मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे —सूत्र २८ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

श्री संदीप रामचंद्र सुंकले

? इंद्रधनुष्य ?

☆ ।। श्री नारद उवाच ।। – नारद भक्ति सूत्रे — सूत्र २८ ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆

।। श्री नारद उवाच ।। 

नारद भक्तीसूत्र २८ . 

तस्या ज्ञानमेव साधनमित्येके ॥ २८ ॥

अर्थ : त्या (भक्तीचे) ज्ञान हेच साधन आहे असे कोणी (आचार्य) म्हणतात.

विवेचन: भक्ती ही कर्म, ज्ञान, योग यापेक्षा श्रेष्ठ आहे. ती फलरूपा आहे असे मागील काही सूत्रात स्पष्ट सांगितले गेले आहे. जर ती फल म्हणजे साध्यच असेल तर तिला कोणत्या तरी साधनाची अपेक्षा असणारच. साधनाविना साध्यप्राप्ती होऊ शकत नाही. 

आपल्याकडे चार प्रकारचे भक्त सांगितले आहेत. आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. त्यात ज्ञानी भक्तच श्रेष्ठ असे मानले जाते. श्रीज्ञानेश्वरमहाराजांनी अनेक ठिकाणी या विषयाचा विचार केला आहे. ज्ञान नसेल तर भक्ती होणार नाही, असेही म्हटले जाते. ज्ञान नसेल तर भगवंताचे यथार्थ स्वरूप कळू शकणार नाही. अन्यथा मनुष्य क्षुद्र देवतांच्या भजनी लागू शकतो. समर्थांनी त्यांच्या काळात अशा क्षुद्र देवतांना मुक्ति दिली आहे असल्याचे आपल्या लक्षात येईल. भक्ति करण्यासाठी ज्ञान पाहिजे असे त्याचे म्हणणे असते असे काही चिंतकांचे मत आहे. 

येथे ज्ञान हा शब्द थोडा संदिग्ध वाटतो. भक्तीचे जसे स्वरूप घेतले जाईल तसे ते ज्ञान ठरणार, नाही का? निराकार, निर्गुण परमात्मस्वरूपाची भक्ती मानली तर त्या स्वरूपाचे ज्ञान उपनिषदादी प्रमाणांवरून होते आणि सगुण साकाराची मानली तर त्याचे अनंत गुण, अनंत लीला, माधुर्य, सौंदर्य तसेच रूप, आकार, त्यांचे अनेक प्रकार इत्यादिकांचे ज्ञान मानावे लागते. मागील काही सूत्रांत व्यास-गर्ग-नारद याची मते आपण अभ्यासली आहेत. त्यावरून त्यांना केवळ निर्गुण-निराकाराचे ज्ञान येथे अभिप्रेत आहे असे जाणवत नाही. कारण त्या ज्ञानात मुक्ती हे साध्य आहे, भक्ती नाही. ज्ञान हे त्या भक्तीचे सर्वश्रेष्ठ साधन असते तर गीता व भागवत एकादश स्कंधामध्ये भक्तीमध्ये अन्य साधनांचा निषेध केला गेला नसता.

यज्ञ-ज्ञान-तपें केली, वेदाभास ही साधिला|

तरी दर्शन हे माझे, न लाभले तुज||”

(गीताई ११.५३)

संत एकनाथ महाराज आपल्या भागवतात लिहितात की भक्तीनेच ज्ञानाची प्राप्ती होत असते.

“माझें भजन करितां । न पडे ज्ञानाची पंगिस्तता । 

माझे भजनें नित्यमुक्तता । जाण मद्‍भक्तां मद्‍भावें ॥५८॥ 

*

ज्ञानेंवीण भक्ति न घडे । म्हणती तें शब्दज्ञान धडफुडें । 

भक्तीस्तव जाण रोकडें । ज्ञान जोडे अपरोक्ष ॥५९॥

(एकनाथी भागवत अध्याय ११)

पुढील सूत्रात भक्ति मुळेच ज्ञानाची प्राप्ती कशी होते ते तपशिलात पाहू . 

।। जय जय रघुवीर समर्थ ।।

।। नारद महाराज की जय!!! ।।

– भक्ती सूत्रे क्र.२८

© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)

थळ, अलिबाग. 

८३८००१९६७६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ पावसा पावसा… कवयित्री : सुश्री सुचेता गोखले ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

सुश्री सुनीला वैशंपायन 

? वाचताना वेचलेले ?

☆ पावसा पावसा… कवयित्री : सुश्री सुचेता गोखले ☆ सुश्री सुनीला वैशंपायन ☆

☆

पावसा पावसा कुठे आहे तुझे गाव

जाण्याचे म्हणून तू घेतच नाहीस नाव .. 

*

ग्रीष्मात तुझे आम्ही केले स्वागत

चिकटूपणा भारी तुला आहे अवगत .. 

*

अवनी तहानेने झाली होती व्याकुळ

साद तिची ऐकून, घातलास तू धुमाकुळ .. 

*

चिंब ओली धरणी मग कित्ती सुखावली 

निसर्गात मग कुंद धुंद हिरवाई पसरली .. 

*

बाळराजे अंगणात नाचू लागले थय थय 

बळी राजा झाला प्रसन्न,बघून ओले वलय .. 

*

हिरवी शाल लेवून, ही अवनी नटली

नव चैतन्याने सृष्टी जणू  मोहरली .. 

*

विठ्ठलाच्या वारीमध्येसुद्धा तू भेटलास

रेनकोट घालून तू सुद्धा लेझीम खेळलास .. 

*

बाप्पा आले घराघरात ,घडला सत्संग

पाऊस गाणी गात भक्तगण झाले  दंग .. 

*

तुझ्या साक्षीने पार पडले नवदुर्गा पूजन

नवरंगी छत्र्या घेऊन आले रसिक जन .. 

*

आली दिवाळी, मनी आले, गेली तुझी स्वारी !

.. .. फराळ,फटाके,अभ्यंग आणि रांगोळ्या,

    बासुंदी,करंजी आणि श्रीखंडात चारोळ्या.

      सरली की दिवाळी .. . आणि अरेच्चा .. 

      आला का तू पुन्हा !!! 

आता काय ??? 

.. .. आता पतंग उडवतच जाणार का रे राजसा ….

*

कवयित्री : सुचेता गोखले

संग्रहिका : सुनीला वैशंपायन

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तू… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ तू… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

☆

तू रे सुखा जरासा दिलदार मित्र हो ना

केंव्हातरी गुलाबी तू प्रेम -पत्र हो ना

*

नुस्त्याच कल्पनेने पाहू तुला कसे रे

दृष्टांत..रंग..रूपे थोडा सचित्र हो ना

*

वैराण माळ पायी.. माथ्यावरी उन्हाळे

तू मोडके तरीही डोईस छत्र हो ना

*

आयुष्य हाच आहे रे यक्ष-प्रश्न माझा

तो सोडवावया तू सोपेच सूत्र हो ना

*

प्रत्येक वेळ आहे येथे रणांगणीची

रे जीवना मवाळा, तू ही सशस्त्र हो ना

*

होवून सूज्ञ, दुःखी-कष्टीच व्हायचा तू

विक्षिप्त अन् जरासा ढोंगी.. विचित्र हो ना

*

ही भांडणे..लढाया..आकांत..सांत्वने ही

आता निवांततेचे अंतीम-सत्र हो ना

*

आजन्म आटलेला.. आजन्म साठलेला

माझे खळाळणारे विस्तिर्ण पात्र हो ना

*

काही न भव्य आता काही न दिव्य आता

स्फूर्ती मिळेल ज्याने ते तू चरित्र हो ना

*

भेटोत ही शकूनी, होवोत लाख शत्रू

माझा सखा ‘सुदामा’ तू एकमात्र हो ना

*

अंधार बारमाही वाट्यास जीवनाच्या

कोजागिरी प्रमाणे तू एक रात्र हो न

☆

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – कोणाच्या आधारे करू मी विचार… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – कोणाच्या आधारे करू मी विचार… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

☆ तुका म्हणे ☆

काव्यानंद

कोणाच्या आधारें करूं मी विचार/

कोण देईल धीर माझ्या जीवा//१//

 *

शास्त्रज्ञ पंडित नव्हें मी वाचक /

यातिशुद्ध एक ठाव नाहीं//२//

 *

कलियुगीं  बहु कुशळ हे जन /

छळितील गुण तुझे गातां //३//

 *

मज हा संदेह झाला दोन्हीं सवा /

भजन करूंं देवा किंवा नको //४//

 *

तुका म्हणे आतां दुराविता जन /

किंवा हे मरण भले दोन्ही//५//

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

आपल्या सभोवताली निर्माण झालेले सामाजिक वातवरत पाहून त्याच्या वर वैतागलेले तुकाराम महाराज देवालाच म्हणतात.अशा या जाचातून जाणा-या कठीण काळात कोणाच्या आधारावर कोणता विचार करू. या नाजूक वेळी मला कोण आधार देईल.मी कोणी फार मोठा शास्त्रज्ञ पंडित किंवा वाचकही नाही.तसेच मी उच्य कुळात जन्मलोयकी नाही हेही मला निपटणे ठाऊक नाही.

या कलियुगात लोक फारच कुशल आणि हुशार आणि चाणाक्ष झाले आहेत.मी तुझे गुण गाणं करतो. तुझी मनोभावे पूजा करतो. केवळ तुझेच नामस्मरण करतो . म्हणून त्यांनी माझा छळवाद मांडला आहे. म्हणूनच माझ्या मनात त्यांच्या विषयीचा संदेह आणि संशय आता बळावत चालला आहे. तेव्हा मी तुझे भजन‌पुजन आणि नामस्मरण करावे की नको हे आता तूच मला सांग. माझ्या मनाला आता कठीण पेच पडला आहे. मी हे माझे कार्य बंद केले तर जन लोकासोबत जोडलेला मी माझा संपर्क हरवून बसेन. लोक माझ्यापासून दूर जातील ते मला नको आहे. तुझे नामस्मरण बंद करणे आणि जनलोकापासून दूर जाणे या दोन्ही गोष्टी माला मरणा सारख्याच वाटतात. आता या पेचातून तुझ्या वाचून माझी सुटका कोणीही करू शकत नाही. तुकाराम महाराजाना छळणा-या लोकांच्या होणा-या त्रासामुळे ते किती हैराण झाले होते हे यावरून कळते. म्हणूनच त्यांनी आपली व्यथा इतराना न सांगता ती प्रत्यक्षात देवापुढेच मांडली आहे .

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ही वाट ‘वाट’ लावे ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ही वाट ‘वाट’ लावे…? श्री अमोल अनंत केळकर ☆

(दिवाळी सुट्टी संपवून सुट्टीच्या शेवटच्या रविवारी आपल्या गावाकडून, कामाच्या ठिकाणच्या गावाकडे येतानाचा अनुभव …… गाव सोडून जायची हुरहुर आता मागे पडून,  ट्रॅफिक जाम ची भीती ही सध्या वरचढ ठरतीय)

(शांता शेळके यांची माफी 🙏मागून )

*

ही वाट ‘वाट’ लावे, पुण्याबाहेरच्या गावा

माझ्या मनातला का, तेथे रस्ता नसावा?

ही वाट ‘वाट’ लावे,

**
जिथे तिथे घुसाया, वाहन आसुलेले

नाक्यावरती टोलच्या, मडगाड ठोकलेले.

इथे मोठ्या खड्ड्यांनी, टायर फुस्स व्हावा

*

माझ्या मनातला का, तेथे रस्ता नसावा?

ही वाट ‘वाट’ लावे,

**

घे वाहन कडेला, थांबून ढाब्यापाशी

लागून भूक भारी मग खा वडा पावाशी

एकदाच  ‘जी – पे’  चा, पासवर्ड विसरावा

*

माझ्या मनातला का, तेथे रस्ता नसावा?

ही वाट ‘वाट’ लावे,

**

स्वप्नामधील गावा, पुण्यातून न जावे

स्वप्नामधील रस्त्याला, स्पिड ब्रेक न यावे

स्वप्नातल्या सुखाचा ,’टुकार’ वेध घ्यावा

*
माझ्या मनातला का, तेथे रस्ता नसावा?

ही वाट ‘वाट’ लावे,

**

© श्री अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com, a.kelkar9@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # २८९ ☆ पंख… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # २८९ ?

☆ पंख… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

☆

खूप पूर्वी तू कापलेस,

माझे पंख,

मी उडू नये फार दूरवर म्हणून,

पण कुठले बळ घेऊन,

मी उडू शकले—

तुझ्या मनाविरुद्ध…माहित नाही !

 

तेव्हा ती माझी बंडखोरीच होती,

बाईला चार भिंतीत डांबून,

ठेवणाऱ्या पुरूष प्रधान

संस्कृती विरूद्ध ची!

आठवायचा कुठल्याशा

हिंदी सिनेमातला डायलॉग,

“शरीफ खानदान की औरते,

घरकी चार दिवारी को कैद नही माना करती!”

 

पण मी ओलांडून उंबरठा,

स्वतःला सिद्ध करताना,

सुखावत होते कुठेतरी,

१९७५ सालच्या,

माझ्या स्त्रीमुक्तीच्या कवितांना,

जागल्याने!

 

पण या सांजसमयी,

तू व्याधींनी ग्रस्त असताना,

तू माझे पंख नाही कापलेस…..

सक्तीचे बंदी बनण्याचे फर्मान काढून,

त्याला एक सोज्वळ नाव दिलेस,

पातिव्रत्य धर्माचे!

आता मावळले आहे माझे ही तेज,

आणि मी ही —

लावून घेतली आहेत,

घराची सर्व कवाडे आतल्या बाजूने घट्ट!

 

हे प्रायश्चित्त की पराभव  ??

स्वतःच्या स्त्रीत्वाचा !!

माहित नाही !

☆

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भाषा मराठी… ☆ श्री विष्णू सोळंके ☆

श्री विष्णू सोळंके

? कवितेचा उत्सव ?

☆ भाषा मराठी… ☆ श्री विष्णू सोळंके ☆

☆

संस्कार, संस्कृती जपते भाषा मराठी

माणसा माणसाला जोडते भाषा मराठी… १

*

चक्रधर, म्हाईंभट सातवाहन आधारवड

संतसाहित्य, ज्ञानेश्वरी जपते भाषा मराठी… २

*

मढैकर, केशवसुत, फुले आणि कुसुमाग्रज

अमृतातेही पैजा जिंकते भाषा मराठी… ३

*

तीन हजार वर्षे जुना तीचा इतिहास

आता अभिजात ठरते भाषा मराठी… ४

*

संस्कृत प्राकृत मागधी पैशाची स्वरूप

शाहिरी पोवाड्यात रंगते भाषा मराठी… ५

*

तुका ज्ञानेश्वर नामदेव जनाबाई मळा

पंढरीत वारीमध्ये नाचते भाषा मराठी… ६

*

माझी माय मराठी माथी अभंग टिळा

संवाद संस्कृती जपते भाषा मराठी… ७

☆

© श्री विष्णू सोळंके

काव्य संध्या, मुदलियारनगर अमरावती ४४४६०६ – मो ७०२०३००८२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३०४ ☆ पावसा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३०४ ?

☆ पावसा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

☆

पावसा आता तुला कंटाळले

जा म्हणूनी हात आहे जोडले

*

काल मी आतूर होते भेटण्या

भेट पहिली छान होते नाचले

*

भंग केला तू कराराचा असा

वागणे आहे तुझे हे टोचले

*

मित्र होता आज झाला शत्रु तू

तू तुडवता शेत माझे लोळले

*

एवढ्या वर्षात नाही जाहला

वेधशाळा देत आहे दाखले

*

सांगना तू काय आता खायचे

तू बरसला पीक सारे नासले

*

गाळ हा शेतात होता साचला

वाटले मी विस्तवातुन चालले

☆

 © अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तुकया खरा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ तुकया खरा… ☆ श्रीशैल चौगुले ☆

☆

तुकयाची भाषा विनाशीत दोषा

ज्ञानीयास रोषा गगनापरी.

*

अज्ञानाचे मुळ अभंडाचा अहं

शरिराचा स्वयं थोतांडराजा.

*

संताचीये बोध आत्मभक्ती शोध

परमात्मा वेध विठ्ठलध्यान.

*

अचाटाची गाथा मार्तंडाशी लाथा

घालीतसे गीता तुकातत्वांनी.

*

उपमाही सत्य सुर्य-चंद्र नित्य

दर्शनास पथ्य संतवचने.

 ☆

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वणवण बळीराजाची… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? वणवण बळीराजाची…? श्री आशिष  बिवलकर ☆

☆

बरसू लागलेत काळे ढग,

बरसू लागलेत डोळ्यातून अश्रू |

जणू दोघांत लागलीय स्पर्धा,

बळीराजा म्हणे कुठं दुःख विसरू |

*

उभी पीकं झोपली शेतात,

दाण्यादाण्याला फुटला अंकुर |

फुटलं नशीबच सारं आता,

निसर्गा एवढा कसा झालास क्रूर |

*

हताश झालाय रे बळीराजा,

अस्मानी सुलताना आता घे आवर |

पीक नाही आलं हाताशी,

भकास झालाय शेतीतला वावर | 

*

ऐन सणावाराला ऐन दिवाळीत,

बळीराजाचं तोंड झालंय कडू |

हुंदक्यात जगण्याची भैरवी गातो,

शेतकऱ्यांना कोसळू लागलंय रडू |

*

फाटकच लुगडं कारभारणीला,

फाटकीच लाज झाकाया लंगोटी |

लेकरंबाळं उघडी फिरती गावात,

पिकाविना शेतीच झाली वांझोटी |

*

मायबाप सरकार झालं बहिरं,

बळीराजाचा आक्रोश ऐकूच येईना |

बळीराजाची जगायची वणवण,

दाही दिशा काही केल्या संपेना |

©️ वास्तवरंग

☆

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares