांनी ज्ञान, दिशा, उत्तुंग आनंद, भाग्य दिलं…. महान कलाकारांचं दर्शन घडवलं… लोकहो, लेख जरा मोठा आहे कारण ती माणसंच फार मोठी….. पण आजवरच्या अनुभवावरून वाचाल… जरूर वाचा!!!

तर पहिली “आठवण”अर्थातच पहिल्या सुरेल टप्प्यावरची… आदरणीय पिंपळखरे गुरूजींची…. अनेक वर्ष रागरागिण्यात रमलेले सर.. आम्हा कित्येक शिष्यांना त्या सुरेल राजरस्त्यावरून सहज, कसलाही आव, अहं न आणता नेणारे… अत्यंत सुरेल सुंदर डिझाईन्सनी सजलेले राग, स्वर रस्ते, सहजपणे गायकीतून पोहोचलेलं राग शास्त्र, अनेक बंदिशी, रागरूपं, ताना, आलापी… सगळ्यांनी ते त्या ८×१० च्या खोलीचा स्वरमहाल करून टाकत अगदी…..

अशीच एक संध्याकाळ.. सर पौडहून शाळेतून सायकल हापसत थकून आलेले… फक्त कपभर गरम चहा एवढीच मागणी… मी पोहोचले होते. समोर भिंतीवर ८/१०चादरी एकावर एक ठेवून केलेलं आसन.. टेकायला तक्क्या… समोर तानपुरा घेऊन शिकायला उत्सुक मी… उजव्या हाताला एक कॉट… डाव्या हाताला बाईंचं स्वैपाकघर… अत्यंत छोट्याशा जागेची ही रचना, नेपथ्य… अगदी सामान्य, साधं, बेताचं….

त्या दिवशी सरांनी कलावती राग शिकवायला घेतला… साग… सागप… गपगसा… नि्धसा… गप धनि् धप… गप.. गध.. गनि् धप गपधनि्सां…. मंद्र, मध्य, तार सप्तकं सजत होती. विलंबित ख्याल कलावतीचं अंतरंग उलगडंत होता… अजून संध्याकाळचा कलता ऊजेड होता… तासभर तरी त्या मिंड, ते स्वरगुच्छ, गंधार पंचमाचं मैत्र, कोमल निषादाची आळवणी.. परत पंचमावर विश्राम… अहाहा!! काय सुंदर रस्ते… काय सुंदर कलावतीचं सांगणं, रिषभ मध्यमा शिवायही सजणारं ते ओडव रूप…. सर खरंतर ग्वाल्हेर गायकीतले… ते तर शुद्ध, ताकदीचं गाणं….. पण सर काहीतरी वेगळंच शिकवंत, रंगवंत, नटवंत असंत… कुठून आलं हे त्यांच्याकडे?  हा वेगळा विचार, भाव… असे अनेक राग आम्ही शिकत होतो… मांडत होतो… कौतुक होत होतं….. पण त्या दिवशीचा कलावती काही औरच होता… आजवर आठवणीत दाटलेला.. मनात, “माझ्या”ह्रदयात सतत “आठवणींची सूर संगत”….

त्या खोलीत फक्त एक पिवळा बल्ब असे. दिवेलागणीला लागणारा…. पण त्या रंगतदार कलावतीत जाणीवंच झाली नाही दिवेलागणीची… सरांच्या घराचं दार सदैव उघडं असे.. दिवा लागलाच नव्हता कारण जणू कलावतीचाच प्रकाश होता खोलीत… त्या दिवशी बराच उशीर झाला म्हणून वडील न्यायला आले. ते आमच्यामधून जाऊन कॉटवर बसले… बऱ्याच वेळानं तो अद्भुत स्वर पिसारा मिटला आणि लक्षात आलं दिवाच लावला नाही… तंबोरी आडवी ठेवून मी उठले… दिवा लावला… समोर आप्पा.. माझे वडील… बापरे!!!म्हणजे खूपच उशीर झाला. मुकाट्यानं घरी निघाले. वाटेत संवाद नाही. घाबरले. त्यांचा गाण्याला जरा विरोध होता. वाटलं उद्यापासून गाणं संपलं बहुतेक… एक चौक ओलांडला.. आप्पा म्हणाले, ” हे काय गात होतात”?  हे अनपेक्षित होतं.. मी म्हंटलं, “कलावती नावाचा राग”.. ते म्हणाले, “इतकं सुंदर असतं गाणं?  तुम्ही इतकं रंगून गात होतात… मी आलेलं कळलं पण नाही… ध्यान लागणं यापेक्षा वेगळं काय असतं?  यापुढे तुला अडवणार नाही.. तू शीक.. गा…. तू इतकं सुंदर गातेस हेही मला माहितीच नव्हतं” हे सारं मला खूप, खूप, खूपच सुखद होतं. विशेष म्हणजे सरांच्या कलावतीच्या गायकीनं ते काम केलं होतं…. कुणी तरी सांगितलं म्हणून घडलं नव्हतं…..

आजवर तो कलावती, ती सुरेल दिवेलागणी, आप्पांची परवानगी शाब्बासकी.. सगळं सगळं आहे “आठवणीत” “मनात” “हृदयात”फक्त…. “माझं”

त्यावेळी झालेल्या गाण्याच्या गानवर्धनच्या कार्यक्रमाला पंडिता रोहिणी भाटे… बेबीताई अध्यक्ष होत्या. त्या दिवशी रागेश्री पण सुंदर रंगला. त्यांना गाणं खूप आवडलं. ‌‌कथक नृत्याला साथ करायला त्यांनी बोलावलं. त्या वसंतरावांच्या, लच्छू महाराजजींच्या शिष्या होत्या. अशा विद्वान, झोकून काम करणाऱ्या कलावती बरोबर काम करणं हे गौरवाचं होतं आणि खूप काही शिकण्यासारखं असणार होतं. मग नृत्य भारती, मी आणि बेबीताई असा प्रवास सुरू झाला. लयकारीत बुडालेले वेगळं संगीताचं रूप… मराठी, ब्रज, अवधी, हिंदी संस्कृत भाषांशी जवळीक असणारं… अनेक रसांशी नातं असणारं… तालांमधे रमणारं… वंदनेतून देवदेवतांचं दर्शन घडवणारं…. अनेक रचना अनेक रूपं…. मी नोकरी करत असे त्यामुळे काही शिकायला, प्रॅक्टिसला मी शाळेच्या आधी घरातलं सगळं आवरून नऊ साडेनऊला पोहोचे…. साडेअकराला शाळेसाठी निघावंच लागे… पूना कॉफी हाऊसच्या मागच्या जिन्यात त्यांच्या मंद, शांत सेंटचा सुगंध तरंगत असे… म्हणजे आल्या आहेत ही खूण… वेळ पाळणं, जपणं, सांभाळणं हे तर त्यांचं खास वैशिष्ट्य…. कधी उशीर नाहीच. वर हॉलच्या खिडक्या उघडून, नादमय घुंगरू बांधून, मेट्रोनोम लावून, त्या मधल्या फरशीवर रियाज सुरू झालेला असे. हाताची घडी घालून, मंद रंगसंगतीच्या पोशाखातल्या बेबीताईंचं लयीशी ध्यान लागलेलं असे. नगमा धरण्याइतपंत हार्मोनियम मी वाजवु लागले की बारीक हासरे डोळे उघडून त्या गोड हासंत. फक्त त्या, मी, दिन की पूरियाचा लाडका नगमा आणि टकटक लयबद्ध मेट्रोनोम.. एवढंच हॉलमध्ये… किती भाग्यवान मी… त्या रियाजाची साक्षी.. संगतकार, श्रोता, रसिक, अभ्यासक, दर्शक…. सर्वकाही….

अध्यात्मातले लोक सात्विक तेज आभा, प्रभा, ऑरा जे जे काय मानतात, म्हणतात ते मला जाणवायचं… हे काहीतरी वेगळं आहे, उत्तुंग आहे, मधुर आहे… ते तेज खोलीभर पसरलंय… जिथे ततकार चाललाय ती दगडाची फरशी सुद्धा मऊशार भासायची… ती “चपत”.. ते घुंगरू, ते वजनदार तरी हळुवार काम…. सारं सारं जाणवायचं. अभिनयाची भावपूर्ण ताकद… सजणाऱ्या देखण्या संगीत रचना… किती, काय त्यांनी शिकवलं, गाऊन घेतलं, सूचना केल्या, दिशा दाखवल्या.. शास्त्रीय संगीतातल्या पण श्रीमंत दागिन्यांसारख्या रचना… त्यांचे स्वर, शब्द, कोरिओग्राफी बघत ऐकत मी समोर आश्चर्यचकित… दिग्मुढ…. हे काय रसायन आहे?  या इतक्या अशा बहुमिती, बहुआयामी!!माझं भाग्य म्हणून मी त्यांच्या संगीताचा भाग झाले. थोडी ना थोडकी २५ वर्षं… खूप कार्यक्रम, दौरे, कौतुकं… पण त्या सकाळच्या रियाजाची श्रीमंती फक्त “माझी”… “एकटीची”…….

आता ती इमारत नाही… हॉल नाही… ततकारानं पावन झालेली फरशी नाही.. तो जिन्यातला रेंगाळलेला सुगंध नाही…. पण माझ्या आठवणीत, डोळ्यात, मनात, कानात…. सगळं सेफ लॉकरसारखं जपलंय…. आठवणींची सोनेरी किल्ली लावली की सारा खजिना समोर… “फक्त माझा. “. “माझ्या आठवणींचा”……

 कथक नृत्याशी पत्रिकेचा कोणता तरी ग्रह बांधलाच गेला असावा… कथकचे अनेक महोत्सव अन् माझी जागरूक, सुरेल, भावपूर्ण साथ हा प्रवास सुरूच झाला. अनेक कथक कलाकार, घराणी, त्यांच्या रचना… तोवर खूप कमी माहिती असलेल्या गोष्टी समोर आल्या. पं. बिरजूमहाराजजींनी दिल्लीत माझं गाणं ऐकलं… खूप खूष झाले.. खरं तर भावस्वराची देवाची देणगी… बेबीताईंकडची संधी, हे त्यातलं रहस्य होतं. कथक केंद्राच्या एका वर्कशॉपमध्ये ते म्हणाले, “यह बहुत भावपूर्ण और सुरीला गाती है”.. ‌त्यांचं कौतुक ऐकून मी आनंदाने बहरून गेले. अन् एक दिवस फोनंच आला शाश्वती दीदीचा गायनसाथ करण्यासाठी, महाराजजींना,

सवाईमधे….. केवढं भाग्य, गौरव… दूरवरून रंगमंचावर ते मार्दवयुक्त तरी ताकदीचं नृत्य पहात होते… आता सूरसंगत करणारी उजवी बाजू झाले. तो सवाई महोत्सव अविस्मरणीय!!!!

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares