श्री अरविंद लिमये
विविधा
☆ तो आणि मी…! – भाग ६५ ☆ श्री अरविंद लिमये ☆
(पूर्वसूत्र- त्या रात्री तारामावशीला खूप ताप भरला. थर्मामिटर लावून पाहिलं तर एकपर्यंत ताप होता. प्रवासाच्या दगदगीने आलेला तो ताप नव्हता हे विषमज्वराचं निदान झालं तेव्हा समजलं.)
नियमित औषधं, पथ्यपाणी, आराम यामुळे तापाला पुढे हळुहळू उतार पडत गेला. तिचा अशक्तपणा कमी झाल्यानंतर तिची मुलगी, जावई दोघे स्वतः येऊन या दोघांना घेऊन गेले. खरं तर ही अगदी साधी घटना, पण त्यात भविष्यांत कधीतरी मला दिलासा आणि शुभसंकेत देणारे धागेदोरे अलगद विणले गेले होते आणि हे मधे बराच काळ उलटून गेल्यानंतर मला आपसूक जाणवणार होतं याची मला कल्पनाच नव्हती. अर्थात त्यामुळेच कदाचित ती घटना मनात जपून ठेवायची प्रेरणा तारामावशीला मिळाली असणार हेही ओघाने आलंच. डोंबिवलीला गेल्यानंतर तिने आवर्जून पाठवलेल्या सविस्तर पत्रात आम्हा दोघांचं भरभरून कौतुक करून आम्हाला मनापासून आशीर्वाद दिले होते!
अगदी योगायोगाने घडलाय असं वाटणारा हा प्रसंग मधल्या काळात आम्ही विसरूनही गेलो होतो. या प्रसंगानंतर दोनतीन वर्षांनी माझ्या लहान भावाचं लग्न ठरलं तेव्हा मावशीला कांही कारणाने समक्ष येणं शक्य झालं नव्हतं तरीही तिने आईकडे भावाच्या संसारासाठी तिची आठवण म्हणून योग्य वस्तू घेण्यासाठी आवर्जून आहेरही पाठवला होता. तिच्या सरळ, मोकळ्या स्वभावानुसार आम्हा कुटुंबियांबाबतचा सद्भावही तिने नेहमीच जपला होता! नात्यांकडून अशा सद्भावनांपेक्षा वेगळी अपेक्षा ती काय असणार? तरीही तारामावशीच्या मनात मात्र यापेक्षा वेगळं, व्यक्त न करता आलेलं असं बरंच कांही ठाण मांडून बसलं होतं आणि तिने मला आवर्जून भेट म्हणून पाठवलेली ती दत्तमहाराजांची प्रसन्न रेखीव मूर्ती हे त्याचंच प्रतिक होतं, हे पुढे मी मुद्दाम तिला भेटण्यासाठी आणि हे सगळं जाणून घेण्याकरता केलेल्या आट्यापिट्यानंतर आमच्या अतिशय केविलवाण्या, करूण अशा मूकसंवादातून मला सांगायचा तिने प्रयत्नही केलेला होता. पण त्यातलं कणभरही कांही माझ्यापर्यंत पोचलंच नव्हतं. त्या संपूर्ण प्रसंगाच्या हळव्या आठवणी आजही मला अस्वस्थ करतायत..!!
आपण बरंच कांही मनाशी ठरवतो, ते आपल्याला अगदी सहजशक्य, अतिशय सोपंही वाटत असतं. पण जे घडतं ते ‘त्या’च्या मनात असेल तर आणि तसंच. आता मुद्दाम वेळ काढून मुंबईला जाऊन
तारामावशीची भेट घेणं आणि तिने माझ्यासाठी पाठवलेल्या दत्तमूर्ती संदर्भात तिच्याशी बोलून त्यामागची तिला मिळालेली प्रेरणा आणि अर्थातच या घटनेमागचा कार्यकारणभाव समजून घेणं माझ्यासाठी फारसं अवघड नसणाराय असंच मी गृहित धरलं होतं, पण नेमकं नियोजन करून मी हे सगळं जुळवून आणायचा प्रयत्न सुरू केला तेव्हा मात्र सहजसोपं वाटणारं हेच सगळं माझ्यासाठी अतिशय क्लेशकारकच ठरलं होतं. तो बोचरा अनुभव मी कधीच विसरणार नाही.
माझ्या टीमसाठीचा आॅडिटटूर प्रोग्राम हातात पडताच त्यातील सूचनांप्रमाणे विदर्भातील कांही रूरल-ब्रॅंचेसचे ऑडिट आम्ही संपवत आणले होते. त्यादरम्यानच्या पुढील नियोजनानुसार आम्हाला नाशिक जिल्ह्यामधील ब्रॅंचेसचा आॅडिट प्रोग्राम मिळाला. त्यात पहिलीच ब्रॅंच होती ती नाशिक-मेन ब्रॅंच. नंतर तिथल्याच इतर दोन लोकल ब्रॅंचेस् करून मग जिल्ह्यातल्या इतर ब्रॅंचेस करायच्या होत्या. त्यासाठी अर्थातच खुद्द नाशिकला सलग कमीतकमी एक महिना तरी आमचा मुक्काम असणार होताच. त्यामुळे सततच्या प्रवासाच्या नेहमीच्या दगदगीतून कांही काळ कां होईना सुटका झाल्याने थोडीतरी स्वस्थता मिळणार होती. नाशिक मेन ब्रॅंचचं आॅडिट सुरू केलं तो शुक्रवार होता. माझे तीनही ऑडिट असिस्टंटस् पुण्याचे असल्याने लगेचच्या शनिवारी काम संपवून त्यांचा पुण्याला घरी जाऊन यायचा बेत होता. त्यामुळे तो शनिवार-रविवार मला एकट्यानेच नाशिकला रहाणं क्रमप्राप्त होतं. शुक्रवारी रात्री उशिरा अंथरूणाला पाठ टेकली तेव्हा याच सगळ्या विचारांमधे मग्न असताना एक पर्याय उसळी मारून वर आला. ‘आपणही या शनिवार-रविवारी इथं एकट्यानेच पडून रहाण्यापेक्षा शनिवारचं हाफ-डेचं रूटीन संपवून मुंबईला जाऊन तारामावशीला भेटून आलो तर..? ‘ हा विचार मनात आला न् सगळी मरगळ निघूनच गेली एकदम. नाशिक-ठाणे बस फ्रिक्वेन्सीज चांगल्या होत्या आणि शेअर टॅक्सीसही मिळू शकत होत्या. प्रवास वन वे साधारण दोन अडीच तासांचा. त्यामुळे ते फारसं दगदगीचंही नव्हतं. माझी सख्खी मावशी, मावसभाऊही डोंबिवलीतच रहायचे. त्यांनाही भेटणं झालं असतं. त्याच उत्साहात रिसेप्शनला फोन करून मी माझ्या मावस भावाचा फोन नंबर दिला आणि अर्जंट काॅल जोडून द्यायला सांगितलं. पाच मिनिटांपूर्वी जे मनातही नव्हतं पण खूप दिवसांपासून मला व्हावंसं वाटत होतं ते आता असं अचानक शक्य होणार होतं. सगळं मनासारखं घडून येणार असल्याचा त्याक्षणीचा आनंद माझ्यासाठी अतिशय अनपेक्षित आणि उत्साहवर्धकच होता!
मी माझी आॅडिट टूर, नाशिकचा मुक्काम सगळं मावसभावाशी बोललो आणि ‘उद्या बँकेतली कामं संपवून संध्याकाळी तुमच्याकडे येतोय’ असंही सांगितलं. आता सगळं मनासारखं घडणार यात तिळमात्रही शंका नव्हती… पण? … पण ते तसं घडणार नव्हतं. वाटेत दबा धरून बसलेले अनेक खाचखळगे, अडचणी एकेक करून समोर येत मला अस्वस्थ करीत रहाणार आहेत याची मला तेव्हा कल्पनाच नव्हती!
नाशिकपासून व्हाया ठाणे डोंबिवली हा प्रवास तसा स्वस्थपणे झाला. रात्री भावाकडे छान गप्पा, जेवण, आराम झाला. माझा परतीचा प्रवासही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी असल्याने, मी गप्पांच्या ओघात
‘मला कांहीही करून आपल्या तारामावशीलाही भेटून जायचंय रे.. ‘ असं भावाला सांगितलं. ती डोंबिवलीतच रहात असल्याने या मावसभावाचं तिच्याकडे अधून मधून जाणं-येणं असेच.
“ती आणि भिडे काका दोघेही आता त्यांच्या मूळ घरी नाही रहात. ते बऱ्याचदा आता दोन्ही मुलींकडेच असतात” भाऊ म्हणाला.
“कां रे…? “
“कारण असं नाही.. पण मावशीला रोजच्या कामांचीही दगदग होते आता. काकाही थकलेत. त्यामुळे दोन्ही मुली, जावयांनीच हा निर्णय घेतलाय. सध्या ही दोघं डोंबिवलीतल्या तिच्या मोठ्या मुलीकडे, मीनाकडे असतात. मी पंधरा दिवसांपूर्वी त्या दोघांना भेटून आलोय. मीना इथून जवळच्या सोसायटीमध्येच रहाते अरे. अगदी जवळ आहे. ” भाऊ म्हणाला
सकाळी चहा घेताना ‘मी आत्ताच मीनाकडे जाऊन येऊ का रे? ‘ असं भावाला विचारलं. त्याला आणखी एक-दोन ठिकाणी जायचं असल्याने त्याने मला तिच्या घरापर्यंत सोडलं आणि ‘तासाभरात न्यायला येतो.. ‘ असं सांगून तो त्याच्या कामासाठी गेला. निघताना भाऊ मीनाला फोन करू लागला तेव्हा मीच त्याला थांबवलं होतं. फोन करू दिला नव्हता. मला मावशीला सरप्राईज द्यायचं होतं.
पण… सरप्राईज मलाच मिळालं पण ते फारसं बरं नव्हतं. कारण घरी मीना आणि तिचा नवरा-मुलं सगळे होते पण मावशी न् काकाच नव्हते. माझा अर्थातच खूप विरस झाला.
त्या दोघांना थोडा बदल म्हणून ठाण्याला असणारी तिची दुसरी मुलगी न् जावई त्यांच्याकडे घेऊन गेले होते. मला परतीचा प्रवास नाहीतरी व्हाया ठाणेच करायला हवा होता त्यामुळे तिच्याकडे जाऊन, मावशीला भेटून तिथूनच थेट नाशिकला जाण्यात मला अडचण कांहीच नव्हती.
“तू असं कर” मी मीनाला म्हणालो, ” मला तिचा ठाण्याचा पूर्ण पत्ता, फोन नंबर लिहून दे आणि कसं जायचं तेही सांग. मला कांही झालं तरी मावशीला भेटायचंच आहे. तिला भेटल्या- बोलल्याशिवाय मला चैनच पडणार नाही. म्हणून भेटायचंय. “
मीनाने अस्वस्थपणे नवऱ्याकडे पाहिलं.
“तुमची खूप आठवण काढत असतात त्या.. ” मग तिचा नवराच म्हणाला, ” तुम्ही जरूर जा, भेटा त्यांना पण…. “
“पण काय? “
” तिला पॅरॅलिसिसचा नुकताच माईल्ड अॅटॅक आला होता अरे. कालच डिस्चार्ज मिळालाय. आम्ही दोघेही कालपर्यंत ठाण्याला जाऊन येऊनच होतो. त्यामुळे तुला पाहून तिला आनंद होईल, पण पूर्वीसारखं बोलता येत नाहीय तिला अजून… ” मीना म्हणाली.
हे सगळंच खरंच खूप विचित्र होतं. पण तरीही ती ‘माईल्ड अॅटॅक’ म्हणाली होती त्यामुळे त्यात मला फारसं गांभीर्य मात्र जाणवलं नव्हतं. तरीही आज शक्यतो पुरेसा वेळ तिच्याजवळ थांबायला मिळेल असं नियोजन करायचं मनाशी ठरवून मी त्या सर्वांचा निरोप घेतला.
तोवरची माझी उमेद, उत्साह सगळं हे ऐकून विरूनच गेलं होतं. ठाण्याला जाऊन मावशीला भेटल्याशिवाय मला आता चैन पडणं शक्य नव्हतंच. मी भावाच्या घराच्या दिशेने झपाझप चालू लागलो. मन मात्र मावशीच्या काळजीने अस्वस्थ झालं होतं… ‘तिथं ठीक असेल ना सगळं…? .. ‘ हा विचार मनात आला. मी तो एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा झटकूनही टाकला. पण तरीही कुशंकेची पाल मात्र बराच वेळ मनात चुकचुकतच राहिली होती…!!
क्रमश:… (प्रत्येक गुरूवारी)
©️ अरविंद लिमये
सांगली (९८२३७३८२८८)
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈















