मराठी साहित्य – विविधा ☆ फादर्स डे ☆ श्री प्रसाद जोग ☆

श्री प्रसाद जोग

🌸 विविधा 🌸

☆ फादर्स डे ☆ श्री प्रसाद जोग ☆

फादर्स डे – २१ जून

भारतात जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो.

अमेरिकेतल्या वॉशिंग्टनच्या स्पोकेन शहरात सोनोरा डॉड या मुलीने आपल्या वडीलांच्या आठवणीत या दिवसाची सुरुवात केली होती. हा दिवस फादर्स डे म्हणून साजरा करण्याची प्रेरणा त्यांना १९०९ मध्ये सुरु झालेल्या मदर्स डे पासून मिळाली.

अलौकिक प्रतिभेच्या जनकवी पी. सावळारामांना लता मंगेशकर यांनी विनंती केली आणि सांगितले वडिलांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गाणं लिहा

त्या वर कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला असं अप्रतिम काव्य सावळारामांनी लिहिलं आणि वसंत प्रभूंनी त्याला स्वरसाज चढवला. लता मंगेशकर यांनी हे गाणे खूप आर्ततेने गाऊन गाण्याला अजरामर केले.

त्या गाण्याची गोष्ट ठाण्याला मनोहर रसाळ यांच्या घरात जनकवी पी. सावळाराम यांच्या ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला’ या गाण्याचा जन्म झालेला आहे. ‘कृष्णा निवास’ या घराला ते भाग्य लाभले. १९६४ चा सुमार असेल. गानकोकिळा लताबाई मंगेशकर यांचा पी. साावळाराम यांच्यासाठी फोन होता. असा फोन आला की पी. सावळाराम यांना निरोप सांगितला जायचा. ते कृष्ण निवासमध्ये आल्यावर पुन्हा फोन खणखणायचा आणि मग लताबाई त्यांच्याशी बोलायच्या आणि विशिष्ठ विषयावर त्यांच्याकडे गाणं करून मागितले जायचे.

एकदा मास्टर दीनानाथांच्या पुण्यतिथीसाठी त्यांनी गाणं मागितल्यावर पी. सावळारामांनी क्षणार्धात ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला’ हे अजरामर गाण्याचे बोल ऐकविले.

कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला वैभवाने बहरुन आला, याल का हो बघायाला

तुम्ही गेला आणिक, तुमच्या देवपण नावा आले सप्तस्वर्ग चालत येता, थोरपण तुमचे कळले गंगेकाठी घर हे अपुले, तीर्थक्षेत्र काशी झाले! तुम्हावीण शोभा नाही, वैभवाच्या देऊळाला

सूर्य, चंद्र तुमचे डोळे दुरुनीच ते बघतात कमी नाही आता काही, कृपादृष्टीची बरसात पाच बोटे अमृताची, पंचप्राण तुमचे त्यात पाठीवरी फिरवा हात, या हो बाबा एकच वेळा

रेकॉर्ड मध्ये नसलेलं कल्पवृक्ष कन्येसाठी गाण्यातलं तिसरं कडवं साडेतीन मिनिटांच्या रेकॉर्डच्या मर्यादेमुळे या गीताचे दोनच अंतरे गाण्यात घेतले आहेत. एक नाईलाजाने सोडलेला अंतराही फारच हृद्य आहे. तो असा आहे:

तिन्ही सांजा येऊन मिळता, सांजवात लावित असता हात जोडलेले तुम्हां, माई सांगे तुमची गीता दु:ख मित्र तुमचा प्यारा, आठवण देऊन जाता मिठी आईची ती कंठी, थांबेनात अश्रुमाला।

या अंतऱ्यातील शेवटच्या ओळीसाठी ‘तुमच्याच मूर्तीला हो आम्ही घालू अश्रुमाला’ ही पर्यायी ओळ सुद्धा सावळाराम यांनी लिहून ठेवली होती.

प्रतिभावंत लेखक, कवी ह्यांच्या मनात अशा अनेक विषय घोळत असतात आणि त्यांच्या प्रभिभेला असं कारण कारण मिळाले, की त्या विचारांना शब्दरूप मिळते, आणि अजरामर साहित्य कृती चा जन्म होतो.

वडिलांप्रती असलेले प्रेम, जिव्हाळाआणि कृतज्ञता पी. सावळारामांनी किती अर्थपूर्ण शब्दात व्यक्त केली आहे.

 

© श्री प्रसाद जोग

सांगली

मो ९४२२०४११५०   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ आनंदी ज्येष्ठांसाठी दहा टिप्स – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? विविधा ?

☆ आनंदी ज्येष्ठांसाठी दहा टिप्स – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती : श्री सुनीत मुळे ☆

🌷 प्रिय सुवर्ण ज्येष्ठांनो, चला स्वतःची परीक्षा घेऊ आणि 10/10 गुण मिळवूया… 👇🏾

 🌷 आनंदी ज्येष्ठांसाठी १० टिप्स ❤️

🌷 १.  जर तुम्हाला सकाळी अलार्म क्लॉक, मोबाईल फोन, पक्ष्यांच्या किलबिलाटाने किंवा इतर आवाजाने जाग आली, तर आनंदी व्हा आणि स्वतःला भाग्यवान समजा.  याचा अर्थ तुम्ही अजूनही या जगाचा एक भाग आहात.

🌷 २.  उठल्यावर थोडे पाणी प्या, तुमच्या ओळखीच्या, प्रेमाच्या आणि काळजीच्या लोकांना मेसेज करा.  त्यांना “शुभ सकाळ” म्हणा.  याचा अर्थ तुम्ही स्पष्ट विचार करू शकता आणि तुम्ही निरोगी आहात.  तुम्ही एका नव्या आणि सुंदर दिवसाची सुरुवात करू शकता.

🌷 ३.  जर मित्रांचे मेसेज आणि फोन येत असतील, जे तुम्हाला जेवायला किंवा वेळ घालवायला बोलावत असतील, तर याचा अर्थ तुम्ही मनमिळाऊ आहात आणि लोकांशी तुमचे चांगले संबंध आहेत.  तुमचे मित्र अजूनही तुमचा विचार करतात.

🌷 ४.  कधी कधी काही लोक तुमच्याबद्दल वाईट बोलले किंवा पाठीमागे कुजबुज केली, तर याचा अर्थ तुम्ही अजूनही त्यांच्या मनात एक महत्त्वाची व्यक्ती आहात.  ते आयुष्यात तुमच्याइतके नक्कीच यशस्वी नाहीत.  तुम्ही आनंदी आणि भाग्यवान आहात असे समजा.

🌷 ५.  जर तुम्हाला वजन वाढल्याची काळजी वाटत असेल, तर याचा अर्थ तुम्ही खूप चांगले जेवता आणि तुमचे जेवण रुचकर व पोषक तत्वांनी भरलेले आहे.  काळजी करू नका.  निरोगी जीवन, दीर्घायुष्य आणि मजबूत प्रतिकारशक्तीबद्दलचे सर्व सल्ले अन्नावरच आधारित आहेत.  फक्त नियंत्रण ठेवा आणि सर्व गोष्टी मर्यादेत ठेवा.

🌷 ६.  जर तुम्ही मित्रांसोबत अनेकदा बाहेर जात असाल, खात-पित असाल, गप्पा मारत असाल, प्रवास करत असाल, ठिकाणे पाहत असाल आणि वातावरण बदलत असाल, तर हे सिद्ध होते की तुमच्या जीवनशैलीत काही दर्जा आहे.  

🌷 ७.  जर तुमच्याकडे विनोदबुद्धी चांगली असेल, तर याचा अर्थ तुम्ही मनाने तरुण आहात आणि तुम्ही खूप निरोगी आहात.

🌷 ८.  जर तुमचे वय ६५ पार झाले असेल, तर आनंदी आणि समाधानी रहा.  एका जागतिक सर्वेक्षणानुसार, १०० पैकी फक्त ८ लोक ७० वर्षांपेक्षा जास्त जगतात.

🌷 ९.  जर तुम्ही बाहेर जाऊन सामान आणू शकता, स्वयंपाक करू शकता, तुम्हाला चांगले दिसते, ऐकू येते, मोबाईल फोनवर मेसेज कसे पाठवायचे हे माहित आहे, तुमच्या आठवणी लिहू शकता, कथा लिहू शकता – तर स्वतःला खूप भाग्यवान समजा.  तुमचे जीवन खूप यशस्वी आहे.

🌷 १०.  जर तुम्ही हा संदेश वाचत असाल आणि तुमच्या चेहऱ्यावर हास्य असेल, तर तुम्ही एक अतिशय आनंदी, तृप्त आणि समाधानी व्यक्ती आहात.

जर तुम्ही हा संदेश मित्रांसोबत शेअर करू शकलात, तर याचा अर्थ तुम्ही स्वार्थी नाही आहात.  तुम्ही दयाळू मनाचे आहात, तुम्ही अशी व्यक्ती आहात जी माणुसकीवर प्रेम करते आणि काळजी घेते.

लेखक…  अज्ञात

प्रस्तुती… श्री. सुनीत मुळे

 🌷 ज्येष्ठ मित्रांना हा संदेश पाठवा आणि आनंद पसरवा. 🙏😀

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

नीता कुलकर्णी

? विविधा ?

☆ “आळंदी ज्ञानेश्वर माऊलींची…” ☆ नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆

इंद्रायणीच्या तीरी असलेल्या आळंदीची आज आठवण येत आहे.  आळंदीचं माझ्या मनाशी वेगळंच नातं आहे…  तिथे गेल्यानंतर रांगेत उभ असताना हरिपाठ म्हणायचा. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घ्यायचं.  त्यांच्यामागे विठ्ठल रुक्मिणी आहेत.  लांबून त्यांना नमस्कार करायचा. मग उजव्या हाताला निघायचं…

ज्ञानेश्वर माऊली समाधीसाठी जिथून आत गेले ती ही जागा आहे…

आत जाताना गुरु निवृत्तीनाथांनी त्यांचा हात धरला असेल..  सोपान मुक्ताबाई बाजूला उभ्या असणार…

हे सगळं चित्र समोर उभ राहत…

किती विलक्षण आहे हे सगळं..

तिथे डोकं टेकवलं की पोटात गलबलून येत…  डोळे भरून येतात…  पाय रेंगाळतात..

माऊली आत कसे गेले असतील..  इतक्या लहान वयात त्यांना हे कसं साधलं असेल… जे काम करायला ते आले होते ते झालं आणि ते गेले..

अक्षरशः ज्ञानाच भांडार त्यांनी आपल्यासाठी दिलेलं आहे.  प्रतिकूल परिस्थितीत, समाजाचे घाव सोसत…  हे कस लिहिल असेल? त्यांचा सगळा जीवनपट आपल्या डोळ्यासमोर येतो.

इतक अफाट ज्ञान त्यांना जन्मजात होत.  देव जगात आहे हे त्यांच्या अभंगावरून मला नेहमी खरं वाटतं…  आई सारख समजावून सांगणाऱ्या ज्ञानदेवांना म्हणूनच

 “माऊली” म्हटलं जातं…

त्यांचे काही अभंग तर अनाकलनीय आहेत. त्याचा गुढार्थ तर वेगळाच आहे… त्यांना काय सांगायचं असेल…  असं काही वेळेस मनात येत.  तो अर्थ थोडा समजतो तेव्हा फार आनंद होतो.

मन भरून येतं…

आळंदीला जाऊन नुसतं दर्शन घेऊन यायचं नाही.  तिथल्या पायऱ्यांवर बसून शांतपणे विचार करायचा…  माऊलींच्या प्रेमाने हृदय आपोआप भरून येते. मंदिरात असताना मन करूणेने भरलेले असते.  त्या वातावरणाने भारलेले असते…

तेवढे क्षण खरे असतात..

त्या वेळा पुरता तरी जगाचा विसर आपल्याला पडलेला असतो.

मला तर वाटते आपल्या मनाच्या एका कोपऱ्यात असलेल्या निरागस शांत आणि खऱ्या मनाने ते माऊलींना भेटणं असतं..

विश्वासाठी कल्याण मागणारे ज्ञानदेव..

“अवघाची संसार सुखाचा करीन

आनंदे भरीन तिन्ही लोक”

ते सांगतात पंढरपूरला वारीला जाऊन माझे माहेर. म्हणजे… विठ्ठल त्याला मी आलिंगन देईन.  जे भक्त विठ्ठलाला भेटले त्यांना विठ्ठलाने आपलेसे केले.  

लाखों वारकरी त्यांचे अभंग गाऊन, वाचून आनंदात मार्गक्रमण करत आहेत.  अनेक संतांनी आपल्याला हा अनमोल ठेवा दिलेलाआहे.  पुढच्या पिढ्या हे ज्ञान समजून घेत आहेत.  त्याचा अभ्यास करत आहेत.  वारीचे वेध लागले आहेत…  म्हणून हे सगळे आज आठवले.  

जाऊन या एकदा माऊलींच्या दर्शनाला आळंदीला…

त्या ज्ञानराज माऊलींना विनम्र अभिवादन. 🌹🙏🌹

☆

©  नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २७ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २७ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

पंढरपूरचे वर्णन

संत तुकारामांच्या पाच हजाराहून अधिक अभंग असलेल्या या गाथेत आपण त्यांनी हाताळलेले विविध विषय आजपर्यंत पाहिले, त्यावर विचार केला आणि जमेल तेवढा अभ्यास केला. पंढरपूर हे तुकारामांचे माहेर, माऊली विठ्ठलाचे निवासस्थान! माहेर कोणाला प्रिय नसते? तुकाराम महाराजांनाही ते अत्यंत प्रिय! अशा त्यांच्या या माहेराचे वर्णन महाराजांनी अनेक अभंगातून केल्याचे गाथा वाचताना लक्षात येते. अशाच माहेरच्या वर्णनाच्या आणि मोठेपणाच्या काही अभंगांचा आपण आज परामर्श घेऊया.

पांडुरंग कुठे, कसा आणि कशासाठी उभा आहे, हे तुकाराम महाराज सामान्य माणसाला सांगत आहेत. ते म्हणतात,

 आता उघडी डोळे/ जरी अद्यापी न कळे/

 तरी मातेचिया खोळे/ दगड आला पोटासी/

 मनुष्य देह ऐसा निध/ साधीलते साधे सिद्ध/

 करुनी प्रबोध/ संत पार उतरले//

 नाव चंद्रभागे तिरी/ उभी पुंडलिकाचे द्वारी

 * कर धरूनिया करी/ उभा उभी पालवी*//

 * तुका म्हणे फुकासाठी/ पायी घातलीया मिठी*/

 होतो उठा उठी/ लवकरीच उतार//

या अभंगातून सामान्य संसारी माणसाला ते डोळे उघडायला सांगतात. तुला काहीच कसे कळत नाही, खरोखरच तुझ्या आईच्या पोटी तू दगड म्हणूनच जन्माला आलास का? असा प्रश्न त्याला विचारतात. ते म्हणतात, ” अरे तुला माणसाचा जन्म मिळाला आहे, त्याचा तू सदुपयोग का करून घेत नाहीस? या देहात तुझी सिद्धी करून घेशील ती तुला साधेल, ” असा बोध करून संत स्वतः विवेक करून संसाराच्या पार उतरले आहेत. तुला तरायचे असेल तर एक नौका आहे, ती चंद्रभागेच्या तिरावर पुंडलिकाच्या दारात कमरेवर हात ठेवून उभी आहे, आणि ती सर्वांना उभ्या-उभ्याच बोलावीत आहे. या नौकेला कोणत्याही प्रकारचे भाडे मोजावे लागत नाही. एकनिष्ठ भावाने देवाच्या पायाला मिठी घातल्यास या भवसिंधुतून पार पडता येते. ” थोडक्यात काय तर पंढरपुरासी, चंद्रभागेच्या काठी पांडुरंग प्रपंचाची नौका पार करून देण्यासाठी भक्तांच्या सेवेला हजर आहे.

महाराजांचा विठ्ठल चरणी किती हा दृढ विश्वास आहे, हे या अभंगातून सहज समजते.

रे नामाची भरली पेठ/ वाहती वाट मार्ग/

वघेची येती वाण/ अवघे शकुन लाभाचे//

अडचणी केल्या दुरी/ देण्या उरी घेण्याच्या/

तुका म्हणे जोडी झाली/ ते आपुली आपणा//

या अभंगात पंढरपूरचे वर्णन करताना महाराज म्हणतात–

पंढरी ही भक्तांना इनाम म्हणून मिळालेली पेठ आहे. या पेठेत भक्तांचे थवेच्या थवे आहेत, तिकडे जाण्याचे मार्गही भक्तांनी भरलेले आहेत

(आषाढी- कार्तिकी वारीचा यात संदर्भ असावा) या पेठेत सर्व काही उपलब्ध आहे. लाभाचे शकून भक्तगणांना होतात. भक्तांच्या देण्या घेण्याच्या सर्व अडचणी दूर केलेल्या आहेत.. लाभ करून घेतला, जे जे या पंढरपुर क्षेत्री गेले, त्या सर्वांना फायदा झालेला आहे.

अनुपम असे कार्तिकी वारीचे वर्णन तुकाराम महाराज या अभंगात करतात.

कार्तिकीचा सोहळा/ चला जाऊ पाहू डोळा*/

आले वैकुंठ जवळा/ सन्निध पंढरीये//

पीक पिकले घुमरी/ प्रेम न समाये अंबरी/

अवघी मातली पंढरी/ घरोघरी सुकाळ//

चालती स्थिर स्थिर/ गरुड टकयांचे भार/

गर्जती गंभीर/ टाळ श्रुती मृदुंग//

मिळाली या भद्र जाती/ कशा आनंदे डुलती/

शूर उठावती/ एक एक आगळे//

नामामृत कल्लोळ/ वृंदे कोंदली सकळ/

आले वैष्णव दळ/ कळी काळ कापती//

आज करिती ब्रह्मादिक/ देखुनी वाळवंटीचे सुख/

धन्य धन्य मृत्यू लोक/ म्हणती भाग्याचे कैसे//

स्मरण मुक्ती वाराणसी/ पितृ ऋण गया नासी/

धार नाही पंढरीसी/ पायापाशी विठोबाच्या//

तुका म्हणे आता/ काय करणे आम्हा चिंता/

सकळ सिद्धीचा दाता/ तो सर्वथा नुपेक्षी//

कार्तिकीच्या वारीचे वर्णन करताना सोबतच्या भक्तांना उद्देशून म्हणतात,

चला हो आपण हा वारीचा सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहू या. या पंढरपुरात प्रत्यक्ष वैकुंठ आपल्याजवळ आले आहे. हरी नामाचा घोष आसमंतात घुमतो आहे, हेच मोठे पीक पिकले आहे. प्रेम आकाशात मावेनासे झाले आहे. हरीच्या प्रेम भावनेने सर्व पंढरपूर दुमदुमले आहे. घरोघरी परमार्थाचा सुकाळ चालू आहे. वैष्णव जन आनंदाने भजन करत हळूहळू थांबत थांबत चालत आहेत. त्यांनी गरुडचिन्हे असलेले ध्वज धारण केले आहेत. टाळ, मृदुंग, एकतारी, वीणा यांच्या साथीने श्रीहरीच्या नामाची गर्जना चालू आहे. मोठमोठे हत्ती गजदळात जसे डोलत असावेत, तसे एकाहून एक श्रेष्ठ विष्णू भक्त आघाडीवर चालत आहेत. भक्त जन समुदाय हरिनामाच्या अमृतघोशाने न्हाऊन निघाला आहे. विष्णू भक्तांचे हे सैन्य पाहून कली आणि काळ थरथर कापत आहेत. पंढरीच्या वाळवंटातील भजनाचे सुख आपल्याला मिळावे अशी सर्व देवांची इच्छा आहे. मृत्युलोक धन्य आहे, तेथील लोक भाग्यवान आहेत. काशीमध्ये मरण आले तर मुक्ती मिळते, पण या पंढरपुरात सर्व काही रोखीने इथेच मिळते. मग चिंता कशाची?

हा संपूर्ण अभंग वाचताना आपणही त्या वारीचाच एक भाग आहोत अशी भावना दृढ होते आणि देवाच्या द्वारी मुक्ती मिळाल्याचा पराकोटीचा आनंद मिळतो.

हे भू वरील वैकुंठ कसे आहे ते आता तुकारामांच्या वाणीतून ऐकूया.

जया दोषा परिहार/ नाही नाही धुंडीता शास्त्र/

ते हरती अपार/ पंढरपूर देखीलिया//

ज्या दोषांची प्रायश्चित्ते कोणत्याही शास्त्रात सापडत नाहीत, अशी पातके जरी हातून घडली तरी नुसत्या पंढरपुराच्या दर्शनाने ती नाहीशी होतात असा महिमा आहे.

धन्य धन्य भीमातीर/ चंद्रभागा सरोवर/

पद्म तिर्थी विठ्ठल वीर/ क्रीडा स्थळ वेणू नाद//

सकळ तीर्थांचे माहेर/ भू वैकुंठ निर्विकार/

नामाचा गजर/ असूर काळ कापती//

पंढरपूर हे भूतलीचे वैकुंठ आहे, सर्व तीर्थांचे जन्मस्थान आहे, तेथे कोणताही विकार नाही, तेथे हरी नामाचा गजर होतो त्यामुळे असुरांना, कळी काळाला कंप सुटतो.

नाही उपमा द्यावया/ समतुल्य आणिक ठाया/

धन्यवाद जया/ जे पंढरपूर देखती//

या क्षेत्राला दुसरी कशाचीही उपमा देता येत नाही. ज्यांना ज्यांना पंढरपूरचे दर्शन झाले, ते सर्व धन्य होत.

उपजोनी संसारी/ एक वेळ पाहे पा पंढरी/

महादशा कैची उरी/ देवभक्त देखीलिया//

जन्माला येऊन एकदा तरी पंढरीचे दर्शन घ्यावे. येथील पांडुरंग आणि भक्त पुंडलिक यांच्या दर्शनाने महापातके नष्ट होतात.

ऐसी विष्णूची नगरी/ चतुर्भुज नर नारी/

सुदर्शन घरटी करी/ रीघ न पुरे कळी काळा//

ते सुख वर्णावया गती/ एवढी कैची मज मती/

जे पंढरपुरा जाती/ ते पावती वैकुंठ//

अशी ही विष्णूची नगरी आहे. तेथील स्त्री-पुरुष चतुर्भुज संपन्न आहेत. सुदर्शन त्यांचे रक्षण करीत आहे, त्यामुळे काळाला इथे प्रवेश नाही. तुकाराम महाराज म्हणतात, अशा या पंढरपुराचे सुख वर्णन करण्याइतकी बुद्धी मजपाशी नाही. जे पंढरपुरास जातात त्याला वैकुंठप्राप्ती होते.

तुका म्हणे या शब्दांचा/ जया विश्वास नाही साचा/

तो अधम जन्मांतरीचा/ जया पंढरी नावडे//

त्यांचे असे म्हणणे आहे की या गोष्टींवर ज्यांचा विश्वास नाही आणि ज्यांना पंढरीची आवड नाही तो पूर्वजन्मीचा अधम होय.

तीर्थ केली कोटीवरी/ नाही देखिली पंढरी/

जळो त्याचे ज्यालेपण/ न देखेची समचरण//

योग याग अनंत केले/ नाही समचरण देखिले/

तुका म्हणे विठ्ठल पाई/ अनंत तीर्थे घडली पाही//

पंढरपूरचा महिमा महाराज सांगत आहेत. कोट्यावधी तीर्थयात्रा केल्या तरी ज्याने पंढरी पाहिली नाही त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही

(आग लागो त्याच्या जगण्याला) कारण विटेवरी पांडुरंगाच्या समचरणांचे दर्शन ज्यांना लाभले नाही त्यांनी कितीही योगयाग केले तरी सारे व्यर्थ आहे. एका पांडुरंगाच्या चरणस्पर्शातच अनंत तीर्थे केल्याचे पुण्य आहे.)

क्रमशः… २७ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ महावस्त्राचे पदर – भाग १ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? विविधा ?

☆ महावस्त्राचे पदर – भाग १ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

महावस्त्र नात्यांचं

  ‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे,

 जरतारी हे वस्त्र मानवा तुझिया आयुष्याचे..’

अतिशय अर्थपूर्ण असं हे गाणं. आपल्या आयुष्याला तंतोतंत लागू पडणारं. क्षणभर त्यातील सुखदुःखाचा विषय आपण बाजूला ठेवू, पण आपलं आयुष्य हे एक सुंदर असं जरतारी वस्त्र आहे. जेव्हा आपण नात्यांचा विचार करतो, तेव्हा हे एका ‘महावस्त्राचं’ रूप घेतं.

आपण ज्या घरात जन्म घेतो, त्या घरापासून आणि जन्मापासून काही नाती आपल्याला उपजतच मिळतात. आई, वडील, बहीण, भाऊ यासारखी अनेक नाती रक्ताची असतात. पण आपण समाजात जसजसे मोठे होत जातो, तशी आणखीही अनेक नाती आपल्याशी जोडली जातात. मग ती नाती बऱ्याच वेळा रक्तापलीकडची असतात. अशी बिनरक्ताची नाती कित्येकदा रक्ताच्या नात्यापेक्षाही घट्ट असतात. अशी सगळी नाती मिळून तयार होतं ते भरजरी महावस्त्र ! यातील मधले एकमेकात गुंफलेले घट्ट धागे असतात रक्ताच्या नात्यांचे; बाजूची रुपेरी किनार असते समाज नावाच्या नात्याची; आणि पदरावर जी मोरपंखी नक्षी असते ना, ती असते जिवलग मित्रांची! त्यांच्यामुळेच ही भरजरी पैठणी शोभून दिसते. वस्त्राला ‘पट’ असाही एक सुंदर शब्द आहे. आपल्या आयुष्याचा पट अशा अनेक रंगीबेरंगी धाग्यांनी विणला गेलेला असतो. 

पण… पण… असा भरजरी पट प्रत्येकाच्याच नशिबी येतो का? कदाचित नाही. कुणाच्या वाट्याला महावस्त्र येतं, तर कुणाच्या वाट्याला जाडंभरडं वस्त्र. कुठे या महावस्त्राचे इंद्रधनुषी रंग शोभून दिसतात, तर कुठे ते फिकट झालेले असतात. पण जे वस्त्र आणि जसं वस्त्र तुमच्या वाट्याला आलं असेल, ते तुम्हाला स्वीकारावंच लागतं. काही जण आपल्या कर्तृत्वाने या वस्त्रात इतके सुंदर रंग भरतात की साध्या वस्त्राचंही महावस्त्र होतं; आणि दुर्दैवाने एखादी व्यक्ती आपल्याला मिळालेलं भरजरी वस्त्रही मातीमोल करते.

महाभारतातल्या कर्णाचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. खरं तर तो ज्येष्ठ कुंतीपुत्र आणि अत्यंत तेजस्वी असा सूर्यपुत्र. राज्यावर पहिला हक्क त्याचा. पण जन्म होतो आणि त्याचा त्याग त्याच्या आईलाच करावा लागतो. तरीही, आपल्या पराक्रमाने आणि कर्तृत्वाने आपल्याला मिळालेल्या या जाड्याभरड्या वस्त्राचं रूपांतर तो महावस्त्रात करतो. तो अभिमानाने सांगतो:

सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम्।

दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्॥

(मी विणकर वा विणकर पुत्र जे काही असेल ते दैवामुळे आहे. कोणत्या कुळात जन्म घ्यायचा हे माझ्या हातात नाही, पण माझ्या कर्तृत्वाने आणि पराक्रमाने मोठे व्हायचे की नाही ही गोष्ट नक्कीच माझ्या हातात आहे.)

याउलट रावणाचं उदाहरण जर आपण पाहिलं तर असं दिसतं की रावण ऐश्वर्यसंपन्न होता, शक्तिमान होता, विद्वान होता, शंकराचा परमभक्त होता, लंकेसारख्या सुवर्णनगरीचा राजा झाला होता. एका अर्थाने त्याच्या पदरात पडलेले हे महावस्त्रच होते. पण आपल्या नैतिक अध:पतनाने आणि अहंकारामुळे त्याने या वस्त्राचे पार पोतेरे केले.

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे असं आपण म्हणतो, पण माणसाला ‘माणूस’ म्हणून जगण्याचं बळ देणारी खरी शक्ती नात्यांमध्ये असते. जन्माला आल्यापासून ते आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण अनेक नात्यांच्या धाग्यांनी वेढलेले असतो. काही नाती रक्ताची असतात, तर काही नाती प्रेमाची, विश्वासाची आणि कर्तव्याची असतात. ही नात्यांची वीण जेवढी घट्ट, तेवढं कुटुंब निकोप; आणि कुटुंब जेवढं निकोप, तेवढा समाज आणि देश सुदृढ. नाती ही केवळ आपणा सर्वांना एकमेकांशी जोडणारी साखळी नसून, ती संपूर्ण समाजाला अंतर्गत ऊर्जा देणारी एक जिवंत व्यवस्था आहे. म्हणूनच, मिळालेली नाती जपायला हवीत, वाढवायला हवीत.

नात्यांमध्ये एक अद्भूत सामर्थ्य असतं. ती जशी कुटुंब आणि समाजाला एकत्र बांधून ठेवतात, जोडतात; तशीच जर ती कमकुवत झाली, तर संपूर्ण व्यवस्था तोडण्याची विनाशकारी ताकदही त्यांच्यात असते. एका सुताचा धागा कमकुवत झाला की अख्खं वस्त्र विस्कळीत व्हावं, तसंच एखाद्या नात्यात वितुष्ट आलं की संपूर्ण कुटुंब कोलमडून पडतं. म्हणूनच, निकोप नात्यांमधून निकोप कुटुंब आणि निकोप कुटुंबांमधून एका निकोप, बलशाली राष्ट्राची निर्मिती होत असते. देश जोडायचा असेल, तर आधी घराघरातील नात्यांचा सांधा भक्कम असावा लागतो.

आपल्या भारतीय संस्कृतीचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या ऐतिहासिक, सामाजिक आणि अध्यात्मिक परंपरांचा या नात्यांवर असलेला गहिरा प्रभाव. आपल्याकडे नात्यांकडे केवळ एक ‘करार’ (Contract) म्हणून पाहिले गेले नाही, तर ती एक साधना मानली गेली आहे. आपल्या परंपरा जेवढ्या उज्वल, तेवढाच आपल्या नात्यांचा दर्जाही उच्च आणि उदात्त राहिला आहे.

याचा सर्वात मोठा आणि आदर्श वस्तुपाठ आपल्याला ‘रामायण’ काळात पाहायला मिळतो. रामायणाने मानवी नात्यांचे जे आदर्श निर्माण केले, ते आजही मानवी संस्कृतीचे दीपस्तंभ आहेत. पित्याचे वचन पाळणारा पुत्र, पुत्रासाठी प्राण त्यागणारा पिता; वशिष्ठांसारखे ऋषितुल्य गुरु आणि त्यांच्या चरणी लीन होणारा शिष्य; राम-लक्ष्मण-भरत यांच्यातील नि:स्वार्थ बंधुप्रेम; सुग्रीव आणि बिभीषणासारखे मित्र; हनुमंतासारखा परमभक्त आणि सेवक; आणि सुख-दुःखात सावलीसारखी पाठीशी राहणारी पत्नी… रामायणातील प्रत्येक नातं कर्तव्याच्या आणि त्यागाच्या एका अत्युच्च पातळीवर विणलं गेलं होतं. तिथे स्वार्थाला जागा नव्हती, म्हणूनच तो रामराज्य नावाचा एक सुवर्णकाळ ठरला.

परंतु, काळाचे चक्र फिरले आणि ‘महाभारत’ काळात ही परंपरा काहीशी खंडित झाली, नव्हे ती कलंकित झाली. महाभारताचा पट हा मानवी नात्यांच्या विस्कळीतपणाचा आणि मर्यादांचा पट आहे. तिथे सत्तेचा लोभ, अहंकार आणि महत्त्वाकांक्षा एवढीणी टोकाला गेली की, रक्ताची नाती एकमेकांच्या रक्ताची तहानलेली झाली. गुरु-शिष्याचे नाते, बंधुत्वाचे नाते, ज्येष्ठ-श्रेष्ठांचे मान-सन्मान सत्तेच्या सारीपाटावर पणाला लावले गेले. जेव्हा नात्यांमध्ये कर्तव्याऐवजी स्वार्थ आणि प्रेमाऐवजी मत्सर जागा होतो, तेव्हा महाभारतासारखा विनाश अटळ असतो, हाच धडा आपल्याला इतिहासाने दिला.

आज आपण एकविसाव्या शतकाच्या उत्तरार्धात, म्हणजे वर्तमान परिस्थितीत जगत आहोत. आजची कुटुंब व्यवस्था एका अत्यंत संवेदनशील वळणावर उभी आहे. काळाने आणि आधुनिकतेने आपल्यासमोर अनेक नवी आव्हाने उभी केली आहेत. तंत्रज्ञानाच्या जाळ्याने आपल्याला जगभरातल्या लोकांशी जोडले असले, तरी शेजारी बसलेल्या आपल्या माणसापासून आपण दुरावत चाललो आहोत की काय, अशी भीती वाटू लागली आहे. एकत्र कुटुंब पद्धती मागे पडून विभक्त कुटुंबे आली आणि आता तर ‘फ्लॅट संस्कृती’मध्ये माणसे अधिक आत्मकेंद्रित होऊ लागली आहेत. नात्यांची वीण उसवू लागली आहे. नात्यांच्या या महावस्त्राचं रूपांतर एखाद्या टॉवेलमध्ये होतं की काय, अशी भीती वाटू लागली आहे. टॉवेलला आपण गरजेपुर्ते हात पुसतो आणि बाजूला ठेवतो. नाती अशी असतात का ?

आजच्या या गतिमान, यांत्रिक युगात संवाद हरवत चालला आहे आणि जिथे संवाद संपतो, तिथे नात्यांची वीण सैल होऊ लागते. संवाद नसलेली नाती म्हणजे केवळ नावापुरती उरलेली नात्यांची एक चौकट. आजच्या तरुण पिढीसमोर आणि आपल्या सर्वांसमोरच हे मोठे आव्हान आहे की, या बदलत्या काळात नात्यांमधील पूर्वीचा तो ओलावा, तो जिव्हाळा आणि ती विश्वासाची ऊब कशी टिकवून ठेवायची? एक गोष्ट मात्र नक्की की स्नेहजलाचं सिंचन झालं की नाती उमलून येतात. स्नेह जाऊन त्याची जागा स्वार्थाने घेतली की नाती कोमेजतात. म्हणूनच जिथे अकृत्रिम प्रेम असते आणि केवळ स्वार्थाला थारा नसतो तिथले नात्यांचे रंग कधीही फिके होत नाहीत.

याच सगळ्या गदारोळात, मनात एका नव्या सृजनाचा अंकुर फुटला. मनात आले, काळाच्या प्रवाहात आपण जे मागे सोडत चाललो आहोत, याची पुनश्च एकदा जाणीव करून द्यायला हवी. वस्त्रातील उभे-आडवे धागे जसे प्रेमाने एकत्र येतात आणि एकमेकांना घट्ट पकडून ठेवतात, तसाच हा दिशाहीन होत चाललेला समाज पुन्हा एकदा नात्यांच्या सूत्रात गुंफायला हवा. या विचारातूनच ‘नात्यांचं महावस्त्र’ या लेखमालेचा जन्म होतोय.

महावस्त्र हे वेगवेगळ्या रंगांच्या, रेशमी मुलायम पण बळकट अशा धाग्यांच्या एकत्र विणण्यातून तयार होतं. या लेखमालेच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यातील अशाच काही अमूल्य, रेशमी नात्यांचे पदर उलगडणार आहोत. आईचे नि:स्वार्थ वात्सल्य, बाबांचे आकाशाएवढे छत्र, आजी-आजोबांच्या संस्कारांची शिदोरी, भाऊ-बहिणीचे निखळ प्रेम, मावशी आणि काकांचा मायेचा आधार, सुख-दुःखात पाठीशी राहणारा मित्र आणि आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा गुरु… या सर्व नात्यांच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

या महावस्त्राचा एक-एक धागा आपण अत्यंत मायेने आणि जिव्हाळ्याने जाणून घेण्याचा प्रयत्न करू या. हे महावस्त्र जितकं सुंदर विणलं जाईल, तेवढं आपलं घर, आपला समाज आणि आपले जगणं अधिक सुकर आणि आनंदी होईल. या वैचारिक आणि भावनिक प्रवासात आपण माझ्या सोबत नक्कीच असाल, ही खात्री आहे.

(पुढील भाग दर रविवारी)

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मैत्र… ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ मैत्र… ☆  कल्याणी केळकर बापट ☆

काल व्हॉट्स ॲप वर एक खूप विचारात पाडणारा फोटो बघितला. त्या फोटोमध्ये दहा वर्षांच्या अंतराने छोट्या चार स्टेजेस दाखवण्यात आल्या होत्या. साधारण 1995 मधील फोटोत सहा सात समवयस्क मित्र घोळका करून बसले असतात आणि मनमोकळी विचारांची देवाणघेवाण करीत असतात. दुसऱ्या फोटोच्या भागात ही मित्रांची संख्या थोडी कमी होते. हा फोटो साधारण 2005 मधील. पुढील 2015 सालच्या फोटोत ही मित्रांची संख्या जरा जास्तच रोडवते आणि अगदी दोन तीन मित्र साथीला असतात. आणि शेवटचा फोटो 2025 मधील ह्यात तो मुलगा एकटाच बसला असून बाजूला म्हणजेच साथीला व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि अशीच मंडळी असतात.

खरं सांगायचं तर कोंबडी आधी की अंडे आधी ह्या न उत्तर मिळणाऱ्या प्रश्ना सारखा प्रश्न मनात लगेच येतो की मित्रांची संख्या घटल्याने वा दुर्मिळ झाल्याने ह्या आभासी गोष्टींची मदत घेतल्या जाते की ही मदत घेऊन आभासी गोष्टींना जवळ केल्याने मित्र दुरावल्या जातात ?

ह्या गोष्टीचा विचार करता एक गोष्ट नक्की. “मैत्र” ह्या संकल्पनेत झपाट्याने बदल होत गेला. सहसा सगळ्यात पहिल्यांदा मैत्रीची जाणीव अगदी बालवयात शेजारी राहणाऱ्या समवयस्क मुलांकडून होत असे. आणि ही अगदी सुरवातीची घट्ट मैत्री पुढे काही काळाने परिस्थिती मुळे दूर गेल्यासारखी वाटली तरी मनात मात्र त्या जुन्या लहानपणच्या मैत्रीचे धागे घट्ट गुंफल्या गेलेले असतात. मैत्रीची जपणूक करण्यासाठी द्यावा लागतो वेळ, कायम मदतीचा हात आणि परस्परांमध्ये हवी सद्भावना.

आभासी जगातील मैत्र हे खरं, कायमस्वरूपी टिकणारे मैत्र नव्हेच. फ्लॅट संस्कृती मधील कायमदार बंद संस्कृती ही अनमोल मैत्र गमावतेय हे नक्की.

 

©  कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ योगाभ्यास : एक मानसोपचार… ☆ सौ. प्रतिभा संतोष पोरे ☆

प्रतिभा संतोष पोरे 

 

☆ योगाभ्यास : एक मानसोपचार…  ☆ प्रतिभा संतोष पोरे ☆

☆

भारत देशास सुवर्णभूमी असे म्हणत याचे कारण म्हणजे देशातील सोन्याच्या खाणी नव्हेत तर भारतात असणारी नराला नारायण बनवणारी ग्रंथसंपदा होय. न्याय, मीमांसा, सांख्य, योग यासारखी शास्त्र किंवा दर्शन होय. भारताचे मानव जातीला सर्वात मोठे कोणते योगदान

असेल तर ते म्हणजे योगशास्त्र होय. योगशास्त्र म्हणजे जीवन- विज्ञान. जीवन जगण्याचे शास्त्र. ५००० वर्षापूर्वी ऋषीमुनींनी आपल्या दिव्य आकलन शक्ती, बुद्धीमत्ता, दूरदृष्टी आणि तपश्चर्येने विकसित केलेले योगशास्त्र आजच्या ताणतणावांच्या, संघर्षमय जीवनातही अत्यंत उपयोगी ठरत आहे. आज संपूर्ण जगात भारताकडे आदराने बघण्याचा दृष्टीकोन दिसत आहे हीच गोष्ट योगाची क्षमता योग्यता सिद्ध होण्यास पुरेशी आहे.

आजकाल हार्ट अ‍ॅटॅकने जाण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. बीपी, शुगरचे पेशंट घरोघरी आहेत. या शारीरिक आजारांवर नियंत्रण करायचे असेल किंवा होऊ नयेत म्हणून प्रतिबंधक उपाय करायचे असतील तर योगाशिवाय दुसरा पर्याय नाही. योगासन, प्राणायाम यांच्या नियमित अभ्यासाने आपणास निरामय आरोग्य निश्चितच लाभते. आपला आत्मविश्वास, निर्णय घेण्याची क्षमतादेखील वाढते.

आज काल चंगळवादी जीवनशैलीत माणसाकडे कितीही वस्तू असल्या तरी तो असमाधानी व अशांत आहे. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तीनही पातळींचा समतोल बिघडल्यामुळे तो अनेक मनोविकारांना बळी पडत आहे. मानसिक विकारांचा विळखा जगभरातील सर्वच लोकांभोवती पडत आहे. विकसित देशांमध्ये मानसिक विकार आणि पीडित लोकांचे प्रमाण भयावह आहे. सर्व भौतिक सुखं प्राप्त झाली म्हणजे मला आनंद व शांती मिळेल हा केवळ भ्रम आहे, हे आज लोकांना पटू लागले आहे. दरवर्षी जगभरातील आठ दशलक्ष मृत्यू मानसिक विकारांमुळे होतात. कॅलिफोर्निया ३९६००० तरुणांना नैराश्याने ग्रासले आहे. भारतात १९. ७% म्हणजेच वीस कोटी लोक मानसिक आजारांनी त्रस्त आहेत. त्यापैकी ४. ६ कोटी लोक नैराश्याने (डिप्रेशन) तर ४. ५ कोटी लोक अँक्झायटीने ग्रासले आहेत असा निष्कर्ष इंडिया स्टेट लेवल डिसीज बर्डन इनिशिएटिव्हने काढला आहे. जर तुम्ही तुमच्या शारीरिक फिटनेस बाबत जागरूक असाल आणि मानसिक आरोग्याचा विचार जराही करत नसाल तर आता तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हे सुचित करण्याचे कारण म्हणजे भारतात दर सात व्यक्तींमागे एक व्यक्ती मानसिक आजाराने ग्रासली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही माहिती ‘लॅन्सेट सायकॅट्री’ नावाच्या जर्नल मध्ये प्रसिद्ध झाली आहे. जगातील निम्मी लोकसंख्या मानसिक विकार अनुभवेल असे भाकीत हार्वर्ड मेडिकल स्कूल ने केले आहे.

मानसिक विकारांची यादीही भरपूर मोठी आहे. भिती वाटणे(फोबिया), अँक्झायटी डिसऑर्डर, बाॅडी डिसमार्फिक डिसऑर्डर, सायकोसोमॅटिक डिसऑर्डर, व्यसनाधीनता, डिप्रेशन इ. यामध्ये रुग्ण मनोरंजन, छंद, सामाजिक संवादामध्ये सारस्य किंवा आनंद गमावतो. भूक, झोप खूपच जास्त लागते किंवा फारच कमी होते. लक्ष केंद्रित करणे किंवा एखादा निर्णय घेता येत नाही. संवाद टाळणे, कुटुंबापासून स्वतःला वेगळे करणे, उदासीनता येते त्यामुळे डोकेदुखी पोटदुखी हे आजार बळावतात. मृत्यूचे किंवा आत्महत्येचे विचार सतत मनात येतात.

हे मनोविकार लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयाच्या व्यक्तींमध्ये, स्त्री-पुरुषांमध्ये आढळत आहेत. मनोविकारांवर वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत. आपल्या मनातील चिंता, दुःख, राग या भावना आपल्या मेंदूतील लिम्बिक सिस्टीम मधल्या मज्जापेशींच्या उत्तेजित अवस्थेमुळे तयार होतात. याला मेंदूतील संदेश वाहक रसायने कारणीभूत असतात. सिरोटोनिन, नॉरएपिनेफ्रीन, डोपामाईन आणि गॅमा अमिनो ब्यूट्रिक ऍसिड (गाबा) ही मुख्य चार संदेश वाहक रसायने आहेत. ही रसायनं तयार होण्याचे प्रमाण कमी किंवा जास्त झाले की भूक न लागणे, झोप न येणे, नकारात्मक विचार वाढणे, चिडचिड वाढणे, इत्यादी अनेक दुष्परिणाम होतात आणि यामुळे मानसिक विकार बळावतात. यावर उपाय म्हणून डॉक्टर या रसायनांची पातळी वाढवणारी किंवा कमी करणारी व्हॅलियम, ऍटिव्हॅन वगैरे औषधे देतात. इतर काही मनोविकारांवर अँटिसायकॅटिक, अँन्टीडिप्रेसंट्स, अँन्टीअँक्झायटी अशी औषधे दिली जातात. या औषधांमुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. हे साईड इफेक्ट फार भयानकही असतात. औषधांबरोबरच डॉक्टर वेगवेगळ्या उपचार पद्धती सायकोथेरपी, बिहेवियरल थेरपी, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी, (सीबीटी), इलेक्ट्रोकन्व्हलसिव्ह थेरपी वापरतात. पण सर्वात महत्त्वाची परिणामकारक थेरपी म्हणजे योग थेरपी होय.

अजिंक्य आणि बलवान धनुर्धारी अर्जुन समोरील आप्तस्वकीयांना कसे मारू या चिंतेने अस्वस्थ झाला होता, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी समुपदेशन करून श्रीमद्भगवद्गीता सांगून अर्जुनाला भयमुक्त व चिंतामुक्त केले आहे.

योगो भवती दुःखहा म्हणजे योगामुळे सर्व दुःखांचा नाश होऊ शकतो. असे भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलेले आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की योग हा फक्त शारीरिक व्याधी निवारण्यासाठी किंवा स्थूलता कमी करण्यासाठी उपयुक्त आहे परंतु तसे नाही. योग हा मनाच्या क्रियेशी संबंधित आहे. योगामुळे मनाची एकाग्रता तर वाढतेच पण मनाचे संतुलन आणि मनःशांती यांचा लाभ होऊन आरोग्यही चांगले राहते. योग साधला तर माणसात शारीरिक व मानसिक कार्यक्षमता निर्माण होते. योगाभ्यासामुळे चिरंतन आनंद, परिपूर्णता व शांती यांचा लाभ होतो. मन ही आत्मशक्ती असून या मनातूनच परमेश्वर विश्व आकारतो. मन अत्यंत सूक्ष्म शक्तीतून बनले आहे. प्राणाची कंपने या मनावर उमटतात आणि विचारांची निर्मिती होते. अशा विचारांचे ठसे मनावर उमटत राहतात. मनावरील राग, लोभ, द्वेष, अहंकार, लालसा या तरंगांमुळेच मन कायम अशांत असते. ज्याचा आपण अतिशय विचार करतो त्याचेच रूप मन धारण करते हा मानसशास्त्रीय नियम आहे. सर्व इंद्रिये ही सैनिक असून त्यांच्यावर नियंत्रण करणारा सेनापती हे मन आहे. मनोविकार झालेल्या रुग्णांचे मन अतिशय दुर्बल झालेले असते. बुद्धीचा त्यावर ताबा रहात नाही म्हणूनच मनावर ताबा मिळवणे गरजेचे असते.

शरीर व मन यांना जोडणारा धागा म्हणजे प्राण होय. म्हणूनच प्राणावर ताबा मिळवला तर मनावर ताबा मिळवणे शक्य होते. जीवनाचे तत्व ऊर्जा शक्ती म्हणजेच प्राण होय. डोळे, नाक, कान, त्वचा, जीभ या ज्ञानेन्द्रियांचे काम, शरीरातील पचन, रक्ताभिसरण, पोषण, श्वासोच्छ्वास ही सर्व कार्ये प्राण शक्तीमुळेच चालतात. चेहऱ्यावरील हसू, संगीतातील माधुर्य, बोलण्यातील गोडवा, डोळ्यातील चमक हे सर्व प्राणशक्तीनेच होते म्हणूनच जर प्राणावर काबू मिळवला तर सहजपणे मनावर ताबा मिळवता येऊ शकतो. ज्ञानतंतूतील प्रवाह व विचारशक्ती हे देखील प्राणाचे प्रकटीकरण आहे. श्वास हे प्राणाचे बाह्यरूप आहे. म्हणून श्वासावर नियंत्रण ठेवले की प्राणावर ताबा मिळवता येतो व प्राणावर ताबा मिळवला तर मनावर ताबा मिळवता येतो. म्हणून श्वासावर नियंत्रण मिळवण्यासाठी नियमित प्राणायाम करणे अत्यंत गरजेचे आहे. प्राणायामाच्या सरावाने मनाचा समतोल ठेवण्यास मदत होते.

योग सायकॉलॉजी ही एक शाखा आता जोर धरायला लागली आहे. या शाखेतल्या विषयाची मुळं प्राचीन भारतातल्या ज्ञानावर आधारित आहेत. योगाचे वर्णन ऋग्वेदात व अथर्ववेदात केलेले आहे. मात्र योगाचे सर्वात शिस्तबद्ध संकलन महर्षी पतंजलीच्या योगसूत्रात आहे. मानसशास्त्रीय थेरपीज मध्ये योग सूत्रांचा वापर होऊ शकतो का? यावर सध्या संशोधन सुरू झाले आहे. काही मनोविकारांवर योगशास्त्रांचा हमखास उपयोग होतो.

आपल्या मनातील चिंता, दुःख, राग या भावना मेंदूतील रसायन सिरोटोनिन, नॉरएपिनेफ्रीन, डोपामाईन आणि गाबा यांच्याशी निगडित असतात. योगासन व प्राणायाम करण्याने या रसायनांचा समतोल राखला जातो रुग्ण पूर्ववत आनंदी व प्रसन्न होऊन सामान्य जीवन जगू शकतो.

मनोविकार असणारा रुग्ण जर स्वतःची दैनंदिन कामे करीत असेल आणि त्याने औषधांसोबत योगाभ्यास केला तर तो निश्चितच लवकर बरा होऊ शकतो. प्राणधारणा, कपालभाती, उज्जायी, अनुलोम विलोम आणि ओंकार इत्यादी प्राणायाम नियमितपणे केल्यास फायदा होतो. त्याचबरोबर रुग्णांनी शक्य असेल तर त्याच्या क्षमतेनुसार शवासन, मकरासन, कटिवक्रासन, भुजंगासन, नौकासन, ताडासन, पवन मुक्तासन, पर्वतासन इत्यादी असने करावयास हरकत नाही परंतु हा सर्व अभ्यास योग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करावा. काही मनोविकारांमध्ये योगनिद्रा ही फार महत्त्वाची ठरते. धारणा, ध्यान याही गोष्टींचा मनोविकारांमध्ये खूप चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो.

मनोविकार न झालेल्या व्यक्तींना ते होऊ नयेत व आयुष्याकडे पाहण्याचा एक सकारात्मक दृष्टीकोन तयार व्हावा तसेच शारीरिक आजारांवर नियंत्रण ठेवून निरोगी राहण्यासाठी योगाभ्यास अत्यंत आवश्यक आहे. नव्हे ही तर सध्याच्या काळाची नितांत गरज आहे. म्हणूनच चला, योगाकडे वळूया, योगाभ्यास करूया.

सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः।

सर्वे भद्राणि पश्यंतु, माकश्चिद् दुःखभागभवेत्।।

© प्रतिभा पोरे

पत्ता – ‘सोनतुकाई’, शांतीसागर कॉलनी, सांगली – भ्रमणध्वनी क्रमांक – ८७८८४५८६२४

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “मी ‘मोल’करीण” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

☆ “मी ‘मोल’करीण” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

मी ‘मोल’ करीन!

कोणत्या कामाचं किती मोल करावं हे परिस्थिती ठरवते. मूल्य या संस्कृतातील शब्दाचं आजचं रूप म्हणजे मोल! यातून अमोल, अमूल्य, अनमोल, मौल्यवान इत्यादी शब्द आले असावेत.

आधुनिक जीवनपद्धतीत, विशेषत: नोकरी करणा-या महिलांना घरकामात मदत ही अपरिहार्यच ठरली आहे. आहे रे (haves) गटातील माणसांना यामुळेच नाही रे (have nots) गटातील माणसांना जवळ करावे लागते. आणि या दोन्ही गटांतील लोकांचे एकमेकांचे सहसंबंध कालपरत्वे बदलत जाताना दिसतात.

मोलकरीण हा शब्द आता मागे पडला असून कामवाली बाई आणि हल्ली नुसतंच बाई असं म्हटलं जातं. इंग्रजी माध्यमात शिकणारी तथाकथित उच्च मध्यमवर्गातील मुलं मराठी शाळेतली मुलं त्यांच्या शिक्षकांना बाई म्हणत असली की त्यांची टिंगल करतात! बाई हा अत्यंत सन्मानदर्शक शब्द असा भलत्याच अर्थाने रूढ होऊ पाहतो आहे. काही ठिकाणी ताई, मावशी हे शब्द वापरले जातात. पण मावशी हा शब्द आता रूग्णालयामध्ये सेवा करणा-या महिलांना आणि मामा हा शब्द तेथे काम करणा-या पुरूषांना चिकटवला गेला आहे!

अगदी फार पूर्वी केवळ अतिश्रीमंत कुटुंबांनाच घरकामासाठी माणसं नोकरीत ठेवणं परवडत असे. ती गरजही होती आणि प्रतिष्ठीतपणाचं एक लक्षणसुद्धा. राजेराजवाडे त्यांच्या मुलींना लग्नात भेट म्हणून काही दासीही तिच्यासोबत धाडून देत.

अर्थात अपवादात्मक परिस्थितीमध्येच, पण घरकामासाठी जाणा-या महिलांना संबंधित घरातील ज्येष्ठ महिला आणि काहीवेळा पुरुषांच्या विचित्र वागण्यास तोंड द्यावे लागते… असे ऐकले आहे.

संबंधित महिला काम करीत असताना तिच्या मागे कमरेवर हात ठेवून तिच्यावर पर्यवेक्षण करणे, अति सूचना करणे म्हणजे बारीक लक्ष ठेवणे हा एक प्रकार असतो. यामुळे काही घरांत कामवाल्या टिकत नाहीत, असा अनुभव आहे.

प्रत्येक घरातील स्वयंपाकाची पद्धत, भाषा निराळी असते. त्यामुळे दुस-या महिलेच्या हाताच्या पोळ्या, भाजी, घासलेली भांडी, धुतलेले कपडे, केलेली स्वच्छता आणि भाषा, लहेजा निश्चितपणे निराळा असणारच… पण यावर काही मालकिणी किंवा त्यांच्या घरातल्या ज्येष्ठ महिला कटाक्ष ठेवून असतात.

एक आजीबाई तर बाई भांडी घासून गेल्या की, ती भांडी पुन्हा एकदा विसळून घेत. सुनेने कामवाल्या ताईस अर्धा कप चहा दिला तर चहाचे महिन्याभराचे किती पैसे होतील? असा सवाल सासू विचारू शकते.

आपल्या घरात अन्न शिजवणा-या व्यक्तीची त्या अन्नावर वासना जाणे काही अगदीच अशक्य नाही. त्यामुळे त्यांना त्याचा एखादा भाग खायला देणे हे काही फार चुकीचे ठरत नाही.

या व्यवसायात असलेल्या महिलांची कर्मकहाणी अत्यंत वेगळीही असू शकते. दारुडा नवरा आणि मोलकरीण हे समीकरण तसे बरेच रूढ होते. आता अगदीच तसे नसले तरी संसाराला हातभार लागावा म्हणून चार घरची कामे करणा-या अत्यंत व्यावसायिक महिलाही आढळून येतात… आणि यात काहीही गैर नाही.

अन्नाची, पैशांची, दागिन्यांची, वस्तूंची चोरी करणे, सतत रजा घेणे, चहाड्या करणे, घरातील चर्चेत आपली मते मांडणे, पगार वाढवला जावा म्हणून अनेक खटपटी करणे, उसने पैसे घेणे, न सांगता काम सोडून निघून जाणे, एखाद्या महिलेला एखाद्या घरात काम धरू नको म्हणून धमकावणे इत्यादी अनेक तक्रारीही या महिलांच्याबाबतीत असतात, आणि त्यात तथ्ये आहेत. पूर्वीच्या काळी अत्यंत प्रामाणिक म्हणून ख्याती असलेल्या समाजघटकातील लोकही आता जबरी चोरी, खून करताना आढळत आहेत. पण बदलत्या सामाजिक, नैतिक परिस्थितीचा हा परिणाम आहे. पण म्हणून सर्वच महिलांवर असा शिक्का मारणे योग्य नाही. आपल्या घरात कामासाठी नेमल्या जाणा-या व्यक्तींची खातरजमा करून घेणे, ही आपलीच जबाबदारी ठरते.

प्राप्त परिस्थितीला सामोरे जात अनेक महिलांना हा व्यवसाय पत्करावा लागतो. यांपैकी अनेक महिलांनी जिद्दीने त्यांच्या मुलांना शिकवून मोठे केल्याचीही उदाहरणे भरपूर दिसतील. यासाठी मालकांचे सहकार्य मात्र लागतेच. आणि हे ओळखून मदत करणारी माणसं खरंच मोठ्या मनाची असतात. घरातील महिलांचे आणि घरकामासाठी येणा-या महिलांचे जीवाभावाचे नाते निर्माण झाल्याचेही दिसून येते. मोलकरणीच्या मुलींनी शिकावे यासाठी आग्रह धरणारी कुटुंबेही आहेतच, हे समाजाचे सुदैवच आहे! याच बरोबर मोलकरणीच्या लहान मुलींनी सुद्धा आपल्याकडेच मोलकरीण म्हणून कामाला यावे, असे वाटणारी माणसेही कमी नाहीत.

मोलकरीण मुलीच्या लग्नात कन्यादान करणारे सुशील लोकही असतात. वधू-वर सूचक मंडळ चालवणा-या एका व्यक्तीने त्यांच्या घरी घरकाम करणा-या एका परित्यक्त मुलीचे लग्न जुळवून दिल्याचेही समजले.

पण काही महिलांना अत्यंत दुर्दैवाने एखाद्या कुटुंबातील ज्येष्ठ पुरुष सदस्याकडून काही उपद्रव होण्याची शक्यता असते. काही महिला केवळ पोटासाठी हे प्रकार सहनही करतात. मोलकरीण आणि त्या घरातील पुरुष यांच्यातील विशिष्ट संबंध यांबाबत चित्रपटांतून विचित्र चित्रणही पहायला मिळते, पण हे ठीक नाही.

काही कुटुंबांत कित्येक वर्षांपासून सातत्याने सेवा करणा-या महिला आढळतात. त्यांच्या समोरच त्या घरांतील मुळे लहानाची मोठी झालेली असल्याने या महिलांचा या मुलांवर जीव असणे, त्यांनी त्यांना चांगल्या सवयी लागाव्यात म्हणून दटावणे असेही प्रकार आढळतात. एखाद्या कुटुंबात जर सुनेचा/सासूचा छळ होत असेल तर त्या घरातील पुरुषांना चार शब्द सुनावण्याचाही अधिकारी काही जुन्या मोलकरीण महिलांना असल्याचे पाहिले गेले आहे.

कोरोना काळात काही महिला मदतनीसांनी एकाकी वृद्ध दांपत्यांची जीवाचा धोका पत्करून सेवा केल्याचीही उदाहरणे आहेत.

काही वेळा तर जिथे काम करतात त्या कुटुंबांच्या आर्थिक परिस्थितीपेक्षा उत्तम आर्थिक परिस्थिती असलेल्या मोलकरणीही असतात… परिस्थिती सुधारली तरी काम करण्याची सवय असल्याने ब-याच महिला काम करीत राहतात… आणि ते पैसे मुलांच्या संसाराला लावत असतात.

‘विनापाश महिला’ हवी आहे अशी कधी कधी वर्तमानपत्रात जाहिरात बघायला मिळते. अशा महिला असू शकतात. काही कुटुंबे अशा महिलांना घरी ठेवून घेतात आणि त्यात त्यांनाही कुटुंबाचे प्रेम, आधार मिळू शकतो. मराठीत ‘मोलकरीण’ नावाचा चित्रपट खूप गाजला. अर्थात प्रत्यक्ष आयुष्यात असं झालेलं असण्याची शक्यता खूप कमी आहे. पण या चित्रपटात आईने मुलासाठी केलेला त्याग, त्या चित्रपटातील देव जरी मज कधी भेटला सारखी गाणी, सुलोचना यांचा अभिनय रसिकांच्या कायम लक्षात राहील, असा आहे.

आपण आपल्या आयुष्यात येणा-या, मग त्या मोलकरणी का असेनात भावनिक नाते जोडले पाहिजे, त्यामुळे आयुष्य सुकर होते, असे दीपा लागू एकदा एका कार्यक्रमात म्हणाल्या होत्या… आणि हे सांगताना त्या भावनावशही झाल्या होत्या. त्यावेळी उपस्थितांना तो विचार फारसा पटलेला दिसला नाही. परंतू मग त्यांनी अशी काही उदाहरणे सांगितली. मुले परदेशी असणारे आजारी लोक, घरात कुणाला असाध्य विकार असणारी कुटुंबे यांना कामवाल्या मावशींचा, आज्जींचा मोठा आधार मिळाल्याचेही दिसून येते.

मराठी दूरचित्रवाहिनीवरील एका विनोदप्रधान कार्यक्रमात एक अविवाहित पुरुष आणि त्याच्या घरात मोलकरीण म्हणून काम करणा-या महिलेचे भावबंध अत्यंत वेगळ्या पातळीवरचे दाखवण्यात येतात! तो संघर्षरत, मध्यमवयीन कलाकार माणूस आहे. ती गरजू, अल्पशिक्षित महिला आहे. ती त्याच्या घरात ते घर जणू तिच्याच मालकीचे आहे, अशा आविर्भावात वावरते. प्रसंगी मालकाला खडसावते, त्याची टिंगल करते. अर्थात विनोदी कार्यक्रम असल्याने लेखकास हे स्वातंत्र्य घेता आलेले आहे, हेही खरेच.
दूरचित्रवाणी वाहिनीवर नुकत्याच प्रसारित झालेल्या या कार्यक्रमातील एका skit मध्ये मालक आणि मोलकरीण यांच्यातील अत्यंत तरल अशा नात्याचे सादरीकरण पहायला मिळाले. कसलेले अभिनेते समीर चौगुले आणि नम्रता संभेराव यांनी या नात्यातील काही पैलू अत्यंत भावनिक प्रसंगांतून उलगडून दाखवताना कमाल केली आणि प्रेक्षकांच्या डोळ्यांत हसता हसता आसवेही तरळून गेली. शेवटी माणूसच माणसाला जीव लावू शकतो. ही मोलकरीण मालकाचे लग्न जुळावे म्हणून हक्काने प्रयत्न करते, मालक वेळेवर जेवावेत म्हणून त्यांना रागे भरते, त्याला राखीही बांधते आणि भाऊबीजेची हक्काची ओवाळणीही वसूल करते. त्याची आणि तिची भाषा निराळी आहे… पण मानवी नात्यातील मृदपणा सारखाच आहे! शेवटी आपण कुणाकडे कोणत्या नजरेने पाहतो, यालाही महत्त्व आहेच की!

प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतातच… आपल्या अनुभवाला आलेली बाजू कायमची तशीच असेल असं गृहीत धरून चालणे ठीक नाही. गरज सर्वांनाच पडू शकते!
आपल्याला आपल्या सभोवताली असलेल्या लोकांचे मोल मात्र करता आले पाहिजे… मी (योग्य ते) मोल करीन… असं प्रत्येकाने ठरवले की माणसांचे मूल्य वाढू लागेल, असं निश्चित वाटतं!

संसाराचा गाडा ओढण्यासाठी कष्ट करीत असणा-या तमाम प्रामाणिक, सालस बाई, ताई, मावशी, आज्जी यांना नमस्कार. त्यांच्या परिस्थितीमध्ये लवकरच सुधारणा होवो, आणि त्यांना ही कामे करावी लागू नयेत, अशी शुभेच्छा!

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “समाजातील डावे–उजवे*” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “समाजातील डावे–उजवे” ☆ श्री जगदीश काबरे ☆

“पुरोगामी = डावी विचारसरणी” आणि “प्रतिगामी = उजवी विचारसरणी” अशी मांडणी ऐतिहासिक प्रक्रियेतून तयार झालेली आहे. याचा उगम समजून घेतला तर हा प्रश्न अधिक स्पष्ट होईल. या संज्ञांचा उगम १७८९ मध्ये फ्रेंच क्रांतीनंतर जेव्हा नवीन संसद बसली, तेव्हा राजसत्ता आणि परंपरागत विशेषाधिकार (जमीनदार, धर्मगुरू) टिकवण्याच्या बाजूचे सदस्य अध्यक्षांच्या उजव्या बाजूला बसत असत, तर बदल, समता आणि लोकशाही यांचा आग्रह धरणारे सदस्य डाव्या बाजूला बसत असत. इथून ‘डावे’ आणि ‘उजवे’ ही राजकीय बिरूदे जन्मास आली. म्हणजेच ही विभागणी कोणी एका व्यक्तीने ठरवली नाही, तर ती प्रत्यक्ष राजकीय परिस्थितीतून नैसर्गिकरीत्या विकसित झाली. यानंतर या शब्दांना विचारसरणीचा अर्थ मिळत गेला. १९व्या आणि २०व्या शतकात समाजवाद, साम्यवाद, सेक्युलरिझम यांसारख्या विचारसरणी डाव्या बाजूशी जोडल्या गेल्या, कारण त्या समानता, कामगार हक्क, संपत्तीचे पुनर्वाटप यांचा आग्रह धरणाऱ्या आहेत. दुसरीकडे सनातनीवृत्ती, कर्मकांड, धार्मिक स्थितीशीलता आणि भांडवलशाही यांसारख्या संकल्पना उजव्या बाजूशी जोडल्या गेल्या, कारण त्या परंपरा, खाजगी मालकी आणि बाजारव्यवस्थेला महत्त्व देणाऱ्या आहेत.

डाव्या विचारसरणीचा गाभा समाजातील असमानता कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. या विचारानुसार, समाजातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विषमता ही नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे आणि ती सुधारता येते. त्यामुळे समाजवाद आणि साम्यवाद यांसारख्या विचारसरणी डाव्या गटात मोडतात. याउलट उजवी विचारसरणी काही प्रमाणात असमानता ही नैसर्गिक किंवा अपरिहार्य असल्याचे मानते आणि समाजात स्थैर्य राखण्यासाठी परंपरा, सांस्कृतिक मूल्ये आणि संस्थांचे महत्त्व अधोरेखित करते. त्यामुळे धार्मिक स्थितीशीलता आणि भांडवलशाही या विचारसरणी उजव्या गटाशी जोडल्या गेल्या. राज्याची भूमिका हा डावे-उजवे यांच्यातील आणखी एक महत्त्वाचा फरक आहे. डाव्या विचारसरणीनुसार राज्याने सक्रिय हस्तक्षेप करून सामाजिक न्याय साध्य करावा, कल्याणकारी योजना राबवाव्यात आणि दुर्बल घटकांचे संरक्षण करावे, असे मानले जाते. याउलट उजव्या विचारसरणीत राज्याची भूमिका मर्यादित असावी, बाजारव्यवस्था आणि वैयक्तिक स्वातंत्र्य यांना प्राधान्य द्यावे, असे मानले जाते. मात्र प्रत्यक्षात बहुतांश देशांमध्ये या दोन्ही टोकांच्या मधला मार्ग स्वीकारला जातो, जिथे काही क्षेत्रांत राज्य हस्तक्षेप करते आणि काही क्षेत्रांत बाजाराला स्वातंत्र्य दिले जाते.

आधुनिक काळात डावे-उजवे ही विभागणी अधिक गुंतागुंतीची झाली आहे, कारण ती फक्त आर्थिक प्रश्नांपुरती मर्यादित राहिलेली नाही. सांस्कृतिक आणि सामाजिक मुद्द्यांवरही ही विभागणी दिसते. डावी विचारसरणी सामान्यतः वैयक्तिक स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, लैंगिक समानता आणि विविधतेचा स्वीकार यावर भर देते, तर उजवी विचारसरणी राष्ट्रवाद, पारंपरिक मूल्ये आणि सांस्कृतिक सातत्य यावर भर देते. त्यामुळे एखादा पक्ष आर्थिकदृष्ट्या उजवा असला तरी सामाजिकदृष्ट्या काही प्रमाणात डावा असू शकतो, किंवा उलटही होऊ शकते. यामुळेच “डावे-उजवे” ही विभागणी एकाच सरळ रेषेत असत नाही, तर ती अनेक स्तरांवर समजून घ्यावी लागते.

इथे पुरोगामी आणि प्रतिगामी या शब्दांचा अर्थही लक्षात घ्यायला हवा. पुरोगामी म्हणजे समाजात बदल घडवून आणणारे, समानता वाढवणारे, अन्यायकारक रचना मोडून काढणारे विचार. प्रतिगामी म्हणजे विद्यमान व्यवस्था टिकवण्याचा किंवा पूर्वीच्या स्थितीकडे परत जाण्याचा आग्रह धरणारे विचार. ऐतिहासिकदृष्ट्या, अनेक वेळा डाव्या विचारसरणीने सामाजिक सुधारणा (उदा. कामगार कायदे, स्त्री-अधिकार, जातीय समानता) पुढे नेल्या, त्यामुळे डावे = पुरोगामी अशी प्रतिमा तयार झाली. त्याचप्रमाणे, उजव्या विचारसरणीने अनेकदा परंपरा जपण्यावर भर दिला, त्यामुळे उजवे = प्रतिगामी अशी प्रतिमा निर्माण झाली. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायला हवा की, एखाद्या काळात जे विचार पुरोगामी होते ते पुढच्या काळात सामान्य होतात आणि मग त्याच गोष्टी टिकवण्याची भूमिका उजवी ठरू शकते. तसेच, काही वेळा उजव्या विचारसरणीतही प्रगतीशील बदल दिसू शकतात (उदा. आर्थिक सुधारणा), आणि काही वेळा डाव्या विचारसरणीतही कट्टरता किंवा बदलांना विरोध दिसू शकतो.

भारतीय संस्कृतीत डावा हात = अशुद्ध ही संकल्पना रूढ आहे. पारंपरिक हिंदू सामाजिक आचारांमध्ये, विशेषतः चातुर्वर्ण्य/जातिव्यवस्थेत, उजव्या हाताला शुद्ध आणि डाव्या हाताला अशुद्ध मानण्याची सवय होती आणि आहेही. उदा. जेवताना उजवा हात वापरणे, शुचिर्भूत होण्याच्या कामांसाठी डावा हात वापरणे. ही विभागणी शारीरिक स्वच्छतेच्या व्यवहारातून आली आणि नंतर तिला धार्मिक-सांस्कृतिक वैधता मिळाली. जेवणाच्या ताटात सुद्धा पदार्थ वाढताना डावे-उजवे केले जाते; जसे की डाव्या बाजूला तोंडी लावण्यासाठी कमी खाल्ले जाणारे पदार्थ (चटणी, लोणचे, मीठ, पापड, इत्यादी) तर उजव्या बाजूला शरीराला जास्त पोषक असलेले खाल्ले जाणारे पदार्थ ( भात, भाजी, डाळ, आमटी, चपाती, भाकारी इत्यादी) वाढले जातात.  यामुळे उजवा = चांगला/पवित्र आणि डावा = कमी/अशुद्ध असा सांस्कृतिक अर्थ तयार झाला.

भारतीय संदर्भात ही विभागणी आणखी गुंतागुंतीची बनते, कारण येथे डावे-उजवे हे फक्त आर्थिक धोरणांवर आधारित नसून जातिव्यवस्था, धर्म, राष्ट्रवाद आणि सामाजिक न्याय यांसारख्या घटकांशीही जोडलेले आहेत. त्यामुळे डावे आणि उजवे यांची व्याख्या व्यक्तीनुसार आणि राजकीय दृष्टिकोनानुसार बदलू शकते. काहींसाठी सामाजिक समता आणि धर्मनिरपेक्षता हे पुरोगामीपणाचे मापदंड असतात, तर काहींसाठी सांस्कृतिक ओळख आणि परंपरेचे संरक्षण हे प्रतिगामी मापदंड महत्त्वाचे असतात. म्हणून येथे पुरोगामी हा शब्द अनेकदा सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्याशी जोडला जातो, तर प्रतिगामी हा शब्द जातिव्यवस्था, धार्मिक कट्टरता, किंवा असमानता टिकवण्याशी जोडला जातो. पण भारतात डावे-उजवे हे फक्त आर्थिक किंवा राजकीय नव्हे, तर सांस्कृतिक, धार्मिक आणि जातीय संदर्भांनुसारही ठरतात. त्यामुळे इथेही डावे = पुरोगामी, उजवे = प्रतिगामी ही रेषा नेहमीच स्पष्ट असतेच असे नाही. पण इथे एक महत्त्वाचा फरक लक्षात घ्यावा लागतो. उजवा–डावा सांस्कृतिक अर्थाचा आणि आधुनिक राजकीय उजवा–डावा या संकल्पनांचा उगम वेगवेगळा आहे. युरोपमध्ये फ्रेंच राज्यक्रांतीनंतर तयार झालेली राजकीय संज्ञा आणि भारतातील धार्मिक-सामाजिक प्रतीकं वापरून तयार झालेली संज्ञा या स्वतंत्र परंपरा आहेत. नंतरच्या काळात, जेव्हा डावी विचारसरणी (उदा. समाजवाद आणि साम्यवाद ) भारतात आली, तेव्हा काही लोकांनी डावा या शब्दाला आधीपासून असलेल्या सांस्कृतिक नकारात्मक अर्थाशी जोडून त्याला कमी लेखण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच, ब्राह्मणांनी किंवा चातुर्वर्ण्य व्यवस्थेने पुरोगामी विचारांना कमी लेखण्यासाठी ‘डावी विचारसरणी’ हा तुच्छता दर्शक शब्द वापरायला सुरुवात केला. भारतीय समाजात आधीपासून असलेल्या डावा = अशुद्ध/कमी या सांस्कृतिक प्रतिमेचा उपयोग आजचे हिंदुत्ववादी राजकीय टीकेसाठी सध्या पुरोगाम्यांना तुच्छ लेखण्यासाठी वापरतात.

खरे पाहता, कोणतीही विचारसरणी—डावी किंवा उजवी—लोकशाहीसाठी तेव्हाच धोकादायक ठरते जेव्हा ती सत्तेवर आल्यावर संस्थात्मक आणि व्यवस्थात्मक संतुलन कमकुवत करत विरोधी मतांना दडपते. म्हणून डावे आणि उजवे या संज्ञा ऐतिहासिक घडामोडी, राजकीय संघर्ष आणि सामाजिक बदल यांच्या प्रक्रियेतून तयार झाल्या आहेत हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. मात्र आजच्या काळात या शब्दांचा वापर अनेकदा भावनिक किंवा राजकीय आरोप-प्रत्यारोपासाठी केला जातो. यामुळे त्यांचा मूळ अर्थ धूसर होतो. म्हणूनच, कोणतीही विचारसरणी डावी म्हणजे पुरोगामी आहे की उजवी म्हणजे प्रतिगामी आहे, हे ठरवताना त्या विशिष्ट काळाचा, समाजाचा आणि त्या विचारांच्या परिणामांचा विचार करणे अधिक महत्त्वाचे ठरते. थोडक्यात, डावी आणि उजवी विचारसरणी या दोन परस्परविरोधी छावण्या नसून त्या समाजातील वेगवेगळ्या मूल्यप्रणालींचे प्रतिनिधित्व करतात. एकीकडे समानता आणि बदल यांचा आग्रह असतो, तर दुसरीकडे स्थैर्य आणि परंपरा यांचे महत्त्व अधोरेखित केले जाते. प्रत्यक्षात कोणताही समाज या दोन्ही प्रवाहांच्या संतुलनातूनच पुढे जातो, आणि त्यामुळे या संज्ञांकडे एकाच वेळी ऐतिहासिक, सामाजिक आणि राजकीय संदर्भात पाहणे अधिक आवश्यक ठरते.

© श्री जगदीश काबरे

(लेखक समाजचिंतक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail.com मो ९९२०१९७६८०

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २६ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

अरुणा मुल्हेरकर

? विविधा ?

☆ मला समजलेली संत तुकारामांची अभंग गाथा… भाग – २६ ☆ अरुणा मुल्हेरकर ☆

व्यावहारिक ज्ञान

ठरल्याप्रमाणे लेखमालेच्या या २६व्या भागात आपण तुकाराम महाराजांच्या काही व्यावहारिक ज्ञानाविषयीच्या अभंगांचा विचार करू.

दान, धर्म, पुण्य कर्म करणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे, परंतु पुण्य कर्म करताना ते योग्य ठिकाणी, योग्य प्रकारे करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.

या अभंगात महाराज काय सांगतात पहा…

सर्वांभूती द्यावे अन्न/ द्रव्य पात्र विचारोन//

उपतिष्ठे कारण/ तेथे बीज पेरीजे//

सर्व भूतमात्रांना अन्नदान करावे, पण द्रव्य मात्र योग्यता पाहूनच द्यावे. जेथे बी उगवेल असे वाटते तेथेच ते पेरावे. थोडक्यात दान हे सत्पात्री असावे.

पुण्य करिता होय पाप/ दुग्ध पाजोनी पोशीला साप//

करोनी अघोर जप/ दुःख विकत घेतले//

भूमी पाहता नाही वेगळी/ माळ बरड एक काळी//

उत्तम निराळी/ मध्यम आणि कनिष्ठ //

म्हणोनी विवेके /काही करणे ते निके//

तुका म्हणे फिके/ रुची नेदी मिष्ठान्न//

सापाला दूध पाजले तर पुण्य कर्म न होता पाप होते, कारण दूध पिऊनही साप गरळच ओकणार. एखादा जारण मारण मंत्र म्हणून दुसऱ्याचे वाईट करता करता, आपले स्वतःचेच वाईट करून घेतो. पृथ्वी सगळी सारखी असली तरी त्यातही माळ जमीन, खडकाळ जमीन, काळी जमीन, कमी जास्त कसाची जमीन असे भेद असतात, म्हणून कोणतीही गोष्ट करताना विचारपूर्वक करणे, नीट पारखून करणे फार महत्त्वाचे आहे. मिष्ठान्न केले आणि त्यात साखरच घातली नाही, तर ते चविष्ट लागेल का? याचसाठी आयुष्यात कोणतीही गोष्ट मोठ्या विवेकाने केली पाहिजे.

माणूस कसा ओळखावा याविषयी तुकाराम महाराज सांगतात.

नाही सर्व येत जोडील्या वचनी/

कवित्वाची वाणी कुशलता//

सत्याचा अनुभव वेधी सत्यपणे/

अनुभवाच्या गुणे रुचो येते//

काय आगी पाशी शृंगारिले चाले/

पोटीचे उकले कसा पाशी//

तुका म्हणे येथे करावा उकल/

लागेचिना बोल वाढवूनी//

मनात ईश्वराची भक्ती नसताना जर कोणी शब्दाला शब्द जोडून काव्य करील तर ते देवाला कसे मान्य होईल? ज्याच्या ठिकाणी खरा अनुभव आहे, त्याच्या बोलण्याने दुसऱ्याला वेधक वाटते कारण ते सत्य असते. अनुभवामुळे त्यातील तथ्य कळते. तुकाराम महाराज अधिक स्पष्टतेसाठी उदाहरणे देतात. हिणकस धातूला सोन्याचा मुलामा केला तर तो शृंगार अग्निपुढे उघडा पडतो. आणि कसोटी पुढे त्याच्या आतील हिणकस धातू ओळखू येतो. ज्या ठिकाणी हृदयात खरा अनुभव असेल तेथे स्पष्टीकरण देण्याची जरुरी पडत नाही, खरी योग्यता लगेच कळते. ते पुढे म्हणतात…

लचाळाच्या (अजागळ) कामा नाही ताळा वाळा/

न कळे ओंगळा उपदेश//

वचनचर्येची नकळे चाचणी/

ऐसी संघस्टनी अमंगळ//

समय न कळे वेडगळ बुद्धी/

विजाती ते शुद्धीचाच चाट//

तुका म्हणे याचा धिक्कारची बरा/

बहुमती खराहुनी हीन//

याचाच अर्थ असा की, जो कोणी अजागळ मनुष्य आहे, त्याच्या कामात काहीच ताळमेळ नसतो आणि त्या मुर्खाला (महाराज त्याला घामट म्हणतात) कितीही समजावून सांगितले तरी त्याची समजण्याची क्षमताच नसते. त्याला शास्त्र, त्यातील मर्म, काही कळत नाही. तेव्हा अशा लोकांपासून चार हात दूरच राहावे. या मतिमंद लोकांना काळ, वेळ समजत नाही. त्यांची बुद्धी विसंगत असते. अशा लोकांपासून दूर राहणे उत्तम! अशी कितीतरी माणसे आपल्या आयुष्यात येतात. ” बरे बाबा तुझेच खरे. ” असे बोलून जास्त वाद न घालता त्याच्यापासून लांब जावे असे महाराज सांगतात. अशा माणसांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटतात. ते लोक गाढवाहुनही नीच समजावे. त्यांचा धिकार करावा.

स्वभावोदुरतिक्रमः– भिन्न भिन्न स्वभावाची माणसे रोजच्या रोज आपल्या जीवनात येत असतात. महाराज म्हणतात की ज्यांचा स्वभावच चोरी करण्याचा असतो, त्यांच्या ध्यानीमनी तोच ध्यास असतो.

चोराचिया धुडका मनी / वसे ध्यानी लांछन//

त्याचप्रमाणे पाऊस पडावा तसे आम्ही बोलत असतो. परंतु ज्यांच्या अंगी दोषच आहेत त्याला आमचे बोलणे झोंबते. आम्ही हिताचे बोललो तरी त्याची तडफड होते. आपल्यालाही हा अनुभव वारंवार येतो कारण आपले सरळ बोलणे समोरचा वाकडेच धरतो. अशा माणसांच्या वाऱ्याला उभे राहू नये.

एक एका सहाय्य करू/ अवघे धरू सुपंथ//

कोण जाणे कैसे परी/ पुढे उरी ठेविता//

अवघे धन्य होऊ आता/ स्मरविता स्मरण//

तुका म्हणे अवघी जोडी/ ते आवडी चरणांची//

यासाठी तुकाराम महाराज सर्व लोकांना सांगतात की, तुम्ही आम्ही मिळून एकमेकांच्या सहाय्याने चांगल्या वाटेवरून चालू या, चांगले जगूया, नाहीतर म्हातारपणी परमार्थ करू अशी चालढकल केली तर पुढे काय वाढून ठेवले आहे ते कोणास ठावे? म्हणून उद्या वर काही ढकलू नका. जे काही करायचे ते आज करा, आत्ता करा. नामस्मरण करणारा व करून घेणारा असे आपण सर्वजण धन्य होऊ. विठोबाच्या चरणांची आवड धरली म्हणजे सर्व काही जोडले जाते व महान पुण्य प्राप्त होते.

चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती/

व्याघ्रही न खाती सर्प तया//

विष ते अमृत आघात ते हित/

अकर्तव्य नीत होत त्यासी//

दुःख ते देईल सर्व सुख फळ/

होतील शितळ अग्नी ज्वाळा//

आवडेल जीवा जीवाचिये परी/

सकळा अंतरी एक भाव//

तुका म्हणे कृपा केली नारायणे/

जाणिजे ते येणे अनुभवे//

तुकाराम महाराज सांगतात, आपले चित्त शुद्ध असेल तर शत्रूही मित्र होतात. वाघासारखे हिंस्र आणि सापासारखे विषारी प्राणी आपल्याला काही त्रास देत नाहीत. (भगवान शंकराच्या गळ्यातील नागाप्रमाणे) विषाचे अमृत होते.

मीराबाईच्या सच्य्या भक्तीमुळेच तिने राणाजीने दिलेला विषाचा प्याला रिचविला.

शरीरावर आघात झाले तरी ते हितकर ठरतात. आपल्या हातून चुकून एखादे अनुचित कर्म घडले पण ते नीतीला धरून असले तर शुभंकरच ठरेल. दुःखातही सुख प्राप्त होईल आणि आगीचा जाळ शांत होईल. शुद्ध चित्ताचा माणूस लोकांना प्राणप्रिय असेल. त्याच्याविषयी सर्वांच्या मनात आदरभावच राहील. असा अनुभव स्वतःबद्दल ज्याला येतो त्याला भगवंत कृपावंत झाला आहे असे समजावे.

कंथा प्रावर्ण/ नव्हे भिक्षेचे ते अन्न//

करी यापरि स्वहित/ विचारूनी धर्मनित//

देऊळ नव्हे घर/ प्रपंच परउपकारक//

विधीसेवन काम/ नव्हे शब्द राम राम//

हत्या शास्त्र धर्म/ नव्हे निष्काम ते कर्म//

तुका म्हणे संती/ करुनी ठेविली आईती//

वरील अभंगात तुकाराम महाराज काय सांगतात?

व्यावहारिक आणि अध्यात्मिक दृष्टीने काही वस्तूंमध्ये कसा फरक असतो याविषयी महाराज बोलतात.

संन्याशाची कंथा(झोळी) आणि सामान्य जनांची वस्त्रे सारखी समजू नयेत. त्याचप्रमाणे पवित्र भिक्षान्न इतर अन्नाप्रमाणे समजू नये. धर्म व नीती विचारात घेऊन स्वहित साधावे. देवालय हे इतर घरांप्रमाणे सामान्य घर नव्हे. परोपकार करताना तो संसारी माणूस इतरांप्रमाणे नव्हे. शास्त्राने सांगितलेल्या नियमांनुसार विषय सेवन केले असता तो माणूस विषयलोलूप नव्हे. राम हा शब्द इतर शब्दांप्रमाणे साधा नाही. क्षत्रियाने युद्धात शत्रूचा वध केल्यास ती हत्या न होता क्षात्रधर्मपालन होते. आणि निष्काम बुद्धीने केलेले कोणतेही कर्म हे इतर कर्माप्रमाणे बंधक नाही. हे नीतिशास्त्र आहे, याप्रमाणे सर्वांनी वागावे.

याचाच अर्थ असा रोजच्या जीवनात इतरांसमवेत वावरत असताना व्यावहारिक ज्ञान वापरून आणि नैतिक धर्माचे पालन करून माणसाने आपले आचरण ठेवावे.

क्रमशः… २६ 

© अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares