जीवनात संवाद साधणं ही फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.संवाद बरेचदा दोन्हीकडून व्हावा लागतो. महाभारतातील उदाहरण द्यायचे झाले तर अर्जुन फार भांबावलेल्या अवस्थेत होता. ऐन युद्धाच्या वेळी त्याने धनुष्य खाली ठेवले होते पण जेव्हा त्याने आपला प्रिय सखा श्रीकृष्णाशी संवाद साधला त्यावेळी त्याच्या मनातील सर्व शंका दूर झाल्या व तो युद्धास तयार झाला. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी त्याला जी गीता सांगितली तो एक अजरामर संवादच आहे.
संवादाचे अनेक प्रकार आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये. कधी हा संवाद उपदेशात्मक असतो, कधी मनातील घालमेल दूर करणारा असतो, कधी आनंदाच्या लहरी पसरवणारा असतो तर कधी क्लेशदायक सुद्धा असतो. त्याला आपण विसंवाद किंवा वाद असेही म्हणतो. संवाद अनेक जणांमध्ये, दोघांमध्ये किंवा कधी कधी तर स्वतःशीच होतो. म्हणूनच संत तुकाराम महाराज म्हणतात,
तुका म्हणे होय मनाशी संवाद आपलाची वाद आपणासी
संवाद अनेक प्रकारे साधता येतो कधी लिहून, कधी डोळ्यातून, कधी स्पर्शातून तर कधी मौनातून सुद्धा.पण वाणीने केलेला संवाद अधिक प्रभावी ठरतो.काही वेळा असे होते की नात्यातील, मैत्रीतील हा संवाद काही कारणास्तव किंवा गैरसमज झाल्याने तुटतो आणि मनाला प्रचंड वेदना होतात. समोर असणाऱ्या व्यक्तीसोबत न बोलता अबोला धरणे, संवाद न करणे हे फार क्लेशदायक होते. कधी ते नाते पतीपत्नीचे असते, पालक मुलांचे असते तर कधी भावंडांचे असते तर कधी समाजातील इतर व्यक्तींचे असते. यामुळे फार मनस्ताप होतो त्याचे परिणाम नंतर शरीरावर देखील होतात.अनेक रोग निर्माण होतात. तिथे एक अदृश्य भिंत नकळत उभी राहते.अहंकार वाढतो. मी कमीपणा घेऊन बोलणार नाही, ही वृत्ती वाढते. पण याच वेळी जर कमीपणा घेऊन संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर तेच नाते पुन्हा बळकट होऊ लागते. थोडक्यात सांगायचे तर आपण समाजात कुटुंबात, सुसंवाद साधण्याचा नेहमीच प्रयत्न केला तर निश्चितच ते नाते अधिक निकोप होऊन आपण निश्चितच सुखी, आनंदी होऊ.
फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश
या गाण्याप्रमाणे आपल्या मनाचे आकाश पारदर्शी व मोकळे राहिल यात शंकाच नाही.
(कविता, गद्य आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा पुनर्विचार) कविता : शब्दांच्या पलीकडचा स्पंदनानुभव.
कविता ही केवळ शब्दांची रचना नसते; ती शब्दांना लाभलेले स्पंदन असते. विचार गद्यही व्यक्त करू शकते, माहिती निबंधही देऊ शकतो; पण एखाद्या अनुभूतीला जेव्हा भाषेची लय, प्रतिमेचे सौंदर्य आणि भावनेचा नाद लाभतो, तेव्हा कविता जन्म घेते. म्हणूनच कविता वाचली जात नाही; ती अनुभवली जाते. तिचा अर्थ केवळ शब्दांत नसतो, तर शब्दांतील विरामांत, ध्वनीत आणि न बोलल्या गेलेल्या सूचकतेतही दडलेला असतो.
मानवी संस्कृतीच्या आरंभीपासून लय ही माणसाच्या जगण्याचा भाग राहिली आहे. अंगाईगीत, ओव्या, अभंग, भारूड, लोकगीते, भजन, आरत्या—या सर्वांचा पाया लयीत आहे. त्यामुळे भारतीय काव्यपरंपरेत छंदाला केवळ तांत्रिक नियम मानले गेले नाही; तो कवितेचा प्राण मानला गेला. छंदामुळे कविता बांधली जाते, असे नाही; छंदामुळे ती वाहते.
मात्र काळ बदलतो, अनुभव बदलतात, भाषेची संवेदना बदलते. प्रत्येक युगाला स्वतःची अभिव्यक्ती शोधावी लागते. या शोधातूनच मुक्तछंदाचा जन्म झाला. तो परंपरेचा निषेध नव्हता; तर परंपरेचा विस्तार होता. अभिव्यक्तीला अधिक व्यापक अवकाश देताना कवितेच्या अंतःस्वरूपाचे जतन करण्याचा तो प्रयत्न होता.
आजचा प्रश्न मुक्तछंदाच्या अस्तित्वाचा नाही; तर त्याच्या आकलनाचा आहे. मुक्तछंद आणि छंदमुक्त या दोन संकल्पना अनेकदा एकाच अर्थाने वापरल्या जातात. परिणामी कविता, गद्य आणि मुक्त अभिव्यक्ती यांतील सूक्ष्म भेद धूसर होऊ लागतो. हीच या लेखामागची प्रेरणा आहे.
मुक्तछंद आणि छंदमुक्त : गोंधळ नेमका कुठे?
“मुक्तछंद” या शब्दातच त्याचा अर्थ सामावलेला आहे. मुक्त आहे तो छंद; छंदापासून मुक्त झालेली कविता नव्हे.
छंदोबद्ध कवितेत वृत्त, मात्रा, यमक आणि लय यांचे ठरावीक नियम असतात. त्या चौकटीत राहून कवी आपली अनुभूती व्यक्त करतो. परंतु काही वेळा आशयाची व्यापकता किंवा भावनेची सूक्ष्मता अशी असते की, पारंपरिक चौकटीत ती पूर्णपणे व्यक्त करणे कठीण जाते. अशा वेळी कवी छंद मोडत नाही; तो त्याला आवश्यक तेवढीच लवचिकता देतो. त्या लवचिकतेतून मुक्तछंद आकाराला येतो.
म्हणून मुक्तछंद म्हणजे नियमभंग नव्हे; तो नियमांच्या आत्म्याशी प्रामाणिक राहून केलेला सर्जनशील विस्तार आहे. त्यात बाह्य छंदाची चौकट सैल झालेली असली, तरी अंतःलय जिवंत असते. शब्दांची निवड, विरामांची जागा, प्रतिमांचा क्रम, भावनेचा चढ-उतार आणि भाषेचा नाद यांमधून ही लय सतत जाणवत राहते.
याउलट छंदमुक्त या शब्दाचा अर्थ छंदाच्या सर्व बंधनांपासून मुक्त असा होतो. परंतु त्याचाही अर्थ शिस्तशून्यता असा होत नाही. कारण कविता कोणत्याही प्रकारची असो, तिच्या अभिव्यक्तीला एक अंतर्गत संघटन आवश्यक असते. भाषा, प्रतिमा, सूचकता आणि आशय यांचा सुसंवाद हरवला, तर ती रचना कविता न राहता गद्याचा तुकडा ठरते.
म्हणून मुक्तछंद आणि छंदमुक्त या संज्ञांमधील भेद केवळ शब्दांचा नाही; तो काव्यदृष्टीचा आहे.
मुक्ततेलाही असते एक अंतःलय
छंद म्हणजे केवळ मात्रा मोजण्याची पद्धत नव्हे; छंद म्हणजे लयीची शिस्त. ही शिस्त कधी बाह्य असते, तर कधी अंतर्मनात विलीन झालेली असते. मुक्तछंदाने बाह्य चौकट शिथिल केली; पण अंतःलयीचा त्याग कधीच केला नाही.
नदीचा प्रवाह मुक्त असतो; तरी त्याला दिशा असते. पक्षी स्वच्छंद उडतो; तरी त्याच्या उड्डाणात सहज क्रम असतो. झाडाची फांदी आपल्या इच्छेनुसार वाढते; पण तिची मुळे मातीत घट्ट रोवलेली असतात. मुक्तछंदाचेही तसेच आहे. त्याची मुक्तता ही बेबंदपणाची नव्हे, तर अंतःशिस्तीची अभिव्यक्ती आहे.
म्हणूनच मुक्तछंद लिहिणे हे सोपे नसते. उलट, बाह्य छंदाचा आधार नसल्यामुळे कवीवर अधिक जबाबदारी येते. शब्दांचा प्रत्येक स्पर्श, प्रत्येक विराम, प्रत्येक प्रतिमा आणि प्रत्येक ओळ ही स्वतःची लय घेऊन उभी राहिली पाहिजे. अन्यथा रचना माहिती देईल; पण कविता होणार नाही.
याच कारणामुळे मुक्तछंदाचा खरा छंद कागदावर दिसत नाही; तो संवेदनशील वाचकाच्या मनात ऐकू येतो.
मराठी मुक्तछंदाची परंपरा : साधनेतून आलेले स्वातंत्र्य
मराठीतील मुक्तछंद ही अचानक घडलेली घटना नाही. तो मराठी कवितेच्या उत्क्रांतीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे.
कवी अनिल यांनी मुक्तछंदाला सैद्धांतिक आणि कलात्मक प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या कवितेत मुक्तता आहे; पण ती कधीही शिस्तभंगात परिवर्तित होत नाही. आशयाच्या आग्रहामुळे छंदाला दिलेली मोकळीक हीच त्यांच्या काव्यदृष्टीची ओळख ठरते.
बा. सी. मर्ढेकर यांनी आधुनिक जीवनातील विसंगती, यंत्रयुगाची धडधड आणि मानवी अस्तित्वाची अस्वस्थता व्यक्त करण्यासाठी भाषेलाच नवे रूप दिले. त्यांनी केवळ छंद मोडला नाही; त्यांनी कवितेच्या अभिव्यक्तीची क्षितिजे विस्तारली.
विंदा करंदीकर यांच्या कवितेत विचार आणि लय यांचा अद्भुत मेळ आहे. इंदिरा संत यांच्या कवितेत अंतर्मुख भावविश्वाची नाजूक हालचाल आहे. कुसुमाग्रजांच्या मुक्तछंदात भाषेचे वैभव आणि चिंतनाची उंची आहे. नारायण सुर्वे यांच्या कवितेत श्रमिक जीवनाची धग आहे; पण ती घोषणेत रूपांतरित होत नाही, कारण तिच्यामागे काव्यात्मक संघटन आहे. ग्रेस यांच्या कवितेचा अर्थ कधी धूसर भासतो; पण तिची अंतःसंगीतमयता वाचकाला सतत गुंतवून ठेवते.
या सर्व कवींमध्ये शैली वेगवेगळी असली, तरी एक समान धागा दिसतो—त्यांनी मुक्तछंदाला स्वैरपणा मानले नाही. त्यांच्या कवितेत प्रत्येक शब्द जाणीवपूर्वक निवडलेला आहे, प्रत्येक विराम अर्थवाही आहे आणि प्रत्येक प्रतिमा अनुभवातून जन्मलेली आहे.
म्हणूनच त्यांच्या कविता वाचताना त्या गद्य वाटत नाहीत. त्या वाचून संपतात; पण त्यांचा नाद मनात दीर्घकाळ घुमत राहातो.
गद्य आणि कविता : सीमारेषा कुठे आखायची?
मुक्तछंदावरील चर्चेत वारंवार एक प्रश्न समोर येतो—गद्य आणि कविता यांतील नेमका फरक काय?
या प्रश्नाचे एकच सूत्रबद्ध उत्तर देता येणार नाही; कारण कविता ही व्याख्येपेक्षा अनुभूतीचा विषय आहे. तरीही एवढे निश्चितपणे म्हणता येईल की, सुंदर आशय म्हणजे कविता नव्हे. तितकेच खरे म्हणजे सुंदर भाषा म्हणजेही कविता नव्हे. कविता तेव्हा घडते, जेव्हा आशय आणि अभिव्यक्ती यांचे विलक्षण रसायन तयार होते.
एखादा विचार निबंधात प्रभावी वाटू शकतो, एखादा अनुभव आत्मकथनात मन हेलावून टाकू शकतो, एखादे वर्णन ललित लेखात मंत्रमुग्ध करू शकते; पण त्यांना आपण कविता म्हणत नाही. कारण कवितेचे वेगळेपण तिच्या आशयात जितके असते, तितकेच तिच्या अभिव्यक्तीच्या स्वभावातही असते.
आज अनेकदा असे दिसते की, गद्य वाक्ये ओळीओळीने मांडली, विरामचिन्हांचा वापर केला, शब्दांचा क्रम बदलला आणि त्याला भावनिक स्पर्श दिला की कविता तयार झाली, असा समज वाढताना दिसतो. ही प्रवृत्ती चिंताजनक आहे. कारण ओळी मोडल्याने गद्याचे रूप बदलते; परंतु त्याचा स्वभाव बदलत नाही.
कवितेचा आत्मा तिच्या अंतर्गत ऊर्जेत असतो. शब्दांमध्ये स्पंदन निर्माण करण्याची, प्रतिमांना अर्थाच्या पलीकडे नेण्याची आणि वाचकाच्या मनात अनुभव पुन्हा जन्माला घालण्याची क्षमता तिच्यात असावी लागते. ही ऊर्जा नसली, तर रचना कितीही प्रामाणिक असली तरी ती कविता होत नाही.
माध्यमयुगातील कविता : संधी आणि आव्हान
आजच्या काळात कविता लिहिणे, प्रकाशित करणे आणि वाचकांपर्यंत पोहोचवणे पूर्वीपेक्षा कितीतरी सोपे झाले आहे. सामाजिक माध्यमांनी अभिव्यक्तीचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले. ही साहित्याच्या दृष्टीने स्वागतार्ह घटना आहे. अनेक नवे कवी, नवे अनुभव, नवे भाषिक प्रदेश आणि नवे संवेदनविश्व यांमुळे मराठी कविता समृद्ध होत आहे.
परंतु या सहजतेने एक भ्रमही निर्माण केला आहे. लेखन सहज झाले म्हणजे कविता सहज घडते, असे मानले जाऊ लागले. मुक्तछंदाची निवड ही अनेकदा अभिव्यक्तीची अपरिहार्यता म्हणून न होता, सुलभतेचा पर्याय म्हणून होऊ लागली. त्यामुळे काही ठिकाणी कविता अनुभवाचे कलात्मक रूप न राहता अनुभवाचे निवेदन बनते.
हे चित्र संपूर्ण मुक्तछंदाचे नाही; पण या प्रवृत्तीची नोंद घेणे आवश्यक आहे. कारण कोणत्याही साहित्यप्रकाराचा दर्जा त्याच्या संख्येने नव्हे, तर त्याच्या गुणवत्तेने ठरतो.
आजही अनेक तरुण कवी आशय, भाषा आणि रचनाशैली यांचे सुंदर संतुलन साधत मुक्तछंदात उल्लेखनीय कविता लिहित आहेत. त्यामुळे प्रश्न मुक्तछंदाचा नाही; तर त्याच्या निकषांचा आहे.
कविता : सहज उमलते, पण सहज घडत नाही
कविता अनेकदा एका क्षणात सुचते; पण ती एका क्षणात घडत नाही.
भावना हा कवितेचा आरंभ असतो; परंतु तिचे अंतिम रूप घडवते ती साधना. भाषेची जाण, परंपरेचे भान, शब्दांची निवड, प्रतिमांची समृद्धी, लयीची जाणीव आणि स्वतःच्या अनुभवाशी असलेली प्रामाणिकता—या साऱ्यांतून कविता आकार घेत असते.
ज्याप्रमाणे गायकाला रियाज, चित्रकाराला रेखाटन आणि शिल्पकाराला दगडाशी संवाद आवश्यक असतो, त्याचप्रमाणे कवीलाही भाषेशी अखंड मैत्री करावी लागते. चांगल्या कविता वाचल्याशिवाय चांगली कविता लिहिता येत नाही. परंपरा जाणल्याशिवाय नवे मार्ग सापडत नाहीत.
म्हणूनच मुक्तछंद हा नवशिक्याचा शॉर्टकट नसून परिपक्व अभिव्यक्तीचा मार्ग आहे.
रसिकाचीही एक जबाबदारी
साहित्याचा दर्जा केवळ लेखकावर अवलंबून नसतो; तो वाचकाच्या अभिरुचीवरही अवलंबून असतो.
क्षणिक दाद, टाळ्या किंवा सामाजिक माध्यमांवरील प्रतिसाद यापलीकडे जाऊन कविता समजून घेण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. एखादी कविता आपल्याला पुन्हा वाचावीशी वाटते का? तिची एखादी प्रतिमा मनात रेंगाळते का? तिच्या एखाद्या ओळीने आपल्याला नव्याने विचार करायला भाग पाडले का? असे प्रश्न रसिकाने स्वतःलाच विचारले पाहिजेत.
रसिक अधिक सजग झाला की कवीही अधिक जबाबदार होतो. तेव्हाच भाषेची आणि कवितेची अभिरुची समृद्ध होते.
शेवटचे काही शब्द…
मुक्तछंदावर बोलताना दोन टोकांच्या भूमिका अनेकदा समोर येतात. एकीकडे छंद म्हणजे जुने बंधन, तर दुसरीकडे मुक्तछंद म्हणजे कवितेचा ऱ्हास—अशा दोन्ही भूमिका वस्तुस्थितीचे पूर्ण चित्र दाखवत नाहीत.
छंदोबद्ध कविता आणि मुक्तछंद हे परस्परविरोधी प्रवाह नाहीत. ते एकाच काव्यपरंपरेची दोन रूपे आहेत. एका रूपात लय बाहेरून ऐकू येते; दुसऱ्या रूपात ती आतून जाणवते. एका ठिकाणी छंद स्पष्ट दिसतो; दुसऱ्या ठिकाणी तो शब्दांच्या नसानसांत मिसळलेला असतो.
म्हणून मुक्तछंदाला विरोध करण्याचे कारण नाही; परंतु त्याच्या नावाखाली छंदशून्यता, भाषिक बेफिकिरी आणि वर्णनात्मक गद्य यांना कवितेचा दर्जा देणेही योग्य नाही. मुक्तछंदाची खरी ओळख त्याच्या मुक्ततेत नसून त्याच्या अंतःलयीत आहे.
झाडाच्या फांद्या कितीही दूरवर पसरल्या, तरी त्यांची मुळे जमिनीत असतात. नदी कितीही वळणे घेत वाहिली, तरी तिचा प्रवाह हरवत नाही. आकाशात मुक्त विहरणाऱ्या पक्ष्यालाही दिशेचे भान असते. निसर्गाचा हा नियम कवितेलाही लागू होतो.
कविता ही केवळ शब्दांची मांडणी नाही; ती संवेदनांची शिस्त आहे. ती केवळ आशयाची अभिव्यक्ती नाही; ती भाषेचा आत्मानुभव आहे.
आजच्या प्रत्येक कवीने आणि प्रत्येक रसिकाने एवढेच स्मरावे—
मुक्तछंद म्हणजे छंदापासून मुक्त होणे नव्हे; तर छंदाला अंतःकरणात इतके सामावून घेणे की, तो दिसेनासा होईल; पण त्याचा नाद प्रत्येक शब्दातून ऐकू येत राहील. आणि कदाचित म्हणूनच…
☆ महावस्त्राचे पदर – भाग ६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆
‘मामा’ (माहेरचा समृद्ध दुवा)
‘नात्यांचं महावस्त्र’ विणताना आपण आतापर्यंत आईची ‘मायेची पैठणी’, बाबांची ‘सह्याद्रीची ढाल’, आजीच्या ‘संस्कारांची शिदोरी’ आणि आजोबांचे ‘सुरकुत्यांमधील शहाणपण’ अनुभवले. या महावस्त्रात एक अत्यंत हसरा, मनमोकळा आणि प्रेमाचा सुंदर रंग भरणारा पुढचा महत्त्वाचा पदर म्हणजेच ‘मामा’! या पदराची झळाळी अत्यंत विलक्षण आणि नजरेत भरणारी असते; कारण हा नात्यांमधील अतिशय महत्त्वाचा, जिव्हाळ्याचा आणि विलोभनीय असा पदर आहे.
‘झुक झुक झुक अगीनगाडी… मामाच्या गावाला जाऊया’ हे गाणं ज्याला माहिती नाही, असा मराठी माणूस विरळाच! मामाबद्दलचे प्रेम आणि आदर आपण अगदी लहानपणापासूनच शिकतो. आकाशात दिसणारा चंद्र बाळाला दाखवताना आई त्याला प्रेमाने ‘चांदोमामा’ म्हणते. तो भलेही आपल्यापासून लाखो मैल दूर असतो, पण त्याच्याशी आपण लहानपणी नकळत कितीतरी गुजगोष्टी करतो! चंद्राची ती शीतल सावली आपण प्रत्यक्ष मामाच्या प्रेमात अनुभवतो. लहान मुलांच्या गोष्टींतही अनेक प्राणी ‘मामा’ बनून बोलू लागतात; तर खेळांमध्ये ‘माझ्या मामाचं पत्र आलं, ते मला सापडलं’ अशी सुंदर गाणी असायची. आजच्या काळात पत्रलेखनच बंद झाल्यामुळे आपण अशा अनेक चांगल्या गोष्टींना मुकलो आहोत.
‘मामा’ हा शब्द उच्चारताच कोणाच्याही चेहऱ्यावर एक निखळ हास्य आणि आपुलकी उमटल्याशिवाय राहत नाही. आपण कधी विचार केला आहे का, ‘मा-मा’ या शब्दात दोन वेळा ‘मा’ शब्द का येतो? पहिला ‘मा’ म्हणजे आईची अथांग ‘माया’ आणि दुसरा ‘मा’ म्हणजे आईचे ‘माहेर’! या दोन ‘मा’ अक्षरांच्या सुरेख मिलनातून साकार झालेला शब्द म्हणजेच मामा! संस्कृतमध्ये ‘मम’ म्हणजे ‘माझे’. जो पूर्णपणे आपला असतो, जिथे कोणत्याही मुखवट्याची किंवा संकोचाची गरज नसते, तो ‘मामा’! आईच्या माहेरची समृद्ध आठवण आणि भाच्यांच्या विश्वातला हक्काचा सखा म्हणजेच मामा असतो.
मला तीन मामा होते. तिघांचीही आर्थिक परिस्थिती तशी अगदी बेताचीच होती, पण त्यांच्याजवळील प्रेमाचा आणि संस्कारांचा झरा मात्र अक्षय—म्हणजेच कधीही न आटणारा होता! लहानपणी ‘मामा घरी येणार आहेत’ एवढं जरी ऐकलं, तरी मला जो आनंद व्हायचा, तो अक्षरशः अवर्णनीय असायचा. सुट्ट्यांमध्ये मामाकडे जायला मिळणे हा मोठा उत्सव असायचा. तिथे मामा आणि मामी माझे खूप लाड करायचे, मला आवडणारे खाद्यपदार्थ हटकून बनवले जायचे. याच मामांनी मला प्रेमासोबतच संस्कारांची खरी शिदोरी दिली. माझे धाकटे मामा तर माझे मामा कमी आणि मित्रच जास्त होते! त्यामुळे मित्रत्वाच्या नात्याने मी त्यांच्याशी सगळ्या गोष्टी मनमोकळेपणाने शेअर करायचो; तेही मला योग्य-अयोग्य काय, हे नेहमी समजावून सांगायचे.
त्यांची स्वतःची आर्थिक परिस्थिती अगदी नाजूक असताना सुद्धा मामांनी माझ्या आईला तिच्या प्रत्येक अडचणीत वेळोवेळी खूप मदत केली. तिचे आई-वडील तर ती लहान असतानाच वारले होते; त्यामुळे मामाच तिचे आई-वडील झाले. त्यांनीच तिला सांभाळले, शिकवले आणि योग्य वेळी लग्न करून दिले.
आई आणि मामा यांच्यातील अतूट व जिव्हाळ्याच्या बंधनाचा एक अतिशय हृदयस्पर्शी प्रसंग मला आजही आठवतो. एकदा आई खूप आजारी होती, त्यावेळी मी लहान होतो. मामा शहरात राहत असल्याने आईला त्यांच्याकडेच ठेवावे लागले. नंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले आणि तिचे एक मोठे ऑपरेशन झाले. त्या दरम्यान तिला प्रचंड रक्तस्राव झाला होता आणि तातडीने रक्ताची गरज निर्माण झाली होती. अशा वेळी माझे मामा तिथे देवासारखे धावून आले. त्यांनी स्वतःचे रक्त देऊन माझ्या आईचे प्राण वाचवले! अशा कधीही न विसरता येणाऱ्या मामांच्या अनेक आठवणी माझ्या आठवणींच्या कप्प्यात जपलेल्या आहेत.
लहानपणीच्या आठवणींचा पट उलगडला, की उन्हाळ्याच्या सुट्ट्या आणि ‘मामाचं गाव’ हे समीकरण सर्वात आधी डोळ्यांसमोर येतं. ‘मामाच्या गावाला जाऊया, तिथे जाऊन मजा करूया’ ही बालगीतातली ओळ प्रत्येक लहान मुलाच्या आवडीची असते. मामाचं घर म्हणजे मुलांसाठी कडक शिस्तीतून मिळालेली एक हक्काची ‘मुक्त शाळा’! जिथे आई-बाबांचा ओरडा नसतो, अभ्यासाची कटकट नसते; असतो तो फक्त आणि फक्त भाचेमंडळांचे लाड पुरवणारा मामा! आई जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी नकार देते, तेव्हा भाचेमंडळी आपला हट्ट पूर्ण करून घेण्यासाठी ज्याच्याकडे विश्वासाने धाव घेतात, तो मामाच असतो. भाच्यांच्या आनंदासाठी स्वतः लहान मूल होणारा, सुट्ट्यांमध्ये त्यांना फिरायला नेणारा, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारा मामा प्रत्येक मुलाच्या बालपणाला आनंदाचे इंद्रधनुषी रंग देऊन जातो.
मामाच्या या अथांग मायेचा आणि बालपणीच्या आनंदाचा विचार करताना एका अत्यंत महत्त्वाच्या नात्याचा उल्लेख केल्याशिवाय हा लेख पूर्णच होऊ शकत नाही—ते नातं म्हणजे ‘मामी’! मामा जे लाड करतो, बहिणीला धीर देतो किंवा भाच्यांच्या पाठीवर हात ठेवतो; या सगळ्यामागे ‘मामीची साथ आणि तिचे औदार्य’ खूप मोठे असते. मामी जर संकुचित वृत्तीची असेल, तर मामाचं घर भाच्यांसाठी कधीच उघडं राहू शकत नाही.
मामी ही केवळ मामाची पत्नी नसते, तर नावातच दडल्याप्रमाणे ती भाच्यांसाठी ‘मा-मी’ म्हणजे आईसारखीच दुसरी माउली असते. उन्हाळ्याच्या सुट्टीत सगळी भाचेमंडळी घरी आल्यावर, अजिबात कपाळावर आठी न आणता, हसतमुखाने त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणारी, त्यांचे कौतुक करणारी मामी खऱ्या अर्थाने त्या घराचे घरपण जपते. प्रसंगी ती स्वतःच्या मुलांकडे दुर्लक्ष करून भाच्यांचे लाड पुरवते! नणंदेच्या संसारातील दुःखात तिला आपल्या सख्या बहिणीसारखा मायेचा आडोसा देणारी मामीच असते. म्हणूनच, मामाच्या माहेरचा हा ‘सुगंध’ टिकवून ठेवण्यात मामीचे योगदान अनन्यसाधारण आणि वंदनीय आहे!
मामा या नात्याचे रूप केवळ लाड पुरवण्यापुरते मर्यादित नाही; तर कठीण प्रसंगात तो कुटुंबाचा भक्कम कणा बनतो. दुर्दैवाने ऐनवेळी कुटुंबातील कर्ता पुरुष म्हणजे मुलांचे वडील वारल्यानंतर, विस्कळीत झालेल्या कुटुंबाला आणि दुःखात बुडालेल्या आईला खऱ्या अर्थाने सावरणारा तिचा भाऊ म्हणजेच मुलांचा मामाच असतो. अशा वेळी मामीसुद्धा आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून त्या भाच्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे सामावून घेते.
याचे सर्वात मोठे आणि ऐतिहासिक उदाहरण म्हणजे भारताचे महान सुपुत्र, पहिले थोर इंजिनियर भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या! सर विश्वेश्वरय्या लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे छत्र हरवले. अशा अत्यंत बिकट आणि कठीण प्रसंगात त्यांच्या आईला आणि बाल-विश्वेश्वरय्यांच्या शिक्षणाला त्यांच्या मामाने विश्वासाचा आणि भक्कम आधार दिला. मामाने लावलेल्या या विश्वासाच्या रोपट्यातूनच पुढे देशाचा एक महान शिल्पकार घडला!
मामा-मामी आणि भाच्यांचे हे प्रेम केवळ भावनांपुरते मर्यादित न राहता व्यवहारातही अगदी मूर्त स्वरूपात दिसते. आपल्याकडे अनेक हॉटेल्स, दुकाने किंवा व्यवसायांची नावे ‘मामा-भाचे’ अशी असलेली आपण आवर्जून पाहतो. ही केवळ व्यावसायिक नावे नसतात, तर एकमेकांवरील अथांग विश्वास, साथ आणि प्रेमाचे ते जिवंत प्रतीक असतात.
आपल्या संस्कृतीच्या इतिहासात पौराणिक कथांमध्ये या नात्याच्या चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही छटा दिसतात. एका बाजूला स्वतःच्याच बहिणीच्या अपत्यांची निर्दयपणे हत्या करणारा आणि श्रीकृष्णाला मारण्यासाठी कपट-कारस्थाने रचणारा दुष्ट कंस मामा, तसेच भाच्यांना कपटाने युद्धाच्या गर्तेत लोटणारा कारस्थानी शकुनी मामा यांसारख्या कुप्रसिद्ध प्रवृत्ती होत्या; तर दुसऱ्या बाजूला श्रीकृष्णाचे अर्जुनाच्या आणि पांडवांच्या पाठीशी असलेले खंबीर मार्गदर्शकाचे नातं होते. कृष्णाने भाच्यांवर म्हणजे अभिमन्यूवर केलेले प्रेम आणि दाखवलेला धर्ममार्ग आजही नात्यांचा आदर्श मानला जातो.
मुलगी लग्न होऊन दुसऱ्या घरी जाते, तेव्हा तिच्या माहेरची खरी ताकद आणि आधार तिचा भाऊ आणि वहिनी असतात. बहिणीच्या सुख-दुःखात खंबीरपणे पाठीशी उभा राहणारा, तिच्या मुलांच्या लग्नसमारंभात किंवा शुभकार्यात ‘माहेरचा मान’ म्हणून आस्थेने पुढाकार घेणारा मामा कुटुंबातील नात्यांची वीण अधिक घट्ट करत असतो.
कधी कधी आपले काम साधून घेण्यासाठी लोक एखाद्याला ‘मामा’ म्हणतात, त्यावरूनच बहुधा ‘कामापुरता मामा’ ही म्हण आली असावी. पण खरा मामा हा कामापुरता कधीच नसतो! तो कायमच आपल्या नात्याचं भान आणि जबाबदारी सांभाळत असतो. बहिणीकडे सगळ्या कार्यक्रमात तो हक्काने राबत असतो—अगदी पु. ल. देशपांडे यांच्या कथेतील ‘नारायण’सारखा! त्याच्या उपस्थितीशिवाय कोणताही कार्यक्रम पूर्ण होऊच शकत नाही. नवरदेवाचे मामा आणि नवरीचे मामा यांनी अंतरपाट धरल्याशिवाय तर आपल्याकडे लग्नच लागत नाही! तो एक प्रकारे मामाने भाच्याला आणि भाचीला दिलेला प्रेमळ आशीर्वादच असतो. भाच्यांच्या लग्नात मंडपात ‘मामाचा मान’ आणि त्यांनी दिलेली भेट ही केवळ वस्तू नसते, तर त्यात आपल्या बहिणीच्या संसाराबद्दलची अखंड कृतज्ञता साठलेली असते. बऱ्याच समाजात अजूनही मामाची मुलगी करण्याची प्रथा आहे. जेव्हा मामांची मुलगी लग्न होऊन आत्याकडे सून म्हणून येते तेव्हा त्या निमित्ताने दुसरी पिढी पुन्हा जोडली जाते. नात्यांचा गोफ आणखी घट्ट होतो.
आजच्या आधुनिक आणि गतिमान युगात, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला जाण्याचे प्रमाण थोडे कमी झाले असले, तरी ‘मामा-मामी’ या नात्यातील ओलावा आणि आपुलकी आजही तशीच टिकून आहे.
आजच्या बदलत्या काळातही भाच्यांशी मित्रासारखे नाते जपणारा, त्यांच्या करिअरच्या आणि आयुष्याच्या टप्प्यावर पाठीवर विश्वासाचा हात ठेवणारा मामा आणि मायेची सावली देणारी मामी आजही तितकेच हवाहवासे वाटतात. नात्यांच्या या भरजरी ‘महावस्त्रा’चा हा मामा-मामीचा पदर माहेरच्या मायेचा समृद्ध सुगंध घेऊन येतो. हा पदर जेवढा प्रेमाने आणि आदराने जपला जाईल, तेवढं आपलं कुटुंब आणि आपले आयुष्य अधिक आनंदी व सुकर होईल!
☆ दिल, दोस्ती आणि रियुनियन…☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆
आयुष्य हे एका प्रवाही नदीसारखे असते.. ती नदी वाहत राहते, किनारे बदलत राहतात, प्रवासी बदलतात पण काही दगड तिच्या तळाशी कायमचे विसावलेले असतात. मैत्रीही अशीच असते. काळ कितीही पुढे सरकला, आयुष्याने कितीही नवी वळणे घेतली, तरी मनाच्या तळाशी जपलेल्या मित्रांच्या आठवणी कधीच पुसल्या जात नाहीत. आणि जेव्हा अनेक वर्षांनी मित्र पुन्हा एकत्र येतात तेव्हा तो केवळ रियुनियन नसतो तो हरवलेल्या दिवसांना पुन्हा एकदा कवेत घेण्याचा भावनिक उत्सव असतो…
शाळेच्या त्या वर्गात एकाच बाकावर बसलेली मने आज जगाच्या वेगवेगळ्या दिशांना विखुरलेली असतात. कुणी यशाच्या शिखरावर पोहोचलेला असतो, कुणी संघर्षाच्या वाटेवर चालत असतो तर कुणी संसाराच्या जबाबदाऱ्यांत स्वतःला विसरून गेलेला असतो पण रियुनियनच्या दिवशी या सगळ्या ओळखी मागे पडतात. पुन्हा एकदा तेच खट्याळ चेहरे, तेच निरागस हसू आणि तेच बेधडक मन समोर उभे राहते. काळाने चेहऱ्यावर सुरकुत्या उमटवल्या असतील, केसांवर पांढरेपणा चढवला असेल पण मैत्रीच्या आठवणी मात्र अजूनही तारुण्याने उजळलेल्या असतात… शाळेच्या अंगणात एकत्र खेळलेले खेळ, डब्यातील घास वाटून खाल्लेले दिवस, शिक्षकांच्या रागानंतरही ओठांवर उमटलेले खट्याळ हास्य, परीक्षेच्या आदल्या दिवशी केलेला अभ्यास आणि सुट्टीची घंटा वाजताच दप्तर खांद्यावर टाकून धावणारी पावले हे सारे क्षण काळाच्या पडद्याआड गेलेले असतात मात्र रियुनियनच्या निमित्ताने ते पुन्हा नव्याने जिवंत होतात. प्रत्येक चेहऱ्यावर काळाच्या रेषा उमटलेल्या असतात पण डोळ्यांतील निरागस मैत्री तशीच ताजी असते…
मैत्री म्हणजे अपेक्षारहित विश्वास. न सांगताही मनातील वेदना समजून घेणारे डोळे, अपयशात खांद्यावर ठेवलेला आधाराचा हात आणि यशात मनापासून वाजवलेली टाळी
यालाच तर मैत्री म्हणतात… रक्ताच्या नात्यांपेक्षाही अनेकदा मैत्रीचे नाते अधिक जवळचे वाटते कारण ते स्वार्थाने नव्हे तर मनाने जोडलेले असते… मैत्री ही रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक जिव्हाळ्याची असते. या नात्याला स्वार्थाचा स्पर्श नसतो, अपेक्षांचे ओझे नसते. मित्रांच्या सहवासात माणूस स्वतःला विसरून मनमोकळेपणाने हसतो. जीवनातील यश-अपयश, आनंद-दुःख, संघर्ष आणि स्वप्ने यांची देवाणघेवाण करताना जाणवते की वर्षांचे अंतर मैत्रीची उब कमी करू शकत नाही…
रियुनियनमध्ये जुन्या आठवणींची पाने एकामागून एक उलगडत जातात. वर्गात केलेल्या खोड्या, डबा चोरून खाण्याचे प्रसंग, शिक्षकांची बोलणी, वार्षिक स्नेहसंमेलनातील गोंधळ, परीक्षेच्या आदल्या रात्री केलेली अभ्यासाची धडपड
प्रत्येक आठवण हसवते तर काही आठवणी डोळ्यांत नकळत पाणी आणतात.. त्या क्षणी काळ थबकतो आणि आयुष्य पुन्हा एकदा बालपणाच्या उंबरठ्यावर येऊन उभे राहते.
आजच्या यांत्रिक जगात माणूस मोबाईलच्या संपर्कात आहे पण मनांच्या संपर्कापासून दूर जात आहे.. हजारो संदेशांची देवाणघेवाण होते तरीही मन मोकळे करून हसण्यासाठी माणूस शोधावा लागतो म्हणूनच रियुनियन ही केवळ भेट नसते ती नात्यांना पुन्हा जिवंत करणारी ऊब असते. मित्रांच्या हास्यात दडलेला आनंद आणि त्यांच्या मिठीत मिळणारा दिलासा कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठा असतो… आजच्या डिजिटल युगात संदेश आणि व्हिडिओ कॉल सहज उपलब्ध आहेत पण समोरासमोर भेटून हातात हात घेण्याची, खांद्यावर हात ठेवून हसण्याची आणि डोळ्यांत डोळे घालून आठवणींना उजाळा देण्याची ऊब कोणतेही तंत्रज्ञान देऊ शकत नाही. म्हणूनच रियुनियन हा केवळ कार्यक्रम नसतो तो नात्यांना पुन्हा नव्याने जगवणारा उत्सव असतो…. खरे तर जीवनाच्या प्रवासात पद, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवता येते पण बालपणीची निरागस मैत्री विकत घेता येत नाही. ती फक्त जपावी लागते. रियुनियन हा त्या जपलेल्या नात्यांचा उत्सव असतो. तो आपल्याला शिकवतो की आयुष्य कितीही व्यस्त झाले तरी मनासाठी काही माणसे राखून ठेवली पाहिजेत कारण शेवटी यशाच्या शिखरावर उभे राहिल्यावर टाळ्या वाजवणारे अनेक मिळतील पण पडल्यावर हात धरून उभे करणारे मित्रच असतात म्हणूनच ‘दिल, दोस्ती आणि रियुनियन’ हे तीन शब्द नसून आयुष्याचा हळवा, जिवंत आणि अमूल्य अनुभव आहे. काळाच्या ओघात सर्व काही बदलते पण मैत्रीचे धागे मात्र काळालाही तोडता येत नाहीत म्हणूनच मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक हाक कायम घुमत राहते
“मित्रांनो, पुन्हा भेटूया… कारण आठवणींना नव्याने जगण्यासाठी रियुनियनची एक भेटच पुरेशी असते. “
रियुनियन हा त्या मैत्रीच्या झऱ्याला पुन्हा एकदा उगम देणारा क्षण असतो. म्हणूनच आयुष्याच्या संध्याकाळी मागे वळून पाहताना जर काही सर्वाधिक मौल्यवान वाटत असेल, तर ते म्हणजे
मित्र, त्यांच्या आठवणी आणि पुन्हा एकदा त्यांना भेटण्याचा तो अविस्मरणीय रियुनियन…!
शेवटी असे वाटते की, ‘दिल, दोस्ती आणि रियुनियन’ ही तीन शब्दांची गोष्ट नसून आयुष्यभर जपण्यासारखी अमूल्य ठेव आहे…
रात्रीचे अकरा वाजत आले होते. शेजारच्या घरातील भजनसंध्या अजून सुरुच होती. भजनात रंगलेल्या त्या कुटुंबाला संध्यासमय उलटून निशाराणी अवतरली आहे हे कळलं नसावं. भक्तीरसात ते चिंबचिंब चिंबोरे झाले होते.
भक्तीरसात, शांतरस असतो हे त्यांना ठाऊक नसावं. गायनातला गोडवा संपला होता आणि त्या भगवंताला आपला आवाज ऐकू जावा म्हणून कंठघोष सुरू झाला होता. शेजारी दवाखाने आहेत. आजूबाजूच्या घरात वृद्ध, जेष्ठ लोक रहात आहेत. कुणी परिक्षार्थी, अभ्यास करण्याचा प्रयत्न करत असतील या गोष्टींचं भान त्यांना उरलं नसावं. देवाचं नाव घेताना, त्यानंच निर्माण केलेल्या या सृष्टीवर ते केवढा अन्याय करताहेत, हे कोणी, कसं पटवून द्यायचं बरं? सगळे उच्चविद्याविभूषित, कलासक्त,. त्यांच्या भक्तीत विघ्न कसं आणायचं?
हा भक्तीरस श्रवणीय, आनंददायी न राहता, ध्वनीप्रदूषणास कारणीभूत ठरतो. ध्वनीप्रदूषणाचे अनेक परिणाम होतात. डोकेदुखी, रक्तदाब वाढणं, डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या होणं आणि कायमचं कमी ऐकू येणं अर्थात बहिरेपणा. मोठ्या आवाजात बोललेलं ऐकण्याची सवय कायमसाठी लागू शकते. मग हळू आवाजात बोललेलं ऐकण्याची क्षमता कमी होते. एकाग्रता कमी होते. हा त्रास सगळ्यांना सोसावा लागतो. आवाज कमी ठेवा असं सांगावं तर, आम्ही आमच्या घरात गातोय आणि ते ही देवभक्तीपर अभंग. तुमच्या कानांना त्रास का होतो? अशा प्रकारची उत्तरं ऐकावी लागतात. केवळ कर्णबधीर नाही तर मनबधीर झालेल्या या लोकांना कसं समजवायचं? असो.
माझ्या झोपेचं मात्र या भजनानं पुरतं खोबरं केलं होतं. काणठळ्या बसवणारा आवाज कानावरुन हात बाजूला सारू देत नव्हता. अशा बेभान झालेल्या भक्तीरसात न्हालेले चिंबोरे गणेशोत्सवात भक्तीनं निथळून नाचताना दिसतातच नं आपल्याला. लग्नसमारंभ असो किंवा वाढदिवस, गौराईंचं आगमन असो किंवा निवडणूक जिंकल्याचा जल्लोष आपला आनंद व्यक्त करण्याची पद्धत कर्णकटू तर असतेच, पण सामाजिक शांतता बिघडवणारी असते. समाजात राहताना नीतीनियमांचं पालन न करणारे अनेक महाभाग दिसतात. ध्वनी प्रदूषण हा शब्द यांच्या शब्दकोशात नसावाच. कोणता कृष्ण, कोणता राम यांना प्रसन्न होत असेल? बिचारे देव सुद्धा कपाळावर आठ्या घालून, कान बंद करुन बसत असतील.
निसर्गाच्या साध्या सरळ नियमांना धाब्यावर बसवून चाललेल्या अशा कितीतरी कृतींना ही अवनी कंटाळली आहे. तिला आता हा आक्रोश सहन होत नाहीये. मोठ्या आवाजात, वेगानं, धुराड्यातून धूर सोडत पळणारी वाहनं, तिचं शरीर तुडवतात. आधुनिकीकरणाच्या नावाखाली, तिची हिरवी बाळं, मुळासकट उखडून टाकली जातात. ती तापलेल्या तप्त तव्यागत किती उसासे सोडत आहे. सजीवांना संजीवन देणारी ही अवनी, आपलं काम चोख बजावत आहे. तरीही वेगवेगळे संकेत देऊन ती तिच्यावर होणारा अन्याय सांगत असते. त्यातूनच जंगलात लागणारा वणवा, असह्य उष्मा, दुष्काळ, पाण्याचं दुर्भिक्ष्य अशा गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. त्सुनामी, महापूर, भूकंप, ज्वालामुखी अशा उद्रेकाच्या रुपानं पृथ्वी तिचा राग व्यक्त करत असते. या वर्षी पावसानं दिलेली हुलकावणी याचंच लक्षण आहे.
आपण सावध व्हायला हवं. संकेत समजून घ्यायला हवेत. अन्यथा ही सर्जनशीलता गमावून बसलेली, रुष्ठ झालेली पृथ्वी, आग ओकणारा सूर्य, संतुलन बिघडलेलं निसर्गचक्र यांना तोंड देणं अवघड होऊन बसेल. आपल्या पुढच्या पिढीला तप्त दाह देणारं वाळवंट म्हणजे पृथ्वी अशी व्याख्या करावी लागेल. हरित अवनी म्हणजे काय असतं हे कळणं दुरापास्त होईल. हिरवे डोंगर, नदीनाले, सरोवरं, तलाव या गोष्टी चित्रात बघाव्या लागतील. हिरवे गालीचे अदृश्य होतील. पक्षांचा गोड किलबिलाट बंद होईल. सूर रुसून बसतील. संगीताचा वसंत हरवेल आणि फक्त ग्रीष्म राहील. म्हणूनच.. म्हणूनच सावध व्हा..
‘न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते?‘खरोखर, ज्ञानासारखं पवित्र दुसरं काहीही नाही. ज्ञानाच्या शाखा अमर्याद आहेत. ज्ञान लिपीतून, चित्रातून, लिखित स्वरूपात किंवा अगदी मौखिक स्वरूपात सुद्धा दिले जाते. पूर्वीची सर्व ग्रंथसंपदा संस्कृत भाषेत आहे. कारण संस्कृत ही प्राचीन भाषा आहे. लॅटिन सुद्धा पुरातन भाषा आहे. आपले धर्मग्रंथ संस्कृत भाषेत आहेत तसेच प्राकृत भाषेतही आहेत. अलीकडे मात्र इंग्रजी (आंग्ल) भाषेला “Window of the World” म्हणतात. म्हणजे जगातील कोणत्याही देशाशी संवाद साधताना इंग्रजी भाषेचा सर्रास उपयोग केला जातो. आपण अनेक भाषांतून विविध देशातील ज्ञानाचा प्रसार होत असलेला पाहतो. इतिहास, भूगोल, कृषी, क्रीडा, उद्योग, वाणिज्य, वैद्यकशास्त्र, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, कुंभारकला, चित्रकला, युद्धकला, शस्त्रनिर्मिती, वस्त्रविणणे, नाट्यशास्त्र, छायाचित्रण, इ. अनेक विषयांचे ज्ञान घ्यायचे म्हटले तर आपला जन्म अपुरा पडेल इतके ज्ञानाचे साठे अमर्याद आहेत.
पूर्वी मौखिक परंपरेनुसार गुरूकडून शिष्य ते पुढील पिढीपर्यंत असे ज्ञान पठण करून पोहोचवित. भूर्जपत्रावर लेखन करणे सुरू झाल्यानंतर ग्रंथनिर्मितीस प्रारंभ झाला. या लेखनानंतर मोडी लिपी किंवा पुढे मोडीचा वापर सुरू झाला. पूर्वी गुरूपदावर विराजमान झालेली व्यक्ती ज्ञानी, अनुभवी व विविध विषयात पारंगत असे. आजही शाळा व महाविद्यालयात अनेक पदव्या प्राप्त केलेले शिक्षक, प्राध्यापक आपण पाहतो. आज संगणकावर, मोबाईलवर, लॅपटॉपवर कोणत्याही विषयाचे अगदी अद्ययावत ज्ञान क्षणात मिळू शकते;
ही एक प्रकारची क्रांतीच आहे. खरी ज्ञानी व्यक्ती ही अहंकाररहित आणि विनम्र असते. याउलट ‘उथळ पाण्याला खळखळाट फार’ या न्यायाने अनेक क्षेत्रातील ज्ञानातील थोडे थोडे मोजके ज्ञान असणारी व्यक्ती अहंकारी असू शकते.
मूलभूत ज्ञान मिळवून निरनिराळ्या साहित्यकृती निर्माण करून अनेक लेखक, संत आज अजरामर झालेले आपण पाहतो. कालिदासांचे ‘अभिज्ञान शाकुंतल’ भारतातच नव्हे तर जर्मनी व इतर देशात गाजले आहे. शेक्सपिअर ची लोकप्रियता जगन्मान्य आहे. ज्ञानेश्वरी माऊलींनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीचे अनेक भाषात भाषांतर झाले आहे. महाभारतास तरी ‘व्यासोच्छिष्टं’ असे म्हणतात कारण असा एकही विषय नाही की ज्याचा उहापोह महाभारतात झाला नाही. व्यासांनी सांगितलेले महाभारत साक्षात श्रीगणेशाने लिहून घेतले आहे.
दिल्याने वाढते ते ज्ञान आणि जे घेतले जात नाही ते अज्ञान असे म्हणणे अगदी योग्य ठरेल. ज्ञानाचा उपयोग करून व्यक्ती उच्च पदी विराजमान होते. ज्ञानामुळे प्रतिष्ठा प्राप्त होते. पूर्वी ज्ञानसंपन्न अशा व्यक्तींना राजाश्रय मिळत असे. आजशी ज्ञानाचे महत्व अनन्यसाधारण आहे. म्हणून ज्ञान हा माणसाला तिसरा डोळा आहे, असे म्हणतात.
सेल! सेल! सेल! … एक खरेदी करा दुसरी वस्तू अगदी फ्री! फ्री! अशा पाट्या मान्सून मध्ये सगळी कडे जास्तच झळकतात.. महिला वर्ग तर अशा मान्सून सेल ची अगदी आतुरतेने वाट बघत असतो.. पण खरचं ह्या एक वर एक फ्री ह्या अशा ऑफर फायदेशीर असतात का हो की ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी केलेला हा एक प्रयत्न असतो.. कारण या जगात कोणतीच गोष्ट फुकट मिळत नसते..
“फुकट” हा शब्द ऐकला की प्रत्येकालाच आनंद होतो. पण खरतर या जगात फुकट काहीच मिळत नाही. प्रत्येक गोष्टीची एक किंमत असते. ती कधी पैशांत मोजली जाते, तर कधी वेळ, कष्ट, त्याग, संयम किंवा जबाबदारी ह्यांच्या रूपात मोजली जाते..
निसर्ग आपल्याला हवा, पाणी, सूर्यप्रकाश आणि अन्न देतो. पण त्यामागे ही निसर्गाचे संतुलन टिकवण्याची जबाबदारी आपलीच असते. शेतकऱ्याने कष्टाने पिकवलेल्या धान्यामागे त्याचा घाम, मेहनत असते. त्यामुळे अन्नाचा प्रत्येक घास अमूल्य असतो.. आणि त्या घासाची किंमत जो पर्यंत कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत त्याचे खरे मोल कळत नाही..
एखाद्या परीक्षेत उत्तम यश गुण मिळवण्यासाठी नियमित अभ्यास, शिस्त आणि सातत्य आवश्यक असते आणि ह्या किंमतीवरचं यशाची पावती मिळते म्हणजेच यश मिळवण्यासाठी प्रयत्न सातत्य आणि मेहनत ही किंमत मोजावी लागतेचं… एखाद्या खेळाडूसाठी एखादी स्पर्धा त्यातील यश मेडल मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे प्रॅक्टिस करावी लागते अपार कष्ट घ्यावे लागतात वेळ खर्ची घालावा लागतो तेंव्हा कुठे यशाची पायरी मिळते.. प्रत्येक यशामागे संघर्षाची कहाणी असते. संघर्षाची चिकाटीची किंमत मोजावी लागते..
आजच्या काळात अनेक गोष्टी “फ्री” म्हणून दिल्या जातात. परंतु त्याची किंमत आपण वेळ, छुपे टॅक्सेस किंवा इतर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात चुकवत असतो. त्यामुळे जे दिसते तेच खरे असते असे नाही. कोणतीच गोष्ट कधीच फुकट मिळत नाही.. त्याची कोणत्या ना कोणत्या प्रकारे किंमत मोजावीच लागते..
आई-वडिलांचे प्रेम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रांची साथ यांना पैशांत मोजता येत नाही. पण त्यामागे त्यांचा त्याग, काळजी आणि निस्वार्थ भाव असतात म्हणून अशा नात्यांचे मोल खूप जास्त असते.. अशी नाती अमूल्य असतात आणि ती ज जपणे ही आपली जबाबदारी असते..
जीवनात यश, सन्मान, विश्वास आणि आनंद हे कोणालाही सहज मिळत नाहीत. त्यासाठी प्रामाणिकपणा, परिश्रम, संयम आणि चिकाटी आवश्यक असते. कष्टाशिवाय मिळालेली गोष्ट टिकत नाही, पण कष्टाने मिळवलेले सुख आयुष्यभर अभिमान देऊन जाते.
म्हणूनच “फुकट काहीही नसते” हे जीवनाचे सत्य आहे. प्रत्येक गोष्टीमागे कोणाचा तरी त्याग, कष्ट किंवा किंमत दडलेली असते. म्हणून मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचे मोल ओळखून कृतज्ञ राहता आले पाहिजे, त्या मागे लागलेल्या कष्टांची किंमत ओळखता येण खूप गरजेचं असतं.
“कष्ट हेच खरे भांडवल आणि परिश्रम हेच यशाचे प्रवेशद्वार आहे. ” कष्टाशिवाय फळ नाही, आणि मूल्याशिवाय कोणतीही गोष्ट नाही. ” म्हणून फुकटाच्या मोहात न पडता, प्रामाणिक परिश्रमाने मिळवलेल्या प्रत्येक यशाचा अभिमान आयुष्यभर आनंद देऊन जातो..
☆ “गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने…” ☆ श्री जगदीश काबरे ☆
गुरुपौर्णिमा हा दिवस पारंपरिक अर्थाने गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा मानला जातो. परंतु बदलत्या काळात गुरु या संकल्पनेकडे नव्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. ज्ञान हे आज एका व्यक्तीच्या मक्तेदारीत राहिलेले नाही. पुस्तके, प्रयोग, संवाद, संशोधन आणि तंत्रज्ञान यांमधून ज्ञानाचे असंख्य स्रोत उपलब्ध झाले आहेत. अशा परिस्थितीत विद्यार्थ्याला केवळ आज्ञाधारक शिष्य बनविण्यापेक्षा विचार करणारा, प्रश्न विचारणारा आणि नवनिर्मिती करणारा नागरिक बनविणे अधिक महत्त्वाचे ठरते.
पारंपरिक गुरुशिष्य परंपरेने भारतीय समाजाला मोठी सांस्कृतिक परंपरा दिली असली तरी तिच्या काही रूपांमध्ये गुरुचे वचन अंतिम मानण्याची प्रवृत्ती वाढली. अशा वातावरणात शंका विचारणे, मतभेद मांडणे किंवा प्रस्थापित विचारांना आव्हान देणे हे अनेकदा अनुचित मानले गेले. अशा विद्यार्थ्याला उद्धट, दुर्वतनी समजले गेले. परिणामी, ज्ञानाचे चिकित्सक आकलन करण्याऐवजी ते स्वीकारण्यावर भर राहिला. गुरुशिष्य परंपरेचा सगळ्यात वाईट परिणाम म्हणजे प्रश्न विचारण्याची सवय कमी झाली की नवनिर्मितीची शक्यतादेखील कमी होते, हा आहे. याउलट शिक्षकमित्र ही संकल्पना शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नात्याला अधिक लोकशाहीवादी आणि सर्जनशील स्वरूप देते. शिक्षकमित्र विद्यार्थ्याला तयार उत्तरे देत नाही; तो योग्य प्रश्न विचारायला शिकवतो. तो विद्यार्थ्याच्या शंका ऐकून घेतो, त्याच्या विचारांना दिशा देतो, चुका करण्याची आणि त्यातून शिकण्याची मोकळीक देतो. अशा वातावरणात विद्यार्थी केवळ माहितीचा संग्रहकर्ता राहत नाही, तर ज्ञानाचा शोध घेणारा संशोधक बनतो. विज्ञान, तंत्रज्ञान, साहित्य आणि समाजपरिवर्तन या सर्व क्षेत्रांतील मोठे शोध प्रश्न विचारण्याच्या धैर्यातूनच जन्माला आले आहेत.
एकविसाव्या शतकातील शिक्षणाचे उद्दिष्ट आज्ञाधारक अनुयायी घडविणे नसून स्वतंत्र विचार करणारे, विवेकशील आणि सर्जनशील व्यक्तिमत्त्व घडविणे हे असले पाहिजे. त्यामुळे गुरुपौर्णिमा साजरी करताना केवळ व्यक्तिपूजेला महत्त्व देण्याऐवजी जिज्ञासा, चिकित्सक विचार, मुक्त संवाद आणि ज्ञानाच्या सततच्या शोधाला प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकाची गरज आहे. म्हणूनच भविष्यात गुरुपेक्षा शिक्षकमित्र ही संकल्पना अधिक उपयुक्त ठरणारी आहे, कारण ती विद्यार्थ्याला अंधानुकरणाची साखळी तोडण्यासाठी विचारांचे बळ देते. त्यामुळे परंपरेचा आदर राखत, पण आधुनिक काळाच्या गरजेनुसार शिक्षणाचे आणि गुरु म्हणवल्या जाणाऱ्या शिक्षकांचेही स्वरूप बदलण्याची वेळ आता आली आहे हे निश्चित. म्हणून मला वाटते की, गुरुशिष्य या नात्यापेक्षासुद्धा शिक्षकमित्र हे नाते जास्त महत्त्वाचे आहे. कारण गुरुशिष्य परंपरेत ‘बाबा वाक्यं प्रमाणम्’ याप्रमाणे गुरु आज्ञा प्रमाण मानली जाते. शिष्य शंका आणि प्रश्न विचारत नाही. त्यामुळे नवीन काही निर्माण करू शकत नाही. गुरुने दिलेले ज्ञान घोकंमपट्टी करून विद्वान झाल्याचा त्याच्यात आभास निर्माण होतो. त्या उलट शिक्षकमित्र या नवीन परंपरेत विद्यार्थी शंका विचारतो, प्रश्न विचारतो आणि आपल्या विचारांना शिक्षकमित्राच्या सहाय्याने निश्चित दिशा देतो. त्यामुळे काहीतरी नवीन करण्याची उर्मी त्याच्यात संचारते.
एवंच कधीतरी पारंपारिक विचारांच्या पलीकडे जाऊन आधुनिक काळानुसार आपण विचार करायला सुरुवात करणार आहोत काय, हा प्रश्न या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे.
☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – ३२ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆
समर्पण (२)
पांडुरंगाची भक्ती करताना संत तुकाराम भगवंताच्या पायी लीन झाले आहेत, त्यांची देह बुद्धी नष्ट होऊन परमेश्वराशी त्यांनी स्वतःला कसे समर्पित केले आहे याविषयीचे काही अभंग मागील लेखात आपण पाहिले. आज आणखी काही अभंगांचा परामर्श घेऊ.
महाराजांना चोहीकडे एका परमेश्वराचेच रूप दिसत आहे, त्याचाच आवाज त्याला ऐकू येत आहे. ते देवाला म्हणतात…
ध्याईन तुझे रूप/ गाईन तुझे नाम/
आन न करी काम/ जिव्हा मुखे//
पाहिन तुझे पाय/ ठेवीन मी डोई/
पृथक ते काही/ न करी आन//
तुझेचि गुण नाद/ आईकेन कानी/
आणिकांची वाणी/ पुरे आता//
करीन मी सेवा करे/ चालेन मी पायी/
आणिक न वजे ठायी/ तुजविण//
तुका म्हणे जीव/ ठेवीन मी पायी/
आणिक ते काही/ देऊ कवणा//
हे देवा मी सदैव तुझेच रूप माझ्या डोळ्याने पाहत राहीन आणि तुझेच नाम सतत गात राहीन. माझ्या जिभेवर दुसरे काहीच येणार नाही. माझ्या डोळ्यांनी फक्त तुझे पाय मी पाहीन आणि त्यावरच माझे मस्तक ठेवीन.
त्याशिवाय दुसरे काही करणार नाही. तुझे गुणगान ऐकत राहीन, बाकी काही बडबड करणार नाही. तुझ्याकडे पायी चालत येईन आणि या माझ्या हाताने तुझी सेवा करीन. तुला सोडून दुसरीकडे कोठेही मी जाणार नाही. हा माझा जीव तुझ्या चरणी अर्पण करीन. आता दुसऱ्या कुणाला देण्यासाठी माझ्याकडे काही उरले नाही. हरीनामा- व्यतिरिक्त तुकारामांकडे काही नव्हते, ते हरिमय झाले होते.
एका विठू माऊलीला शरण गेल्याने भक्ताचा कसा फायदा होतो ते महाराज या अभंगात सांगत आहेत.
भावे ऐसा नाश/ अवघिया दिला त्रास/
अविटाचा केला संग / सर्व भोगी पांडुरंग//
आइताच पाक/ संयोगाचा सकळीका/
तुका म्हणे धणी / सीमा राहिली होऊनी//
आज पर्यंत मी दुसऱ्यांना जो काही त्रास दिला असेल आणि त्यामुळे मला जे पाप लागले असेल, ते या पांडुरंगाला शरण गेल्यामुळे आता नष्ट होईल. कारण त्याच्या अवीट भक्तीमुळे मला त्याचा संग लागला आहे आणि माझी सर्व सुखदुःखे तो एक पांडुरंग आता भोगत आहे. तुकाराम महाराजांना हेच सांगायचे आहे की हरिभक्तीत लीन झाल्यामुळे भक्ताला सुखदुःखाची जाणीव राहत नाही. कोणत्याही परिस्थितीत, चांगली अथवा वाईट त्याचा समभाव राहतो.
तुकाराम सांगतात की अन्नाचा दुष्काळ पडला आहे किंवा त्यांना फार भूक लागली आहे म्हणून ते अन्न सेवन करत नाहीत, तर सर्वसाक्षी जनार्दनाचा मान राखण्यासाठी ते भोजन करतात. बालका बरोबर जर ते जेवावयास बसले तर त्यांना असे जाणवते की आमचा पिताच आम्हाला मोठ्या प्रेमाने भरवीत आहे.
चांगली आणि वाईट दोन्ही कर्मे जेथे जळून जातात ते आत्मपद महाराजांना प्राप्त झाले आहे. मी कोणी नसून कर्ता- करविता तोच एक नियंता आहे याची अनुभूती त्यांना आलेली आहे.
तुकारामांच्या मनाची ही अवस्था ते या अभंगातून कशी व्यक्त करत आहेत ते बघा.
जे जे काही करितो देवा/ ते ते सेवा समर्पे//
भेद नाही सर्वात्मना/ नारायणा तुज मज //
आम्ही दुजे नेणो कोणा/ हेचि मना मन साक्ष/
तुका म्हणे जगन्नाथा/ हे अन्यथा नव्हे की//
ते जे जे काही कर्म करतात ते ते सर्व एका नारायणाला समर्पित करायचे या एका मनोभूमीकेतून. सर्वात्मक सर्वेश्वर आणि तुकाराम महाराज स्वतः यात तो आणि मी असा जराही भेद आता राहिलेला नाही. त्यांचे मनच या स्थितीला साक्षी आहे. ते पुन्हा पुन्हा सांगतात, ” हे जगन्नाथा, मी हे जे सांगतो आहे ते पूर्ण सत्य आहे, यात जराही खोटेपणा नाही.”
लोहचुंबकाच्या बळे/ उभे राहिले निराळे/
तैसा तूचि आम्हा ठाई/ खेळतासी अंतर्बाही //
भक्ष अग्नीचा तो दोरा/ त्यासी वाचवी मोहरा/
तुका म्हणे अधीलपणे/ नेली लाकडे चंदने//
नारायणाच्या संगतीने भक्त कसा परमेश्वराशी एकरूप होतो हे तुकाराम महाराजांनी वरील अभंगात काही उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.
चुंबकाच्या आकर्षणाने लोखंडाची सुई उभी राहते, तसा परमेश्वर भक्तांच्या अंतर्बाह्य उभा आहे. धाग्याचा धर्म आगीने जळण्याचा असतो, परंतु तोच धागा मोहरा नामक खड्याला गुंडाळून अग्नीत टाकला तर जळत नाही. चंदनाच्या संगतीने इतर वृक्षांचे गुणधर्म जाऊन त्यांना चंदनाचा सुगंधी गुण येतो. सत्संग किती महत्त्वाचा आहे ही गोष्ट या उदाहरणांवरून आपल्या लक्षात येते. तात्पर्य, देवाच्या संगतीने भक्त आमुलाग्र बदलतो.
समर्पणाविषयी अनेक अभंग आपल्याला गाथेत आढळतात. मला असे वाटते की या सर्व अभंगांचा आपण अभ्यास करावा. चांगल्या वाचनाने आपल्यावरही चांगले संस्कार होऊन उचित परिणाम होऊ शकतो. यास्तव पुढील लेखात समर्पणाविषयीचे आणखी काही अभंग आपण अवश्य विवेचनासाठी घेऊ.