मराठी साहित्य – विविधा ☆ खीर बाई खीर…भाग 2 ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

?  विविधा  ?

☆ खीर बाई खीर…भाग 2 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

(दिग्दर्शकाना आपल्या नाटकाच्या यशाची खात्री पटे.भाग 2 पुढे चालू)

मग या नायिकेला लाडीगोडी लावण्यासाठी तिच्याच वजनाइतकी चिरलेल्या पिवळ्याधमक गुळाची साडी नेसवली जाई. त्यामुळे ती नायिका आपला पूर्वीचा रंग झटकून हा पिवळा रंग अंगभर लपेटून घेई. त्या पिवळ्या साडीला खोवून घेतलेल्या पांढऱ्याशुभ्र ओल्या नारळाच्या किसाची मध्ये मध्ये नक्षी काढली जात असे. ही कलाकुसर मात्र सढळ हाताने करत असत. असा हा मेकअप पूर्ण झाल्यावर आता या नायिकेला प्रत्यक्ष नाटकाचे वेध लागलेले असत. मग एका गोल, खिरीच्या साजेशा रंगाला मॅच होईल अशा रंगाच्या डिशच्या रंगमंचावर नायिका अवतरत असे.   आता नायकाच्या एंट्रीची वेळ जवळ आलेली असते.  इतका वेळ सर्व दिव्यातून बाहेर पडताना आपल्या या नायिकेला अग्नीसरांनी योग्य वेळी साथ  दिलेली असते. पण ते फक्त पाहुणे कलाकार असल्याने या प्रयोगातून वेळीच exit घेतात. त्यानंतरच नायकाचे रंगमंचावर आगमन अपेक्षित असते. अग्नीसरांच्या उपस्थितीतच जर चुकून या नायकाचे आगमन झालेच तर मोठा अनर्थ ओढवतो. कारण आपल्या तापट स्वभावाने अग्नीसर पाहुणे कलाकार न राहता खलनायकाच्या भूमिकेत शिरुन गुळाच्या मदतीने या दुग्धरुपी नायकाला बदसूरत करण्याची शक्यता असते आणि पूर्ण नाटकाचा प्रयोगसुद्धा फसू शकतो. म्हणून मग थोडा वेळ ही नायिका मंद वाऱ्याच्या सान्निध्यात आपले श्रम विसरुन थंड होत आतुरतेने नायकाची वाट पाहू लागते. हीच वेळ नायकाच्या आगमनाची असते. आपल्या शुभ्रधवल वर्णाने हा दूधनायक सळसळत रंगमंचावर प्रवेश करतो. आपल्या सहजसुंदर  अभिनयाने या नाटकात रंग भरु लागतो. जोडीला याने  नायिकेला भेट म्हणून तुपाची धार पण आणलेली असते. त्याच्या सानिध्याने खिरीचे नाटक अधिकच झळकू लागते. शिवाय साथीला त्याची नेहमीची, नेहमीच छोटीशी पण महत्वाची भूमिका निभावणारी वेलचीताई या नाटकाला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवते. आता हा सर्व  कलाकारांचा एकजीव झालेला संच नाटकाच्या शेवटच्या अंकासाठी सिद्ध होतो. आतुरतेने क्लायमॅक्स ची वाट पाहणारे आम्ही प्रेक्षक ताबडतोब आमच्या रसनारुपी चक्षूनी त्या रंगमंचीय रंगतदार खिरीचा आस्वाद घेत असू. आणि आमच्या चेहऱ्यावरील तृप्तीने आपल्या कलाकृतीला योग्य दाद मिळाल्याचे त्या दोन दिग्दर्शिकाना समजत असे. मग आपल्या या स्त्रीपार्ट करणाऱ्या नायिकेकडे कौतुकाने पाहताना त्या  कृतकृत्य होऊन जात.

तळटीप:-

  • आवडत असल्यास या नाटकात काजूचे तुकडे, बदाम, बेदाणे याना छोट्या भूमिका द्यायला हरकत नाही.
  • खोबऱ्याच्या किस वापरण्याऐवजी सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करुन त्याची नक्षी पिवळ्या साडीला काढली तरी चालेल.
  • महत्वाचे म्हणजे खपली गव्हाच्या अनुपस्थितीत घरातले रोजचे गहू किंवा त्याचा बाजारात मिळणारा  तयार दलिया कधीतरी नायिकेची भूमिका उत्तम पार पाडू शकतात.
  • सध्याच्या काळात उखळ सहज उपलब्ध नसल्यामुळे त्याचे काम मिक्सर करु शकतो. फक्त गव्हाला हलकेच पाण्याने ओलसर करुन, मिक्सरमध्ये हलके हलके फिरवावे लागते.

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ सर्वपित्री ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर

? मनमंजुषेतून ?

☆ सर्वपित्री ☆ संग्रहिका – सुश्री आनंदी केळकर ☆ 

आज सर्वपित्री अमावस्या. तिच्या घरचा म्हाळ . रिकाम्या भिंतीवर नजर खिळवून ती नुसतीच बसून होती . नेमकं आपल्याला काय होतंय हे तिचं तिलाही कळेना . डोळ्यातील पाणी खाली सांडू नये म्हणून चाललेला कसोशीचा प्रयत्न . 

कधीही न पाहिलेल्या सासू – सासऱ्या बद्दल तिला वाटणाऱ्या आपुलकीची आणि एकटेपणाची कुणीतरी चेष्टा करेल किंवा तिच्या त्या भावनेबद्दल शंका व्यक्त करेल या भीतीनेच ….तिने ही  तगमग कोणाजवळही बोलून दाखवली नाही   

तसं पहायला गेलं तर एकदा …. हो फक्त एकदाच…तिच्या आईजवळ बोलली होती ती हे सगळ.  

“इतरांना सासू सासरे असतात म्हणून अडचण आणि मला नाहीत म्हणून ”  

यानंतर तिच्या आईने तिला जे काही समजावलं . त्यानंतर हा विषय तिने कधीही कोणाजवळ ही काढला नाही . आभाळभर रिकामेपणा साचलेल्या लेकीच्या छपराला तिने कोणत्या शब्दात आसरा दिला हे फक्त त्या माउलीलाच ठाऊक . याच शब्दांच्या शक्तीवर आणि आधारावर सासू सासऱ्याविनाच सासर तिच्या लेकीने आजवर पेललंय . 

खर पहायला गेल तर जीव ओवाळून टाकावा इतका चांगला दीर आणि कधीही कोणाही जवळ तक्रार करू नये इतका गुणी नवरा साथीला होते तिच्या . पण म्हणतात ना ‘ज्याची त्याची दुखणी ज्याची त्यालाच माहित असतात . आणि ती एकट्यानेच सहन करायची असतात…करावी लागतात  ‘

कुणाच्या घरी कधी हळदी कुंकवासाठी ती गेली की कोपऱ्यात नटून बसलेल्या त्या घराच्या सासूबाईकडे बघून तिला अगदी हेवा वाटायचा . हळद कुंकू कुठल्या बोटाने लावावं ? नारळ ओटीत घालताना कसा घालावा ? विड्याच्या पानाचे टोक कोणत्या बाजूस अन देठ कोणत्या बाजूस असावं ? अशा बारीकसारीक गोष्टी हक्काने सांगायला तिच्याही घरी कोणीतरी जेष्ठ व्यक्ती असायला हवी होती अस सारखं वाटायचं . अंगणात एकट्याच खेळणाऱ्या तिच्या बाळकृष्णाला गोष्टी सांगायला , गालावरून हात फिरवत कडकड बोटे मोडायला त्याच्या वाट्याला आजी आजोबा असायला हवे होते हे जाणवायचं  

पण हे वाटण , जाणवण सगळ मनातल्या मनात . ओठांच्या पाकळ्या उघडून आजपर्यंत एकही शब्द बाहेर पडला नाही . तिचा हा संवाद एकटीचाच असायचा . स्वतःपुरता मर्यादित . “ओरडणाऱ्या का असेनात पण मला सासूबाई हव्या होत्या , ज्यांच्या नजरेला चुकून जरी नजर मिळाली तरी भीती वाटावी इतके कडक का असेनात पण मला सासरे हवे होते ” 

कधीतरी तिच्या माहेरवाशिणी मैत्रिणी एकत्र जमायच्या . त्यांच्या रंगलेल्या गप्पा ‘ सासू ‘ या विषयावर येउन नेहमी थांबायच्या . मग त्या एकमेकीना सांगत राहायच्या घराच्या ‘ त्या ‘ दोन व्यक्तींमुळे होणारी अडचण , त्रास , अवघडलेपणा …… आणि बरच काही . हिच्याकडे पाहून कुणीतरी अगदी सहज बोलून जायचं  “बरंय बाई  तुझ. हे असले प्रकार तुझ्याकडे नाहीत ” या वाक्यावर तिच्याकडे खोट्या हसण्याव्यतिरिक्त काहीही उत्तर नसायचं . ज्या भावनांचा कल्लोळ तिच्या मनात उठायचं ते वादळ तिच्या मैत्रिणींना समजणार न्हवत.     

मी ही सहजच केला होता आज तिला फोन . तिच्या पहिल्याच वाक्यात आवाज खोल गेल्याचा जाणवला . गळ्यात दाटलेल्या हुंदक्यामुळे तिला धड बोलताही येईना . “काय झालंय ग ???” न राहवून शेवटी विचारलंच मी . “आज सर्वपित्री ” इतकच बोलली ती यावर . 

तिला काहीही न समजावता मी फोन बंद केला . बाप्पाजवळ हात जोडून उभी राहीले आणि एकचं मागण मागितलं 

“हवं तर सगळ वैभव लुटून ने पण कोणाची जिवाभावाची माणसं नको नेत जाऊ– अशी,  ज्यांची जागा उभ्या आयुष्यात दुसर कुणीही नाही घेऊ शकत . “

मुर्तीतला देव मुका का असतो ?? हे आज कळले मला 🙂 

— अमृता आशिष पेडणेकर

संग्राहिका : सुश्री आनंदी केळकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ जगातला सर्वात श्रीमंत माणूस…!!! ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर

? वाचताना वेचलेले ??‍?

☆ जगातला सर्वात श्रीमंत माणूस…!!! ☆ प्रस्तुती – सुश्री मीनल केळकर ☆ 

जगातल्या सर्वात श्रीमंत बिल् गेट्सना कोणीतरी विचारलं,” ह्या जगात तुमच्यापेक्षा कोण श्रीमंत आहे का…? ”

बिल् गेट्स म्हणाले, ” हो एक व्यक्ती माझ्यापेक्षा श्रीमंत आहे.” 

समोरच्या व्यक्तीनं विचारलं,” कोण…!!! “ 

बिल् गेट्स म्हणाले, ” एकेकाळी मी प्रसिद्ध किंवा श्रीमंत नसताना, मी एकदा न्यूयॉर्क एअरपोर्टवर असताना सकाळी मला एक न्युजपेपर घ्यावासा वाटला म्हणून खिशात हात घातला.  तर खिशात एकही डाॅलर नसल्याचं जाणवलं.  सबब मी तो खरेदी करण्याचा विचार सोडुन दिला…! व माझ्याकडं पैसे नसल्याचं सांगितलं. –समोरच्या त्या पेपर विकणा-या  मुलानं माझ्याकडं बघून तो न्युजपेपर फुकट देण्याचं ठरवलं…!!!

तीन महिन्यानंतर योगायोगानं मी त्याच एअरपोर्टवर उतरलो असता मला पुन्हा न्युजपेपर घेण्याचा मोह झाला.  परंतु त्याहीवेळी माझ्याकडे पैसे नसल्याने मी मोह आवरला–

पण यावेळीही त्याच मुलानं परत मला न्युजपेपर ऑफर केला…!

पण मी नम्रपणे नकार दिला, व सांगितलं मी नाही घेऊ शकत…!!!

यावर त्या मुलानं सांगितलं की “ तुम्ही हा न्यूज पेपर  घ्या.  कारण हा मी तुम्हाला माझ्या फायद्याच्या पैश्यातुन देत आहे. ” त्यानंतर मी तो घेतला…!!!

१९ वर्षानंतर, मी जगातला श्रीमंत माणूस झाल्यानंतर,  मला त्या पेपर विकणा-या मुलाची आठवण झाली—मी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.  तब्बल दीड महिन्याच्या तपासांती मला तो सापडला..!

मी त्याला विचारले, ” तू  मला ओळखतोस का ?” 

तो म्हणाला, ” हो तुम्ही बिल् गेट्स आहात…! “ 

मी म्हटलं, “ तुला आठवतंय का, की कधीकाळी तू मला न्यूजपेपर फ्री दिले होतेस…! “ 

तो म्हणाला, ” हो…दोनदा…!”

मी म्हणालो, ” मला त्याची किंमत अदा करायची आहे. तुला तुझ्या आयुष्यात जी गोष्ट हवी असेल ती मला सांग…! मी तुला हवी ती गोष्ट देऊ शकतो…!!! “ 

यावर तो नम्रपणे म्हणाला, ” सर पण तुम्हाला असं वाटत नाही का की  तुम्ही ती किंमत देऊ शकणार नाही…!”

मी विचारले,” का…??? “ 

तो मुलगा म्हणाला, ” मी जेव्हा तुम्हाला मदत केली तेव्हा मी गरीब होतो आणि आणि तुम्हाला माझ्या होणा-या फायद्यातून मदत करत होतो.  तर तुम्ही मला मदत अशावेळी करत आहात जेव्हा तुम्ही जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात…! म्हणून तुम्ही तुमच्या मदतीची तुलना माझ्या मदतीबरोबर करु शकत नाही…!!! “ 

बिल गेट्सच्या नजरेत तो मुलगा जगातला सर्वात श्रीमंत माणसाहून श्रीमंत आहे,  कारण कोणाची मदत करण्यासाठी त्यानं स्वतः श्रीमंत होण्याची वाट नव्हती बघितली…!!!

श्रीमंती पैश्यांची नसते, तर मनाची असते. कारण कोणाची मदत करण्यासाठी श्रीमंत मन असणं देखील आवश्यक आहे…!!!

संग्राहक – सुश्री मीनल केळकर

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ खीर बाई खीर…भाग 1 ☆ डॉ मेधा फणसळकर

डॉ मेधा फणसळकर

?  विविधा  ?

☆ खीर बाई खीर…भाग 1 ☆ डॉ मेधा फणसळकर ☆ 

माझ्या माहेरी कराडला चैत्रात कृष्णाबाईचा मोठा उत्सव असतो. देवीची पालखी, जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम याची तीन दिवस रेलचेल असते. पण मला कायम उत्सवाचा शेवटचा दिवस आवडत असे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शेवटच्या दिवशी प्रसाद म्हणून ‛गव्हाची खीर’ असायची. आणि घरोघरी गहू गोळा करुन तयार केलेल्या या खिरीला एक प्रकारची अवीट गोडी असायची.  सोहळयातल्या या खिरीला जसा वेगळा स्वाद असायचा तसाच ही खीर आमच्या घरी करायचा पण एक सोहळाच असायचा.

पाचवीत असताना आम्हाला शाळेत एक कविता होती. त्यात एका स्त्रीचे वर्णन करताना म्हटले  होते, “ गोधूम वर्ण तिचा!” आता हा गोधूम वर्ण म्हणजे कसला? असा त्या वयात आम्हाला प्रश्न पडला. पण बाईंनी लगेचच स्पष्टीकरण केले,“मुलींनो, गोधूम म्हणजे गव्हासारखा बरं का!” तेव्हा तो गव्हाळ वर्ण डोक्यात अगदी पक्का बसला. तर अशा या गव्हाची एक गंमत आहे बर का! बिचाऱ्याला पाकशाळेत गेल्यावर  कोणत्याही पाककृतीच्या नाटकात काम करायचे असेल तर अनेकदा ‛स्त्रीपार्ट च’ करायला लागतो. उदा. पुरणपोळी,सांज्याची पोळी, चपाती,गूळपापडी, कुरडई, खीर इ. इ.! क्वचित पुरुषपार्ट पण मिळतो जसे पराठा, लाडू वैगेरे वैगेरे ! पण ते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच. असो.

तर आमच्या घरी  ‘गव्हाची खीर’ करायची तर जय्यत तयारी असे. नाटकात काम करणारे अनेक कसलेले नट असले तरी कोणत्या भूमिकेसाठी कोणता नट योग्य आहे हे जसे दिग्दर्शकाला माहीत असते. तसे आमच्या घरातील आई आणि जवळच राहणारी मामी, या दोन दिग्गज दिग्दर्शकांना खिरीच्या नाटकासाठी ‛खपली गहूच’ लागत. ते दुकानात मिळाले की मामीला लगेच निरोप जात असे. मग दुपारी घरची जेवणे आटोपली की मामी जय्यत तयारीनिशी आमच्या घरी हजर होत असे. कारण नाटक बसवायचे असे ना! मग या दोन दिग्दर्शकांच्या अंगात खीर चढलेली असे.   स्त्रीपार्ट करायचा म्हणजे या गव्हाला भरपूर पूर्वतयारी करावी लागत असे. नाटकात फिट होण्यासाठी सूप आणि चाळणीच्या मार्गदर्शनानंतर ते उखळबाईंच्या  ताब्यात दिले जात. मामीच्या अनुभवी नजरेतून सूप आणि चाळणी या गव्हाचे ग्रुमिंग करत असतानाच बरेच दिवस दुर्लक्ष झाल्यामुळे रागावून बसलेल्या उखळ आणि मुसळीला लाडाने  अंजारून- गोंजारून, थोडे पाणी पाजून आईने त्यांच्या कृष्णकांतीला लकाकी आणली असे. मग हे थोडेसे तांबूस वर्णाकडे झुकणारे खपली गहू उखळात प्रवेश करत. इथे आपले पुरुषी दिसणे कमी करण्यासाठी आपल्याला दिव्यातून जावे लागणार हे माहीत असूनही ते निमूटपणे मुसळीचे घाव सोसण्यासाठी सज्ज होत. मग आई आणि मामी या दोन दिग्दर्शिका मुसळीला वरखाली नाचवत त्यांना हवा तसा मेकओव्हर तिच्याकडून करवून घेत. यावेळी गव्हाचे वॉक्सिंग होत असे. ते करताना कातडी सोलवटली जात असे. म्हणून मध्ये मध्ये त्यावर थंड पाण्याचा शिडकावा करावा लागे. तरीही एखादा चुकार दाणा पटकन बाहेर पडे. पण दोघी दिग्दर्शिका बारीक लक्ष ठेवून असत. त्या लगेच त्यांचे बखोटे पकडून त्यांना पुन्हा उखळीत घालत. बघता बघता गव्हाचे रुप पालटू लागे. बाह्य आवरण बाजूला पडून हे गहू आता नाटकाच्या रंगात रंगायला लागलेले असत. मग याना पुन्हा सुपात नाच करावा लागे आणि उरले सुरले त्यांचे बाह्य आवरण गळून पडे व गव्हाला अधिक गोरा रंग प्राप्त होत असे. आता मात्र या दोघी दिग्दर्शिका त्यांच्या रुपावर खुश होत त्यांना थंड पाण्याच्या बाथटबमध्ये किमान तासभर तरी डुंबायला सोडत. मग त्याला त्याच पाण्यात चांगले चोळून घेऊन गरम पाण्यात, कुकरमध्ये अग्नी सरांच्या साथीने स्टीम बाथ घ्यायला लावत. मग आपल्यातील पुरुषी ताठा टाकून हे गहूराजे स्त्रीभूमिकेसाठी अगदी मऊ मुलायम बनत. आपल्यात झालेला हा बदल बघून गहूराजे स्वतःवरच खुश होत. त्यामुळे त्यांच्या शरीरावर मूठभर पाणी चढून ते टम्म फुगत. अशी ही नाटकासाठी योग्य, अंगाने भरलेली नायिका बघून दिग्दर्शकाना आपल्या नाटकाच्या यशाची खात्री पटे.

© डॉ. मेधा फणसळकर

मो 9423019961

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फ्रीझ इन्स्पेक्शन…प्रकाश तांबे ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले

डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ फ्रीझ इन्स्पेक्शन…प्रकाश तांबे ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆ 

अत्यंत साशंक नजरेने, पत्नी घरात नसताना, मी आमच्या Fridgeची पहिल्यांदा आणि शेवटची झडती घेतली होती.

Fridge उघडताच आंब्याच्या पेटीत जसे वरवर चांगले आंबे रचतात आणि खाली गाळ भरतात तसेच वरच्या कप्यात पॕकबंद दुधाच्या पिशव्या, पातेल्यातले वापरातले दूध, लोणी, पनीर, प्लास्टिक कंटेनरमधे चिरून ठेवलेल्या दोन भाज्या व तत्सम ताजे पदार्थ पाहिल्यावर मी सुखावलो. 

परंतु गाफिल न रहाता खालच्या कप्प्यांकडे जरा आधिक बारकाईने बघायचं ठरवलं. वरून अलगद झाकणाने  बंद केलेल्या पण ओसंडून वहाणा-या  विविध आकाराच्या बऱ्याच  वाट्या आणि दोन तीन पातेल्यांनी माझे दाटी वाटीत का होईना, पण सर्व प्रथम, जोरदार स्वागत केले. तेलाची तीन चार लसणीच्या पाकळ्या शिल्लक असलेली तळाला गेलेली फोडणी, मळलेल्या कणकेचा गोळा, एक दोन दिवसापूर्वी केलेल्या पावभाजीसाठीचा कांदा व लिंबाच्या फोडी व विरजणासाठी संभाळून ठेवलेले दही वगैरे कॉमन पदार्थ आढळले. यात दडलेल्या मालाला काळाचे बंधन नसते कारण expiry date चे बंधन तो जुमानत नाही. कंझमशन रेटही खूप हाय असतो.

परंतु त्याच बरोबर, एक दोन दिवसापूर्वीच्या उरलेल्या तयार भाज्याही झाकणीखाली आपला केंव्हा नंबर लागेल या विवंचनेत पडून राहिलेल्या आढळल्या आणि हळूहळू मला आमच्या घरी वारंवार होणाऱ्या  पराठे वा सँडविचेसचे कोडे उलगडत गेले. ओलसर भाज्या पराठ्यासाठी आणि कोरड्या भाज्या सँडविचेस साठी असे त्यांचे ढोबळ वर्गीकरण असते. 

दुपारचे टाइमपास कुकरी शो बघणे हा केवळ वरवरचा दिखावा असून शेवटी आईकडून परंपरेने शिकलेले पराठेच कामी येतात हेच खरे. शिवाय हेच पराठे न लाटता पोळपाटावर थापून मधे भोक पाडून तूप लोणी सोडले की थालीपीट म्हणून तुमच्या पानात अवतरू शकतात. आहे की नाही मल्टी पर्पज युटिलिटी? 

कुकरच्या एका गोलसर भांड्यात शिजवून ठेवलेले दाट वरणही या गर्दीत होते. बहुदा पहिल्या कप्यातील पळीची फोडणी देऊन डाल तडका या नावाखाली येत्या एक दोन दिवसात ते माझ्या पानात अवतरणार होते.

अजून एक उभा गंज होता. हात लागताच त्यातले ताक जागे झाले आणि ढवळताच वर वर दिसणा-या पाण्याशी एकरुप झाले. शेजारीच पसरट पातेल्यात साईचे दही होते. खूप विचार केला पण कोणत्याही प्रयत्नाने ‘हि’च्या नकळत साय लाटणे अशक्य होते म्हणून नाद सोडला.

दारा मागच्या साईडच्या कप्यात विविध मसाल्यांची तयार पाकिटे त्यांच्या वापराच्या frequency प्रमाणे लावली होती. दुसर्-यात सर्व टाईपच्या सॉसच्या बाटल्या होत्या. काहींवर माझ्या हलगर्जीपणामुळे आलेले ओघळ दिसले ते पटकन ओल्या फडक्याने पुसून घेतले.

भाजीच्या कप्यात objectionable काहीच आढळलं नाही. गाजर, काकडी, टोमॕटो एकमेकांच्या साथीत ” मरेंगे तो साथमे ” असे म्हणत एकमेकांना कंपनी देत होते. डीप Fridgeमधेही एकदम सामसूम होती. सगळेच लांबच्या रेसचे घोडे air packed अवस्थेत उभे होते. Icecream container sealed होता. मी हताश झालो. तेवढ्यात एक काजू दिसला तो तोंडात टाकला Inspection fee समजून.

एवढ्यात ही आली आणि मी Fridgeचा दरवाजा पटकन बंद केला. तिच्या लक्षात आले आणि मी ‘त्यातला’ नसून सुध्दा तिने विचारले सोडा शोधताय का? मी माझे निर्दोशत्व सिध्द केलंच पण त्याच बरोबर एकही पदार्थ वाया न घालवता संसाराचा गाडा अविरत चालवणा-या तिचे व तिच्यासारख्या तुम्हा असंख्य गृहिणींचे मनोमन आभार मानले. 

ले. प्रकाश तांबे

8600478883

(Repost)

संग्राहक : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ओंकाराचे महत्त्व ☆ संग्राहक – कालिंदी नवाथे

? इंद्रधनुष्य ?

☆ ओंकाराचे महत्त्व   ☆ संग्राहक – कालिंदी नवाथे ☆ 

१] “ॐ” चे उच्चारण केल्याने गळ्यात कंपन होण्यामुळे थायरॉइडचा त्रास दूर होतो.

२] “ॐ” च्या जपाने जीव घाबरणे दूर होते.

३] “ॐ” चा जप केल्याने शरीरात रक्त प्रवाह योग्यरितीने होऊ लागतो

४] “ॐ” चा जप केल्याने रक्तदाब सामान्य होतो आणि ह्रुदय विकाराच्या झटक्या पासून बचाव होतो.

५] “ॐ” चा जप केल्याने पोटात कंपन होते आणि पचन शक्ति मजबूत होते.

६] “ॐ” चा जप केल्याने फुफ्फुसांना अधिक प्राणवायू मिळतो आणि त्यामुळे उत्साहात वाढ होते.

७] “ॐ” चा जप केल्याने थकवा दूर होतो आणि ताजेपणाचा अनुभव होतो.

८] “ॐ” चे उच्चारण झोपण्यापूर्वी केल्याने झोप लगेच आणि शांत लागते.

९] “ॐ” चा जप केल्याने मानसिक शांती मिळते आणि तणावापासून कायमची मुक्ती मिळते.

१०] “ॐ” चा जप केल्याने पाठीच्या कण्यात कंपन होते आणि त्यामुळे पाठीचा कणा मजबूत होऊन कमरेचा त्रास दूर होतो.

११] “ॐ” चा उच्चार केल्याने मेंदूत कंपन होते आणि त्यामुळे एकाग्रता वाढते आणि स्मरणशक्ती वाढते.

१२] “ॐ” चे उच्चारण अथवा जप केल्याने आपण खूप सगळे विकार दूर करू शकतो.

 

संग्राहक :  कालिंदी नवाथे 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ चं म त ग ! कुकर आणि गॅसवरचा पाडवा ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक

श्री प्रमोद वामन वर्तक

? विविधा ?

? चं म त ग ! ⭐ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐

? कुकर आणि गॅसवरचा पाडवा ! ?

“अहो ऐकलंत का जरा !”

“अगं लग्न झाल्यापासून तुझ्या शिवाय कुठल्या बाईच ऐकलंय का मी ?”

“आता मला कसं कळणार, ऑफिसमध्ये कोणा कोणाचं ऐकता ते ?”

“बरं, बरं, कळतात हो मला टोमणे ! ते जाऊ दे, सकाळी सकाळी मला सणा सुदिला वाद नकोय ! बोल काय म्हणत होतीस तू ?”

“अहो आपण किनई या पाडव्याला स्वर्गात जाऊ या !”

“काय s s s s ?”

“अहो केवढ्या मोठ्याने ओरडताय ? शेजारी पाजारी बघायला येतील, काय झालं म्हणून !”

“अगं मग तू बोललीसच तशी ! दसऱ्याला जसं सिमो्लंघन करतात तसं पाडव्याला काय स्वर्गारोहण करतात की काय ?”

“अहो नीट ऐकून तर घ्याल किनई, का लगेच सुतांवरून स्वर्ग गाठाल ?”

“अगं मी कुठे स्वर्ग गाठायला चाललोय ? तूच म्हणालीस नां, की आपण या पाडव्याला स्वर्गात जाऊ या म्हणून ?”

“अहो हा स्वर्ग म्हणजे एक ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांची शो रूम !”

“अगं मग असं सविस्तर सांग नां, मला कसं माहित असणार तुझ्या डोक्यात कुठला स्वर्ग आहे ते ? पण तिथून तुला काय घ्यायच आहे ते नाही बोललीस.”

“अहो आता मला प्रत्येक पाडव्याला ओवाळणीत नवीन साडी वगैरे नकोय. अजून पाच सहा कोऱ्या साडया तशाच पडल्येत !”

“पण त्या साडया काय तुला ‘इधर का माल उधर !’ करण्यात कधीतरी कामाला येतीलच नां ?”

“म्हणजे ?”

“अगं म्हणजे एखादी मिळालेली साडी आवडली नाही, तर तोंड दाबून बुक्क्याचा मार खाल्ल्यागत तुम्ही बायका ती ठेवून घेताच की नाही ?”

“मग तोंडावर कसं बरं सांगणार आवडली नाही म्हणून ? ते बरं दिसत का ?”

“हो ना, मग तीच साडी कधी ना कधी तरी दुसऱ्या बाईला देता नां, त्यालाच मी ‘इधर का माल….’

“कळलं, कळलं ! आम्हां बायकांचं ते ट्रेड सिक्रेट आहे !”

“यात कसलं सिक्रेट, ओपन सिक्रेट म्हणं हवं तर ! बरं ते जाऊ दे, तुला त्या स्वर्गाच्या शो रूम मधे कशाला जायचय ते नाही कळलं !”

“मला ‘ठुशी’ घ्यायची आहे ! सासूबाईंनी त्यांची खरी ‘ठुशी’ मोठ्या जाऊबाईंना दिली, तेंव्हा पासून माझ्या डोक्यात निदान एक ग्रॅमची ‘ठुशी’ घ्यायच फारच मनांत आहे !”

“अगं पण तुला आईनं, वहिनीला दिलेल्या ठुशीच्या बदल्यात तिचा ‘घपला हार’ दिला ना, मग?”

“अहो त्याला ‘घपला हार’ नाही ‘चपला हार’ म्हणतात!”

“तेच ते, अगं पण मग खोटी खोटी एक ग्रॅमची ‘ठुशी’ कशाला ? आपण वा. ह. पे. कडून किंवा पु. ना. गा. कडून खरी ‘ठुशी’ घेऊ या की ?”

“नको गं बाई, हल्ली खरे दागिने घालायची सोय कुठे राहील्ये ? सगळ्या बायकांचे सगळे खरे दागिने लॉकरची शोभा वाढवताहेत झालं !”

“मग माझ्या डोक्यात एक नाही दोन वस्तू आहेत, ज्या नुकत्याच बाजारात नव्याने आल्येत, त्या नवीन आणि इनोव्हेटिव्ह असल्यामुळे खूपच महाग आहेत, त्या घेऊ या का ?”

“अगं बाई, त्या आणि कुठल्या ?”

“प्रेशर कुकर आणि…..”

“काय  s s s ?”

“अगं किती जोरात ओरडलीस ? मगाच्या सारखे शेजारी पाजारी बघायला येतील ना ?”

“अहो तुम्ही बोललातच तसं ! प्रेशर कुकर काय बाजारात नवीन आलेली वस्तू आहे ? गेली कित्येक वर्ष मी वेग वेगळे कुकर वापरत्ये.”

“अगं खरंच सांगतो, हा प्रेशर कुकर बोलणारा आहे, जो नुकताच नवीन आलाय दिवाळीसाठी बाजारात!”

“काय सांगताय काय ?”

“अगं खरं तेच सांगतोय, या कुकर मधे ना शिट्याच होत नाहीत !”

“मग कळणार कसं कुकर झाला आहे का नाही?”

“अगं जरा नीट ऐक, मी तुला म्हटलं ना की हा बोलणारा कुकर आहे म्हणून, मग त्याच्यात शिट्या कशा होतील ? तुला किती शिट्या हव्येत त्यावर तो सेट करायचा आणि गॅस चालू करायचा !”

“बरं, मग ?”

“मग त्यातून थोडया थोडया वेळाने one, two, three असे आवाज येतील, त्यावरून तुला कळेल की कुकरच्या किती शिट्या झाल्येत त्या.”

“अस्स होय ! मग बरंच आहे, सिरीयल बघायच्या नादात मला मेलीला कळतच नाही किती शिट्या झाल्येत त्या ! चालेल मला, आपण तो बोलणारा कुकर घेऊयाच ! ते ठुशी बिशीच जाऊ दे, पुन्हा कधी तरी बघू !”

“Ok, मग उद्याच जाऊन बोलणारा कुकर घेऊन येवू, काय ?”

“हो चालेल, पण तुम्ही दुसरी वस्तू पण म्हणाला होतात, ती कुठली ?”

“आहे, म्हणजे तुझ्या लक्षात आहे मी दोन वस्तू म्हटल्याचे.”

“म्हणजे काय? आम्हां बायकांची मेमरी तशी पुरुषांपेक्षा बरी असते म्हणतात!”

“ती फक्त तुम्हाला हव्या असलेल्या खरेदीच्या बाबतीतच बरं का ! बाकी सगळा उजेड.”

“कळलं, कळलं ! मला पण तुम्ही म्हणालात तसा सणा सुदीला वाद नकोय ! ती दुसरी वस्तू काय आहे ना, ती बोला चटचट, मला अजून बरीच कामं पडल्येत !”

“अगं त्या दुसऱ्या नवीन वस्तूच तू नांव ऐकलंस ना, तर नाचायलाच लागशील बघ !”

“ते नाच कामाचं नंतर बघू, पटकन त्याच नांव….”

“रिमोट कंट्रोलची गॅस शेगडी !”

“काय ?”

“अगं आपल्या टीव्हीला कसा रिमोट कंट्रोल असतो ना, तसाच या गॅसच्या शेगडीला पण असतो ! बसल्या जागेवरून तू गॅस चालू किंवा बंद करू शकतेस ! बोल कशा काय आहेत या दोन नवीन वस्तू !”

“झ ss का ss स ss ! आता सिरीयल सोडून मधेच उठायला नको गॅस बंद करायला !”

एवढं बोलून बायको किचन मधे पळाली आणि मी…. खरी सोन्याची ठुशी परवडली असती, पण या दोन नवीन त्याहून महागडया वस्तू घ्यायचे कबूल करून, स्वतःच्या पायावर धोंडा तर मारून नाही ना घेतला, या विचारात पडलो !

 

© श्री प्रमोद वामन वर्तक

(सिंगापूर) +6594708959

मो – 9892561086

ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ कुंकू/ टिकली डे…. ☆ श्री अमोल अनंत केळकर

श्री अमोल अनंत केळकर

? विविधा ?

☆ कुंकू/ टिकली डे ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆ 

#NoBindiNoBusiness

या शेफाली ताईंनी सुरु केलेल्या उपक्रमावरुन काही महिन्यापूर्वी लिहिलेला लेख आठवला

अर्थात त्यांचा उद्देश आणि या लेखाचा उद्देश अगदी वेगळा आहे

पण असंच चालू राहिले तर हा काल्पनिक लेख सत्यात यायला वेळ लागणार नाही

=======================

रिपोस्ट ?

 

कुंकू / टिकली डे *

(काल्पनिक, पण सध्या पहाण्यात येणा-या  निरीक्षणावरुन *)

 

कुंकू किंवा टिकली ला इंग्रजीत काय म्हणतात हे माहित नाही त्यामुळे तेच लिहून पुढे ‘डे’ असं लिहिलय.तुम्हाला माहित असेल तर ते नाव टाकून बदल करायला हरकत नाही. बाकी बरेच जागतीक पातळीवरचे ‘डे’  उदा फादर, मदर, फ्रेंडशीप, चाँकलेट, कटलेट, वडा, सामोसा, योग डे इ.इ.इ हे माहित  आहेत.

तर मंडळी, आजपासून पुढे ५० वर्षांनी  कुठल्या अमेरिकन / युरोपियन संस्थेने केलेल्या पाहणीतून कपाळावर कंकू / टिकली लावणे कसे शास्त्रीय आहे हे सिध्द होऊन जुलै महिन्यातील “फूल मून” च्या जवळच्या रविवारी हा कुंकू/ टिकली डे अतीशय उत्साहात साजरा होईल यात शंका नाही. असा डे साजरा होताना कुणाच्या तरी एकदम लक्षात येईल की अरे ही तर मूळ आपलीच परंपरा आहे. त्या खास दिवसानिमित्य मग चँनेलवर “माझा कूंकवाचा कट्टा” यावर खास चर्चासत्र किंवा विविध ठिकाणी चर्चा सत्रे रंगतील. आठवडाभर स्पेशल सेल मधे अँमेझॉन किंवा तसल्याच कुठल्याही संकेत स्थळावरुन मागवलेले  कुंकू/ टिकल्यांचे combo पॅक एव्हांन घरपोच मिळायला लागले असतील. आपण घेतलेले डिझाईन, किंमत शेअर केली जाईल. एखादी मैत्रीण दुस-या मैत्रिणीला उद्या माझा सेल्फीच बघ, एकदम हटके डिझाईन मागवलय असं सांगून आपण काय मागवलय हे गुलदस्त्यातच ठेवेल.

सोशल मिडीयावर याचे महत्व सांगणारे अनेक निबंध लिहिले जातील, दूरदर्शन वर कुंकू सिनेमा तर काही चॅनेलवर कुंकू मालिकेचे भाग दाखविले जातील आणि इतर अनेक स्पेशल ‘डे ‘ सारखा हा दिवस तेवढ्यापुरता साजरा होऊन संपून जाईल.

काही येतय लक्षात?  असो.

लेखनाचा शेवट नेहमीप्रमाणे टुकार ओळींनी

परंपरे पुरती ‘टिकली’

अन् अस्मितेचे ‘कंकू’

आधुनिक सावित्रींचे म्हणणे

तरीपण

आम्हीच जिंकू

आम्हीच जिंकू

आम्हीच जिंकू

 

 ??

#टिकलीतरटिकली

#NoBindiNoBusiness

अमोल

©  श्री अमोल अनंत केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “यश ज्वेलर्स” चा शुभारंभ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? मनमंजुषेतून ?

☆ “यश ज्वेलर्स” चा शुभारंभ ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆ 

आणि ……….

आणि तो दिवस उगवला, माझ्या यश ज्वेलर्स दुकानाच्या शुभारंभाच्या आधीचा एक दिवस– ०५ सप्टेंबर १९९८. अनंत चतुर्दशी. 

——सर्विसला असतानाच दुकानाची तयारी चालू होती  १ टनापेक्षा जास्त वजनाची समेरिका कंपनीची तिजोरी कोल्हापूरवरून येऊन  स्थानापन्न झाली होती. दुकानाचा लोगो तयार झाला.  फक्त १५ दिवस हातात होते. काम पटापट चालू होते. दुकानाचा शुभारंभ धर्मवीर आनंद दिघे साहेबांकडून करायचे  ठरविले होते– “ एक मराठी माणूस सर्व्हिस सोडून सोन्याच्या दागिन्यांचे दुकान चालू करतोय म्हणजे मी नक्कीच येणार आणि आशिर्वाद देणार “, अशी त्यांनी  ग्वाही दिली. ०६ सप्टेंबरला सकाळी १० वाजताची वेळ नक्की झाली. 

चार दिवस आधी सोन्याचे दागिने तयार होऊन हातात आले होते.  दुकानाच्या बोर्डावर पितळी धातूची अक्षरं असलेले “ यश ज्वेलर्स “ हे चमचमणारे नाव झाकून ठेवले होते. सगळे ठरल्या वेळेत आणि मनाजोगतेही होत होते. 

———आणि तो दिवस उगवला, आदल्या दिवशी दुपारी आम्ही पनवेलहून  सगळे दागिने आणून, नवीन तिजोरीत ठेऊन, तिजोरी नंबर -लॉकिंगने बंद केली, आणि जेवायला गेलो. परत आल्यावर दागिने भिंतीवरच्या ट्रे मधे लावून उद्याची रंगीत तालीम करायचे ठरविले. दागिने तिजोरीतून बाहेर काढण्यासाठी तिजोरीची चावी फिरवली, ठरलेले नंबर सेट केले आणि——-

———आणि जे काही घडले ते अक्षरशः अनाकलनीय होते. ती नवी तिजोरी जी गेले महिनाभर दिवसातून एकदातरी उघड -बंद करीत होतो, आजही सकाळपासून तीनदा उघड- बंद केली होती, ती तिजोरी उघडेना. पुन्हापुन्हा  प्रयत्न केला. परत परत नंबर चेक केले तरीही तिजोरी उघडेना. मी पुरता घामाघूम झालो होतो.  दुकान चालू होण्याआधीच स्वामींनी मला मोठ्या परीक्षेला बसविले होते.  दुपारचे चार वाजले.  डोळ्यात पाणी आले, नको ते विचार डोक्यात येऊ घातले. तिजोरी नाही उघडली तर उद्या दुकानाचे उदघाटन कसे होईल ? अनेक प्रश्न डोक्यात थैमान घालत होते. सगळे दागिने तिजोरीत अडकले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता उदघाटन होते. फक्त १८ तास हातात होते. जे काही करायचे ते लवकर करायला लागणार होते.  मी समेरिकाच्या  वर्कशॉपला  फोन केला. मालक पांचाळ फोनवर  होते. त्यांना तिजोरीचा गोंधळ सांगितला. त्यांनी दिलासा देत सांगितले—-’ फक्त मी सांगतो तसं करा.’ नंतर जवळ जवळ एक तास त्यांच्या सूचनांप्रमाणे मी तिजोरीचे नंबरलॉक  फिरवत होतो,  पण काहीच उपयोग होत नव्हता.. ते जे काही सांगत होते ते सगळे करून सुद्धा काहीच फरक पडला नव्हता.

———-आता संध्याकाळचे पाच वाजले.  पांचाळसाहेबाम्हणाले, “  घाबरू नका, मी लगेच  निघतो आणि पहाटेपर्यंत ठाण्याला येऊन तिजोरी उघडून देतो. “ तरीही माझी पायाखालची जमीन सरकली. तेव्हा कोल्हापूर- ठाणे  प्रवासाला  १०-१२ तास लागायचे . ते लगेच  निघाले तरी  ठाण्याला पोचायला त्यांना सकाळ होणार होती.  हतबलपणे फक्त वाट बघणे एवढेच हाती होते. मी पार कोसळलो होतो, रडत होतो. काही कारणास्तव जर सकाळी ते वेळेत पोचले नाहीत तर …. दुसरा काही उपायही दिसत नव्हता— फक्त वाट बघण्याव्यतिरिक्त.  पण माझे मन दुकान सोडायला तयार नव्हते. मी ठरविलेच होते — तिजोरी उघडल्याशिवाय घरी जायचे नाही. वेळ जाता जात नव्हता. मनाची चलबिचल चालूच होती. रात्री एक वाजता  पांचाळसाहेबांचा फोन आला– ” मी पुण्याला पोचलोय. सहा वाजेपर्यंत ठाण्यात येतोय “. जीवात जीव आला. आशेचे किरण दिसू लागले. आता सगळे व्यवस्थित होईल असा विश्वास वाटायला लागला . 

———– पहाटेचे  पाच वाजले. रस्त्यावर थोडी वर्दळ चालू झाली. लक्ष हातातल्या  घड्याळावर होते. सव्वासहा वाजले आणि पांचाळ हजर झाले. त्यांना बघून त्यांच्या रूपात स्वामीच आल्यासारखे जाणवले. त्यांनी आल्याआल्या आतमध्ये जाऊन कामाला सुरवात केली. मला वाटले होते की  ते जादूगारासारखे एका क्षणात तिजोरी उघडतील— पण नाही— अर्धा तास झाला त्यांचे काम चालूच होते. माझ्या मनात स्वामींचा जप चालू होता. एक तास झाला तरीही काही घडले नव्हते. मी येरझाऱ्या घालू लागलो. . मनात नको  नको ते विचार येऊ लागले आणि तेवढ्यात खट्क असा मोठा आवाज झाला—तिजोरी उघडली होती . मी देवाचे आभार मानले आणि लगेच उठून आत गेलो. पांचाळना नमस्कार केला. व्यवसायाच्या सुरुवातीलाच  एक महत्वाचा धडा मिळाला—–     कुठचीही समस्या कायमस्वरूपी नसते. संयम ठेवून समस्येला सामोरे गेल्यानेच त्याचे उत्तर मिळते.’

—–६ तारखेला ठरल्याप्रमाणे  १० वाजून १० मिनिटानी ‘यश ज्वेलर्स’ दुकानाचे उदघाटन झाले. मी तीन वर्ष जे स्वप्न बघत होतो ते जसेच्या तसे साकार झाले होते—-आणि  यश ज्वेलर्सचा यशस्वी प्रवास चालू झाला——

 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

मो. नं. ९८९२९५७००५. 

ठाणे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ सुंदर दृष्टांत ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

श्रीमती मीनाक्षी सरदेसाई 

? इंद्रधनुष्य ? 

☆ सुंदर दृष्टांत ☆ संग्रहिका: श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆

एक संन्यासी फिरत फिरत एका दुकानावरून जात होता. त्याचे सहज लक्ष गेले त्या दुकानात बरेच लहान मोठे डबे, बरण्या होत्या. 

त्या संन्याशाच्या मनात सहज एक विचार आला आणि त्याने त्या दुकानदाराला एक डबा दाखवून विचारले की “ यात काय आहे? “  दुकानदार म्हणाला, “ त्यात मीठ आहे.”  संन्यासी बुवांनी आणखी एका डब्याकडे बोट दाखवून विचारले, “  यात काय आहे? “ दुकानदार म्हणाला, “ यात साखर आहे.“—असे करत करत बुवांनी शेवटच्या डब्याकडे बोट करून विचारले, “ आणि यात काय आहे? “ दुकानदार म्हणाला, “ यात श्रीकृष्ण आहे.” 

संन्यासी अचंबित झाला आणि म्हणाला, “ अरे या नावाची कोणती वस्तू आहे ? मी तर कधी ऐकली नाही. हे तर देवाचे नाव आहे.” 

 दुकानदार संन्यासीबुवांच्या अज्ञानाला हसून म्हणाला, ” महाराज तो रिकामा डबा आहे, पण आम्ही व्यापारी रिकाम्या डब्याला रिकामा नाही म्हणत.  त्यात श्रीकृष्ण आहे असे म्हणतो.”

बुवांचे डोळे खाडकन उघडले आणि त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले. 

ते ईश्वराला म्हणाले,  “अरे कोणत्या कोणत्या रूपाने तू ज्ञान देतोस. ज्या गोष्टीसाठी मी एवढा भटकलो, घरदार सोडून संन्यासी झालो, ती गोष्ट एका दुकानदाराच्या तोंडून मला ऐकविलीस.

परमेश्वरा मी तुझा शतशः आभारी आहे “— असे म्हणून त्याने त्या दुकानदाराला साष्टांग नमस्कार केला.

जे मन-बुद्धी- हृदय,  काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार, ईर्षा, द्वेष, चांगले-वाईट आणि सुख-दुःख, अशा लौकिक गोष्टीने भरले आहे, तिथे श्रीकृष्ण म्हणजेच भगवंत कसा राहील? जे रिकामे आहे– म्हणजेच एकदम स्वच्छ आहे, अशाच ठिकाणी, म्हणजे अशाच मन, बुद्धी व हृदयात परमेश्वर वास करतो. 

लोकांना दाखवायला गीता व ज्ञानेश्वरी वाचली, किंवा एकादशीला आळंदी-पंढरपूरची वारी केली,  तरी मन-बुद्धी-हृदय जोपर्यंत रिकामे होत नाही– म्हणजे स्वच्छ होत नाही, तोपर्यंत परमेश्वर तिथे वास करणार नाही.. 

संग्रहिका:  श्रीमती मीनाक्षी सरदेसाई

सांगली

मो. – 8806955070

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares