मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नात्यांमधील बदल ☆ संग्राहिका – सुश्री मीनल केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ नात्यांमधील बदल ☆ संग्राहिका – सुश्री मीनल केळकर ☆ 

सकाळपासून घरामध्ये  एखाद्या सणासारखं वातावरण होतं. सासूबाईंच्या चेहर्‍यावरील उत्साह आणि स्वयंपाकघरातून येणारा खाद्यपदार्थांचा घमघमाट या दोन्ही गोष्टींचं कारण एकच होतं – आज घरी दुपारच्या जेवणासाठी त्यांची एक मैत्रीण येणार होती. म्हणून घर पूर्णपणे सुशोभित केलं होतं.

काल संध्याकाळीच त्यांनी बोलता बोलता सांगितलं होतं की उद्या त्यांची एक मैत्रीण जेवायला घरी येणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी, आम्ही बाजारात गेलो आणि सासू- -बाईंनी एक छानशी, किंमती साडी आपल्या मैत्रिणीसाठी विकत घेतली.

आज तर त्या जणू काही वेगळ्याच पातळीवर होत्या. उत्साहाच्या भरात, त्या सकाळी माझ्या अगोदरच उठल्या होत्या. माझ्याआधीच स्वयंपाकघरात गेल्या आणि त्यांनी स्वतःच तयार केलेल्या यादीमधील एक एक पदार्थ, मनापासून व मोठ्या प्रेमाने बनवायला सुरुवातही केली होती.

त्या आज खूपच आनंदी दिसत होत्या.  पण मी… मी मात्र खोट्या खोट्या हसऱ्या चेहऱ्याने आणि जड अंत:करणाने त्यांना मदत करत होते.

आज माझ्या आईचा वाढदिवस होता. माझ्या लग्नानंतरचा आईचा हा पहिलाच वाढदिवस होता. आणि ती एकटीच असणार होती. मी इथं सासरी, बाबा ऑफीसच्या कामासाठी बाहेरगावी आणि भाऊ तर आधीच परदेशात गेलेला होता.

काल मी माझे मन घट्ट करून माहेरी जाण्याचे ठरवले होते. मी याबाबत माझ्या सासूबाईंशी काही बोलणार, तेवढ्यात त्यांनीच त्यांच्या येणाऱ्या मैत्रिणीबद्दल व उद्याच्या ठरवलेल्या बेताबद्दल सांगितले. दुपारचे भोजन आणि संध्याकाळी आम्ही सगळ्यांनी मिळून त्या मैत्रिणीबरोबर, फन सिटीला जाण्याचा कार्यक्रम त्यांनी ठरवला होता.

ह्यावर मी आता काय बोलणार होते? मी गप्पच राहिले आणि कामाला लागले. सर्व घर व्यवस्थितपणे आवरले आणि स्वतःही जरा नाराजीनेच तयार झाले. थोड्या वेळाने दारावरची बेल वाजली आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी सासूबाईंनी मलाच पाठवलं.

दरवाजा उघडल्यावर भल्या मोठ्या पुष्पगुच्छाच्या मागे लपलेला चेहरा जेव्हा समोर आला, तेव्हा माझे डोळे आश्चर्याने विस्फारले गेले आणि मी ‘आ ‘ वासून बघतच राहिले ! कारण समोर उभी असलेली व्यक्ती म्हणजे, माझी आई  होती. आई मला पुष्पगुच्छ  देत म्हणाली, ” सरप्राईज! “

आश्चर्याने आणि आनंदाने, मी तिथे उभी राहून आपल्या आईकडे एकटक बघत होते. 

” वाढदिवसाच्या शुभेच्छा नाही का देणार माझ्या मैत्रिणीला? ” मागे उभ्या असलेल्या सासूबाईंनी विचारले.

“माझी आई… तुमची मैत्रीण?” मी मोठ्या आश्चर्याने विचारले.

“अग, हो ! मी खोटं नाही बोलत ! कोण म्हणतं की विहीणी-विहीणी मैत्रिणी होऊ शकत नाहीत? ” सासूबाई म्हणाल्या.

“ नक्कीच होऊ शकतात. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सासू आपल्या सुनेचे, मुलीसारखे लाड करू शकते आणि तीच विहिणीला पण मैत्रीण बनवू शकते.” असे म्हणून माझ्या आईने पुढे होऊन सासू- बाईंना मिठीच मारली.

आनंदाने माझ्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता, फक्त डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले होते. मी सासूबाईंचे हात हातात घेऊन डोळ्यांना लावले आणि त्यांच्या हाताच्या तळव्यांचे मुके घेतले व त्यांना मिठी मारली. आम्हा दोघींना बघून, माझ्या आईच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या व तिने स्मित हास्य केले.

नात्यांचा हा उत्सव, अत्यंत प्रेमाने साजरा करत असताना, एका बाजूला माझी आई होती, जिने मला नात्यांचं महत्त्व शिकवलं, तर दुसरीकडे माझ्या सासूबाईं- ज्यांनी नातं हृदयापासून कसं जपायचं हे शिकवलं.

दोघीजणी माझ्याकडे बघून हसत होत्या आणि त्या दोघींच्यामधे उभी राहून, मी माझ्या नशिबावर खूष होत होते. माझ्या डोळ्यात अश्रू होते पण चेहऱ्यावर मात्र हसू फुलले होते.

स्वतःला महत्त्व कसे मिळेल, याकडे लक्ष देण्यापेक्षा दुसऱ्यांना “मान” कसा देता येईल याविषयी आपण विचार केला पाहिजे, हे मनापासून पटलं मला. 

 

संग्राहिका : सुश्री मीनल केळकर 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ नको फक्त मोबाईल..संस्कारही हवेत ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे

सुश्री उषा जनार्दन ढगे

?विविधा ?

☆ नको फक्त मोबाईल..संस्कारही हवेत ☆ सुश्री उषा जनार्दन ढगे ☆ 

—आजच्या नवयुगातील तुमचा आमचा सर्वांचा घनिष्ठ सोबती म्हणजे स्वतःचा मोबाईल..त्याच्याशिवाय घरबसल्या आप्त-स्वकीयांशी संपर्क साधणें-जोडलेले रहाणें म्हणजे दुर्गम बाब झाली आहे…एकटे असतांना कधी रेंज नसली किंवा नेटवर्क नसले तर एकदम सगळ्यांशी संपर्क तुटल्यासारखा वाटतो व जीव घाबराघुबरा होतो..याचा अनुभव मलाही आलेला आहे…

प्रगत युगातील हे आधुनिक लहानसे यंत्र लाॅकडाऊनच्या काळात तसे खूपच उपयोगी पडले…सर्व व्यवहार ठप्प झालेले असतांना व्यवसाय नोकर्‍या इत्यादींचे वर्क फ्राॅम होम चालले होते…भाजीपाला,जरूरीच्या वस्तू, औषधे इ. सर्व मोबाईलवरून आॅनलाईन मागविल्याने घरपर्यंत पोहोचत होते..स्वकीयांशी संवाद साधता येऊन परिस्थितीचा अंदाज घेता येत होता..

या लाॅकडाऊनच्या काळात शाळा काॅलेजे ही बंद पडल्याने, शाळा-काॅलेज वर्ग आॅनलाईन screen वर असल्याने, मुलांची मोबाईलशी जास्तीत जास्त जवळीक झाली हे मात्र खरे..अजूनही अद्ययावत परिस्थितीमुळे म्हणावा तसा बदल झालेला नाहीय..

या मुलांचे शाळेत जाणें नाही,मित्र-मैत्रिणींशी भेटणें नाही,त्यांच्याशी खेळणे नाही,म्हणून त्यांची चिडचिड होणें स्वाभाविक आहे..परंतु गृहपाठ करण्याचा बहाणा  करून ही लहान मुले आईवडिलांचा मोबाईल घेतात व तासनतास त्यावर गेम खेळत बसतात..किंवा टी व्ही वर कार्टून्स बघत बसतात,वेळेचा अपव्यय करतात हे मात्र गैर आहे..अर्थात काहीजण यांस अपवाद असतील..

मोबाईल,काॅम्प्युटर,लॅपटाॅप,टी.व्ही. याचा वापर किती प्रमाणांत, किती मर्यादा राखून करायचा याची सवय सर्व थोरा-मोठ्यांना अंगवळणी पडलेली बरी…

—आभासी जगतापलिकडेही एक जग असते हे पहाण्याची दृष्टी मुलांना संस्कारातून मिळते..!

अभ्यासाव्यतिरिक्त मिळालेल्या फावल्या वेळेचा सदुपयोग कसा करून घ्यावा याचा सुजाण व जागरुक पालकांनी मुलांना बोध करून द्यावा..हा वेळ त्यांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी सार्थकी लावण्यात मुलांना सुयोग्य सहकार्य करावे..त्यांचा बहुमूल्य वेळ मोबाईलवर वाया घालविणे इष्ट नाही.. यासाठी पाल्यास दिवसभरातील कामाचे एक वेळापत्रक तयार करून द्यावे..त्यामुळे त्यांना ठरलेल्या वेळात ठरलेली कामें करण्याची नियमित सवय लागून भविष्यात यश संपादन करण्यासाठी निश्चितच चांगला फायदा होईल..यात शारिरीक व्यायाम,योगासने,अथर्वशीर्ष,अभंग-ओव्या पाठ करणें इ.चांगल्या सवयींचाही समावेश होतो..मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा,त्यांच्या आवडत्या छंदांना प्राधान्य द्यावे…जसे चित्रे काढणें,रंगविणें,गोष्टींची पुस्तके वाचणे,त्या गोष्टी दुसर्‍या मुलांना कथित करणें,शुध्दलेखन करणें,बुध्दीबळ खेळणें..टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनविणें,नृत्य संगीताची आवड असल्यास त्यांचा सराव करणें, एखादे वाद्य वाजविण्यास शिकणें वगैरे वगैरे..

बागकाम,शिवणकाम पाककला, हस्तकला लेखन हे मोठ्या मुलांसाठीचे पर्यायही आहेत..

तसेच,मुलांची एकाग्रता वाढविण्यासाठी त्यांना ध्यानधारणा,चिंतन,मनन करण्याची सवय लावावी..अशाप्रकारचे संस्कार करून मुलांना लहान वयातच वेळेचे महत्व समजावून दिले तर त्यांच्याकडून कदापि वेळेचा अपव्यय होणार नाही..

वेळेच्या बाबतीत विल्यम पेन यांचे एक सुंदर वाक्य आहे..ते म्हणतात ” आपल्याकडे वेळेची कमतरता सर्वांत जास्त असते,असे असूनही आपण सर्वांत जास्त दुरुपयोग वेळेचाच करतो..”

वेळ हे जीवनातले असे नाणें आहे जे कसे आणि कुठे खर्च करायचे ते आपणच ठरवू शकतो..!

मुलांवर संस्कार करतांना किंवा संस्कारी मुले घडवीत असतांना,पालकत्व ही केवळ जन्मदात्या पालकांचीच नव्हे तर संपूर्ण कूटुंबाची जबाबदारी असते हेही इथे नमूद करावेसे वाटते..!

कर्तव्य पालकांचे

मुलांसी द्यावे संस्कार

हे संस्कारच देतील

त्यांच्या जीवनास आकार..!

 

© सुश्री उषा जनार्दन ढगे

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ खुलभर दुधाची कहाणी – भाग – 1 …. प्रस्तुती श्री सुनील इनामदार ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे

?इंद्रधनुष्य? 

☆ खुलभर दुधाची कहाणी – भाग – 1 …. प्रस्तुती श्री सुनील इनामदार ☆ संग्राहक – श्री सुनीत मुळे ☆ 

(एक पेला दुधामुळे सुरू झाली चक्क एक बँक आणि एक विद्यापीठ !!)

खुलभर दुधाची कहाणी तुम्ही सगळ्यांनीच वाचली असेल. पाऊस पडावा म्हणून राजा प्रजेला घरात असलेलं सर्व दूध देवळाच्या गाभार्‍यात ओतायला सांगतो. गाभारा भरला की पाऊस येणार हे नक्की असतं. घरातली मुलंबाळं उपाशी ठेवून गावकरी गाभार्‍यात दूध टाकत राहतात. पण गाभारा भरत नाही. संध्याकाळी एक आज्जी घरातल्या लेकरांना आणि गाईच्या वासरांना दूध पाजून नंतर खुलभर दूध घेऊन गाभार्‍यात अर्पण करते आणि काय आश्चर्य !! गाभारा दुधाने भरून वहायला लागतो. या कथेचे पौराणिक तात्पर्य काही असो, आजच्या काळातले तात्पर्य असं आहे की विकासाच्या गाभार्‍यात प्रत्येकाने खुलभर दूध टाकले तर समृध्दीचा लोट वाहायला वेळ लागत नाही. फक्त त्याआज्जीबाईसारखं कोणीतरी मार्गदर्शन करायला हवं ! अशीच एक पेला दूधाची कहाणी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत !

ही कथा आहे तोन्से माधव अनंत पै यांची. कर्नाटकातल्या एका छोट्या गावात यांचा जन्म झाला. १९२० साली हा तरूण बंगळूरला डॉक्टर व्हायला गेला. मुळात अत्यंत हुशार असलेल्या माधव अनंत पैंचं शिक्षण लवकरच आटपलं. त्यांच्या मालपे या गावात त्यांनी दवाखाना सुरु केला.  खरं सांगायचं तर या छोट्या गावातल्या डॉक्टरकीत त्यांना रस नव्हता. त्यांना जपानला जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं होतं. त्याला आईवडीलांनी मोडता घातला होता. नाईलाजाने मन मारून माधव अनंत पैंनी आपला दवाखाना त्या छोट्या गावात चालू ठेवला होता.

मालपे हे छोटंसं मच्छीमारांचं गाव होतं. सर्दी-खोकला-हगवण-उलट्या हे वर्षभर छळणारे रोग त्या गावातही होते. पण डॉक्टर पै यांना मात्र व्यवसायात काही केल्या आर्थिक यश मिळत नव्हतं. तुटपुंज्या कमाईवर दवाखाना कसाबसा चालत होता. एकीकडे उच्च शिक्षण घेण्याची संधी हुकली होती आणि दुसरीकडे पुरेशी कमाईपण नव्हती. अशावेळी इतर तरुणांचे होते तेच झाले ! त्यांना अत्यंत नैराश्याने ग्रासले. 

अशाच चिंतेत असताना एक दिवस त्यांच्या लक्षात आले की त्यांचे उत्पन्न न वाढण्याचं कारण त्यांच्याकडे येणारे गरीब पेशंट आहेत.  मग साहजिकच गरीबांचा डॉक्टर गरीबच राहणार ! थोडं निरीक्षण केल्यावर त्यांच्या हे लक्षात आलं की गावात पुरुष फक्त मच्छीमारी करायचे. मासे विकणे आणि पैसे मिळवणे हे काम बायका करायच्या. बायकांच्या हातात पैसे आले की खर्च वगळता राहिलेली जमा पुरुष दारुत खर्च करायचे. डॉक्टरांनी त्यांच्याकडे येणार्‍या बायकांना त्यांची बचत किती हे विचारल्यावर त्या हातात असलेली चिल्लर दाखवायच्या. त्या चिल्लरीतून डॉक्टरांनी चार आणे स्वत:कडे जमा करायला सुरुवात केली. 

दोन चोपड्यांवर हा बचतीचा कारभार सुरु झाला. एक चोपडी डॉक्टरांकडे, तर दुसरी खातेधारकाकडे !

सुरुवातीला येणारे नकार, नकाराची कारणं मोडून डॉक्टरांनी गावातल्या बायकांना बचतीची सवय लावली. काही दिवसांतच काही हजार रुपये जमा झाले. आजच्या काळात हजार म्हणजे फार मोठी रक्कम नाही, पण १९२० साली ही रक्कम फारच मोठी होती. असा जन्म झाला एका बचतीच्या सवयीचा, ज्याला नंतरच्या वर्षांमध्ये नाव मिळालं- ‘ पिग्मी डिपॉझिट स्कीम ‘. इथे या कथेचा पहिला भाग संपला. बायकांना बचतीची  सवय लागली. पैसे जमा झाले. पण पुढे काय?  इथे सुरु झाला या कथेचा दुसरा अध्याय !

क्रमशः….

—डॉ. तोन्से माधव अनंत  पै

प्रस्तुती :-सुनील इनामदार

संग्राहक : – श्री सुनीत मुळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ शेवटची सुट्टी ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले

 

? वाचताना वेचलेले ?

☆ शेवटची सुट्टी…. ☆ प्रस्तुती –  डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

असाच एक English picture बघितलेला…

‘Last Holiday’—‘ आयुष्याची शेवटची सुट्टी ‘— जरा उशिरा लावलेला पण तरीही थोड्या वेळाने कथानक लक्षात यायला लागलं… 

त्यातली नायिका ही सर्वार्थाने सर्वसामान्य असणारी तरुणी. त्यामुळे अर्थातच आयुष्यही सर्वसाधारणच. मात्र एक दिवस तिला अचानक, असाध्य रोग असल्याचं निदान होतं. 

मग ती ठरवते की आपण नोकरी सोडून, अजूनपर्यंत जी ‘सुट्टी घेणं’ परवडत  नव्हतं,  त्या ‘ मोठ्ठ्या सुट्टी ‘ वर जायचं आणि शेवटच्या पै पर्यंत सगळे पैसे उधळून टाकायचे. 

ती उंची पोषाख खरेदी करते आणि एका पंचतारांकित हाॅटेल मध्ये… आपण श्रीमंत असल्याची बतावणी करत,  उच्चभ्रू वर्तुळात वावरते. 

तिथे तिच्या नशिबाचे फासे पलटतात. जुगारात शंभर हजार डाॅलर्स जिंकते. आता बतावणी करायची गरज नाही. लक्ष्मी खरंच प्रसन्न झालेली असते. तिला आनंद तर होतो…पण ती देवाला विचारते….

” why now…? आयुष्य संपताना का एवढा मेहेरबान झालास? “

पण आता तिला कशाचंच सोयर सुतक नसतं. तसंच तिला आता ‘ आणखी काही ‘ गमावण्याचीही भिती नसते. म्हणून ती उरलेलं आयुष्य खरेपणाने जगायचं ठरवते. समाजात वावरताना लागणारा ‘ दांभिक सभ्यतेचा ‘ बुरखा फाडून, स्वतःशी आणि इतरांशी निव्वळ प्रामाणिक रहाते… वागतेे… बोलते.

आणि तिला जाणवतं—– 

“ आतापर्यंत, आयुष्य गृहीत धरताना, आपण आयुष्य खऱ्या अर्थाने जगलोच नाही.  केवळ ‘ भविष्य ‘ आणि ‘ लोकं काय म्हणतील ‘….याची चिंता करण्यात हे सुंदर आयुष्य फुकट घालवलं.”

” I have wasted too much of time on assumptions…..now I have time only for reality! ” 

—–ती राहिलेलं दोन आठवड्यांचं  आयुष्य सच्चेपणानं जगायला सुरुवात करते. तिच्या departmental store owner लाही खरी खोटी सुनावते… त्याच्या चुकीच्या वागण्याची जाणीव करून देते.

—–आणि अचानक तिला कळतं की तिचे reports चुकीचे आहेत… तिला कसलाही आजार नाही… ती एवढ्यात मरणार नाही. तिच्या आनंदाला पारावार रहात नाही. पण या last holiday नं शिकवलेला धडा, ती कधीच  विसरत नाही. तिला तिची नोकरी आणि प्रियकर दोन्ही परत मिळतात—–

फिल्मी भाग सोडला, तर नायिकेच्या या आयुष्याचा प्रवास खरंच विचार करायला लावणारा होता. 

आपणही… आजचा – आत्ताचा क्षण कधी भरभरून जगतंच नाही… मनात कायम उद्याची चिंता ! काही तरी अशाश्वत मिळवण्यासाठी… कायम हातचं सोडून पळत्या पाठी, जीवाच्या आकांताने पळत रहातो—इतरांपेक्षा मागे पडू नये म्हणून मनाविरुद्ध जगाच्या् शर्यतीत सहभागी होतो. 

सगळा आनंद, सगळी मजा, एखाद्या ‘ सुट्टीत ‘ उपभोगण्यासाठी, शिलकीत टाकत जातो….आणि —-आणि हे सगळं व्यर्थ आहे… जे खरच हवं होतं… तो आनंद, ते  समाधान… हे या कशात नव्हतंच… हेे कळायच्या आतच…   ‘ शेवटची सुट्टी लागते ‘. 

शिलकीतली ‘ पुंजी ‘ तशीच राहून जाते… न वापरलेली… कोरीच्या कोरी… पण आता निरूपयोगी  ! 

या ‘ शेवटच्या सुट्टी ‘ पर्यंत वाट न पाहता प्रत्येक क्षण , त्याच क्षणात, चिंता व भयमुक्त जगून घेतला तर?—-

—तर प्रत्येक क्षण त्या ‘सुट्टी’ इतकाच आनंद देईल. 

संग्राहक :  डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! शॉपिंगचा विजय ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? शॉपिंगचा विजय ! ?

“अहो, ऐकलंत का, मला जरा पंधरा हजार द्या !”

“पंधरा हजार ? एवढी कसली खरेदी करणार आहेस ?”

“मनःशांती !”

“काय मनःशांती ? आणि ती सुद्धा फक्त पंधरा हजारात ?”

“हो ! पण या पंधरा हजारात ती फक्त एका महिन्यासाठीच मिळणार आहे बरं का !”

“आणि नंतरचे अकरा महिने ?”

“नंतर पुढच्या प्रत्येक महिन्यासाठी मनःशांती हवी असेल, तर परत दर महिन्याला पंधरा हजार भरायचे !”

“अस्स, म्हणजे मनःशांती मिळवायची प्रत्येक महिन्याची फी पंधरा हजार आहे असं सांग की सरळ !”

“अगदी बरोब्बर ओळखलंत तुम्ही !”

“अगं पण तुला ही मनःशांती देणार कोण ?”

“अहो, आपल्या चाळीत ‘नवरे मनःशांती केंद्र’ सुरु झालं आहे गेल्या महिन्या पासून, ते मी जॉईन करीन म्हणते. घरात तुमची सदा कटकट चालू असते, त्यामुळे जरा शांतता नाही माझ्या डोक्याला !”

“क s ळ s लं ! पण आपल्या चाळीच्या ४५ बिऱ्हाडात, माझ्या माहिती प्रमाणे ‘नवरे’ नावाचे कोणतं बिऱ्हाडच नाही, मग…”

“अहो केंद्राचे नांव जरी ‘नवरे मनःशांती केंद्र’ असलं तरी ते चालवतायत तिसऱ्या मजल्यावरचे गोडबोले अण्णा !”

“भले शाब्बास, अण्याने आता हे नको ते धंदे चालू केले की काय या वयात ?”

“काय बोलताय काय तुम्ही ? धंदे काय धंदे ? चांगल पुण्याचं काम करतायत अण्णा, तर तुम्ही त्याला नको ते धंदे काय म्हणताय !”

“अगं पुण्याचं काम करतो आहे नां अणण्या, मग फुकटात कर म्हणावं ! त्यासाठी प्रत्येका कडून महिन्याला पंधरा हजार कशाला हवेत म्हणतो मी ?”

“अहो केंद्र चालवायचं म्हणजे  कमी का खर्च आहे?”

“कसला गं खर्च ?”

“अहो एक सुसज्ज AC हॉल घेतलाय त्यांनी भाड्याने त्यांच्या केंद्रासाठी ! त्याच भाडं, लेक्चर द्यायला बाहेरून मोठं मोठी अध्यात्मिक लोकं येणार त्यांच मानधन, असे अनेक खर्च आहेत म्हटलं.”

“बरं बरं, पण मला एक कळलं नाही, केंद्राचे नांव त्या अणण्याने ‘नवरे मनःशक्ती केंद्र’ असं का ठेवलंय ?”

“ते मला काय माहित नाही बाई, पण एखाद वेळेस आपापल्या नवऱ्यापासून मनःशांती मिळावी, असा उदात्त हेतू असावा असं नांव ठेवण्या मागे अण्णांचा !”

“हे बरं आहे अणण्याच, स्वतःची बायको शांती, त्याला गेली त्याच्या कटकटीमुळे या वयात सोडून माहेरी आणि हा दुसऱ्यांच्या बायकांना मनःशांतीचे धडे देणार ?”

“अहो शेजारच्या कर्वे काकू सांगत होत्या, शांती काकी जेंव्हा अण्णांना सोडून गेल्या, तेव्हाच अण्णा हिमालयात गेले होते एका आश्रमात साधना करण्यासाठी आणि तिथूनच ते दिक्षा घेवून आले…..”

“आणि आता ते तुम्हां सगळ्या भोळ्या साधकांकडून महिन्याला प्रत्येकी पंधरा हजाराची भिक्षा घेवून तीच दिक्षा देणार, असंच नां ?”

“बरोब्बर !”

“अगं पण तुला हवीच कशाला मनःशांती म्हणतो मी ? आपल्या दोन मुली लग्न होऊन गेल्या आपापल्या सासरी, घरात आपण दोघच ! सासूचा त्रास म्हणशील तर, आई जाऊन पण आता दहा वर्ष….”

“उगाच देवानं तोंड दिलंय म्हणून काहीच्या बाही बोलू नका !  मगाशीच मी तुम्हांला सांगितलंय, तुमची रिटायर झाल्या पासून रोज घरात कटकट चालू असते, त्यामुळे माझी मनःशांती ढासळली आहे !”

“अगं पण तुझ्या ढासळलेल्या मनःशांतीवर माझ्याकडे एक जालीम उपाय आहे ! त्यासाठी महिन्याला पंधरा हजार खर्च करायची काहीच गरज नाहीये !”

“अहो, उगाच महिन्याचे पंधरा हजार वाचवण्यासाठी मला काहीतरी फालतू उपाय सांगू नका तुमचा ! गपचूप…..”

“अगं आधी उपाय ऐकून तर घे मग बोल !”

“ठीक आहे, बोला !”

“हां, तर उपाय असा आहे, मी तुला या महिन्यापासून दर महिन्याला, फक्त तुझ्या शॉपिंगसाठी बरं का, पाच हजार देणार आणि त्याचा हिशोब पण मागणार नाही, बोल !”

“काय सांगताय काय ? फक्त माझ्या एकटीच्या शॉपिंगसाठी महिन्याला पाच हजार ?”

“हॊ s s य!”

“पण अहो, त्या माझ्या पाच हजारच्या शॉपिंगमधे मी तुमची एक लुंगी सुद्धा आणणार नाही, कळलं नां ?”

“अगं लुंगीच काय, माझा एक साधा हातरूमाल सुद्धा मी तुला आणायला सांगणार नाही, मग तर झालं !”

“मग ठीक आहे !”

“पण त्यासाठी माझी एक अट आहे”

“आता कसली अट?”

“हे महिन्याचे तुझ्या एकटीच्या शॉपिंगसाठीचे पाच हजार तुला पाहिजे असतील, तर ‘नवरे मनःशांती केंद्राचा’ नाद तुला सोडावा लागेल !”

“पण मग माझ्या ढासळलेल्या मनःशांतीवरच्या उपायाच काय ?”

“ते काम माझ्याकडे लागलं !”

“तुम्ही करणार उपाय?”

“हो s s य !”

“अहो मला जरा कळेल का, तुम्ही कसला उपाय करणार आहात ते !”

“अगं साधा पंधरा रुपयाचा उपाय आहे, तू माझ्यावर सोड !”

“आता बऱ्या बोलानं सांगताय, का जाऊ नांव नोंदवायला अण्णांकडे ?”

“अगं काही नाही, खाली जातो आणि पंधरा रुपयात मिळणारे, स्विमिंग करतांना पोहणारे लोकं, जे इअर प्लग्स घालतात ते घेवून येतो !”

“त्यांच मी काय करू ?”

“अगं तुला असं जेव्हा जेव्हा वाटेल, की मी आता तुझ्याशी कटकट करायला सुरवात केली आहे, तेव्हा तेव्हा ते तू कानात घालायचेस ! म्हणजे तुला माझ्या बोलण्याचा त्रास होणार नाही आणि तुझी……”

“मनःशांतीपण ढासळणार नाही, काय बरोबर नां ?”

“अगदी बरोब्बर ! मग आता काय, जाणार का त्या ‘नवरे मनःशांती केंद्रात नांव नोंदवायला ?”

“नांव नका काढू त्या केंद्राचे, पण माझं

आत्ताच्या आत्ता एक काम करा जरा !”

“ते आणि काय ?”

“तसं काही खास नाही, मी आल्याचा चहा घेवून येते, तो पर्यंत या महिन्याचे माझे शॉपिंगचे पाच हजार काढून ठेवा ! लगेच या महिन्याच्या शॉपिंगला जाते ! शुभस्य शीघ्रम !”

असं बोलून बायको किचन मधे पळाली आणि मी दर महिन्याचे दहा हजार कसे वाचवले याचा विचार करत, स्वतःची पाठ स्वतःच थोपटू लागलो ! शॉपिंगचा विजय असो !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

२१-०१-२०२२

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ काळी चंद्रकळा नेसू कशी? ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

?विविधा ?

☆ काळी चंद्रकळा नेसू कशी? ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

महाराष्ट्रीयन स्त्रियांच्या वेषभूषेत नऊवारी, पाचवारी साडीची खासियत असते. पंजाबी ड्रेसचे प्रमाण वाढले असले तरी लग्नात मिरवायला शालू, पैठणीच आवडते. आपल्या महाराष्ट्रीयन पद्धती नुसार लग्नानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला काळी साडी घेण्याची पद्धत होती. काळ्या साडीवर पांढरी खडी असलेली चंद्रकळा उठून दिसत असे. त्यावर हलव्याचे दागिने घातले की चंद्र कळा अधिकच खुलून दिसे. लग्नानंतर पहिल्या वर्षी हौसेने हळदीकुंकू करून नवीन सुनेला काळी साडी नेसायला लावणे आणि हलव्याचे दागिने घालून तिचा सण करणे हे सासू ला आवडत असे तसेच सुनेलाही त्यात कौतुक वाटत असे. आमच्या लग्नानंतर माझ्या मोठ्या नणंदेने हलव्याचे सर्व दागिने करून आणले होते. बिंदीपासून ते पायातल्या जोडव्या पर्यंत! अगदी कंबर पट्टा सुद्धा केला होता हे सर्व दागिने काळ्या चंद्र कळेवर खूपच खुलत होते.इतकी वर्ष झाली तरी तेव्हाचा तो   चंद्रकळेचा स्पर्श मनाला आठवतो आणि अजूनही मी अधून मधून संक्रांतीला काळी साडी खरेदी करते.

जानेवारी महिन्यात येणारा संक्रांत सण हा विविध गोष्टीने सजलेला असतो शेतकऱ्यांसाठी शेतात पिकणारी दौलत- बाजरी वांगी, तीळ,सर्व प्रकारची धान्ये आणि भाज्या -अशा स्वरूपात दिसत असते. भारतात सगळीकडे हा सण विविध रुपात साजरा केला जातो. दक्षिणेत त्याला ‘पोंगल’ म्हणतात.तर उत्तरेकडे हा संक्रांतीचा सण ‘पतंगाचा सण’ म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवसात हवा स्वच्छ असते. आकाश निरभ्र असते. आकाशाच्या पार्श्वभूमीवर उंच  उंच जाणारे पतंग मनोहारी दिसतात.!

या सणाला दानाचे महत्त्व आहे.त्यामुळे आपल्या जवळ असलेले दुसऱ्याला देणे ह्याचे संक्रांतीला महत्व आहे.हळदीकुंकू करून त्या निमित्ताने सवाष्णी ला दान करणे हा मूळ हेतू होता,तो कमी होऊन आता कोणी काय वस्तू लुटल्या हे सांगणे आणि आपले वैभव दाखवणे यासाठीच हळदीकुंकू समारंभ करतात की काय असे वाटते! पूर्वी सुगड दान

करत असत.त्या सुगडात उसाचे करवे, तीळगुळ,वाटाणा हरभरा,पावटा,यासारखे त्या दिवसांत मिळणाऱ्या गोष्टी घालत असत.आता सुगडाची पध्दत शहरात फारशी दिसत नाही,पण गावाकडे मात्र अजूनही सुगडांचे पूजन केले जाते.

आपल्या हिंदू संस्कृतीत आपले सणवार हे कालानुरूप साजरे केले जातात.या थंडीच्या दिवसांत स्निग्ध पदार्थ जास्त खावेत या हेतूने तीळगुळ, तूप, लोणी,बाजरी यांसारख्या गोष्टींचा उपयोग आहारात केला जातो.संक्रांतीनंतर सूर्याचे संक्रमण होऊन दिवस मोठा होऊ लागतो.उष्णता वाढू लागते.उन्हाळ्यात काळे कपडे आपण घालू शकत नाही. पण संक्रांतीला आपण आवर्जून काळे कपडे वापरतो.लहान बाळांना बोरन्हाण घालणे,काळी झबली,फ्राॅक घालणे हे सर्व कौतुकाने करतो,कारण पुढील चार महिने काळा कपडा अंगावर नको वाटेल! प्रत्येक सण असा काही हेतू ने साजरा केला जातो.

आज काळी साडी कपाटातून बाहेर काढल्यावर आपोआपच असे काही विचार, आठवणी मनात जाग्या झाल्या, त्या शब्द रूपात प्रकट केल्या.. इतकेच!‌

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ वृद्धत्व श्रावणबाळाचे !! …’स्नेहसावली’ संस्थांतील एक समाजसेवक ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर

??

☆ वृद्धत्व श्रावणबाळाचे !! …’स्नेहसावली’ संस्थांतील एक समाजसेवक ☆ संग्राहक – श्री अनंत केळकर ☆

काही महिन्यांपूर्वी अमिताभ बच्चन व ऋषी कपूर यांचा नितांत सुंदर अभिनय असलेला “नॉट आऊट १०२” हा चित्रपट बघण्यात आला. अमिताभ १०२ वर्षांचा व त्याचा मुलगा ऋषी कपूर ७५ वर्षाचा. ऋषी कपूरला सतत आपण म्हातारे झालेलो आहोत असे वाटत असते. तर अमिताभला १०२ व्या वर्षीदेखील आपण तरुण आहोत व जीवन मुक्तपणे अनुभवत मजेत जगले पाहिजे असे वाटत असते. ह्या दोघांच्या विरुद्ध मानसिकतेमधून जो गोंधळ निर्माण होतो त्यामुळे चित्रपट खूप मनोवेधक बनला आहे. ह्यात अमिताभ आपल्या मुलासाठी वृद्धाश्रमाचा शोध घेत असतो.

असाच काहीसा एक वेगळा अनुभव मला ‘ स्नेहसावलीत ‘ आला —– 

एक ७५ वर्षांचे आजोबा चौकशीकरता संस्थेत आले. त्यांना माझ्याशीच बोलायचे होते. किरकोळ देहयष्टी, शरीरावर जाणवणारा मानसिक थकवा, जाड भिंगाचा चष्मा, हातात काठी असे हे आजोबा अत्यंत चिंतातूर स्वरात विचारात होते,– “ डॉक्टर इथे अगदी व्यवस्थित काळजी घेतली जाईल ना हो? ‘  मी म्हणालो, “ आजोबा अजिबात काळजी करू नका. इथे तुमची उत्तमरीत्या काळजी घेतली जाईल.” त्यावर ते म्हणाले, ” नाही नाही डॉक्टर, मला माझ्यासाठी नाही, तर माझ्या आईला इथे ठेवायचे आहे जिचे वय आता ९८ वर्षे आहे. आम्ही घरी दोघेच असतो.  १० वर्षांपूर्वी माझी बायको कर्करोगाने गेली. माझा मुलगा परदेशात असतो. मी आणि आई दोघेच घरी असतो. आई अगदी ठणठणीत आहे.  कुठलाही आजार नाही तिला.  फक्त आताशा कमी ऐकायला येते.” 

मी आश्चर्यचकित होऊन विचारले,” अहो मग आत्ताच तुम्हाला त्यांना इथे का ठेवावे वाटत आहे? ”  “ त्याचे काय आहे डॉक्टर, मला मागच्या वर्षीपासून हार्टचा त्रास होत आहे, दमही लागतो आहे. मला जर काही झाले तर तिच्याकडे कोण पाहणार? माझ्या जन्मापासून आज ७५ वर्षे आम्ही एकत्र राहत आहोत. मला आईची खूप काळजी वाटते. आजकाल माझ्याच्याने तिची सेवा करणेही होत नाही.”  

त्यांचा हा अनुभव ऐकून मी खूपच  आश्यर्यचकित  झालो. मी सहज आजोबांना म्हणालो–”  मग तुम्ही आणि आई एकत्रच इथे स्नेहसावलीत का नाही राहत?”  त्यावर त्यांचं उत्तर खूपच मनाला भिडणारं होतं – “अहो माझ्या आईला जी माझी सतत सोबत असण्याची सवय आहे ती मोडायची आहे. उद्या मला काही झाले तर ह्या वयात ती हे दुःख सहन करू शकणार नाही. ती जशी आज ठणठणीत आहे, तशीच शेवटपर्यंत असावी अशी माझी इच्छा आहे. मलाही तिला इथे सोडताना खूप दुःख होणार आहे. पण तिला माझ्याशिवाय राहण्याची पण सवय झाली पाहिजे.”  हे ऐकून मी अगदी सुन्न झालो. मुलांकडून आईवडिलांकडे दुर्लक्ष  केल्या जात असणाऱ्या ह्या काळात एक ७५ वर्षाचा मुलगा ९८ वर्षाच्या आईच्या मनाची एवढी काळजी घेताना बघून मानवी नात्यातील घट्ट वीण आणि ती धरून ठेवताना स्वतःला विसरून, प्रसंगी त्रास सहन करूनदेखील दुसऱ्यांचे मन जपण्याचा अट्टाहास करणारे लोक पाहिले की चांगुलपणाच्या पराकोटीत्वाची जाणीव होते…!!

लेखक : – “स्नेहसावली“ या संस्थेतील एक समाजसेवक 

संग्राहक : – श्री अनंत केळकर 

≈ संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फुलका कठीण नसतोच मुळी !! ☆ संग्रहिका – सुश्री प्रतिभा तळेकर

? वाचताना वेचलेले ?

☆ फुलका कठीण नसतोच मुळी !! ☆ संग्राहिका – सुश्री प्रतिभा तळेकर ☆

त्या दिवशी रात्री मी स्वैपाक करताना माझा छोटा मुलगा जवळ उभा राहून पहात होता. 

मी छोटासा फुलका लाटून तव्यावर टाकला, आणि एकदा परतून भाजून घेतला. 

तोवर दुसरा लाटून तयार होताच. एका हातात पकड घेऊन तवा उचलला, आणि फुलका चिमट्याने त्यावर धरला, लगेच तो फुगून आला. 

मुलगा आश्चर्याने म्हणाला  “झाला पण फुलका? इतका सोप्पा ??”

मी म्हणाले,  “हो, कठीण नसतोच मुळी फुलका.” 

खरं तर सगळा स्वैपाकच मुळी सोप्पा असतो . कठीण असतं ते—-

तो रोज रोज करणे, ^दिवसातून^ अनेक वेळा ओट्याशी झुंजत उभे राहणे, आपल्या मूडचा, मनःस्थितीचा ,आजारपणाचा, दुखण्याचा कशाकशाचा विचार न करता अचूक आपली भूमिका निभावत, भयंकर उकाड्यात देखील शेगडीजवळ न कंटाळता लढत देणे .

सगळे संपले असे वाटत असतानाच,  ऐन वेळेवर नव्याने कणीक मळून चार पोळ्या जास्त कराव्या लागणे. स्वैपाकघर आवरून ठेवल्यावर ‘ संपली एकदाची दगदग आतापुरती ‘ असे वाटत असतानाच… बैठकीतून ”आज जेवूनच जा “चा पुरुष मंडळींनी पाहुण्यांना केलेला आग्रह हसून साजरा करणे आणि तडक बिनपगारी overtime करणे आणि हे करीत असताना प्रत्येकाची भाजी, तिखट, चटणीची ^वेगळी आवड^,  आणि ^तर्‍हा^ समजून घेऊन, त्यानुसार जास्तीत जास्त मने सांभाळत खपणे. 

बरे एवढे करून भागेल तर कसले स्वैपाकघर?  म्हणून सगळा जीव निघून गेल्यावरही ओटा, शेगडी, भांडी सगळे घासून पुन्हा लख्ख करून ठेवणे आणि –  इतक्या मेहनतीला साधा कुणी thank you चा उच्चार ही न करता,  साधी पुढली ताट देखील न उचलता निघून जाणे.  

भरीस भर म्हणून ‘ ह्यात कोणते जग जिंकले??  स्त्रिया असतातच स्वैपाक आणि घरकाम करण्यासाठी टाइप ‘ अशी सामाजिक मान्यता असणे.. 

आणि हे सगळे, शिकल्यासवरल्या स्त्रिया आहात म्हणून बँक, शाळा, नोकर्‍या, उद्योग, असे उत्पन्नाचे मार्ग अवलंबत राहून, आणि  मीठ- मसाला, नातेवाईक, सण समारंभ अशा इतर अनेक जास्तीच्या गोष्टी सांभाळून,  फिरून ओट्याशी दोन हात करीत न कुरकुरता उभे राहणे. 

^कामवाल्या बाईला^ निदान पगार तरी देतात, ^घरच्या बाईला^ तर तेवढीही किंमत नसते. 

अरे —-

 * फुलका कठीण नसतोच मुळी—-

——————– कठीण असतो तो स्त्री जन्म .*

(खूप साऱ्या स्त्रियांचे मनोगत …)

संग्राहिका – सौ. सुनीता पाटणकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी आलेख ☆ वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया: उभया भारती ☆ सौ कुंदा कुलकर्णी

सौ कुंदा कुलकर्णी

 ? वेद व पुराण काळातील महत्वपूर्ण स्त्रिया ?

☆ उभया भारती ☆ सौ कुंदा कुलकर्णी 

उभया भारती

उभया भारती ही मंडनमिश्र यांची पत्नी होती. मंडन मिश्र हे वेदांती पंडित होते. दोघे पती-पत्नी अति विद्वान असून आदर्श जोडपे होते. ते दोघे मध्य प्रदेशातील बिहार राज्यात माहिष्मती नगरी येथे राहत होते. मंडनमिश्र आदि शंकराचार्यांचे समकालीन असून वेदांती पंडित होते. मंडनमिश्र हे ब्रह्म देवाचा अवतार व उभया भारती सरस्वतीचा अवतार असे मानले जाते.

शंकराचार्य अत्यंत विद्वान होते. त्यांना संन्यास मार्गाचा प्रचार करायचा होता. पण त्यापूर्वी त्यांना मंडनमिश्र यांच्याशी  वादविवाद करण्यास सांगितले गेले. म्हणून शंकराचार्य माहिष्मती नगरीत आले. त्यांनी तेथे मंडनमिश्र यांचा पत्ता विचारला असता लोकांनी सांगितले” ज्यांच्या घराच्या दरवाजावर एका पिंजऱ्यात बंदिस्त असलेले , पोपट संस्कृत मधून अमूर्त विषयांवर चर्चा करत असतील ते त्यांचे घर होय.” त्याप्रमाणे शंकराचार्य तिथे आले. एका पिंजऱ्यात मैना आणि पोपट बंदिस्त असून त्यांच्यात चर्चा रंगली होती विषय खालील प्रमाणे होते.

1) वेद स्वप्रमाणित आहेत की नाहीत?

2) कर्माचे फळ कर्म सिद्धांत देतो की ईश्वर

3) जग नित्य आहे की अनित्य आहे?

हे संभाषण ऐकून शंकराचार्य आश्चर्यचकित झाले व त्यांनी मंडनमिश्र यांना वाद-विवाद सभा घेण्यास सांगितले. त्यासाठी योग्य व्यक्ती म्हणून उभया भारतीने न्यायाधीश बनावे असे ठरले. या  वादामध्ये जो पराभूत होईल त्याने विजेत्या चा आश्रम स्वीकारावा असे ठरले. मंडन मिश्र हरले तर त्यांनी संन्यास धर्म स्वीकारावा व शंकराचार्य हरले तर त्यांनी विवाह करून गृहस्थाश्रम स्वीकारावा असे ठरले.

दोघे अतिशय विद्वान असल्यामुळे वाद-विवाद अतिशय गतिशील आणि मनोरंजक होता. दोघेही ज्ञानाचे दिग्गज होते. भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास दोघांचा उत्तम होता.

उभया भारती गृहिणी होती. तिला खूप दैनंदिन कामे होती. तिने एक युक्ती काढली. दोघांच्या गळ्यात एक सारखे फुलांचे हार घातले. ज्याच्या गळ्यातील हारातील फुले सुकतील तो पराभूत व ज्याच्या गळ्यातील हारातील फुले टवटवीत असतील तो विजयी असे तिने सांगितले. हरलेल्या माणसाला खूप राग येतो. त्याच्या शरीरात उष्णता वाढते व त्यामुळे फुले सुकतात. तिच्या विद्वत्तेवर,नि:पक्षपातीपणावर , शहाणपणा वर दोघांचा विश्वास होता.

अठरा दिवसानंतर तिने पाहिले की मंडनमिश्र यांच्या गळ्यातील हार सुकलेला आहे. तिने शंकराचार्यांना सांगितले, तुम्ही पूर्ण विजेता ठरू शकत नाही. मी मंडनमिश्र ची अर्धांगी आहे. तुम्ही त्यांना जिंकून अर्धे अंग जिंकले. आता माझ्याशी वाद-विवाद करून मला जिंकला तरच तुम्ही विजेता ठराल. शंकराचार्यांनी मान्य केले.

तिने त्यांना कामुक कला आणि विज्ञान यांच्या विषयी प्रश्न विचारले. शंकराचार्यांनी कबूल केले मला यातील ज्ञान नाही. मी बाल ब्रह्मचारी आहे. उभया भारतीने युक्तिवाद केला” तुम्ही सर्वज्ञ आहात ना? मग काम शास्त्राचे ज्ञान तुम्हाला का नाही? भारतीय संस्कृतीने “काम” पुरुषार्थात समाविष्ट केलेला आहे. मग तो त्याज्य आहे का? जर मानवी जीवन निर्मितीचा तो आधार आहे तर तुम्ही त्याच्याकडे तुच्छतेने का पाहता?कामशास्त्राचा अभ्यास  केला तर संन्यासधर्माला धक्का बसतो का? तुम्ही स्वतःला सर्वद्न्य समजता पण तुम्ही लग्न केले नाही .कामशास्त्राचे अजिबात ज्ञान नाही. माझ्या प्रश्नांची उत्तरे दिलीत तरच तुम्ही विजेता बनाल.”

शंकराचार्य हार मानायला तयार नव्हते त्यांनी तिच्याकडून मुदत मागून घेतली. परकाया प्रवेश करून एका राजाच्या अंतःपुरात राजाचे रूप घेऊन ते काही महिने राहिले. लैंगिकतेचे पूर्ण ज्ञान मिळवले.व पुन्हा मूळ रूपात

येऊन उभया भारतीच्या या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली. तिचे समाधान झाले. तिने शंकराचार्यांना ” सर्वात मोठा वैदिक विद्वान ” घोषित केले. मंडनमिश्र यांनी ठरल्याप्रमाणे संन्यास धर्माचा स्वीकार केला. उभया भारती शापमुक्त झाली व स्वर्गात निघून गेली.

अशा या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वाच्या उभयाभारतीला प्रणम्य शिरसा वंद्य , वंद्य, वंद्य.

प्रणम्य शिरसा वंद्य , वंद्य, वंद्य.

 

© सौ. कुंदा कुलकर्णी ग्रामोपाध्ये

क्यू 17,  मौर्य विहार, सहजानंद सोसायटी जवळ कोथरूड पुणे

मो. 9527460290

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ बापाची सायकल…..! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर

? विविधा ? 

☆ बापाची सायकल…..! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆

बापाच्या बँक खात्यात दोन पैसं आलं की नेहमीप्रमाणं आमच्या आप्पांची आईच्या मागं भूणभूण असायची. मला हे घेऊन दयायला सांग म्हणून. त्यातच वरच्या आळीतली सरमाडी पोटात गेली की मग साऱ्या गावात हाय लय भारी म्हणत ओरडत रहायची त्यांची सवय साऱ्या घरादाराला आणि गावाला पण काही नवीन नाही.

आमच्या लहानपणापासून आम्ही आप्पांना असंच पहात आलोय. सारं आयुष्य झिंगतच काढलेल्या बापाची ही सवय काही अजून तर सुटलेली नाही. चार दिवस आईबरोबर भूणभूणत राहणाऱ्या आप्पाचं -मला सायकल तर नवीन घेऊन दयायला सांग नाहीतर इलेक्ट्रिक गाडी तर घ्यायला सांग – त्याला शिकवलंय कुणी -मी- अशी रोजचीच बडबड आई फोनवरून सांगत रहायची. “बरं घेऊया ” म्हणत मी ऐकत रहायचो-आणि क्षणभर मन भूतकाळात जाऊन यायचं…..!

गावातनं १५ किलोमीटरवर असणाऱ्या आटपाडीच्या साखर कारखान्यात करकरणाऱ्या सायकलीने पाय खोडत केलेल्या बापाच्या पाळ्या नजरेसमोरून हटता हटत नाहीत. पाच सहा महिन्यातनं एकदा झालेला पगार तिकडच गडप करून आलेल्या बापाचं रिकामंपण अजूनहीं विसरता म्हणता विसरता येत नाही. कारखाना बंद पडला.. बापाचं कामपण बंद झालं. पण बापाच्या अंगाचा कारखान्याच्या मळीचा वास आणि लिकरची साथ काय सुटली नाही. कारखान्यात असताना आटपाडीच्या स्टँडवर सायकल एकीकडे आणि बाप एकीकडे पडलेला दिसायचा. खरंतर दारुड्या विठूची पोरं म्हणूनच आजही गावात आमची ओळख. (मी सेट/नेट झाल्यावर व दिल्ली येथे भारतीय दलित साहित्य अकादमीचा माझ्या  ‘काळजातला बाप’ या पुस्तकाला फेलोशिप मिळाल्यावर पोरांनी गावातल्या चौकात मोठे पोस्टर लावले होते. त्या पोस्टर पुढं बाप कितीतरी वेळा पिऊन पडलेला असायचा. गावी गेलो की अजूनही पोरं सांगत राहतात.)….बाप चांगला असला की त्यांच्यासारखा कुणी नाही पण बिघडला की बापासारखा कुणी नाही ; असं आजही कुणी कुणी बोलत असतं. पोरांनी शिकावं म्हणून उपदेशाचे डोस देत रहाणारा बाप नेहमीच आठवत राहतो. त्यांच्या भीतीनं कोपऱ्यात अभ्यास करत बसलेल्या आम्हा तिघा भावंडाना पाहून बापाचं काळीज सुपाएवढं व्हायचं. “मला हे दत्तगुरु दिसले ” हे गाणं म्हणत बाप तिथंच बडबडत रहायचा. पगार झाल्या झाल्या बाप आटपाडी स्टँडवरच्या पेपर स्टॉलवरून चंपक आणि चांदोबा पुस्तकं हमखास आमच्यासाठी आणायचा. पोरांना जगाची ओळख व्हावी म्हणून बाप त्याही काळी रोज आटपाडीतून कामावरून येताना वर्तमान पेपर नेमानं आणायचा. “शिक्षण हा तिसरा डोळा राहू नको तू भोळा”अशी गाणी म्हणत रहायचा. आई मात्र काबाडकष्ट करून बापाचा संसार जगवत रहायची.स्वतः अडाणी असून पोरांच्या शिक्षणासाठी शेतामातीत झिजत राहायची.

आजही बापाचं जगणं आणि आईचं झिजणं जसंच्या तसंच आहे…..!

गेल्या महिन्यात विदयापिठाच्या पीएचडीच्या इंटरव्ह्यूनंतर सिलेक्शन झाल्यावर पहिल्यांदा बापाला फोन लावला आणि सांगितले – “आप्पा, पीएचडी म्हणजे काय माहीत आहे का.”…”होय माहित आहे की ”  ……. “तुमच्या पोराला पीएचडीला अँडमिशन मिळाले आहे. तुमच्या दोस्तांना सांगा दारुड्या बापाचं पोरगं पीएचडी करतय म्हणून “…..बाप फोनवर क्षणभर स्तब्ध झाला. मनापासून हसला. कारखान्यातल्या गोड साखरंसारखा बापाचा भास मला विद्यापीठाच्या त्या आवारात जाणवत राहीला. आईला विचारलं “आई तू शाळेत गेली होतीस का “……”हं कशाची शाळा बाबा”…….” मग तू पण सांग तुझ्या मैत्रिणींना,अडाणी आईचं तुझं पोरगं पीएचडी करतंय म्हणून.. “……नकळत तिच्या झिजलेल्या शरीरावरही मुठभर मांस चढल्याचं क्षणभर जाणवलं. (खरंतर पूणे, कोल्हापूर, सोलापूर आणि जळगाव या चार विद्यापीठाची मी एकाच वेळी पीएचडी साठीची पेट परीक्षा दिली होती.या चारही विद्यापिठाच्या पीएचडीसाठी मी क्वालिफाईड झालो होतो.हा अनुभव माझ्यासाठी खरंतर माझं सगळं घरच पीएचडी झाल्यासारखा होता.)

……………….. नेमका हाच धागा बापानं पकडून ठेवला होता. आणि आईच्यामागं सायकल किंवा मोटर सायकल पाहिजेच आणि तीही ‘झेंडा उंचा ‘च्या दिवसापर्यंतच- म्हणून भूणभूण लावली होती….वर “मीच शिकवलंय पोराला “..म्हणून जरब मात्र ठेवला होता……!

सायकल की मोटार सायकलवरून शेवटी सायकलवरचा त्यांचा शिक्का फायनल झाला. (गावी आजही बापाच्या नावानं घेतलेली ओमनी गाडी व सीडी हंड्रेड या गाडया आहेत. शिका म्हंटलं तरी बापानं कधी चालवल्या नाहीत. गाडीच्या पाठीमागे मोठ्या अक्षरात ‘आप्पा’लिहलेली अक्षरे पाहूनच बाप समाधानी. त्यामुळं कदाचित बाप सायकलीवर ठाम झाला असावा.)…….आणि मग ठरलं. ‘तुम्हाला कसली सायकल पाहीजे ती घेऊया की..या सांगलीला’-  म्हणून सांगलीत बोलवून घेतले.सायकलच्या दुकानातील वेगवेगळ्या देखण्याझार दिसणाऱ्या सायकलीवरुन बापाची नजर फिरत फिरत एकदाची एक सायकल फायनल झाली.२४ इंचीच सायकल पाहिजेचा हट्टही पुरा झाला. हरक्युलसवरून टाटाची दणकट सायकल बापाला आवडली.जे हवे ते सर्व पार्टस् बसवून सायकल स्वारी तयार झाली…… “लगेच गावी घेऊन जाणार,मी काही थांबणार नाही ” म्हणत बाप एसटी स्टँडकडे निघाला सुद्धा.सांगलीचे एसटी कंट्रोलर असणारे माझे मित्र मोरे साहेबांना सायकलीबद्दल अगोदरच सांगितले होते.त्यांच्या सहकार्याने नवी कोरी सायकल एसटीच्या टपावर व्यवस्थित बांधली.आप्पांना एसटीत बसविले आणि सायकल करगणीत उतरून घ्यायला सांगितले.गावी भावाला फोन करून करगणीत एसटीची वाट पहायला सांगितले…..एसटी हलेपर्यंत हरखून गेलेल्या बापाबरोबर काही क्षण घालवले.ज्या एसटीने बाप मला जेवणाची गाठोडी पाठवायचा आणि ती गाठोडी आटपाडी-जोतिबा गाडीतून ज्या ठिकाणी घ्यायचो ती सांगली स्टॅडवरची जागा डोळेभरून मी पहात होतो.

आज त्याच डेपोतील एसटीने माझ्या बापाची सायकल रुबाबात जिथे बाप पोराच्या शिक्षणासाठी एसटीत डबे ठेवायचा त्या ठिकाणी निघाली होती….!

…..घरी मात्र अजूनही करकरणारी बापाची जूनी सायकल…आता तिला काय वाटत असेल याच विचारात मी हरवून गेलो होतो…..आणि बापाची नवी कोरी सायकल त्या एसटीच्या टपावरून खुद्कन् हसत मला टाटा-बाय-बाय करत होती……!!

 

© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर..

‘काळजातला बाप ‘कार..

मु.पो.बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली

९४२११२५३५७…

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares