मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #३०१ ☆ भूमिका… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

 

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # ३०१ ?

☆ भूमिका… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

सर्व निजानिज झाल्यानंतर निजते बाई

सूर्य उगवण्या आधी रोजच उठते बाई

*

चारित्र्याला स्वच्छ ठेवण्या झटते कायम

कपड्यांसोबत आयुष्याला पिळते बाई

*

चूल तव्यासह भातुकलीचा खेळ मांडते

भाकर नंतर त्याच्या आधी जळते बाई

*

ज्या कामाला किंमत नाही का ते करते ?

जो तो म्हणतो रिकामीच तर असते बाई

*

सासू झाली टोक सुईचे नवरा सरपण

रक्त, जाळ अन् छळवादाने पिचते बाई

*

तिलाच कळते कसे करावे गोड कारले

कारल्यातला कडूपणाही गिळते बाई

*

पत्नी, मुलगी, बहीण, माता, सून, भावजय

एकावेळी किती भूमिका करते बाई

अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रिद्धीसिद्धीच गोंदणं… ☆ प्रा. भरत खैरकर☆

प्रा. भरत खैरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ रिद्धीसिद्धीच गोंदणं… ☆ प्रा. भरत खैरकर 

तळ्याच्या तळी साठले आभाळ

असा अनंताचा अनोखा मायाजाळ!

*

विजेची जळते रेघ आकाशात

प्रकाशतो जसा अज्ञाताचा हात!

*

उतरे धरेवरी  लडीवाळ उन्हं

नको वाटे मग सावलीचं जीणं!

*

पौर्णिमेच्या पावलांनी अंगणात ये चांदणं

नव्या वाटा सजविते रिद्धीसिद्धीचं गोंदणं!

 

© प्रा. भरत खैरकर

संपर्क – बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ तुका म्हणे – पडिलो भोवनी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? काव्यानंद ?

☆ तुका म्हणे – पडिलो भोवनी… – अभंग रचना ☆ रसग्रहण – प्रा तुकाराम दादा पाटील ☆

तुका म्हणे

*

पडिलों भोवनीं

बहु चिंतवणी //१//

*

होतो चुकलो मारग /

लाहो केला लागवेग //२//

*

इंद्रियांचे संधी /

होतो सापडलो बंदी //३//

*

तुका म्हणे बरे झाले/

विठ्ठलसें वाचे आले //४//

*

– संत तुकाराम.

 *

तुका म्हणे

मी जन्म घेतला तेव्हापासूनच संसाराच्या भोव-यात अडकून पडलो होतो. खूप अडचणीत अडकलो होतो. खरे तर मी निवडलेला माझा रस्ताच चुकला होता.

मी मग लगबग करून तो बदलूनच टाकला. इंद्रिय सुखाच्या जाळ्यात अडकल्यामुळे मी तिथेच पुरता बंदिवान झालो होतो. गुरफटून गेलो होतो. पण मग अचानक पुढे विठ्ठलाचे नाव माझ्या मूखी आले.मी त्याच्या नामाचा नामघोष चालू केला आणि त्या जंजाळातून माझी सुखरूप सुटका झाली.हे खूप बरे झाले.

प्रपंच करताना सतत येणा-या अडचणीतून कुणाची कधीच सुटका होत नाही. त्या अडचणी कुणालाही टाळता येत नाहीत.त्या मुळे संसारात गुंतलेला माणूस सतत चिंताग्रस्त असतो.त्या मुळेच तो इंद्रिय सुखाच्या मागे लागतो आणि तेथेच कायमचा गुंतून पडतो.पण जेव्हा असे होवू लागते तेव्हा आपला रस्ता चुकला आहे हे त्याच्या ध्यानात यायला पाहिजे. आपण प्रापंचिक चिंतेतच गुंतून पडलोय, इंद्रिय सुखाच्याच मागे धावतोय हे काही बरे नाही असे वाटायला पाहिजे. यातून आपण बाहेर पडण्यासाठी धडपड केली पाहिजे हे सुचले पाहिजे. अशावेळी शांतचित्ताने मुखाने विठ्ठलाचा नामघोष केला तरी पुरेसे आहे. केवळ तसे केले तरी या सतावणा-या चिंतेत पासून आपली मुक्तता होईल. आणि मुक्तीचा सन्मार्ग आपल्याला नक्कीच सापडेल. पण त्यासाठी प्रबळ इच्छा शक्ती मात्र निर्माण करायला हवी. सामान्य माणसाला येवढे करणे सहज शक्य आहे. असे तुकाराम महाराज येथे सांगतात.

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ फुले.. फुले.. अन् फुले… ☆ प्रस्तुती – सौ. जयश्री पाटील ☆

सौ. जयश्री पाटील

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ फुले.. फुले.. अन् फुले… ☆प्रस्तुती – सौ. जयश्री पाटील ☆

किती छान लिहिले आहे, फुलांविषयी.. केवढी क्रियापदे.. केवढी विशेषणे…. कमाल आहे आणि प्रत्येक गोष्ट मनाला पटते!

फुले माळावी मोगर्‍याची

फुले वेचावी पारिजातकाची

फुले जपावी बकुळीची

फुले दरवळावी चाफ्याची

फुले खुलावी गुलाबाची

फुले वाहावी अनंताची

फुले बहरावी बहाव्याची

फुले घमघमावी रातराणीची

फुले फुलावी कमळाची

फुले रंगावी जास्वंदाची

फुले झुलावी मधुमालतीची

फुले भरावी केळ्याची

फुले मोहरावी आंब्याची

फुले ओघळावी बुट्ट्याची

फुले दिखावी बोगनवेलीची

फुले स्मरावी बाभळीची

फुले लाघवी अबोलीची

फुले निगर्वी गोकर्णीची

फुले उधळावी झेंडूची

फुले तोलावी केशराची

फुले उमलावी ब्रम्हकमळाची

फुले निरखावी कृष्णकमळाची!

 

लेखक: श्री. पु.ल.देशपांडे

संग्राहिका –  सौ. जयश्री पाटील

विजयनगर.सांगली.

मो.नं.:-8275592044

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ ध्यास… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ध्यास…? श्री आशिष  बिवलकर ☆

जमीनदोस्त झालं तरी,

जगण्याचा ध्यास आहे |

उखडलं जरी मुळांना

जमिनीशी कास आहे |

*

वादळाने झोपवलं तरी,

उभे राहण्याची जिद्द आहे |

येईल त्या परिस्थितीशी

लढण्याचा निश्चय सिद्ध आहे |

*

कितीही संकटे आली तरी,

झेलण्याची हिम्मत आहे |

ध्येय ठेवून जगण्याला,

जीवनात किंमत आहे |

*

ऋतू चक्राच्या फेऱ्यात,

शिशिरात पानगळ आहे |

नवचैतन्य देणाऱ्या वसंतात,

जगणं उजळ आहे |

*

आघात जरी झाले तरी,

उभं राहण्याचा संयम आहे |

सगळेच दिवस सारखे नसतात,

निसर्गाचा तो नियम आहे |

*

जन्माला आलेलं सारं जरी,

उद्या भविष्यात नश्वर आहे |

सकारात्मक वर्तमानात,

प्रयत्नांती परमेश्वर आहे |

©️ वास्तवरंग

(चित्र सौजन्य – श्री आशिष बिवलकर) 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ कवडसा… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ. सोनिया कस्तुरे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “कवडसा…” – ? ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

 

या मोकळ्या आभाळाचे

शब्द तुझ्या ध्यानी आहे..!

*

या नभातल्या चांदण्याचे

तेज तुझ्या नयनी आहे!

*

या क्षणाच्या आनंदाचे

उमज तुझ्या मनी आहे

*

अंतर मनातील लाटांचे

बोध तुझ्या हृदयी आहे !

*

स्नेह-दर्पणाचा कवडसा

जर तुला प्रकाशित आहे ?

*

मग हर्ष-शोक हिंदोळ्याचे

गुपित तुला कळले आहे.

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जखमा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ जखमा… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

जखमा दिल्या फुलाने आहेत खोल काही

बिलगून काळजाला छळतात रोज काही

*

आयुष्य रांगडे हे मजबूत फार झाले

किरकोळ या व्यथांचा नसतोच जाच काही

*

पुसल्या ललाट रेषा मग काळजी कशाची

झाले समर्थ जगणे कसलाच ध्यास नाही

*

कळले कधीच नाही छळले कुणी कुणाला

त्यांचेच खास जुलमी फसले प्रयास काही

*

मागे वळून थोडे निरखून पाहताना

नजरे पुढे नजारे फिरतात गोल काही

*

सुखदुःख मोजताना केलीच नोंद नाही

बिनधास्त पण सुखाचा घडला प्रवास काही

*

गरजे नुसार वेडे फुलतात फार थोडे

काबूत राहणारे नसतात श्वास काही

*

कोणी मदालसाना पाहून गार होतो

सौंदर्य पाहुनीया होतात दास काही

*

त्रासून जिंदगीला त्यागायचे कशाला

थोडे पुढे जगाया बांधू कयास काही

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देवाला विनवणी! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

? कवितेचा उत्सव ?

🌨️🙏 देवाला विनवणी! 🙏🌧️ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

खळ नाही आभाळाला

अविरत धरलीस धार

ओल्या दुष्काळाचे सावट,

करू लागले मनी घर!

*

घे उसंत आता जराशी

नदी नाल्या आले पूर,

वावरात शिरे पाणी

तोडूनिया त्याची मेर!

*

धीर सुटे बळीराजाचा

पाणी डोळ्याचे खळेना,

उघड्या डोळ्यांनी पाहे

पेरणीच्या शेताची दैना!

*

कर उपकार आम्हांवर

पुन्हा एकदा विनवितो,

भाकर तुकडा लेकरांचा

सांग कशास पळवतो?

सांग कशास पळवतो?

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तयात वेगळाल्या छटा… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? तयात वेगळाल्या छटा… ?  सुश्री नीलांबरी शिर्के 

मुळे यांची जमिनीखाली

जमिनीच्या वरती वाढ

वेगवेगळे पान आकार

वेगळे असे प्रत्येक झाड

*

फुलरंग पिवळेच तरी

तयात वेगळाल्या छटा

आकार फुलांचे वेगळे

मनमोहक गंधांच्या लाटा

*

वंश एक जातही एकच

एक सर्वांची गंध कुळी

एकतरी जवळी असावा

सकाळ असो वा सायंकाळी

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सद्गती… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सद्गती… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

(गझल स्वरूप)

ना गताची खंत

ना भविष्याची चिंता चालू आहे तसे राहू दे

सांग मज, प्रवाहात या टिकाव धरू कसा?

 

कुणी सोबतीस आहे

कुणी तोडले संबंध आहे

तूला जे योग्य वाटते, ते तू कर

सांग फक्त, मस्तीत मी माझ्या राहू असा?

 

आप्तस्वकीय रणांगणी

माझ्याच विरोधात उभे

गीता सांगून वळविले मन तूवा

मी अर्जून नाही, हे तूला पटवू कसा?

 

मीच माझा वैरी

मीच आहे विषयी, व्यसनी

पेरले तेच उगवले आहे

मृत्यूनंतर सद्गती मागू कसा?

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares