सुश्री अरुणा मुल्हेरकर
विविधा
☆ मला समजलेली संत तुकारामांची गाथा… भाग – १ ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
१) भक्ती
सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची
ओवी ज्ञानेशाची तैसी आर्या मयूर पंतांची
हा श्लोक लहानपणापासून आमच्या वडिलांच्या मुखातून आम्ही बहिणी ऐकत आलो आहोत.
पैकी अभंग आणि ओवी हे काव्यरचनेचे दोन प्रकार म्हणजे मराठी वाङ्मयाच्या पाठीचा कणा आहे. मराठी मनाला अभंगाचे वेड आहे आणि ओवीचा लळा आहे. ज्याला ओवी आणि अभंग रचना येते त्याच्यावर परमेश्वराची कृपा असलीच पाहिजे अशी मराठी मनाची धारणा आहे.
ज्ञानदेवे रचिला पाया या अभंगात तुका झालासे कळस असे शब्दांकन करून कवीने असे दर्शविले आहे की संत तुकारामांची अभंग रचना सर्वोत्तम आहे. त्यामुळे भागवत संप्रदायाचा संपूर्ण विकास झाला आहे.
या गाथेतून तुकाराम महाराजांचे स्वतःच्या खडतर ऐहिक आणि दिव्य परमार्थिक जीवनाविषयी त्यांची कहाणी ते स्वतःच सांगत आहेत याचा प्रत्यय येतो.
ऐहिक जीवन जगत असताना गाथेतील पहिल्याच अभंगात ते म्हणतात,
समचरण दृष्टी। विटेवरी साजिरी।।
तेथे माझी हरि।वृत्ती राहो॥१॥
*
आणिक नलगे।मायिक पदार्थ।
तेथे माझे आर्त।नको देवा॥२॥
*
ब्रह्मादिक पदे। दुःखाची शिराणी।
तेथे दुश्चित्त झणी ।जडो देसी॥३॥
तुका म्हणे त्याचे ।कळले आम्हा वर्म।
जे जे कर्म धर्म ।नाशवंत॥४॥
*
अर्थात~
१) हे हरी, तुझी सुंदर मुर्ती विटेवर उभी आहे. त्या मुर्तीचे चरणकमल व सर्वांभुतीची दृष्टी सम आहे. अशा तुझ्या ठिकाणी माझी मनोवृत्ती स्थिर राहो.
२) हे देवा, मला आणखी कोणत्याही माया पाशात अडकविणारी गोष्ट नको. त्याविषयी माझ्या मनात तृष्णाच राहू नये.
३) ब्रह्मदेव इत्यादींची मोठी पदे म्हणजे दुःखाचीच वतनदारी आहे. माझे चित्त अशा ठिकाणी लागूच नये.
या तिसऱ्या अभंगात तुकारामाने विठ्ठलाला झणी म्हटले आहे. (आपल्या अत्यंत प्रिय अशा मित्र-मैत्रिणीला किंवा सख्या~ साजणाला झणी, झडकरी असे संबोधण्याची प्रथा आहे. या झणी शब्दावरून तुकारामांच्या मनात पांडुरंगा विषयी किती प्रेम भाव आहे हे दिसून येते.)
४) अशा पदांची चुकून सुद्धा इच्छा माझ्या मनात उत्पन्न होऊ नये. आम्हाला या धर्माकर्माचे वर्म कळले आहे, हे तर सगळे नाशिवंतच आहे.
अत्यंत रसाळ वाणीने या अभंगात तुकाराम महाराज गीतेतील फार मोठे तत्व सांगून जातात. गाथा वाचत असताना क्षणोक्षणी पांडुरंगाची भक्ती हा एकच मुक्तीचा मार्ग आहे याची सामान्य संसारी माणसाला ते जाणीव करून देतात. अति सामान्य लोकांना शास्त्र कळत नाही, परंतु भक्ती करणे सहज कसे शक्य आहे हेच वेळोवेळी त्यांनी आपल्या अभंगांतून समजावले आहे.
मनुष्य व देव यांच्यातील द्वैत भाव संपूर्णपणे नाहीसा करून अनन्य भक्ती करणे हाच या गाथेचा विषय आहे. ते म्हणतात,
आयुष्य वेचे फुकासाठी।।
शाश्वत भक्ती हीच भवसागर तरुन जाण्यासाठी महाशक्ती आहे.
मज सोडवी दातारा।
कर्मा पासून दुस्तरा।।
करीसी अंगीकारा।।
तरी काय माझा भाग।।
जिवीच्या जीवना।
तुका म्हणे नारायणा||
संसार तापाने तुकाराम महाराज पोळले आहेत, म्हणून ते पांडुरंगाला साद घालत आहेत.
संसाराच्या तापे तापलो मी देवा।
करिता या सेवा कुटुंबाची।।
म्हणवुनी तुझे आठवले पाय।
ये बा माझे माय पांडुरंगे।
माय, बाप, बंधू, सखा हे सर्व एका पांडुरंगातच आहेत म्हणून ते म्हणतात,
जेणे घडे नारायणी अंतराय
होतं बाप माय वर्जावी ती।।
देवासाठी जवळच्या नातलगांनाही सोडावे लागले तरी हरकत नाही. प्रल्हादाने आपल्या पित्याचा, बिभीषणाने आपल्या वडील बंधूंचा आणि भरताने आईचा व राज्याचा त्याग केला. एक हरिचरण सर्वधर्म आहेत, त्या चरणांवाचून इतर सर्व उपाय अपायकारक व दुःखमूलकच आहेत.
क्रमशः… १
© सुश्री अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

















