मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ नवं वळण… कवयित्री : सुचेता गोखले ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

उषा नाईक

📖 वाचताना वेचलेले 📖

नवं वळण… कवयित्री : सुचेता गोखले ☆ प्रस्तुती : उषा नाईक ☆

स्त्री जन्माची गाथा गेली नव्या वळणावर

राजा राणी स्वार आता स्वतंत्र मार्गावर

 *

पूर्वीची ती लाजरी राणी गेली कुठे हरवून?

रुसल्या राणीची समजूत काढणारा

राजा, नाही येत दिसून.

 *

स्त्रीमुक्तीचे दिवस आले सोन्याचे

आता स्वयंपाघरात राज्य असते दोघांचे

 *

तिशीतील राजा राणी, परिपक्व त्यांची मते

करियरची घोडदौड सांभाळत करतात कामे फत्ते

 *

स्वयंपाक करायचा दोघांनी

बाळ सांभाळायचे दोघांनी

 *

तोलून तराजूत कामे सारी

म्हणतात मैत्री आमच्यात भारी

 *

तिने केली भाजी तर त्याने करावे वरण

त्याने आणले दळण तर तिने करावे तळण

 *

चिऊ-काऊच्या गोष्टी बरोबर मऊ मऊ भात

बाळ राजे चालतात धरून दोघांचा हात

 *

नवीन कुटुंबातून आजी आजोबा हरवले

बाळ राजे आई बाबा सोबत खेळण्या हट्टावले

 *

पिझ्झा आणि बर्गर आले, गेले मोदक आणि लाडू

आईची झाली मॉम आणि बाबाचे झाले डॅडू

 *

नको मोबाईल नको टीवी नका आता टोकू

बालगीतातून भेटतील त्यांचे दोस्त चिकू पिकू

 *

स्त्री म्हणजे वात्सल्याचा झरा

शिक्षणाच्या ज्योतीने उजळेल तो खरा

 *

दोघे आता समर्थ संसार रथ सांभाळण्या

पुढच्या पिढीस सर्वतोपरी सक्षम करण्या

 *

स्त्री शिकली की घर होते संस्कारीत

नवीन पिढी नक्कीच करेल भारताला विकसित

कवयित्री : सुचेता गोखले

प्रस्तुती :  उषा नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कृपासिंधू… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? कृपासिंधू… ? श्री आशिष  बिवलकर ☆

स्वामी तुम्ही थोर | दावी ऐसी दया |

उद्धरती काया | नश्वरांची ||१||

*

भिऊ नकोस तू | मी आहे पाठीशी |

आशिष गाठीशी | कृपासिंधू ||२||

*

प्रसन्न चित्ताने | करावे स्मरण |

वंदावे चरणं | स्वामीकृपा ||३||

*

चराचरात या | जाणवे अस्तित्व |

हृदयी स्वामीत्व | विराजते ||४||

*

अध्यात्माची गोडी | दावी ऐसी दृष्टी |

सुखमय सृष्टी | चिंतनाने ||५||

*

संकटात तुम्ही | मार्ग दाखविता |

दाह शमविता | वेदनांचा ||६||

*

तिन्ही सांजवेळी | रचना स्फुरली |

तुम्हांस अर्पिली | भक्ती भावे ||७||

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वर्णन करण्या शब्द अपुरे… ☆ शालिनी जोशी ☆

शालिनी जोशी

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

 

? वर्णन करण्या शब्द अपुरे... ? शालिनी जोशी 

ही फुले जुईची कां 

आकाशीच्या चंद्रिका

अवतरल्या वेलीवर 

सुखवावया भूलोका

*

नव्हे नव्हे, त्या चंद्रिका 

असती गंधहीन

सुगंध जुईचा व्यापून टाकी 

सारे गगन

*

धुंदी कळ्या फुलांची 

फोटोतूनही जाणवे

वर्णन करण्या 

शब्दही अपूरे व्हावे

©  शालिनी जोशी

संपर्क – फ्लेट न .3 .राधाप्रिया  टेरेसेस, समर्थपथ, प्रतिज्ञा मंगल कार्यालयाजवळ, कर्वेनगर, पुणे, 411052.

मोबाईल नं.—9850909383

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ छंद… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ छंद… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

आठवणींच्या चांदणराती चंद्र चांदणी बोलत होती

खुल्या दिलाने अनुभवलेली एक कहाणी रंगत होती

*

सूर्य जरासा थकला तेव्हा विश्रांतीला निघून गेला

रात साजणी देत हुंदके विरहामध्ये जागत होती

*

रात्रीची पण त्या सूर्याशी ओळखपाळख कधीच नव्हती

भलती आशा मनी बाळगत रात अशी का वागत होती

*

दरवळणारा गंध सुगंधी वारा घेऊन पळून गेला

बागेमधली कुजबुजणारी फुले फुलांना सांगत होती

*

अधीर वेडे प्रेम पाखरू विसावण्यला झाड शोधते

नजरचत्याची बनून वेडी एकचजागा शोधत होती

*

प्रेमासाठी पतंग सुद्धा ज्योती वरती जळूनमरतो

कधी पासूनी जगात सा-या हीच बातमी गाजत होती

*

फरावलंबी नको जगाया सन्मानाने जगता यावे

म्हणून सारी तरणी पोरे काम सारखे मागत होती

*

जगणे केवळ जगणे नसते असते सुंदर जीवन गाणे

जुनी पिढी हे नव्या पिढीला रियाजातुनी शिकवत होती

*

भविष्यातले स्वप्न पहाणे हा सगळ्यांचा छंदच असतो

कर्तृत्वाने छंद जिंकणे पिढी पिढीतीला घडवत होती

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ कृष्णप्रेम… ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

अलका ओमप्रकाश माळी

?  क्षण सृजनाचा ?

☆ कृष्णप्रेम… ☆ अलका ओमप्रकाश माळी ☆

जगात तेहतीस कोटी देव आहे अस मानलं जात.. असतील ही कदाचित.. पण प्रत्येकाच्या मनात त्याच्या देवाची एक वेगळी प्रतिमा असते.. प्रत्येकाचं आराध्य वेगळं असत.. कोणी विष्णू भक्त असतो तर कोणी शिव भक्त.. कोणी देवी भक्त असतो तर कोणी गणेश भक्त..

किती किती रूपे तुझी..

कुठे कुठे शोधू तुला..

तुझे अनंत देव्हारे…

हे जरी खर असलं तरी प्रत्येकाची श्रद्धा त्याची भक्ती ही वेगळी असते.. कोणी देवावर फुलं वाहून आपली भक्ती जपत असत.. तर कोणी खडकाळ मातीवर अनंत फुलं फुलवून आपली भक्ती दाखवत असत आता इथे प्रत्येकाची श्रद्धा महत्वाची.. आणि जिथे श्रद्धा असते तिथे अंध श्रद्धेला अजिबात स्थान नसते हे महत्वाचे… जेंव्हा पासून देव ही संकल्पना कळायला लागलीय तेंव्हा पासून बाप्पाचे म्हणजे गणपती बाप्पाचे साजिरे रूप च माझ्या डोळ्यासमोर येतं.. आणि मग ह्या सगळ्या च्या ही पलीकडे मनात खोल वर घर करून आहे तो माझा सखा.. कृष्ण… सावळा कान्हा.. त्याचं आणि माझं नात एका गोड आठवणीने जोडलं गेलंय.. लहानपणी आजी आम्हा मुलांना वेगवेगळ्या गोष्टी सांगायची.. रामायण,  महाभारत आणि किती काय काय गोष्टी ती सांगायची त्या सगळ्याच फार रंजक असायच्या पण कृष्णाची गोष्ट जास्त आवडीचे.. रामायणातील राम जेंव्हा सीता मातेला सोडून जायचा तेंव्हा वाईट वाटायचं.. त्या वेळी तर रामाचा राग ही यायचा पण कृष्णाच्या कुठल्याच गोष्टीचा कधी राग आला नाही.. त्याने राधेला किती ही वाट पाहायला लावली.. त्रास दिला तरी तो नटखट कान्हा अजूनच जवळचा वाटायचा.. अर्थात राम आणि कृष्ण हे कोणी वेगळे नाहीत हे कळायचं ते वय न्हवत.. पुढे दोघांच्या प्रेमाची तुलना करायला लागले तेंव्हा दोघं ही आपापल्या अवतारात किती महान होते ह्याची खात्री पटत गेली.. माझी आजी पण गोष्टी इतक्या रंगवून सांगायची ना की बास आत्ता चे हे मालिका वाले पण तिच्या पुढे पाणी कमच म्हणावे लागतील🤪 कृष्ण जन्म रंगवून सांगताना वसुदेवा ने टोपलीत लपेटून ठेवलेलं ते देखणं बाळ अगदी डोळ्यासमोर उभं राहायचं.. कारावासातून बाहेर निघताना झोपी गेलेले पहारेकरी,  नदीला आलेला पूर,  देवकीचा आक्रोश सगळं सगळं आपण जगतो आहोत असा भास व्हायचा.. तेंव्हा पासून हा बालगोपाल मनात घर करून बसला तो कायमचा.. नंद यशोदा घरी वाढताना त्याच्या लिला.. त्याच्या वर आक्रमण करणारे ते क्रूर राक्षस.. ती पुतना मावशी.. आपल्या वरच चाल करून येतायत की काय इतकं ते कृष्ममय जीवन मी जगते आहे असं वाटायचं.. पायाला मुसळ बांधून घर भर फिरणारा लड्डू गोपाळ तर जास्तच लाडका वाटतो.. नटखट कान्हाच्या खोड्या त्याच्या बाल लिला,  त्याच लोण्यावर ताव मारणं.. लोण्यानी माखलेला तो निरागस चेहरा सगळच कस लोभसवाण वाटतं.. सवंगड्यांना सोबत घेऊन त्याने काढलेल्या खोड्या,  गोवर्धन पर्वत उचलून गोकुळ वासियांना दिलेल मायेचं छत,  इंद्राचा चुर केलेला अहंकार हे सगळच कौतुकास्पद वाटतं.. कृष्ण कधी देव आहे म्हणून त्याची भिती नाही वाटतं तो जवळचा मित्र बनून नेहमी जास्तच जवळचा वाटतो.. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तो आपला सखा,  सोबत,  प्रेरणास्थान,  आदर्श पुत्र,  स्त्रियांचा कैवारी,  दुष्टांचा वैरी आणि राधेचा प्रियकर.. ही त्याची सगळीच रूप आपण जगतो आहोत ह्याचा सतत भास होत राहतो ते आपण कृष्ण मय आहोत म्हणूनच.. कृष्ण फार आपला सामान्य माणसा सारखा अगदी आपला वाटतो.. जेवढा तो नंद यशोदेच्या लाडाकोडात वाढला तेवढाच तो संदीपणी च्या आश्रमात सुदामा सोबत सामान्य रोजची कर्तव्य करताना पण तेवढाच प्रभावी वाटतो.. वयाच्या प्रत्येक टप्प्यात कृष्णाने जगण्यासाठी उत्तमोत्तम उदाहरण घालून दिलेली आहेत.. कृष्णा वरचं प्रेम त्याची भक्ती जगण्याची एक वेगळीच प्रेरणा देऊन जाते.. त्याच्या त्यागातलं त्याच निस्सीम प्रेम त्यांचं समर्पण आजच्या पिढीने अनुकरण करण फार गरजेचं वाटतं.. आज जेंव्हा छोट्या छोट्या संकटाना घाबरून मुलं आत्महत्या करताना दिसतात तेंव्हा कृष्ण निती महत्वाची वाटते… कृष्णाची संकटावर मात करण्याची जिद्द जगण्याची नवी ऊर्जा देऊन जातात.. फक्त ती समजून घेण्याची गरज आहे.. आणि मैत्रिणींनो खर सांगू का आपण संकटात आहोत,  आपल्यावर अत्याचार होतायत आपल्याला सोडवायला कृष्ण येईल ह्याची वाट बघण्यापेक्षा स्वतः कृष्ण बनून त्या संकटावर मात करणं म्हणजे कृष्ण भक्ती.. तो तर आहेच आपल्या मनात आपल्या मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात आपण केलेल्या प्रत्येक चांगल्या कृत्यात,  आपल्या प्रेमात,  आपल्या त्यागात त्याची साथ असतेच ती फक्त आपल्याला ओळखता आली पाहिजे इतकचं.. कधी हा कृष्ण आपला बाबा बनून येतो तर कधी हा मित्र,  भाऊ,  सखा तर कधी पतीच्या रुपात फक्त त्या कृष्णाला आपल्याला ओळखता आलं पाहिजे.. म्हणूनच वाटतं कृष्ण येईल मदत करेल ह्याची वाट पाहत राहण्या पेक्षा आपल्या प्रयत्नांनी ते संकट दूर करण्याचे प्रयत्न करून स्वतः कृष्ण बनता आलं पाहिजे..

जगेन मी कृष्ण बनुनी

राधेचा सखा होऊन

गोपिकांचा बालगोपाल..

यशोधेचा नंदलाल..

होऊनी मित्र सुदाम्याचा..

आधार बनू आपल्या सख्याचा..

रुक्मिणी चा होऊनी नाथ..

सोबत करू देऊ निरंतर साथ..

बनुनी प्रद्युमनाचा पिता..

मार्ग दाखवू सर्वथा..

पांडवांचा होऊनी कैवारी..

दूर करू कौरवी दूर विचारी..

कुण्या द्रौपदीचा होऊनी सखा..

देऊ विश्वास रक्षणाचा..

अर्जुनाचा होऊनी सारथी..

घेऊनी सुदर्शन हाती..

आपणच होऊन आपले मुरारी

मारून टाकू सारे दूर विचारी…

होऊनी कृष्णमय..

मिरवू आनंद निरामय…

 

टीप – सोनी लीव्ह वरती लालो नावाचा सिनेमा पाहिला आणि कृष्णप्रेमाने मन भरून आल.. कृष्ण प्रेमीनी आवर्जून बघावा असा मूव्ही आहे नक्की बघा…)

© अलका ओमप्रकाश माळी

मोब. 8149121976

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भीष्म विषाद… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ? 

☆ भीष्म विषाद… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

पडून पंजरी पार्थ शरांच्या प्रतीक्षा करी मृत्यूची

आंस लागली उत्तरायणी नसे वासना जन्माची ||ध्रु||

पांचालीच्या अब्रूसाठी फुरफुरले ना हे बाहू

किती विनविले चरणांपाशी किती काय मी साहू

एक वस्त्र ना पुरे पडावे होळी झाली लज्जेची

लाज राखली कृष्ण बांधवे वाण नसे मग चीरांची ||||

 *

हाच काय पुरुषार्थ आमुचा शिखंडी ही वाटतो भला

पुरुष नसोनी न्यायासाठी धाक दावितो किती मला

शौर्य आमुचे क्लैब्य जाहले शस्त्रे ही गाळायची

धनंजयाचे बाण झेलुनी काया मग अर्पायाची ||||

 *

पश्चात्ताप हा जाळुनि आत्म्याला नी कायेला

देहासाठी शरपंजर परी ना आधार शीराला

मस्तकाचे क्लेश जाणुनी तीर धावले पार्थाचे

परतफेड ही धनंजयाची उपकारे अन्यायाची ||||

कवी : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ पानगळ… (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ क्षण सृजनाचा ☆ पानगळ… (कविता) ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

कधी नव्हे तो निवांतपणा मिळाला होता. उकाडा फार जाणवायला लागला होता. बाल्कनीत जरा हवा येत असेल म्हणून तिथे खुर्ची टाकून बसले होते. मग नजर सहजच इकडेतिकडे भिरभिरायला लागली, आणि दररोजच समोर असणाऱ्या कित्येक गोष्टी नव्यानेच पहातेय असं वाटायला लागलं……

… त्यातलेच एक हे घरासमोरील मोठ्ठे पिंपळाचे झाड …’ आजूबाजूचं सगळंच इतकं बदललंय.. पण हे झाड मात्र गेली कित्येक वर्षं आहे तसंच आहे.. ते कसं काय ?‘…

… इतक्यात वाऱ्याची एक सुखद झुळूक आली.. अंग मोहरून उठलं.. समोरचं ते झाडही सळसळलं …. आणि.. आणि बघता बघता त्याची कितीतरी पानं अल्लाद झाडावरून खाली पडली.. मला कसंतरीच झालं.. एकदम जाणवलं की ही तर पानगळ सुरु झालीये.. म्हणजे आता शिशिर संपून वसंत ऋतू येणार तर … आणि मग त्या भिरभिरणाऱ्या पानांबरोबर मनही भिरभिरायला लागलं – – –

खरंच.. काय गंमत आहे ना.. कोणी न सांगताच या झाडांना कळतंय की वर्षभर ज्याची वाट पाहात होतो तो आपला प्रिय सखा वसंतराजा आता येणार म्हणून.. आणि झाडं आता त्याच्या स्वागताची जणू तयारी करताहेत.. मनात आलं.. ही झटकून टाकलेली पानं म्हणजे जणू इतके दिवस नावडत्या सोबत्याबरोबर राहावे लागल्याने मनाला आलेली मरगळच अशी क्षणार्धात झटकून टाकली असेल का ? पण मग ज्यांच्यामुळे झाडांना शोभा अशी ती पानं एकदम अशी निरुपयोगी समजून दूर फेकून देतांना काहीच दु:ख नसेल का झालं झाडाला ?……

…. असं नसेल पण.. इतकं कठोर नि कृतघ्न व्हायला झाडं म्हणजे माणसं थोडीच आहेत ? मग हे कदाचित फक्त स्थित्यंतर असेल …. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे.. किंवा झाडाचा पुनर्जन्म ??

आत्मा तोच आणि वरचा साज मात्र नवा.. कोवळ्या लुसलुशीत तजेलदार पानांचा !!.. असंच असावं….

.. म्हणूनच तर या खाली पडलेल्या पानांच्या चेहेऱ्यावर कुठे दु:ख दिसत नाहीये ! कशी आनंदाने भिरभिरताहेत ! त्यांची जागा घेऊन आता झाडावर अभिमानाने डोलणाऱ्या नव्या पानांकडेही किती कौतुकाने पहाताहेत ! केवढं मोठं मन हे.. आणि केवढा त्याग.. आपल्या जीवावर ज्याचा रुबाब, त्याला संजीवनी मिळावी म्हणून किती सहज स्वतःचाच त्याग करताहेत ही पानं ! ही पानगळ !…. का लोक खेदाने पहातात तिच्याकडे ? तिचा मोठेपणा का लक्षातच येत नाही कुणाच्या ?.. प्रत्येक गोष्टीत फक्त ‘उणं’ तेवढंच पाहणाऱ्या आम्हा माणसांना तिच्याकडून काहीच संदेश घ्यावासा वाटत नाही ते का ?….

…. निदान आयुष्याला मरगळ आणणाऱ्या नकारात्मक संवेदना झटकून टाकून सद्भावाची अन प्रेमाची नवी पालवी फुलवावी आणि भविष्य आनंददायी ‘वसंत’ व्हावं असा प्रयत्न करण्यासाठी या पिंपळवृक्षाप्रमाणे सज्ज व्हावं असं कधी वाटेल आम्हाला ?

नव्या रक्ताला.. नव्या विचारांना.. नव्या जाणिवांना संधी देण्यासाठी जुन्यांनी अट्टाहास सोडून समजूतदारपणा दाखवायलाच हवा हे या पानगळीकडून शिकेल का कधी आमचा समाज ? … या समाजवृक्षाला नवजीवन मिळावं म्हणून हातात हात घालून एकत्रपणे काही करू शकू का आम्ही.. या पानगळीसारखं ???

… सहजपणे ‘कचरा’ समजल्या जाणाऱ्या या दुर्लक्षित पानगळीतून कितीतरी शिकण्यासारखं आहे हाच एक विचार मग कितीतरी वेळ माझ्या मनात टपटपत राहिला … त्या पानगळीसारखाच … आणि नकळत तसेच भिरभिरत कागदावर शब्द उतरले… 

☆ पानगळ… ☆

दिवसामागून दिवस चालती.. ऋतूमागूनी ऋतू धावती

विसावा नसे मुळी कसा तो.. निसर्गचक्रा सततची गती – –

*

वसंत प्रिय तो येईल आता.. कल्पनेत या वृक्ष थरारे

स्वागतास अति आतुर झाला.. आनंदे अन मनही भरारे – –

*

येणार नक्की तो प्रियतम म्हणुनी.. सळसळ उठली पानोपानी

स्वतःस आता किती सजवावे.. रोमरोम हे जाई हरखुनि – –

*

मरगळ मनीची झटकत असता.. विखरून पाने किती ओघळली

सालभरी त्यांनीच सजवले.. जुनी जणू ती आता झाली – –

*

जुने जाऊ द्या मरणालागी.. म्हणतच येती नवी पाने ती

परी तयांना आज कळेना.. उद्याची त्यांची हीच स्थिती – –

*

नवेपणा मिरविण्या तयांचा.. जुन्यांनी जणू नेपथ्य मांडले

आपली जागा त्यांना देण्या.. मन मोठे हे किती हो केले – –

*

जाण्यासाठीच येती सगळे.. जगरीती ही त्यांना ज्ञात

सवेच आलो.. सवे चाललो.. म्हणतच घेती हातात हात – –

*

दु:ख मुळी ना परतण्यात त्या.. कर्मयोग त्यांनी स्विकारला

सार्थच झाले जीवन म्हणुनी.. आनंदे जीवही थरारला – –

*

पायघड्या आपल्याच घातल्या.. सफल जणू हे जीवन झाले

जीवनदायी वसंतऋतूच्या.. पायी जीव समर्पित झाले – –

*

चैतन्याची ज्योत पालवून.. स्वतः मालवे कृतार्थ जीवन

पानगळीला हिणवू नका हो.. मनास मिळू द्या तिचे प्रबोधन – –

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १५ आणि १६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक १५ आणि १६ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक पंधरावा – – 

मना पाहता सत्य हे मृत्यूभूमी |

जिता बोलती सर्वही जीव मी मी`

 चिरंजीव हे सर्वही मानिताती |

अकस्मात सांडूनिया सर्व जाती १५|

अर्थ:

आपल्या भोवताली दिसणारे सुंदर जग म्हणजे मृत्यूभूमी आहे ही सत्य गोष्ट आहे. असे असले तरी माणूस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अहंकारामुळे मी मी करीत असतो. आपण अमर आहोत अशीच सर्वांची भावना असते. परंतु एक दिवस अचानक हे सगळेच सोडून जावे लागते.

आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला महाथोर ते मृत्यूपंथेची गेले असे सांगतात. या श्लोकात आपण ज्या पृथ्वीवर म्हणजेच इहलोकांत राहतो तो इहलोक किंवा ही पृथ्वी मृत्यूभूमी कशी आहे हे समजावून सांगतात. हे जग नित्य बदलते आहे किंबहुना बदल हाच या जगाचा स्थायिभाव आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीनही अवस्था पृथ्वीवर आपल्याला बघायला मिळतात. भासमान असणाऱ्या या दृश्य जगात प्रत्येक गोष्ट आपल्याला उत्पत्ती, स्थिती आणि लय या अवस्थातून जाताना दिसते. माणसाला देखील याच अवस्थांमधून जावे लागते. तरीसुद्धा प्रत्येक माणूस स्वतःला चिरंजीव समजतो आणि आपण केलेल्याचा अहंकार मिरवत असतो. हा अहंकार भल्याभल्यांचा घात करतो. ज्यांना साधना मार्गावर चालायचे आहे, त्यांना तर अहंकार विषाप्रमाणे वर्ज्य आहे. संत, सद्गुरू किंवा सद्ग्रंथ यांच्यामध्ये अहंकार दूर करण्याचे सामर्थ्य असते. म्हणून साधकाने त्यांचा आश्रय घ्यावा.

माणूस आयुष्यभर सुखाच्या मागे लागून पैसा कमावतो. घरदार, मुलेबाळे सगळे नाती निर्माण होतात. परंतु या सगळ्या गोष्टी इथेच राहतात. माणूस गेला की पैसा, धन, संपत्ती जागच्या जागीच राहते आणि इतरांची मालमत्ता होते. पत्नी त्याला दारापर्यंत पोहोचविण्यास येते, समाजातील लोक त्याला स्मशानापर्यंत पोहोचवतात. मात्र अगदी अंगावरचा कपडा देखील सोबत येत नाही. सोबत जाते ते फक्त आपले कर्म. परंतु तरीही माणसाचा ताठा किंवा गुर्मी शेवटपर्यंत कायम असते. मी एवढा पैसा कमावला, मी एवढे वैभव मिळवले, मला एवढे यश मिळाले, हे सगळे माझ्या कर्तृत्वामुळे ! माझी मुले, माझी बायको असे सगळे तो मी मी करत असतो.

काही लोक गैरमार्गाने अमाप संपत्ती कमावतात परंतु अंत्यसमयी त्यातील काहीही कामी येत नाही. करोडोंची संपत्ती असते परंतु एखाद्या दुर्धर आजाराने दवाखान्यात दाखल व्हावे लागले की पैसा सुद्धा त्याला बरे करू शकत नाही. आयुष्य वाढवून मिळत नाही की गेलेले क्षण परत येत नाहीत. हे सगळे सोडून कधीही अचानक जावे लागते. ‘नाही घडीचा भरवसा, कोण काळ येईल कैसा‘ हेच खरे. समर्थ म्हणतात

घटका गेली, पळे गेली, तास वाजे ठणाणा,

आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना”

प्रत्येक क्षण मृत्यूच्या दिशेने जात असताना, संसाराच्या मायेत न अडकता ईश्वराचे (रामाचे) नामस्मरण करावे, कारण तोच कायमचा आधार आहे. म्हणून जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत आपण आपला प्रत्येक क्षण सार्थकी लावला पाहिजे आणि परमेश्वर प्राप्तीच्या दिशेने पाऊल टाकले पाहिजे. तेच मानवी जीवनाचे अंतिम ध्येय आहे.

स्वसंवाद :

  • माझ्या आयुष्यात मी हे केले किंवा हे सगळे माझ्यामुळे आहे असा अहंकार बाळगतो का ?
  • पैसा, पद, प्रतिष्ठा या गोष्टी कायमच्या नाहीत हे मला खरोखर पटते का?
  • माझ्या आयुष्यातील सत्कर्मेच माझ्यासोबत येतील यावर माझा विश्वास आहे का ? ( क्रमशः )

– – – 

श्लोक सोळावा – – 

मरे एक त्याचा दुजा शोक वाहे। 

अकस्मात तोही पुढे जात आहे॥ 

पुरेना जनीं लोभ रे क्षोभ त्याते। 

म्हणोनी जनीं मागुता जन्म घेते॥१६॥

अर्थ : आपली प्रिय किंवा जिव्हाळ्याची व्यक्ती गेली, मरण पावली म्हणजे दुःख होणे स्वाभाविक आहे. परंतु अशा व्यक्तीच्या निधनाचे दुःख करीत बसणारा देखील त्याच रांगेत उभा असतो आणि अकस्मात त्याला देखील हे जग सोडून जावे लागते. शोक हा लोभ किंवा मोहापोटी असतो. त्यातून क्षोभ म्हणजे नाशालाच जन्म मिळतो म्हणून माणूस पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो.

आधीच्या श्लोकात समर्थ आपल्याला काळ हा आपल्या पाठीशी लागलेला आहे हे अटळ सत्य सांगतात. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे जातस्य हि ध्रुव मृत्यू. जो जन्मला त्याला मृत्यू निश्चित आहे. या श्लोकात ते मृत्यूबद्दलच अधिक सांगून आपल्याला जागृत करण्याचा प्रयत्न करतात. आपली प्रिय व्यक्ती मरण पावली म्हणजे दुःख होणे स्वाभाविक आहे. आपण आपल्या प्रिय व्यक्तीच्या दुःखाचा शोक करत बसतो परंतु हा शोक लोभ किंवा मोहाच्या पोटी असतो असेच समर्थांना सांगायचे आहे. कारण त्यातून क्षोभ निर्माण होतो आणि हा क्षोभ सर्वनाशाला कारणीभूत ठरतो.

मृत्यू पावलेल्या व्यक्तीबद्दल दुःख करीत बसताना आपल्यालाही एक दिवस त्याच वाटेने जायचे आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मृत्यूची जाणीव आपल्याला कायमस्वरूपी असली पाहिजे. म्हणजे आज माझी प्रिय व्यक्ती मला सोडून गेली परंतु उद्या मला देखील त्याच मार्गाने जायचे आहे. हे लक्षात घेतले तर आपोआपच जगण्याची आसक्ती आणि इहलोकीचा लोभ कमी होतो. असे झाले म्हणजे व्यक्ती आपल्या कर्तव्यापासून च्युत होत नाही.

उपकार या हिंदी चित्रपटात अभिनेता प्राणच्या तोंडी जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं एक फार सुंदर गाणं आहे. त्यात कवी म्हणतो,” कस्मे वादे प्यार वफा सब बाते है, बातों का क्या ? कोई किसी का नही है, झूठे नाते है नातोंका का क्या ?”

गाडगे बाबा कीर्तन करीत असताना कोणीतरी त्यांना त्यांचा एकुलता एक मुलगा गोविंदा गेल्याची बातमी सांगितली. तेव्हा ते म्हणाले

किती मेले कोट्यानुकोटी

काय रडू एकासाठी ?

लोकमान्य टिळक केसरीचा अग्रलेख लिहित असताना त्यांना देखील आपला मुलगा वारल्याची बातमी कळाली. परंतु त्यांनी आपले दुःख बाजूला ठेवून अग्रलेख पूर्ण केला आणि दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणेच केसरीचा अंक निघाला. ही सगळी मंडळी महान असली तरी त्यांना दुःख झाले नसेल का ? निश्चितच झाले असणार. परंतु त्याचे रूपांतर त्यांनी शोकामध्ये होऊ दिले नाही आणि आपल्या कर्तव्य मार्गावर ते अग्रेसर राहिले. कारण त्यांना देखील पुढे आपणही त्याच मार्गाने कधीतरी जाणार आहोत याची जाणीव होती.

समर्थ असे सांगतात की अति शोक हा मोहातून निर्माण होतो. मोह म्हणजेच लोभ किंवा वासना. असे षडरिपूंचे मायाजाल आपल्याला जगण्यात किंवा ज्या अनंत अशा राघवाच्या मार्गावर आपल्याला चालायचे आहे त्यापासून परावृत्त करते. माणसाने त्यातून बाहेर पडले पाहिजे.

इच्छेतून वासना निर्माण होतात. वासनेतून काम किंवा षडरिपू निर्माण होतात. त्यात आपण अडकलो की जन्ममरणाच्या चक्रातून आपली सुटका नाही. आपण पुन्हा पुन्हा जन्म घेत राहतो आणि मृत्यू पावत राहतो. माणसाचे अंतिम ध्येय मोक्ष हेच आहे. म्हणूनच मरणाचा अति शोक न करता आपल्यालाही एक दिवस त्याच मार्गाने जायचे आहे हे लक्षात ठेवून आपले कर्तव्य करीत राहणे महत्त्वाचे आहे.

आपल्या संस्कृतीत जे चार आश्रम सांगितले आहेत, त्यातील वानप्रस्थाश्रमाची कल्पना फार सुंदर आहे. ती यासाठी फार उपयोगी पडते. वानप्रस्थाश्रमात संसारातील लक्ष हळूहळू काढून घ्यायचे असते. आजच्या काळात प्राचीन काळाप्रमाणे वानप्रस्थाश्रम शक्य नाही. परंतु काही ठराविक वयानंतर मुलांच्या बरोबर संसारात राहताना आपली आसक्ती हळूहळू कमी करायला हवी. ही आसक्ती जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत मुलांच्या संसारात अप्रत्यक्षपणे आपली ढवळाढवळ सुरूच राहते आणि त्याचे प्रमाण अति वाढले म्हणजे मुलांना देखील आपण नकोसे होतो. ही आसक्ती सोडता आली तर अंतकाळी जो मोह किंवा लोभ शिल्लक राहतो, तो राहणार नाही आणि त्यामुळे जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका होऊ शकेल.

स्वसंवाद : 

  • माझ्या प्रिय व्यक्तींबद्दल असलेले माझे प्रेम हे आसक्तीत तर बदलत नाही ना?
  • मृत्यू अटळ आहे ही जाणीव मी खरंच मनापासून स्वीकारली आहे का?
  • दुःखाच्या प्रसंगी मी खचून जातो की कर्तव्य मार्गावर स्थिर राहण्याचा प्रयत्न करतो?
  • संसारातील मोह आणि लोभ कमी करण्यासाठी मी काही प्रयत्न करतो का?
  • माझ्या आयुष्याचे अंतिम ध्येय केवळ संसारापुरते मर्यादित आहे की आत्मोन्नतीकडेही माझे लक्ष आहे?

– क्रमशः श्लोक १५ आणि १६.  

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बाई ग… लेखिका : सुचरिता ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ बाई ग… लेखिका : सुचरिता ☆ प्रस्तुती – स्वाती मंत्री ☆

जो दिवस साजरा करण्याची मुळात वेळच येता कामा नये

ज्यासाठी अभिनंदन, शुभेच्छा, कार्यक्रम, विकृत विनोद,  सण-समारंभ, भाषणं, सत्कार, व्याख्यान इत्यादी सोहळ्याची गरजच उरता नये

मनातून नष्ट न होणाऱ्या असमानतेच्या एकदिवसीय टोचणीदिनाचं अस्तित्वच असता नये

या तात्पुरत्या शिराळशेठी दिवसाचं काय करायचं, हे नुमजून हळदीकुंकू गजरा-कजरा,साडी,दागिने वगैरे करणाऱ्या स्त्रियांची कीव करावी लागू नये

ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्या अंधाऱ्या कपारीपर्यंत पोचताना स्वातंत्रसूर्याची वेळ संपून अवेळी संध्याकाळ होऊ नये

पन्नास टक्यांतील काही टक्क्यांना काही प्रमाणात जोखडातून मुक्तता मिळाली म्हणजे घोडं गंगेत न्हालं असं ठाम विधान प्रचलित होऊ नये

थेट गर्भापासून तिरडीपर्यंत सर्व स्थितीत विकल्या जाणाऱ्या देहांचं बाजारअस्तित्व अमान्य करण्याचं झापडबंद सुखासीन आंधळेपण तुला येऊ नये

एक दिवस वगळता उरलेले तीनशे चौसष्ठ दिवस ज्यांचे आहेत त्यातले शंभर टक्के सगळेजण खलनायकच असतात, असा उलटा एकेरी भ्रम उराशी धरण्याचा मंदपणा तुझ्यात  असू नये

म्हणून

तू

लवकरात

लवकर

शहाणी

हो

त्यासाठी

विचार

करायला

सुरुवात

कर

हाच

एक

उपाय

आहे

लेखिका:सुचरिता

प्रस्तुती: स्वाती मंत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ मागे वळून पहाता ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? मागे वळून पहाता?  सुश्री नीलांबरी शिर्के 

याच स्टोव्हने सुरूवात

झाली होती संसाराची

राॅकेलचा डबा घेऊनी

धडपड ते मिळवायाची !

*

स्टोव्हच्या त्या फरफरीचे

स्वयंपाकाचे होते गाणे 

नरसाळ्याच्या सहाय्याने

स्टोव्हला जीवरस देणे !!

*

मागे वळून पाहत असता

आठवणीचे मोहोळ भेटे

मोहोळातील कप्प्यामध्ये

गोड स्मृतीचा मकरंद भेटे !!

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares