☆ ब्रह्म सत्यम् जगन् मिथ्या… – भाग – २☆ श्री सुनील देशपांडे☆
पूर्व परंपरेत ब्रह्माला चार मस्तके आहेत. म्हणजेच चार प्रज्ञा. चार वेगवेगळ्या पद्धतीने सत्यान्वेशी प्रगती करण्याचे मार्ग दाखवणारी चार मस्तके.
पहिले मस्तक : विचारशक्ती. प्रगतीसाठी स्वतःची विचारशक्ती वापरण्याची प्रज्ञा. ब्रह्ममार्गाकडे जायचे असेल तर ती असणे आवश्यक आहे. त्या मार्गावरील शेवटचे स्थान म्हणजे ब्रह्म. म्हणजेच विचारशक्तीचे अनंतत्व म्हणजे ब्रह्माचे पहिले मस्तक.
दुसरे मस्तक : बुद्धीप्रामाण्य. एकदा विचारशक्तीने पुढे जायचे ठरवल्यानंतर त्या विचारशक्तीवर पूर्ण विश्वास ठेवून बुद्धीच्या कसोटीवर जे पटेल त्यालाच सत्य मानण्याची प्रज्ञा म्हणजेच बुद्धीप्रामाण्य. त्या बुद्धीप्रामाण्याचे अनंतत्व म्हणजे ब्रह्माचे दुसरे मस्तक.
तिसरे मस्तक : संशोधन. विचार आणि बुद्धी यांच्या समन्वयाने पुढे जात असताना प्रत्यक्ष प्रमाण ताडून पाहणारी प्रज्ञा म्हणजेच संशोधन. या संशोधन वृत्तीचे अनंतत्व म्हणजे तिसरे मस्तक.
चौथे मस्तक : विवेकबुद्धी. या तीनही मार्गातून सिद्ध झालेली गोष्ट योग्य त्या पद्धतीने वापरण्याचा सम्यक व सुयोग्य विचार करणे व तशी पात्रता निर्माण करणारी प्रज्ञा म्हणजे विवेक बुद्धी. या विवेक बुद्धीचे अनंतत्व म्हणजे चौथे मस्तक.
ब्रह्माची ही चार मस्तके म्हणजे या चार प्रज्ञा या असल्याशिवाय सत्याच्या मार्गावरून म्हणजेच ब्रह्म मार्गावरून पुढे जाताच येत नाही. एकदा या ब्रह्म मार्गावरून पुढे जात राहिले की त्या मार्गाचे अनंतत्व म्हणजे ब्रह्मा.
यात पुन्हा प्रश्न येईलच की प्रज्ञा म्हणजे काय?
त्याचे उत्तर पाहिजे असेल तर सरस्वतीला समर्पित असे प्रज्ञाविवर्धन स्तोत्र याकडे पहावे. या स्तोत्रातून मिळणारी फलश्रुती म्हणजे बुद्धी, ज्ञान आणि स्मरणशक्ती. (Thought process, knowledge and memory) याचाच अर्थ बुद्धिमत्ता आणि मिळवलेले ज्ञान हे स्मरणशक्ती मध्ये साठवून ठेवून त्याचा योग्य वेळी उपयोग करता येण्याची क्षमता म्हणजे प्रज्ञा.
याचाच अर्थ या चार प्रज्ञांच्या सहाय्याने किंवा एकत्रित प्रयत्नाने किंवा एकत्रीकरणाच्या दिशेने प्रगल्भ होत प्रवास करणे म्हणजे सत्याचा शोध. परंतु हा शोध हा आपल्याला अनंताकडे नेतो याचाच अर्थ या शोधाचा अंत कधीच होत नाही. म्हणूनच कोणत्याही क्षणी कोणत्याही पद्धतीने पूर्ण सत्य किंवा अंतिम सत्य समजले आहे असा दावा करणारा अस्तित्वात असूच शकणार नाही. म्हणजेच आत्तापर्यंत जे ज्ञात झाले आहे त्याच्या पलीकडे काहीतरी आहेच. म्हणूनच आत्तापर्यंत जे समजले आहे ते अंतिम सत्य आहे असा दावा कोणीही करू शकणार नाही. याचाच श्लोकमय अविष्कार म्हणजे ब्रह्म सत्यम् जगन् मिथ्या!
म्हणूनच विज्ञान किंवा वैज्ञानिक विचारसरणी, वैज्ञानिक संशोधन पद्धती या सर्वांचा विचार केल्यास या सगळ्या गोष्टींना ब्रह्मा चे तत्व पूर्णपणे लागू पडते. कोणतेही वैज्ञानिक किंवा शास्त्रीय संशोधन हे अंतिम सत्य नसतेच. प्रत्येक वेळी शास्त्रज्ञ फक्त एवढेच म्हणू शकतो की हे आत्तापर्यंत सापडलेलं सत्य. किंवा ज्ञात सत्य. म्हणजेच सत्याच्या मार्गावरील आजचा मुक्काम. कधी कधी असेही होते की सत्याच्या मार्गावरून भरकटलेपणा सुद्धा येऊ शकतो. त्यामुळे असत्यालाही सत्य समजण्याची चूक होऊ शकते. म्हणूनच शास्त्रीय संशोधनात किंवा वैज्ञानिक संशोधनात कोणतीही गोष्ट शंभर टक्के बरोबर असा दावा करता येत नाही. आत्तापर्यंत झालेल्या प्रायोगिक परिस्थितीमधून द्रृग्गोचर झालेले अलीकडचे सत्य. एवढेच शास्त्रज्ञ म्हणू शकतो आणि एवढेच म्हटले जाते. तेव्हाच ते खरे वैज्ञानिक संशोधन ठरते.
ब्रम्हाला चार मस्तकांबरोबरच चार हातही आहेत. दोन हात हे संशोधनकार्यात गुंतलेले आहेत असे आपण म्हणू शकतो किंवा गुंतवण्यासाठी असले पाहिजेत असेही म्हणता येईल. दुसरे दोन हात हे लेखन कार्यामध्ये गुंतलेले आहेत. याचाच अर्थ ब्रम्हाकडे प्रवास करणाऱ्याने आत्तापर्यंत आपल्याला लाभलेले ज्ञान, वैचारिक पद्धत आणि त्यातून सापडलेले संशोधित ज्ञान या सर्वांच्या योग्य त्या नोंदी ठेऊन पुढील संशोधनासाठी उपलब्ध करून ठेवणे हे सुद्धा अपेक्षित आहे. असे केले तरच या मार्गावरील प्रवास पुढे पुढे सरकेल आणि सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न मानवाला करता येईल. मिथ्या जगाकडून ब्रह्म सत्याकडे जाणारा प्रवास हा असाच असला पाहिजे असा माझा ठाम विश्वास आहे.
☆ ब्रह्म सत्यम् जगन् मिथ्या… – भाग – १☆ श्री सुनील देशपांडे☆
विचारशक्ती, बुद्धीप्रामाण्य, विवेकबुद्धी आणि संशोधन यातून प्रतीत होणारं ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान असे मी मानतो. म्हणजे तेच ब्रह्म आणि तेच सत्य.
ब्रह्म म्हणजे अंतिम सत्य.
ब्रह्मा / ब्रह्मदेव म्हणजे विश्वाचा उद्गाता.
म्हणजेच अनंत कोटी ब्रह्मांडाचा निर्माता. अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असे. म्हणजेच अंतिम सत्य. म्हणजे कधीही न गवसणारे सत्य. कारण त्याला अंत नाही. याचाच सरळ शब्दात अर्थ म्हणजे सत्य हे सतत उलगडत जाणारी गोष्ट आहे. जितका शोध घेऊ तितकं ते अधिक उलगडत जातं आणि तेवढं अधिक ज्ञान प्राप्त होत राहतं. म्हणूनच विज्ञान व संशोधन या सर्व गोष्टी या अनंत आहेत. याला शेवट नाही. म्हणूनच जगामध्ये अंतिम सत्य नावाची गोष्ट अस्तित्वातच नाही. आपण सतत तर्कशक्ती, विचारशक्ती आणि संशोधन यामध्ये कार्यरत राहिलं पाहिजे. म्हणजे सत्याच्या मार्गावर, म्हणजेच ब्रह्मज्ञानाच्या मार्गावर आपण सतत पुढे पुढे जात राहू. विज्ञान आणि वैज्ञानिक संशोधन याचा अर्थ हाच आहे. अज्ञात गोष्टी अनंत आहेत त्यामुळे सगळ्या गोष्टींचं ज्ञान हे कधीच कुणाला होऊ शकणार नाही. कितीही ज्ञान प्राप्त झालं तरी त्यापुढे काहीतरी आहेच. म्हणूनच विज्ञान मार्गाने सतत संशोधन करत राहणे आणि प्रगतीच्या मार्गावर जायचे असेल तर मिळालेले ज्ञान विवेक बुद्धीने वापरणे हाच खरा ज्ञानमार्ग आणि हीच खरी ब्रम्होपासना.
दृश्यज्ञानातून पुढे प्रगती करत अनुभव सिद्ध ज्ञान, त्यातून पुढे प्रगती करत संशोधन सिद्ध ज्ञान, त्यातून पुढे प्रगती करत विचार आणि तर्क शक्तीतून ज्ञानाचा विकास आणि विवेकशक्ती मधून ज्ञानाचा उपयोग या क्रमाने हा ज्ञानमार्ग असावा असे मला वाटते.
सूर्य पृथ्वीभोवती फिरतो हे दृश्य ज्ञान म्हणजेच जगामध्ये दिसणारं दृश्य ज्ञान. परंतु ते मिथ्या आहे, खरं नाही.
पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे वरील चार निकषांवर सिद्ध झालेलं ज्ञान म्हणून ते सत्य आहे. पण मग ते अंतिम सत्य आहे का? असेलच असे नाही. सत्य मार्गा वरून जाताना ते सापडलेले सर्वात अलीकडचं ज्ञात सत्य आहे. सत्याच्या मार्गावरून जाताना एखाद्या गोष्टीचा शोध घेत असताना अनेक प्रश्न निर्माण होतात. त्या प्रश्नांच्या उत्तरांच्या पुढेच अंतिम सत्य असू शकते. म्हणजेच जसे जसे आपण या चार निकषांवर सत्याच्या मार्गावर पुढे पुढे जात असतो,
तसतसे आणखी नवनवे प्रश्न निर्माण होत जातात. त्या प्रश्नांच्या उत्तरा कडे जात असताना पुन्हा अनेक प्रश्न निर्माण होतात. अंतिम सत्य हे या सर्व प्रश्नांच्या उत्तरांच्या ही पुढे असले पाहिजे. त्यामुळे ज्ञात सत्य आणि अंतिम सत्य यात फरक केला पाहिजे. विज्ञान हा फरक जाणीवपूर्वक करत असते. कोणत्याही विज्ञानाने अथवा संशोधकाने असा कधीही दावा केलेला नाही की मी तर्काने गणिताने किंवा प्रयोगांनी सिद्ध केलेले सत्य हे अंतिम सत्य आहे. विज्ञानाचा कायम असाच दावा असतो की हे सत्य या चार मार्गांच्या चिकित्सांवरून जे ज्ञात झाले आहे ते ज्ञात सत्य आहे. विज्ञानाच्या दृष्टीने अंतिम सत्य ही कल्पना आहे. अनंत म्हणजेच इन्फिनिटी ही जशी कोणती एक संख्या नाही सर्व संख्यांच्या पलीकडची ही संकल्पना आहे. त्याच पद्धतीने अंतिम सत्याची कल्पना म्हणता येईल. म्हणजेच ब्रह्मज्ञान हे जर अंतिम सत्य म्हणून कल्पिले तर ब्रह्मज्ञान हे ज्ञानाच्या मार्गावरील अनंतत्व आहे.
‘ब्रह्म सत्यम् जगन् मिथ्या’
या वाक्याचा विचार करताना ब्रह्म हेच अंतिम सत्य आहे असा करण्यापेक्षा अंतिम सत्यालाच ब्रह्म कल्पूया. अंतिम सत्य म्हणजे ब्रह्म असे म्हणूया. या दृष्टीने या मंत्राचा विचार करणे आवश्यक आहे असे वाटते. या परिप्रेक्षातून जर विचार करावयाचा म्हटला तर जगामध्ये अंतिम सत्य असूच शकत नाही, हेच खरे अंतिम सत्य आहे. कुणाला जर अंतिम सत्य सापडले असे म्हणत असेल तर ते असेच असले पाहिजे.
मग उरते ते काय? फक्त प्रश्न प्रश्न आणि प्रश्न.
प्रश्न म्हणजे मनुष्याच्या बुद्धीला, संशोधन शक्तीला, आणि विचारशक्तीला सतत पुढे नेण्यासाठी निर्माण झालेले आव्हान. या आव्हानांचा पाठपुरावा करणे हे सगळ्यात महत्त्वाचे सगळ्यात मोठे सगळ्यात आवश्यक आणि प्रगतीसाठी उपकारक आहे. परंतु या सर्व शक्तींबरोबर विवेकशक्ती ही सुद्धा पुढे गेली पाहिजे त्याचाही विकास झाला पाहिजे. विवेकशक्तीचा विकास झाला नाही तर बाकी सर्व शक्ती गोठून जातील, अस्थिर होतील किंवा चुकीच्या दिशा पकडतील अथवा नष्ट होतील.
थोडक्यात वंशवृद्धी किंवा असलेल्या वंशावळीचे रक्षण व्हावे यासाठी हे दीपपूजन. घरात दीप पाहून लक्ष्मी देखील आत येते असे म्हणतात आणि म्हणूनच त्या लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी घरातील दिवे लख्ख उजळून लावणे म्हणजेच समृध्दी व ऐश्वर्य यांचे प्रतिक आहे.
इतर अमावस्या आपल्याकडे अशुभ मानल्या जातात, परंतु ही दीपअमावास्या किंवा लेकुरवाळी अमावास्या ही शुभ मानली जाते. तसेच दिवाळीतील लक्ष्मी पूजनाची अमावस्या देखील शुभ मानली जाते. इतर अमावस्या अशुभ समजल्या जातात.
घराघरातून मातीची ठाणाई ( मांडीवर लेकरासहित) तयार करतात, तिच्या हातात दीप दिला जातो व दोऱ्यानी सुतवले जाते. आणि मग तिची यथासांग पूजा करून तिला पुरणाचा नैवेद्य दाखवून तिची आरती केली जाते व आमच्या वंशाचे रक्षण व वंशवृद्धी साठी प्रार्थना केली जाते.
आपल्याकडे दिव्यांचे विविध प्रकार आहेत. विविध प्रसंगी विविध ठिकाणी आपल्याला ते बघायला मिळतात. या दिवसात पावसाळी हवा असते. बरेचदा अंधारून येते. त्या साठी घरातील दिवे हाताशी असतील तर शोधाशोध करावी लागत नाही. म्हणून आजच्या दिवसाच्या निमित्ताने सगळे दिवे साफ करून ठेवले जातात.
या सणाचे वैज्ञानिक महत्व म्हणजे, आत्तापर्यंत आपण जो आहार केला होता तो आता करायचा नाही तो गतहार झाला. आता चार महिने पचनास हलके अन्न घ्यायचे. या दिवसात पचनशक्ती कमी झालेली असते. म्हणून हलके व सात्विक अन्न घ्यावे.
हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या धर्मात याच्या मागचे विज्ञानही सामावलेले आहेच. पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. किमान या पावसाळी दिवसांमध्ये मांसाहार बंद ठेवण्याची तीव्र गरज आणि आपली प्रथा किती दूरदर्शीपणे आपल्या पूर्वजांनी योजली आहे.
◆ आपण यामागची वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया:
१) या ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही.
२) बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा / प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत. मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून? याचा साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो. त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.
३) या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते. शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.
४) वातावरणात ओलावा असतो. मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते हवेतील वाढलेल्या जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधिक वेगाने होते.
५) आज विविध लसी, अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके, औषधे उपलब्ध असूनसुद्धा, धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथींना आवर घालणे कठीण झाले आहे. अनेक घातक रोगांच्या जीवघेण्या साथी, ह्या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतुंमुळे पसरतात. म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो.
अशा सर्व कारणांमुळे या दिवसाला धार्मिक जोड दिली गेली आहे. त्यामुळे आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो.
◆ या दिवसात शाकाहार करण्यामागेही शास्त्रीय कारणे आहेतच.
१ ) अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायलाही मिळत नाहीत.
२) शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात. त्यात बऱ्याच औषधी वनस्पती असतात. त्याचा फायदा वर्षभर होतो.
३) तुलनेने शाकाहाराचे या दिवसात नीट पचन होते.
४) विविध उपासांच्या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खनिजे आणि उपयुक्त पोषक घटक अपोआप शरीराला लाभतात.
५) कायम मांसाहार करणाऱ्यांच्या पचन संस्थेवर नेहेमी येणारा ताण, या शाकाहारी बदलामुळे कांही काळ कमी होतो.
चातुर्मासात वेगवेगळी व्रते केली जातात. काही मंडळी नक्तव्रत करतात. ते आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत चांगले असते. ही व्रते करण्यामागे सात्विक भाव वाढावेत हा उद्देश असतो. आपले सगळेच सण त्यातील पूजा, आहार, कपडे, व्रते हे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य असतात.
दिव्यांच्या आमावस्येची पूर्वी सांगितलेली कहाणी सर्वांना माहिती असेलच. त्यातून खूप बोध मिळतो. या कहाण्या पूर्वीच्या असल्याने त्या काळाला अनुसरून लिहिलेल्या होत्या. पण त्यातील बोध मात्र त्रिकाल आबाधित आहे. याच कहाणीत किती महत्वाच्या बाबी समजतात.
१) घरातील व्यक्तींची काळजी घ्यावी.
२) माणसात देव बघावा.
३) हलक्या कानाच्या किंवा ज्यांना कमी समज आहे त्यांच्यावर विश्वास ठेवू नये.
४) प्रत्येक गोष्टीची सत्यता पडताळून बघावी.
ही तत्वे नुसती सांगून आचरणात येतीलच असे नसते. म्हणून त्याला काही उदाहरणे/अनुभव/गोष्टी जोडाव्या लागतात. म्हणून आपल्याकडे कहाण्या आवडीने वाचल्या जातात. आज आमच्या प्रत्येक शाळेत दिव्यांचे विविध प्रकार, त्यांचे उपयोग, महत्व तसेच आजच्या दिवसाचे महत्त्व सांगून दीपपूजन केले जाते.
☆ पाऊस आणि आठवणी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
“सावन आया बादल आए, मोहे पिया नही आए… “1975 साली रिलीज झालेल्या “जान हाजिर है” या सिनेमातील हे गाणं! खरंतर मला हे गाणं माहिती नव्हतं, कारण आम्ही त्यावेळी राजेश खन्ना, अमिताभ बच्चनच्या प्रेमात होतो! त्यामुळे अर्थातच राजेश खन्ना, अमिताभचे पिक्चर आणि त्यातील गाणी पाठ होती. पण हे गाणं ह्यांच्या आवडीचं होतं आणि आज बाहेर पाऊस पाहताना मला हे गाणं आठवतंय! हे तर आता परतून येणार नाहीत, पण ते गाणं मनात आहे! ह्यांनी ऐकवलेले ते गाणे आता माझ्या आयुष्यात खऱ्या अर्थानं मी अनुभवते आहे.
तेव्हा आमचं लग्न झाल्यानंतर आम्ही पाटणला मे महिन्याच्या अखेरीस बिऱ्हाड केलं त्यामुळे लगेचच पावसाळा सुरू झाला! कोकण आणि देश यांच्या बॉर्डर वरचं पाटण हे गाव! तिथे पाऊस ही भरपूर असे. आमचा क्वार्टर गावाबाहेर एका डोंगरावर असल्यासारखाच होता. आणि घराच्या दारात बसलं की समोरही डोंगरदऱ्याच दिसत असत! पाटणला पाऊस भरपूर पडत असे. इतका की घराबाहेर पडताच येत नसे. त्यावेळी घरात टीव्ही ची करमणूक नव्हती. ट्रांजिस्टर, टेप रेकॉर्डर सुद्धा नव्हता आमच्याकडे! त्यामुळे फक्त गाणी आठवणं आणि गुणगुणणे! …. डोळ्यातला पाऊस आणि बाहेरचा पाऊस…. कधी रिमझिम येतोय, कधी कोसळतोय तर कधी बरसतोय एका लयीत! “सावन आया, बादल आए, मोहे पिया नही आए’ ह्या गाण्याप्रमाणे हे पण आता परतून येणार नाहीत, हे सत्य मला मान्य करावं लागतं आहे!
पावसाची गाणी हा तर लेखनाचा आवडता विषय! “रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन,.. ” हे एक गाणं अमिताभ आणि मौसमी वर चित्रित झालेलं, दरवर्षी पाऊस आला की या गाण्याची आठवण येतेच येते!
” सावन का महीना पवन करे शोर…. ” हे ही असं च चिरतरूण
गाणं सुनील दत्त आणि नूतन च्या
“मीलन” मधील!
अशी कित्येक हिंदी गाणी आपल्या मनाच्या कोपऱ्यात जपलेली असतात आणि आपल्या ला भावुक करत असतात..
अशी कित्येक गाणी आपला पावसाचा आनंद द्विगुणीत करत असतात!
पावसाळा ऋतूच मोठा मजेदार! मजेदार अशासाठी की पाऊस नसला तरी प्रॉब्लेम, जास्त झाला तरी प्रॉब्लेम! कामावर जाणाऱ्यांची तर पावसाळ्यात फार चिडचिड होत असते! रोज ट्रॅफिक जॅमला तोंड देणे, कधी पावसामुळे रस्ता बंद होणे तर कधी एखादा पूल धोकादायक तर कधी एखादं धरण! पावसाचा फटका कसा बसेल सांगता येत नाही!
पण पाऊस आठवावा लागत नाही! पाऊस आला की आपोआपच पावसाच्या आठवणी मनामध्ये रुंजी घालू लागतात. असं वाटतं की इतके पावसाळे आपण पाहिले पण पावसाचं प्रेम काही कमी होत नाही! कदाचित बालपण कोकणात गेल्यामुळे मला पावसाची आपुलकी अधिक वाटत असेल! बाहेर बरसणाऱ्या
पावसाच्या सरी, कौलावरून येणारे त्याचे ओघळ, घरामध्ये असणारा बऱ्यापैकी अंधार, – कारण पावसाळ्यात लाईट जाणे कायमच असायचे, मग आम्ही कंदीलाच्या प्रकाशात संध्याकाळी आईच्या भोवती भोवती करत असू. वडील बरेच वेळा फिरतीवर असायचे. त्यामुळे माझे दोन भाऊ आणि मी आई भोवतीच असायचो..
त्या अंधाऱ्या रात्री आई मऊ भात, कधी खिचडी तर कधी
कुळीथाचे पिठलं आणि भात, पापड असे मेनू करीत असे.
हे पदार्थ गरम गरम खाताना खूप आनंद मिळत असे. आधुनिक काळात आपण काही काही गोष्टी विसरून गेलो किंवा त्या मिळेनाशा झाल्या हे मात्र मनाला जाणवत असते.
वयाने सत्तरीचा टप्पा ओलांडला आणि नकळत मन सातव्या वर्षाकडे जात राहिले! बरेचदा आत्ता घडलेल्या गोष्टी आठवत नाहीत पण जुन्या गोष्टी मात्र मनाच्या कोपऱ्यात घट्ट धरून राहिलेल्या असतात आणि पुनरावलोकन करताना पहिल्यांदा आठवतं ते आपलं बालपण!
काळ बदलला, पावसाचं रूप ही बदललं! कधी तो वेळेत येतो, कधी नाही! बाहेरच वातावरण बदललं, रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाले, लाईट जाणं कमी झालं, घर स्लॅबची झाली, त्यामुळे घरात
पाणी गळणे, ओल येणे कमी झाले! या ओली बरोबरच या सगळ्या गोष्टी प्रेमाची ओढ घेऊन गेल्या! प्रत्येक गोष्टीत आधुनिकता आली पण नकळत प्रेम, मायेची ओल ही कमी झाली. पावसात भिजून आल्यावर गरम गरम चहा आणि भजी किंवा तत्सम पदार्थ खाण्याची लज्जत मात्र कमी झालेली नाही. अजूनही पावसाचं नातं कांदा भज्याशीच जोडले जाते… आणि मग कॅलेंडर कडे लक्ष जातं, अरेच्चा, आषाढी एकादशी जवळ आली, तेव्हा कांदेनवमी चा कांदा भज्याचा बेत व्हायलाच पाहिजे! पूर्वीच्या काळी पुढे चार महिने कांदा खायचा नाही म्हणून कांदे नवमीचे महत्त्व असे, पण आपण आता बारा महिने कांदा खातो, तरीही कांदे नवमी ते कांदे नवमीच! तिचा आनंद तर घेतलाच पाहिजे आणि त्याचबरोबर जुन्या प्रत्येक आठवणी बरोबर एक एक भजं तोंडात टाकताना घेत असलेला आनंद एकमेकांबरोबर शेअर केला पाहिजे!
अशा या पावसानं नेहमीप्रमाणेच मला आठवणींच्या पावसात भिजवून टाकले! दरवेळी पाऊस सुरू झाला की मनामध्येही आठवणींच्या पावसाची बरसात चालू होते आणि ती व्यक्त करायला लिखाण हे होत राहिलंच पाहिजे, खरं ना!
☆ या झोपडीत माझ्या… ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆
परवाची गोष्ट..सांगलीतून माझ्या बनपुरी गावी निघालो होतो. हा माझा नेहमीचा प्रवास आणि नेहमीचाच रस्ता…अगदी खडतर रस्ता असल्या पासूनचा! या मार्गाचे सर्व उन्हाळे पावसाळे पहात आणि सोसत होत असणारा हा माझा नेहमीचाच प्रवास. चकचकित आणि प्रशस्त झालेल्या या डांबरी रस्त्याशी हितगूज करत आणि सभोवतालची हिरवळ डोळ्यात साठवत सक्कासक्काळचा हा प्रवास नेहमीच आनंदाची पर्वणीच देऊन जातो. तसाच आजचाही असाच प्रवास.. मनात येतील ती गाणी मोठ्यानं म्हणत आपल्याच तालातला हा प्रवास मला नेहमीच सुखावतो.तीच ती गाणी रिपिट करत रस्ता कधी सरत राहतो ते कळतही नाही.
आणि प्रवाशाच्या या टप्प्यावर नेहमी थांबून गप्पा मारत चहा घेण्याचं ठिकाण म्हणजे भिवघाट… त्याचं कारणही तसंच.. इथं असणारा माझा मित्र किरण माने. गेली कित्येक वर्षं भिवघाटचं हे हक्काचं थांबण्याचं ठिकाण झालंय माझं..
या प्रवासात त्याची भेट घेत.. त्याच्या सोबत चहा घेत अर्धा पाऊण तास गप्पा मारून भिवघाट उतरायचा नेहमीचाच शिरस्ता. करंज्यांत आल्या आल्याच त्याला फोन करायचा म्हणजे पाच मिनिटात तो हजरच राहतो. मनमिळावू आणि बोलक्या स्वभावाचा किरण सामाजिक आणि राजकीय अशा सगळ्या कामात नेहमीच रस घेतलेला हसतमुख असणारा माझा मित्र. तिथंच त्याचं घर आणि मेडिकलही.त्यामुळेच मी किरण आणि भिवघाट हा त्रिवेणी संगम नेहमीच असा जुळत असतो. त्याची भेट घेतल्याशिवाय भिवघाट उतरता येत नाही आणि सोडताही येत नाही असं पक्कंच होऊन गेलंय म्हणा ना!
..असो त्या दिवशीही त्याची भेट, चहा आणि गप्पानंतर भिवघाट उतरत होतो.तसा छोटासाच हा घाट भिमाशंकर मंदिर आणि घाटातल्या म्हसोबानं पवित्र आणि पावन झालाय.हळूहळू वळणे घेत पायथ्याला पोहचताच उजवीकडे अचानक वेगळेपण जाणवलं आणि गाडी थांबवली. रस्त्याच्या कडेला प्लॅस्टिकच्या बाटलीच्या भिंती बनवून उभी असणारी झोपडी मला खुणावू लागली.
तिथं पोहचून मागोवा घेत आवाज दिला.आत असणाऱ्या पन्नास वयाच्या आसपासच्या स्त्रीने प्रतिसाद देत बाहेर पाहिलं आणि ” काय पाहिजे वं पावणं ” म्हणत बाहेर आली.
..'”काही नाही तुमची झोपडी पाहतोय तुमची, प्लॅस्टिकच्या बाटलीपासून बनवलीय म्हणून वेगळी वाटली आणि कौतुक वाटलं, किती दिवसापासून राहताय मावशी इथे.आणि गाव कोणतं तुमचं, ” त्यांच्याशी संवाद साधत झोपडी न्याहळू लागलो. आतमध्ये त्या स्त्रीचा नवरा काही तरी कामात मग्न होता. मी आल्याच्या चाहूलीनं ते काम थांबवून आमच्या संवादात सामील झाला. तो मोजकंच बोलत होता. मावशी मात्र इकडच्या तिकडच्या ओळखी सांगत होत्या.- ” काय करायचं.अशी राहायची येळ आलीया बघा.माझं माह्यार हे पलिकडं अर्जुनवाडी हाय.सगळं चांगलं हाय तकडं, मस्त तिसरा हिस्सा हाय माझा तिथं, पण काय करायचं, असं वाऱ्यावर राहायची येळ आलीया बघा.सरकार काय मदत करतूया का बघा, घर बिर मिळतंय का? आमाला “,, ..महाराष्ट्राची ही’ लाडकी बहिण ‘तिचं दुःख सांगत होती.
” चहा करू का पावणं” म्हणून आपुलकीही दाखवत होती.
…भिवघाटातल्या नेहमी भरणाऱ्या जत्रंमुळं तिथं नेहमीच गर्दी असते.लोकं पाण्याची बाटली विकत घेतात आणि रिकामी बाटली तिथेच फेकून देतात.त्याच बाटल्या गोळा करून तिच्या नवऱ्याच्या मदतीनं हा निवारा उभा केलाय त्यांनी. आणि हे बनवण्याची आयडीया तिच्या नवऱ्याचीच.
घरात दारिद्र्य घेऊन उभा असलेला हा प्लॅस्टिकच्या बाटलीच्या भिंतीनं बनलेला प्रपंचाचा डोलारा… डोक्यावर हिरवं शेडनेट असलेल्या छतालाही ठिकठिकाणी ठिगळं लागलेली… मळकटलेल्या शेडनेटचंच पडद्यासारखं फडफडणारं दार.अशा झोपडीत विपरीत परिस्थितीत आलेल्या प्रत्येक संकटावर मात करीत प्लॅस्टिकच्या बाटलीच्या भिंती तयार करून पर्यावरणपूरक झोपडं असं ऊन वारा पाऊस झेलत लक्ष वेधतंय. या झोपडीतही एक दुर्दम्य इच्छाशक्ती वसलीय. माणसाच्या जगण्याच्या उमेदीला खडतर मार्गावरूनही असा संसार थाटता येतो याची जाणीव ही झोपडी देते राहते. टोलेजंग इमले आसपास वाढत असताना ही झोपडी मात्र येणाऱ्या जाणाऱ्याचं लक्ष वेधते.
…त्यांच्या दु:ख दारिद्रयाची कहाणी काही असेल ती असेल पण पर्यावरणाला घातक असणाऱ्या आणि लोकांनी पाणी पिऊन रस्त्याकडेला फेकून दिलेल्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्याचं घर मात्र त्या वळणावर अनेकांचं लक्ष वेधतंय हे मात्र नक्की..!
………….
राष्ट्र संत तुकडोजी महाराजांची रचना आठवून पुन्हा पुन्हा गुणगुणत माझा पुढचा प्रवास सुरु झालेला……!
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥
*
भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥
*
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या
दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥
*
जाता तया महाला, ‘मज्जाव’ शब्द आला
भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥
*
महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥
*
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा
कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥
*
पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥
….संत तुकडोजी महाराज
………………
आपणही त्या भागात गेलात की नक्की पहावी अशी ही प्लॅस्टिक बाटल्यांची झोपडी….!
☆ परंपरागत चातुर्मास आणि आजचे नवे अर्थ ☆ सौ राधिका भांडारकर ☆
परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे मूलतत्त्व अथवा वैशिष्ट्य आहे.
हिंदू धर्मात चातुर्मास या कालावधीला पारंपरिक महत्त्व फार आहे. चातुर्मास म्हणजे नक्की काय? या काळात काय करावे आणि काय करू नये याविषयीचेही परंपरागत नियम आहेत. चातुर्मास हा चार महिन्यांचा कालावधी आहे. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी पर्यंत हा कालावधी असतो. यंदा म्हणजेच २०२५ सालचा चतुर्मास ६जुलैपासून म्हणजेच आषाढी एकादशी पासून ते कार्तिकी एकादशी पर्यंत आहे. साधारणपणे ११८दिवसांचा हा काळ आहे. या कालावधीभोवती पौराणिक कथा आहेत. असे मानले जाते की या चार महिन्यांच्या काळात भगवान विष्णू निद्रासनात जातात. ते या काळात, संपूर्ण विश्वाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी भगवान शंकराकडे सोपवतात. थोडक्यात चातुर्मास हा भगवान विष्णूचा निद्राकाळ आहे आणि शिवाच्या पूजनाचाही काळ आहे.
याविषयीची परंपरा सांगते की या काळात सकाळी लवकर उठून सूर्यदेवाची पूजा करावी, सात्विक अन्नाचे सेवन करावे. जास्तीत जास्त दान करावे. दही, लोणचे, हिरव्या भाज्या, मुळा वगैरे खाणे टाळावे. तसेच या काळात विवाह, मुंजी, गृहस्थापनासारखी शुभ कार्ये टाळावीत. हा धर्मशास्त्रीय संकेत आहे.
अशी समजूत आहे की देवशयनी (आषाढ एकादशी) ते प्रबोधिनी (कार्तिक एकादशी) या देवांच्या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देतात म्हणून त्यांच्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे असे धर्मशास्त्र सांगते. सामान्यपणे लोक चातुर्मासात एखादे तरी व्रत करतातच जसे की पर्णभोजन(पानावर जेवण करणे) एक भोजन अयाचित (म्हणजे न मागता मिळेल तेवढे) एकवाढी (एकदाच वाढून घेतलेले), मिश्र भोजन (काला करून) धरणे— पारणे (एक दिवस भोजन एक दिवस उपास) अशा प्रकारची काही ठळक व्रते चातुर्मासात केली जातात. थोडक्यात हा झाला चातुर्मासाविषयीचा काय करावे, काय करू नये, वर्ज्य, अवर्ज्य याविषयीचा परंपरागत विचार पण या पलीकडे जाऊन या धर्मसंकल्पनांच्या गाभ्यातून उलगडणार्या वैज्ञानिकतेचा, भौगोलिकतेचा, ऋतुमानाचा, नैसर्गिक वातावरणाचा, शास्त्रोक्त दृष्टीने विचार करून चातुर्मास हा कालावधी समजून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे नवा विचार रुजवणे. केवळ धर्मशास्त्र सांगते म्हणून किंवा पापभीरू मानसिकतेतून व्रतवैकल्ये करणे या अंधश्रद्धायुक्त वृत्तीतून बाहेर येऊन, डोळसपणे या चातुर्मासाला नवा आयाम दिला तर त्याचे महत्त्व अधिक स्पष्ट होईल.
हा संपूर्ण चार महिन्याचा कालावधी म्हणजे श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक. यात सुरुवातीला आषाढाचे काही दिवस आणि शेवटी कार्तिक महिन्यातले काही दिवस येतात. पावसाळ्याचा हा काळ. यावेळी धरणीचे रूप पालटलेले असते. स्थलांतर अशक्य असते. अशावेळी कुटुंबात होणारी शुभकार्ये म्हणजे उपस्थित राहण्यासाठी इच्छुक असणाऱ्या गणगोतांसाठी ही यातायातीची, कठीण किंवा अशक्य बाब होऊ शकते मग या संपूर्ण काळात अशी शुभकार्ये न केलेलीच बरी नाही का? किंबहुना संभाव्य धोके टाळण्यासाठी ती करूच नये म्हणून भगवान विष्णुच्या योगनिद्रेचे कारण पूर्वजांना द्यावे लागले असेल. शिवाय मंगलकार्याच्या निमित्ताने होणारा रजतमयुक्त आहारही धोकादायक. या संपूर्ण विचारामागे देव आणि असुर या रुपकात्मक कल्पना आहेत आणि या कल्पनांचा आधार म्हणजेच परंपरा.
याच काळात मानवाचे ऋतुबदलामुळे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशावेळी कंद, वांगी, मुळे, तंतुयुक्त पदार्थ पचनसंस्थेसाठी योग्य ठरत नाहीत म्हणून धर्मशास्त्रात या वातवर्धक, पित्तवर्धक, कफवर्धक पदार्थांना चातुर्मासात वर्ज्य ठरवण्यात त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन दडलेला आहे. रजतमयुक्त आणि सत्वगुण प्रधान पदार्थांची एक शास्त्रीय यादी देऊन, वैज्ञानिकता जाणून परंपरेचे महत्त्व धर्मशास्त्रात सांगितले आहे आणि त्याचा अभ्यासपूर्ण विचार करणे म्हणजेच परंपरेला नव्या अर्थाने स्वीकारणे.
या काळात शरीरातील अग्नी मंदावलेला असतो. चेतनाशक्ती, वीर्य शक्ती इतर ऋतूंच्या मानाने कमी झालेली असते आणि जीवन जगताना याचे भान ठेवणे गरजेचे आहे आणि हेच लक्षात आणून देण्यासाठी चतुर्मासातील व्रतवैकल्यांचा आधार घेतला जातो.
एक वेळ जेवणाने ताकद आणि ओज यांची वृद्धी होते. मौन धारणेमुळे शक्तिर्हास रोधला जातो कारण बोलण्यातून बरीच ऊर्जा खर्च होत असते.
दीपध्यान म्हणजे प्रकाशाचे, तेजाचे अग्नीचे मंगलदायी पूजन. शरीराला ताजेतवाने करण्याचे ते एक माध्यम असते.
खरं म्हणजे आपली सर्वच धार्मिक व्रते ही निसर्गाशी जवळीक साधतात. चातुर्मासात पिंपळ, तुळस या वनस्पतींची पूजा, सेवा तसेच त्यांच्याभोवती प्रदक्षिणा घालण्यात येते कारण या सर्वच वनस्पती औषधी, जंतुनाशक आहेत. त्यांच्या संपर्कानेही आरोग्याचे रक्षण होते.
चातुर्मासात येणाऱ्या श्रावण महिन्याचे आपल्या परंपरेत फार महत्त्व आहे. श्रावण महिना म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना पण त्याचा मूलभूत संबंध निसर्गाशी जुळलेला आहे.. पर्जन्यधारांनी वसुंधरा पूर्णतया नटलेली असते. फुलं, पत्री, फळे यांची रेलचेल असते. हरतालिकेच्या निमित्ताने वेगवेगळ्या २१ पत्रींचे पूजन होते. नागपंचमी, ललित पंचमीच्या निमित्ताने हातावर मेंदी रेखली जाते. दुर्वा खुडणे, दुर्वांच्या संपर्कात राहणे हे सारेच पित्तशामक, आरोग्यवर्धी असते. अशाप्रकारे चातुर्मासाचा पाप पुण्याशी, संस्कृतीशी, देवाधर्माशी संबंध जोडलेला आहे असे वरवर वाटत असले तरी त्यामागे ऋतुबदलाप्रमाणे मनुष्याच्या आरोग्याची, निसर्ग संवर्धनाची काळजी घेणे हा मुख्य हेतू आहे. चातुर्मासातील व्रतवैकल्ये ही वैज्ञानिक पायावर आधारित आहे. त्यांना शास्त्रीय बैठक आहे. शरीर मन व आत्म्याचे आरोग्य आणि उत्कर्ष या हेतूने ती तयार केलेली आहेत.
कुठल्याही परंपरेला का? कशासाठी? हे प्रश्न विचारणे म्हणजे परंपरा डावलणे नव्हे तर त्यात दडलेली शास्त्रीय उत्तरे शोधून परंपरेचा नव्याने डोळस स्वीकार करणे आणि बदलत्या काळानुसार, जीवनपद्धतीनुसार, गरजेनुसार, सोयीप्रमाणे, उपलब्धता जाणून त्यात आवश्यक, सुटसुटीत, कर्मठपणा आणि अंधश्रद्धा टाळून सकारात्मक रूप, आकार देणे म्हणजे खरी आधुनिकता.
चातुर्मासातील परंपरागत व्रतधारणांविषयी याच विचारांची जागृती व्हायला हवी कारण चातुर्मास ही केवळ धर्म परंपरा नव्हे तर ती ऋतुबदलानुसार केलेली एक आरोग्य समृद्ध लाईफ स्टाईल आहे.
(पूर्वसूत्र- त्या रात्री तारामावशीला खूप ताप भरला. थर्मामिटर लावून पाहिलं तर एकपर्यंत ताप होता. प्रवासाच्या दगदगीने आलेला तो ताप नव्हता हे विषमज्वराचं निदान झालं तेव्हा समजलं.)
नियमित औषधं, पथ्यपाणी, आराम यामुळे तापाला पुढे हळुहळू उतार पडत गेला. तिचा अशक्तपणा कमी झाल्यानंतर तिची मुलगी, जावई दोघे स्वतः येऊन या दोघांना घेऊन गेले. खरं तर ही अगदी साधी घटना, पण त्यात भविष्यांत कधीतरी मला दिलासा आणि शुभसंकेत देणारे धागेदोरे अलगद विणले गेले होते आणि हे मधे बराच काळ उलटून गेल्यानंतर मला आपसूक जाणवणार होतं याची मला कल्पनाच नव्हती. अर्थात त्यामुळेच कदाचित ती घटना मनात जपून ठेवायची प्रेरणा तारामावशीला मिळाली असणार हेही ओघाने आलंच. डोंबिवलीला गेल्यानंतर तिने आवर्जून पाठवलेल्या सविस्तर पत्रात आम्हा दोघांचं भरभरून कौतुक करून आम्हाला मनापासून आशीर्वाद दिले होते!
अगदी योगायोगाने घडलाय असं वाटणारा हा प्रसंग मधल्या काळात आम्ही विसरूनही गेलो होतो. या प्रसंगानंतर दोनतीन वर्षांनी माझ्या लहान भावाचं लग्न ठरलं तेव्हा मावशीला कांही कारणाने समक्ष येणं शक्य झालं नव्हतं तरीही तिने आईकडे भावाच्या संसारासाठी तिची आठवण म्हणून योग्य वस्तू घेण्यासाठी आवर्जून आहेरही पाठवला होता. तिच्या सरळ, मोकळ्या स्वभावानुसार आम्हा कुटुंबियांबाबतचा सद्भावही तिने नेहमीच जपला होता! नात्यांकडून अशा सद्भावनांपेक्षा वेगळी अपेक्षा ती काय असणार? तरीही तारामावशीच्या मनात मात्र यापेक्षा वेगळं, व्यक्त न करता आलेलं असं बरंच कांही ठाण मांडून बसलं होतं आणि तिने मला आवर्जून भेट म्हणून पाठवलेली ती दत्तमहाराजांची प्रसन्न रेखीव मूर्ती हे त्याचंच प्रतिक होतं, हे पुढे मी मुद्दाम तिला भेटण्यासाठी आणि हे सगळं जाणून घेण्याकरता केलेल्या आट्यापिट्यानंतर आमच्या अतिशय केविलवाण्या, करूण अशा मूकसंवादातून मला सांगायचा तिने प्रयत्नही केलेला होता. पण त्यातलं कणभरही कांही माझ्यापर्यंत पोचलंच नव्हतं. त्या संपूर्ण प्रसंगाच्या हळव्या आठवणी आजही मला अस्वस्थ करतायत..!!
आपण बरंच कांही मनाशी ठरवतो, ते आपल्याला अगदी सहजशक्य, अतिशय सोपंही वाटत असतं. पण जे घडतं ते ‘त्या’च्या मनात असेल तर आणि तसंच. आता मुद्दाम वेळ काढून मुंबईला जाऊन
तारामावशीची भेट घेणं आणि तिने माझ्यासाठी पाठवलेल्या दत्तमूर्ती संदर्भात तिच्याशी बोलून त्यामागची तिला मिळालेली प्रेरणा आणि अर्थातच या घटनेमागचा कार्यकारणभाव समजून घेणं माझ्यासाठी फारसं अवघड नसणाराय असंच मी गृहित धरलं होतं, पण नेमकं नियोजन करून मी हे सगळं जुळवून आणायचा प्रयत्न सुरू केला तेव्हा मात्र सहजसोपं वाटणारं हेच सगळं माझ्यासाठी अतिशय क्लेशकारकच ठरलं होतं. तो बोचरा अनुभव मी कधीच विसरणार नाही.
माझ्या टीमसाठीचा आॅडिटटूर प्रोग्राम हातात पडताच त्यातील सूचनांप्रमाणे विदर्भातील कांही रूरल-ब्रॅंचेसचे ऑडिट आम्ही संपवत आणले होते. त्यादरम्यानच्या पुढील नियोजनानुसार आम्हाला नाशिक जिल्ह्यामधील ब्रॅंचेसचा आॅडिट प्रोग्राम मिळाला. त्यात पहिलीच ब्रॅंच होती ती नाशिक-मेन ब्रॅंच. नंतर तिथल्याच इतर दोन लोकल ब्रॅंचेस् करून मग जिल्ह्यातल्या इतर ब्रॅंचेस करायच्या होत्या. त्यासाठी अर्थातच खुद्द नाशिकला सलग कमीतकमी एक महिना तरी आमचा मुक्काम असणार होताच. त्यामुळे सततच्या प्रवासाच्या नेहमीच्या दगदगीतून कांही काळ कां होईना सुटका झाल्याने थोडीतरी स्वस्थता मिळणार होती. नाशिक मेन ब्रॅंचचं आॅडिट सुरू केलं तो शुक्रवार होता. माझे तीनही ऑडिट असिस्टंटस् पुण्याचे असल्याने लगेचच्या शनिवारी काम संपवून त्यांचा पुण्याला घरी जाऊन यायचा बेत होता. त्यामुळे तो शनिवार-रविवार मला एकट्यानेच नाशिकला रहाणं क्रमप्राप्त होतं. शुक्रवारी रात्री उशिरा अंथरूणाला पाठ टेकली तेव्हा याच सगळ्या विचारांमधे मग्न असताना एक पर्याय उसळी मारून वर आला. ‘आपणही या शनिवार-रविवारी इथं एकट्यानेच पडून रहाण्यापेक्षा शनिवारचं हाफ-डेचं रूटीन संपवून मुंबईला जाऊन तारामावशीला भेटून आलो तर..? ‘ हा विचार मनात आला न् सगळी मरगळ निघूनच गेली एकदम. नाशिक-ठाणे बस फ्रिक्वेन्सीज चांगल्या होत्या आणि शेअर टॅक्सीसही मिळू शकत होत्या. प्रवास वन वे साधारण दोन अडीच तासांचा. त्यामुळे ते फारसं दगदगीचंही नव्हतं. माझी सख्खी मावशी, मावसभाऊही डोंबिवलीतच रहायचे. त्यांनाही भेटणं झालं असतं. त्याच उत्साहात रिसेप्शनला फोन करून मी माझ्या मावस भावाचा फोन नंबर दिला आणि अर्जंट काॅल जोडून द्यायला सांगितलं. पाच मिनिटांपूर्वी जे मनातही नव्हतं पण खूप दिवसांपासून मला व्हावंसं वाटत होतं ते आता असं अचानक शक्य होणार होतं. सगळं मनासारखं घडून येणार असल्याचा त्याक्षणीचा आनंद माझ्यासाठी अतिशय अनपेक्षित आणि उत्साहवर्धकच होता!
मी माझी आॅडिट टूर, नाशिकचा मुक्काम सगळं मावसभावाशी बोललो आणि ‘उद्या बँकेतली कामं संपवून संध्याकाळी तुमच्याकडे येतोय’ असंही सांगितलं. आता सगळं मनासारखं घडणार यात तिळमात्रही शंका नव्हती… पण? … पण ते तसं घडणार नव्हतं. वाटेत दबा धरून बसलेले अनेक खाचखळगे, अडचणी एकेक करून समोर येत मला अस्वस्थ करीत रहाणार आहेत याची मला तेव्हा कल्पनाच नव्हती!
नाशिकपासून व्हाया ठाणे डोंबिवली हा प्रवास तसा स्वस्थपणे झाला. रात्री भावाकडे छान गप्पा, जेवण, आराम झाला. माझा परतीचा प्रवासही दुसऱ्या दिवशी संध्याकाळी असल्याने, मी गप्पांच्या ओघात
‘मला कांहीही करून आपल्या तारामावशीलाही भेटून जायचंय रे.. ‘ असं भावाला सांगितलं. ती डोंबिवलीतच रहात असल्याने या मावसभावाचं तिच्याकडे अधून मधून जाणं-येणं असेच.
“ती आणि भिडे काका दोघेही आता त्यांच्या मूळ घरी नाही रहात. ते बऱ्याचदा आता दोन्ही मुलींकडेच असतात” भाऊ म्हणाला.
“कां रे…? “
“कारण असं नाही.. पण मावशीला रोजच्या कामांचीही दगदग होते आता. काकाही थकलेत. त्यामुळे दोन्ही मुली, जावयांनीच हा निर्णय घेतलाय. सध्या ही दोघं डोंबिवलीतल्या तिच्या मोठ्या मुलीकडे, मीनाकडे असतात. मी पंधरा दिवसांपूर्वी त्या दोघांना भेटून आलोय. मीना इथून जवळच्या सोसायटीमध्येच रहाते अरे. अगदी जवळ आहे. ” भाऊ म्हणाला
सकाळी चहा घेताना ‘मी आत्ताच मीनाकडे जाऊन येऊ का रे? ‘ असं भावाला विचारलं. त्याला आणखी एक-दोन ठिकाणी जायचं असल्याने त्याने मला तिच्या घरापर्यंत सोडलं आणि ‘तासाभरात न्यायला येतो.. ‘ असं सांगून तो त्याच्या कामासाठी गेला. निघताना भाऊ मीनाला फोन करू लागला तेव्हा मीच त्याला थांबवलं होतं. फोन करू दिला नव्हता. मला मावशीला सरप्राईज द्यायचं होतं.
पण… सरप्राईज मलाच मिळालं पण ते फारसं बरं नव्हतं. कारण घरी मीना आणि तिचा नवरा-मुलं सगळे होते पण मावशी न् काकाच नव्हते. माझा अर्थातच खूप विरस झाला.
त्या दोघांना थोडा बदल म्हणून ठाण्याला असणारी तिची दुसरी मुलगी न् जावई त्यांच्याकडे घेऊन गेले होते. मला परतीचा प्रवास नाहीतरी व्हाया ठाणेच करायला हवा होता त्यामुळे तिच्याकडे जाऊन, मावशीला भेटून तिथूनच थेट नाशिकला जाण्यात मला अडचण कांहीच नव्हती.
“तू असं कर” मी मीनाला म्हणालो, ” मला तिचा ठाण्याचा पूर्ण पत्ता, फोन नंबर लिहून दे आणि कसं जायचं तेही सांग. मला कांही झालं तरी मावशीला भेटायचंच आहे. तिला भेटल्या- बोलल्याशिवाय मला चैनच पडणार नाही. म्हणून भेटायचंय. “
मीनाने अस्वस्थपणे नवऱ्याकडे पाहिलं.
“तुमची खूप आठवण काढत असतात त्या.. ” मग तिचा नवराच म्हणाला, ” तुम्ही जरूर जा, भेटा त्यांना पण…. “
“पण काय? “
” तिला पॅरॅलिसिसचा नुकताच माईल्ड अॅटॅक आला होता अरे. कालच डिस्चार्ज मिळालाय. आम्ही दोघेही कालपर्यंत ठाण्याला जाऊन येऊनच होतो. त्यामुळे तुला पाहून तिला आनंद होईल, पण पूर्वीसारखं बोलता येत नाहीय तिला अजून… ” मीना म्हणाली.
हे सगळंच खरंच खूप विचित्र होतं. पण तरीही ती ‘माईल्ड अॅटॅक’ म्हणाली होती त्यामुळे त्यात मला फारसं गांभीर्य मात्र जाणवलं नव्हतं. तरीही आज शक्यतो पुरेसा वेळ तिच्याजवळ थांबायला मिळेल असं नियोजन करायचं मनाशी ठरवून मी त्या सर्वांचा निरोप घेतला.
तोवरची माझी उमेद, उत्साह सगळं हे ऐकून विरूनच गेलं होतं. ठाण्याला जाऊन मावशीला भेटल्याशिवाय मला आता चैन पडणं शक्य नव्हतंच. मी भावाच्या घराच्या दिशेने झपाझप चालू लागलो. मन मात्र मावशीच्या काळजीने अस्वस्थ झालं होतं… ‘तिथं ठीक असेल ना सगळं…? .. ‘ हा विचार मनात आला. मी तो एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखा झटकूनही टाकला. पण तरीही कुशंकेची पाल मात्र बराच वेळ मनात चुकचुकतच राहिली होती…!!
☆ जागतिक विद्युत सुरक्षा दिन.. अर्थात दीप अमावस्या…☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’ ☆
आज आषाढ महिन्याची अमावस्या!!!
या अमावस्येलाच ‘दिव्याची आवस’ किंवा ‘दीप अमावस्या’ असे म्हटले जाते. या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात. त्याच्याभोवती रांगोळ्या काढतात व ते दिवे प्रज्ज्वलीत करुन त्यांची पूजा केली जाते. पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात.
‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्।
गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥”
भावार्थ:-
‘‘हे दीपा, तू सूर्यरुप व अग्निरुप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. ’’
कथा कहाण्या नेहमीच रम्य असतात. जनमानस सुद्धा कथा ऐकण्यास उत्सुक असते. *ज्याप्रमाणे मधाचे बोट लावून आई कडू औषध पाजते, अगदी त्याच मायेने आपल्या पूर्वसूरींनी जनमानसाचा अभ्यास करुन प्रत्येक आध्यात्मिक (खरंतर वैज्ञानिक) तत्व सामान्य मनुष्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आणि यातूनच विविध कहाण्यांची निर्मिती झाली. कहाणीच्या पुस्तकात ‘विविध सण’ आणि ‘व्रतवैकल्ये’ यांच्या मनोहर कहाण्या दिलेल्या आहेत. त्या कहाण्या सांगण्याचा मुख्य हेतू श्रद्धा वृद्धिंगत व्हावी आणि समाजाने नियम पाळावेत असा असावा. कारण तत्कालीन समाजपद्धतीत ‘धर्माने’ अथवा ‘शास्त्राने’ सांगितले आहे असे मानून तसे आचरण करणारी मंडळी पुष्कळ होती.
भारतीय कालमापन पद्धतीप्रमाणे आषाढ महिन्याच्या शेवटी ग्रीष्म ऋतू संपतो. तसेच दुसऱ्या दिवशीपासून वर्षा ऋतूची सुरुवात होते. वर्षा ऋतू स्वाभाविकच जास्त पावसाचा. *पूर्वी विद्युत दिवे नव्हते, त्यामुळे प्रकाशासाठी दिव्यांची गरज होती. दिवा स्वच्छ असेल तर स्वाभाविक त्याचा जास्त प्रकाश पडणार. त्यानिमित्ताने घरातील सर्व दिव्यांची तपासणी (आपण त्यास आजच्या लौकिक भाषेत ‘ऑडिट’ म्हणू शकतो) व्हायची. पूर्वीच्या लोकांना आठवत असेल की कंदील, टूकं (रॉकेल वर जळणार छोटा दिवा), बत्ती असे विविध प्रकारचे दिवे असायचे. त्या दिव्यांची खूप निगा राखावी लागत असे, अन्यथा ऐनवेळी ते दिवे पेटत नसतं. यासाठी उजळणी म्हणून घरातील सर्व दिवे उजळले जायचे. श्रावण भाद्रपद हे दोन्ही महिने मुसळधार पावसाचे आणि तुफानी वादळाचे. त्यामुळे हवामान त्यामानाने थंड. अमावस्या म्हणजे काळोखी रात्र. घरात प्रकाश आणि पुरेशी ऊब मिळण्यासाठी दिव्यांची गरज असतेच. त्यामुळे दिव्यांची डागडुजी, स्वच्छता हा त्यामागील तांत्रिक भाग होता. आजच्या आधुनिक युगात संपूर्ण आषाढ महिना ‘विद्युत सुरक्षा मास’ म्हणून पाळावा असे सुचवावेसे वाटते. घरातील, कार्यालयातील सर्व वायरिंग, प्लग, सॉकेट, अर्थींग, बटन्स, सर्व विद्युत उपकरणे आदि या महित्यात तपासून घ्यावीत, दिवे पुसून घ्यावेत. तसेच दुचाकी, चारचाकी वाहनाचे दिवे, इनव्हर्टर, जनरेटर आदींची आवश्यक ती निगा राखावी. या सर्वांचे मूल्यमापन (तपासणी) दीपअमावस्येला करावी.
(कारण अमावस्या ही सर्वात जास्त काळोखी असते). विशेष करून घरातील गॅस शेगडी तसेच गॅसचा पाईप यांचीही तपासणी करावी कारण ‘स्वयंपाकघर सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित!! ‘ आजच्या भाषेत आपण त्यास जागतिक विद्युत सुरक्षा दिन’ म्हणू शकतो नव्हे तो होताच कारण हा ‘दिन’ संपूर्ण भारतात तितक्याच श्रद्धेने अनेक वर्षे पाळला जायचा आणि आजही पाळला जातो. मधल्या काळात आपण वैज्ञानिक दृष्टिकोन विसरलो आणि आपल्या बऱ्याचशा सणांचा भावार्थ बदलला, तसेच त्याचा यथोचित अर्थ समाजास समजून सांगण्याची व्यवस्था आपण समाज म्हणून प्रस्थापित करण्यात अपयशी ठरलो, खरंतर तसा प्रयत्नच झाला नाही असे खेदाने नमूद करावेसे वाटते. ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून ‘वटपौर्णिमा’, ‘जागतिक विद्युत सुरक्षा दिन’ म्हणून ‘दीप अमावस्या’, ‘जागतिक कृतज्ञता दिन’ म्हणून ‘सर्वपित्री अमावस्या’, जागतिक आरोग्य दिन म्हणून धनत्रयोदशी (धन्वंतरी जयंती),महर्षी नारद जयंतीला ‘जागतिक पत्रकार दिन’ असे बरेच ‘दिन‘ आपण साजरे करु शकतो. कारण या सर्व गोष्टींचा उगम भारतात झालेला आहे. गरज आहे ती फक्त इतिहासाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची!! . आज आपण सर्वांनी प्रण करु की आजपासून ‘दीप अमावस्ये’च्या निमित्ताने घरातील ‘विद्युत सुरक्षा’ आवर्जून पाळली जाईल.
आपल्या मागील सर्व पीडा (अर्थात गैरसमजुती, कोती वृत्ती) जाऊन जीवनात प्रकाश निर्माण व्हावा म्हणून या अमावस्येच्या दिवशी घरामधील सर्व दिव्यांचे पुजन केले जाते. पंच महाभूतांमधील अग्नि तत्वाची ही पूजा आहे. आपल्या पोटातील वैश्वानर नावाचा अग्नी अन्नपचनाचे काम करतो. शरीरातील अग्नीतत्व मंद झाले तर पोट बिघडते. याचाही विचार इथे होणे गरजेचे आहे. या दिवशी घरातील सर्व पितळी दिवे, समया, निरांजने, तांब्याचे दिवे, लामणदिवे, कापूरवाती अश्या सर्वांची पूजा केली जाते. संध्याकाळी दिवेलागणीला ओटीवर गाईच्या शेणानं सारवायचे, रांगोळी काढून त्यावर पाट ठेवायचा. त्यावर सर्व दिवे ओळीने मांडून त्यांना हळदकुंकू, अक्षता, फुलं वाहायची. कणकेचे दिवे करायचे आणि मग त्यात साजुक तूप आणि कापसाची वात घालून सर्व दिवे पेटवून त्यांनी दिव्यांची आरती करून देवाला नैवेद्य दाखवयाचा. भारतीय संस्कृतीमध्ये दिवा, ज्योती, वात, फुलवात यांना महत्त्वाचे स्थान आहे. प्राणाला प्राणज्योत म्हणले जाते, दिवा व प्रकाश यांचे जीवनाशी नाते मानले जाते. सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी लक्ष्मी घरात येते व त्याचवेळी दारिद्र्याची देवता घरातून निघुन जाते अशी श्रद्धा आहे. यासाठीच घराघरात देवापाशी दिवा लावून शुभंकरोति, परवचा म्हणायची पद्धत होती. दिवस मावळतीकडे जातोय आणि रात्रीचा उदय होत असताना, या संधिकालात परमेश्वराचे नाव घेतले तर मनःस्थिती उत्तम राहण्यास मदत होते. मन प्रसन्न असेल तर स्वाभाविक जगही प्रसन्न असते, नाही का?
पूर्वी मुलाला कुळदीपक किंवा वंशाचा दिवा असे संबोधले जायचे किंवा रागाच्या भरात ‘किती दिवे लावलेस ते माहीत आहे’ असेही बोलले जात असे. अर्थात या बोलण्यातील मर्म असे आहे की मुलगा मुलगी कोणीही असो, त्याने घराण्याचे नाव आपल्या शुद्ध आचरणाने आणि कर्तृत्वाने उज्ज्वल करावे. *’उजेडात होते पुण्य, अंधारात पाप’ असे एक गीत आहे. मनुष्याने नेहमी उजेडातील कर्म करावीत असे ही दीप अमावस्या आपल्याला सुचविते असे म्हटले तर वावगे होणार नाही. *
भारतातील अनेक भागांमध्ये मोठमोठ्या गुहांमध्ये सुंदर चित्रकारी, नक्षीकाम पाहावयास मिळते. हे काम दिव्याशिवाय करणे शक्य नव्हते. भारतामध्ये दिव्याचा इतिहास खूप प्राचीन आहे. अग्नीचे प्राचीन काळापासून धर्मकर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. वेदांमध्ये अग्नीला देवतास्वरूप मानण्यात आले आहे. यामुळेच हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यापूर्वी देवासमोर दिवा लावला जातो. त्यामुळे वातावरण प्रसन्न होते. दिवा ज्ञान आणि प्रकाशाचे प्रतिक आहे. पूजेमध्ये दिव्याचे विशेष महत्त्व आहे. सामान्यतः विषम संख्येत दिवा प्रज्वलित करण्याची परंपरा आहे. दीप लावण्यामागचे कारण म्हणजे, आपण अज्ञानाचा अंधकार दूर करून जीवनात ज्ञानाच्या प्रकाशासाठी पुरुषार्थ करावा. हिंदू धर्मशास्त्रानुसार पूजा करताना दिवा लावणे अनिवार्य आहे. गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने घरामध्ये सुख-समृद्धी येते. घरामध्ये स्थायी लक्ष्मीचा वास राहतो. गायीच्या तुपामध्ये रोगराई पसरवणारे सूक्ष्म किटाणू मारण्याची क्षमता असते. तूप जेव्हा दिव्यामध्ये अग्नीच्या संपर्कात येते तेव्हा वातावरण पवित्र आणि शुद्ध होते. यामुळे प्रदूषण दूर होते. गायीच्या तुपाचा दिवा लावल्याने याचा संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना फायदा होतो. ‘दीप प्रज्वलन’ हा घराला प्रदूषण मुक्त करण्याचा एक प्राचीन आणि प्रभावी उपाय आहे.
दिवा लावतानाचा मंत्र:-
“दीपज्योति:परं ब्रह्म
दीपज्योति: जनार्दन:।
दीपो हरति मे पापं
संध्यादीप! नमोऽस्तु ते।।”
दिवा लावण्याचे नियम: –
दिव्याची वात पूर्व दिशेकडे असल्यास आयुष्य वाढते.
दिव्याची वात पश्चिम दिशेकडे असल्यास दुःख वाढते.
दिव्याची वात उत्तर दिशेकडे असल्यास धनलाभ होतो.
दिव्याची वात चुकूनही दक्षिण दिशेकडे करू नये. यामुळे धन आणि जीवित हानी होऊ शकते.
दीप प्रज्वलन करण्यापूर्वी दीपाखाली अक्षता का ठेवाव्यात?
अक्षतांमध्ये असलेल्या पृथ्वी आणि आप तत्वाच्या कणांच्या प्राबल्यामुळे दीपाकडून प्रक्षेपित होणाऱ्या लहरी ग्रहण केल्या जातात अन् आवश्यकतेनुसार आपकणांच्या प्राबल्यावर त्या प्रवाही बनवून वातावरणात भूमीच्या दिशेने प्रक्षेपित केल्या जातात. या लहरी अधोगामी असल्याने त्यांची ओढ भूमीकडे असते, तर दीपातून प्रक्षेपित होणाऱ्या लहरींची ओढ आकाशाच्या दिशेने असते; कारण त्या ऊर्ध्वगामी दिशेने संचार करत असतात. अशा प्रकारे कार्यस्थळी दीपाच्या माध्यमातून वातावरणाच्या वरील पट्ट्यात सूक्ष्म-छत, तर अक्षतांच्या माध्यमातून भूमीवर सूक्ष्म-आच्छादन निर्माण होण्यास साहाय्य झाल्याने कालांतराने त्याचे रूपांतर घुमटाकार संरक्षक-कवचात होत असते.
आषाढ महिना संपल्या नंतर श्रावण येतो आणि नंतर भाद्रपद या महिन्यामध्ये मद्यपान व मांसाहार वर्ज्य मानला जातो. म्हणून यादिवशी काही लोकं अति प्रमाणात मांसाहार करतात. आज समाजात ही अमावस्या आज जरा ‘वेगळ्या’ कारणांसाठी प्रसिद्ध झालेली आहे. आज कोकणात तरी ती ‘गटारी अमावस्या’ म्हणून जास्त प्रसिद्ध आहे. सणांचे इतके विडंबन फक्त हिंदू धर्मातच होऊ शकते आणि ते फक्त ‘हिंदूच’ करु शकतात, यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते. धर्मांध असू नये याबाबत सर्वांचे एकमत होऊ शकेल पण धर्माभिमानीही असू नये हा दैवदुर्विलास नव्हे काय? आज आपल्या परंपरा, सण, व्रतवैकल्ये पुन्हा एकदा डोळसपणे समजून घेण्याची आणि समजून देण्याची नितांत गरज आहे अन्यथा पुढील पिढीला आपल्या विज्ञानाधिष्ठित संस्कृतीची माहिती होणार नाही.
उगवत्या सूर्याची पूजा करणारे आपण हिंदू लोकं आहोत. आपल्या परंपरा, आचारविचार ह्या उजळवलेल्या दिव्यांच्या ज्योतीवर धरुन ‘पारखून’ घेऊ आणि तसे आचरण करण्याचा प्रयत्न करुया. प्रत्येक घरात जर असे ‘ज्ञानदीप’ लावले गेले तर आपला देश नक्कीच उजळून निघेल आणि त्या प्रकाशाने साऱ्या जगाचे डोळे दिपतील यात शंका नाही.
☆ “छोट्या रेषा मोठ्या रेषा”☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
आमच्या घरचं वातावरण अस्सल मराठी. आधीच्या पिढ्या मराठी शाळेत, मराठी माध्यमातूनच शिकल्या. आम्हीही मराठी माध्यमातूनच शिकलो. पुढची पिढी सुद्धा मराठी माध्यमातूनच शिकतेय. तीही अगदी अभिमानानं.. घरात भरपूर मराठी पुस्तकं, आजही आकाशवाणीचं नित्य श्रवण, मराठी सणवार मराठी पद्धतीनंच साजरे होणारं आमचं घर. घरातले सगळे व्यवहारासाठी उत्तम हिंदी आणि इंग्रजी बोलत, वाचत, लिहित असले तरीही प्रेम मात्र मराठीवरच. हरिवंशराय बच्चन, कवी प्रदीप, नरेंद्र शर्मा, मैथिलीशरण गुप्त, मुन्शी प्रेमचंद यांचं साहित्य आम्हाला सगळ्यांनाच प्रिय असलं तरीही कुसुमाग्रज, वसंत बापट, विंदा, शांताबाई, शन्ना, भा. रा. भागवत, गोनिदा, पुलं यांच्यावर आमचा लोभ अधिक.. ! शेवटी तुमची नाळ जिथं, तुमचं आंतरिक प्रेमही तिथंच.. !
माझा मुलगा लहान होता तेव्हा, मराठी भाषेतली कार्टून्स मिळतात का, ते शोधत होतो. ॲनिमेटेड गाणी मिळाली, गोष्टी मिळाल्या, पण खास मराठी कार्टून मिळालंच नाही. अगदी लहान मुलं सुद्धा हिंदी कार्टून्स पाहतात, हिंदी गाणी ऐकतात. त्यांच्याशी नुसत्या गप्पा मारल्या किंवा त्यांच्या एकमेकांशी चाललेल्या गप्पा ऐकल्या की, त्यात मराठी, हिंदी, इंग्लिश, मिंग्लिश, हिंग्लिश अशा अनेक प्रकारची शब्दसंपदा सापडेल. आता मुलांना शाळेत “मधली सुटी” नसते, “ब्रेक” असतो किंवा “रिसेस” असते. “कवायत” नसते, “पिटी” असते. “पाढे” नसतात, “टेबल्स” असतात. “शाळेचा डबा” नसतो, “टिफीन किंवा लंचबॉक्स” असतो. “निकालाचा दिवस” नसतो, “ओपन डे” असतो. “पालकसभा” नसते, “पीटीएम” असते. वर्गात “बाई” शिकवत नाहीत, “टीचर किंवा मिस” शिकवतात. “पाठ्यपुस्तक” नसतं, “टेक्स्ट” असतं. “गृहपाठ” नसतो, “होमवर्क” असतो. “शिकवणी” नसते, “कोचिंग क्लास किंवा ट्युशन” असते. शाळेत “असेम्ब्ली” असते, त्यात “प्रेअर” असते. इतकंच काय, ती खेळायला जात नाहीत, ग्राउंड ला जातात. त्यांना “कंटाळा” येत नाही, त्यांना “बोअर” होतं.
आजकाल लोक “भेळवाल्याकडे” जात नाहीत, तो “चाट वाला” असतो. “मधल्या वेळचं खाणं” नसतं, त्याला “टी टाईम स्नॅक्स” म्हणतात. “शेंगदाण्याची चिक्की” नसते, तिला “न्यूट्री बार” म्हणतात. “धिरडं” म्हणायचं नाही, त्याला “चिला” म्हणायचं. “फोडणी” म्हणायचं नाही, “तडका” म्हणायचं. “गोंदवण” म्हणायचं नाही, “टॅटू” म्हणायचं.
सर्दी-पडसं झाल्यावर “वाफ” घेत नाहीत, “स्टीम” घेतात. हॉटेलात गेल्यावर तर विचारूच नका. “थंड पाणी” मागत नाहीत, “चिल्ड वॉटर” लागतं. “मेन्यू कार्ड” मागतात, “सूप वन बाय टू” सांगतात, “भाजी” ऐवजी “सब्जी” मागतात, “भाकरी” मागवत नाहीत, “जोवार रोटी” मागवतात. शेवटी “फिंगर बाऊल” आहेच. “पोट तुडुंब भरलं” म्हणत नाहीत, “बल्की झालं” असं म्हणतात.
“खरेदी” नसते, तिला “शॉपिंग” म्हणतात. “वाण्याचं दुकान” नसतं, “सुपर मार्केट” असतं. “इस्त्रीवाला” नसतो, “लॉन्ड्रीवाला” असतो. “औषधाचं दुकान” नसतं, “मेडिकल स्टोअर” असतं. “कपड्यांचं दुकान” नसतं, “शोरुम” असतं. गणपतीची वर्गणी नसते, डोनेशन असतं. शाळांमध्ये “आषाढीची दिंडी” नसते, “आषाढी सेलिब्रेशन” असतं. गणपती फेस्टीव्हल असतो.
“साखरपुडा” नसतो, “रिंग सेरेमनी” असतो. “प्री वेडिंग शूट” असतं. “पंगत” नसते, “बुफे” असतो. जेवणात “दहीभात” नसतो, “कर्ड राईस” असतो. “जीरा राईस – दाल तडका” असतो. “भजी” नसतात, “पकोडे” असतात. व्हेज भूना, मसाला बेंगन, व्हेज अद्रकी, व्हेज मराठा, व्हेज दिलबहार, नर्गिसी कोफ्ता असली नावं असतात. मराठी लग्नात मराठी गोड पदार्थ नसतातच, बंगाली स्वीट असतं.
आता तर “उपवासाचा फराळी चिवडा” म्हणणंसुद्धा संपलंय, “फलाहारी चिवडा” असं म्हणायचं म्हणे. “शेवपुरी दहीपुरी” नं तर त्यांचं इंग्रजी नामांतर केव्हाच स्वीकारलं आहे, त्या स्वतःला “एस्पीडिपी” असं मोठ्या झोकात म्हणवून घेतात. पाणीपुरी खाल्ल्यावर लोक ‘सुखी पुरी’ मागतात. मराठी पाणीपुरी वाल्याला सुद्धा “थोडा प्याज देना और तिखा पुरी बनाना भैय्या” असं म्हणतात.
आकाशवाणी आणि दूरदर्शन सोडलं तर शुद्ध मराठी भाषा माध्यमं सुद्धा वापरत नाहीत. एफ एम चॅनल्स चं मराठी तर अगाध असतं. बाकी ‘तो व्यक्ती, तो पेन, ती बुक’ हे तर ऐकून ऐकून कान किटले. “मिळालं, सापडलं आणि भेटलं” यांच्या वापराचा घोळ तर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. पत्ता भेटला, मोबाईल भेटला, मार्क भेटले, जागा भेटली, तिकीट भेटलं, मार्कलिस्ट भेटली, निकाल भेटला, जेवण भेटलं, पाणी भेटलं, नाश्ता भेटला, कपडे भेटले, पार्सल भेटलं, कुरिअर भेटलं… औषध भेटतं, कॅब भेटते, ऍडमिशन भेटते.. पासवर्ड भेटतो, पैसे भेटतात, कर्ज भेटतं.. देवा रे देवा… !
आमच्याकडचे सणसुद्धा आता मराठीपण सोडून पल्याड निघालेत. अगदी गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा जेवणात पनीर? लग्नात सुद्धा नवरदेव मराठी पोशाख करत नाही. शेरवानी, जोधपुरीची चलती.. आता मराठी लग्नात पाठवणी होत नाही, बिदाई होते. राखीपौर्णिमेला राख्या सुद्धा डोरेमॉन, मिकी माऊस, टॉम अँड जेरी च्या मिळतात. पण पांडुरंगाची राखी मिळत नाही, शिवाजी महाराजांची राखी मिळत नाही, भगव्या झेंड्याची राखी मिळत नाही. महाराष्ट्रातल्या शाळेत आता हरतालिका, भोंडला, श्रावण शुक्रवार, पिठोरी अमावस्येचा मातृदिन होत नाही. पण ख्रिसमस होतो. गणपतीला पाच दिवस सुट्टी मिळत नाही, पण ख्रिसमसला पाच दिवस सुट्टी मिळते.
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ आजही लाखो मराठी घरातून पाहिला जातो. मराठी बिग बॉस किंवा कॉमेडी शो यांनी मराठीची शोभा वाढवली आहे की हसं केलं आहे? ‘नक्षत्रांचे देणे’ सारखा दर्जेदार मराठी कार्यक्रम पुन्हा का होत नाही? मराठी वाहिन्यांवर ‘संतवाणी’ का लागत नाही? सह्याद्री वाहिनी वर पूर्वी संध्याकाळी प्रक्षेपण सुरु होताना संतवाणी लागत असे. मराठी वृत्तनिवेदक शुद्ध मराठीत बातम्या देत असत. एखादा शब्द चुकला तरी त्याक्षणी ‘माफ करा’ असं म्हणत. आता मराठी महिन्यांवर मराठीचाच आग्रह धरणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ‘सावरकर नायक की खलनायक?’ असे कार्यक्रम मराठी संपादकच करतात. नाना पाटेकरांसारखा एखादा अपवाद वगळता, एकही तरुण मराठी सेलिब्रिटी अस्खलित मराठीत मिडियाशी बोलत नाही. दर वाक्यात भरमसाठ इंग्रजी शब्द.. ! कुठल्याही मराठी चित्रपट सोहळा किंवा मराठी वाहिन्यांचे पुरस्कार सोहळे पहा. कितीजण अस्सल मराठी पोशाखात पुरस्कार स्वीकारतात त्याचं निरीक्षण करा. तुम्हाला उत्तर मिळेल.. !
अहो, उन्हाळ्यात आंब्याची खोकी सुद्धा इंग्रजी भाषेतली असतात. व्यापारी मराठी अन् मालाची खोकी मात्र इंग्रजी.. चितळे बंधूंची बाकरवडी इंग्रजी भाषेतल्या वेष्टणात मिळते. मॅगीचं पॅकिंग आजही इंग्रजीच आहे. त्यावर मराठी भाषा कुठंय? हल्दीराम चं उत्पादन महाराष्ट्रातच होतं, पण पॅकिंग मात्र पूर्ण इंग्रजी भाषेतच.. !
मराठी सिनेमे, मराठी जाहिराती, मराठी मालिका, मराठी अपार्टमेंट्सची नावं सगळीकडं मराठीचा लोपच दिसेल. “वरण भात लोनच्या अन् कोण नाही कोनच्या” असला मराठी चित्रपट करणाऱ्या मराठी माणसाला मराठी भाषा, मराठी संस्कृती याविषयी एक शब्द तरी बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? हे सगळं शांतपणे, साकल्याने पाहिलं म्हणजे, आपल्या जीवनशैलीतलं मराठीपण हळूहळू कसं, कुठं आणि कुणामुळं सुटत चाललं आहे, हे लक्षात येईल.
मराठी टिकवायची असेल, जोपासायची असेल, समृद्ध करायची असेल तर, मराठीतून विचार करायला शिकवलं पाहिजे. मराठी वाचन वाढवलं पाहिजे. एकमेकांशी मराठीत बोललं पाहिजे. अभ्यासक्रमात हिंदी असो, इंग्रजी असो किंवा अन्य भाषा असो, कितीही पुस्तकी शिकवलं तरी कुठलीच भाषा मातृभाषेची जागा घेऊ शकणार नाही, हे त्रिवार सत्य आहे.
स्व. लता मंगेशकरांच्या सुरुवातीच्या काळातली आठवण आहे. त्यांचं गाणं ऐकल्यावर अभिनेते दिलीपकुमार असं म्हणाले होते की, “इस की आवाज से मराठी दाल भात की बू आती है”. लतादीदींनी त्यानंतर हिंदी उच्चारणात इतकं नैपुण्य प्राप्त केलं की, अख्खी हिंदी चित्रपटसृष्टी त्यांच्या आवाजापुढं नतमस्तक होऊन उभी होती. भाषा आत्मसात करायची असते ती अशी.. !
हिंदी भाषेच्या सक्तीमुळे जर मुलं मराठीचा संस्कार विसरणार असतील, तर मग पहिलीपासून इंग्रजीची सक्ती का केली आहे? की, हिंदीसाठी आणि इंग्रजीसाठी वेगवेगळा न्याय आहे? पहिलीपासून इंग्रजीची सक्ती केल्यामुळे मुलं मराठीचा संस्कार विसरणार नाहीत का? जेव्हा मराठी मुलं फास्टर फेणे वाचण्याऐवजी हॅरी पॉटर वाचतात, तेव्हा मराठीचा संस्कार पुसट व्हायला सुरुवात होते. रस्त्यावर, चौकात बाईक आडवी लावून त्यावर केक ठेवून वाढदिवस साजरा होताना इंग्रजी शुभेच्छा दिल्या जातात, तेंव्हा मराठीचा संस्कार पुसट होतो. मराठी माणसं दारात रांगोळी काढण्याऐवजी रांगोळीचं स्टिकर लावतात, रेडीमेड गुढीचं वस्त्र, नाडीचं किंवा इलास्टिकचं सोवळं, रेडीमेड नऊवारी साडी विकत आणतात, तेव्हा तिचं वरवरचं रुप जरी सोयशास्त्राचं असलं तरीही वास्तव मात्र मराठीपण न शिकल्याचंच असतं. गणपती उत्सवात आरती सुद्धा रेडीमेड म्युझिक सिस्टिमवर लावतात, दसऱ्याची पाटीपूजा विसरतात, ऐन दिवाळीत घराला कुलूपं लावून ट्रिपला जातात, घरातली संध्याकाळची शुभंकरोती बंद होते, तेंव्हा मराठीचा संस्कार पुसट व्हायला लागतो. पिठलं भाकरी खाण्यासाठी जेंव्हा हॉटेल गाठायला लागतं, तेव्हा मराठीचा संस्कार पुसट व्हायला लागतो.
ज्या दिवशी आपण सगळी मराठी माणसं फोनवर बोलताना हॅलो ऐवजी राम राम किंवा नमस्कार म्हणायला लागू, आपला वाढदिवस तिथीनुसार साजरा करायला लागू, घरांची दारं उघडी ठेवायला लागू, घराघरात ज्ञानोबा तुकोबांचे अभंग ऐकले- म्हटले जातील, नित्य हरिपाठ होईल, सणावाराला अकरा अकरा आरत्या अख्खं कुटुंब एका सुरात म्हणेल, जेवणाची सुरुवात “वदनी कवळ घेतां” म्हणून होईल, शुभकार्याच्या पत्रिका फक्त मराठी भाषेतूनच छापल्या जातील, तेंव्हा मराठी पुन्हा रुजायला लागेल, तिला नव्यानं पालवी फुटेल.
मराठी घरांमधल्या ज्येष्ठ नागरिकांनी स्वतः हरी तात्या, चितळे मास्तर व्हायला सुरुवात केली की, त्रिभाषा सूत्र असो किंवा बहुभाषा सूत्र, मराठी तिच्या स्थानी अढळ राहील. “ये रे पावसा” पासून ते मोरोपंतांच्या आर्यांपर्यंत मुलांपर्यंत प्रत्यक्ष शिक्षकांच्या, पालकांच्या मुखातून पोचेल, तेंव्हा मराठी टिकेल. मराठी कुमार साहित्य अधिकाधिक निर्माण होईल, तेव्हा मराठीचा पाया सिंधुदुर्गासारखा भक्कम होईल. मराठी कुटुंबं अडलॅब्स इमॅजिका ऐवजी शिवसृष्टी, झपूर्झा पहायला जातील, तेव्हा मराठीचा संस्कार ठळक होईल.
जेंव्हा आपल्याला आपलं स्वत्त्व, तत्त्व आणि सत्व टिकवायचं असतं ना, तेंव्हा स्वतःच्या रेषा ठळक करायच्या असतात, मोठ्या करायच्या असतात. दुसऱ्यांच्या रेषा खोडत बसायच्या नसतात. आपली रेषा मोठी करण्याचं तंत्र आणि मंत्र आपल्याला उमगलं असेल तर चिंतेचं कारणच काय?
अनेक जणांचे गुरुबाबतचे अनुभव ऐकताना, वाचताना गुरुबद्दल एक वेगळीच प्रतिमा माझ्या मनात तयार झाली. ती मांडण्याचा हा प्रयत्न.
विश्वामध्ये जन्माला आल्यानंतर मी कोण, माझे उद्दिष्ट काय, माझ्या आजूबाजूचं जग कसं आहे, ते असं का आहे, ते तसं का नाही असे अनेक प्रश्न प्रत्येक मनुष्य जीवाला पडतात. कारण त्याच्याजवळ ‘विचार’ ही एक वेगळी शक्ती आहे. या प्रश्नांची उत्तरे शोधताना गरज असते ती ‘गुरु’ची. मग आता गुरु कोण? तो कसा शोधावा? याबाबत जीवाची धडपड सुरू होते.
या धडपडीत जाणवलं ते म्हणजे गुरु शोधण्याचा हा प्रवास हीच खरी मज्जा आहे म्हणजे आनंद या अर्थाने. कारण या प्रवासात गुरुपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःला जाणून घेण्याचं, शोधण्याचं कामच आपल्याला करावं लागतं. म्हणजेच स्वतःवर काम केल्याशिवाय गुरु मिळत नाही. आणि आपण अगदीच कोरडे राहून त्याच्यापुढे गेलो तर लाभत नाही.
हे काम करताना आपण जगत असलेल्या आणि आपल्या जगण्यात अभाव आहे, असं वाटत असलेल्या गोष्टींच्या मूल्याची जाणीव होते. थोडक्यात आपले ज्ञानचक्षु जागृत होतात. आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीची जाणीव होणं, त्याचं मूल्य समजणं, एखाद्या गोष्टीतला नको असलेला भाग काढून टाकता येणं म्हणजेच एक प्रकारचं ज्ञान मिळवणं आहे. ही जाणीव या प्रवासात निर्माण होणं आणि त्यातून प्रेरित होऊन असे ज्ञानाचे कण कण गोळा करायला आपण प्रवृत्त होणं ही गुरूच्या जवळ जाण्याची पहिली पायरी असावी असं मला वाटतं.
ज्ञानचक्षुंच्या जागृतीमुळे हा प्रवास सातत्याने, विश्वासाने करत राहिल्यावर आपल्याकडे असे छोटे छोटे ज्ञान बिंदू जमा होत जात असतील. आणि समान गोष्टी एकमेकांना आकर्षित करत राहतात या न्यायाने आपण हळूहळू गुरुच्या जवळ जाण्याच्या मार्गावर राहातं असू. हा प्रवास दिर्घपल्ल्याचा आहे. त्यामुळे त्यावर असणारे अनेक मोह हेच खाचखळगे आहेत. याच घसरत्या वाटा आहेत. पण त्या वेळेला गुरुचा सूक्ष्म अंश आपल्याला मार्गदर्शन करतो आणि तो सूक्ष्म अंश म्हणजे आपलं अंतर्मन. हे अंतर्मन आपल्याला सूचना देऊन पुन्हा आपल्या मूळ मार्गाकडे मार्गस्थ करत राहतं. अनेक अडचणीच्या प्रसंगी पहा आपल्या अंतर्मनाला अनेक धोक्याच्या सूचना मिळालेल्या असतात किंवा अचानक समस्येवर उत्तर सापडलेल असतं तेव्हा हे अंतर्मनच आपल्या मदतीला धावून आलेलं दिसतं. तर हे अंतर्मन म्हणजे गुरुचा सूक्ष्म कण आपल्या मदतीसाठी आपल्याबरोबर आलेला आहे.
असा प्रवास करत जेव्हा प्रत्यक्षात गुरु भेटतो तेव्हा नक्की काय घडत असेल? मला वाटतं जर ज्ञान ही गोष्ट गुरु स्वरूपात मानली, तर ज्ञानाच्या मोठ्या साठ्यात ज्ञानाचे असे छोटे छोटे ओहोळ येऊन मिसळले तर जे काय होईल ते घडत असेल. ज्ञान ज्ञानात मिसळून जात असेल. आणि प्रत्येक प्रश्नाला उत्तरं असतातच आणि प्रश्न म्हणजे न संपणारी समस्या नसून उत्तरांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग असतो ही शहाणीव निर्माण होत असेल.
असा गुरुचा शोध घेण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न कळतनकळत चालू असतो. तो सफल व्हावा आणि प्रत्येकाला गुरु मिळावा याच गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छा!