मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वाढलेला मुक्काम – चित्र एक.. काव्ये दोन श्री प्रमोद वामन वर्तक आणि सुश्री नीलांबरी शिर्के ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? (१) बुद्धीला ताळमेळ नाही… (२) निरक्षर चोर ? (३) माया पुस्तकांची… >> चित्र एक.. काव्ये तीन ? श्री आशिष बिवलकर, श्री प्रमोद वामन वर्तक आणि सुश्री वर्षा बालगोपाल

श्री आशिष बिवलकर

(१ )

☆ बुद्धीला ताळमेळ नाही…

*

दारूचा ट्रक उलटला,

लुटायला उडते झुंबड |

पुस्तकांचा ट्रक उलटला,

बघाया कुणा नाही सवड |

*

विश्वगुरु म्हणून पूर्वजांनी,

जपली ज्ञानाची ग्रंथसंपदा |

बख्तियार खिल्जीने जाळले,

सहा महिने जळत होते नालंदा |

*

पुस्तकं ग्रंथ वाचायला,

कोणाकडे आता वेळ नाही |

रद्दी म्हणून बघायचीच दृष्टी,

बुद्धीला आता ताळमेळ नाही |

*

कपाटात अडगळीत स्थान,

हीच मोठी शोकांतिका आज |

वागावे कसे, घडावे कसे,

कशाचीही ना उरलीय लाज |

*

‘वाचाल तर वाचाल,’

या उक्तीला ना उरला अर्थ |

घड्याळाच्या काट्यावर सारं,

जीवन होतं चाललय व्यर्थ |

कवी : श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मोबाईल – 9518942105

☆☆☆☆

श्री प्रमोद वामन वर्तक

(२)

निरक्षर चोर ?

*

नवे नाहीत अपघात 

आपल्या सगळ्यांना 

पण या अपघाताचा 

वेगळाच पहा नमुना

*

धन शब्द साहित्याचे 

सारे विखरे रस्त्यावर 

लुटण्या अक्षरांची पुंजी 

आला नाही कोणी चोर

*

अपघातग्रस्त ट्रकात 

असती जर कां वारुणी 

समस्त लोकांच्या उड्या 

पडल्या असत्या झणी

*

आता तरी मान्य करा 

वाचन संस्कृती लोपली 

“हातातल्या जादूगाराने” 

पुस्तकांवर मात केली

पुस्तकांवर मात केली

© श्री प्रमोद वामन वर्तक

मानपाडा, ठाणे (प.) ४००६१०

मो – ९८९२५६१०८६

वर्षा बालगोपाल

(३)

माया पुस्तकांची…

*

सरिता पुस्तकांची व्याकुळ झाली 

मुलांना भेटण्या रस्त्यावर आली 

मुलांची ममता का आटून गेली 

नजर पडूनही कीव न आली ||

*

शिकवले घडविले ज्या मातेने 

उच्च पदी गेला तुम्ही ज्या वाटेने 

त्या मातेची, वाटेची, साद ना ऐकली 

नजर पडूनही कीव न आली ||

*

एका आठवास हृदयी धरावे 

एका आठवास उचलोनी घ्यावे 

ईच्छा ही साधीच तुला न कळली 

नजर पडूनही कीव न आली ||

*

आपला न कोणी नुरला का त्राता 

पोरकी नदी बोलकी झाली आता 

उरफाटी जनरीत नुरे वाली 

नजर पडूनही कीव न आली ||

*

नका करू चिंता माझ्या लेकरांनो 

गाडले जाऊ असे ऐका बांधवांनो 

जरी आज तुम्ही कीव नाही केली 

वन पुस्तकांचे देईल सावली ||

© वर्षा बालगोपाल

मो 8830084184 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जो उठतो तो… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ जो उठतो तो… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

जो उठतो तो म्हणतो सावर

ज्याचे त्याचे वाळूचे घर

पाणवठ्यावर जातो येतो

नाही भरली अर्धी घागर

 *

मनकवडा ही नाही ठरला

होता फसला तो हसण्यावर

 *

तरल्या नावा पाण्यावर ती

वादळ वारा सरल्या नंतर

 *

अंदाजाने पुरता डुबला

नजरे मधले चुकले अंतर

 *

फसवाफसवी करणारांची

भाषा असते अतिशय सुंदर

 *

धंदा होतो छान खरोखर

हाताखाली नसता नोकर

 *

अपयश केव्हा आले जर तर

दैवा वरती फोडू खापर

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३५ आणि ३६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ३५ आणि ३६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ३५ 

असे हो जया अंतरी भाव जैसा|

वसे हो तयार अंतरी देव तैसा |

अनन्यास रक्षीतसे चापपाणी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी|३५|

अर्थ :  आपल्या मनात परमेश्वराबद्दलचा जसा भाव असेल त्याप्रमाणे परमेश्वर आपल्या अंतरामध्ये वसतो म्हणजे त्याचे अस्तित्व जाणवते. अनन्यभावाने परमेश्वराला जो शरण जातो त्याचे रक्षण हा धनुर्धारी राम नक्कीच करतो. आपल्या भक्तांची तो कधीही उपेक्षा करत नाही.

(अनन्य – एकनिष्ठ, चापपाणी – हाती धनुष्य धारण केलेला /भगवंत.)

विवेचन : आधीच्या श्लोकात समर्थ देव आपल्या भक्तांचे रक्षण करतो असे आपल्याला सांगतात. या श्लोकात ते आपल्याला परमेश्वर कोणत्या भक्तांचे रक्षण करतो ते सांगतात. परमेश्वर सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी वास करतो. परंतु त्याच्याबद्दलची आपली जाणीव किती तीव्र आहे यावर आपल्याला त्याची होणारी अनुभूती ठरते. भगवंताविषयीची भावना जर आपल्या अंतःकरणात तीव्र असेल तर तो प्रकट होण्यास वेळ लागत नाही.

या श्लोकात ‘भाव ‘ हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. जसा भाव तसा देव किंवा देव भावाचा भुकेला असे आपण म्हणतो. कोणी भक्त स्वतःला परमेश्वराचा दास म्हणून घेतात समर्थ स्वतःला रामाचा दास म्हणून घेत असत. ही दास्यभक्ती. काही भक्त परमेश्वराला आपला पती समजून त्याची पत्नी भावाने आराधना करतात अशा प्रकारच्या भक्तीला मधुरा भक्ती असे म्हटले जाते. काही भक्त परमेश्वराला आपली आई मानून त्याची भक्ती करतात. ही वात्सल्य भक्ती. तर काही परमेश्वराला आपला मित्र किंवा सखा मानून त्याची भक्ती करतात. ही झाली सख्ख्य भक्ती. असे भक्तीचे म्हणजेच भावाचे विविध प्रकार आहेत. आपली भक्ती ज्या प्रकारची असेल तशा स्वरूपात परमेश्वर आपल्याला दर्शन देतो. त्या अनादी अनंत आणि निर्गुण निराकाराला कोणत्याही रूपात प्रकट होण्यासाठी अडचण नाही.

शेगावीचे महान संत श्री गजानन महाराज यांनी आपल्या भक्तांना वेगवेगळ्या स्वरूपात दर्शन दिले होते. कोणाला त्यांनी समर्थ रामदासांच्या रूपात दर्शन दिले तर कोणाला विठ्ठलाच्या रूपात. परमेश्वराने सुद्धा आपल्या भक्तांना त्यांच्या इच्छेप्रमाणे विविध रूपात दर्शन दिले आहे. अर्जुनाला तर त्याने विश्वरूप दर्शन सुद्धा घडवले. अडचण परमेश्वराकडून नाही. अडचण आपल्याकडून असते. आपल्या मनामध्ये तेवढा समर्पण भाव नसतो.

परमेश्वर कोणाचे रक्षण करतो या प्रश्नाचे उत्तर समर्थ श्लोकातील तिसऱ्या ओळीत देतात. ते म्हणतात, ” अनन्यास रक्षीतसे चापपाणी. ” अनन्य म्हणजे कोण हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. एका परमेश्वराशिवाय आपल्याला दुसरा कोणताही आधार नाही, आश्रय नाही अशा प्रकारची भावना ज्याच्या मनामध्ये असते तो अनन्य भक्त ! अशा भक्तांचे तो धनुर्धारी राम रक्षण करतो.

आपली भक्ती ही सकाम भक्ती असते. आपण देवाची भक्ती केली म्हणजे देवाने आपले रक्षण करावे, आपल्याला सुख, समाधान, यश आणि ऐश्वर्य प्रदान करावे अशी आपली इच्छा असते. अर्थात त्यात फार काही चुकीचे आहे अशातला भाग नाही. परमेश्वर आपल्या संकटात जर धावून आला नाही तर आपली त्याच्यावरील श्रद्धा डळमळीत होते. मी एवढे देवाचे करतो परंतु काही उपयोग होत नाही असे आपण म्हणतो. परंतु याला परमेश्वराची अनन्यभावाने भक्ती म्हणता येणार नाही. मला इतर गोष्टी नाही मिळाल्यात तरी चालतील. मला फक्त परमेश्वर हवा आहे, त्याचे दर्शन हवे आहे अशा प्रकारची भावना जेव्हा आपल्या मनामध्ये तीव्रतेने निर्माण होईल तेव्हाच परमेश्वराचे दर्शन आपल्याला घडू शकेल. श्रीकृष्णाचा भक्त सुदामा आणि त्याची पत्नी श्रीकृष्णाचे अनन्य भक्त होते. त्यांच्यावर प्रपंचामध्ये अनेक संकटे आली, प्रचंड दारिद्र्य पाचवीला पुजले होते. मुलांना प्रसंगी उपाशी झोपावे लागत होते. परंतु परमेश्वरावरील त्यांची श्रद्धा कधीच डळमळीत झाली नाही. आपल्याला जे काही अन्न प्राप्त झाले असेल त्याच्यातीलच काही भाग बाजूला काढून ते परमेश्वराला अर्पण करत असत. आणि मगच स्वतः भोजन करीत. ही झाली अनन्यभक्ती. परमेश्वराने भलेही त्यांची परीक्षा पाहिली असेल परंतु अशा अनन्यभक्तांचे परमेश्वराने रक्षण केले आहे.

स्वसंवाद (नवीन) : 

१) माझी भक्ती कोणत्या प्रकारची आहे – दास्य, सख्य, वात्सल्य की मधुरा ? माझा नैसर्गिक भाव कोणता हे मी ओळखले आहे का ?

२) “जसा भाव तसा देव. ” माझ्या मनात परमेश्वराविषयी खरोखर कोणता भाव आहे ? दृढ श्रद्धा की केवळ भीती ?

३) सुदाम्याने दारिद्र्यातही आधी परमेश्वराचा वाटा काढला. तसा माझ्या जीवनात मी परमेश्वराला आधी प्राधान्य देतो का ?

४) “अनन्य” म्हणजे एकच आधार. माझ्या संकटात परमेश्वर हाच माझा खरा आधार आहे असे मला मनापासून वाटते का ? (क्रमशः)

– – – – – 

श्लोक क्र. ३६

सदा सर्वदा देव सन्निध आहे |

कृपाळूपणे अल्प धारिष्ट पाहे|

सुखानंद आनंद कैवल्यदानी |

नुपेक्षी कदा राम दासाभिमानी |३६|

अर्थ : परमेश्वर कायम आपल्याजवळच आहे. फक्त तो आपली परीक्षा आणि धैर्य पाहतो. सुख, आनंद आणि कैवल्य यांचा तो दाता आहे. असा हा परमेश्वर आपल्या भक्तांचा अभिमानी असून त्यांच्याकडे तो कधीही दुर्लक्ष करत नाही.

(सन्निध – समीप/जवळ, अल्प धारिष्ट – परीक्षा/कसोटी, कैवल्य – मोक्ष.)

विवेचन : आधीच्या श्लोकात समर्थ परमेश्वर आपल्या कोणत्या भक्तांचे रक्षण करतो ते आपल्याला सांगतात. तर या श्लोकात हा परमेश्वर कोठे आहे, त्याचा वास कोठे आहे हे ते आपल्याला सांगतात. ते म्हणतात सदा सर्वदा देव सन्निध आहे म्हणजे जवळच आहे. व्यवहारामध्ये आपण सन्निध या शब्दाचा अर्थ जवळ किंवा समी र असा घेतो परंतु अध्यात्मामध्ये सन्निध म्हणजे अंतर्यामी. त्या परमेश्वराला शोधायला दूर कुठेही जावे लागत नाही. त्याचा वास आपल्या अंतर्यामीच असतो. आणि तिथे तो सदा सर्वदा म्हणजे कायमस्वरूपी असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर परमेश्वर आणि आपण वेगळे नाहीच आहोत.

असे जर आहे तर मग आपल्याला त्याचे अस्तित्व का जाणवत नाही ? आपली देहबुद्धी एवढी प्रबळ असते की त्यामुळे हा देह म्हणजे मी नाही आणि आपल्या अंतरात्म्यात त्याचा वास आहे हे आपल्याला जाणवतच नाही. सकाळी उठल्यानंतर आपण ” कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम्” हा श्लोक म्हणतो त्याचा अर्थ हाच आहे. आपल्या अंतर्यामी परमेश्वर वसतो आहे.

आपल्याला त्याचे अस्तित्व जाणवत नाही परंतु साधकांना मात्र पदोपदी त्याच्या अस्तित्वाची जाणीव होते. आपण आपले मूळ स्वरूप विसरल्यामुळे आपल्याला त्याच्या अस्तित्वाची जाणीव होत नाही. परंतु तुकाराम महाराजांसारखे संत ईश्वर चिंतनातच रममाण झालेले असल्यामुळे त्यांना स्वतःचे असे वेगळे अस्तित्व नसते. परमेश्वर कायम आपल्याबरोबरच आहे याची जाणीव त्यांना होत असते. म्हणूनच ते म्हणतात, ” जेथे जातो तेथे तू माझा सांगाती |चालविशी हाती धरुनिया ||

परंतु परमेश्वराची अशी कृपा होण्याआधी तो आपली परीक्षा पाहतो. ही परीक्षा पाहण्यामागे आपल्या भक्ताला मानसिक दृष्ट्या खंबीर करावे, आपल्या कृपेसाठी पात्र करावे अशीच सध्या भगवंताची इच्छा असते. आई आपल्या मुलाला चालायला शिकवते. पण कधी कधी त्याचे धरलेले बोट सोडून देते. एखादेवेळी तो पडेल हे तिला माहिती असते. परंतु त्याला स्वतःला चालता यावे, तो स्वावलंबी व्हावा म्हणून ती हे करत असते. अनेक संतांनी सुद्धा आपल्या अनुयायांना अनुग्रह देण्यापूर्वी त्यांची परीक्षा पाहिली आहे. आपल्या कृपेसाठी आपला शिष्य पात्र आहे की नाही याची खात्री झाल्यानंतरच गुरु त्याच्यावर कृपा करतात. प्रत्यक्ष जीवनात सुद्धा यशस्वी होण्यासाठी आपल्याला नाना प्रकारच्या परीक्षा उत्तीर्ण व्हाव्या लागतात. पण ज्याला पुढे जायचे आहे तो अशा प्रकारच्या परीक्षांना, संकटांना न डगमगता सामोरा जातो.

तसेच भगवंताच्या एकनिष्ठ भक्ताचे आहे. “देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो” अशी त्याची वृत्ती असते. खरा भक्त संकटप्रसंगी डगमगत नाही. परमेश्वरावरील त्याची श्रद्धा अविचल असते. परमेश्वराचा भक्त असलेल्या छोट्या प्रल्हादावर अनंत संकटे येतात. परंतु तरीदखील परमेश्वरावरील त्याची श्रद्धा ढळत नाही. मागील श्लोकात समर्थ आपल्याला जी अनन्यभक्ती सांगतात ती हीच !

अशी आपली त्याच्यावर संपूर्ण निष्ठा असली आणि त्याने घेतलेल्या परीक्षेत एकदा का आपण उत्तीर्ण झालो की मग त्याच्या कृपेचे जणू भांडारच खुले होते ! अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने अशी भक्ताची अवस्था होते. सुख, समाधान, आनंद आणि कैवल्य म्हणजे मोक्षमार्गाचा दाता असलेला परमेश्वर आपल्याला या सर्व गोष्टी सहजच प्रदान करतो.

स्वसंवाद : 

१) “परमेश्वर अंतर्यामी आहे” हे मी जाणतो पण माझ्या दैनंदिन जीवनात मला त्याची प्रत्यक्ष जाणीव होते का ?

२) आईने बोट सोडले तरी ती दूर नसते. माझ्या संकटकाळात परमेश्वराबद्दल अशी भावना माझी असते का ?

३) परमेश्वर परीक्षा पाहतो हे मान्य आहे. माझ्या आयुष्यातील समस्यांकडे मी त्या दृष्टीने पाहतो का ?

४) “अनंत हस्ते” देणारा भगवंत आहे. मग मी त्याच्याकडे क्षुल्लक गोष्टींचीच मागणी करत राहतो का ? 

– क्रमशः श्लोक ३५ आणि ३६.

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ किती सुंदर भांडण!… कवयित्री: अज्ञात ☆ प्रस्तुती : रेखा जांबवडेकर ☆

रेखा जांबवडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ किती सुंदर भांडण!… कवयित्री: अज्ञात ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर 

किती सुंदर भांडण !

(घरोघरी चालणारं,

डोळ्यात आनंदाश्रू आणणारं!)

 

माझे भांडखोर आई-बाबा

 

लहानपणापासून बघतेय मी,

आई-बाबा सतत भांडायचे,

आता सत्तरी उलटली तरीही,

तेच सुरू त्यांचे !

 

खूप दिवसांनी, दोन दिवसांसाठी,

गेले होते मी माहेरी,

बाबा बाहेर गेल्या गेल्या,

आईच्या सुरू झाल्या तक्रारी.

 

रोज सकाळी सकाळी तुझे,

बाबा जातात फिरायला,

मी ही जाते, कोपऱ्यापर्यंत,

त्यांना रस्ता क्रॉस करून द्यायला.

 

कानाला काहीतरी बांधा म्हणते,

किती गारठा असतो हल्ली,

ऐकत तर नाहीतच,

वर उडवतात माझीच खिल्ली.

 

रोज ह्यांच्या मित्रांपैकी आणतं,

कुणीतरी काहीतरी खायला,

बॉर्डरलाईन शुगर आहे आपली,

आता सांभाळून नको का राहायला ?

 

घरी आल्यावर खुशाल बसतात

तासभर वाचत पेपर,

धुणेवाली बाई निघून गेली तर,

पुन्हा माझ्याच डोक्यावर खापर !

 

ऐन बाराच्या उन्हात म्हणतात,

जरा बँकेत जाऊन येतो,

एन्ट्री आणतो, बिलाचं बघतो,

अन देवाला दोन हार घेतो ”.

 

अमेरिकेतून तुझा भाऊच इथले,

सांभाळतो, ग, सगळे व्यवहार,

पण ‘मी’ उन्हात नका जाऊ म्हणाले,

की हे जाणार, म्हणजे जाणार !

 

तुझ्या ताईने ‘मोबाईल’ घेऊन दिलाय,

इमर्जन्सीत सोबत असावा म्हणून,

तेव्हढा बरोब्बर घरी विसरतात,

कितीही सांगा शिरा ताणून !

 

इतकी वर्ष सांगतीये तरीही,

तितकेच भरभर जेवतात,

वाघाच्या अन ह्यांच्या शर्यतीत,

अजूनही हेच जिंकतात.

 

रोज संध्याकाळी मुलांच्या फोन्सची

वाट बसतात बघत,

मी म्हणते, ‘’अहो, मुलं बिझी असतात, ”

तरीही घुटमळतात येरझाऱ्या घालत.

 

परवा म्हणे, ”पंखा पुसतो, ”

अन घेतलं स्टूल चढायला,

आता ह्यांचं का वय राहिलं,

असली कामं करायला ?

 

तेव्हढ्यात बाबा आले फिरून,

म्हणाले, ”चला वाढा ”,

मी काही बोलणार, तितक्यात,

बाबांनी, सुरू केला त्यांचाही पाढा.

 

नका करत जाऊ, ‘स्वतः’ चार जिन्नस,

सांग जरा तुझ्या आईला,

फुकटचा का पगार द्यायचा,

स्वैपाकाच्या बाईला ?

 

खावं-प्यावं, मजेत राहावं,

कशाला ते धरावे उपास,

आता काय मिळवायचं राहिलंय,

आता कशात होणार नापास ?

 

अजून एक तिला समजावून सांग,

ती घेत नाही नीट औषधं-गोळ्या ”,

आई म्हणाली आतून, ”चला,

झाल्यात गरम-गरम पोळ्या ”.

…………………………..

………………………….

केला मी देवाला नमस्कार,

डोळ्यांतून अश्रू सांडत,

म्हटलं,

देवा, ह्या दोघांना,

असेच ठेव भांडत !”

 

अगदी हृदयास स्पर्शून गेले हे भांडण.

फक्त आपल्या पिढीपर्यंतच मर्यादित राहील का हे भांडण?

 

माहीत नाही या बाबतीत कोणाचे काय मत आहे मात्र या भांडणात पती- पत्नी संबंधात जो गोडवा आहे तो जगात कोणत्याच संबंधात दिसत नाही.

 

पति – पत्नी एकमेकांस किती पूरक असतात, याचे हे भांडण ज्वलंत उदाहरण आहे.

तसे पाहता हे भांडण जरूर आहे परंतु यात प्रेम भरभरून आहे हे मात्र तितकेच खरे.

कवयित्री:अज्ञात

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३१२ ☆ मैत्र… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३१२ ?

☆ मैत्र… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

हे तुझे दुटप्पी वागणे नव्हे बरे

सूज्ञ तू तुला समजावणे नव्हे बरे 

 *

बेगडी तुझे सारे विचार साजणी

नेहमीच संधी साधणे नव्हे बरे

 *

वागणे तुझे वा-यापरीच स्वैरसे

स्वार्थ सोहळे जोपासणे नव्हे बरे

 *

शब्द शस्त्र आहे लागता मनावरी

डंख नित्य सकळा मारणे नव्हे बरे

 *

जर नसे जिवाला शांतता “प्रभा” तिथे

मैत्र हे असे सांभाळणे नव्हे बरे

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझा संसार… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ माझा संसार सुश्री नीलांबरी शिर्के 

माझा संसार संसार

तवा तापे गॅसवर

मसाला वाटताना

होई मिक्सरची घरघर!!

सखे माझ्या या संसारी

नाही म्हातारी कोतारी

वृद्धाश्रमी पाठवून

सुख शांती लाभे घरी!!

लॅडस्केप बोनसाय

सजवीले घरीदारी

जागा नाही खर्च केली

देवाच्या ग मी देव्हारी!!

माझ्या संसाराला ठेका

डिस्को पाॅप संगिताचा

मिळणार नाही तुला

शब्द येथे आरतीचा!!

सांभाळाया मुलांना ग

बाई खास आहे घरी

काय म्हणते संस्कार

आपोआप होतात ग

मोबाईल टि व्ही वरी!!

माझ्या कपाळीच कुंकू

नाही लालच रंगाच

त्याच कसब ग मोठ

ड्रेससंगे रंगायाच!!

सखे संसार संसार

नाही सुखा पारावार

रूढवादी संस्कारांना

जागा नाही टिचभर!!

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २२ ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

श्री मंजिरी येडूरकर

? इंद्रधनुष्य ?

☆ श्री रविंद्रनाथ टागोर यांची “गीतांजली”… भाग – २२ ☆ श्री मंजिरी येडूरकर ☆

श्री रविंद्रनाथ टागोर

जवळजवळ १६५ वर्षांपूर्वी कोलकत्ता जवळच्या ‘जोरासांको’ येथील ठाकूर घराण्याच्या महाल सदृश घरात ७ मे १८४१ रोजी रविंद्रनाथांचा जन्म झाला. वडील महर्षी देवेंद्रनाथ व आई शारदा देवी यांचं ते चौदावं अपत्य होते. साहजिकच त्यांना आईचा सहवास फार वर्षे लाभला नाही. वडील पण सतत प्रवासांत असत. ऋषीतुल्य व्यक्तिमत्वाचे देवेंद्रनाथ वरचेवर हिमालयात भटकंती करत, तिथे जाऊन रहात, त्यामुळे त्यांचा सहवास देखील फारसा मिळायचा नाही. पण जेंव्हा रविंद्र उर्फ ‘रोबी’ ने शाळे विषयीच्या तक्रारी त्यांना सांगितल्या तेंव्हा त्यांना फार वाईट वाटले व त्यांनी रोबीला शाळेतून काढले ते कायमचेच.

घरीच वडील त्यांना शिकवू लागले. प्रवासात ते रोबीला आपल्या सोबत घेऊन जाऊ लागले. तिथे निसर्गाच्या सानिध्यात शाळेत न मिळणारं, पण बौद्धिक व भावनिक जग समृद्ध करणारे शिक्षण सहज बोलता बोलता रोबीला मिळू लागलं. वडिलांबरोबर केलेला प्रवास, हिमालयातील भटकंती, निसर्गाकडून व वडिलांकडून मिळालेलं ज्ञान हा रविन्द्रनाथ यांच्या जीवनातला सुवर्णकाळ होता. याच काळात या शाळा सोडून दिलेल्या तथाकथित अज्ञानी मुलाचं रूपांतर एका सुसंस्कृत मुलात झालं. (The ugly duckling was transformed into an admired swan) ही शिदोरी त्यांना नोबेल पुरस्कारा पर्यंत घेऊन गेली व शिक्षणपद्धतीचा कायापालट करणाऱ्या शिक्षणमहर्षी या पदवीपर्यंत घेऊन गेली. पूर्ण भारताने नाही तर जगाने त्यांना कलाक्षेत्र, शिक्षणक्षेत्र, समाजसुधारणेचं क्षेत्र, तत्वज्ञानाचे क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांतील गुरुपद बहाल केलं व गुरुदेव या पदवीने सन्मानित केलं. कोणतेही समाजमान्य पारंपारिक शिक्षण न घेतलेला, कोणत्याही विद्यापीठाची कसलीही पदवी गाठीशी नसलेला हा माणूस शिक्षणक्षेत्रात ‘न भूतो न भविष्यति’ असा प्रयोग यशस्वीपणे करून दाखवतो ही गोष्ट अचंबित करणारी आहे.

त्यांच्या मनात शाळेविषयी तिरस्कार निर्माण करणाऱ्या, त्या काळी सर्वसंमत असणाऱ्या, मुलांना शारीरिक क्लेश देणाऱ्या, अपमानास्पद शिक्षा करणाऱ्या पद्धतीचे जगाने खरंतर आभारच मानायला हवेत कारण त्यामुळेच रविंद्रनाथांनी शाळा सोडली. वडिलांकडून, निसर्गाकडून, पुस्तकां कडून ज्ञान मिळवून ते संवेदनशील विचारवंत, हरहुन्नरी कलाकार बनले.

रविंद्रनाथांनी लहानपणीच तीन तीन क्रांतीकारी चळवळी खूप जवळून पाहिल्या, अनुभवल्या. एक म्हणजे राजा राममोहन रॉय यांची धार्मिक पुनरुत्थानाची चळवळ, ज्यातून ब्राह्मो

समाजाची निर्मिती झाली. दुसरी म्हणजे बंकिमचंद्र चटर्जी यांनी चालू केलेली साहित्यिक चळवळ, ज्यामुळे भारतीय, वाङ्मयीन विश्व खडबडून जागे झाले. आणि तिसरी राजकीय चळवळ ‘Indian National movement’, जी राजकीय व सांस्कृतिक दडपशाहीचा निषेध करत होती. या तीनही चळवळींत टागोर कुटुंबियांचा सक्रिय सहभाग होता व त्यामुळे बालपणी व तरुणपणी रविंद्रनाथांनी या सर्व हालचाली खूप जवळून पाहिल्या होत्या.

पौर्वात्य व पाश्चिमात्य दोन्ही संस्कृतीतील चांगल्या गोष्टी एकत्र आणून संघर्षाशिवाय मानवजातीच्या कल्याणासाठी काम करावं अशी भावना कदाचित या तिन्ही चळवळींचा त्यांच्या कोवळ्या मनावर झालेल्या परिणामाचा परिपाक असावा.

वयात बरंच अंतर असूनही वडीलबंधू सत्येंद्रनाथांबरोबर रविंद्रनाथांचे वडिलांप्रमाणेच मित्रत्वाचे संबंध होते. आय ए एस असलेल्या सत्येंद्रनाथांच्या देशातील निरनिराळ्या शहरांत बदल्या व्हायच्या पण तिकडे जाऊन रोबी त्यांच्याबरोबर रहात, वेद, उपनिषदे, संत वाङ्मय यांचे वाचन करीत व त्यांच्याबरोबर चर्चा करून आपल्या ज्ञान कक्षा विस्तारित असत.

‘रोबी’ या आपल्या आत्मकथनपर पुस्तकात त्यांनी म्हटलय की, ” ज्या देवाचा व प्रेमाचा माझ्या सर्व साहित्यात संदर्भ आला आहे तो या जीवनाचा देव (God of life) आहे व ते प्रेम जीवनावरील प्रेम आहे. ” त्यांच्या शब्दांतून उमटणारे दैवी सूर, धर्म, भाषा, देश अशा सर्व सीमा लांघून सर्व विश्वात घुमले. आपल्या एका कवितेत ते स्वतःलाच सांगतात, “Move out of yourself, stand out in the open, you will hear the music of the universe in your heart. “

—–

☆ गीत : ६४ ☆

ON the slope of the desolate river among tall grasses I asked her, “Maiden, where do 

you go shading your lamp with your mantle? My house is all dark and lonesome ⎯ lend 

me your light! ” She raised her dark eyes for a moment and looked at my face through 

the dusk. “I have come to the river, ” she said, “to float my lamp on the stream when the 

daylight wanes in the west. ” I stood alone among tall grasses and watched the timid 

flame of her lamp uselessly drifting in the tide.

In the silence of gathering night I asked her, “Maiden, your lights are all lit ⎯ then where do you go with your lamp? My house is all dark and lonesome, ⎯ lend me your light. ” 

She raised her dark eyes on my face and stood for a moment doubtful. “I have come, ” she said at last, “to dedicate my lamp to the sky. ” I stood and watched her light 

uselessly burning in the void.

In the moonless gloom of midnight I asked her, “Maiden, what is your quest holding the 

lamp near your heart? My house is all dark and lonesome, ⎯ lend me your light. ” She 

stopped for a minute and thought and gazed at my face in the dark. “I have brought my light, ” she said, “to join the carnival of lamps. ” I stood and watched her little lamp uselessly lost among lights.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत :६४ ☆

नदीच्या उतरणीला उभा मी असताना,

मज दिसली ती, झाकुनि एक दीप नेताना

 

निघालीस कोठे हा दीप 

तुझा घेउनि?

देशील कां, घर माझे

आले अंधारुनि?

 

डोळे मोठ्ठे करूनि क्षण

मजकडे पाही

म्हणे मावळतीला सोडेन नदी प्रवाही

 

भित्री ज्योत थरथरुनि

वहातच गेली 

निशेच्या तमी पुन्हा दिवा घेउनि दिसली 

 

आता तरी देशील कां,

घर माझे उजळण्या?

म्हणे दिवा हा आणिला

नभासि अर्पिण्या

 

अवकाश पोकळीत दीप व्यर्थ तेवला

गडद रात्री, आली फिरुनि,

दीप छातीशी धरिला 

 

पुन्हा मी पुसले, टक लावुनि, पहात म्हणते

आनंदोत्सव असे दिव्यांचा, त्याचसाठी नेते

 

अनंत दिवे, ध्येय रहित, तेवती प्रकाशात

ती अन् तिचा दीप दोन्ही हरवले गर्दीत

 

भक्तीचा दीप न मिळे, असा आयता कोणास

ज्याचा त्याने तो ठेवावा चेतवुनि हृदयास

 

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर 

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत : ६५ ☆

WHAT divine drink wouldst thou have, my God, from this overflowing cup of my life?

My poet, is it thy delight to see thy creation through my eyes and to stand at the portals 

of my ears silently to listen to thine own eternal harmony?

Thy world is weaving words in my mind and thy joy is adding music to them. Thou givest 

thyself to me in love and then feelest thine own entire sweetness in me.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ६५ ☆

*

भरुनी वाहतो देवा

सुखी जीवनाचा ठेवा

*
तूच दिले मज हे जीवन

विविध रसांनी नटवून

*

कोणता रस तुजला

अर्पू मी न कळे मला

*

तूच निर्मिलेले जग 

मम नेत्री पाहशील का?

संगीत तूच निर्मिलेले

मम श्रोत्री ऐकशील का?

*

विश्व तुझेच मम हृदयी

गोफ विणे शब्दमयी

*

अलौकिक तव आलापी

सुखदायक हो भवतापी

*

बली सम तू दाता असशी

मम चेतसी तुलाच देशी

*

तव माधुरी मी हृदयी धरी

तव हृदयांगण जी तृप्त करी

भावानुवाद ©️ मंजिरी येडूरकर

संपर्क: ९४२१०९६६११

—–

☆ गीत ६६ ☆

SHE who ever had remained in the depth of my being, in the twilight of gleams and of glimpses; she who never opened her veils in the morning light, will be my last gift to thee, my God, folded in my final song.

Words have wooed yet failed to win her; persuasion has stretched to her its eager arms in vain.

I have roamed from country to country keeping her in the core of my heart, and around her have risen and fallen the growth and decay of my life.

Over my thoughts and actions, my slumbers and dreams, she reigned yet dwelled alone and apart.

Many a man knocked at my door and asked for her and turned away in despair.

There was none in the world who ever saw her face to face, and she remained in her 

loneliness waiting for thy recognition.

—–

☆ मराठी भावानुवाद : गीत: ६६ ☆

*

जी अंतरात माझ्या, ती संधीप्रकाश किरणात

कुणी न तिज पाहिले, दिवसाच्या प्रकाशात

*

प्रेमयाचना शब्दांची, फोल तिला जिंकण्यास 

प्रयत्न निष्फळ होत, तिचे मन वळविण्यास

*

देशोदेशी फिरलो, हृदयात तिज स्थापुनि

आयुष्याचे चढउतार, भोवती तिच्या गुंफुनि

*

अनन्य भक्ती तुजप्रती, हृदयी येई उमलुनि

मार्ग चाललो, जो दिला तिनेच मला दावुनि 

*

सत्ता तिचीच, मम स्वप्न, विचार वा कृती

निराश झाले, ज्यांना ती मागून हवी होती

*

वाट पाहते, तव मान्यतेची, एकटीच राहुनि

अर्पण करी, तिज देवा, अखेरच्या गीतातुनि

*

– क्रमशः भाग २२..

मूळ इंग्लिश काव्य : श्री. रविंद्रनाथ टागोर.

भावानुवाद : कवयित्री : © सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३२५ ☆ शेतकऱ्यांचे प्रश्न… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३२५ ?

☆ शेतकऱ्यांचे प्रश्न… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

वावरात या इतके कांदे पिकले होते

जागोजागी त्यांचे डोंगर रचले होते

*

उठाव नाही या कांद्याला काय करावे

कवडीच्या भावातच सारे विकले होते

*

भाग भांडवल सुद्धा वसूल झाले नाही

कास्तकार तर सारे येथे खचले होते

*

डोळ्यांचा हा पहा कालवा झाला त्याच्या

काळजात त्या सारे पाणी मुरले होते

*

अंधाराशी रोज लढाई करता करता

कोसळणारे तारे दिवसा दिसले होते

*

सटवाईने कायम केली त्याची थट्टा

त्याचमुळे का नशीब त्याचे रुसले होते

*

लग्न ठरेना म्हणून त्याने फास घेतला

शेतकऱ्यांचे प्रश्न कधी का सुटले होते

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मौनरंगी काव्य… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ मौनरंगी काव्य... ☆ श्रीशैल चौगुले ☆

तुझ्या मौनरंगी गाली

कुसुमांक शब्दलाली

ओळखूनी मन आहे

वाहे कवणपखाली.

 *

चालता जीवनवाट

अनोळखी भेट झाली

वाटले लिहावे आता

स्मरणांची ओळ ओली.

 *

नजर चोरटी जाणे

हृदयातली रंगोली

प्रभात संध्या नित्यची

स्वप्न प्रतिभे हवाली.

 *

असे वेड तुझे कसे

लागले कवित झुली

शब्द झोके अक्षरांना

ज्ञानफुलांच्याच वेली.

ऋतू मात्र भारावून

रचित श्रावण डोली

शिशीर वसंत गाती

काव्यप्रेम स्पंद बोली.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ ‘देवा…’ ☆ सुश्री शांभवी मंगेश जोशी ☆

सुश्री शांभवी मंगेश जोशी

? क्षण सृजनाचे ?

☆ ‘‘देवा…’ ☆  शांभवी मंगेश जोशी 

क्षण सृजनाचे:

दि. ३/४/२०२६ या ई-अभिव्यक्ती मध्ये खालील लेख आला आहे. तो वाचल्यानंतर मला माझी एक कविता येथे द्यावी असे वाटले. प्रथम तो लेख व नंतर माझी कविता आपल्यासाठी.

☆  निवांत एकांत… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆

मंदिराच्या पायऱ्या चढताना हातातील फुलांच्या हारापेक्षाही मनातील मागण्यांचे ओझे जास्त जड असते..

प्रत्येक पाऊल एका अपेक्षेने पडत असते आणि प्रत्येक नमस्कारात काहीतरी पदरात पाडून घेण्याची धडपड असते..

आपण देवाकडे जातो ते बहुधा स्वतःला अपूर्ण समजूनच..

कुणाला धन हवे असते, कुणाला यश, तर कुणाला केवळ मनाची शांती..

पण या मागणारे आणि देणारे यांच्या गर्दीत एक निराळाच प्रवाह वाहत असतो.

तो म्हणजे त्या जिवांचा, ज्यांनी मागणे सोडून दिले आहे..

ज्यांच्या डोळ्यांत आता आसवांची जागा एका संथ शांततेने घेतली आहे..

माणूस जेव्हा स्वतःच्याच अंतर्मनाच्या गाभाऱ्यात डोकावतो, तेव्हा त्याला उमजते की खरी श्रीमंती बाहेरून काही मिळवण्यात नसून आत जे आहे त्यात तृप्त राहण्यात आहे.

हे जगणे सोपे नसते..

या तृप्तीला एक सूक्ष्म दुःखाची किनार असते. हे दुःख एखाद्या जुन्या जखमेसारखे नसते, तर ते एका अशा जाणीवेचे असते की आता आपल्याला जगाकडून काहीही नको आहे..

ज्याला काही नको असते, तोच खऱ्या अर्थाने ‘सुखी आत्मा’ असतो..

पण या वैराग्यात एक प्रकारची एकाकीपणाची सावली असते..

जग जेव्हा धावत असते, ओरडत असते, तेव्हा हा माणूस आपल्याच हृदयाच्या कोपऱ्यात शांत बसून स्वतःच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करतो..

ही तृप्ती आनंदापेक्षाही जास्त गंभीर आणि मौनापेक्षाही जास्त सखोल असते..

अशा वेळी बाहेरच्या मूर्तीसमोर हात जोडण्याचं भानही उरत नाही, कारण साऱ्या जगाला व्यापणारा तो विधाता स्वतःच्याच निवांत एकांतात सामावलेला असतो..

हे एक नितांत सुंदर सत्य आहे..

*

लेखक: अज्ञात

प्रस्तुती: स्वाती मंत्री

—– 

☆ कविता –  😀 देवा, 🙏🌹🙏 ☆

 आले कशी कळेना, दारी तुझ्या दर्शनास

 नसताच कारण आणि इच्छा जराही मनात😞

 तरीही आस उगा मनात, भेटशील इथे तू खचित!

 वाटले…! वाटले पाहू तरी, असतो कसा तो देव!

 भ्रमनिरास माझा देवा नक्कीच तू केला😢

 साधून ते तुजला, आनंद कुठला मिळाला?

 रांगेत मी भक्तांच्या, तू वेढ्यात सुरक्षारक्षकांच्या

 तिथेच भक्ती माझी टिचकली, जी बळेच होती मी जपलेली 🙃

 ढकलाढकली अन् धक्काबुक्की ती अशी

 आले क्षणभर तव सामोरी कशीबशी

 तशाच धक्क्याने नेले क्षणात दूरदूर

 तनाने तसे मनानेही खूप खूप दूर दूर 👎👎

 सांगते हात जोडुनि शपथ घेउनि तुझी, 🙏🙏

 हात जोडण्यासही जमलेच नाही, त्या एका क्षणात! 😢

 किंचितही वळून ना पाहिले पुन्हा

 परी

 सोडला श्वास सुटकेचा, संपला सोहळा दर्शनाचा

आली कीव तुझीच! वाटले, हवी तुलाच सुटका

 येथुनि

निघाले तडक जरी माघारी… तरी…

तरी पावलांमागोमाग हा कसला भास? 🤔🤔🤔

 

आलास की काय सोडुनि तू तुझ्या राउळास?

 

संशय खरा की खोटा, छळतो मनाला

परी त्या क्षणापासुनिवाटते निश्चिंत माझ्या मनाला👍🙏😀🙏

© सौ. शांभवी मंगेश जोशी

संपर्क – सुमन फेज 4, धर्माधिकारी मळा, एस्सार पेट्रोल पंपामागे, सावेडी, अहमदनगर 414003

फोन नं. 9673268040, shambhavijoshi76@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares