☆ ‘एक्स्पायर’ व्हायच्या अगोदरच् ‘आऊटडेटेड’… ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
हळूहळू किती खर्च आपण वाढवून घेतलेत काही कल्पना आहे का? सकाळी उठल्यापासून.. “टूथपेस्ट में नमक” असायला पाहिजे, चारकोल असायला पाहिजे.. लौन्ग दालचिनी विलायची अजून काय काय टाकतील..! दात घासायचेत, का दातांना फोडणी द्यायचीय, काय माहिती!
आणि सगळ्याच टूथपेस्ट “डेंटिस्ट का सुझाया नंबर वन ब्रँड” असतात.. रातभर ढिशूंम ढिशूंम..
टूथब्रशच्या ब्रिसल्सवर जितके संशोधन झालेय तितके संशोधन ‘नासा’त तरी होतेय का नाही कुणास ठाऊक!
कोनेंकोनें तक पहुँचने चाहिए म्हणून मग आडवे तिडवे उभे सगळे प्रकार आहेत.. असोत बापडे.. पण त्या डेंटिस्टच्या गळ्यात स्टेथो का असतो, हे मला अजून समजलं नाही..!
आंघोळीचा साबण वेगळा, चेहरा धुवायचा वेगळा.. जेल वेगळं.. फेसवॉश वेगळं.. दूध, हल्दी, चंदन आणि बादामने अंघोळ तर क्लिओपत्राने पण केली नसेल, पण आता गरिबातली गरीब मुलगी पण सहज करतेय..
आधी शिकेकाईने पण काम भागायचं, मग शॅम्पू आला.. मग समजलं की, शॅम्पू के बाद कंडिशनर लगाना भी जरुरी हैं..
भिंतीला प्लास्टर करणं स्वस्त आहे, पण चेहऱ्याचा मेकअप फार महागात पडतो.. पण तो केलाच पाहिजे.. नाहीतर कॉन्फिडन्स लूज होतो म्हणे.. “दाग अच्छे हैं” हे इथं का नाही लागू होत काय माहिती.?!
मी “गॅस, नो गॅस” करत सगळे डिओ वापरून बघितले.. पण “टेढ़ा हैं, पर मेरा हैं” म्हणत एक पण पोरगी कधी जवळ आली नाही.. खरंच.. सीधी बात, नो बकवास..
केस सिल्की हवेत, चेहरा तजेलदार हवा, त्वचा मुलायम हवी, रंग गोरा हवा, आणि परफ्यूमचा सुगंधी दरवळ हवा बस्स.. बाकी शिक्षण, संस्कार, बॉडी लँग्वेज, हुशारी हे गेलं चुलीत..!
मला तर वाटतं, काही दिवसांतच सगळीकडे संतूर गर्ल, कॉम्प्लॅन बॉय, रॉकस्टार मॉम, आणि फेअर अँड हॅन्डसम डॅड दिसतील..
साबुन से पण किटाणू ट्रान्सफर होतें हैं म्हणे..!!
(हे म्हणजे, कीटकनाशकालाच् कीड़े लागण्यासारखं आहे!)
आता, तुमचा साबण पण स्लो असतो.. मग काय.. धुवत रहा, धुवत रहा, धुवत रहा..
टॉयलेट धुवायचा हार्पिक वेगळा,
बाथरूमसाठीचा वेगळा..! मग त्यात खुशबुदार वाटावं म्हणून ओडोनिल बसवणं आलंच.. जसं काय मुक्कामच करायचाय तिथे..
हाताने कपडे धुणार असाल तर वॉशिंग पावडर वेगळी, मशीनने धुणार असाल तर वेगळी.. नाहीतर, तुम्हारी महँगी वॉशिंगमशीन भी बकेट से ज्यादा कुछ नहीं, वगैरे…
आणि हो, कॉलर स्वच्छ करण्यासाठी वॅनिश तर पाहिजेच, आणि कपडे चमकविण्यासाठी “आया नया उजाला, चार बुंदोवाला”.. विसरून कसं चालेल..?
“अगं पण दुधातलं कॅल्शियम त्याला मिळतं का? ” हा प्रश्न तर एकदम चक्रावून टाकणारा आहे..
म्हणजे आदिमानवापासून जे जे फक्त दूध पीत आलेत ते सगळे वेडे.. आणि त्यात हॉर्लीक्स मिसळणारेच तेवढे हुशार!! ह्यांनाच फक्त दुधातलं कॅल्शियम मिळतं..
… आणि वर, मुन्ने का हॉर्लिक्स अलग, मुन्ने की मम्मी का अलग, और मुन्ने के पापा का अलग…
“इसको लगा डाला, तो लाईफ़ झिंगालाला” म्हणून मी टाटा स्काय लावलं खरं.. पण ते एचडी नाहीये.. म्हणून मग मी घरात टिव्ही बघत असलो, की लगेच दार लावून घेतो.. न जाणो, कुठूनतरी पाच-सात पोरं नाचत येतील आणि “अंकल का टिव्ही डब्बा, अंकल का टिव्ही डब्बा”.. म्हणून माझ्या ४० ०००च्या टिव्हीला चक्क डब्बा करतील.. याची धास्तीच वाटते..
“पहले इस्तेमाल करो, फिर विश्वास करो”च्या जमान्यात आपणच खरे इस्तेमाल होतोय.. काल घेतलेल्या वस्तू, ‘एक्स्पायर’ व्हायच्या अगोदरच् ‘आऊटडेटेड’ होताहेत..
गेल्याच महिन्यात मी ड्रायव्हिंग टेस्ट सफलतापूर्वक उत्तीर्ण झालो होतो. नवंकोरं लायसन्स खिशात घालून, कॉलर टाईट करून, बाबांची गाडी घेऊन, मी माझ्या लाडक्या सूर्याकाकाला घेऊन फेरफटका मारायला निघालो होतो.
शहराबाहेर, फारशी वाहतूक नसलेल्या रस्त्यावर पोचलो होतो. एका चौकात हिरवा सिग्नल ओलांडून आम्ही पुढे आलो, आणि सायरन वाजवत पोलिसांची जीप मागून आली, आणि आम्हाला थांबण्याचा इशारा करत आमच्या गाडीला त्यांची जीप आडवी घालून थांबली.
गाडीतून दोन साध्या वेशातले पोलिस उतरले आणि माझ्याकडे यायला लागले.
माझ्या छातीत उगाचच धडधड व्हायला लागली.
“लायसन्स! ” त्यांच्यातल्या एकाने काचेवर टकटक केली, आणि माझ्याकडे लायसन्स मागितलं. मी लायसन्स दिलं, ते पाहिल्यावर, काहीतरी गोष्टीचा उलगडा झाल्यागत त्याने मान डोलावली आणि लायसन्स त्याच्या वरिष्ठाकडे दिलं.
“हं, गेल्याच महिन्यात मिळालेलं दिसतंय, ” लायसन्स बघत तो वरिष्ठ मला म्हणाला, “म्हणूनच एवढी मूलभूत चूक झाली. “
“मूलभूत चूक”? मला तर काहीच समजेना. मी मनातल्या मनात वाहतुकीच्या सगळ्या नियमांची उजळणी करू लागलो, पण माझी काहीच चूक लक्षात येईना.
मी प्रश्नार्थक नजरेने त्या दोघा पोलिसांकडे पाहिले.
“लेकरा, अरे, ट्रॅफिक सिग्नल तोडला तू, लाल सिग्नलमधून तशीच गाडी पुढे दामटलीस तू, ” त्यातला ज्युनियर मला सांगत होता.
“नाही हो, मी चौक ओलांडला तेव्हा हिरवा होता सिग्नल, ” मी आधी ठामपणे आणि नंतर ते ऐकत नाहीत म्हटल्यावर गयावया करत सांगू लागलो. पण ते काही बधेनात.
सूर्याकाका हाताची घडी घालून हा सगळा ड्रामा निवांतपणे बघत होता.
“आम्ही दोघांनीही बघितलं आहे, सिग्नल लाल झाला होता, पण तू तशीच गाडी घुसवलीस, ” त्या पोलिसाचं पालुपद चालूच होतं.
दोन पाच मिनिटं, कॅसेट अडकल्यासारखा, हा संवाद पुन्हा पुन्हा तसाच फिरत राहिला.
“चल, सोड, जाऊ दे. तू लहान आहेस, नवा आहेस, होते अशी एखादेवेळी चूक. पाचशे रुपये दे मला गुपचूप, मी काही तुझं चलन कापत नाही, ” तो वरिष्ठ एकदम निर्वाणीचं बोलला.
मी गोरामोरा झालो, माझी काहीच चुकी नाही, आणि शिवाय या माणसाला लाच द्यायची. मी व्याकुळतेने काकाकडे पाहिलं, तो अजूनही ढिम्मच होता.
“नाही हो, ” मी पुन्हा म्हणालो, “मी चौक ओलांडला तेव्हा हिरवाच होता सिग्नल. “
“ए, गप रे, ” त्या वरिष्ठाने आता एकदम टोन बदलला, “मगापासून प्रेमाने समजावतो आहे, अक्कलच नाही याला. नियमभंग केला म्हणजे शिक्षा व्हायलाच पाहिजे, एवढं साधं कळत नाही तुला? जा, तुला कोणासमोर गाऱ्हाणे घालायचं तिथं घाल. दोन साधे नागरिक – ordinary civilians म्हणत आहेत – सिग्नल हिरवा होता, आणि दोन पोलिस अधिकारी म्हणत आहेत – सिग्नल लाल होता, कोणाचं म्हणणं खरं मानलं जाईल? “
प्रकरण एवढं पुढे गेल्यावर मात्र सूर्याकाकाने सीट बेल्ट काढला, गाडीचं दार उघडलं, गाडीला वळसा घालून त्या दोघांसमोर येऊन उभा ठाकला. काही न बोलता, त्यानं खिशात हात घातला, पाकीट काढलं)- मनसुबा पूर्ण होताना दिसल्यावर त्या दोघांचे डोळे लकाकले), आणि एका हाताने एकाची गचांडी धरत, पाकिटातून आपलं ओळखपत्र (I card) काढलं, आणि त्याच्या डोळ्यासमोर नाचवत म्हणाला, “मी इन्स्पेक्टर सूर्यकांत भोसले, मुंबई पोलिस. मी सांगतो आहे की चौक ओलांडला तेव्हा सिग्नल हिरवा होता. आता मला सांगा, कोणाकडे गाऱ्हाणे घालू? “
त्याचं ओळखपत्र आणि रुद्रावतार पाहून दुसरा माणूस तर त्याच्या गाडीत बसून पळूनच गेला, पण ज्याला काकाने पकडलं होतं, त्याला जागचं हलताही येईना.
त्याच्या हातातून माझं लायसन्स काढून घेत काका मला म्हणाला, “राजू, माने हवालदारांना फोन लाव, पोलिस स्टेशनवरून दोन हवालदार आणि जीप घेऊन यायला सांग. निरपराध कोवळ्या पोरांना गाठून दादागिरी करता होय रे त्यांच्यावर? आज मी पोलिसात नसतो, तर काय हाल केले असतेत याचे?
ते काही नाही, तू कोण आहेस, खरंच वाहतूक खात्यात आहे का तोतया आहेस त्याची शहानिशा करू, आणि नियमभंग केला म्हणजे शिक्षा झालीच पाहिजे हे तुझं वाक्य तुलाच सविस्तरपणे पटवून देऊ. तुझ्या साथीदाराला बऱ्या बोलानं तूच बोलावून घेतोस का त्याला पकडायला मी बँड बाजा वाजंत्री पाठवू? “
मी मानेकाकांना फोन करू लागलो, इतका वेळ मुजोरी करणाऱ्या त्या माणसाच्या डोळ्यात छप्पन्न सशांची व्याकुळता दाटून आली होती.
“आपल्या घराची एक ‘ extra’ किल्ली नेहमी शेजारी असावी. हे नक्की. पण आपल्या आयुष्याची किल्ली मात्र स्वतः कडेच ठेवावी. “••••
आज मी खूप उत्साहात आहे. काय कारण असावं माहीत नाही. पण आज भरपूर ऊर्जा आहे. मला छान वाटतय. खूप काम करावसं वाटतंय. मन गुणगुणतय. आजच्या या उत्साहपूर्ण दिवसांचा चांगला उपयोग करून घ्यायचा हे मी लगेच ठरवलं. आजकाल असे दिवस दररोज उगवत नाहीत. म्हणून मी सगळ्यात आधी मस्त चमचमीत जेवणाचा बेत ठरविला. घर अगदी चकाचक करायचे ठरविले. एकानंतर एकेक काम आठवतं गेली व आज जास्तीत जास्त काम करायची हे लगेच ठरविले. कामे केंव्हा, कशी करायची याची रूपरेषा मनात ठरवून टाकली. आता एवढ्या कामांची लिस्ट समोर म्हंटल्यावर कामाची स्पीड वाढवायलाच हवी. हे सर्व ठरवत असताना च मधे दोन मिनिटे काढून वॉशिंग मशीन लावली. म्हणजे आजची सकाळ वेगळीच उगवली. ••••
बहुतेक माझी झोप चांगली झाली होती. स्वप्न पण छान पडलं होतं. पावसाळी मन प्रसन्न करणारी हवा होती. त्यातच रेडिओ वर पहिलंच मस्त आवडीचे गाण ऐकलं. ••••
” मस्ती भरा है समा, ••••
हम तुम हैं दोनो यहां.
आंखो में आ जा, दिल में समा जा,
झूमें ज़मीं आसमां । ” •••••
वाढत्या उत्साहात भर पडली. तसे मागच्या पंधरा वर्षांपासून आम्ही दोघेच असतो पण “Today it’s different. ” •••••
कारण काहीही असू दे. लगेच हा दिवस cash करायचाच. असं मी ठरवलं. •••
सर्व अगदी मजेत सुरू होत. हळदीचे डाग पडतात व कपडे खराब होतात, असा रोजचा विचार आज बाजूला सारून, रोजपेक्षा वेगळा ड्रेस घातला. मनात म्हंटल पडले डाग तर पडू दे. ••••
” बहुत कपड़े हैं अपने पास । “
मन लावून एकेक पदार्थ लक्ष देऊन केला. पाहुण्यांसाठी जपून ठेवलेली क्रोकरी उत्साहाने काढणार, तेवढ्यात फोन वाजला, लगेचच घेतला. एका मैत्रिणीचा होता. •••••
वेळ आहे का ग.??? ••••
असं म्हणून आमच्या गप्पा नेहमी प्रमाणेच सुरू झाल्या. मी उत्साहात होतेच. लगेच आजचा माझा बेत मी तिला सांगितला. ••••
काही नाही ग सहजच.. सणवार, वाढदिवस वगैरे काहीच नाही. मी म्हंटल. ••••असच काहीतरी वेगळं करावं म्हणून करतेय. सर्व झालंय, फक्त मसालेभात तेवढा राहिलाय. येतेस का जेवायला?? मी सहज विचारलं. ••••
लगेच ती म्हणाली, अग! तुला कंटाळा नाही येत का?? मला तर आता एवढा कंटाळा आला आहे. रोज रोज, तेच ते, तोच तोच, आपल्या हातच जेवून स्वयंपाक करून करून मी थकलेय.. मी तर आता जेमतेम जेवढी गरज असेल तेवढंच काम करते व बाकी जास्तीची कामे तर अजिबात करतच नाही. कोणी येत जात नाही. त्यामुळे तर अजून काही करत नाही. कंटाळा तर रोजच येतो. ••••
अग! तू आणि मी एकाच वयाच्या ना, मग तुलाही आता कामाचा कंटाळा येतच असणार नाही का?? बघ बाई, खूप करायला जाऊ नको, नाही तर उद्या कंबर दुखायची. ••••
झालं, एवढं पूरे होत. मलाही ते पटले. मनाने सहजच पलटी मारली. उत्साही मनाने कुलांटी मारली. अचानक घड्याळ उलटे सुरू झाले. आता विचारांची दिशाच बदलली. म्हणजे. ‘ Follow Me ‘ सारख तिच्या मागे माझे मन चालू लागले. ••••
मलाही थकल्या सारखे वाटू लागले. कुठे तरी ‘कंटाळा ‘ शब्द डोक्यात छान बसला. व आपला असरही दाखवू लागला. ••••
आता मनात नवीन विचार येऊ लागले. मसालेभात राहू दे का?? बाकी एवढं सर्व आहेच ना. म्हणजे नाही केलं तरी चालेल. एवढं पचलही पाहिजे ना. आजकाल जास्त जेवले की त्रासही होतो. ‘कंटाळा’ शब्दाला साजेसे व स्वतःला सोईस्करपणे पटणारे विचार मनात येऊ लागले. स्वतः शी च बोलणे होत होते. ••••
गॅस बंद करून थोड्या वेळ शांत बसले.
एकदम विचारात बदल कसा काय झाला?? संगतीचा असर का? तरी संगत दुरुनच होती. फक्त फोनवर. तरी एवढा प्रभाव कोणाच्या तरी बोलण्याचा होऊ शकतो का?? मग माझ्या उत्साहपूर्ण दिवसाचे काय?? सर्व मुसळ केरात?? ••••
एकदम दिवस कंटाळवाणा वाटू लागला. थकल्या सारखे वाटू लागले. क्रोकरी वगैरे नकोच, राहू दे. उगीच फूटली तर सेट खराब व्हायचा. ••••
म्हणजे तिच्या म्हणण्याने माझी नकारघंटा सुरू झाली. एकदम विचारांची दिशाच बदलली. •••••
माझी अवस्था मलाच कळत नव्हती. मनात कुठेतरी तरी अस्वस्थता जाणवू लागली. मी हा असा विचार करणे योग्य आहे का??
म्हणतात ना, ••• “संगतीचा असर पडतो. “
हो बरोबर आहे. ती पण तर माझ्या संगतीत तेवढ्याच वेळ होती ना, मग तिला मी प्रभावित का करू शकले नाही.???? •••••
तिचा कंटाळवाणा दिवस उत्साहात मी का बदलू शकले नाही.???? मी पण सांगू शकले असते ना, ••••
अग! नाही, असं अजिबात नाही. वयाप्रमाणे थकवा येतो कधी कधी. नाही असं नाही. पण आजचा दिवस खुप छान उगवला आहे. म्हंटल आनंद घेऊया आज. कधी कधी काही तरी वेगळं असावं ना. आपल्यालाही छान वाटत असे प्रसंग स्वतः च निर्माण करायचे असतात. कशाला वाट बघायची वाढदिवसाची किंवा सणाची. आणि जेवढं पचेल तेवढच खायचं. अग! छान वाटत. स्वतः चीच पाठ थोपटावीशी वाटते. आनंदी दिवसाची वाट बघण्यापेक्षा हातात असलेला क्षण/ दिवस आनंदात कसा घालवता येईल यांचा विचार करावा. •••••
माझ्या अशा बोलण्याने तिच्यात कदाचित बदल झाला असता. बरे असो, ••••
माझ्या आनंदाची किल्ली मी तिला दिली आहे का?? घराची एक extra किल्ली शेजारी नेहमी द्यावी. हे बरोबर आहे पण आपल्या आयुष्याची किल्ली जर दुसऱ्या च्या हातात दिली तर बंदर च्या खेळाप्रमाणे तो डंबरू वाजवणार आणि आपण नाचायचं का?? •••
लगेच सर्व मरगळ झटकली. सर्व कंटाळा डिलीट केला. व पुर्वीच्या उत्साह मोड मधे आले. आरशात बघीतल. स्वतः चेच कौतुक केले मनात म्हंटल, •••
” अभी तो मैं जवान हूं ” ।••••
व लगेच उत्साहाने कामाला लागले. क्रोकरी काढली. टेबल सजवले. बगीच्यातून गुलाबाची फूल फ्लॉवर पॉट मधे सजवली. प्लेट मधे सर्व वाढले. छान गाणी लावली. फोटो काढला. काही लोकांचा कंटाळा जाऊन उत्साह यावा या उद्देशाने फेस बुक वर फोटो पोस्ट केला. ••••
रोज पेक्षा दोन घास जास्त खाल्ले. ••••
थोड्याच वेळात उत्साही फेस बुक active लोकांचे comments ही आलेच. ••••
* व्वा काकू मस्तच ••••
*Wow!! so tempting ••••
*Great, , Kaku You Rock••••
* मी पण उद्या नक्की करते ••••
*Enjoy Kaku n Kaka
वाचून छान वाटल. मेहनतीचे चीज झाले, अस वाटल. •••••
मी स्वतः लाच धन्यवाद दिला. छान स्वयंपाक केला, हे कारण तर होतच. पण दुसरं म्हणजे नवीन सूत्र ” Follow yourself ” हे पाळल्या बद्दल. ••••
कोणी काय बोलावे?? काय सांगावे?? यावर आपलं नियंत्रण नसते. पण त्यांचे किती ऐकायचे?? किती नाही?? यावर आपल्याला नियंत्रण नक्की ठेवता येते. ••••
तरीही संगत महत्वाचीच. माझी आई नेहमी म्हणत असे, ••••तुम्ही ज्या प्रकारच्या व्यक्तिंच्या सहवासात राहाता, त्या सर्वांचे एव्हरेज व्यक्तिमत्त्व तुमच घडत जातं. नकळत त्यांचे विचार तुम्हाला पटत जातात. ••••
लोक निंदा करतात तर मी दुःखी होते. ••• लोक स्तुती करतात तर आनंद होतो. •••• म्हणजे माझ्या सुख दुःखाचे बटन दुसऱ्यांच्या हातात आहे का?? बटन आपल्या हातात असावे. स्वतःला जे पटेल तेच करावे. •••••
आत्मविश्वास, हीच आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली आहे ••••
“Say Or Do what you feel. It is not being rude. It is called being real. “
☆ जीव द्यावासा वाटतोय? .. जरा थांबा!! ☆ डॉ. धनंजय देशपांडे☆
प्रचंड निराश झाल्यावर जीव द्यावासा वाटतोय?
– – जरूर द्या.. पण त्याआधी पाच मिनिट वेळ काढून हे वाचा.
काहीवेळा असंही घडत की, आपली कसलीही चूक नसतानाही आपण बेदम संकटात सापडतो. किंवा फारतर असं म्हणूया की, १ टक्का असेल आपली चूक पण त्याची इतकी मोठी शिक्षा का मिळावी? असंही काहीजण म्हणतात.
अशावेळी सहनशक्तीच संपल्याने नाईलाजाने जीव द्यावासा वाटतो. ज्येष्ठ मंडळी यावर म्हणतात की, जीव देणं हा भ्याडपणा आहे. पण तेही खरं नाही. शेक्सपियर म्हणतो त्याप्रमाणे इतकी वर्ष स्वतः जपलेलं हे शरीर, हे जीवन असं सहज संपवून टाकण्यासाठी उलट जास्त ताकद लागते. हिंमत लागते. येरागबाळ्याचे ते काम नाही. मग त्या मानाने जगणे सोपे आहे की!
मात्र जीव देण्यापूर्वी एकच विचार करावा की, जन्म आणि मरण या दोन्ही गोष्टी विधात्याच्या हाती असतात. जन्म घेणं जसे आपल्या हाती नव्हते तसेच मरणे तरी का आपण आपल्या हाती घ्यावे? विधाता म्हणा किंवा नियती म्हणा, त्याला त्याचे काम करू द्यावे. आपण जन्माला आलोय तर जगणं आपल्या हाती आहे. ते जगावं.
मायनस १२० कोटीतून अमिताभ बच्चन पुन्हा “शहेनशहा” होऊ शकतो अथवा कैक हॉटेलचे मालक असलेले विठ्ठल कामत एका रात्रीत भाऊबंदकीच्या दणक्याने चक्क रस्त्यावर येतात. मात्र पुन्हा उठून उभे राहून लढतात आणि जिंकतात.
तर त्यापेक्षा आपण बरेच नशीबवान आहोत, असं समजल तर बरेच प्रश्न सुटतील.
बचेंगे तो और लढेंगे म्हणा!
जायचं तर आहेच प्रत्येकाला, पण कस जायचं हे आपण का ठरवायचं? ते वरच्या बाप्पाला ठरवू दे न अशा मनस्थितीत असलेले अनेकजण मी महिन्यातून दोन-चारजण तरी पाहतो, त्यावरून एक लक्षात आलं की, जे काही असं संकटमयी घडत ती टेम्पररी फेज असते. कायमची नसते.
“हेही दिवस जातील”
असं म्हणत उभं राहील की परिस्थितीसुद्धा तुम्हाला शरण येते.
“माझ्यामागे तसेही आता कुणी रडणारे नाही” असे म्हणत “म्हणूनच आता संपवून टाकाव वाटत सगळं” या विचाराचेही काही असतात. त्यांना हेच सांगणं की, ठीके, तुमच्यामागे रडणारे कुणी नाहीत. पण म्हणून आपण “जायचं? ” मग त्यापेक्षा भोवती अशीही अनेक माणसे, मुले, संसार आहेत ज्यांना कदाचित तुमची गरज असू शकते. त्यांच्या पाठीशी राहण्यात बाकीचे जीवन जगा. मग पहा, एकाचवेळी तुमच्याही जीवनात आनंद येईल आणि ज्यांना आधार देताय त्यांनाही सुखाचे दिवस येतील.
नैसर्गिकपणे मरण यायचे तेव्हा येईल. आपण ते ओढून का घ्यायच?
स्व. निर्मलाताई पुरंदरे यांचे एक वाक्य आठवलं. “वर” गेल्यावर चित्रगुप्ताने जर विचारलं की, इतकं चांगलं आयुष्य दिल होत, तर त्याचे काय केले? “
तर त्याला एक तरी काम दाखवून सांगता आलं पाहिजे की, “हे मी केले मगच वर आले”
*
थोडक्यात काय तर स्वतःसाठी जगायची इच्छा संपून गेलीय असं वाटायला लागत तेव्हा इतरांसाठी जगणे सुरु करावे.
जीव द्यावा वाटतोय या अवस्थेत अजून एक प्रकारचे लोक असतात. ज्याचे घरदार मुलं बाळ असतात (म्हणजे त्यांच्या जाण्याने रडणारे नक्की असतात) मात्र खूप प्रयत्न करूनही अपयश आल्यावर “संपवून टाकतो सगळं” या मोडवर ते येतात. खरेतर त्यांच्या हातून नकळत का होईना काहीतरी चूक झालेली असते, त्यामुळे अपयश आलेलं असत. हे आधी मान्य करावं आणि दुसरं म्हणजे तुमच्या चुकीमुळे अपयश आलं म्हणून “जीव द्यायचा? ” आणि त्याची शिक्षा मग काहीच चूक नसलेल्या घरच्यांनी का भोगायची? अपयश तुमचं अन शिक्षा त्यांना? हे पटत का पहा? जीव द्यायचे विचार जेव्हा येतात न, त्या रात्री जवळ शांतपणे झोपलेल्या आपल्या लेकरांचा चेहरा फक्त पाच मिनिट पहा. तुम्ही आहात म्हणूनच ते लेकरू शांतपणे झोपलेलं असत. हे लक्षात घ्या. स्वतःला संपवून, त्याला का सैरभैर जीवन जगायला भाग पाडायचे? हा विचार करा.
पानिपतावर चहूबाजूनी शत्रूंनी वेढलेले असताना आणि शत्रूचा सेनापती विचारतोय की, “अब क्या करोगे? “
तेव्हा शेकडो जखमा अंगावर घेऊन रक्तबंबाळ झालेले आपले दत्ताजी शिंदे त्वेषाने म्हणाले होते, “बचेंगे तो और लढेंगे”
हा बाणा, हि हिम्मत आपण काय फक्त पुस्तकात वाचायची? आणि पाच मार्कापुरती उत्तरपत्रिकेत लिहायची? छे! ते प्रत्यक्ष जगण्यात आणायचं असत.
अजून एक करता येईल. अशा निराश प्रसंगी आपल्या मनात साचलेलं आपल्या जवळच्या मात्र “विश्वासू” माणसाजवळ बोलून मोकळे व्हा. भले तो समोरचा तुम्हाला काही मदत करणार नसेल किंवा आधार देणार नसेलही पण तो विश्वासू असल्याने शांतपणे ऐकून तर घेईल न. आणि त्यामुळे मन आणि दुःख नक्की हलकं होत. हे नक्की!!
अशा निराश अवस्थेत जर कुणी असेल तर त्यांच्यासाठी “रेडू” सिनेमातील एक फार सुंदर गाण्याचे शब्द सांगतो. ते वाचा. जमल्यास ते गाणे यु ट्यूबवर एकांतात पहा.
खात्रीने सांगतो, तुमची निराशा निघून जाईल. आणि लढण्यासाठी पुन्हा तुम्ही उभे राहिला!!
(Soulful devotional Marathi song 2018 “देवाक काळजी रे | Dewak Kalaji Re” sung by re known singer Ajay Gogavale from Marathi Movie Redu)
☆ ‘महर्षि व्यास, वाल्मिकींचे गुरु.. ‘गुरुंचेही गुरु’ – देवर्षी नारद – भाग – १ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆
☆
जगातील एकमेव नारद मंदिर पुण्यात आहे. त्या मंदिरातील महर्षी नारदांची प्रसन्न मूर्ती!
नारद म्हटले की प्रत्येकाच्या मुद्रेवर स्मितरेषा उमटते. जनमानसात नारदांचे एक वेगळेच चित्र रंगवले गेले आहे. सर्वत्र संचार करणारे, चतुर बोलणारे, लावालाव्या करणारे, उपद्व्यापी, सतत काही तरी उचापती करणारे, कळलावे, कलागत्ये, बोलघेवडे, कुणा दोघात भांडणे लाऊन स्वतः नामानिराळे होऊन दुरून गंमत बघणारे, सर्वांना हवेहवेसे वाटणारे, असे एक ‘गमत्या’ व्यक्तिमत्व म्हणून नारदांचा परिचय आहे. त्यांना सहसा कोणी गांभिर्याने घेत नाही.
हरदासांच्या कथेत, कीर्तनकारांच्या अख्यानात, लावणीतल्या वगनाट्यात, लोककलांत, संगीत नाटकात, अगदी हिंदी वा प्रादेशिक भाषांमधील चित्रपटात सुद्धा, कुठेही नारद हे पात्र अवतरले की प्रेक्षक, श्रोते प्रमुदित होऊन टाळ्या वाजवणारच.
असे हे सर्वांचे लाडके नारद खरेच विनोदी, गमत्या, उपद्व्यापी आहेत की त्यांना आम्ही नीट ओळखले नाही? देवर्षी नारद नक्की कोण आहेत? कसे आहेत? गावभर भटकणे आणि लावालाव्या करणे येवढेच काम त्यांनी केले आहे की त्यांचे काही अन्य कर्तृत्वही आहे? नारद विदूषक आहेत की विद्वान? या लेखात आपण नारदांना जरा तरी नीट समजून घेऊया.
देवर्षि नारद यांचा वंश/ गोत्र
पुराणात ब्रह्मदेवाच्या तीन पत्नींची नावे आढळतात
१ सावित्री, २ गायत्री, ३ सरस्वती
ब्रह्मदेवांचे पुत्रः
१. मारिचि, २. अत्रि, ३. अंगिरस, ४. पुलस्त्य, ५. पुलह, ६. कृतु, ७. भृगु, ८. वशिष्ठ, ९. दक्ष, १०. कंदर्भ, ११. नारद
ब्रह्मदेवाचे मानसपुत्रः-
१ सनक २. सनंदन ३. सनातन ४. सनत्कुमार.
– – – पुराणात या मुलांच्या संख्येत व नावात एकवाक्यता आढळत नसली तरी हे स्पष्ट आहे की नारद हे ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत व त्यांची माता सरस्वती आहे.
नारदांचा जन्म ज्येष्ठ कृष्णपक्षातील द्वितीयेला झाला आहे. नारदांचा धर्म हिंदु. पंथ वैष्णव. वैष्णव संप्रदायाचे ते परमाचार्य व मार्गदर्शक आहेत याविषयी पुढे कळेलच.
जन्मकथा
आधीच्या कल्पात नारद ‘उपबर्हण’ नावाचे गंधर्व होते. त्यांना आपल्या रूपाचा फार गर्व होता. एकदा ब्रह्मदेवाच्या मनोविनोदासाठी अप्सरा आणि गंधर्वगण नृत्यगायनाने त्यांची आराधना करीत होते. उपबर्हण हे स्त्रियांसह श्रृंगारिक हावभाव करीत जरा विलंबानेच तेथे उपस्थित झाले. त्याचे असे अशिष्ट आचरण बघून ब्रह्मदेव रागावले आणि त्यांनी त्याला शाप दिला की तू पुढील जन्मी ‘शूद्र योनी’त जन्म घेशील. शापाचा परिणाम म्हणून पुढील जन्मी ते ‘शूद्रा दासी’चे पुत्र झाले.
हे माता व पुत्र साधुसंतांची निष्ठेने सेवा करीत. हा पाच वर्षचा बालक संतांच्या ताटात उरलेले अन्न प्रसाद म्हणून भक्तिभावाने ग्रहण करीत असे. त्यामुळे त्याची पूर्वजन्माची सारी पापे धुतली गेली. बालकाच्या सेवेवर प्रसन्न होऊन साधुंनी त्याला नामसाधना, जप व ध्यानधारणा करण्याचा उपदेश दिला.
लौकरच शूद्रा दासीचा सर्पदंशाने मृत्यु झाला. आता केवळ पाच वर्षाचा नारद जगात एकटा उरला. ‘मातावियोग हा भगवंताचा अनुग्रहच होय’ असे समजून तो बालक अनाथांचा नाथ दीनानाथ अशा भगवंताचे भजन करत घराबाहेर पडला.
– – एक दिवस हा बालक एका पिंपळाखाली ध्यान लाऊन बसला असता त्याच्या हृदयात भगवंताच्या आस्तित्वाची एक लहर विजेसारखी चमकून गेली. त्यामुळे त्याच्या चित्तात भगवंताच्या दर्शनाची व्याकुळता अधिकच वाढली. तेवढ्यात आकाशवाणी झाली, ‘हे दासीपुत्रा! आता या जन्मात तुला माझे दर्शन होणे असंभव आहे. पण पुढच्या जन्मी तू माझा पार्षद होऊन मला प्राप्त करशील ‘.
– – यथावकाश बालकाचा मृत्यु झाला आणि कल्पांती त्याचा आत्मा ब्रह्मातत्वात विलिन झाला. योग्य समयी नारदजी ब्रह्माचे मानस पुत्र म्हणून अवतीर्ण झाले.
पौराणिक उल्लेख
उभी ताठ शिखा, त्यावर मोग-याचे शुभ्र, सुगंधी पुष्प खोचलेले, भाळावर उभे गंध, भाळाच्या दोन्ही अंगाला गोपिचंदनाच्या नाममुद्रा उमटवलेल्या, खांद्यावर ‘महती’ नावाची वीणा, एका हातात चिपळ्या, मुखी ‘नारायण’ शब्दाचा जप, कटिभोवती नेसलेले शुभ्र वा पीत वस्त्र, गळ्यात सुगंधी धवलपुष्पमाला किंवा तुलसीदलमाला, पवन पादुकांवर आरुढ होऊन स्वच्छंदपणे त्रिखंडात विचरण करणारे नारद सर्वपरिचित आहेत. ते भक्ति व नामसंकीर्तन याचे आद्याचार्य आहेत. ते अजर-अमर आहेत. स्वतः भगवान श्रीकृष्ण देवर्षिंगणांमधे नारदांना आपली विभूति मानतात. भगवद्भक्तीची स्थापना, प्रसार व प्रचार करण्यासाठीच त्यांचा अवतार झाला आहे. कठीण तपस्या करून त्यांनी ‘ देवर्षि, ब्रह्मर्षि’ हे पद प्राप्त केले आहे. त्यांना ब्रह्मदंदन असेही म्हणतात. ब्रह्मलोक हे नारदांचे निवासस्थान आहे.
पुराणकथेप्रमाणे राजा प्रजापति दक्षाने नारदांना शाप दिला होता की ते दोन पळांपेक्षा अधिक काळ एकास्थानी थांबू शकणार नाहीत. त्यांच्या सततच्या भ्रमंतीमागचे हेच कारण आहे.
नारदांचे व्यक्तिमत्व
नारद आत्मज्ञानी, नैष्ठिक ब्रह्मचारी, त्रिकाल ज्ञानी, वीणा द्वारा निरंतर मधुर गायन करणारे प्रभु भक्तिचे प्रचारक, श्रेष्ठ वैष्णव, दक्ष, मेधावी, निर्भय, विनयशील, जितेन्द्रिय, सत्यवादी, स्थितप्रज्ञ, तपस्वी, चारी पुरुषार्थाचे ज्ञाता, परमयोगी, सूर्यासमान तेजस्वी, त्रिलोकाचे पर्यटक, वायुसमान गतिमान, सर्व युगात, सर्व समाजात व लोकात विचरण करणारे, मनोविजयी, नीतिज्ञ, अप्रमादी, आनंदरत, कवि, उत्तम गायक, निष्णात ज्योतिषि, प्राणिमात्रांवर नि:स्वार्थ प्रीति करणारे, देव, दानव, मानव अशा सर्व लोकात सदैव सम्मानित होणारे देवता पण तरीही ऋषित्व प्राप्त झाल्याने देवर्षि आहेत.
देवर्षि नारद धर्मप्रचार आणि लोककल्याणासाठी सतत प्रयत्नशील असतात. म्हणूनच सर्व युगांत, सर्व लोकात, समाजातील सर्व वर्गांमधे नारदजी सहज प्रवेश करू शकतात. सर्वत्र त्यांचे नेहमीच स्वागत केले जाते. वेळोवेळी केवळ देवतांनीच नाही तर दानवांनी सुद्धा त्यांचा सदैव आदर केला आहे, त्यांचे समादेश व मार्गदर्शन घेतले आहे.
नारदांच्या रचना/ग्रथसंपदा
नारद पंचरात्र, नारद भक्तिसूत्र, नारद पुराण, नारद स्मृतिवाद्यवीणासंदर्भ ग्रंथ, वैदिक साहित्य, रामायण, महाभारत, पुराण, स्मृति, अथर्ववेद, ऐतरेय ब्राह्मण इ. शास्त्रात कुठे ना कुठे नारदांचा उल्लेख आहेच आहे. ऋग्वेदातील मंडल ८-९ मधील काही सूक्तांचे द्रष्टा नारद आहेत. अथर्ववेद, ऐतरेय ब्राह्मण, मैत्रायणी संहिता यातही नारदांचा उल्लेख आहे. बृहन्नारदीय उपपुराणसंहिता (स्मृतिग्रंथ), नारदपरिव्राजकोपनिषद, नारदीयशिक्षा या सवे त्यांनी रचलेली अनेक स्तोत्रे पण उपलब्ध आहेत.
नारदांचे कार्य
नारदांची अगणित अलौकिक कार्ये केली आहेत. पुढील सूची पहा..
१. भृगुकन्या लक्ष्मीचा विवाह विष्णूंच्या बरोबर करवला.
२. इंद्राची समजूत घालून उर्वशी व पुरुरवा यांचे मीलन घडविले.
३. महादेवांकडून जलंधरचा नाश करवला.
४. कंसाला आकाशवाणीचा अर्थ समजून सांगितला.
५. वाल्मीकींना रामायणाची रचना करण्यास प्रवृत्त केले.
६. वेदव्यासांकडून भागवत पुराणाची रचना करून घेतली.
७. प्रह्लाद आणि ध्रुव यांना उपदेश करुन महान भक्त केले.
८. बृहस्पति आणि शुकदेवांसारख्यांना उपदेश करुन त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले.
९. इन्द्र, चन्द्र, विष्णु, शंकर, युधिष्ठिर, राम, कृष्ण इ. ना कर्तव्याभिमुख केले.
१०. नारदजी भक्तिचा प्रसार करताना अप्रत्यक्षपणे भक्तांना सर्व प्रकारचे सहकार्य करतात.
११. नारद भगवंतांची विशेष कृपा लाभलेले त्यांचे विशेष लाडके भक्त आहेत. भगवंतांच्या लीलेत नारदांचा विशेष सहभाग असतो. जेव्हा जेव्हा भागवंत अवतीर्ण होणार असतात तेव्हा तेव्हा नारद भागवंतांच्या अवताराआधीच पुरेशी पृष्ठभूमी तयार करतात. त्यांच्या लीलानाट्यात महत्वाची भूमिका निभावत असतात.
१२. देवर्षि नारद हे व्यास, वाल्मीकि आणि महाज्ञानी शुकदेव इत्यादिंचे गुरु आहेत.
श्रीमद्भागवत हा भक्ति, ज्ञान व वैराग्य याचा परमोपदेशक ग्रंथरत्न आहे. नारदांच्या मार्गदर्शनाखाली व्यासांनी तो लिहिला व आम्हा मानवांना उपलब्ध करून दिला. तसेच रामायण, जे मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरांचे पावन, आदर्श चरित्र वर्णन करते, तेही देवर्षि नारदजींच्या कृपेने आम्हाला प्राप्त होऊ शकले. नारदांनीच प्रह्लाद, ध्रुव, राजा अम्बरीष आदि महान् भक्तांना भक्ति मार्ग दाखवला. ते भागवत धर्माचे परमगूढ़ रहस्य जाणणारे, ब्रह्मा, शंकर, सनत् कुमार, महर्षि कपिल, स्वयंभुव मनु आदि बारा आचार्यांतील एक आहेत.
१३. देवर्षि नारदरचित भक्तिसूत्र अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. नारदजींना आपली विभूति म्हणताना योगेश्वर श्रीकृष्ण श्रीमद् भगवद्गीतेच्या दशम अध्यायात म्हणतात ‘अश्वत्थ: सर्ववृक्षाणां देवर्षीणां च नारद’.
(ती एक मुलगी आणि त्या दोन महिला माझ्यासाठी जिवंत केस स्टडी होत्या — गरिबी आणि लाचारीत जगणारा महाराष्ट्र माझ्यासमोर उभा राहिला. पण या गरिबीतही त्यांनी आपला स्वाभिमान कधीच विकला नव्हता — हाच महाराष्ट्राचा चेहरा आहे.) – इथून पुढे —–
आमचा जेवणानंतरचा तो संवाद असाच मनात घुमत राहिला. त्यांनी जणू आपलं सगळं दुःख माझ्यावर सोपवलं होतं, आणि मी ते घेऊन निघालो. मन जड झालं होतं.
त्यांच्याशी बोलताना माझा चालक कधी माझ्या बाजूला येऊन बसला, हेही मला कळलं नव्हतं. त्या संवादात प्रचंड दुःख होतं, पण त्याचबरोबर एक मोठा जीवनधडा होता — सामाजिकतेचा खरा आदर्श.
मी ज्या लहान मुलीशी बोलत होतो तिचं नाव सानुली उर्फ अवनी. माझ्यासोबत जी दुसरी महिला बोलत होती तिचं नाव गौरी, आणि तिसरीचं नाव राधा.
या तिघी बहिणी आहेत. आम्ही त्या जंगलामध्ये ज्या नितळ वाहणाऱ्या झऱ्याच्या समोर बसलो होतो, तिथून सहा ते सात किलोमीटर अंतरावर एका छोट्याशा गावात त्या राहतात.
संदेश धामणे आणि ज्योती धामणे — पती-पत्नी. या तिघी त्यांच्या मुली. याशिवाय एक मुलगा. चार अपत्यं आणि स्वाभिमानाचा दागिना लेवून या सर्वांचं आयुष्य अगदी सुख-समाधानात चाललं होतं.
शेतीत उगवणारी लहान पिकं, गावात असणारे छोटे व्यवसाय — पण काळाच्या ओघात सगळ्यावर घरघर आली. माणसं शेती विकून पडीक ठेवू लागली. गावकुसातील व्यवसाय बंद होऊन लोक मोठ्या शहरात जाऊन राहू लागले. याचा परिणाम संदेश आणि ज्योती यांच्या संसारावर झाला.
गावात कितीही फिरलं तरी रोजगार मिळेना. उपासमारीची वेळ आली. संदेश एका मित्रासोबत जंगलात गेला. दुपारी लाकडं आणली, संध्याकाळी लगेच पैसे मिळाले. रोजंदारीवर दिवसभर काम करण्यापेक्षा जंगलात जाऊन लाकडं आणायची, ती विकायची आणि पैसे कमवायचे — हे काम संदेशला आवडलं. काही दिवस मित्रासोबत, मग पत्नीला घेऊन तो जंगलात जाऊ लागला. लाकडं आणून विकायची आणि घर चालवायचं — हाच संसाराचा हिशोब झाला.
मोठी बहीण गौरी सांगत होती —
“त्या दिवशी आई आणि बाबा सकाळी जंगलात गेले. जंगलात जितके आत जाल, तितकी चांगली लाकडं सापडतात आणि त्याला जास्त पैसे मिळतात. आई जवळच थांबून लाकडं गोळा करत होती. बाबा मात्र खोल दरीत गेले होते. बराच वेळ झाला, पण बाबा आले नाहीत. दिवस कलायला लागला. आईच्या पोटात धस्स झालं. तिने लाकडाची मोळी डोक्यावर घेतली आणि गावात आली. लोकांना सांगितलं. तेव्हा लोक म्हणाले — गेल्या महिन्याभरापासून दोन वाघ जंगलात पिसाळल्यासारखे वावरतायत, हे माहीत असताना तुम्ही त्या भागात गेला का? ”
वाघाचं नाव ऐकताच आईचा हंबरडा फूटला. गावच्या सरपंचांनी जंगल खात्याच्या दोन माणसांना बोलावलं. त्यांनी इतर माणसं घेऊन, बंदूक आणि बॅटरीसह बाबांना शोधायला जंगलात गेले. आईही सोबत होती. रात्रभर शोधूनही बाबा सापडले नाहीत.
चार दिवसांनी बाबांचे रक्ताने माखलेले कपडे आणि शेजारीच रक्ताने माखलेली कुऱ्हाड आणून दिली. त्या जागी वाघ आणि बाबांमध्ये झटापट झाल्याचं जंगल खात्याच्या माणसांनी सांगितलं. पिसाळलेल्या वाघाने बाबांना ठार केल्याचं निष्पन्न झालं.
चार-पाच दिवस रडापड झाली. पण रिकाम्या पोटाने रडणं किती दिवस? आईने बाबांसोबत आणलेली लाकडाची मोळी विकली आणि दोन दिवसांचा उपवास सुटला. मग आम्हा चार भावंडांना सावरून आई पुन्हा बाबांच्या रक्ताळलेल्या कुऱ्हाडीवर हात ठेवून जंगलात लाकडं आणायला निघाली.
मी राधाला विचारलं, “तुमचा भाऊ कुठे आहे? ”
ती म्हणाली, “गोवर्धन आमच्या आधारासाठी मामाच्या मुलीशी लग्न करून दिलं. पण महिन्याभरात ती म्हणाली — मी इथे राहणार नाही. कितीही समजावलं तरी ती ऐकली नाही. दादा तिच्यावर प्रेमात होता. तो तिच्यासोबत राहायला गेला. आता कित्येक वर्ष झाली, त्याने आम्हाला विचारपूसही केली नाही. ”
आई खचली नाही. ती कष्ट करत राहिली. पण नियतीचा पिच्छा संपेना.
एकदा आम्ही दोघी बहिणी आईसोबत जंगलात गेलो. आई पलीकडे गेली आणि एका मोठ्या रानडुकराचा सामना झाला. आईच्या खांद्यावर बाबांची धारदार कुऱ्हाड होती, पण डुकराच्या झडपेत तिची कंबर मोडली. डुकरानं दोन्ही पायांची हाडं फोडली. किंचाळण्याचा आवाज ऐकून लोक धावले आणि बंदुकीच्या धाकानं डुकराला पळवलं. फाटक्या साडीत आईला गुंडाळून दोन माणसांनी डोक्यावर घेऊन घरी आणलं.
आई बेशुद्ध होती. पंधरा दिवस उपचारानंतर तिने डोळे उघडले. अनेकदा ती विचारायची — देव असं का करतोय? आम्हीही रडत रात्र काढायचो. आता तीन वर्ष झालीत. आई अंथरुणाला खिळली आहे.
मी विचारलं, “मग घर कसं चालतं? ”
गौरी आणि राधा म्हणाल्या, “बाप गेला तेव्हाही खचलो नाही, आई अधू झाली तेव्हाही नाही. आम्ही रोज कष्ट करतो. अवनी शाळेत शिकते, सुट्टीत आमच्यासोबत जंगलात येते. लाकडं आणायला बाप गेला, मग आई गेली, आणि आता मी जाते. माझ्यानंतर बहीण जाईल. ”
गौरीने हातातली कुऱ्हाड दाखवत म्हटलं, “हीच ती कुऱ्हाड, जिनं वाघालाही वाटलं होतं की आता आपण संपलो, आणि डुकरालाही वाटलं होतं की आज शेवटचा दिवस आहे. ”
त्यांच्या डोळ्यांत भीती नव्हती — तिथं चमक होती. वडिलांचा आणि आईचा प्रसंग अनेकदा सांगून त्याची भीती त्यांनी संपवली होती.
राधा हसली, “कसलं कौतुक, दादा! उलट आम्हाला ‘तीन तिघाड्या’ म्हणतात. सगळ्यांचं म्हणणं — या तिघी आई-बाबांसाठी उपद्रवी आहेत. ”
त्यांनी लाकडं डोक्यावर ठेवायला सांगितली. मी ठेवली. त्यांचं गाव माझ्या रस्त्यावर असल्याने पत्ता घेतला आणि पुढे गेलो. राधाच्या गावात जाऊन मी तिच्या आईचा पत्ता विचारत तिच्या घरी गेलो. सोबत नेलेली फळं दिली. त्या तिघींची भेट सांगितली. आईनंही सगळं सांगितलं.
– – – मी निघणार तितक्यात त्या तिघी आल्या. मला पाहून त्यांनाही धक्का बसला. अवनीची वही पाहिली — मोत्यासारखी अक्षरं. ती दरवर्षी शाळेत पहिली येते.
मी आईला म्हटलं, “ताई, मुली मोठ्या झाल्या. लग्नाचा विचार करा. ”
ती म्हणाली, “स्थळं येतात. पण त्या म्हणतात — लग्न झालं तर आईला कोण सांभाळणार? ”
खिशातून पैसे काढून तिच्या हातावर ठेवले. ती म्हणाली, “दादा, पैसे घेणं म्हणजे नातं तोडणं. ”
मी शांत बसलो. थोडा वेळ थांबून निरोप घेतला. काही काळजी करू नका मी आपल्या सोबत आहे असा आशावाद मी त्यांना दिला.
… परिस्थिती कितीही वाईट असली तरी खचायचं नाही.
आज नाही, उद्या चांगले दिवस येतील — या भावनेनं जगायचं.
चांगलं करत राहायचं, स्वाभिमान जपायचा — हेच त्या बहिणींनी मला शिकवलं.
मी तिथून निघालो, पण माझं मन ‘त्यांच्या’ स्वाभिमानात अडकून राहिलं. त्या तिघी तिघाडा नव्हत्या एक सामाजिक पायवाट होती ममतेकडून समतेकडे जाणारी बरोबर ना..!
☆ माझी जडणघडण… स्थलांतर – भाग – ५५ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)
आमच्या भविष्यातल्या जीवनाविषयी आम्ही दोघं आता ठरवायला लागलो होतो. विलासला स्वतःचा आर्किटेक्चरचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करायचा होता. सुरुवातीला त्यांनी अनुभवासाठी अमळनेरस्थित, बिल्डिंग व्यवसायाशी संबंधित असलेल्या एका खाजगी व्यक्तीबरोबर काही उपक्रम केले. मात्र स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्यास अमळनेर हे काही योग्य ठिकाण वाटेना. इथे व्यवसायाची वाढ होणे पर्यायाने वैयक्तिक वाढ होणे जरा अशक्य होतं. एक तर अमळनेरच्या गल्ली गल्लीत सारेच परिचयाचे नव्हे अगदी घरातलेच म्हणाना! त्यामुळे अर्थार्जनाच्या दृष्टीने अमळनेर हे लाभदायी असणारच नव्हते. शिवाय भांडारकरांच्या कुटुंबाच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व विलास पासून सुरू झाले होते.
बदललेल्या सरकारी कायद्यामुळे कापसाची एकाधिकारशाही सुरू झाली होती त्यामुळे जिनिंग, प्रेसींग मिल्स सध्यातरी बंद होत्या. तेल गिरण्यांची सुद्धा तीच परिस्थिती होती. हे सर्व नव्याने उभं राहू शकत होतं मात्र तोपर्यंत कुटुंबातील भाऊबंदकी जरा जास्तच विकोपाला गेलेली होती या पार्श्वभूमीवर विलासच्या मनात “आपण घेतलेल्या शिक्षणाद्वारेच आपल्या आयुष्याची दिशा ठरवूया” असा विचार येणे स्वाभाविकच नव्हे तर अगदी योग्यच होते आणि वाडवडिलांच्या मालमत्तेवर सुखाने आयुष्य जगण्याची कल्पना त्याच्या मनाला स्पर्श करू शकत नव्हती.
अमळनेर पासून ६०/७० किलोमीटरवर असलेल्या जळगाव या जिल्ह्याच्या ठिकाणी त्याने स्वतंत्र “वास्तुकला” या नावाने व्यवसायाची मुहुर्तमेढ रुजवली. सुरुवातीचे काही महिने तो अमळनेर- जळगाव- अमळनेर असा अत्यंत जिकिरीचा, भुसावळ पॅसेंजर गाडीचा नाहीतर एसटीचा प्रवास करत असे. दुसरा काही पर्यायच नव्हता. तो सकाळी सहा वाजता घरातून निघायचा तो रात्री नऊ वाजताच किंवा ट्रेन लेट झाली तर त्याहूनही उशिरा परतायचा. हा जो काळ होता तो अत्यंत मानसिक अस्वस्थतेचा होता. दोघांसाठी. “सासुरवाशीण” या शब्दाभोवती असलेला कायदेशीर कडवटपणा काढून मीच मला स्वतःला “सासुरवाशीण” पदवी देऊन टाकली होती. आज जेव्हा मी संपूर्णपणे निवृत्त जीवन जगत असले तरी त्यावेळेची माझी मानसिक स्थिती आठवली की लक्षात येते निवृत्ती आणि रिकामपण या दोन्ही संज्ञांचे अर्थ फार निराळे आहेत. शिवाय ते वयाशी सापेक्ष आहेत. निवृत्तीत “आपण एक परिपूर्ण आयुष्य जगलोय. ” हे समाधान असतं आणि रिकामपण, निवांतपणा अथवा क्रियाशीलशून्यता किंवा अजिबातच अरचनात्मक जीवन जगण्यात कमालीचं नैराश्य असतं आणि माझ्यासारख्या आयुष्याबद्दल वेगळ्या कल्पना असणाऱ्या व्यक्तीसाठी तर ते अधिकच कठीण होतं.
पण सहजीवनातलं एक चिरंतन मर्म असतं. एकमेकांच्या मनातली वादळं शब्दाविना समजणं.. नुसतच समजणं नव्हे तर त्याबाबतीतली योग्यायोग्यता स्वीकारणे.
एक दिवस विलास ने आबांना(माझ्या सासऱ्यांना) सांगितले, ” माझ्या व्यवसायाची घडी आता नीट जमली आहे. व्याप्तीही वाढत आहे. या सर्व बाबींचा विचार करता आम्ही दोघांनी जळगावलाच राहण्याचा विचार केला आहे शिवाय अमळनेर मध्ये मला माझे भविष्य घडवता येईल असे वाटत नाही. ” हे सर्व सांगताना विलासने अत्यंत विचारपूर्वक, शांत, नम्र, न दुखावणारी भाषा वापरली होती. माझे सासरे ही अत्यंत समंजस वृत्तीचे होते. दुराग्रही अजिबात नव्हते शिवाय त्यांचा “दादा”वर(विलासवर) पूर्ण विश्वास होता. एकत्र परिवारापासून जरी तो दूर राहिला तरी कुटुंबाविषयी त्याची मानसिक आणि नैतिक बांधीलकी तो कधीच डावलणार नाही याची त्यांना खात्री होती. पिता-पुत्रांमधला हा घट्ट बंध कसा आणि का तुटेल?
ते एवढंच म्हणाले, ” बरं. तू जे करशील ते योग्य आणि विचारपूर्वकच करशील. आपल्या कुटुंबात आजपर्यंत मात्र कुणीही न उचललेलं असं हे तुझं धाडसाचं पाऊल आहे. माझे तुम्हा दोघांसाठी आशीर्वादच आहेत. ”
त्याचवेळी विलासने आणखी एक मनाशी ठाम ठरवलं होतं. एक दिवस तो मला म्हणाला, ” हे बघ आपण विसरून जायचं की आपण या व्यापक स्थावर, जंगम आदी मालमत्तेचे वारस आहोत. आपण स्वतःच आपलं आयुष्य घडवायचं. कुणाच्याही आर्थिक पाठिंब्या शिवाय. नाहीतर आपल्याला आपल्या क्षमताच कळणार नाहीत. ”
या एका रेषेवर आमचं दोघांचंही शतप्रतिशत एकमत झालं आणि याच रेषेवरून आमचा सहजीवनाचा खरा प्रवास सुरू झाला.
जळगावला आम्ही दोघं भाड्याने घेण्यासाठी चांगले घर शोधत होतो. वास्तविक माझ्यासाठी जळगाव आणि अमळनेर ही दोन्ही नगरे अनोळखीच होती. जळगावचे दोन भाग होते. जुनं जळगाव आणि नवं जळगाव. नवीन जळगावचा परिसर स्टेशन पासून, मार्केट पासून आणि विलासच्या ऑफिसपासून सुद्धा दूरच होता पण कलेक्टर ऑफिस, पोलीस चौकी, रिंग रोड चा भाग सुधारित होता. बरीचशी पायपीट करून आम्ही तिथल्याच ब्रुक बाॅन्ड कॉलनी जवळ येऊन ठेपलो. आम्हाला दोघांनाही ती कॉलनी फारच आवडली. थोड्या थोड्या अंतरावर एक मजली बंगले असलेली ही कॉलनी आमच्या मनातच भरली. इथे एखादं घर भाड्याने मिळालं तर किती छान होईल हा विचार दोघांच्याही मनात त्याच क्षणी चमकला. आम्ही तिथेच घुटमळत राहिलो. कुणाला भेटायचं, कुठे चौकशी करायची याविषयी आम्हाला काहीच माहीत नव्हते. त्याचवेळी एका मध्यमवयीन बाईंनी आम्हाला पाहिले असावे. त्या ओट्यावरून फाटकापर्यंत आल्या आणि त्यांनी तिथूनच आम्हाला बोलावले. क्षणभर “आमचं काही चुकलं का” असंच आम्हाला वाटलं पण त्यांनी अगदी मृदू आवाजात विचारलं, ” कुणाचा पत्ता हवाय का तुम्हाला? तुम्ही या भागात नवीनच दिसताय् “
तेव्हा मी एकदमच म्हटलं, ” नाही. आम्ही घर शोधतोय आमच्यासाठीच भाड्याने. ” त्या प्रौढ महिलेच्या चेहऱ्यावर एक स्मित रेषा उमटली.
“३ब मध्ये एक वरचा ब्लॉक रिकामा होता पण आत्ताच एका फॅमिलीशी बोलणं झाले आहे. तुम्ही थोडे आधी आला असता तर मी तुम्हालाच तो दिला असता. ”
म्हणजे त्या या कॉलनीच्या सेक्रेटरी वगैरे असाव्यात.
त्यांचे बोलणे ऐकून आम्ही दोघेही मनातून खूपच खट्टू झालो. त्या बाईंच्या मनातही काहीतरी विचार आला असावा. त्या लगेच म्हणाल्या, ” तुम्ही जर तीन महिन्याचं आगाऊ भाडं आता दिलंत तर मी देते तुम्हाला हा ब्लॉक. आधीच्याना काय सांगायचं ते मी बघेन. ”
भाडं काही फार जास्त नव्हतं पण तितके ही पैसे आमच्या जवळ नव्हते पण विलास म्हणाला, ” चालेल मावशी. मला एक तासाचा वेळ द्या मी आणून देतो पैसे पण आम्हाला हे घर द्याच, ”
आबासाहेब संन्याशीव.
सुभाष चौकात त्यांचं कापड दुकान होतं. ते विलास च्या मावस बहिणीचे पती. अतिशय सालस, मराठमोळं, उंच व्यक्तिमत्त्व. संथ, मधुर बोलणं. पांढरंशुभ्र दुटांगी धोतर, तसाच शुभ्र झब्बा आणि डोक्यावर पांढरी खादीची टोपी. त्यांनी पैसे कशासाठी हवेत हे सुद्धा विचारले नाही पण विलासने त्यांना सर्व वृत्तांत ऐकायला लावला. ते म्हणाले, “जा! जा! आधी तुझं काम पूर्ण करून घे मग निवांतपणे बोलू. ”
का कोण जाणे पण या व्यक्तीमध्ये मला माझ्या पप्पांचाच भास झाला.
“तीन ब, ब्रुक बॉन्ड कॉलनी रिंग रोड जळगाव” हे आमचं पहिलं दोघांचं घर. इथूनच आमच्या वैवाहिक आयुष्याच्या जडणघडणीचे पर्व सुरू झाले.
आम्हाला घर मिळवून देणाऱ्या त्या बाई पुढे “पांडे मावशी” म्हणून आमच्या आयुष्याचा एक भक्कम मानसिक आधार बनून राहिल्या. तो एक हळवा कोपरा आजही मी मनात जपून आहे…
कधीकधी घराच्या दारावर, खिडकीवर कावळा ‘काव – काव’ करत सतत ओरडत असतो, तेव्हा घरातली माणसं म्हणतात, ‘कावळा ओरडतोय, आज कोण पाहुणे येणार आहे कोण जाणे!’
पाहुणा येण्याचा तो एक संकेत मानला जात असे. पाहुणा, पाहुणचार हे मराठीतील शब्द आपल्याला परिचित असे आहेत.. कायमचा न राहणारा असा तो पाहुणा!
त्यावरून मला मी पूर्वी आकुर्डीला मुलांना घेऊन माहेरी जात असे, तेव्हाची गोष्ट आठवते. माझ्या भावाची मुले आणि माझी मुले वयाने जवळपास सारखीच होती. एकत्र खेळत असत, तशीच सतत भांडतही असत छोट्या छोट्या गोष्टींसाठी! त्यांची भांडणे, रडा रडी होत असे. तेव्हा माझे वडील समजून घालायचे. तिथल्या नातवंडांना सांगायचे, ‘अरे दे त्याला तो मागतोय तो खेळ, चार दिवसांसाठी पाहुणा आलाय ना तो!’असा हा पाहुणा काही का राहून परत आपल्या घरी जाणार हे ठरलेलं असायचं!
‘पाहुणा’ शब्द आणखी एका संदर्भात मला आठवतो. पावसाळ्याच्या दिवसात दुपारनंतर पाऊस सुरू झाला की, ‘माझा सासुबाई म्हणायच्या की, आता हा संध्याकाळचा पाव्हणा आलाय, आता कुठला तो थांबतो!’ म्हणजे हा पाऊस आता रात्रभर पडणारच अशी त्यांना खात्री असायची!
लग्न होऊन मुलगी सासरी गेली की माहेरच्या घरात ती पाहुणी होते! ती जेव्हा माहेरी येते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की, आपली खोली, आपलं कपाट, किंवा वस्तू आता इतरांनी व्यापलेला आहेत! आपण इथे पाहुणे आहोत माहेरी! चार दिवस माहेरच्या माणसांबरोबर राहून पुन्हा तिला सासरच्या घराची ओढ लागत असते..
पूर्वीच्या काळी मुली लग्नाच्या वेळी लहान असत.. त्यामुळे विविध कारणांनी मुलीला माहेरी बोलावले जाई. हळूहळू मुलगी मोठी होई आणि सासरच्या घरात रूळून जाई! ही परंपरागत रीत! बहिणाबाई चौधरी आपल्या गीतात सांगतात, ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते!’
लग्नाच्या वेळी दुसऱ्या घराला नवीन असलेली ती मुलगी काही वर्षातच ते ‘आपलं घर’ मानायला लागते! आणि तिथे पाहुणी राहत नाही..
आपल्याकडे बरेचसे सणवार साजरे करताना ‘पाहुणे’ म्हणून देवही येतात! भाद्रपदात गणपती पाहुणा म्हणून येतो. तो कुठे दीड दिवस, कुठे पाच दिवस, सात दिवस तर कुठे दहा दिवस, अनंत चतुर्दशी पर्यंत तो रहातो.. तेव्हा आपल्या मनात गणपतीचा पाहुणचार ही भावना असते.
आपण गणपतीसाठी आरास करतो, त्याला मखरात बसवतो, गोडधोड खायला घालतो आणि त्याचे कौतुक करतो. गणपती पाठो पाठ त्याच्या बहिण रुपात गौरी पाहुणी येते. तिलाही आपण जेऊ खाऊ घालतो आणि मगच गणपती- गौरीचे विसर्जन करतो. हे पाहुणे आपल्याला आनंद देतात. ‘ गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे सांगून आपण गणपती- गौरींना निरोप देतो.
‘पाहुणी आली माझ्या घरी, अंबिका माया जगदीश्वरी’ या गीताने आपण नवरात्रात देवीचे स्वागत करतो. नऊ दिवस देवी विविध रूपात आपल्याकडे पाहुणी म्हणून येते. आपण देवीला सजवतो, तिची विविध रूपे उभी करून तिच्या दर्शनाचा, अस्तित्वाचा आनंद घेतो.. अशी ही देवी नवरात्राची पाहुणी असते! नेहमीप्रमाणे हे सर्व लिहिताना मला जाणवते की, हिंदू संस्कृतीतील प्रत्येक सण हा आपल्याला नवीन काही शिकवतो. ‘ अतिथी देवो भव’ हे तर आपण घरातच शिकतो. असे हे देवस्वरूप मोठे पाहुणे माझ्या मनामध्ये आठवले!
काळ जसा बदलत गेला तशी ” पाहुणा ” शब्दाची संकल्पना ही बदलत गेली. आपल्या घराच्या चौकटीत राहणाऱ्या आधुनिक समाजाला पाहुणा म्हणजे काहीशी अडचणच वाटू लागली. एकत्र कुटुंब पद्धती बऱ्याच कारणाने कमी होत गेली. विभक्त कुटुंबाला पाहुणचार करायला ही वेळ नाही अशी स्थिती होत गेली. कारणे काहीही असोत, घर लहान असेल, घरातील दोन्ही व्यक्ती नोकरी करत असतील किंवा इतरही आर्थिक कारणे असतील तर पाहुणा हा नको वाटतो. आवर्जून लोकांना बोलावणे कमी झाले आहे, संपले नाहीये!
………
आत्ता पाहुणा हा विषय माझ्या मनात डोकावला तो माझ्या लेकीकडे दुबईला येण्याने! इथे आल्यापासून मुलगी, जावई नातवंडे सतत आजीची चौकशी करतात ती ‘कम्फर्टेबल’ आहे ना म्हणून !माझी काळजी घेतात. मी महिनाभरासाठी इथे आले आहे, त्यामुळे माझ्या नातीने आपल्या कपाटातील दोन कप्पे आजीला तिचे कपडे, सामान ठेवण्यासाठी रिकामे करून दिले तर नातवाने आजीला सगळं मिळतंय ना, याची चौकशी केली! रोज संध्याकाळी आजीला घेऊन चक्कर मारून आणायचे काम दोन्ही नातवंडांनी स्वखुशीने स्वीकारले! अशावेळी वाटतं माझ्यासारखी भाग्यवान मीच! इतका छान पाहुणचार मिळतोय आपल्याला!!
“पाहुणा” हा शब्द आपण वेगवेगळ्या ठिकाणी वापरतो. एखाद्या कार्यक्रमासाठी आपण जेव्हा प्रतिष्ठित व्यक्तींना निमंत्रित करतो, तेव्हा त्यांना “पाहुणे” म्हणून योग्य तो सन्मान दिला पाहिजे, स्वागत केले पाहिजे.. तेव्हाच त्या पाहुण्यांनाही आनंद वाटेल! पाहुणचार घेतानाही तो आपल्याला दिलेला सन्मान आहे, याचे भान ठेवून, आपण पाहुणा या पदाला योग्य असे वागले पाहिजे हेही पाहुण्याचे कर्तव्यच असते!
निसर्गामध्ये ही विविध प्रकारचे ‘पाहुणे’ हजेरी लावत असतात. काही वनस्पती ठराविक काळातच येतात आणि जातात, जसे पांढरे शुभ्र ब्रह्मकमळ ठराविक दिवसातच येते आणि ते रात्री पुरतेच राहते! पक्षी सुद्धा पाहुणे म्हणून एका देशातून दुसऱ्या देशात ‘पाहुणे’ म्हणून येतात. उत्तरेकडची थंडी सोसत नाही म्हणून खूप दूरचा प्रवास करून इग्रेट्स, कॉर्मोनंट्स् सारखे पक्षी पाहुणे म्हणून येतात. थंड वातावरणात असणारे पेंग्विन सारखे पक्षी गरम देशात कृत्रिम रित्या बर्फ निर्माण करून तिथे पाळतात पण ते पाहुणे काही काळापुरतेच असतात.
पक्षी, प्राणी आणि आपण सुद्धा या जगात ‘पाहुणे’ म्हणूनच आलो आहोत, ही जाणीव माणसाने कायम मनात ठेवली पाहिजे. प्रत्येकाला वाटते की या पृथ्वीतलावर आपण कायमचेच राहायला आलो आहोत! पण देहाची नश्वरता लक्षात आली की जाणवते, आपण तर इथे पाहुण्यासारखेच आहोत! जेव्हा केव्हा परमेश्वराचे बोलावणे येईल तेव्हा हा देह सोडून आपल्याला परत जायचे आहे! त्यामुळे मानव रुपात असताना आपण चांगले राहिले पाहिजे. निसर्गाचा, पर्यावरणाचा ऱ्हास होईल अशी कृती न करता निसर्गाला त्याचे अस्तित्व टिकवून ठेवायला मदत केली पाहिजे! परमेश्वराच्या कृपेने आपल्याला मानव जन्म मिळाला आहे त्या परमेश्वराचे आपण ऋणी राहिले पाहिजे. हे जग मानवाने व्यापले आहे. आपल्या प्रमाणेच सर्व प्राणी, पशुपक्षी आणि निसर्ग या पृथ्वीचे भागीदार आहेत. सजीवांचे संवर्धन, संगोपन या निसर्गातच होत असते. या पृथ्वीतलावर राहताना ‘हे जग आपल्याला कधीतरी सोडून जायचे आहे याची जाणीव ठेवली पाहिजे. आपण जन्माबरोबरच मृत्यूला घेऊन येत असतो. मृत्यू म्हणजे विनाश नाही तर जिवाचे स्थित्यंतर आहे असे प्रत्यक्ष भगवान कृष्णाने सांगितले आहे. एक वस्त्र टाकून दुसरे वस्त्र परिधान करतो त्याप्रमाणे जीव दुसऱ्या रूपात प्रकटतो हे कृष्णाने अर्जुनाला सांगितले, त्याचाच अर्थ असा केला या पृथ्वीवर आपण ‘पाहुणे’ म्हणूनच येतो…. आणि त्याला कधीतरी ” परतीचा प्रवास” हा असतोच!
“ नको वापरू गंss तो ब्लाऊज आता, किती जुना झालाय. नवीन शिवून आणलेत त्यातले वापर कि. तुझ्या पसंतीचे सफेद आणि ऑफ व्हाईट आणले आहेत. माप सुद्धा अगदी तू दिलं होतंस ते…. सगळीकडून मोकळं सैलवालं.. अगदी तुला हवं तसं. “
“ हंsss काढेन वापरायला. “
“ कधी ते? “
मग चैत्र पाडव्यापासून थेट दिवाळीपर्यंतचे वायदे व्हायचे.
आम्ही गप्प किंवा पुन्हा तेच तेच सांगून कंटाळलेले.
“ आणि परकर? त्यांची तर दशा झालीये. “
“ माहिताय मला. “
“ ते सुद्धा तुला हवे तसे लांडे लांडे आणलेत. लांब परकर पायापायात येतात म्हणून नको म्हणतेस ना? मग हे बाद कर आणि नवे वापरायला लाग. नवे परकर गरम पाण्यातून तीन वेळा धुवून काढत मऊ पण करून ठेवलेत. “
“ हो गं बाईsss… वापरेन. तुमचे कोणी पाहुणे किंवा मित्र आले तर तशीच समोर नाही यायचे, काळजी करू नका. आणि मी काही फाटके कपडे वापरत नाही. सगळं छान शिवणकाम येतं मला. जरा कुठे फाटलं उसवलं तर तुम्ही कपडा टाकून देता. मी बघ किती छान रफ़ू केलंय परकराला आणि हा छोटासा पॅच… कोणाला कळायचा सुद्धा नाही. आणि मला सांग परकर कोणाला दाखवायला का जातो आपण? “
“ अगंss आई, दाखवायला म्हणून नाही पण प्रत्येक कपड्याचं सुद्धा एक आयुष्य असतं आणि कपडा घातल्यावर आपल्याला छान वाटणं सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं कि नाही? ‘
बस…. या वाक्यावर बोलणाऱ्याची विकेट.
“ बघ.. तूच आत्ता म्हणालीस कि कपडा घातल्यावर आपल्याला छान वाटलं पाहिजे. (आणि आवाज अचानक मऊ मुलायम बिचारा बापुडवाणा होऊन जातो). नवा कपडा तुम्ही कितीही मऊ करून दिलात तरी नाही गं सोसत मला आताशी. नवे ब्लाऊज कितीही सैल शिवले तरी कुठेकुठे काचतातच. मात्र हे जुने कपडे, वापरून छान मऊमऊ झालेले, जणूकाही आपल्या शरीराचाच भाग वाटतात….. बरं वाटतं गं. कधीच टाकू नै वाटतात हे मऊ कपडे. “
– – – हे बोलणारी आई… आज नाही.
मी आणि वहिनी नेहमी या कपडे मॅटरवरून तिला टोकायचो; अर्थातच प्रेमाने… आणि तिने नवे धडके कपडे घालावे या हेतूनेच. पण विक्रम वेताळाच्या गोष्टीप्रमाणे थोड्याफार फरकाने हेच हेच डायलॉग सुरु रहायचे. वहिनीचं म्हणणं तिने ऐकलं नाही कि वहिनीचा मला फोन यायचा …’ बघ ना गं आईंना किती सांगितलं तरी ऐकत नाहीत. आता तूच सांग काहीतरी. ’
मग मला अधलंमधलं काहीच ठाऊक नाही अशा अविर्भावात मी माझ्या शब्दात तेच सांगणार. थोडं आश्चर्य, थोडं रागावणं, थोडं प्रेमळ भाष्य, थोडा अधिकार असं सगळं.
– – हा उंदीर मांजराचा खेळ आता संपला.
पण हे सगळं आज आठवायचं कारण म्हणजे रोजच्या वापरातला पंचा खूप जुना झाला. अगदी फाटला नाही पण रंग फिका झालेला. नवीन दोन पंचे कधीचेच आणून ठेवलेले. खरंतर कोणी सांगत नाहीये की जुना पंचा बाद कर. पण प्रत्येक वेळी तो टाकायचा विचार आला कि मी म्हणते… अजून थोडे दिवस वापरते की. वापरून वापरून किती छान मऊ झालाय…. जणू काही माझ्या देहाचा एक भागच.
.. ‘ आह… हेच वाक्य तर आई म्हणायची. ’
आणि मी तो जुना, खरंतर विटलेला म्हणावासा पंचा अतीव मायेने लपेटून घेते.
हंss… हे आणि असं चालूच असतं.
…. आणि नको तेव्हा पाणी येतंच डोळ्यात. पाणी वेडं असतं.
मदर्स डे एवढ्यातच होऊन गेला. लोकांनी खूप खूप आठवणी सांगितल्या आईच्या.
कोणी असलेल्या आईच्या.. कोणी नसलेल्या.. तर कोणी…!!
पण.. आई असतानाच्या कथा वेगळ्या असतात आणि आई नसतानाच्या गोष्टी खूssप निराळ्या.
लेखिका : सुश्री स्मिता गानू जोगळेकर
प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
सांगली
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
‘टाटा मोटर्स’चा, म्हणजे पिंपरी आणि चिंचवडच्या कारखान्याचा परिसर मोठा निसर्गरम्य आहे. पिंपरी वाघिरे भागातला एकेकाळी ओसाड, माळरान, खडकाळ, ओबडधोबड, दगडगोट्यांनी आणि काटेरी झुडुपांनी व्यापलेला सुमारे अठराशे एकरांचा हा परिसर आता वड, पिंपळ, औदुंबर, कदंब, कांचन, पांगार, बहावा, टबुबिया, कशिया, स्पथोडिया, ग्लिरिसिडिया, जकरेंडा, पेल्टाफोरम, बाटलब्रश, निरगिरी इ. कितीतरी बहुगुणी आणि पर्यावरण समृद्ध करणाऱ्या वृक्षांची लागवड केल्याने आता नंदनवन झालाय. नानाविध पक्षांचा तिथे मुक्त संचार असतो. पिंपरीच्या कारखान्याच्या परिसरात तर चक्क एका वाघोबानेही काही काळ तिथे निवास केल्याचे ऐकले असेल! जगविख्यात पक्षिनिरीक्षक डा. सलीम अली सुद्धा इथे पक्षी पाहण्यासाठी आवर्जून येत असत कधी कधी.
चिंचवडचा प्लँट म्हणजे पूर्वीची ‘इन्व्हेस्टा मशीन टूल्स कंपनी. ‘ ‘टेल्को’ कंपनीने ती ताब्यात घेऊन तिथे आपली ‘ मशीन टूल डिव्हिजन’ सुरू केली. कालांतराने फौंड्री, ए पी डी इ. विभाग सुरू केले. तर या चिंचवडच्या कारखान्यात, उत्तरेला ‘स्टडर्स बिल्डिंग’ नावाची, इंग्रजी ‘सी’ च्या आकाराची एक बैठी एकमजली वातानुकूलित इमारत आहे. तिला ऐसपैस पडवी आहे. इतर शॉप्स आणि इमारतींपासून ती जरा दूर आहे. तिच्या मागे उत्तरेला दाट झाडी आहे. त्यामुळे तिथे अनेक पक्षांचा राबता असतो. या परिसरात मानवाची फारशी वर्दळ नसते. या इमारतीत ‘आर अँड डी १’, ‘मेकनिकल अँड हायड्रॉलिक लॅब अँड टेस्टिंग’ आणि मेट्रोलॉजि’ हे विभाग आहेत. त्यावेळी काही काळापुरती माझी नियुक्ती या हायड्रॉलिक लॅब विभागात झाली होती.
ते पावसाळ्याच्या सुरुवातीचे दिवस होते. दुपारी तीन-चारची वेळ होती. आकाश झाकळून आले होते. सर्वत्र अंधार पडला होता म्हणून बिल्डिंगमधले दिवे लावले. जेव्हा इमारत विद्युत प्रकाशाने उजळून निघाली, तेव्हा लक्षात आले की कॉरिडॉर मात्र अंधारात आहे. तिथल्या ट्यूबलाईट्स लागत नाहीयेत. मी लगेच सी पी ई डीला (सेंट्रल प्लांट इंजिनियरिंग डिव्हिजन) फोन करून कळविले आणि सर्व नवीन ट्यूबलाईट्स बसवायची विनंती केली. पाच वाजता जनरल शिफ्ट संपल्यामुळे मी घरी निघून गेलो.
दुसऱ्या पाळीतील सी पी ई डी च्या कर्मचाऱ्याने तत्परतेने येऊन कॉरिडॉरमधील सर्व दिवे बसवले. त्याचे हे काम होईतो जेवणाची सुट्टी झाली. त्याने बरोबर आणलेल्या शिडीची घडी घालून ती पडवीच्या एका कोपऱ्यात भिंतीला टेकवून उभी केली आणि तो गेला. शिडी तशी तिथेच राहिली. ती परत न्यायची तो विसरला आणि पुढे सात-आठ दिवस ती तशीच पडून राहिली.
एक दिवस माझ्या दृष्टीस ती शिडी पडली. मी सी पी ई डी ला फोन करून ती शिडी त्वरित घेऊन जायला सांगितले. मला कर्मचाऱ्याच्या निष्काळजीपणाचा रागही आला. काही वेळाने शिडी न्यायला एक जण आला पण त्याने शिडीला हातही लावला नाही. नुसताच तिच्याकडे बघत बघत, आला तसा परत गेला. शिडी तिथे कोपऱ्यात होती तशीच उभी!
दुसऱ्या दिवशी मी जरा तणतणतच फोन केला. म्हटलं, “काय चाललंय हे? ती शिडी का नेत नाही तुम्ही? आता आठ दिवस होऊन गेले इथले काम करून. काम झाल्यावर पुढचे निस्तरायला नको वेळच्यावेळी? ” पलीकडून मलाच प्रश्न झाला, “काय? अजून नाही नेली? कमाल आहे. मी कालच सांगितलं होतं आणायला. इथे आमच्या डिपार्टमेंटचं कामही अडून राहिलंय त्यामुळे. मी आत्ता लगेच पाठवतो कोणालातरी आणि उचलून आणतो. ” मी तरीही जरा जोरातच बोललो, “आत्ताच्या आत्ता हलवा इथून. आहो, म्हणजे आम्ही फाईव्ह एस ची डिसिप्लिन काटेकोरपणे पाळायची, त्यासाठी परिश्रम घ्यायचे आणि तुम्ही ही अशी गलथान कामं करायची? ते काही नाही. त्वरित उचला इथून. “
तो कर्मचारी परत आला पण शिडी उचलायच्या ऐवजी सरळ माझ्या केबिनमधे शिरला आणि अजिजीने म्हणाला, “एक्स्ट्रिमलि सॉरी सर. काईंडली एक्स्यूज मी. सर, खरं म्हणजे मी परवा शिडी न्यायला आलो होतो. शिडी उचलायला तिच्या जवळ गेलो तो माझ्या लक्षात आले की त्या शिडीच्या वरच्या एका पायरीच्या सांदीत एक पक्षांची जोडी आपले घरटे करत्येय. ते अर्धेअधिक झालंय करून. पुढच्या चार-पाच दिवसात बांधून पूर्ण होईल बहुतेक. ते पाहून मनात विचार आला, बिचाऱ्यांनी काडी काडी गोळा करून घर बांधायला घेतलंय. दिवसभर आळीपाळीने हेलपाटे मारतायत दोघही. समजा, मी ही शिडी नेली तर त्याचे घरटे तुटेल. दोघांनी केलेले काम वाया जाईल. त्यांचे घरट्याचे स्वप्न अर्धवट राहील. त्यांनी घेतलेल्या साऱ्या कष्टांवर पाणी पडेल. पुन्हा त्यांना दुसरी सुरक्षित जागा शोधावी लागेल. परत काड्या, कापूस, चिंध्या शोधून आणाव्या लागतील. यात किती वेळ जाईल साहेब. त्यांचा सगळा शेड्यूल डिस्टर्ब होईल. पक्षांचा अंडी घालण्याचा हा सिझन आहे. म्हणून तर त्यांची लगबग चाललीय येवढी. अशात एखाद्याचे घर असे विनाकारण उध्वस्त करणे बरे दिसते का आपल्याला, तुम्हीच सांगा. असे पाप नको व्हायला हातून म्हणून मी शिडी नेत नाहीए. त्यातून जर तुमचा हट्टच असेल तर नेतो. पण मनाला पटत नाही हे. सांगा काय करू? नेऊ का राहू देऊ तिथेच? महिन्याभाराचा प्रश्न आहे. एकदा त्यांच्या पिलांना पंख फुटले की जातील भुर्रssकन् उडून. प्लीज कोआँपरेट करा सर. “
त्या कर्मचाऱ्याच्या भावना इतक्या प्रामाणिक होत्या, त्याच्या बोलण्यात येवढे आर्जव होते की मला काय करावे हेच सुचेना. तो माझ्याशी बोलत असताना इतर मशीनवर काम करणारे दोन-तीन आॕपरेटरही भोवती गोळा झाले. सर्वांना त्या कर्मचाऱ्याचे म्हणणे पटले असावे. खरे म्हणजे मलाही त्याचे म्हणणे पटले होते. त्याच्या या उदात्त विचारांना दाद द्यावीशी वाटत होती. त्याचे कौतुक करावसे वाटत होते.
तरीही मी म्हणालो, ” अरे असे कसे करता येईल. पुढचे दीड-दोन महिने ही शिडी अशीच ठेवायची कोपऱ्यात अडगळीसारखी, त्यावर धूळ, कोळिष्टकं जमायला! त्या भागाची झाडलोट, स्वच्छता होणार नाही. इट विल लुक अग्लि, अन्-टायडी, इनडीसेंट अँड विच इज नाट अक्सेप्टेबल”.
यावर माझ्याच शॉपमधला एक पुढे आला आणि म्हणला, ” सर, त्याची काळजी आम्ही घेऊ, इथे काम करणारे सगळे. ” “काळजी घेऊ म्हणजे नक्की काय करणार? जे दिसायला कुरूप आहे त्याला कसे रूप देणार तुम्ही? उगीच काहीतरी आपलं. ” मी तरीही विरोध दर्शविला.
त्यावर दुसरा म्हणाला, “सर, ते आमच्यावर सोपवा ना. एक दिवस जाऊ द्या. उद्या करू काहीतरी व्यवस्था. आम्ही केलेली व्यवस्था आवडली तर ठेवा. नाही तर हा त्याची लडर घेऊन जाईल. ही पाखरं दुसरा आश्रय शोधतील. आपण फाईव्ह एस च्या आग्रहासाठी आपल्या आश्रयाला आलेली पाखरं उडवून लावू. फाईव्ह एस चे आडिट होईल, आपल्याला सर्टिफिकेट मिळेल. मग आपण त्याला फ्रेम करून इथेच, या कोपऱ्यातल्या भिंतीवर टांगून ठेऊ. साऱ्या जगाला दाखवू आपले कर्तृत्व. ”
हा शेवटचा उपरोध अतिशय तीक्ष्ण आणि मर्मभेदी होता. विषय भावनिक झाला होता. औद्योगिक परस्पर संबंधांत ताण निर्माण करू पहात होता. कामगारांच्या म्हणण्यात सुसंस्कृतता, सहृदयता, भूतदया, पर्यावरणाचे भान, जबाबदारीची जाणीव इ. अनेक जीवनमूल्ये व व्यवसायमूल्ये डोकावीत होती. त्यांचा आदर करणे आवश्यक वाटले मला.
क्षणभर कोणीच काही बोललं नाही. मग मीच म्हणालो, “ठीक आहे. तुम्ही म्हणताय तर राहू दे शिडी तिथे. बघू नंतर. ” माझा निर्णय सगळ्यांना आवडला. “थक्यू सर. आम्ही काळजी घेऊ. ” असे म्हणत सगळे पांगले, आपापल्या मशीनवर जाऊन कामाला लागले. मी ही मिटिंगला निघून गेलो.
…
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे ऑफेसमधे आलो. दिवसाच्या कामाचे शेड्यूल सहकाऱ्यांना समजून सांगितले. कामाच्या सूचना दिल्या आणि टेबलावर येऊन पडलेले टपाल पहायला सुरवात केली. तेवढ्यात एक कर्मचारी टेबलाजवळ आला आणि म्हणाला, “सर, तुमचं हे हातातलं काम झालं की जरा कॉरिडॉरमध्ये याल का? बघा कसं झालंय ते. “त्याचा विषय माझ्या लगेच लक्षात आला आणि मी म्हणालो, “नंतर कशाला? हा आलोच, चल, तुझ्याबरोबर लगेच येतो. ”
बाहेर येवून बघतो तो काय! शिडी कोपऱ्यात पूर्वीसारखीच भिंतीला रेलून उभी होती. वरती गवताचे घरटे आकार घेतच होते. पण शिडीभोवती काही अंतरावर वर्तुळाकारात सुंदर फुलांच्या कुंड्या मांडल्या होत्या. त्याच्या बाहेर साखळीचे कुंपण उभारले होते. शेजारी एक स्टँड उभा करून त्यावर सुवाच्य अक्षरात एक पाटी लावली होती. त्यावर लिहिले होते, “please don’t disturb. Work in progress”.
जवळच्या एका झाडाच्या फांदीवर दोन पत्र्याची लहान डबडी लटकवली होती. एका डब्यात पाणी आणि दुसऱ्या डब्यात मुठभर राळे ठेवले होते. कामगारांची ही संवेदनशीलता, कल्पकता आणि योजकता पाहून मी थक्क झालो!
विशेष म्हणजे ज्या ‘फाईव्ह एस’ या जपानी व्यवस्थापनतंत्राचा अवलंब करण्याचे धोरण कंपनी आपल्या दैनंदिन व्यवहारात राबवू इच्छित होती, ज्याचे प्रशिक्षण प्रत्येक कर्मचाऱ्याला दिले होते त्या तंत्रातील सूत्रांचे तंतोतंत पालन या कर्मचाऱ्यांनी करून दाखविले होते!
त्यांना हे तंत्र इथे अवलंबायला कोणी सांगितले? कोणी शिकवले? निसर्गातील सर्व जीवजंतू, वनस्पती, भूमि, जल, वायू, पर्यायाने आपले पर्यावरण या विषयी आमचे कर्मचारी इतके जागरूक, दक्ष आहेत? ‘हो, आहेत’, हेच या प्रश्नाचे उत्तर. समोर दिसतंय हे त्याचे एक उत्तम उदाहरण!
निसर्गातील सर्व प्रकारच्या जीवनशृंखला जपण्याविषयी ते पुरेसे जागरुक आहेत, गंभीर आहेत हे पाहून धन्य वाटले. कारखान्यातील तंत्रज्ञान, कौशल्ये इ. विषयात त्यांना प्रशिक्षित केले जाते. ती व्यवसायिक गरज असते. तसे आरोग्य, पर्यावरण, सामाजिक कर्तव्ये, सुरक्षितता, समाज विकास इ. विषयी सुद्धा त्यांना प्रशिक्षित केले जाते हे आमच्या टाटा मोटर्सच्या प्रशिक्षण धोरणाचे वैशिष्ठ्य. हे त्यांना शिकवलेले ज्ञान खालपर्यंत झिरपत आहे हे सिद्ध करणारा हा प्रत्यक्ष पुरावा. प्रत्येकाला, पावलोपावली जे ज्ञान आणि भान दिले जाते, त्या ज्ञानाचा त्यांनी व्यवहारात केलेला हा उपयोग खरंच कौतुकास्पद होता.
मी त्यांचे मनापासून कौतुक केले. त्यांचे आभारही मानले कारण माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी त्यांच्या या अनोख्या उपक्रमात मलाही सहभागी होण्याची संधी दिली म्हणून!
पुढील दोन महिने माझे सर्व उत्साही सहकारी एखाद्या पहिलटकरीण लेकीची काळजी तिचे आई-वडील जशी घेतात तशी काळजी घेत होते त्या विहगयुगुलाची! त्या जोडप्याला कोणाचा जराही व्यत्यय होऊ नये म्हणून इतरांना तो रस्ताही तात्पुरता बंद केला त्यांनी. चक्क सूचनाच लावली त्या मार्गावर ” Entry prohibited”. ते स्वतःही सारे लांब उभे राहूनच काळजी घ्यायचे.
यथावकाश पक्षिणीने त्या घरट्यात चार अंडी घातली. दोघांनी आळीपाळीने ती उबवली. त्यातील तीन अंड्यातून पिले बाहेर आली. एक अंडे वाऱ्यामुळे खाली पडून फुटले. पुढील पंधरा-वीस दिवस हे पिलांचे भरण-पोषण-शिक्षणात गेले. काही दिवसात पिलांना पंख फुटले आणि एका रम्य सुप्रभाती चिवचिवाट करीत ती पिले घरट्यातून आकाशात आत्मविश्वासाने झेपावली!
ज्यांनी अथक परिश्रम घेऊन घरटे बांधले, त्यात आपला संसार थाटला, तीन पिलांना जन्म दिला, त्यांचे संगोपन करून जगायला सक्षम बनवले ते पक्षाचे जोडपे मात्र दुसऱ्या दिवसापासून अचानक दिसेनासे झाले. आम्ही कर्मचारी मित्रांनी दोन-तीन दिवस त्यांची वाट पाहिली. पण कोणीच फिरकले नाही!
साप्ताहिक सुटीनंतर कामावर आलो आणि आफीसमधे प्रवेश करताना सवयीप्रमाणे कॉरिडॉरच्या ‘त्या’ कोपऱ्याकडे लक्ष गेले. पण आता तर तो कोपराही रिकामा होता. शिडी आणि त्यावर उभारलेले घरटे अदृष्य झाले होते. फुलांच्या कुंड्या, साखळीचे कुंपण, जवळचा स्टँड, हे सारे उचलले गेले होते. खालची जमीन धुऊन पुसून स्वच्छ केली गेली होती. भिंतीवर एक नवीन पोस्टर चिकटवले होते. त्यावर लिहिले होते….
Project completed successfully!
Thanks to all team members for their active support and participation. “