मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “आईचं प्रेम.. तिचा स्पर्श” – लेखक : श्री दिलीप कुंभोजकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ “आईचं प्रेम.. तिचा स्पर्श” – लेखक : श्री दिलीप कुंभोजकर ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

कवी माधव ज्यूलियन

कविता : प्रेमस्वरूप आई (माधव ज्यूलियन)

कवी माधव ज्यूलियन म्हणजेच डॉ. माधव त्र्यंबक पटवर्धन यांची प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई! ही लोकप्रिय कविता. संगीतकार वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील ही कविता ऐकताना रसिकांचे मन गलबलते.

 पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहास कवी डॉ. माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन यांचे नाव देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला गेला आहे. माधव ज्यूलियन यांचा जन्म बडोदे येथे झाला तर प्राथमिक शिक्षण पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील आवळस येथे झाले. पण परत बडोदे येथे मामाकडे जाऊन त्यांनी बी. ए. केले.

नंतर मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयातून फारसी व इंग्रजीत एम. ए. केले. प्रथम फर्ग्युसन महाविद्यालयात प्राध्यापक होते पण नंतर अमळनेर, कोल्हापूर येथे फारसीचे प्राध्यापक म्हणून काम केले. वैयक्तिक आणि व्यावहारिक जीवनात त्यांना खूप तडजोड करावी लागली.

‘गॉड्ज गुड मेन’ या मेरी कोरलेली यांच्या कादंबरीतील एका व्यक्तिरेखेवरून माधवरावांनी ज्यूलियन हे नाव घेतले असे सांगितले जाते. ते रविकिरण मंडळाचे संस्थापक सदस्य होत. त्यांच्या ठिकाणी विद्वत्ता आणि कवित्व यांचा अपूर्व असा मिलाफ झालेला बघायला मिळतो.

जरी ते वृत्तीने झुंजार कवी जाणवले, तरी त्यांच्या साहित्यातून कणखरपणा बरोबर वात्सल्याची कोमल भावना अनुभवास मिळते. त्यांच्या ”गज्जलांजली” या निर्मितीमधून यौवनातील प्रेम व्यक्त झाले आहे पण त्या वेळेच्या समाजास हे मान्य झाले नाही, त्यांना ‘प्रणयपंढरीचा वारकरी’ ही पदवी देऊन हिणवले.

छंदोरचना’ या ग्रंथासाठी मुंबई विद्यापीठाकडून मराठी साहित्यातील योगदानाबद्दल त्यांना भारतातली पहिली डी. लिट. प्रदान केली गेली. ते १९३६ मध्ये जळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनात अध्यक्ष होते. मराठीत त्यांनी उमर खय्याम यांचा रुबाया तसेच गझल, सुनीत हे काव्यप्रकार समर्थपणे आणले. ‘फारसी – मराठी शब्दकोश’ ही त्यांनी महत्त्वपूर्ण देणगी मराठी सारस्वताला दिली आहे.

‘ प्रेमस्वरूप आई! वात्सल्यसिंधू आई! बोलावु तूज आता, मी कोणत्या उपायी? ’ 

ही कविता म्हणजे एक पोरका मुलगा जो आईच्या प्रेमाला लहानपणीच पारखा झाला आहे, त्याचे मनोगत आहे. त्याच्या मनोव्यापाराचे विश्लेषण आहे, त्याच्या भावनांचा हृदयस्पर्शी आविष्कार आहे. आजही आईच्या प्रेमाला लहानपणीच मुकले आहेत त्यांना ही कविता आणि लतादीदींचा स्वर गलबलून सोडतो. प्रेम ही भावना ही दोन जीवांना अंतःकरणापासून जोडणारा अदृश्य धागा आहे किंवा आत्ताच्या भाषेत Cordless Bluetooth आहे.

त्यातही आई आणि मुलगा / मुलगी यांचे प्रेम म्हणजे अत्युच्च आणि निरपेक्ष असा ऋणानुबंध आहे. कधी कधी वास्तव इतके भयानक असते की मन स्वीकारत नाही. आई आता परत येणार नाही हे माहीत आहे. तरीही मनात आठवणींच्या पलीकडील डोंब पेटल्यावर तो वात्सल्य सिंधूला म्हणजेच प्रेमाच्या सागराला विचारत आहे – ‘ बोलावु तूज आता, मी कोणत्या उपायी?  

नाही जगात झाली आबाळ या जिवाची,

तूझी उणीव चित्ती आई, तरीहि जाची.

चित्ती तुझी स्मरेना कांहीच रूपरेखा,

आई हवी म्हणूनी सोडी न जीव हेका॥१॥

आईविना वाढलेला, समजूतदार पोरका पोरगा प्रामाणिकपणे कबूल करीत आहे की माझी आबाळ झाली नाही, माझ्याकडे कोणी दुर्लक्ष केले नाही. तरीसुद्धा… “आई तुझी उणीव माझ्या अंतःकरणात कायम आहे. तुझा चेहरामोहरा मला आठवत नाही पण माझा जीव हे ऐकत नाही, माझ्या मनाला तुझा स्पर्श हवा आहे. ” ही वेदनेची संवेदना आहे. ”ज्याचे जळते त्याला कळते, ” या उक्तीनुसार कवी येथे व्यक्त होत आहे.

ही भूक पोरक्याची होई न शांत आई

पाहुनिया दुज्यांचे वात्सल्य लोचनांहीं

वाटे इथूनि जावे, तूझ्यापुढे निजावे

नेत्री तुझ्या हसावे, चित्ती तुझ्या ठसावे॥२॥

वात्सल्य म्हटले की गाय आणि वासरू आपल्या डोळ्यासमोर नकळत येतात. वात्सल्य हा एक निरपेक्ष प्रेमाचा आदर्श आहे. मुल रडले की आई त्याला पदराखाली घेते. तिच्या दोन हातांचा स्पर्शही तिच्या दुधाएवढाच महत्त्वाचा आहे, तिची मांडी हा त्या बालकांचा विश्वास आहे, कवच आहे.

कवी आर्तपणे आईला सांगतो आहे, की माझी शारीरिक भूक ही वरचे दूध भागवेल पण माझी मानसिक भूक हा तुझा स्पर्शच आहे. दुसऱ्यांचे असे प्रेम पाहून मी जास्तच अस्वस्थ होतो, वाटते की आत्ताच्या आत्ता निघावे आणि तू जिथे असशील तेथे येऊन तुझ्या जवळ निजावे, तुला भरभरून पाहावे, आतून हसावे आणि तुझ्या हृदयात, मनात, अंतःकरणात विसावे. कवीची ही हृदयस्पर्शी आळवणी ऐकून आपल्या डोळ्यात पाणी येते.

वक्षी तुझ्या परी हे केव्हा स्थिरेल डोके,

देईल शांतवाया हृत्स्पंद मंद झोके?

घे जन्म तू फिरुनी, येईन मीहि पोटी,

खोटी ठरो न देवा, ही एक आस मोठी॥३॥

या कवितेचा अभ्यास करताना मनात सहज विचार आला, की शेक्सपियरच्या हॅम्लेटची प्रत्यक्ष आई कुठे आणि माधव ज्यूलियन यांनी या कवितेत उभी केलेली अप्रत्यक्ष आई कुठे आहे? भावना दोन्हीकडे आहेत पण संस्कृतीच्या संस्काराचा आविष्कार वेगळा आहे. लहान बालकाचा अस्वस्थपणा आईने त्याला छातीपाशी जवळ घेतले की कमी होतो, हृदयाचे वाढलेले ठोके आपोआप मंद होतात.

आई मला माहीत आहे, की तू या जन्मी मला भेटणार नाही तरी तुला भेटण्याची मनातील आस कमी होत नाही. तू परत जन्म घे, मी परत तुझ्याच पोटी जन्म घेतो. ही माझी इच्छा देव नक्की पुरी करेल. आद्य शंकराचार्य यांच्या पंक्तींमधून आपली पुनर्जन्मावरील श्रद्धा म्हणते, “पुनरपि जननं, पुनरपि मरणं पुनरपि जननी, जठरं शयनं”॥ माधव ज्यूलियन या वरील ओळीत हेच सांगताहेत.

तू माय, लेकरु मी; तू गाय, वासरु मी;

ताटातुटी जहाली, आता कसे करु मी?

गेली दुरी यशोदा टाकुनि येथ कान्हा,

अन्‌ राहीला कधीचा तान्हा तिचा भुका ना? ॥४॥

विविध उदाहरणांतून कवी माधव ज्यूलियन आपल्या भावना या पोरक्या मुलाच्या द्वारे रसिकांपर्यंत पोचवत आहेत. गायवासरू असू दे नाहीतर मायलेकरू… ताटातूट सहन होत नाही. देवकीने जन्म दिला तरी यशोदेचे प्रेम तितकेच खरे आहे. कान्हा, पान्हा आणि तान्हा यांचे नाते अतूट आहे.

तान्ह्यास दूर ठेवी – पान्हा तरीहि वाहे –

जाया सती शिरे जी आगीत, शांत राहे;

नैश्ठूर्य त्या सतीचे तू दावीलेस माते,

अक्षय्य हृत्प्रभूचे सामीश्य साधन्याते॥५॥

तान्ह्या बाळाला, बालकाला सोडून आई जरी दूर दूर गेली तरी प्रेमाचा पान्हा फुटतोच ना? (“घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लापाशी” संत जनाबाई). सतीच्या निष्ठुर प्रथेवर १८२९ मध्ये बंगालमध्ये प्रथम बंदी आली, तरी संपूर्ण देशातील जनमानसात हा नियम रुजायला बराच काळ गेला. काही परिस्थितीचे बळी गेले, तरी आज सतीप्रथेचे कोणीच समर्थन करणार नाही. आज मथितार्थ एकच घ्यायचा की हा पोरका अनाथ मुलगा आईची उणीव जाणून आक्रोश करीत आहे.

विद्याधनप्रतिष्ठा लाभे अता मला ही,

आईविणे परी मी हा पोरकाच राही.

सारे मिळेपरं तू आई पुन्हा न भेटे,

तेणे चिताच चित्ती माझ्या अखंड पेटे ॥६॥

आईविना वाढलेला हा मुलगा म्हणत आहे, की जरी आज मी शिकलो आहे, लक्ष्मी प्रसन्न आहे, मानसन्मान मिळाला तरी मी ”पोरका”च आहे. सगळं ऐश्वर्य मिळाले तरी आईचे प्रेम माझ्या नशिबात नाही. ही भावना माझ्या पोटात कायम पेटलेली आहे, ती मध्येच प्रसंगाने माझ्या मनावर अधिकार गाजवते.

आई तुझया वियोगे ब्रह्मांड आठवे गे!

कैलास सोडुनी ये उल्केसमान वेगे

किंवा विदेह आत्मा तूझा फिरे सभोती,

अव्यक्त अश्रुधारा की तीर्थरूप ओती ॥७॥

‘आई… ‘ लतादीदींचा आर्त स्वर अंतःकरणात घुसतो, तेव्हा कवीचे शब्द त्या आवाजात विरघळून जातात. आई तुझा वियोग, दुरावा, त्याच दु:ख कमी करण्यासाठी मला अख्ख ब्रह्मांड शोधले तरी तू सापडली नाही. आकाशातील सुटणाऱ्या ताऱ्याप्रमाणे उल्का रूप धारण करून तू परत ये! तुझा आत्मा शरीररूपात नसला, तो विदेह असला तरी माझ्या सभोवती आहे. तुझ्या अव्यक्त भावना मला अश्रूरूपात दिसल्या तरी मला आशीर्वादाचे ते तीर्थ जाणवते.

आपल्याकडे एक अशी म्हण आहे, की अशी दु:खद वेळ आपल्या शत्रूवर सुद्धा येऊ नये. ज्यांना आईचे प्रेम आणि सहवास लाभला त्यांना या पोरक्या मुलांची व्यथा कदाचित जाणवणार नाही पण कोणत्याही सहृदयी माणसाला समजल्याशिवाय राहणार नाही. माधव ज्यूलियन आणि त्यांच्या “प्रेमस्वरूप आई”च्या स्मृतीस विनम्र अभिवादन!!


लेखक : श्री दिलीप कुंभोजकर

प्रस्तुती : श्री सुहास रघुनाथ पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘ती’ बस कंडक्टर अशी का वागली? – लेखक : श्री चंद्रशेखर वैद्य ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

सुश्री मीनल केळकर

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘ती’ बस कंडक्टर अशी का वागली? –  लेखक : श्री चंद्रशेखर वैद्य ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

मालेगांवला लग्नाला जायचं म्हणुन बस स्टँडवर आलो तरं सगळीकडे गर्दीचं गर्दी. लग्न सराई असल्यानं येणाऱ्या जाणाऱ्या एसटी बसेस प्रवाश्यांनी तुडुंब भरलेल्या.. बस्स! स्थानकाच्या आत शिरणारी बस पाहिले रे पाहिली की धावलेच प्रवासी. आतल्या लोकांना बस बाहेर येण्याची संधी न देता. जागा पकडण्याची नुसती शर्यत लागलेली. ड्राईव्हरची केबिन, खिडक्या, वाट्टेल तेथून आत जाण्याची धडपड. त्या गदारोळात अखेर महत्प्रयासाने मालेगांवला जाणाऱ्या बस मध्ये स्वतःला कोंबून घेतलं आणि कसाबसा दारांत उभा राहिलो. माझ्या नंतर बस मध्ये शिरायला कुणालाच वाव नव्हता इतकी बस फुल्ल होती.

आता ही बस कधी निघते याचं विचारात असताना लक्ष कंडक्टर सीट कडे गेलं. तर, त्यावर एक अगदीच तरूण कदाचित नवीनच असलेली महिला कंडक्टर एका हातात तिकिट देण्याचे मशिन आणि दुसऱ्या हातातला मोबाईल कानाला लावून कोणाशीतरी बोलण्यात मग्न होती. ‘निघालेच मी… अजुन थोडा वेळ जरा सांभाळा’ असं कांहीतरी काकुळतीला येवुन सांगत असल्याचं ऐकू येतं होतं. बोलणं झाल्यावर तिनं मोबाईल ठेवला आजुबाजुला एकदा पाहुन. डबल देण्यासाठी समोरची दोरी ओढली आणि तिकडं ड्राईव्हरने सेल मारला. पन्नास पंचावन्न प्रवाश्यांचे ओझे सांभाळत. कुरकुर करीत बस स्थानकाच्या बाहेर निघत मार्गस्थ झाली.

बस थोडीशी पुढे गेल्यावर ‘ती’ महिला कंडक्टर ‘तिकिट तिकिट’ हलक्या आवाजात ओरडली. पण बसचा आवाज आणि प्रवाश्यांची गडबड यांतच तिचा आवाज विरला. त्याचवेळी मी खिश्यातुन पैसे काढुन तिच्या समोर धरीत ‘एक मालेगांव’ म्हणतं तिकिट घेतलं. मग आजुबाजुला बसलेले उभे प्रवाश्यांची पैशे तिकिटाची देवघेव सुरु झाली. कदाचित काहींनी महिला कंडक्टर प्रथमच पाहिली असावी ते तिच्या प्रत्येक हालचाली टिपत होते. हसुन कांहीतरी कॉमेंट्स पास करण्यात धन्यता मानीत होते. शेवटी बसच्या मागील भागातील प्रवाश्यांना तिकिट देण्यासाठी ‘ती’ गळ्यातली ब्याग आणि मशिन सावरीत उभी राहत. कांही अनावधानाने होणारे.. कांही हेतुपुरस्सर दिलेले धक्के… होतं असणारे स्पर्श यांना चुकवीत.. तोल सांभाळीत… सुट्या पैशांवरून.. मुलांच्या वया वरून नेहमीचे होणारे वाद यांना तोंड देतं देतं मागे जावू लागली… पण, ती कुठंतरी हरवल्या सारखी वाटतं होती. कसल्यातरी काळजीत असल्या सारखी.

तिकिटे देवुन झाल्यावर ती पुन्हा सीटवर येवुन अधीरतेणे शुन्यात नजर लावून बाहेर बघत होती. मधुनच येणाऱ्या मोबाईलवर ‘आलेच… पोहोचतेच’ अशीच उत्तरं देवुन फोन कट करीत होती. दरम्यान, बसने चांदवडचा टोलनाका पास केला होता. चांदवडच्या बस थांब्यावर बस उभी राहताच उतरणारे चढणारे यांची पुन्हा एकवार झुम्बड उडाली आणि त्या गर्दीत ‘ती’ घाईघाईने खाली उतरून गेली. एसटी बस पासुन थोड्या अंतरावर एक पडदे लावलेली रिक्षा उभी होती. चपळाईने ती रिक्षात शिरली. एव्हाना चढ उतार करणारे प्रवासी बस निघण्याची वाट पाहतं चुळबुळ करीत. बसची कंडक्टर गेली कुठं? असं विचारून ड्राईव्हरला भंडावून सोडीत होते. ‘येईल इतक्यात’ म्हणुन वेळ मारून नेत होता. माझंही कुतूहल जागं झालं होतं…

माझी नजर त्या दूरवर उभ्या रिक्षावर खिळली होती. कांहीच अंदाज येतं नव्हता. तोच ती रणरणत्या उन्हात उभ्या रिक्षातून घाईघाईने खाली उतरली. अक्षरशः धावत बसकडे येतं तिच्या सीटवर बसली आणि डबल बेल दिली. बस मालेगांवच्या दिशेनं निघाली. तिच्या शेजारी असलेला प्रवासी उतरून गेल्यानं मला बसायला जागा मिळाली होती. तिच्याकडे पाहताना एक जाणीव झाली. तिच्या चेहेऱ्यावरची काळजीची छटा लोपली होती. ती थोडीशी सावरल्या सारखी दिसतं होती.

नवीन प्रवाश्यांना तिकिट देवून ती शांत बसली होती. शेवटी न रहावुन. “ताई तुम्ही बस सोडून कुठं गेला होता? प्रवासी ओरडत होते” मी विचारलं… माझ्या अनपेक्षित प्रश्नानं क्षणभर ती गोंधळली. पण तडक उत्तरली.

“माझ्या साडेचार महिन्यांच्या बाळाला दूध पाजायला.. हों… नाशिक मालेगांव- मालेगांव नाशिक अश्या फेऱ्या मारताना रोजचं मला असं करावं लागतं… माझे पती इथेच चांदवडला रिक्षा चालवतात… सासुबाई बाळाला रिक्षात घेऊन येतात. भुकेने व्याकुळ झालेल्या माझ्या बाळाला मी दूध पाजते आणि पुढे जाते. कंडक्टर म्हणून आत्ताच नोकरीवर रुजू झाले. त्यामुळं रजा नाही. त्यासाठीच हे सगळं करावं लागतं. प्रवासी ओरडतात, तक्रारी करतात, पण त्याला ईलाज नाही. बाळासाठी नोकरीसाठी सारं सोसावं लागतं. ” ती बोलत होती. मी तिची व्यथा ऐकत होतो. न रहावून माझ्या जवळची माझी पाण्याची बाटली मी तिच्या समोर धरली. बुच उघडून ती अर्धे निम्मे पाणी घटाघटा प्याली. जणू बाळाला दूध पाजेपर्यत तिला तहान भुकेची कांहीच शुध्द नसावी इतकी ती तहानलेली होती. ‘धन्यवाद काका’ म्हणतं तिनं पाण्याची बाटली परत केली.

तिनं उलगडलेल्या तिच्या या अश्या दैनंदिन प्रवासाच्या कथेमुळं माझ मन हेलावल होतं. बाळासाठी आणि नोकरी टिकवण्याची तिची होणारी ससेहोलपट प्रत्यक्ष पाहतं अनुभवीत होतो. त्याचबरोबर नकळत तिच्यातील स्त्रीशक्तीला, तिच्या सहनशक्ती पुढं नतमस्तक होतं होतो. तिच्यातील मातृत्वाला. आपल्या बाळासाठी इतकं सगळं सोसणाऱ्या एका आईला वंदन करीत. आदराने तिच्या कडे पाहतं होतो. ती मात्र एखाद्या देवालयातील मुर्ती सारखी डोळे लावून शांत बसली होती. मालेगांव नाशिक येतांना पुन्हा आपल्या बाळाला दूध पाजण्याच्या विचारांत. स्वतःला तयार करीत असल्यासारखी….

लेखक : श्री चंद्रशेखर वैद्य

प्रस्तुती : सुश्री मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सम्राट अशोकाची जयंती का नाही?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

📚 वाचताना वेचलेले 📖

सम्राट अशोकाची जयंती का नाही?” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

सम्राट अशोकाची जयंती आपल्या देशात का साजरी केली जात नाही?

खूप विचार करूनही “उत्तर” सापडत नाही! तुम्हीही या “प्रश्नांचा” विचार करा!

सम्राट अशोक

वडिलांचे नाव – बिंदुसार गुप्ता

आईचे नाव – सुभद्राणी

“सम्राट” ज्याच्या नावाने जगभरातील इतिहासकारांनी “महान” हा शब्द लावला.

“सम्राट” चे राजेशाही चिन्ह “अशोक चक्र” भारतीयांनी त्यांच्या ध्वजात ठेवले.

“सम्राट” ज्याचे शाही चिन्ह “चारमुखी सिंह” हे भारत सरकारने “राष्ट्रीय चिन्ह” मानून चालवले आहे आणि “सत्यमेव जयते” स्वीकारले आहे.

ज्या देशात सैन्याचा सर्वोच्च युद्ध सन्मान, सम्राट अशोकाच्या नावावर आहे, तो “अशोक चक्र” आहे.

“अखंड भारत” (आजचे नेपाळ, बांगलादेश, संपूर्ण भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान) च्या विशाल भूभागावर एकहाती सत्ता गाजवणारा सम्राट, ज्याच्या आधी किंवा नंतर असा राजा किंवा सम्राट कधीच नव्हता…

सम्राट अशोकाच्या काळात “23 विद्यापीठे” स्थापन झाली. त्यामध्ये तक्षशिला, नालंदा, विक्रमशिला, कंदाहार इत्यादी विद्यापीठे प्रमुख होती. या विद्यापीठांमध्ये परदेशातून विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी भारतात येत असत.

“सम्राट” च्या कारकिर्दीला जगातील विचारवंत आणि इतिहासकार भारतीय इतिहासातील सर्वात “सुवर्ण काळ” मानतात.

“सम्राट” च्या काळात भारत “विश्वगुरु” होता. तो “सोन्याचा पक्षी” होता. जनता सुखी आणि भेदभावमुक्त होती.

ज्यांच्या कारकिर्दीत, “ग्रेड ट्रंक रोड” या प्रसिद्ध महामार्गासारखे अनेक महामार्ग बांधले गेले. 2,000 किलोमीटरच्या संपूर्ण “रस्त्या’च्या दोन्ही बाजूला झाडे लावण्यात आली. “सराय” बांधण्यात आली..

माणसं माणसं आहेत.. , प्राण्यांसाठीही, पहिल्यांदाच “वैद्यकीय गृह” (हॉस्पिटल) उघडण्यात आली. प्राण्यांची हत्या बंद झाली.

 – असा “महान सम्राट अशोक” ज्यांची जयंती त्यांच्याच देशात का साजरी केली जात नाही? तसेच सुट्टी जाहीर केलेली नाही?

ज्या नागरिकांनी ही जयंती साजरी करावी ते आपला इतिहास विसरले आहेत, आणि ज्यांना हे माहित आहे, त्यांना ही जयंती का साजरी करावीशी वाटत नाही हे कळत नाही हे खेदजनक आहे.

“जो जिंकतो तो चंद्रगुप्त” होण्याऐवजी “जो जिंकतो तो सिकंदर” कसा झाला??

चंद्रगुप्त मौर्याचा प्रभाव पाहूनच अलेक्झांडरच्या सैन्याने युद्ध करण्यास नकार दिला होता हे सर्वांनाच माहीत आहे. मनोबल वाईटरित्या तुटले आणि अलेक्झांडरला “मागे फिरावे” लागले.

आपण सर्वांनी मिळून ही “ऐतिहासिक चूक” सुधारण्याची शपथ घेऊया. 🙏

कवी : अज्ञात

प्रस्तुती : श्री सुनीत मुळे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “प्रपंच करतो आवडीने…” – कवी : संतोष मोकाशी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

सुश्री प्रभा हर्षे

? वाचताना वेचलेले ?

☆ “प्रपंच करतो आवडीने…” – कवी : संतोष मोकाशी ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆

प्रपंच आवडीने.. परमार्थ? .. सवडीने…

*

प्रपंच करतो आवडीने,

परमार्थ मात्र सवडीने.

नाही पूजा नाही ध्यान,

मोबाईलशी अनुसंधान

*

नामस्मरण boring फार 

त्याने काय होणार यार?

देवाने करावी कृपा खास 

गप्पा मारतो तासनतास

*

जप करतो माळेवर 

पण खरे प्रेम पैशावर

खिचडीसाठी करतो उपास

भक्तीमध्ये पूर्ण नापास

*

स्वतःच्या पानात वाटयांची दाटी,

नैवेद्याला छोटी वाटी

संकट आल्यावर देव आठवतो,

नवस बोलून deal करतो.

*

अभिषेक मोठ्या थाटात करतो,

return वरती डोळा असतो.

सर्व करतो स्वतःसाठी,

पण देव हवा सदा पाठी.

*

देवाकडं सारखं मागणं,

माणसा तुझं काय हे वागणं? – – 

*

शक्ती दे, युक्ती दे, बुद्धी दे,

विद्या दे नोकरी दे, घर दे,

बायको दे, मुलं दे सुख दे,

समाधान दे, यश दे, कीर्ती दे 

आणि हे सारं कायम टिकू दे,

असाही देवा वर दे!

*

हसून देव म्हणतो,

माणसा थकलो तुला देऊन सारखा 

मागण्या मागतोस फारच मस्त,

पण एवढा मी नाही स्वस्त

*

मागून मागून थकत नाहीस 

थँक्यू सुद्धा म्हणत नाहीस!

भक्तीमध्ये करतोस लबाडी,

अरे चाललीये कुठे तुझी गाडी.

*

एवढं सगळं द्यायचं म्हणतोस,

पण माझ्यासाठी काय करतोस?

थोडीफार आठवण काढून,

मलाच तुझी सेवा सांगतोस.

*

अरे एकदा तरी म्हण राजा,

देवा मला भक्ती दे.

मनी तुझे प्रेम दे 

पायी तुझ्या मुक्ती दे.

*

तुझे गीत गाण्यासाठी 

कंठामध्ये सूर दे 

तुझे रूप बघण्यासाठी 

डोळ्यांमध्ये भूक दे 

*

तुझा महिमा ऐकण्याची 

कानांना या आस दे

तुझे नाम घेण्यासाठी 

माझा प्रत्येक श्वास दे..!

*

सुटो माझी आसक्ती,

लाभो मला विरक्ती.

अंतकाळ साधण्याइतके 

नामामध्ये प्रेम दे

*

अंतकाळ साधण्याइतके

नामामध्ये प्रेम दे

।।रामकृष्ण हरि।।

कवी : श्री संतोष मोकाशी 

प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “महाभारताचा सारांश…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

सुश्री शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “महाभारताचा सारांश…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शोभा जोशी ☆

– – फक्त थोडक्यात महाभारताचा सारांश समजून घ्या, ज्यात पाच लाख श्लोकांचे सार आहे.

तुम्ही हिंदू असाल किंवा इतर कोणत्याही धर्माचे,

तुम्ही स्त्री असो वा पुरुष,

तुम्ही गरीब असो वा श्रीमंत,

तुम्ही तुमच्या देशात असाल किंवा परदेशात,

— —

  1. जर तुम्ही तुमच्या मुलांच्या अवास्तव मागण्या आणि इच्छांवर वेळीच ताबा ठेवला नाही तर तुम्ही आयुष्यात असहाय्य व्हाल… “कौरव”
  2. तुम्ही कितीही बलवान असलात तरी तुम्ही अधर्माला पाठिंबा दिलात तर तुमचे सामर्थ्य, शस्त्रे, कौशल्ये आणि आशीर्वाद सर्व निरुपयोगी होतील… “कर्ण”
  3. तुमच्या मुलांना इतके महत्त्वाकांक्षी बनवू नका की ते त्यांच्या ज्ञानाचा गैरवापर करून संपूर्ण विनाश घडवून आणतील… “अश्वत्थामा”
  4. अशी वचने कधीही देऊ नका की तुम्हाला अधर्मींना शरण जावे लागेल… “भीष्म पितामह”
  5. संपत्ती, सत्ता, अधिकार यांचा गैरवापर आणि चुकीच्या लोकांचे समर्थन हे शेवटी संपूर्ण विनाशाकडे नेत असते… “दुर्योधन”
  6. सत्तेचा लगाम कधीही आंधळ्या व्यक्तीकडे सोपवू नका, म्हणजे जो स्वार्थ, संपत्ती, गर्व, ज्ञान, आसक्ती किंवा वासनेने आंधळा आहे, कारण तो विनाशाकडे नेईल… “धृतराष्ट्र”
  7. ज्ञानासोबत शहाणपण असेल तर तुमचा विजय नक्कीच होईल… “अर्जुन”
  8. फसवणूक तुम्हाला सर्वच बाबतीत यशाकडे नेणार नाही… “शकुनी”
  9. जर तुम्ही नैतिकता, नीतिमत्ता आणि कर्तव्य यशस्वीपणे जपले तर जगातील कोणतीही शक्ती तुमचे नुकसान करू शकत नाही…“युधिष्ठिर”

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती: श्रीमती शोभा जोशी

मो ९४२२३१९९६२ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ “रामभक्त संत कबीर —…” – कवयित्री : डॉ. वंदना बापट ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

 ? वाचतांना वेचलेले ?

☆ “रामभक्त संत कबीर —…” – कवयित्री : डॉ. वंदना बापट ☆ प्रस्तुती – सुश्री सुनीला वैशंपायन ☆

गर्भवती ब्राह्मणी होती आनंदात 

आईपणाची स्वप्ने होती रंगवत 

*
अचानक पतीदेव गेले देवाघरी 

गर्भवती एकटीच पडली संगरी….

*
रामानंद स्वामींच्या दर्शनास गेली

पुत्रवती भव आशीर्वाद पावली

*
काशी तीर्थक्षेत्री पुत्र जन्मा आला

समाज भीतीने कमळपत्री ठेविला….

*
निरू निमा यवन दंपतीस दिसला 

‘अल्लाकी देन’ म्हणून प्रेमे सांभाळिला 

*

निरू निमा होते कुशल विणकर

सवाई विणकर बनला पुत्र कबीर

*

राम भजन रचण्याचा छंद त्यास लागला

भजन गात विणण्यात कबीर रमला….

*
असंख्य ग्रंथ वाचुनी बुद्धिवादी जाहला

अंधश्रद्धा कर्मकांड थोतांड ठरविला

परखड भाषेतून समाज सुधारला….

*
श्लोक नाही, ओवी नाही, आर्या नाही, अभंग नाही

जनहितकारक लेखन केले.. आगळे वेगळे नाव लाभले

*
कबिराचे दोहे म्हणुनी दिगंतरी नावारूपा आले 

कबीर राम रूपी रंगला जन मानसात भक्तिमार्ग जागविला

*
राम राम राम राम नाही दुजा राहिला

भाव भोळा देव भक्तासाठी धावला

*
प्रभू राम विणकामी सहाय्यक जाहला

कहत कबीर सुनो भाई साधू

… मुद्रा मंत्र दोह्याच्या अंती गुंफियेला…

कवयित्री : डॉ. वंदना बापट

प्रस्तुती : सुश्री सुनीला वैशंपायन 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जगणे व्हावे सोपे… – कवयित्री : सौ. मधुर कुलकर्णी  ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ जगणे व्हावे सोपे… – कवयित्री : सौ. मधुर कुलकर्णी  ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

वाटतं कधीतरी एकांत असावा..

आपला श्वास आपणच ऐकावा..

त्या श्वासाचीच नादमधुर लय व्हावी..

जगण्यासाठी काय हो, जराशी उभारी हवी.

*

मन अचानक लाटांवर हेलकावतं..

आयुष्य इथेच थांबावं असंही वाटतं..

त्या लाटा पार करण्याची तयारी हवी..

जगण्यासाठी काय हो, जराशी उभारी हवी.

*

वाटतं जेव्हा सगळं सोडून दूर जावं..

प्रियजनांचं प्रेम त्याक्षणी आठवावं..

त्यांच्यासाठी जगण्याची उर्मी यावी..

जगण्यासाठी काय हो, जराशी उभारी हवी.

*

सूर्य, चंद्र, तारे, निसर्गाला गुरू करावं..

आत दडलेल्या आनंदाला आपणचं शोधावं..

दुःख, आनंद, आशा, निराशेची पायरी चढावी..

जगण्यासाठी काय हो, जराशी उभारी हवी.

*

मन उदास होता, दुसऱ्याचं दुःख स्मरावं..

सर्वसुखी कुणी नाही हे सत्य समजावं..

संतांनाही ना चुकली ही प्रारब्धाची ठेवी..

जगण्यासाठी काय हो, जराशी उभारी हवी.

*

आयुष्य एकदाच मिळतं, भरभरून जगावं..

शक्य असेल ते ओंजळीने देत रहावं..

देण्यातल्या आनंदाची तृप्ती मिळावी..

जगण्यासाठी काय हो, जराशी उभारी हवी.

कवयित्री : सौ मधुर कुलकर्णी

पुणे

प्रस्तुती: सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘अध्यात्मिक रंग होळीचा…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

सौ अंजली दिलीप गोखले

📚 वाचतांना वेचलेले 📚

☆ ‘अध्यात्मिक रंग होळीचा… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

आध्यात्मिक रंग होळीचा 🟥🟧🟨🟩🟦🟪

एक दिवस भगवान कृष्ण मथुरेमधील एका रंगारीकडे गेले आणि त्याला म्हणाले की मलाही सर्वांचे कपडे रंगवायचे आहेत… मला ही एक रंगाची बादली देण्यात यावी… हा रंगारी कृष्णभक्तीत आधीच रंगला होता म्हणुन त्याने एक बादली रंगाची भगवंताला दिली…

ती बादली घेऊन भगवान कृष्ण मथुरेमधील एका चौकात उभे राहिले आणि जोरजोरात ओरडून म्हणू लागले की मी सर्वांची वस्त्रे रंगविण्याचे कार्य करीत आहे. ज्याला आपली वस्त्रे रंगवायची आहेत त्यांनी “फुकट” ही वस्त्रे रंगवुन घ्यावी. कोणताही मोबदला देण्याची गरज नाही… हळु हळु लोकांची गर्दी वाढु लागली. कोणी आपले धोतर… तर कोणी आपली साडी… कोणी आपले उपरणं… तर कोणी आपला सदरा देण्यास सुरवात केली. प्रत्येकाने आपला आवडता रंग निवडला. कोणी लाल… तर कोणी पिवळा… कोणी निळा तर कोणी गुलाबी… भगवंत प्रत्येकाची वस्त्रे बादलीत टाकत होता आणि ज्याला जो रंग हवा त्याच रंगात रंगवुनही देत होता.

असे करता करता संध्याकाळ झाली आणि लोकांची गर्दी कमी होण्यास सुरवात झाली. भगवान कृष्ण आपली बादली उचलुन निघणारच होते तेवढ्यात एक अत्यंत साधा पोषाख केलेला माणुस भगवंतासमोर हात जोडुन अत्यंत नम्रपणे उभा राहिला. तो म्हणाला माझे ही एक वस्त्र रंगवुन हवे आहे. भगवंताने पुन्हा रंगाची बादली खाली ठेवली आणि त्याला म्हणाले, दे तुझे वस्त्र… कोणत्या रंगात रंगवून हवे आहे…? ? तो साधा वाटणारा व्यक्ती म्हणाला… त्याच रंगात रंगवून दे जो रंग या बादलीत आहे. अरे कृष्णा… हे भगवंता… सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी बघतो आहे की तुझ्याजवळ बादली एकच आहे पण या बादलीमधून तू सर्व वेगवेगळे रंग काढतो आहेस. ज्याची जशी इच्छा तसा तुझा रंग… पण मला मात्र रंग तुझ्या इच्छेचा हवा आहे.

… कारण कदाचित माझा रंग हा स्वार्थाचा असेल पण तुझा रंग निःस्वार्थाचा आहे… माझा रंग अहंकाराच्या पुर्ततेचा असेल पण तुझा रंग समर्पणाचा आणि भक्तिचा आहे… माझा रंग व्यवहारिक आनंदाचा असेल पण तुझा रंग तर चैतन्याच्या अनुभूतीचा आहे…. म्हणून “जशी तुझी मर्जी तशीच माझी इच्छा”… तुझ्याशिवाय माझे काय अस्तित्व… तू आहेस तरच मी आहे, तु नाही तर मी नाहीच… म्हणून संतांनी लिहिले की….

उसी रंग में रहना रे बंदे,

उसी रंग में रंगना….

जिस रंग में परमेश्वर राखे,

उसी रंग में रंगना….! ! !

लेखक : अज्ञात 

संग्रहिका : सौ. अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘हुशार भारतीय …’ –  लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

 

? वाचताना वेचलेले ?

☆ ‘हुशार भारतीय …’ –  लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

हुशार भारतीय…

दात घासतात ”कोलगेट” ने

दाढी करतात जिलेट’ ने

आंघोळ करतात पीयर्स’ ने

दाढी झाल्यानंतर लावतात ओल्ड स्पाइस

शर्ट घालतात ॲलन सोलीचा

पॅन्ट घालतात ‘लेविस‘ची

खातात मॅगी‘ आणि

पितात ‘ नेस कॅफे

टीव्ही पाहतात सोनीचा‘ 

मोबाईल असतो वोडाफोन चा

गॉगल घालतात ‘रे बॅन चा

वेळ बघतात रॅडो‘ वर

प्रवास करतात ‘टोयोटा‘ गाडीतून

कॉम्प्युटर वापरतात ‘ॲपल चा 

बाजूला कोक ‘ ची बाटली ठेवतात.

सकाळचे जेवण असतं ” मॅकडोनाल्ड‘ मध्ये,

पिझ्झा’ विकत घेतात ‘डोमिनोज ‘ मधून,

जॉनी वॉकर ‘ आणि शिवास रिगल ‘ पितात.

शॉपिंग करतात ‘ॲमेझॉन‘ वर

अन्… ,

अन्… मग प्रश्न विचारतात….

भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत का घसरतोय? “

बाबांनो, आपला पैसा देशात तयार होणाऱ्या उत्पादनासाठी वापरा आणि मग रुपयाची किंमत पहा

यासाठी स्वदेशी उत्पादन वापरा आणि रुपया बळकट करा

सर्व हुशार भारतीयांसाठी डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख.

– – म्हणून भारताला अधिकाधिक नवे उद्योजक हवे आहेत🙏🙏

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ कर्माचे मूलतत्व…  लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

📚 वाचताना वेचलेले 📖

☆ कर्माचे मूलतत्व…  लेखक – अज्ञात ☆ संग्राहक – सुश्री कालिंदी नवाथे ☆

मी पवित्र संगमात बुडी मारली आणि त्या त्रिवेणी नदीला विचारले, “माझी पापं जमा करुन घेतली का? “

नदीने उत्तर दिले, “होय. “

मी विचारले, “तुम्ही त्यांचे काय करणार? “

त्रिवेणी नदी खुद्कन हसली, “ती ठेवून घ्यायला मी काय वेडी आहे का? मी ती समुद्रात सोडून देणार. “

उत्सुकतेनं मी समुद्राकडे जाऊन त्याला विचारले, “माझी पापं त्रिवेणीकडून मिळाली का? “

समुद्राने उत्तर दिले, “होय. “

मी विचारले, “तुम्ही त्यांचे काय करणार? “

समुद्र हसला, “मी वेडा आहे का ती ठेवून घ्यायला? मी ती ढगांमध्ये जमा करणार. “

मी ढगांकडे गेलो आणि विचारले, “तुम्हाला समुद्राकडून माझी पापं मिळाली का? “

ढगांनी उत्तर दिले, “होय. “

मी विचारले, “तुम्ही त्याचं काय करणार? “

ढग कुजबुजले, “आम्ही वेडे आहोत काय ती ठेवायला? आम्ही त्यांचा पावसासारखा खाली वर्षाव करु. “

मी विचारले, “कुणावर? “

ढग खट्याळपणे हसले, “तुझ्यावरच, अर्थातच. “

मला अचानक जाणीव झाली की: आपण कुठेही असू, कर्म आपल्या मागोमाग येते. ही सृष्टी आपल्याला आठवण करून देते की नीतिमान रहा आणि चांगले वर्तन करा, कारण आपले कर्म शेवटी आपल्याकडे परतते.

माझ्या स्नेहीजनांनो, हे कर्माचे खरे सार आहे.

 रामकृष्णहरि 

लेखक : अज्ञात 

संग्राहिका : सुश्री कालिंदी नवाथे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares