मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सम्राज्ञी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ सम्राज्ञी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

(दाशी ६+६+६+६ (२४))

☆

दिसला मज चंद्र खुळा मनमुराद हसताना

चांदणीस वाटेवर थांब जरा म्हणताना

* 

नयनानी केलेल्या भावखुणा कळल्यावर

दिलखुलास रमली ती दर्पणात बघताना

 *

ती हसली मग फसली प्रेमातच कायमची

स्वप्नाच्या दरबारी विनयाने फिरताना

* 

मनमौजी प्राणसखा आवडता स्मरताना

प्रेमाच्या झोक्यावर ती दिसली झुलताना

* 

गझलेला सापडले विश्वतिचे आवडते

जगण्याचे मनभावन गीतनवे रचताना

*

मंदधुंद वास किती आसपास दरवळतो

मिलनाच्या ओढीने अंतरात फुलताना

* 

गूढ गीत गाताना सूर नवा सापडला

बनली मग सम्राज्ञी संसारी मुरताना

☆

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # ३३२ ☆ गझल – आपले नसते कुणीही… ☆ प्रभा सोनवणे ☆

प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # ३३२ ?

☆ गझल – आपले नसते कुणीही… ☆  प्रभा सोनवणे ☆

☆

समजला नाही कधी तो आगळा अनुनय मला

या कहाणीचा कधी कळलाच ना आशय मला

*

 चारचौघा सारखा नव्हतास तू सामान्यही

 भव्यतेचा नेहमी आलाय की प्रत्यय मला

*

 माणसे जातात का, सहचर्य अर्धे सोडुनी

तू असा जाशील, नव्हता हा कधी  संशय मला

*

 कोणत्या पक्षात जाता लाभते खुर्ची इथे

 धूर्त नेते सांगती, दावून खोटे भय मला

*

 आपले नसते कुणीही वेळ येता समजले

पात्र आता द्रौपदीचे लाभले अक्षय मला

☆

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) –  उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / मंजुषा मुळे/ गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दुष्काळ ☆ वनिता संभाजी जांगळे ☆

वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ दुष्काळ… ☆ वनिता संभाजी जांगळे ☆

☆

दिली पावसानं वड

पिकं गेलं करपून

हाता तोंडाचा घास

गेला मातीत मिटून

* 

ये गं ये गं सरी धावून

टाक शिवार भिजवून

माझ्या अंतरीची धग

टाक पावसात विझवून

 *

मरगळला हिरवा जीव

वाट रानाची चालवेना

करपल्या पिकाचं दुःख

आता काळजाला सोसेना

 *

दडी मारली पावसानं

तापलं भादव्याचं उन

मोहरून आलेलं शिवार

टाकील दुष्काळ गिळून

 *

करपल्या पिकाची व्यथा

आता कुणाकडं मांडावी

देवा तुझ्या कृपेची धार

आभाळातनं सांडावी

 ☆

©  वनिता संभाजी जांगळे (घागरे)

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३४२ ☆ देशभक्तिचे वेड… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३४२ ?

☆ देशभक्तिचे वेड… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

☆

देशभक्तिचे वेड लागले पुजतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

*

युद्ध खेळणे केवळ नाही काम एवढे

कुठल्याही कामाचे नसते इथे वावडे

पूर वादळा सोबतसुद्धा झटतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

*

पालन नियमांचे करण्याची सक्ती आहे

देशावरती नितांत कायम भक्ती आहे

म्हणून आम्ही धारातीर्थी पडतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

*

डोंगर सोडा हिमालयावर चढतो आम्ही

कण वाळूचे तप्त जाळती जळतो आम्ही

देशासाठी आनंदाने भिजतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

*

या पायांना हिरवळ सांगा कोठे दिसते

ढग युद्धाचे नसतानाही पळपळ असते

ओझे असते पाठीवरती पळतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

*

विझण्यासाठी आम्ही पेटुन उठतो येथे

देशासाठी बाधा ठरती काही नेते

विचार त्यांचा मनास अमुच्या छळतो आहे

रणांगणावर देशासाठी लढतो आहे

☆

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संत विवेकी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ संत विवेकी… ☆ श्रीशैल चौगुले ☆

☆

ऐसीए संगत भक्तास रंगत

संतांची पंगत आत्मसुखी.

*

श्लोकांची आरास ओवींचे तोरण

मुक्तीचे कारण पांडुरंग.

*

अभंग अक्षरे शब्दांचे रोपण

इंद्रिया कुंपण शुध्दभावे.

*

महती त्र्यैलोकी विठ्ठल गजर

भुलोकी पाझर अंतर्यामी.

*

अगंध व्यासंग चौघडा वारीचा

विवेकी स्वारिचा संतसंगी.

 ☆

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ करारनामा फक्त चुकला !  श्री आशिष  बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? करारनामा फक्त चुकला ! ? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

ह्रदयाच्या बिऱ्हाडात,

राहतेस तू एकटी |

आणि भाडे दयावे मीच,

रीत कशी ग उलटी |

… लहानतोंडी मोठा घास… सुरेश भट साहेबांच्या या चार ओळीवरून सुचलेली रचना 

– – – 

डोकावले बिऱ्हाडात,

आठवणींचा खजिना |

रमतो तुटण्यात मी,

संपता तो संपेना |

*

हिरे माणकं फिकी,

दिपतो त्या क्षणांनी |

चमक चेहऱ्यावर,

गुलाबी आठवांनी |

*

गंध बकुळ गजऱ्याचा,

मनास सुखावतो |

निर्माल्याच्या गाभाऱ्यात,

येण्यास खुणावतो |

*

भाडेकरू नव्हतीस कधी,

मालकीणच झालीस |

करारनामा फक्त चुकला,

एकटी सोडून गेलीस |

©️ वास्तवरंग

☆

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आहेत वंचनेच्या पाठीशी पखाली… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ आहेत वंचनेच्या पाठीशी पखाली… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

☆

संसार पेलताना जनता पिचून गेली

लटकी उगी जगाला सांगू नका खुशाली

जगणेच आज येथे झाले आहे हमाली

आहेत वंचनेच्या पाठीवरी पखाली

 *

होणार पूर्ण नाही अशा मनात जपली

अंधार उजळणा-या नाहीत या मशाली

आहेच वास्तवाची काळोख रात आली

झालोय आज आम्ही स्वप्नात भाग्यशाली

 *

सरली उमेद आहे बांधून ठेवलेली

सगळीकडे निराशा आहेच पसरलेली

संधी सुधारणांची फसवून दूर गेली

सद्भावना कुणाची नाही कुठेच दिसली

 *

समता इथेच दिसते द्वेषात गुंतलेली

जातियतेत आहे धूसफूस चाललेली

वाचनास जाणारी नियती निघून गेली

संस्कार संस्कृती ही नाही कुठेच उरली

 *

माणूस माणसाचा नाहीच आज वाली

बदलून भावभक्ती झालीय आज नकली

जिकडे बघाल तिकडे विध्वंसता पसरली

होईल काय पुढती चिंताच फक्त उरली

☆

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ संधी-विग्रहाच्या पलीकडे… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ संधी-विग्रहाच्या पलीकडे… ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

☆

 – – नाती, व्यवहार आणि समत्वाचा अंतर्मुख प्रवास

 

“शत्रौ मित्रे पुत्रे बन्धौ मा कुरु यत्नं विग्रहसन्धौ ।

भव समचितः सर्वत्र त्वं वाञ्छस्यचिराद्यदि विष्णुत्वम् ॥”

(द्वादशपञ्जरिका स्तोत्रम्)

व्दादशपञ्जरिका स्तोत्रात आचार्य शिष्याला वरील उपदेश करतात.

– – शब्द थोडे पण आशय अथांग.

आचार्य असे का म्हणतात?

– – शत्रू असो वा मित्र, पुत्र असो वा बंधू—या नात्यांच्या संधी-विग्रहात मनाला इतके गुंतवू नकोस की तुझे चित्तच अस्थिर होऊन जाईल. सर्वत्र समचित्त राहा. परमात्म्याशी ऐक्याची आकांक्षा असेल, तर अंतःकरणात समत्व जागव.

आचार्यांचे हे वचन वाचताना एक प्रश्न मनात येतो—

— मग व्यवहार करायचा कसा?

शत्रूशी विग्रह करायचा नाही? मित्राची चूक झाली तर विरोध करायचा नाही? पुत्र चुकीच्या मार्गावर गेला तर त्याला थांबवायचे नाही?

– – या प्रश्नाचे उत्तर शोधले की या श्लोकाचा सूक्ष्म अर्थ उलगडू लागतो.

 

नाती नकोत असे नाही…

आचार्य नाती तोडायला सांगत नाहीत.

ते नात्यांभोवती मनाने विणलेली आसक्तीची जाळी तोडायला सांगतात.

– शत्रू असेल तर त्याचा प्रतिकार करावा लागेल.

मित्र असेल तर स्नेह ठेवावा लागेल.

पुत्र असेल तर प्रेम करावे लागेल.

बंधू असेल तर नाते निभवावे लागेल.

व्यवहार नाकारून अध्यात्म साधत नाही.

– मग सोडायचे काय?

अतिरेकी मोह. द्वेष. अपेक्षांचे ओझे. ‘माझे’ आणि ‘परके’ यांत मनाला अडकवणारी तीव्रता.

– – नाती राहू द्यावीत.

पण नात्यांनी मनाला कैद करू नये.

नाती हातात असावीत;

गळ्यातील फास होऊ नयेत.

 

संसार बाहेर कमी, मनात अधिक

शत्रू बाहेर असतो; पण त्याच्याविषयीचा द्वेष आपण मनात वाढवत राहतो.

मित्र बाहेर असतो; पण त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा मनात घर करतात.

पुत्र आपला असतो; पण त्याच्यावरील मोह कधी विवेकावर सावली टाकतो.

म्हणून प्रश्न नात्यांचा नाही.

– प्रश्न आहे—नात्यांशी आपले मन किती बांधले गेले आहे?

आचार्यांना हीच गाठ सोडवायची आहे.

 

समत्व म्हणजे समान वर्तन नव्हे

‘समचित्त’ म्हणजे सर्वांशी अक्षरशः एकसारखे वागणे नव्हे.

– दुष्ट आणि सज्जन यांच्यात भेद करावाच लागतो. न्याय आणि अन्याय यांत फरक करावाच लागतो.

समत्व म्हणजे विवेक सोडणे नव्हे;

– विवेकाला राग-द्वेषाच्या ताब्यात जाऊ न देणे.

गीता सांगते—

“समत्वं योग उच्यते।”

– – मन एखाद्याच्या प्रेमाने उंचावले आणि दुसऱ्याच्या द्वेषाने कोसळले, तर त्या मनाचे स्वातंत्र्य कुठे राहिले?

ज्याच्या हातात आपला राग आहे,

त्याच्या हातात आपल्या मनाची दोरी आहे.

 

व्यवहारात भेद, दृष्टीत अभेद

गीतेतील—

“पण्डिताः समदर्शिनः”

– – ही दृष्टी समत्वाचा गाभा सांगते.

समदर्शी ज्ञानी सर्वत्र एकच आत्मतत्त्व पाहतो. याचा अर्थ व्यवहारातील सर्व भेद नष्ट करणे नव्हे. प्रत्येक व्यक्तीचे आचरण, कर्तव्य आणि स्थान वेगळे असू शकते.

पण अंतःकरणातील दृष्टी द्वेषाने कलुषित होऊ नये.

व्यवहारात भेद.

दृष्टीत अभेद.

– – कदाचित समत्वाचे हेच सर्वांत नेमके सूत्र.

 

मग विग्रह करायचाच नाही?

करावा लागला तर करावा.

अन्यायासमोर उभे राहणे हेही कर्तव्य असू शकते. सत्यासाठी विरोध करावा लागू शकतो. म्हणून विग्रहाचा निषेध नाही; विग्रहामागील द्वेषाचा निषेध आहे.

महाभारताच्या रणभूमीवर अर्जुनासमोरही मोह आणि कर्तव्य यांचा संघर्ष उभा राहिला. श्रीकृष्णाने त्याला पलायनाचा मार्ग दाखविला नाही; मोह बाजूला ठेवून कर्तव्यकर्म करण्याची दिशा दिली.

म्हणून—

कर्तव्य करावे; पण द्वेषाने नव्हे.

विरोध करावा; पण प्रतिशोधाने नव्हे.

सीमा आखावी; पण अंतःकरणात वैराची भिंत उभी करू नये.

 

संधीही विवेकाने, विग्रहही विवेकाने

संधी म्हणजे नेहमी सद्गुण नव्हे.

कधी ती शहाणपण असते; कधी भीतीची सावली.

विग्रह म्हणजे नेहमी दोष नव्हे.

कधी तो अहंकार असतो; कधी धर्मरक्षणाचे रूप.

 

म्हणून प्रश्न कृतीचा कमी आणि अंतःप्रेरणेचा अधिक.

 

मी का लढतो आहे?

स्वार्थासाठी?

अहंकारासाठी?

प्रतिशोधासाठी?

की न्यायासाठी?

 

मी का संधी करीत आहे?

भीतीपोटी?

लोभापोटी?

की शांततेसाठी?

«कृती बाहेरची असते;

तिचे खरे स्वरूप मनात ठरते. »

 

प्रेम असावे; मोह नसावा

पुत्रावर प्रेम करावे; पण त्याची चूक दिसली तर सांगावी.

मित्रावर प्रेम करावे; पण तो चुकीचा असेल तर सत्य सांगावे.

बंधूवर प्रेम करावे; पण बंधुत्वाच्या नावाखाली अन्यायाला समर्थन देऊ नये.

शत्रूचा विरोध करावा; पण त्याच्याविषयीचा द्वेष आपल्या अंतःकरणात साठवू नये.

प्रेम माणसाला उंचावते;

मोह त्याला बांधतो.

 

कमळाचे रहस्य

कमळ पाण्यात असते.

पण पाणी त्याला चिकटून राहत नाही.

– – संसाराचेही तसेच.

संसार सोडून दूर जाणे हीच विरक्ती नव्हे. संसारात राहूनही संसाराला मनाचा स्वामी होऊ न देणे—ही खरी विरक्ती.

– हात संसारात.

– मन समत्वात.

– – हीच अंतर्मुक्तीची दिशा.

संघर्ष बाहेरचा, शांती आतली

जीवनात संघर्ष टाळता येत नाही.

कधी घरात.

कधी समाजात.

कधी कार्यक्षेत्रात.

आणि कधी स्वतःच्या मनातच.

– – पण प्रत्येक संघर्ष अंतःकरणात उतरवायचा नसतो.

काही संघर्ष बाहेरच थांबवायचे असतात.

सीमा बाहेर आखायची.

शत्रुत्व आत वाढू द्यायचे नाही.

अध्यात्म म्हणजे संघर्षापासून पलायन नव्हे.

संघर्षाच्या मध्यातही विवेक आणि शांती जपण्याची शक्ती—हीच साधना.

 

शेवटी काय उरते?

– शत्रू कायमचा राहत नाही.

– मित्रही कायमचा राहत नाही.

– आजचा परका उद्या जवळचा होऊ शकतो.

– आजचा जवळचा उद्या दुरावू शकतो.

– संधी होतील.

– विग्रह होतील.

– जिंकणे-हरणे चालूच राहील.

 

मग या सगळ्यांच्या पलीकडे काय उरते?

– –आपले चित्त.

ते रागाने व्यापले असेल तर विजयातही पराभव असतो.

ते द्वेषाने भरले असेल तर शत्रू दूर असूनही आपल्या मनातच वसतो.

आणि ते समत्वाने उजळले असेल

तर संघर्षाच्या मध्यातही शांती जन्म घेते.

आचार्यांचा अंतिम संकेत

आचार्य म्हणतात—

शत्रूशी व्यवहार कर.

मित्राशी स्नेह ठेव.

पुत्रावर प्रेम कर.

बंधूचे नाते निभाव.

 

पण या सर्वांच्या पलीकडे स्वतःला विसरू नकोस.

संधी करावी लागेल—कर.

विग्रह करावा लागेल—कर.

पण मनाचा ताबा कोणालाही देऊ नकोस.

– – कारण मुक्ती नात्यांपासून पळण्यात नाही.

 

मुक्ती आहे—

नात्यांत राहूनही अनासक्त राहण्यात.

विग्रह बाहेर असला तरी चालेल… तो अंतःकरणात नको.

संसार हातात असू दे.

मन परमात्म्यात असू दे.

 

आणि मग—

शत्रू असो वा मित्र,

पुत्र असो वा बंधू,

संधी असो वा विग्रह—

 

चित्ताच्या आकाशात एकच ऋतु उरेल—

– समत्वाचा!

 

©️ दिवाकर बुरसे

पुणे.

संपर्कः ९५५२६२९२४५

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बुद्धी दाता आणि ज्ञान दाता! 🙏 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? कवितेचा उत्सव ?

🙏 बुद्धी दाता आणि ज्ञान दाता! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ☆

☆

साम्य वाटले मजला

PC आणि गणेशात,

सांगतो समजावून कसे

बघा येतंय कां ध्यानात!

 *

साऱ्या विश्वाची खबर

लंबकर्ण कानी आकळे,

साठवी माहिती जगातून

PCचे इंटरनेट जाळे!

 *

मोठी सोंड वक्रतुंडाची

करी दुष्टांचे निर्दालन,

अँटीव्हायरस करतो

स्व जंतूचे स्वतः हनन!

 *

ठेवी लंबोदर उदरात

भक्तांच्या पाप पुण्याला,

PCची हार्डडिस्क पण

येते ना त्याच कामाला?

 *

येई स्वारी गजाननाची

मूषक वाहना वरुनी,

PCचा माऊस पण चाले

एका चौकोनी पॅडवरुनी!

 पण,

भले भले भरकटती

PCच्या मोह जालात,

एकच गणेश बुद्धीदाता

ठेवा कोरून हृदयात!

ठेवा कोरून हृदयात!

☆

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ गण गण गणात बोते ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

श्री सुधीर करंदीकर

? मनमंजुषेतून ?

☆ गण गण गणात बोते ☆ श्री सुधीर करंदीकर ☆

शेगांवचे श्री गजानन महाराज यांनी सर्व भक्त मंडळींना एकच मंत्र दिला होता आणि तो म्हणजे – गण गण गणात बोते.

महाराज स्वतः या मंत्राचा सतत जप करत असत आणि त्याप्रमाणे तो आचरणात आणत असत.

कुठलाही मंत्र म्हटला, कि, त्यामध्ये दोन भाग असतात. एक म्हणजे ध्यानस्थ बसून त्या मंत्राचा नित्यनियमाने जप करणे. आणि दुसरा महत्वाचा भाग म्हणजे, नित्य जप करण्याबरोबरच त्या मंत्राचा अर्थ समजवून घेणे आणि त्याप्रमाणे आपले आचरण बदलणे आणि ठेवणे.

आपण बरेच जण ‘गण गण गणात बोते’ या मंत्राचा नित्य जप करत असतो. असा जप केल्यामुळे आपलं चित्त एकाग्र होतं, आणि त्यामुळे जप करणाऱ्यांना मानसिक शांतता नक्कीच मिळते.

पण बऱ्याच जणांना या मंत्राचा अर्थ माहीत नसतो, त्यामुळे तो आचरणात आणणे दूर राहते. आणि त्यामुळे आपली वैचारिक पातळी / अध्यात्मिक पातळी उंचावण्याकरता या अतिशय साध्या आणि आचरणांत आणायला अतिशय सोप्या अशा मंत्राचा उपयोग करण्याला आपण मुकतो.

आपल्याला समजेल, असा या मंत्राचा अर्थ जर आपल्याला समजला, तर तो आचरणात आणणे सोपे असते. आणि मग आपण मनात तसं ठरवलं, तर आपली वाटचाल त्या दिशेनी सहजपणे होऊ शकते.

या मंत्राचा अर्थ सांगतात तो असा :- _जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये. भगवान सर्वत्र आहेत आणि सर्व सत्ता भगवंतात आहे. _ 

हा सांगितलेला अर्थ वाचून मला किंवा बऱ्याच जणांना समजेल असा अर्थ लक्षात येत नव्हता. आणि त्यामुळे मंत्र आचरणात कसा आणायचा हे लक्षात येत नव्हते.

म्हणून मी प्रत्येक शब्दाचा सर्व बाजूंनी अर्थ लक्षात घेऊन या मंत्राद्वारे महाराजांना काय सांगायचे असेल व ते सगळ्यांना कसे समजेल, असा या मंत्राचा अर्थ मी लिहून काढला. 

मला या मंत्राचा सोपा अर्थ दिसतो तो असा —

(पहिला) गण = कुणीही व्यक्ती, कुणीही प्राणी

(दुसरा) गण = शिव म्हणजेच ईश्वर म्हणजेच देव

गणात = हृदयात

बोते = बघा

म्हणजे सगळ्या व्यक्तींमध्ये / प्राण्यांमध्ये ईश्वर आहे हे लक्षात घ्या आणि ही जाणीव ठेवा. आणि मग त्याप्रमाणे आपली वागणूक ठेवा. सगळ्या व्यक्ती; म्हणजे आपण स्वतः पण त्या मधे येतो, म्हणून स्वतःमध्ये पण ईश्वर आहे, हे पण लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

आपण ज्या व्यक्तीशी बोलतोय किंवा ज्या व्यक्ती विषयी बोलतोय, त्या व्यक्तीमध्ये ईश्वर आहे, हे जर आपल्या प्रत्येकाला उमगलं, तर आपण त्या व्यक्तीशी खोटं बोलू शकणार नाही / नाटकीपणाने बोलू शकणार नाही / त्याच्यावर आरडाओरडी करू शकणार नाही / त्याला घालून पाडून बोलू शकणार नाही / त्याला फसवू शकणार नाही / त्याला खोटी आश्वासने देऊ शकणार नाही / कुठेहि भेसळ करू शकणार नाही / भ्रष्टाचार करू शकणार नाही. यामुळे सगळेच नातेसंबंध / मैत्रीसंबंध आणि व्यवहार स्वच्छ होतील, आणि राहतील.

आपण अनेक मंदिरांची यात्रा करतो, देवांची पूजा करतो, देवांचे सण साजरे करतो, पण आपल्याला देवदर्शन कधीच होत नाही. कारण देवळातला देव म्हणत असेल, इथे तू माझ्यासमोर हात जोडतो आहेस / माझ्या आरत्या करतो आहेस आणि बाहेर गेल्यानंतर तू लोकांना म्हणजेच मला (कारण सगळ्याच व्यक्तींमधे देव आहे) फसवतो आहेस / लोकांना म्हणजेच मला शिवीगाळ करत आहेस, तुला मी कस काय दर्शन देणार आणि तुझ्यावर कसा प्रसन्न होणार!

समोरच्या व्यक्ती मधे देव आहे हे जर आपल्याला मनापासून पटलं, तर आपलं आचरण आपोआपच भक्तासारखं होईल आणि मग देव स्वतः आपल्या दाराशी दर्शन देण्याकरता येईल हे नक्की. पुराणकाळात अशी उदाहरणे भरपूर आहेत.

आता दुसरा भाग म्हणजे, स्वतःमधे देव आहे, हे जर आपल्या मनात रुजलं तर एक गोष्ट सहज लक्षात येईल, की, आपले स्वतःचे शरीर हेच त्या देवाचे मंदिर होते. देवाचे वास्तव्य जागृत ठेवायचे असेल तर ते मंदिर म्हणजेच आपण आपले शरीर आणि मन हे दोन्ही स्वच्छ आणि पवित्र ठेवायलाच पाहिजे. आणि हे अगदी सोपे आहे. आपण याकरिता काय करायला पाहिजे –

रोज आपल्या शरीराची बाहेरून स्वच्छता करायला पाहिजे. नियमित व्यायाम, नियमित फिरणे, नियमित प्राणायाम, आपल्या आवडी / छंद जपणे, चांगले खाणेपिणे, वेळेवर झोपणे आणि उठणे, हे करायलाच पाहिजे. आपली घरची / बाहेरची कामे, नोकरी, व्यवसाय, हे सगळे नेहेमीच मन लावून करायलाच पाहिजेत. सगळ्यांशी प्रेमानी बोलणे / वागणे / कायम चेहेरा हसरा ठेवणे, यामुळे मन स्वच्छ राहते. कुणाही कडून अपेक्षा न ठेवणे यामुळे पण मन स्वच्छ राहते.

तुकाराम महाराजांचं याच विषयावर एक सुंदर भजन आहे –

 देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर l 

 देव देहात देहात, का हो जाता देवळात l 

 तुका सांगे मूढ जना, देही देव का पहाना II

गजानन महाराजांच्या मंत्राचा सोपा अर्थ आता लक्षात आला असेलच. 

चला तर मग आपण सगळेच जण आजपासून आचरणात आणूया 

गण गण गणात बोते l

गण गण गणात बोते l

 © श्री सुधीर करंदीकर

मो. 9225631100 – ईमेल – srkarandikar@gmail. com

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares