मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “सफर!!!” ☆ मोहिनी किंहिकर हेडावू ☆

मोहिनी किंहिकर हेडावू

??

☆ “सफर!!!☆ मोहिनी किंहिकर हेडावू 

‘सफर’ हा हिंदीतला बर का, नाहीतर इंग्रजी शब्द म्हंटल तर अर्थाचा अनर्थ होईल. ! हा सफर म्हणजे प्रवास! यात्रा. !

आता सफर म्हंटल की” हम सफर” हा आलाच.. तो चांगलाच मिळेल तर नशिब.. स्वर्ग दोन बोटे उरले.. वगैरे.. नाहीतर अनुभव.. बाबा आमटे म्हणतातच. ‘An experience is cruel teacher.. it punishes first. teaches later..

आता हम सफर.. हा एक भाग.. दुसरा भाग म्हणजे कशाने प्रवास करणार हा?

‘केल्याने तीर्थाटन! ‘असे म्हंटल आहेच.. कोणताही मोठा पुरुष घेतला तर ते देशभरातून प्रवास करतातच.. अर्थात पायीच. मग ते शंकराचार्य.. जे केरळ मध्ये जन्मले.. अणि श्रीनगर ला पायी गेले.. अणि तपश्चर्या केली.. अणि ह्या प्रवासात भारताचा अभ्यास केला..

गांधीजी, ह्यानी मीठाचा सत्याग्रह पद यात्रेने सुरू केला. विनोबा भावे.. ह्यानी पदयात्रेने भूदान चळवळ सुरू केली..

तर असे हे प्रवास.. !

हा पर्यटन म्हणून आजकाल करतातच.. फक्त साधने बदलली. ‘सजन रे झूट मत बोलो ‘ची बैलगाडी असो वा ‘मांग के साथ तुम्हारा.. ‘ वाली घोडा गाडी.. प्रवास हा आलाच.. साधने तर महत्वाची आहे.. !

कार मध्ये देवानंद ‘चुडी नही मेरा दिल है.. ‘! म्हणतो तर ट्रेन मध्ये ‘ उपरवाला जानकर भी अंजान है’ म्हणून श्लेष साधतो!.. अणि प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो.. !!

तिकडे शर्मिला टागोर जितेन्द्रला.. ट्रक मध्ये ‘हम सफर मेरे हम सफर ‘ म्हणते..

तर जीनत अणि राजेश खन्ना ‘हम दोनो दो प्रेमी’ म्हणत जीवन प्रवासाचा आनंद घेतात..

कारण त्यांना ‘हम सफर ‘ मिळाला आहे फक्त प्रवासच बाकी आहे. !

प्रवासात शॉकच absorber म्हणून भक्कम साथ आहे. !!

ट्रेन, बस ह्याने प्रवास केल्यावर करीना अणि शहीद ह्याना रस्ते आवडून गेले.. अणि ते म्हणतात ‘ मंजिल से रास्ते अच्छे लगने लगे. !

“The last ride together” ही जॉन डन ची कविता खूप गाजली की त्या नंतर जिने हा लग्नाचा प्रस्ताव झिडकारल, त्या गाजलेल्या कवयित्रीने त्याला प्रपोज केले.. and they lived happily ever.. असे झाले.. ! ह्यात कवि म्हणतो.. की. ‘त्याचा सोबत प्रेयसीने घोड्यावर बसावे अणि सोबत त्याने फेरफटका मारावा.. ‘

अणि ती तयार होते. त्या छोट्याश्या प्रवासाचे वर्णन त्याने त्यात केले आहे.. exctasy.. सर्वोच्च आनंद.. देणारा हा प्रवास होता!!

खरा प्रवास हाच आहे की मंजिल दूर आहे.. अणि हम सफर चा हाथ हातात आहे.. शेवटी जन्मापासून मरेपर्यंत हा प्रवास करायचाच आहे.. त्यामुळे destinstion ला पोहोचण्याची घाई नाही करायची बर का… तर प्रवास हाच अनुभव घ्यावा, , उपभोगायचा, साजरा करायचा.. इतक की मंजिल विसरून जाऊ.. ह्यात तद्रूप होऊन जायचे अणि केशवसुतांनी म्हणाल्याप्रमाणे झपूर्झा अवस्थेला पोहोचू शकतो.. !

The road less travelled.. ह्या कवितेत tennyson म्हणतो त्याप्रमाणे धोपटमार्ग.. सोडले की प्रवासात गम्मत येते… अणि काही चांगल करण्याची धमक!!

तर तुमचा प्रवास ठरवा.. साथी निवडा. अणि निघा.. the whole world is with you!!

© मोहिनी किंहिकर हेडावू

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ प्रेरणा… लेखक : शरद कुलकर्णी ☆ प्रस्तुती : रेखा जांबवडेकर ☆

रेखा जांबवडेकर

??

☆ प्रेरणा… लेखक : शरद कुलकर्णी ☆ प्रस्तुती : सौ. रेखा जांबवडेकर 

आम्ही छान मराठीत गप्पा मारत चाललो होतो. निनादने याआधी एव्हरेस्ट बेस कॅम्पचा ट्रेक केला होता. त्यामुळे त्यालाही हा रस्ता माहितीचा होता. आम्ही गप्पा मारत चालत असतानाच पुढे उजव्या बाजूला एक भारतीय ट्रेकर हळूहळू चालताना दिसला. साधारण पंचावन्न वयाचा, काहीसा स्थूल, पाठीवर छोटी सॅक, कमरेला एक पाऊच, बरोबर एक पोर्टर. त्याच्या खांद्यावर स्वतःच्या बॅगेसहित या माणसाची मोठी डफलबॅग. तो त्या माणसाच्याच चालीने हळू हळू चालत होता.

आमच्या मराठीतील चाललेल्या गप्पा ऐकून तो माणूस थोडा थबकला आणि वळून म्हणाला.

“ पुण्याचे का? ” 

मी म्हणालो “नाही”.

मी ठाण्याचा आणि हा निनाद नाशिकचा.

महाराष्ट्रीयन आहोत. हे ऐकून त्याला खूप आनंद झाला.

बाहेरच्या कोणत्याही अनोख्या देशात किंवा अनोळखी ठिकाणी मराठी बोलणारा ट्रॅकर असला की तो पुण्याचाच असतो असा समज बऱ्यापैकी आहे. आणि तो काही अंशी खराही आहे.

“मी पण महाराष्ट्रीयन… इंदोरला असतो. “

मी म्हटलं “अरे वा”… एवरेस्ट बेस कॅम्प का?

“नाही” मी “थ्री पासचा” ट्रेक करायला चाललोय. “

त्याचे एकंदर वय आणि त्याचं शरीराचं आकारमान पाहून मला त्याचं कौतुक वाटलं. त्याच्या एकूण शरीरयष्टीकडे पाहून मला वाटत होतं की, याला हे जमेल की नाही. पण त्याचा आत्मविश्वास दांडगा होता. फक्त एक पोर्टर गाईड घेऊन तो सोलो “थ्री पास” करायला निघाला होता.

“थ्री पास” हा ट्रेक एव्हरेस्ट बेस कॅम्प पेक्षाही अवघड आहे. मला अजूनही शंका होती.

मी तरीही त्याचं कौतुक केलं.

“अरे वा तुम्ही या वयात पण “थ्री पास” करत आहात आणि तेही सोलो.. ?

नाही म्हटलं तरी हा वीस-बावीस दिवसाचा ट्रेक होता.

“25 दिवस लागले तरीही चालेल. मी हा ट्रेक पूर्ण करण्याच्या उद्देशानेच पूर्ण महिन्याची सुट्टी घेऊन आलोय. ” 

मला त्याचं अजून कौतुक वाटलं. मी त्याचं नाव विचारलं.

“मी पिंगळे”

मी थोडं थांबून विचारलं 

“तुम्ही काय करता”

“मी आयआयटीमध्ये प्रोफेसर आहे इंदोरला” आणि माझे आयआयटीचे क्लासेस पण आहेत. और मेरा लडका इंजिनियर है. बेंगलोरमे सर्व्हिस करता है.. ”

अर्ध मराठी आणि हिंदी बोलण्यावरून तो पक्का इंदोरचा महाराष्ट्रीयन वाटतं होता.

चालत असताना त्याला बोलायला जड जात होतं. थोडी धाप ही लागत होती. त्या अरुंद वाटेवरून खेचर आणि इतर पोर्टर, गिर्यारोहक ये जा करीत होते..

मी आणि निनादने त्यांना थोडं बाजूला थांबवलं. आता माझी उत्सुकता वाढत होती.

निनाद बाजूला शांतपणे उभा राहून आमच्यातील संवाद लक्षपूर्वक ऐकत होता.

आता एका जागी थांबल्यामुळं त्याला बोलायलाही सोपं वाटू लागलं. एकीकडे त्याच्याबद्दल कौतुक पण वाटत होतं आणि काळजीही वाटत होती.

शेवटी मी विचारलंच…

“एवढा अवघड ट्रेक का निवडला. त्याऐवजी नुसता EBC करायचा ”

त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाला..

“ EBC तो सब करते है. मुझे कुछ चॅलेंजिंग करना था.. ”

और इसके साथमे मेरा EBC भी हो जायेगा..

परत तो एक क्षण थांबला आणि म्हणाला.

“ये मेरा बकेट लीस्टका ट्रेक था. ”

मी म्हटलं “अरे व्वा.. येतो बहोत अच्छा है. दुनियाके हर ट्रेकरके बकेट लिस्टमे ये EBC ट्रेक होताही है. ”

एक दीर्घ उसासा घेऊन लगेच म्हणाला…

“वो क्या है, मेरी वाईफ को कॅन्सर है. सेकंड स्टेज…”

मी एकदम स्तब्ध झालो. माझ्या मनात प्रश्न पडला. यांची पत्नी कॅन्सरने आजारी असूनही हा गृहस्थ एव्हढा अवघड ट्रेक का करतोय.. ?

माझ्या तोंडून निघालं. “ओह.. सॉरी…”

“कोई बात नही. मेरे वाईफ के लियेही मैं ये ट्रेक कर रहा हूँ…”

उसनेही मुझे जबरदस्ती ये ट्रेक पर भेजा. बोली तुम्हारा बकेट लीस्टका ट्रेक है, सपना है… वो पुरा करके आओ. तुम वापीस आने तक मुझे कुछ नही होगा”

धन्य आहे त्या महिलेची. एव्हढा जीवघेणा आजार असूनही नवऱ्याच्या स्वप्नाची काळजी ती करतेय. एव्हढ बळ येतं कुठून…? मी मनातच विचार करीत होतो.

आजूबाजूनी येणारे जाणारे ट्रेकर्स आम्हाला पाहून शुभेच्छा देत होते. आम्हीही ट्रेक पूर्ण करून येणाऱ्यांचे अभिनंदन करीत होतो. ट्रेक रूटवर असा संवाद नेहमीच एकमेकांना बळ देत असतो. थकून येणाऱ्यांना परत उभारी मिळत जाते.

आम्हालाही आता उशीर होत होता. जमेल तर जास्त अंतर आज कापायचं होतं. निनादची पण चुळबुळ चालू होती. आम्ही परत गप्पा मारत हळू हळू चालायला सुरवात केली. त्याने पण आमच्या बरोबर चालायला सुरुवात केली.

त्याला खूप बोलायचं होतं. चालतंच त्याने बोलायला सुरुवात केली…

“मेरी पत्नीको मेरा ट्रेकिंगका पॅशन मालूम है. कुछदिन पहले उन्होने मेरे हातमे एक बुक थमाई… बोली पढो इसे.. मैने दो बार पढी है. “और उनकी डॉक्युमेण्ट्रीभी देखी है …”

माझं कुतूहल हळूहळू वाढतंच होतं. मी माझी चाल हळू केली. त्याच्या बरोबरीने चालू लागलो.

“मैने वो बुक दो दो बार पढी… और डॉक्युमेंटरीभी चार चार बार देखी. और उससे प्रेरणा लेके मैं ट्रेक पे चला हूँ. ”

माझ्या बरोबरचा निनादने शेवटी त्याला विचारलं.

“कोनसा बुक है वो…”

“वो कोई महाराष्ट्रके मुंबईसे कुलकर्णी करके है ”

मी न राहवून म्हटलं “कहीं शरद कुलकर्णी तो नही.. ”

तो लगेच उत्तरला “हाँ वही… जिनकी पत्नीका देहांत एवरेस्टपर हुआ था. ” 

मी आणि निनाद दोघेही स्तब्ध झालो.

पिंगळे पुढे बोलतच होता..

“मैं ये ट्रेक पुरा करुंगा और मेरे वाईफ को समर्पित करुंगा…

उसे बहुत ख़ुशी होगी. ”

आम्ही दोघंही चालता चालता थांबलो.

पिंगळेही थांबले. त्यांचा पोर्टरही पुढे जाऊन आमची वाट पहात थांबला.

निनादला आता राहवलं नाही.

तो हातातला ट्रेकिंग पोल माझ्या दिशेने करीत पिंगळेना म्हणाला.

“तुम्हाला माहीत आहेत का हे कोण आहेत. ? ”

माझ्याकडे शोधक नजरेने न्याहाळत पिंगळे उत्तरले.

“ नाही…याद नही येत. पण कोठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ”

“ हे शरद कुलकर्णी आहेत ”

आश्चर्याने माझ्याकडे पहात पिंगळे उदगारले.

“ये शरद कुलकर्णी”.. ??

अंजली मॅडमके पती.. ??

जिन्होने वो बुक लिखा है वो.. ?

शेवटी माझ्याच्याने राहवले नाही. त्यांच्याकडे वळत मी सांगितलं.

“हो, मीच तो शरद कुलकर्णी. ”

पिंगळेचा विश्वास बसत नव्हता. परत परत ते विचारत होते. “वो आपही है…? “

… बोलता बोलता त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. तो माझ्या पायावर पडायच्या आत मी त्याला सावरले आणि माझ्या गळ्याशी धरले. सारखे त्याच्या तोंडातून तेच शब्द बाहेर पडत होते.

“यहाँ आनेसे पहले.. मैने मॅडमकी फिल्म… चार- चार बार देखी…बार – बार बुक पढी. और निकल पढा.. ”

मैं बहुत भाग्यशाली हूँ…आज मेरी लिये बहुत बढा दिन है.. जिससे प्रेरणा लेके चला हूँ, वह खुद मेरे सामने यहाँ खडा है.. वह भी परदेशमे… मैं मेरे पत्नी को लेके आपसे मिलने जरूर आऊंगा…”

… त्याला झालेल्या अत्यानंदामुळे त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हते.

मी त्यांना म्हटलं “अहो तुमच्यासारखे लोक एका चांगल्या उद्देशाने, अशा बिकट परिस्थितीत, तेही या उतार वयात ट्रेक करीत आहात. हे आमच्यासाठीपण खूप प्रेरणादायी आहे. ”

मी त्याला आपल्या बाहुपशात घेऊन थोडं शांत केलं. त्यांना पुढील ट्रेक साठी काही उपयुक्त सूचना दिल्या. शुभेच्छा दिल्या. आणि दोघां उभयंतांना मुंबई भेटीचं आमंत्रण दिलं. आणि पुढील मुक्कामासाठी निघालो.

वाटेतील रोडोडेंड्रॉन गुलाबी फुले आता आणखीन गडद दिसू लागली. त्याचा हलकासा दरवळणारा सुगंध हळुवारपणे मन प्रफुल्लित करित होता. माझं मलाच छान वाटू लागलं.

… तसा मी काही मुळात लेखक नाही. पण आज पहिल्यांदाच माझ्या हातून एक चांगलं पुस्तक लिहून झाल्याचं समाधान वाटलं… अतिशय आनंदायी आणि आत्मसमाधान देणारा अनुभव होता तो…

खरं तर हे पुस्तक लिहायचा मी खूप कंटाळा केला होता.

… पण आता वाटतंय या पुस्तकाने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष काही लोकांच्या जीवनात खरीच प्रेरणा मिळतेय… आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव मी आता घेतोय.

लेखक : शरद कुलकर्णी

प्रस्तुती : रेखा जांबवडेकर

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ही फक्त हकीकत नसून वास्तव.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

श्री सुनीत मुळे

? इंद्रधनुष्य ?

☆ ही फक्त हकीकत नसून वास्तव.. – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे 

ही फक्त हकीकत नसून वास्तव – – 

अतिशय गंभीरपणे प्रत्येकाने वाचावे, विचार करावा ही हकिकत नसून वास्तव आहे

एक प्रश्नही निर्माण होतो : जर आयुष्याच्या शेवटी सोबत करायला कोणी नसेल, तर प्रगती, पद आणि पैशाचा काय उपयोग???

येणारा काळ हा अविवाहितां,चा काळ असेल…

एका नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार, पुढील सहा वर्षांत जगातील सुमारे ४५% महिला अविवाहित राहतील.

हा अहवाल १ मे २०२६ रोजी ‘लोकमत’ वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला होता.

हा ‘मॉर्गन स्टॅनली’ने (Morgan Stanley) केलेल्या एका विस्तृत अभ्यासावर आधारित आहे.

अभ्यासातील प्रमुख निष्कर्ष :

१. आजच्या महिला उच्चशिक्षित आहेत आणि आपल्या करिअरला प्राधान्य देतात.

२. त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत आणि कोणावरही अवलंबून राहू इच्छित नाहीत.

३. त्यांना स्वातंत्र्य आवडते आणि त्या आपल्या आयुष्यातील निर्णय स्वतः घेऊ इच्छितात.

४. त्यांनी लग्न, मातृत्व आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे आपल्या प्रगतीतील अडथळे म्हणून पाहायला सुरुवात केली आहे.

५. हा कल असाच सुरू राहिला, तर पारंपारिक कौटुंबिक रचना आणि सामाजिक चौकट कोलमडून पडू शकते.

६. लोकसंख्या घटणे, अविवाहित पुरुषांच्या संख्येत वाढ होणे आणि वृद्धत्वातील एकाकीपणाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

७. इथे एक प्रश्नही निर्माण होतो : जर आयुष्याच्या शेवटी सोबत करायला कोणी नसेल, तर प्रगती, पद आणि पैशाचा काय उपयोग?

अनेक आई-वडील आपल्या मुलींसाठी स्थळे शोधत आहेत, पण मुलींना स्वतःलाच लग्नात रस नाही.

परिणामी, आलेले प्रत्येक स्थळ नाकारले जाते.

समाजातील एका मोठ्या वर्गाला अजूनही या बदलाचे गांभीर्य समजलेले नाही, त्यामुळे आपण योग्य वेळी जागे होणे आवश्यक आहे.

मुलीच्या लग्नाचे योग्य वय २३ ते २६ वर्षांच्या दरम्यान असावे किंवा शक्य असल्यास त्याहूनही आधी असावे. यासाठी सामूहिक पातळीवर जनजागृती आणि प्रयत्नांची गरज आहे.

हा मुद्दा कोणाच्या विरोधात उपस्थित केलेला नाही, तर भविष्यातील स्थिरता आणि संतुलनाच्या चिंतेतून मांडला आहे.

समाज, कुटुंब, कुटूंब व्यवस्था आणि वैयक्तिक जीवन यात संतुलन राखणे हीच खरी प्रगती आहे.

आपण सर्वांनी यावर नक्कीच विचार केला पाहिजे.

भविष्यातील एक ज्वलंत समस्या

  • जेव्हा मुलांची लग्ने २० व्या वर्षी होत होती, तेव्हा एका शतकात ५ पिढ्या होत होत्या.
  • जेव्हा मुलांची लग्ने २५ व्या वर्षी झाली, तेव्हा एका शतकात ४ पिढ्या झाल्या.
  • आता, जेव्हा मुलांची लग्ने ३० व्या वर्षी होत आहेत, तेव्हा एका शतकात केवळ ३ पिढ्या होत आहेत.

विचार करण्यासारखी गोष्ट : आपला समाज पुढच्या शतकापर्यंत टिकेल का?

रस्ते आणि गल्ल्या ओस पडल्या आहेत, आसपासची घरे रिकामी आहेत.

आज घरांमध्ये मुलांचा आवाज कमी आणि पती-पत्नीचे आवाज जास्त ऐकू येतात.

महिला वयाच्या ३०-३५ वर्षांपर्यंत अविवाहित राहतात.

पुरुष वयाच्या ३५ वर्षानंतरही अविवाहित राहतात.

उशिरा लग्ने – आणि मग विभक्त होणे (घटस्फोट).

तुटलेली कुटुंबे,

दुःखी आई-वडील,

एकटे पडलेले आई-वडील…

संपूर्ण पिढी एक रिकामेपण (पोकळी) अनुभवत आहे.

आपण याला “शिक्षित समाज” म्हणू शकतो की “आत्मघातकी समाज”?

ही लोकसंख्या कमी करण्याची एक छुपी कटकारस्थाने वाटते.

जर ५० जोडप्यांपैकी प्रत्येकाला एकच मूल असेल, तर पुढच्या पिढीतील मुलांची संख्या नाममात्र असेल.

हे असेच सुरू राहिल्यास तिसरी पिढी तर जवळपास नाहीशी होईल.

पाडे आणि गल्ल्या ओस पडल्या आहेत आणि प्रत्येकजण रस्त्यावर आहे.

अर्धे आयुष्य रस्त्यावरच जाते.

संपूर्ण गावेच्या गावे नाहीशी होत आहेत.

शहरांमध्ये उत्तुंग इमारती आहेत, पण संयुक्त कुटुंब पद्धती संपुष्टात आली आहे.

नवीन सुना म्हणतात की त्यांना “फक्त एकच मूल” हवे आहे.

हा समाज आहे का?

सत्य हे आहे की :

मुले आता प्रेमाचे प्रतीक राहिलेली नाहीत, उलट, मूल होणे ही एक सक्ती वाटू लागली आहे.

यात सर्वात मोठा दोषी मुलीचा बाप आहे; तोच बाप ज्याने स्वतः २०-२२ व्या वर्षी लग्न करून संसार थाटला, तोच आता वयाच्या ३० वर्षांपर्यंत मुलीचे लग्न न करून हिरोगिरी दाखवतो.

परिणाम…?

स्त्री-पुरुष मानसिक तणावाखाली जातात.

आज मुलांना ना वेळेवर नोकऱ्या मिळत आहेत, ना त्यांची लग्ने वेळेवर होत आहेत.

समाज हळूहळू कोलमडत चालला आहे.

म्हणूनच मुले समाजासोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे पसंत करतात.

म्हणजेच, विभक्त कुटुंबे.

ते अगदी असेही म्हणतात की त्यांना मुले नको आहेत.

लग्नाला उशीर करणे / मूल होण्यास उशीर करणे, आणि नंतर एका मुलानंतर वैद्यकीय आणि संगोपनाच्या समस्यांची कारणे देणे… हे आता सामान्य झाले आहे.

वयामुळे हजारो तरुण-तरुणी अविवाहित फिरत आहेत आणि समाजातील ज्येष्ठ मंडळी गप्प आहेत.

लग्न, कुटुंब, मुले,

सर्व काही एक ओझे मानले जात आहे.

लग्न हे केवळ सांसारिक बंधन नाही, तर ते घर, कुटुंब आणि समाजाचा मुख्य आधारस्तंभ आहे.

हा वंश, सभ्यता आणि संस्कृती पुढे नेण्याचा मार्ग आहे.

आता आपल्या सर्वांना समजून घेण्याची वेळ आली आहे.

मुलांना “अति” स्वातंत्र्य देऊन आपण त्यांची समज काढून घेतली आहे.

लग्ने पुढे ढकलली जात राहिली आणि जेव्हा ती होतात, तेव्हा खूप उशीर झालेला असतो.

पुन्हा तोच एकाकीपणा.

लग्नाचे योग्य वय :

  • पुरुषांसाठी : वयाच्या ३० वर्षांपूर्वी
  • महिलांसाठी : वयाच्या २५ वर्षांपूर्वी

अन्यथा इतिहास लिहील, “त्या समाजाने स्वतःला शांतपणे नष्ट केले.” विचार करा आणि समजूतदारपणे वागा.

आपल्या मुलांची लग्ने योग्य वेळी करा.

कारण, जर कुटुंबाचे रक्षण झाले नाही, तर समाज कोसळायलाही वेळ लागणार नाही.

म्हणूनच डेव्हिड सेल्बॉर्न आणि बिल वॉर्नर सारख्या लेखकांना असे म्हणणे भाग पडले आहे की, मजबूत कौटुंबिक रचनेच्या अभावामुळे जगातील बहुतांश देशांमध्ये आणि अगदी भारतातही कौटुंबिक परंपरेचा ऱ्हास सुरू झाला आहे.

पाच रक्ताची नाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत :

मोठे काका (वडिलांचे मोठे भाऊ),

लहान काका / चुलते (वडिलांचे लहान भाऊ),

आत्या (वडिलांची बहीण),

मामा (आईचे भाऊ),

मावशी (आईची बहीण).

भविष्यात अशी नाती कदाचित पाहायला किंवा ऐकायलाही मिळणार नाहीत.

हे आपण असे समजून घेऊ शकतो :

मुलगा मुलगी

२ १ (मावशी नाही)

१ २ (मोठे काका, लहान काका नाहीत)

१ १ (मोठे काका, लहान काका, मावशी नाही)

१ ० X

० १ X

परिणाम

० ०

एका अपत्याच्या (single-child) कुटुंबांमुळे तिसऱ्या पिढीवर गंभीर परिणाम होईल, ती पिढी जिथे तुम्ही आजी-आजोबा असाल.

ज्या आजोबांना मुदलापेक्षा व्याजाची (नातवंडांची) जास्त ओढ असते, ते मुद्दलही गमावून बसतील. त्याला ते स्वतःच जबाबदार असतील.

त्यामुळे, जोडप्यांनी एकाच अपत्याच्या निर्णयावर गांभीर्याने विचार केला पाहिजे.

लोकसंख्येची ही घटती आकडेवारी बरेच काही सांगून जाते.

तुमचा नातू किंवा पणतू या जगात अगदी एकटा पडेल.

जर त्याला रक्ताच्या नात्यांची गरज भासली, तर या संपूर्ण विश्वात त्याचे म्हणायला कोणीही नसेल.

ही अत्यंत चिंतेची बाब आहे.

हे केवळ आपल्या मुलांना एकाकी जीवन जगण्यास भाग पाडत नाही, तर आपली संस्कृती देखील नष्ट करेल.

आपण एकतेच्या गोष्टी करतो, पण संस्कृतीच नष्ट होईल.

या सर्व गोष्टीला सध्याची पिढी जबाबदार आहे.

जर तुम्हाला हा विषय गंभीर वाटत असेल, तर यावर घरी, पती-पत्नीमध्ये, नातेवाईकांमध्ये, मित्रांमध्ये आणि विविध सभा-बैठकांमध्ये चर्चा करा.

आपली संस्कृती, मूल्ये आणि येणाऱ्या पिढ्यांना वाचवा.

 

हा लेख खरचं आजच्या दुष्टीने प्रेरणादायी आहे – – यातुन तरी वधु वर पालकांनी सर्तक राहा.

आपल्या पाल्यांसाठी नक्कीच विचार करावा ही खरंच विनंती आहे

लेखक : अज्ञात

प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ शिवतत्त्व आणि कॉस्मिक विज्ञान ☆ श्री दिवाकर बुरसे ☆

श्री दिवाकर बुरसे

? इंद्रधनुष्य ?

☆ शिवतत्त्व आणि कॉस्मिक विज्ञान ☆ श्री दिवाकर बुरसे

(एक तुलनात्मक शोधनिबंध)

टीपः

या निबंधात भारतीय शैवदर्शनातील शिवतत्त्व आणि आधुनिक कॉस्मोलॉजीतील विश्वसंकल्पना यांची तुलनात्मक चिकित्सा केली आहे.

कॉस्मिक विज्ञान_ (Cosmic Science) म्हणजे विश्वाची (Cosmos) उत्पत्ती, रचना, उत्क्रांती आणि अंतिम नियती यांचा अभ्यास करणारे विज्ञान. हे प्रामुख्याने कॉस्मोलॉजी (Cosmology) आणि खगोलभौतिकी (Astrophysics) या शाखांमध्ये विकसित झाले आहे.

शिवतत्त्वातील_ “स्पंद”, “उत्पत्ती–स्थिती– लय” आणि “अद्वैत” या संकल्पनांचा आधुनिक भौतिकशास्त्रातील “बिग बँग” सिद्धांत, “क्वांटम क्षेत्र सिद्धांत” आणि “कॉस्मिक उत्क्रांती”शी संवाद साधून अभ्यास केला आहे.

प्रस्तुत अभ्यासाचा उद्देश वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञानात्मक भाषांचा गोंधळ न करता प्रतीकात्मक व संकल्पनात्मक साम्यांचे विश्लेषण करणे हा आहे.

१. प्रस्तावना

मानवी ज्ञानपरंपरेत विश्वविषयक चिंतन दोन प्रमुख मार्गांनी विकसित झाले आहे—

(१) प्रायोगिक, गणिताधारित विज्ञान

(२) अनुभूतीप्रधान अध्यात्मिक तत्त्वज्ञान

भारतीय शैवपरंपरेतील शिव ही संकल्पना विश्वाच्या मूलतत्त्वाचे प्रतीक आहे, तर आधुनिक विज्ञानात विश्वाचे वर्णन निरीक्षणीय पुराव्यांवर आधारित आहे. या दोन ज्ञानप्रणालींचा तुलनात्मक अभ्यास “विज्ञान विरुद्ध अध्यात्म” असा संघर्ष न मानता “संवाद” म्हणून करणे हा या प्रबंधाचा उद्देश आहे.

२. साहित्यसमीक्षा

२. १ उपनिषद व अद्वैत दृष्टी

छांदोग्य उपनिषदात “सर्वं खल्विदं ब्रह्म” ही संकल्पना संपूर्ण विश्व एकाच अद्वैत तत्त्वाचे रूप असल्याचे सांगते. ही अद्वैत संकल्पना अस्तित्वाच्या एकात्मतेचा आधार देते.

२. २ काश्मीर शैवदर्शन आणि स्पंद सिद्धांत

‘वसुगुप्त’ यांनी प्रतिपादित केलेले ‘शिवसूत्र’ आणि पुढील ‘स्पंदकारिका’ ग्रंथांमध्ये विश्वाचे मूळ स्वरूप “स्पंद” — सूक्ष्म कंप — असे मांडले आहे.

स्पंद म्हणजे चेतनेची गतिशील अवस्था.

२. ३ आधुनिक भौतिकीतील समांतरता

‘फ्रिटजॉफ काप्रा’ यांनी ‘दि ताओ ऑफ फिजिक्स’ (१९७५) मध्ये पूर्वीय अध्यात्म आणि क्वांटम भौतिकीतील साम्यांचे विवेचन केले आहे. त्यांच्या मते उप-अणु कणांची गतिशीलता ही “कॉस्मिक डान्स” सारखी आहे.

३. आधुनिक कॉस्मोलॉजी : वैज्ञानिक आधार

३. १ विश्वाचा विस्तार

एडविन हबल (१९२९) यांनी आकाशगंगांच्या रेडशिफ्ट निरीक्षणांवरून विश्व विस्तारत असल्याचे दाखवले.

यावरून बिग बँग सिद्धांत दृढ झाला.

३. २ ऊर्जा–पदार्थ समत्व

अलबर्ट आईन्स्टाईन (१९०५) यांच्या विशेष सापेक्षतावादानुसार E = mc² हे समीकरण ऊर्जा आणि पदार्थ एकाच वास्तविकतेच्या दोन अवस्था असल्याचे दाखवते.

३. ३ क्वांटम क्षेत्र सिद्धांत

क्वांटम क्षेत्र सिद्धांतानुसार मूलभूत कण हे स्वतंत्र घटक नसून क्षेत्रातील स्पंदने आहेत.

ही कल्पना “स्थैर्य” हे भासमान असून “गतिशीलता” हेच मूलभूत स्वरूप असल्याचे सुचवते.

३. ४ कॉस्मिक मायक्रोवेव्ह पार्श्वभूमी

१९६५ मध्ये ‘ अर्नो पेन्झिआस’ आणि ‘ रॉबर्ट विल्सन’ यांनी कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राउंडचा शोध लावला, जो बिग बँग सिद्धांताचा प्रायोगिक पुरावा मानला जातो.

४. तुलनात्मक विश्लेषण

विश्लेषण पुढील क्रमाने खालील तालिकेत सांगितले आहे.

विषय / आधुनिक विज्ञान / विश्लेषणात्मक टिप्पणी

शैवदर्शन /सृष्टी–स्थिती–संहार /बिग बँग–विस्तार–संभाव्य संकुचन/चक्रीय संकल्पनेतील प्रतीकात्मक साम्य

स्पंद /क्वांटम फ्लक्चुएशन /गतिशीलतेचा मूलाधार

अव्दैत /ऊर्जा–पदार्थ एकत्व /एकात्मिक दृष्टिकोन

अव्यक्त /डार्क एनर्जी, डार्क मॅटर /अदृश्य आधारतत्त्व

समीक्षात्मक नोंद

ही तुलना प्रत्यक्ष वैज्ञानिक समानता दर्शवत नाही, तर संकल्पनात्मक साम्य दाखवते. शैवदर्शन हे अनुभूतीप्रधान आहे; आधुनिक विज्ञान हे गणितीय आणि प्रायोगिक आहे.

५. तत्त्वज्ञानात्मक चर्चा

शैवदर्शनात विश्व हे चेतनेचे प्रकटन आहे.

विज्ञानात विश्व हे ऊर्जा-क्षेत्रांचे परस्परसंवाद आहे.

दोन्ही दृष्टींमध्ये “अस्तित्वाचे मूलभूत एकत्व” हा समान धागा आढळतो.

तथापि, विज्ञान चेतनेला अद्याप भौतिक प्रक्रियांच्या संदर्भात स्पष्ट करते; अध्यात्म चेतनेला मूलतत्त्व मानते.

६. काव्यमय निष्कर्ष

जेव्हा हबल अवकाश दुर्बीण दूरस्थ आकाशगंगांचे प्रकाशचित्र टिपते,

तेव्हा ती अब्जावधी वर्षांचा इतिहास उलगडते.

जेव्हा ध्यानात अंतर्मन शांत होते,

तेव्हा ते वर्तमानातील सूक्ष्म स्पंद ऐकते.

विश्व हा एक नाद आहे—

डमरूचा, प्रकाशाचा, गुरुत्वाचा.

ताऱ्यांचा जन्म आणि लय,

कणांचे प्रकट आणि विलय,

हे सर्व एका अखंड लयीचे प्रतिबिंब आहेत.

समारोप

या संशोधनात्मक अभ्यासातून असे दिसते की:

शैवदर्शन आणि आधुनिक कॉस्मोलॉजी या स्वतंत्र ज्ञानप्रणाली आहेत.

दोन्हींत गतिशील, स्पंदनशील विश्वाची कल्पना आढळते.

साम्ये प्रतीकात्मक व तत्त्वज्ञानात्मक पातळीवर आहेत; वैज्ञानिक प्रमाण म्हणून नव्हेत.

विज्ञान विश्वाचे मोजमाप करते;

अध्यात्म त्याचा अनुभव घेते.

या दोन्हींच्या संवादातून विश्वाचे अधिक समग्र आकलन संभवते.

 

© श्री दिवाकर बुरसे

पुणे

संपर्कः ९२८४३००१२५, ९५५२६२९२४५

संदर्भसूची:

वासुगुप्ताचे शिवसूत्र (इ. स. ९)

छान्दोग्योपनिषद

फ्रि. काप्राचे ‘ दि ताओ ऑफ फिजिक्स’ (१९७५)

आईन्स्टाईन ओ (१९०५). On the electrodynamics of moving bodies.

हबल ई (१९ २९). A relation between distance and radial velocity among extra-galactic nebulae. (निबंध)

Penzias, A. A. , & Wilson, R. W. (1965). (The Astrophysical Journal)

🙏🏻

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “सध्याची बटाट्याची चाळ…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी ☆

शोभा जोशी 

? वाचताना वेचलेले ?

☆ “सध्याची बटाट्याची चाळ…” – लेखक : अज्ञात ☆ शोभा जोशी

बटाट्याची चाळ आता जमीनदोस्त झाली आहे.

त्रिलोकेकर, सोमण, गुप्तेच्या पुढच्या पिढ्या आता स्वतःच्या गाड्यांनी फिरू लागल्या आहेत.

असा मी असा मीमधले गिरगांवातले रस्ते आता भलतेच रुंदावले आहेत. हातात जीपीएस फोन आणि गुगल मॅप्स आल्यामुळे बेंबट्या आता भर उन्हातान्हात पत्ता शोधत फिरत बसत नाही, मॅप लावून झटदिशी डेस्टिनेशन गाठतो.

लग्नातल्या जेवणावळी श्लोक आहेर कधीच इतिहासजमा झाले आहेत. नाव घेणं मात्र नाममात्र उरलं आहे.

कोकणातल्या अंतू बर्वासुद्धा तब्येतीन् चांगलाच सुधारला आहे आणि विचारांनीही.

मुलाच्या घरची सगळी अपसव्यं त्याला आता मान्य झाली आहेत.ना जातीची, ना पातीची सून त्याची चांगली काळजी घेते आहे.

नामू परटान् आता लौंड्री घातली आहे, आता तो स्वतःचे कपडे वापरतो आणि दुसरी कसली भट्टी पण लावत नाही.

नारायणाने पण आता नसते उद्योग करायचे सोडून आपल्या कुटुंबाकडे व्यवस्थित लक्ष द्यायला सुरुवात केली आहे.त्याचा मुलगा आता लग्नात फुल चड्डी आणि टाय घालून बुफे घेत असतो आणि नारायणदेखील त्याला एटिकेट्स शिकवित असतो.

हरितात्यांनी आता इतिहासातल्या गोष्टींचं पुस्तक लिहिलं आहे, त्यांना आता आजोबांनी पुरवलेल्या भांडवलावर बुडित धंदे करायची आवश्यकता राहिली नाही.

लखू रिसबुड आता चांगलाच सुधारला आहे, त्याच्या हातात सोन्याच्या अंगठ्या आणि गळ्यात सोन्याची जाड  साखळी आली आहे. कुणाच्या बातम्या देऊन फायदा होईल हे त्याला चांगलेच उमगले आहे.

आता लखू शब्दकोडी लिहित नाही, मोठं मोठ्या नेत्यांना आपल्या लेखांतून कोडी घालतो आणि ती कोडी सोडविण्याची बक्षिसं देखील पटकावतो.

सखाराम गटणे आता कॉम्प्युटरच्या भाषा शिकतो, त्याला सुवाच्य हस्ताक्षराची आणि नीतिमत्तेची आवश्यकता उरली नाही. कॉम्प्युटरच्या अनेक भाषांत पारंगत झाल्यामुळे त्याची साहित्याची आवड पार मागे पडली.

नंदा प्रधान पहिल्यापासून जरा फॉरवर्डच होता.तोही तीन ब्रेकअप्स नंतर आता लॉंगटर्म रिलेशनशिप करण्यात सक्सेसफुल झाला आहे.

नाथा कामत मात्र आहे तसाच राहिला आहे, त्याचा बुजरेपणा कधी जाईल देव जाणे.

बबडू आता राजकारणात शिरला आहे, तो कुठलातरी महापौर वगैरे झाला होता, पहिल्यापासूनच लटपट्या होता तो, कुठल्या युनिव्हर्सिटीचा चॅन्सेलरसुद्धा झाला तर मला नवल वाटणार नाही.

पेस्तनकाका आणि काकी मात्र हल्ली दिसत नाहीत आणि कधी दिसलेच तर ते १००% वाटत नाहीत.

नाही म्हणायला चितळे मास्तर हरवल्याची खंत मात्र हृदयात बोचते.

ऑनलाईन टीचिंग, टेस्ट सिरीज, प्रोफेशनल टीचिंगच्या या जमान्यात संस्कार पेरणारे मास्तर मात्र हरवलेले आहेत.

भगवद्गीता पाठ न करता त्यातले तत्त्व जगणारे काकाजी आता सापडेनासे झाले आहेत, पण आचार्यांचा वेष चढवून गीता मुखोद्गत करून नाही ते धंदे करणारे बोगस आचार्य फोफावले आहेत.

दोन तत्त्वांचा वाद त्यांच्यातल्या प्रामाणिकपणाबरोबरच मिटलाय आणि फक्त ऐहिक सुखांचा पाठलाग सुरू राहिला आहे.

पुलंनी लिहिलेल्या एक एक व्यक्तिरेखा हा बदलणाऱ्या संस्कृतीचा प्रवास सांगणाऱ्या होत्या.

त्यांनी लिहिलेली बटाट्याची चाळ आणि असा मी असा मी हे बदलत्या सामाजिक जीवनाचे प्रवासवर्णनच होते.

त्या संस्कृतीमध्ये एकेकाळी पुरता मिसळून गेलेल्या मला, आज मागे वळून बघताना ती संस्कृती अनोळखी वाटू लागली आहे आणि माझ्या मुलांकडे बघितल्यावर असे जाणवू लागते की आज मी स्वीकारलेली ही आधुनिक संस्कृतीसुद्धा फार वेगाने कालबाह्य होत चालली आहे.

पुलंनी हा बदल त्यांच्या लिखाणातून नेमकेपणाने दाखवला.

बदलत्या काळाची पावले कशी ओळखायची आणि त्या नव्या काळाचं हसतमुखाने स्वागत कसं करायचं हे पुलंनी आम्हाला शिकवलं.

काळ बदलला, संस्कृती बदलली, वेषभूषा बदलली, आर्थिक स्थिती बदलली तरी माणूस तोच आहे.

त्या बदललेल्या वेष्टणातला माणूस वाचायला पुलंनी आम्हाला शिकवलं.

भले त्यांच्या व्यक्तिरेखा जुन्या झालेल्या असोत किंवा त्यांची विचारसरणी आज पूर्णपणे बदललेली असो, पुलंनी टिपलेली त्यांची स्वभाव वैशिष्ठ्ये आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अमर आहे.

नितळ मनानं केलेलं ते समाजाचं निरीक्षण आहे.

पुलं आज असते तर शंभरीत पदार्पण करते झाले असते, आणि आज बदललेल्या सुशिक्षित आणि श्रीमंत समाजाचीही त्यांनी तितक्याच कुशलतेने दाढी केली असती.

पुलंनी आम्हाला जगण्याची दृष्टी दिली, संगीताचा कान दिला, राजकारण्यांच्या भाषणातला आणि कृतीतला फरकही दाखवून दिला.

आणीबाणीत वागण्यातला निर्भयपणा आणि सच्चेपणा दाखवून दिला.

खऱ्या अर्थाने आयुष्य बुद्धिनिष्ठ विचारांनी आणि प्रामाणिकपणे जगलेला मराठी साहित्यिक असे मी त्यांना म्हणेन.

त्यांच्या वैविध्यपूर्ण लिखाणाचा संपूर्ण वेध घेणे हे माझ्या बुद्धीच्या पलीकडले असले तरी माझ्या क्षीण बुद्धीला त्या ज्ञान समुद्रातल्या खजिन्याचे जेवढे दर्शन घडले त्यातील थोडेफार मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.

याव्यतिरिक्त त्यांची प्रवास वर्णनं ,नाटकं, पुरचुंडी सारखे लेख, गोळाबेरीज हसवणूक सारखी पुस्तकं, भाषांतरं, चित्रपट पटकथा लेखन, दिग्दर्शन, एकपात्री प्रयोग, कथाकथन, मराठी साहित्याचा गाळीव इतिहास यासारखी विनोदी शैलीत लिहिलेली विद्वत्ता पूर्ण पुस्तकं, इत्यादी साहित्याचा आणि अंगभूत कलेचा वेध घेण्यासाठी एखाद्यास त्यांच्या साहित्यात डॉक्टरेट केले तरी आयुष्य कमीच पडेल यात काहीच शंका नाही.

या आमच्या आयडॉलला लक्ष लक्ष प्रणाम।

कवी : अज्ञात 

प्रस्तुती :  शोभा जोशी

कार्यकर्ती, जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर. 

मो ९४२२३१९९६२ 

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ फुलपाखरे… कवी : श्रीशैल चौगुले – रसग्रहण : अविनाश शिंदे ☆ प्रस्तुती – श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? काव्यानंद ?

☆ फुलपाखरे… कवी : श्रीशैल चौगुले – रसग्रहण : अविनाश शिंदे ☆ प्रस्तुती – श्रीशैल चौगुले ☆

फुलपाखरे

इवली पिवळी फुलपाखरे

पिवळ्याशा दगडफुलांवर

सुंदर बागडती ईथे-तिथे

वारा ओला झेलीत दलांवर.

 *

पाती गवताची दवात मस्त

कधी वनात भ्रमण अनेक

ओहोळकाठी माळरानी कधी

मोहित मना फसवी अनेक.

 *

स्पर्श होता भिरभिरती भारी

रंग हाताला लावून उडती

पुन्हा बेभान पाठलाग त्यांचा

गवसणेचा हेतु ना घडती.

 *

भाव अंतरी असेच जीवनी

स्वप्नांच्या हृदयी फुलपाखरे

एकही न मनासारखे यश

रंग स्मृतींचे ते हरे-भरे.

 श्रीशैल चौगुले.

 श्रीशैल चौगुले यांची ‘फुलपाखरे’ ही कविता अत्यंत निसर्गरम्य, संवेदनशील आणि मानवी भावनांची सखोल उकल करणारी एक अप्रतिम रचना आहे.

कवितेच्या पहिल्याच कडव्यात पिवळ्या दगडफुलांवर बागडणारी पिवळी फुलपाखरे आणि ओला वारा झेलणारी त्यांची नाजूक पंखे यांचे अतिशय जीवंत आणि दृश्यमान चित्र उभे राहते. शब्दांमधून निसर्गाचा ताजेपणा स्पष्टपणे जाणवतो.

‘ओहोळकाठी’, ‘माळरानात’, ‘दवात मस्त गवताची पाती’ यांसारख्या शब्दांमुळे कवितेला एक निसर्गदत्त सौंदर्य प्राप्त झाले आहे. फुलपाखरांचा मागोवा घेताना मनाची होणारी मोहिनी आणि भ्रमंती कवीने खूप सुंदर टिपली आहे.

फुलपाखराला स्पर्श करताच ते हाताला रंग लावून भिरभिरत उडून जाणे आणि त्याच्या मागे बेभान होऊन धावणे… हा बालपणीचा किंवा मानवी स्वभावाचा नित्याचा अनुभव कवीने अतिशय साध्या पण प्रभावी शब्दांत मांडला आहे.

कवितेचा शेवट या रचनेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. केवळ निसर्गाचे वर्णन न राहता, कवीने फुलपाखरांची तुलना माणसाच्या ‘स्वप्नांशी’ आणि ‘इच्छांशी’ केली आहे. आयुष्यात मनासारखे यश पकडू पाहताना ते फुलपाखरासारखे निसटून जाते, पण हातात किंवा आठवणींत मात्र त्याचे ‘रंग’ कायम राहतात, हा तत्त्वज्ञानाचा धागा अतिशय अर्थपूर्ण व भावुक करणारा आहे.

थोडक्यात सांगायचे तर –

ही कविता बाह्य निसर्गाच्या सौंदर्यातून मानवी आयुष्यातील स्वप्न आणि सत्याचा सुंदर मेळ घालते. कवीची कल्पकता, लयबद्धता आणि भावोत्कटता कौतुकास्पद आहे.

 

रसास्वाद: अविनाश शिंदे

प्रस्तुती: श्रीशैल चौगुले

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /मंजुषा मुळे/गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ शतक महोत्सवी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

?  विविधा ?

☆ शतक महोत्सवी अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

९ ऑगस्ट २०२६.

शतकमहोत्सवी अ.भा.मराठी साहित्य संमेलनानिमित्ताने

(हे मनोगत  सर्व मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या सर्वांसाठी असून ते कुणाच्याही विरोधी नाही).

 ———

पुण्यात, शंभरावे अखिल भारतीय पातळीवरचे मराठी साहित्य संमेलन जानेवारी २०२७मध्ये संपन्न होत आहे.

 २०२४ मध्ये केंद्र शासनाकडून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त मिळाल्यानंतर, मराठीची सध्याची स्थिती आणि उज्वल इतिहासाची चर्चा करण्यासाठीचे हे मोठे व्यासपीठ असणार आहे.  

अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर, या भाषेच्या विकासाची चर्चा सगळीकडं झडत असताना, इथं मी काही विचार मांडू इच्छितो.

प्राचीनता, समृध्द साहित्यिक वारसा आणि अद्वितीय सांस्कृतिक महत्व, अशा निकषांवर मराठीचे महत्व राष्ट्रीय पातळीवर या निर्णयाने मान्य केले आहे.

या चांगल्या निर्णयाने, केंद्राकडून मराठी भाषेच्या विकासासाठी भरीव आर्थिक मदत मिळणार आहे.यातून काही शैक्षणिक पदे निर्माण होतील अशी आशा वाटते.

यातून  मराठी भाषेचा सखोल अभ्यास, संशोधन  होऊ शकेल ह्या बाबी नक्कीच आनंददायक आहेत.

पण या सकारात्मक बाबींनी हुरळून जाण्याची गरज नाही.

मराठी भाषेचा विकास व्हावा, अशी इच्छा बाळगणाऱ्या सर्वसामान्य  माणसाच्या भूमिकेतून काही मुद्दे स्पष्ट करतो.

व.पु.काळे एका ठिकाणी म्हणतात तसं, ‘स्काय इज द लिमिट’ असं  वाक्य  प्रचलित असलं तरी,प्रत्येकानं आपापलं आकाशाचा आवाका  ओळखला पाहिजे, निश्चित केला पाहिजे.

सर्वसामान्य माणसाला या परिस्थितीत काय करणं शक्य होईल?

१) अगदी प्राथमिक शाळेपासून विद्यापीठापर्यंत ज्या अनेक संस्था आहेत, त्या शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाची केंद्रं आहेत; जिथं सळसळत्या तरूणाईने भारलेले तरूण असतात.अशा केंद्रांतून वक्तृत्व, वादविवाद, चर्चासत्रे, निबंध अशासारख्या, तेथील  तरूणांना  सहभागी करून घेणारे लोकप्रिय उपक्रम/ स्पर्धांचे आयोजन करून, या तरुणाईच्या माध्यमातून मराठीवर सतत चर्चा घडवून आणता येईल.

अध्ययन आणि अध्यापन यांचे माध्यम हे मराठीतूनच करण्याचा आग्रह धरला जावा.या दृष्टीने संबंधित अभ्यासमंडळांनी अभ्यासक्रम/पूरक साहित्य हे  सुलभ मराठीत तयार करण्याचा प्रयत्न करावा.

२) समाजात आर्थिक उलाढाली होणाऱ्या  संस्था (उदा.बॅंका, सहकारी पतपेढ्या इ .),न्यायालये,विविध शासकीय,अशासकीय,निमशासकीय संस्था या नियमितपणे लोकांच्या जीवनाशी संबंधित असतात.

त्यांच्यातून  लोकांना मदत आणि माहिती घेऊन लाभ घेण्याच्या दृष्टीने,त्यांच्यातील   व्यवहार सोप्या, सुटसुटीत मराठीत होणे गरजेचे आहे.अनेक संस्थांचे तसे मराठीत व्यवहार चालतात. मात्र,’त्याची उपयुक्तता आणि लोकांना त्यात काही अडचणी वाटत नाही का? त्यात  सातत्याने  बदल’ करता येईल का? ‘यावर नेहमी स्थानिक लाभधारक लोकांकडून फिडबॅक घेणे आवश्यक आहे.

३) ‘बारा मैलावर भाषा बदलते ‘असं म्हणतात.

ठिकठिकाणच्या भौगोलिक,सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीतीनुसार विविध ठिकाणच्या बोलीभाषा बोलल्या जातात आणि बदलतातही.

या बोलीभाषा लोकांच्या संवादाचे जसे माध्यम असतात, तसेच ते   संबंधित संस्कृतीचे प्रतिकही असतात.

भाषा ही काळानुसारही बदलते.बोलीभाषेची वैशिष्ट्ये,सामाजिक  व्यवहारात त्यांचे स्थान, त्यांच्या प्रसारासाठी ज्ञात आणि अज्ञात व्यक्तिं/ संस्थांनी केलेले योगदान याचेही  विविध स्तरांवर संशोधन झाले पाहिजे.

आपल्याकडे संशोधनालाही काही चौकटी असतात. त्यामुळे  सर्वसामान्य माणसाला त्याची भिती आणि पर्यायाने तिटकारा येतो आणि तो संशोधनापासून बाजूला रहातो.समाजातील प्रश्नांची उकल करण्याचे  आणि

काही चमकदार बाबी शोधण्याचे ते उत्तम साधन असते, असा दृढ विश्वास त्याच्या मनात निर्माण झाला तर, संशोधन ही त्याची आवड आणि छंद होईल. मराठी साहित्य विकासात त्याचा उपयोग करून घेता येईल.

आपल्याकडे छपाईचे तंत्र विकसित होत असताना, इथं पुण्यातल्या पेशव्यांची सत्ता होती. म्हणून त वापरतात ती मराठी  भाषा ही ‘प्रमाण मराठी’ समजली  जाऊ लागली. तरीपण इतर बोलीभाषा (उदा. मालवणी,अहिराणी इ.)

याही मराठीचे वैभव आहेत.  

आज इंग्रजी ही जगातील सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा समजली जाते.मला वाटतं की, याचं एक कारण म्हणजे जगातील अनेक भागांत राज्य करताना, इंग्रजांनी ती सगळीकडे नेली .पण इंग्रजीत अनेक  स्थानिक  शब्दांचा आंतर्भाव आहे.आपल्याकडील ‘ट्रॅफिक जॅम’ हा शब्दही त्यापैकी एक असावा.

आजच्या सोशल मिडियाच्या  काळात मराठी बोलताना, इतर भाषांची त्यात सरमिसळ झाली म्हणून ती अशुद्ध झाली किंवा तिच्यावर आक्रमण झाले असं समजणं चूक आहे.

जोवर मराठी माणूस  जिवंत आहे,तोवर मराठीही 

भिती नाही हेच खरं.

मराठीला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर नवी दिल्लीत झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त मी एक कविता लिहिली होती.तिची आठवण येते ;

‘देशाच्या शीर्षनगरी

साहित्य संमेलन होताना,

संसदेच्या कोर्टात

न्याय मिळाल्याचा आनंद ओसंडून वहाताना,

उधळा गुलाल

होऊन बेभान,

ठेवा फक्त एक भान;

अमृताच्या पैजा जिंकणारी,

चामुंडराये करवियलेली

ही श्रीमंत भाषा

सरकारी हापिसातून झिरपू द्या,

इथल्या माणसांची तहान त्याने भागू द्या;

कोर्टातून, बॅंकांतून

आणि शाळा काॅलेजांतून ती खेळू द्या,

रडणा-यांचे डोळे

पुसणारे

ते हसरे फूल होऊ  द्या!’

मराठी वापरा,मराठी वाढवा  आणि मराठी वाचवा…

या निमित्ताने अजून दोन बाबींचा उल्लेख करणं मला आवडेल.

१) महाराष्ट्रातील लोकजीवनाच्या  विद्यापीठाचे अनभिषिक्त निरक्षर कुलगुरू असा ज्याचा  गौरव केला जातो,त्या पूज्य गाडगेबाबांच्या  कीर्तनाचे वर्णन करताना एका अभ्यासक सांगत होते की,एखाद्या गावातील बाबांचे कीर्तन हा एक अवर्णनीय सोहळा असे.कुठेतरी पटांगणावर कंदिलाच्या किंवा पेट्रोमॅक्सच्या उजेडात बाबांच्या कीर्तनाला त्या गावच्या आजूबाजूलाच्या परिसरातील हजारो माणसं उपस्थित असत.अगदी मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या कीर्तनात, तेव्हा खेड्यात लाईट असणं अशक्य.आणि म्हणून माईकही बहुतेक  वेळा नसायचा. पण कीर्तनात मधूनमधून  बाबा दोन्ही हात वर करून ‘गोपाला,गोपाला देवनकीनंदन गोपाला’ असं पालुपद  म्हणत;  तेव्हा तिथं हजर असलेली ती सर्व माणसंही मोठ्यांदा ते म्हणत. कीर्तनाच्या  शेवटी बसलेल्या माणसांना विचारलं की,’इतक्या दुरून तुम्हाला बाबांचं कीर्तन ऐकायला येत नसेल तरी तुम्ही का येता?’

यावर त्यांचं उत्तर विलक्षण होतं.उत्तर होतं,”आम्ही गाडगेबाबांचं कीर्तन पहायला येतो”. कीर्तन ऐकता येतं हे आजपर्यंत आपण ऐकत आलो आहोत. पण कीर्तन पहाणं जो केवळ वाक्प्रचार नव्हता; तर ते आपलेपणाचं नातं सांगणारा जिव्हाळा होता.मराठी भाषेला नवीन वाक्प्रचार होता.

माझ्या माहितील  एक कुटुंब सुट्टीत सिंहगडावर  गेलं होतं.

सिंहगड;तिथं डोंगर, झाडी  होतीच.

पायवाटही काहीशी ओबडधोबड होती.

गडावरून पायी उतरताना त्या कुटुंबातील छोटी मुलगी अचानक ओरडली,” आई,किंचोळा”.तिनं एक कीटक पाहिला होता.मात्र पाहिलेला किटक तिच्या शब्दांत किंचोळा होता.

माझ्यामते  तरी तो नवीन शब्द असेल. अशी अनेक उदाहरणं आहेत की,जेथे सर्वसामान्य माणूस व्यवहारात नकळत नवनवीन शब्द/वाक्ये किंवा वाक्प्रचार निर्माण करतो.मला वाटतं यातून भाषा समृद्ध होत  जाते. 

अनेक शिक्षणसंस्थांतून, मराठी भाषेवर संशोधन सुरू आहे.त्यांनी अशा नवीन शब्दांना संकलित केलं तर हा चांगला उपक्रम असेल,

२) आणखी एक विचार.अर्थात अनेकजण ते बोलतातही. त्याचा पुनरूच्चार करतो इतकंच.

 मराठी भाषेवर प्रेम असणाऱ्यांनी नियमित नव्हे तर जमेल तसं काही कुटुंबांशी बोलावं आणि एकतरी मराठी पुस्तक विकत घेऊन ते वाचावं असा सल्ला द्यावा. त्यांनी

जमल्यास, त्यावर इतरांशी बोलावं.अगदी कुणाला शक्य नसेल तर, आपण जिथं काम करतो तिथं तरी फावल्या वेळात मराठी पुस्तकांवर चर्चा करता येईल.किंवा सोशल मिडीयावरूनही यावर इतर उहापोह करता येईल.मराठी  न बोलल्या  जाणाऱ्या  कुटूंबात याची गरज काय? असा मुद्दा उपस्थित होईलही.अशा ठिकाणी  त्यांचं म्हणणं   शांतपणे ऐकून, जगण्याच्या व्यवहारात  मराठी वापरणं ही गरज आहे,हे त्यांना पटवून देऊन, त्यांच्या  आवडीच्या  विषयांतील  लहान लहान  पुस्तकं  सुचवता येतील. अर्थात अशी सूचना करताना,कोणतीही राजकीय किंवा सांप्रदायिक विचारसरणीचा प्रचार करू  नये हे पथ्य  कसोशीने  पाळावे.

काही मराठी भाषेतील  समूहांवर  याविषयी उत्तम उपक्रम सतत सूरू असतात.हे नक्कीच आनंददायक आणि अनुकरणीय आहेत. त्याच्या पटी वाढवल्या जाव्यात.

———-

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

सेवानिवृत्त प्राध्यापक आणि म.फुले अध्यासनाचे माजी समन्वयक,

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,

ईमेल- sks.satish@gmail.com मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मनावर कोरलेला शिलालेख…!!!” ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

? मनमंजुषेतून ?

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “मनावर कोरलेला शिलालेख…!!!☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆

आदरणीय डॉ. A. P. J. अब्दुल कलाम सर, माझे रोल मॉडेल, आदर्श व्यक्तिमत्व, माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, सच्च्या दिलाचे माणूस…!

त्यांच्यावर प्रेम करत नाही, असा एकही माणूस शोधूनही सापडणार नाही…!

त्यांना एकदा तरी भेटून त्यांच्या पायावर नतमस्तक व्हावे…

आयुष्यातल्या काही इच्छांपैकी ही एक इच्छा…!

… पण आभाळाएवढा माणूस, त्यांच्या पायापर्यंत सुद्धा पोहोचण्यासाठी माझे हात तोकडे पडले.

आदरणीय रतनजी टाटा सर यांच्याबाबतीतही असेच घडले. त्यांच्या नावे पुरस्कार मिळाला, परंतु त्यांची कधीही भेट होऊ शकली नाही.

आयुष्यातल्या या काही जखमा.. कधीही भरून न येणाऱ्या…!

यांची वैयक्तिक भेट आता आयुष्यात कधीही शक्य नाही, परंतु त्यांचे विचार आणि पुस्तकं यांनाच गुरु मानून मी तिथे नतमस्तक होतो 

… पण अशी माणसं कुठेही जात नाहीत, शतकांनुशतके ती अमर असतात…!!!

असो…

“लेवा भ्रातृ मंडळ, पुणे” या संस्थेकडून एके दिवशी मला फोन आला, ‘मी पुरुषोत्तम पिंपळे बोलतो, आमच्याकडे एक कार्यक्रम आहे या कार्यक्रमासाठी आपले बुके आम्ही विकत घेऊ इच्छितो. ‘ 

भीक मागणाऱ्या लोकांनी भीक मागणे सोडून काम करावे, सन्मानाने जगावे, यासाठी आम्ही एक रोजगार केंद्र सुरू केले आहे. तिथे आम्ही विविध वस्तू बनवतो आणि त्याच्या विक्रीतून तेथील सर्व खर्च भागवतो. मोत्यांचे बुके हे त्यातलेच एक प्रॉडक्ट…

आनंदाने मी बुके पाठवून दिले.

पुन्हा एके दिवशी त्यांचा फोन आला, ‘ पिंपळे सर म्हणाले, ‘आमच्या कार्यक्रमात आम्ही तुमचा विशेष सन्मान करू इच्छितो, अमुक दिवशी अमुक वेळेला यावे. ‘ 

त्यांनी बोलावलेल्या दिवशी न टाळता येण्यासारखी बरीच कामं होती, मी त्यांना नम्रपणे माझी अडचण सांगितली, आणि पुढील वेळेला बघूया कधीतरी, पुढील वेळी नक्की येतो असं म्हणालो.

यावर ते म्हणाले, ‘ अहो डॉक्टर, कार्यक्रमाला डॉ. A. P. J. M. J. सलीम शेख सर येत आहेत, त्यांच्या हस्ते तुम्हाला पुरस्कार देत आहोत. ‘

दोन सेकंदासाठी मनातल्या मनात प्रचंड लाटा उसळल्या.

डॉ. सलीम शेख सर म्हणजे आदरणीय कलाम सरांचे नातू (भावाच्या मुलाचे चिरंजीव), Dr. APJ Abdul Kalam International Foundation चे संस्थापक, रामेश्वरम येथील Dr. A. P. J. Abdul Kalam Mission of Life Gallery चे डायरेक्टर… आणखीही बरंच काही…!

… *आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आदरणीय कलाम सरांच्या पवित्र, निर्मळ आणि शुद्ध सहवासाने पुनित झालेलं एक व्यक्तिमत्व…!!! *

.. अत्तराच्या दुकानात बसलेला माणूसही सुगंधी होऊन जातो…!

डॉ सलीम शेख सर यांना भेटून, आयुष्यात हरवलेला आदरणीय कलाम सरांचा सुवास आणि सहवास अशा रूपाने का होईना, पण मिळेल… सरांची भेट, मनाच्या गाभाऱ्यात झालेल्या जखमेवर हळुवार फुंकर तरी मारून जाईल…

या विचाराने सर्वच्या सर्व कामं बाजूला ठेवून गेलो.

मुख्य कार्यक्रमाआधी डॉ. सलीम सरांशी भेट झाली, काम समजल्यानंतर ते सद्गदित झाले, दूर उभ्या असलेल्या मला त्यांनी जवळ बोलावलं, छातीशी लावलं, पाठीवर हात ठेवून शाबासकी दिली, खांद्यावर हात ठेवून तुझ्यासोबत आहे म्हणाले…!

हेच ते हात असतील ना? जे कधीतरी इवले होते, आणि या हातांना आदरणीय कलाम सरांचा सुद्धा स्पर्श झाला असेल…?

.. या विचाराने मी रोमांचित झालो, मला काय वाटलं असेल, हे मी शब्दात सांगूच शकत नाही…

भेटीचा हा सुगंध मी श्वासात भरून घेतला, डोळ्यात साठवून घेतला…

मुख्य कार्यक्रम सुरू झाला, सरांच्या हस्ते माझा विशेष सन्मान झाला. सरांचे स्वागत करताना आयोजकांनी आमचा बुके सरांना भेट म्हणून दिला.

डॉ. A. P. J. M. J. सलीम शेख सर यांच्या हाती तो बुके पाहून मी पुन्हा रोमांचित झालो, हृदयातली धडधड वाढली…

आमच्या थरथरत्या वृद्ध अपंग हातांनी हे बुके बनवले होते, तेच बुके आज सरांच्या हाती होते, याच हातांना आदरणीय कलाम सरांचा स्पर्श झाला होता… आता श्वासाचा वेग वाढला…

भर सभेत, व्यासपीठावर, मी पुढे होऊन हा क्षण सरांच्या जवळ जाऊन कॅमेऱ्यात टिपला…

– – खरंतर मी प्रोटोकॉल मोडला होता, पण हे समजायला मी भानावर होतोच कुठं…???

डॉ सलीम सर गालातल्या गालात मंद हसले…

त्यांना माहीत होतं, निस्सीम भक्ती करणाऱ्या भक्ताच्या हातून अनावधानाने काही चूक घडली तर ती चूक नसते…!

आदरणीय कलाम सरांचा मी भक्त होतो हे त्यांना माहीत होते.

शक्यतो मोठी माणसं कार्यक्रमात मिळालेले बुके, शाल किंवा नारळ अशा गोष्टी घेऊन जात नाहीत, असा अनुभव आहे.

.. कार्यक्रम संपल्यानंतर मी सरांना हात जोडून म्हणालो, सर प्लीज हा बुके आपण घेऊन गेलात, तर आम्ही सर्वजण आपल्या ऋणात राहू…

मंद हसत ते म्हणाले, ‘ Offcourse, इतका सुंदर बुके मी इथे कसा ठेवेन? मी माझ्या ड्रायव्हर कडे आधीच तो दिला आहे, आणि त्यांनी तो व्यवस्थित गाडीत ठेवला आहे. मी तो घरी घेऊन जाणार आहे आणि चांगल्या ठिकाणी, इतरांना दिसेल अशा जागी ठेवणार आहे. ‘ ते सहज बोलून गेले.

… पण माझ्या डोळ्यात पाणी आलं…

माजी राष्ट्रपती, माझे दैवत, आदरणीय कलाम सर, यांच्या मूळ गावी, मूळ घरात, ज्या घराला आदरणीय कलाम सरांचा सहवास लाभला आहे, घर नव्हे जे एक मंदिर आहे, तिथे हा बुके सन्मानाने जाईल…

मी शहारलो…

भीक मागणे सोडून काम करू लागलेल्या आमच्या लोकांचा हा खऱ्या अर्थाने झालेला सन्मान होता…!

सर पुढील कार्यक्रमासाठी निघाले, भरलेल्या डोळ्यांनी सरांना निरोप दिला.

मला डोळ्यात पाणी येऊ द्यायचं नव्हतं… वाटलं, ज्या डोळ्यांनी हे सर्व पाहिलं, त्या डोळ्यातल्या आठवणी हे अश्रू पुसून टाकतील…

पण नाही… दगडात कोरलेले शिलालेख सहजासहजी पुसले जात नाहीत.

सरांची भेट आणि अप्रत्यक्षरीत्या झालेला आदरणीय कलाम सरांचा स्पर्श आणि सहवास हा मनावर कोरलेला एक शिलालेख आहे, तो कधीही पुसला जाणार नाही.

… हा शिलालेख मी आयुष्यभर मिरवत राहीन…!!!

श्री पुरुषोत्तम पिंपळे सर आणि समस्त लेवा भ्रातृ मंडळ यांचा मी मनापासून ऋणी आहे…!!!

अभिजीत 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  abhisoham17@gmail.com,

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈ संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ ”एक स्वस्त छंद..” ☆ संध्या बेडेकर ☆

संध्या बेडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ “एक स्वस्त छंद.. ☆ संध्या बेडेकर ☆

एक स्वस्त छंद – – – 

 – – – ALL INDIA RADIO / BBC…

प्रत्येक परिवारात/ मोहल्ल्यात एक BBC /AIR news reader व्यक्ती असतेच. परिवारातील/ मोहल्ल्यातील सर्वांची सर्व माहिती घेणे. मग ती सर्वांना सांगणे.

एखादी बातमी चांगली / वाईट कोणाच्या कानावर पडली तर लगेचच…

त्यांना विचारूया.. म्हणजे BBC ला 

खर काय ते कळेल… अस सहज लोकांच्या तोंडून निघत.

ALL INDIA RADIO वर बातम्या ऐकल्या की देश- विदेश खेलकूद, क्राइम, सोने-चांदीचे भाव, भाजी भावातील चढ-उतार सर्व कळत. BREAKING NEWS च्या नावाखाली अनेक बातम्या कानावर पडतात. कोण कोणाबरोबर पळून गेली, बाॅलीवूड, टाॅलीवूड च्या सर्व बातम्या किती खर्या किती खोट्या हे ऐकणार्याला आपल्या बुद्धीचा वापर करून ठरवायच असत. त्याकडे दुर्लक्ष करायच की लक्षात ठेवायच. हे ही ठरवायच असत.

जर चार बहीण भावांचा एक परिवार असेल तर त्यांच्या घरच्या, याच्या माहेरच्या, तिच्या सासरच्या, त्यांच्या मुलांच्या, जावयांच्या, चूलत, मावस भावडांचे परिवारही असतातच की. इकडच्या तिकडच्या अनेक बातम्या असतातच की.

मग ही BBC news reader आपल्या स्वभावानुसार, आपल्या आवडत्या नावडत्या लोकांना त्या बातम्या आधी एकत्र करणार, मग सांगणार. आवडत्या आणि नावडत्या लोकांना बातम्या सांगायची पद्धत, बातम्यांचा क्रम ब्रेकिंग न्युज वेगवेगळी असते. कोणाला काय सांगायच? काय नाही? याचा विचार करण्या एवढे हे हुशार असतात. कोणाचे कान भरायचे. याचा अभ्यास छान केलेला असतो. कोण कच्च्या कानाचे आहेत? हे सर्व लक्षात ठेवाव लागत.

मला असं कळलं… खर की खोट माहित नाही… अस म्हणून एखादी फुलझडी सोडण सहज जमत त्याना.

मी फक्त तुम्हाला सांगतेय हं! कोणाला सांगू नका. हे वाक्य तर हमखास सर्वांनाच कधी न कधी म्हंटलेलच असत.

अशा लोकांचा मुख्य टाईम पास हाच असतो. आता फोन असल्यामुळे हे काम सोप्प झालय. आणि वेळ छान जातो.. इकडची बातमी तिकडे, तिकडची इकडे. यासाठी खूप मोठी डिग्री, ज्ञान लागत नाही. फक्त वेळ द्यावा लागतो.

एखाद्या/ एखादीला फोन करायच्या आधी त्यांच होमवर्क झालेले असत. कारण सांगितलेल्या गोष्टीचा प्रभाव पडायला पाहिजे ना. तरच तर उद्देश्य सफल होतो. त्या बातमीत किती मसाला टाकायचा, त्याला किती चरफरीत करायचे की गोड पदार्थ करायच हे फोन रिसीव करणार्या व्यक्ती बरोबर त्यांचे संबंध कसे आहेत? यावर अवलंबून असत.

कोणाच लग्न मोडल. कोणाच सूनेबरोबर पटत नाही, कोणाला दारूच व्यसन आहे.

आता व्यसनची डिग्री कमी जास्त करणे हे त्यांच्या सांगण्यावर, आवाजावर अवलंबून असत. Voice modulation जमते त्यांना. कधी कधी एखादी बातमी सांगताना असूरी आनंद ही त्यांच्या आवाजात जाणवतो. म्हणजे तसे ते हुशार असतात.

ही एक कला आहे सर्वांना जमतच अस नाही. त्यासाठी तो Interest, practice, रोज चार तास फोन करायची हौस असावी लागते. ऐर्यागैर्याचे काम नाही ते.

आपल्या घरापेक्षा दुसर्यांच्या घरात जास्त interest असावा लागतो.

मधून मधून स्वतः ची श्रीमंती, स्वतः ची हुशारी बोलायला विसरत नाहीत.. खूप बोलताना आपल्या घरच्या काही गोष्टी पण सांगून टाकतात. आणि स्वःतच मनोरंजनाचे पात्र बनतात.

काय आहे… रोज डेटा फ्री मिळतोच. मग स्वस्तातला हा छंद छान आहे.

उरलेला वेळ You tube च्या बातम्या, whats app वर आलेले मेसेजेस असतातच, ते forward करायचे. हा पण एक added छंद असतो.

हुशार माणसाला अशा लोकांशी सावधान रहाव लागत.

मला कधी कधी अशा लोकांच खूप कौतुक वाटत. किती वेळ, किती energy, खर्च करतात. त्यांचा फोन आला की लगेच लक्षात येत आज काही तरी विशेष ऐकायला मिळणार. त्यांच्याकडे वेळ भरपूर असतो. आपल्याकडे किती वेळ आहे हे बघून फोन घ्यायचा की नाही हे ठरवायच असत.

AIR / BBC च्या बातम्या ऐकून आपण नेहमी बोअरच होतो अस नाही, कधी कभी मजाही येते नाही का?

खरतर ही अशी माणस आपल्या आयुष्यात रंग भरतात.. म्हणजे प्रयत्न करतात. मनोरंजन करतात.

शोधून बघा तुमच्या परिवारात / मोहल्ल्यातही अशी एखादी व्यक्ती आहे का?? …

थोडा डेटा… खूप मजा… छंद किती स्वस्त आहे. कष्ट नको… ज्ञान नको… पलंगावर पडल्या पडल्या वेळ कसा मस्त जातो…

 

© संध्या बेडेकर 

वारजे, पुणे.  

7507340231

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९७ आणि ९८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्री विश्वास देशपांडे

? इंद्रधनुष्य ?

☆ मनाचे श्लोक – एक सार्वकालिक ‘मनोपनिषद’… – श्लोक ९७ आणि ९८ ☆ श्री विश्वास देशपांडे ☆

श्लोक क्र. ९७ – – – 

मुखी नाम नाही तया मुक्ती कैंची ।

अहंतागुणे यातना ते फुकाची ।

पुढे अंत येईल तो दैन्यवाणा ।

म्हणोनि म्हणा रे म्हणा देवराणा ।।९७।।

अर्थ : ज्याच्या मुखी भगवंताचे नाम येत नाही त्याला मुक्ती कशी मिळणार? कर्तेपणाच्या अहंकारातून माणसाला विनाकारण यातना भोगाव्या लागतात. शेवटी मृत्यू येतो तो सुद्धा अत्यंत करुणाजनक. म्हणून सर्वानी भगवंताचे नाम घ्यायलाच हवे.

विवेचन : आयुष्यभर भगवंताचे नाम घ्यायचे नाही, भक्ती करायची नाही आणि अंतकाळी भगवंताने आपल्याला मुक्ती द्यावी अशी अपेक्षा करायची. पण काही केलेच नाही तर मुक्ती मिळेल कशी? मुक्तीची अशी अपेक्षा करणे म्हणजे शेतात धान्य पेरण्याचे श्रम करायचे नाहीत आणि आयते धान्य किंवा पीक आपल्या घरात येईल अशी अपेक्षा करण्यासारखेच आहे. आपल्याला आपल्या कर्तेपणाचा भयंकर अभिमान असतो. मी हे केले, मी ते केले. माझ्यामुळेच सगळे होते आहे असा अभिमान मनुष्य बाळगतो. पण शेवटी एक दिवस हा कर्तेपणाचा फुगा फुटतो. वृद्धापकाळी मुले, सुना विचारत नाहीत तेव्हा मनात निराशा घर करते. मी आयुष्यभर एवढे कष्ट केले, मुलांना शिकवून मोठे केले, त्यांचे लग्न केले. पण एवढे असूनही ते माझ्याकडे लक्ष देत नाहीत. आपण दुर्लक्षित आहोत ही भावना सर्वात जास्त अस्वस्थ करणारी असते.

गोंदवलेकर महाराज म्हणतात, ” देहाने कर्म करा, पण कर्तेपण स्वतःकडे घेऊ नका. कर्ता राम आहे असे म्हणा. ” आपले चुकते ते इथेच. आपण कर्तेपण रामाकडे देत नाही. म्हणून आपल्याला अपेक्षाभंगाचे दुःख भोगावे लागते. त्याशिवाय कर्तेपणाच्या धुंदीत भगवंताचे नाम घेतो कोण? निदान निवृत्त झाल्यावर तरी भगवन्नामात रमण्याची सवय लावून घ्यावी. ही सवय लागली तर संसाराचा मोह हळूहळू कमी होतो, आसक्ती कमी होऊ लागते. अशा परिस्थितीत मृत्यू आला तरी तो सुखाचा होतो. पण ही सवय नसेल तर मृत्यूप्रसंगी देखील संसारातील आसक्ती कमी होत नाही. जो मनुष्य नाम घेत नाही त्याचा अंत दीनवाणा होतो. म्हणून समर्थ म्हणतात प्रत्येकाने देवाचे नाव घ्यावेच घ्यावे. समर्थ आपल्या एका अभंगात म्हणतात, ” काळ जातो क्षणक्षणा । मूळ येईल मरणा । काही धावाधाव करी । जंव तो काळ आहे दूरी ।।”

स्वसंवाद :: 

१. माझ्या कुटुंबासाठी किंवा व्यवसायासाठी केलेल्या कष्टांमध्ये मी ‘मी केले’ हा कर्तेपणाचा अहंकार बाळगून विनाकारण मानसिक यातना तर ओढवून घेत नाहीये ना?

२. गोंदवलेकर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, मी माझे कर्तव्य चोख पार पाडताना “या सगळ्याचा कर्ता-धर्ता तो प्रभू श्रीराम आहे” हा भाव मनात ठेवू शकतो का?

३. “मी मुलांसाठी एवढे केले तरी ते मला विचारत नाहीत” या विवंचनेत जगण्याऐवजी, मी आतापासूनच भगवंताच्या नामात रमून संसाराची आसक्ती कमी करण्याचा प्रयत्न करतोय का?

 ४. समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे जर काळ क्षणोक्षणी पुढे जात आहे आणि मृत्यू अटळ आहे, तर मग माझ्या उद्धारासाठी ‘देवराणा’ श्रीरामाचे नाव घेण्यास मी अजून उशीर का करत आहे?

=====

श्लोक क्र. ९८ – – – 

हरीनाम नेमस्त पाषाण तारी ।

बहु तारिले मानवदेहधारी ।

तया रामनामीं सदा जो विकल्पी ।

वदेना कदा जीव तो पापरूपी ।।९८।।

अर्थ : भगवंताच्या नामाने खरोखर पाषाणही तरले आहेत. रामनामाने अनेक माणसे तरून गेली आहेत. पण काही माणसांच्या मनात रामनामाबद्दल नेहमी विकल्प म्हणजे संशय असतो. असे जीव म्हणजे खरोखर पापी समजावे की ज्यांच्या मुखात रामनाम येत नाही.

(नेमस्त – खरोखर, विकल्प – संशय/शंका, वदेना – बोलत नाही)

विवेचन : रामनामाचे महत्व वर्णन करताना समर्थ म्हणतात की रामनामाने खरोखरीच पाषाण देखील तरले. पाषाण म्हणजे दगड. बुडणे हाच त्याचा धर्म आहे. जो त्याचा संग करील त्याला देखील तो घेऊन बुडतो. परंतु रामनामाची महती एवढी आहे की पाषाणाच्या या मूळ स्वभावात देखील अंतर्बाह्य बदल झाला. पाण्यात बुडणारा पाषाण चक्क रामनामामुळे पाण्यावर तरंगू लागला. या ठिकाणी रामायणातील सेतुबंधनाचा संदर्भ आहे. श्रीरामांना लंकेला जाण्यासाठी समुद्र उल्लंघून जायचे होते. पण जायचे कसे हा मोठा प्रश्न होता. अशा वेळी वानर सेनेतील नल, नील, जांबुवंत आणि हनुमान यांच्या साहाय्याने हा सेतू बांधण्यात आला. अर्थात यात प्रत्येकाचीच मदत झाली. अगदी खारीची देखील! रामनाम लिहिलेले दगड सागरावर तरंगू लागले आणि पाहता पाहता चक्क समुद्रावर पूल तयार झाला. हा पूल पार करून रामाची सेना लंकेला पोचली.

दगड हे रूपक आहे. या संसारसागरात ज्याने रामनामाचा आश्रय घेतला नाही असा मनुष्य देखील पाषाणासमानच आहे. पण जर तो रामनामाचा आश्रय घेईल तर या भवसागरातून तो निश्चितपणे तरून जाईल यात शंका नाही. रामनामाने तयार झालेला हा पूल माणसाला भवसागर पार करण्यासाठी मदत करेल आणि त्याच्या मदतीने तो निश्चितपणे परमेश्वरापर्यंत पोहोचेल यात शंका नाही. ‘ नाम आहे आदी अंती, नाम सर्व सार, आहे बुडत्याला नौका ठेवली आधार ‘ हे अगदी खरे आहे. म्हणून आपले सर्व कर्म नाममय झाले पाहिजे.

परंतु एवढे उदाहरण डोळ्यासमोर असूनही माणसाच्या मनात रामनामाबद्दल शंका असतात. खरेच रामनामात एवढे सामर्थ्य आहे का? नुसते रामनाम मला तारील का? असा माणूस नाम घेण्याचे टाळतो. रामनामाचे विस्मरण होणे हे पाप आहे. पण माणसाची देहबुद्धी अत्यंत प्रबळ असते. बाह्य दृश्यात त्याचे मन रमलेले असते. त्याची दृष्टी अंतराकडे म्हणजे आतमध्ये वळत नाही. अंतरात्म्याला तो जाणून घेऊ इच्छित नाही. अशा माणसाला वेद, पुराणे, शास्त्रे किंवा संतांनी कितीही समजावून सांगितले तरी त्याची खात्री पटत नाही. अशा माणसांच्या मुखी भगवंताचे नाम येत नाही. भगवंताचे नाम मुखी यायला देखील भाग्य लागते. पूर्व जन्मीच्या पापामुळे अशा व्यक्तींना भगवंताचे नाम घेण्याची बुद्धी होत नाही. पण ज्यांना कळते आहे त्यांनी तरी रामनाम अवश्य घ्यावे. कोणाच्या सांगण्याची वाट पाहू नये.

स्वसंवाद ::

१. ज्याप्रमाणे रामनामाने समुद्रावरील जड पाषाणही तरंगले, त्याप्रमाणे माझ्या मनातील संसाराचे जड विचार आणि चिंता दूर करण्यासाठी मी रामनामाची नौका धरली आहे का?

२. “नुसते नाम घेऊन काय होणार? ” अशा कुठल्यातरी ‘विकल्पाने’ (संशयाने) माझे मन घेरलेले आहे का? हा संशय दूर करण्यासाठी मी कधी नाम घेऊन अनुभव पाहीला आहे का?

३. सेतुबंधनातील खारीप्रमाणे, मी माझ्या आयुष्यात परमेश्वराच्या कार्यात किंवा सत्कर्मात माझा खारीचा वाटा उचलण्यास तयार असतो का?

४. माझी दृष्टी केवळ बाह्य दृश्य विश्वातील आकर्षणांमध्येच गुंतून पडली आहे, की मी माझ्या अंतरात्म्याला जाणून घेण्यासाठी कधी अंतर्मुख होतो?

– क्रमशः श्लोक ९७ आणि ९८

© श्री विश्वास देशपांडे

चाळीसगाव

प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२

≈संस्थापक संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares