मराठी साहित्य – विविधा ☆ आगे आगे होता है क्या… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ आगे आगे होता है क्या… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

जगाच्या पसरलेल्या प्रचंड पसा-यात आपल्या संसाराचं बस्तान सुरळीत बसवून ते निटनेटकेपणे टिकवून ठेवण्यासाठी आपल्या वकुबानुसार कुठलतरी कर्म आपल्याला स्वीकारणं भागच पडतं. मग ते आवडीच असो नहीतर नावडत असो. शकारण बुडत्याला कडीचाआधार असल्या शिवाय हा दुस्तर भवसागर तरून पारकरण शक्य होत नाही. इथे उतू नको मातू नको घेतलावसा टाकू नको असे आवर्जून सांगणारे मात्तबर अनुभवी खूप मार्गदर्शक भेटतात आपला अनुमभव ते सांगतात. त्यांच्या त्या प्रभावशाली तार्किक विचाराने प्रभावित होण्याशिवाय आपल्या पुढे कोणताच विकल्प नसतो. आपण या सांसारिक संघर्षात नव्यानेच पदार्पण करणारे नवयुवक असतो. आपल्याला कुठलेतरी कर्म स्वीकारावेच लागते. मग पुढे ते स्विकृत कर्म आपला धर्म मानून जन्मभर जपाव लागते तेव्हा कुठेआपल्या जन्माचे सार्थक झाले असे लोक समुहाकडून आपल्याला ऐकायला मिळते. कर्म नाही जपलं तर करंटेपणा पदरी पडतो.

स्वीकारलेल्या कर्माच्या मार्गावर सुसाट वेगाने धावताना कुठल्यातरी सुविचाराच्या थांबल्यावर अंमळ विश्रांती घेवून पुन्हा नव्या दमाने कर्माला भिडल्यावर यश पदरी पडतं यात शंका नाही.

मग आपणास गीतेत महत्त्वाचा म्हणून विवरणकेलेला निष्कामकर्मयोग आठवतो, फळाची इच्छा न बाळगता कर्म करत राहिल्याने यश, किर्ती, संपदा आपल्याकडे चिरंतन वास्तव्याला येतत. सूख आपल्या पायाशी लोळण घेते आणि अंत्यंत महत्त्वाच म्हणजे आपल्या कुळाचाही उद्धार होतो

आणि बनतो आपण दिगंत कीर्तीचे धनी. हे सगळं तत्वज्ञान मागच्या अनेक पिढ्यांनी स्वेच्छेने पाळलं म्हणून त्यांचा त्यांच्या पूर्वजांच्या सह इहलोकी लौकिक झाला. याचे अनेक पुरावे पूर्वजांनी पुराणात नोंदवून ठेवलेले आहेत. पण ते आज मितीला कितपत खरे ठरतील या बाबत मनात शंका निर्माण झाल्याशिवाय रहात नाही.

आजकाल काळ, माणूस, निसर्ग, व्यवहार, संस्कार संस्कृती संसार बदलला आहे. हा सगळा प्रकार आणि प्रताप माणसांनीच केला आहे या बाबत दूमत नाही. तो आता देव आहे की नाही इथपर्यंत बळावला आहे. म्हणूनच देवाविषयीचा माणसाच्या मनात असणारा धाक ही संपुष्टात आला आहे. त्या मुळेच माणूस स्वैराचारी व भोगवादी बनलाय. तो विवेकच विसरून गेलाय. पैसाच इथला देव बनलाय. माणूस त्यांच्या भोवती फिरू लागलाय. त्या देवानेच माणसाला आज कोणत्या स्थितीत आणून ठेवलं आहे ते अवलोकन करण्यातच खरी मजा आहे.

आपल्या जीवनातले माया, ममता लळा, जिव्हाळा, हे परवलीचे शब्दच परागंदा झालेत. जाताना त्यांनी माणुसकी ही गिळंकृत केलीय. मग माणुसकीने वागणारी माणसे कमी झालीत आणि माणसे पाशवीवृत्तीची बनलीत. त्यानी तर कमालच केली. सौख्य, स्वास्थ, शांतता, आध्यात्म, श्रद्धा, विश्वास, यांना कुठल्याकुठे पळवून लावलं त्यामुळे वरून झगमगीत दिसणार जगणं आतून भकास झालं. नैराश्याने ग्रासलं. माणसाचं भविष्य ही भयभीत झाल. लाचार झाल. ते एकाकीपणे चिंता करतय माणसांची, पण त्याच्या हातात तरी काय ठेवलय माणसांनी, कारण माणूस आज स्वतंत्र झालाय माणसावरच वर्चस्व गाजवायला‌. तिथे बिचार लाचार भविष्य तरी काय करणार, ? आता विज्ञानाचा व विकासाचा पराक्रम पहात बसण्याशिवाय माणूस दुसरं काय करू शकतो बरं? जुनं सोनं होतं असं म्हटलं तर काळही तुमच्या कानात हळूच सांगेल अभी रुको और देखो आगे आगे होता है क्या !

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ६२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ६२ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- उन्हाच्या कडाक्याने बळी घेतलेले ते दोन जीव आणि त्यांच्या अखेरच्या श्वासांचा मूक साक्षीदार असणारा मी…! तो पूर्ण दिवस मृत्यूच्या त्या काळ्या सावल्या मला अस्वस्थ करत राहिल्या. जगणं किती क्षणभंगूर असतं याचा तो ‘जीवघेेणा’ अनुभव यापुढे उगवणारा इथला प्रत्येक दिवस तिथं तग धरून रहाण्यासाठी मला कराव्या लागणाऱ्या जीवघेण्या संघर्षाचं सूतोवाचच करतोय असं तिथल्या संघर्षकाळात मला सतत जाणवत रहायचं! )

त्याचा प्रत्यय मला पुढे पावलोपावली येऊ लागला. इथे अकोल्याला येताना मी फक्त एका सुटकेसमधे माझे कपडे आणि रोज लागणाऱ्या वस्तूच घेऊन आलो होतो. पहिले दहा दिवस माझी व्यवस्था बँकेतर्फे लॉजवर झालेली होतीच. तेवढ्या अवधीत ब्रॅंचमधल्या रूटीनची आणि थकीत कर्ज खात्यांसंदर्भात मी तातडीने सुरू करणे आवश्यक असणाऱ्या कारवाईची जुजबी सुरुवात तरी झाली होती. सुदैवाने पहिल्याच दिवशी ब्रॅंचमधे भेटायला येऊन देशपांडेनी माझ्या रहाण्याचा प्रश्न सोडवला होता. त्यामुळे मी लॉज सोडून रेंटल फ्लॅटवर रहायला यायच्या दिवशीच मी आधीच देऊन ठेवलेल्या सूचनेनुसार अहमदनगरच्या सर्व स्टाफने माझं बाकी सगळं घरसामान व्यवस्थित पॅकिंग करून ट्रकमधून पाठवून दिलेलं होतं. त्याची उस्तवार लगेचच करणं मला शक्य नव्हतं म्हणून मी ती पॅकींग्ज् एका रूममधे तशीच रचून रूम बंद करून ठेवली. फ्लॅटमधली सगळी स्वच्छता फ्लॅट माझ्या ताब्यात देण्यापूर्वीच देशपांडेनी करून ठेवलेली होती. सर्वार्थाने प्रतिकूल परिस्थितीत नगरहून सामान आणणं असो किंवा भाड्याने सोयीची जागा मिळणं असो, ही दोन्ही कामे जी माझ्यासाठी एरवी जिकिरीची ठरली असती ती इतक्या सुरळीतपणे पार पडणे ही ‘त्या’चीच कृपा आहे हा विचार मनात आला आणि मी स्वस्थ झालो. ती स्वस्थताच पुढे येऊ लागलेल्या साध्या साध्या बाबींमधेही येत रहाणाऱ्या असंख्य अडचणींतून मार्ग काढायला मला सहाय्यभूत ठरली होती!

या साध्या साध्या बाबी अगदी दैनंदिन जीवनातल्या आवश्यक अशाच. खिशात पैसे आहेत म्हणजे त्या मिळणारच असं आपण गृहीतच धरत असतो अशाच. आपल्या आवश्यक आणि अपरिहार्य गरजेच्याच. त्या मिळाल्या नाहीत तर आपण तगही धरू शकणार नाही इतक्या अत्यावश्यक! त्यातही अतिशय महत्त्वाच्या म्हणजे भुकेच्या वेळेला पोटभर चांगलं जेवण आणि थकून भागून अंथरूणाला पाठ टेकली की आवश्यक असणारी शांत झोप! मी फ्लॅटमधे रहायला आलो आणि तेव्हापासून नेमक्या याच दोन गोष्टींना महाग झालो!!  

तोपर्यंतचं माझं बँकिंग क्षेत्रातलं अठ्ठावीस वर्षांचं करियर किती सुरळीत आणि सरळरेषेत गेलेलं होतं हे इथल्या परिस्थितीला सामोरं जाताना मला नव्याने जाणवू लागलं. रात्रीची शांत झोप, पहाटेचं नियमित फिरणं आणि व्यायाम, रोजची पूजा हे सगळं तेव्हा विनासायास सुरू असायचं. माझं आवरण्यापूर्वीच जेवणाचं ताट घेऊन ठेवलेलं असे आणि मी पानावर बसताच पानात वाढला जाणारा वाफाळलेला भात! खरंतर या सगळ्या किती साध्या गोष्टी, पण त्याच इथे आयुष्यांत प्रथमच हातून निसटून गेल्या आणि त्या साध्या साध्या गोष्टीत लपलेला आनंद आणि समाधान किती मोलाचं होतं हे मला खऱ्या अर्थाने समजलं. त्या तुलनेतलं इथलं माझं आत्ताचं रुटीन तेव्हाचं ते स्वास्थ्य, समाधान, निश्चिंतता देणारं नव्हतंच. खिशात पैसे असूनही दोन वेळेला साधं पोटभर जेवण मिळणंही किती दूरापास्त असू शकतं याचा तो विलक्षण त्रासदायक अनुभव मी प्रथमच घेत होतो! निमित्त झालं ते फ्लॅटमधे रहायला आलो त्या पहिल्या दिवशी एका चांगल्या घरगुती खानावळीमधे मी जेवायला गेलो त्याचं. तिथं सुग्रास जेवणाची अपेक्षा नव्हतीच. तरीही दोन घास कसेबसे खाऊन मला नाईलाजाने उपाशीपोटीच पानावरून उठावं लागलं होतं. कारण भाजी, आमटी, चटणी, कोशिंबीर सगळंच इतकं तिखट आणि जळजळीत होतं कीं त्या पहिल्या दोन घासातच तोंड अक्षरशः पोळून निघालं. लॉजवर होतो तिथल्या रेस्टॉरंटमधेही हीच परिस्थिती असली तरी तिथे इतर पर्याय उपलब्ध होते. इथं आता रोजचं हे निभवायचं कसं हाच प्रश्न. त्यादिवशी मी बँकेत गेलो ते घरून निघताना दोन भांडी पाणी पिऊन आणि जाताना थोडी फळे विकत घेऊन. त्यानंतरचे दोन-तीन दिवस दोन्ही वेळेला नुसता ताक-भात आणि भूक लागेल तेव्हा मिळतील ती फळं खाऊन मी कसेतरी ओढून काढले. त्याकाळी मोबाईल नव्हते. एक-दोन दिवसाआड रात्री टेलिफोन बूथवर जाऊन घरी मी आठवड्यातून किमान दोन दिवसतरी लँडलाईनवर फोन करायचा असं ठरलं होतं आणि फोन करायचे वार आणि वेळही ठरवून ठेवलेली होती. नेमक्या त्यावेळी सगळं आवरून आरती, सलिल माझ्या फोनची वाट पहात असायचे. इथला कडक उन्हाळा, जेवणाखाण्याची सोय या सगळ्याबद्दल आरती सुरूवातीला खूप काळजीने विचारायची, पण ‘सगळं व्यवस्थित आहे, फारसं त्रासदायक कांही नाही’ असं मोकळेपणाने हसत सांगून मी वेळ मारून न्यायचो. इथल्या न बदलू शकणाऱ्या गोष्टींचे दडपण आणि काळजी तिला सांगून माझा त्रास कमी होणार नव्हताच, उलट त्या दोघांचा जीव तिकडं टांगणीला लागला असता असा विचार मी केलाच शिवाय आता आपणही इथं हतबल न होता सगळं मनापासून स्विकारायचं आणि हसून साजरं करायचं असं मी स्वत:पुरतं ठरवूनच टाकलं. ते निभावणं ही माझी मला स्वतःलाच घ्यावी लागणारी परीक्षाच होती जशीकांही. मुख्य प्रश्न होता रोजच्या दोन वेळच्या जेवणाखाण्याचा. मला अहमदनगरहून आलेल्या माझ्या घरसामानाच्या एका खोलीत मी रचून ठेवलेल्या पॅकिंग्जची आठवण झाली आणि माझ्या अंधारून आलेल्या मनात एक आशेचा किरण चमकून गेला. मी तत्परतेने त्या खोलीकडे धाव घेतली. अहमदनगरला असताना मे आणि दिवाळीच्या सुट्टीत आरती आणि सलिल तिथे रहायला यायचे. कधी वाटलं तर घरी ऐनवेळी कांहीतरी करता यावं म्हणून आम्ही मुद्दाम एक गॅसची सिंगल शेगडी आणि अगदी आवश्यक तेवढी मोजकी भांडीकु़ंडी खरेदी केली होती. इथं तेच सगळं माझ्यासाठी एक वरदानच ठरलं होतं! एकदाही आजारी पडायचं नसेल, ‘बँकेतल्या कामाकडं कणभरही दुर्लक्ष होऊन द्यायचं नसेल तर येईल तसं स्वतः रांधायचं आणि होईल ते होईल तसं खायचं. ‘ असं मी स्वत:लाच बजावलं आणि समोरची पॅकींग्ज खोलून सगळं सामान जागच्याजागी लावायला सुरूवात केली.

हे असं ठरवलं खरं पण ते निभावणं वाटतं तेवढं सोपं नव्हतं. सामान लावून होईपर्यंतच रात्रीचे नऊ वाजून गेले. त्या रात्री तरी फलाहाराशिवाय दुसरा पर्याय नव्हताच.

हे सगळं असं सविस्तर लिहितानाही आपण हे खरंच तेव्हा कसं निभावू शकलो याचं मलाच आश्चर्य वाटत रहातं.

हे सगळं मला सुसह्य व्हावं यासाठीच घडलेली असावी तशी ध्यानीमनी नसताना त्या रात्री मला दिलासा देणारी एक घटना घडली. तशी साधीच पण माझ्यादृष्टीने अतिशय महत्त्वाची!

देशपांडेंच्या त्या फ्लॅटमधे एक बैठं लाकडी देवघरही होतं जे त्या रात्री किचनमधे सामान लावताना मला अचानक प्रथमच लक्षात आलं. देशपांडेचं वास्तव्य सध्या पुण्यात असल्याने देवघरातले देव अर्थातच त्यांच्या पुण्यातल्या बि-हाडी गेलेले. मला ते रिकामं देवघर पाहून कसंतरीच वाटलं. उद्या दत्ताचा एखादा फोटो आणून इथं देवघरात ठेवायचा असंही मी मनोमन ठरवलं आणि त्यालाच पूरक ठरणारी अशी अनपेक्षितपणे घडली ती ही घटना! रात्री झोपण्यापूर्वी जास्तीच्या कपड्यांचं एक पॅकिंग आपण अजून उघडलेलं नाहीय हे माझ्या लक्षांत येताच मी ते उघडून त्यातले कपडे न् इतरही सामान आवरून ठेवायचं ठरवलं. त्यातले कपडे बाहेर काढताना नॅपकिनची एक घडी थोडी जड वाटली म्हणून मी ती घडी उघडून पाहिलं तर आत दत्ताची मूर्ती! ती व्यवस्थित रहावी म्हणून पॅकींग करताना ती अशी घट्ट गु़डाळून ठेवली होती. मी भान हरपून त्या मूर्तीकडे पहातच राहिलो. तळहाताएवढ्या उंचीची. अतिशय शांत, हसतमुख आणि प्रसन्न अशी ती दत्तमूर्ती! माझी इचलकरंजी ब्रॅंचहून ऑडिट डिपार्टमेंटला बदली झाल्यानंतर अचानक प्रवासाची तयारी करायला लागलो असताना एखादा चमत्कार घडावा तशी मला घरपोच मिळालेली तीच ही दत्ताची मूर्ती! ती मूर्ती मिळणं हा तेव्हा आणि आत्ता या रात्रीही एक शुभशकूनच वाटला मला! त्या मूर्तीशी लगडलेल्या कितीतरी जुन्या आठवणी त्या क्षणी माझ्या मनात उभारून वर आल्या आणि त्या आठवणींच्या स्पर्शानेच मनातला सगळा अंधार क्षणात विरून गेला!!  

क्रमश:…  (प्रत्येक गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “विचार…. सर्वांगीण विचाराचा” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “विचार…. सर्वांगीण विचाराचा☆ श्री जगदीश काबरे ☆

एखाद्या मुद्याचा सर्वांगीण विचार का करायचा? कारण एकांगी विचारानं जगताना दुसऱ्याला समजून घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे आपली समाजासोबत जगण्याची क्षमता कमी होते. एकांगी राहिलो तर एकसारखा विचार करणाऱ्यांचीच टोळी बनेल, मग दुसरा एकांगी विचार करणाऱ्यांची दुसरी टोळी बनेल, मग टोळी-टोळी खेळण्यातच वेळ जाईल. म्हणून सर्वांगीण विचार करायचा प्रयत्न करणारे लोक वाढतील तशी समाजाची समज वाढल्यानं एकूण सामाजिक आनंद-समाधान वाढेल.

म्हणून करायलाच हवा हा सर्वांगीण विचार! पण खरंच सर्वार्थानं येतो तरी का तो करता? नाहीच बहुधा. पण तसा प्रयत्न तर सतत सुरू ठेवायला हवा. कसा करायचा मग हा सर्वांगीण विचाराचा प्रयत्न? एक सर्वात सोपं उत्तर म्हणजे वेगवेगळ्या लोकांसोबत राहणं, त्यांची गोष्ट, त्यांचा प्रवास ऐकणं. त्यांचा धर्म, त्यांच्या चालीरीती, त्यांच्या श्रद्धा-अंधश्रद्धा यावर चर्चा करत राहणं. या सगळ्यांच्या एकमेकांना समजून घेण्यासाठी मदत करणाऱ्या असतात.

पण आपली सध्याची सामाजिक बांधणी अशी होत चालली आहे की डावे, उजवे, सोशलिस्ट, लिबरल, कम्युनिस्ट, गांधीवादी, हिंदुत्ववादी, ब्राह्मण, फेमिनिस्ट, सेक्सिस्ट, रेसिस्ट, कॅपिटलिस्ट… वगैरेंपैकी कुठलंतरी बिरुद चिकटवून आपलं आणि इतरांचं वर्गीकरण आणि त्यानुसार ध्रुवीकरण केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. लोकांचे जीवनप्रवास मनापासून ऐकून घेताना हे हमखास समजतं, की ह्यातली कितीतरी परस्परविरोधी बिरुदं आपल्यात गुण्यागोविंदानं नांदत असतात. मग टोळी-टोळीचा खेळ तितकासा सार्थक वाटत नाही. आपली कवाडं आणखीन उघडतात. समज वाढते.

बरेचदा असं होतं, की आपण अनेक गोष्टी करतो तेव्हा फारसा विचार न करता करतो… इतर सगळे करतात म्हणून लोक काय म्हणतील या भीतीपोटी देखादेखी करत असतो, आणि कळपात सुरक्षितता शोधत असतो. नंतर मागे वळून पाहताना त्यानुसार एक सुसंबद्ध वैचारिक मोट बांधली जाते. मग त्यात ठराविक वर्तुळातच आपण फिरत राहतो.

जेव्हा आपण सर्वांगाने विचार करू लागतो तेव्हा आपल्या लक्षात येते की, एकांगी विचारामुळे माणूस स्वतःला… स्वतःच्या धर्माला श्रेष्ठ आणि इतरांना कनिष्ठ सांगायला लागलेला असतो. खरे तर सगळ्याच समाजाप्रती आपल्या सगळ्यांचंच काही एक कर्तव्य असतं. आपण आपला खारीचा का होईना पण वाटा उचललाच पाहिजे. नाहीतर आयुष्य आपलं नुसतं जातच राहतं गळक्या मडक्यासारखं..

© श्री जगदीश काबरे

मो ९९२०१९७६८०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ छत्रपती शिवरायांना पत्र… ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆

श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

🌸 विविधा 🌸

☆ छत्रपती शिवरायांना पत्र… ☆ श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर ☆

दिनांक –          

राजे,

साष्टांग नमस्कार!

आज तुम्हाला माझ्या मनातील विचार सांगावेसे वाटते म्हणून हा पत्र प्रपंच करीत आहे. खरंतर राजे, तुमची आठवण ही पदोपदी येत असते. पण आज पत्रातून व्यक्त होण्याचे वेगळेच कारण आहे.

हिंदवी स्वराज्याची स्थापना एका उदात्त हेतूने करून तुम्ही महाराष्ट्राची अस्मिता जागृत केलीत. कित्येक वर्षे असलेल्या परकीय राजसत्तांच्या जुलमी जोखडातून जनतेला मुक्त करून त्यांच्यात ‘स्व’ ची जाणीव करून दिलीत. आपण जे आदर्श हिंदवी राष्ट्र निर्माण केलेत, ते टिकवण्याची, त्याचा लौकिक वाढवण्याची जबाबदारी खरं तर आम्हा सर्व नागरिकांची आहे.

पण राजे, आज समाजातील अनेक घटना या मन उद्विग्न करणाऱ्या आहेत. या गोष्टींवर कोणाचातरी वचक रहायला हवा. पण तसे होताना दिसत नाही. खरंतर आपली लोकशाही शासनव्यवस्था जगामध्ये श्रेष्ठ आहे. पण तरीसुद्धा यातील कायद्यांना अनेक पळवाटा असल्याने गुन्हेगारीवर हवा तसा अंकुश राहताना दिसत नाही. कित्येक वर्षे गुन्हेगार मोकाट फिरत असतात.

महाराज, आपली शासन व्यवस्था किती महान होती! आपण आपल्या उण्यापुऱ्या तीस वर्षात सार्वभौम सिंहासनाची स्थापना करून दाखवली. यावेळी अनेक संघर्ष आपल्याला करावे लागले. पण हा आपला संघर्ष कुण्या जातीशी वा धर्माशी नव्हताच मुळी! तो संघर्ष अन्यायाविरुद्ध होता. तो संघर्ष वाईट प्रथांविरुद्ध होता, झुंडशाहीविरुद्ध होता. पण खेदाने म्हणावेसे वाटते की आपले ते उदात्त विचार आज पायदळी तुडवले जात आहेत. आताच्या लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्रात जाती-जातीमध्ये भेदभाव केला जात आहे. धर्मावरून राजकारण केले जात आहे. लव जिहाद, धर्मांतरण यासारख्या घटनांमुळे आज समाज व्यवस्था पोखरून निघाली आहे. धर्मनिरपेक्ष देशात शुल्लक कारणांवरून धार्मिक तेढ निर्माण करून जाळपोळ, बंद, हिंसा इत्यादी गोष्टी केल्या जातात. यातून सामान्य माणूस हा पुरता हतबल होऊन जातो. कायदा सर्वांना समान असूनही राजकीय पुढा-यांच्या मतलबी राजकारणामुळे हा संघर्ष धुमसतच राहताना दिसतो. आपल्याच बांधवांमध्ये धार्मिक तेढ निर्माण केली जाते. म्हणूनच महाराज आज आपली खरी गरज आहे.

राजे, चारित्र्याशिवाय चरित्र निर्माण होत नसते. आपले चारित्र्य आपल्या व्यक्तिगत जीवनासह प्रशासकीय कारभारातून प्रकट झालेले आहे. आपण स्वराज्यासाठी शत्रूवर आक्रमण करत असताना आपल्या सैनिकांना परस्त्री बाबत, लेकी सुनांबाबत दिलेली ताकीद आज प्रकर्षाने जाणवत असते. ज्यावेळी तुमच्या सैनिकांनी एका परस्त्रीला लुटून आणले होते, त्यावेळी आपण म्हणाला होता, “अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती,……. ” केवढे आपले उदात्त विचार! आणखी एका प्रसंगात परस्त्रीला त्रास देणाऱ्या एका पाटलाला सुद्धा आपण जबर शासन करून आपला एक धाक निर्माण केला होता. पण महाराज आपण आपल्या वागण्यातून एवढा मोठा आदर्श ठेवूनही आज बदलापूर सारखी परिस्थिती का बरं निर्माण होते? आज कित्येक शहरांमध्ये स्त्रियांवर अत्याचार का बरे होताना दिसतात? त्यांना आपल्या सुरक्षेची चिंता का बरे वाटत राहते? वासनेच्या आहारी गेलेल्या नजरा आमच्या माता भगिनींवर ठिकठिकाणी रोखल्या जातात. खरंच महाराज, आज आपण असता तर अशा वासनांध नजरा किंवा बरबटलेले हात आपण नक्कीच छाटून टाकले असते. महाराज म्हणूनच मी तुम्हाला विनवतो, आपण परत या.

महाराज, आपण वतनदारी बंद केलीत. कारण सरदार, प्रशासक यांना कोणत्याही भ्रष्टाचारापासून दूर ठेवले जावे. आपण शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नव्हता. पण आज प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे. टक्केवारीची कीड समाज पोखरून टाकत आहे. प्रशासनातील अधिकारी असो अथवा राजकीय पुढारी असो प्रत्येक जण आपली खळगी भरण्यासाठी कोणत्याही थराला जात आहे.

राजे, या भ्रष्टाचारी व्यवस्थेतून आपणही सुटू शकला नाहीत. हे कशाचे द्योतक मानावे बरे? पुतळा दुर्घटनेने या गोष्टीचा साऱ्या जगाने अनुभव घेतला. आपल्या मूर्तीचा फक्त वापर केला जातो. पण आपली कीर्ती डोळ्यासमोर ठेवून लोक वागत नाही याचे फार दुःख वाटते.

महाराज, आपले कार्य हे प्रकृतीविरुद्ध विकृतीच्या संघर्षात प्रकृतीच्या पुनर्स्थापनेसाठी, स्वातंत्र्य व गुलामगीरीच्या संघर्षात स्वातंत्र्याचा उद्घोष करण्यासाठी व निरपेक्ष धर्मनिष्ठेचा आदर्श घालून देण्यासाठी होते. मग आपले चरीत्र वाचूनही आजचे राज्यकर्ते हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कधी बरं वागतील?

राजे, आज आपल्याशी पत्ररुपाने बोलून थोडं मन हलकं केलं. आपले विचार, आपले आदर्श समाजात रुजविण्यासाठी आपण आम्हाला आशीर्वाद द्या.

आपलाच,

एक शिवभक्त.

 

© श्री गुरुनाथ चंद्रकांत ताम्हणकर

सदस्य, अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवण

पत्ता – मु. बागायत, पो. माळगाव, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग. 416606

संपर्क – 9420738375

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ रंगोत्सव…☆ सौ शालिनी जोशी ☆

सौ शालिनी जोशी

🔅 विविधा 🔅

☆ रंगोत्सव… ☆ सौ शालिनी जोशी

रंग म्हटलं की समोर येते शाळेतली रंगपेटी किंवा रांगोळीतले रंग. आदिमानवाने रंगांची सुरुवात निरनिराळ्या रंगाच्या मातीतून, पानांच्या व फुलांच्या रसातून केली. पण हळूहळू रंगांची व्याप्ती वाढू लागली. माणसाच्या भावभावनांची व विचारांची रंगाचे नाते जोडले गेले. उदाहरणार्थ पांढरा रंग शुद्धता व शांतीचा, केशरी रंग त्याग व समर्पणाचा, पिवळा रंग आनंद व उत्साहाचा, निळा रंग व्यापकतेचा व गुढतेचा, तर काळा रंग सर्वसमावेशक पण नकारात्मकता, लाल रंग प्रेमाचा व सौंदर्याचा, गुलाबी म्हणजे निरागसता, कोमलता आणि हिरवा रंग शांती व समृद्धी. याच बरोबर कपडे, घरे आणि इतर कोणत्याही वस्तूंत सुद्धा वेगवेगळ्या रंगछटा असतात आणि त्या अर्थपूर्ण असतात. एवढेच नव्हे तर कलर थेरपीचा उपयोग मानसिक आजार दूर करण्यासाठीही केला जातो. अशा प्रकारे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात रंगाचा वापर प्रभावी ठरतो. रंग नसता तर जीवन निरस झाले असते.

असे होऊ नये म्हणून निसर्गानेच रंगोत्सवाची योजना केली. विविध रंगांची पाने, फुले, झाडे, फळे, प्राणी, पक्षी, इंद्रधनुष्य, आकाश, ढग निर्माण करून जीवनात रंग भरला. आकाश एकच ज्याला स्वतःचा रंग नाही पण २४ तास तिथे रंगोत्सव सुरू असतो. क्षणाक्षणाला रंग बदलत असतात. प्रभातीची केशरी, पिवळी, लालसर छटा तर दुपारी फिकट निळरस आकाश. संध्याकाळीची मावळतीची वेगळीच शान. रात्री अंधार असला तरी चमकदार चांदण्याने तो काळसर रंगही चमकतो. या आकाशाचे प्रतिबिंब सागरात पडते. त्यामुळे रंगहीन पाणीही विविध रंग धारण करते. त्या सागरातही रंगीत प्राणी सृष्टी व चमकदार मासे असतात. शिवाय ऋतूप्रमाणे झाडे, फुले यांचे रंगही बदलत असतात. कधी हिरवाई, कधी कोवळी पोपटी पालवी आणि त्यावर हिंडणारी तशीच रंगीत फुलपाखरे, पक्षी, कीटक असे हे चैतन्यमय, रंगमय, उत्साहमय जग. ते निर्माण करणारा सृष्टीकर्ता परमात्मा त्याचे नावही श्रीरंग. येथे सोयराबाईंचा अभंग आठवतो,

‘अवघा रंग एकचि झाला रंगी रंगला श्रीरंग ‘पण ही बहुरंगी सृष्टी निर्माण करणारा तो श्रीरंग त्याचा रंग वेगळाच. त्याच्या ठिकाणी रंगांचा भेद नाही. तो एकमेक भक्तिरंगातच रंगणारा म्हणून श्रीरंग.

©  सौ. शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ तो आणि मी…! – भाग ६१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ तो आणि मी…! – भाग ६१ ☆ श्री अरविंद लिमये ☆

(पूर्वसूत्र- मी अकोला ब्रॅंचचा चार्ज घेतल्यानंतरच्या पहिल्या पंधरा दिवसातल्या या सगळ्या उलाढालींमधे मला श्वास घ्यायलाही फुरसत मिळालेली नव्हती. क्रिमिनल लाॅयरना भेटून आल्यानंतरच्या त्या रात्री कांही वेळ कां होईना मला प्रथमच बऱ्यापैकी झोप लागली होती. त्या मिटल्या डोळ्यांना मात्र उद्यापासूनचा प्रत्येक क्षण खऱ्या अर्थाने माझ्या सहनशक्तीची कसोटी पहाणारा ठरणार आहे याची कल्पनाही नव्हती.)

मी अकोल्याला जॉईन झालो ती जानेवारी २००० ची नुकतीच झालेली सुरूवात होती. त्या अनपेक्षित बदलीमुळे ही नवीन वर्षाची सुरुवात फारशी उत्साहवर्धक वाटली नव्हती एवढे खरे. आज पंचवीस वर्षांनंतर ते सगळे दिवस पुन्हा आठवताना त्या अनुभवाने मला समृध्द करून गेलेले कितीतरी प्रसंग आपण अजूनही विसरलेलो नाही हे नव्याने जाणवतेय. या प्रसंगांमधला एकेक क्षण मला हादरवणारा, माझी कसोटी पहाणारा जसा होता, तसाच या ना त्या रूपातल्या ‘त्या’च्या अस्तित्त्वाची जाणीव करून देणाराही होता!

अतिशय कडक, जीवघेण्या अशा उन्हाळ्याचा अनुभव मी माझ्या आयुष्यांत तिथे प्रथमच घेत होतो. पहिल्याच दिवशी पहाटे शेगावला जाऊन गजानन महाराजांचे दर्शन घेऊन झाल्यावर परतीच्या प्रवासासाठी शेगाव एसटी स्टँडवर येऊन पोचेपर्यंतचे ते दोन अडीच तास काय ते बऱ्यापैकी सुसह्य वाटले होते. पण परतीच्या बसमधे चढण्यापूर्वीच सकाळचे सातही वाजलेले नसताना ऊन तापू लागलंय हे जाणवले. अकोल्यापर्यंतचा तो फारतर तासाचा प्रवास पण कणभर वाऱ्याचाही शिरकाव न होऊ देणारं तीव्रता हळूहळू वाढू लागलेलं ते ऊन, स्वतः चटके सोसत माझ्या डोईवर गरम सावली धरणारं त्या एस टी चं आमच्यासाठी ऊन अडवून उभं राहिलेलं ते छत, प्रवासात खिडकीबाहेर बघणंही नको असं वाटणारं बाहेरचं तापू लागलेलं वातावरण, स्वतःची गारवा देणारी हिरवाई असोशीने घट्ट धरून ठेवायची धडपड करणारी केविलवाणी पळती झाडं… हे सगळंच माझी उसनी उमेद कोळपून जायला पुरेसं ठरत होतं. अकोला स्टॅंडवर बसमधून उतरलो तेव्हा सकाळचे आठच वाजून गेले होते तरीही मी घामाने चिंब भिजलो होतो आणि बाहेर ऊन अधिकच तापू लागलेलं होतं! तो जानेवारी महिना होता तरी ही अवस्था. खूप वर्षांपूर्वीच्या महाबळेश्वरला मी अनुभवलेल्या तेव्हा नकोशा वाटणाऱ्या धुवांधार पावसाच्या आठवणी त्याक्षणी मात्र मला हरवलेल्या जिवाभावाच्या मित्रा सारख्या वाटू लागल्या. शेगावला दर्शन घेऊन योग्य वेळेत परत आल्याचं समाधानही या सगळ्या मनोवस्थेत कांहीसं मलूल होऊन गेलं होतं!

बसमधून उतरताच बऱ्यापैकी तापत चाललेलं ऊन पाहून हाकेच्या अंतरावरच्या लॉजवर जाण्यासाठीही मी रिक्षाला हात केला. रिसेप्शन वरून किल्ली घेऊन रूमचं दार उघडलं. समोरच्या भिंतीवरच्या चित्रातल्या गजानन महाराजांच्या चेहऱ्यावरच्या स्मितरेषेने आणि माझ्याकडे एकटक पहाणाऱ्या त्यांच्या गूढ नजरेने माझं स्वागत केलं तेव्हा मनातलं कडक ऊन क्षणभर मळभ यावं तसं विरून गेलं. त्यांच्या नजरेचा तो स्पर्श दिलासा देणारा होता आणि माझ्या कसोटीची आत्ता कुठं सुरुवात झालीय याची जाणीव करून देणाराही!

आधी सांगितल्याप्रमाणे पहिले पंधरा दिवस अतिशय घाईगर्दीत उलटून गेले होते. वाढत जाणारा उन्हाळा अर्थात सुसह्य नव्हताच पण हार मानूनही चालणार नव्हतं. पहिल्या दिवशी ब्रॅंचमधे गेल्याबरोबर परस्परांचा परिचय वगैरे सगळं पार पडलं. ब्रॅंचचं रुटीन सुरू झालं. सकाळी हेवी ब्रेकफास्ट करून आल्यामुळे लंचटाईममधे बाहेर जाऊन जेवून यायचं ठरवलं होतंच. मी ड्रॉवरमधली कॅप काढली आणि अकाऊंटटला मी जाऊन येतो असं सांगितलं. त्याने मला थांबवलं.

“आत्ता.. इतक्या उन्हात?” त्याने आश्चर्याने विचारले.

“हो. इथून जवळ चांगलं हॉटेल आहे का एखादं? म्हणजे जेवण चांगलं मिळेल असं…? “

” आहेत पण नुसती कॅप घालून कसे जाणार? इथं नेहमी मोठा रूमाल डोक्याला बांधूनच जावं लागतं. नको सर. आम्ही सगळ्यांनी डबे आणलेत. आपण शेअर करूया. “

मला संकोचल्यासारखंच झालं. “नाही.. नाही.. नको. तुमचं चालू दे. मी आलोच. ” मी म्हंटलं.

” सर. नको. एका माझं. आम्ही इथे रहाणारे असूनही हे चार महिने अशा उन्हात अगदी नाईलाज असल्याशिवाय कुणीच बाहेर पडत नाही. तुम्हाला सवय नाहीय. तुम्हाला ते अजिबात सहन होणार नाही. प्लीज रिस्क घेऊ नका. आणि संकोचही करू नका. या. “

ते आग्रहाने म्हणाले. त्यात काळजी होती. आपुलकीचा ओलावा होता. आत्तापर्यंतच्या रखरखीत वातावरणात अचानक आलेली ती एक गार वाऱ्याची झुळूकच वाटली मला.

त्यादिवशी सगळ्यांच्या बरोबर बसून घासभर खाताना त्या सर्वांच्या डब्यातल्या जळजळीत तिखट भाज्या घशाखाली उतरवतानाही मनाला स्पर्शून गेलेला दिलासा मन शांतवणारा होता. या प्रतिकूल परिस्थितीत माझी

मूळं इथं रूजायला तोच दिलासा पुढे पाण्याचा शिडकावा करणारा ठरला होता हे नक्कीच. त्याच दिवशी घडलेली आवर्जून दाद द्यावी अशी आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांनीच शिपायाला सांगून माझ्यासाठी ब्रॅंचमधून बाहेर पडायच्या आधी दोन कॉटनचे मोठे रुमाल आवर्जून मागवून घेतले होते. ते मला देऊन त्यांनी तिथं उन्हाळा संपेपर्यंत मी स्वतः काय काय काळजी घेणे आवश्यक आहे तेही समजावून सांगितले. तो रुमाल टाळूवर घडी ठेवून दोन्ही कान व्यवस्थित झाकले जातील अशी काळजी घेऊन न सुटेल असा कसा बांधायचा हे प्रात्यक्षिक करून मला शिकवलं होतं. माझी नेहमीची कॅप घालायची ती रुमाल बांधलेल्या डोक्यावर हेही गंमतीने हसत मला सांगितलं होतं. या गोष्टी लहान लहान वाटत असल्या तरी माझ्यासाठी त्या खूप मोठा आधार, निश्चिंतता देणाऱ्या होत्या. नवीनच ओळख झालेल्या तिथल्या या सगळ्या स्टाफ मेंबर्सशी माझं असं आपुलकीचं घट्ट नाते निर्माण झालं जे पुढं मी तिथं असेपर्यंत माझी पाठराखण करीत होतं! इथं कितीही संकटं आली तरी त्यातून बाहेर पडायला मदतीचे हातही इथे असणार आहेत हेच तो मला सुचवत असावा असंच वाटत राहिलं. म्हणूनच तर त्या पहिल्याच दिवशी नेमके या आधीच्या भागात लिहिल्याप्रमाणे ऑडिट डिपार्टमेंटमधले माझे सहकारी श्री. देशपांडे आवर्जून मला भेटायला आले होते. माझ्या रहाण्याची सोय करून देण्यासाठी! हे सगळं प्रतिकूल परिस्थितीत ‘त्या’ने माझी पाठराखण करणारंच तर होतं!

जगणं किती क्षणभंगूर असू शकतं याचा या भाजून काढणाऱ्या पेटत्या उन्हानेच मला दिलेला ‘जीवघेणा’ अनुभव आज आठवला तरी चर्र होतं. ती अकोल्यात जाॅईन झाल्यानंतरच्या पहिल्या महिन्यातलीच ती घटना!

क्रिमिनल लॉयरकडे सोपवलेल्या त्या ११ कर्ज खात्यांखेरीज मी तातडीने लक्ष घालून काळजी घ्यायला हवी अशी मोठ्या रकमांची इतरही अनेक कर्जखाती होती. ती थकबाकीत जाऊ नयेत म्हणून त्या खातेदारांशी सतत संपर्कात राहून नियमित वसुलीची खात्री करून घेत, इतरही त्रुटी निर्माण होणार नाहीत यासाठी दक्ष रहाणे आवश्यक होते. या आठवड्यात व्हिजिट करायलाच हवी अशी पाच सहा खाती होती. त्यातील एकाकडे मी इन्स्पेक्शनला जायचे ठरवले. माझी ती पहिलीच व्हिजीट असल्याने माझ्याबरोबर ॲडव्हान्सेस डिपार्टमेंटमधला ऑफिसर येणार होता. अकोला स्टॅन्डजवळच्या एका बसस्टाॅपजवळ मी सकाळी साधारण साडेनऊला यायचे असे ठरले. तो ऑफिसर तिथेच येऊन मला घेऊन जाणार होता. मी पाच मिनिटे आधीच तिथे गेलो. बस-स्टॉप वर गर्दी होती. म्हणून मग शेजारच्याच एका झाडाखाली सावलीत जाऊन उभा राहिलो. त्या झाडाखाली एक थकलेला म्हातारा खेडूत बसलेला होता. दीनवाणा करपून गेलेला चेहरा, विझलेली नजर, आणि त्या नजरेतला केविलवाणा भाव! मी तिथे उभा राहून एक दोन मिनिटेच झाली असतील, तेवढ्यांत झाडावरून धपकन् काहीतरी माझ्यासमोर पडल्याचा आवाज आला. मी दचकून पाहिलं तर झाडाच्या पानांच्या सावलीत बसलेला, तहानेने व्याकुळ झालेला एक कावळा झाडावरून खाली मरून पडलेला होता! ते बघूनसुद्धा मला कसंतरीच झालं. थोडं मागं सरकून उभं रहावं म्हणून मी वळून बघितलं तर बाकावर बसलेला तो म्हातारा माणूस माझ्याकडेच बघत होता.

” पावनं, किती वाजलं म्हणायचं..? ” त्याने काकुळतीने विचारलं. मी हातातलं घड्याळ पाहिलं. त्याला वेळ सांगावी म्हणून नजर वर केली न् अंतर्बाह्य हादरलोच. आत्ता एका क्षणापूर्वी माझ्याशी बोललेला तो… त्याची निर्जीव मान त्याच्या खांद्यावर लुळी पडल्यासारखी विसावलेली आणि डोळे तसेच सताड उघडे! दुसऱ्याच क्षणी तो कोलमडल्यासारखा खाली मातीत कोसळला! तेवढ्यांत तिथे आलेल्या ऑफिसरने स्कूटर माझ्याजवळ येत थांबवली. त्या आवाजाने मी दचकून भानावर आलो.

” साहेब, साॅरी.. थोडा उशीर झाला.. चला, बसा. जाऊया. ” तो म्हणाला. तोवर जाणायेणाऱ्या ८-१० माणसांनी त्या म्हाताऱ्यासमोर गर्दी केलेली होती! तिथेच मरून पडलेला तो कावळा मात्र कुणाच्या खिजगणतीतही नव्हता!

उन्हाच्या कडाक्याने बळी घेतलेले ते दोन जीव आणि त्यांच्या अखेरच्या श्वासांचा मूक साक्षीदार असणारा मी..! तो पूर्ण दिवस मृत्यूच्या त्या काळ्या सावल्या मला अस्वस्थ करीत राहिल्या. त्या दोन जीवांसारखाच मीही येईल त्या परिस्थितीला तोंड देत जगण्यासाठीच तर धडपडत होतो! आणि कुणाचंही असो पण ते जगणंही किती क्षणभंगूर असू शकतं याचा ‘जीवघेणा’ अनुभव जणू जिवंत होऊन मला हादरवून सोडत होता! तिथल्या तळपत्या उन्हाने मला दिलेला तो चटका एखाद्या दु:स्वप्नासारखा पुढे कितीतरी दिवस माझ्या मनात रेंगाळत, यापुढे उगवणारा इथला प्रत्येक दिवस इथं तग धरून रहाण्यासाठी मला कराव्या लागणाऱ्या जीवघेण्या संघर्षाचं सूतोवाचच करतोय असंच मला तिथल्या संघर्षकाळांत सतत जाणवत रहायचं!

क्रमश:…  (दर गुरूवारी)

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ उगीच आपलं सहज… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

?विविधा ?

☆ उगीच आपलं सहज… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

जन्मावं, जगावं, भोगावं आणि कायम स्वरुपी लक्षात ठेवावं असं या धरतीवर खूप काही आहे. फक्त ते शोधण्याची क्षमता आपल्या ठायी असायला हवी. एकदा त्याची ओळख पटली की जीवनातलं नाराजीचं सतत वाजणारं तुणतुणं आपोआप बंद होईल आणि सुश्राव्य मधुर जीवन संगीत आपल्या तना मनाला यरगटून टाकील. मग त्याचा क्षणभराचा विरह सुद्धा आपल्याला सहन होणार नाही. अशी अनेक आकर्षणे अवतीभवती असताना ती विसरून उगीचच चिंताग्रस्त अवस्थेत जगण्यातच स्वारस्य असणारी मंडळी कोणता विचार करतात ते त्यांचं त्यांनाच माहीत.

पण ते जीवनातल्या ख-या आनंदाला पारखे होतात येवढे मात्र खरं जीवनाच इंद्रधनुष्य विविध रंगानी भरून ओसंडून वाहत असतं. त्यांच्या सर्वच रंगात रंगून जाणं आपल्याला अवगत झालं की मग जिकडे तिकडे आनंदी आनंद गडे अशीच जगण्याची अवस्था होऊन जाते.

आयुष्याच्या भविष्याचा सुंदर ठोकताळा मांडण्यासाठी आदर्शाचे पाढे पाठ करत संस्कृतीच्या आणि संस्कारांच्या पोथ्या गिरवाव्या लागतात. पण नेमकं हेच विसरलं की मग आयुष्य कोड्यात टाकणारं एक अवघड प्रमेय होऊन बसत.

ते सोडवता सोडवता दमछाक सहन करावी लागते तनाला आणि मनाला सुद्धा.

मानवी प्रपंच म्हणजे एक अजब धुंदीचं रसायन आहे ते डोळे मिटून प्यायच नसतं. सतर्कतेने सावध राहून त्याचा आस्वाद घेतला तरच बेधुंद होण्यातल इंगीत कळतं माणसला.

आजवर मजबूत, करारी बाण्याने कणखरतेने वागणा-या भक्कम ताकतीच्या कर्तृत्वान पुरुषाला फक्त त्याची आवडती स्त्रीच रडवू शकते

याची जाणीव नसणारी व्यक्ती मनाने आरोप करून पुरुषालाच कठोर समजत असेल तर तो दैवदुर्विलास समजायला काय हरकत आहे?

प्रेमाची हीच तर खरी ताकत आहे ती ओळखण तशी साधी बाब नाही. तस समृद्ध जगणं जगून ज्यानं जगणं अनुभवलय त्याला विचारून बघा तो काय म्हणतोय ते

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “स्त्री आणि छत्री…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆

श्री कौस्तुभ परांजपे

? विविधा ?

☆ “स्त्री आणि छत्री…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे

परवाच नवीन आणलेली छत्री रात्री माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होती. मी विचारले काय झालं? तर म्हणाली काही नाही. पुरुषांच्या मनाचा विचार करत होते.

तुमचं कसं आहे. या दोन्ही गोष्टी तुम्हाला आपली सोडून इतरांच्याच नाजूक, आणि देखण्या वाटतात‌.

आपलीच असली तरी दोन्ही वेळेवर मदतीला हाताशी हव्या असतात.

त्या जुन्या झाल्या तरी त्यांनी तसं दिसता कामा नये. अशीच तुमची भावना असते. पण तुमच सुटलेलं पोट तुम्हाला चालत.

तुम्ही बरोबर असाल तर तुमच्या इच्छेविरुद्ध यांनी तोंड उघडलेल तुम्हाला बऱ्याचदा चालत नाही. तुम्ही लगेच ते बंद करायचा प्रयत्न करता.

गरज असेल तेव्हा तुम्ही एकीला डोक्यावर धरता, तर दुसरीला मात्र डोक्यावर बसली आहे अस सहजपणे बोलता. आणि तिची गरज नसेल तेव्हा फक्त सोबत मिरवण्यासाठी म्हणून वापर करता.

संरक्षण तुम्हाला दोघींकडून सारखच अपेक्षित असतं. पण बऱ्याचदा तुम्ही दोघींबद्दल निष्काळजीपणे वागता.

या तिच्या बोलण्याचा मी काही वेळ विचार केला. आणि म्हटलं, तू म्हणतेस ते अगदीच खोटं नाही. त्यात बरच तथ्य आहे. छत्रीची बाहेर आलेली काडी टोचल्यावर जखम झाली नाही तरी टोचल्याच जाणवतं. तसच आमच्या अशा वागण्यामुळे तुम्हाला टोच जाणवत असेल यात शंकाच नाही.

पण तू (छत्री) घरात निमुटपणे बसलीस तर मनाला काही वाटत नाही. पण दुसरी (स्त्री) जर गप्प राहिली तर तिच गप्प रहाणसुध्दा मनाला नकळत कुठेतरी खूपत असत. हे तुला माहीत आहे का?

तू जशी थोडी नादुरुस्त झाल्यावर आपले तोंड सहजपणे उघडायला तयार नसतेस तसेच स्त्री आपले दुःख सहजपणे तोंड उघडून सांगत नाही. हे देखील सत्यच आहे. दोघींच्या तोंड न उघडण्याच्या प्रकारात फार फरक आहे.

तू (छत्री) जशी उन्हाचा कडाका आणि पावसाचा तडाखा सहन करतेस आणि तशीच राहतेस, तशीच स्त्री देखील मानापमानाचे चटके सहन करते. आणि स्वयंपाक घरात घामाने चिंब झाली तरी जेवण सुग्रास करण्याचा हट्ट धरते पण चेहऱ्यावर दाखवत नाही. “स्वयंपाक छान झाला आहे” या एका वाक्यात तिचा थकवा जातो. खरंच हे कौतुकास्पद आहे.

यावर छत्री परत म्हणाली, माझ्या शिवाय इतर वस्तूंबाबत देखील तुमचे विचार तसेच असतात. जसे स्त्री आणि गाडी. या बाबतीत सुध्दा तुमची मतं सारखीच असतात.

गाडीत पेट्रोल भरण्याच्या टाकीजवळ थेंब थेंब पेट्रोल भोवती घाण साचते. ते तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही ते स्वच्छ करायचा प्रयत्न करता. कारण इतरवेळी ते सीटखाली किंवा झाकणाखाली झाकले जातं.

मला सुध्दा पावसातून आल्यावर उघडी ठेवून कोरडी करतात. पण सातत्याने तुम्ही स्त्री च्या मनाला मनापासून स्वच्छ करण्याचा प्रयत्न करता का?…

तुम्हाला जशी माझी घडी व्यवस्थित असावी असे सतत वाटते, तशीच स्त्री आपल्या घराची घडी कायम चांगली रहावी या प्रयत्नात आपले मन बऱ्याचदा उघडतच नाही. त्याचीही घडी उलगडून परत नीट घालण्याचा प्रयत्न करा… जमेल ते.

… तुझं म्हणण खर आहे. आम्हाला तुमचं सतत जवळ असणं अपेक्षित असतं. पण बऱ्याचदा आम्ही तुम्हाला उपेक्षितच ठेवतो. असे मी म्हणालो… 

©  श्री कौस्तुभ परांजपे

मो 9579032601

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ यश कसे टिकवायचे? ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆

सौ. अंजोर चाफेकर

🔅 विविधा 🔅

☆ यश कसे टिकवायचे? ☆ सौ. अंजोर चाफेकर

प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी झटत असतो. त्याचे अविरत कष्ट, त्याची हुषारी, नवनिर्मितीची प्रतिभा आणि नवीन शिकत राहण्याची जिज्ञासा या गुणांमुळे तो यशाच्या पाय-रा चढत जातो.

पण यश मिळाल्यावर ते टिकवायचे कसे?

यश मिळाले की त्याची धुंदी चढते.त्यातून अहंकार पोसला जातो. अहंकारातून उर्मटपणा येतो.दुसराला कमी लेखण्याची वृत्ती वाढते. मग जवळची माणसे जी तुमच्या यशात भागीदार होती, ती दुरावतात.

कितीतरी अभिनय सम्राट, सिनेसृष्टीतील यशस्वी तारे यांची उदाहरणे आहेतच.

यश आले की लोकांकडून अपेक्षा वाढतात. आणखी उंच जाण्याचा ताण वाढतो. वेगाने पुढे जाण्यासाठी कधी कधी स्वतःची मूल्ये बाजूला सारून अनैतिकता येते. कधी कधी हा ताण इतका असह्य होतो की आत्महत्येला प्रवृत्त होतो. मोठे बिल्डर्स, सिने प्रोड्यूसर्स कंपनीचे डायरेक्टर्स या ताणाला बळी पडतात.

कधी कधी यशामधे तुमचे भाग्य, तुम्हाला मिळालेल्या संधी यांचाही वाटा असू शकतो.परंतु आपण समजतो की माझ्यातील गुणांमुळेच व माझ्यातील असामान्य हुषारी मुळेच मला हे यश प्राप्त झाले आहे.

कितीतरी नवरे त्यांच्या पत्नीलाही क्रेडिट द्यायला तयार नसतात, जी पत्नी त्यांच्या पडत्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. ईश्वर तर पाठीशी असतोच. मनात नेहमी कृतज्ञता असावी म्हणजे अहम् पोसत नाही.

आणखी आणखी पुढे जाण्यात कधी कधी धोका आहे का याचा विचार करायला हवा.

कधी थोडे थांबून पुन्हा पहिल्यापासून विचार करावा.

उदा. एखादी कंपनी, इंडस्ट्री वाढविण्यासाठी मोठे भांडवल उभे करावे लागते. त्यासाठी लोन घ्यावे लागते. परंतु टेक्नाॅलाॅजी इतक्या झपाट्याने बदलते.

उदा. नोकियासारखी मोठी कंपनी, त्यांनी फोनचे प्राॅडक्शन वाढविण्यासाठी खूप मोठी इन्व्हेस्टमेंट केली. आणि इंटेल कंपनीने मायक्रोप्रोसेसर आणल्यावर नोकियाच्या मोबाइल फोनची मागणी कमी झाली. शेवटी कंपनी बंद पडली.

 म्युझिक क्षेत्रात आधी कॅसेटस होत्या, मग सी.डी. ज आल्या, आता पेनड्राइव.

आता काळा पांढरा टी.व्ही कोण घेणार? सर्वांना स्मार्ट टी.व्ही. हवा.

झेराॅक्स मशीनमधे किती बदल झाले.

त्यामुळे भांडवल घालताना पुढचा विचार हवा.

शिवाय कर्ज घेताना डेट/इक्वीटी रेशिओ तपासायला हवा.

कंपनी कितीही मोठी झाली तरी त्या कंपनीच्या कोअर व्हॅल्यूज, कंपनीची मूल्ये यांना धक्का पोचता कामा नये. याचे उत्तम उदाहरण म्हणजे टाटा उद्योग समूह.

मर्क या औषधांच्या कंपनीचा मोटो होता, “आम्ही हे कधीही विसरणार नाही की औषधे ही लोकांसाठी असतात. नफा कमावण्यासाठी नाही. नफा आपोआप पाठी येईल. “

परंतु कंपनी जसजशी मोठी होत गेली, त्यांची ही फिलाॅसाॅफी डायल्यूट होत गेली.आणि कंपनीचा करिष्मा कमी झाला.

कधीकधी अनेक अडचणी येतात. यशाचा मार्ग काट्यातूनच जातो. अशावेळी कुठलाही निर्णय घेताना शांतपणे घ्यावा. पॅनिक होऊन जर निर्णय घेतला तर तो चुकीचा असू शकतो. आपणच आपल्या पायावर धोंडा मारू नये.

शेवटी पडत पडतच शिकायचे आहे.

©  सौ.अंजोर चाफेकर

मुंबई.

≈संपादक –  श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “रिसॉर्टमधील विवाह.. एक सामाजिक आजार…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष बिवलकर

☆ “रिसॉर्टमधील विवाह.. एक सामाजिक आजार…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री आशिष बिवलकर ☆

आता मंगल कार्यालयाचा वापर लग्न समारंभासाठी होत नाही, ही सर्व ठिकाणं आता निकामी झाली आहेत.

काही वर्षांपूर्वीपर्यंत शहरातल्या मंगल कार्यालयात लग्न होणं सामान्य होतं, पण तो काळही आता संपत आला आहे. आता शहरापासून दूर महागड्या रिसॉर्टमध्ये लग्न समारंभ होऊ लागले आहेत. लग्नाच्या दोन दिवस आधीपासूनच हे रिसॉर्ट बुक केली जातात आणि संपूर्ण कुटुंब तिथे स्थलांतर करतं. पाहुणे थेट तिथेच पोहोचतात आणि तिथूनच निरोप घेतात. इतक्या लांबच्या समारंभाला स्वतःचे चारचाकी वाहन असलेलेच पोहोचू शकतात.

आणि खरी गोष्ट म्हणजे आमंत्रण देणाऱ्यालाही हेच हवं असतं की, केवळ कारधारक आणि “स्टेटसवाले” पाहुणेच येवोत. आता २-३ प्रकारची आमंत्रणं दिली जातात:

फक्त महिलांसाठी संगीत कार्यक्रमासाठी

फक्त रिसेप्शनसाठी

फक्त कॉकटेल पार्टीसाठी

आणि काही VIP लोकांना सर्व कार्यक्रमांसाठी.

या प्रकारच्या निमंत्रणात आपलेपणाची भावना राहिलीच नाही, केवळ उपयोगी लोकांनाच बोलावलं जातं.

महिला संगीतासाठी संपूर्ण कुटुंबाला डान्स शिकवण्यासाठी महागडे कोरिओग्राफर १०-१५ दिवस ट्रेनिंग देतात. मेहंदी लावण्यासाठी कलाकार बोलवले जातात, हळदीसाठी सुद्धा एक्सपर्ट नेमले जातात.

मेहंदीच्या कार्यक्रमात सगळ्यांना हिरव्या रंगाचे कपडे घालणे अनिवार्य केले जाते. जो न घालेल त्याला कमी समजले जाते. म्हणजेच कमी दर्जाचा मानला जातो. ब्युटी पार्लर २-३ दिवसांसाठी बुक केले जातात.

यानंतर हळदीचा कार्यक्रम होतो. इथे सगळ्यांनी पिवळा कुर्ता-पायजमा घालणे गरजेचे असते. जो हे न पाळेल त्याला देखील कमी समजलं जातं.

प्रत्येक कुटुंब वेगवेगळ्या खोलीत राहतं, त्यामुळे भेटणारे नातलग एकमेकांना भेटत नाहीत. सगळे श्रीमंत झाले आहेत, पैसेवाल्या जगात आपुलकी हरवून गेली आहे. आता समारंभातही मोबाइलवरून बोलविल्यावरच लोक बाहेर येतात. प्रत्येकाला वाटतं की मी दुसऱ्यापेक्षा श्रीमंत आहे.

लग्नाच्या स्वागतद्वारावर नवदांपत्याच्या प्री-वेडिंग फोटोशूटमधील आलिंगनाचे फोटो लावलेले असतात, जे आपल्या संस्कृतीला झटका देणारे असतात. आता नववधूच्या नावापुढे ‘सौ. ’ किंवा वराच्या नावासमोर ‘चि. ’ असा उल्लेख होत नाही. सर्व इंग्रजीमध्ये असतं.

एंट्री गेटजवळ मोठ्या स्क्रीनवर त्यांच्या फिल्मी शैलीतील प्री-वेडिंग व्हिडिओ दाखवले जातात. कार्यक्रम आशीर्वादासारखा वाटतच नाही. स्टेजवर नवदांपत्य आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर थिरकत असतं, आपल्याच संस्कारांचे प्रदर्शन करत.

स्टेजजवळ स्क्रीनवर प्री-वेडिंग शूट दाखवलं जातं, ज्यात त्यांची आधीच भेट झालेली असते आणि मुलगी अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून चट्टानांवर, बागांमध्ये, कुंभारवाड्यांमध्ये, स्मशानात किंवा कृत्रिम फुलांमध्ये पोझ करताना दिसते.

यानंतर रिसेप्शन सुरू होतं, स्टेजवर वरमाला होते. पूर्वी वर-वधूचे कुटुंबीय मिळून हसतखेळत वरमाला घालायचे. आता स्टेजवर धूर सोडला जातो, सगळ्यांना दूर हटवलं जातं आणि दांपत्य स्लो-मोशनमध्ये फिल्मी स्टाईलमध्ये वरमाला घालतात. त्यात लेझर शो आणि फटाकेही असतात.

यानंतर वरात निघते. बऱ्याच घरांतील सुसंस्कृत मुली ५० हजार रुपये खर्च करून ढोल-ताशावर नाचतात.

आपली संस्कृती बिघडवण्याचे काम हे अतिसंपन्न वर्ग करत आहेत.

माझं सर्व मध्यमवर्गीय समाज बांधवांना आवाहन आहे की, आपले पैसे आहेत, आनंद साजरा करा, पण इतरांची नक्कल करू नका.

कर्ज काढून आपला आणि आपल्या कुटुंबाचा सन्मान गमावू नका. आपल्या क्षमतेनुसार खर्च करा. चार-पाच तासांच्या रिसेप्शनसाठी आयुष्यभराची कमाई खर्च होते आणि जेवढंच करू, लोक फक्त रिसेप्शन हॉलपर्यंतच तुमचं कौतुक करतील आणि भेट पाकीट देऊन निघून जातील.

माझं तरुण पिढीकडेही आवाहन आहे की, आपल्या कुटुंबाला त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक खर्च करण्यास भाग पाडू नका. तुमचं लग्न हे तुमच्या आईवडिलांच्या त्यागाचे फलित आहे, आणि त्याचं मोल तुम्हाला फक्त स्वतः आई-वडील झाल्यावर कळेल.

हा दिखाव्याचा आजार फक्त उच्चवर्गापुरताच मर्यादित ठेवा. आपलं वैवाहिक आयुष्य अभिमानाने, आत्मसन्मानाने सुरू करा आणि स्वतःला आपल्या कुटुंबासाठी व समाजासाठी योग्य सिद्ध करा.

५० लाख ते १ कोटी रुपयांच्या लग्नात वर-वधूच्या अंगावर किती दागिने असतात, पण उगाचच त्या पैशांचं दहापट खर्च केलं जातं, केवळ दिखाव्यासाठी.

कृपया समाजातील प्रत्येक व्यक्ती यावर गंभीर चिंतन करावं आणि भविष्यात या आजारातून मुक्त होण्यासाठी योग्य पावलं उचलावीत.

लेखक : अज्ञात

प्रस्तुती : श्री आशिष बिवलकर 

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares