मराठी साहित्य – विविधा ☆ “समिधाच सख्या या…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

प्रा.भारती जोगी

? विविधा ?

☆ “समिधाच सख्या या…” ☆ प्रा.भारती जोगी ☆

स्वातंत्र्य दिन जसजसा जवळ येऊ लागतो तसतसं मनात आठवणींचे मोहोळ उठतं! ब्रिटिश राजवटीचं दाटलेलं, दाट, गर्द सावट; लाखों-करोडोंनी स्वातंत्र्य प्राप्तीच्या धगधगत्या यज्ञकुंडात केलेलं जीवांचं समर्पण!! अनेक स्मरणीय, काही मात्र विस्मृतीत! काहींचं बलिदान लक्षणीय, तर काही अलक्षित!! पण बलिदान मात्र सगळ्यांचंच! ते व्यर्थ नाहीच! पण तरीही इतिहासात नोंद न झालेल्या अशा अनेक स्त्री हुतात्म्यांच्या प्रेरणा स्त्रोतांच्या झाकोळलेल्या कर्तृत्वाला नव्याने झळाळी देण्याचा हा प्रयत्न!

राणी वेलू नचियार….

तामिळनाडूच्या शिवगंगा जिल्ह्यातील रामनाथपुरम च्या राज परिवारात जन्मलेली एकुलती एक कन्या. जन्मजात विलक्षण प्रतिभेचं लेणं लेऊन आलेली! पित्याने तिचं लालन-पालन राजकुमारासारखंच केलेलं. अस्त्र, शस्त्र, तलवारबाजी, तिरंदाजी, भाला फेक, लाठी चालविणे, आदि सर्व युद्धकलेत पारंगत झालेल्या वेलू ने, ‘सिलंबम’ या तामिळी मार्शल आर्ट मध्ये ही कुशलता प्राप्त केली होती.

युद्धकला प्रविण वेलू नचियार ने तमीळ, तेलगू, मल्याळी, फ्रेंच, उर्दू… या भाषांवर ही प्रभुत्व मिळवले होते. हे कमी होतं म्हणून की काय तिने महान अशा तामिळ ग्रंथांचे वाचन करून ही, आपलं व्यक्तित्व बहुपेडी, बहुआयामी, बहुश्रुत बनवून स्वतः ला राज्याची उत्तराधिकारी म्हणून सिद्ध ही केले.

वयाच्या १६ व्या वर्षी राजा शशीवर्मा यांचे सुपुत्र… मुत्तू वेदुंगानाथ थेवर यांच्याशी विवाह झाला. वेलू आपल्या जीवनसाथी ची ख-या अर्थाने ‘ संगिनी’ सिद्ध झाली. वेळोवेळी आपल्या पतीची… मित्र, सल्लागार, एक विश्वासू सहयोगी सिद्ध झाली ती! पण दुर्दैवाने ईस्ट इंडिया कंपनी ची नजर शिवगंगा वर पडली, त्यांनी १७७२ मध्ये शिवगंगा वर आक्रमण केले. एक विध्वंसक युद्ध म्हणून इतिहासात नोंदलं गेलेलं हे युद्ध! निर्दयता आणि नृशंसता याची हद्द पार केली इंग्रज सैनिकांनी! अगदी वृद्ध, महिला, बालके ही नाही सुटली त्यांच्या हिंसाचारातून! वेलू नचियार च्या पतीला ही हौतात्म्य प्राप्त झाले.

वेलू आणि तिची कन्या वेल्लाची स्वतः ला सुरक्षित वाचवंत, तामिळनाडूतील डिंडिगुल येथील जंगलातील एका सुरक्षित जागी जाऊन पोहोचल्या आणि तेथेच वास्तव्य केले.

आपलं राज्य परत मिळविण्याची जिद्द, महत्वाकांक्षा, या राणीला स्वस्थ बसू देईना. तिचा आत्मविश्वास तिला आतून सारखा लढ, आगे बढो… अशी साद घालत होता.

वेलू नचियार ने कंबर कसली. आपली अस्त्र-शस्त्र विद्येतली पारंगतता पणाला लावायचं ठरवलं आणि आसपासच्या महिलांना गोळा करून त्यांच्यात देशाचं रक्षण करण्याचं स्फुल्लिंग चेतवलं या समिधेने! स्वातंत्र्य लढ्याच्या धगधगत्या होमकुंडात स्वतः ला समर्पित करणा-या अशा अनेक महिलांची सांगड घालंत, जणू एक मोळीच बांधली तिने! स्त्रियांना स्वतः तलवारबाजी, निशाणे बाजी सातत्याने ८ वर्षे शिकवत राहिली, तयारी करीत होती ती युद्धाची!

तिने त्यांना सैन्य रणनीती शिकवली. राणी वेलू नचियार चा हा मार्ग अतिशय खडतर होता. एकटीने बांधलेली सांगड तिला योग्य वेळी अर्पण करायची होती. पण दुर्दैवाने त्या त्याग आणि बलिदानासाठी, स्वातंत्र्य मंत्रोच्चारांनी सिद्ध आणि सिक्त समिधांमधील एक समिधा जिला युद्धा आधीच… राणीच्या शोधात आलेल्या इंग्रज सैनिकांना तिचा ठाव-ठिकाणा सांगितला नाही म्हणून हौतात्म्य पत्करावं लागलं! ती होती ऊदइयाल… राणीची मानसकन्या! जिने जणू काही आपल्या प्राणांचे बलिदान देऊन, मातृ वंदना दिली आणि ही समिधा निमाली!!

मग तिच्या वीर गती प्राप्ती च्या स्मरणार्थ राणीने स्थापिली एक नारी सेना… आणि तिला नाव दिले उदयियाल!!

एका समिधेच्या समर्पणाने चेतविलेल्या अनेक समिधा गोळा झाल्या… देश प्रेमाने बांधलेल्या, भारलेल्या, एकजुटीने!!

राणीने त्यांचं सेनापतीपद सोपवलं… तिच्या दुस-या मानसकन्येला… विश्वासू, तीक्ष्ण बुद्धी, वीरांगनेला… कुयिली ला!! आणि मग सुरू झाली युद्धाची तयारी!!

राणी वेलू नचियार… आपलं राज्य परत मिळविण्यासाठी ज्या योजना मोठ्या योजकतेने आखत होती, त्यांत एक महत्त्वाचा भाग म्हणजे तिने म्हैसूर च्या राजाला हैदरअली ला पत्र लिहून केलेली भेटीची विनंती!

राजाने ही तिचे अगदी राणीचा आब, इतमाम, आणि स्वाभिमान कायम राखणारं असं सन्मानित स्वागत केले. तिचे आतिथ्य ही केले. राणीने ही आपल्या उर्दू भाषेत संवादी होत, त्याला खूप प्रभावित केले. त्यानंतर हैदरअली ने राणीला मदत करण्याचे नुसते वचन नाही दिले, तर प्रत्यक्षात ४०० पौंड आणि ५००० सैनिकांची फौज ही दिली. इतकंच नाही तर असं म्हणतात की, राजाने त्यांच्या या आगळ्या, पवित्र, आणि एकाच ध्येयासाठी झपाटलेल्या मैत्रीचं प्रतीक म्हणून महालात एक मंदीर ही बांधले.

अशी ही युद्धाची तयारी ८ वर्षे चालली होती. आणि शेवटी तो दिवस आला. ज्याची वाट राणी आणि तिची नारी सेना… “रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग”… असं म्हणंत त्या प्रसंगाची वाटच बघत होती.

दस-याचा दिवस उजाडला! शिवगंगा किल्ल्यात देवी राजराजेश्वरी चं मंदीर! प्रतिवर्षी दसरा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने स्त्रिया येत. तशाच आल्या. स्त्रियांसाठी मंदिराचा दरवाजा उघडला गेला. मंदिराजवळच इंग्रजांचे शस्त्रागार असल्याची खबर नारी सेनेच्या सेनापती ला… कुयिली ला आधीच लागलेली. त्याच क्षणी तिच्या मनात एक विचार, विजेच्या लोळासारखा शिरला. त्याचा तिने कुणाला थांगपत्ता ही नाही लागू दिला.

तिच्या विचारांत ते विद्युल्लतेचं तेज झिरपू लागलं हळूहळू!!!

मंदिराचा दरवाजा उघडला… उदायल नारी सेना साधारण वेषात… फुला-फळांच्या टोपलीत; हत्यारे लपवून आत प्रवेशल्या. दस-याचा क्षणी कुयिली ने क्षणाचाही विचार न करता… एक क्षण ही न दवडता… सेनेला आपल्या अंगावर पूजेसाठी आणलेल़ सगळं तूप ओतायचा जणू हुकूमच दिला… आणि तशी कार्यवाही होताच… तिने आग लावली स्वतः ला! पापणी लवायच्या आत… आगीचे लोळ उठले… कुयिलीने उडी घेतली थेट शस्त्रागारात… आणि कानठळ्या बसविणा-या, एकामागोमाग एक होणा-या स्फोटात, संपूर्ण शस्त्रागार राख झाले… आणि त्यातच

इतिहासातला पहिला आत्मघातकी मानवी बॉंब… कुयिली… एक जळती, तेज:पुंज, पवित्र उद्देशाने भरलेली, आणि भारावलेली समिधा समर्पित झाली, त्या अग्नी दाहात! नाही कुठेच नोंद फारशी… आणि तिच्या दहनभूमी वर नाही चिरा नाही पणती.

अशा या दोन समिधा आपल्या जुडीत, सांगडीत बांधून घेणा-या तिस-या समिधेने… राणी वेलू नचियार ने * मग… सर्वशक्तीनीशी शिवगंगा किल्ला काबीज केलेल्या इंग्रजांवर हल्ला बोल करून… आपल्या युद्ध कौशल्याने आणि रणनीती ने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. आणि शेवटी विजयश्री माला तिच्या गळ्यात पडली. त्यानंतर राणी ने १० वर्षे राज्य केले. राजा हैदरअली शी असलेली मैत्री थेट पर्यंत टिकवून ठेवली. त्याचा मुलगा, टिपू सुलतान वर ही सख्ख्या भावासारखं प्रेम केलं. आणि नंतर आपल्या लेकीच्या हाती राज्य सोपवून ही पती निधनानंतर, सतत जळंत, धगधगंत, प्रज्वलित राहून, प्रजा हितासाठी स्वतः चं जळंत राहणं, प्रज्ज्वलन टिकवून ठेवणारी ही समिधा ही १७९६ मध्ये निमाली!!

राणी वेलू नचियार ला प्रजा वीर मंगई… वीर महिला या नावाने संबोधायची. झाशीच्या राणी लक्ष्मीबाई च्या जवळ जवळ ७५ वर्षे आधीचा हा वेलू चा संघर्ष! त्यामुळे ती एका अर्थाने राणी लक्ष्मीबाई ची प्रेरणा स्त्रोत च ठरते!

२००८ मध्ये भारतीय पोस्ट खात्याने तिच्या सन्मानार्थ एक पोस्टाचे तिकीट काढलं!

वेलू नचियार आजही… साहस, रणनीती, आणि नेतृत्व याचा आदर्श आहे महिलांसाठी!!

पण तरीही… भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक दुर्लक्षित नायिका च ठरतीये! समिधांच्या सांगडीतल्या या… उदयियाल, कुयिली आणि वेलू नचियार… तिनही समिधांना कोटी कोटी प्रणाम!

स्मृतीतल्या संपुटीत जपू यात ही त्रिपुटी… आणि म्हणू यात ना… तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हां घडो!

© प्रा.भारती जोगी

पुणे.

 फोन नंबर..९४२३९४१०२४.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ देवकीचे बाळ बाई नंदाघरी आले ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

प्रा. सुनंदा पाटील

? विविधा ?

☆ देवकीचे बाळ बाई नंदाघरी आले…  ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆

श्रावण महिना आणि आपले सण याचं अतूट असं नातं आहे. वर्षाचे अनेक सण या श्रावणातच येतात. त्यात श्रावण महिना हा शिवशंकराचा आहेच. श्रावण सोमवार असतोच. पुढे येणाऱ्या मंगळागौरी / भराडी गौर, वरद लक्ष्मी व्रत, श्रावणी शुक्रवार म्हणजे देवीची पूजा आहेच. पण यासोबतच श्रावणाचं आणि श्रीकृष्णाचं एक अतूट असं नातं आपल्याला दिसतं. अगदी दीपपूजेला जो जिवतीचा कागद आपण घेतो, त्यात सुद्धा कालियामर्दनाचं म्हणजेच पर्यायाने श्रीकृष्णाचे चित्र आहे. आज रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधन म्हटलं की सुभद्रा, कृष्ण आणि द्रौपदी यांच्या संबंधातली एक चिंधीची गोष्ट आपल्याला आठवते. अगदी लक्षात येतं ते शामची आई या चित्रपटातलं गाणं. ते म्हणजे,

“भरजरी ग पितांबर दिला फाडून

द्रौपदीशी बंधू शोभे नारायण

किंवा पारंपारिक असं गीत – – –

हरी बंधू शोभे द्रौपदी बाईला

ही गाणी सर्वांच्या ओठावर आहेत. बहीण भावाच्या प्रेमाचा राखीचा सण अतिशय उत्साहात पार पडतो.

पुढे आठच दिवसात जन्माष्टमी येते आहे. नंतर दहीहंडी आणि गोपालकाला. म्हणजे पुन्हा भगवान श्रीकृष्ण आहेतच. हरिहराचं हे नातं असलेला श्रावण महिना. या महिन्यात फक्त चारच शनिवारी काय काय लिहायचं? मोठा प्रश्न आहे कारण विषय खूप आहेत आणि वेळ कमी. पण वेगळं असं काहीतरी लिहावं वाटतं, म्हणून हा लेखप्रपंच.

श्रीकृष्ण जन्माष्टमी किंवा श्रीकृष्ण जन्मोत्सव हा सकल हिंदूंचा एक पवित्र सण आहे. श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमीच्या मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर, कंसाच्या बंदी शाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार. कृष्णाचा जन्म अराजकाच्या प्रदेशात झाला. लोकांचे स्वातंत्र्य जिथे नाकारले गेले होते, तिथे झाला. सर्वत्र वाईट गोष्टी होत्या. सख्ख्या मामाकडूनच भाच्याच्या जिवाला धोका होता. सख्खी बहीण, देवकी बंदिवासात होती. जन्मापूर्वीच त्या बाळाच्या हत्येचे अनेक कट रचले गेले होते.

बाळाचा जन्म झाला आणि जन्मानंतर काही क्षणातच वसुदेवाने, यमुना ओलांडून मथुरे मधून कृष्णाला गोकुळात नेले. नंद – यशोदा यांनी कृष्णाचे पालन केले. दोन मातांचं प्रेम कृष्णाला मिळालं. अनेक लोक या दिवशी उपवास करतात. विविध प्रकारे पूजा करतात. कुठेकुठे परंपरागत फुलोरा असतो.

आज निसर्गाशी साम्य साधणारे अनेक सण आपण करतो. अगदी गणपती सुद्धा शाडूचाच हवा – इकोफ्रेंडली वगैरे शब्द आत्ता आत्ता आम्हाला कळले. पण ही सणांची पद्धत अतिशय पूर्वीपासूनच खेड्यापाड्यात इकोफ्रेंडलीच आहे. माझ्या माहेरी सांगायचं झालं, तर कृष्ण जन्माष्टमीचा सण तिथे मोठ्या धडाक्यात साजरा होतो. माझे वडील स्वतः गणपतीच्या मूर्ती करत असल्यामुळे, घरी माती तयार असायचीच. त्याचेच आम्ही गोकुळ बनवायचो. बाबा कृष्णाची सुरेख मूर्ती बनवायचे. इतर मुर्त्या बनवायला भावंडं त्यांना मदत करायची. आणि आजी सांगायची की, “आजच्या दिवशी जर मातीला हात लावला नाही तर पुढला जन्म गाढवाचा मिळतो. ” पण तिच्या अशा युक्तीमुळे पुढचा जन्म गाढवाचा नको म्हणून त्या माती पासून आम्ही काही तरी तयार करायचोच. नाहीच काही झालं तर किमान एक डोंगी / पाण्याचं टाकं तरी आम्ही तयार करायचो. मूर्तीकलेला अशाप्रकारे बालपणापासूनच प्रोत्साहन दिलं जायचं.

मग कृष्णाची पूजा व्हायची. संपूर्ण गोकुळाची पूजा करायची. लेकुरवाळं घर असल्याने सर्वांना पूर्ण उपास नसून धान्यफराळ असायचा. कृष्ण जन्मासाठी आई आणि पुढे वहिनी सुंठवडा तयार करून ठेवत. कारण त्या दिवशी सुंठवड्याचाच प्रसाद असायचा.

रात्री भजन असायचं. या भजनात पंचपदी झाल्यानंतर शक्यतो कृष्णाची गाणी म्हटली जायची. अनेक ठिकाणी कृष्ण जन्माची कहाणी सुद्धा वाचली जाते. काही ठिकाणी मध्यरात्री कृष्ण जन्मानंतर कृष्णरूप, याच्या बालरूपाला आंघोळ घातली जाते. नवे कपडे आणि दागिने घातले जातात. आणि नंतर त्याला पाळण्यात घालून झोके दिले जातात. स्त्रिया त्यांच्या घराच्या दारावर बाहेर लहान पावलांचे घराकडे चालत येणारे रांगोळीचे ठसे काढतात. हे कृष्णाच्या त्यांच्या घरातील प्रवासाचे प्रतीक आहे.

कृष्ण सगळ्यांना जवळचा का वाटतो? प्रत्येक मातेला आपलं मूल हे कृष्णा समान वाटतं. प्रत्येक बहिणीला आपला भाऊ हा कृष्णा समान वाटतो. प्रत्येक पत्नीला आपला पती हा कृष्णा सारखाच वाटतो. एवढेच काय? प्रत्येकच स्त्रीला कृष्णा सारखा एकतरी सखा असावा असं वाटू लागतं आणि आपण त्याची राधा असावी असंही वाटतं. कारण श्रीकृष्ण वाटाडे आहेत. मार्गदर्शक आहेत. तत्त्वज्ञ आहेत. नर्तक आहे / गायक आहे /वादक आहे. समाज सुधारक सुद्धा आहे. अशा या कृष्णाच्या रूपात आपण एकरूप होऊन जातो. आणि म्हणूनच कदाचित मुलगी सासरी निघताना तिला दिली जाते ती अन्नपूर्णा आणि सोबत बाळकृष्ण. तिच्या आयुष्यभरासाठी तिचा सोबती म्हणून.

म्हणूनच हा सण मोठ्या भक्ती भावाने आणि उत्साहाने सर्वत्र साजरा केला जातो.

माझ्या माहेरी रात्री बरोबर बारा वाजता कृष्ण जन्म केला जायचा. गुलाल उधळला जायचा आणि त्यानंतर कृष्णाच्या पाळण्याचं गाणं म्हटलं जायचं. कृष्णाचे अनेक पाळणे आहेत. पण त्याच्या सख्ख्या मातेला कृष्णाला पाळण्यात घालून झोका देता आला नाही आणि म्हणूनच जो पाळणा मला ठाऊक आहे तोच मी या ठिकाणी देत आहे.

देवकीचे बाळ बाई नंदाघरी आले

माय यशोदा गं देई पाळण्यात झोले ॥ धृ ॥

*

मांडीवरी जोजविते कुण्या माऊलीचा कान्हा

आई पण जागे झाले फुटे यशोदेला पान्हा

पिता अमृताच्या धारा बाळ झोपी गेले ॥१ ॥

*

गोकुळीच्या गवळणींनो दूध आणा वाटी वाटी

हळूहळू वाढे कान्हा भूक त्याची होई मोठी

रोप यादव वंशाचे दारी लावियेले ॥ २ ॥

*

आईबाप ठाव नाही माझ्या लाडक्या कृष्णाला

त्याच्या माऊलीच्या दैवी मथुरेची बंदीशाळा

त्याच्या काळजाची माया माझ्या उरी हाले ॥३ ॥

*

माय यशोदा ग देई पाळण्याचा झोले

हा पाळणा म्हणून झाला की, आरती व्हायची. सर्वांना सुंठवड्याचा प्रसाद दिला जायचा. इतरत्र सुंठवडा होत नसल्याने अनेकजण घरच्यांसाठी प्रसाद सोबत बांधून न्यायचे. या साऱ्या आठवणी माझ्याजवळ आहेत आणि कधीतरी वाटतं की हा कृष्ण जन्म पुन्हा एकदा माहेरी जाऊन अनुभवावा. कारण अजूनही त्याच पद्धतीने त्याच परंपरेने कृष्णजन्म तिथे भावांकरवी आजही होत असतो.

याचा दुसरा दिवस म्हणजे गोपालकाल्याचा. गोपालकाला हा वेगळा विषय आहे गोपालकाल्याचे किर्तन आणि गोपालकाल्याचं गाणं एक वेगळा विषय असल्यामुळे पुढल्या लेखात तो भाग येईल. आज मी इथेच थांबते. पुन्हा एकदा कृष्ण द्रौपदीच्या रूपातल्या सर्व भावा – बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या जन्माष्टमीच्या सुद्धा खूप खूप शुभेच्छा.

© प्रा.सुनंदा पाटील

गझलनंदा

८४२२०८९६६६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा  ☆ ‘कोमल वाचा दे रे राम!’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘कोमल वाचा दे रे राम!’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

बोलण्याची क्षमता हे निसर्गाने मानवाला दिलेले विशेष वरदान होय. विकसित वाणी, तिन्ही काळाचा विचार करणारी अलौकिक बुद्धी व स्मरणशक्ती ही वरदाने केवळ मानवालाच मिळालेली आहेत. त्यातले ‘वाणी’ हे आपल्या इच्छा, भावना, विचार, गरजा व्यक्त करण्याचे एक अत्यंत प्रभावी साधन आहे.

तुम्ही बोलायला सुरुवात केली की, तुम्ही कसे आहात याचा परिचय जगाला होतो. तुमच्या आवाजाची पट्टी, शब्दांची निवड, बोलण्यातली सत्यता, विषयाचे गांभिर्य, विषयाचा व्यासंग, अनुभव, प्रामाणिकपणा, समोरच्या व्यक्तीविषयीचा आदर, आपुलकी सारे काही बोलण्यातून कळते. आपली नाती, व्यवसाय, सामाजिक व्यवहार या बोलण्यावरच अवलंबून आसतात.

समर्थांच्या मते बोलणे आणि बोलणारा कसा असू नये ते प्रथम समजून घेऊया.

अल्पमती आणी वादक l दीनरूप आणी भेदक l सूक्ष्म आणी त्रासक l कुशब्देकरुनि ll

कठिणवचनी कर्कशवचनी l कापट्यवचनी संदेहवचनी l दुःखवचनी तीव्रवचनी l क्रूर निष्ठुर दुरात्मा ll

न्यूनवचनी पैशून्यवचनी l अशुभवचनी अनित्यवचनी l द्वेषावचनी अनृत्यवचनी l बाष्कळवचनी धिःकारू ll

(दासबोध द. २ स. ३)

पुढे एके ठिकाणी समर्थ आपल्याला बोलणे हा विषय समजाऊन सांगताना म्हणतात….

बरें बोलता सुख वाटतें l हें तों प्रत्यक्ष कळतें ल आत्मवत परावें तें l मानीत जावें ll

कठिण शब्दें वाईट वाटतें l हे तो प्रत्ययास येतें l तरी मग वाईट बोलावें तें l काये निमित्त ll

आपणास चिमोटा घेतला l तेणे कासाविस जाला l आपणावरुन दुस-याला l राखत जावे ll

जे दुस-यास दुःख करी l ते अपवित्र वैखरी l आपणास घात करी l कोणियेकें प्रसंगी ll

पेरलें तें उगवतें l बोलिण्यासारिखें उत्तर येतें l तरी मग कर्कश बोलावें तें l काये निमित्त ll

आपल्या पुरुषार्थ वैभवें l बहुतास सुखीं करावें l परंतु कष्टी करावें l हे राक्षेसी क्रिया ll

दंभ, दर्प, अभिमान l क्रोध आणी कठिण वचन l हे अज्ञानाचे लक्षण l भगवद्गीतेंत बोलिलें ll

(दासबोध द. १२ स. १०)

बोलणे हे इतके महत्त्वाचे असूनही आपण आपले बोलणे अधिक चांगले करण्यासाठी विशेष प्रयत्न करत नाही. ब-याच वेळा आपला अहंकार आपल्याला तसे करू देत नाही.

‘आपलं जे आहे हे असंच आहे’, ‘माझा आवाजच मोठा आहे’ ‘मला अशीच सवय आहे’ ‘असं बोललं की मगच समजतं ‘ असे म्हणत आपण स्वतःचे समर्थन करतो. पण लक्षात घ्या, चांगले बोलणे प्रयत्नपूर्वक शिकावे लागते, आत्मसात करावे लागते आयुष्यभर याची साधना करावी लागते.

सुसंस्कृत वाणी हाच खरा अलंकार

वाणेक्या समलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते

क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणम् ll

अर्थः- वाणी संस्कृतियुक्त एकच नरा शोभा खरी देतसे

वाणी हीच अपूर्व भूषण सदा, नाशा दुजें जातसे ll

(राजा भर्तृहरिकृत नीतिशतक)

‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम लोक अमिताभ बच्चन यांचे बोलणे ऐकण्यासाठी पहात- खरे तर ‘कान देऊन ऐकंत’ असंत. उत्तम शब्दसंग्रह, स्पष्ट शब्दोच्चारण, आवाजाचा चढ-उतार- लय इ. शिकायचे असेल, तर हा बच्चन महोदयांचा आवाज आणि त्यांची बोलण्याची शैली अभ्यासायलाच हवी. आवाजाची, बोलण्याची, वाणीची साधना, तपस्या याचे साक्षात उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चन!काही शब्द त्यांच्या तोंडून ऐकले, की मग तसा उच्चार दुसरे कोणी करु शकत नाही हे हळूहळू कळत जाते.

सत्यार्थाने शब्द जगलेला माणूस शब्द उच्चारताना ते ज्या ऊर्जेने उच्चारतो त्यावरून त्याचा खरेपणा ओळखता येतो.

बोलण्याचा ध्वनी आतून, अंतःकरणातून उमटतो. माणसाच्या चेतनेला स्पर्श करुन बाहेर पडतो. माणूस म्हणून आपण जितके व जसे घडत जातो तसा, तितका आपला आवाजही सुंदर होत जातो. आशाताईंचे साधे बोलणेही गाण्याइतकेच सुश्राव्य का वाटते? कारण जगण्याची लढाई हसत लढलेल्या शक्तीची ती अभिव्यक्ती आहे!

एक प्रयोग करून पहा. सुंदर शब्दांची यादी करा आणि ती दररोज वाचा. सकारात्मक शब्दांची यादी लिहायची आणि वेळ मिळेल, तशी मोठ्याने वाचायची. सरावाने वाढवत जायचे हे आपले शब्दभांडार. सततच्या प्रयत्नाने हळूहळू आपल्या बोलण्यात ते शब्द येऊ लागतात. याने बोलणे चांगले होतेच पण सवयीने या विरुद्ध काही ऐकावेसे वाटतच नाही. नकळत आपल्या अभिरुचीचा स्तर उंचावत जातो.

आयुष्य बदलून टाकणारी ही शब्दांची साधना आहे. आपले शब्द जसे असतील, तशाच घटना, तशाच व्यक्ती आपण आकर्षित करत असतो. शब्द बदलले तर आयुष्यही बदलता येते हे ‘शब्दशः’ सत्य आहे!

सावकाश, स्पष्ट, भावपूर्ण, शक्यतो मृदु, हळू बोलणे या सवयी जाणीवपूर्वक लावून घ्याव्या लागतात. वाचनाने आपले विचार अधिक स्पष्ट, मुद्देसूद, प्रगल्भ होतात. आपल्याला नेमके व मोजके बोलण्याची कला अवगत होते.

काव्यवाचनाने कवितेतील भाव आणि शब्दयोजना समजून घेता घेता आपल्या बोलण्याची लय सुधारते. बोलण्यातला रुक्षपणा जातो आणि ‘ ये हृदयिचे तें हृदयीशी’ संवाद साधण्याची कला साध्य होते. यासाठी प्रकट वाचन, काव्यवाचन महत्त्वाचे आहे.

कानात प्राण आणून ऐकावे असे बोलणारी माणसे या जगात आहेत. आपल्याला ती शोधता-ऐकता आली पाहिजेत येवढेच.

बोलताना कटाक्षाने टाळायच्या गोष्टी म्हणजे तार स्वरात न बोलणे, पाल्हाळ न लावणे, अति संथ लयीत, समोरच्या व्यक्तीच्या सहनशक्तीची परीक्षा घेत रटाळ न बोलणे. वेळ ही संपत्ती असेल, तर अशा लोकांना वेळचोर का म्हणू नये? फोन, मोबाईलवर बोलण्याचे नियम हा तर चर्चेचा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल.

‘आपल्या’ माणसांशी बोलण्याने मनावरचा ताण हलका होतो. बोलणे म्हणजे निव्वळ शब्द नाहीत तर त्यामागे बोलणाराचे अनुभव, विषयाचे चिंतन, भावभावना, तळमळ असते. काही प्रसंगी तर मौन बाळगणे हेच सर्वात प्रभावी बोलणे ठरू शकते. ‘शब्दांवाचुन कळले सारे शब्दांच्या पलिकडले’ असे होते.

वेळात वेळ काढून घराघरात, समाजात संवाद – सुसंवाद झाले पाहिजेत. माणसांमाणसातले अंतर बोलण्यानेच दूर होऊ शकते. नात्यातले, मनामनातले गैरसमज बोलून दूर करता येतात.

परिणामकारक कसे बोलावे हे या जगाच्या शाळेत शिकावेच लागते. हा जगण्याचा प्रवास अवघड असला तरी अशक्य मुळीच नाही.

सोबत कोणी बोलणारे मिळाले की प्रवास सोपा होतो.

तात्पर्य:- ज्याच्या वाणीमध्ये माधुर्य व गोडवा आहे, जो सदैव संयमित व विनयशील बोलतो, शब्द जपून वापरतो, आपले बोलणे सहज, अकृत्रिम, प्रवाही, यमकअनुप्रासादि अलंकार, समर्पक दृष्टांत, उदाहरणे, उद्धरणे, अवतरणे यांनी शृंगारतो, जग त्याच्या प्रेमात पडते व अशा व्यक्तीला अशक्य गोष्टी शक्य होतात!

वाणीचे आणि शब्दांचे महत्व व सामर्थ्य जाणून समर्थ रामरायाला विनवतात….

कोमल वाचा दे रे राम

बहुत पाठांतर दे रे राम

शब्द मनोहर दे रे राम

दास म्हणे रे सद्गुणधाम

उत्तम गुण मज दे रे राम!

*

llजय जय रघुवीर समर्थ ll

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ प्राचीन कोकण… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

🌸 विविधा 🌸

☆ प्राचीन कोकण… ☆ प्रा. भरत खैरकर ☆

मागील कित्येक वर्षे कोकणात गणपतीपुळेला जाणं होतय.. साधारणतः २५-३० वर्षांपूर्वीचा कोकण आणि अलीकडच्या दशकातला कोकण फारच बदललेला आहे.. “पर्यटनातून रोजगाराची निर्मिती” तयार झाली आहे आणि ह्याच एक छानसं उदाहरण नुकत्याच गणपतीपुळेच्या झालेल्या भेटीत सापडलं..

गणपतीपुळ्याच्या बाजूलाच असलेल्या मालगुंड येथे कवी केशवसुतांचं घर व प्राचीन कोकण संग्रहालय ही दोन ठिकाणं मला खूप स्पर्शून गेली.. एवढी वर्षे कोकणात येऊन नुसते किनारे फिरून.. मासे खाऊन.. कोकणी माणूस समजून घेतला नव्हता..! पण प्राचीन कोकण संग्रहालयातील गाईड असलेल्या मुलीने जो कोकण समजावला तोच सांगण्याचा माझा हा प्रयत्न आहे..

संग्रहालयात प्रवेश करतानाच ज्याच्या त्याच्या ‘जन्मनक्षत्रा’नुसार त्या त्या व्यक्तीचे ‘आराध्यवृक्ष’ इथे बघायला मिळतात.. पिंपळपाराची पार जुनी परंपरा आपण येथे बघू शकतो.. प्रवेशगुहेच्या आधी अलीकडचा कोकण आणि आतमध्ये प्राचीन कोकण दाखविला आहे.. प्रवेशद्वारावर कवी माधव यांची “हिरवे तळकोकण” ही सुंदरशी कविता लावली आहे.. त्यानंतर लगेचच कोकणचं वैभव असलेलं कोकमच झाड आपलं लक्ष वेधून घेत.. त्याची औषधी उपयोगीता ऐकून आपण थक्क होतो.. शरबत, तेल, आमसूल, अशा विविध उपयोगासाठी आमसूल वापरलं जातं.

परशुरामभूमी असलेल्या ह्या कोकणात.. परशुरामाने ज्यावेळी पूर्ण भूमी जिंकली आणि ती लगेच दान देवून टाकली. त्यावेळी त्याला राहायला जागा उरली नाही.. मग तो ज्याठिकाणी चिपळूण, (गणपतीपुळे) आहे त्या ठिकाणी समुद्राला आव्हान करतो.. समुद्राशी लढाई करतो आणि त्याला जिंकून तिथला समुद्र ३०-४० किलोमीटर मागे जायला परावृत्त करतो.. हीच तयार झालेली किनारपट्टी वरची भूमी म्हणजे कोकण होय!

गुहेच्या आत प्रवेश केल्यावर जांभा ह्या लाल दगडात तयार केलेली ‘पाखाडी’ म्हणजे कच्चा रस्ता आपणास दिसतो.. हा रस्ता ग्रामदेवतेकडे जाण्याचा मार्ग आहे.. आजूबाजूला नानाविध मसाल्यांची झाडे.. त्यात काळीमिरी, दालचिनी, लवंग, वेखंड, वेलदोडा, हळद, इत्यादी मसाले आपण बघू शकतो.. सोबतच माडीवाला, ताडीवाला, यांचे पुतळे बघत बघत आपण कोकणी लोकांच दैवत असलेल्या ‘वाघजाई ‘ मंदिरात येतो.. ज्या ठिकाणी वाघांच जास्त प्रमाण असतं तिथला निसर्ग समृद्ध असतो असं म्हणतात.. कोकणी लोक हे

निसर्गपूजक असल्याने नाग, वड, पिंपळ इत्यादींची पूजा व त्यांची स्थापना आपण ठिकठिकाणी बघू शकतो.

कोळी समाजातील बांधव रात्रभर समुद्रात जाऊन पहाटे पहाटे मासे घेऊन येतात.. त्यानंतर ते मासे समुद्रकिनारी असलेल्या बाजारात विकतात.

बारा बलुतेदार, खोत व सामान्य जनता यांचा एकमेकांशी असलेला संबंध.. वैशिष्ट्यपूर्ण जीवन.. कोकणी समाज व्यवस्थेत दिसतं. त्यामध्ये खोत प्रामुख्याने न्यायदान करणे, महसूल जमा करणे, कायदा सुव्यवस्था बघणे व जमीनदारी सांभाळणे अशी महत्त्वाची कामे करायचे.

कोकणी माणसाच्या घराला ओसरी, पडवी, देवघर, स्वयंपाकघर, माजघर, छप्पर, अंगण आणि तुळस शिवाय आजूबाजूला ताड, माड आणि नारळ, सुपारीची झाडे आपण बघू शकतो. इथला शेतकरी सर्वांना अन्नधान्य पुरविणारा अन्नदाता.. त्याच्या घरात कणगी, भात, नाचणी, भात, वरई इत्यादी धान्य चिरफळाच्या पानांनी झाकून त्याला कणगी मध्ये लिंपून ठेवल्या जात असे. तीन-चार वर्षेपर्यंत हे धान्य कीड न लागता टिकून राहायचे.

इथला कुंभार गणपती.. देवी.. मडकी.. पणत्या.. दिवे..

इत्यादी संपूर्ण गावाला पुरवायचा.. त्यांनीच तयार केलेली अनेक मोजमापाची भांडी जशी की चवली, पावली चिपटं, मापटं, इत्यादी याठिकाणी आपण बघू शकतो. इथला सुतार लाकडी अवजारे, शेतीसाठीची नांगर, फाळ, तयार करून द्यायचा.. सावंतवाडीची लाकडी खेळणी आधीपासूनच तशीही जगप्रसिद्ध आहेत..

गावात येणारा अस्वलाचा खेळ दाखवणारा दरवेशी.. तसेच सापाचा खेळ दाखवणारा गारुडी.. आपण ह्या ठिकाणी बघू शकतो.. गावातला लोहार कोयती, विळी, नांगर, कुऱ्हाड, तलवारी इत्यादी अवजारे तयार करून धान्याच्या बदल्यात द्यायचा.. गावचा तेली व त्याची बायको तेलघाणा वापरून खोबऱ्याचं तेल काढून द्यायचे. त्याच्यातील घाण्यांमध्ये खुंट, सुके खोबरे, लाट, जोखड, दगड, अशी एक मशीनवजा यंत्रणा असायची ज्यावर बसून तो तेली पसा दिडपसा तेल दिडदोन तासात काढायचा!

बांबूच्या टोपल्या, सुपं, परडी, रोवडी, तयार करणारा बुरुड.. गावच्या शुभकार्यात महत्त्वाची भूमिका बजावायचा.. कोकणामध्ये भाजणीचे वडे, उकडीचे मोदक, भात-मासे, माशाची आमटी, हे मुख्य जेवणाचे पदार्थ आहे.. तांदूळ मुख्य धान्य असल्यामुळे धानातून तांदूळ आणि भुसा अलग करण्यासाठी… ‘घिरटं किंवा जातं ‘ वापरात यायचं.. वेगवेगळ्या शेवयायंत्र, किटली, टिफिन बॉक्स, चमचे, उखळ, दगडी मुसळ, अडकित्ते, इत्यादी प्राचीन वस्तू आपण ह्या संग्रहालयात बघू शकतो.. गावातला कासार मुली आठ दहा वर्षाच्या होईपर्यंत त्यांना मोफत बांगड्या भरून द्यायचा.. मात्र जेव्हा तिचं लग्न व्हायचं तेव्हा तिचे वडील कासाराला लहानसा सोन्याचा दागिना किंवा मणी भेट म्हणून द्यायचे ही पद्धत कोकणात होती..

कोकणी लोकांच्या ग्रामदेवता व पाणवठा ह्या दोन्ही मुख्य जागा.. या ठिकाणी संपूर्ण गाव एकत्र येतो.. चर्चा करतो.. पाणवठा तर आंघोळीसाठी, पाणी भरण्यासाठी, कपडे धुण्यासाठी, गुरांना पाणी पाजण्यासाठी, असलेलं हक्काचं ठिकाण… गावातला चांभार म्हणजे चर्मकार चामड्याची चप्पल जोडे शिवणारा.. कोकणातील सुप्रसिद्ध मार्लेश्वराच्या कथेमध्ये शंकराला चर्मकारानेच त्या गुहेपर्यंत पोहोचवल्याचं बोलल्या जातं.. तिथे प्रत्यक्ष शंकराने चर्मकाराला दर्शन दिल्याचं कथानक उपलब्ध आहे.. धनगर ही भरपूर धन असलेली जमात! चामड्याची वाहणं (चप्पल), घोंगडी आणि घुंगराची काठी असा पोशाख असलेला हा धनगर शंभर ते सव्वाशे गाईंचा मालक, तसेच पंधरा ते पंचवीस म्हशींचा मालक शिवाय अगणित मेंढ्या- बकऱ्या त्याच्याकडे असायच्या..!

अशी ही सर्व बारा बलुतेदारांची इतिहास वजा माहिती या ठिकाणी दीड ते दोन तासात आपणास सहज मिळते.. त्यामुळे गणपतीपुळ्याला जाणाऱ्या कुटुंबांनी.. पर्यटकांनी.. आवर्जून आपल्या मुलांसह ह्या संग्रहालयाला भेट द्यावी म्हणजे प्राचीन कोकणासह महाराष्ट्राचा इतिहास.. परंपरा.. संस्कृती.. मुलांना वेगळं शिकविण्याची.. सांगण्या गरज पडणार नाही असे वाटते..

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “गर्भसंस्काराचा सापळा” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “गर्भसंस्काराचा सापळा” ☆ श्री जगदीश काबरे ☆

गर्भसंस्कार केल्यामुळे मूल सुसंस्कारी जन्माला येते. कारण गर्भाला आवाज ऐकू येतो, असे समर्थन करणारे हे शिक्षित असतात आणि ते अवैज्ञानिक पद्धतीने या भंपक कर्मकांडाचे समर्थन करत असतात. गर्भसंस्काराला महाभारतातील अभिमन्यूच्या कथेची सांगड घालून धार्मिकतेचे वलय दिल्यामुळे या अज्ञानी मंडळींना आपण काही चुकीचे करत आहोत असे वाटतच नाही. गर्भाला आवाज ऐकू येतात, गर्भ वेगवेगळ्या आवाजांना वेगवेगळा प्रतिसाद देतो, हे वैज्ञानिक सत्य आहे. पण त्याला शब्द कळतात, त्याचे अर्थ कळतात, हे मान्य नाही. कारण त्यासाठी भाषा अवगत असावी लागते. गर्भाला जर गर्भातच भाषा कळत असती तर बाळ जन्माला आल्यानंतर त्याला भाषा शिकवण्याची गरज पडली नसती. पण गर्भ आवाजाला प्रतिसाद देतो म्हणजे त्याला सगळे कळते असे समजून गर्भसंस्काराचे मूढ समर्थक सुतावरून स्वर्ग गाठत असतात आणि चुकीच्या पद्धतीने म्हणजेच छद्म वैज्ञानिक पद्धतीने समर्थन करत असतात. असे समर्थन करणे म्हणजे ख्राईस्ट हा कृष्ण या शब्दाचा अपभ्रंश आहे म्हणून मागच्या जन्मी येशू हा कृष्ण होता असे म्हणण्यासारखे हास्यास्पद आहे. तेव्हा खऱ्या अभ्यासाची गरज या शिक्षित विचारशत्रूनाच आहे.

खरे संस्कार तर आयुष्यभर करावे लागतात. कौटुंबिक संस्काराबरोबर सामाजिक संस्कारही महत्त्वाचे असतात. त्याची सांगड धर्म, अध्यात्म याच्याशी फारशी घालू नये. गर्भवतीच्या भावनिक कमजोरीचा गैरफायदा घेऊ नये. संस्कार हा फार मोठी व्याप्ती असलेला विषय आहे. आपल्याला रोज येणारे अनुभव डोळसपणे पाहिले, त्याबद्दल विचार केला तर आपल्यावर नकळतपणे अनेक संस्कार होत राहतात. अनुभव हाच मोठा शिक्षक असतो. जी माणसं समाज बदलण्याचं काम करतात, लढे उभारतात, माणसांना चांगल्या कामाची स्फूर्ती देतात, निःस्वार्थीपणे काम करणाऱ्यांच्या फौजा उभ्या करतात, अशा माणसांवर कोण संस्कार करतं? त्यांच्या म्हणण्यानुसार, लहानपणी पालक, शिक्षक, आणखीही कोणी जवळची माणसं यांचं मार्गदर्शन होतं. पण ते काही काळच असतं. त्यांच्याकडून एक गोष्ट घडते की, या माणसांचे मन टिपकागद बनतो. आजूबाजूच्या घटना त्याच्यावर परिणाम करतात. ते संवेदनशील बनतात आणि त्या संवेदनेला प्रामाणिक प्रतिसाद देत ते मोठे होत जातात. गांधीजी म्हणत, ‘माझं जीवन हाच माझा संदेश आहे. ‘ त्यांनी स्वतः सफाईपासून राजकीय लढा उभारण्यापर्यंत सर्व कामं केली. सर्व कामं ते जीव ओतून करत, ते त्यांच्या आईवर कोणी कुठल्याही प्रकारचे गर्भसंस्कार केले नाहीत तरीही…

हातातलं काम जीव ओतून आणि चांगलंच करायचं हा संस्कार आपण मुलांवर करू शकतो. घरातलं काम करताना हे काम मुलाचं आणि हे काम मुलीचं असा भेद न करण्याचा संस्कार आपण घरातच करू शकतो. तसं घरात वातावरण असलं तर मुलांनाही ती सवय लागते. आई तिचं काम नीटनेटकं करते, तिच्या मनात उद्याचं प्लॅनिंग असतं. ‘डबा करायला विसरलेच! ‘, असं ती म्हणत नाही, बाबा त्यांचं काम मनापासून, जबाबदारीने करतो हे घरात पाहणारं मूल तसाच विचार करणार. मनापासून, जबाबदारीने याबरोबर ‘वेळेवर’ हेही महत्त्वाचं असतं. वेळेवर पोचण्यासारखे इतरही अनेक किरकोळ वाटणारे पण अतिशय उपयोगी संस्कार असतात. संस्कार साधेपणाचे असतात, कामाबद्दलचे असतात, पर्यावरणा-बद्दलचे असतात, साफसफाईचे असतात, पैसे योग्य प्रकारे वापरण्याचे असतात, माणसांशी वागण्याचे असतात, काटकसरीचे असतात, व्यायामाचे असतात, भाषेचेही संस्कार असतात. महत्त्वाची कागदपत्रं नीटनेटकी ठेवण्याचे असतात. पण लक्षात कोण घेतो? 

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ सिग्नलवरचा भारत… + संपादकीय निवेदन – डॉ. शैलजा करोडे – अभिनंदन ☆ सम्पादक मंडळ ई-अभिव्यक्ति (मराठी) ☆

सूचना/Information 

(साहित्यिक एवं सांस्कृतिक समाचार)

डॉ. शैलजा करोडे

💐 अ भि नं द न 💐

 

आपल्या समुहातील ज्येष्ठ साहित्यिका डॉ शैलजा करोडे यांचा निशीगंध हा ललित लेख संग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे.

ई अभिव्यक्ती परिवारातर्फे त्यांचे मन: पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 💐💐

डॉ शैलजा करोडे यांचा लेख  ‘सिग्नलवरचा भारत’ आज प्रकाशित होत आहे. 🪻

संपादक मंडळ

ई अभिव्यक्ती मराठी

☆ ☆ ☆ ☆ ☆

🌸 विविधा 🌸

☆ सिग्नलवरचा भारत ☆ डॉ. शैलजा करोडे ☆

आज ट्रफिक जाम होतं. आॅफिसची वैळ असल्याने गर्दीत अजूनच भर पडली होती. अकरा वाजता माझी महत्वाची मिटींग होती, त्यामुळे सर्कल आॅफिसला वेळेत पोहोचणं महत्वाचं होतं. मी ड्रायव्हरला गाडी लवकर चालवण्याबद्दल बोलले. ” मॅडम कशी चालवणार हो. समोरची गाडी तर हालली पाहिजे. भरीत भर गाडीभोवती एक एक फेरीवाला नाहीतर भिकारी येत होता.

“मॅडम, ही खेळणी घ्या ना. स्वस्तात देईन.”

“नाही ग, मला नकोत खेळणी” “घ्या हो ताई, तुमच्या बाळासाठी” “माझ्या घरी कोणी लहान मूल नाही आहे. जा तू येथून” गाडी थोडी पुढे सरकली. एक दहा/बारा बर्षाचा मुलगा हातातील फडक्याने गाडी पुसू लागला. गाडी पुसली थोडीफार लगेच पैशांसाठी हात पुढे. तुला कोणी सांगितली रे गाडी पुसायला. दहा ₹ ची नोट त्याच्या हातात सरकवली.

थोड्या अंतराने एक बाई कडेवर मूल घेऊन भीक मागायला आली. “दे बाई, माझ्या लेकराला दे. कालपासून भूखी आहे” ड्रायव्हरने तिला पळवलं. प्रत्येक सिग्नलला गाडी थांबली कि लिंबूमिरची विकणारे, गाडीतील देवासाठी छोटा फुलांचा हार विकणारे, गाडी पुसण्यासाठी छोटे टाॅवेल, व अन्य सामुग्री विकणारे, गुलाबाची फुले विकणारे. , एकतर मिटींगचं टेन्शन, व वरून हा त्रास, मी वैतागले.

मुंबईत हजारोंच्या संख्येने लोकं येतात. दिवसा कमवतात. रात्री फूटपाथवर राहातात. काम नाही मिळाले भीक मागतात. लहान मुलांचे अपहरण करून त्यांना भीकेला लावले जाते. म्हातारी माणसेही अशा गुंडाच्या हाती सापडतात व त्यांच्यासाठी भीक मागतात.

अशा गरजू भिखारी मुले व वद्धांना पैसे न देता पूर्ण जेवण देणे, आपले जुने कपडे देणे हे दान करावे. जेणे करून ह्या भिखारी जोपासणार्‍या टोळ्यांना आळा बसेल. भीक मागणारी मुले गुन्हेगारी प्रवत्तीचीही असतात, त्यांच्यासाठी संस्कार शाळा असाव्यात. कमवा व शिका योजने अंतर्गत त्यांना वसतिगृृृहात प्रवेश मिळावा व त्यांचे पुनर्वसन व्हावे.

एकांगी, एकलकोंडे वृध्दांनाही त्यांना झेपेल तसा रोजगार, वृृृध्दाश्रमात प्रवेश मिळावा.

शेवटी समाजातील हे वंचित पर्यायाने आमचीही जवाबदारी असल्याने आपल्याकडून होईल तेवढी मदत जरूर करावी

शेवटी जनसेवा हीच ईशसेवा, खरंय ना?

© डॉ. शैलजा करोडे

नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391

ईमेल – karodeshailaja@gmail.com 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चातुर्मास – श्रावण – — भाग २ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ चातुर्मास – श्रावण – — भाग २ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

‘आs घाs डाss

दुs र्वाsss फू ss लू ssss य ssss’ अशी लांबच लांब आरोळी वजा हाक कानावर पडली की असे वाटायचे, ही बाई आणि ही हाक आली की, हिच्या मागे श्रावण महिना येतो. वर्षभर ही कुठे असते कोण जाणे? पण दिव्यांच्या आमावस्ये पासून हीची आरोळी व हे समान घरपोच उपलब्ध व्हायचे. आणि हे सगळे मूठभर धान्य देऊन मिळायचे. ती कधीच पैसे घेत नसे. डोक्यावर आघाडा, दुर्वा, फुले घेतलेली टोपली असायची. काखेत एक झोळी, त्यात छोटया छोटया ३/४ टोपल्या आणि पाठीवर एक बाळ साडीच्या पट्ट्यात बांधलेले असायचे. ते तिच्या खांद्यावरून डोकावून खुदुखुदू हसायचे. आपण दिलेले धान्य ती तिच्या जवळच्या झोळीत असलेल्या टोपलीत वेगवेगळे ठेवायची. मला तर तीच साक्षात जिवती वाटायची. तिच्या कडील त्या रानातील वस्तू घेऊन झाल्या की लहान मुलांचा दिवस सुरु व्हायचा. आणि आई, आजी यांच्या या वाढीव कामाला सुरुवात व्हायची.

घेतलेल्या वस्तू पुन्हा धुणे, त्या कोरड्या करून निवडणे, त्यातील नको असलेले गवत काढणे, त्यांचे एकसारखे दांडे कापणे यात आजीला मदत करायला मजा यायची. मात्र ज्याची पहाटे अंघोळ झालेली असेल त्यालाच ही संधी मिळायची. सुई नसताना नुसत्या दोऱ्यात वेगवेगळ्या वनस्पती एकाच मापात गुंफून हिरवा, पांढरा, लाल, गुलाबी, जांभळा असा देखणा हार खास जीवतीच्या कागदाच्या पूजेसाठी तयार व्हायचा.

जसे आपण घरातील पाहुण्याचे आगत्य करतो त्याला प्रथम मान देतो. त्या प्रमाणे दैनंदिन पूजेत या पाहुण्या कागदाला मान असायचा. प्रथम त्याची पूजा व्हायची. तो हार घातला जायचा. मग बाकीच्या देवांची पूजा व्हायची. ते निरीक्षण करताना काही प्रश्न मनात यायचे. काही प्रश्नांची उत्तरे मोठी माणसे द्यायची पण काही उत्तरे नंतर मिळाली. त्यात प्रश्न असायचा या चार चित्रांचा एकत्र समावेश का असावा? आणि त्यांचा या महिन्याशी काय संबंध आहे?

पहिले चित्र भगवान नृसिंह ज्यांनी बाळ प्रल्हादाचे हा अवतार घेऊन रक्षण केले.

दुसरे चित्र कालिया मर्दन करणारे भगवान श्रीकृष्ण यात खेळणाऱ्या, बागडणाऱ्या मुलांचे, तेथील लोकांचे रक्षण करणारा श्रीकृष्ण दिसतो.

तिसरे चित्र जरा व जिवतिका जिवती म्हणजे दीर्घायू प्रदान करणारी. या दोघी आपल्या आसपास बालकांना खेळवताना दिसतात. म्हणजेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना आनंदी ठेवण्याचे महत्त्वाचे काम करतात.

चौथे चित्र बुध आणि बृहस्पती (गुरु) बुध पूजनामुळे अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व प्राप्त होते. आणि बृहस्पती मुळे शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती होते. विवेकबुद्धी जागृत होते.

प्रथम रक्षक देवता. नंतर बालकांचे रक्षण करणारी देवता.

त्या नंतर दीर्घायुष्य देणारी देवता.

आणि चौथी व्यक्तिमत्व प्रभावित करणारी देवता.

एकूणच या सगळ्या पूजेचा केंद्रबिंदू अपत्ये आहेत.

एका मातृ शक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजे हे जिवती पूजन.

आणि जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्या साठी आणि रक्षणाची प्रार्थना म्हणजे जिवती पूजन.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ श्रावणी पौर्णिमा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

? विविधा ?

☆ श्रावणी पौर्णिमा… ☆ सौ कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये ☆

श्रावणात येणाऱ्या पौर्णिमेला नारळीपौर्णिमा, राखी पौर्णिमा, पोवती पौर्णिमा, श्रावणी पौर्णिमा” अशी नावे आहेत.

पूर्वीपासूनच नारळी पौर्णिमा म्हणून या दिवशी नारळाचे अनेक पदार्थ केले जातात. नारळीभात, करंज्या, वड्या, पोळ्या यांचा नेवैद्य देवाला दाखवून आनंदाने खातात.

कोळी लोक समुद्राची पूजा करतात. पावसाळ्याच्या सुरूवातीचे दिवस म्हणजे माशांचा प्रजनन काळ. म्हणून या काळात ते मासेमारी बंद ठेवतात. नारळी पौर्णिमेला समुद्र पूजन करून श्रीफळ अर्पण करून ते समुद्रात होड्या नेतात व मासेमारी सुरू करतात. समुद्र हे वरुण देवतेचे स्थान मानले जाते. वरूण पश्चिमेचा दिक्पाल आहे. या पौर्णिमेला त्याला श्रीफळ अर्पून कृतज्ञता व्यक्त केली जाते.

राखी पौर्णिमा हा खरेतर उत्तर भारतातला सण. पण आज पूर्ण भारतात बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून सर्वांना हवाहवासा वाटतो.

राखी या शब्दातच खूप मोठा अर्थ आहे. राख म्हणजे सांभाळ कर असे सांगणे. धर्मशास्त्रामध्ये या पौर्णिमेला राखी बांधावी असे सांगितले आहे. या विधीला ” पवित्रारोपण ” असे म्हणतात. आपल्याकडे भावाचा उत्कर्ष व्हावा, त्याचे प्रेम व पाठबळ आपल्याला मिळावे या हेतूने बहीण भावाला राखी बांधते. काही प्रांतात नोकर मालकाला, ब्राह्मण यजमानाला, मुलगी वडिलांना, पत्नी पतीला राखी बांधते. त्यामागे एकच भावना असते आपल्यापेक्षा सक्षम माणसाने आपले रक्षण करावे. एका रेशमी धाग्याने नात्यांचे रक्षण व्हावे एकमेकांना भेटावे हात हेतू आहे.

यामागे अशी कथा आहे की एकदा देव आणि दानव यांच्या त तुंबळ युद्ध झाले. दानवांचा राजा होता बलाढ्य वृत्रासुर. देवांचा राजा होता इंद्र. दोघेही पराक्रमी होते. इंद्राचा विजय व्हावा म्हणून त्याच्या पत्नीने तिला भगवान विष्णूंच्या कडून मिळालेला एक दोरा म्हणजेच राखी त्याच्या हातात श्रद्धेने बांधली. इंद्राचा विजय झाला. त्याचे सगळे वैभव त्याला परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून दरवर्षी रक्षाबंधन साजरे करु लागले.

एक ऐतिहासिक कथा सुद्धा आहे. बहादूरशहाने चितोड वर स्वारी केली. चितोडची राणी कर्मवती हवालदिल झाली. तिने हुमायूँ बादशहाला राखी पाठवली. त्या राखीचा सन्मान करून हुमायूँ बादशहाने तिला बहीण मानून मदतीचा हात दिला. आपले सैन्य पाठवले व बहादुर शहा ला पळवून लावले. रक्षाबंधनाला जाती-पातीचे बंधन नाही हेच यावरून सिद्ध होते.

पूर्वी राज्याचा मंत्री राजाला राखी बांधत असे. त्यावेळी तांदूळ, सोने व पांढर्‍या मोहर्‍या एकत्र करून त्याची पुरचुंडी बांधून रक्षा म्हणजे राखी तयार करत. तिची पूजा करत. त्यावेळी खालील मंत्र म्हणून राज्याचा मंत्री राजाला राखी बांधत असे

येनबघ्दो बळीराजा

दानवेन्द्रो महाबल:

तेनत्वामपि बध्नामि

रक्षे मा चलमाचल.

याचा अर्थ असा आहे की महाबली दानवेन्द्र बळीराजा जिने बद्ध झाला त्या रक्षेने मी तुला हि बांधतो. हे रक्षे, तू चलित होऊ नकोस” यावरून मुळचे रक्षाबंधन राजासाठी होते असे दिसते. आज मात्र बंधू व बंधू समान असलेल्या सर्वांना राखी बांधली जाते.

” पोवती पौर्णिमा” असेही एक नाव आहे. कापसाच्या सुताच्या नऊ धाग्यांची जुडी करून तिला. 8-12 किंवा 24 गाठी मारतात व त्यांच्या ठिकाणी ब्रम्हा, विष्णू, महेश, ओंकार, सूर्य इत्यादी देवतांना आवाहन करून हे पोवते प्रथम देवाला वाहून तसलीच पोवती तयार करून कुटुंबातील इतर सदस्यांना मनगटावर बांधली जातात.

श्रावणी पौर्णिमा या दिवशी पूर्वी कुमारांना शिक्षण घेण्याचा मुहूर्त समजला जात असे. ब्राम्हण लोक या दिवशी यज्ञोपवीत बदलण्याचा कार्यक्रम करतात.

तमिळी पंचांगाप्रमाणे या पौर्णिमेला” अवनी” असे नाव आहे. तमिळ महिना ते अवनी या कालाला ” अवित्तम ” असे म्हणतात.

अवित्तम म्हणजे धनिष्ठा. श्रावणात जेव्हा लागोपाठ दोन दिवस पौर्णिमा येते तेव्हा दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला चंद्र धनिष्ठा नक्षत्रात असतो. लागोपाठ दोन दिवस पौर्णिमा आली तर पहिल्या दिवशी ऋग्वेदी दुसऱ्या दिवशी यजुर्वेदी ब्राह्मण श्रावणी साजरी करतात.

जैन लोक हा दिवस रक्षा पर्व म्हणून पाळतात. जैन मंदिरामध्ये राख्या ठेवल्या जातात. जैन मुनि त्यांचे आदराने स्वागत करतात.

उत्तर भारतात नौकर मालकांच्या हाताला राखी बांधतात.

उत्तराखंडमध्ये चंपावत जिल्हा आहे. तेथील देईपुरी इलाख्यात बरही नावाची देवी आहे. तिला खूष करण्यासाठी गावातल्या दोन गटात दगडफेक चालू करतात. यात अनेक लोक जखमी होतात म्हणून आत्ता हायकोर्टाने त्यावर बंदी घातली आता तेथील लोक दगडां ऐवजी एकमेकांना सफरचंद मारतात.

उत्तर भारतात एकादशी ते पौर्णिमा झुलन यात्रा उत्सव असतो. श्रावण पौर्णिमेला राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देत गीते गातात.

अशाप्रकारे श्रावण पौर्णिमा हा आनंददायी सण सर्वत्र साजरा केला जातो.

लेखिका : सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “वक्त ने आजमाया, लेकिन हरा नहीं पाया…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

सुश्री संध्या बेडेकर

??

☆ “वक्त ने आजमाया, लेकिन हरा नहीं पाया…” ☆ सुश्री संध्या बेडेकर ☆

भारत पाकिस्तानची T 20 World Cup मॅच बघत होते. अनेक चढ उतार मॅच मध्ये घडत होते, आणि त्याबरोबर प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके चूकत होते. शेवटचा ओव्हर तर ‘full of activities ‘ होता. बहुतेक क्रिकेट मधील सर्व टर्म्स त्या ओव्हर मध्ये ‘commentators ‘ ना वापराव्या लागल्या. ••••

त्या ओव्हर मध्ये काय नाही झालं.?? •••

एक, दोन, तीन, चार, सिक्स रनस्, नो बॉल, फ्री हिट Wide Ball, stumps उडाले, दोन प्लेअर आउट होतात. कॅप्टन चे एंपायर बरोबर डिस्कशन वगैरे वगैरे. तो एक ओव्हर म्हणजे पूर्ण मॅच होता. ••••

खेळ कसा प्रत्येक बॉलवर बदलू शकतो. ते समजे पर्यंत दुसरी घटना घडते. प्लेअर्स ची कमाल तर होतीच, बरोबर एंपायर्स ची पण परीक्षाच होती. एवढी कठीण परीक्षा त्यांनीही यापूर्वी कधी दिली नसेल बहुतेक. जणू काही सर्वांच्या डोक्यात Super computer fit असतात, तसे ते निर्णय देत होते. ••••

खेळ कसा खेळावा याची अनेक उदाहरण प्रत्यक्षात बघायला मिळत होती. •••

म्हणजे पूढे एखादा कोच आपल्या शिष्याला कोचिंग देताना हा over नक्की दाखवेल असा हा over होता. •••

कोणाकोणाचे किती आणि कशा कशाचे कौतुक करावं हेच कळत नाही. हा over म्हणजे तासोंतास चर्चा करण्याचा विषय आहे. •••

विराटचे तर विराट कौतुक. त्याची बॉडी लॅंगवेज, aggressive approach, presence of mind, stamina, awareness, quick decisios. एवढ्या प्रेशर मध्ये असताना तो घेत होता. कुठेही give up, surrender ची बॉडी लॅंग्वेज नव्हती. ‘मी जिंकणारच ‘हाच भाव चेहऱ्यावर होता. ••••

त्याला साथ देणारा हार्दिक चे योगदान पण तेवढेच. आश्विनचां एवढ्या प्रेशर मध्ये असताना wide ball समजून, सोडणे. खरंच खूप कौतुकास्पद. दोन बॉल खेळायला आलेल्या अश्विन चा वर्ल्ड क्लास दिसला. अनुभव कामी आला. ••••

पूर्ण टीम वर्क. positive attitude, Never say die approach.

हारलेला मॅच जिंकला. ••••

कुठे, कधी, किती, कसा, केंव्हा, काय?? समतोल साधावा?? हे कोणीही मॅच बघून शिकावं. आयुष्याचे सार सांगणारा असा हा over होता. ••••

मला तर वाटतं मनातील मरगळ काढायला प्रत्येकाने हा मॅच मधून मधून नक्की बघावा. ••• 

 एक लाखाच्या आसपास उपस्थित दर्शकांसमोर आपले concentration कायम ठेवणे. ध्येयाकडे वाटचाल करत असताना प्रत्येक बॉल वर होणारा प्रेक्षकांचा हल्ला तुम्हाला विचलित करत नाही, म्हणजे किती मानसिक शक्ती, टफनेस, विल पावर, आणि काय म्हणाव?? शब्द/ विशेषण कमी पडतायेत. •••

त्यानंतर मी कितीदा तरी हा मॅच बघीतला. प्रत्येक वेळी अनेक नवीन विचार मनात येत होते. •••

हाच का तो कोहली?? मधल्या पिरेडमध्ये अगदी डाऊन होता. प्रत्येक वेळेस खेळायला यायचा आणि लगेच पॅव्हेलियन मध्ये परत जायचा. तेंव्हा अनेकांना बोलायचा चान्स मिळाला होता. •••

पुन्हा बाऊन्स होऊन पुर्वी पेक्षा जास्त दमदार वापसी. व्वा!! कौतुक च आहे. •••

तो काळ म्हणजे त्याच्या क्रिकेट जीवनात आलेला ‘Bad Patch ‘ च होता. शिखरावर असताना खाली घसरण. पुन्हा शिखरावर पोहचण. यामधील काळ म्हणजे अनेक मानसिक, शारीरिक उलाढाली चां काळ असणार नाही का?? त्यात पब्लिक फिगर असल्यावर लोकांच्या अपेक्षा असतातच. कौतुक करताना अगदी डोक्यावरच नाही तर, देवघरात बसवतील, तर अपेक्षा भंग झाल्यास काय करतील?? त्यांचाही भरवसा नसतो.. •••

भारतीय तर तसेच क्रिकेट प्रेमी म्हणजे क्रिकेट मागे वेडेच, •••

* क्रिकेट के लिये कुछ भी करेगा वाले * •••

* त्यात पाकिस्तान बरोबर मॅच म्हणजे 

* “इज्जत का सवाल * असतो. •••

BAD PATCH मध्ये, •••

खेळताना येणाऱ्या अडचणींवर लक्ष देणे, काही खेळण्याचे टेक्नीक बदलणे. कुठे सतर्क रहायचे?? कुठे समर्पित रहायचे?? हे ठरविणे. योग्य वेळी दोन पावले मागे घेणे.

खेळण्या बरोबर मानसिक अनुशासन असणेही आवश्यक आहे. हे काम खेळाडूंच्या कोचचे जरी असले तरी ते खेळाडू ने ऐकणेही महत्वाचे आहे. •••

 जो काळानुसार स्वतः मध्ये बदल करतो तो प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतो. घसरत असताना ताठ उभं राहून चालत नाही. झुकता आलं पाहिजे. शिक्षण घेणे आणि त्याचा उपयोग परीक्षेत करणे, दोन्हीं मध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. खेळाच्या मैदानावर common sense and Presence of mind चे महत्व जास्त असते. ••••

या काळात, •••

“जब कोई बात बिगड जाए, जब कोई मुश्किल आ जाए, तुम देना साथ मेरा. ” •••

असा कोचही पाहिजे. ‘धोनी’ सारखा साथ देणारा मित्रही पाहिजे. ••••

हा विश्वास कोच आणि प्लेअर मध्ये असायला हवा. •••

“वक्त ने विराट को आजमाया बहुत लेकिन हरा नहीं पाया ।••••

हेच म्हणावे लागेल. •••

Bad Patch ••••

हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच. त्यांचा सामना करणे म्हणजे, •••स्वतः चे परिक्षण निरिक्षण करेक्शन करता आले पाहिजे. पुन्हा RESTART चे बटन दाबून पुन्हा जोमाने कष्ट करता आले पाहिजे. ••••

स्वतः लाच Push and run करणे जमले पाहिजे. प्रत्येक area त double XL पेक्षा जास्त मेहनत करणे जमले पाहिजे. •••

म्हणतात ना ••••

” जिंदगी में तोता नहीं बाज बनिए, क्योंकि तोता बोलता बहुत हैं और उड़ता कम हैं । बाज शांत रहता है, लेकिन आसमां छूने की ताकत रखता हैं। “••••

जिंदगी हर कदम एक नयी जंग हैं। •••

* Don’t be afraid to take risk. •••

© सुश्री संध्या बेडेकर 

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चातुर्मास – श्रावण – — भाग १ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

🔅 विविधा 🔅

☆ चातुर्मास – श्रावण – — भाग १ ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

ऐका परमेश्वरा गणेशा, तुमची कहाणी, निर्मळ मळे, उदकाचे तळें, बेलाचा वृक्ष, सुवर्णाचीं कमळें, विनायकाचीं देवळें रावळें. मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधीं घ्यावा? श्रावण्या चौथीं घ्यावा. माही चौथीं संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडावं. अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहाचं सहकुटुंबी भोजन करावं. अल्प दान, महापुण्य. असा गणराज मनीं ध्यायीजे, मनी पाविजे, चिंत्त लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्यसिध्दि किजे. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ संपूर्ण.

अशी गणपतीच्या कहाणीने दिवसाला सुरुवात झाली की, श्रावण महिन्याचे आगमन झाले हे लक्षात येते. आता हे फार दुर्मिळ झाले आहे. पण आमच्या लहानपणी हे प्रत्येक घरी ऐकू यायचे. घरातील आजी, आई यांचा ऐका परमेश्वरा गणेशा….

स्वर कानी पडताच आपलेही कान तिकडे लागायचे. त्या बरोबर आघाडा, दुर्वा, फुले यांचा हार त्याचा मंद सुगंध वातावरण भारून टाकायचा. त्या बरोबर घराघरात लावला जाणारा जिवतीचा कागद. घरात आधीच तयारी केली जायची. तो कागद आधीच आणून तो एखाद्या जाड पुठ्ठ्यावर चिकटवला जायचा किंवा एखाद्या जुन्या आरशावर लावला जायचा. अशा घरीच तयार केलेल्या फ्रेमला “हार घालायची सोय कर” अशी प्रेमळ सूचना वजा धमकी मिळायची. आणि मग ती फ्रेम श्रावण अमावस्ये पर्यंत फार महत्वाची असायची. श्रावण अमावस्या या दिवशी तो कागद पालथा घालून दुसऱ्या दिवशी त्याचे विसर्जन केले जायचे. तो कागद व त्यावरील चित्रे यांचा अर्थ लहानपणी कळायचा नाही. पण त्यातील प्रसंगाच्या कथा ऐकून काही गोष्टी लक्षात आल्या. या सगळ्या गोष्टी व्रते मुख्यतः घरातील मुलांच्यासाठी केल्या जातात. त्यातील चित्रे बघितली तर ती वेगवेगळी असतात.

जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध – बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पुजले जाते. या सगळ्या चित्रांचे अर्थ आपण हळूहळू समजून घेऊ. पण ही चित्रे बघितली आणि एकूणच क्रम लक्षात घेतला, तर प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता, आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम! एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना म्हणजेच जिवती पुजन!

विशेष म्हणजे या चित्रात आपले बाप्पा कुठेच नाहीत. पण श्रावणातील रोज होणाऱ्या या खास पूजेतील कथा श्रवण करताना प्रथम मान आपल्या बाप्पाला असतो. आणि त्याच्या कथेनेच सुरुवात होते. गणपती ही विघ्नहर्ता देवता आहे, तिची पूजा वेगळ्या पद्धतीने केली जाते. जिवती देवी आणि गणपती यांच्या पूजेच्या पद्धती आणि उद्देश वेगळे आहेत. त्यामुळे जिवतीच्या या कागदातील चित्रात गणपती नसतो.

बाकीच्या चित्रांची माहिती पुढच्या लेखात बघू.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

मेडिटेशन,हिलिंग मास्टर व समुपदेशक, संगितोपचारक.

सांगवी, पुणे

📱 – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares