मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ओटी अधिक मासातील — ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर

? मनमंजुषेतून ?

☆ ओटी अधिक मासातील — ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆

अधिक महिना सुरू झाला आणि त्याचं माहात्म्य सांगणारे वेगवेगळे लेख सोशल मिडियावर धबाधबा कोसळू लागले आहेत. या अधिक महिन्याचं एक वेगळेपण म्हणजे या महिन्यात लेकीनं आईची ओटी भरावी असं म्हणतात. इतर वेळी कधीही मुलगी आईची ओटी भरत नाही. हं, आता ओटी भरायची म्हणजे ती खण-नारळ, साडी/वस्त्र

अशी जगरहाटी. मग ती सवाष्णीनी आणि सवाष्णीचीच/देवीची भरायची अशी आपली परंपरा.

पण ओटी भरणं म्हणजे केवळ सौभाग्याचा सन्मान एवढाच अर्थ अभिप्रेत आहे का? तर नाही. स्त्रीच्या मातृत्वाचा आणि सृजनतेचाही सन्मान करण्याची ही परंपरा आहे. आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आहे. मग ती आई प्रत्यक्ष जन्म देणारीच असली पाहिजे असं नाही, तिच्या मातृत्व भावनेचा आदर आणि सन्मान करण्यासाठी ही संधी आहे, असं मला वाटतं. याआधी माझ्या आईची शब्दरूप ओटी मी सादर केली होती.

आजही अशीच शब्दरूप ओटी भरणार आहे… मातृसमान माझ्या सासूबाईंची.

 सुमारे ३३ वर्षांपूर्वी लग्न होऊन मी सासरी आले. पण आजपर्यंत एकही दिवस माझ्या सासूबाईंनी मला सून म्हणून वागवलं नाही. आमचं नातं माय-लेकीचंच राहिलं. बऱ्याच घरात सुनेच्या आगमनानंतर स्वैपाकघराला युद्धभूमीचं स्वरूप प्राप्त होतं. आता कोणत्याही दोन घरातील स्वैपाकाच्या पद्धतीत फरक हा असतोच. नव्याने आपल्या घरात आलेल्या सुनेला स्वैपाकाची नवीन पद्धत लगेच कशी स्वीकारता येणार?

तर आमच्या घरी म्हणजे माझ्या सासरची एकूण सगळी मंडळी तर मूळ मध्यप्रदेशातील आणि मी महाराष्ट्रात वाढलेली. मला स्वैपाक येत होता. पण दोन्हीकडच्या पद्धतीत खूपच फरक. आमच्याकडे घडीची पोळी, यांच्याकडे टम्म फुगलेले गरम-गरम फुलके.

सालासहित मुगाच्या डाळीचं वरण जास्त आणि तुरीचं वरण केलं तरी ते चिंच/कोकम आणि गूळ न घालता. म्हणजे हे आपलं रोजच्या जेवणातला उदाहरण. दीर आणि सासऱ्यांना आंबटगोड भाजी-आमटी अजिबातच चालायची नाही. पण सासूबाई म्हणायच्या तू त्यांची भाजी-आमटी वेगळी काढून ठेव आणि बाकीच्यात घाल चिंच-गूळ, आम्हाला चालेल.. म्हणजे त्या आणि नणंद.

माझं लग्न झालं तेव्हा सासरेही नोकरीत होते. आम्ही दोघं, दीर, नणंद आणि सासूबाई, अशी सहा माणसं घरात. एकावेळी ४०-४० फुलके लागायचे. नणंदेला आणि मला एकत्र फुलके करायला लावून मला त्यांनी ते सहज शिकवले. तसेच इतर वेगळे पदार्थही.

लग्नानंतर चारच महिन्यांनी मला प्रमोशन मिळालं. माझी बदली वसईला झाली. डोंबिवली ते वसई.. व्हाया दादर जायचं म्हणजे येऊन – जाऊन, पाच तास प्रवासात जाणार… डोंबिवलीहून दादरला उतरायचं आणि मग पश्चिम रेल्वेच्या विरार लोकलने, वसईला जायचं. प्रमोशन स्वीकारायचं की नाही, मी दुविधेत पडले होते. माझ्या आई-वडिलांचाही नकारच होता. नुकतंच लग्न झालेलं, त्यामुळे मी आधी घरात स्थिरस्थावर व्हावं असं त्यांना वाटत होतं. पण माझ्या सासू-सासऱ्यांनी मला सांगितलं, प्रवास त्रासदायक आणि वेळखाऊ आहे, तो तुला झेपेल का? हा विचार करून काय ते ठरव. बाकी घरातली काही जबाबदारी तुला घ्यावी लागणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. मी प्रमोशन स्वीकारलं. पोळ्यांना बाई ठेवली. मी घरातून सकाळी साडेसातला बाहेर पडायचे आणि रात्री आठच्या सुमारास घरी परतायचे. सकाळी आई माझा डबा सुद्धा भरून द्यायच्या. रात्री आल्यावर तर स्वैपाक झालेलाच असायचा. मागची आवरा-आवर तेवढी मी करायचे. कधीकधी मी खूप थकलेय असं दिसलं तर आई म्हणायच्या, राहू दे मी बघते ते. झोप तू, परत सकाळी उठून धावायचंय तुला!

… किती जणींना हे भाग्य लाभतं हो? असे तब्बल तेरा महिने काढले आणि मग माझी बदली डोंबिवलीला झाली.

दोन वर्षांनी मी गरोदर असतानाच माझे वडील गेले. त्यावेळीही त्यांनी मला खूप आधार दिला. माझ्या आईला पार्किन्सन होता. त्यामुळे माझं बाळंतपण सासरीच झालं. अर्थात माझ्या बहिणींनीही खूप मदत केली. पण त्याही नोकरी करणार्‍या आणि त्यांना त्यांचेही संसार होतेच, त्यामुळे मदतीला थोडी मर्यादा होती. आईंनी सगळं खूप मायेनं केलं, माझं आणि नातवाचंही.

सासरी थोडं धार्मिक वातावरण होतं. पण आई-दादांनी मला कधीच कोणत्या गोष्टीची जबरदस्ती केली नाही. किंवा अमुक एक पूजा आहे, तर मी सुट्टी घ्यावी अशी अपेक्षाही ठेवली नाही. काहीवेळा कार्यालयीन जबाबदारीमुळे रजा घेणं शक्य नसायचं, पण त्यांनी कधीच तक्रार केली नाही.

दिराचं लग्न झाल्यावर आम्ही वेगळे झालो. पूर्वेला घर घेतलं. दोन्ही घरं म्हणजे दोन टोकं होती. पण मनात कधी अंतर निर्माण झालं नाही. रोज मी लेकाला पाळणाघरात ठेवायचे. पण माझ्या अडीअडचणीला आई-दादा कायम हजर असायचे. लेकाच्या तब्येतीच्या लहान-सहान तक्रारींसाठी मला कधी फारशी रजा घ्यायला लागली नाही. त्या माझ्याकडे येऊन राहायच्या नाहीतर मग लेकाला त्यांच्याकडे ठेवून घ्यायच्या. दादा तर रोजच संध्याकाळी आमच्याकडे यायचे, गौरवला सांभाळायचे, रात्री राहून, सकाळी माझ्याबरोबर बाहेर पडायचे. प्रशांतना सकाळी लवकर जावं लागायचं आणि रात्री पण नऊ वाजून जायचे घरी यायला. बँकेचं डबल टायमिंग होतं.

मला कधी बरं नसलं तरी आई आमच्याकडे येऊन राहायच्या. काही वर्षांपूर्वी तर मला खूप ताप आला होता, तोंडाची चव गेली होती. डॉ. च्या औषधाने ताप गेला तरी जेवण अजिबात जात नव्हतं. आई दिवसभर काहीतरी वेगवेगळं करून माझ्यापुढे ठेवायच्या, मी चार घास तरी खावे म्हणून. प्रसंगी स्वतःच्या हाताने त्यांनी मला भरवलंही आहे.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एवढं सगळं केलं तरी त्याचा त्यांनी चुकुनही उच्चारदेखील केला नाही कधीच. ना मला ऐकवलं ना इतर कोणालाही. कधीतरी छोटे – मोठे वादही व्हायचे आमच्यात. पण त्यांनी कधीच ते मनात ठेवलं नाही. त्यांचा स्वभाव अत्यंत मनमोकळा आहे. घरात येणाऱ्या पाहुण्यांची आवड-निवड लक्षात ठेवून, त्यांना भरपेट जेवायला घालणं, ही तर त्यांची खासियत. सुगरण आहेत त्या आणि नवीन पदार्थ शिकण्यासाठी कायम तयार!

माझ्या मिस्टरांच्या आकस्मिक मृत्यूने मात्र आई-दादा अगदी खचून गेले. त्यांचा जीवनातला रस संपून गेला. खरंच किती कठीण आहे उतारवयात हा आघात पचवणं! नंतरच्या काळात माझे सासरेही गेले. वयानुसार आईंचीही तब्येत खालावली. तसं त्यांना बी. पी. , डायबिटीस वगैरे काही नाही हं आधीपासून!

मला आठवतं काही वर्षांपूर्वी मी लेकाला घेऊन ठाण्याला गेले होते. माझ्या हातातल्या चार सोन्याच्या बांगड्यांपैकी एक बांगडी चोरीला गेली. कशी काय ते कळलं नाही, गाडीला गर्दीही नव्हती. दुसऱ्या दिवशी फक्त एक मोठ्ठा ओरखडा दिसला हातावर. मी आईंना फोन करून सांगितलं, त्या पटकन म्हणाल्या, तुझ्या हाताला काही झालं नाही ना, हे महत्त्वाचं, बांगडी काय पुन्हा करता येईल!

असे किती म्हणून प्रसंग सांगावे. माझी शब्दसंपदा अपुरी आहे ते वर्णन करायला.

आजच्या घडीला मात्र त्यांच्याशी फक्त फोनवरून संपर्क आहे. माझ्या पाठीच्या आॅपरेशनमुळे मी त्यांचे तीन मजले चढून जाऊ शकत नाही आणि वयोमानानुसार त्यांनाही आता ते जिने उतरून येणं शक्य नाही. तरीही एकदा नणंदेला घेऊन त्या मला भेटायला येऊन गेल्याच. मी फोन केला की खूप आनंद होतो त्यांना. बरेच दिवस फोन केला नाही तर त्यांचा फोन हमखास येतो.

तब्येतीची काळजी घे, दगदग करू नकोस. काही लागलं तर सांग हं! हे त्यांचे शब्द किती मानसिक बळ देतात.

त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच प्रेम, आदर आणि कृतज्ञता राहिल. आई, जीवेत् शरदः शतम्! याहून अधिक काय बोलू?

© प्रणिता खंडकर

संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.

ईमेल pranitakhandkar@gmail.com केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “जाऊ देवाचिया गावा! शेगाव!!” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

जाऊ देवाचिया गावा! शेगाव!! ☆ श्री संभाजी बबन गायके 

रात्रीचे साडेदहा वाजलेत. आनंदविहार भक्तनिवास. परिसरातील झाडांची पानगळ सतत सुरूच असते. या पानगळीला रात्रीही आराम नसतो. इथं पानं गळून खाली पडण्याची जणू वाटच पाहिली जाते… आणि ती उचलून घेतली जातात!

कचरा साठू द्यायचा आणि मग तो उचलायचा अशी इथली रीत नाही! आज दुपारी मंदिरातल्या ओसरीवर बसलेल्या मुलीने थोडंसं पाणी सांडवलं… ज्यांची त्या ठिकाणी duty नव्हती असे एक माऊली त्या जागी त्यांच्या कामासाठी आले तेंव्हा त्यांनी ते पाणी पाहिलं आणि केवळ एकाच मिनिटात ते पाणी पुसून घेण्याची व्यवस्था केली गेली.

मंदिर प्रदक्षिणा मार्गावर फोटो काढण्याची परवानगी नाही. पण ही सूचना तोंडी न देता तसा लाकडी फलक फोटो काढणाऱ्या व्यक्तीच्या समोर धरला जातो. आणि फोटो काढण्यासाठी नेमून दिलेली जागाही दाखवली जाते.

या नियमातून पोलिसांनाही सूट नाही!

विदर्भाची भाषाही त्यात तशी मृदु आणि मावळ. त्यात ‘ माऊली ‘ हे संबोधन तर अतिशय समर्पक. त्यामुळे कुणाला ओरडण्याचा, रागावण्याचा संबंध फारसा येत नाही. ज्या लोकांना बुद्धीच्या कानांनी कमी ऐकू येते, अशांच्या कानांवर सुरक्षा रक्षक गणवेशधारी लोकांचे शब्द मात्र जातील, अशी व्यवस्था आहे.

श्री गजानन महाराज संस्थान हे स्वयंपूर्ण, स्वयंशिस्त आणि स्वयंस्फूर्त संघटन असल्याने स्वयंसेवक हा मुख्य आधार आहे. आसपासच्या तीनशे पेक्षा जास्त गावांतील हजारो तरुण या सेवाकार्यात कालबध्द सेवा करण्यास रुजू होत असतात. आणखी शंभर गांवे प्रतीक्षेत आहेत, असे समजते!

ही सेवेकऱ्यांची नवी पिढी सुशिक्षित आणि संगणक साक्षर आहे.

इथला प्रत्येक घटक भक्तांच्या संभाव्य अडचणींचा विचार करून सातत्याने सुधारणा घडवत राहतो. मंदिरात जायचे म्हणजे चपलांची काळजी सोबत नेणे, असा प्रकार इथे नाही. बूट घालायचे म्हणजे खाली बसणे आले… यासाठी आरामदायी बाक, खुर्च्या आहेत. पूर्वी चप्पल स्टँड कप्प्याचे बिल्ले दिले जात. आता मोबाईलमध्ये फोटो काढून घ्यायला सांगतात! फोटो दाखवायचा आणि चपला ताब्यात! फक्त इथं समोर म्हणजे पुढे असा अर्थ घ्यावा लागतो. माऊली, चला समोर.. म्हणजे तिथून पुढे सरकावे… थांबून राहू नये. समाधी दर्शन एकाच वेळी किमान शंभर लोकांना घडेल अशी पायऱ्यांची व्यवस्था आहे. समाधी जवळ पोहोचेपर्यंत भाविक मूर्ती पाहू शकतात… त्यात समाधान लाभते. समाधीपासून डाव्या आणि उजव्याही बाजूने जाता येते.

जेवणापूर्वी लोक हात धुणार, नळ पूर्ण सोडणार आणि सत्तर टक्के पाणी वाया घालवणार…! इथे एक सारखी नियंत्रित धार सोडणारे अनेक नळ एका रांगेत, तेही भोजन गृहात प्रवेश करण्याच्या अगदी जवळ लावले गेलेत. ते पाणी सुद्धा वाया जाऊ दिले जात नाही.

दर्शन रांगेत उभे असताना कुणाला स्वच्छतागृहात जायचे असेल तर रांग सोडून जाणे आणि पुन्हा रांगेत येणे या प्रक्रियेत लोकांचा राग, गैरसमज ठरलेला असतो. पण इथे रीतसर स्वच्छतागृह पास घेऊन जाता येते आणि अधिकृतरित्या रांगेत परतता येते. रांगेत ठेवून ताटकळत असलेल्या लोकांसाठी चहा आणि स्वच्छ पाण्याची सोय आहेच. शिवाय तान्ह्या बाळांची आणि त्यांच्या मातांची अत्यंत उत्तम व्यवस्था प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे.

मुख्य मंदिरात प्रसाद व्यवस्था दिवसभर ठरलेल्या वेळी विनामूल्य असते. भक्त निवासात सशुल्क आहे. पण रात्री उशिरा पोहोचणाऱ्या भाविकांना हाच भोजन प्रसाद विनामूल्य देण्याची व्यवस्था आहे!

भक्त निवास ते मंदिर ते रेल्वे स्टेशन अशी विनामूल्य आणि सुरक्षित बस सेवा आहे. भक्तनिवास प्रवेशद्वार ते भक्तनिवास इथपर्यंत साहित्य, माणसे नेण्यासाठी चाकांच्या खुर्च्या, ढकल गाड्या आहेत, लहान मुलांसाठी आच्छादित ढकल गाडी आहे! निवास व्यवस्था ऑनलाईन नाही. आगाऊ आरक्षण नाही. प्रथम येईल त्यास प्राधान्य अशा रीतीने खोल्या उपलब्ध करुन दिल्या जातात. निवास व्यवस्था देणगी स्वरूपात सशुल्क आहे.

मंदिराच्या प्रवेशद्वारात दर्शनास अंदाजे किती वेळ लागू शकेल याचा इलेक्ट्रॉनिक फलक आहे. त्यातही मुख दर्शनाची सोय आहे.

देणगी द्यायची असल्यास रोख आणि card swipe करून देता येते. UPI scanner उपलब्ध नाही. मात्र online पद्धतीने घरूनही देणगी पाठवता येते.

देणगी रकमेनुसार भक्तांना भेटवस्तू, प्रसाद दिला जातो. पाच हजार रुपयांच्या देणगीदारास उत्तम दर्जाचा शर्ट पॅन्ट पीस देण्याची पद्धत सुरू आहे! श्री गजानन महाराज प्रतिमा सुद्धा आहेच. पोथी आणि इतर साहित्य सुबक, सुलभ आणि अत्यल्प शुल्कात मिळते!

VIP दर्शन पद्धती नाही. अगदी नाईलाज म्हणून माननीय राष्ट्रपती महोदया यांच्या दौऱ्या दरम्यान, सुरक्षिततेचा अत्यावश्यक उपाय म्हणून अगदी अल्प काळ इतर भाविकांसाठी दर्शन स्थगित ठेवले जाईल हे जाहीर करताना संस्थान दिलगिरी व्यक्त करण्यास विसरलेले नाही!

थोडक्यात, श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र हे तीर्थक्षेत्र सतत भेट द्यावे असेच आणि इतरांना आदर्शवत आहे!

जय गजानन.

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ चाळीस वर्षांपूर्वी… – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुचिता पंडित ☆

सुचिता पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ चाळीस वर्षांपूर्वी– लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती –  सुचिता पंडित ☆

चाळीस वर्षांपूर्वी लग्ने सहज व्हायची आणि घटस्फोट मिळणे अवघड होते. आता लग्न जमणे अवघड झाले आहे आणि घटस्फोट मिळणे सोपे बनले आहे.

चाळीस वर्षांपूर्वी लोकांना कष्ट करण्यासाठी ताकद मिळावी म्हणून भरपूर खावे लागायचे. आता कोलेस्टेरॉल आणि कॅलरीजच्या भीतीने लोक खायला घाबरतात.

चाळीस वर्षांपूर्वी खेडेगावातील लोक नोकरीच्या शोधात शहरात यायचे. आता शहरातील लोक ताणतणावातून मुक्ती आणि शांततेच्या शोधात खेडेगावात जातात.

चाळीस वर्षांपूर्वी खात्यापित्या घरातील दिसण्यासाठी धडधाकट दिसावे, यासाठी प्रयत्न करायचे. आता लोक तंदुरुस्त दिसण्यासाठी डायट करतात.

चाळीस वर्षांपूर्वी श्रीमंत व्यक्ती आपण गरीब असल्याचे दाखवण्यासाठी धडपडत असत. आता गरीब व्यक्ती आपण श्रीमंत असल्याचे भासवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात.

चाळीस वर्षांपूर्वी एक व्यक्ती सगळ्या कुटुंबाचा चरितार्थ चालवत असे. आता कुटुंबातील एका मुलासाठी सगळे नोकरी व्यवसाय करत असतात.

चाळीस वर्षांपूर्वी संवाद साधण्यासाठी साधन नव्हते. आता संवादासाठी माणसे नाहीत.

याला प्रगती म्हणावी का अधोगती…?

 _कुठे आणि कसे पोहोचलो आपण…?

शोधा म्हणजे सापडेल.

लेखक:अज्ञात

प्रस्तुती: सुचिता पंडित

 ≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ ‘अधिकमास ते चातुर्मास’ ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

🌸 विविधा 🌸

☆ ‘अधिकमास ते चातुर्मास’ ☆ श्री दिवाकर बुरसे

(भारतीय संस्कृतीतील ऋतुचक्र, अध्यात्म आणि उत्सवांचे अद्भुत सौंदर्य)

प्रस्तावना : निसर्गाशी मैत्री करणारी संस्कृती

जंबुद्वीपातील भरतखंड — आपले भारतवर्ष!

जगातील सर्वांत प्राचीन, समृद्ध आणि जीवनमूल्यांनी परिपूर्ण संस्कृतीचा वारसा लाभलेली ही भूमी केवळ कृषिप्रधान नाही, तर विज्ञाननिष्ठ, अध्यात्मप्रधान आणि निसर्गपूजक आहे.

येथील ऋषी-मुनींनी जीवनाकडे केवळ भौतिक नजरेने पाहिले नाही; तर मानव, निसर्ग आणि विश्व यांच्यातील सूक्ष्म नाते अनुभवले.

ऋतुचक्राच्या लयीत, सूर्य-चंद्रांच्या गतीत आणि निसर्गाच्या स्पंदनांत त्यांनी जीवनाचे शाश्वत तत्त्व शोधले.

भारतीय संस्कृतीने प्रत्येक ऋतूला अर्थ दिला, प्रत्येक तिथीला पावित्र्य दिले आणि प्रत्येक दिवसाला उत्सवाचे रूप दिले.

मानवाचे आरोग्य, मानसिक संतुलन, सामाजिक ऐक्य आणि आत्मिक उन्नती जपण्यासाठी व्रत-वैकल्ये, उत्सव, पर्व आणि संस्कारांची निर्मिती झाली.

यातूनच जन्माला आला —

भक्तिरसाने ओथंबलेला, रंगांनी नटलेला आणि अध्यात्माच्या तेजाने उजळलेला चातुर्मास!

अधिकमास : भारतीय कालगणनेतील अद्भुत विज्ञान

यावर्षीचे महत्त्वाचे दिनविशेष

 ▫️अधिकमासारंभ : १७ मे २०२६

 ▫️अधिकमास समाप्ती : १२ जून २०२६

▫️चातुर्मासारंभ : २५ जुलै २०२६

▫️चातुर्मास समाप्ती : २१ नोव्हेंबर २०२६

अधिकमास म्हणजे नेमके काय?

भारतीय सण-उत्सव हे चांद्रगतीवर आधारित आहेत, तर ऋतुचक्र सूर्याच्या गतीवर अवलंबून आहे.

या दोन्ही कालगणनांचा अद्भुत मेळ भारतीय ज्योतिषशास्त्राने साधला आहे.

चांद्रवर्ष आणि सौरवर्ष यांतील सूक्ष्म फरक भरून काढण्यासाठी जो अतिरिक्त महिना येतो, त्याला ‘अधिकमास’ म्हणतात.

तर एखादा महिना लुप्त झाला तर त्याला ‘क्षयमास’ म्हणतात.

दोन अधिकमासांमध्ये साधारणतः २७ ते ३४ महिन्यांचे अंतर असते.

चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक आणि फाल्गुन हे महिने अधिकमास म्हणून येऊ शकतात.

मार्गशीर्ष आणि पौष हे क्षयमास होऊ शकतात; परंतु माघ मास कधीच अधिक किंवा क्षय होत नाही, हे विशेष!

क्षयमास म्हणजे काय?

कधी कधी एका चांद्रमासात सूर्य दोन राशींमध्ये प्रवेश करतो.

अशा वेळी त्या महिन्याला ‘क्षयमास’ म्हणतात.

विशेष म्हणजे, एखाद्या वर्षी क्षयमास आला तर त्या वर्षी दोन अधिकमास येतात.

अधिकमासाला पुरुषोत्तम मास किंवा मलमास अशीही नावे आहेत.

हजारो वर्षांपूर्वी निर्माण झालेले हे भारतीय कालगणनेचे विज्ञान आजही अचूक आहे — ही आपल्या पूर्वजांच्या प्रज्ञेची तेजस्वी साक्ष आहे.

अधिकमासाचे अध्यात्मिक महत्त्व

अधिकमास हा केवळ गणिती समतोल नाही;

तो आत्मशुद्धी, संयम आणि साधनेचा पवित्र कालखंड आहे.

या महिन्यात अनेक जण विविध व्रते आणि संकल्प करतात —

▫️ उपवास

▫️ एकभुक्त / नक्तभोजन

▫️ मौनभोजन

▫️ अखंड नंदादीप

▫️ तांबूलदान

▫️ गंगास्नान

▫️ मंत्रजप

▫️ विष्णुसहस्रनाम पारायण

“ॐ नमो भगवते वासुदेवाय”

या मंत्राच्या अखंड जपाने वातावरणही भक्तिमय आणि पवित्र बनते.

या काळात भगवान विष्णूच्या उपासनेला विशेष महत्त्व असते.

मनातील विकार धुऊन टाकून अंतःकरण अधिक निर्मळ करण्याचा हा आध्यात्मिक उत्सव आहे.

चातुर्मास : उत्सव, साधना आणि संस्कृतीचे महापर्व

आषाढातील शयनी एकादशी ते कार्तिकातील प्रबोधिनी एकादशी — हा चार महिन्यांचा कालखंड म्हणजे चातुर्मास.

हा काळ केवळ धार्मिक नसून ऋतुबदल, आरोग्य, पर्यावरण, शेती, अध्यात्म, कला आणि सामाजिक जीवन यांचा सुंदर समन्वय आहे.

आषाढ : भक्तिरसाचा प्रारंभ

🫟 कालिदास दिन

🫟 जगन्नाथ रथयात्रा

🫟 पंढरपूरची वारी

🫟 गुरुपौर्णिमा

🫟 दिव्याची आवस

आषाढात भक्तीचा पहिला वर्षाव मनावर होतो.

वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगात, विठ्ठलनामाच्या गजरात आणि पावसाच्या सरींत भक्तिरस दाटून येतो.

श्रावण : व्रत-वैकल्यांचा हिरवा महिना

श्रावण म्हणजे भक्ती, पावित्र्य आणि मंगलमयतेचा उत्सव!

🪻 रविवार — सूर्यपूजा

🪻 सोमवार — शिवआराधना

🪻 मंगळवार — मंगळागौरी

🪻 बुधवार-गुरुवार — बुध-बृहस्पती पूजन

🪻 शुक्रवार — जिवती पूजन

🪻 शनिवार — बलभीम दर्शन

याच महिन्यात येतात —

🪻 नागपंचमी

🪻 नारळी पौर्णिमा

🪻 राखी पौर्णिमा

🪻 स्वातंत्र्यदिन

🪻 गोकुळाष्टमी

🪻 पिठोरी अमावस्या

🪻 बैलपोळा

श्रावणातील हिरवाई जशी धरतीला सजवते, तशीच भक्ती मनालाही प्रसन्न करते.

भाद्रपद : गणरायाच्या आगमनाचा जल्लोष

🍁 हरतालिका

🍁 गणेश चतुर्थी

🍁 ऋषीपंचमी

🍁 गौरी आगमन

🍁 अनंत चतुर्दशी

🍁 पितृपक्ष

भाद्रपद म्हणजे भक्ती, कुटुंबभाव आणि परंपरेचा मंगल सोहळा.

“गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घराघरांत आनंदाचे तरंग दाटून येतात.

अश्विन : शक्ती आणि प्रकाशाचा उत्सव

🔅 घटस्थापना

🔅 नवरात्रोत्सव

🔅 विजयादशमी

🔅 कोजागिरी पौर्णिमा

🔅 वसूबारस

🔅 दीपावली

या महिन्यात संपूर्ण भारत प्रकाश, उत्साह आणि मंगलमयतेने उजळून निघतो.

अंधारावर प्रकाशाचा आणि अन्यायावर धर्माचा विजय साजरा केला जातो.

कार्तिक : भक्तीचा परमोच्च क्षण

कार्तिकातील प्रबोधिनी एकादशी — चातुर्मासाची सांगता.

वारकरी चंद्रभागेत स्नान करतात आणि विठ्ठलनामाच्या गजरात भक्तीचा महासागर दुमदुमतो.

असे मानले जाते की आषाढी एकादशीला योगनिद्रेत गेलेले भगवान विष्णू या दिवशी जागृत होतात आणि पुन्हा विश्वकारभार सांभाळण्यासाठी सज्ज होतात.

चातुर्मास : भारतीय जीवनसंस्कृतीचा आत्मा

चातुर्मास म्हणजे —

✨ भक्तीचा महोत्सव

✨ ऋतुचक्राचा उत्सव

✨ निसर्गाशी संवाद

✨ कुटुंबसंस्कृतीचा उत्सव

✨ कला, संगीत आणि परंपरेची मेजवानी

या काळात प्रत्येक घर उत्सवांनी, पूजा-अर्चेने, भजन-कीर्तनांनी आणि स्नेहमेळाव्यांनी गजबजून जाते.

समारोप : परंपरा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे

हजारो वर्षांच्या चिंतनातून, अनुभवातून आणि विज्ञाननिष्ठ जीवनदृष्टीतून घडलेल्या भारतीय परंपरा या केवळ धार्मिक कर्मकांड नाहीत.

त्या आहेत —

☘️ निसर्गसंवर्धनाची शिकवण

☘️ आरोग्यसंरक्षणाची जीवनपद्धती

☘️ सामाजिक ऐक्याची वीण

☘️ आत्मिक उन्नतीचा मार्ग

म्हणूनच या समृद्ध, बहुरंगी आणि जीवनमूल्यांनी परिपूर्ण परंपरांची टिंगल किंवा कुचेष्टा करणे हे पुरोगामित्वाचे नव्हे, तर सांस्कृतिक दारिद्र्याचे लक्षण ठरते.

भारतीय संस्कृती ही केवळ इतिहास नाही;

ती अखंड वाहणारी जीवनगंगा आहे —

ऋतूंप्रमाणे बदलणारी, पण मुळात शाश्वत असलेली!

🌼 मंगल शुभेच्छा 🌼

अधिकमास आणि चातुर्मासाचा हा चिरंतन उत्सव आपल्या जीवनात भक्ती, आनंद, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो!

🙏🏻

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”ऐकावे जनाचे.. पण..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “ऐकावे जनाचे.. पण.. ☆ संध्या बेडेकर ☆

“Confident walking is better than confused running. ” 

मीरा माझी जीवाभावाची मैत्रीण. आमच्या दोघींचे छान जमतं. अगदी छत्तीस गुण जमतं नाहीत, पण चार सहा आवश्यक गुण एकमेकांचे एकमेकांना पटतात. त्यामुळे शाळेपासून ची आमची मैत्री अजूनही आहे. लग्नानंतर एकाच शहरात आहोत. तेंव्हा भेटी गाठी होत असतात.

तसं बघीतल तर आमच्या दोघींचा स्वभाव एकदम वेगळा. common असं काही नाहीच. तरीही मैत्री आहे. कारण आम्ही दोघींनी एकमेकींना जसे आहोत तसे स्विकारले आहे.

वेळ पडली तर सल्ला देणे, चूक दाखविणे, कधी ‘हो ‘कधी ‘नाही ‘ उत्तर सहज देणे जमते आम्हाला. आणि ते दुसऱ्याला सहज पटत. किंवा पटलं नाही तरी ते पचविणे जमतं आम्हाला.

पटल नाही म्हणून राग लोभ वगैरे नसतो. आता यापूढे हिला काही सांगायचेच नाही असं वगैरे मनात येत नाही.

जगातील कोणतीच गोष्ट परीपूर्ण नाही. सोनं आणि चाफा दोन्ही गोष्टी देवानेच जन्माला घातल्या. दोघांची किंमत /महत्व वेगळं आहे. सोन्याला चाफ्याचा सुगंध देता आला असता ना. पण तसे देवाने केले नाही. बहुतेक अपुर्णतेतही मजा असते. हेच सुचवायचे असेल. किंवा जसं आहे तसं स्विकारावे हे देवाचे सांगणे असेल.

‘No one is perfect ‘. हे सांगायचे असेल.

हे आम्हा दोघींना छान कळलय. पटलंय. आम्ही एकमेकींच्या ‘जाणीवा’ आणि ‘उणीवा’ समजून घेतल्या आहेत. आणि हेच आमच्या मैत्रिचे रहस्य असाव. बहुतेक.

घरातील प्रत्येक महत्वाच्या कामात सहभाग असतो आमचा.

मीरा थोडी भोळी, कोणाच्याही म्हणण्यात सहज येणारी. तिला सर्वांचे पटत, ते तिच्या वागण्या बोलण्यात लगेच दिसू लागतं. पण फार काळ टिकत नाही. कारण लगेचच दुसऱ्यांचे नवीन काही तरी पटलेल असत. सतत धर पकड चालू असते.

प्रत्येक वेळी काही तरी नवीन, सारख डॉक्टर बदलणे. औषध बदलणे. नक्की काय हवंय ?? हे ठरतच नाही. मन स्थिर नाही. एका ठिकाणी थांबायचेच नाही. सारखी पळापळ. स्वतः ठोस विचार असा काही करायचाच नाही.

खूप दा सांगून झाल.

अग !! ऐकायचे सगळ्यांचं पण करायचं आपल्या मनाचं. प्रत्येक घर, त्यांच्या घरच्या आवडीनिवडी, स्वभाव, वेगवेगळे असतात. ते ते घर त्या त्या पद्धतीने चालत. तब्येत व्यायाम केल्याने छान राहते. गोळी घेऊन वजन कमी होतं नाही. मेहनतीने घरात पैसा येतो. धागे दोरे बांधून नाही.

‘ ती ‘ पहाटे चार ला उठते आणि व्यायाम करते. म्हणून मी पण तसच करायला पाहिजे, असं नाही.

आपल्या ला काय झेपत??, काय आवडतं ?? ते करायचं ना. किती पसारा करायचा ?? व्यवस्थित विचार करून कुठे तरी थांबायलाही शिकावेच लागेल.

बरेचदा समजावून झाले. पण जैसे थे.

आता मी म्हणजे, माझा स्वभाव म्हणजे

मीराच्या एकदम विरुद्ध. मला माझंच पटत. एकदम कोणाच्या म्हणण्यात मी सहसा येत नाही. मी माझं माझं ठरवते. माझी चूक मीच ठीक करते. पडली तर पुन्हा उभी राहते.. सर्वांशी दोस्ती आहे. पण नियम माझे स्वतःचेच. जे मला, जे माझ्या परिवाराला आवडतील, झेपतील तेच.

माझा नियम म्हणजे,

“Follow no one, but learn from everyone. ”

‘ I follow myself. ‘ हा मुख्य नियम.

कारण व्यवहारात लोकांची लबाडी मला कळते. काही लोक आपल्या वर हावी व्हायचा प्रयत्न करतात. म्हणजे अगदी साध्या साध्या गोष्टींमध्ये आम्ही कसे हुशार, कसे स्मार्ट, healthy डायट, देवधर्म, सर्व गोष्टींची त्यांना अचूक माहिती आहे. जणू काही सर्व गोष्टींमध्ये त्यांची मास्टरी आहे. असं एवढ्या confidently सांगतात, पटवून देण्याचा प्रयत्न असा करतात, की ते ऐकून समोरचा थोड्या वेळ का होईना गडबडतो. Confuse होतो. त्यांच्या तावडीत जातो.

ज्याला स्वतः चे मत नसते, ते येथे बळी पडतात. त्यांना follow करतात.

माझ्या मते

 “Confused running पेक्षा confident walking is better. “

आज मीरा कडे जायचे आहे. दोन दिवसांनी येणाऱ्या चतुर्थी ला ती आपल्या मुलीचे नाव विवाह संस्थेत नोंदविणार आहे. अशा महत्वाच्या गोष्टीं मध्ये तिचा हात मी सोडणार नाही.

काल फोन वर मला म्हणाली,

अग!!! तू विचारांची पक्की आहेस ग. तेंव्हा या कामात मला तुझी मदत हवी आहे. माझ्या मुलीसाठी योग्य वर शोधणे, ही आमच्या साठी खूप महत्वाची गोष्ट आहे. तेंव्हा मनातील शंका, चलबिचल सांगायला तुझ्या सारखी योग्य मैत्रिण दुसरी नाही. काल आमच्या घरी यावर चर्चा झाली, तेंव्हा तुला या मोहिमेत सामील करायचे असे प्रत्येकाचे मत आहे.

मला पण याबाबतीत सावध रहायची हिदायत मिळाली आहे.

आता तिला सांभाळायची जबाबदारी माझी आहे.

म्हणतात ना,

“मन शांत ठेवायला आणि शांतपणे विचार करायला शिकला, तर सर्व प्रश्नांची उत्तरे आपले मनच आपल्याला देत असत. ”

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

डॉ. शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २५ ☆ डॉ. शोभना आगाशे ☆

श्री रविंद्रनाथ टागोर  

रविंद्रनाथ टागोर व संगीत

रविंद्रनाथांना जन्मजात लाभलेल्या रूपसौंदर्यासारखंच सूर सौंदर्य देखील लाभलं होतं. ब्राह्मो समाजाचे आद्य गायक विष्णुचंद्र चक्रवर्ती हे त्यांचे पहिले गायन गुरू. यदुभट्ट यांच्याकडेही त्यांचे संगीत शिक्षण झाले मात्र कोणत्याही विशिष्ट प्रणालीत त्यांनी स्वतःला बांधून घेतलं नाही. त्यांनी जवळ जवळ २२३० स्वरचित गाण्यांना चाली लावल्या.

रविंद्रनाथांच्या कविता; नाद, सूर, लय घेऊनच त्यांच्या लेखणीतून प्रकट होत. ते त्यांच्या कवितेला कधी कविता म्हणत नाहीत, गीत म्हणतात. इंग्रजी गीतांजलीतील कविता खरंतर prose poetry किंवा गद्य काव्य या प्रकारातील आहेत पण तरीही त्यांनी तिला ‘गीतांजली, song offering’ म्हटलंय. कदाचित मूळ बंगाली कविता, ह्या गेय असल्यामुळे असेल. कविता व गेयता यांचं नातं अनादि कालापासून भारतीयांनी अनुभवलेलं आहे. आपली वेद, उपनिषदे सुद्धा गेय काव्य रूपातच आहेत.

रविंद्रनाथांनी सुरांचे सामर्थ्य लहानपणीच ओळखलं होतं. त्यांच्या कवितेचा भाव; सुख-दु:ख, हर्ष- शोक, भक्ती- प्रीती कोणताही असो, त्यांचे शब्द, सुरांचा साज लेऊनच वहीच्या मंचावर नर्तन करीत प्रवेश करत. कवितेचं गाणं होताना सुरांतून इंद्रधनुष्य निर्माण होत असतं असं त्यांना वाटे.

“मला गायला कधी येत नव्हतं असं मला आठवतच नाही. ” असं ते म्हणायचे. गाणं रचताना ते गात गात रचावं व रचता रचता तद्रूप होऊन जावं अशी तन्मयता, उन्मादावस्था त्यांनी अनेकदा अनुभवली व एकदा एका खाजगी पत्रात वर्णिली पण आहे. ही अलौकिक अशी अध्यात्मिक परमावस्था नाही काय?

रविंद्रनाथांना भारतीय अभिजात संगीताची चांगली जाण होती. अनेक रागरागिण्यांचे संस्कार घेऊन त्यांची गीतं प्रकट होत. पण लोकसंगीताच्या देखील असंख्य चाली त्यांच्या गीतांमध्ये दिसतात. बंगाली लोकसंगीत मुळात अतिशय समृद्ध आहे. बाऊल, भटियाली, कीर्तन, काका, कविगान, श्यामा संगीत, फकिरांची गाणी, सूफी गाणी, वैष्णव भक्तांची गाणी, भादू सारखी कहाण्यांची गाणी, पाँचालि, जात्रापाला असे अनेक प्रकार त्यात आहेत. आपल्या संगीतासाठी ख्याल, ध्रुपद, ठुमरी, दादरा, टप्पा इथपासून लोकसंगीतापर्यंतच्या; इतकंच नव्हे तर पाश्चात्य संगीतावर आधारित चाली देखिल वापरण्याची रविंद्रनाथांची प्रतिभा पाहून अभ्यासक देखील चकित होतात.

रविंद्र संगीताचा बंगाली संगीतावरील प्रभाव आज देखील ठळकपणे जाणवतो किंबहुना खरंतर रविंद्र संगीतापासून बंगाली संगीत वेगळं करताच येणार नाही. त्यांच्या संगीताकडे चित्रपट क्षेत्रातील सत्यजित राय, ऋत्विक घटक, मृणाल सेन, नितीन बोस, तपन सिन्हा, कुमार साहनी यांच्यासारखे अतिरथी, महारथी आकर्षित झाले नसते तरच नवल! त्यांनी आपल्या चित्रपटात रविंद्रनाथांची गाणी वापरली. इतकेच नव्हे तर कांही ब्रिटिश, युरोपियन व ऑस्ट्रेलियन चित्रपटांत देखील त्यांची गाणी वापरली गेली आहेत. मात्र आपल्या गीतातील शब्दच काय पण सूर देखील बदलणं त्यांना मंजूर नव्हतं. आज सुध्दा त्यांची गाणी जशीच्या तशी गायली जातात.

 (संदर्भ: रविंद्रनाथ तीन व्याख्याने, ले. पु ल देशपांडे)

——

गीत : ७३

DELIVERANCE is not for me in renunciation. I feel the embrace of freedom in a thousand bonds of delight.

Thou ever pourest for me the fresh draught of thy wine of various colours and fragrance, filling this earthen vessel to the brim.

My world will light its hundred different lamps with thy flame and place them before the altar of thy temple.

No, I will never shut the doors of my senses. The delights of sight and hearing and touch will bear thy delight.

Yes, all my illusions will burn into illumination of joy, and all my desires ripen into fruits of love.

——

☆  मराठी भावानुवाद : गीत : ७३

☆ 

सर्वसंगपरित्याग करुनि

कशास मी मुक्त व्हावे ?

हजार बंधनात सुखाच्या,

मुक्तीला आलिंगन द्यावे॥

 *

काठोकाठ रस तू भरिशी 

मातीच्या या घटाघटातुनी

अनेक रंगी तिला रंगविशी,

अनेक तशा सुवासातुनी॥

 *

तव ज्योतीने दीप उजळतील

मम जगती, राऊळी लावण्या

पंचेंद्रिये मम सजग राहतील

तुझे शब्द, स्पर्श जाणण्या॥

 *

तव दर्शनास आसुसलो रे,

कसा करीन मी बंद लोचना

सारी सुखे ही तुझी देणगी

याच जाणीवा आणि भावना॥ 

 *

आनंद इतुका मला हवा की

आभास सारे त्यात मिटावे

तव प्रेमाच्या अंतर्यामी

मनोरथ माझे फलित व्हावे॥

☆ 

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९८५०२२८६५८

—–

☆  गीत : ७४ ☆ 

THE day is no more, the shadow is upon the earth. It is time that I go to the stream to fill my pitcher.

The evening air is eager with the sad music of the water. Ah, it calls me out into the dusk. In the lonely lane there is no passer by, the wind is up, the ripples are rampant in the river.

I know not if I shall come back home. I know not whom I shall chance to meet. There at the fording in the little boat the unknown man plays upon his lute.

—–

☆  मराठी भावानुवाद : गीत : ७४ ☆ 

☆ 

लांब गेल्या सावल्या अन्

क्षितिजी टेकला दिनमणी

मावळतीची सुवर्णलाली

जलात नदीच्या आरसपानी॥

 *

सांजवेळी नदी किनारी,

घडा भराया जाईन म्हणते

उत्सुक सायंकाळ परंतु 

उदासवाणे गीत गाते॥

 *

तिन्हीसांजेच्या या प्रहरी

दूर कोण मज साद देते

वात लहर ती अवखळ भारी

पाण्यावर तरंग उठविते॥

 *

जाईन म्हणते, नसे माहिती 

परतुनि येईन की नाही

नदी किनारी, कुणा भेटण्या

जीव अनावर होतच राही॥

 *

गेले धावत निर्जन मार्गे

तोच उमटले मधु सूर बासुरी

एकल नावेमधे बैसला

अनोळखी जरी, खचित मुरारी॥

☆ 

भावानुवाद © शोभना आगाशे

संपर्क: ९४५०२२८६५८

—–

☆   गीत : ७५ ☆ 

THY gifts to us mortals fulfil all our needs and yet run back to thee un-diminished.

The river has its everyday work to do and hastens through fields and hamlets; yet its incessant stream winds towards the washing of thy feet.

The flower sweetens the air with its perfume; yet its last service is to offer itself to thee.

Thy worship does not impoverish the world.

From the words of the poet men take what meanings please them; yet their last meaning points to thee.

—–

☆   मराठी भावानुवाद : गीत : ७५ ☆ 

☆ 

 दान तुझे तुळस मंजिरी

उणे न कांही तुझ्या मंदिरी

भरभरुनि तू देतच जाशी

परतुनि ये ते तुझ्याच पाशी॥

 *

नदी वाहते शेतामधुनी

शमते तृष्णा गावामधुनी

अविरत वाहे, अखेर सरिता,

पादाभ्यंगा तुझ्याच करिता॥

 *

कुसुम गंधा पवन वाहतो

आसमंत हा पुलकित होतो

ध्येय अंतिम परंतु त्याचे

तुझ्याच पायी लीन व्हायचे॥

 *

तुझ्या पूजना सर्वस्व वाहतो

इथे परि कुणी नच गरीब होतो

भरभरून सुख जीवनी वेचतो

तुझीच किमया हे ही जाणतो॥

 *

 कवीच्या गीतांमधुनी अर्था

जो तो शोधी, पुरवित स्वार्था

परि अखेर जी गीते बोलती

कृष्ण भावना तुझीच की ती॥

☆ 

– क्रमशः भाग २५..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “संकट हीच संधी” ☆ श्री जगदीश काबरे ☆

श्री जगदीश काबरे

☆ “संकट हीच संधी☆ श्री जगदीश काबरे ☆

मानवी जीवनात संकटे, आजार आणि अनपेक्षित घटना या अपरिहार्य आहेत; परंतु त्या क्षणी माणसाची मानसिक प्रतिक्रिया त्याच्या पुढील आयुष्याची दिशा ठरवते. एखादे संकट कोसळले किंवा गंभीर आजार झाला की “मलाच का? हे माझ्याच नशीबी आहे का आले?” असे प्रश्न पडणे ही स्वाभाविक प्रतिक्रिया होय… पण ही अंतर्मुखतेऐवजी आत्मदयेची छटा असलेली प्रतिक्रिया असते. या प्रश्नामागे अन्यायाची भावना आणि स्वतःला परिस्थितीचा बळी समजण्याची प्रवृत्ती दडलेली असते. ही मानसिकता दीर्घकाळ टिकली तर ती निराशावाद, हताशपणा आणि निष्क्रियता वाढवू शकते, कारण यातून समस्या सोडवण्याऐवजी परिस्थितीला दोष देण्याची सवय निर्माण होते. अशा वेळी व्यक्ती आपली उर्जा प्रश्न विचारण्यात खर्च करते, पण उत्तर शोधण्याचा प्रयत्न कमी पडते.

याउलट, “हे का घडले?” किंवा “यातून मी काय शिकू शकतो?” असा विचार हा अधिक रचनात्मक आणि सकारात्मक दृष्टिकोन दर्शवतो. या भूमिकेतून व्यक्ती स्वतःच्या जीवनशैलीकडे, निर्णयांकडे आणि सवयींकडे वस्तुनिष्ठपणे पाहू लागते. उदाहरणार्थ, एखादा आजार झाल्यास त्यामागील कारणे—जसे की आहार, व्यायामाचा अभाव, ताणतणाव, किंवा वैद्यकीय दुर्लक्ष—यांचा विचार केल्यास भविष्यात त्यापासून बचाव करण्याचे मार्ग सापडू शकतात. संकटांच्या बाबतीतही तसेच आहे; चुकीचे निर्णय, अपुरी तयारी, किंवा बाह्य परिस्थिती यांचे विश्लेषण केल्यास पुढील वेळी अधिक सजगपणे वागता येते. ही वृत्ती केवळ समस्या समजून घेण्यापुरती मर्यादित राहत नाही, तर ती व्यक्तीला कृतीशील बनवते.

सामाजिक पातळीवरही ही दोन मानसिकता भिन्न परिणाम घडवतात. “माझ्याच वाट्याला का?” हा दृष्टिकोन व्यक्तीला स्वतःपुरता मर्यादित ठेवतो, तर कारणमीमांसा करणारी वृत्ती व्यापक संदर्भ समजून घेण्यास मदत करते. उदाहरणार्थ, एखाद्या आजाराचा प्रसार झाला तर केवळ वैयक्तिक दु:खावर थांबण्याऐवजी सार्वजनिक आरोग्यव्यवस्था, स्वच्छता, जागरूकता यांसारख्या घटकांचा विचार केल्यास सामूहिक उपाययोजना शक्य होतात. त्यामुळे सकारात्मक वृत्ती ही केवळ वैयक्तिक विकासापुरती नसून सामाजिक प्रगतीसाठीही महत्त्वाची ठरते. याचा अर्थ असा नाही की “माझ्याच बाबतीत का?” हा प्रश्न पूर्णपणे चुकीचा आहे; तो मानवी भावनांचा नैसर्गिक भाग आहे. परंतु त्या प्रश्नात अडकून न राहता, पुढे जाऊन कारणांचा शोध घेणे आणि त्यावर उपाययोजना करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. संकटांना टाळता येत नाही, पण त्यातून शिकण्याची आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची संधी नक्कीच असते. त्यामुळे निराशावादी आत्मदयेपेक्षा विवेकाधिष्ठित, कृतीशील आणि सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारणे हेच खऱ्या अर्थाने मानसिक परिपक्वतेचे लक्षण आहे. त्यामुळे बिकट परिस्थितीतून मार्ग काढताना अथक परिश्रम करण्याची जिद्द निर्माण होते. 

© श्री जगदीश काबरे

(लेखक विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टीकोन प्रसारक आहेत.)

jetjagdish@gmail. com

मो ९९२०१९७६८०

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ पिओ तो जानो… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ पिओ तो जानो… ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

(काही देशात १८ मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा झाला त्यानिमित्ताने…)

“दादा, इराण्याच्या हॉटेलमध्ये चहा घ्यायला याल का ? ” माझी लेक आणि जावई मला पुण्यातील चांदणी चौकात असलेल्या इराणी कॅफेमध्ये जाण्यासाठी आग्रह करीत होते. मग परवा सकाळी आम्ही चौघं तिथं गेलो. पाहिलं तर तिथे तरुणाईची ही गर्दी. ! इराण्याच्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी सकाळी सकाळी एवढी गर्दी पाहून मला आश्चर्य वाटलं. मग मला कळलं की हे हॉटेल अष्टौप्रहर सुरु असतं. चहाच्या अशा काही ठराविक दुकानांवर प्रचंड गर्दी कायम असते.

मी विचार करू लागलो. प्रसिद्ध नाटककार राम गणेश गडकरींनी ‘ एकच प्याला ‘ हे संगीत नाटक दारूचे दुष्परिणाम दाखवण्यासाठी लिहिले आणि ते अजरामर झाले. त्या वेळी तळीरामांचे (दारू पिणाऱ्या मंडळींचे) प्रमाण समाजात वाढले होते. (आजची परिस्थिती मला माहिती नाही. कारण मी त्या वाटेला जात नाही. नाहीतर काही मंडळी उगीचच आज काय हे प्रमाण कमी आहे का असे म्हणतील.) शंभर दीडशे वर्षांपूर्वी भारतात फार कमी लोकांना चहा माहिती होता. इंग्रजांनी भारतात ज्या काही चांगल्या (?) गोष्टी आणल्या, त्यात चहाचा पण समावेश करायला हवा. तर शंभर दीडशे वर्षांपूर्वी ज्यांना चहा माहितीही नव्हता, अशी मंडळी खरोखर दुर्दैवी म्हणायला हवी कारण त्यांना क्षणात उत्साह, स्फूर्ती आणि तरतरी देणारे हे पेय माहिती नव्हते. गडकरींच्या काळातही फार कमी लोकांना त्याची आवड असावी नाहीतर त्यांनी त्यानंतर चहावर एखादे नाटक नक्कीच लिहिले असते.

ब्रिटिशांनी जो चहा भारतात आणला, त्या मूळ चहा नावाच्या पेयात भारतीयांनी बरेच बदल केले. खास दुधाचा चहा, आले, वेलची घातलेला चहा, गवती चहा असे अनेक प्रकार निघाले. त्यातील आले, वेलची आणि गवती चहाचा वापर करून बनवलेला चहा तर सर्दी, खोकला इ. आजारांवर आवर्जून घेतला जातो. सध्या तर ब्लॅक टी, ग्रीन टी यासारखे चहाचे अनेक प्रकार निघाले आहेत. खरे तर चहा पावडर, दूध आणि साखर हे चहाचे मूळ घटक. पण जेव्हा एकत्र येतात, तेव्हा चहा नावाचे एक वेगळेच रसायन तयार होते. चहाच्या दुकानांची नावे सुद्धा मोठी गमतीदार आहेत. अमृततुल्य चहा, प्रेमाचा चहा, गुळाचा चहा इ. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांची घोषवाक्ये सुद्धा भारी आहेत. एकदा प्याल तर पुन्हा याल, पिऊन तर पहा, चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो वगैरे वगैरे. नुसत्या चहाच्या व्यवसायात तर आजकाल करोडोंची उलाढाल होते आहे.

आता तर हा एकच प्याला (चहाचा हो !) एवढा लोकप्रिय झाला आहे की त्याच्या लोकप्रियतेचे वर्णन करायला शब्द कमी पडतील. आमचे पंतप्रधान सुद्धा त्यांना काही ‘ मन की बात ‘ सांगायची असली की ‘ चायपे चर्चा ‘ करतात. हिंदी सिनेमात तर नायकाला लग्नाची मागणी घालण्यासाठी नायिका त्याला ‘ चायपे बुलाया हैं ‘ म्हणून गाणंच म्हणते. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात बहुधा चहाने होते आणि शेवटही गोड (चहाने) होतो. कॉफी ही चहाची धाकटी बहीण ! पण चहाला जी लोकप्रियता लाभली, ती तिला लाभली नाही. जे खरे चहाबाज असतात, त्यांना वेळेला चहाच लागतो. त्या वेळी दूध, लस्सी, ताक, कॉफी असे विविध पर्याय उपलब्ध असले तरी खरा चहाप्रेमी निवड करतो ती चहाचीच.

आपल्याकडे लग्नाच्या वेळी मुलगी दाखवण्याचा जो कार्यक्रम होतो, त्या कार्यक्रमात प्रामुख्याने चहा, पोह्यांचा समावेश असतो. अस्मादिकांच्या लग्नात तर चहाने मोठीच भूमिका बजावली. एक कप चहा काय करू शकतो त्याचे प्रत्यंतर आले. त्याचे झाले असे की आमच्या सौ. चे वडील तिला दाखवण्यासाठी जेव्हा आमच्या घरी घेऊन आले, तेव्हा मी माझे वडील, तिचे वडील आदी मंडळी बाहेरच्या हॉलमध्ये गप्पा मारत बसलो होतो. ही आतून चहा, पोहे घेऊन आली. चहा पिताना वृद्धापकाळामुळे तिच्या बाबांच्या हातातील कपबशी थरथरत होती. त्याच वेळी अस्मादिकांनी निर्णय घेऊन टाकला की आता यांना जास्त फिरवायचे नाही. आणि आम्ही आमची पसंती जाहीर करून टाकली.

मी शिक्षक म्हणून शाळेत काम करत असतानाचा चहाबद्दलचा गमतीदार अनुभव आहे. मी पडलो भाषाविषयांचा शिक्षक. मला प्रत्येक वर्गावर खूप बोलावे लागायचे. बोलून बोलून घसा कोरडा पडायचा. प्रत्येक तासाला घोट दोन घोट पाणी प्यायलं तरी गरमागरम चहाने घसा शेकावा असे वाटायचे. पण बाहेर जाता यायचे नाही. आमच्या शाळेत फक्त मधल्या सुटीत एकदा चहावाला यायचा. मग अस्मादिकांनी एक युक्ती शोधून काढली. आमच्या शाळेतील एक ज्येष्ठ शिक्षक जे अधिकारी होते (आणि मी विद्यार्थी असताना माझे शिक्षकही होते, त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बसायचो.) ते चहाचे फार चाहते होते. ते चहाला कधी नाही म्हणत नसत. (कोणीतरी असं म्हटलेलं मी ऐकलेलं आहे की बाईने कुंकवाला आणि पुरुषाने चहाला कधी नाही म्हणू नये.)

मी त्यांच्याकडे गेलो की ते बेल मारून शाळेच्या सेवकाला बोलवायचे आणि चहा आण म्हणून आज्ञा करायचे. मी आपला उगीचच ‘ राहू द्या हो सर ‘ म्हणायचो. पण सरांनाही चहा हवाच असायचा. त्यामुळे आमच्या दोघांच्या चहाचा प्रश्न अशा रीतीने सुटायचा.

एक कप चहाने काय होत नाही महाराजा ? एखाद्या तरुणाचे एखाद्या तरुणीवर प्रेम असले की तो प्रथम तिला चहाचे आमंत्रण देतो. चहाच्या एका कपाच्या साक्षीने त्यांची प्रेमकहाणी सुरु होते. अनेक महत्वाच्या चर्चा, बोलणी, सभा, वाटाघाटी चहाच्या साक्षीने सुरु होतात. परीक्षेसाठी रात्र रात्र जागून अभ्यास करणारे विद्यार्थी चहाच्या साहाय्याने झोपेवर नियंत्रण मिळवतात. एखाद्या सरकारी कचेरीत तुमचे काम होत नसले तर चहा ते काम सहज करून टाकतो. (तुम्ही भाग्यवान असाल तर तेथील कर्मचारीच तुमच्यासाठी चहा मागवतात. अर्थात आपल्यासारख्या सर्वसामान्यांच्या बाबतीत अशी शक्यता फार कमी असते.) पण तसे नसेल तर ‘ चहापाण्यासाठी ‘ हात जरा सैल सोडला की तुमचे काम होऊन जाते. चहापाण्यासाठी पैसे देणे हे काही लाच किंवा भ्रष्टाचार या प्रकारात मोडत नाही असे या कामातील काही तज्ज्ञ लोकांचे म्हणणे आहे. तो एक शिष्टाचार असतो.

‘राम गावा राम ध्यावा, राम जिवीचा विसावा ‘ असं समर्थ रामदास म्हणतात. त्यात थोडा बदल करून आणि समर्थांची क्षमा मागून ‘ चहा घ्यावा चहा द्यावा, चहा जिवीचा विसावा ‘ अशीच भावना अट्टल चहाप्रेमींची असते. पूर्वीच्या काळी चहाच्या साधारणपणे दोनच वेळा असायच्या. एक सकाळी आणि दुसरी संध्याकाळी साधारण चार वाजता. पण काही हुशार लोकांनी प्रवासात रेल्वे स्टेशनवर, एस टी स्टॅण्डवर दिवसाचे चोवीस तास चहा विक्री करायला सुरुवात केली आणि त्यांना चहाप्रेमींनी निराश केले नाही. दिवस असो, रात्र वा पहाट असो, गाडी एखाद्या स्टेशनवर थांबली की खरा चहाप्रेमी चहा घेण्यासाठी खाली उतरतोच. आपल्या खासगी वाहनाने प्रवास करणारे लोकही तास दोन तासांनी चहाचा ब्रेक घेतातच. गाडी चालवताना पेंगुळलेल्या आणि कंटाळलेल्या ड्रायव्हरला चहा म्हणजे संजीवनी असते. त्यामुळे तात्काळ तरतरी, हुशारी वगैरे येऊन त्याची झोप कुठल्याकुठे पळून जाते आणि प्रवास सुरक्षित पार पडतो.

ऑस्टेलियातील लोक कॉफी पिण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अशा ठिकाणी चहाला लोकप्रियता मिळवून देण्याचं काम भारतीय वंशाच्या उपमा बिरदी या तरुणीने केलं आहे. उपमा खरं तर वकील आहे. पण तिला चहाची प्रचंड आवड. भारतीय चहाला लोकप्रियता मिळवून देण्याचं काम तिने ऑस्ट्रेलियात केलं आहे. ती तिथे ‘ चायवाली ‘ म्हणून प्रसिद्ध आहे. ती तिथे ‘ बिझिनेस वुमन ऑफ द इयर ‘ ठरली आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातून आलेला सोमनाथ गिराम या तरुणाची कथा वेगळीच आहे. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. शिक्षणासाठी सुद्धा पैसे नाहीत पण शिकण्याची जिद्द अफाट. सोमनाथ शिक्षणासाठी पुण्यात आला. पैसे नाहीत म्हणून त्याने सदाशिव पेठेत टी स्टॉल सुरु केला. त्यातून वेळ मिळेल तसा अभ्यास केला. अपार कष्ट केले. त्याच्या कष्टाला फळ आले. सोमनाथ चक्क सी ए झाला. आता तो महाराष्ट्र शासनाच्या ‘ कमवा व शिका ‘ या योजनेचा ब्रँड अम्बॅसडर बनून तरुणांना प्रेरणा देतो आहे.

असे हे चहापुराण ! कितीही सांगितले तरी कमीच ! त्यावर अधिक चर्चा करण्यापेक्षा आता गरमागरम मस्तपैकी एक फर्मास चहा घेऊ या.

 

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ “अल्पप्रसिद्ध हुसैनीवाली सीमा…” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆

श्री संभाजी बबन गायके

? इंद्रधनुष्य ?

“अल्पप्रसिद्ध हुसैनीवाली सीमा… ☆ श्री संभाजी बबन गायके 

अल्पप्रसिद्ध हुसैनीवाली सीमा

– – – आणि काळी पाचवी मराठा लाईट इन्फंट्री!

वर्ष १९६५. आपल्या जन्मजात शत्रूने अर्थात पाकिस्तानने १९४७ नंतर १८ वर्षांनी पुन्हा फणा उभारला आणि भारतावर आक्रमण करण्याचा मनसुबा प्रत्यक्षात आणला ! –

– – आपल्या पंजाब सीमेवरील फिरोजपूर जिल्ह्यातलं, सतलज नदीच्या अगदी अंगाखांद्यावर खेळणारं आणि पाकिस्तानातील गंडासिंगवाला गावच्या अगदी समोर असलेले हुसैनीवाला गाव. अमृतसर पासून हे स्थळ सुमारे ११० किलोमीटर्स भरते. हुसैन नावाच्या मुस्लिम संताच्या नावावरून या गावाचे नाव पडले आहे.

या गावाला एक विशेष इतिहास लाभला आहे. क्रांतीपुरुष भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांना ब्रिटिशांनी फासावर चढवले. या तिघांवर सतलज काठावरील एका ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. भारतीय जनमत या बलिदानांनी विदग्ध झालेले होते… या अंत्यसंस्कार प्रसंगी मोठा जमाव जमून काही विपरीत घडण्याची शक्यता लक्षात घेऊन ब्रिटिशांनी ठरलेल्या दिवसापेक्षा एक दिवस आधीच गुपचूप अंत्यसंस्कार करण्याची योजना आखत या तिघांची शवं तिथे पोहोचवली… पण याचीही खबर लोकांना लागली… मोठाच तणाव निर्माण झाला… यामुळे ब्रिटिशांनी हे तीन मृतदेह जागेवरच ठेवून तिथून पळ काढला. मग स्थानिक नागरिकांनीच या देहांवर अंत्यसंस्कार केले! इथे पुढे प्रेरणा स्थळ स्मारक उभारले गेले.

भगत सिंह यांच्या मातोश्री, विद्यावती देवी यांनी आपले अंतिम संस्कार मुलाशेजारीच केले जावेत, अशी अंतिम इच्छा व्यक्त केली होती. त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्याच अंतिम इच्छेनुसार त्यांच्या देहावर भगत सिंग यांच्या स्मारकाजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले… मूल आईच्या कुशीत शिरते… इथे आई मुलाच्या कुशीत शिरून चिरनिद्रा घेती झाली! क्रांतिवीर बी. के. दत्त यांनीही अशीच इच्छा व्यक्त केली होती… त्यांनाही इथे अंतिम विश्रांती देण्यात आली.

१९४७ च्या फाळणीत हुसैनीवालासह येथील बारा गावे पाकिस्तानात गेली. नतद्रष्ट पाकिस्तान्यांनी इथून जाताना भारतात असलेला कैसर ए हिंद हा स्थापत्य शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेला सुंदर पूल नष्ट केला!

मुंबईतून हुसेनीवाला मार्गे पाकिस्तानमध्ये जाणारी पंजाब मेल दिल्लीवरून फिरोजपूरला वळवण्यात आली.. हुसेनीवाला रेल्वे स्टेशन तिथे जतन करून ठेवलेले आहे.

फाळणीमुळे पाकिस्तानात गेलेल्या शहीद प्रेरणास्थलाची अवस्था खराब झाली होती. तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रयत्न करून तो भाग भारतात घेतला आणि त्या बदल्यात नदीचा आणि जलव्यवस्थेचा काही भाग पाकिस्तानला दिला! 

१९५६. प्रचंड पावसाने महापूर आलेला होता, येथील ब्रिटिशकालीन पूल वाचवण्यासाठी अभियंते झटत होते. परिस्थितीचा गैरफायदा घेत पाकिस्तानने या पुलावर हल्ला चढवला. ४, जम्मू काश्मीर रायफल्सच्या सैनिकांनी पाकिस्तान्यांना हुसकावून लावले!

आणि यानंतर दहाच वर्षांनी पाकिस्तान पुन्हा उलटून आला.. !१९६५ मध्ये पाकिस्तान ही जागा ताब्यात घेण्याच्या प्रयत्नांत असल्याची खबर भारतीय सैन्यास लागली. या भागाच्या रक्षणासाठी २, मराठा लाईट इन्फंट्री या आपल्या चपळ सैन्यदलास इथे घाईघाईने तैनात करण्यात आले.

– – या काळ्या पाचवीच्या नेतृत्वाची जबाबदारी लेफ्टनंट कर्नल टी. टी. ए. नोलान साहेबांच्या भक्कम खांद्यांवर होती. खरं तर मराठा सैनिक इथे संरक्षणात्मक पवित्रा घेतील अशी इतरांची कल्पना होती!

काळी पाचवी मराठा लाईट इन्फंट्री या नावाला एक अर्थ आहे. या सैनिकांच्या गणवेशात काळया रंगाचे प्राबल्य आहे. सह्याद्रीचा रंगही करडा, काळा कभिन्न! आणि इथं जन्मलेली शरीरं आणि मनं कणखर! वायुवेगाने हालचाली करीत शत्रूच्या गोटात शिरून त्याच्या राईराई एवढ्या चिंधड्या उडवाव्यात त्या मराठ्यांनीच! यशाचे धनी असलेले मराठा गडी लष्करात विशेष वकूब राखून आहे. पूर्वी आपल्याकडे गणपत हे नाव प्रचलित असे. त्यावरून अधिकारी लोकांनी प्रेमाने आपल्या सैनिकांना Ganpats हे नाव दिले होते! आता दुसरी असलेली ही इन्फंट्री पूर्वी पाचवी होती. लष्करात प्रत्येक दलाला विशिष्ट क्रमांक दिलेले असतात.

पाकिस्तान पूर्ण ताकदीने या हल्ल्यात उतरले असताना नोलान साहेबांनी आक्रमक पवित्रा घेतला! मराठे त्वेषाने लढले… एक विरुद्ध शंभर अशी स्थिती असताना एक मराठा शंभर पाकिस्तान्यांना भारी पडला! हल्ले परतवून लावले जातच होते… एके दिवशी नोलान साहेब युद्धाची व्यूहरचना करीत असताना त्यांच्या अगदी जवळच बाँब पडला आणि आपण एका शूर अधिकाऱ्यास मुकलो. त्यांच्यासह वीस सैनिक, अधिकारी हुतात्मा झाले. नेता धारातीर्थी पडलेला असताना मराठे आणखी जोरदार लढले आणि पाकिस्तान शेपूट घालून माघारी पळून गेला!

या लढाईतील कामगिरी मुळे २, मराठा लाईट इन्फंट्रीला Husseniwala Battle Honour प्राप्त झाला. स्थानिक नागरिकांनी विशेष मानपत्र प्रदान केले!

 १९७१ मध्ये सुद्धा पाकिस्तानने इथेच हल्ला चढवला होता. पंजाब बटालियनने यावेळी शौर्य गाजवून त्यांना खूप काळ रोखून धरले होते! पण यावेळी पाकिस्तानची ताकद आणि तयारी तिप्पट होती… त्यांनी हुसेनीवाला पूल उडवून लावला आणि परिसर ताब्यात घेतला… मात्र शिमला करारात भारताने हा भाग पुन्हा मिळवला!

या जागेचे महत्त्व व्यापारीदृष्ट्या सुद्धा अधिक होते आणि आहे. भारत – पाकिस्तान – अफगाणिस्तान यांच्यात जो काही व्यापार होतो… तो बराचसा इथून होतो. परस्पर संवाद वाढवा, सौहार्द वाढावे म्हणून सीमा सुरक्षा दलाचे तत्कालीन इन्स्पेक्टर जनरल अश्विनीकुमार शर्मा साहेबांनी १९७० मध्ये आटारी बॉर्डर सारखी The Beating The Retreat Ceremony सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. आणि ही परेड सुरू झाली.. आणि १९७१ पासून ही नियमित झाली!

माहितीचा किंवा प्रसिद्धीचा अभाव या कारणांनी अनेक भारतीय नागरिकांना ही जागा माहीत नाही. खरं तर हुतात्मा भगत सिंग, सुखदेव, राजगुरू यांची बलिदाने, भगत सिंग यांच्या मातोश्री यांना वंदन करण्यास लोकांनी गेले पाहिजे… हे एक पवित्र स्थळ आहे. भारतीय सैनिकांनी इथे बलिदाने दिली आहेत… मराठी अधिकाऱ्यांनी इथे अनुभव पणाला लावला आहे. त्यांना वंदन म्हणून इथे भेट द्यायला पाहिजे!

सैनिक आणि नागरिक यांनी आता अधिकाधिक जवळ आले पाहिजे… कारण पाकिस्तान सुधारणार नाही… आपण सदैव दक्ष असले पाहिजे! सैन्य आहेच तैनात! जय हिंद.. जय हिंद की सेना!

(सेवानिवृत्त सैन्याधिकारी श्री. संजय सहस्रबुद्धे साहेबांनी या लेखासाठी प्रेरणा दिली.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ‘हा’ मराठी माणूस तुम्हाला माहितीये का? – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर☆

सुश्री मीनल केळकर

? इंद्रधनुष्य ? 

‘हा’ मराठी माणूस तुम्हाला माहितीये का? – माहिती संग्राहक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆

मरीन ड्राईव्ह बांधणारा आणि दादरची स्मशानभूमी दान देणारा ‘हा’ मराठी माणूस तुम्हाला माहितीये का?

तुम्हाला विचारलं की मुंबईची शान असलेला मरीन ड्राईव्ह कोणी बांधला? तर अनेकांना उत्तर माहीत नसेल. पण स्वतःच्या खिशातले लाखो रुपये खर्चून मुंबईसाठी मरीन ड्राईव्ह बांधणारा, आणि दादरमध्ये स्मशानभूमीसाठी तब्बल ५ एकर जागा दान देणारा एक महान मराठी माणूस होता !

ते होते : श्रीमान भागोजी शेठ कीर ! 

रत्नागिरीतल्या एका अत्यंत गरीब भंडारी कुटुंबात जन्मलेल्या या सुपुत्राने स्वतःच्या जिद्दीवर मुंबईत साम्राज्य उभं केलं. आज दादरमध्ये ज्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ‘चैत्यभूमी’ आणि ‘सावरकर स्मारक’ डौलाने उभं आहे, ती ५ ते ६ एकर जागा भागोजी शेठ कीर यांनी स्वतःच्या पैशाने विकत घेऊन स्मशानभूमीसाठी दान केली होती.  

इतकेच नाही, तर मरीन ड्राईव्हची समुद्राचे पाणी अडवणारी भिंत, मुंबई सेंट्रल स्टेशन आणि ब्रेबॉर्न स्टेडियम या मुंबईच्या ऐतिहासिक वास्तूंचे बांधकाम त्यांनी शापूरजी पालनजी यांच्यासोबत भागीदारीत केले.

नुसता पैसाच नाही तर समाजसुधारणेतही ते पुढे होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी स्वतःच्या खर्चाने रत्नागिरीत देशातले पहिले ‘पतित पावन मंदिर’ बांधले आणि सर्व जाती-धर्मांसाठी खुले करून अस्पृश्यता निवारणाचा मोठा लढा उभारला.

ज्या माणसाने मुंबईच्या जडणघडणीसाठी आपली संपत्ती पणाला लावली, त्यांचं साधं एक भव्य स्मारक आज मुंबईत नाही, हे आपलं दुर्दैव आहे ! 

पण हा इतिहास इथवरच थांबता कामा नये.

… भागोजी शेठ कीर यांच्याबद्दल प्रत्येक मराठी माणसाला अभिमानाने सांगा! 

 

माहिती संग्राहक : अज्ञात 

प्रस्तुती – मीनल केळकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares