फुलपाखरू… किती निर्मळ आणि स्वच्छंदी जीवन असतं त्याचं…, जीवशास्त्र हे सांगतं की फुलपाखराचे आयुमान फक्त चौदा दिवसाचं असतं… तरी सुद्धा ते किती आनंदात जगतांना आपल्याला दिसतं… या फुलावरून त्या फुलावर लीलया उडतं, जीवन कसं जगावं याचा परिपाठ जणू ते सर्वांना शिकवत असतं…आपल्याच विश्वात रममाण असणारं हे फुलपाखरू खरेच एक आदर्शवादी कीटक आहे… वास्तविकता त्याला पण खूप शत्रू परंपरा लाभलेली आहे, तरी सुद्धा तो आपला जीवनक्रम विना तक्रार पूर्ण करतं… या उलट शंभर वर्ष वयाचा गर्व असणाऱ्या माणसाला नेहमीच आपल्या कार्याचा, आपल्या नावाचा, आपल्या पदाचा गर्व असतो, तो त्या गर्वातच संपून सुद्धा जातो… अहो शंभर वर्ष आयुष्य जरी माणसाचं असलं, तरी मनुष्य तितका जगतो का…? यदाकदाचित एखादा जगला तरी… ” वात, कफ, पित्त…” हे त्रय विकार त्याला शांत जीवन जगू देतात का…? अगणित विकार उद्भवुन लवकर मरण यावे म्हणून हा मनुष्य देवाला साकडं घालत असतो… मग काय कामाचं ते शंभर वर्षाचं आयुष्य. आणि म्हणून मला फुलपाखरू खूप आणि खूपच आवडतं… *( short but sweet life… )
एक चांगला गुरू म्हणून मी त्याकडे नेहमी पाहतो, जीवन जगण्याची कला मी त्याकडूनच अवगत केलीय… जेव्हा जेव्हा मी उदास होतो, मला कंटाळा येतो, तेव्हा मी फुलपाखराला आठवतो… मला एक लहानपणी कविता होती, फुलपाखरू छान किती दिसते, फुलपाखरू… आणि तेव्हापासून त्याची आणि माझी घट्ट मैत्री झाली आहे…
My dear friend the butterfly… forever
शेवटी एकच सांगावे वाटते की इथे आपले काहीच नाही, सर्व सोडावे लागणार आहे, मग कशाला उगाचच व्यर्थ गर्व करून रहावं… प्रेम द्या प्रेम घ्या, आणि प्रेमानेच मग मार्गस्थ ही व्हा…!
☆ ज्येष्ठतेचा ‘देहशतवाद’.. ☆ सुश्री वैशाली पंडित ☆
(मजेशीर हलका फुलका लेख जरूर वाचा)
ज्येष्ठ नागरिक या इयत्तेत प्रवेश केला की पहिल्या दिवसापासूनच सावध रहावं लागतं.आता मागच्या इयत्तांतल्या पाठ्यपुस्तकांचा अर्थातच काय्येक उपयोग नाही. नवा अभ्यासक्रम, नवनवीन चाचणी परीक्षा, त्याही ठराविक वेळापत्रकानुसार वगैरे फाजील लाड नाहीत. अचानक परीक्षा जाहीर की बसा सोडवत पेपर. अभ्यास चांगला झालेला असेल तर व्हालच पास. अन्यथा भोगा…!
तर ‘ज्येष्ठ’ झाल्यावर ‘ताबा’ हा पहिला धडा सतत पाठ करावा लागतो.बरं तो नुसता घोकंपट्टी करून नव्हे; तर आचरणात आणावा लागतो तरच आरोग्याच्या सीमेवरचे सैनिक आपलं रक्षण करतात.
कसला ताबा ?
कुणावर ताबा ?
अर्थातच पहिला ताबा जिभेवर !
आत्तापर्यंत काय खाल्लं काय पचवलं, काय नाही पचवलं याचा सव्याज हिशेब फेडायची वेळ आलेली असते.ज्येष्ठत्व आता आहारातही दिसणं सक्तीचं असतं. मनाला येईल तेव्हा हाणायचे दिवस मागे पडले.आपल्याला काय आणि किती खाल्लेलं पचतं हे स्वतःला प्रामाणिकपणे विचारूनच ठरवावं लागतं.
” ओ, आता अरबटचरबट खाणं बंद करा.”
” आता आम्हाला सांगायची वेळ आणू नका तुम्ही खाण्यावरून.”
असे सल्ले आपल्या मुलाबाळांकडून ऐकणं कमीपणाचं वाटत असेल तर मुळात तशी वेळच का आणा आपण ?
दुसरा ताबाही जिभेवरचाच.पण तो मिताहाराबरोबरच मित शब्दांचा.
खूप काही शेकडो, सहस्र, लाखो, अनंत गोष्टी खटकू लागलेल्या असतात आता.अगदी फडाफड सुनवावं नि सरळ करावं एकेकाला असं वाटत असतं… कबूल… पण सबूर… आता मनात आलेले विचार आणि तोंड यांच्यात एक बारीक जाळीची चाळणी फिट करून घ्यायची.म्हणजे मनातले शब्द बुळुक्कन बाहेर येणार नाहीत.तारतम्याने चाळूनच शब्दयोजना व्हायला हवी.
तीही आवश्यकता भासली तरच ! उगाचच मुलाबाळांच्या ज्यात त्यात आपलं नाक खुपसून तोंडाची चाळण उघडायची नसतेच मुळी.
विचारला(च समजा ) सल्ला तर मनापासून द्यावा पण तो ऐकावाच असा आग्रह बिल्कूल धरू नाही.त्यावरून रूसू रागवून आपली शोभायात्रा तर मुळीच काढून घेऊ नाही.
ज्येष्ठ ‘अगं’ ना निदान घरकामातल्या लुडबुडीचा थोडा तरी विरंगुळा असतो.पण ‘ अहों ‘ ना तोही नसतो.रिकामपणत्यांना त्रास देतं नि अहो अगंना छळतात.नको जीव करतात.अहो आणि अगंना आता एकमेकांच्या दुख-या नसा पुरत्या माहीत झालेल्या- असतात.अशा वेळी दोघांनी गुण्यागोविंदाने भांडत बसावं.एकमेकांच्या औषधपाण्याची मधूनच भांडणाच्या एपिसोडमध्ये ब्रेक घेऊन आठवण करावी.
दुर्दैवाने एकटा जीवच या इयत्तेत असेल तर मात्र स्वतःचा अभ्यासक्रम स्वबळावरच पूर्ण करावा लागतो.त्यासाठी स्वयंसमुपदेशनाची सवय लावून घ्यावी लागते.
आता शरीर आपल्याकडे कर्जफेडीचा तगादा लावत असतं.तिकडे प्राधान्याने लक्ष द्यावं लागतं.
चालतानाही प्रत्येक पाऊल अत्यंत सावधगिरीने टाकावं लागतं.वा-यावर उधळून घेणा-या तरूणपणासारखं आता किधर भी देखना न् किधर भी चलना चालतच नाही.चालता चालता आता इकडे तिकडे बघायचे दिवस संपलेले आहेत.पायांकडची नजर हटी तो दुर्घटना घटीच समजा.
देह नावाचा प्राणी आता त्याच्याकडेच…त्याच्याकडेच्च लक्ष द्यावं म्हणून हटून बसलेला असतो.
लहरी झालेला असतो. त्याची लहर केव्हा, कशी फिरेल हे खुद्द आपल्यालाही कळत नसतं.
त्या देह नावाच्या प्राण्याच्या प्रत्येक अवयवाची मिजास आता पुरवावी लागते.
आत्ता आत्तापर्यंत सुरळीत असणारा एखादा बारकुस्सा स्नायूसुद्धा कधी तुम्हाला वेठीला धरील सांगता येता नाही.सुखासुखी बसलेलो असताना उठताना कमरेतून सणकच काय येईल, पोटरीतून वळच काय येईल,मस्तकातून भिरभिरंच काय फिरेल काय काय मजामजा होईल काही विचारायचं कामच नाही.
प्रत्येक हालचाल करताना मुळी आता त्या त्या अवयवाची परमिशन घेतल्याशिवाय चालणारच नाही ते !
पायांनो, उठून उभं राहू का ?मानेबाई,मागे वळून बघितलं तर चालेल का ?*
दंडाधिका-यांनो, जिन्याच्या कठड्याला जोरात धरलं तर तुमची काही हरकत नाही ना ?
दंतोपंत, कणीस खाताना त्यातच नाही ना मुक्काम करणार ?
अगदी हातापायांच्या चिरमुटल्या करंगळ्याही वरपक्षाकडच्या करवल्यांसारख्या मिजाशीत मुरडतात कधीकधी.
असे देहाचे लळे आता पुरवावेच लागतात; नाहीतर तो ‘देहशतवाद’ आपल्या जगण्याचा सगळा नकाशाच बदलून टाकू शकतो.वेगवेगळ्या व्याधींची अफाट शस्त्रसेना आणि असहाय्यतेचा दारूगोळा त्याच्या पोतडीत ठासून भरलेला असतो.
हे सगळं त्या इयत्तेतच जायच्या आधीच माहीत करून घेतलं तर या असल्या देहशतवादाशी सामना करावाच लागणार नाही.पटतंय ?
सुश्री वैशाली पंडित
(व्हाॅटस्अॅप वरून साभार)
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
सुप्रभात!!! काय बरे आहात ना सगळे, किंवा एखादा सुंदर पुष्पगुच्छ, किलबिलाट करणार्या पक्ष्यांचे चित्र, कोणता तरी उपदेश देणारा संदेश, नाहीतर एखादा motivational संदेश असे अनेक संदेश टिंग टिंग करत पडायला लागतात ना सकाळी सकाळी आपला मोबाईल ऑन केल्यानंतर?
पूर्वी ना… मला ह्या गुड मॉर्निंगची फार गंमत वाटायची. आणि रागही यायचा. असं वाटायचे की काय मिळतय लोकांना रोज hii, good morning, good night असे मेसेजीस टाकून? आणि हे टाकले नाहीत तर काय आपण लगेच disconnect होतो की काय त्यांच्या पासून? आणि आश्चर्यही वाटायच की त्यांना एवढा वेळ मिळतोय तरी कुठून ? ते ही सकाळी सकाळी. काहीजणांचा तर पहाटे पाच वाजल्यापासून हा गुड मॉर्निंग संदेश देण्याचा कार्यक्रम चालू होतो.
इथ दोन घोट चहा निवांत बसुन प्यावा म्हणलं तर पाच मिनिटं नसतात. कधी बसलेच तर लगेच नवर्याची तरी हाक येते किंवा मुलांना काहीतरी सापडत नसतं, सासुबाईंना त्याचवेळी साखरेच्या डब्यातून साखर काढून हवी असते, आणि हे कमी की काय म्हणून अगदी त्याच वेळी भाजीवाले मामा दारात हजर. मग काय नाखूषीने का होईना उठावच लागत.
आज हे सगळं तुमच्याशी शेअर करावसं वाटलं कारण, घडलं ही तसंच आहे. माझी एक मैत्रीण आहे ती मला रोज न चुकता सुप्रभात!!! चा संदेश टाकायची. भले मी त्याला रीप्लाय देवो नाही तर नाही. खरं सांगायच तर कधीतरी दुपारी मी तो पहात होते आणि कधी वाटले तर hii किंवा एखादी smile टाकत होते. काहीवेळा तेही नाही. आमच्यात नेहमी ह्यावरून वादही व्हायचा. अर्थात वाद फोन वरूनच व्हायचा, कारण ती दिल्लीत आणि मी मिरजेत. मी नेहमी तिला विचारत होते काय गं.. एखादा दिवस नाही टाकला मेसेज तर काय आपली मैत्री टिकणार नाही, मैत्री संपणार की काय ??
हा वाद आमच्यात घडलेल्या दुसर्याच दिवसापासून तिचे सुप्रभात मेसेज यायचे बंद झाले. मला वाटलं माझ्या बोलण्याचा उपयोग झाला वाटत. चला बर झालं उगीच वेळ वाया घालवत होती. पण खर सांगते असेच तीन चार दिवस गेले आणि मलाच चुकल्यासारखे वाटू लागले. I was missing Something in the morning. आणि पाचव्या दिवशी मात्र असे वाटले की का टाकत नसेल ती मेसेज ? एवढ मनावर घेतलं असेल का तिने माझं बोलणं? का आजारी असेल, किंवा एखाद्या संकटात तरी सापडली नसेल ना?
वाट पाहून मीच दुसरे दिवशी तिला फोन केला तेव्हा तिचे मिस्टर फोनवर ओक्साबोक्शी रडत होते. तिला massive heart attack आला होता आणि ती हॉस्पिटल मधे अॅडमिट होती. हे ऐकून मला धक्काच बसला. पाच दिवसांपूर्वी जिच्याशी मी वाद घातला ती आज मरणाशी लढत होती आणि तिचे ऑपरेशन करायचे ठरले होते.
जेव्हा आमच्यात वाद होई तेव्हा ती मला नेहमी म्हणायची it’s a connecting wavelength between two people. कळेल तुला एक दिवस पण तो एक दिवस असा येईल अस मला स्वप्नात ही वाटलं नव्हतं.
त्या दिवसापासून मी रोज सकाळी तिला न चुकता सुप्रभात!!! चा मेसेज टाकू लागले. आणि जेव्हा एक महिन्यानंतर माझ्या सुप्रभात वर तिचा smiley पडला तेव्हा माझा दिवस खरा गुड ठरला.
आणि तेव्हा कळले की अंधारा कडून प्रकाशाकडे केलेली वाटचाल म्हणजे सुप्रभात!!!
आपल्या मित्र मैत्रिणींकडून मिळालेली एक संजीवनी म्हणजे सुप्रभात!!!
आपलं कोणी आहे ह्याची जाणीव म्हणजे सुप्रभात!!!
प्रत्येक वेळी आपण मनांत आलं की फोन करू शकतोच असं नाही .पण हा एक गुड मॉर्निंगचा मेसेज मात्र नकळत आपण सुखरूप असल्याची पावती देऊन जातो.
☆ सोंड नसलेला एकमेव गणपती ! ☆ संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे ☆
जगभरातील गणपतीच्या प्रत्येक मूर्तीमध्ये गणेशाचे शीर हे गजमुख असलेले पहायला मिळते.
गणपतीच्या अन्य रुपाची कुणी कल्पनाही करू शकत नाही.
मात्र, दक्षिण भारतात गणपतीला गजाचे शीर लावण्यापूर्वी, म्हणजे मानवी मस्तक असलेल्या रूपात गणपतीची मूर्ती असलेले मंदिर आहे. मनुष्याचे मस्तक असलेली ही जगातील एकमेव गणेश मूर्ती असल्याचे मानले जाते. तामिळनाडूमध्ये कुथनूरपासूनजवळ तिलतर्पणपुरी जवळ हे मंदिर आहे.
‘आदी विनायक मंदिर ‘ असे या मंदिराचे नाव आहे.
गजमुखी अवतारापूर्वी मानवी रुपात असलेल्या गणपतीच्या या मूर्तीमुळे याला “ आदी गणपती ” असे संबोधले जाते.
|| गणपती बाप्पा मोरया ||
संग्रहिका – सुश्री प्रभा हर्षे
पुणे
भ्रमणध्वनी:- 9860006595
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
अंशूकांचा ढीग सभागृहात पडू लागला. माझ्या मनात असंख्य विचारांचा ढीग पडू लागला. काय केलं मी ! बालपणापासून कडक नियमांनी आणि कष्टसाध्य प्रयत्नांनी हस्तगत केलेली चारित्र्याची धवल साधना एका क्षणात सूडाच्या काळ्या कुंडात आज मी बुडवून टाकली! कर्ण ! योध्द्यांनी गौरविलेला कर्ण ! प्रेमाच्या धाग्यांनी सगळ्या नगरजनांच्या हृदयावर अधिराज्य करणारा कर्ण ! एकाच क्षणात भावनांच्या राज्यातील दुर्दैवी कर्ण पराजित ठरला ! शिशुपाल आणि मी, दु:शासन आणि मी, इतकंच काय पण कंस आणि मी यात कसलाच फरक नाही की काय ? या विचारानं कधी नव्हते ते माझ्या डोळ्यात टचकन अश्रुबिंदू उभे राहिले ! राजसभेतील माझ्या जीवनातले पहिलेच अश्रुबिंदू ! त्यात कारुण्य नव्हतं, भीती नव्हती, याचना नव्हती, परिणामाच्या भयानं थरथरणारी पश्चातापदग्धताही नव्हती ! आदर्श म्हणून प्राणपणानं जीवनभर उराशी कवटाळलेल्या नीतितत्वांना उरावर घेऊन अंशुकांच्या ढिगार्यात सूर्यशिष्य कर्णाचं कलेवर पाहताना खंबीर मनाचे बांध फोडून आलेली ती वेदनेची आणि यातनेची तीव्र सणक होती. अश्रुबिंदूंच्या स्वरूपात ती सणक उभी राहिली होती – तीही सूतपुत्र कर्णाच्या नेत्रांत ! सूर्यशिष्या साठी सूतपुत्राच्या डोळ्यांत अश्रू ! एक क्षणभरच मला वाटलं, मी सूतपुत्र झालो नसतो तर! कसं झालं असतं माझं जीवन !श्रीकृष्णासारखं ? का नाही ? झालंही असतं ? संस्काराच्या संघातांनी सामान्याचा असामान्य होतो. उलट कुसंस्कारांच्या कर्दमात कमलपुष्पाच्या पाकळ्यांचंही घृणामय शेवाळ होतं ! कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे. मी एका क्षणात या सर्व मर्यादा आज ओलांडल्या होत्या !
माझ्या डोळ्यातले ते पहिलेच अश्रुबिंदू कुरूंच्या राजसभेत घरंगळून हातांतल्या उत्तरीयावर पडून असेच विरले! ज्यांचा अन्वय सभागृहातल्या कुणालाही लागला नसता. निवळलेल्या डोळ्यांसमोर पांचाली उभी होती. घामानं डवरलेला, थकलेला दु:शासन क्षणभर थांबला. शेकडो योजनांचा प्रवास करून आलेल्या घोड्यासारखा तो धापावत होता. अंशुकांचा ढिगारा त्या दोघांपेक्षाही उंच दिसत होता. सर्व वाद्यांचा आवाज एकाएकी थांबला आणि केवळ मुरलीचेच स्वर भयाण भेदक शीळ घालू लागले. पांचालीच्या अंगावर पीतवर्णी अंशुक झळाळत होतं ! सुवर्णधाग्यांनी गुंफलेल्या वस्त्रासारखं ! मला ते पूर्वीही कुठंतरी पाहिल्यासारखं वाटलं ! सर्व शक्ती एकवटून त्या पितांबरालाही हात घालण्यासाठी दु:शासनानं हात उचलला ! पुढचे खूर उचलून मध्येच उसळणाऱ्या शुभ्र घोड्यासारखे दोन्ही हात उंचावून पितामह खाडकन उठून गरजले.
“दु:शासन, एक सूतभरही आता पुढं सरकू नको ! शिशुपालासारखा एका क्षणातच दग्ध होशील. लक्षात ठेव ते पितांबर आहे ! “
अंगी त्राण नसल्यामुळे हात खाली सोडून दु:शासन रखडत – रखडत कसातरी आपल्या आसनाजवळ आला. क्षणभर आसनाच्या हस्तदंडीवर हात टेकवून कमरेत खाली वाकला.त्याच्या स्वेदानं डवरलेल्या मस्तकावरचे दोन थेंब टपकन त्याच्याच आसनावर ओघळले. त्या स्वेदबिंदूवर तो उभ्यानंच शक्तिपात झाल्यासारखा कोसळला.आसनावर स्वेदबिंदू, स्वेदबिंदूवर दु:शासन ! शिसारीने मी मान फिरविली. माझ्या हातातील उत्तरीय केव्हाच गळून पडलं होतं. पितांबराच्या तेजस्वी वर्णापुढं त्या उत्तरीयाचा वर्ण काहीच नव्हता ! खिन्न मनानं मी खाली बसलो. कायमचा !
(अंशुक म्हणजे स्त्रियांचे वस्त्र)
श्रीकृष्ण — ( रणभूमीवर अर्जुनाच्या बाणांनी घायाळ होऊन कर्ण पडला ती वेळ. )
त्याची अंतिम इच्छा विचारण्याचं सर्व-सर्व नैतिक उत्तरदायित्व आता केवळ एकट्या माझ्यावर येऊन पडत होतं ! केवळ एकट्या माझ्यावरच !!
झटकन मी पुढे झालो ! त्याच्या पाळं तुटलेल्या कानाजवळ तोंड नेत हळूच पुटपुटलो.” कौंतेया, तुझी अंतिम इच्छा ? “
त्यानं झापडणारे निमुळते डोळे निर्धारानं पुन्हा उघडले ! दोन अश्रुबिंदू त्याच्या डोळ्यात तरळलेले मला स्पष्ट दिसत होते ! कसले होते ते !
दुःखाचे ? पश्चातापाचे ? ते ; धन्यतेचे !! कृतार्थतेचे !! मी – स्वतः मी त्याला ‘कौंतेया’ म्हटलेलं ऐकून धन्य झाल्याचे! तोही हळूहळू पुटपुटू लागला, ” द्वारकाधीशा… माझी अंतिम इच्छा! इच्छा की… तू – तूच माझा अंत्यसंस्कार… एका… एका… कुमारी-भूमीवर करावा!! कुमारी-भूमी!! ” त्याच्या आवाज अत्यंत क्षीण झाला होता.
“कुमारी-भूमी!! म्हणजे ?” त्याला अचूक काय पाहिजे होतं ते मला नीटपणे कळलं नाही म्हणून मी पुटपुटलो.
“होय…कुमारी! ज्या भूमीवर… कधी – कधीच…तृणांकुरसुद्धा… उगवले नसतील… उगवणार नाहीत! माझी दुःखं…ती…ती पुन्हा – पुन्हा या मर्त्य भूमीवर – कोणत्याही रूपात उगवू नयेत!!! म्हणून… ही – ही पंचमहाभूते… कुमारी-भूमीत – लय – लय…!”
त्याचा आवाज आता अत्यंत क्षीण आणि अस्पष्ट होत चालला होता. त्याची ती धक्का देणारी विलक्षण अंतिम इच्छा ऐकून मीही स्तिमित झालो! तो अर्धवट बोलत होता. त्याला आणखी काही सांगायचं तर नसेल म्हणून मी माझे कान त्याच्या अगदी ओठांजवळ नेले. टवकारून ऐकू लागलो. एकचित्तानं!
तो अस्पष्ट अर्धवट शब्द उच्चारत होता-
” ली… ली… माता… माता… ण … न!”
तो काय म्हणू इच्छित होता ते माझ्याशिवाय कुणालाच स्पष्ट सांगता आलं नसतं! तो वृषाली म्हणत होता की पांचाली! तो कुंतीमाता म्हणत होता की राधामाता!! शोण म्हणत होता की अर्जुन!!! मी ताडलं – तो दोन्ही म्हणत होता!!!
आता त्याच्या तोंडातून अस्पष्ट शब्दही बाहेर पडेनासे झाले! सूर्यबिंबावर खिळलेल्या निळ्या बाहुल्या कणभरही चळत नव्हत्या. त्याच्या ओठांच्या हालचालींवरून तो काय म्हणत होता ते मी ओळखू शकत होतो! अर्ध्यदान करणाऱ्या एका एकनिष्ठ सूर्यपुत्राचे ते शेवटचे शब्द होते. ओठांच्या हालचालींवरून नक्कीच सवितृ मंत्राचे, गायत्री छंदातले ते दिव्य बोल होते!!
“ॐ भूर्भुव: स्व: तत्सवितुर्वरेण्यंऽऽऽ!” एकाएकी त्याच्या ओठांची तीही हालचाल क्षणात थांबली! सर्वांनी श्वास रोखले! त्याचा आकाशदत्त श्वास पूर्ण थांबला! छातीवरचं स्पंदणारं लोहत्राण आता शांत झालं! स्थिर झालं.
महान तेजस्वी असा, डोळे दिपवणाऱ्या एका प्रखर तेजाचा प्रचंड स्त्रोत क्षणात सर्वांसमक्ष त्याच्या हृत्कमलातून बाहेर पडून आकाशमंडलातील पश्चिम क्षितिजावर अमीन टेकडीच्या माथ्यावर रेंगाळणाऱ्या विशाल अशा लाल-लाल सूर्यबिंबाकडे प्रचंड गतीनं झेपावला! क्षणात त्या रसरशीत तप्त हिरण्यगर्भात लय पावला!! त्या जात्या महान तेजानं सभोवतीच्या सर्वांचे डोळे दिपले! अंधारले!
त्या मृत्युंजय महावीराचं महानिर्वाण झालं!!!
प्रस्तुती – सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ बुध्दीबळ शास्त्र आणि ज्योतिष शास्त्र ⚜️ ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
मंडळी नमस्कार, ?
बुद्धीच्या देवतेचा सध्या उत्सव सुरु आहे. कुठलाही कलाकार मग तो गायक, अभिनेता, नर्तक, वादक, चित्रकार ,लेखक,कवी असू दे
वर्षातील एकदा तरी आपली कला कलेची देवता श्री गजानना चरणी सादर करावी हे सर्वच कलाकारांना मनोमन सांगणे. गणेशोत्सव ही या सगळ्यांसाठी विशेष पर्वणी.
याच उद्देशाने माझ्या बुध्दीच्या कुवती नुसार लिहिलेला हा लेख बाप्पाला अर्पण ?
तर मंडळी, लहानपणा पासून असलेली बुध्दीबळाची आवड आणि वयाच्या एका टप्प्यावर लागलेली ज्योतिष विषयाची गोडी आणि आज या दोन्ही क्षेत्रातले बेसिक नाॅलेज यावरून या दोन्ही गोष्टींची तुलना, काही समान धागे जोडण्याचा केलेला हा प्रयत्न
पटावरील ६४ घरांमधे रंगणारे दोघांमधील युध्द आणि पत्रिकेतील १२ भावांमधे असणा-या जन्मकालीन ग्रहांशी गोचरीने होणारे ग्रहयोग ( नियतीने टाकलेले डाव ) हे माझ्यासाठी कायमच उत्सुकतेचे विषय राहतील
पटांवरील प्रत्येक सोंगटी आणि पत्रिकेतील प्रमुख ग्रह यांची मी अशी बरोबरी केली आहे
रवी – राजा ??
आत्म्याचा कारक ग्रह – रवी
पटावर ज्याच्या साठी खेळ रंगतो तो राजा
दोघांनाही चेक बसला, सोडवता नाही आला तर खेळ खल्लास
मंगळ / वझीर ?
मंगळाला सेनापती म्हणले आहे, वझीर हा पटावरचा खरा सेनापती
सळो की पळो करुन सोडेल, गर्व हरण करेल सांगता यायचे नाही
हत्ती / गुरु ? ?
पटावर राजा पासून सगळ्यात लांब असणारा, अगदी सरळ मार्गी असणारा, पण वेळोवेळी राजाला मार्गदर्शन करणारा हत्ती , आणि पत्रिकेतील गुरु सारखेच
कॅसलीन रूपाने राजाची हत्तीशी होणारी सल्लामसलत, मार्गदर्शन आणि वेळप्रसंगी गरज लागलीच तर मैदानात उतरणारा हत्ती म्हणजे पटाला लाभलेले गुरुबळच.
दोन उंट – बुध/ शुक्र ???
हे दोन्ही ग्रह अशुभ ग्रहात येत नाहीत पण अनेक वेळा यांची पत्रिकेतील स्थिती जपून अभ्यासावी लागते. वक्री, स्तंभी, उच्च-निच्च ग्रह केंव्हा तिरपी चाल चालवून धोक्याची घंटा वाजवतील हे सांगणे अवघड
प्यादी / चंद्र ?♟️
संख्येने जास्त असणारी प्यादी, आणि पत्रिकेत विविध कला दाखवणारा चंद्र यात कमालीचे साम्य आहे. राशी, नक्षत्र, दशा, प्रश्णकुंडलीतील चंद्राचा भाग, इतर ग्रहांशी जमणारी केमिस्ट्री याबरोबरच मनाचा कारक ग्रह चंद्र
मूर्ती लहान पण कीर्ती महान. याच मनाच्या खंबीरतेवर प्रतिस्पर्ध्याच्या पहिल्या घरात पोचून प्यादाचा वजीर बनू शकतो जे इतर कुणालाही शक्य नाही.
इतर सोंगट्यांना सगळ्यात जास्त सपोर्ट हे प्यादे देते. धारातीर्थी ही पहिल्यांदा तेच पडते तर वजीर बनून पोर्णीमा ही अनुभवते
मंडळी , कशी वाटली तुलना? आयुष्यात बुध्दीबळाचे अनेक डाव तुम्ही खेळता कधी जिंकता कधी हरता. पण पत्रिकेत ग्रहांचा जन्मत: सुरु झालेला डाव तुमच्या अंतापर्यंत सुरु राहतो. त्यात काही लढाया नियती तुम्हाला जिंकवते काही डावपेचात हरवते. इथे नियतीच फक्त खेळत असते, आपल्यासाठी..
लेखनाचा शेवट भाऊसाहेब पाटणकरांची एक गझल थोडीशी बदलून
२००० साली आमचा मुलगा सून- सतीश सुप्रिया- सतेजसह मिनीयापोलिस इथे होती. अमेरिका पहायला जायचं मनात होतं. व्हिसाही मिळाला होता. पण गणेशोत्सव जवळ आला होता. आणि सासुबाईंनी नेहमीच्या समजूतदारपणे अमेरिकेत गणपती साजरा करण्याची परवानगी दिली. मग तयारीची धांदल उडाली. श्रींची मूर्ती इथूनच नेण्याचे ठरले. पण ‘केसरी’ने त्यांच्या पूर्वीच्या अनुभवावरून बजावून सांगितले होते की, गणपतीची मूर्ती बॅगेत ठेवू नका. कितीही चांगलं पॅकिंग केलं तरी एवढ्या प्रवासानंतर मूर्तीला काही झालं तर आपला विरस होतो. म्हणून माझ्या खांद्यावरच्या मोठ्या पर्समध्ये राहील अशी मध्यम आकाराची मूर्ती व्यवस्थित पॅक करून घेतली. मुंबई- न्यूयार्क व पुढे पंधरा दिवस पूर्व-पश्चिम-पूर्व अमेरिका दर्शन असा श्री गणेशाच्या साथीने प्रवास करून मिनीयापोलिसला पोहोचलो. खूप आधीपासून आणलेली मूर्ती सुखरूप होती हे पाहून फार बरे वाटले.
घराभोवती सुरेख हिरवळ आणि हरतऱ्हेच्या फुलांनी सजलेली बाग बघून माझे डोळे चमकले. सतीशने लगेच बजावले, ‘ इथल्या कुठल्याही फुलालाच काय पण पानालाही हात लावायचा नाही. मी तुम्हाला डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये घेऊन जाईन. तिथे सारे काही मिळते.” गणपतीसाठी बहुतेक सर्व तयारी मुंबईहूनच करून आणली होती. अभिषेकासाठी चांदी-पितळेची छोटी मूर्ती तेवढी आणायची राहिली होती. डेकोरेशनचे मनाजोगते सामान ,फळे , फुले आणि एक डॉलरला नारळसुद्धा त्या स्टोरमध्ये मिळाला.. यांनी स्वतःच पुस्तकावरून श्री गणेशाची यथासांग प्रतिष्ठापना केली. डिस्नेलॅ॑डमध्ये एका स्टॉलवर सुंदर रंगीत दगड विकायला ठेवलेले दिसले. त्यातला लाल रंगाचा, गणपतीच्या आकाराचा भासणारा, नर्मदा गणपती खरेदी केला होता, त्याचीच गणपतीच्या मूर्तीबरोबर पूजा करून त्यावरच आवर्तनांचा अभिषेक करत होतो. तिथल्या काही परिचितांना सहकुटुंब बोलावले होते. पूजा, आरती, नैवेद्य सर्व यथासांग झाले. शेजाऱ्यांना त्रास नको म्हणून झांजा न वाजवता टाळ्या वाजवून आरती झाली. एसीमधून उदबत्तीचा जास्त सुगंध जाऊ नये म्हणून साध्या उदबत्या लावल्या. आदल्या दिवशीच गुलाबजाम व तळलेल्या करंज्या मोदक करून ठेवले होते. भरगच्च मेन्यू होता. सर्वजण गणपती, आरती, प्रसाद यावर खुश होती. आम्हालाही मुंबईसारखेच सगळे साग्रसंगीत झाल्याने आनंद झाला होता.
दोन दिवसांनी सतीशच्या ऑफिसमधील आठ नऊजणं रात्री गणपतीला जेवायला येणार होते. संध्याकाळीच स्वयंपाक करून ठेवला. आरतीही करून घेतली. पण पाहुणे विचारायला लागले, ‘ऑंटी, आरती कभी करेंगे?’ आरती झाल्याचे सांगितल्यावर ते म्हणाले,’नही नही .ऐसे कैसे हो गया? हमे तो आरती, पूजा सब देखना है. करना है. कितने बरस के बाद ये सब देखने का मौका मिला है.’– मग पुन्हा एकदा साग्रसंगीत आरती झाली. आमचा नातू आश्चर्य वाटून म्हणाला की, ‘आजी, आपण उद्याची आरतीसुद्धा आजच करीत आहोत का?’— ठिकाण आणि पाहुणे दरवर्षीपेक्षा वेगळे पण आनंद, मानसिक समाधान तेच!
मिनीआपोलिसला मिनेसोटा नदी मिसिसिपीला मिळते. मिनीयापोलिस व सेंट पॉल ही जुळी शहरे मिळून तिथे पाण्याने भरलेले अनेक मोठे तलाव आहेत. लोक मजेने स्वतःच्या बोटीतून फिरत असतात. आत्ममग्न, उच्चभ्रू लोकांचे हे शहर आहे. फक्त डाऊन टाऊनमध्ये उंच टॉवर्स आहेत. बाकी सगळीकडे शोभिवंत, टुमदार बंगले. निगुतीने राखलेली रंगीबेरंगी फुले, झोपाळे ,छोटी कारंजी व निवांत लोक. तलावांशी पोचणाऱ्या शांत स्वच्छ वाटा! विसर्जनाच्या वेळी बाप्पांना घातलेले सर्व वस्त्रालंकार, फुले घरीच उतरवून, छानपैकी मॅक्झीमा गाडीतून श्री गणेशांसह सिडार लेकवर गेलो आणि अभिषेकाच्या ‘नर्मदा’ गणेशासह शांतपणे विसर्जन केले. दरवर्षीप्रमाणे एक प्रकारच्या हुरहुरीने, समाधानाने मन भरून आले.
दोन दिवसांनी सॅनहोजेला आमच्या भाच्याकडे गेलो. तिथेही सनीवेल इथे साजरा होणारा गणेशोत्सव पहायला मिळाला. गणेश चतुर्थीला श्रींची प्रतिष्ठापना, पूजा आरती यथासांग करतात. पेणहून खास मूर्ती नेली जाते. सर्वांना सोयीचे जावे म्हणून गणपतीत येणाऱ्या शनिवार-रविवारी भरपूर कार्यक्रम ठेवले जातात. आम्ही गेलो तेंव्हा रविवारी सर्वांसाठी मोदकांचे साग्रसंगीत जेवण होते. आधीच नोंदणी केलेले लेंगे-झब्बे–त्यावर जाकिटे किंवा रंगीबेरंगी उपरणी घालून लहान मोठे सारे पुरुष हजर होते. बायका ठेवणीतले शालू पैठणी नेसून, नटून सजून उत्साहाने वावरत होत्या. लहान मुलांनी सादर केलेले श्लोक ,नाच-गाणी असा कार्यक्रम चालला होता, वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या होत्या. रांगोळ्या, समया आणि फुलांच्या आराशीत गणेशाची प्रसन्न मूर्ती विराजमान होती. अगदी आपल्यासारखीच थोडी गडबड आणि गोंधळ होताच. क्षणभर आपण अमेरिकेत आहोत की भारतात असा संभ्रम पडला. आपली तरुण हुशार पिढी स्वकर्तृत्वाने, कष्ट करून या परदेशात उभी आहे–उत्साहाने आपले उत्सव साजरे करून मनातले काही टिकविण्याचा प्रयत्न करीत आहे म्हणून कौतुक वाटले — आणि प्रकर्षाने जाणवले की —-श्री ज्ञानेश्वरांनी वर्णिलेला ‘विश्वात्मक देव’ इथे आपल्या देशात काय आणि सातासमुद्रापलिकडे काय —एकच !— त्यामागची मनातली भावना महत्त्वाची !
टी.एन्.शेषन् भारताचे मुख्यनिवडणूक आयुक्त होते.त्यांच्या जीवनात घडलेला प्रसंग !—
एकदा ते आपली पत्नी जयलक्ष्मी शेषन् यांच्याबरोबर फिरायला बाहेर पडले होते. उत्तरप्रदेशातल्या एका सुंदर रस्त्यावरून गाडी जात होती. रस्त्याच्या दुतर्फा दाट झाडी होती. वर्दळीचा रस्ता नसल्यामुळे की काय ,पक्ष्यांची अनेक सुंदर घरटी झाडांची शोभा वाढवत होती.
जयलक्ष्मी यांना हे दृष्य खूप आवडलं. त्यांना वाटायला लागलं की आपल्या घराच्या बागेसाठी यातली दोन घरटी नेली ,तर बाग किती शोभून दिसेल. त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.
गाड्या थांबल्या. त्यांच्यासाठी जे संरक्षक पोलीस दल होते ,ते इकडे तिकडे शोधायला लागले. तिथे एक मुलगा गुरं चरायला आला होता. त्याला बोलावलं. तो सरकारी इतमाम पाहून कोणीतरी मोठी अधिकारी व्यक्ती आलीय ,हे त्यानी ओळखलंच. त्यांनी मुलाला दोन घरटी काढून आणायला सांगितली ,आणि प्रत्येक घरट्याचे १० रु.देऊ असंही सांगितलं. त्या मुलानं खाली मान घालून नकारार्थी मान हलवली. “दहा रुपये कमी वाटतायंत का ,५०रुपये देऊ प्रत्येक घरट्याचे.”
यावर तो मुलगा म्हणाला , “सरजी, पैशाचा सवालच नाहीए. कितीही पैसे दिलेत तरी ती घरटी मी झाडावरून उतरवणार नाही.”
“का रे बाबा?”
“त्यात पक्ष्याची पिल्लं शांतपणे आणि विश्वासानी झोपली आहेत. सायंकाळी त्यांची आई चोचीत दाणे घेऊन पिल्लांच्या ओढीनं येईल ,पिल्लं सापडली नाहीत तर ती सैरभैर होईल ,आक्रोश करेल, ते माझ्याच्यानं पाहवणार नाही. कोणाचं घर मोडायचं पाप आहे ना सर जी.”
हे ऐकून शेषन् व त्यांची पत्नी थक्क झाले.
शेषन् म्हणाले, “कोणीतरी डोळ्यात अंजन घातल्यासारखं वाटलं. माझं पद, माझी पदवी, उच्च शिक्षण सार्या सार्याचा अभिमान क्षणार्धात गळून पडला ,वितळून गेला. जे शिक्षण, संस्कृती आणि संस्कार या मुलानं निसर्गाकडून शिकलेत, ते शिक्षण कोणत्याच विद्यापीठात मिळणार नाही.”.
संग्राहिका – सौ. स्मिता पंडित
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
☆ शिवाजी सावंत स्मृतीदिन विशेष – मृत्युंजयकार ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
मराठीतील आपल्या पहिल्याच पौराणिक कादंबरीने इतिहास घडविणारे सुप्रसिद्ध कादंबरीकार म्हणजे शिवाजीराव सावंत. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गावी ३१ ऑगस्ट १९४० ला त्यांचा जन्म झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवाजीरावांचे शालेय शिक्षण गावातच झाले. ते उत्कृष्ट कबड्डीपटू होते. महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून ते कोल्हापूरात नोकरीला लागले.
कोल्हापूरच्या राजाराम प्रशालेत काही वर्षे अध्यापनाचे काम केले. तेथून पुण्यात येऊन महाराष्ट्र शासनाच्या ‘ लोकशिक्षण ‘ मासिकाचे सुरवातीला सहसंपादक आणि नंतर संपादक म्हणून काम पाहिले.
भारतीय जीवन आणि संस्कृती याबद्दल त्यांना सुरुवातीपासून सार्थ अभिमान होता. ‘ माझा भारत म्हणजेच महाभारत’, हे समीकरण एकदा मनात रुजल्यावर अभ्यासूवृत्तीने त्यांनी महाभारताचा सखोल व्यासंग सुरू केला.या अभ्यासातून अस्मिता विसरू पहात असलेल्या समाजपुरुषाला सूर्यपुत्र, ‘ मृत्युंजय ‘ कर्ण आपत्तीतही धैर्यशाली आणि तेजस्वी बनवेल असे उत्तर त्यांना मिळाले. मग प्रदीर्घ संदर्भशोधन, सखोल व उलटसुलट चिंतन-मनन आणि डोळसपणे टिपलेले निरीक्षण यातूनच रससंपन्न अशा प्रदीर्घ कादंबरीचा जन्म झाला . मृत्युंजयच्या लिखाणासाठी त्यांनी थेट कुरूक्षेत्रात मुक्काम ठोकला होता. अत्यंत सत्प्रवृत्त,समर्पणशील, स्वाभिमानी अशा कर्णाच्या व्यक्तिमत्त्वाची तितकीच गौरवास्पद प्रकाशमय बाजू या कादंबरीत मांडली आहे.
‘मृत्युंजय ‘ही १९६७ साली लिहिलेली त्यांची पहिलीच कादंबरी.या कादंबरीला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यांच्या नावाला प्रसिद्धी मिळाली आणि ‘ मृत्युंजयकार ‘ हीच ओळख कायम झाली.
कादंबऱ्यात मानदंड ठरलेल्या या कादंबरीला अनेक संस्थांचे पुरस्कार मिळाले. १९८६ साली कलकत्त्याच्या ‘ विवेक संस्थान ‘ या बंगाली वाचकांच्या संस्थेने ‘ पूनमचंद भुतोडिया ‘ हा सर्जनशील साहित्याचा पुरस्कार देऊन सन्मान केला. दिल्लीतील भारतीय ज्ञानपीठ या संस्थेने १९९५ सालचा बारावा ‘ मूर्तिदेवी पुरस्कार ‘भारताचे उपराष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते देऊन सावंतांना सन्मानित केले.हा अत्यंत मानाचा पुरस्कार मिळवणारे सावंत हे एकमेव मराठी साहित्यिक आहेत.
‘ मृत्युंजय ‘ च्या एकतिस आवृत्त्या निघाल्या. हिंदी, कन्नड, गुजराथी, मल्याळम अशा अनेक भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे.इंग्लिशमधील भाषांतराने मूळ मराठी कर्णगाथा आंतरराष्ट्रीय साहित्यात समाविष्ट झाली. तिच्या गुजराथी भाषांतराला ‘गुजराथ साहित्य अकादमी’ पुरस्कार आणि पुढे ‘केंद्रीय साहित्य अकादमी’ पुरस्कारही प्रदान करण्यात आला.
सावंतांनी कादंबरी, चरित्रलेखन, व्यक्तिचित्रे, ललित निबंध असे विविध प्रकारचे कसदार लेखन केले.
सावंतांची छत्रपती संभाजीराजांच्या जीवनावर लिहिलेली ‘ छावा’ ही कादंबरी पण खूपच वाचकप्रिय ठरली.तिचाही हिंदी अनुवाद प्रसिद्ध झाला.ही कादंबरी पण महाराष्ट्र राज्य पुरस्काराची मानकरी ठरली.
सावंतांनी लिहिलेले ‘मृत्युंजय’ नाटक चंद्रलेखा या नाट्यसंस्थेने रंगभूमीवर पुरे एक तप सादर केले. तसेच ‘ छावा’ हे नाटकही त्यांनीच सादर केले.दोन्हीही नाटके खूपच रसिकप्रिय होती.
भारतीय समाजमनातीला एक आदर्श व्यक्तिमत्व असणाऱ्या योगयोगेश्वर श्रीकृष्णाच्या चरित्रग्रंथावर ‘ युगंधर ‘ ही कादंबरी त्यांनी सिद्ध केली.या कादंबरीचाही हिंदी अनुवाद प्रकाशित झाला.
भव्योदात्त जीवनाबद्दल त्यांना वाटणारा आदर आणि ओढ मृत्युंजय, युगंधर,छावा या पुस्तकातून उत्कटतेने प्रकट होते. शब्दब्रह्माचे वरदान लाभलेल्या त्यांच्या लेखणीतून अत्यंत ओजस्वी शब्द सुमनांनी ही व्यक्तिमत्त्वे साकारताना हिऱ्याला जणू सुवर्ण कोंदणच लाभले.
त्यांनी लिहिलेली पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांची ‘ लढत ‘ ही चरित्र कहाणी, भाई मनोहर कोतवाल यांची ‘ संघर्ष ‘ ही चरित्र कहाणी आणि माननीय पी. के. अण्णा पाटील यांच्यावरील ‘पुरुषोत्तम नामा ‘ ही चरित्र कहाणी प्रकाशित झालेली आहे.
‘अशी मने असे नमुने ‘, ‘मोरावळा’ ही व्यक्तीचित्रे प्रसिद्ध आहेत. १९८३ साली ते बडोदा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
असा हा सिद्धहस्त लेखक दि.१८सप्टेंबर २००२ ला आकस्मिकपणे आपल्यातून निघून गेला. तरीही त्यांच्या अजरामर कलाकृतीतून ते सदैव साहित्य दरबारात वास करणार आहेत. त्यांना विनम्र अभिवादन. ?
☆ शिवाजी सावंत स्मृतीदिन विशेष – स्मरण मृत्युंजयकारांचे…. ☆ श्री आनंदहरी ☆
आपल्या शब्दसाहित्याने मृत्युवर जय मिळवलेल्या , अजरामर झालेल्या,मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचा आज स्मृतीदिन .
जीवनातील काही आठवणी या अमिट असतात. त्यातही बालपणातील, शालेय जीवनातील काही आठवणी तर आपण काळीज-कोंदणात जपून ठेवत असतो.. अशीच एक आठवण मृत्युंजयकार यांना पाहिल्याची, भेटल्याची आणि ऐकल्याची.
१९७२-७३ चे शैक्षणिक वर्ष. न्यू इंग्लिश स्कुल ,पेठ मध्ये आठव्या इयत्तेत शिकत होतो. शालेय वय हे संस्कारक्षम वय.. ओल्या मातीला हवातसा आकार देण्याचे वय.. आणि म्हणूनच असेल शाळेमध्ये विविध कारणांनी साहित्यिक, कलाकार यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी बोलावण्याची परंपरा शाळेने जोपासलेली. त्या परंपरेनुसार शाळेत मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांना निमंत्रित केलेले. ते त्यावेळी राजाराम हायस्कुल, कोल्हापूर येथे शिक्षक होते. मृत्युंजय कादंबरी प्रचंड गाजलेली होती, गाजत होती पण तरीही ते पेठ सारख्या ग्रामीण भागातील शाळेत आलेले.
त्यावेळी जे.के.दैव हे इतिहासाचे शिक्षक होते.साहित्य, नाटक यांची प्रचंड आवड असणारे.. रसिक वाचक म्हणून मृत्युंजयकारांचे मित्र असलेले. त्यांनी त्यांना आमंत्रित केले होते. लष्करातील अधिकाऱ्यासारखे रुबाबदार व्यक्तिमत्व असणाऱ्या शिवाजी सावंतांचे प्रथम दर्शनच आदर निर्माण करणारे.. प्रेमात पडणारे.
शाळेच्या ग्रंथालयात ‘मृत्युंजय ‘ होतीच. माझ्यासह काही विद्यार्थ्यांनी त्यावेळच्या आकलनशक्ती नुसार वाचलेली आणि कार्यक्रमाच्या अगोदरच काही दिवस पाहुण्यांचा सविस्तर परिचय करून देण्याच्या शाळेच्या प्रथेनुसार सर्व विद्यार्थी वर्गाला परिचित झालेली व्यक्ती समोर पाहून मनात आनंदघन बरसू लागलेले.
मृत्युंजयकार बोलायला उभे राहिले. शब्द जणू जिव्हेवर येण्यासाठी आतुर झाले असावेत अशी ओघवती, काळजाला साद घालणारी भाषा.. त्यांचे बोलणे आणि आपले ऐकणे संपूच नये असे प्रत्येकाला वाटायला लावणारे वक्तृत्व. त्यांनी मृत्युंजयचा सारा निर्मिती प्रवास कथन केला.. कुरुक्षेत्राचा त्यांनी केलेला प्रवास, कर्णाबद्दलच्या लोककथा, दंतकथा, काही ग्रंथांचा अभ्यास, चिंतन, मनन ते विदित करत होते आणि आम्ही सर्व सहप्रवासी झालो होतो.
मृत्युंजयकारांनी त्या क्षणी मनात चिरंतन असे आदराचे स्थान निर्माण केले. मृत्युंजय नावाप्रमाणेच अजरामर अशी साहित्यकृती. रसिकवाचकांचे अढळ प्रेम लाभलेली, त्यांच्या मृत्युंजय, छावा, युगंधर या साऱ्याच साहित्यकृतींना राज्य शासनाचे, साहित्य अकादमीचे आणि नामवंत मानले जाणारे अनेक पुरस्कार मिळाले..
भारतीय साहित्यजगतातील नोबेल पुरस्काराइतकाच सर्वश्रेष्ठ मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार भारतीय ज्ञानपीठच्या संस्थापक अध्यक्षा रमाबाई यांच्या प्रेरणेने त्यांचे पती श्री. साहू शांती प्रसाद जैन यांनी १९६१ ला द्यायला सुरुवात केली होती. त्यानंतर १९८३ सालापासून मातोश्री मूर्तिदेवी यांच्या स्मरणार्थ भारतीय संस्कृती व तत्वज्ञान यावरील भारतीय भाषेतील ग्रंथासाठी पुरस्कार द्यायला सुरुवात केली. ज्ञानपीठ इतकाच महत्वाचा असा मूर्तिदेवी पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार १९९४ साली ‘ मृत्युंजय ‘कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना देऊन सन्मानित करण्यात आले. मराठीला मिळालेला हा एकमेव पुरस्कार आहे. मृत्युंजयकारांच्या साहित्यकृतीं अनेक भाषेत भाषांतरित ,अनुवादित झाल्या आणि गाजल्याही. या साऱ्या साहित्यकृतींना रसिक वाचकांचे अढळ प्रेम लाभले आणि आजही लाभत आहे.
शिवाजी सावंतांच्यामुळे आधी कर्ण भेटला.. समाजव्यवस्थेचा, समाज विचारधारेचा नाहक बळी ठरलेला, जन्मताच जन्मदात्या आईच्या मातृसुखाला पारखा झालेला पण अधिरथ व राधा या पालनकर्त्या आई वडिलांचे प्रेम लाभलेला, आयुष्यभर खऱ्या अर्थाने उपेक्षितच ठरलेला कर्ण..
छावा मध्ये छत्रपती संभाजी महाराज भेटले. राजकारणाचे नाहक बळी ठरलेले, जन्मापासून जन्मदात्या आईच्या मातृसुखाला पारखे झालेले पण जिजाऊ आणि धाराऊ चे निर्व्याज प्रेम लाभलेले, राजकारणामुळे आयुष्यभर विनाकारण प्रवादांनी घेरलेले उत्तुंग व्यक्तिमत्व..
युगंधर मध्ये कृष्ण भेटला. तोही जन्मदात्या आईच्या मातृसुखाला पारखा झालेला पण नंदराय आणि यशोदेचे निर्व्याज प्रेम लाभलेला.. महाभारतातील देवपदाला पोहोचलेली व्यक्तिरेखा.
या महावीर असणाऱ्या तीनही नायकांची आयुष्य समाप्ती ही ते निशस्त्र असताना झाली.. कर्णाची युद्धभूमीवर , छत्रपती संभाजी राजांची शत्रूच्या कैदेत स्वराज्यासाठी अनन्वित छळ सोसत..मनाला व्यथित करणारी, डोळ्यात अश्रू आणि त्वेष, चीड आणणारी… आणि कृष्णाची झाडाखाली निवांत बसला असताना व्याधाचा बाण पायाच्या अंगठ्यात लागून.
मृत्युंजयकारांनी अनेक पुस्तके लिहिली पण मृत्युंजय, छावा, युगंधर यातील एक जरी कादंबरी त्यांनी लिहिली असती तरी त्यांचे नाव मराठी साहित्यात अजरामरच झाले असते.
आयुष्यात आजवर अनेकदा मृत्युंजयकार भेटत राहिले..एक दोनदा प्रत्यक्ष, अनेकदा शब्दांतून.. आजही भेटतात.. कधी ‘ मृत्युंजय ‘ मधून, कधी ‘ छावा ‘मधून तर कधी ‘ श्रीकृष्ण : एक चिंतन ‘ मधून, ‘ युगंधर ‘ मधून… प्रत्येक भेट काळीज कोंदणात जपून राहिलेली. पुन्हा पुन्हा भेटावे असे वाटणारी.
जीवन अनुभवसंपन्न करणारी वाचनानुभूती देणाऱ्या, आपल्या शब्दवैभवाने चिरंजीव झालेल्या मृत्युंजयकारांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !